मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाचलेली आणि वेचलेली माणसे… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ वाचलेली आणि वेचलेली माणसे… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

मी अनेक गावं फिरलो. माणसं वाचली आणि मनात वेचलीत सुद्धा. कधी डोक्याला ताप झाला तर कधी गुरुही भेटले.

भीमाशंकर जवळ असल्याने तिथल्या निसर्ग सौंदर्यात मी आकंठ बुडालो आणि जास्तीत जास्त दिवसांकरता चाकणला बुड टेकवलं. तिथेच डॉक्टर सोनवणेंशी माझी ओळख झाली. आमची इतकी मैत्री वाढली की माझा संध्याकाळी कायम मुक्काम त्यांच्या दवाखान्यातच असायचा.

चाकणचे शेतकरी, व्यापारी, भाजी विक्रेते वृत्तीने धार्मिक आणि भाविक होते. डॉ. सोनवणे म्हणजे त्यांच्यासाठी दैवतच होतं म्हणा नां ! नाही तरी डॉक्टर म्हणजे प्रति परमेश्वरच असतात नाही का?

त्या दिवशी दवाखान्यात खूप गर्दी होती. रिसेप्शनिस्ट रुग्णांना नंबर वारी आत सोडताना मेटाकुटीला आली  होती. कारण नुकतंच तिचं एका तिरपांगड्या, रांगड्या पैलवानाशी भांडण झालं होतं.

मी तिला मदत करीत असतांना तो पैलवान गुरगुरत आम्हाला म्हणाला, “माझा नंबर लवकर का नाही लावत ?” गरम डोक्याच्या त्या महाशयांनी शिव्यांचा भडीमार पण सुरू केला.

गडबड ऐकून डॉक्टर बाहेर आले. त्यांनी खूप समजावलं   त्याला, पण हा बाबा आपला इरेलाच पेटलेला.! शेवटी “बघून घेईन मी डॉक्टर तुम्हाला.! “असं म्हणून तो जमदग्नी तणतणतच बाहेर पडला. मुर्खपणाचा कळस म्हणजे रस्त्यावर जाऊन त्याचं शिव्या देणं चालूच होतं. डॉक्टरांना वाईट वाटलं.

‘अशी माणसं आपल्या आयुष्यात येऊ शकतात का ?’  ह्या विचाराने मीच अस्वस्थ झालो होतो. मात्र प्रसंग सावरत हसत डॉ. म्हणाले, “चला हा ही एक अनुभव.! पाऊस पडताना बघतो आपण. पण असेही अनुभवाचे पावसाळे आपल्या आयुष्यात येतातच. हं, पुढचे पेशंट आत पाठवा”असे म्हणून डॉक्टर आत मध्ये गेले. जरा वेळानी ते पैलवानी वादळ पाय आपटीत निघून गेलं .

इतर पेशंटकडे माझं लक्ष गेलं. वार्धक्यानी वाकलेलं एक जोडपं केव्हापासून कोपऱ्यात अवघडून बसलं होतं‌. त्यांचे उठता बसतांनाचे हाल बघून मी दोनदा त्यांना म्हणालो होतो, “आधी नंबर लावून आत सोडू का तुम्हाला? बसवत नाहीये का तुम्हाला? काही त्रास होतोय का?”

तेव्हा सरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य उमललं आणि ते म्हणाले, “नाही रे बाळा, तरास काय बी नाय. आता नंबरावरी जाऊदे बाबा, इतर आजारी पेशंटना.नाय तर मगा सारका  एकादा आग्या वेताळ त्या देव माणसाच्या डोक्याला ताप द्यायचा. आमची तब्येत मस्  चांगली झालीया. पर एक डाव डागदरला भेटायचयं आमाला.”

मला नवलचं वाटलं त्यांच्या बोलण्याचं. ‘त्रास काही नाही, पण डॉक्टरांना नुसतं भेटायचंय’ म्हणजे काय?

इतक्यात डॉक्टरच बाहेर आले आणि त्या जोडीला बघून आश्चर्याने म्हणाले, “हे काय माऊली! एवढ्या उन्हाचं आलात? अजून बरं वाटत नाही का तुम्हाला?”

कापऱ्या आवाजात कमरेत वाकलेली ती माऊली म्हणाली, “डागदरा, तुझ्या गोळीने ठणठणीत बरी झाले म्या. आता काय बी तरास नाही बघ. तुला एकदा डोळं भरून बघायचं हेच काम होतं. ‘बरे झालो’ ह्येचं सांगाया आलोय आमी. आता फकस्त देवाच्या पाया पडाया आलोया.”

हसत डॉ. म्हणाले, “अहो मग विठोबा मंदिर शेजारी आहे. इकडे कसे काय वळलात?”

यावर दोघजण डॉक्टरांच्या पायाशी वाकले आणि म्हणाले, “डागदरा, अरे तूच आमचा ईठोबा हाईस. मला मरणाच्या दारातून ओढून काढलंस आणि आता फकस्त हे सांगाया आलोया, की तुझ्या गोळीनं उतारा झाला आणि लई बरं वाटतंय आता आमाला. देव तुला सुखात ठेवो.”

आता मात्र चकित होण्याची पाळी आमची होती. डॉक्टर हात जोडून म्हणाले, “गुरुमाऊली माझाच तुम्हाला कोपरापासून शिरसाष्ठांग नमस्कार. गुरुपौर्णिमेलाच गुरु पूजा करावी असं थोडंच आहे ? आज मला साक्षात गुरुदेव दत्त भेटले.”

एव्हाना बाहेरच्या हॉलमधली लोकं आत आली होती. त्यांच्याकडे वळून डॉक्टर म्हणाले, “शाळेच्या प्रांगणात भेटलेले गुरु, हे गुरुच असतात. पण अनुभवाच्या शाळेत हे असेही गुरु भेटतात..आणि आपल्याला नवीन धडा शिकवून जातात. माझ्याकडे अनेक व्याधीग्रस्त पेशंट येतात, पण बरं वाटल्यावर पुन्हा या दवाखान्याची पायरी ‘चढणं नको रे बाबा’ असं म्हणत, दवाखान्याकडे आणि माझ्याकडेही पाठ फिरवून जातात. पण आता आम्हाला बरं वाटतंय हे सांगायला येणारी ही पहिलीच जोडी आहे.”

हा सगळा प्रकार बघून मी भारावलो, खरंच ‘बरं वाटत नाही’ हे सांगायला पेशंट येतात. पण ‘आम्हाला आता बरं वाटतंय’ हे एवढं एकच वाक्य उन्हातून चालत येऊन सांगणारी ही वृद्ध जोडी खरंच महान आहे, गुरुस्थानी आहे. डिग्री वाल्यांनाही हे सुचलं नसतं.

डॉक्टर आपला रोग मानपाठ एक करून, मानसिक क्लेश सहन करून बरा करतात. मग त्यांची परतफेड म्हणून शब्दांची फुंकर घालून आयुष्याचं गणित सोडवणारं हे जोडपं खरंच खूप खूप श्रेष्ठ आहे.

पेशंट मध्ये काही वारकरीही होते. तेही पुढे धावले आणि “विठू माऊली! विठू माऊली!” म्हणून या विठोबा रखुमाईच्या पाया पडले. जणू काही शेजारच्या मंदिरातले विठ्ठल रखुमाई त्यांच्यापुढे उभे होते.

डॉक्टर म्हणजे साक्षात ‘देव असतो’ असं सगळे म्हणतात, पण या दैवत्वालाही शिकवण देणारा गुरु कुठेतरी कधीतरी  भेटतोच.

या प्रसंगावरून मला एक किस्सा आठवला. त्याचं असं झालं, गुलबर्ग्याचे डॉक्टर श्रीनाथ औरादकर यांचेशी व्हाट्सॲप द्वारे माझी ओळख झाली. त्यांनी मला त्यांच्या लहानपणीचा एक मजेशीर, मनोरंजक किस्सा सांगितला.

ते बेळगाव हुबळी प्रवास करीत होते. प्रवासात घाटातून गाडी जात असताना मध्येच एक गृहस्थ उठले, ड्रायव्हरशी आणि कंडक्टर शी काहीतरी बोलले. त्या तिघात काय खलबत् झाली कोण जाणे! ड्रायव्हरने हसून गाडीचा वेग कमी केला. कंडक्टरनी ‘नामी शक्कल’ असं म्हणून दिलखुलास दाद दिली.

शबनम वाल्या गृहस्थांनी मुठभरून खजिना बाहेर काढला. प्रत्येकाला तो खजिना मुठी मुठी ने देताना ते सांगत होते “या पेरू, जांभूळ, करवंद, सिताफळ, चिक्कु इत्यादीच्या बिया आहेत. आपण प्रत्येकाने या बिया घाटात टाकायच्यात.”

डॉ श्रीनाथ त्यावेळी वयाने लहान होते. त्यांच्या डोळ्यात कुतूहल मावत नव्हतं. हा काय प्रकार आहे? सगळे संभ्रमावस्थेत होते.

ते कुतूहल न्याहाळताना हसतच शबनम वाले म्हणाले, “आता पाऊस पडेल. या बिया जमिनीत रुजतील, कोंबं फुटतील, रोपं तरारून डोलतील आणि खट्याळ वाऱ्याशी खेळत जोमाने वाढतील. त्यांची काही वर्षांनी वृक्षं होतील. निसर्गाचं दान आपण त्याचं त्यालाच परत करतोय, हो ना? ही धरणी त्यांना उत्तम प्रकारे जोपासेल. आणि मग फळा फुलांना काय तोटा हो !

आपल्याला नाही त्या फळांचा आस्वाद घेता येणार! पण म्हणून काय झालं! वाटेचा वाटसरू येईल विसाव्यासाठी, झाडाखाली विसावेल आणि फळांचा रसास्वाद घेऊन अगदी प्रसन्न तृप्त होउन पुढे जाईल, खरंय कीं नाही? त्याबरोबर पक्षी, खारुताई, वानर सेना येऊन  पोटोबा शांत करतील ते वेगळंच. काय मग, पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं?”

आणि मग काय! सगळे प्रवासी पुढे सरसावले. दऱ्या खोऱ्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत शंभर मुठीतल्या, लाखो, करोडो बिया धरणीच्या कुशीत विसावल्या. आणि मग साध्या सामान्य वेशातले ते शब्नम वाले, सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय झाले.’

डॉक्टरांनी मला हा साधा पण मोठ्या आशयाचा किस्सा सांगितला. तेव्हा माझ्या मनात आलं, काही वर्षानी मोठे झाल्यावर डॉक्टर त्या घाटातून जाताना ती वाढलेली निसर्ग दत्त देणगी बघून मनात म्हणाले असतील, “किती साधा माणूस, पण केवढा मोठा आशय तो देऊन गेला आपल्या सगळ्यांना, ‘वेष असावा बावळा, परी अंतरी असाव्या नाना कळा’ ही उक्ती आठवली असेल त्यांना. पण काही म्हणा, तो सामान्य माणूस सगळ्यांचाच गुरु झाला होता. आयुष्याच्या शाळेत मार्ग दाखवून, योग्य दिशेने नेणाऱ्या त्या परोपकारी सेवाभावी पर्यावरण प्रेमी सज्जनाला गुरुचीच उपमा योग्य आहे असं मला वाटतंय.अशा सामान्य पण असामान्यत्व प्राप्त झालेल्या गुरूंकडे बघून म्हणावसं वाटतंय..  ‘तस्मै श्री गुरवे नमः’

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोलायचे राहून गेले – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बोलायचे राहून गेले – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(वंदना घरी आली तरी सरांच्या बोलण्याचा विचार करत राहिली. मिताला कुठे बिझी ठेवावे? तिला कसली आवड नाही पण अश्विनपासून तिला लांब ठेवावेच लागेल.) इथून पुढे — 

पुन्हा सर तिच्या मदतीला धावून आले. चार दिवसानंतर ते तिला म्हणाले “वंदना, तुझी बहीण B. Sc आहे ना?”

“हो सर “.

“मग माझ्या डिपार्टमेंटमधील गोगटे मॅडम प्रेग्नन्सी लीव्हवर जात आहेत एक तारीखपासून.त्या जागेवर डेमॉन्स्ट्रेटर म्हणून मिता जर काम करायला तयार असेल तर प्रोफेसर शास्त्रींना मी सांगतो,”.

“पण सर मिताला अनुभव नाही हो, तिला जमेल प्रॅक्टिकल घयायला ? “

“का नाही जमणार? आणि मी असतो ना तेथे. सुरवातीला तिला थोडं अवघड वाटेल, पण पंधरा दिवसात ती तयार होईल “

“ बरं सर.. मी विचारते.. आणि कळविते “ असं म्हणत वंदना क्लासवर गेली.

वंदनाने रात्री आईसमोर मिताला कॉलेजमधील जॉबबद्दल विचारले. हल्ली मिता ताईबरोबर बोलत नव्हती, त्यामुळे तिने तिला उडवून लावले पण जेव्हा तिला कळले की जोगळेकरसरांच्या हाताखाली काम करायचे आहे, तेव्हा ती तयार झाली.

मग वंदनाने मिताच्या नावाचा अर्ज तयार केला आणि प्रोफेसर शास्त्रींकडे नेऊन दिला. शास्त्रीसरांनी एक तारखेपासून प्रोफेसर जोगळेकरना मदत करायला सांगितले आणि अशा रीतीने मिताला तात्पुरता का असेना पहिला जॉब मिळाला.

एक तारखेला वंदना आपल्या गाडीवरून मिताला घेऊन गेली आणि तिची जोगळेकर सरांशी गाठ घालून दिली. सर समोर येताच तिने “थँक्स “ म्हंटले. सरांनी पण हसून मिताचे स्वागत केले.

“आता मिताला थोडे दिवस दाखवावे लागेल पण थोडया दिवसांनी ती स्वतः मुलांचे प्रॅक्टिकल घेईल “

“हो ना सर, तुम्ही असताना तिची काळजी नाही, तुम्ही तिला तयार कराल “.

मिताला नवीन वर्गावर सोडून सर आणि ती कॅन्टीन मध्ये गेली. वंदनाला वाटत होतं, सरांशी काही तरी बोलाव, पण सर समोर असले की तिची बोलती बंद होई.

“सर, जरा सांभाळून घ्या मिताला. मागचं सर्व विसरायला हवं तीने “

“त्याची काळजी करू नकोस वंदना, एकदा काम सुरु झालं की सर्व विसरेल, हें वय वेड असतं. ‘”

वंदनाच्या मनात आले, ‘ किती समजूतदार आहेत सर, आता आपल्यापुढे आहेत तर सांगावे का मनातले? किती दिवस मनातच राहिल्या आहेत भावना.’ 

सरांना मिटिंग होती त्यामुळे ते चहा पिऊन गेले. वंदनाला परत कविता आठवली 

“रोज तुला मी येथे भेटते, बोलायाचे राहून जाते…. “

मिता पहिल्या दिवसापासून खूष होती. आता रोज ती आईला कॉलेजमधील मुलांच्या गमती आणि जोगळेकरसरांचे कौतुक सांगत राहिली. वंदनाचे बारीक लक्ष होतं, मिता आता व्यवस्थित प्रॅक्टिकल घेत होती, एकंदरीत ती कॉलेजमध्ये रमली होती. हेच तर वंदनाला हवं होतं. वडील गेल्यानंतर मिताची जबाबदारी तिने घेतली होती, पण मिता अवखळ होती, म्हणून तिची नाव व्यवस्थित पैलतीराला लावायला हवी  होती .

तिने कॉलेज मध्ये पाहिलं, जोगळेकर सर आणि मिता कॅन्टीनमध्ये थट्टामस्करी करत असत. तिला स्वतः ला सरांची थट्टा कधीच जमली नव्हती.

एकदा ती उशिरा घरी आली तर तिची आई म्हणाली “आज तुमचे जोगळेकरसर येऊन गेले.”

वंदनाला आश्यर्य वाटलं, “सर कसे काय घरी?” तिने आईला विचारले.  तर ती म्हणाली “अग मिता दोन दिवस कॉलेजमध्ये गेली नव्हती ना, म्हणून पहायला आले.”  तिला कमाल वाटली सरांची. तसे सर कॉलेज मध्ये माझ्याकडे चौकशी करू शकले असते ना?

वर्ष संपत आले, कॉलेजमध्ये परीक्षा सुरु होत्या. आता एप्रिलअखेर मिताचा जॉब संपणार होता. मिता पण नर्व्हस झाली होती, आता दुसरीकडे कुठे जॉब असेल तर.. वंदनाने तिच्या नोकरीसाठी कुठे कुठे सांगून ठेवलं होतं. एका गोष्टीचं वंदनाला समाधान होतं, मिताने अश्विनचा नाद पूर्ण सोडला होता,कारण अश्विन नवीन मुलीबरोबर दिसत होता.

एप्रिल अखेर एक दिवस सरांचा फोन आला “वंदना, महत्वाचे बोलायचं होतं, उद्या सायंकाळी त्या हॉटेलमध्ये भेटशील का?” 

वंदनाच्या शरीरावर मोरपीस फिरवल्यासारखे झालं. तिने ओळखले सर काय बोलणार आहेत ते? खरं तर तिलाच सरांना विचारायचं होतं पण,”बोलायचे राहून जाते ‘असे तिचे होत होते. ‘काही हरकत नाही, आपल्या संस्कृतीत पुरुषच पुढाकार घेतो,’ तिच्या मनात येत होतं, आपलं लग्न होण्याआधी मिताला जॉब मिळायला हवा, मग ती आणि आई राहतील, मग मिताचे लग्न.. मग आई एक महिना माझ्याकडे एक महिना मिताकडे .’ ..

पुरी रात्र वंदनाला झोप आली नाही, या कुशीवरून त्या कुशीवर ती तळमळत राहिली. सर काय बोलतील.. मग आपण लाजायचं.. मग हळूच हो म्हणायचं.. तिचं स्वप्नरंजन  रात्रभर सुरु होतं.

तिला शोभणारे कपडे नेसून, हलकासा मेकअप करून हसरा चेहेरा ठेऊन ती सायंकाळी हॉटेलमध्ये गेली. सर वेळेवर आलेच. त्यानी दोन कप कॉफीची ऑर्डर दिलीं आणि ते बोलू लागले….. 

“वंदना, माझे आईवडील आले आहेत. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत माझे दोनाचे चार हात होताना त्यांना पहायचे आहे ‘

वंदनाच्या मनात आले केवढी ही सरांची प्रस्तावना, त्याची काही गरज आहे का? सरळ सांगायचे, तू मला आवडतेस म्हणून.

सर बोलत होते,” माझे वय एकतीस वर्षे आहे, त्यामुळे आता लग्न करणे आवश्यकच आहे. तू मागे म्हणाली होतीस, सर माझ्यामागे घट्ट उभे राहा, मी तुला जमेल तसे सल्ले दिले, तुला ते पटले असतील.

मिताला तिच्या प्रेमातून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आपण यशस्वी झालो.  पण मी तिच्या आठ महिन्याच्या सहवासाने तिच्यात अडकलो. वंदना, मला आणि मिताला लग्न करायचे आहे, पण तुझी आणि आईची परवानगी हवी.” … वंदनाला वाटले, जग आपल्याभोवती फिरत आहे. तिच्या कानात सरांचे उदगार घुमत राहिले “मला आणि मिताला लग्न करायचे आहे.. मला आणि मिताला लग्न करायचे आहे… मला आणि मिताला लग्न करायचे आहे….. “

वंदना सटपटली. तिच्या घशाला कोरड पडली. आपल्या डोक्यात कुणी लोखंडाचे घण मारीत आहे, असे तिला वाटले. तिचा विचित्र चेहेरा पाहून सर म्हणाले “काही होतंय का वंदना.. तुला मितासाठी मी पसंत नसेल तर तसे सांग..”

वंदना सावरली,”तसे नाही सर, तुम्हाला पसंत न करणारे म्हणजे…. “

तिला पुढे बोलवेना, डोळयांतून अश्रूचा पूर धडका मारत होता, तिने स्वतः ला सावरले आणि ती म्हणाली 

“माझी पसंती आहेच सर पण आईला विचारते “ असं म्हणून ती बाहेर पडली.

वंदना कशी घरी आली, गाडी कशी चालवली.. तिच्या काही लक्षात नव्हते. तिने घरात प्रवेश केला मात्र, आई हसतहसत बाहेर आली “अग, तुला मिताची काळजी वाटायची ना, बघ तिने व्यवस्थित स्थळ पटकवले, अग जोगळेकरसरांनी तिला मागणी घातली, आहेस कुठे?”

वंदनाने पण काही माहित नसल्यासारखे सोंग केले “आई, तुला कुणी सांगितलं?”

“ अग मिता सांगते आहे, शनिवारी त्याचे आईबाबा भेटायला यायचे आहेत.”

“होय काय? अभिनंदन मिता. चांगला नवरा पटकवलास. आई, शनिवारच्या कार्यक्रमांची तयारी करायला हवी “

वंदनाने अश्रूना बांध घातला आणि ती मिताच्या लग्नाच्या तयारीत जुम्पलीं. त्याच वेळी ती आपल्यासाठी लांबच्या कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज करू लागली.

मे अखेरीस मिता आणि जोगळेकरसर विवाहबंधनात अडकले.

दुसऱ्या दिवशी वंदना लातूरच्या कॉलेजमध्ये हजर होण्यासाठी आईसह एस.टी त  बसली.

…… पण काही केल्या तिच्या मैत्रिणीची कविता तिचा पिच्छा सोडत नव्हती ….  

” रोज तुला मी येथे भेटते, बोलायचे राहून जाते..” 

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोलायचे राहून गेले – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बोलायचे राहून गेले – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(या मूर्ख मुली, डोळयांवर पट्ट्या बांधतात की काय कोण जाणे. स्टेजवरचा हिरो स्वतःच्या आयुष्यात झीरो असतो, हें यांना कळतच नाही.) – इथून पुढे — 

“अश्विन, तुला तुझ्या आईसमोर सांगते, माझ्या बहिणीचा नाद सोड, तिला फोन जरी केलास तर असशील तेथे येऊन तुझे पाय मोडून ठेवीन “

पर्स घेऊन वंदना बाहेर पडली, आता तिची स्कुटी कॉलेज रस्त्याला लागली. गेल्या वर्षीपासून ती फिजिक्स डिपार्टमेंटला लेक्चरर म्हणून लागली होती. आज तिला पहिला तास नव्हता. ती आपल्या खुर्चीवर येऊन बसली. आज तिचे डोके गरम झाले होते. वडील गेल्यानंतर तिने आईला आणि छोटया बहिणीला सांभाळले होते. वडिलांची अर्धी पेन्शन आईला मिळत होती, त्यात दोघींची शिक्षणे पार पडली. लहानपणापासून तिच्यावर जास्त जबाबदारी. तिने मिताला जास्त त्रास होऊ दिला नव्हता. सगळे आर्थिक व्यवहार, घरात काय हवं काय नको, तीच पहात होती. मग तिने M. SC केले आणि गावातील कॉलेजमध्ये लागली. बहिण मिता Bsc झाली, पण पुढे शिकेना किंवा नोकरीसाठी प्रयत्न करेना, म्हणून तिची चिडचिड व्हायची, त्यात आज मिता-अश्विन यांचं  प्रकरण? 

लहानपणापासून जबाबदाऱ्या पडल्याने ती रोखठोक झाली होती. कुणाच्या जास्त जवळ जात नव्हती. नाटकाचा ग्रुप होता पण तो पण नाटकापुरता. एकप्रकारचा कोरडेपणा तिच्या आयुष्यात आला होता. ती खुर्चीत शांत बसलेली पाहून त्याचवेळी आत आलेले जोगळेकरसर  तिच्याकडे पहात म्हणाले “वंदना, आज एकदम गप्प?” 

वंदना याच कॉलेजची विद्यार्थिनी.. ती फायनल इयरला असताना जोगळेकर नवीनच या कॉलेजला आले होते. अतिशय हुशार, देखणे – जोगळेकर सरांबद्दल तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होता. या 

कॉलेजमध्ये फक्त जोगळेकर सरांसोबत तिला बोलायला आवडायचे. त्यांचे बोलणे तिला ऐकत रहावेसे वाटायचे.

“हो सर, थोडी विचारात होते. तुम्ही केव्हा आलात सर?”

“आत्ताच, पहिला तास मला नव्हता म्हणून जरा उशिरा आलो, घरी पण सर्व आवरून यावं लागत ना?”

“सर, मला पण पहिला तास नव्हता आज, म्हणून उशिरा आले. सर, तुम्हाला सायंकाळी थोडा वेळ आहे? थोडा बोलायचं होतं “

“हो, पाचला प्रॅक्टिकल संपतील मग समोरच्या रेस्टॉरंटमध्ये बोलू “

“हो सर, मी वाट पहाते “. 

सर आपल्या वर्गावर गेले. वंदनाने पण वर्गावर जायची तयारी केली. आज सर सायंकाळी भेटणार याने तिला आत्तापासून आनंदी  वाटत होते. सरांना सकाळचा घरचा विषय सांगायचा आणि त्त्यांचा सल्ला घ्यायचा. सर योग्य तेच सांगतील याबद्दल तिला खात्री होती आणि सरांबरोबर कॉफ़ी प्यायला मिळणार होती, मुख्य म्हणजे सर एक फुटावर असणार होते, त्यांच्या डोळ्यात पाहून बोलता येणार होतं..

वंदनाची लेक्चर्स पाचपर्यंत संपली. संपूर्ण दिवस काम केल्याने ती दमली होती, मग ती वॉशरूममध्ये गेली आणि तिने चेहेरा स्वच्छ धुतला. आता थोडया वेळाने सर भेटणार होते म्हणून ती जास्तीत जास्त बरी दिसण्याचा प्रयत्न करत होती. तिने आरशात पाहिले – तशा आपण सावळ्या , आई सारख्या. मिता गोरी, सुरेख बाबासारखी.. तिने परत परत आरशात वळून वळून पाहिले. आपण सावळ्या  असलो तरी चेहेरा तरतरीत आहे, बांधा पण चांगलाच. उंची चांगली. मिता थोडी घारी, उंची थोडी कमी तिची. पण ती गोरी असल्याने आकर्षक दिसते.

सर उंच, कोकणस्थ असल्याने गोरे. आपण सरांना शोभून दिसू का?

पण हे मनातील मांडे. खरंतर सर दिसले की आपली ततपप होते, घाम सुटतो, अंगाला कंप सुटतो. असं  का होतं? इतर पुरुष समोर आले तर आपण बिनधास्त असतो, कुणी जादा धिटाइ केली तर दोन कानाखाली द्यायला कमी करत नाही. मग सर समोर आले की…

सहा वाजता ती रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली. पाच मिनिटांनी सर आले. सकाळपासून ते पण कामात होते तरी सर तरतरीत दिसत होते. सरांनी तिला पाहिले, ते हसले आणि तिच्यासमोर येऊन बसले.

“थोडा उशीर झाला, कॉफी घेऊया काय?”

“हो सर “

सरांनी कॉफ़ी मागवली आणि ते म्हणाले 

“बोल, काय बोलायचं होतं?”

वंदना मनात म्हणाली, ‘ खूप बोलायचंय सर, पण शब्द बाहेर पडत नाहीत.

मग ती म्हणाली “सर काही मनात शंका असली की मी तुमच्याशी बोलते, तुमच्याशी बोलले की बरं वाटतं.”

“हो कल्पना आहे, बोल.”

“सर, माझ्या बहिणीबद्दल मी काळजीत आहे, तिने स्वतः चे लग्न जमवलेय. जो मुलगा तिने निवडलाय तो माझा मित्र, नाटकातल्या ग्रुपमधील. पण तो स्वतः काही कमवत नाही, बरं त्याची या आधी दोन प्रेमप्रकरणे मला माहित, म्हणून मी विरोध केला, कोणत्याही परिस्थितीत लग्न होऊ देणार नाही असे तिला सांगितले. त्यामुळे मी डिस्टर्ब आहे सर..मी काय करावं अशा परिस्थितीत?”

“तुझी बहीण म्हणजे मिता ना? ओळखतो मी तिला. ती पण माझीच विद्यार्थिनी. काय असतं  वंदना, हे वय वेडे असते. या वयात आंधळेपणाने प्रेम होते, म्हणून सांभाळले पाहिजे. मला वाटते सध्याच्या काळात स्त्री ने पण स्वावलंबी असायला हवं, आर्थिक आणि विचाराने सुद्धा. तुझी बहीण सध्या काही काम करत नाही, पैसे मिळवत नाही, त्यामुळे तिच्या डोक्याला आराम मिळतो, म्हणून हे असे उद्योग सुचतात. तू या लग्नाला विरोध केलास हें योग्यच, कारण पुरुष जर स्वतः साठी दोन पैसे कमवत नसेल तर उद्याच्या संसाराची जबाबदारी कशी निभावेल ? अर्थात तूझ्या बहिणीला यातून बाहेर काढणे, हें तुझे कौशल्य असेल. तिला कोणत्या तरी कामात अडकवून ठेवायचं किंवा तिचे लक्ष दुसरीकडे वळवायचं म्हणजे ती हें सारं विसरेल.” 

“हो सर, तुम्ही योग्य बोललात, तिचे लक्ष दुसरीकडे वाळवायला हवे, म्हणजे कसे?”

“तिला कोणता तरी जॉब मिळत असेल तर पहा म्हणजे तिचे लक्ष तिकडे जाईल “

“हो सर, मी बघते, काहीतरी प्रयत्न करते “

“आणि माझी काही मदत हवी असल्यास सांग, मी तुझी काळजी दूर करण्यासाठी नेहेमीच असेन, बरं  निघूया..” 

सर उठले पाठोपाठ वंदना उठली. सरांनी कॉफ़ीचे बिल दिले आणि स्कुटर सुरु करून सर गेले. सर गेले त्या दिशेकडे वंदना पहात राहिली, लांब दूर जाईपर्यत..

वंदनाला कविता आठवली 

“रोज इथे मी तुला भेटते, बोलायचे राहून जाते…. “ 

आजही सरांना मनातील.. अगदी आतल्या मनातील बोलायचे.. सांगायचे राहूनच गेले..

वंदना घरी आली तरी सरांच्या बोलण्याचा विचार करत राहिली. मिताला कुठे बिझी ठेवावे? तिला कसलीच  आवड नाही, पण अश्विनपासून तिला लांब ठेवावेच लागेल.

  

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोलायचे राहून गेले – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बोलायचे राहून गेले – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

वंदना बाहेर पडण्याची तयारी करत होती.  एव्हड्यात तिची मैत्रीण सीमा चा फोन आला. सीमाचा खुप दिवसांनी फोन, म्हणून वंदना आंनदीत झाली.

वंदना –” काय सीमे? आज एवढ्या लवकर उठलीस वाटतं?”

सीमा –” म्हणजे काय वंदे? मी लवकर उठत नाही अस म्हणायचंय तुला?”

वंदना –”उठतेस ग, पण कामाशिवाय तू फोन करणाऱ्यातील नाही, म्हणून आश्यर्य वाटलं.”

सीमा –” ते बरोबर ओळखलस, बर वंदे, मी फोन केला म्हणजे तुमची मिता आणि अश्विन यांचा प्रेमप्रकरण जोरात सुरु आहे, तुला माहित आहे ना?”

वंदना –” काय? मिता आणि अश्विन? नाही ग, मला आत्ताच समजतंय, आता खडसवून विचारते मिताला, नोकरीं वगैरे बघायची सोडून प्रेम करते? आणि ते पण अश्विन, तो उनाड पोरगा?”

सीमा –”अग पण अश्विन तुझा मित्र ना?”

वंदना –” हो ना, एका नाटकाच्या ग्रुपमध्ये आहोत आम्ही चार वर्षांपासून. पण मैत्री फक्त ग्रुप मध्ये आणि नाटकात, वैयक्तिक आयुष्यात नाही. तो कसा आहे फुलपाखरासारखा हें मला माहित आहे. आज पर्यत तीन चार मुलीबरोबर दिसायचा. पण आता माझ्या बहिणीबरोबर? थांब विचारते दोघांनाही.”

सीमा –” ए बाई, माझं नाव घेऊ नकोस हा?”

वंदना –”नाही घेणार पण दोघांनाही सरळ करते की नाही बघ.” 

सीमाने फोन खाली ठेवला.

वंदनाचा संताप संताप झाला. जेमतेम वीस वर्षाची ही आपली बहिण, गेल्या वर्षी B. Sc झालेली, पुढे काही शिक म्हटलं तर टाळाटाळ करणारी, आईच्या पेन्शनवर जगणारी प्रेमाचे इष्क उडवू लागली आहे आणि कुणाबरोबर? तर त्या खुशालचेंडू अश्विनबरोबर?

वंदना कडाडली ” मिता, आत्ता माझ्यासमोर ये, ताबडतोब “

तिचे ओरडणे ऐकून त्या दोघींची आई घरातून बाहेर आली 

” काय झालं ग, कशाला ओरडू लागलीस?

“अग आई, ही आपली मिता त्या अश्विनबरोबर प्रेमाचे चाळे करते आहे म्हणे जोरात “

“अग पण तुला कोणी सांगितलं?”

“मला कोणी सांगितले हें महत्वाचे नाही, तिला विचार खरे का खोटे?”

“ती बाथरूममध्ये गेली आहे ‘

आईने हें वाक्य म्हणता म्हणता मिता आंघोळ करून बाहेर आली 

“काय कशाला आवाज वाढवलास वंदनाताई?

“तुझाच विषय, मी तुला म्हंटल पुढे शिक किंवा चांगला कोर्स कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. आईच्या अर्ध्या पेन्शनवर राहू नकोस,तर तुला जमत नाही आणि त्या अश्विनबरोबर फिरते आहेस म्हणे गावभर “

“कुणी सांगितलं तुला?”

“खोटे आहे का सांग. अश्विनला जाऊन विचारू? बाबा रे, तू कमवतोस किती? दोन वर्षांपूर्वी त्या नयना बरोबर तुझे प्रेमाचे चाळे चालले होते, त्या आधी मामेबहिणीबरोबर, आता तुला माझी बहिण मिळाली का,? विचारू त्याला?”

“आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहोत.”

“होय काय?”

“मग तीन वर्षांपूर्वी तो त्याच्या मामेबाहिणी लग्न करणार होता, आता ती कुठे गेली कोण जाणे, मग नयना बरोबर करणार होता, नयना मागे पडली, आता तू मिळालीस?”

“ते सगळे जुने विषय झाले ताई “

“आई बघितलंस, तुझं लाडकं कोकरू कस तुरुतुरु बोलतंय ते? तोंड फोडीन मिते, पहिलं काही कमवायला शिक, मग प्रेम कर, मग लग्न कर, लग्न करून खाणार काय? की परत आईकडे भीक मागणार?”

“ताई, आई आम्ही लग्न करणार आहोत.

“कशी लग्न करतेस तेच पहाते. जिथे असशील तेथे येऊन बडवीन, त्या अश्विनला पण पहाते “

“पण अश्विन तुझा मित्र ना ताई?”

“मित्र नाटकाच्या ग्रुपमध्ये, वैयक्तिक आयुष्यात नाही, तो स्टेजवर कलाकार म्हणून चांगला आहे, तो शाळा कॉलेजमध्ये जाऊन नाटकें बसवतो म्हणून तुम्ही मुली त्याच्या प्रेमात पडता, पण वैयक्तिक आयुष्यात अश्विन कसा आहे तो माझ्याएवढा कुणाला माहित नाही. म्हणून परत परत सांगते मिता, तू अश्विनचा नाद सोड. आई तिला सांग, एवढे मी बोलून सुद्धा तिचे प्रेमाचे चाळे सुरु राहिले, तर माझ्याएवढी वाईट कुणी नाही “

मिता रागारागाने आपल्या खोलीत गेली आणि कॉटवर झोपून रडू लागली.

डोकं गरम झालेलीं वंदना बाहेर पडली, तिने आपली स्कुटी चालू केली आणि कॉलेजला जायच्याऐवजी ती अश्विनच्या घरी पोहोचली. अश्विनची आई स्वयंपाक घरात भाजी चिरत होती. तिला पहाताच ती म्हणाली,

“वंदे, किती दिवसांनी वाट मिळाली? नवीन नाटकाच्या तालमी सुरु होणार की काय?”

“नाही हो काकू, सहज आलेले. अश्विन कुठे गेला?”

“झोपलाय.?”

“झोपलाय? “ वंदनाने घड्याळात पाहिले. साडेनऊ वाजले होते.

“अजून झोपलाय?”

“काय सांगायचं वंदे, रात्री उशिरा येतो बाराला आणि दहापर्यत झोपून असतो, त्याच्यासाठी नोकरी बघ कुठेतरी, घरखर्च कसा चालवायचा? थोडं  भाडं  येत त्याचावर संसार “.

“मग प्रेम करायला कस जमत? नोकरी नाही, दोन पैसे कमवत नाही, पण वर्षाला एक पोरगी पटवायला जमते कशी?”

“आता बाई नवीन कोण? माझ्या भावाची मुलगी रेश्मा तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणत होता, मग काय झालं कोण जाणे, आता तीच नाव काढत नाही “

“आता माझ्या धाकट्या बहिणीबरोबर मिताबरोबर प्रेमाचे चाळे सुरु आहेत म्हणे, पण त्याला सांग, गाठ माझ्याशी आहे, हातपाय मोडून ठेवीन “

तेवढ्यात खोलीतून झोपलेला अश्विन बाहेर आला. तिला पहाताच चपापला, मग म्हणाला “वंदे, सकाळी सकाळी?”

वंदना एक शब्द पण बोलली नाही. पण अश्विनची आई त्याला म्हणाली,”वंदी चिडली आहे, तू म्हणे तिच्या बहिणीबरोबर सध्या फिरतो आहेस?”

“हो हो.. म्हणजे हो.. प्रेम करायला आणि संसार करायला कुणाची बंदी आहे की काय..”

“प्रेम नंतर कर रे, आधी दोन पैसे कमव, तुझ्या आईला दोन पैसे आणून दे, नुसत्या सिगरेटी ओढून आणि बिअर पिऊन संसार होतं नाही “

“आमच्यात तू पडू नकोस वंदे, मिताची ताई असलीस म्हणून काय झाल.?”.

“मिताची ताई असलीस तर काय झाल? मोडून ठेवीन अश्विन. तो नारायण माहित असेल तुला आपल्या ग्रुपमधला, माझ्यावर लाईन मारू पहात होता, मला जाता येता धक्के मारू लागला, त्याचा हात आणि पाय मोडून ठेवला सर्वासमोर. माझ्यासमोर हुशारी करू नकोस, दरवर्षी नवीन नवीन मुली फिरवतोस चांगल्या घरातल्या. या मूर्ख मुली, डोळयांवर पट्ट्या बांधतात की काय कोण जाणे. स्टेजवरचा हिरो स्वतःच्या आयुष्यात झीरो असतो, हे यांना कळतच नाही.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन बोधकथा : विकतची डिग्री / आंधळे प्रेम ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ दोन बोधकथा – विकतची डिग्री / आंधळे प्रेम ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(१) विकतची डिग्री 

अतिशय श्रीमंत बापाचा सुमेध एकुलता एक मुलगा. काही म्हणजे काहीच कमी नव्हते त्याला.म्हणेल तेव्हा म्हणेल ते, ज्यावर बोट ठेवेल ती गोष्ट त्याला मिळत होती.

दिवसेंदिवस त्याच्या मागण्या वाढत होत्या आणि त्या तत्परतेने पूर्ण करण्यात आई बाप स्वतःला धन्य मानत होते.

सहाजिकच सुमेध हेकेखोर तर झालाच पण अभ्यासात ही त्याचे लक्ष लागतं नव्हते. कसाबसा पास होत तो दहावीत पोहोचला. पण परीक्षेच्या वेळी तो घाबरला. आता कसे होणार? पण वडिलांनी त्याला फक्त परिक्षा दे म्हणून सांगितले आणि मग पैशाच्या बळावरच तो पास झाला. त्याला सायन्सला ऍडमिशन मिळाली. दहावीचाच कित्ता पुढे गिरवला गेला आणि तो बारावीच नाही तर डॉक्टरही झाला.

पैसा असल्याने त्याला मोठे हॉस्पिटल बांधून दिले. आणि मग काय डिग्री हातात, मोठे हॉस्पिटल नावावर कोणताही पेशन्ट आल्यावर त्यावर स्वतः उपचार न करता या डॉकटरकडे त्या डॉक्टरांकडे पाठवायचे आणि पेशंटला लुटायचे अशी प्रॅक्टिस सुरु झाली.

एकदा सुमेधचे वडीलच खूप आजारी पडले. नातेवाईकांनी त्यांना सुमेधच्याच हॉस्पिटलमध्ये आणले.

वडिलांना पाहून सुमेधला रडू फुटले. रडत रडत तो बाबांना म्हणाला मला माफ करा बाबा. मी तुमच्यावर उपचार नाही करू शकत. तुम्हाला मी दुसऱ्या चांगल्या डॉक्टरांकडे पाठवतो. माझाच मित्र, त्याला माझ्यापेक्षा कमी डिगरी आहे पण त्याचे निदान एकदम बरोबर असते. तो स्वतः त्याच्या पेशंटना बरे करतो. आणि हो मी पाठवलेले पेशन्ट सुद्धा तो अगदी खडखडीत बरे करतो.

बाबांना सुद्धा लक्षात येते.’ केवळ डिगरी मिळवली म्हणजे ज्ञान मिळालेले असतेच असे नाही.’ 

वडील मित्राच्या हॉस्पिटल मधे जाऊन चांगले बरे होतात. मित्राचा हातगुण पाहून म्हणतात हेलिकॅप्टरने अती उंच शिखरावर पोहोचून शिखर सर केल्याच्या आनंदापेक्षा अवघड वाटेने स्वतःच्या मेहनतीने थोड्या कमी उंचीवर पोहोचले तरी ती उंची गाठल्याची किंमत ही वरच्या मुलापेक्षा जास्तच असते. पैशाने डिग्री मिळवता येते. ज्ञान नाही. पैशाने मिळवलेली डिग्री लोकांच्या प्राणासाठी घातकही ठरू शकते.

(२) आंधळे प्रेम 

सुखवस्तु कुटुंबात राहणारा सुशील. खुप हुशार, सगळ्यांचा लाडका पण थोडा खोडकर. त्याचा लहानसहान खोड्यांकडे अजून तो लहान आहे म्हणून दुर्लक्ष केले जाई. आजी तर म्हणे आमचा कृष्ण आहे तो. करू दे खोड्या.

प्रेमाच्या नादात कोणी त्याला समजावून सांगण्याच्या भानगडीत पडले नाही. किंबहुना त्याला समजावयाला गेले तर तो मुद्दाम जास्त खोड्या काढायचा. मग डॉक्टर पण म्हटले काही मुले असतात  व्रात्य, over active, पण नंतर समज वाढली की होतात शांत आपोआप.

असेच दिवस जात होते. मुलाच्या खोड्या काही कमी होत नव्हत्या. अचानक किरकोळ आजाराचे निमित्त झाले आणि सुशीलच्या वडिलांना देवाज्ञा झाली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. आधीच खोडकर असलेल्या सुशीलवर सहानुभूतीचा दयेचा वर्षाव होऊ लागला. त्यामुळे तो निर्ढावू  लागला. छोट्या मोठ्या खोड्यांचे स्वरूप शेजाऱ्या पाजार्यांना त्रासदायक होऊ लागले. तशा तक्रारी त्यांनी आईकडे केल्या.

आई पण मोठ्या कंपनीत कामाला असल्याने आर्थिक बळ खूपच होते. आईला मुलाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम द्यावे लागतं होते आणि ती ते द्यायचा पूर्ण प्रयत्न करत होती. याच भावनेतून तिला आपल्या मुलाला कोणी काही बोललेले सहन व्हायचे नाही. ती पैशाने त्या व्यवहारावर पाणी फिरवत होती.

मुलाने कोणाची गोष्ट तोडली, दे त्यांना नवी गोष्ट आणून, कोणाच्या घरातून पैसे चोरले, किती पैसे चोरले विचारून पैसे परतफेड करणे, कोणाच्या वळवणात पाणी ओतले एवढे नुकसान झाले का दे भरून…

कोणी काही मुलाला म्हणू नाही म्हणून आई सढळ हात ठेवत होती. त्याने शेजाऱ्यांचे समाधान होत नव्हते पण बाई माणसाला कसे सांगायचे, वडीलाविना पोराला वाढवतीय जाऊदे असे म्हणून सोडून देत होते.

असे करून एक प्रकारे आपण मुलाचे नुकसान करत आहोत हेच मुळी तिच्या लक्षात येत नव्हते. माझ्या मुलाला कोणी काही बोलायचे नाही, आमचे आम्ही पाहून घेऊ अशीच तिची भूमिका असायची.

दिवस, महिने, 5 वर्ष लोटली पण वागण्यात काहीच फरक नव्हता ना सुशिलच्या ना त्याच्या आईच्या. सोसायटीतले लोक पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण असा विचार करून गप्पच होते.

एक दिवस त्याने शाळेतल्या मुलीची छेड काढली. पोलिसांनी पकडून नेले पण वय जास्त नसल्याने कोणी त्याला मारलेही नाही. आईनेही येऊन मध्यस्थी केली पैसे देऊन हे प्रकरण मिटवले. पोलिसांनी कडक शब्दात समज देऊन त्याला सोडून दिले.

सुशील तर अजूनच निर्ढावला.आई त्याला चकार शब्दाने बोलत नव्हती. तिला पण त्रास होत होता पण बापाविना पोर वाढवायच्या नादात ती त्याला घडवत नव्हती.

शेवटी एक वयस्क बाई तिच्या आईसारखी असणारी तिने सुशिलच्या आईला सांगून बघायचे ठरवले.

सुट्टीच्या दिवशी दुपारी निवांतपणे त्या सुशीलकडे गेल्या. गप्पा मारता मारता सुशिलचा विषय काढला मात्र सुशिलची आई चवताळली. ती त्या आज्जीना काही बोलणार एवढ्यात एक शेजारी सुशीलची तक्रार घेऊन आले. पार्किंगमधल्या गाडीचा सायलेन्सर काढून त्याने आईच्या गाडीच्या डिकीत ठेवला होता. हे पाहून तक्रार करत असताना सुशीलही तेथे आला. त्याने मी काही केले नाही असे म्हणून ती गोष्ट उडवून लावली आणि नेहमीप्रमाणे आईने काही पैसे देऊन त्या शेजाऱ्याला गाडी दुरुस्त करून घे. पैसे कमी असतील तर अजून देईन सांगून त्याचे तोंड बंद केले.

शेजारी निघून जाताच आजीने सुशीलला आवाज दिला सुशील येताच त्यांनी आईला दटावायला सुरुवात केली आणि दटावताना एक आईच्या मुखात लगावून द्यायचे धाडसही दाखवले.

अनपेक्षित घटनेमुळे दोघेही सुन्न झाले. ते रागाने आजीकडे पहातच होते पण त्यांना बोलण्याची संधी न देताच आजीच बोलू लागली…

“ मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप रागावलाय. पण माझाही नाईलाज झाला आणि माझ्याकडून हे कृत्य घडले. सुशील बेटा चूक तुझी होती पण शिक्षा आईला झाली. कसं वाटलं रे तुला?” 

सुशील तर पार चक्रावून गेला होता. पण घाव वर्मी बसला होता आपल्यामुळे आपल्या आईला शिक्षा झाली हे त्याने पहिल्यांदाच पाहिले होते. ते त्याच्या मनाला एकदम लागले. तो फक्त डॊळे मोठे करून पहात बसला.

आई म्हणाली “ काय हो मला का मारलेत? मी काय केलं? “ तसे आजी म्हणाली “ तू आंधळं प्रेम केलंस. आपल्या पोराने चूक केली आहे हे समजून सुद्धा दरवेळी त्याला पाठीशी घातलंस. त्याच्या चुका निस्तरण्यासाठी तुझा कष्टाचा पैसा खर्च केलास पण त्यातून मुलाला काही बोध नाही दिलास. अजून वेळ गेलेली नाही. मुलाला वाढवणे म्हणजे त्यांना त्यांची मनमानी करू देणे नव्हे. त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे नव्हे. तर त्यांना घडवण्यासाठी वेळेवर कठोर व्हायलाच हवे. त्यांना शासन आईच करू शकते. कृष्णाला सुद्धा त्याच्या यशोदा मय्याने बांधून ठेवणे, मारणे, अबोला धरणे यातून तो चांगला घडावा म्हणून शासन केलेच होते. जन्म न देता मुलाच्या चांगल्या भवितव्यासाठी माय शिक्षा देऊ शकते तर मग ज्या मुलाला तू जन्म दिला आहेस त्या मुलाला घडवताना सांगून पटत नसेल तर शासन आईनेच करावे लागते ना?  मुलाला वाढवताना त्याला चांगले घडवावे पण लागते. घडवताना थोडे कठोरही व्हायचे असते. आंधळे प्रेम मुलाला पांगळे तर करतेच पण त्याच्या आयुष्याचेही नुकसान करते. सोन्याचा दागिना घडवताना त्याला घाव तर सोसावे लागतातच पण अग्निदिव्यातूनही जावे लागते. ते काम सोनाराला कुशलतेने करावे लागते.

मडके घडवताना त्याला आकार देताना थापटावे लागते, चाकावर फिरावे लागते आकार देताना थोपटले तरी आत आधाराचा हात द्यायला पाहिजे आकार घेताच हळूच हात काढून भट्टीत तावून सुलाखून काढले पाहिजे हे काम त्या कुंभाराला करायला पाहिजे. दागिना नीट नाही झाला, मडके कच्चे राहिले तर दोष सोनार, कुंभारालाच दिला जातो,  म्हणून मी शिक्षा तुला दिली. अजूनही वेळ गेलेली नाही. तू मुलाला सुधार, घडव. त्याच्या दोन कानाखाली वाजवून गांभीर्य समजावून सांग मग बघ…” 

.. .. असे म्हणून आजी निघून गेली आणि आईला प्रेम आणि आंधळे प्रेम यातला फरक कळला 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅटरी – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ बॅटरी – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(ती श्वास रोखून त्या गाडीच्या निघून जाण्याची वाट बघत होती. तेवढ्यात त्या गाडीचे ब्रेक जोरात दाबले गेले आणि चर्र करत ती थांबली.) – इथून पुढे — 

कोणीतरी तिच्या गाडीवर टक टक केलं. काहीतरी धोका आहे, नाहीतर हा गाडीवाला का थांबला असेल? हे जे काही आहे, ते या रात्रीतलं आणखी एक चक्रीवादळच आहे! ती श्वास रोखून पडूनच राहिली, अजिबात न हलता.

“हॅलो! मी मदत करू शकतो, दार उघडता का?”

ती गप्पच राहिली.

“मी पाहिलं आहे तुम्हाला, तुम्ही इथे गोठून जाल. घाबरू नका.”

आता काही पर्यायच नव्हता. तिनं कसाबसा दरवाजा उघडला आणि बोलली—“माझी बॅटरी डेड झाली आहे, फोन पण डेड आहे आणि मी पण मरणारच आहे. तुम्ही जा.”

“मी तुमची गाडी जंप स्टार्ट करून देऊ शकतो.”

सोफिनी काही म्हणायच्या आत तो अगांतुक तिच्या गाडीचं बॉनेट उघडू लागला. तो थंडीने कुडकुडत होता, आणि तीच परिस्थिती सोफीची पण होती. बोलण्यासाठी तिनं फक्त तोंड उघडं ठेवलं होतं, बाकी सगळं गुरफटलेलंच होतं. बोलताना तोंडातून भरपूर वाफ बाहेर पडत होती. दोघंही थंडीमुळे थरथरत होते. सोफीची थरथर त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. थंडी आणि भीति दोन्हींचा एकत्र हल्ला झालेला होता तिच्यावर. त्याने जंप स्टार्ट करून दिली गाडी आणि म्हणाला, “आता गाडी बंद करू नका, इंजिन चालूच ठेवा. मी तुमच्या मागून गाडी चालवत रहातो.”

“तुम्ही गेलात तरी चालेल, मी ठीक आहे आता. मी फोन पण लावते चार्जला.”

“हवा फार वाईट आहे, मी तुमच्या मागेच राहीन. तुमची गाडी अर्धा तास सतत चालू राहिली नाही, तर परत बंद पडू शकते.”

तो सोफीच्या मागेच रहात होता. दोन्ही गाड्या मंदगतीने सरपटत चालल्या होत्या. थोडा जरी वेग वाढला, तरी गाडी घसरण्याचा धोका होता. शंभरच्या गतीने जाण्याजोग्या रस्त्यावर वीसच्या गतीने गाड्या चालवाव्या लागत होत्या. असा प्रवास की ज्याच्या शेवटाचा पत्ता नव्हता! याच प्रकारे जावं लागणार होतं. सोफीची भीति वाढत गेली—नक्कीच कुठल्याही क्षणी तो गाडी पुढे आणून मला थांबवेल आणि मग….!

त्यानं इतके कपडे घातले होते, स्वेटर, मफलर, टोपी, की त्यात गुंडाळलेला माणूस कोण, कसा आहे, काही कळायला मार्गच नव्हता. फक्त त्याचा आवाज येत होता. दहा मिनिटं ते असे गेले असतील, नसतील, तेवढ्यात तो परत तिच्या बाजूला आला, आणि त्यानी हॉर्न दिला, आणि गाडी थांबवण्याची खूण केली. एकटी स्त्री असण्याची भीति परत तिच्या मनात दाटून आली.  हात पाय कापू लागले. कसेबसे तिने ब्रेक दाबले. मरणाच्या भीतीपेक्षाही ही भीति जास्त विक्राळ स्वरुप घेऊन तिच्यासमोर उभी राहिली.

तो गाडीतून बाहेर आला नाही, फक्त खिडकी उघडायची खुण त्याने केली. “दहा मिनिटात एक सर्व्हिस एरिया येईल, तिथून मी गरम कॉफी घेऊन येतो, तुम्ही गाडी बंद नका करू. पार्किंग लॉटमधे थांबून रहा.”

सोफिने मान हलवली. खरंच तिचा घसा कोरडा पडला होता, कॉफी मिळेल, या सुखद जाणिवेपेक्षा त्याचं काही कट कारस्थान तर नाही ना, ही भीति मोठी होती. कोणजाणे, याच्या मनात काय आहे! संशय येत होता, की कॉफी द्यायचं निमित्त करून हा गाडीत तर घुसणार नाही? आणि कॉफीत काहीतरी मिसळलं असेल तर? आसपास बर्फाशिवाय काहीच दिसत नव्हतं. कोणाला बोलावणार मदतीला? तो जे म्हणेल, ते करण्याशिवाय तिच्या हातात काहीच नव्हतं. पण तो लगेचच कॉफी घेऊन आला. बहुतेक मशीनची कॉफी असावी. अशा थंड रात्रीत कॉफी हाऊसमधे कोण असणार होतं? तो आला आणि तिला कॉफी देऊन त्याच्या गाडीत परत गेला.

भीतिच्या सावटाखाली असल्याने कॉफीची चवच लागत नव्हती. बेचव! एकदा वाटलं, बेशुद्ध करण्यासाठी काहीतरी घातलेलं असणार. बरंच होईल, बेशुद्ध झाल्यावर यातना तरी जाणवणार नाहीत. ती तशीच कॉफी पीत राहिली. कॉफीचा गरमपणा कणाकणानी शरीरात भरत होता. निघण्याचा इशारा मिळाल्यावर दोघं निघाले परत एकमेकांच्या मागे. तो तिच्यापेक्षा हळू गाडी चालवत होता, कारण त्याला तिच्या मागेच रहायचं होतं.

सोफीचं थंडीनं थरथरणं आता कमी झालं होतं, गाडीच्या हिटिंग सिस्टिमने थंडी काही प्रमाणात कमी केली होती. पण तिची भीति वाढतच चालली होती. सुनसान रस्त्यावर, मिट्ट अंधारात दोन्ही गाड्या चालल्या होत्या. आणि फिसफिस आवाज करत वायपर्स काचेवर साठणारा बर्फ सतत दूर करत होते.  परत दहा मिनिटं गेल्यावर त्यानं परत एकदा थांबण्याचा इशारा केला.

या वेळी तर भीतिने सोफिचे प्राणच कंठात आले! या अनोळखी माणसाचा काय इरादा होता? आता शिकार पुरती आपल्या ताब्यात आली आहे, असं तर वाटत नाहिये याला? मुलगी आता बेशुद्ध व्हायच्या बेतातच असेल? मग तिच्या लक्षात आलं, “मी तर पूर्णपणे शुद्धीवर आहे! कॉफी पिऊन तरतरी आली आहे, नशा नाही!”  काय करावं ते कळेनासं झालं होतं तिला, पण बघितलं, तर परत त्यानं तशीच तिच्या बाजूला गाडी आणत तिला ओरडून सांगितलं, “तुमच्या गाडीच्या मागच्या दिव्यांपैकी एक लागत नाहिये, अजून जरा गाडी हळू चालवा.”

आणि परत सोफीच्या गाडीच्या मागे जाऊन गाडी चालवू लागला. या वेळी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. सोफिने आरशात पाहिलं, तो अजूनही तशीच तिच्या मागे गाडी चालवत होता. मिनिटा-मिनिटांनी पुढे जाणा-या या दोन गाड्या जशा काही वर्षानुवर्षे प्रवास करत होत्या. एखाद्या नवशिक्या ड्रायव्हरप्रमाणे थरथरणारे हात कसेबसे गाडी नियंत्रित करत होते.

परत एकदा त्याची गाडी तिच्या गाडीच्या बाजुला आली. तशाच पद्धतीने गाडी थांबवून त्याने सांगितलं- “ तुमची बॅटरी आता काही त्रास देणार नाही. आता मी जातो.” आणि तो गाडी पुढे काढून, तिला बाय करून निघून गेला.

हतप्रभ झालेल्या सोफिने हात हलवून त्याला निरोप दिला, त्याने ते पाहिलं की नाही कोणजाणे! तिने मनातल्या मनातच त्याचे आभारही मानले. जातानाची त्याची गाडी एखाद्या देवदूताच्या विमानासारखी वाटली, ज्याने आकाशातून उतरून एका मुलीचा जीव वाचवला होता. आता शरीराची थरथर बंद झाली होती.

संकटांच्या एका लांबलचक रात्रिची इतिश्री झाली होती. आता पहाट फटफटायला लागण्याची लक्षणंही दिसायला लागली होती. हिमवर्षाव पण आता थकून परतेल असं वाटायला लागलं होतं. पुढे दूर अंतरावर, रस्त्यांवर मीठ टाकणाऱ्या ट्रक्सचे दिवे चमकताना दिसू लागले होते. शहराच्या जवळ आल्याच्या खुणाही दिसू लागल्या होत्या. मृत्युच्या भीतीतून सुटका झाल्याबरोबर सोफीला तहान, भूक या सगळ्याची जाणीव होऊ लागली. कित्येक तासात काहीही खाल्लेलं नव्हतं. धिम्या गतीने चालणारी गाडी एका हाताने सांभाळत तिचा दुसरा हात शेजारच्या सीटवर ठेवलेल्या खाण्याच्या वस्तू धुंडाळू लागला, जेणे करून तिची बॅटरी पण उतरणार नाही!

तिच्या डोळ्यांसमोर एका पाठोपाठ एक बॅटरीची रूपं दिसू लागली— गाडीची बॅटरी, फोनची बॅटरी, तिची स्वतःची आणि खास करून त्या अनोळखी देवदूताची, जो आपल्या मदतीच्या बॅटरीने जीवनभरासाठी एक सुखद, ऊर्जादायी जाणीव ठेवून गेला होता. आता त्याला परत एकदा भेटलं पाहिजे या जाणीवेने तिचं मन उतावळं झालं. त्याला डोळेभरून बघायला हवं या इच्छेने उचल खाल्ली आणि तिच्या पायांनी ताबडतोब गाडीची गती वाढवली 

– समाप्त – 

मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅटरी – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ बॅटरी – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

भयंकर थंडी! पारा शुन्याहून वीस डिग्री खाली. नाकातली ओल बर्फाचा खडा बनून नाकात टोचत होती. बर्फाचे शुभ्र, लहान लहान कण एकत्र जमून सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत होते. डांबरी रस्त्याचा काळेपणा शिल्लक नव्हता, की छताच्या कौलांचा कुठला रंग ! बर्फाच्या या कणांनी मिळून प्रत्येक रंग पांढऱ्या रंगात बदलून टाकला आहे. झाडा झुडुपांच्या फांद्या बर्फांनी लगडून जणू स्वागतासाठी झुकल्या आहेत. एखाद दुसरा चालत जाणारा माणूस बर्फाचं गाठोडं चालत जात असल्यासारखा दिसतोय. त्यांच्या गरम कपड्यांवर आणि जाडजूड बुटांवर सफेद बर्फकण हसत बसले आहेत असं वाटतंय. जमलेल्या बर्फावरही खारी, हिरव्या गवतावर जशा उड्या मारत, बागडत होत्या, तशाच बागडताना दिसताहेत. सुनसान रस्त्यांवर कधी  कधी जंगली प्राणीही दिसून येत असत.

निसर्गाच्या या रूपाला तोंड देण्यासाठी माणसाला फार तयारी करावी लागते. कधी कधी जर माणसाच्या मेंदूची काही चूक झाली, तर “आ बैल मुझे मार” च्या चालीवर “ ये बर्फा, मला गोठवून दाखव” अशा तऱ्हेने सोफीसारखी, जाणून बुजून या बर्फाळ  हवेला आव्हान देण्याची चूक घडून येते. सोफीचा हट्ट म्हणा, की नाईलाज, ती या वेळी, अशा जीवघेण्या हवेत हायवे वर गाडी चालवते आहे. उद्या तिला कामावर हजर व्हायचे आहे. जाणं आवश्यकच आहे. सगळी विमानोड्डाणं रद्द झाल्याने तातडीने तिला हा निर्णय घेणं भाग पडलं. धाडस करणंच भाग पडलं होतं. कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशात रात्रीचं गाडी चालवणं खूप सुरक्षित आणि सोपं असतं. आणि या   बर्फाळ हवेसाठी तिच्या गाडीला स्नो टायर्स पण आहेत. त्यामुळे हवा अधिक बिघडली, तरी ती सुरक्षित राहू शकते. दूरवरच्या ठिकाणी गाडी चालवत जायची क्षमता पण आहे तिच्यात. असा धोका पत्करणं रोमांचक वाटत होतं तिला. तरुण आहे ती, आत्ता नाही धाडस करायचं, तर काय पन्नाशी नंतर करायचं का? तसंही पेईंग गेस्ट म्हणूनच रहात होती ती. सामान म्हणजे, फक्त दोन सुटकेस आहेत, ज्यात तिचे कपडे आहेत. एवढ्या प्रचंड बर्फवृष्टीमधेही रोजचं आयुष्य काही थांबत नाही. टोरांटो पासून न्यूयॉर्क शहरापर्यंतचा प्रवास गाडीने करायचा उत्साह तिला खूप उर्जा देत होता. मधे एखादा स्टॉप घेतला तरी बास आहे. हॉटेलमध्ये सामान टाकून ती लगेच ऑफिसलाच जाईल. हवा कितीही खराब असली तरी सब वे रेल्वे असो किंवा रोजचं आयुष्य सगळं काही त्याच गतीने चालू रहातं.

अमेरिकेची सीमा पार केल्यावर एकाएकी जोरदार वारा आणि बर्फवृष्टीचा हल्ला होऊ लागला. बर्फाळ हवेच्या थपडा गाडीच्या काचेवर वारंवार आदळू लागल्या. अंधाराला चिरत वाऱ्याचा सों सों आवाज गुंजत होता. रस्त्यावर जमलेल्या बर्फाच्या घसरणीमुळे त्या भरभक्कम चाकांनाही धोका निर्माण होत होता. हवा आणखी बिघडू शकते, हे माहित तर होतं, पण अशी वादळी होईल याचा अंदाज नव्हता, बिघडत्या हवेची लक्षणं बघून, तिला वाटायला लागलं की आपला निर्णय चुकीचा होता. अशा प्रकारे धोका पत्करायची काही गरज नव्हती. आता ती मधेच अडकली होती, ना धड इकडे, ना तिकडे! परत जायचं म्हंटलं, तरी तेव्हढाच त्रास होणार होता. गाणी ऐकताना तिच्या लक्षात आलं, की फोन चार्जला लावायला पाहिजे. फोन जर बंद झाला, तर तिचं काही खरं नाही.

गाडीचा वेग सतत कमी होत होता. काळाकुट्ट अंधार आणि समोर सतत उडत असणारा बर्फ यामुळे निर्माण होणाऱ्या धुरकटपणामुळे समोरचं दिसायला त्रास होत होता. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाशही कमी वाटत होता. रस्त्यावर जमा झालेला बर्फ साफ करायला या वेळी कोणी येणार नव्हतं. गाडीत हीटरची सोय असल्यामुळे बाहेर थंडीचा कहर असला तरी सोफीला त्याचा त्रास होत नव्हता. समोरच्या काचेवर पडलेला बर्फ आता घट्ट होऊन काचेवर त्याचा थर जमा होऊ लागला होता. ते साफ करण्यासाठी गाडीचे वायपर्स काहीतरी रसायन त्याच्यावर उडवत होते, पण समोरचा रस्ता काही दिसत नव्हता. तिने विचार केला, गाडी थांबवून पुढच्या-मागच्या काचा, हेडलाईट्स, बाजुच्या काचा आणि गाडीच्या चारी बाजुंना साठलेला बर्फ साफ करून घ्यावा. गाडी बंद करून तिने ब्रश काढला आणि सगळा बर्फ काढून टाकला. परत नव्याने बर्फ पडतच होता, पण तो काढून टाकण्यासाठी वायपर्स पुरेसे होते.

गाडीच्या सगळ्या बाजूंचा बर्फ काढून टाकून परत ती गाडीत येऊन बसली. पण गाडी चालू करण्याआधी हात गरम करण्याची आवश्यकता होती, सगळी बोटं आखडून गेली होती तिची. काही वेळ हातमोजे काढून हात एकमेकांवर घासायला सुरवात केली तिने. सगळं अंग पण गारठून गेलं होतं. हुडहुडी भरली होती. गाडी सुरु करून ती सुटकेचा निश्वास टाकणारच होती, तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, की गाडी सुरूच झालेली नाही! “अरे! हे काय?” परत सुरु करण्याचा प्रयत्न केला. परत तेवढाच हलकासा आवाज. इंजिन चालू होण्याचा कुठलाच आवाज नाही. परत परत ती बटण दाबत राहिली, पण गाडी एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे ओठ बंद करून जागच्या जागी थटून उभी राहिली होती. सोफी एकटक त्या मूक झालेल्या बटणाकडे पहात राहिली. अनेक शक्यता तिच्या मनात एकदम घोंघावू लागल्या. असं गाडी सुरु न होणं म्हणजे, बॅटरी बंद पडली असणार. अशा वेळी बॅटरी डेड होणं म्हणजे एक प्रकारे सोफीचंच मरण होतं. हेल्पलाईनला फोन करावा म्हणून तिने फोन हातात घेतला, तर फोन पण डेड झालेला! त्याची बॅटरी चार्जच झालेली नव्हती. आता कोणाला मदतीला बोलावणं पण शक्य नव्हतं. आता काय करायचं? शंका कुशंकांनी तिला घेरून टाकलं. सगळ्यात मोठी धोक्याची घंटा तिच्या डोक्यात घण घालत होती, ती म्हणजे, “आज या थंड रात्रीत ही गाडीच तिची कबर बनणार आहे की काय?”

मागच्या सीटवर ठेवलेलं ब्लॅन्केट तिनं अंगभर लपेटून घेतलं आणि सुन्न होऊन बसून राहिली. या थंडीत शरीर काकडून त्याची बर्फकांडी बनत जाण्याचा अनुभव नरकमय यातना देणारा असणार होता, त्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने मृत्यू आला असता, तर तो ठीक असता असा विचार तिच्या मनात आला. असं वाटायला लागलं, की जणू तिने स्वतःच स्वतःला मृत्युच्या स्वाधीन केलं होतं. संपूर्ण शरीर ब्लॅन्केटमधे गुंडाळून घेतलेलं असूनही थंडीची तीव्रता वाढत होती. थोड्याच वेळात बाहेरच्या ओल्या, तीव्र, हाडं फोडणाऱ्या थंडीने गाडीचा हीटर बंद पाडला. हुडहुडी भरायला लागली होती, दात वाजायला लागले होते. हळुहळू हाताची बोटं गोठणं सुरु झालं. पायात बूट होते, त्यामुळे पाय थोडे उबेत होते. या निर्जन रस्त्यावर, या वेळी दूरवरही कुठे दुसरी कुठली गाडी येईल अशी शक्यता दिसत नव्हती.

मृत्यू पावला पावलांनी जवळ येत शरीर शिथिल करत चालला होता. आता वाचण्याची आशा सोडून देऊन ती आपल्या जवळच्या माणसांची आठवण येऊन हळवी होऊ लागली होती – “माझ्या मृत्यूची बातमी त्यांना केंव्हा कळेल, कोणजाणे! मला इथून कसं घेऊन जातील ते? की इथेच बर्फाखाली दबून, गाडलं जाईल माझं शरीर? मृत्यूची  एक मूक अशी चाहूल कानांना ऐकू येत होती. अरे! कानांना खरंच काहीतरी ऐकू येत होतं. ही चाहूल स्पष्ट होती. असा काही मृत्यूचा आवाज नसतो! पहिलाच अनुभव आहे, काय माहित, कसा असतो ते! कान आता सावध झाले. मेंदूला संदेश मिळाला—“हा तर कुठल्या तरी गाडीचा आवाज आहे”. नसानसात जीवनाशा फुरफुरू लागली. मागून आलेल्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश दिसू लागला. मनात आलं, थांबवून मदत मागावी, पण परत वाटलं, की कोणजाणे, कोण असेल? आत्ता तर नुसतं थंडीनीच मरायचं आहे, या गाडीला थांबवून आणि कुठल्या त्रासातून जाऊन मरायची वेळ येईल, कोणजाणे! मरणाची भीति तर होतीच, त्यात अजून एका संकटाच्या भीतीचं भूत मानगुटीवर येऊन बसलं. ती ब्लॅन्केटमधे अजूनच गुरफटून बसली, म्हणजे त्या येणाऱ्या गाडीतल्या माणसाला या गाडीत कोणीच नाहिये असं वाटून तो निघून जाईल. ती श्वास रोखून त्या गाडीच्या निघून जाण्याची वाट बघत होती. तेवढ्यात त्या गाडीचे ब्रेक जोरात दाबले गेले आणि चर्र करत ती थांबली.

– क्रमशः भाग पहिला    

मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ती, आरसा, आणि मी…” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “ती, आरसा, आणि मी” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी 

(त्या म्हणाल्या, “ह्या मुलीबरोबर कोणी डबा खायला तयार नाही, हिला कोणी एक एकत्र बसून घेत नाहीत. आम्ही खूप समजून सांगितलं दोन-तीन दिवस, पण मुली ऐकायलाच तयार नाहीत. तुम्ही काही करता का पहा…”) इथून पुढे 

मी दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळेला मुलींना सांगितले की, “..मुलींनो समाजातले एक दुर्दैवी मूल आपण स्वीकारू शकत नसू तर तुम्ही पुढे जाऊन काय करणार. एखाद्याला मानसिक आधार देणे, मदत करणे हे आपण करायला नको का…? बरं, तिला कुठला रोग नाहीये. तो अपघात झाला होता आणि त्यामध्ये तिच्या शरीरावर हे वैगुण्य आले आहे. हे तुमच्या बाबतीत घडले असते आणि न करो पण पुढे  तुमच्या एखाद्या मुलाच्या बाबतीत घडले, नातेवाईकाच्या बाबतीत घडले तर तुम्ही अशा वागणार आहात का? तुमच्या सहकार्यामुळे तिला मानसिक उभारी मिळणार आहे मुलींनो.. आणि मी तुमच्या विश्वासावरच तिला शाळेत प्रवेश दिला आहे. मला खात्री आहे की तुम्ही माझ्या सगळ्या मुली.. एका मुलीला समाजामध्ये शिक्षण घेण्याच्या कामी नक्कीच मदतीला उभे रहाल. पण तुम्ही तर मला निराशच केलं. मला ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. अगं दहावी काय, तुम्ही पास व्हाल, पण आयुष्यामध्ये ज्या अनेक परीक्षा द्यायच्यात ना, त्याच्यामध्ये सामोरे जाताना द्याव्या लागणाऱ्या अनेक परीक्षांची तयारी आहे, त्यात तुम्ही नापास होणार आहात का? मुळीच नाही. तुम्ही पतकी बाईंच्या विद्यार्थिनी आहात हे लक्षात ठेवा. संकट आणि दुःखाशी सामना करणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर उभे रहाण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे….” आणि मी बरंच बोलत राहिले.

मुली खाली मान घालून बसल्या होत्या. “तुम्हाला डबा खायचा नसेल तर उद्या मधल्या सुट्टीत मी इथे येईन  तिच्याबरोबर डबा खायला.. कारण तिला मी शाळेत घेतले आहे, ती माझी जबाबदारी आहे, तुमची नाही. आणि मी तुम्हाला याबाबत सक्ती करू शकत नाही.”

दुसऱ्या दिवशी मी माझा डबा घेऊन संस्थेत गेले. मी, मुख्याध्यापक आणि ती मुलगी असा मी डबा माझ्या खोलीत खाल्ला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी परत मधल्या सुट्टीत गेले त्यावेळी मात्र मला दृश्य वेगळे दिसले. माझ्या सगळ्या मुलींनी त्या मुलीला आपल्याबरोबर डब्यामध्ये बसवले होते आणि त्या आनंदाने गप्पा मारत डबा खात होत्या. ते दृश्य पाहून माझे डोळे वाहिले. त्यांच्या डब्याच्या मध्ये जाऊन मी म्हणलं.. “तुम्ही माझ्या मुली आहात हे सिद्ध केलेत गं ..खूप छान वाटलं…. दहावी होण्यापेक्षा ह्या अशा गोष्टी शिकणं खूप गरजेचे आहे. खूप मोठ्या व्हाल. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला …!”

मुलीनाही खूप आनंद झाला. आपण चुकलो याची जाणीव झाली आणि वर्गात पुन्हा प्रश्न निर्माण झाला नाही… शाळा सुरळीत चालू झाली काहीच प्रॉब्लेम नव्हता

सुरेखाच्या डोळ्यात मला हळूहळू आत्मविश्वास दिसायला लागला. अभ्यासाला ती बरीच होती पण फार कृश होती. मी तिच्या पालकांना ‘डॉक्टरांना दाखवून एखादं टॉनिक घ्या’ असा सल्ला दिला. त्यानंतर नागपंचमीचा सण आला. म्हणजे साधारण ऑगस्ट महिना. शाळा सुरू होऊन दीड एक महिना झालेला. माझी मुलींची शाळा असल्यामुळे सेवासदनला सुट्टी होती …शाळेला सुट्टी असली की पूर्ण वेळ मी नापास मुलांच्या शाळेत थांबत असे. आमच्या नापास शाळेला सुट्ट्या अगदी कमी, म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि रविवार याखेरीज सुट्ट्या नाहीत, कारण मला नऊ महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करायचा असे. त्यामुळे या दिवशी शाळा चालू होती. 

अर्धी शाळा झाल्यानंतर मुलांना सोडून देण्यात आले आणि त्यानंतर चार वाजता मुलींसाठी फेर धरण्याचा कार्यक्रम होता. मुलींना असे कार्यक्रम फार आवडायचे‌. त्यानंतर आम्ही त्यांना खाऊही देत असू.  माझ्या त्या शाळेची रचना अशी होती की एक मोठा हॉल होता, त्याच्या बाजूला एक छोटी खोली, नंतर अगदी एंट्रन्स लाईक छोटा व्हरांडा आणि त्याच्या बाजूला माझं ऑफिस. त्यावेळी संस्था लहान जागेत कार्य करत होती. ती जागा भाड्याची होती. त्याच्या व्हरांड्यामध्ये माझ्या बंधूनी भिंतीला एक मोठा आरसा बसवून दिलेला होता, कारण सकाळी तिथे लहान मुलांची शाळा म्हणजे नर्सरी होती.. ती मुले आले की आरशात बघून मग प्रवेश करीत असत. 

त्या दिवशी मधल्या सुट्टीनंतर डबा खायला एक वेळ दिलेला होता. तेव्हा या सगळ्या मुली एकमेकींच्या हातावर मेंदी काढत होत्या. आज त्यांना काहीही करायला मुभा होती. गटागटांनी मेहंदी काढण्याचे काम चालू होते. मी सहज आत डोकावले तर ..सुरेखाच्या हातावर दोन मुली मेंदी काढत होत्या. मला खूप आनंद झाला. तिची ती दुमडलेली बोटं, तो भाजलेला हात, पण त्याच्यावर मुली आनंदाने मेंदी काढत होत्या. मला कुठेतरी मनात समाधान वाटले‌. मुलींचे आतमध्ये ड्रेसिंग चालले होते, लिपस्टिक लावत होत्या.. वेण्यांमध्ये  गजरे घालत होत्या ..कुणी फेराच्या गाण्याची प्रॅक्टिस करत होत्या.. त्यांच्या शाळेत त्यांना संधी मिळाली नव्हती. आज इथे त्यांना ते मुक्तपणे अनुभवता येणार होते …!

माझ्या ऑफिसमध्ये बसून मी समोर व्हरांड्याकडे पाहत असताना मला आरशासमोर सुरेखा दिसली. ती ही नटून आली होती. छान गुलाबी पंजाबी ड्रेस घातला होता. हाताला नुकतीच मुलींनी मेंदी लावलेली होती, आणि तिने गळ्यामध्ये एक हार घातला होता ज्याच्यावर आर्टिफिशियल खड्यांचे डिझाईन होते. तो हार ती व्यवस्थित करून आपल्या स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि आनंदित होत होती. ती हार पुन्हा पुन्हा व्यवस्थित करत होती. 

मी आश्चर्यचकित झाले … मुळात सुरेखाने आरशात आपल्या स्वतःला पहावं हे धाडस होते आणि ती पुन्हा पुन्हा आपला तो गळ्यातला हार सारखा करून आपल्या छबीकडे पाहत होती. अर्थात आरशात बघायचे तिचे वयच होते, परंतु पूर्वी दुर्दैव हे की आरशातले रूप तिला आनंद देत नव्हते, पण आता मात्र तसे नव्हते. त्या सुरकुतलेल्या भाजक्या जळक्या मानेवर रुळणाऱ्या त्या हाराला ती व्यवस्थित करत होती आणि पुन्हा पुन्हा तो नीट बसलाय ना हे निरखत होती. ..कदाचित तिला आपल्या चेहऱ्यात एक नवीन सौंदर्य दिसत असावे. 

मी ते दृश्य डोळ्यात साठवून घेत होते… मी मनात म्हणत होते हिला त्यात जळक्या कातडीवर दिसणाऱ्या त्या हारातले कोणते सौंदर्य जाणवत होते ठाऊक नाही, पण तिला जगण्यातली सुंदरता मात्र जाणवली होती. तिचं ते आरशात पाहणं मला मोहून टाकणारे होते. सुरेखाला समवयस्क मुलींनी स्वीकारणे… तिच्या कुरूपतेचा मनापासून सर्वांनी स्वीकार करणे.. तिला थोडे प्रेम देणे आणि पुन्हा वर्गात बसून शिकायची संधी मिळणे… या सर्व कृतींमुळे सुरेखाच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आला होता त्या आत्मविश्वासाचे विलोभनीय सौंदर्य मी पाहत होते. आज सुरेखाच काय, मला सगळे जग सुंदर दिसत होते.. त्या आरशासमोरची मुलगी मला सर्वात सुंदर दिसत होती… कारण तिला जगणे सापडले होते…. खूप आनंदाचा क्षण होता. कदाचित त्या आरशानंही तिला सांगितलं असेल.. “सुरेखा, आज तू खूप सुंदर दिसतेस”.. 

नंतर सुरेखा अगदी सहज रुळली, उत्तम गुणांनी पास झाली. त्यानंतर तिच्या त्वचारोपणाच्या ऑपरेशन साठी एक सामाजिक संस्था पुढे आली. त्यांनी मदत केली. पुढे सुट्टीमध्ये तिची तीन-चार ऑपरेशन झाली आणि सुरेखाचे हात छान काम करायला लागले. बोटं सरळ झाली. चेहऱ्यावरचे आणि मानेवरच्या.. गळ्यावरच्या.. सुरकुत्या कमी झाल्या ! ‘सुंदर मी होणार’ चे सेशन दोन-चार महिन्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले ..एका स्थानिक आमदाराने या कामी खूप मदत केली ..!

सुरेखा पास झाली आणि त्यानंतर तिने जवळच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती बीए झाली. बालवाडीचा कोर्स केला. एका अंगणवाडीमध्ये ती आता शिक्षक म्हणून कार्यरत आहे…!!!

आता माझे आरशात पाहण्याचे वय नाही, तरीही मी जेव्हा जेव्हा आरशात पाहते तेव्हा तेव्हा माझ्या आधी मला तिची प्रतिमा दिसते, कारण मला नेहमी जाणवत राहतं की आरशावर सुरेखाचा पहिला हक्क आहे, त्यानेच तिला सांगितलं, ‘तू खूप सुंदर दिसतेस’, आणि तिथूनच तिचा आत्मविश्वास वाढला. मुळतः आरशात बघण्याचे धाडस तिच्यात निर्माण झाले आणि आमची सुरेखा सुंदर झाली, अगदी अंतर्बाह्य…..!

– समाप्त – 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ती, आरसा, आणि मी…” भाग – १ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “ती, आरसा, आणि मी” भाग – १ ☆ सुश्री शीला पतकी 

नापास शाळेच्या ऍडमिशन सुरू झाल्या.. पालक विद्यार्थी हितचिंतक अशा नापास मुलांना घेऊन माझ्याकडे येत असत. कुणाकडे पैसे नाहीत, कोणी खूप गरीब आहे, दहावी मध्ये नववी मध्ये नापास होऊन शिक्षण थांबले आहे, असे खूप विद्यार्थी येतात. 

सकाळी नऊ वाजता माझे काम सुरू  झाले आणि एक रिक्षावाले गृहस्थ आले. त्यांनी आपली ओळख करून दिली आणि म्हणाले “माझी मुलगी येथील एका कन्या शाळेत होती पण शाळेने तिला काढून टाकले आहे. इयत्ता नववीमध्ये शिकत होती. तेव्हापासून ती घरीच आहे.”

मी त्यांना मध्येच थांबून विचारलं, “अहो पण शाळेतनं काढायचं कारण काय?”

त्यावर ते दोन मिनिट गप्प राहिले आणि मग त्यानी मला सांगायला सुरुवात केली. म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी माझी मुलगी तळत्या तेलात पडून गंभीर जखमी झाली. तिचा चेहऱ्याचा भाग, मानेचा भाग, हात, म्हणजे जवळपास अर्ध शरीर भाजून निघाले तिचे.. सात आठ महिने दवाखान्यातच गेले ..ती जगेल असे मुळीच वाटत नव्हते. पण माहित नाही आमच्या सुदैवाने की तिच्या दुर्दैवाने ती जगली. त्यानंतर तिचा चेहरा, कातडी विद्रूप झाल्यामुळे तिच्या बाई म्हणतात की त्यांच्या शाळेतील मुली तिला घाबरतात, आणि अशी विद्रूप मुलगी आम्हाला वर्गात नको ” …..हे सांगताना त्यांना अक्षरशः रडायला येत होते. त्यांनी हुंदका दिला.

मी उठून त्यांना पाण्याचा ग्लास पुढे केला.. पाठीवरती थोपटलं ..आणि म्हणलं, “काळजी नका करू, आपण करू काहीतरी. ..तुम्ही मुलीला घेऊन या !”

ते म्हणाले, “बाई ती खूप निराश झाली आहे. आता दीड दोन वर्ष झाले ती घरीच आहे. कोणाशी फार बोलत नाही, मिसळायचा तर प्रश्नच नाही. तिला कोणी मिसळूनच घेत नाही. घरातली खोली आणि ती ! बरं, लहानगा जीव, काय समजते हो 14/ 15 वर्षाच्या मुलीला. आमच्या डोळ्यासमोर तिचं सगळं भविष्य उभं रहातं.”….

मलाही थोडं आश्चर्यच वाटलं .. “भाजली आहे ना, एवढं काय काळजी करण्यासारखं, होईल बरं. हल्ली प्लास्टिक सर्जरी वगैरे करतात.” 

ते म्हणाले, “हो, पण त्याला ठराविक कालावधी जावा लागेल…. मुलगी बऱ्यापैकी हुशार आहे. घरी बसून खूप कंटाळली आहे. तुम्ही तुमच्या शाळेत प्रवेश दिला तर फार उपकार होतील.”

मी म्हणाले, “उपकाराची भाषा करू नका. शिक्षण घेणं हा तिचा हक्क आहे. आपण तिला शिकवूयात.”

माझ्या शब्दाने त्यांना खूप धीर मिळाला. मी म्हणाले, “मुलीला घेऊन या. मी तिच्याशी बोलते आधी, आणि मग आपण ठरवू.”

ते थोडे सुखावले होते. त्यांना कुठेतरी खात्री वाटत होती की इथे माझ्या मुलीला प्रवेश मिळेल. ते तातडीने घरी गेले आणि एका तासाभराने आपल्या मुलीला आणि बायकोला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आले. 

तोपर्यंत काही ॲडमिशनचे इंटरव्यू चालले होते. मी मुलांशी, पालकांशी बोलत होते, त्यांचे समुपदेशन करत होते. त्यानंतर समोरचे पालक बाहेर पडले. मी खाली वाकून काही फॉर्मवरती टिपणं करत होते आणि हे  रिक्षावाले गृहस्थ पुन्हा ऑफिसमध्ये प्रवेश करते झाले. सोबत त्यांची पत्नीही होती. त्यानी सांगितले, “बाई, मुलीला घेऊन आलो आहे. आपण तिच्याशी बोला.” 

सुरुवातीला तिची आई माझ्याशी बोलली. त्या म्हणाल्या, “दिवाळीचं तळण तळत होते हो, आणि ही पोरगी धावत आली आणि त्या मोठ्या कढईत पडली.” ते सगळं ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता. त्या वेदना, ते हॉस्पिटल, सगळं त्या वर्णन करून सांगत होत्या. मी म्हणलं, “एवढ्या लहान लेकराने हे कसं सोसलं असेल ना ?” 

इतक्यात ती मुलगी आत आली. सुरेखा तिचं नाव होतं आणि मीही इतर मुलांना जसा दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावाने हाक मारते ये ये …तसं मी हिला हाक मारली “ये ये सुरेखा …”

सुरेखा आत आली. तिला पाहिलं आणि मी खुर्चीवरून नकळत उठले. समोर तिचं रूप पाहून मला काय वाटलं मी सांगू शकत नाही.. भीती, किळस.. भयानक चेहरा होता.. डोळे बाहेर आलेले, गालाची हाडं वर आलेली, त्याच्यावर जळलेलं मास थोडंसं लोंबणारे.. जागोजागी असंख्य जळकट सुरकुत्या, मानेभोवती अशाच सुरकुत्यांचे जळकट जाळे.. केस तुटके तुटके भुरे.. डोक्यावर थोड्याशा जखमा भाजलेल्या.. ओठ भाजल्याने किंचित पुढं आलेले, कानाच्या पाळ्यांची तीच अवस्था.

मी तिच्या हाताशी पाहिलं, हातावरचं मांस दिसावं तसा तांबूस रंग होता. दोन्ही हाताची बोटं आतून मुडपलेली होती आणि अगदी बारीक बारीक बोटं म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या पक्षाच्या पिलाचा जसा रंग असतो ना आणि शरीर असतं तसं ते सगळं होतं. …

मी एक क्षणभर म्हटलं हे रोज बघू शकतो का आपण…? मुळात तिच शरीर अतिशय कृश होतं. म्हणजे हाडं आणि लोंबणारी कातडी.. बाहेर आलेले डोळे.. तुटके केस ..  हे थोडक्यात वर्णन ….आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारला ‘शीला पत्की, सामाजिक सेवा करायला निघाला आहात, हे सोसणार आहे का तुम्हाला ? दररोज नुसतं बघणं तरी काय भयानक होतं ते, छे छे, हे होणे नाही…!’

… पण माझ्या दुसऱ्या मनाने मला सांगितलं… ‘मग तू समाजसेवेचा खोटा आव आणतेस का? इतकं साधं तुला सोसता येत नाही.. फक्त बघायचे तर तुला एवढी किळस आली… ती कशी ते सगळं रूप घेऊन समाजात मिरवेल ना? काय सांगणार आहेस तिला तू ? ‘

… आणि मग कुठून अवसान आलं माहित नाही, आतून एक आवाज आला.. ‘नाही नाही, हीच माझी परीक्षा आहे’ ….आणि मी मलाच आजमावण्यासाठी असेल बहुदा.. तिला म्हणलं ” हाय सुरेखा….” आणि तिचा तो मांसल वेडावाकडा हात मी हातात घेतला… तो स्पर्श अगदी थंड होता. कुणीतरी पहिल्यांदा तिचा हात प्रेमाने हातात घेत होतं.. कुणीतरी तिला स्पर्श केला होता.. आणि तिच्या त्या चेहऱ्यावर ओठामधून एक छानसं हसू फुटलं. म्हणजे डब्यात ठेवलेल्या जाईच्या कळ्या उमललेल्या असाव्यात आणि एखादी तळातली कळी न उमललेली ..वरची फुलं काढल्यावर अलगद आणि पटकन उमलते ना तशी तशी ती हसली..! मला वाटतं खूप दिवसांनी ती हसली असावी….. मी माझी स्वतःची परीक्षा घेणं किंवा स्वतःला आजमावणं याच्यासाठी तो हात तिच्या हातात तसाच ठेवला आणि दोन मिनिटांनी त्या स्पर्शात काय संवेदना होती माहित नाही, मी तिच्या दुःखाशी तद्दूप झाले. क्षणभरात दिसणारे विद्रूप रूप माझ्यासमोरून नाहीस झालं आणि माझ्यासमोर दिसत होती एक छोटी मुलगी, तिला पुन्हा एकदा आपलं आयुष्य फुलवायचं आहे, माझ्या थोड्या मदतीची याचना ती करत होती. 

बस्, मी ठरवलं आणि तिला प्रवेश दिला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. बहुदा मी स्वतःला तिला सहन करू शकते का हे आजमावत होते.

तिला प्रवेश दिल्यामुळे तिचे आई-वडील दोघेही रडायला लागले‌. “बाई फार उपकार झाले. आज तुम्ही माझ्या मुलीला जवळ घेतलेत.”

मी त्यांच्याही पाठीवरून हात फिरवला. त्यांना धीर दिला… शाळेचे नियम समजावून सांगितले आणि सुरेखाचा प्रवेश झाला ..!

पण इथे मुद्दा संपला नव्हताच. आमच्या मुख्याध्यापकांना मी तिचा विषय समजून सांगितला. त्या दोघी खूप चांगल्या होत्या. मी त्यांना सांगितले, “आपल्याला त्या मुलीला समजून घ्यायचे आहे.”

…तिथे मुख्याध्यापक म्हणून काम करणारी माझी मैत्रीणच होती आणि त्या माझ्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका होत्या, वयाने मोठ्या होत्या.. आई होत्या. त्यानी त्या गोष्टी समजून घेतल्या!

शाळा सुरू झाली. मुलींचा वर्ग, मुलांचा वर्ग सुरुवातीला एकत्रच असे. मग ऍडमिशन सगळ्या झाल्या की मुला मुलींचे वर्ग वेगळे करत असू…

मी तेव्हा सेवासदन मध्ये नोकरी करत होते. मी एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी शाळेमध्ये उपस्थित राहत असे. बाकी सगळे व्यवस्थापन माझा स्टाफ पाहत होता. शाळा माझी अगदी माझ्या संस्थेला लागूनच होती त्यामुळे मुख्याध्यापकांच्या परवानगीने मधल्या सुट्टीतही मी एक चक्कर टाकून जात असे. त्याप्रमाणे मी मधल्या सुट्टीत गेले. मुख्याध्यापिका म्हणाल्या, “बाई बरं झालं तुम्ही आलात. एक प्रॉब्लेम आहे…”

मी म्हणाले, “काय झालं ..?”

त्या म्हणाल्या, “ह्या मुलीबरोबर कोणी डबा खायला तयार नाही, हिला कोणी एक एकत्र बसून घेत नाहीत. आम्ही खूप समजून सांगितलं दोन-तीन दिवस, पण मुली ऐकायलाच तयार नाहीत. तुम्ही काही करता का पहा…”

– क्रमशः भाग पहिला

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ असंही एक माहेरपण… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

असंही एक माहेरपण… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

मी एक प्रथितयश डॉक्टर आहे. आधी सरस्वतीने, विद्यादेवीनें यशाची माळ माझ्या गळ्यात घातली  होतीचं. तेव्हांच अलकाचीही माळ माझ्या गळ्यात पडली. आणि ती माझी अर्धांगिनी झाली.अलका माझी सहचारिणी ,चतुर,  हुशार,  कल्पक,चाणाक्ष बुद्धीची आहे, म्हणूनच तिने मला सुचवलं ,” तुम्ही तळमजल्यावर स्वतःच क्लिनिक काढा. वरच्या मजल्यावर राहून  तुमच्या बरोबरीने,  मी तुम्हाला हातभार   लाविन.  तिचं वाक्य मध्येच तोडत मी म्हणालो “म्हणजे माझी असिस्टंट होणार की काय  तू ?  त्यावर मानेला एक गोड हलकासा झटका देत ती म्हणाली   ” नाही हो! जातीने लक्ष घालून, पेशंटची मी   ‘ ‘पोटोबा शांती ‘  करून सेवा करीन. आश्चर्याने मी उदगारलो “अरे वा!म्हणजे नक्की काय करणार आहेस तू ? त्यावर मिस्किल  हंसत अलका म्हणाली ”  ऐका  नां , म्हणजे असं बघा तुम्ही पेशंटच्या शरीराची काळजी घ्या. मी त्यांच्या मनाची आणि पोटाची काळजी घेईन. म्हणजे त्यांना   पथ्याचं, खायला-प्यायला घालून  तृप्त करीन .मानसिक आधार देऊन त्यांच्या मनाला सांवरणारा दिलासा देणार . आणि आपल्या संसाराला, तुमच्या पिठाला माझ्या मिठाची जोड देणार. तर मंडळी अशी मला सकारात्मक उर्जा घरातून मिळाल्यावर  उशीर कशाला करायचा? शुभस्य शीघ्रम या वाक्याच्या सुमुहूर्तावर आमचं स्वप्न साकारही झालं होतं. 

काही पेशंट निराश, उदास नकारात्मक विचारांचे होते. तर काही मोकळेढाकळे, दिलखुलास दिलाचे, बिनधास्त  स्वभावाचे होते. श्रीमती नर्मदा वहिनींची गणनाही त्यात करावी लागेल. तपासणीसाठी दोन दिवस राहिलेल्या वहिनी आमच्या घराशी, क्लिनिकशी अगदी  स्टाफशी सुद्धा इतक्या एकरूप झाल्या की स्वतःच   दुखणंच विसरल्या. वहिनींच्या  तपासण्या झाल्या.आणि नको ते संकट ओढवलं.वहिनींच्या पोटात लिंबाएवढी  गांठ होती. आणि ती त्यांना अधून मधून क्लेश देत होती. त्यांना  हे गाठं प्रकरण आपण  कसं   सांगावं ?हा भलामोठा यक्षप्रश्न अलकाच्या आणि माझ्या पुढे उभा होता. लवकरच मेजर रिस्की ऑपरेशन करावं लागणार होतं. वहिनीशी, त्यांच्या हंसर्‍या खेळकर हेल्पफुल नेचर मुळे,आमचं भावनिक नातं जुळलं होतं. पण नाईलाजाने  आता त्यांना सगळी परिस्थिती सांगावीच लागणार होती. कारण पेशंटपासून, त्याची मानसिक तयारी व्हावी म्हणून ,कुठलीही गोष्ट लपवायची नाही. हे माझं ब्रीदवाक्य होतं. अखेर असें हे अवघड  ऑपरेशनचे   दुखणं सांगण्यासाठी मी निघालो. अलका बरोबर होतीच. वेळप्रसंगी वहिनींना ऑपरेशनचं ऐकल्यावर धक्का बसला तर त्यांना सांवरण्यासाठी ती सोबत आली होती. शेवटी काहीही न लपवता सारी परिस्थिती मी कथन केली.आणि प्रततिक्रियेसाठी वहिनींकडे अलकाने आणि मी बघितले. 

क्षणभर त्या गांगरल्या आणि दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरून हसतच म्हणाल्या “एवढ्चं नां डॉक्टर!अहो मग काढून टाका नं ती गाठ लवकर. अहो नऊ महिने माझ्या मुलांना मी पोटात वाढवलं.तेव्हा  कुठे आज तीच सोन्यासारखी   माझी मुलं मला आधार देत आहेतं. माझी लेकरचं  आत्ता माझ्या कामास आलीत.पण ही   बिनकामाची बांडगुळासारखी वाढवून त्रास देणारी गाठ, कशाला पोटामध्ये वाढवू ?  माझी तयारी आहे डॉक्टर, सांगा कधी करायचं ऑपरेशन?  हे पोटातलं निरर्थक बांडगूळ लवकरच काढायला हवं नाही कांहो डॉक्टर? त्यांचं बोलणं ऐकून मी निशब्द झालो. काय ग्रेट बाई आहे? वास्तव  किती सहज स्वीकारलय  ह्या वहिनींनी. मी पुढे म्हणालो ” वहिनी ऑपरेशन नंतर दोन महिने तुम्हाला इथे माझ्या देखरेखीखाली रहावे लागेल,माझ्या क्लिनिकमध्ये .लगेच वहिनींकडून उत्तर आलं. “अहो अगदी आनंदाने राहीनं मी,  पण मग नंतर मात्र मला खडखडीत बरी करूनच घरी पाठवा हं! म्हणजे पुन्हा पेशंट म्हणून   इथे यायला नको. वहिनींचा मुलगा म्हणाला “ दोन महिने ? आई,अगं किती कंटाळा येईल तुला!” त्यावर वहिनींचे उत्तर तयारच होतं. “नाही रे बाळा!  कंटाळा  कशाला  येईल? उलट इथे माहेरी आल्यासारखं वाटतंय मला. वेळोवेळी उत्तम काळजी घेणारे हे डॉक्टर, माझ्या शरीराचे रोग बरे करणार आहेत. तर ह्या अलकाताई मला मानसिक आधार देऊन,सुग्रास पौष्टिक पथ्याचं जेवण देऊन, माझ्या आरोग्याची काळजीचं घेणार आहेत. ऑपरेशन नंतर मी खडखडीत   बरी होणार. आणि मग? -मग महाराणी सारखी या पलंगावर  झोपणार.आणि हो, या महाराणीची सेवा करायला या सिस्टर, मावश्या, मामा आहेतचं कीं  माझ्या दिमतीला. सगळेजण मनापासून आणि आत्तापासूनच खूप प्रेमाने काळजी घेत आहेत माझी. याच्यापेक्षा माहेरचे सुख आणखी काय वेगळे असणार? 

वहिनींच्या या आशावादी सकारात्मक बोलण्यावर सगळ्यांनी हसून खुशीची पावती दिली. आणि मी पण पुढच्या ट्रीटमेंट साठी सज्ज झालो .तर अलका पदर बांधून आनंदाश्रू पुसतं, स्वयंपाक घराकडे वळली. स्वतःशीच म्हणाली ‘ हो वहिनींना शिरा    आवडतो  नां? आजपासून या माहेरवाशिणीच्या माहेर पणाला सुरुवात करायला हवी, नाही का? असं हे आगळंवेगळं  माहेर पण आणि आजार पण  भोगून,सकारात्मक विचारांच्या बळावर बर्‍या होऊन,लवकरच वहिनी ठणठणीत  झाल्या, आणि घरी गेल्या  पण. अजूनही अधून मधून त्या आमच्या भेटीला येतात. अशी माणसं आयुष्यात येणं म्हणजे, एक थंडगार  वाऱ्याची झुळूक असते आणि हा  आनंद दायी गारवा आम्हाला वहिनीच्या सहवासात मिळाला.  तर अशा या वयाने ज्येष्ठ आणि मनाने श्रेष्ठ असलेल्या वहिनी सगळ्यांच्या आवडत्या झाल्या आहेत.

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print