सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ आभाळमाया… लेखक – श्री उमेश कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆
घरी विठ्ठल तुळस आणून तीन चार वर्षं झाली असतील. यंदाच्या फेब्रुवारी – मार्च पर्यंत ती सदैव छान बहरलेली होती. दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला तिचा विवाह सोहळा व्हायचा.
बाबांना दिवसातून तीन चार वेळा तुळशीची पानं खायला लागायची. आई वाटीत काढून ठेवायची. दररोज देवघरातल्या कृष्णाला तुळशीचा छोटासा हार आई करायचीच. कर कटीवर असणाऱ्या पांडुरंगाचाही एक तुलसीहार असायचाच.
दररोज सकाळी देवघरातल्या देवांची पूजा झाल्यावर आई तुळशीला पाणी घालून, हळद कुंकू वाहून, दूध साखरेचा नैवेद्य दाखवून, उदबत्ती लावून मनोभावे नमस्कार करायची. दररोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा, हळदकुंकू आणि उदबत्ती व्हायलाच हवी.
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी…
“घरात, अंगणात तुळस असली की घरावर संकटं येत नाहीत. तुळस आपल्या अंगावर झेलते आणि घराला जपते.” असं आई नेहमी सांगते.
फेब्रुवारी – मार्च मधे विठ्ठल तुळस छान बहरलेली. नेमकं त्याच वेळी आईचं मोठ्ठं दुखणं रिपोर्ट झालं. बाबा जाऊन सहा महिने होतायत तोवर हे आईचं दुखणं. जे तिनं बाबांच्या दवाखान्याच्या धकाधकीत मुलांवर आपल्या आजारपणाचं ओझं नको म्हणून तसंच अंगावर काढलं होतं. आमच्या आख्ख्या घराचं धाबं दणाणलं होतं. आईचं मेजर ऑपरेशन करायचं ठरलं. आम्ही सगळे टेन्शनमधे आणि ही बाई बिनधास्त. ॲडमिट झाली अगदी हसत-खेळत.
“घाबरू नका रे. सगळं नीट होणारेय. माझा रामराया आहे, तुझे समर्थ आहेत, आईचे माऊली आहेत आणि सगळ्यात भारी तुझा मित्र मारुतीराया आहेच की माझ्याबरोबर… मग मला काय धाड होणारेय… मी ठणठणीत बरी होणारेय… अजून प्रयागराज-काशी करायचंय मला…
एक काम कर, आपल्या अंगणातल्या तुळशीला पाणी घालून, तिथं दिवा लावून, नैवेद्य दाखवून तिला निरोप द्या, तिला सांगा… की मी परत येणारेय तोवर माझ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे… घर सांभाळायला मी सांगितलेय म्हणावं ! आणि येताना माझ्यासाठी चार पाच पाने घेऊन या!”
ऑपरेशनच्या दिवशी सकाळी उठून आईनं आपलं आपलं व्यवस्थित आवरलं, रोजचा हरिपाठ म्हटला, रामरक्षा, भीमरुपी म्हटली आणि “मारुतीराया, चल रे माझ्याबरोबर, धर माझा हात !” असं म्हणत तुळशीची पानं चघळत ती ऑपरेशन थिएटरमध्ये गेली.
ऑपरेशन झालं. नंतरचे रिपोर्ट नॉर्मल आले. आई घरी आली. दारातच माझ्या बायकोने तिची मीठमोहरीनं दृष्ट काढली. पण घरात यायच्या आधी आई अंगणात तुळशीकडे गेली. बायकोकडून पाणी घेतलं आणि तुळशीला घातलं. हळदकुंकू वाहून नमस्कार केला… “तू होतीस म्हणून मी निर्धास्त होते बघं… थोरल्या बहिणीचा मान घेतेस तर त्याबरोबर मी नसताना घराला सांभाळायची जबाबदारी पण मग तुझीच आहे ना… सगळं कसं छान सांभाळलंस गं बाई तू… आता आराम कर… मी आलेय आता !”
आईचं रुटीन पूर्ववत् व्हायला नंतरचे दोन महिने तरी लागले. हळूहळू ती पूर्ववत् झेपेल तशी घरातली कामं करू लागली आणि मुख्य तिच्या आवडीचं काम… रोजची देवपूजा अगदी षोडशोपचारे करु लागली…
एप्रिलमध्ये तिला प्रयागराज- काशीला पाठवलं. घरातून निघताना तुळशीजवळ गेली, नमस्कार केला पण चेहेऱ्यावर काळजी दिसत होती.
“का गं ? चेहेरा का असा काळजीत पडलाय ?” मी विचारलं.
“माझं तसं काही नाही रे… पण ही बघ की… थोडी काळवंडलीय रे… सुटत चाललीय असं वाटतंय… नविन आलेली पानंही आकाराने छोटीच आहेत आणि वाढही मंदावल्यासारखी वाटतेय…”
मलाही ते जाणवलं.
“अगं आई, उन्हाळा सुरु होतेय ना म्हणून थोडं तसं झालं असेल. आपल्यासारख्या माणसांना ते वातावरण बदलाचे त्रास होतात. ही तर वनस्पती आहे. तिलाही थोडा त्रास होणारच की. पण होईल ती नीट. या बदलत्या वातावरणाला घेईल ती जुळवून. बहरेल ती. तू नको काळजी करू. तू निर्धास्त जाऊन ये.”
घरातून तिचा पाय निघत नव्हता पण ती प्रवासाला गेली आणि प्रयाग राज आणि काशीला जाऊनही आली.
रामेश्वरहून आणलेल्या वाळूचे शिवलिंग काशीला गंगेच्या तीरावर करुन काशी विश्वनाथाची रूद्राध्याय आवर्तन करुन प्रार्थना केली.
आई परत आल्यावर तिला चांगलंच जाणवलं… तुळस मंदावली होती. थोडी थकली होती. रंग बदलत होता. पण पालवी फुटत होती. आशा पालवत होती. तोवर मे महिना आला. कडक उन्हाळा लागला. सकाळी पाणी घातलं तरी संध्याकाळी पानं मलूल होऊन जायची.
दररोज संध्याकाळी दिवा लावताना आई तिला सांगायची, “सांभाळ गं तब्ब्येतीला… ऊन जरा जास्त आहे पण तुला सावलीही आहे… तरी पण तू अशी अशक्त का होतेयस ? काही होतंय का ? माझी नको काळजी करुस. मी आता ठणठणीत आहे. आता हे पुढचे रिपोर्ट नॉर्मल आले की तू आणि मी झिम्मा खेळायला मोकळ्या !” हळदकुंकू वाहून आई रामरक्षा म्हणत तिथंच बसायची.
ऑपरेशन नंतर चार महिन्यांनी आईच्या काही टेस्ट करुन रिपोर्ट घ्यायचे होते. २७ जूनला टेस्ट झाल्या.
२९ जून… आषाढी एकादशी… आई पूजा करतेय… पांडुरंगाला तुळशीचा हार घालतेय… पण मनात तिच्या खंत आहे की तो हार घरच्या तुळशीचा हार नाहीये. पूजा झाल्यावर नेहमीप्रमाणे आईनं तुळशीचीही पूजा केली… घोगऱ्या आवाजात तिला म्हणाली, “बाई गं… हे असं काय करुन घेतलंयस स्वतःचं ? कसली काळजी करतेस ? नीट राहा गं… किती हडकली आहेस बघ एकदा… तुझी काळजी वाटतेय गं… आणि मला कसली तरी भितीही वाटतेय… सांभाळून घे गं बयो !”
संध्याकाळी मी आईचे रिपोर्ट घेऊन आलो. सगळे नॉर्मल होते. तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो.
“काकू, आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. सगळं छान झालंय. तुमची कमाल आहे… आता सगळी औषधं बंद… फक्त एक गोळी दिवसभरात… ती पण तुमच्या बी.पी.साठीची… आता निर्धास्त राहा… भरपूर फिरा, मजा करा ! आणि आता माझ्याकडे यायचं असेल तर या मुलाकडं म्हणून हक्कानं यायचं… पेशंट म्हणून अजिबात यायचं नाही… कळलं !”
घरी येईपर्यंत रात्र झाली होती. घरी आल्या आल्या आई अंगणात गेली तुळशीसमोर ! तुळस मलूल झालेली होती. निरांजनाच्या उजेडात ती खूप थकलेली वाटत होती. तिनं खूप काही सोसलंय असं जाणवत होतं. खरं खोटं करण्याच्या पलिकडंच होतं ते सगळं. आणि मी ते करायच्या फंदातही पडणार नाही कारण आई तिथं गुंतली होती. आईला धक्का लावून काय मिळवायचंय ?
जेवताना आई अस्वस्थ होती. जेवण झाल्यावर सुपारी चघळत आई म्हणाली… “उद्या तुळशीचं नविन रोप घेऊन ये. या तुळशीला निरोप द्यायची वेळ आलीय. आज तिच्याकडे बघताना माझे रिपोर्ट नॉर्मल का आलेत हे कळ्ळलंय मला… थोरली बहीण रे… धाकट्या बहिणीला जपलं तिनं… सांभाळलं तिनं… उद्या तिचा निरोपाचा दिवस… पाठवणीचा दिवस ! खूप झेललं तिनं, खूप सोसलं रे… आता नको तिला अडकवायला…”
आई डोळे पुसत झोपायला गेली. मी सुन्न होऊन बसलो. हे असं सगळं कुठून येतं असेल हिच्या मनात ? कसं सुचत असेल ? का ही माणसं हा असा एवढा जीव लावतात?
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोह
पोटी गूढ माया
आभाळमाया…
आभाळमाया !
सकाळी तुळशीचं नविन रोप आणलं. आईनं त्याची पूजा केली. दोन्ही तुळशीची भेट घडवली.
“बाई गं… तू आलीस आणि ही निघालीय. तू हिचे आशिर्वाद घे आणि हिला संतुष्ट मनानं निरोप दे… गळाभेट होऊ दे… या हृदयीचे त्या हृदयी संवाद होऊ दे… गुजगोष्टी-कानगोष्टी होऊ देत आणि मग प्रसन्न वदने एकमेकींचा निरोप घ्या…”
हळदकुंकूमार्जन झालं, आरती झाली आणि आईनं स्वतःच्या हातानं वृध्द झालेली तुळस बादलीतल्या पाण्यात ठेवली आणि नमस्कार करत म्हणाली…
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्…
आई हळवी झाली होती. घरात आली आणि म्हणाली… “तुळस वनस्पती असली म्हणून काय झालं… आपल्या घरातलीच होती ना ती… नातं जुळलं होतं रे तिच्याशी… तुझे बाबा शेवटपर्यंत विचारायचे, “तिला पाणी घातलं का ? तिला दिवा लावला का ?” ते गेल्याचं कळलं होतं बघ तिला. तेव्हापासूनच ती एकटी होत गेली. आणि माझं हे सगळं दुखणं तर तिनं स्वत:वर घेतलं…
बहिणाबाई म्हणवून घ्यायची भारी हौस होती तिला… सगळं नीट करुन गेलीय… सुखानं गेलीय… समाधानाने गेलीय… आणि जाताना ही तिची लेक आपल्याकडे सोपवून गेलीय… सांभाळायचं बघ तिला आता… तिला मोठी करायची… कृष्णानं सांगितलेय ते आठवायचं आणि आपली समजूत घालून घ्यायची…
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः…
आत्मा अविनाशी आहे… त्याला अंत नाही… तो फक्त शरीर बदलतो… गेली तरी ती इथंच आहे… “
भर दुपारी मी गारठलो होतो.
मी आईकडे बघत होतो.
आई तुळशीकडे बघत होती.
आईच्या डोळ्यात नक्षत्र होते…
लेखक : श्री उमेश कुलकर्णी
प्रस्तुती : सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈