मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभूमी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ रंगभूमी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

( स्पर्धा नुकतीच सुरु झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील. काही तरी कारण झाले, पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही, हे खरे.) इथून पुढे —-

ग्रुप आपल्या शहरात परत आला आणि आपापल्या कामात व्यस्त झाला.

पुन्हा नटराज नाट्य ग्रुपचा “मत्स्यगंधा “चा प्रयोग होणार होता, त्याला जायचे ठरले होते.

पुन्हा मंडळी जमा झाली आणि एक ट्रॅव्हलर घेऊन नटराज ग्रुपचा “मत्स्यगंधा” बघायला निघाली.

मनोज – अनिल देवव्रत कसा करतो बघू,पण सुदर्शन, तुझ्या जवळ पण जाणार नाही देवव्रत.

सुदर्शन – पण माझं पण त्या दिवशी काम बरं झालं नाही रे, मूडच आला नाही.

ज्योती – असं तुला उगाच वाटतं सुदर्शन, तू मस्त काम केलंस, भीष्मला केवढे मोठे आणि कठीण डायलॉग्ज लिहिलेत वसंतरावांनी. मास्तर दत्ताराम ही भूमिका करायचे म्हणे.

मनोज – हो, आणि मत्स्यगंधा आशालता. गाजवली तिने ही भूमिका आणि गाणी. गाणी काय सुरेख आहेत ना यातली.पंडीत अभिषेकींचे संगीत. खुप प्रयोग झाले या नाटकाचे.

ग्रुपची गाडी स्पर्धा चालू असलेल्या गावात पोचली, सर्व मंडळी एका हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश झाली आणि नाटक सुरु होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे साडेसहाला नाट्यगृहाजवळ पोचली.

सुदर्शन आणि बाकी ग्रुप मधील आत गेली, नटराज च्या ग्रुपला भेटायला. अनिल जो नाटकात देवव्रत म्हणजे भीष्म करणार होता, तो मेकअप करून तयार होता. त्याने सुदर्शन, ज्योती यांना पाहिले आणि जवळ येऊन सुदर्शनला मिठी मारली.

सुदर्शन-अन्या, जाडा झालास की रे,व्यायाम करत नाहीस काय?

अनिल – नाही रे, वेळच मिळत नाही, चालणं पण होत नाही.

ज्योती – अनिल, तुझी तब्येत बरी नाही की काय, धापा टाकतोस..

अनिल -हो ग, आज थकवा आलाय, प्रयोग झाला की उद्या डॉक्टरला तब्येत दाखवतो.

सुदर्शन -हो बाबा, रोज चालणं महत्वाचे आहेच आणि तपासून घे बऱ्या डॉक्टरकडून.

एव्हड्यात सत्यवतीची भूमिका करणारी तन्वी आणि बाकी कलाकार, लाईट करणारा उमेश जवळ आले. सर्वजण शेकहॅन्ड करत शुभेच्छा देत राहिले.

सर्वाना प्रयोगासाठी शुभेच्छा देऊन सुदर्शन आणि ग्रुपची लोकं बाहेर आली. तो पर्यत नाटकाची पहिली घंटा दिली होती.

दुसरी घंटा वाजली आणि सुदर्शन, ज्योती, मनोज, अरुणा आत जाऊन आपापल्या खुर्चीवर बसली. परीक्षक स्थानापन्न झाले, संगीत साथ करणारे, प्रकाश योजना करणारा आपआपल्या जागेवर बसले आणि तिसरी घंटा दिली गेली, मग पात्रपरिचय आणि नाटक सुरु झाले.

“संगीत नाट्यस्पर्धेतील आठवा दिवस “

आज आठव्या दिवशी नटराज नाट्यस्पर्धेचे नाटक “संगीत मत्स्यगंधा ‘ सुरु झाले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी हेच नाटक दुसऱ्या नाट्य ग्रुप ने सादर केले होते. त्या दिवशी एवढी गर्दी नव्हती कारण स्पर्धा नुकतीच सुरु झाली होती, जसजशी स्पर्धा पुढे सरकत होती, तसतशी गर्दी वाढत होती. आणि आज शनिवार असल्यामुळे असेल, नाटकाला सातशे हुन जास्त प्रेक्षक हजर होते.

एवढे प्रेक्षक तिकीट घेऊन नाटकाला आले म्हणून नटराज ग्रुपची माणसे खूष होती.

नाटक सुरु झाले, सत्यवती झालेली तन्वी आणि भिवर यांचा प्रवेश सुरु झाला, मग पराशर आणि सत्यवती यांची सदाबहार गाणी, त्या गाण्यानी प्रेक्षक खूष झाले, वन्स मोअर मिळत गेले.

दुसऱ्या प्रवेशात राजा शंतनू आणि सत्यवती यांची भेट, शंतनू सत्यवतीच्या प्रेमात पडणं, तिच्यासाठी झुरणं, आणि मग प्रवेश झाला देवव्रताचा.

सुदर्शन आणि ग्रुप सरसाऊन बसला. देवव्रत स्टेज वर किती आत्मविश्वासाने बोलतो यावर नाटकाचा कस लागणार होता कारण वाचिक अभिनयाची, मोठया दर्जाची, तिथे गरज होती.

देवव्रताच्या भूमिकेत अनिलने प्रवेश केला, त्याचे पहिलेच वाक्य

“भिवरा, तूझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजासाठी मागणी घालायला आलो आहे.”

खरे तर ते देवव्रतासाठी महत्वाचे वाक्य. पण अनिल ने मुळमुळीत म्हटले. संवाद सुरु होते, सत्यवती आणि देवव्रत यांची संवादाची आतिषबाजी व्हायला हवी होती पण अनिलची तब्येत बरी नसावी कदाचित, तो फिक्का पडत होता आणि तन्वी प्रभावी होत होती.

प्रेक्षकात बसलेली अरुणा सुदर्शनाच्या कानात म्हणाली “आज अन्या मूड मध्ये नाही, कमी पडतोय. तुझा देवव्रत किती तरी श्रेष्ठ होता.”

दुसरा अंक संपला आणि पडदा पडला. इकडे देवव्रत झालेला अनिल आत गेला तो घामाघूम झाला. त्याच्या पाठीतून कळा यायला लागल्या. डावा हात दुखू लागला. छाती जड झाली.

छाती धरून अनिल टेबलावर झोपला आणि कण्हू लागला. त्याच्याकडे सर्व मंडळी धावली. अजितच्या लक्षात आले, बहुतेक हार्ट अटॅक येतो आहें.

अजित धावत स्टेज वर गेला आणि प्रेक्षकात कोणी डॉक्टर असल्यास ताबडतोब आत येण्याची विनंती केली.

डॉ. विभुते त्यांच्या बायकोसह संगीत नाटक म्हणून आले होते. त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते त्वरित आत आले. त्यानी टेबलावर विव्हळणाऱ्या अनिलला पाहिले, त्याची नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात आले, हार्ट अटॅक आला आहें, याला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज आहें.

डॉक्टरनी त्यांच्या पॉकेट मधील सोरबिट्रेटची गोळी अनिलच्या जिभेखाली ठेवली आणि धावत आपली गाडी आणायला गेले. तोपर्यत बाकी नाटक मंडळी त्याला वारा घालत होती. घाम पुसत होती. छातीवर बुक्के मारून प्रथमोपचार करत होती.

सुदर्शनने बाहेर स्टेजवरील डॉक्टरांचे बोलणे ऐकले आणि तो पण आत आला. अनिलची परिस्थिती त्याने पाहिली, त्याला आठवले, नाटक सुरु व्हायच्या आधी आपल्या आणि ज्योतीच्या लक्षात आले होते, आज अन्याची तब्येत बरी दिसत नाही, त्याला श्वास लागत होता, म्हणून.

डॉ.विभुते यांनी सोर्बीट्रेट ची गोळी जिभेखाली ठेवली असेल म्हणून कदाचित, अनिलच्या छातीत दुखणे थोडे कमी झाले, घाम थांबला.

डॉक्टरांनी दोघांच्या मदतीने अन्याला गाडीत घेतले आणि ते अजितला म्हणाले “आता काळजी करू नका, मी डॉ. भागवत हॉस्पिटल मध्ये त्याला ऍडमिट करतोय. हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरु ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्या सोबत राहतील .”

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभूमी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ रंगभूमी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

साईनाथ नाट्य मंडळीची वार्षिक बैठक. ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ. बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. मंडळाच्या नाट्य ग्रुपचा दिग्दर्शक सुदर्शन हजर होता. शिवाय मनोज, अरुणा, ज्योती, उदय, वासंती बाई, सदानंद हजर होते. संस्था संगीत नाटकं करण्यात प्रसिद्ध होती. दरवर्षी शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेत भाग घेऊन मग त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत. या आधी संस्थेने अनेक नाटके केली, बक्षीसे मिळविली.

यंदा कुठले संगीत नाटक करावे, यासाठी बैठक होती. सुदर्शनने मागच्या काही वर्षातील संस्थेने केलेल्या नाटकंचा आढावा घेतला, दरवर्षी आपली संस्था प्राथमिक स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर मिळविते, पण अंतिम स्पर्धेत आपण पहिला नंबर मिळवत नाही, ही सल सुदर्शनने मांडली.

या बाबत काही मेंबर्स नी आपली मते मांडली.

अरुणा – संगीत नाट्य स्पर्धा असल्याने आपण ज्यात संगीताला भरपूर वाव आहें, असे नाटक निवडावे. सुदैवाने या वर्षी ज्योती तिचं शिक्षण संपवून पुन्हा ग्रुपमध्ये आली आहे.

मनोज – आपले संगीत साथीदार बदलावे लागतील. कारण आपण स्पर्धेच्या वेळी पहातो, इतर ग्रुप्स दर्जेदार साथीदार घेऊन येतात.

अरुणा – हे खरे आहे, परीक्षक संगीत साथीकडं बारकाईने लक्ष ठेऊन असतात.

सुदर्शन – मग नाटक कुठलं निवडावं? ज्याला उत्तम लेखन आणि संगीत आहे? आणि आपण ते इतक्यात केलेलं नसावं?

मनोज – यंदा ज्योती सारखी देखणी आणि उत्तम गळा असलेली स्त्री कलावंत आहे, सुदर्शन सारखा दर्जेदार वाचिक कलावंत पण आहेच आणि मनोज पण उत्तम गातो, म्हणून आपण “संगीत मत्स्यगंधा” करावं, अस मला वाटतं.

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. सुदर्शनला पटले. अरुणा, ज्योती यांनी पण मान हलवली. मनोजने पण हो म्हटलं.

यंदा स्पर्धेसाठी “संगीत मत्स्यगंधा” करायचे ठरले. सुदर्शन आणि अरुणा संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरींना भेटले. त्यांनी पण मान्यता दिली. नाटकासाठी खर्चाची तजवीज केली.

नाटकाचे दिग्दर्शन दरवर्षी प्रमाणे सुदर्शन करणार होता.

“मत्स्यगंधा ‘” नाटक करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सत्यवती च्या भूमिकेसाठी उत्तम गाणारी आणि देखणी कलाकार हवी होती, त्यामुळे ज्योती सत्यवती करणार हे निश्चित झाले. पराशर साठी पण चांगला गाणारा माणूस हवा होता, मनोज हा अनेक वर्षे काम केलेला आणि खडया आवाजाचा ग्रुप मेंबर होता, त्याला पराशर भूमिका मिळाली, देवव्रत च्या भूमिकेला मोठी मोठी वाक्ये होती, ती पेलणारा कलवंत हवा होता. सुदर्शन तसा होता. त्याचे पाठांतर उत्तम होते आणि शब्दफेक सुरेख होती. त्यालाच ही भूमिका मिळाली, अरुणला चंडोल ची भूमिका. याखेरीज इतर भूमिका इतर ग्रुप मेंबर्स मध्ये वाटल्या गेल्या आणि सुदर्शनने मुहूर्त करून तालमी सुरु केल्या.

स्पर्धेचा फॉर्म भरला. रोज सायंकाळी कलाकार जमू लागले, प्रथम गद्य तालीम सुरु झाली, वाक्ये तोंडात बसली, मग उभ्याने हालचाली दिग्दर्शकाने बांधल्या, मग संगीत साथ करणारे यायला लागले, गाण्याच्या तालमी सुरु झाल्या. हळूहळू प्रकाश योजना करणरा येऊ लागला. दृष्य परिणाम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग सुरु झाला. नाटक हळूहळू बसू लागले. पाठांतरे झाली. गाणी व्यवस्थित बसली.

स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले. या ग्रुपचे नाटक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होते आणि आश्चर्य म्हणजे या ग्रुपचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप, जो दुसऱ्या शहरातील होता, त्यांनी पण यंदा “मत्स्यगंधा ” हेच नाटक स्पर्धेत उतरविले होते.

ही बातमी कळली मात्र ,सुदर्शन खवळला. तालमीच्या वेळी ग्रुप मंडळी भेटली, तेव्हा सर्वांचीच हीच चर्चा.

सुदर्शन – मला वाटते, नटराज ची मंडळी दरवर्षी असेच करतात, आपण हे नाटक बसवतोय, हे अनिलला कळले असेल, म्हणून मुद्दाम तो हे नाटक करतोय.

अरुणा – अरे गेली दोन वर्षे प्राथमिक ला आपण पहिले दुसरे असतो ना, म्हणून ते आपल्याला त्रास देतात, आणि ती तन्वी काही कमी नाही. तीच करत असणार सत्यवती. दुष्ट मेली..

ज्योती – अरे ते करेनात, आपण उत्तम प्रयोग करायचा, आपला प्रयोग तिसऱ्या दिवशी आहे ना, तो करू आणि अन्याचा केव्हा आहें, आठव्या दिवशी आहें ना, तो पहायला सर्वजण जाऊ.

ज्योतीच्या या बोलण्याने सर्व गप्प झाले. पण सुदर्शनला अन्याचा राग आला होता,”साला आपल्याशी स्पर्धा करतो, तरी बरं हा स्टेज वर फापलतो,देवव्रताची भूमिका म्हणजे काय खाऊ वाटला काय याला? मोठी मोठी वाक्ये आहेत, आणि हा अन्या जाडा किती झालाय, दारू मारत असणार आणि बिड्यापण ओढत असतो.

सुदर्शनने तीन रंगीत तालमी आयोजित केल्या. भूमिकेचे कपडे, मेकअप करून, नेपथ्य रचून आणि प्रकाश योजना व संगीत साथीसह तीन प्रयोग. त्याच्या ओळखीच्या आणि नाट्यशास्त्र जाणणाऱ्या लोकांना बोलावून त्यांची मते घेतली. चर्चा केल्या. काही सुधारणा केल्या.

तीन रंगीत तालमी झाल्यामुळे कलाकारांना विश्वास मिळाला. ज्योती आता उठताना,झोपताना, जेवताना, बोलताना सत्यवतीची भूमिका जगू लागली. सुदर्शन देवव्रताचे संवाद मोठया मोठ्याने आरशात पाहून म्हणू लागला. मनोज, अरुण यांच्या पण अंगात भूमिका शिरली होती.

स्पर्धा सुरु झाली आणि तिसऱ्या दिवशी ग्रुप बसने स्पर्धेच्या गावात पोहोचला. दुपार पासून स्टेज मांडणी, लाईट जोडणे, पेटी तबल्याचे सूर मिळविणे, मग मेकअप, कपडे.

परीक्षक आले, आत सर्वाना भेटून गेले. या वर्षीचे परीक्षक नाट्यकला जाणणारे, संगीत उत्तम समजणारे होते, त्यामुळे सुदर्शन खूष होता.

मित्रमंडळी ,अनेक ओळखीचे आत येऊन शुभेच्छा देत होते, नाटक वेळेत सुरु झाले. पहिला अंक संपला. पुन्हा बाहेरून मित्र परिवार आत आला, ज्योतीचे, मनोजचे कौतुक करून गेला.

दुसरा अंक संपता संपता देवव्रत स्टेज वर आला आणि नाटकाने स्पीड पकडला. मग तिसरा अंक देवव्रत आणि सत्यवती, अंबा यांचा.

नाटक संपलं, लोकांनी खूप कौतुक केलं.

परीक्षक सुद्धा आत येऊन भेटून गेले. दुसऱ्या दिवशीच्या सर्व पेपर मध्ये कौतुक केलं गेलं. विशेष करून ज्योती जिने सत्यवती साकारली होती, जिला खुप गाणी आणि संवाद होते. स्पर्धेतील प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खूष नव्हता. आपण या पेक्षा कितीतरी चांगली भीष्माची भूमिका करायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. भूमिका अत्यंत ताकदीने कानेटकरांनी लिहिली होती, पण आपल्याला सूर लागला नाही हे खरे.

कदाचित दिग्दर्शक असल्याने एका माणसावर खुप लोड पडतो, प्रत्येक गोष्टीत त्याला लक्ष घालावे लागते. त्यामुळे स्वतः च्या भूमिकेकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही, हेही कारण असेल किंवा स्पर्धा नुकतीच सुरु झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील. काही तरी कारण झाले, पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही, हे खरे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कन्यादान— भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ कन्यादान— भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(आणि…” ते बोलतच होते. आपल्याभोवती कुणीतरी घट्ट दोरी आवळताहेत असं रेवाला भासत होतं. ती स्तब्ध झाली.) — इथून पुढे 

“हे बघ रेवा, ही आमच्या स्वामीजीने मंत्रून दिलेली ही पुडी आहे, ती सदैव जवळ बाळगायला हवंस. समजलं?” या वाक्यानं ती भानावर आली आणि म्हणाली, “होय मामंजी, समजलं. येऊ मी?” असं म्हणून ती तरातरा आपल्या खोलीत निघून गेली. फक्त आमच्याकडून आहेर म्हणून दिलेले कपडे आणि दागिने तिने एका सूटकेसमध्ये भराभर भरले. तितक्यात नवरदेव तिच्या खोलीत आला. “रोहित, बरं झालं तुम्ही आलात ते. पाठराखीण म्हणून थांबलेली माझी आत्या निघायचं म्हणतेय. मी त्यांना सोडून येते आणि येताना माझे नेहमीचे ड्रेसेस घेऊन तासाभरात येते.” म्हणून त्या दोघी टॅक्सी बुक करून तडक इकडे आल्या. पुन्हा त्या घरी पाऊल ठेवणार नाही हा रेवाचा निर्णय ठाम होता.”

“मग काय रोहित अन तिची सासरची मंडळी तिला न्यायला आलीच नाहीत काय?” हरीशने शंका विचारली.

वहिनी पुढे म्हणाल्या, “आले होते. नंतर पंचायत बोलावली गेली. कन्याच नांदायला जाणार नाही म्हटल्यावर कोण काय करणार? काय असेल तो दंड भरू पण आमची मुलगी त्या घरी येणार नाही असं आम्ही उभयतांनीही आग्रह धरला. खूप मनस्ताप झाला. सगळं एकदाचं मिटलं. रेवा आणि आम्ही दोघे मात्र त्या धक्क्यातून अजून सावरलेलो नाही.”

हरीश शांतपणे म्हणाला, “खरं आहे वहिनी, माझ्या लेकीचा साखरपुडा होऊन लग्न मोडलं होतं, तेव्हा साहेबांनीच मला धीर दिला होता. परंतु रेवाविषयीचं त्यांच्या मनात असलेले दु:ख मला आज कळलं. ‘तुझ्या बाबतीत त्या विधात्याने चूक वेळीच दुरूस्त केलेली दिसतेय’, असं त्यांनी म्हटलेल्या वाक्याचा उलगडा मला आज झालाय.  रेवाची काळजी करू नका, निश्चितच तिचंही चांगलं होईल या शक्यतेवर विश्वास ठेवा.”

तितक्यात रेवा आली.

रेवाकडे पाहत हरीश म्हणाला, “रेवा, एखादा अपघात घडला म्हणून रडत कुढत बसणं, नैराश्याच्या गर्तेत जाणं, आपलं भवितव्य अंधारात लोटणं हा त्यावरचा तोडगा नसतो. भविष्यात आणखी काही तरी चांगलं वाढून ठेवलेलं असेल, त्यामुळेच असा प्रसंग ओढवला असावा असा सकारात्मक विचार करायला हवा.”

तितक्यात दारावरची बेल वाजली. रेवानं दार उघडलं. सतीशची अन रेवाची नजरानजर झाली.

साहेब वहिनींच्याकडे पाहत म्हणाले, “सतीशसाठी चहा आणताय ना?”

सतीश नम्रपणे म्हणाला, “नको सर आताच झालाय, पुढच्या वेळी आलो की दोन कप घेईन.”

असं म्हटल्यावर लाटकर साहेब प्रसन्नपणे हसत म्हणाले, “नक्की येशील ना?”

हरीश आणि सतीशने साहेबांचा निरोप घेतला.

हरीशच्या मनात काय शिजत होतं कळत नव्हतं. काही तरी कारण काढून तो सतीशला वारंवार साहेबांच्या घरी पाठवत होता. कधी साहेबांना ही कागदपत्रे देऊन ये तर कधी हा रिपोर्ट नेऊन दे. या निमित्ताने सतीशची अन रेवाची वरचेवर भेट होत होती.

बेल वाजताच रेवाने दार उघडलं. सतीशला तिने दारातच सांगितलं, “आईबाबा चेकअपसाठी हॉस्पिटलला गेले आहेत. तासाभराने परत येतील.”

सतीश मिश्किलपणे हसत म्हणाला, “म्हणजे मी आत यायचं नाही की काय? माझ्यासाठी चहा टाकावा लागेल म्हणून बाहेरच्या बाहेर कटवताय की काय?”

ती दारातून बाजूला सरकताच काही रिपोर्ट्स आणि मिशेल ओबामाचं ‘बिलीव्ह इन दि पॉसिबिलीटी’ शक्यतेवर विश्वास ठेवा हे पुस्तक तिच्या हातात देत तो म्हणाला, “काकांनी हे पुस्तक तुम्हाला द्यायला सांगितलं आहे.” आणि आत जाऊन सोफ्यावर बसला. “तुम्ही हे पुस्तक वाचलंत काय?” रेवाने सतीशला विचारलं.

सतीश पटकन म्हणाला, “वाचलं नाही. परंतु माझाही शक्यतेवर खूप विश्वास आहे. एखादी गोष्ट शक्य वाटत असेल तर मी त्याचा पाठपुरावा करतो.”

“उदाहरणार्थ एखादी शक्य वाटत असलेली अशी किंवा संभाव्य गोष्ट सांगाल काय?.” रेवानं विचारलं.

“मी एमपीएससी परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होईन या शक्यतेवर माझा प्रचंड विश्वास होता.”

“घडून गेलेली गोष्ट नव्हे, भविष्यकाळातील संभाव्य किंवा शक्य वाटत असलेली गोष्ट सांगा. मग तुमचा विश्वास कितपत खरा ठरतो ते मी पाहीन !”

“पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. कराल मदत? तरच मी ती शक्य वाटत असलेली गोष्ट सांगेन.”

“माझ्याकडून ती मदत होत असेल तर मी नक्की करीन. आधी ती शक्य वाटत असलेली गोष्ट कोणती ते तरी सांगा.”

“माझ्याशी लग्न कराल? पहिल्या भेटीतच मला ही गोष्ट शक्यता असलेली वाटली म्हणून मी विचारतोय. सांगा ना.”

“सतीश तुम्हाला माझा भूतकाळ माहीत आहे ना?”

“मला तुमच्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही. तुम्हीच माझं वर्तमान आणि माझे भविष्य आहात.”

“तुमच्यासाठी चहा आणते.” असं म्हणत रेवा पटकन निघून गेली.

दार उघडंच होतं. लाटकर दांपत्य सरळ आत आले. त्यांनी सतीशची विचारपूस केली. सतीश चहा घेऊन बाहेर पडला. पहिल्यांदाच रेवाच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकलेलं सतीशनं पाहिलं. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.

सतीशने काकांच्या कानांवर ही गोष्ट घातली. हरीशला बहुधा हेच अपेक्षित असावं. लाटकरसाहेबांना भेटून हरीशने पुढील बोलणी केल्या. पंधरा दिवसाच्या आत तालुक्याच्या मंगल कार्यालयात अतिशय साधेपणाने सतीश आणि रेवाचा मंगल विवाह संपन्न झाला.

रेवाची पाठवणी करताना हरीशचे हात हातात घेत, भावविवश होऊन लाटकर साहेब म्हणाले, “हरीश, अगदी मनापासून सांगतो. आम्ही उभयता तुमचे खूप खूप ऋणी आहोत.”

हरीशदेखील भावुक होत बोलला, “साहेब, ‘कन्यादान’ तुम्ही केलंत. दान देणाऱ्या दात्याचे, दान स्वीकारणाऱ्याने ऋण मानले पाहिजेत. रेवासारखी सुशिक्षित, सुसंस्कृत, गुणी मुलगी आमची सून म्हणून आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो.” लाटकरांनी सगळ्या वऱ्हाडी मंडळींचा निरोप घेतला.

‘सकारात्मक शक्यतेवर विश्वास ठेवायला हवं, मग ते फलद्रूप होतं’ हे विधान खरं ठरल्यानं रेवाचा चेहरा प्रसन्न फुलासारखा उमललेला दिसत होता.

ही सुफळ कथा संपूर्ण झाली नाही, चांगुलपणाचं बीज रोवत, ती कथा पुढच्या घरी मंगल संदेश घेऊन पुढे पुढे निघाली आहे… !

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कन्यादान— भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ कन्यादान— भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

तो काळच असा होता, मुंबईतल्या कार्पोरेट ऑफिसच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांत उत्तर भारतीय आणि बंगाली अधिकारी वर्गच अधिक होता. त्याच सुमारास डिपार्टमेंटमध्ये जनरल मॅनेजर म्हणून लाटकर साहेबांची नियुक्ती झाली. जनरल मॅनेजर कुणीही येवोत हरीशला फरक पडत नव्हता. कारण ‘हेड ऑफ दि डिपार्टमेंट’ कुणीही असला तरी ‘ब्रेन ऑफ दि डिपार्टमेंट’ हरीशच होता. 

कंपनीच्या विक्रीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काय करता येईल ह्याविषयी हरीश नवनवीन कल्पक प्रेझेंटेशन सादर करायचा. लाटकर साहेब मराठी असल्याने तो साहेबांशी चक्क मराठीतच बोलायचा. त्या अधिकाऱ्यांचा जळफळाट व्हायचा.

हरीश वेगळं काही करत नव्हता. पूर्वीसारखेच काम करत होता, परंतु आता साहेबांच्याकडून वेळोवेळी त्याच्या कामाचं कौतुक होत होतं, त्यामुळे त्याला एक वेगळंच समाधान लाभत होतं. हरीश दर शनिवारी पुण्याला जाऊन सोमवारी मुंबईला परत यायचा.  

हरीश अशाच एका सोमवारी सकाळच्या बसने मुंबईला पोहोचला. त्याचा नेहमीचा ओसंडून वाहणारा उत्साह मात्र आज कुठेतरी हरवला होता. साहेबांनी बोलावताच डायरी घेऊन त्यांच्या केबिनमध्ये हजर झाला.

“हरीश, पुढच्या तिमाहीत विक्रीचे लक्ष्य गाठण्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटजी करता येईल याचा विचार करून आराखडा तयार कर आणि जमल्यास मला संध्याकाळपर्यंत दाखव.”

लाटकर साहेबांच्या आदेशावर हरीश थंडपणे म्हणाला, “होय साहेब, तयार करतो.” 

हरीशची देहबोली पाहून साहेब लगेच म्हणाले, “काय रे, आज तुझी तब्येत बरी नाहीये का? तुझा चेहरा पडलाय म्हणून विचारतोय.” 

हरीशच्या डोळ्यांत पाणी तरारलं. 

“हरीश तू आधी बस पाहू. कामं होत राहतील रे. सांग काय झालं ते ”

“साहेब, गेल्या महिन्यात मी किती उत्साहानं माझ्या लेकीचा वाङनिश्चय साजरा केला होता, डिसेंबरमध्ये लग्न ठरलं होतं. पण अतिशय क्षुल्लक कारणावरून हे लग्न मोडलं.”

“हरीश, अरे तुझं मन:पूर्वक अभिनंदन. अक्षता पडायच्या आधीच त्या कुटुंबाचं खरं स्वरूप बाहेर पडलं, तुझं पूर्वसंचित कामाला आलं आहे. तुझी कन्याही नशिबवान आहे म्हणायची. लग्न लागल्यानंतर असं काही झालं असतं तर मात्र अख्खं कुटुंब हवालदिल होऊन गेलं असतं. असो. तुझ्या बाबतीत तरी त्या विधात्याने आपली चूक वेळीच दुरूस्त केलेली दिसतेय. काळजी करू नकोस. तिला नक्कीच चांगला वर मिळेल.” 

हरीशला बरं वाटलं. मुलीचं लग्न मोडल्यानंतर असा सकारात्मक विचार किती लोक करतात? लाटकर साहेबांच्याविषयी हरीशचा आदर दुणावला. संध्याकाळी फोनवर पत्नीशी बोलताना साहेबांची प्रतिक्रिया सांगायला विसरला नाही. 

लाटकर साहेबांचं भाकित खरं ठरलं. हरीशच्या लेकीचं लग्न जमलं. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. जावई चांगला भेटला त्याहून महत्वाचे म्हणजे लेकीला सुसंस्कृत सासू-सासरे लाभले याचा आनंद अधिक होता. हरीशला मात्र एक चुटपुट लागून राहिली होती. लेकीच्या लग्नाला नक्की येतो असं सांगून देखील लाटकरसाहेब आले नव्हते. फक्त अभिनंदनाची तार आली होती. 

लग्न पार पडल्यानंतर हरीश कामावर रूजू झाला. लाटकर साहेबांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने ते रजेवर होते. हॉस्पिटलहून ते कालच घरी परत आल्याचं आणि त्यांना आणखी पंधरा दिवसांची विश्रांती घ्यायला सांगितल्याचं कळलं. ही बातमी हरीशसाठी धक्कादायकच होती. 

हरीश आपल्या पुतण्याला सोबत घेऊन साहेबांना भेटण्यासाठी ठाण्याला गेला. बेल वाजवताच एका सुस्वरूप तरूणीने दार उघडले. 

“मी हरीश. साहेबांना भेटायला आलोय,” असं म्हटल्यावर, “हो, आत या. बाबांनी सांगितलंय, तुम्ही भेटायला येणार होता म्हणून. बसा. मी बाबांना निरोप देते.” म्हणत ती आत गेली. साहेबांना मुलगी आहे, हे पहिल्यांदाच हरीशला कळलं. 

थोड्याच वेळात साहेब आले आणि समोरच्या सोफ्यावर बसत विचारलं, “हरीश पत्ता शोधायला तुला त्रास नाही ना झाला?” 

“नाही साहेब, हा माझा पुतण्या सतीश. ह्याला या भागाची माहिती आहे, म्हणून त्याला सोबत घेऊन आलो.”

सतीशने साहेबांना नम्रपणे नमस्कार केला. ‘काका मी इथे जवळच माझा एक मित्र राहतो. मी त्याला भेटून लगेच येतो’ असं सांगून सतीशने निरोप घेतला.     

“हा सतीश काय करतो?” साहेबांनी उत्सुकतेनं विचारलं. 

“साहेब, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. आठ दहा मोठ्या कंपन्यांत मिळत असलेली संधी नाकारल्या. राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास व्हायचा ध्यास घेतला आणि विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता त्यानं उत्तम यश मिळवलं आहे. कठोर परिश्रम हेच त्याच्या यशाचे गमक आहे. आता पोस्टींगची वाट पाहतोय. माझा मोठा भाऊ आणि वहिनी अपघातात गेल्या तेव्हा तो तीन वर्षाचा होता. आम्ही त्याला मुलासमान सांभाळलं आहे.”

इतक्यात लाटकरवहिनी चहाचा ट्रे घेऊन आल्या. हरीशने त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि स्वत:ची ओळख करून दिली. 

वहिनी हसत म्हणाल्या, “साहेब ऑफिसच्या गोष्टी कधीच घरी सांगत नाहीत पण ते तुमच्या कामाचं कौतुक मात्र मला अधूनमधून सांगत असतात.”

हरीश सहज म्हणाला, “साहेब, तुमच्या कन्येविषयी तुम्ही कधी बोलला नाहीत ते.” 

लाटकर वहिनी गंभीर होत म्हणाल्या, “काय बोलणार ते? मी सांगते. दोन वर्षापूर्वी रेवाचं लग्न मोडलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या सासरेबुवानी तिला दिवाणखान्यात बोलावलं. सगळी घरची मंडळी आधीच जमलेली होती. रेवा येताच सासरेबुवानी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “रेवा, तू आता या घरची सून आहेस. इथल्या रीतीरिवाजाप्रमाणे तुला चालावे लागेल. सकाळी नऊच्या आत ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण एक वाजता आणि रात्रीचे जेवण आठच्या आत तयार असायला हवे. मंगळसूत्र आणि बांगड्या सोडून बाकीचे सर्व दागिने सासूच्याकडे सोपव. ती लॉकरमध्ये ठेवून देईल. सणासुदीला माहेरी जाता येईल. परंतु त्याच दिवशी माघारी यावे लागेल. आणि…” ते बोलतच होते. आपल्याभोवती कुणीतरी घट्ट दोरी आवळताहेत असं रेवाला भासत होतं. ती स्तब्ध झाली. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वंध्यत्व… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ वंध्यत्व… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

(गजाभाऊ काय न्हाय तुझ्या नातवाला बघाय आलो व्हतो. अस गजाभाऊ म्हनला. तस नाम्यांनी चहाची अर्डर सोडली,  अन नातवाला बी भैर घेऊन यायल सांगीतलं.) इथून पुढे —- 

चहा झाला , नातवाला धुपट्यात गुंडाळून नाम्याच्या बायकोनं सोप्यात आणलं अन त्याला सुपात गजाभाऊ समोर ठेवलं . तस गजाभाऊ न शंभर रुपयांची नोट तीन आठवड्याच्या बाळाच्या मुठीत ठेवली .

बाळाला सरस्पतींन मुलाला सुपासकट आत न्हेल . मग गजाभाऊन प्रश्न केला ? नाम्या तुझ्याबी घरात

चारपाच वर्स पाळणा हलत नव्हता , तू काय केलंस ? तस नाम्या म्हणाला आर माज्या सरस्पतीच्या भावान , माझ्या मेव्हन्यांनं सूनबाईला मिरजला दाखवाय दवाखान्यात नेली . अन औषधांचा मारा चालू केला . तस दोघबी नवरा बायकू मिरजला एक वरीस खेट घालत व्हत ! तवा कुठं हे दिस बघाय मिळालं . गजाभाऊंन मिरजचा पत्ता घेतला . दुसऱ्याच दिशी , गंप्या अन गोदावरीला टकोटाक मिरजचा दवाखाना गाठला .  पण गप्प बसला न्हाय .

मरणाचा उन्हाळा ! उन्ह जरा मावळतीला कल्याल ! सावल्या लांब लचक व्हत हुत्या ! कागवाड तस मोठं गाव , शिरमंत पटवर्धन सरकारच संस्थानिक गाव ! पण गावाला यष्टी स्टॅन्ड नव्हतं ! गावच्या येशी भैर मोती तळ ! आता त्याला मोतीतळ का म्हणत्यात कुणाला बी म्हैत नव्हतं !  त्या तळ्याच्या म्होर एक फर्लांगवर , मोठं लिंबऱ्याच झाड , ततच समद्या यष्टी बस थांबत व्हत्या ! झाडाला लागून एक हॉटल , त्याच्या म्होर म्हमद्याच पानाचा ठेला . बाजूला बाजी मोरेच सायकलीच दुकान . दुकानाम्होर भाड्याने द्यायच्या सायकली , तीस पैसे भाड तासाला . पंचर झाली तर पन्नास पैसे ज्यास्त !

तेवढ्यात येक यष्टी मिरजकडून अथणी कड जाणारी आली . गाडी थांबली तस धुरळा उडाला .

गाडीतुन बरीच लोक उतरली . सगळ्याच तोंड घाम्याजलेली . अन मळकट ! मरणाचा  उन्हाळा! कसबस धोतर्याच सोगा पकडून गजा भाऊ उतरले . त्यांच्या मागोमाग त्यांची सून गोदावरी अन मुलगा गंप्या पण उतरला .

पडक्या सिनेमा टाकीज मधून गेलेल्या रस्त्याने आडवी वाट करत जाऊ लागले . तस बाजीराव न त्यांना हटकले , म्हनला तात्या असल्या उन्हात कुठं गेला व्हता ?  अस म्हनताच गंप्याला राग आला , पण गप्पगार बसला . बोलणार कस ! त्यावर गजाभाऊ म्हनलं काय न्हाय पावण्याच्या लग्नला गेलं व्हतो . गजाभाऊ मनातल्या मनात त्या बाजीला शिव्या हसडत व्हते . नसत्या चांभार चवकश्या लागतात ह्यांना!

येशीतन मारुती देवळा म्होरन चालत वरच्या डांबर कट्ट्यावरून त्यांनी वळसा घातला अन घर जवळ केलं . चार पायऱ्या चढून सोप्यात येऊन बसल . तोंडातील तंबाकू काढली . डोक्यावरील काळी टोपी बाजूला करून , हातानी घाम बाजूला केला . तेवढ्यात राधाकाकू म्हणजे गजाभाऊ च्या पत्नी मठातील गार पाणी आणून गजाभाऊ म्होर ठेवलं . तस गजाभाऊ नी तांब्या तोंडाला लावून गट गट आवाज करत पाणी खतम केलं . अन गार फरशी वर आडवे झाले !

गजाभाऊ कदम म्हणजे मोठी गावची आसामी ! गावात चिरेबंदी दुमजली  वाडा , मोठं ऐसपैस आंगण ! अंगणात पडवी त्यात खिल्लारी बैलजोडी ढवळ्या अन पवळ्या .  चार म्हसर , दोन गायी , दोन कालवड . अंगणातन वरच्या बाजूला चौसोपी कट्टा अन सोपा . मधोमध मोठा दरवाजा . बाजूला चबुतरा , माजघर , माजघरातल्या आतल्या बाजूस चार खोल्या . कोठीच्या खोलीत धान्यांनी भरल्याली पोती .

मधल्या बाजूला ऐसपैस कडेपाट ! त्यावर राधकाकू बसून हिंदोळे घेऊ लागल्या !

गंप्या नवसाचा पोरगा ! एकुलता एक ! त्याच लगीन होउन बारा वरीस उलटली तरी बी पाळणा हलीत नव्हता ! त्यासाठी राधा काकूंनी लै उपाय केलं , पण गोष्ट काय जमून येत नव्हती !

देव देवरूशी , अंगारे धुपारे , समद करून झालं व्हतंच ! कोण काय म्हणतील ते करत व्हती बिचारी .  चोळाप्पा मंत्रिकाकडे तर त्यांनी खेट घातलं ! त्यो सांगिल ते केलं  . उलट्या पखाची कोंबडी उतरून टाकली . समद झालं पण वीस एकर रानाला वारस घावंत नव्हता !

यल्लमाचा  जग आणून घरी बसवला ! देवीचा गोंधळ झाला पण , काय बी उपेग झाला न्हाय .

गंपू दादा अशी कोणतरी हाळी मारली तस त्या तंद्रीतन भानावर आल्या ! गोदानी चहा आणून हातात ठेवला . मग त्यानी कडेपाटवर बसून चहा घेतला भैर रानातला सालगडी गोप्या अन गोप्याची बायको आली व्हती . दोघांना एकदम बघून गजाभाऊ चमकलेच !

गजाभाऊ म्हनलं आज जोडीने आलायस ? त्यावर काय न बोलता गप्पगुमान आत माजघरात गेले . गोप्या गेली कित्येक वर्स त्यांचा घरगडी व्हताच . वहिवाट पण लै दिसची व्हती . गोदानी समद्याना चहा दिला . तस राधकाकू म्हंल्या आज काय काढलंय बाबा !

त्यावर गोप्याची बायकू म्हणली , काकू एवढं समद करतायसा एकडाव मरगुबाईल का जात न्हाईसा . तस राधकाकू म्हंल्या समद झालाय बघ . तीत बी जाऊन देवीची ओटी भरून पाळणा पण बांधून आले . आता देवच डोळे झाकून गप्प बसलाय तर आम्ही काय करणार . आमच्या हातात जेवढं जेवढं होत ते समद केलं . आता भार देवावर च !

पुढं गंप्या अन गोदा जवळपास वरीसभर,  मिरजला औषधाला जात व्हती , हे गावच्या लोकांना बी कळलं . अन एकदिस असा आला की गजाभाऊ अन राधकाकू हंरकून गेल्या . त्यांना काय करावं काय नकु अस झाल्याल .

कारण बी तसच व्हत , गोदाला दिस गेलं व्हत , अन तिची चोर चोळी करायचा घाट गजाभाऊ नी आखला व्हता . तीन महिन्याच्या आत चोरचोळी केली अन आख्ख्या गावाला जेवणाच

आवतान बी दिल !

— समाप्त — 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वंध्यत्व… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ वंध्यत्व… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

पौषची हुडीहुडी भरणारी बोचरी थंडी, अन गार गार वारा. जिकडे तिकडे बनशांकरीच्या देवळात, घरोघरी नवरात्र झोकात चाललं व्हत. नैवेद्याची रेलचेल, भजन काकडा आरती समदीकडे जोमात सुरू व्हतीच. पण गजाभाऊंच्या घरी येगळीच वर्दळ चालू व्हती. राधकाकू तर भल्या पहाटे उठून रांधत व्हत्या. चपात्या, वाटलेली डाळ, घट्ट झुणका, दहीभात , लोणचं इत्यादी दुरडीत भरून घेत व्हत्या. 

दारात सवारीची बैलगाडी उभी व्हती. शेतातला वाटेकरी सिध्दाप्पा बैल जुंपून तयार व्हता. तस गजाभाऊ अन राधकाकू लगबगीनं गाडीत बसल्या. 

शुक्राची चांदणी इरघळत व्हतीच. कोंबड्याची बांग बी झाली. घराघरात छप्परा वरून धूर भैर पडत व्हता. आंबाबईच्या देवळात घंटा वाजत व्हती. 

चिमण्यांची चिवचिवाट चालू झाल्याली. अन बैलगाडी पांनदीच्या वाटला लागल्याली. धुकं शाल पसरून बसल्याल. दहिवर चौकडं पडल्याल. गाडी ओढ्या जवळ आली. तस मोराच केकाटन चालू झालं. 

मधीच कुठंतर वटवाघूळ फडफडत जाऊन झाडाला उलट टांगल्याल व्हत. आता गाडी मुख्य रस्त्याला आली. तस झुंजूमंजू झालं. गाडी मुत्नालच्या रस्त्याला लागली. मुत्नाल गाव तस छोटंसं पण तिथला ज्योतिषी व्होरा पंडित गुंडाचार्य लै परसिध्द गडी. त्याच्या अंगणात सकाळ दरण लोकांची गर्दी ! अडीअडचणी घेऊन लोक त्याच्याकडे येत व्हत व गुण पण येत व्हतंच ! 

गजाभाऊ अन राधकाकू आज त्याच कामगिरीसाठी चाललं व्हत. बघता बघता दिस कासराभर वर आला, हवेत जरा ऊब पण आली. 

गाडीच चाक करकरत एकदा मुत्नालच्या येशीत धडकली. 

जवळच् वडाचा पार , तिथंच सिद्धाप्पांन गाडी थांबवली. अन बैलाचा जु रिकामा केला. गाडीतन दोघबी उतरल्यालीच. गाडीतला कडबा बैलाम्होर टाकून बैल बांधली. 

गजाभाऊ कदम अन राधकाकू गुंडाचार्यच घर जवळ केलं. बघत्यात तर काय ! त्याच अंगण सोडून गल्लीतबी लोकांची तोबा गर्दी ! कसबस राधकाकू अंगणातून सोप्यात आल्या.

सोप्यात समदिकड जाजम घातल्याल. दाटी वटीन लोक अन बाया पण बसल्याल. 

गुंडाचार्य म्हणत्याला जरिकाटी धोतर,अंगात बारबंदी अन डोईवर कोषा पटका. खांद्यावर लाल जरिकाटी उपरण,  कपाळावर उभं गोपीचंदी टिळा, गळ्यात तुळशीची माळ अस साग्र संगीत बसल्याल. त्याच्या म्होर चौरंग त्यावर चार पाच नमुन्यांची पंचांग ! बाजूला कवड्याची रास ! 

एकेक गडी म्होर येत त्याला डोकं टेकवून नमस्कार करीत व्हता अन आपलं गाऱ्हाणं घालीत व्हता ! तस गुंडाचार्य काहीतरी बोटांची आकडे मोड करीत व्हता, पंचांग बघून त्याला काहीतर तोडगे सांगत व्हता. अस करताकरता जवळपास बारा वाजलं तस राधकाकू अन गजाभाऊचा लंबर लागला !

तस गुंडाचार्यन ईचारल बोला, काय अडचण हाय.

त्यावर दोघबी पंचांगला  डोस्क टेकवून नमस्कार केला, अन बोललं काय सांगणार गुरुजी – 

गुरुजी – काय असलं ते भीडभाड न ठेवता बोला. 

राधकाकू – आमचं एकुलता येक ल्योक अन सून. लगीन व्होहून बारा वरीस झालं ! अजून घरात पाळणा हलना, अन आम्हाला वारीस घावना ! अस म्हटल्याव

गुंडाचार्य डोळ मिटून शांत बसलं अन हातानी आकडेमोड केली. घड्याळ बघितलं अन पंचांग मांडलं. 

जवळच्या पाटीवर पेन्सिलने कुंडली मांडली. गजाभाऊंच्या हातात कवड्या देऊन फास फेकायला सांगितलं. त्याच दान पडल्यावर गुरुजींना डोळ जरा किलकिल करून, पांडुरंग पांडुरंग अस म्हटलं !

दोघबी गुरुजी काय सांगत्यात ह्याचाकड लक्ष्य व्हत. 

गुंडाचार्य – भिऊ नकोस इत्याल्या बुधवारी, मुलावरून अन सून वरून सात पिठाची दामटी, केळ, लिंबू, तेल तिखट अस घेऊन, दोघांच्या वरून उतारा कर अन गावच्या येशी भैर टाक ! 

राधकाकू – आणि काय दोष हाय म्हणायचं ? 

गुंडाचार्य – दोघांना पण कालसर्प दोष आहे ! त्याची शांती नरसिंह वाडीला करून घे ! म्हणजे  तुच्या घरात एक वर्षात पाळणा हललाच म्हणून समज ! 

तस दोघं गुंडाचार्यला परत नमस्कार करून जवळ असल्याला नारळ धोतर जोडी अन पान सुपारी दक्षणा ठेऊन, भैर पडलं. 

दुपारचं एक वाजला होता, परत वेशीबाहेर येऊन जवळच्या मारुती देवळात बसून आणलेली शिदोरी सोडली. जेवण झाली तस सिद्धाप्पांन परत गाडी जुंपली. अन परतीच्या मार्गाला लागलं ! 

घरी आल्याव गुंडाचार्य नी सांगितलेला सर्व तोडगा केला. दिस,मास करीत कॅलेंडर फिरू लागला. दोन वरीस झालं तरी, इकडची कडी तिकडं झाली न्हाय. 

गावच्या ग्रामदेवतेच नैवेद्य, ओटी अन दंडवत बी झालं. गजाभाऊ कटाळून गेलं. तस एकदा वडाच्या पारावर बसलं व्हत. गावची भावकी बी बसल्याळी. सीतारामन उगाचच खाकरून इशय काढला. गजाभाऊ काय काय केलसा औंदा शेतात. म्हटल्याव गजाभाऊनी पानांची चंची भैर काढली. अन सुपारी कातरत सीतारामला दिली. पान अन चुना बी दिला तस तांबकुची चिमट बी दिली. सीताराम गडी खुश झाला. अन म्हणाला वरच्या अळीतला,नाम्याच्या पोराला मुलगा झाला. एक वरीस दवाखाना करीत व्हता. असा विषय काढल्यावर, गजाभाऊच्या काळजात चरर झालं. अरर इसरलो गड्या मला रानात जाय पाहिजे ! आता सांच्याला कस काय काम हाय बा तुझं

इति सीताराम. 

त्याच काय हाय सीताराम, म्या रानात मेंढरं बसवल्यात, त्यांचं रातच जेवण शिदोरी द्यायचं ठरलं हाय. बर झालं तू राना ची आठवण करून दिली. अस म्ह्णूनश्यान गजाभाऊन पिचकारी टाकली अन तडक गप्पगुमान वरच्या आळीतील नाम्याच्या घरी गेला. 

नाम्या  म्हसरांचं धार काढीत व्हता. गजाभाऊ अलगदपणे आतल्या सोप्यात जाऊन बसला. धार काढल्यावर भैर येऊन बघतोय तर गजाभाऊ दिसलं ! तस राम राम गजाभाऊ आज हिकड कुठं

वाकडी वाट केलायस, अस नाम्या म्हणताच , गजाभाऊ काय न्हाय तुझ्या नातवाला बघाय आलो व्हतो. अस गजाभाऊ म्हनला. तस नाम्यांनी चहाची अर्डर सोडली,  अन नातवाला बी भैर घेऊन यायल सांगीतलं. 

 – क्रमशः भाग पहिला     

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जरीकाठी पदर !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “जरीकाठी पदर !श्री संभाजी बबन गायके 

“आज्जी,पदर कर पुढं !” असं नातीनं म्हणताच पापड लाटत बसलेल्या सीताबाईंनी मान वर करून पाहिलं. अंगणात त्यांच्यासारख्याच अन्य काही म्हाता-याही पापडाचे गोळे घेऊन पापड लाटण्याची कामं पटापट करीत बसल्या होत्या…त्यांनीही लगोलग वर पाहिलं. हातात कापडी पिशवी घेऊन सीताबाईंच्या थोरल्या मुलाची मुलगी कांता त्यांच्यासमोर हस-या चेह-यानं उभी होती. कांता शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होऊन वर्ष होत आलं होतं.

सीताबाईंना वाटलं कांतानं नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीचा खाऊ आणला असेल… मस्तानी! त्यांच्या शहरातलं हे अत्यंत प्रसिद्ध पिण्याजोगं थंडपेय… आईसक्रीम घातलेलं… पण तसं महाग असल्यानं अगदी केंव्हातरीच मिळू शकणारं आणि ते सुद्धा फुल ग्लास नव्हे तर हाफ. कांता त्या शाळेत रुजू होण्याआधी घरीच मुलांच्या किरकोळ शिकवण्या घ्यायची. वस्तीतल्या लोकांची मोठमोठ्या शिकवण्यांच्या फिया भरण्याची ऐपत तशी नसायचीच…पण कांता पैशांचा फारसा आग्रह धरीत नसे. आलेले पैसे असेच आज्जी आणि तिच्या मैत्रिणींच्या खाऊवर मजेने खर्च करत असे. सीताबाई तशा चांगल्या खात्यापित्या घरच्या कन्या पण लग्नानंतर सासरी आल्या आणि काहीच दिवसांत सासरची आर्थिक घडी विस्कटली. नाईलाजाने वस्तीत रहायला यावं लागलं आणि संसाराचा गाडा ओढण्याची वेळ आली. सीताबाईंचे यजमानही खाजगी नोकरीत होते पण वेतन अतिशय तुटपुंजे होते आणि घरात त्याकाळच्या प्रथेप्रमाणे मुलाबाळांची कमतरता नव्हती. त्यात यजमान आजाराने घरीच बसले तेंव्हा थोरला मुलगा नाईलाजाने शिक्षण अर्धवट टाकून कमवायला जायला लागला. त्यात मुलींची लग्नं निघाली आणि होतं नव्हतं जवळ किडुकमिडुक ते गिळंकृत करून साजरी झाली. मग अशातच थोरल्याचं लग्न उरकून घेतलं. बरी आर्थिक स्थिती असलेल्या सूनबाई मिळाल्या पण त्यांनाही थोड्याच दिवसांत शिलाईच्या कामावर जावं लागलंच…इलाज नव्हता.

सीताबाई मसाला कांडप कामावर जायच्या. तिखट मिरच्यांच्या झोंबणा-या स्पर्शांची त्यांना सवय झालेली होती पण हातांची आग मात्र व्हायचीच. पण पोटाच्या आगीपेक्षा ही आग सुसह्य म्हणायची. सीताबाईंच्या हाताला चव मात्र भन्नाट होती. मालक त्यांच्या कामावर समाधानी असे. सीताबाईंनी मात्र कधी चिमुटभर मसाला घरी आणला नाही. दुस-याचं काही नको असा त्यांचा खाक्या होता. कामावरून घरी येतानाच त्या कंपनीतून पापडाच्या ओल्या पीठाचा गोळा घेऊन यायच्या आणि घरच्या कामातून वेळ वाचवून दीड एक किलोचे पापड सहज लाटायच्या…कामानं माणूस मरतंय होय? असा त्यांचा सवाल असायचा.

गरीबीत कष्टाच्या मानानं पैसं कमी मिळतात हा अजब न्याय आहे. पण कामंच अशी की त्यातून एकावेळी भरपूर रक्कम मिळणं दुरापास्त. शिवाय डोक्यावर अनेकांची छोटी छोटी कर्जे असायचीच. वस्तीतला असा एकही माणूस सापडला नसता की जो कुणाचा देणेकरी नाही. पण एकमेकांच्या आधारावर वस्ती दिवस ढकलत असते हे मात्र खरं. आज उधार आणि उद्या रोख असा इथल्या दुकानदारांचा शिरस्ता पडून गेलेला होता. लोक पैसे मात्र बुडवत नसत. मग त्यांना दुकानदार दहा पैशांऐवजी वीस पैसे दर लावत असला तरी चालत असे…शेवटी वेळ भागणं महत्वाचं. त्याहीवेळी वस्तीत दोन रुपयाचं दूध, तीन रुपयाचं सुट्टं तेल मिळत असे. कोणताही जिन्नस किलोच्या मापात घेणं कठीण असे….पण रात्रीच्या चुली कुरकुरत का होईना पेटत असत. एकमेकांच्या घरांतून भाजी-कालवणांची वाटी वाटी देवाणघेवाण करीत करीत अंगणात पंगती व्हायच्या उन्हाळ्याच्या दिवसांत.

कांताबाई नव्या शाळेत रुजू होऊन बरेच महिने लोटून गेलेले असले तरी नियमित पगार सुरू व्हायला कार्यालयीन कार्यपद्धतीनुसार उशीर लागला होता. पण पगार एकदम जमा मात्र होणार होता. कांताचेही स्व:ताचे काही खर्च असेच उसनवारीवर झाले होते. शाळेत विद्यार्थ्यांसमोर उभं राहायचं म्हणजे उत्तम पेहराव असलाच पाहिजे असा कांताचा कटाक्ष होता. मूळचीच नीटनेटकी राहण्याची सवय असलेल्या कांताला शिक्षिका म्हणून काय घालावं आणि काय घालू नये याची उत्तम जाण होती. तिच्या वडिलांनी त्यांच्या मालकाकडून आगाऊ रक्कम घेऊन तीन चांगल्या साडया घेऊन दिल्या होत्या. बाकीचा खर्च कांताने शिकवणीच्या पैशांतून बाजूला ठेवलेल्या रकमेतून केला. कांताचा स्वत:चा मेकअपचा खर्च तसा अगदी शून्यच म्हणावा असा. थोडीशी पावडर लावली चेह-यावर की झालं. पण साधी राहणी असली तरी व्यक्तिमत्वच उत्तम असल्यानं कांताचं मेकअपवाचून अडत नव्हतं.

आज कांता आज्जीपुढं पिशवी घेऊन उभी होती. आज तिचा पगार जमा झाला होता. तिने स्वत:ही एवढे पैसे एकरकमी कधी पाहिलेले नव्हते आयुष्यात. सीताबाईंनीही नोटांचं बंडल शेवटचं बघून कित्येक वर्षे उलटून गेली होती…आणि ते सुद्धा माहेरच्या श्रीमंतीत. आणि आता तर माहेर जुनं झालं होतं. स्वाभिमानानं जगणा-या सीताबाईंनी कधी माहेरी पदर पसरला नव्हता.

कांतानं आजीच्या पदरात आपल्या हातातली पिशवी रिकामी केली…..शंभराच्या कित्येक नोटा…त्यात काही पन्नासाच्याही होत्या. रक्कम काही फार मोठी नव्हती म्हणा पण सीताबाईचं आणि कांताच्या वडिलांचं किमान किरकोळीतलं तरी कर्ज फेडण्याएवढी निश्चित होती. आणि वस्तीत कुणी कुणाला फार मोठ्या रकमा उसन्या देऊही शकत नाही म्हणा.

एखादं सुवासिनीसारखी सीताबाईंनी आपला पदर सावरून धरला. अलगद उठल्या. त्यांच्या चेह-यावर जग जिंकल्याचा आनंद ओसंडून वहात होता. वाळत घातलेल्या पापडांमधून थरथरती पण अचूक पावलं टाकीत सीताबाई तिथून बाहेर आल्या आणि चाळीतल्या प्रत्येक घराच्या दारांसमोर गेल्या…त्यांना त्यांच्या नातीची पहिली कमाई कौतुकानं दाखवत राहिल्या…..त्यांचा पदर जड झालेला नोटांनी आणि मन हलकं झालेलं कित्येक वर्षांनंतर. सा-या वस्तीनं त्या को-या करकरीत नोटा डोळेभरून पाहून घेतल्या आणि आता आपण सीताबाईंना दिलेले चार दोन रुपये निश्चित परत मिळतील अशी त्यांची खात्रीही झाली. काहींना कौतुक वाटत होते तर काहींना आपल्या पोरांनीही असं काही तरी करून दाखवावं अशा आशा जाग्या झाल्या.

“आज्जी, हे सगळे पैसे तुझे!” कांता म्हणाला तसं सीताबाईंचे आधीच ओले झालेले डोळे भरून ओसंडून वाहू लागले. “अगं, आधी तुझ्या बापाच्या हातात दे हे रुपयं. तु आधी देवाला दाखवले असशीलच.!”

तेवढ्यात कांताचे वडील कामावरून परतले. सायकलवरून येणं जाणं…घामाघुम झालेले…अंगणात एवढी माणसं उभी बघून त्यांनाही आश्चर्य वाटले. सीताबाईंनी त्याच्यासमोर पदर धरला.

खरं तर पोरीचं लग्न लावून द्यावं, ती तिच्या सासरी काय नोकरी धंदा करायचा ते करील. शिकलेल्या पोरींची लग्नं जमणं कठीण असा त्यांचा परिस्थितीतून आलेला विचार होता. त्यामुळे कांताचं असं नोकरी करणं त्यांना फारसं रुचलेलं नव्हतं. पण त्यांच्या आईनं आणि बायकोनं त्यांना गप्प केलं होतं. कांताच्या वडिलांच्या डोक्यावर कुणाचं कर्ज नाही असा गेल्या कित्येक वर्षांतला एकही दिवस त्यांना आठवत नव्हता….आज तो दिवस उगवला होता….किंबहुना दिवस संपता संपता कर्जमुक्तीची पहाट उगवली होती.

कांताबाईंच्या लुगड्याचा विरत आलेला पदर आज जरीकाठी भासत होता!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बिन पैशाचे दिवस… भाग – ३ ☆ श्री मेहबूब जमादार ☆

श्री मेहबूब जमादार 

? जीवनरंग ❤️

☆ बिन पैशाचे दिवस… भाग – ३ ☆ 🖋 मेहबूब जमादार

(तिथेच आम्ही तोंड धुत असू. चहा पिण्याचा काय प्रश्नच नव्हता. कारण चहा कोणीच पीत नव्हतं. माणसं भाजलेल्या गुळ शेंगा खात पण कोण चहाला धक्का लावत नसे.  सर्वच घरांमध्ये त्यावेळी चहा आला नव्हता.) येथून पुढे………

त्यावेळी आमची न्याहरी म्हणजे हे पिकलेले आंबे असत.  त्यावेळी घरातील काढलेले आंबे असायचे. मी तर दिवसा 25 ते 30 आंबे खात असेन.  माझी सगळी भूक आंबे खाऊनच भागवली जात असे. त्यावेळी राघू आंबा, शेपू आंबा,  तोतापुरी असे निरनिराळ्या प्रकारचे पण गोड आंबे होते. या सगळ्या वस्तू आम्ही केव्हाच विकत आणल्या नव्हत्या. एवढ्या मुबलक त्या घरात मिळत .आंबे जास्त असले तर पाटी  भरून शेजारी देत असत.  ज्यांच्याकडे आंब्याचे झाड नाही त्याला सगळेजण थोडे थोडे आंबे देत असू.  त्यावेळी शेजारधर्म पाळला जात होता. कोण शेजारी दुःखी राहणार नाही याची काळजी घेतली जायची.  त्याच्या दुःखात सारी वाडी सामील व्हायची त्याचबरोबर त्याच्या सुखात  तो सगळ्यांना बोलवत असे.  त्यामुळे ते दिवसच सोन्याचे होते असं म्हटलं तर वावगं  ठरणार नाही. 

हाच मोसम जांभळे खाण्याचाही असे.  आमच्या ओढ्यात जांभळाची फार झाडं  होती. दुपारी आम्हा सगळ्यांचा मोर्चा जांभळ खाण्या साठी ओढ्याकडे जात असे.  ज्याला झाडावर चढता येईल तो झाडावर चढे व बाकीची पिकलेली जांभळं तो वरून खाली टाके  ते आम्ही झेलत असू.  सगळी गोळा करून एखाद्या पिशवीत ठेवत असून त्यावेळी खादीच्या किंवा गोणपाटाच्या  पिशव्या होत्या. 

केंव्हा केंव्हा वानरं  ह्या झाडावर मुक्काम करत असत.  काही वेळा त्यांना हुसकावं  लागे.  तरी पण ती दात वेंगाडून काढून व ख्या…ख्या … करत अंगावर येण्याचा प्रयत्न करत. आमच्यातली दांडगी पोरं वानर  जिथं बसलेत तिथे दगडांचा टीपीरा मारत.  दगड वांनर बरोबर चुकवी.  एखादा  दगड लागला तर ती पळून जात.  वानरांच एक असे जर त्यांचा म्होरक्या  पळाला की सगळी वांनरं  लांब उड्या मारत ह्या फांदीवरून त्या फांदीवर असं करत दुसऱ्या झाडावर जाऊन बसत. 

वांनरं  पळाली की आम्ही निवांत झाडावर चढून जांभळे काढत असू.  जांभळे पोटभर खात असू.  जांभळे खाल्ली की सारं  तोंड नीळ शार होई. जीभ निळी होई. हा रानचा मेवा फार गोड लागे.  त्याचं वर्णन करणे केवळ असंभव आहे, असे ते दिवस होते. 

त्यावेळचे  खेळ अजब होते.  बरीचशी मुलं गोट्याने खेळत. त्यावेळी सिमेंटने  तयार केलेल्या गोठ्या होत्या.  काचेच्या  गोट्या होत्या.  काही गोट्या तर आम्ही ओढ्यातून गोल गोटे आणत असू.  आणि त्या दगडावर ठेवून दगडानेच त्याला घडवत असू.  त्या घासून घासून गोल  करत असू. काही केलं तर त्या गोठ्या केंव्हाच फूटत नसत.  शाळा सुटली की आमचा हा  खेळ चाले. 

दुसरा खेळ म्हणजे लोखंडी तवा फुटला की त्याची जी किनार असते ती व्यवस्थित कापून तो गोल तयार करायचा.  त्याला लोखंडी सळीचा हुक तयार करून त्यांनं  ते तयार झालेले चाक फिरवायचं.  काही मुलं सायकलची रिम फिरवत.   तर काही बाद  झालेले सायकलचे टायर्स फिरवत.  याच्या व्यतिरिक्त सूरपारंबीचा खेळ आमचा चिंचेच्या सावलीत फारच रंगे.  तिथे झाडावर चढायला जागा होती. शिवाय झाडांची सावली होती. 

आट्यापाट्यांचा खेळ आमच्या वाडीत प्रसिद्ध होता.  अगदी लग्न झालेली माणसं सुद्धा हा खेळ खेळायला येत.  आमच्या मुलांचा लपाछपी हा खेळ जोरात चाले. कुठेही एखाद्या गोठ्यात किंवा एखाद्याच्या घरात सुद्धा पोरं लपून बसत. या सा-या खेळांना काहीही लागत नसे. हे  सर्व बिन पैशांचे  खेळ होते. 

त्याकाळी जुन्या विहिरीवर मोट होती.  तर नव्या विहिरीवर नवीन आलेले इंजिन बसवलं होतं. त्या विहिरीला  पायऱ्या नव्हत्या.   पण ज्या विहिरीवर मोट होती ती विहीर चांगल्या दगडांनी मातीतच बांधली होती.  त्या दगडाच्या पहाडीनां   एवढा दुमाला  होता की त्या भिंतीची जाडी तीन फूट होती.  तिला घडीव  पायऱ्या होत्या.  मोट  जिथून ओढली जायची तिथं कोरीव  दगडांच बांधकाम केलेल होत. त्या दगडांना  छिद्र पाडून सागवानी खांब उभे केलेले होते.  त्या खांबांच्या टोकावरती लोखंडी मोठा रॉड  बसवून त्यावरती मोट ओढण्यासाठी लाकडी खाचेचे चाक बसवलेलं होतं. एक मोठा दोर (नाडा) त्या चाकावरुन  जाई.  तर खालचा दोर खाली तीन फूट लांबीचा लाकडी गोल उंबरा(कणा )  पद्धतीचा बसवला होता त्यावरून एक दोर  फिरत असे. 

मोट चालू झाली की कुई$$… कुई $$…असा आवाज येई. साऱ्या शिवारात तो आवाज घुमे.  मोट सकाळी लवकर चालू होई व सकाळी  अकरापर्यंत चाले.  कारण बैलं मागं येऊन आणि मोट ओढून थकलेली असत. परत दुपारी चार वाजता मोट  चालू होऊन ती दिवस मावळायला बंद होई. ज्या विहिरीवर मोट बसवली होती त्या विहिरीचे पाणी केव्हाच आटत नसे. त्या. विहिरीला चांगल्या पायऱ्या होत्या. त्यामुळे आम्ही सगळे पोहायला शिकलो. 

त्या काळात आमची सकाळची शाळा होती.  सकाळी आठला शाळा भरे व ती अकराला सुटे. आम्ही पावसाळा सोडला तर शाळा सुटली की कसं बसं जेवण उरकून सगळीच पोहायला जात असू. पोहण्यात  आमचा बराच वेळ जायचा.  शेवटी दुपारच्या शाळेसाठी घरातली माणसं काठी घेऊन यायची. अन  आम्हाला वर बोलवायची. कोण मारत नसे. पण भीती दाखविण्यासाठी बहुधा  काठी आणली असावी.  पुन्हा दुपारी दोन ते साडेपाच अशी शाळा भरे.

एकंदरीत त्याकाळचे जीवन बिन दगदगीच होतं.  शेतकरी खरीप पिके घेत. चुकून हरभरा किंवा शाळू  पेरला जाई. तोही थंडीवर येत असे. पुन्हा मार्च ते जून महिन्या  पर्यंत शेतकरी निवांत असत. 

त्यावेळी पाहुण्यांचे यात्रेसाठी किंवा ऊरुसाला दोन चार दिवस माणसं जाऊन राहत.  आम्ही सुद्धा मुलं यात्रेला व ऊरुसाला जात असू. 

तो काळ असा होता की जगण्यासाठी सारं काही घरात असायचे.  किराणा माल लागला तर तो ज्वारी किंवा शें गा विकून माणसं आणत.  त्यामुळे बिन  पैशाने सारं काही चालत असे.  पैशामुळे काही थांबत नसे. त्यामुळे आज या सर्व गोष्टींचा विचार करता पैशाविना सर्व माणसे निवांतपणे जगत होती. पण एक मात्र होतं माणसाकडे सोनं नव्हतं.  पण माणस सोन्या सारखी होती एवढे मात्र निश्चित….!!!

— समाप्त —

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बिन पैशाचे दिवस… भाग – २ ☆ श्री मेहबूब जमादार ☆

श्री मेहबूब जमादार 

? जीवनरंग ❤️

☆ बिन पैशाचे दिवस… भाग –  २ ☆ 🖋 मेहबूब जमादार

(कामावरचे  गडी दिवस मावळला तरी कामावरून घरी जात नसत.   काही वेळेला रात्रीला जेवणाचा वकुत होई. तरीपण अर्ध काम सोडून कोण घरी जात नसे. त्यावेळी मालक सुद्धा दुप्पट धान्य गडयानां  मजुरी म्हणून देत असे.) येथून पुढे. .. .

आम्ही शाळेत जात असताना चुकून एखादा गारेगारवाला म्हणजे बर्फाचा गोळा विकणारा भेटे.  आमच्या हातातच काय  खिशात सुद्धा दमडी नसायची.  त्यावेळी शेजारच्या रानातील आठ दहा ज्वारीची कणसं  दिली की तो आम्हाला एक गोळा बर्फाचा देई.  त्यावर तांबडा पिवळा गोड पाण्याचा फवारा मारुन देई.  तो आम्ही अगदी चवीने खात शाळेत जात असू. 

आमच्या वाडीत पाच  मोठी चिंचेची झाडं  होती.  तिला चिंचा लागायला लागल्या  की त्या चिंचा कोवळ्या असताना पाडून आम्ही खिशात भरून शाळेत नेत असू. त्या चिंचा दुसऱ्या मुलांना द्यायच्या त्या बदल्यात मुलाकडून गोळ्या किंवा पेन्सिल घेत असू. कुणीच आम्ही या वस्तू घेत असताना पैशाचा वापर केला नाही. 

वाडीत जर एखादं लग्न असेल तर आम्हा मुलांना ती एक संधीच असायची.  शक्यतो लग्न मे महिन्याच्या  सुट्टीत असायची.  लग्नात मांडव घालण्याचे जेवणापासून ते पाणी आण ण्या  पर्यंतची  सर्व कामे आम्ही करत असू.  मांडव घालताना लागणाऱ्या करंजी,   आंब्याच्या डहाळ्या तसेच नारळाच्या झाडाच्या झावळ्या  हे सर्व आम्ही आणत असू.  मांडव घातल्यानंतर सर्वांसाठी जेवण असायचे. मोठ्या लोकांबरोबर पंक्तीत बसून जेवताना फार मजा यायची.  दुसऱ्या दिवशी लग्नाच्या घरात आडावरून किंवा आमच्या नव्या विहिरीवरून पाणी भरावं  लागे.  त्यावेळी मोठं मांदाणं  किंवा लोखंडी बॅरेल ठेवलेला असे.  त्याच्यावर एक दोन लाकडी दांडकी ठेवून त्यावर भिजलेले कापड अंतरलेले  असे त्यामुळे पाण्याचे  धुळीपासून संरक्षण होई.  पाणी आणणाऱ्यांना दुपारी एक लाडू,  दोन कानवले व थोडासा चिवडा मिळे.  आम्ही मुलं यावर फार आनंदी असू.  कारण लग्न सोडलं तर लाडू किंवा चिवडा कुठेच मिळत नसे. 

लग्नात सगळी वाडी गुंतलेली असे. लग्नाचा मालक निवांत बसून पान सुपारी कात्रत  बसायचा. बाकीची सारी कामे वाडीतील माणसे करायची माणसात आपलेपणा होता.  लग्न कोणाचेही असो ते आपलं समजून त्यातील सर्व कामे माणसे करायची.  बायका हळद लावणे.  जेवण बनवणे या कामातच गुंतलेल्या असायच्या. 

एखादं लग्न बाहेरगावी असलं तर सात ते आठ बैलगाड्यांना सजवून वरती कळकाच्या कांबी बांधून त्यावर कापड बांधले जायचं  आणि त्या गाड्यांमधून व-हाड जायचं. आंतर जास्त असलं तर मध्ये जेवणासाठी हारा भरून भाकरी,  एक पातेलं भरून देशी वांग्याची भाजी, पिठलं आणि खर्डा हा सारा लवाजमा  बरोबर घ्यावा लागत असे. जेवणाची वेळ झाली की एखादी नदी किंवा ओढा किंवा विहीर बघून निवांत गाड्या सोडल्या जात.  पहिल्यांदा बैलांना पाणी पाजले जाई.  मग त्यांना वैरण टाकून माणसं झाडाखाली जेवायला बसत. 

वऱ्हाडातल्या बायका सगळ्यांना जेवायला वाढायच्या.  था टली असली तर बरं,नाहीतर माणसं हातातच भाकरी घ्यायची .त्यावर वांग्याची भाजी, पिठलं, खर्डा असं चवदार जेवण असायचं .आम्हा मुलांना या जेवणाची फार मजा वाटायची. माणसं दोन-तीन भाकरी निवांत खायची .आम्ही मुलं तर एक दिड  भाकरी खात असू.सगळ्यांची जेवणं झाली की पान तंबाखू खाऊन परत लगेच गाड्या जुंपल्या जायच्या.  त्यावेळी लग्न संध्याकाळी असायची. 

किरकोळ मान पानावरून सुद्धा पाव्हण्यात भांडण लागायची.  पण त्यातली समजूतदार पंच माणसं ती मिटवायची. लग्न लागलं की रात्री नऊ नंतर सगळ्यांना जेवण मिळत असे.  गाव लांब असलं तर गाड्यांचा मुक्काम तिथेच असायचा.  तिथला लग्नाचा मालक जनावरांना कडबा गवताच्या  पेंड्या आणून द्यायचा.  त्याचबरोबर बैलांची बांधायची सोय करायचा. 

सकाळी उठल्यावर तोंड धुतल्यावर चहा पाणी व्हायचं. शिल्लक जेवण राहिलं  असेल तर जेवण तिथेच कराव लागायचं.  ज्यादाच जेवण असेल तर तो पाहुणा दुर्डीतून बांधून द्यायचा.  

नवरी निघताना मात्र तिथली सारी  मंडळी रडायची बायका तर नवरीला मिठी मारून रडायच्या अन  म्हणायच्या,

“सुखी राहा गं ! इथली काय काळजी करू नकं ”

“आता सासू-सासरेच  तुझ आई बा समज”

अशा बऱ्याच सूचना केल्या जायच्या. नवरी का रडते हे त्यावेळी आमच्या बालमनाला कळत नसे.  एवढी नवी कापडं, गळ्यात दाग दागिने घातलेले असताना ही नवरी का बर रडते आहे. हेच आम्हाला कळत नसे. अर्थात हे कळण्याचं आमचं वय ही नव्हतं.

उन्हाळ्यात सुगी  संपली की आमची मांडवाची पट्टी होती तिथे सगळेजण जनावरासाठी मांडव घालत. सगळे माझे भाऊबंदच राहत होते.  त्यामुळे सगळ्यांना थोडी का होईना तिथे शेती होती. त्यामुळे सगळ्यांचे  मांडव त्या पट्टीत ओळीने घातलेले असायचे.  जेवढी जनावर तेवढ्या मेढाचा  मांडव असे. शिवाय दोन खणांचा मांडव वैरणीसाठी किंवा झोपण्यासाठी ठेवलेला असे.  अशाच एका मांडवात आमचा  रात्रीचा मुक्काम ठरलेला असायचा. परीक्षा  संपल्या की सगळेजण मांडवात एकत्र झोपत.  एक जण कंदील घेऊन येई.  त्याला फिरून फिरून आम्ही रॉकेल घालत असू. रात्री एक तर गाण्याच्या भेंड्या लावत असू.  किंवा पत्त्यांचा तरी डाव चाले रात्री बारा ते एक वाजेपर्यंत आम्ही खेळत बसू. त्याचवेळी आंबे पाडाला येत.  प्रत्येकाच्या रानात आंब्याची झाडं असली  तरी आम्ही पहाटे पाच वाजता  ओढ्यावर आंब्याच्या हंगामात पाड  पडलेली वेचायला जात असू.  कोणा तरी एकाकडे पिशवी  असे. मिळालेले सगळे पाड आम्ही एकत्र बसून त्याचा फडशा पाडत असू.  एक तर ते आंबे पिकलेले  असायचे किंवा अर्धे कच्चे असायचे.  ते आंबे आम्ही भाताच्या अडीत  पिकाला घालत असू. ते ज्यावेळी पिकत  त्यावेळी तोंड धुतले की आमचा तो कार्यक्रम ठरलेला असे. आमच्या मांडवाच्या पट्टी शेजारच्या   वाडीतल्या सखाराम जाधवांनी  तंबाखू केली होती. रोज सकाळी आम्ही शेकोटीसाठी जाळ करीत असू.  त्या जाळावर त्या तंबाखूची पानं भाजली जात व त्याची मिस्त्री आम्ही लावत असू.  मांडवात घागर किंवा मातीचा मोगा  ठेवलेला असे.  तिथेच आम्ही तोंड धुत असू. चहा पिण्याचा काय प्रश्नच नव्हता. कारण चहा कोणीच पीत नव्हतं. माणसं भाजलेल्या गुळ शेंगा खात पण कोण चहाला धक्का लावत नसे.  सर्वच घरांमध्ये त्यावेळी चहा आला नव्हता. 

क्रमश : भाग दुसरा

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बिन पैशाचे दिवस… भाग – १ ☆ श्री मेहबूब जमादार ☆

श्री मेहबूब जमादार 

? जीवनरंग ❤️

☆ बिन पैशाचे दिवस… भाग – १ ☆ 🖋 मेहबूब जमादार

तो 1967 चा काळ असावा.  त्यावेळी आमच्या चिंचेच्या बनाशेजारी गुऱ्हाळ घर होतं.  दरवर्षी सुगी संपली की गुऱ्हाळ चालू व्हायचं.  गुऱ्हाळासाठी लागणारा ऊस आमच्या सगळ्या भाऊबंदांचा होता.  तर काही शेजारील शेतकरी तोडायला सांगत.  त्यावेळी तांबडा देशी ऊस असायचा.  तो खायला फारच गोड होता. 

दिवाळी संपली की गुऱ्हाळ चालू व्हायचं. ऊस तोडायला अन तो गाडीतून आणायला सात ते आठ मजूर लागत.  इंजिन वरती दोघं  असायचे. इंजिन चालू झालं की घाणा  चालू व्हायचा.  त्या घाण्यात ऊस घालण्यासाठी दोन मजूर लागायचे.  एक जण ऊस द्यायचा.  एक जण  प्रत्यक्ष घाण्यात ऊस घालायचा. त्याचा रस लोखंडी मांदाणं  होतं त्यात पडायचा.  ते भरलं की रस उंचावरच्या  लोखंडी टाकीत  इंजिनच्या मदतीने  लोखंडी पाईप मधून टाकला जायचा.  ती टाकी भरली की दुपारी चार वाजता काईल चुलवानावर ठेवायची.  त्यात तो रस टाकला जायचा.

गुऱ्हाळात सगळ्यात महत्त्वाचा कामगार म्हणजे गुळव्या. गुळव्या चांगला असला तर गुळ चांगला तयार व्हायचा. काईल  मध्ये रस टाकला की चुलवान उसाचं  वाळल चिपाडं टाकून पेटवलं जायचं.ते  पेटवायला दोन माणसं लागायची. त्यानां  चुलवाण्या  म्हणत. त्याचं काम चार वाजता चालू व्हायचं ते रात्री बारा एक वाजेपर्यंत जवळजवळ तीन आदनं  पूर्ण होईपर्यंत चालायचं. आगीमुळे ती बिचारी घामे घूम होत. त्यांचं  अंग काळ दिसे.  एकूण गुऱ्हाळाला जवळजवळ पंधरा ते सोळा माणसे लागत. त्यावेळी गुऱ्हाळ व्यवस्थित चाले.

गूळ तयार व्हायला लागला की त्याचा वास आमच्या वाडीत पसरत असे.  त्यावेळी लगेच आम्ही सारी मुलं गुऱ्हाळघरा शेजारी जमा होत असू.  पण तिथे एक राखणदार ठेवलेला होता.  तो आमच्या शेजारच्या गावातला होता.  तो काय आम्हाला तिथे येऊ देत नसे.  आम्ही सारी मुलं त्याला फार त्रास देत असू.  शेवटी तो म्हणायचा, गुळ तयार झाला की तुम्हाला थोडा थोडा गूळ खायला देतो तुम्ही चिपाड फक्त घेऊन या म्हणजे झालं.

तो  तयार झालेला मलईदार गुळ आमच्या चिपाडावर ठेवायचा.  तो फार गरम असे. पण त्याची चव इतकी लाजवाब असे की तो सारा गूळ आम्ही तिथेच फस्त करत असू.  ते दिवस मजेचे होते.  बिन पैशानं  हे  सारं आम्हाला मिळायचं. 

तो एखादी दिवशी लिंबू आणा म्हणायचा. आणि सगळ्यांना लिंबू पिळून रस शोधून जर्मन च्या मापातनं प्यायला द्यायचा. त्या उसाचा मालक म्हणायचा,

“घ्या रे पोरांनो रस!  अगदी पोटभर प्या ”

गूळ तयार झाला की काईल उतरायला लागायची. त्यावेळी काईलच्या  एका हूकातुन  समोरच्या दुसऱ्या हुकात एक गोल लाकूड बसवलेलं  असे. असे तीन हुक या बाजूला आणि तीन हुक समोरच्या बाजूला असत. प्रत्येक हूकाकडे दोन ते तीन माणसे लागायची.  प्रत्येक बाजूला सात ते आठ माणसे अशी पंधरा-सोळा माणसे लागायची. तरच ती काईल उचलत असे. ती काईल  उचलताना माणसं श्लोक म्हणायची,

“बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय”

असं म्हणत ती सारी काईल फरशीच्या तयार केलेल्या वाफ्यात पालथी केली जायची.  त्यावेळी गुळ पातळ असायचा.  फारच गरम असायचा.  वाफ्यात  टाकला की तो थंड व्हायचा.  हळूहळू तो घम्यात भरला जायचा. घम्यात पहिलंच धुतलेलं पांढरं कापड अंथरलेलं असे. 

गुळ इकडे तिकडे सारायला लांब दांड्याचे  हत्ये  असायचे.  तर भरायला लाकडी लहान हत्ये  असायचे.  एका काईल  मधून गुळाच्या जवळजवळ पाच सहा ढेपा तयार होत. त्या ढेपाच वजन जवळजवळ वीस  किलोच्या आसपास असायचं. प्रत्येक मालकाचा गुळ अलग ठेवला जायचा. काही वेळा गि-हाईक  तिथे येऊन गूळ घेऊन जायचा. समजा नाहीच खपला तर मालक ट्रक सांगून सांगलीच्या किंवा कोल्हापूरच्या बाजारपेठेत तो विकून येत. 

त्या काळात आमच्या ओढ्यात सीताफळ,  पेरू,  आंबा,  जांभळीची झाड होती. दिवाळी संपली की पेरू आणि सीताफळ पाडाला यायची.  पोपटाने झाडावर एखाद्या फळाला टोच मारली की आम्हा मुलांना कुठलं झाड पाडाला आलय  ते समजायचं. ओढा  आमच्या घरापासून हजार बाराशे फूट लांब होता.  तिकडे जाण्यासाठी माणसांना अन गुरानां  एकच वाट होती.

आम्ही चार पाच जण एका वर्गातच शिकत होतो. रविवारी सुट्टी असल्यावर ओढ्यात जाऊन सीताफळ  ठीकं  भरून आम्ही आणत असू.  ती  पिकायला कुणाच्यातरी गोठ्यात ठेवत असू. पिकली की रोज सायंकाळी शाळा सुटली की पोटभर सिताफळ खात असू.

आमच्यातला गण्या तर म्हणायचा,

“शंकरया लेका  थोडी खा ,नाहीतर पोटातच झाड उठल बघ सिताफळीच !”

यावर सारी हसायची. कोण जास्त सीताफळ खातय,   त्याची तर इर्षा लागायची. आम्हाला पोटासाठी या वस्तू केव्हा विकत घ्याव्या लागल्या नाहीत. सारे गणित आमचे बिन पैशाचं होतं. 

काही वेळेला कोकणातल्या बाया बिबे घेऊन यायच्या.  त्यांना मिरच्या दे ऊन ह्या बिब्या विकत घेतल्या जायच्या त्यावेळीही पैसा लागत नसे.  फक्त मालाची आदला बदल केली जायची. 

सुगी चालू असतानाच काही माणसं खळ्यावर धान्य मागायाला येत. त्यात पेठे चा नामदेव मामा दरवर्षी यायचा.  एरवी तो वरकी पाव व तंबाखूची पुडया विकायचा. पेठेत तंबाखू आणि तपकीर प्रसिद्ध होती.  तो खळ्यावर यायचा, त्यावेळी ज्वारीची मळणी चालू असायची. त्याला सूप  भरून धान्य दिलं की तो दहा-बारा वर्की पाव किंवा आठ दहा  तंबाखूच्या पुड्या त्या सुपातच  टाकायचा. त्यावेळी त्याचे पैसे किती होतात हे कोणच बोलत नसे. सार काहीं  अदलाबदलीवर चाले. गड्यांना पगार सुद्धा माणसं ज्वारी देत.  सुगीला दुप्पट ज्वारी मिळे.  त्यामुळे काम करण्यासाठी माणसं खुश असत.   कामावरचे  गडी दिवस मावळला तरी कामावरून घरी जात नसत. काही वेळेला रात्रीला जेवणाचा वकुत होई. तरीपण अर्ध काम सोडून कोण घरी जात नसे. त्यावेळी मालक सुद्धा दुप्पट धान्य गडयानां  मजुरी म्हणून देत असे.   

क्रमश : भाग पहिला 

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print