श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 1 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
दुपारी दोन वाजता राजाभाऊ दुकान वाढवून घरी आले. तसे ते रोज एक वाजताच घरी जेवायला जायचे, पण आज रविवार. मुलगा, सुन घरी असणार. स्वयंपाकाला जरा उशिरच होतो. त्यांना सुट्टी… मग आरामात उठणे.. त्यानंतर नाश्ता.. मग स्वयंपाक.
सोमवार पेठेत त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. बहुतेक सर्व जुने भाडेकरू. मालकाच्या.. म्हणजे त्यांच्या ताब्यात जेमतेम अडिच खोल्या. त्याही आता जिर्ण झालेल्या.
लाकडी जिना चढून राजाभाऊ वरती आले. कठड्याला धरून जरा वेळ थांबले. हल्ली त्यांना दम लागायचा. आतला संवाद ऐकून ते जागीच थबकले.
“मला काय वाटते मिनु,आपण अजून एक दोन वर्षे थांबुया.” हा आवाज राहुलचा होता.
“नाही हं. एक दोन म्हणता म्हणता चार वर्ष झाली. तुझी कारणं चालुच असतात.”… मीनु जरा चिडुनच म्हणाली.
“माझं ऐकायचच नाही असंच तु ठरवलयं का? दादांना काय वाटेल?आईचा काही विचार केलास?”
“आता मी या पडक्या वाड्यात रहाणार नाही. चार वर्ष राहिले. खूप झालं. नील आता दोन वर्षाचा झालाय. त्याची शाळा सुरू होण्याच्या आत मला इथुन निघायचंय. या असल्या वातावरणात मी त्याला इथे ठेवणार नाही”.
राहुल चिडलाच मग. “या असल्या वातावरणात म्हणजे? आम्ही नाही राहिलो? अदिती नाही राहिली? अगं फार काय.. लग्नाच्या आधीचे दिवस आठव. माहेरचं घर म्हणजे काय फार मोठा महाल लागुन चाललाय का?विसरलीस का ते दिवस?”
राहुलचा आवाज वाढला.. तसे राजाभाऊ आत आले. त्यांनी राहुलला शांत केलं.
“सुनबाई, समजतं मला.. तुमची इथे अडचण होते. तु फ्लॅट घ्यायचा विचार करतेय ना? मग घेऊ की आपण फ्लॅट. मी काही मदत करीन. सर्वांनी मिळुन जाऊ नवीन घरात.”
मीनु जरा शांत झाली. आणि खरंच.. पुढच्याच आठवड्यात राहुल आणि मिनलने फ्लॅट चे फायनल केले. गंगापूर रोडवर आनंदवल्लीच्या पुढे एक टाऊनशिप तयार होत होती. त्यात काही फ्लॅटस् उपलब्ध होते. फ्लॅट बुक करायला ते दोघे राजाभाऊंना घेऊन गेले. फ्लॅट बुक झाला. येताना त्यांनी नवश्या गणपतीपुढे पेढे ठेवले. येत्या दिवाळीत ताबा मिळणार होता.
राजाभाऊ खुष होते. त्यांना पण अलीकडे वाटु लागले होते की, बस झाले हे गल्लीतील आयुष्य. आपल्या आजुबाजुला बघीतले की त्यांना जाणवायचं.. बरोबरीचे बरेच जण गल्ली सोडून गेले. बहुतेक जणांचे फ्लॅट झाले. ज्यांनी फार पुर्वी प्लॉट घेतले त्यांचे तर बंगलेसुध्दा बांधून झाले. आपण मात्र आहे तिथेच आहोत. अदिती, राहुलचे शिक्षण.. त्यांची लग्ने यातच बरीचशी पुंजी खर्च झाली.
भद्रकाली परीसरात त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. मिळुन मिळुन मिळणार तरी किती? अडचणी तर कायम दार ठोठावतच होत्या. त्यातुनही मार्ग काढला. ललितानेही साथ दिली. आता साठी जवळ आली. गावाबाहेर, मोकळ्या वातावरणात, मोठ्या खोल्यांमध्ये उर्वरित आयुष्य जाणार. अजून काय पाहिजे आपल्याला या वयात? आपल्याच मनाशी बोलत ते स्वप्न पाहु लागले.
2 बी.एच.के.चा प्रशस्त फ्लॅट सहा महिन्यात ताब्यात मिळाला. फर्निचरचे काम सुरू झाले. एक दिवस रात्री जेवताना राहुलने विषय काढला. “दादा, आम्ही पाडव्याला शिफ्ट होतोय”.
“आम्ही म्हणजे…?”
“आम्ही म्हणजे.. आम्ही तिघे. मुहूर्त पण चांगला आहे.”
“अधुनमधून येत जा ना तुम्ही आईंना घेऊन.” मीनु म्हणाली.
राजाभाऊंची बोलतीच बंद झाली. काय, कसे विचारावे त्यांना कळेचना.
“अरे,पण आपले तर ठरले होते…”
त्यांना पुढे बोलु न देता मीनलने सुत्र हातात घेतली. “ठरले होते दादा.. आपण सर्वांनी जायचं, पण मीच सांगितले राहुलला.. आई दादांना ईथेच राहु दे म्हणून. तुम्हाला इकडची.. गावात रहायची सवय आहे ना. तुम्हाला नाही करमणार तिकडे”.
“अगं,असंच काही नाही” त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला.
“नाही.. तसे येत जा ना तुम्ही अधुनमधून. नीलला भेटायला”.
काही बोललेच नाही राजाभाऊ. भ्रमनिरास झाला त्यांचा. किती स्वप्न रंगवली होती त्यांनी नवीन जागेची. जेवण करून बाहेर गॅलरीत येऊनही उभे राहिले. पराभूत मनस्थितीत. ललिताबाई मागे येऊन उभ्या राहिल्या.
“सांगत होते तुम्हाला.. पैसे देऊन टाकु नका. मागीतले तरी होते का त्यांनी? त्यांचे ते समर्थ होते ना जागा घ्यायला. तुम्हालाच फार हौस नवीन जागेची. जी काय गंगाजळी होती, ती पण गेली”.
राजाभाऊ ऐकत होते… आणि नव्हतेही.
पाडव्याचा मुहूर्त बघून राहुल, मीनल ..नीलला घेऊन नवीन जागेत गेले. फक्त कपडे नेले त्यांनी. बाकी सर्व इथेच ठेवले. वाड्यातील त्या दोन अडीच खोल्यात फक्त राजाभाऊ आणि ललिताबाई राहिल्या.
भद्रकालीत टेलरिंग शॉप होते, पण आता काही फारसा धंदा होत नव्हता. रेडिमेडच्या जमान्यात कपडे शिवायला कोण येणार? आणि तेही राजाभाऊंकडे. तेही आता थकले होते. फारसे काम होत नव्हते. आयुष्यभर मशीन चालवून गुडघे पण आताशा दुखत. दोघांपुरते कसेबसे मिळे. अजून तरी मुलाकडे हात पसरायची वेळ आली नव्हती. अपेक्षा होती…. म्हणावे राहुलने.. ‘दादा तुम्ही आता काही करू नका. दोघेजण आरामात रहा फ्लॅटवर.’ पण ते त्यांच्या नशिबी नव्हते.
– क्रमशः भाग पहिला
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈