मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उद्या पालकांना घेऊन ये… ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

उद्या पालकांना घेऊन ये…☆ श्री मयुरेश देशपांडे

उद्या बाहेरगावी जायची त्याची लगबग त्याच्या आत्ताच्या घाईत स्पष्ट जाणवत होती. जेवणं लवकर उरकली, माझा बिछाना लवकर घातला आणि आपल्या खोलीकडे लवकर गेला. दाराच्या फटीतून बाहेर येणारा प्रकाश अद्याप तो जागा असल्याचे सांगत होता, उद्या प्रवासात न्यायचे सामान भरत असेल बहुधा. पूर्वी हे सामान त्याच्यासाठी दुसर कोणी भरत होतं. त्यामुळे लक्षात ठेवून सगळे सामान, रोजची औषधे आणि हो ज्या कामासाठी जायचे आहे त्या संदर्भातील कागदपत्रे असे खूप काही. मला त्याला उद्याबद्दल सांगायचं होतं, विचारायचं होतं, थांबवायचं होतं, पण तो आज माझ्याशी नीट बोललाच नाही, आज त्याने मला काही विचारलेही नाही.

मला माझ्या वर्गशिक्षकांनी उद्या पालकांना घेऊन ये, असे सांगितले होते आणि नेमके तेच मला त्याला सांगायचे होते. पालकांमध्ये आई आणि बाबा दोघे आले ना? पण माझी आई कुठे आहे? कुठे आहे म्हणजे खरेच कुठे आहे मला माहित नाही. रडायला लागले की चित्रपटातला बाबा सांगतो, तसा माझा बाबा मला आकाशातला एखादा तारा दाखवतो आणि माझ्या आईचा पत्ता सांगतो. शाळेतल्या बाईंना पण तो हेच सांगेल काय? हो, पण त्यासाठी आधी तो शाळेत तर आला पाहिजे, तो तर उद्या बाहेरगावी चालला आहे, निदान त्याची धावपळ तरी हेच सांगतीये. आता काय करायचे?

वर्गशिक्षिकांनी “पालकांना घेऊन या”, असे नक्की का सांगितले असावे? प्रश्नांचे जाळे शाळेतून निघाल्यापासून मला गुंत्यात अडकवत होते. अगदी रात्री बिछान्यात अंग टाकल्यावरसुद्धा. म्हणजे एरवी बाबाने अंगावर दुलई घातली की अंगाई गीताची गरज नाही की काऊ माऊच्या गोष्टीची गरज नाही. पण आज तसे झाले नाही. बाबाने त्याच्या खोलीत जावे म्हणून मी काहीवेळ डोळे मिटलेही, पण त्याने दार ओढून घेताच ते उघडलेही. आता तो त्याच्या आणि मी माझ्या खोलीत जागे होतो. समजा उद्या बाबा शाळेत आलाच, तर बाई त्याला काय सांगतील? तुमची मुलगी खिडकीतून बाहेर बघत असते, वर आकाशात कोणाला तरी शोधत असते, अभ्यासात ठीक आहे पण वर्गात अजिबात लक्ष नसते, आताशी मित्र मैत्रिणींपासूनही लांब राहु लागली आहे वगैरे सगळे तर नाही ना सांगणार? आणि हे ऐकून बाबाला काय वाटेल? तो खरेच माझ्यासाठी खूप काही करत आहे. अगदी त्याचा व्याप पूर्वी इतकाच सांभाळत. मग त्याला अपयशी तर वाटले तर? तो माझ्यावर रागावला तर? नाही नाही मी यातले काहीच होऊन देणार नाही. उद्या सकाळीच वर्गशिक्षिकांना जाऊन भेटीन, त्यांची माफी मागेन आणि त्यांना हवे तसे वागण्याचे आश्वासन देईन. फक्त माझ्या पालकांना, म्हणजे फक्त माझ्या बाबाला शाळेत बोलवू नका. आता मात्र विचारांनी थकलेले माझे डोके कधी शांत झोपेत गेले कळालेच नाही.

सकाळी बाबा लवकर उठला असावा बहुधा. आज त्याला बाहेरगावी जायचे असावे. मग आजी तरी इकडे येईल किंवा मला तरी आजीकडे पाठवेल, म्हणजे धम्मालच धम्माल. इतक्यात कालची शाळा आठवली, बाईंचे पालकांना बोलावणे आठवले. बाबाला सांगू का? तो बिचारा बाहेरगावी चालला आहे. सगळेच रद्द करावे लागेल त्याला. नको कालरात्री ठरवल्याप्रमाणे मीच जाऊन भेटीन बाईंना.

एखाद्या शहाण्या मुलीसारखे माझे सगळे आवरूनच मी खोली बाहेर आले. दिवाणखान्यात शाळेचे दप्तर ठेवले. स्वयंपाकघरात जाऊन बाबाला काही मदत हवी आहे का विचारले. “अरे वा! आज माझे पिल्लू स्वतःहून उठले आणि तुझे आवरूनही झाले.”, बाबा खूप खूश झाला. मग मी पटकन दुध प्यायले, दोघांनी नाष्टा उरकला आणि शाळेत खेळांची तयारी आहे असे सांगून मी सायकल काढत लवकर घरातून बाहेर पडले. शाळा सुरू व्हायच्या आधी वर्गशिक्षिकांना भेटायचे होते.

मी सायकल घाईने दामटत शाळेत पोहचले. सायकल लावली आणि समोरच्याच झाडाखाली जाऊन बसले. बाईंशी बोलायची हिंमत होत नव्हती. काय आणि कसे बोलायचे याची वाक्ये मनात जुळवत होते, पुन्हा पुन्हा उजळणी करत होते. मी हे सगळे बोलल्यावर बाई काय म्हणतील? रागावतील, घरी पाठवतील की प्रेमाने जवळ घेत पाठ थोपटतील.

ते काही नाही जाऊच आत्ता असे म्हणत दप्तर पाठीवर घेत मुख्य इमारतीकडे चालू लागले. बाहेरच प्रवेशद्वाराजवळ बाबाची भली मोठी गाडी दिसली आणि छातीत धडधडायला लागले. बाबा इथे कसा आला, बाबाला हे सगळे कसे कळाले, तो तर बाहेरगावी चालला होता, मग इथे कसा आला, पुन्हा प्रश्नांचा गोंधळ. मी शिक्षकांच्या खोलीकडे वळाले. अर्ध्या वाटेतच बाबा परत येताना भेटला.

“अग वेडे कालच नाही का सांगायचस? यात घाबरण्यासारखे काय? बरे, मी वर्गशिक्षिकांशी बोललो आहे. तू थेट वर्गाकडेच जा आता आणि हो, त्या तुझे खूप सारे कौतुक करत होत्या. तेव्हा मी बाहेर गावावरून येताना तुझ्यासाठी मोठे बक्षिस आणणार आहे.”

मला नक्की काय बोलावे हेच कळत नव्हते. त्याच्या भल्या मोठ्या गाडीत बसताना बाबा मला गाडीपेक्षाही मोठा भासत होता, माझे आभाळजणू. मी वर्गात पोहचून बाकावर दप्तर ठेवले आणि वर्गाबाहेरच वर्गशिक्षिकांची वाट बघत उभे राहिले. त्या आल्या तशी त्यांच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि आईजवळ रडावे तसे हमसून हमसून रडायला लागले.

“हं चला आता वर्गात, प्रार्थनेची वेळ झाली आहे”, बाई मात्र हसून इतकेच म्हणाल्या.

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा — डायबिटीस प्रेम / नव्या वळणावर ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ दोन लघुकथा — डायबिटीस प्रेम / नव्या वळणावर ☆ श्री मंगेश मधुकर 

[१]  डायबेटीस प्रेम

बराच वेळ डॉक्टर रिपोर्ट पहात होते त्यामुळं अनंतची अस्वस्थता वाढली.

“अनंतराव,तपासण्या करून घेण्याची सुबुद्धी कशी काय झाली.त्यातही दोघांनीही तपासण्या केल्या हे चांगलं केलंत”डॉक्टर हसत म्हणाले. 

“काही सीरियस?”

“खास नाही.अभिनंदन!!आयुष्यभर सोबत करणारा नवीन नातेवाईक आलायं”

“डायबेटीस”

“हो,काळजी घ्यावी लागेल.शुगर जास्त आहे.औषधं देतो पण सवयी बदलून पथ्य काटेकोरपणे पाळावी लागतील.” डॉक्टरांचा निरोप घेऊन विचारांच्या तंद्रीतच अनंत घरी आला.

“रिपोर्ट आले.काय म्हणाले डॉक्टर.सगळं व्यवस्थित ना.”अनीतानं एकापाठोपाठ प्रश्नांचा भडिमार केला.

“काही विशेष नाही”

“म्हणजे काहीतरी आहे.तुम्हांला चांगलं ओळखते”

“शुगर खूप वाढलीय”

“अरे बाप रे!! मग”

“औषध दिलीत आणि पथ्य सांगितलीयेत.”

“काळजी करू नका.तसंही आपण जास्त गोड कुठं खातो”

“आपल्याला वाटतं पण रिपोर्ट काही वेगळंच सांगतायेत.आजपासून चहा बंद”अट्टल चहाबाज अनंतचा गळा दाटून आला.

“पथ्य म्हणजे अवघड आहे.तुम्हांला गोड तर अतिप्रिय.”

“फक्त मलाच???तू पण गोड खाण्यात तोडीस तोड आहेस”

“मग असं करू आपण दोघंही मिळून पथ्य पाळू.दोघात तिसरा आता गोड विसरा.”अनीतानं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. 

“मग काय काय खाणं बंद करायचं.”

“जे जे आवडतं ते सगळं..”

“इतक्या वर्षांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी एकदम कशा बदलायच्या.तुम्हांला जमेल”

“जमवावं लागेल.नाहीतर.. ” 

“काय होईल”

“औषधाबरोबरच इन्सुलिन सुरू करावं लागेल.” 

“बाप रे.त्यापेक्षा नव्या नातेवाईकाचा पाहुणचार जोडीनं करू या.एक से भले दो.”

“नको.माझ्यासाठी इच्छा मारू नकोस.बिनसाखरेचा चहा,कारल्याची भाजी यागोष्टी झेपणार नाहीत.खूप त्रास होईल.”

“चॅलेंज देऊ नका.मी ठरवलं तर काहीही करू शकते.”

“रोज किमान अर्धा-पाऊण तास चालायला सांगितलेय.मला चालण्याचा जाम कंटाळा.तू बरोबर येशील.” 

“हे बरंयं.बोट दिलं तर तुम्ही हात पकडताय.असं वाटतयं की डायबेटीस मलाच झालाय”

“शुभ बोल.”

“त्रास होतो म्हणून तपसण्या केल्या अन भलतंच झालं.माझे रिपोर्ट नॉर्मल आले आणि तुम्हांला….”

“शंका असेल तर चेक कर”

“अहो,तसं नाही तुमच्यावर विश्वास आहे.या साखर बंदीचा फार त्रास होणार.”

“तो कसा काय?”

“मनाला आणि शरीराला बदल झेपायला पाहिजे ना.”

“आता यावर नंतर बोलू.चल आवर फिरायला जाऊ.”

“आजपासूनच..”अनीता 

“कल करे सो आज कर म्हणूनच आता डायबेटीस लाईफचा श्रीगणेशा आजच..”

“हे किती दिवस”

“सध्या तरी तीन महीने नंतर पुन्हा तपासण्या करू आणि मग डॉक्टर सांगितल तसं..”अनंत-अनीताचं नवीन रुटीन सुरू झालं.गोड खायची खूप इच्छा व्हायची पण मोह आवरला.बिनसाखरेचा चहा घशाखाली उतरायचा नाही म्हणून दिवसातून चार-पाच वेळा होणारा चहा दोनवर आला.जेवणात कारल्याचं प्रमाण वाढलं.सकाळी व्यायाम आणि संध्याकाळी चालणं सुरू झालं.तीन महिन्यांनी तपासण्या करून डॉक्टरांकडे गेले. अनीता रिसेप्शनिस्टशी बोलत असताना अनंत लगबगीनं आत गेले.

“डॉक्टर,एक महत्वाचं सांगायचंय”  

“बोला”

“हिला डायबेटीस विषयी..”तितक्यात अनीता आल्यामुळे अनंत गप्प बसले. 

“डायबेटीस विषयी काय म्हणत होता”डॉक्टरांनी विचारलं. 

“काही विशेष नाही.तुम्ही सांगीतल्याप्रमाणे पथ्य पाळीलीत.अजून काही काळजी घ्यायची का?’

“सांगतो.”

“वा,वा!!वहिनी,रिपोर्ट एकदम नॉर्मल.काळजीचं कारण नाही”डॉक्टर. 

“थॅंकयू डॉक्टर!!यांचा डायबेटीस काय म्हणतोय”

“मला शुगरचा त्रासच नाहीये”गडबडलेले अनंत पटकन म्हणाले. 

“तेच तर …डायबेटीस तुम्हांला आहे.त्यांना नाही.”डॉक्टरांचं बोलणं ऐकून अनीताला धक्का बसला. 

“डायबेटीस आहे म्हणून यांनी तीन महीने कडक पथ्य पाळलीयेत”

“चांगलयं की मग!!अनंतराव ठणठणीत आहेत.बिनधास्त गोड खाऊ शकतात.तुम्ही मात्र पथ्य आणि व्यायाम असाच चालू ठेवा.काहीही प्रॉब्लेम होणार नाही.”रिक्षातून येताना अनीता एकही शब्द बोलली नाही.त्यामुळं आता काय होणार या विचारांनं अनंताला टेंशन आलं.

“खोटं का बोललात”घरात पाऊल टाकताक्षणीच अनीताचा प्रश्न. 

“खोटं बिटं काही नाही उलट डायबेटीस होऊ नये म्हणून मी सुद्धा काळजी घेतली”

“मन मारून..”

“इतकी वर्षे गोड खातोय.काही दिवस बंद केलं तर काही बिघडत नाही. ”

“माझ्यासाठी केलंत ना” भरल्या डोळ्यांनी अनितानं विचारलं. 

“आपल्यासाठी..”

“डायबेटीसचं कळल्यावर घाबरले असते आणि माझं गोडावरचं प्रेम बघून कोणतीच पथ्य पाळली गेली नसती म्हणूनच हा खेळ केलात ना”

“यामुळे फायदाच झाला ना.तुझी शुगर कंट्रोल मध्ये आली आणि माझंही थोडं वजन कमी झालं.”

“चहा चालेल”

“पळेल”अनीतानं चहाचा कप दिला.पहीला घोट घेतल्यावर अनंतानं विचारलं “हे काय”

“अडीच चमचे साखर घातलीये.गोड चहा आवडतो ना.बिनधास्त प्या”

“अगं पण तुला..”

“तुमच्या प्रेमामुळे माझाही चहा एकदम गोड आहे.” अनीता अशी काही लाजली की अनंतच्या काळजाचं पाणी पाणी झालं.त्याच वेळी रेडिओवर सुरु असलेलं “बहोत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो….. ” हे गाणं अनुराधा पौडवाल आपल्यावतीनं गात आहेत असचं दोघांना वाटलं.

[२] “नव्या वळणावर…

सकाळची गडबडीची वेळ, किचनमध्ये आवराआवर सुरू होती.नवरा मित्राला भेटायला निघाला. 

“अहो,बाहेर जाताय तर एक काम करणार”जरा भीत भीतच विचारलं. 

“बोला”

“टोमॅटो अन बटाटे आणता”काही बोलले नाहीत पण चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसला. 

“आणतो”

“आधी बटाटे घ्या आणि नंतर ..”पिशवी देताना म्हटलं तर नवरोबा प्रचंड चिडले. 

“विनाकारण अक्कल शिकवू नकोस”

“धांदरटपणा माहितीये म्हणून सांगितलं”

“तुझा बावळटपणा काढू का?” झालं!! रोजच्याप्रमाणं ‘तू तू .. मै मै..’ सुरू झालं.शेवटी हातातली पिशवी फेकून दार आपटून नवरा बाहेर गेला. संतापानं लाही लाही झाली. सणसण डोकं दुखायला लागलं.कामं बाजूला ठेवून बसून राहिले.डोकं शांत झाल्यावर ताईला फोन केला “आहेस का घरी”

“हो.आहे की”

“दहा मिनिटात येते”

“काही विशेष”

“सहजच”आवरून ताईच्या घरी गेले.चहासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेल्या असताना एकदम ताईनं विचारलं “सगळं काही ठिक ना.”

“हो,असं का विचारतेस”

“बोलतेस वेगळे पण चेहरा निराळचं सांगतोय अन डोळे तर..”

“काही नाही.यांच्याशी वाद झाला”

“संसारात असल्या गोष्टी चालयच्याच”

“तसं नाही गं.आजकाल आम्ही बोलतो कमी आणि भांडतो जास्त.मग त्यासाठी कोणतही निमित्त पुरतं.रोजच कटकट.कुठंतरी निघून जावंसं वाटतं पण जायला जागा नाहीये.”

“लग्नाची पंचवीशी उलटल्यावर हे असं होतच”ताईनं अनुभवाचे बोल सांगितले. 

“हो,पण सहन करायला पण काही मर्यादा असते.किती अडजेस्ट केलं,मन मारलं ते माझं मलाच माहिती.”

“हे सगळं तुझ्याच संसारासाठी केलं ना’

“पण संसार माझ्या एकटीचा नाहीये.”

“पण तुझा नवरा तर चांगलायं ना”

“जगासाठी.खरं काय ते मला विचार.फक्त पैसे कमावले म्हणजे झालं का?घरात बाकीच्याही जबाबदाऱ्या असतात.दुखणी-खुपणी असतात ते सगळं मीच बघते.”

“म्हणजे नवरा बिनकामाचा आहे.”ताईनं हसत हसत विचारलं. 

“अगदीच तसं नाही.चांगलं वागत नसले तरी वाईटही वागत नाही फक्त नीट बोलत नाही.इतरांशी किवा फोनवर मात्र गुलूगुलू बोलतात.त्याचाच जास्त राग येतो.”

“असं का वागता म्हणून विचारलं नाही का?”

“तुला काय वाटतं.विचारलं नसेल.दहादा विचारलं पण उत्तर दिलं नाही उलट मीच खूप चिडकी आणि विसराळू झालीय असं म्हणाले.नाही नाही ते सुनावलं मग मी पण आख्ख खानदान खाली आणलं.”

“एवढं करून काय मिळवलं”ताई. 

“मनस्ताप,चिडचिड आणि अबोला,घरातली शांतता घालवली.”

“सगळं कळतय ना मग वाद का घालतेस”

“मुद्दाम करत नाही.चाळीशी नंतरच्या बदलांचा परिणाम होणारच ना.अशावेळी हक्काच्या माणसानं समजून घेतलं पाहिजे ना पण यांना काही कळतच नाही.सतत आपलं ‘तू बदललीस, बदललीस’ हा धोशा चालू.मुलीसुद्धा वडिलांची री ओढतात.कोणाला माझी किंमतच नाही.”एकदम भरून आलं अन ओक्साबोक्सी रडायला लागले. ताई पाठीवरून हात फिरवत होती.मायेच्या,वडीलकीच्या स्पर्शनं जास्तच रडायला आलं. 

“शांत हो,”

“आजकाल मूड सारखे बदलतात.सारखी चिडचिड होतेय हे मला समजतं.त्यामुळं वाद,कुरबुरी होतात हे मान्ययं. बाईच्या आयुष्यात ही फेज येतेच.सांभाळून घ्यावं एवढी साधी अपेक्षा पूर्ण होत नाही. गेल्या काही वर्षांपासून आमचं अजिबात पटत नाहीये.धड बोलणं तर दूरच पण सारखी भाडणं नाहीतर अबोला.खूप वैताग आलाय.एकमेकांची तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही पण नाईलाज.”

“तुला असं का वाटते की भाऊजीनी समजून घेतलं नसेल”ताई. 

“१०० टक्के खात्री आहे.”

“शांतपणे विचार केला तर अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील.”ताई बोलण्यानं विचारचक्र सुरू झालं.एकेक गोष्टी आठवल्या.नवरा घर कामात करत असलेली मदत,अनेकदा क्षुल्लक कारणावरून मी चिडले तरी त्यांचं शांत राहणं.चूक नसताना माघार घेऊन टाळलेले वाद अशा अनेक गोष्टी आठवल्यावर रागाची धार बोथट झाली.

“नवरा अगदीच वाईट नाहीयं” सहजच बोलून गेले.

“चला,तुझं तुलाच समजलं यातच सगळं आलं.”

“आता निघते.त्यांच्या आवडीची कांद्याचं थालपीठ करते.खूष होतील.”

“काळजी घे ”

“येस,नक्की,काळजी घेईन ”

“मी भाऊजींविषयी बोलतेय.”

“म्हणजे”

“बायकांच्या आयुष्यात जसे हार्मोन्समुळे वागण्या-बोलण्यात बदल होतात.मूड स्विंग होतात. इमोशनल उलथापालथ होते.चाळीशीनंतर पुरुषांच्या आयुष्यात देखील तशाच घडामोडी होतात.मिडलाईफ क्रायसिस.मन सैरभैर होतं.अस्वस्थता वाढते. शारीरिक तक्रारी सुरू होतात.पुरुषांनाही त्रास होतो. फरक एवढाच की आपण बायका निदान बोलतो तरी ….पण पुरुष यावर व्यक्तच होत नाहीत.एकदम गप्प राहतात नाहीतर चिडचिड करतात.अनेकांना तर होणारा बदल समजतच नाही तर बरेचजण स्वीकारत नाही.”

“फक्त स्वतःला कुरवाळत बसले.त्यांच्या बाजूनं  कधी विचारच केला नाही..”

“जगण्याचा मार्ग बदलणाऱ्या ‘नव्या वळणावर’ एकमेकांना सांभाळलं ना मग पुढचा प्रवास सोप्पा होतो.”ताईनं जगण्याचं मर्म सोप्या शब्दात सांगितलं. इतक्यात नवरोबांचा फोन “हे बघ,टोमॅटो घेतलेत आता बटाटे किती घ्यायचेत” त्यांचं बोलणं ऐकून मला हसायला आलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“अग पुष्पा,काय ग सुंदर हापूस हा ! असला अस्सल हापूस कित्ती वर्षांनी खाल्ला मी .. वा वा.”)  – इथून पुढे 

त्या मे महिन्यात दोघीनी खूप मजा केली.सारसबागेत फिरल्या  मंडईत गेल्या, पर्वती  चढल्या. दमून हाश हुश करून उसाचा रस प्यायल्या. .   त्या रात्री बोलता बोलता मीना म्हणाली, “ पुष्पा, एक कल्पना येतेय मनात ..  सांगू का?बघ आवडते का. पटली तर हो म्हण नाही तर नको.आपण असं दोघीनी एकेकट्या रहाण्यापेक्षा  एकत्र राहून बघूया का?काही महिने माझ्या मुंबईच्या घरात तर काही महिने तुझ्या पुण्याच्या घरात.म्हणजे दोन्ही घरं चालू रहातील आणि आपल्याला आपली कंपनीही मिळेल.तुझी मुलगी आली की तू पुण्याला जा,मुलगी नातवंडं यांच्या बरोबर रहा, मग ती मुंबईला येईल मुलं घेऊन.आणि माझ्याकडेही रहातील ते.चालेल का? एक पथ्य पाळायचं. कोणीही कितीही गॉसिप केलं,काड्या घालायचे प्रयत्न केले तरी अजिबात  लक्ष द्यायचं नाही. सर्व खर्च आपण निम्मे निम्मे वाटून घेऊ.  दोन्ही घरांचे.काही वाद झाले तर लगेच सोडवून टाकायचे.चालेल का? “ मीना म्हणाली. नाहीतरी त्या दोघीत मीना हुशार, व्यवहारी जग बघितलेली होती, हे पुष्पाला चांगलंच माहीत होतं. हा प्रयोग दोघीनी करायचं ठरवलं. इतक्यात कलिका प्रशांतला काहीच नको सांगायला असं ठरवलं दोघीनी. सहा महिने खूप मजेत सुरळीत गेले आणि मग मीनाने ही ऐडजस्टमेंट मुलांना सांगून टाकली.  कित्ती आनंद झाला त्या दोघांना . प्रशांत सरळ म्हणाला “सासूबाई,तुमची मला खात्री आहे हो पण आमच्या आईसाहेब जरा विचित्र आहेत. तुम्हाला त्रास नाही ना होत तिचा?नाहीतर नका असले  प्रयोग करू हं. तुम्ही खूप समजूतदार आहात.” 

मीना हसून म्हणाली, “ नाही रे. खूप बदलली आहे पुष्पा. आता.तशी ती भाबडी आहे.मस्त जमतंय आमचं. तुम्हाला सांगू? पुढच्या महिन्यात  बँकॉक ट्रिप करतोय आम्ही केसरीबरोबर. आहे ना मजा?कुठं गेले नाहीये रे मी कित्ती वर्षात.कलिकाचे बाबा गेल्यानंतर नाही जमलं कुठं जायला पण आता पुष्पाची मस्त कंपनी मिळालीय तर जाऊ अशा  ट्रिपाना. नशिबाने दोघींकडे चांगला पैसा आहे तर येतो जाऊन “ . 

प्रशांत म्हणाला “ क्या बात है. जरूर जा सासूबाई मजा करा.”   

त्या दोघी नंतर अशा छोट्या ट्रिप्स करू लागल्या.दोघीनी एक पथ्य पाळले .तुझी मुलगी माझा मुलगा हे विषय अजिबात बोलायचे नाहीत. वादाचे मुद्दे बंद.पुष्पाने स्वयंपाकघराचा ताबा घेतला तर मीना बँक हिशेब बिले हे सगळं चोख बघायची.बिल्डिंगमधल्या भोचक बायकांना सुगावा लागलाच,की विहिणी विहिणी एकत्र रहातात. त्यांना आश्चर्यच वाटले आणि कधी भांडणं होतात याकडे लक्ष ठेवून होत्या बायका. प्रयत्नही करून झाले भांडणे लावायचे पण या दोघी भक्कम होत्या. कधीही त्यांनी या लोकांना थारा दिला नाही. मुलांना अतिशय आनंद झाला आणि हायसं वाटलं की आपल्या आया एकेकट्या पडल्या नाहीत आता.एकमेकींना धरून रहात आहेत आणि आयुष्य छान जगत आहेत. त्या दिवशी कलिकाचा फोन आला पुष्पाला. “ अहो आई गम्मत सांगायची आहे तुम्हाला.माझ्या ऑफिसमध्ये मी सहज लंच ब्रेकमध्ये सांगितलं ना की माझी आई आणि सासूबाई खूप महिने हल्ली एकत्र रहातात तर मला भेटायला आमच्या ऑफिसमधली  केटी घरी आली. म्हणाली कलिका,खरंच का तुझ्या सासूबाई आणि आई एकत्र रहातात? पटतं का ग त्यांचं?कशी करतात  ऐडजस्टमेंट त्या?” सगळं सीरिअसली विचारत होती हो.मी म्हटलं “ का ग केटी?का विचारते आहेस तू?” तर म्हणाली “अग माझी आणि माझी विहीण जेनीचीही सेम आहे परिस्थिति. कंटाळलो आहोत एकेकट्या राहून. मी जेनीला तुझ्या सासू आणि आईचं सांगितलं तर म्हणाली आपण बघूया का असं राहून?आम्ही सध्यातरी चार महिने बघणार आहोत कसं जमतं ते .जमलं तर बघू.’बघा सासूबाई,किती मस्त होईल ना त्यांचं ही जमलं तर.” कलिका सांगत होती. “ इकडे खूप कंटाळतात हो माणसं अशी एकेकटी राहून.थँक्स तुम्हा दोघीना हं. “ मीना आणि पुष्पाला हे ऐकून फार आनंद झाला.,एकटेपणाचे दुःख त्यांनीही नव्हते का सोसलं? 

त्या दिवशी दोघी बागेत फिरून आल्या आणि सहज सोसायटीतल्या बाकावर बसल्या.शेजारच्या विंग मधले जोग काका त्यांच्या जवळ आले.” जरा बसू का मी इथं पाच मिनिटं?” जोग काकांनी विचारलं.”अहो बसा की त्यात काय विचारायचं?” पुष्पा म्हणाली.

जोग म्हणाले, “ तुम्ही प्रशांतच्या आई ना?आणि या सूनबाईंच्या आई, हो ना?” “ हो हो आम्ही विहिणी आहोत दोघी. का हो?” जोग म्हणाले “ गेले चार वर्षे तुम्हाला आम्ही एकत्र रहाताना बघतोय.मोकळेपणाने विचारतो,जमतं का हो असं राहून?मला फार कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय.रागवू नका हं.”   

“ अहो त्यात काय रागवायचंय?आम्ही चार नाही हं पण सहा वर्षे झाली अशा मजेत रहातोय.मस्त पटतं आमचं. आता या वयात कसली हो भांडणं आणि मानपान?आम्ही आता विहिणी आहोत हेच विसरून गेलोय “.जोग म्हणाले “ आणि नोकर, घरखर्च, हॉटेल असे खर्च कसे करता?” “ते आम्ही निम्मे निम्मे करतो. डॉक्टरचे खर्च मात्र ज्याचे त्याने करायचे असं ठरवून घेतलंय आम्ही.”

जोग म्हणाले “ कौतुक वाटतं आम्हाला तुमचं दोघींचं हो.पहिल्यांदा मीही  साशंक होतो की या दोन बाया कशा काय राहणार कायम एकत्र.त्यातून  हे नातं किती नाजूक. पण  तुम्ही ते  खोटं ठरवलंत.शाब्बास.  आता एक गम्मत सांगतो.आम्ही दोघे मित्र मी आणि शेजारचे  भाटे असेच शेजारच्याच फ्लॅट्स मध्ये राहतोय कित्ती वर्ष दोघेही एकेकटेच. दोघांचीही मुलं परदेशी आणि आमच्या बायकाही लवकर गेल्या म्हणून समदुःखीही आहोत.तुमच्या उदाहरणावरून वाटलं आपणही मित्रांनी एकत्र राहून बघावं का?म्हणून तुम्हाला विचारायला आलो .,भाटे  म्हणाला जा रे त्या दोघीना विचारून ये.आपण पण राहूया असे.”  जोग हसत म्हणाले. मीना हसून म्हणाली “ अहो मस्त घेतलात निर्णय.खूप फायदेही आहेत या सहजीवनात.खर्च कमी होतो,हाकेला कोणीतरी आहे याचा आधार वाटतो आणि एकटेपण जाणवत नाही.जरूर रहा तुम्हीही.अहो या उतार वयात ,मुलं परदेशी असताना आपण असं एकाकी का रहायचं हो?पुष्पा सांग ना याना आपला निर्णय किती योग्य ठरला ते.” पुष्पा म्हणाली “ खरंच रहा तुम्ही आणि भाटे एकत्र.मस्त ट्रिप ना जा, हॉटेलात जा फार्म हाऊस ला जा. ही लास्ट इनिंग मस्त जगा आमच्या सारखीच.’

“ मीनाताई,पुढच्या महिन्यात  आपल्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये या विषयावर एक टॉक द्याल का? मी सुचवलंय तुमचं नाव.” “ देईन की त्यात काय. नाहीतरी हाडाची  प्रोफेसर आहेच मी आणि हे सहजीवन आम्ही यशस्वी करून दाखवलंय असं आता इतक्या वर्षांनी म्हणायला हरकत नाही  हो ना? “ मीना हसत हसत म्हणाली. जोग म्हणाले “ चला मग.त्या टपरीवर मस्त चहा पिऊ या.  तो बघा भाटे आलाच.” 

हसत हसत सगळे मजेत चहा प्यायला टपरीवर गेले.

– समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ विहिणी – नव्हे मैत्रिणी— भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आधी प्रशांतनं लग्न ठरवलं तेव्हा पुष्पाचा जरा विरोधच होता या लग्नाला.प्रशांत म्हणाला, “ आई,अग शोधून सापडणार नाही अशी मुलगी तुझ्यासमोर आणून उभी करतोय तर का नको म्हणते आहेस ग?काय कमी आहे कलिकामध्ये ? का उगीच नकार द्यायचा म्हणून द्यायचा?एवढी शिकलेली सुंदर हुशार माझ्याइतकाच पगार मिळणारी मुलगी मी अजिबात सोडणार नाही. ठोस कारण सांग मला नको म्हणायचं.”  

पुष्पा जरा घुटमळत म्हणाली, “ तसं नाही रे! कलिका सुंदरच आहे, सगळं छान आहे, पण एकुलती एक आहे ना.” 

“ बरं मग?उलट तुला बरंच वाटायला हवं. भाव्यांची सगळी इस्टेट आयतीच पडेल आपल्या खिशात’! “ उपरोधाने प्रशांत म्हणाला.आपल्या आईचा स्वार्थी,थोडा ,मतलबी स्वभाव जाणून होता प्रशांत. पुष्पा म्हणाली ,” तसं नाही रे बाबा ! पण हिच्यावर एकटीवर आईची जबाबदारी येऊन पडेल ना.  वडील तर नाहीयेत म्हणतोस ना? दोन भावंडं असली की बरं असतं. आईवडील शेअर नाही का होत? “ 

प्रशांत म्हणाला “ हो का?मग मी नाहीये का तुमचा एकुलता एक मुलगा? करणार आहे ना मीच तुमचं?तशीच कलिकाही करील. तिने करायलाच हवं आपल्या आईचं. हा कुठला ग न्याय तुझा?मी कलिकाशी लग्न करणार आणि तिच्या आईची  जबाबदारीही घेणार .नको असेल तर सांग आत्ताच. मी लगेच वेगळा फ्लॅट घेतो.” पुष्पा हादरलीच हे ऐकून. “ तसं नव्हे रे ,पण वाटलं ते सांगितलं. “ 

“ आई,कृपा करून हे कलिका समोर नको बोलू हं, तिला काय वाटेल?किती छान मुलगी आहे ती. तुझं काहीतरीच तिरपागडं असतं बघ.” प्रशांत म्हणाला आणि निघून गेला. वसंतराव ही झकाझकी ऐकत होतेच. पुष्पा फणफणत म्हणाली, “ तुम्ही गप्प बसून रहा बर का .. .कद्धी नका घेऊ बायकोची बाजू. काय हो चूक आहे मी म्हणते त्यात? “ वसंतराव हसत म्हणाले “ मला नका ओढू तुमच्या वादात. मी जातो जरा  बाहेर.” काढता पाय घेत वसंतराव म्हणाले. 

प्रशांतने चार वेळा  कलिकाला घरी आणलं.  खरोखरच छान होती मुलगी.  कलिका मुंबईची होती आणि जॉबसाठी पुण्याला आली होती.  तिच्या आईने या सगळ्याना आपलं घर बघायला बोलावलं. केवढा सुंदर होता  त्यांचा फ्लॅट. मुंबईला चांगल्या एरियामध्ये. प्रशांत कधी बोलला नव्हता हे लोक इतके श्रीमंत असतील असं. कलिकाही कधी असं बोलली नव्हती  .पुष्पाला अगदी कानकोंडं झालं. या सुंदर श्रीमंत मुलीनं काय पाहिलं एवढं आपल्या मुलात हेच तिला समजेना. सहा महिन्यांनी प्रशांत कलिकाचंअगदी थाटामाटात लग्न झालं आणि कलिका सोन पावलांनी घरी आली. पुष्पाला दडपणच होतं की ही श्रीमंतांची मुलगी कशी काय नांदणार आपल्या घरी. पण ती सहज सामावून गेली त्यांच्या घरात. वाटलं तितकी गर्विष्ठ अजिबात नव्हती कलिका. तिच्या आई तर फार चांगल्या होत्या स्वभावाने .आणि कित्ती काय काय करायच्या उद्योग. पुष्पाला उत्तम स्वयंपाक करायची, वाचनाची, भरतकाम  ड्रॉइंगची फार आवड होती. कलिकाच्या आई  मीनाताई एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होत्या आणि आता निवृत्त झाल्या होत्या. मोठ्या फ्लॅटमध्ये एकट्याच रहात होत्या मुंबईला.

त्या दिवशी वसंतराव फिरायला गेले आणि  चक्कर येते म्हणून मधूनच घरी आले. ‘ जरा झोपतो ग,’ असं म्हणून झोपले. बराच वेळ झाला तरी अजून कसे उठले नाहीत.  पुष्पा उठवायला गेली, तर झोपेतच  वसंतराव गेलेले होते. काहीही होत नसताना, कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानकच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेलेच ! सगळ्यांना फार मोठा धक्का होता हा. पुष्पा तर कोलमडूनच गेली. कधीही वसंतरावांशिवाय रहायची सवय नव्हती तिला. हळूहळू एकटं रहाण्याची सवय करावी लागली तिला. यावेळी कलिकाने तिला खूप आधार दिला आणि जपलेही. आपल्या आईचे उदाहरण दिले आणि म्हणाली, “ तुम्हीही आता खंबीर  व्हायला हवं हो आई. माझ्या आईकडे बघा.खूप लवकर गेले माझे बाबा, पण  माझी आई  खंबीर राहिली आणि तिने मला एकटीने वाढवले.आणि स्वतःला खूप व्यस्त ठेवले तिने आणि म्हणूनच मी इतकी शिकले, मोठी झाले.”  

पुष्पाने हळूहळू स्वतःला सावरले आणि आपले आयुष्य सुरू केले. लग्नाला पाच वर्षे झाली.  कलिकाला दोन मुलंही झाली आणि अचानक प्रशांतला आणि कलिकाला अमेरिकेची ऑफर आली. दोघांच्याही आया म्हणाल्या, “अरे मिळतेय संधी तर जा. आम्ही अजून तरी चांगल्या आहोत तब्बेतीने. नंतरचं बघू नंतर. जा तुम्ही.”  कलिका आणि प्रशांत सध्या दोन वर्षासाठी म्हणून अमेरिकेला गेले. 

प्रथम प्रथम पुष्पाला अतिशय बेचैन वाटले, पण नंतर तिने स्वतःला गुंतवून घेतले कितीतरी गोष्टीत. तिने आता दुपारी ड्रॉइंगचे  क्लास  घ्यायला सुरुवात केली आणि तिला छान रिस्पॉन्स मिळायला लागला. छान वेळ जायला लागला तिचा.  एक दिवस सकाळी कलिकाचा फोन आला पुष्पाला. “ आई तुम्हाला एक विनंती होती .माझी आई काल बाथरूम मध्ये पडली आणि फार काही नाहीये पण हाताला फ्रॅक्चर झालंय. तुम्ही प्लीज चार दिवस जाऊ शकाल का?डावा हात आहे तिचा पण जरा थोडी मदत लागेल.नोकर आहेत पण मला फार काळजी वाटतेय हो.मी तर इतक्या लांबून येऊ शकत नाही ना.” कलिका तर रडायलाच लागली फोनवर.” पुष्पा म्हणाली ,” कलिका डोळे पूस बघू. हे बघ काळजी नको करू. मी आत्ताच सकाळी निघते मुंबईला. मी त्यांच्या घरी राहीन आणि तसं वाटलं तर  त्याना आपल्या घरी पुण्याला घेऊन येईन की.तू मुळीच नको काळजी करू ग. ” कलिकाला धीर आला आणि ती म्हणाली आई, “ कळवत रहा हं. किती रिलॅक्स वाटलं तुम्ही जाताय म्हणून ! थँक्स आई “ . 

पुष्पा लगेचच मुंबईला टॅक्सीने  गेली. मीनाताईंना  खूप आनंद झाला त्यांना बघून. “ अग बाई ! कलिकाने दिसतोय फोन केलेला लगेच. काय मुलगी हो. म्हणाले होते मी नको कळवू तुम्हाला. काळजी वाटते हो . नशिबाने डावाच हात आहे म्हणून त्यातल्या त्यात बरं म्हणायचं.” मीनाताई  म्हणाल्या. 

पुष्पा म्हणाली, “ आता आलेय ना मी,मग करा मस्त आराम.” पुष्पाने घर ताब्यात घेतले. स्वयंपाकाच्या बाईना सूचना  दिल्या. मीनाच्या लगेच लक्षात आले,पुष्पा सुगृहिणी आहे आणि उरकही खूप आहे तिला .बाई यायच्या आत सुंदरसा नाश्ता तयार असायचा तिचा. दोघी विहिणी मजेत बाल्कनीत बसून चहा नाश्ता घ्यायच्या. मीनाला खूप आराम मिळाला पुष्पामुळे. “ पुष्पा,आपण मैत्रिणीच जास्त झालो नाही,विहिणी पेक्षा?मग आता मला ए मीना म्हण बघू.आणि मी तुला ए पुष्पा.  चालेल ना? “ हसत हसत दोघीही  तयार झाल्या.

मीनाचे प्लास्टर निघाल्यावर मीनाने खूप फिरवले पुष्पाला मुंबईत.  दोघी चांगली नाटके बघून आल्या,बागेत गेल्या भेळ खाल्ली.मीना म्हणाली, “ खरं सांगू पुष्पा, मला अशी जवळची मैत्रिणच नव्हती ग.कित्ती छान मैत्रीण मिळाली तुझ्यामुळे. आता ही मैत्री कायम ठेवायची आपण.विहिणी नंतर. मैत्रिणी आधी.!” 

“ हो ग मीना,मलाही फार आवडलीस तू.असेच मस्त रहात जाऊया आपण. आता जाऊ ना मी पुण्याला? रहाशील ना नीट? “ मीनाच्या डोळ्यात पाणी आलं. “ कित्ती छान काळजी घेतलीस पुष्पा . खूप खूप आभार ग बाई तुझे. असेच प्रेम ठेव. दुनिया काही का म्हणेना.आपण हे मैत्रीचं नातं कायम जपूया.” 

पुष्पा पुण्याला परत आली. कलिकाला अतिशय आनंद झाला. तिने सासूचे शंभर वेळा तरी आभार मानले.

“ अग त्यात काय कलिका? अडचणीला नको का जायला आपल्या माणसाकडे? तीही आली असतीच की माझ्या अडचणीला.आम्ही आता चांगल्या मैत्रिणी झालोय बरं का. विहिणी नाही काही.” पुष्पा हसून म्हणाली. 

नंतर आला मे महिना.

“ मीना,कोकणातून आमच्या घरी आंबे येतात घरचे.आमच्या चुलतसासूबाई पाठवतात ..येतेस ना? मुकाट बॅग भर.” मीना  आढेवेढे न घेता आली. “ अग पुष्पा,काय ग सुंदर हापूस हा ! असला अस्सल हापूस कित्ती वर्षांनी खाल्ला मी .. वा वा.” 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बरं… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं.  पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. “काळाची गरज” या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.) – इथून पुढे 

त्यादिवशी बाकावर पागेबाई एकट्याच बसल्या होत्या. नानीनं दुरूनच त्यांना पाहिलं. जरा उदासच वाटत होत्या. मग नानी त्यांच्या शेजारी जाऊन बसली. पागेबाईंनी लगेच त्यांचा हात धरला.

” काय झालं मायाताई ?”

“काही नाही हो! नेहमीचच.”

नानीने थोडा वेळ जाऊ दिला.  फारसे काही प्रश्न विचारले नाहीत. मग त्याच सांगू लागल्या,

” किती वर्ष मी या दोघांना सांगत होते मला नातवाची पावलं दाखवा रे! आठ वर्षे झाली यांच्या लग्नाला. विषयच काढू द्यायचे नाहीत.  मुल जन्माला घालण्यापूर्वीचं यांचं बजेट ठरलेलं असतं म्हणे! ते गाठेपर्यंत थांबायचं.  अरे पण तुमच्या वयाचं काय रे? ते थांबणार आहे का? मूल जन्माला येणं महत्त्वाचं नाही का? ते वाढेलच की आपोआप.  त्यासाठी बजेट कशाला हवं? निसर्गाच्या विरुद्ध जाण्याची किंमत आता मोजावी लागते.  तारुण्य सरलं  आता ivf च्या पाठी लागलेत.  काय म्हणाव यांना? मोठ्यांचे सल्ले यांना पटत नाहीत. त्यांच्या अनुभवांशी यांचं काही देणंघेणं नसतं.  यांचा  विश्वास प्रगत विज्ञानावरच. फक्त विज्ञान हाच त्यांचा आधार हो! बाकी निसर्ग तत्वांशी यांचं नातच नाही. मान्य आहे रे बाबांनो तुम्ही सारे खूप प्रगत आहात, खूप पुढे  गेली आहेत तुमची तंत्र.  पण तंत्र, यंत्र आणि निसर्ग यांचा काही ताळमेळ आहे की नाही? सगळी नैसर्गिक मजाच हरवून बसतात जीवनातली.  नाही का हो?”

नानी एकदम भानावर आली मायाताईंच्या  प्रश्नाने. मायाताईंच्या डोळ्यात अश्रू होते. चेहऱ्यावर नैराश्य होतं. सगळे पेशन्स संपले होते.

नानी मात्र एवढेच म्हणाली, “नका इतके गुंतून घेऊ स्वतःला.  काळ बदलतो, जीवन बदलतं. त्यांचं आयुष्य त्यांचे निर्णय.  जगू दे त्यांना त्यांच्या पद्धतीने. आपण फक्त प्रार्थना करायची.  ठेच लागली तर आधार द्यायचा.  तोही त्यांना हवा असेल तर?”

” काय बोलताय तुम्ही?  असं कुठे असतं का?”

असं म्हणत पागेबाई उठून गेल्या. त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे नानी पहात बसली.  क्षणभर तिला वाटलं “हे कालचक्र फिरताना प्रत्येक मागच्या पिढीचं या पागे बाई सारखंच होतं का?” 

नानीचीही पंच्याहत्तरी  उलटली होती. नाना जाऊन वीसेक वर्ष झाली असतील.नानी निवृत्त झाल्यावर राघव म्हणाला, “नानी तू आता एकटी राहू नकोस.”

तसा हा निर्णय खूप मोठाच होता आणि नानीच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला पलटी देणारा होता.  नानीला एकटं राहण्याची सवयी झाली होती.  शिवाय दोघात तिसरा नकोच हाही  एक विचार होताच. तशी नानी आर्थिक दृष्ट्या अवलंबूनही नव्हती.  तिचे भरभक्कम पेन्शन होते. स्वतःची सेविंग्ज होती.  नानांची थोडीफार पुंजी होती.  पण त्याला तिने कधीही हात लावला नाही. फक्त नियोजन केलं आणि राघव साठीच राखून ठेवलं.

अनेक कडू गोड आठवणींना मागे ठेवून घराचा उंबरठा कायमचा ओलांडणं नानीला जड गेलं होतं.  पण राघव बरोबर राहताना दोघांच्याही आयुष्यात होणाऱ्या बदलांचं काय करायचं याचं एक निश्चित धोरण तिनं आखलेलं होतं आणि म्हणूनच असेल राघव, राघवची बायको आणि रिमा यांच्या आयुष्यातलं तिचं  होणार आगमन त्या वेळेपासून कुणालाही त्रासदायक वाटलंच नाही. 

नानी खूप वेळा विचार करते की कुठलाही बदल ही समस्या कशी होऊ शकते?  बदलाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही खरी समस्या असते.  नानी सतत एक सकारात्मक दृष्टिकोन जपत आली. तिचं एकच उत्तर असतं सगळ्यांवर,

” बरं.” 

या “बरं” मध्ये खूप काही व्यक्त, अव्यक्त साठलेलं असतं. पण याचा अर्थ ती नव्या पिढीच्या ताब्यात गेली आहे असं मुळीच नाही.  तिच्या अस्तित्वावर फक्त तिचाच हक्क आहे.  त्यावर कुणीही कुरघोडी करू शकलेलं नाही.  फक्त दोन वेगळ्या विश्वातली एक अस्पष्ट रेषा तिने जाणीवपूर्वक सांभाळलेली आहे.  ती सांभाळताना होणारी उरातली धडधड, उदासीनता, चीड, तुलना या साऱ्या भावनांवर तिने मात नसेल केली पण त्यांना नीट हाताळले आहे. हे नक्की.

या साऱ्यांसोबत नानीबरोबर  तिची आई, आजी यांच्या आयुष्याची ही आठवण असते.  त्यांच्या आयुष्यातल्या अनेक रिकाम्या जागा नानी  भरून काढण्याचा प्रयत्न करत असते.

रात्र खूप झाली आहे.  राघव दिल्लीला गेलाय.  अवंती काही दिवसांसाठी ऑफिसच्या प्रोजेक्ट निमित्त सिंगापूरला गेली आहे.  रिमा अजूनही घरी आलेली नाही.  तिचाही कोणी मित्र आहेच. सकाळी निघताना तिने आजीला सांगितले होते की, ती त्याच्याबरोबर आज एका लाईव्ह कन्सर्टला जाणार आहे.  मालतीबाईंचीही  सुट्टी होती. नानीच्या मनात पुष्कळदा येतं रिमाला एकदा विचारावं,” तुझं आणि त्याचं नक्की नातं काय आहे?”

पण  नानीला खात्री आहे ती म्हणेल “अग आज्जी आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आत्ता तरी.”

” आत्ता तरी” याचा नक्की अर्थ काय? अवंती जवळ सहजच बोलता बोलता नानीने विचारलं होतं,

” त्यांच्यात काही ठरतंय का?”

तेव्हां ती म्हणाली होती,

“नानी आज-काल मुलं काय मुली काय पटकन लग्नाच्या बंधनात पडत नाहीत. त्यांना सहवासातून एकमेकांची खरी ओळख करून घ्यायची असते. लग्न हा त्यांच्यासाठी फार पुढचा विचार असतो. नानीला प्रश्न तर पडलेच होते पण न विचारण्याचं धोरण तिने याही वेळेला राखलंच. फक्त अवंतीला म्हटलं मात्र, “तुम्हाला चालतय का  हे सारं?म्हणजे तुला आणि  राघवला?”

अवंती नुसतीच हसली.

” अहो नानी आमच्या चालण्याचा प्रश्न येतोच कुठे? आजकाल मुलांना फारसं विचारलेलंही आवडत नाही.  विचारत राहिलं की संवाद तुटायला लागतो आणि त्यांच्या जीवनाचा निर्णय घेण्यास ती समर्थ आहेत. 

नानीला एवढंच जाणवलं हळूहळू सूनही मागच्या बाकावर येत चालली आहे. नानीला गंमत वाटली.

आकाशात भुरकट ढगांच्या पदरातून चंद्र संथपणे सरकत होता.  कुणाच्याही सुखदुःखाची त्याला जाणीव नव्हती.अथांग आभाळात तो मुक्तपणे भटकत होता. आजचा चंद्र ही नानीला वेगळाच भासला.  तिच्या अंतरातून जणू काही नकळतच स्वर आले,” अरे बाबा! या मानवाने तुला तरी कुठे सोडले? विश्वाच्या मनातल्या तुझा गोजिरवाण्या रूपाची चिरफाडच झाली ना?”

मग नानी बेडरूम मध्ये आली.  थोडा वेळ तिने टीव्हीवरची एक मालिका लावली.  तिथेही हेच सारं होतं. ती कुणी एक इशा, अरुंधतीला म्हणजे तिच्या आईला जोरजोरात तिचं म्हणणं पटवत होती.  ताड ताड तिच्या बाबतीत घडलेल्या सगळ्या गोष्टींबाबत तिला दोष देत होती.  बिनदिकतपणे ती बोलतच होती.  शेवटी नानीने टीव्ही बंद केला.

मोबाईलवर मेसेजची ट्युन वाजली. मेसेज रिमाचा होता.

” आज्जी प्रोग्रॅम नंतर आम्ही सगळे विक्रमच्या फार्मवर जाणार आहोत. खूप जण आहोत आम्ही. काळजी करू नकोस. सकाळी ब्रेकफास्ट नंतर आम्ही निघू. गुड नाईट! टेक केअर!

नानीने मेसेजला उत्तर दिलं.

” बरं.”

त्याही वेळेला तिच्या मनात एकच विचार आला निदान रिमाने कळवले तरी.

– समाप्त – 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बरं… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं.  पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले.) – इथून पुढे –  

” हे बघ राघव! तू तुझ्या मतांवर इतका ठाम असशील ना तर माझे काही म्हणॉणे नाही.  तू तुझा स्वतंत्र, मी माझी. मला तुझी ही अरेरावी मुळीच चालणार नाही. लक्षात ठेव या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर माझा शंभर टक्के अधिकार आहे. मला माझी मतं आहेत आणि मी तुझ्यावर एक कपर्दीकही अवलंबून नाही.रिमाचा सांभाळ करायलाही मी तुझ्यापेक्षा जास्त समर्थ आहे.”

नानी आतल्या आत प्रचंड हादरली होती. आर्थिक स्वातंत्र्यांमधून मिळालेली ही आवाजाची धार तिला जाणवत होती. पण मग नानीने असा आवाज कधीच का नाही वापरला?

अशा पार्श्वभूमीवर तिला तिची आणि नानांची ही भांडणे आठवत. जेव्हां ती खोदून खोदून आठवायची तेव्हा तिच्या मनात आलं सारं काही सोडून जाण्याचा विचार तिच्याही मनात नव्हता का कधी आला? पण राघव साठी ती मिटूनच राहिली.  मनातलं ओठावरही आलं नाही. एक घाव दोन तुकडे हा विचार तर फारच दूर राहिला. 

राघवचं आणि सुनेचं  नक्की काय बिनसलं होतं याचा खोलवर जाऊन मागोवा घेण्याचा नानी प्रयत्न सुद्धा करत नाही.  कोण चूक? कोण बरोबर ?कसं ठरवायचं आणि का ठरवायचं? मुलगा म्हणून राघवच बरोबर असही तिला वाटत नाही आणि सुनेने थोडं पडतं घ्यावं असंही वाटत नाही.  पण यांचं नातं मात्र तुटू नये असं नक्कीच वाटतं. रिमाच्या भविष्याचं काय असंही वाटतं. 

नानी गप्प बसली तरी नानीला दुःख होतं.  कळून चुकतं इथेच सारं बदललंय. नाती कचकड्याची होत आहेत. संसाराच्या व्याख्या बदलत आहेत.  जो तो आत्मकेंद्रित झालाय.  ही आपली संस्कृती आहे का? हे लोण पलीकडचं आहे. 

पण तरीही नानीच्या मनात गोंधळ असतो. नाते टिकवणे म्हणजे नक्की काय?  रडत खडत निभावणं याला नातं टिकवणं म्हणायचं का? की” मेरी झाँसी नही दूंगी” या प्रकारातला आवेश दाखवून दणादण कापाकापी करायची?

राघवच्यात  नानांचे काही गुण असणारच. तसं पाहिलं तर नानीचं अवंतीशी— सुनेशी— नातं चांगलं आहे. मोकळेपणाचे आहे.  ती तिच्या ऑफिसमधल्या घटना सांगते.  तिच्या मैत्रिणींबद्दलही  बोलते. ऑफिसातल्या सहकाऱ्यांच्या नात्यांबद्दल बोलते आणि बिनदिक्कतपणे राघवच्याही तक्रारी करते.कधी कधी संगणक,मोबाईल बाबतीत नानीची शिकवणीही घेते.   नानी तिचं हरवलेलं रूप अवंतीत  पाहते आणि त्यावेळी नानीला एक स्त्री म्हणून सुनेची कणव येते आणि खूप बदललंय असं वाटत असतानाच नानीला वाटतं छे! सारं काही तसंच आहे अजून.  समाज बदलतो, पण तो फक्त वरवर. त्याचा वेश बदलतो, खाद्य बदलते, जगण्याची तंत्रं बदलतात, पद्धत बदलते, वागणं बदलतं, प्रगतीच्या भुलभुलय्यात सारेच भरकटतात.  पण या ऑर्बिट च्या फेऱ्यात सापडलेलं मन काही बदललेलं नाही. माणसातल्या माणूसपणातली प्रगती काही माणसाला या तंत्रज्ञानाने अजूनही साधता आलेली नाहीच. 

रिमाचं आणि नानीचही एक सुंदर नातं आहे.  आजी आणि नातीचं नातं! पण या नात्यातही खूप बदललेले कंगोरे आहेत. रिमाच्या हुशारीने, दिसण्याने, चातुर्याने नानीचा उर एकीकडे मायेने भरून जातो तर कधी तिच्यातला फटकळपणा, ताडताडपणा,भाषा, बदललेला पेहराव बघताना नानी मनातल्या मनात धास्तावते.  तिसऱ्या नव्या पिढीचं प्रातिनिधिक स्वरूप तसं नानीच्या पचनी नाही अजून पडलेलं. 

एक दिवस नानी  रिमाला चुचकारत म्हणाली होती,” रिमा बेटा! अंधार पडायच्या आत घरी येत  जा ग! काळजी वाटते आणि हे बघ तू छानच दिसतेस पण इतका उघडेपणा कशाला हवा? झाकण्यातही अधिक सौंदर्य असतं.”

तेव्हां ती म्हणाली होती,

“आज्जी आजकालची फॅशन आहे ही! नाहीतर काकूबाईचं लेबल लागेल मला. आणि तुझी “सातच्या आत घरात” ही व्याख्या बदल बरं.  खूप मोठी स्वप्नं आहेत माझी आणि ती पुरी करण्यासाठी मला या वेळा कशा सांभाळता येतील? आज्जी यु आर द बेस्ट आज्जी इन द वर्ल्ड.  मी माझ्या मित्रांना, मैत्रिणींना नेहमी सांगते माझ्या आजीचे विचार खूप मॉड आहेत.  सो प्लीज नाऊ डोन्ट बी आउट डेटेड हं!”

“आउटडेटेड” नक्की काय असतं याचा कधीकधी नानी विचार करते, पेपरात वाचलेल्या, टीव्हीवर पाहिलेल्या, आजूबाजूला चर्चेत असणाऱ्या अनेक अत्याचाराच्या, बलात्काराच्या, आत्महत्येच्या, नैराश्याच्या, एकतर्फी हिंसक प्रेमाच्या, अपहरणाच्या,जिहादच्या, खुनाच्या बातम्या नानीला नक्कीच अस्वस्थ करतात.  कळीचं फुल बनत असलेल्या रिमाला बघताना उर धडकतोच. सोशल मीडियाचा वाढलेला राक्षस समाजाचा गळा दाबत आहे असंही नानीला वाटतं. या राक्षसाने चुकून आपल्या घराचं दार कधी ठोकलं तर?  नानी घाबरते. विलक्षण थरकाप होतो तिचा.  पण त्याचवेळी तिला हेही जाणवतं आपल्या आवाकाच्या बाहेर आहे हे सगळं आता. मग तिला धीर मिळतो तो घरातल्या देव्हाऱ्याचा.  निदान तो तरी आहे अजून, तिला माहित आहे, ना नमस्कार करायला कुणाला वेळ ना दिवा लावायला सवड. कधीतरी आठवण आल्यासारखे हात जोडायचे.  पण नानी मात्र त्या देवांशीच बोलते.  दिवा उजळवून त्यांची आरती करते. त्याच्याशी तिचा मूक ,अश्वासक संवाद घडतो.सुखाय,रक्षणाय.सर्वांच्याच.

अनेक चर्चा घडतात.  घटनांचं मंथन होतं. मतांची देवाण-घेवाण होते आणि शेवटी एकच निष्कर्ष असतो “कालाय तस्मै नमः”

सकाळी फिरताना नानीला डी बिल्डिंग मधले सरदेसाई ठराविक वेळेला भेटायचे. गेल्या कित्येक दिवसात ते दिसले नाहीत. बऱ्याच दिवसांनी नानीला त्यांची अनुपस्थिती जाणवली.  नानींना त्यांच्याविषयी एवढेच माहीत होतं की त्यांचं स्वतःचं वाकडेवाडीत घर होतं. एकटेच राहत होते.  पत्नीचे निधन काही वर्षांपूर्वी झालेले  होते.  पण एक दिवस उंबरठ्यावर पाय अडखळून ते पडले आणि मग त्यांच्या जीवनाचं तंत्रच बदललं. शेवटी मुलीने त्यांना तिच्या घरी आणले.  तेव्हापासून सरदेसाई या कॉम्प्लेक्सचे सदस्य होते.  पण काही दिवसापूर्वीच कळलं की आता ते कामशेतला वृद्धाश्रमात असतात. त्यावरूनही पोडियमवर चर्चा झाली.कारणमीमांसा झाली,बदलत्या कुटुंब संस्थेवर ओरखडे उमटले, आजकाल म्हाताऱ्या माणसांची जबाबदारी कोण घेतोय? वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं.  पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. “काळाची गरज” या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बरं… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

बरं… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

नानीचे एक बरं आहे ती कुणाच्या मध्ये बोलतच नाही. अद्यात मद्यात राहतच नाही.  तिला पटलं नाही, खूप खटकलं तरी सुद्धा ती कसला विरोध दर्शवत नाही.  “आमच्या वेळी हे असं काही नव्हतं बाबा! आम्ही असे वागलो असतो तर..” वगैरे अशी वयस्कर, परंपरा छाप वाक्यं ती कधीच मुखातून काढत नाही. अगदीच असह्य झालं तर ती तिच्या रूम मधल्या फ्रेंच विंडोपाशी जाऊन बसते आणि खिडकीतून दिसणाऱ्या मोकळ्या आभाळाकडे पहात राहते किंवा पोडियम वर जाऊन बागेतल्या एखाद्या बाकावर एकटीच बसते.  तिथे मुली असतात, मुलगे असतात मुला-मुलींचे घोळके असतात, त्यांचं जरा जास्तच मोकळं वागणं, हसणं बागडणं असतं.  ज्येष्ठ नागरिकही असतात. बागेचा एखादा कोपरा पुरुषांचा तर दुसरा बायकांचा.  नानी मात्र एकटीच बाकावर बसून राहते.  जगदाळे, पागे, येवलेकर झाल्यास तर त्या चंद्रपूरच्या तन्नीवार नानीला बोलावतात.  जाते कधी कधी नानी त्यांच्यात. पण मग त्यांच्या गॉसीप्स ऐकून तिचे कान किटतात.

कोणाची सून माहेरीच गेलेली असते, तर कुणाला बाईच्या हातच्या पोळ्याच आवडत नाहीत, कोणाचा मुलगा लग्नानंतर फारच बदललेला असतो, कोणी उशिरा उठतो, कुणी रात्रीचा लाईटच काढत नाही वेळेवर, एक ना अनेक.  पण थोडक्यात सगळ्याच तक्रारी. खाण्यावरून, कपड्यांवरून, खर्चावरून, रितीभातींवरून, सण साजरे करण्यावरुन,बोलण्यावरून, हसण्यावरून. नाराजी —नाराजी— फक्त नाराजी.

नानीला हे सारं नको असतं.  तिला अशा माणसांच्या घोळक्यातून कुठेतरी दूर जाऊन फक्त हे बदललेलं जग जरा बघायचं असतं.  अनुभवायचं असतं. कुठलंही मत तिला द्यायचं नसतं. तिची भूमिका एकच. फक्त वॉचमनची.

पण म्हणूनच नानीचा कुणाला त्रास नाही. सुनेला, मुलाला, नातीला— कुणालाच नाही. म्हणजे ती त्यांच्यातच असते. नानी खरंतर त्यांच्या जगात पूर्ण सामावलेली असते.पण तरीही अलीप्त असते.

“नानी आज मला ऑफिसातून यायला उशीर होईल.  माझं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर आम्हाला डिनर आहे. आणि रिमा मधुराकडे बर्थडे पार्टीला जाणार आहे. तिचं टीनेज संपल्याचं सेलिब्रेशन आहे बहुतेक आज.  राघवचं माहित नाही. तो येईल कदाचित घरी. पण तुम्ही त्याच्यासाठी जेवायला थांबू नका. तुम्हाला जे आवडेल ते मालतीबाईंकडून करून घ्या.”

सुनेच्या या लांबलचक ‘आजच्या अहवालावर’ नानी अगदी मनापासून म्हणते,

” बरं!”

हे “बरं” म्हणणं किती छान. वादच नाही. प्रत्येकाकडे घराच्या चाव्या असतातच. त्यामुळे दार उघडण्यासाठी वाट पाहत राहण्याची गरजही नसते. सारं किती सोप्पं! कुणाचा पाय कुणात अडकलेला नाही.  नानींना चुकारपणे वाटूनही गेलेलं असतं,” मग आज राघवच्या आवडीची गरमागरम कांद्याची छान तेल लावून खरपूस भाजलेली थालीपीठ आपणच का करू नये?”

पण नकोच. सुनेचं शासन बिघडायला नको.  तशी ती काही वाकड्यात नाहीच.  नानीलाच उगा या वयात त्रास होऊ नये हीच तिची भावना असते.  नानीला सगळं समजतं.  नानी उगीच फाटे फोडत नाही.

जग बदललं आहे हे खरंच आहे. खूपच बदललं. कुठच्या कुठे गेलं. वास्तविक नानी ही एका मध्यरेषेवर होती.जुन्या नव्याच्या,बदलत्या काळाच्या केंद्रबिंदुवर होती. जरी तिची जडणघडण एका मराठमोळ्या सुसंस्कृत कुटुंबात झाली होती तरी त्याही वेळेला तिच्या भोवतालचं वातावरण खूप बंधनकारक होतं असं नाहीच.  स्वतंत्र, स्वैर जरी नव्हतं तरी स्वतःची ओळख, अस्तित्व उमलणं यासाठी तेव्हाही ते पोषक होतं. मात्र फारसे जाचक नसले तरी काही शिस्तीचे नियम हे आपोआपच मनावर रुजलेले होते.  एक वेळापत्रक नक्कीच होतं. भिंतीवरच्या कॅलेंडरवर परंपरेची वर्तुळही आखलेली होती.  मग त्यात शुभंकरोती होतं, परवचा होत्या, नित्य नेमाचा अभ्यास होता, खेळणं किती, फिरणं किती, भटकणं किती, घरातलं वास्तव्य, भावंडांच्या कामाच्या वाटण्या आणि आयुष्य म्हणजे चांगलं भविष्य आणि भविष्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मेहनत या सर्वांचा एक अदृश्य आराखडा मनाशी बाळगलेलाच होता. मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यात इतकं काही जबरदस्त त्यावेळी बदललेलं नव्हतं.  म्हणजे त्याही वेळेस वेगळे, वेगळ्या पातळीवरचे सामाजिक स्तर   त्या त्या प्रमाणात होतेच पण नानीचं जीवन एका मधल्या धारेतलं होतं आणि याच आखलेल्या मार्गाने तिने तिच्या आयुष्याची इतकी मोठी वाटचाल केली होती.  आणि आताही मागेपुढे पाहताना त्यावेळच्या काही नसण्यावर, नाहींवर, त्रुटींवर तिला अजिबात खेद नव्हता.  नो रिग्रेट्स.

त्याही वेळेला ती एका नामांकित संस्थेत मोठ्या हुद्द्यावर स्वतःची प्रतिष्ठा सांभाळत होतीच की.  एकाच वेळी दोन्ही पद संतुलित पणे तिने सांभाळली. गृहिणी पद आणि संस्थेतलं जबाबदार पद.  तसे दोन्ही आघाड्यांवरती यशस्वी होती ती. पण कुठेच तिने मर्यादा सोडल्या नाहीत.अतिरेक,अवाजवीपणाच्या वाटेला ती गेली नाही. सासुबाईंसाठी सणावारी डोक्यावर पदर घेतला, वडाची पूजा केली, श्रावणी शनिवार, सोमवार पाळले. पितरांना जेवू घातलं. परंपरेच्या गर्भातले वैज्ञानिक अर्थ समजूनही तिने सारे काही बिन बोभाट पार पाडून सर्वांची मने राखली.  निदान तसा प्रयत्न नक्कीच केला.  उगीच किडूक मिडुक वादात ती पडलीच नाही.

ऐकूनही घेतलं. सासूबाई तरीही म्हणायच्या,” तुला वेळच कुठे असतो? तू तुझ्या ऑफिसच्या कामात? घर तुला नंतरच.”

नानीला काय वाईट नसेल वाटलं? पण उगीच स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत ती तेव्हाही पडलीच नाही. नानांनी सुद्धा  सगळं काही  स्वीकारलं नव्हतं. विरोध नव्हता म्हणजे संपूर्ण संमती असा अर्थ नसतो. नानांच्या कन्व्हेनशनल मनाला नानीच्या अनेक गोष्टी पटायच्या नाहीत. ज्या ज्या वेळी नानी काळाप्रमाणे बदलायचं ठरवत असे त्या त्या वेळी नानांना त्यांचा गतकाळ आठवायचा आणि त्या पुन्हा पुन्हा नानीची पावलं मागे खेचायचे. गैरसोयीच्या आयुष्याला उदात्तपणा आणण्याचा प्रयत्न करायचे. प्रेम होतच पण घर्षणंही खूप कचकचणारी  होती. नानीने केलं सहन. स्थैर्यासाठी. शेवटी काय? पिढीतले अंतर, संस्कृतीतील बदल हे काळाच्या पावला बरोबर अव्याहत सरकतच असतात, नाही का? आज आणि काल यातलं अंतर कधी मिटूच शकत नाही.  मग आज या मिडलाईन वर उभे असताना, बदललेलं जग बघताना इतकं भांबावून, बिथरून कां जायचं? कदाचित काल आणि आज मधलं अंतर जास्तच वाढलंय म्हणूनही असेल.

नक्की काय बदललं याचा विचार करताना नानीला गंमतच वाटते. त्यादिवशी राघवचं आणि सुनेचं काहीतरी बिनसलं होतं.  धुसफुस चालूच होती. कदाचित नानी आसपास असल्यामुळे भांडण वाजत नसावं.  पण जेव्हा जगाबरोबर नानी निद्रावस्थेत गेली तेव्हा तिला दारापलीकडून जोरजोरात उच्चारलेले शब्द ऐकू आले. 

– क्रमशः भाग पहिला  

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सोळावं वरीस धोक्याचं… – भाग-२ ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆सोळावं वरीस धोक्याचं… – भाग-२ ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

(“बघून घेईन मी तुझ्याकडे, आता बघच मी कसं तुला जाळ्यात अडकवतो ते !” आणि पाय आपटत तो गेला.) – इथून पुढे.

संध्याकाळी स्वप्ना आली ती तणफणतच. नुसती धुमसत होती ती. आता हिला काय झालंय! रागिणीला कळेना. तिच्याजवळ ती गेली तर स्वप्नानें तीचा हात झिड कारला. खोदून खोदून विचारल्यावर ती म्हणाली, ” रागिणी तू अशी असशील असं वाटलं नव्हतं. इतक्या दिवसाची दाट मैत्री आपली. मला कुणी जवळच नाही म्हणून तुला मी बहिण मानत होते पण आता मला घृणा वाटते तुझी. आपली मैत्री आज पासून संपली. तू मात्र केसांनी गळा कापलासं माझा. रागिणी सुन्न झाली. “अगं काय झालय काय, तुला? नीट सांग ना जरा. डोकं फिरलंय का तुझं ?” “ हो फिरलय माझं डोकं. आणि, ते तू, फिरवलस. हेवा करतेस ना तू माझा?बघवत नाही नां तुला माझं सुखं. ?माझं आणि संतोषच लग्न ठरलय. तो प्रेम करतो माझ्यावर आणि माझंही किती प्रेम आहे सगळं सांगितलं होतं मी तुला. आणि एवढं सगळं माहित असूनही तू त्याच्यावर प्रेमाचं जाळ टाकलसं. हेवा करतेस ना तू माझा? माझ्याबद्दल खोटंनाटं सांगून त्याला माझ्यापासून हिरावून घेण्याचा काल तू प्रयत्न केलास. सांगितलय संतोषनी सगळं मला. ” 

एवढी खंबीर रागिणी हे सारं ऐकून मटकन खालीच बसली. अखेर त्यांनी डाव साधला होता. आणि साधी भोळी स्वप्ना त्याच्या नाटकाला फसलीच म्हणायची. नंतर तिला कितीही समजावलं तरी हा तेढा सुटत नव्हता. उलट त्या मवाल्याबरोबर तिचं हिंडणं फिरणं वाढलंच होतं. आणि इकडे रागिणीच्या मनात प्रश्नांचा फेरा फिरत होता. काय करायचं आता? कसं या चिखलातून हिला बाहेर काढायचं ? तो नाटक्या प्रेमाचं नाटक करतोय. तो फसवेल तुला. आयुष्य बरबाद होईल तुझं आयुष्यभर रडायची वेळ येईल तुझ्यावर. पण नंतर काय उपयोग ?आता कसं सांगू हे सगळं मी तिला?आता आपणचं काहीतरी करायला हवंय. आपल्यासमोर एक भोळी भाबडी मुलगी, आपली मैत्रीण, बरबाद होईल. कारण चौकशी केल्यावर रागिणीला कळलं होतं की तो एक लफंगा आहे.. विचार करून रागिणीचं डोकं दुखायला लागलं. अखेर निर्धाराने ती रणरागिणी पेटून उठली. अनेक मुलींना फसवणाऱ्या या बदमाश्याला चांगलाच धडा शिकवायला हवा आहे.

एका जवळच्या ग्रुप मधल्या मैत्रिणीला विश्वासात घेऊन तिने सारा प्रकार सांगितला. पुढची सूत्र तिने भराभर हलवली. त्यांच्याच ग्रुप मधल्या त्या मैत्रिणीला संतोष बरोबर प्रेमाचं नाटक करायला सांगितलं. समाजात अशा नराधमांच्या कारस्थानाला भोळ्या भाबड्या मुली फसतात. आणि आयुष्यातून उठतात. त्यांना आपण वेळीचं वाचवायला हवय. आणि स्वप्ना तर आपली जवळची मैत्रीण. हीच वेळ आहे तिला सांवरायची. या विचाराने झपाटलेल्या त्या दोघींनी प्लॅन आखला, आणि तो सक्सेसही झाला. सभ्यतेचा बुरखा फाडल्यावर संतोषचं खरं रूप समोर आलं. त्याचं पितळ, उघडं पडलं. पुराव्यानिशी संतोष, स्वप्नासमोर पकडला गेला. अशा मवाल्यावर प्रेम करणाऱ्या, साध्या सरळ अशा स्वप्नांसाठी हा धक्का प्रचंड होता. निराशेच्या खोल खोल गर्तेत ती इतकी रुतली की आयुष्य संपवण्याच्या मागे लागली. आणि इतका वेळ या नाटकाच्या पडद्याकडून काम करणारी रागिणी पुढे झाली. आपल्या या मैत्रिणीं च्या साधेपणाची, दुबळेपणाची तिला भयंकर चीड आली. संताप आंवरत स्वप्नाला सावरत ती म्हणाली, “मूर्ख आहेस का तु ? अशा नालायक माणसासाठी तू आत्महत्या करायला निघालीस? लांडग्यांच्या कळपात. सापडली होतीस तू. इतकं भोळसट राहून नाही चालत. कळलं ना तुला आता. ? तो कसा हैवान आहे ते. त्याच्या नजरेतला विखार मी पहिल्या दिवशीच ओळखला होता. तुझ्या आधी अनेक मुलींना त्यानी बरबाद केलेलं आहे. शंका आल्यावर मी पूर्ण माहिती काढली. मूर्खपणामुळे तु माझ्यावरच अविश्वास दाखवलास. ” 

स्वप्ना म्हणाली, ” सॉरी फारच चुकलं गं माझं ! माफ कर नां मला. पण सांग ना! मी आता काय करू?मला मला आता जगावसंच वाटत नाहीये. तिला आधार देत ती रणरागिणी म्हणाली, “आधी हा बावळटपणा भोळसटपणा सोड. आणि माणसं ओळखायला शिक. नशीब थोडक्यावर निभावलं, नाही तर हे प्रकरण कुठल्या कुठे गेलं असत. वेळीच सावध झालीस, नशीब समज. सोळावं वर्ष धोक्याचं मोहमयी असतं पण ती धोक्याची वाट ओळखता आली पाहिजे. नाहीतर आयुष्याची माती होते. आणि काय ग! रडतेस कशाला ? आपले मोलाचे अश्रू आणि मोलाच् आयुष्य अशा लफग्यांसाठी आपण मातीमोल नाही करायचं. त्या पळपुट्या मवाल्यासाठी जीव द्यायला निघालीस. तो किती नालायक आहे हे समजलं ना तुला ? पुस ते डोळे. तू गुन्हेगार नाहीसचं. आयुष्यात कधीतरी वाकड्या वाटा येतातच पण त्या ओळखून, पुढच् आयुष्य ‘ जशास तसं ‘ वागून जगायचं असतं. वाईटाबरोबर चांगली माणसेही, अगदी आपल्यावरून जीव ओवाळून टाकणारी माणसेही, जगात असतात. ते ओळखण्याची नजर मात्र आपल्याजवळ हवी. मी आहे तुझ्या पाठीशी त्या संतोषला चांगला धडा शिकवू आपण. अशी अद्दल घडऊ की इतर मुली तरी त्याच्या तावडीतून वाचतील. ” मैत्रीची पकड घट्ट करीत स्वप्ना म्हणाली,

“पण तूच सांग, आता मी काय करू ?, तिला अडवत रागिणीने मागची आठवण करून दिली. “संतोषच्या प्रेमाने आंधळी झाली होतीस. त्यावेळी तू कौतुकाने सांगत होतीस संतोष नेहमी म्हणतो ‘तुझा आवाज चांगला आहे ‘ म्हणून. आता तू त्याच्याविरुद्धच आवाज उठव. तुला भीती वाटते ना! तो तुझ्याशी गुंडगिरी करेल की काय म्हणून, परत तो तुझ्या वाटेला गेला तर कानाखाली आवाज काढ त्याच्या. अशी घाबरू नकोस. आपण आता कराटेचा क्लास लावूया. तुझा गेलेला आत्मविश्वास परत आणायचाय“ 

आपल्याला. मैत्रिणीचा भरभक्कम आधार मिळाल्यावर कोलमडलेली स्वप्ना खंबीरपणे उभी राहिली. भोळ्या भाबड्या मैत्रिणींना मोहनगरीतून सावरायला रणरागिणीच्या मदतीने तिला सज्ज व्हायलाच हवं होतं. आणि मग मैत्रिणींच्या भरभक्कम आधाराने ती निर्धाराने उठली. अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी तिला आता दुबळेपणा टाकून लढायचं होत. आणि मग त्यांच्या मैत्रीचा धागा अगदी पूर्वीसारखा घट्ट झाला.

अगदी घट्ट. अशा जीवाला जीव देणाऱ्या वेळीच सावरणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या, मैत्रिणीची मैत्रीची साथ प्रत्येकीलाच मिळायला हवी आहे, नाही का ! मग त्या एकजुटीनी अबला नक्कीच सबला होतील हॊ नां!

– समाप्त – 

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सोळावं वरीस धोक्याचं… – भाग-१ ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆सोळावं वरीस धोक्याचं… – भाग-१ ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

त्या दोघींची अगदी आदर्श अशी दाट मैत्री होती. अगदी जीवश्च कंठश्चतेच प्रतीक असलेली त्यांची मैत्री कशी जमली असेल बाई? हे बघणाऱ्याला अगदी कोडचं होतं. कारण दोघींचे स्वभाव म्हणजे दोन टोकं,एक उत्तर ध्रुव तर दुसरी दक्षिण ध्रुव.रागिणी नांवाप्रमाणे रणरागिणी   गुंडांना पाणी पाजणारी ..तर स्वप्ना, टोमणे मारणाऱ्या गुंडां पुढे थरथर कापणारी सशाच पिल्लू  व्हायची.आणि आपलेच मोलाचे अश्रू सांडणारी भित्री भागुबाईअशी ही रडूबाई, नावाप्रमाणेचं स्वप्नवेडी, आभासी दुनियेत जगणारी होती. सिनेमा पहाणं हा तिचा आवडता छंद. त्यातला हिरो तिला आपलाच प्रियकर वाटायचा. आणि हिरॉईनच्या जागी तिला आपली स्वतःची छबी दिसायची.टवाळखोर मैत्रिणीं टिंगल करायला लागल्या की मग बाईसाहेब मुळू मुळू रडायच्या.अशावेळी    रागिणी तिची ढाल होऊन म्हणायची, “ए लाज नाही वाटत,माझ्या मैत्रीणी ची टिंगल करायला? स्वप्न तिच्या सारख्या सुंदर मुलीनी नाही पाह्यची तर काय तुमच्यासारख्या काळतोंड्यांनी  पाह्यची का ?  आरशात तुमचं खापर तोंड बघा आधी. निघाल्यात मोठ्या शहाण्या, दुसऱ्यावर तोंडसुख घेणाऱ्या.  मग तिची तोफ स्वप्नाकडे वळायची. आणि तिला ती डाफरायची ,” रडतेस काय अशी नेहमी नेहमी नेभळटा सारखी ? तिच्या दमदार धमकीनी त्या कृष्णवर्ण टवाळ पोरी तोंड लपवून पसार व्हायच्या.टिंगल करणाऱ्या पोरींची ही कथा.तर मवाल्यांची क्या बात ? सांगायचं कारण म्हणजे आपल्या भाबड्या मैत्रिणीच्या मागे सतत रागिणी सांवलीसारखी उभी असायची.दोघींच्यात कुठलंच गुपित नसायचं. रूम मेट होत्या ना त्या दोघीजणी ! रात्री अंथरूणावर पडल्यावर स्वप्नाची टकळी सुरू व्हायची. इतरांपुढे अबोल असणारी ही अबोली रागिणीजवळ बोलकी व्हायची. पण हल्ली काय झालय कोण जाणे,!स्वप्ना  अंतर्मुख  झाली होती. काहीतरी कुठेतरी पाणी मुरतं होतं.आपल्यापासून स्वप्ना काहीतरी लपवतीय.      

हे आणि उशिरापर्यंत चाललेलं तिचं, बाहेर राहणं, फिरणं फार खटकलं रागिणीला. नंतर मग, काहीं काहीं गोष्टी उडत उडत कानावर आल्या.स्वप्ना एका मुलाबरोबर हिंडत असते. तिचं म्हणे अफेअर चालू आहे.सांगणाराच थोबाड रंगवावस वाटलं होतं रागिणीला.पण त्याआधी सोक्षमोक्ष लावावा म्हणून तिने स्वप्नालाच खोदून खोदून विचारलं. खनपटीलाचं  बसल्यावर ती कबूल झाली, ” हो संतोष बरोबर  फिरणं चालू आहे माझं. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर.खूप चांगला मुलगा आहे तो. नुसतं फिरवणार नाही तो मला, तर लग्न करणार आहे तो माझ्याशी. गांवाकडे नातेवाईक आहेत त्याचे. ईथे अगदी एकटा आणि नवखा आहे गं तो.तिचं कौतुक ऐकून रागिणी फणकारली, “अगं पण त्याची बाकीची चौकशी केलीस का तू ?मूर्खासारखी निघालीस लग्न करायला ? आई-बाबा नाहीयेत तुझे.,पण दादाला तर विचार.  फसलीस  म्हणजे ?”. “नाही ग ! नाही! नाही फसवणार तो मला. खूप साधा , सरळ मुलगा आहे तो.त्याच्याशी लग्न करून मी सुखात राहीन. लग्न करीन तर त्याच्याशीच असंच  ठरवलंय मी. आता नोकरी साधी आहे त्याची,पण नंतर होईल सगळं ठीक. मला कोणी जवळचे मायेचे नातेवाईक नाहीत .तोही बिचारा एकाकीच  आहे.आणि त्यातून गरिबी पण आहे त्याची. काही वेळेला खर्चायला  हॉटेलसाठी पैसे पण नसतात त्याच्याजवळ. अशावेळी त्याचा हॉटेलचा खाण्यापिण्याचा  खर्च मीच करते. डोळ्यात पाणी आणून तो म्हणतो,” सपना मेरी सपनोंकी रानी, धीर धर, काही दिवसांनी मी खोऱ्यानी पैसा ओढीन , आणि लग्नानंतर तुला राणी सारखी सुखात ठेवीन. ” हे सगळं  आपल्या मैत्रिणीला रागिणीला, भाबडी स्वप्ना भडाभडा सांगत सुटली होती.  तिच्या बोलण्याचा धबधबा थांबवत रागिणी म्हणाली, ” मला एक सांग  खर्चायला एवढा पैसा तू आणतेस कुठून ? अय्या ! सांगायचं राहिलंच की तुला. संतोषला मी पहिल्या भेटीतच सांगून टाकलंय आई बाबा एक्सीडेंट मध्ये गेलेत माझे. निम्मी   इस्टेट माझ्या नावावर आहे. खर्चाचं   विचारणार कोणीच नाही मला. दादा वहिनीनी तर माझ नांवच टाकलय.संतोषला हे सगळं मी खुल्लम खुल्ला सांगून टाकल. तेव्हां तो म्हणाला, ” वाईट वाटून घेऊ नकोस मी आहे ना तुला.! मला आई बाबा नाहीत, दादा लक्ष देत नाही हे कळल्या पासून जरा जास्तच प्रेम करतोय तो माझ्यावर. माझ्या मनीचा राजकुमार आहे गं तो “. हे सगळं ऐकतांना रागिणीच्या मनात आलं हे वेडं पांखरू कुणा पारध्याच्या जाळ्यात तर अडकणार नाही ना,! तिची शंका खरी ठरली. कारण रागिणी तिला म्हणाली होती,” अगं मग तुझा राजकुमार दाखव ना मला.”

ठरल्याप्रमाणे संतोष ची गांठभेट झाली. खरचं  नावाप्रमाणे राजकुमार होता तो.रागिणी समोर त्याचं स्वप्नावरच प्रेम उतू चालल होत. पण त्यात नाटकीपणा जास्त वाटत होता. आणि त्याची नजर ! त्या नजरेत कोल्ह्याची लबाडी भासली रागिणीला. फुलपांखरासारखी मुलींवरून भिरभिरणारी त्याची नजर नाही आवडली तिला . का कोण जाणे तिला  आठवेना,पण जाणवत होतं,आपण हयाला कुठेतरी पाह्यलंय. विचारात गर्क असलेल्या तिला हलवत, स्वप्ना चिंवचिवली, ” ए कुठे हरवलीस ?  माझ्या राजकुमाराला पाहून भारावलीस कीं काय? आहेच मुळे  तो हँडसम.नंतर मात्र रागिणी गप्पच होती. आपली मैत्रीण फसवली तर जाणार नाही ना ? या विचाराने ती बैचेन झाली होती. संतोषच्या नजरेतला विखार तिला अस्वस्थ करीत होता.

दुसऱ्या दिवशी तर कहर झाला.स्वप्ना नसतांना तो रूमवर आला. आत येण्या आधीच तिने त्याला सांगितलं, ” स्वप्ना नाहीय्ये घरात.” निर्लज्जपणे  आत येत तो म्हणाला,” ते माहीत होतं म्हणूनचं तर मी आलोय. फक्त तुझ्यासाठी.काल तुला पाह्यलं आणि मी वेडा झालो. तुझी आणि माझी आधीच भेट व्हायला पाहिजे होती, स्वप्नापेक्षाही तूच आवडलीस मला, पण अजूनही वेळ गेली नाही. काही हरकत नाही अजूनही मैत्री वाढवूया आपण.” रागिणी  चवताळलीच., ” निर्लज्ज माणसा! लग्न करणार आहेस नां तू स्वप्नाशी?तिचं प्रेम आहे तुझ्यावर”.  छदमीपणे  हंसत तो म्हणाला, ” प्रेम ? आणि लग्न ? अशा बावळट मुलीशी कोण करेल लग्न?  खूप मुलीं गळ्यात पडतात माझ्या . टाईमपास बरा असतो.म्हणून काय प्रत्येकीशी मी लग्न करू की काय?

आता मात्र रागिणी रणरागिणी झाली.धक्के मारून तिने त्याला घराबाहेर काढलं. विषारी सापाच्या शेपटीवर तिने पाय दिला होता. शेजारी गोळा झाले. सगळ्यांसमोर तमाशा झाला होता.नक्की काय झालं कुणालाच कळलं नव्हतं.जातांना तो फिस्कारला, ” बघून घेईन मी तुझ्याकडे,आता बघच मी कसं तुला जाळ्यात अडकवतो ते!” आणि पाय आपटत तो गेला.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा – बक्षिसी… / चांगला पर्याय – A better option ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

दोन लघुकथा – बक्षिसी… / चांगला पर्याय – A better option श्री मकरंद पिंपुटकर

(१) बक्षिसी…

सकाळची वेळ. सुषमा आपली गावातल्या घराच्या व्हरांड्यात नुकती कुठे बसत होती.

तिचे गेले दोन चार दिवस खूपच धावपळीचे गेले होते. अगदी घोटभर चहाही गळ्याखाली उतरला नव्हता दोन दिवसांत.

पण आता सगळीच धावपळ संपली होती, शांत झाली होती.

सकाळची वेळ होती. दिवसाचा पहिला चहा करून सुषमाने आपल्या सासूला दिला, आणि व्हरांड्यात बसून, स्वतः पहिला घोट घेणार, एवढ्यात दारासमोर रिक्षा थांबली. आणि त्यातून उतरणारी शम्मो, कम्मो, राजो, राणी आदि तृतीयपंथींना बघून सुषमाला पुढे काय होणार ते तिला उमगलं.

साठ एक वर्षांची राणी त्यांची म्होरक्या – सगळ्यात पुढे होती.

“कुठं आहे आमची नवी सून ? हाय दैय्या, अजून बेडरूममध्येच आहे का ? आणा, आणा तिला बाहेर. तिला आशिर्वाद द्यायचे आहेत आणि आमची बक्षिसी घ्यायची आहे, ” घुंगरू मागवत राणीची वटवट सुरू झाली.

“सूनबाई नाहीये इथे, ” तिला मध्येच थांबवत सुषमा शांतपणे म्हणाली.

“ओ हो, हनीमूनला गेले का ? कुठे गेले – गोवा का काश्मीर का लक्षद्वीपला ? आणि परत कधी येणार ? आम्हाला सांगा, आम्ही तेव्हा परत येऊ, ” राणीची टकळी लगेच नव्या ट्रॅकवर सुरू झाली.

“नाही, ते परत येण्यासाठी नाही गेले. ते वेगळे झाले. ते दुसऱ्या नव्या घरात राहायला गेले. ” सुषमा.

“आं, ते का बुवा ?” 

कधी नव्हे ते राणीला पुढं काय बोलावं ते सुचेना.

“तू यांना ओळखतेस ना ?” व्हीलचेअरवर बसलेल्या आपल्या सासूकडे बोट दाखवत सुषमाने विचारलं.

“म्हणजे काय ? तू लग्न होऊन इथे आलीस तेव्हा तुझी बक्षिसी घ्यायला मीच आले होते की. त्याच्या आधीपासून ओळखते मी तुझ्या सासूला. ” राणी म्हणाली, पण काय चालले आहे याचा तिला अजून उलगडा होत नव्हता.

“आमच्या नव्या सूनेला माझ्या या सासूबाईंची अडचण होत होती. तिला घरात ही अशी dustbins नको होती. तिचं माझ्या लेकाशी आधीच बोलणं झालं होतं म्हणे. त्याला तिचं म्हणणं मान्य होतं, पण आम्हा दोघींना सांगायची हिंमत झाली नव्हती.

लग्नाचे विधी पार पाडून वरात घरी आली, पाहुणेरावणे काल गेले आणि संध्याकाळीच हे दोघेही नव्या घरात शिफ्ट झाले.

मला म्हणत होती तूही ये म्हणून. पण मी काही सासूबाईंना सोडून गेले नाही. ते त्यांच्या घरात सुखी आहेत, मी माझ्या घरी. “

मंद हसत राणीने घुंगरू पायात बांधायला सुरुवात केली, सुषमा हैराण झाली.

“अग, हे एवढं रामायण ऐकूनही तू नाचणार आहेस ?”

“हो तर. बक्षिसी घ्यायला आली आहे, बक्षिसी घेऊनच जाणार. वर्षानुवर्षे नव्या सुनेसाठी बक्षिसी घेते, आज पहिल्यांदाच, सासूला जपणाऱ्या अशा सुनेबद्दल तिच्या सासूकडून बक्षिसी घेईन. काय आज्जी ?” व्हीलचेअरवरच्या आजींकडे सहेतुकपणे पहात राणी म्हणाली.

दिलखुलास हसत, आजीबाईंनी आपल्या बटव्यातून पाचशेची नोट काढली, राणीला दिली.

राणीने सुषमावरून ती नोट ओवाळली, तिची अलबला काढली. ते पाचशे रुपये कम्मोला दिले. आपल्या पर्समधून एकशे एक रुपये काढून तिनं सुषमाला दिले, म्हणाली, “हे माझ्याकडून बक्षीस तुला. तू नेक काम करते आहेस. सुखी रहा. “

आणि मग मंडळींनी घुंगरू बांधले, ढोल वाजू लागले, आणि राणी, शब्बो, कम्मो, राजो – सगळ्याच जणी बेभान होऊन नाचल्या, नाचतच राहिल्या.

लेखक : श्री मकरंद पिंपुटकर 

= = = = = =

(२) चांगला पर्याय – a better option

नोकरीतील कामासाठी मला दर आठवड्याला एकेकदा पुण्याहून सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जावे लागायचे, रात्री घरी परत.

खेड शिवापूरच्या ठरलेल्या धाब्यावर जेवण व्हायचं. इतक्या वर्षांच्या वेगवेगळ्या trial and error नंतर आता जेवणाचा मेनू ठरलेला आहे. पापड, ३ पोळ्या, रायता, दाल तडका, दही, आणि गोड म्हणून श्रीखंड वाटी.

सवयीने टेबलही ठरलेले आहे, “काय हवं ?” विचारायला येणारा वेटरही ठरलेला आहे. आताशा तर तो काय हवं हे विचारतही नाही. मी आलो की पापड आणून ठेवतो, आणि मग बाकीचं जेवण.

कालही तसंच झालं. मी माझ्या नेहमीच्या टेबलावर बसलो, पण माझा नेहमीचा वेटर दिसत नव्हता, पण दोन मिनिटात एक तरुण पोरगं आलं, “ते शंकरभाऊंना बरं नाहीये, आज रजेवर आहेत ते. “

अच्छा, म्हणजे, माझ्या अन्नदात्याचं नाव शंकर होतं तर. “बरं मग, तुझं नाव काय आहे ?” 

“सचिन, सर. “

काळा सावळा, तरतरीत, चापून चोपून पाडलेला भांग, कॉलरशी झिजलेला, थोडा चुरगळलेला पण स्वच्छ हाफ शर्ट, पायात चपला.

“बरं, सचिन, असं कर, मला एक पापड… ” मी सांगायला सुरुवात करत होतो, तेवढ्यात मला हाताने थांबवत तो म्हणाला, “माहिती आहे, सर. २ पोळ्या, रायता, दाल तडका, दही, श्रीखंड. ” 

“अरे व्वा, गृहपाठ झाला आहे तर. ठाऊक आहे तर मग आण लवकर, मित्रा, पोटात कावळे कोकलत आहेत. “

तो थबकला, म्हणाला, “सर, हरकत नसेल तर एक better option सुचवू ?”

“बोला, काय better option सांगताय ?” मला रूटीन बदलायला आवडत नाही. आणि एका वेटरच्या सांगण्यावरून तर नाहीच नाही. पण एकदम काहीतरी खवचटपणे बोलणं योग्य वाटलं नाही मला.

“सर, तुम्ही त्यापेक्षा आमची veg थाळी घेता का ? दोन पोळ्या, दोन भाज्या, दाल तडका, भात, रायता, दही, खीर, पापड अशी थाळी असते. तुम्हाला भात नको असेल तर त्या ऐवजी एक पोळी extra घेता येईल सर, किंवा एक भाजी कमी करून extra पोळी घेता येईल आणि तुमच्या नेहमीच्या बिलापेक्षा २०% कमी बिल होईल, सर. ” त्यानं सांगितलं.

मी मेनू कार्ड पाहिलं. तो बरोबर सांगत होता.

मला आश्चर्याचे एका पाठोपाठ एक धक्के बसत होते.

एकतर तो माझ्या टेबलवर कधीच आला नव्हता, तरीही मला काय हवं ते त्याला ठाऊक होतं. Better option म्हणण्याइतकं त्याला इंग्रजी येत होतं, बोलताना नम्रपणे बोलत होता, भाताऐवजी अथवा भाजीऐवजी पोळी देण्याची मॅनेजमेंट त्याला उमगत होती, आणि तो टक्केवारीची गणितं तोंडी करू शकत होता.

“तू काय करतोस ?” मी त्याला विचारता झालो.

“सर, इथे वेटर आहे, ” काहीसं गोंधळून तो म्हणाला.

“नाही, नाही. त्याव्यतिरिक्त काय करतोस ?”

“दिवसा एमपीएससी ची तयारी करतो, सर. रात्रपाळीच्या नोकरीचे दोन पैसे जास्त मिळतात, आणि निवांतपणा असला तर दोन पुस्तकंही वाचता येतात. ” आत्मविश्वासानं तो म्हणाला.

“मित्रा, better option च घेऊन ये. “

जेवण झालं, छान होतं. बिल घेऊन सचिन आला. मी बिल दिलं, पण आज मी टिप नाही ठेवली.

याच्यासाठी पैश्यांची टिप महत्त्वाची नव्हती.

माझ्या खिशाला पार्करचं चांगलं पेन होतं. मी ते खिशातून काढलं, आणि त्याच्या खिशात ते ठेवलं. “तुला सह्या करण्यासाठी, ” मी म्हटलं.

त्याचे डोळे लकाकले.

सगळी सुखं हात जोडून उभी असतानाही बहाणेबाजी करणारी एक जमात आहे, आणि गरीबी पाचवीला पूजली असताना, पोट हातावर असताना, नशिबाला दोष न देता, मेहनतीने better option शोधणारा एक वर्ग आहे.

सचिन या दुसऱ्या वर्गातला आहे. दिवसा अभ्यासाने स्वप्नांची दुनिया सजवत आहे, रात्री मेहनत करून सध्याच्या दुनियेत जगण्याची तजवीज करत आहे.

आणि सचिन नक्की जिंकणार, कारण याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाहीये, आणि जिंकण्यासाठी अख्खी दुनिया.

मी उद्याच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला एक पेन भेट म्हणून दिलं आले.

परिस्थितीबद्दल रडगाणं गाण्यापेक्षा, ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हाच better option आहे.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print