मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ४ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ४ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले – महामूद आणखी जोर लावत म्हणाला, ‘वकील साहेब टेबल –खुर्चीवर बसतील. तुझा चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार?‘

या तर्काने सम्मी आणि नूरेच्या जसा जीवात जीव आला. किती योग्य बोललाय पठ्ठ्या! चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार? ‘ आता इथून पुढे )

हमीदला यावर पटकन उत्तर सुचलं नाही. त्याने गडबबड गोंधळ करत म्हंटलं’ माझा चिमटा स्वयंपाकघरात नाही पडून रहाणार. तो वकीलसाहेबांच्या खुर्चीवर बसेल. जाऊन त्यांना जमिनीवर पाडेल. आणि त्यांचा कायदा त्यांच्याच पोटात घालेल. ‘

इतरांना पुढे बोलणं काही जमलं नाही. चांगली शिवीगाळ झाली.पण कायदा पोटात घालण्याची गोष्ट भाव खाऊन गेली. अशी भाव खाऊन गेली की तिघेही योद्धे तोंड बघू लागलेज्सन काही आठ आण्याचा मोठा पतंग एखाद्या साध्याशा पाटांगाला काटून गेलाय. कायदा ही तोंडातून बाहेर येणारी गोष्ट आहे. ती पोटात घालण्यात विसंगती असली तरी त्यात काही तरी नावीन्य होतं. हमीदने मैदान मारलं. त्याचा चिमटा रुस्तुमे – हिंद आहे, याबद्दल सम्मी, नूरे मोहसीन, महामूद यांची खात्रीच झाली. विजेत्याला हरणार्‍यांकडून जो सन्मान मिळणं अपेक्षित असतं, तो हमीदला मिळाला॰ इतरांनी तीन तीन –चार चार आणे खर्च केले, पण कोणती कामाची गोष्ट आणू शकले नाहीत. हमीदने तीन पैशात रंग जमवला. खरच आहे! खेळणी तुटून फुटून जातील. त्यांचा काय भरवसा? हमीदचा चिमटा वर्षानुवर्षे टिकून राहील.

तडजोडीच्या अटी तयार होऊ लागल्या. मोहसीन म्हणाला, जरा तुझा चिमटा दे. आम्ही पण बघतो. तू माझा पाणक्या घेऊन बघ.‘

महामूद आणि नूरेनेही आपापली  खेळणी दिली.

हमीदला ही अट स्वीकारण्यात काही अडचण वाटली नाही. चिमटा आळीपाळीने सगळ्यांच्या हातात गेला. त्यांची खेळणी आळीपाळीने हमीदकडे आली. किती सुरेख खेळणी आहेत!

हमीदने हरणार्‍यांचे अश्रू पुसले. ‘मी तुम्हाला चिडवत होतो. खरं म्हणजे लोखंडाचा चिमटा काय या खेळण्यांची बरोबरी करणार. मला वाटत होतं, आता म्हणाल…. मग म्हणाल ….’

पण मोहसीनच्या पार्टीला या दिलाशाने संतोष झाला नाही. चिमाट्याचा शिक्का पक्का बसला. चिकटलेलं तिकीट आता पाण्याने निघणार नाही.

मोहसीन म्हणाला, ‘पण या खेळण्यांसाठी कोणी आम्हाला दुआ ( आशीर्वाद) देणार नाही.

महामूद म्हणाला, ‘दुआ जाऊ देत, उलटा मार पडला नाही, म्हणजे मिळवलं. अम्मा म्हणेल, ‘जत्रेत तुला मातीचीच खेळणी मिळाली का?

हमीदला ही गोष्ट मान्य करावीच लागली. चिमटा पाहून त्याची दादी जितकी खूश होईल, तितकी या मुलांची खेळणी बघून कोणीच खूश होणार नाही. तीन पैशातच त्याला सगळं काही करायचं होतं आणि त्याने पैशाचा जो उपयोग केला, त्यात पश्चात्तापाची मुळीच गरज नव्हती. आता तो चिमटा रुस्तुमे-हिंद होता आणि सगळ्या खेळण्यांचा बादशहा होता.

रस्त्यात महमूदला भूक लागली.त्याच्या बापाने केळ खायला दिलं. महमूदने केवळ हमीदला भागीदार बनवलं. त्याचे बाकीचे मित्र तोंड बघत बसले. हा त्या चिमाट्याचा परिणाम होता.

अकरा वाजले. सगळ्या गावात गडबड सुरू झाली. मेळेवाले आले. …. मेळेवाले आले… मोहसींच्या छोट्या बहिणीने पळत येऊन पाणक्या त्याच्या हातातून ओढून घेतला. खुशीने टी उद्या मारू आगळी. , तर तो पाणक्या हाली कोसळला आणि स्वर्गलोकात पोहोचला. यावर भावा-बहिणीच्यात खूप मारामारी झाली. दोघेही खूप रडली. त्यांची अम्मा हा आरडाओरडा ऐकून खूप चिडली आणीदोघांनाही दोन दोन थपड्या लगावल्या.

नूरेच्या वकिलाचा अंत त्याला साजेशा प्रतिष्ठेने अधीक गौरवपूर्ण रीतीने झाला. वकील जमिनीवर किंवा कोनाड्यात बसू शकत नाही. त्याच्या प्रतिष्ठेचा विचार करायला हवा. भिंतीत दोन खुंटया मारल्या गेल्या. त्यावर एक लाकडी फळी ठेवली गेली. त्यावर कागदाचा गालीचा  घातला गेला. वकीलसाहेब राजा भोजाप्रमाणे सिंहासनावर विराजमान झाले. नूरे त्यांना पंख्याने वारा घालू लागला. न्यायालयात वाळ्याचे पडदे आणि विजेचे पंखे असतात. इथे साधा पंखा तरी नको? कायद्याची गर्मी डोक्यावर चढेल की नाही?  नूरे त्यांना वारा घालू लागला. पंख्याच्या वार्‍याने की, त्याच्या स्पर्शाने वकीलसाहेब स्वर्गलोकातून मृत्यूलोकात आले आणि त्यांचा मातीचा अंगरखा मातीत मिळाला.मग जोरजोरात मृत्यूशोक झाला आणि वकीलसाहेबांच्या अस्थी उकिरड्यावर टाकल्या गेल्या.

आता राहिला महमूदचा शिपाई. त्याला लगेचच गावाचा पहारा देण्याचा चार्ज मिळाला, पण पोलीस शिपाई ही काही साधारण व्यक्ती नाही. ती आपल्या पायांनी काशी चालणार?तो पालखीतून जाणार. एक टोपली आणण्यात आली. त्यात फाटक्या-तुटक्या चिंध्या घालण्यात आल्या. त्यात शिपाईसाहेब आरामात पहुडले. नूरेने ही टोपली उचलली आणि आपल्या दाराशी चकरा मारू लागला. त्याचे दोन्ही छोटे भाऊ ‘छोनेवाले जागते लहो’ पुकारत दोन्ही बाजूने चालले. पण पहारा द्यायचा म्हणजे रात्रीचा अंधार पाहिजे. महमूदला ठोकर लागते. टोपली त्याच्या हातातून सुटते आणि खाली पडते. मियाँ शिपाई आपली बंदूक घेऊन जमिनीवर येतात. त्यांचा एक पाय तुटतो. महमूदला आठवलं की, तो चांगला डॉक्टर आहे. त्याला मलम मिळालं. आता तो तुटलेली टांग लगेचच जोडून टाकेल. केवळ उंबराचं दूध हवं. उंबराचं दूध येतं. पाय जोडण्यात येतो, पण शिपायाला उभं करताच पाय डोलू लागतो. शल्यक्रिया असफल झाली. मग त्याचा दुसरा पायही मोडण्यात येतो. आता निदान एका जागीतो आरामात बसू तरी शकेल. एका पायाने तो बसू शकत नव्हता, चालूही शकत नव्हता. आता तो शिपाई संन्याशी झालाय. आपल्या जागी बसल्या बसल्या पहारा देतोय. कधी कधी तो देवता बनतो. त्याच्या डोक्यावरचा झालरदार साफा आता खरवडून काढून टाकलाय. आता त्याचं हव्या त्या प्रकारे रूपांतर करणं शक्य होतं. कधी कधी त्याच्याकडून वरवंट्याचंसुद्धा काम करून घेतलं जातं.

आता मीयाँ हमीदची परिस्थिती काय झाली, ते ऐका. अमीना त्याचा आवाज ऐकताच पळत पळत बाहेर आली आणि त्याला कडेवर ऊचलून त्याच्यावर प्रेम करू लागली. सहजच त्याच्या हातात चिमटा तिने पाहिला आणि ती चकित झाली.

‘हा चिमटा कुठे होता?’

‘मी तो विकत आणलाय.’

‘किती पैशाला?’

‘तीन पैसे दिले.’

अमीनाने छाती बडावून घेतली. हा कसला मुलगा आहे. असमंजस. दोन प्रहार होत आले. काही खाल्लं नाही प्याला नाही.आणलं काय , तर हा चिमटा. सगळ्या जत्रेत तुला आणखी काही मिळालं नाही, हा लोखंडाचा चिमटा उचलून आणलास ते?

हमीदने अपराधी स्वरात म्हंटलं, ‘तुझी बोटं तव्यामुळे भाजत होती ना, म्हणून मी हा चिमटा आणला.

म्हातारीचा राग लगेच मायेत बदलला. आणि स्नेहदेखील असा तसा नाही, जो प्रगल्भ असतो आणि आपली सारी तीव्रता शब्दातून विखरून टाकतो. हा मूक स्नेह होता. खूप ठोस, रस आणि स्वादाने भरलेला. मुलामध्ये किती त्याग, किती सद्भाव आणि किती विवेक आहे. इतरांना खेळणी घेताना आणि मिठाई खताना बघून त्याचं मन किती लालचावलं असेल! इतका संयम, इतकी सहनशीलता त्याच्याकडे आली कुठून? तिथेदेखील त्याला आपल्या म्हातार्‍या आजीची आठवण झाली. अमीनाचं मन गदगदून गेलं.

आणि आता एक अगदी विचत्र गोष्ट घडली. हमीदच्या या चिमाट्यापेक्षाही विचत्र. छोट्या हमीदने म्हातार्‍या हमीदचा पार्ट खेळला होता आणि म्हातारी अमिना बालिका अमीना झाली होती. ती रडू लागली. पदर पसरून हमीदसाठी आशीर्वाद मागत होती आणि अश्रूंचे मोठे मोठे थेंब बरसू लागली होती.  हमीदला याचे रहस्य काय कळणार?

 – समाप्त –  

मूळ हिंदी  कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद 

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ३ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग ३ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले – चिमटा किती कामाचा आहे. रोटया तव्यावरून काढा. चुलीत शेका . कुणी विस्तव मागायला आलं, तर झटपट निखारा चुलीतून काढूनं त्याला द्या. अम्माला कुठे फुरसत आहे की बाजारात जाऊन चिमटा आणावा आणि इतके पैसे तरी मिळतात कुठे? रोज बिचारी हात भाजून घेते. आता इथून पुढे )

हमीदचे मित्र पुढे गेले. पाणपोईवर सगळे जण सरबत पिताहेत.  हमीदच्या मनात येतय , किती लालची आहेत सगळेजण. इतकी मिठाई खाल्ली, मला एवढीसुद्धा कुणी दिली नाही. त्यावर आणि म्हणतात, माझ्याबरोबर खेळ. माझं हे काम कर. आता कुणी काही काम सांगितलं तर म्हणेन, मिठाई खा. आपलं तोंड सडवून घ्या. फोड येतील. जीभ चटोर बनेल. मग ते घरातले पैसे चोरतील. आणी सापडले की मार खातील. पुस्तकात खोट्या गोष्टी थोड्याच लिहिल्या आहेत. माझी जीभ का खाराब होईल? चिमटा बघताच आम्मा पळत पळत येऊन माझ्या हातातून चिमटा काढून घेईल, म्हणेल, माझं बाळ ते. आम्मासाठी चिमटा घेऊन आलाय.‘ हजारो आशीर्वाद देईल. शेजारच्या बायकांना  दाखवेल. सगळ्या गावात चर्चा होईल. ‘हमीदने चिमटा आणला. किती चांगला मुलगा आहे. या लोकांच्या खेळण्याचं कोण कौतुक करणार? मोठ्यां लोकांच्या प्रार्थना थेट अल्लाहच्या दरबारात पोचतात॰ आणि त्या लगेच ऐकल्या जातात. माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणूम, मोहसीन आणि महमूद मिजास दाखवतात. खेळू देत खेळण्यांशी. आणि खाऊ देत मिठाई. मी खेळण्यांशी नाही खेळत. मग कुणाची मिजास का सहन करू? मी गरीब आहे पण कुणाकडे काही मागायला तर जात नाही ना! कधी ना कधी तरी आब्बाजान येतीलच. अम्मासुद्धा येईल. मग त्या लोकांना विचारेन, किती खेळणी घ्याल? एकेकाला एकेक टोपलीभर खेळणी देईन आणि दाखवेन, मित्रांबरोबर कसं वागायचं असतं. असं नाही की एक पैशाची रेवडी घेतली, तर दुसर्‍याला चिडवून  चिडवून एकट्याने खावी. सगळेच्या सगळे खूप हसतील. की हमीदने चिमटा घेतलाय. हसूदेत बापडे. त्याने दुकानदाराला विचारलं, ’हा चिमटा केवढ्याला आहे? ‘ 

 दुकानदाराने त्याच्याकडे पाहीलं. त्याच्याबारोबर दुसरं कुणी मोठं माणूस नाही, असं पाहून तो म्हणाला, ‘ही गोष्ट तुझ्या कामाची नाही.’

‘विकायचा आहे की नाही?’

‘विकायचे का नाहीत? मग हे आणलेत कशला?’

‘मग सांगत का नाही, केवढ्याला आहे?’

‘सहा पैसे लागतील.’

हमीद हिरमुसला. ‘नक्की सांग. ‘

‘‘नक्की पाच पैसे पडतील. हवा तर घे. नाही तर चालू लाग.’

हमीदने काळीज घट्ट कारत विचारलं,’ तीन पैशाला देणार?’

असं बोलता बोलता तो पुढे निघाला. उगीच दुकानदाराच्या शिव्या ऐकायला नकोत. पण दुकानदाराने शिव्या दिल्या नाहीत. बोलावून चिमटा दिला. हमीदने तो खांद्यावर अशा तर्‍हेनेने ठेवला, जशी काही बंदूकच आहे. आणि मोठ्या ऐटीत तो मित्रांजवळ आला. जरा ऐकूयात तरी सगळे कशी टीका करताहेत.

मोहसीन म्हणाला, ‘हा चिमटा का आणलास ? वेड्या. याचं काय करणार? ‘

हमीदने आपला चिमटा जमिनीवर आपटत म्हंटलं, जरा आळ पाणक्या जमिनीवर पाड. सगळा चुराडा  होऊन जाईल. बच्चू .’

महमूदनं म्हंटलं, ‘ हा चिमटा काय खेळणं आहे?’

त्यावर हमीदचं म्हणणं, ‘खेळणं का नाही? आता खांद्यावर ठेवला बंदूक झाली. हातात घेतला, फकिरांचा चिमटा झाला. मनात आलं, तर चिपळ्यांचं काम करू शकतो. एक चिमटा घेतला, तर तुमच्या सगळ्या खेळण्यांचा जीव जाईल.तुमच्या खेळण्यांनी कितीही जोर केला, तरी ते माझ्या चिमाट्याचा केसही वाकडा करू शकत नाहीत. माझा चिमटा बहादूर आहे. वाघा आहे वाघ! ‘

सम्मीने खंजिरी घेतली होती. तो प्रभावित होऊन म्हणाला, ‘माझ्या खंजिरीबरोबर बदलशील. दोन आण्याची आहे.’

हमीदने खंजिरीकडे उपेक्षेच्या भावाने पाहिले. ‘माझा चिमटा मनात आलं, तर तुझ्या खंजिरीचं पोट फोडू शकेल. एक चामड्याचा पडदा काय लावला, ढबढब बोलायला लागली. जरासं पाणी लागलं की संपून जाणार. माझा बहादूर चिमटा आगीत, पाण्यात, वादळात डळमळीत होत नाही. स्थिरपणे उभा रहातो.

चिमाट्याने सगळ्यांना मोहित केलं,पण आता पैसे कुणाकडे होते? आणि आता सगळे जत्रेपासून दूर आले होते. नऊ कधीच वाजून गेले होते. ऊन कडक होऊ लागलं होतं.घरी पोहोचायची गडबड झाली होती. बापापाशी हट्ट धरला, तरी चिमटा मिळणं शक्य नव्हतं. हमीद मोठा चालाह आहे. यासाठी त्याने पैसे वाचवून ठेवले होते.

मुलांच्यात दोन गत झाले. सममी, नूरे, मोहसीन, म्हमूद एका बाजूला. आणि हमीद एकटा एका बाजूला. शास्त्रार्थ चालू होता. सम्मी विधर्मी झाला. तो दुसर्‍या पक्षाला जाऊन मिळाला. पण मोहसीन , महमूद आणि नूरे हमीदपेक्षा एक – एक, दोन –दोन वर्षांनी मोते असूनही हमीदच्या आघातांनी आतंकीत होऊन उठत होते. त्याच्याजवळ न्यायाचं बाल आहे आणि नीतीची शक्ती . एका बाजूला माती आहे. दुसर्‍या बाजूला आया बलवा म्हणवणारं लोखंड. ते अजेय आहे. घटक आहे. एखादा वाघ आला, तर पाणक्याचा धीर सुटेल. मियाँ शिपाई मातीचे बंदूक टाकून पळून जाईल. वकीलसाहेबांची घाबरगुंडी उडेल. तो आपल्या कोतात तोंड लपवून जमिनीवर पडेल. पण हा चीयता हा  बहादूर, हा रुस्तुमे-हिंद झटकन वाघाच्या  मानेवर स्वर होऊन, त्याचे डोळे फोडेल.

मोहसीनने सारा जोर पणाला लावू म्हंटलं, ‘पण पानी टीआर नाही न भरू शकणार?

हमीदने चिमटा सरल उभा धरत म्हंटलं, ‘ पाणक्यावर जर जोरात ओरडलं, तर तो पळत जाऊन पाणी आणेल, आणि त्याच्या दारात शिंपडेल.

मोहसीन परास्त झाला, पण महामूद त्याच्या मदतीला आला, ‘ जर मळगा पकडला गेला आणि कोर्टात हात बांधून फिरायला लागला, तर वकिलसाहेबांच्याच पायाशी लोळण घेणार ना!’ या प्रबळ तर्काचं उत्तर हमीद देऊ शकला नाही. त्याने विचारले, ‘पण आम्हाला पकडायला कोण येणार? नूरे ऐटीत म्हणाला, ‘हा शिपाई बंदूकवाला॰

हमीदने चिडवत म्हंटलं, ‘हा बिचारा आमच्या रुस्तुमे – हिंदला पकडणार? बरं आण. दोघांच्यात कुस्ती होऊ दे. याचा चेहरा बघून दूर पळून जाईल. पकडणार काय बिचारा.’

मोहसीनला एक नवा मुद्दा सुचला. ‘तूहया चिमाट्याचा तोंड रोज आगीत जळेल. ‘

त्याला वाटलं होतं, हमीद निरुतर होई. पण तसं झालं नाही. हमीद ताबडतोब म्हणाला, ‘जे बहादूर असतात, तेच आगीत उडी घेतात. तुमचा तो वकील, शिपाई, आणि पाणक्या बायकांप्रमाणे घरात घुसतील. आगीत उडी घेणं म्हणजे असं काम आहे, जे रुस्तुमे- हिंदच करू

महामूद आणखी जोर लावत म्हणाला, ‘वकील साहेब टेबल –खुर्चीवर बसतील. तुझा चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार? ‘

या तर्काने सम्मी आणि नूरेच्या जसा जीवात जीव आला. किती योग्य बोललाय पठ्ठ्या! चिमटा स्वयंपाकघरात पडून रहाण्याशिवाय आणखी काय करू शकणार? ‘

  ईदगाह  क्रमश: भाग ३ 

मूळ हिंदी  कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद 

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले  –  ‘शंभर तर पन्नासपेक्षा जास्त आहेत ना,’ हमीदने विचारले.  ‘कुठे पन्नास आणि कुठे शंभर? पन्नास तर एका थैलीतच मावतात. शंभर दोन थैल्यातसुद्धा मावणार नाहीत!’  – आता इथून पुढे)

आता वस्ती दाट होऊ लागलीय. इदगाह (मुसलमानांचे नमाज पढायचे मोकळे मैदान)ला जाणार्‍यांचे वेगवेगळे समूह दृष्टीला पडताहेत. एकापेक्षा एक भडक वस्त्र त्यांनी परिधान केली आहेत. कोणी एक्क्यावरून , टांग्यातून येताहेत. कुणी मोटारीतून येताहेत. सगळ्यांनी अत्तर लावलय. सगळ्यांच्या मनात हर्ष आहे. आनंद आहे. ग्रामीण बालकांचा हा छोटासा  गट आपल्या विपन्नतेच्या बाबतीत अजाण आहे. संतोष आणि धैर्य यात मग्न होऊन तो पुढे चालत होता. मुलांसाठी नगरातल्या अनेक गोष्टी नवीन होत्या. जिकडे बघत, तिकडे बघतच रहात. मागून वारंवार हॉर्न वाजला , तरी तिकडे त्यांचं लक्षच नसायचं. हमीद तर एकदा मोटारीखाली येतायेताच वाचला.

एवढ्यात इदगाह नजरेस पडला. वर चिंचेच्या मोठ्या वृक्षाची घनदाट छाया. खाली पक्की फारशी घातलेली. त्यावर जाजम टाकलेलं. रोजा (उपास) करणार्‍याच्या ओळी, एकामागून एक किती लांबर्यंत गेल्या आहेत. अगदी पक्क्या जागेच्याही पलीकडे. तिथे तर जाजमही नाही आहे. मागून येणारे मागच्या बाजूला ओळीत उभे आहेत. पुढे जागा नाही. या ग्रामिणांनीही नमाज पढण्यापूर्वी हात-पाय धुतले आहेत आणि मागच्या ओळीत उभे आहेत. किती सुंदर संचलन आहे. किती सुंदर व्यवस्था. लाखो मस्तकं एकाचा वेळी गुढगे मोडून नमस्कारासाठी  झुकताहेत. मग सगळेच्या सगळे उभे रहातात. पुन्हा एक साथ झुकतात. मग आपल्या गुढग्यांवर बसतात. किती तरी वेळा हीच क्रिया होते. असं वाटतं विजेचे लाखो दिवे एकाच वेळी प्रदीप्त झालेत आणि एकाच वेळी विझलेत आणि हाच क्रम चालू आहे. किती अपूर्व दृश्य होतं ते. या सामूहिक क्रिया, विस्तार, आणि अनंतता, हृदयाला श्रद्धा, गर्व आणि आत्मानंदाने भरून टाकत होत्या. जणू बंधुभावाच्या एका सूत्रात, या सगळ्या आत्म्यांना एका माळेत ओवून टाकलय.

नमाज पढून झालीय. लोक आता आपापसात एकमेकांना मिठ्या मारताहेत. आलिंगन देताहेत. मग मिठाई आणि खेळण्यांच्या दुकानाकडे धाव घेतली जाते. ग्रामिणांचं दलही मुलांपेक्षा काही कमी उत्साही नाही. हा बघा फिरता पाळणा. एक पैसा देऊन चढून बसा. कधी आसमानात जातोयसं वाटेल. कधी जमीनीवर पडतोयसं. हे चक्र आहे. लाकडाचे हत्ती, घोडे, उंट छड्यांना लटकलेले आहेत. एक पैसा द्या आणि पंचवीस चक्रांची मजा अनुभवा. महमूद, मोहसीन, नूरे, आणि सम्मी सगळे या उंट घोड्यांवर बसताहेत. हमीद दूर उभा आहे. त्याच्याजवळ तीनच पैसे आहेत. आपल्या खजिन्याचा तिसरा हिस्सा, तो थोड्याशा चकरा घेण्यासाठी नाही देऊ शकत.

सगळे चक्रावरून उतरले. आता खेळणी घ्यायची. किती तर्‍हेची खेळणी आहेत. शिपाई आहे. गवळण आहे. राजा आहे. वकील आहे. पाणी देणारा पाखालवाला पाणक्या, धोबीण, साधू, आणखी किती तरी खेळणी ….. सुंदर सुंदर खेळणी आहेत. महमूद शिपाई घेतो. त्याने खाकी वर्दी, लाल पगडी घातलीय आणि खांद्यावर बंदूक आहे. असं वाटतय, की आत्ता कवायतीला निघालाय. पाणक्याने पखालीचं तोंड हाताने धरून ठेवलय. किती प्रसन्न दिसतोय. नूरेला वकिलाबद्दल प्रेम आहे. किती विद्वत्ता झळकतेय त्याच्या तोंडावर. काळा कोट, त्याखाली सफेद अचकन, अचकनच्या पुढे खिशात घडयाळ, त्याची सोनेरी साखळी आणि एका हातात कायद्याचे पुस्तक. असं वाटतय, एवढ्यातच न्यायालयातून उलटतपासणी घेऊन किंवा खटल्यात आशिलाची बाजू मांडून येतोय. ही सगळी दोन दोन पैशांची खेळणी आहेत. हमीदजवळ फक्त तीन पैसे आहेत. इतकी महाग खेळणी  तो कशी घेऊ शकेल? खेळणी हातातून पडली, तर मोडून जातील. थोडंसं पाणी पडलं, तर रंग धुऊन जाईल. असली खेळणी घेऊन तो काय करणार? काय उपयोग मग त्यांचा?

मोहसीन म्हणाला, ‘ माझा पाणक्या सकाळ-संध्याकाळ पाणी देईल.’

महामूद म्हणाला, ‘माझा शिपाई घराचा पहारा करील. कुणी चोर आला, तर बंदुकीच्या फैर्‍या झाडील.’

नूरे म्हणाला, ‘ माझा वकील खूप खटले लढेल.’

सम्मी म्हणाला, ‘ माझी धोबीण रोज कपडे धुवेल.’

हमीद खेळण्यांना नावे ठेवू लागला. ‘मातीची तर आहेत. पडली तर चक्काचूर होऊन जातील.’ तो असं म्हणाला खरं, पण लालचावलेल्या डोळ्यांनी खेळण्यांकडे बघतही होता. ती काही काळ हातात घेऊन बघावी, असंही त्याला वाटतय. अभावितपणे हात पुढेही करतोय. पण मुलं इतकीही त्यागी नाहीत. विशेषत: खेळणी इतकी नवी नवी असताना. हमीदची लालसा तशीच रहातेय.

खेळण्यानंतर मिठाईची दुकाने लगातात. कुणी रेवडी घेतलीय. कुणी गुलाबजाम. कुणी सोहन हलवा. सगळे मजेत खाताहेत. हमीद त्यांच्या टोळी पासून वेगळा आहे. बिचार्‍याजवळ फक्त तीन पैसे आहेत. काही घेऊन खात का नाही? लालचावलेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे बघतो आहे.

मोहसीन म्हणतोय, ‘हमीद रेवडी घे. किती मस्त आहे बघ. ‘

हमीदला संशय येतोय, ही केवळ क्रूर थट्टा आहे. मोहसीन काही इतका उदार नाही. तरीही तो अभावितपणे त्याच्याकडे जातो. मोहसीन पुड्यातून एक रेवडी काढून हमीदच्या दिशेने हात पुढे करतो. हमीद हात पसरतो. मोहसीन रेवडी आपल्या तोंडात टाकतो. महमूद, नूरे, सम्मी टाळ्या वाजवाजवून खूप हसतात. हमीद खजील होतो.

मोहसीन म्हणतो, ‘आता या वेळी नक्की देईन. अल्लाह कसम घे.’

हमीद म्हणतो ‘ठेव तुझ्याकडे. माझ्याकडे काय पैसे नाहीत?

सम्मी म्हणतो, ‘तीन पैसे तर आहेत. त्यात काय काय घेणार?’

त्यावर महमूद  म्हणतो, ‘माझ्याकडून  गुलाबजाम घे. हमीद मोहसीन बदमाश आहे.’

हमीद  म्हणतो, ‘मिठाई काही खूप चांगली गोष्ट नाही. त्यामुळे काय काय अपाय होतात, याबद्दल पुस्तकात खूप लिहिलंय. ‘त्यावर मोहसीन म्हणतो, ‘ पण मनात म्हणतच असणार, मिळाली तर खावी.’

त्यावर महमूदचं म्हणणं असं की, ‘याची चलाखी लक्षात येतेय, जेव्हा आपले सगळे पैसे खर्च होतील, तेव्हा हा काहीतरी घेईल आणि आपल्याला टूक टुक करत खाईल.’

मिठाईनंतर काही लोखंडाच्या वस्तूंची दुकानं लागतात. काही गिलिटाच्या आणि नकली दागिन्यांची दुकाने लागतात. मुलांना काही याचं आकर्षण नाही. ते सगळे पुढे जातात. हमीद लोखंडाच्या वस्तूंच्या दुकानाशी थांबतो. तिथे खूपसे चिमटे ठेवलेले आहेत. त्याला आठवतं दादीजवळ चिमटा नाही. तव्यावरून  रोटया काढते, तेव्हा हात भाजतो. जर त्याने चिमटा घेऊन दिला, तर तिला केवढा आनंद होईल. मग तिची बोटं भाजणार नाहीत. घरात एक कामाची वस्तू येईल. खेळण्याचा काय फायदा? उगीचच पैसे खर्च होतात. थोडा वेळ खूश होतात. नंतर तिकडे कुणी डोळे वर करून बघतसुद्धा आही. घरी जाताच तुटतील. फुटतील. किंवा जी लहान मुले जत्रेला आली नाहीत, ती जिद्दीनं ओढून घेतील आणि या ओढाताणीत खेळणी फुटतील. चिमटा किती कामाचा आहे. रोटया तव्यावरून काढा. चुलीत शेका . कुणी विस्तव मागायला आलं, तर झटपट निखारा चुलीतून काढूनं त्याला द्या. अम्माला कुठे फुरसत आहे की बाजारात जाऊन चिमटा आणावा आणि इतके पैसे तरी मिळतात कुठे? रोज बिचारी हात भाजून घेते.

ईदगाह  क्रमश: भाग २ 

मूळ हिंदी  कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद 

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग १ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ईदगाह (अनुवादीत कथा) – भाग १ (भावानुवाद) – मुंशी प्रेमचंद ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

रामजानच्या तीस दिवसांच्या (उपवासाच्या)नंतर ईद आलीय. किती मनोहर, आनंददायी पहाट आहे. वृक्षांवर अजब हिरवेपण आहे. शेतात खास अशी चमक आहे. आभाळात वेगळाच लालिमा आलाय. आजचा सूर्य पहा. किती हवाहवासा, किती शीतल…. जसं काही सगळ्या जगाला शुभेच्छा देतोय. गावात किती गडबड आणि किती उत्साह आहे. इदगाहला जाण्याची तयारी होते आहे. कुणाच्या कुडत्याला बटण नाही. शेजारच्या घरातून आणण्यासाठी पळतोय. कुणाचे बूट कडक झालेत. त्याला तेल घालण्यासाठी तेल्याच्या घरी धावतोय. भराभर बैलांना वैरण-पाणी द्यायचं चाललय. इदगाहहून परतताना दुपार होईल. तीन कोसांचा रास्ता. पायी जायचं. तिथे शेकडो लोक भेटणार. यायला दुपार होणारच. मुलं अगदी खूश आहेत. कुणी एका दिवसाचा रोजा ठेवलाय. तोही दुपारपर्यंत. कुणी कुणी तेवढाही नाही. पण इदगाहला जायची खुशी त्यांनाही आहेच. रोजे मोठ्यांसाठी-म्हातार्‍यांसाठी असतील. मुलांसाठी मात्र ईद आहे. रोज ईदच्या नावाचा जप होतोय. ती आज आलीय. आता त्यांना घाई झालीय. ही मोठी माणसं लवकर लवकर का आवरत नाहीत.

संसारातील चिंता, अडचणी यांच्याशी मुलांचा काय संबंध? शेवयांसाठी दूध, साखर आहे की नाही, तो मोठ्यांचा प्रश्न. मुलं शेवया खाणार. त्यांना काय माहीत आब्बाजान व्याकूळ होऊन चौधरी कयाम अलींच्या घरी पळत पळत का जाताहेत? त्यांना काय माहीत, की त्यांनी स्नेह कमी केला, तर ईद मोहरममध्ये बदलून जाईल. त्यांच्या खिशात कुबेराचं धन भरलय. पुन्हा पुन्हा खिशातून आपला खजिना काढून ते मोजताहेत आणि खूश होऊन पुन्हा ठेवताहेत. महामूद मोजतोय. एक…. दोन… दहा… बारा… त्याच्याजवळ बारा पैसे आहेत. मोहसीनजवळ एक…. दोन… दहा… बारा…पंधरा पैसे आहेत. या अगणित पैशातून अगणित गोष्टी ते घेणार आहेत. खेळणी, मिठाई, शिट्टी, चेंडू….. आणखी न जाणे काय काय घेणार आहेत. सगळ्यात जास्त प्रसन्न आहे तो हमीद. तो चार-पाच वर्षांचा आहे. अशक्त आणि दुबळा. त्याचा बाप गेल्या वर्षी पटकीने गेला आणि आई कुणास ठाऊक, कशाने पिवळी पडत एक दिवस मरून गेली. काय आजार झाला, कुणाला कळलंच नाही. सांगितलं असतं, तरी ऐकणारं कोण होतं? जे अंगावर पडेल, ते मुकाट्याने झेलत होती बिचारी. आता हमीद आपली म्हातारी आजी अमिनाच्या कुशीत झोपतो. अगदी प्रसन्न आहे तो. कारण त्याचे अब्बाजान पैसे मिळवायला गेले आहेत आणि खूपशा थैल्या घेऊन येणार आहेत. अम्माजान अल्लाह मीयाँच्या घरून त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी आणायला गेलीय. त्यामुळे तो अगदी प्रसन्न आहे.

आशा ही एक मोठी गोष्ट आहे. मुलांच्या आशेबद्दल काय बोलावं. त्यांची कल्पना तर राईचा पर्वत बनवते. हमीदचे बूट फाटले आहेत. डोक्यावर एक जुनी-पानी टोपी आहे. त्याचा गोंडाही काळा पडलाय, पण तो प्रसन्न आहे. त्याचे अब्बाजान पैशांच्या थैल्या घेऊन येतील आणि अम्मीजान दुर्लभ वस्तू घेऊन येईल, तेव्हा त्याची स्वप्नं पूर्ण होतील. तेव्हा तो बघेल, की महमूद, मोहासीन, नूरे आणि सम्मी कुठून एवढे पैसे आणतील?

अभागिनी अमिना आपल्या घरात बसून रडते आहे. आज ईद आहे, पण तिच्या घरात दाणाही नाही. आज अबीद असता, तर काय आशा तर्‍हेने ईद आली असती, आणि निघून गेली असती? या निराशेच्या आंधारात ती बुडत चालली होती. कुणी बोलावलं होतं या निर्लज्ज , बेशरम ईदला. या घरात तिचं काही काम नाही, पण हमीद! त्याचा कुणाच्या जगण्या-मारण्याशी काय संबंध? त्याच्या आत प्रकाश आहे. बाहेर आशा. विपत्ती आपलं सारं सैन्य-बळ एकवटून येऊ दे. हमीदच्या आत आसलेला उत्साह, आनंद तिचं विध्वंस करून टाकेल.

हमीद आत जाऊन दादीला सांगतो, ‘तू मुळीच घाबरू नकोस अम्मा, मी सगळ्यात आधी जाईन. तू आजिबात घाबरू नकोस.’

अमिनाच्या मनाला टोचणी लागली होती. गावातील सगळी मुलं आपापल्या बापाबरोबर चाललीत. हमीदला अमिनाशिवाय कोण आहे? त्याला एकट्याला जत्रेत कसं जाऊ द्यायचं? त्या गर्दीत मुलगा कुठे हरवला बिरवला तर? नाही अमिना त्याला एकट्याला नाही जाऊ देणार? तीन कोस कसा चालेल? पायाला भेगा पडतील. बूटसुद्धा नाहीत. ती गेली असती, म्हणजे अधून मधून त्याला कडेववर घेतलं असतं. पण इथे शेवया कोण शिजवणार? पैसे असते म्हणजे येताना सगळ्या गोष्टी आणून पटपट शेवयाची खीर बनवता आली असती. इथे तर सगळ्या गोष्टी जमा करायला तास न् तास जाणार. मागून आणायचं. त्यावरच भिस्त ठेवाया हवी. त्या दिवशी राहिमनचे कपडे शिवून दिले होते. आठ आणे मिळाले होते. ते आठ आणे तिने आजच्या ईदसाठी अगदी इमानदारीने सांभाळून ठेवले होते, पण काल गवळण अगदी डोक्यावरच बसली. मग काय करणार? हमीदसाठी बाकी काही नाही, तरी दोन पैशाचं दूध तरी हवं ना! आता फक्त दोन आणे राहिलेत. तीन पैसे हमीदच्या खिशात आणि पाच पैसे अमिनाच्या बटव्यात. एवढीच यांची दौलत आहे. ईदचा सण. अल्लाहच यातून पार करेल. धोबीण, न्हावीण, मेहतरीण, बांगडीवाली सगळ्या येतील. सगळ्यांना शेवया हव्या. थोड्या दिल्या तर कुणाला चालणार? कुणाकुणापासून तोंड लपवणार? वर्षाचा सण. जीवनात कल्याण, मंगल होवो, असं सांगणारा सण. ज्याचं त्याचं नशीब, ज्याच्या त्याच्या सोबत. मुलाला खुदाने सुरक्षित ठेवावं. हेही दिवस निघून जातील.

गावातून लोक निघाले. इतर मुलांसारखा हमीदही निघाला. मुलं कधी कधी पळत पुढे जात. मग एखाद्या झाडाखाली थांबून बरोबर आलेल्या मोठ्या माणसांची वाट बघत. त्यांना वाटे, ही माणसं इतकी हळू हळू का चालताहेत? हमीदच्या पायांना तर जसे पंख लागले होते. तो कधीच थकणार नाही. शहर आलं. शहराच्या दोन्ही बाजूला धनिकांच्या बागा आहेत. घराच्या चारी बाजूंनी पक्क्या भिंती आहेत. झाडं आंबे आणि लिची यांनी लगडलेली आहेत. एखादा मुलगा लहानसा दगड उचलून आंब्यावर मारतोय. माळी आतून शिव्या देत बाहेर येतो. पण मुले तेथू फर्लांगभर अंतरावर पोचली आहेत. खूप हसताहेत. माळ्याला कसं मूर्ख बनवलं.

मोठ्या मोठ्या इमारती येऊ लागल्या. हे कोर्ट. हे कॉलेज. हा क्लब. इतक्या मोठ्या कॉलेजात किती मुले शिकत असतील? सगळीच मुले नाहीयेत. मोठी मोठी माणसेसुद्धा आहेत. त्यांना मोठ्या मोठ्या मिशा आहेत. इतकी मोठी झाली, तरी अजून शिकताहेत. कधीपर्यंत शिकणार आणि इतकं शिकून काय करणार कुणास ठाऊक? हमीदच्या मदरशात दोन –तीन मोठी मुले आहेत. अगदी तीन कवडीची. रोज मार खातात. कामचुकारपणा करतात ना! या जागेतही तसल्याच प्रकारचे लोक असतील. क्लबमध्ये जादू आहे. इथे मृतांच्या खोपड्या धावतात, असं ऐकलय. मोठे मोठे तमाशे होतात, पण कुणाला आत जाऊ देत नाहीत. इथे संध्याकाळी साहेब लोक खेळतात. मोठी मोठी माणसे आहेत. दाढी मिशा असाणारी आणि मेमसुद्धा खेळतात. आमच्या अम्माला ते द्या. काय नाव? बॅट. तिला ती पकडताच येणार नाही. फिरवतानाच कोलमडून पडेल.

महमूद म्हणाला, ‘आमच्या अम्मीजानचा तर हातच कापू लागेल. अल्ला कसम.’

मोहसीन म्हणाला, ’ अम्मी मण मण पीठ दळते पण जरा बॅट पकडली, तर हात कापायला लागतील. शेकडो घागरी पाणी काढते. पाच घागरी तर म्हैसच पिते. कुणा मेमला पाणी काढायला सांगितलं, तर डोळ्यापुढे अंधेरी येईल.’

महमूद म्हणाला, ‘पण पळू तर शकत नाही ना! उड्या तर मारू शकत नाही ना!’

यावर  मोहसीन म्हणाला, ’हं! उड्या मारू शकत नाही, हे खरं; पण त्या दिवशी आमची गाय सुटली आणि चौधरींच्या शेतात गेली, तेव्हा अम्मी इतकी जोरात पळाली, की, मी तिला गाठू शकलो नाही, खरंच!’

मुलं पुढे गेली. ही पोलीस लाईन आहे. कॉन्स्टेबल कवायत करताहेत. रात्री बिचारे जागून जागून पहारा देतात. नाही तर चोर्‍या होतील. मोहसीननं प्रतिवाद केला, ‘मग फारच माहिती आहे तुला. अरे बाबा हेच चोर्‍या करवतात. शहरातले जेवढे म्हणून चोर डाकू आहेत, सगळे यांच्याशी संबंध ठेवून आहेत. रात्री हेच चोरांना सांगतात, चोरी करा आणि आपण दुसर्‍या मोहल्ल्यात जाऊन ‘जागते रहो… जागते रहो…चा पुकारा करतात. म्हणून यांच्याजावळ एवढे पैसे असतात. माझे एक मामा कॉन्स्टेबल आहेत. पगार वीस रुपये, पण पन्नास रुपये घरी पाठवतात. अल्लाह कसम! मी एकदा विचारलंसुद्धा, ‘मामू इतके पैसे आपल्याला कुठून मिळतात? हसून म्हणाले, बेटा, अल्लाह देतो. ‘ मग आपणच म्हणाले, ‘आम्हाला वाटलं, तर दिवसात लाख रुपये मारू शकतो, पण आम्ही एववढेच घेतो. त्यामुळे आमची बदनामीही होणार नाही आणि आमची नोकरीही जाणार नाही.’

हमीदने विचारले, ‘हे लोक चोरी करवतात, तर कुणी यांना पकडत कसं नाही?’ मोहसीन त्याच्या मूर्खपणावर दया दाखवत म्हणाला, ‘अरे वेड्या, यांना कोण पकडणार? पकडणारे तर हेच आहेत ना! पण अल्लाह त्यांना खूप शिक्षाही देतो. हापापाचा माल गपापाही होतो. थोड्याच दिवसात मामूच्या घराला आग लागली.  सारी जमा पुंजी जळून गेली. एक भांडंसुद्धा राहिलं नाही. झाडाखाली झोपले. अल्लाह कसम! मग कुठून कोण जाणे, शंभर रुपये कर्ज घेतलं, तेव्हा भांडी-कुंडी आली.’

‘शंभर तर पन्नासपेक्षा जास्त आहेत ना,’ हमीदने विचारले. 

‘कुठे पन्नास आणि कुठे शंभर? पन्नास तर एका थैलीतच मावतात. शंभर दोन थैल्यातसुद्धा मावणार नाहीत!’

  ईदगाह  क्रमश: भाग १ 

मूळ हिंदी  कथा 👉 ‘ईदगाह…’ – मूळ लेखक – मुंशी प्रेमचंद 

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आली माझ्या घरी ही दिवाळी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ आली माझ्या घरी ही दिवाळी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

बेडरूमच्या खिडकीचं तोरण निसटलं म्हणून ती लावत असताना त्याने खोडकरपणा करत आपल्या हातांचा विळखा तिच्या कमरेला घातला,… तशी ती डोळे वटारून म्हणाली, ” नेहमी सारखे राजराणी नाही आपण घरात,… दिवाळीचं माणसांनी घर गच्च भरलंय माझं,…” तो म्हणाला, “तुलाच हौस होती सगळयांनी एकत्र दिवाळी करण्याची,…” ती लाडात म्हणाली, ” हम्म मग एकटी असते तर तू तर अभ्यंग स्नानही घालशील मला,”…

तिला अलगद कड्यावर घेत त्याने खाली उतरवलं आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला,

“खूप thanku,…  माझ्या खेड्यातल्या आई बाबांना आणि भाऊ, वहिनीला इतकं मानाने आणि प्रेमाने बोलवलं तू दिवाळीला,… खरंच मला खुप आनंद वाटतोय ग अगदी खरी दिवळी झगमगली आहे मनात,…”

ती म्हणाली, “अरे thanku काय त्यात,…? सून म्हणून मला माझीही कर्तव्य करायलाच पाहिजे ना,…एरवी आपण दोघेच तर असतो ह्या एवढ्या मोठ्या घरात,… आणि आज तू जे काही मोठ्या पदावर आहेस ते तुझ्या आई वडिलांमुळे,… त्यांना विसरून कसं चालेल,…? असले जरी खेड्यातले तरी खुप मायाळू आहेत रे,… खुप प्रेमाने वागतात आणि नाही वागले तरी मलाही सहन करता आलं पाहिजे ना,… कारण वर्षात काही दिवस तर येतात,… आणि तू खुश तर मग खरा संसार आणि खरी दिवाळी नाही का आयुष्याची,…?”

तेवढयात सासुबाई आल्या,.. दोघे उगाच खोकल्यासारखं करून दूर झाले,… तेव्हा सासुबाईच हसून म्हणाल्या, ” अरे मीच चुकीच्या वेळी आले वाटतं,.. पण मी फक्त एवढंच सांगायला आले,.. अरे आज पाडवा सूनबाईला काहीतरी छान भेट घेऊन ये,… लवकर जाऊन या मी स्वयंपाक करून ठेवते,… आपली ताई पण येईलच उद्याच्या भाऊबीजेला,…”

दोघे बाहेर पडले. तिने मात्र स्वतःला सोडून सगळ्यांसाठी छान साड्या घेतल्या,… भाचे,पुतण्या सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले,… तो म्हणाला आणि तुला काय घ्यायचं,… ती म्हणाली, ” इतकं भरलं घर दिलंस मला,… अरे शिक्षण नोकरी असली तरी शेवटी अनाथाश्रमात वाढलेली मी ह्या माणसांच्या सुखासाठी फार तरसली आहे रे,… ते सुख तुझ्यामुळे मिळालंय मला,.. आता काही नको,… नेहमी अशीच आनंदी दिवाळी राहू दे आयुष्यात,…”

संध्याकाळी औक्षणात त्याने आईलाही साडी दिली,… सासुबाई म्हणाल्या, ” सुनबाई चांगली जादू केली माझ्या मुलावर अग आजपर्यंत त्याने काही घेतलं नाही मला,.. मला तशी अपेक्षा नव्हती ग,… पण आपल्या लोकांसाठी असं मनातून घ्यावं वाटलं पाहिजे,… प्रेम त्या वस्तूवर नसतं ग,… पण ज्याच्यासाठी घ्यायचं त्या व्यक्ती विषयी असतं,…  आणि ह्या क्षणांच्या ह्या आठवणी असतात,… खरंतर त्या वस्तूशी निगडित नसल्या तरी त्या वस्तूसोबत आलेल्या भावनेत असतात ना,… खेड्यात रहात असल्या तरी विचाराने किती प्रगल्भ आहेत ह्याचं तिला कौतुक वाटलं,…

तिने त्याला औक्षण केलं,… खिशातील 100 रु ची नोट त्याने ताटात टाकली,… तेवढ्यात सासरेबुवानी एक पॅकेट त्याच्या हातात दिलं,… हे दे सुनबाईला आणि म्हणाले…” अरे ह्या सासु सुना सारख्याच असतील माहीत होतं मला,… तुझ्या आईने पण पहिल्या दिवाळीला असंच सगळ्या साठी घेतलं स्वतःला नाही,… मग माझ्या वडिलांनी असंच खोक ठेवलं होतं हातात,… सुनबाई बघा भेट आवडते का,…?”

तिने हसत ते उघडलं,… गिफ्ट बघून तिला आश्चर्यच वाटलं,… तिला आवडलेला तो मोत्याचा तन्मणी,…” अय्या बाबा,तुम्हाला कसं कळलं मला हेच पाहिजे होत,…?” बाबा मघाशी आलेल्या ताईकडे म्हणजे तिच्या नणंदेकडे बघून हसले,… नणंद म्हणाली, ” अग तू ऑनलाइन ज्या ग्रुपवर तन्मणीची चौकशी केलीस त्या ग्रुपवर मी पण आहे,… मग ठरलं माझं आणि बाबांचं,…”

तिचे डोळेच भरून आले,… गळ्यातला तन्मणी अजूनच खुलून दिसत होता,… माणसं जपायची तिची दिवाळी सुरुवात छानच झाली होती,… भरल्या घरातुन,…. सगळे तोंडभरून आशीर्वाद देऊन गेले,… दिवाळीही गेली.  तरीपण हिचं गाणं गुणगुणणं सुरूच होतं,… ” सप्त रंगात न्हाऊन आली आली माझ्या घरी ही दिवाळी,…”

नाते जपण्याची,प्रेमाची,चैतन्याची दिवाळी एकमेकांना जुळवून घेत अशीच प्रत्येकाच्या आयुष्यात येवो  …

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्पीड लिमिट… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ स्पीड लिमिट… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

माने हवालदार, एका गुन्ह्याच्या तपासासाठी, इन्स्पेक्टर भोसले यांना घेऊन पुणे शहराबाहेर दौंडच्या दिशेने गेले होते. काम संपवून दोघे पुन्हा त्यांच्या पुण्यातील दगडूशेठ गणपतीजवळील फरासखाना पोलीस स्टेशनला परतत होते.

अचानक एक लाल रंगाची 2 सीटर मर्सिडीज गाडी वाऱ्याच्या वेगाने त्यांना ओव्हरटेक करून झपकन पुढे निघून गेली. आज भोसल्यांकडे वाहतूक शाखेतल्या त्यांच्या एका मित्राची स्पीड गन होती. त्यांनी सहज त्या मर्सिडीजचा स्पीड तपासला, आलेला आकडा पाहून त्यांचे डोळे विस्फारले.

“साहेब, स्पीड बघितला का त्याचा ? घ्यायचा का याला खोपच्यात ?” ॲक्सीलरेटरवर पाय दाबत माने विचारते झाले.

“माने, खरंतर, तीन कारणांनी आपल्याला असं काही करता येणार नाही. एक म्हणजे आपण वाहतूक पोलीस नाही, दुसरं म्हणजे सकाळी येताना मी पाहिलं होतं, यवतपासून दौंडपर्यंत, महामार्गाच्या दोन्ही बाजूला वेग मर्यादा दाखवणारे फलक नाहीत, किंवा असले तरी पडलेले आहेत.

आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं कारण म्हणजे, त्याला पकडण्यासाठी, आपण त्याला गाठणार कसं ?” भोसले.

आपल्या प्रश्र्नातील फोलपणा मान्यांच्या लक्षात आला, ते मुकाट्याने गाडी चालवू लागले. पण ते एक दोन किलोमीटर गेले असतील, नसतील, त्यांचं लक्ष डावीकडच्या “कांचन” हॉटेलकडे गेलं, आणि त्यांचे डोळे लकाकले.

ती लाल मर्सिडीज तिथे उभी होती.

“साहेब, चान्स आहे. सोडू नकोया. ” भोसले काही बोलायच्या आत मान्यांनी गाडी मर्सिडीजच्या मागे थांबवलीच.

बाकी काही नाही तर केवळ ती सुंदर तितकीच पॉवरफुल गाडी जवळून बघण्यासाठी भोसले खाली उतरले.

“माने, मर्सिडीजची AMG GT आहे ही. जवळजवळ ४ लिटरचे इंजिन आहे. आपल्या स्कॉर्पिओच्या साधारण दुप्पट ताकदीचे. ० ते १०० किलोमीटर स्पीड ३ सेकंदात घेते हे गाडी, आहेस कुठे ?”

“कितीला भेटते हो, साहेब ? आणि average काय आहे हिचा ?”

“माने, काय पुढच्या पगारात दोन चार विकत घेताय की काय ? दोन कोटींच्यावर किंमत आहे गाडीची. एका लिटरला बारा किलोमीटरचा average देते, पण जो दोन कोटींची गाडी घेतो, तो असले हिशेब करत असेल, असं वाटत नाही.”

त्यांचं हे बोलणं चाललं होतं, तेवढ्यात एक अठरा एकोणीस वर्षांचा पोरगेलासा तरुण साधारण त्याच्याच वयाच्या, फॅशनेबल तोकडे कपडे घातलेल्या, त्याच्या मैत्रिणीसोबत आला. गाडीजवळ पोलीस पाहून तो हसला, “काय मामा, काय झालं ? स्पीड लिमिट तुटली का ?” थोड्याशा उर्मटपणे विचारत, तो बोलू लागला.

“हो, गाडी खूपच भरधाव चालली होती. ” भोसले.

“तरी किती ? १५० होता का स्पीड ?”

“नाही, १४६ होता. “

“श्या. लास्ट टाईम १५० क्रॉस केला होता आपण. बेब, तू असलीस ना की गाडी चालवण्यावर लक्ष नाही रहात माझं. ” तिला कोपरखळी मारत, या दोघांकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्या हिरोची टकळी सुरू होती.

“गाडीचं RC Book, तुझं लायसन्स पाहू. ” भोसले.

त्याने बेफिकिरीने ती दोन्ही कार्ड्स भोसल्यांकडे दिली.

मान्यांना वाटलं की RC book पाहून भोसल्यांच्या चेहऱ्यावर अस्फुट स्मित उमटलं, का तो भास होता ?

“एक काम करा सर, तुम्ही आता. तुम्ही आता आमच्या गाडी मागोमाग तुमची गाडी घ्या. आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. ओव्हरटेक करून भरधाव गाडी चालवू नका आणि मध्येच कुठे कलटी मारू नका. असं केलंत, तरी, तुमची तुमच्या घरी भेट होईपर्यंत मी तुमच्या घरी थांबणार आहे, एवढं लक्षात ठेवा. “

“Whatever. तुला माहित असेलच की तू माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदवू शकत नाहीस, एकतर तू ट्रॅफिक पोलीस नाहीस आणि दुसरं म्हणजे या स्ट्रेचला कुठेच स्पीड लिमिटचा बोर्ड नाही. मी कायद्याने सज्ञान आहे आणि कोणतेही नशापाणी न करता गाडी चालवत आहे. ” तो बेफिकिरीने बोलत होता, “आणि गाडी स्लो नेली तर मला तेवढाच जास्त वेळ बेबला देता येईल. “

भोसल्यांचा एकेरी उल्लेख ऐकून मान्यांचा पारा चढू लागला होता, भोसल्यांनी खुणेनेच त्यांना शांत केलं.

“आपला कायद्याचा अभ्यास कौतुकास्पद आहे, सर. या आता आमच्या मागोमाग. ” भोसल्यांनी विषयावर पडदा टाकला.

रमतगमत माने आणि त्यांच्या मागे ती मर्सिडीज, यांची वरात, सदाशिव पेठ, पुणे – ३० इथे एका बंगल्यासमोर थांबली. गाडी जशी बंगल्याजवळ येऊ लागली, तशी भोसल्यांच्या सांगण्यावरून, मान्यांनी गाडीचा सायरन, लाइट्स सुरू केले होते.

बंगल्याबाहेरील नावाची पाटी बघून माने चपापले. ” साहेब, हा तर हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश मॅडमचा बंगला आहे. ” सायरन बंद करण्यासाठी हात पुढे करत माने म्हणाले.

भोसल्यांनी त्यांना थांबवलं, सायरन चालूच ठेवला. सदाशिव पेठेच्या नीरव शांततेत तो आणखीनच भेदक वाटत होता. मर्सिडीजमधून उतरून तो तरुण सायरन बंद करायला सांगत होता.

आवाज चालूच राहिल्याने काय गडबड आहे ते पाहायला आजूबाजूच्या बंगल्यातील लोक दारात येऊ लागले होते. अखेर न्यायाधीश महोदया यांनी दार उघडलं आणि त्या बंगल्याच्या दरवाज्यात आल्या.

भोसल्यांनी सायरन बंद केला, आणि विनम्रतेने तो तरुण आणि ती मुलगी यांना एस्कॉर्ट करत ते न्यायाधीश मॅडमपर्यंत पोचले. मॅडमना कडक सॅल्युट ठोकला.

“ऑफिसर, काय तमाशा आहे हा ?”

“नाही, काही नाही, मॅम. ” तो तरुण काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे आणि विशेषत: तोकड्या कपड्यातल्या त्या तरुणीकडे जळजळीत कटाक्ष टाकून मॅडमने त्याला गप्प केलं. आणि प्रश्नार्थक नजर भोसल्यांकडे वळवली.

“मॅडम, तमाशा काही नाही. सर गाडी खूप वेगात चालवत होते, मी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करू शकत नाही, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं, मॅडम. त्यांना सुरक्षित घरी सोडावं, केवळ म्हणून त्यांच्याबरोबर आलो, मॅडम. ” भोसले निवांतपणे सांगत होते. आणि मॅडमचा चेहरा लाल पिवळा होत होता, बहुधा गाडी बेफाम चालवण्याची त्याची ही पहिली खेप नव्हती.

“तुला फार कायदा कळतो का रे ?” त्या मुलाला उद्देशून विचारत होत्या, आणि मुलगा त्यांची नजर चुकवत होता. “गाडी माझ्या नावावर आहे. माझी परवानगी घेतली होती का ? गाडी चोरीला गेली म्हणून तक्रार केली मी तर काय होईल कल्पना आहे का ?” 

आपण तिऱ्हाईतासमोर आपल्या मुलाशी बोलत आहोत याचं भान त्यांना आलं आणि त्या थांबल्या. “ऑफिसर, तुम्ही जा आता. तुम्ही अतिशय योग्य काम केलं आहेत.” 

भोसल्यांनी पुन्हा कडक सॅल्युट ठोकला, आणि ते बाहेर जाऊ लागले. “सर, हे माझं कार्ड ठेवा. कधीही काही अडचण आली तर आवर्जून फोन करा. तुमच्यासारख्या सज्जनांच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, सर. “

हसत हसत भोसले बंगल्याबाहेर पडले, आणि तो तरुण न्यायाधीश आईच्या कचाट्यात सापडला.

स्पीड लिमिट तोडणे तर दूरच, पण आता कित्येक दिवस ती मर्सिडीज त्याच्या हाती लागणंही आता कठीण दिसत होतं.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “टिश्यू पेपर…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “टिश्यू पेपर…” ☆ श्री मंगेश मधुकर 

घरात आल्यावर भाजीची पिशवी आईकडं देऊन खोलीत गेलेला रघू हाक ऐकून बाहेर आला. 

“भाजी आणली.आता काय??”

“थोडं बोलायचं होतं.’

“कशाबद्दल”

“नेहमीचा विषय.”

“आज नको”

“मग कधी? अरे,मी काय आयुष्यभर पुरणार नाही. चाळीशीला आलास आता तरी…”

“एकटाय तेच बरयं. जाऊ दे ना.”

“आता कोणाची वाट बघतोयेस.”

“ कोणी सांगितलं.काहीही काय ”

“ मला सगळं कळतं. अजून मालती परत येईल अशी आशा आहे ना ”

“ एकदम मालतीची आठवण?” रघूनं आश्चर्यानं विचारलं. 

“ मुद्दामच ”

“ भेटली होती का?.”

“ खूप दिवसात भेट नाही आणि फोन पण नाही ”

“ बघ,मी सांगत होते तसंच झालं. परिस्थिती बदलली अन ही बयासुद्धा..”

“ जाऊ दे. यावर बऱ्याचदा बोललोय.”

“ पण काही उपयोग झाला का?सगळं पालथ्या घड्यावर पाणी !!”

“ आई!!” रघू वैतागला. 

“ माझ्यावर कशाला ओरडतो. तिला खडसावून विचारायचं तेव्हा मूग गिळून गप्प बसलास.”

“ आता काय तिचं थोबाड फोडू म्हणजे तुझं समाधान होईल.”

“ शक्य आहे का?.”

“ अजूनही ती माझा मान ठेवते ”

“ इतक्या दिवसात साधी विचारपूस केली नाही.यावरूनच कळलं.”

“ तोंडाला येईल ते बोलू नकोस.”

“ अजून तिच्याबद्दल पुळका आहे.”

“ तू समजतीस तितकी वाईट नाहीये. आमच्यात काही गैरसमज झाले म्हणून.” 

“ कसला बोडक्याचा गैरसमज !! गरज संपली म्हणून सोडून गेली.”

“ असं काही नाही. आमची मैत्री होती, आहे आणि पुढेही राहणार ”

“ रघ्या,अगदी भोळा सांब आहेस रे !!”

“असू दे ”

“ मला वाटलं त्यापेक्षा ती जास्त चलाख निघाली. फसलेला प्रेमविवाह, तुटलेलं माहेर आणि घटस्फोट अशा पाठोपाठच्या घटनांमुळे एकटी होती. अशावेळी नेमका तू भेटलास, आणि तिला हवा असलेला आधार मिळाला.”

“ मग त्यात वाईट काय झालं ? ”

“ तिच्या बाजूनं म्हणशील तर काहीच नाही. तुझ्यामुळे ती सावरली. आत्मविश्वास परत मिळाला.आयुष्य मार्गी लागलं. हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर मोठया कंपनीत ऑफिसर झाली.”

“ चांगलंच झालं ना ”

“ हो ..  पण तू जिथं होतास तिथंच राहिलास. नुकसान तर तुझंच झालंय.”

“ नोकरी, स्वतःचं घर, खाऊन पिऊन सुखी. अजून काय पाहिजे “ 

“ यापलीकडे सुद्धा आयुष्य असतं. परिस्थिती, वस्तुस्थिती आणि मालती सगळं बदललं. तू नाहीस.  अजून  किती दिवस असा कुढणार.? ”आई चिडली.

“ मागचं विसरायचा प्रयत्न करतोय. तूच पुन्हा विषय काढलास ”

“ तुमची जोडी छान होती, परंतु मनात धास्ती होती.”

“ कसली ? ”

“ ती कधीही सोडून जाईल याची.”

“ असं वाटायचं कारण?” 

“ दोघांचे टोकाचे स्वभाव !! तू हळवा तर ती व्यवहारी. तू चटकन भावूक होणारा तर ती फटकळ, नको इतकी स्पष्ट बोलणारी. तू आहे त्यात समाधान मानणारा तर ती प्रचंड महत्वकांक्षी .”

“ तरीही आम्ही एकमेकांना समजून, सांभाळून घेतलंच ना. आमचं छान नातं होतं. ”

“ डोंबलाच नातं !! एकमेकांच्या प्रेमात होतात .”

“ आधी होतो..  पण स्वभावातला फरक लक्षात आल्यावर सावरलो. नंतर फक्त मैत्री होती.”

“ आता तर ती सुद्धा राहिली नाही. तुमचे मार्ग वेगवेगळे आहेत. तू अजूनही झुरतोयेस. ती मात्र आयुष्यात स्थिरावली. आता ती थांबणार नाही. पुन्हा लग्न करून मोकळी होईल ”

“ माहितेय ”

“ आणि तू काय असाच दुसऱ्याला मदत करण्यात आयुष्य घालवणार? अजून किती दिवस भलेपणाची मशाल घेऊन फिरणारेस ? ”

“ शक्य होईल ती मदत करत रहायचं.”

“ म्हणजे लोकांना स्वतःला वापरायला द्यायचं.असंच ना.”

“ तुझ्या मनात मालतीविषयी पहिल्यापासूनच अढी होती. कामाच्या व्यापात आमच्या भेटीगाठी, बोलणं कमी झाल्या. एवढंच, बाकी काही नाही. नोकरीत स्थिरावल्यावर मालती जास्तच फटकळ,आक्रमक झाली हे देखील मान्यय.”

“ याविषयी सावध केलं होतं..  पण तू लक्ष दिलं नाही.”

“ जे झालं ते झालं.आता त्यावर चर्चा करून काय उपयोग !! तिच्याविषयी राग नाही. अडचणींवर मात करत तिनं मिळवलेल्या यशात खारीचा वाटा आहे याचाच आनंद आहे.”

“ त्याच खारीच्या वाट्याची किंमत पाठवलीय. हे घे ”

“ म्हणजे? ” आईनं पाकीट रघूच्या हातात दिलं. पन्नास हजाराचा चेक पाहून रघूला मोठा धक्का बसला. प्रचंड राग आला. मनात खूप खोलवर जखम झाली. 

“ तुझ्या मदतीची चांगली परतफेड केलीय.” आई. 

“ काय बोलू !! तू तिला बरोबर ओळखलं मीच तिला समजून घ्यायला चुकलो. तुझा विरोध डावलून भाड्यानं खोली घेऊन दिली. लोक काय म्हणतील याची पर्वा केली नाही. आमच्याविषयीचे टोमणे, शेरेबाजी सगळं सगळं सहन केलं, पण तिची साथ सोडली नाही. त्याचं हे फळ मिळालं.” .. रघू.

“ आता काय करणायेस ? ”

“ हा भिकेचा चेक परत पाठवणार. ”

“ शाबास !! आवर्जून तिला सांग की सगळ्याच गोष्टी पैशात मोजायच्या नसतात. काही नाती ही व्यवहारा-पलिकडची असतात. ”.

“ हा चेक म्हणजे आमच्या नात्याचा पूर्णविराम.” 

“ दुनियदारीत बऱ्याचदा स्वार्थ हा भावनेपेक्षा मोठा ठरतो. चेष्टा होईल इतकंही माणसानं चांगलं वागू नये.” .. .. आई 

“ खरंय !! आतापर्यंत ऐकलं होतं की माणसं गरजेपुरती वापरली जातात आणि गरज संपली की??? माझ्या बाबतीत तेच घडलं. एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की मालतीला खूप जवळचं, हक्काचं माणूस समजत होतो पण तिच्यासाठी मी फक्त एक टिश्यू पेपर…….” .. भरून आल्यानं रघू पुढे बोलू शकला नाही.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आक्रित — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ आक्रित ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आज सकाळी मंजिरी बँकेत, ऑफिसला पोहचली, तर ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय होता. धनश्री परांजपेंनी, म्हणजे असिस्टंट मॅनेजरने स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिलाय, तोही आगाऊ नोटीस न देता, लगेच स्वेच्छानिवृत्ती हवीय. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. काय कारण असेल यावर तर्क – वितर्क आणि चर्चा सुरू झाली होती. शेवटी चीफ मॅनेजरने केबिनमधून बाहेर येऊन, ‘आता कामाला लागा’, अशी आज्ञावजा सूचना केली, तशी प्रत्येकजण आपापल्या जागेवर गेला. काम करता-करताही एकीकडे कुजबुज चालू होतीच या विषयावर ! 

धनश्री मॅडम म्हणजे मूर्तिमंत उत्साह ! परांजपे आडनावाला शोभणारा केतकी वर्ण, किंचित तपकिरी झाक असलेले घारे पण चमकदार डोळे, अगदी चाफेकळी नाही, पण चेहऱ्याला शोभणारं सरळ नाक, एकूण चेहऱ्यातच गोडवा होता त्यांच्या. कमरेपर्यंत लांब केस, बऱ्याचदा फक्त छोट्या पिनेत अडकवलेले असायचे. वय पंचावन्नच्या आसपास, उंची साडेपाच फूट आणि सुखवस्तूपणा दर्शवणारा पण आटोपशीर बांधा. साडी/ड्रेस साधाच पण नीटनेटका आणि फेसपावडर व्यतिरिक्त कोणतंही प्रसाधन त्या वापरत नसत. 

नेहमी हसतमुख आणि सगळ्यांशी मिळून-मिसळून राहण्याचा स्वभाव. हं पण कामात हयगय केलेली नाही चालायची अजिबात ! मग एकदम दुर्गावतार धारण करायच्या त्या ! पण हे फारच क्वचित घडायचं. शक्यतो गोड बोलून, समजावून काम करण्याची त्यांची पद्धत होती आणि स्वतः कोणतंही काम करायची तयारी असायची. एकदम झोकून देऊन काम करणार ! यामुळे सगळा स्टाफ त्यांच्या प्रेमात असला तरी आदरयुक्त धाकही होता त्यांचा ! त्यांचे यजमान एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी होते. सासू – सासरे कधी पुण्यात मोठ्या दिरांकडे तर कधी अमरावतीला या मुलाकडे असायचे. 

त्यांची दोन्ही मुलंसुद्धा एकदम हुशार ! मुलगी तनया एम. बी. बी. एस. च्या शेवटच्या वर्षाला, मुंबईत हाॅस्टेलला होती. मुलगा सोहम इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर… नुकतंच इन्फोसिसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि तो मैसूरला नोकरीवर रुजू होणार होता. धनश्री मॅडम रोज ऑफिसला कारनेच यायच्या. म्हणतात ना एखाद्याला देव छप्पर फाड के देतो, अगदी तस्सच धनश्री मॅडमच्या बाबतीत होतं. 

घरात स्वैपाकाला बाई होती. पण यांना स्वतःला पण काही ना काही पदार्थ बनवायची भारी हौस होती. आणि मग ऑफिसला येताना तो पदार्थ मोठ्या डब्यात भरून आणायचा आणि सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालायच्या. करणंही एकदम टकाटक असायचं, एकदा खाल्लेल्या पदार्थाची चव कित्येक दिवस रेंगाळत राहायची सगळ्यांच्या मुखी. 

ऑफिसच्या कामात तर अव्वल होत्याच त्या. पण पिकनिक असो, हळदीकुंकू असो, कुठलाही विशेष दिवस साजरा करणं असो, सगळ्या उपक्रमातही तेवढ्याच उत्साहाने त्या सहभागी व्हायच्या. त्यांच्या हाताखाली जवळजवळ तीसेक कर्मचारी होते. पण कोणाला काय चांगलं जमतं, कोण काय काम करू शकतं याबाबत त्यांचं निरीक्षण आणि अंदाज अगदी अचूक असायचा. त्यामुळे या ब्रँचचा आणि मॅडमच्या नावाचा हेड ऑफिसमध्येही दबदबा होता. चीफ मॅनेजरना कधी प्रशासनिक कामांमध्ये दखल द्यायची वेळच यायची नाही धनश्री मॅडमच्या कर्तबगारीमुळे ! त्यामुळेच कोणाला काही न सांगता – सवरता त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज का केला हे सगळ्यांना कोडंच पडलं होतं.

मंजिरी धनश्री मॅडमच्या हाताखालची क्लासवन ऑफिसर. आता मॅडम नसल्याने सगळी जबाबदारी आत्तातरी तिलाच सांभाळावी लागणार होती. ती फ्रेश होऊन जागेवर आली आणि चीफ मॅनेजरनी इंटरकॉम करून तिला केबिनमध्ये बोलावलंच. त्यांनी जे सांगितलं त्यावर तिचा विश्वासच बसेना. पण चीफना ही माहिती हेड ऑफिसमधून स्वतः पर्सनल मॅनेजरनी फोन करून सांगितली होती आणि पर्सनल मॅनेजरना धनश्री मॅडमचे पती आणि मुलगी यांनी, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं भागच होतं. पण या प्रकाराची वाच्यता ती कोणाकडेच करणार नव्हती. मॅडमच्या आजवरच्या प्रतिमेला धक्का लागू नये याची काळजी ती नक्कीच घेणार होती. कोणावर कधी कशी वेळ येईल काय सांगावं? 

धनश्री मॅडमचा मुलगा पुढच्या आठवड्यात मैसूरला नोकरीवर रूजू होणार होता. त्यासाठीच मॅडमनी पंधरा दिवस रजा घेतली होती. त्याला भेटण्यासाठी त्यांची मुलगीदेखील मुंबईहून आली होती. आठ दिवसांपूर्वी संध्याकाळी आई आणि दोन्ही मुलं काही खरेदी करण्यासाठी माॅलमध्ये गेले होते. खरेदी करून पेमेंट करून बाहेर पडताना सिक्युरिटीने नेहमीप्रमाणे त्यांच्या बॅग, पर्स तपासल्या आणि.. आणि… त्यांना बाहेर पडायला मनाई केली… ..  

… धनश्री मॅडमच्या हातातल्या छोट्या पर्समध्ये चार-पाच वस्तू अशा सापडल्या होत्या, की ज्या त्यांनी बिलिंग काउंटरवर दाखवल्या नव्हत्या आणि त्याचे पैसे दिले नव्हते. बरं वस्तू तरी काय? तर नेलपेंट, कंगवा, कॅडबरीसारखं एक चाॅकलेट, की-चेन, रंगीत खोडरबर अशा, की ज्याची किंमत जेमतेम शंभर-दीडशे रुपये झाली असती. पण त्या सर्व वस्तूंवर माॅलचा टॅग तर होताच. मॅडमच्या त्या पर्समध्ये सात हजार कॅश, दोन ए. टी. एम. कार्ड सुद्धा होती. ती बघून तो सिक्युरिटीसुद्धा गोंधळात पडला, की ही बाई अशा फालतू वस्तू का चोरेल? 

धनश्री मॅडमनी पण आश्चर्य व्यक्त केलं की या वस्तू माझ्या पर्समध्ये कशा आल्या? तनया आणि सोहम एकदम चकितच झाले. पण त्यांनी आईचा काहीतरी गोंधळ झाला असावा असं म्हणून बाजू सावरून घेतली. काउंटरवर जाऊन साॅरी म्हणून त्या वस्तू परत केल्या. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आईच्या कपाटात इस्त्रीचे कपडे ठेवताना, तनयाला एक प्लॅस्टिकची हँडबॅग दिसली. उत्सुकता म्हणून सहज तिनं बघितलं तर लहान – मोठ्या अनेक वस्तूंचा खजिनाच तिच्या हाती लागला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यात चष्मा, लिपस्टिक, फेसवाॅश, छोटी कार, मनीपर्स अशा ज्या वस्तू सापडल्या त्या तिची आई वापरणं शक्यच नव्हतं.

ती आईला बोलावून विचारणारच होती, हे कोणाचं सामान आहे म्हणून. पण तेवढ्यात तिला त्या बॅगेत तिच्याच मैत्रिणीनं वाढदिवसाला दिलेला एक शो पीस सुद्धा दिसला. जो दुसर्‍याच दिवशी तिच्या खोलीतून गायब झाला होता आणि सगळीकडे शोधून सापडला नाही म्हणून तिनं घर डोक्यावर घेतलं होतं. 

तनया वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. हे काही तरी वेगळं आहे. कालचा माॅलमधला प्रसंग तर ताजाच होता. तिनं ती बॅग गुपचूप तशीच जागेवर ठेवून दिली. मग तिनं सोहमला आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. ती दोघं मग कालच्या माॅलमध्ये गेली. तिथल्या मुख्य व्यवस्थापकाशी बोलून त्यांनी काल संध्याकाळचं सी. सी. टि. व्ही. फूटेज दाखवण्यासाठी त्यांना विनंती केली. आणि ते खरेदी करत असतानाचं चित्रीकरण बघताना, आपल्याला आलेली शंका रास्त आहे, याबद्दल तनयाची खात्रीच पटली. कॅमेऱ्यात धनश्रीनेच त्या वस्तू आपल्या पर्समध्ये टाकल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिनं समजावून सांगितल्यावर सोहमही तिच्याशी सहमत झाला. 

तनयानं तिच्या मैत्रिणीच्या आईशी संपर्क साधला, जी मानसोपचार तज्ज्ञ होती. तिनं हा क्लॅप्टोमेनिया नावाचा आजार असू शकतो असं सांगितलं. हा एक आवेग नियंत्रण विकार आहे. या आजारात व्यक्तीमध्ये कोणतीही वस्तू चोरण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मग ती वस्तू तिच्या उपयोगाची असो किंवा तिला त्या वस्तूचे काही महत्त्व असो नसो. ही व्यक्ती चोरी करण्यापूर्वी तणावात असते आणि चोरीनंतर तिला आनंद, समाधान मिळते. अशा व्यक्तींना चोरी करण्याची इच्छा किंवा आवेग इतका तीव्र असतो, की त्या स्वतःला थांबवूच शकत नाही. या व्यक्ती सहसा सार्वजनिक जागा म्हणजे दुकानं, सुपरमार्केट, ऑफिस अशा ठिकाणी चोरी करतात. काही वेळा ओळखीच्या किंवा मित्रांकडील समारंभातही चोरी करतात. या चोरीतून त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नसतो. या व्यक्तींना आपण पकडले जाऊ, आपल्यावर चोर असा शिक्का लागेल  अशी जाणीवही अनेकदा असते, पण त्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. 

क्लॅप्टोमेनिया होण्याचं निश्चित कारण अजून ज्ञात नाही. त्यावर संशोधन चालू आहे. हा आजार कोणत्याही वयात आणि कोणालाही होऊ शकतो. मेंदूतील सेरोटोनिन या संप्रेरकाची खालावलेली पातळी हे त्याचं एक कारण असू शकतं. कारण हे सेरोटोनिन आपल्या भावना आणि कृतीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतं. आतापर्यंत या रोगावर ठोस, सुयोग्य उपचार नाहीत. पण मानसिक आरोग्याशी निगडित उपचार घेणे आवश्यक आहे. आणि या उपचारांचा कालावधी निश्चित सांगता येत नाही. म्हणूनच धनश्री मॅडमच्या घरच्या मंडळींनी विचार – विमर्श करून आणि त्यांचं समुपदेशन करून, स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायला त्यांना तयार केलं होतं. त्यामुळे योग्य उपचारासाठी त्यांना वेळ मिळणार होता. ऑफिससारख्या ठिकाणी अनुचित प्रकार होऊन त्यांची मानहानी होऊ नये हाही उद्देश होताच. 

दोन-तीन दिवसात मॅडमच्या जागी कोणाचीतरी नियुक्ती करण्यात येणारच होती. कारण ऑफिसच्या कामाच्या दृष्टीने हे जबाबदारीचं पद रिकामं ठेवता येणार नव्हतं. मॅडमचं टेबल नवीन येणाऱ्या मॅनेजरसाठी व्यवस्थित आवरून ठेवण्याची जबाबदारी चीफनी मंजिरीवर टाकली होती. संध्याकाळी काम आवरून आणि बहुतेक सगळे जण गेल्यावरच तिनं ते करायला घेतलं. त्या टेबलच्या उजव्या बाजूच्या खालच्या ड्राॅवरमध्ये मंजिरीला कर्मचाऱ्यांच्या अनेक वस्तू आढळल्या, ज्या नजीकच्या काळात हरवल्या होत्या. छत्री, लंचबाॅक्स, पंचिग मशीन, स्टॅपलर, पेपरवेट ज्यावर वस्तू कोणाची हे ओळखू येण्यासाठी कर्मचारी आपलं नाव कोरून अथवा काही तरी खूण करून ठेवत. पण त्याचं मूल्य किरकोळ असल्याने त्याचा फारसा गाजावाजा कोणी केला नव्हता. मॅडम रजेवर गेल्या काय आणि आता अशा प्रकारे स्वेच्छा निवृत्ती घेतात काय, मंजिरीला सारंच अतर्क्य वाटत होतं. —- 

 — आता धनश्री मॅडमवर मानसोपचार सुरू आहेत व त्यातून त्या बऱ्या होतील याकडे कुटुंबातील सर्वांचंच लक्ष आहे. 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वस्तिक… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्वस्तिक… भाग-2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपाण पाहिले –  भिंतीवरचे म्युरल पाहत असताना डीव्हींचा चेहरा अधिकाधिक शांत होत गेला.  क्षणभर त्यांच्या मनात आलं स्वस्तिक हेच त्यांचं अस्तीत्व. अखंड सोबत.  एक अदृश्य मार्गदर्शक आणि सहजच त्यांचा हात गळ्यापाशी गेला. ता इथून पुढे)

आयुष्याच्या ओघात तसे बदलही  खूप झाले. आई गेली तेव्हा दुःख झालेच, पण जेव्हा वासूचे अकस्मात निधन झाले तेव्हां डीव्ही पार कोसळले.  एक अंग गळून पडल्यासारखं त्यांना वाटलं.  डीव्ही  हे नावच त्यांना तुटल्यासारखं वाटलं.  स्वस्तिक म्हणजे दोन रेषा, एक आडवी एक उभी.  एक रेषा जणूं पुसली.  हा आघात खूप मोठा होता.  पण हळूहळू त्यातूनही सारं काही सावरलं गेलं. आयुष्य पुढे जातच.  जावं लागतं.

स्वस्तिकचा पसारा वाढतच होता.  आता वयात आलेली त्यांची उच्चशिक्षित तरुण  मुलं आणि सुनाही हळूहळू प्रवेशत होत्या.  नाविन्य येत होतं. आधुनिकतेतनं रूप पालटत होतं.  अधिक मोठं, त्याहून मोठं! अधिक वेगळं, दैदीप्यमान, जे आजपर्यंत नव्हतं ते आता प्रथमच, या भव्यतेत,  दिव्यतेत डोळे दिपवून टाकणाऱ्या स्वप्नांच्या प्रदेशात, एक एक पाऊल पुढे जात असताना नक्की काय झाले कळलेच नाही.  वाटेतच काही गणितं चुकली.  आराखडे चुकले.  अंदाज खोटे ठरले.  आश्वासनं  पोकळ ठरली. फसवणूक झाली की झेपच पेलवली नाही?  कित्येक कोटींच्या ड्रीमलँड प्रोजेक्टमध्ये इन्वेस्टरची पंधरा टक्के गुंतवणूक झालेलीच होती. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झालेल्या असतानाही काही परदेशी बँकांनी मंजूर केलेली कर्जे ऐनवेळी देण्यास नकार दिला.  आणि सगळी उलथापालथ  झाली.  आधी घेतलेली स्थानिक बँकांतील कर्जे, त्यांचे हप्ते, कॅश क्रेडिट चे अकाउंट्स, स्टॉक अकाउंट्स  सर्वांच्या हिशोबात प्रचंड गडबड झाली. नोटिसांवर नोटीसा येऊ लागल्या.  वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या उलट सुलट बातम्यांमुळे चालू प्रोजेक्ट्सना खिळ बसू लागली. आणि या सगळ्यांमध्ये गुंतवलेला पैशांचा धबधबा एकदम कोसळला.  संपूर्ण आयुष्य डेबिट झालं. प्रचंड उणे.  मायनस.

” अहो माझं ऐकून तरी घ्या!”  या विनवण्यांना कायद्यामध्ये सहानुभूती नसते.  गुन्हेगारीच्या चक्रात डीव्ही पार अडकले.

” माणसं दिसतात तशी नसतात,  अखेर पैसाच माणसाला विचलित करतो.  वाममार्गाला नेतो.”

” काय गरज होती यांना? हे असे फसवणुकीचे धंदे करण्याची? ”

” लोक केवळ यांच्या नावावर भुलले आणि यांनी काय केलं स्वतःच्या झोळ्या भरल्या. भोगा आता.”

“विश्वासघातकी,भ्रष्टाचारी, चोर”

अशा अनेक तलवारींनी डीव्हींच्या काळजावर अक्षरशः वार केले.  प्रॉपर्टीज सील होत होत्या.  अटक सत्रं चालू होती.  मुलं, सुना कुठे कुठे दूर देशी नातेवाईकांकडे निघून गेले. काही हितचिंतकांनी डीव्हींनाही पळून जाण्याचा सल्ला दिला.  त्यातले काही राजकीय वर्तुळातलेही होते.

पण डीव्ही. शांत होते. अविचलित होते.  पलायनवाद त्यांना मान्य  नव्हता. चूक झाली होती. शिक्षा भोगायला हवी. त्यांना अजून अटक झालेली  नव्हती.  तत्पूर्वी न्यायालयीन चौकशी समिती समोर होणाऱ्या चौकशीला ते सामोरे जाणार होते.

ते सकाळी उठले.  नित्य नियमाप्रमाणे सर्व अटपून त्यांनी मनोभावे पूजा केली.   त्यांच्या पत्नीने, सावित्रीने पूजेची सर्व तयारी साग्रसंगीत केलेलीच होती.  सुरेख सजवलेल्या रांगोळीत स्वस्तिक रेखाटलेला होता.

डीव्ही ध्यानस्थ बसले.

स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि:|

स्वस्तिन बृहस्पतिर्दधातु||

ॐ शांती: शांती: शांती :

घरातून निघताना पत्नीने हातावर दहिसाखर ठेवले. म्हणाली,

” तुम्ही नक्की यातून बाहेर याल.  माझी खात्री आहे. काळजी नसावी. जाणून-बुजून न केलेली घटना गुन्हा ठरू शकत नाही.  काहीतरी मार्ग नक्कीच निघेल.”

सदाशिव बॅग घेण्यासाठी आत आला. तेव्हा ते त्याला म्हणाले,

” आज गाडी काढू नकोस.  मी रिक्षाने जाणार आहे.”

कोर्टात रिक्षातून बाहेर उतरणाऱ्या डीव्हींना पाहून पत्रकार, चॅनल्स वाले यांची धावाधाव झाली.

” काय हो डीव्ही? आज रिक्षातून? तुमच्याकडे अठ्ठावीस गाड्या आहेत ना ? सगळ्या जप्त?”

“मग नेमकं काय वाटते तुम्हाला?  आज तुम्हाला अटक झाली तर?”

” तुम्ही हे सारं करताना तुमच्या प्रतिमांचाही विचार केला नाही का?”

गर्दीतून वाट काढत काढत डीव्ही चौकशी दालनात पोहोचले. अॅड. झुनझुनवाला  त्यांच्या सहकारी वकीला सोबत थोड्यावेळाने आले.  त्यांनी डीव्हींना नजरेनेच इशारा केला.

चौकशी समितीत  मोठ्या टेबलासमोर, उंच खुर्च्यांवर चार दिग्गज न्यायाधीश स्थानापन्न होते.  डीव्ही त्यांच्यासमोर शांत बसले होते.  वातावरणात कमालीची सभ्यता होती.  सहानुभूतीपूर्वक आदरही होता.

हळूहळू चौकशी प्रक्रिया उलगडत गेली.  डीव्हींनी गळ्यातल्या स्वस्तिकास स्पर्श केला.   आज ते शुभ्र, पांढऱ्या कुर्ता पायजम्यात होते. त्यांच्या गोऱ्या गळ्यात सोन्याचा स्वस्तिक चमकत होता.

विषयाला सुरुवात झाली. शपथेचं  सत्र संपलं.

“मिस्टर दिनकर भास्कर वसिष्ठ,  तुमच्या ड्रीमलँड प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही एकूण तीन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाची फसवणूक केलेली आहे.  असा तुमच्यावर आरोप आहे तो तुम्हाला मान्य आहे का?”

” नाही. माझ्या हातून चूक झालेली आहे हे खरं आहे. माझे हिशोब चुकलेत, अंदाज चुकलेत गणित चुकलंय. फसवणुकीचा कुठलाही माझा उद्देश नव्हता.  आणि मी या सर्व रकमेची परतफेड करण्याची हमी आपणास देतो. मला फक्त थोडा वेळ द्यावा एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे”

” पण कशी परतफेड करणार?  इतकी मोठी रक्कम तुम्ही कशी उभी करणार? ”

” माझे वकील माझ्या स्थावर जंगम ,रोख मालमत्तेचे स्टेटमेंट  देतील त्यासाठी मी आपणास विनंती करतो की माझ्या वकिलांना आपण परवानगी द्यावी.”

पुढील सर्व कायदेशीर बाबी अॅडवोकेट झुनझुनवालांनी अतिशय कुशलतेने पार पडल्या.  आणि शेवटी ते कोर्टाला उद्देशून म्हणाले,

” युवर ऑनर, माझे अशील  एक प्रतिष्ठित, नामांकित, धार्मिक वृत्तीची व्यक्ती आहे.  आजपर्यंत त्यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही.  कुणाची फसवणूक केलेली नाही.  त्यांचे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. आणि या व्यवसायात ते गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहेत. अनेक सामाजिक प्रतिष्ठानांवर ते पदाधिकारी आहेत. आणि डीव्ही एक दानशूर व्यक्तिमत्व आहे.  ते कुणाची जाणून-बुजून फसवणूक का करतील?  कायद्याप्रमाणे जरी हा गुन्हा असला तरी ही एक निव्वळ चूक आहे.  म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना एक संधी द्यावी.  त्यांची सील केलेली सर्व मालमत्ता मोकळी करावी.  त्यांना अटक करू नये म्हणजे त्यांना त्यांच्या मालमत्तेचा योग्य विनियोग करून रक्कम उभी करता येईल व परतफेड करणे त्यांना शक्य होईल.  कोर्टाने तसा पुरेसा वेळही त्यांना द्यावा.एव्हढीच माझ्या अशिलातर्फे मागणी आहे.”

आरोपी, गुन्ह्याचे स्वरूप, आरोपीचे सामाजिक स्थान, कायदा, कायद्यातील तरतुदी, मर्यादा, चौकटी आणि त्या बजावणाऱ्यांची मानसिकता याचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित, पण कोर्टाकडून डीव्हींना एक संधी देण्यात आली.  हा एक ऐतिहासिक निर्णय होता.  पण ते न्यायदानाच्या प्रक्रियेत घडलं.  त्यांची सर्व मालमत्ता मोकळी करण्यात आली.  त्यांना तूर्त तरी अटक झाली नाही.  वेळेची मर्यादा त्यांना देण्यात आली. त्या क्षणी तरी हा डीव्हींचा अंशतः विजयच होता.

इतिहासात,पुराणात असे घडले आहे. राजा हरिश्चंद्राला राज्य सोडावे लागले. शिवरायांचे सर्व गड ,किल्ले एका तहात त्यांना द्यावे लागले. रामाला,पांडवांना वनवास घडला. यादवीत युगंधराचाही अंत झाला. नियती, कालचक्र..

डीव्हींनी दिलेला शब्द पाळला.  त्यांच्या चारित्र्याला लागलेला फसवणुकीचा, अनैतिकतेचा कलंक पुसला गेला. एक राज्य गेलं. एक साम्राज्य संपलं .पण एक व्यक्ती उरली. शुभ्र निष्कलंक .कदाचित पुन्हा नव्याने राज्य उभं करण्यासाठी त्यांना यातूनही सामर्थ्य मिळेल. श्रद्धेनं जपलेली आपली प्रतिकंच आपल्याला शक्ती देतात. नियतीचं आवाहन पेलण्याचं बळ देतात. कुठल्याही परिस्थीतीत तटस्थ ठेवतात.

गळ्यातल्या स्वस्तिकाला निरखत डीव्ही.हळूच पुटपुटले

कल्याणमस्तु।।

– समाप्त – 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वस्तिक… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्वस्तिक… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

काल रात्री डीव्ही  पाणी प्यायला उठले आणि त्यांच्या लक्षात आले की गळ्यातला ताईत  पडलाय.  ते थोडेसे विचलित झाले, काहीसे भयभीतही झाले. पाणी पिऊन पटकन बेडपाशी आले तेव्हां उशीवर  त्यांना त्यांचा ताईत दिसला.  त्या अंधुक प्रकाशात त्यातले सोन्याचा सुरेख कमनीय स्वस्तिक चमकले.  डीव्हींना एकदम हायसं वाटलं.  त्यांनी तो पटकन उचलला आणि पुन्हा गळ्यात घातला.

अजून रात्र बरीच बाकी होती.  त्यांनी डोळे मिटले आणि झोपण्याचा प्रयत्न केला.  शेजारी सावित्री— त्यांची पत्नी शांत झोपली होती.  त्यांनी पुन्हा गळ्यातल्या स्वस्तिकाला स्पर्श केला. 

तेव्हां आई म्हणाली होती,

” दिन्या! आज मी गुरुजींकडे गेले होते. त्यांना तुझी पत्रिका दाखवली. बराच वेळ ते निरखत होते.  लांबलचक आकडेवारी लिहीत होते.  म्हणाले,” माई छान आहे  पत्रिका. तुझा दिन्या नाव कमावणार.  खूप मोठा होणार. यशस्वी, कीर्तीवंत! स्वतःचे एक साम्राज्य उभं करणार तो. पण पत्रिकेत स्पष्ट दिसतंय की पनवतीचे काही टप्पे अवघड आहेत.  मी  एक ताईत देतो. यात एक स्वस्तिक आहे तो त्याचं सदैव रक्षण करेल.  आयुष्यभर त्यांनी तो गळ्यात ठेवावा.”

तेव्हांपासून आजतागायत तो गळ्यात आहे. कधीच काढला नाही. पण दिन्या ते डीव्ही या आयुष्याच्या एका दिमाखदार प्रवासात गळ्यातल्या या स्वस्तिकाने कशी काय साथ दिली याचाही कधी विचार मनात आला नाही. कित्येक वेळा तो आपल्या गळ्यात आहे याचाही विसर पडला असेल.  मात्र एक, आई असताना आणि ती गेल्यानंतरही आजपर्यंत डीव्हींनी कधीही तो काढला नाही.

जेव्हां जेव्हां डीव्ही आईला भेटायला जात, तेव्हां तेव्हां आई त्या स्वस्तिकाकडे बघूनच म्हणायची,

” मोठा झालास. नाव कमावलंस, खूप मोठी ओळख स्वतःची मिळवलीस, राज्य उभं केलंस.  आज कितीतरी लोकांची कुटुंबं तुझ्यावर अवलंबून आहेत, पण लक्षात ठेव यात आपलं काही नसतं बरं! सारं तो करतो! त्याला विसरू नकोस. सदैव जमिनीवर राहा.  आयुष्यात वाटा खूप असतात रे!  पण सरळ वाटेवर चालत रहा.”

डीव्हींनी कूस बदलली. पहाट व्हायची ते वाट बघत होते. उद्या सकाळी अकरा वाजता कोर्टात अंतिम सुनावणी आहे. न्यायालयीन चौकशी समोर त्यांना सामोरे जायचं आहे.अॅडव्होकेट झुनझुनवालांचा रात्रीच फोन आला होता.

” डीव्ही, तशी आपली बाजू भक्कम आहे. तुमच्याकडून मुद्दामहून  गुन्हा झालेला नाही.  फसवणूक करण्याचा तुमचा हेतूही नाही.  तुम्ही फक्त एका अचानक आलेल्या वादळात अडकलात आणि मग एक एक पाऊल निसटत गेलं .हे सर्व आपल्याला खंडपीठांसमोर नीट विश्वासार्ह पद्धतीने मांडायचं आहे.  निर्णय काय लागेल ते आत्ताच सांगू शकणार नाही. पण प्रयत्न करूच.  आणि अपेक्षित प्रश्नांना कसे सामोरे जायचे, काय उत्तर द्यायचे याची पूर्वकल्पना मी तुम्हाला दिलेलीच आहे.  तेव्हां धीर ठेवा, सावध राहा.   लेट अस होप पॉझिटिव्ह!”

वास्तविक या व्यवसायात येण्याचं कुठलंही स्वप्न डीव्हींनी कधीच पाहिलं नव्हतं.  दिन्या नावाचा एक मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातला माणूस काय स्वप्न बघणार? एक पदवी, एक नोकरी, एक घर, समंजस पत्नी, गुणी मुलं, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ आणि अखेर एक समाधानी निवृत्ती!  पण सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असूनही कुठेही नोकरी मिळत नव्हती.  प्रचंड नैराश्य आलं होतं.  अजूनही आपण कुटुंबाचा आधार बनू शकत नाही या भावनेने जगताना निरुपयोगी असल्यासारखं वाटत होतं.  अगदी आत्मघाताचेही विचार मनात घोळत होते.  आत्मविश्वास पार डळमळला होता  त्याचवेळी गळ्यातल्या स्वस्तिकाला सहजपणे केलेला तो स्पर्श एकाएकी खूप आश्वासक वाटला होता.  त्याही क्षणी क्षणभर मनात आलं होतं,’ खरंच असं काही असतं का? तर्कबुद्धीच्या पलीकडे या संकेतांना नक्की काय अर्थ असतो?’

पण योगायोगाने वासू भेटला.  एका इराण्याच्या हॉटेलात. दिन्या  चहा पीत होता.  वासूनेच जोरात हाक मारली,

“अरे दिनकर?”

दिन्या निराशच होता.  नुकतीच नोकरीसाठी एक मुलाखत देऊन तो आला होता.  आणि अपयशाचीच शंभर टक्के खात्री होती.  त्यामुळे चेहरा उदास, पडलेला, निराश.

“अरे दिनकर? दिनेश स्कॉलर? काय चाललंय तुझ्या आयुष्यात? काय करतोस? कुठे असतोस? “

दिन्या शांतपणे म्हणाला होता,

“काहीही नाही.”

आणि मग दिन्याने जे आहे ते सारं वासूला सांगितलं.

भरदार अंगाच्या, धष्टपुष्ट, उंच ताड वासुने दिन्याच्या हातावर जोरात टाळी मारली.  आणि तो म्हणाला,

“अरे भावड्या!  हे बघ माझ्याकडे सॉल्लिड प्लॅन्स आहेत. या गावकूसाच्या बाहेर,  माझ्या नावावर आजोबांनी ठेवलेली एक जमीन आहे.  तो भाग पुढच्या दहा वर्षात प्रचंड गजबजणार आहे.  काही वर्षांनी ती उद्योगनगरीच होणार आहे.  सोन्याचा तुकडा आहे बघ.  आपण ती डेव्हलप करूया.”

“म्हणजे नेमकं काय ?”

“म्हणजे आपण एक प्रोजेक्ट करूया.  एक स्वयंपूर्ण नगरच बसवूया.  सदनिका, रो हाऊसेस, सर्व प्रकारची दुकानं,  मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी सुविधा, शिक्षण, आरोग्य याचा परिपूर्ण विचार करून थाटलेलं एक संपूर्ण नगर!”

वासुने जणू एक स्वप्नच दिन्याच्या हातात ठेवलं.

“हे बघ , जमीन माझी डोकं तुझं.  आजपासून तुझी आणि माझी टीम.  काय भावड्या जमतंय् का?”

“हो पण माझ्याकडे काहीच भांडवल नाहीय “

“त्याची काळजी तू करू नकोस.  तू कामाला लाग.  असा पॅव्हलीन  मध्येच आऊट होऊ नकोस.  मैदानात ये.  खेळ जमव. आपण साइटवर जाऊ आणि ठरवू  पुढचं.”

दिन्या काही बोलणार तोच त्याचं लक्ष वासूच्या गळ्यातलल्या ताईताकडे गेलं. अगदी हुबेहूब.  काळा दोरा आणि सोन्याचा सुरेख नक्षीदार स्वस्तिक. सहजच एक तार जुळली. प्रवाहाला प्रवाह मिळाला. आणि सुरुवात झाली.

आयुष्यात असही काही घडू शकत यावर विश्वास बसत नव्हता. पण ते घडलं. या पहिल्याच  स्वस्तिक प्रोजेक्टला उदंड प्रतिसाद मिळाला.  वासूने कायदेशीर बाबी, जाहिराततंत्र,  बुकिंग, सेल्स, पैशाचे नियोजन, बँकांचे व्यवहार सर्व काही अत्यंत कौशल्याने सांभाळलं.  आणि दिन्याने बौद्धिक, कल्पक, तांत्रिक, वेगवेगळे शास्त्रोक्त आराखडे, एलेवेशन्स, व्हिजीयुलायझेशनची सारी तंत्र चोख पाळली. यशाची एक वाट नव्हे, महावाटच सुरू झाली.  स्वस्तिक बिल्डर्स हे नाव प्रचंड गजबजलं. पेपरात फोटो, मुलाखती, पुढच्या प्रोजेक्टचे विचार वगैरे वगैरे सर्व काही विनासायास प्रवाहाबरोबर घडतच गेलं. 

“शहरात प्रथमच, ईको फ्रेंडली,निसर्गाच्या सान्निध्यात आगळे वेगळे आपलं घर!”अशी होर्डींग्ज झळकू लागली.

दिन्याचा डीव्ही झाला.  वास्तविक डीवी म्हणजे दिनकर आणि वासू. आणि दोघांचे मिळून स्वस्तिक, पण व्यावसायिक विश्वात, परिसरात, समाजात, देशात,  विदेशात डीव्ही याच नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली. दिनकर एक दिवस वासूला म्हणालाही होता,

“आपण दोघे म्हणजे वन सोल ईन टु बॉडीज् दोन रेषा,एका बिंदुतल्या.”

आणि नकळत दोघांनी आपले गळ्यातले स्वस्तिक असलेले ताईत सहज आनंदाने उचलले.

सगळं आयुष्यच बदलून गेलं.  राहणीमान, जीवन पद्धती, सारं सारं बदललं.  एका टिंबापासून झालेल्या सुरुवातीनं आख्खा पृथ्वी गोलच जणू पादाक्रांत केला.  देश विदेशात स्वस्तिक प्रोजेक्ट्स उभारले गेले.  पन्नास मजली टॉवर्स,  फिरती पंचतारांकित हॉटेल्स,  आरकेड्स,  हॉल्स, बँक्वेट्स हॉस्पिटल्स, आणि त्याचबरोबर इनसाईड आऊटसाईड मधले गुळगुळीत फोटो. 

दिन्या नावाचं मिटलेलं कमळ डीव्हींच्या रूपात उमलत गेलं.

कुटुंब आणि परिवाराबरोबरच एक व्यावसायिक आणि सामाजिक चेहरा दिन्याला प्राप्त झाला. काही हजारांचे कित्येक हजार कोटी झाले. 

एक दिवस डीव्ही असेच, नदीकिनारी असलेल्या त्यांच्या आलिशान बंगल्याच्या पॅटीओमध्ये शांत बसले होते. समोरच्या भिंतीवरचे म्युरल ते पाहत होते.  वास्तविक ते म्युरल म्हणजे त्यांच्या व्यवसायाचा लोगोच होता. एक सुरेख स्वस्तिक.  सूर्य, चंद्र, वायु, पृथ्वी,  लक्ष्मी,  विष्णु ब्रह्मदेव,  शिवपार्वती,  श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असणारं, शांती, समृद्धी आणि मांगल्यांचं  प्रतीक स्वस्तिक!  एकमेकांना छेदणाऱ्या दोन सरळ रेषा पुढे जाऊन विरुद्ध दिशेला वळलेल्या.

“स्वस्तिक क्षेम कायति इति स्वस्तिक:”

कुशलक्षेम, कल्याणाचे प्रतिक.

डीव्हींच्या आत, आईचा दिन्या अजूनही होता.  त्या दिन्याने मात्र समाजाभिमुख अनेक कामेही केली. लोकाभिमुख संस्थांना आर्थिक योगदान  दिले.  कितीतरी लाचार ओंजळी त्याने भरल्या.  कला, क्रीडा, धर्म, संस्कृती सर्व क्षेत्रात त्यांनी अर्थदान केले.  

भिंतीवरचे म्युरल पाहत असताना डीव्हींचा चेहरा अधिकाधिक शांत होत गेला.  क्षणभर त्यांच्या मनात आलं स्वस्तिक हेच त्यांचं अस्तीत्व.  अखंड सोबत.  एक अदृश्य मार्गदर्शक आणि सहजच त्यांचा हात गळ्यापाशी गेला.

  स्वस्तिक   क्रमश: भाग १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print