मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवोsहम्… भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ शिवोsहम्… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागच्या भागात प्रेम कथा लिहिणारी लेखिका, प्रेम कथा तिच्या पठडीतली कशी असावी हे सांगते…. आता पुढे)

३०—४० वर्षांपूर्वीची, सरू आणि विजयची प्रेम कहाणी माझ्या मनात अजून आहे. सरुने  हलकेच माळलेलं सोनचाफ्याचं पानासकट असलेलं फुल, चेहऱ्यावरचे लाजरे, बुजरे, काहीसे धुंद भाव आणि आतुरतेने त्या गावकुसाकडच्या पुलाखाली, खिशात हात घालून वाद घालणारा विजय. .या प्रेमात, लपून-छपून भेटी होत्या, चोरुन पाठवलेली पत्रं होती,चुंबने होती, धाकधूक होती, दु:खं होती,  घरच्यांनचा  विरोध होता,  वियोग ही होता!  पण तरीही ती  एक सफल प्रेम कथा होती. चारी अंगाने फुललेली  आणि विवाह बंधनात सुखरूप परिणती झालेली, सुरेख, गोजिरवाणी, स्वच्छ!

कल्पनांना एकसारखे धक्के बसत होते!  कधी कधी तर माझंच मला आतून ठकठकायचं.  हे सारे प्रवाह जुनाट, आऊटडेटेड वाटायला लागायचे.  माझे मलाच वाटायचे,  ज्या पिढीचं मी प्रतिनिधित्व करते, त्या पिढीच्या विचारांना, कल्पनांना, अनुभवांना आजच्या या नव्या बदलत चाललेल्या समाजाला खरोखरच काही महत्त्व आहे का? त्याहीपेक्षा काही उपयोग आहे का? आपण त्यांच्या पाठी की  पुढे आहोत? हा  एक गोंधळ वाढवणारा प्रश्न. पण मनाच्या एका अदृश्य पडद्यावर मला स्पष्ट दिसायची ती फक्त या नव्या समाजाची पाठच.  मीच आपली धावते त्यांच्या मागे.  माझ्याकडे जे काही थोडेफार आहे, त्याचं गाठोड घेऊन.  कधी कधी माझं मलाच ते जीर्ण, सुकलेलं, रसहीन, बेचव वाटते.  माझी प्रेम कथा तर अगदीच मुळमुळीत आहे असे वाटते. काही गरम मसाला नसलेलीच जाणवते.

प्रेमाचे रंग बदलत आहेत.  ते, अधिक उग्र, गडद डोळ्यांना सुखद वाटण्यापेक्षा, भयभीत,करणारे  रौद्र, भीषण, अचकट —विचकट झालेत. सूत्र प्रेमाचं आहे, गाभाही  प्रीतीचा आहे, पण ती मृदूता, तो मुलायमपणा कुठेतरी हरवलाय.

हे सगळं वाटायचं एक  कारण होतं.  अंतर्बाह्य ढवळून काढणारं,  हादरवणारं, धक्का देणारं, अगदी जवळच घडलेलं असं काही.  याच काळातली ती घटना.

त्याचं म्हणे तिच्यावर प्रेम होतं! वय वर्ष १९ . ती ही त्याच्याच वयाची. एकाच कॉलेजमधले, एकाच वर्गातले.  तिला तो आवडायचा म्हणे.  पण मित्र म्हणून.  तसे तिला मित्र खूपच होते.  ती होतीच छान!  आकर्षक,  गोरी, उंच,  सडपातळ, शिवाय हुशारही, पैसे वाली.  थोडक्यात अगदी सिनेमातल्या हिरोईन सारखी.  तशीच लांबलचक  गाडीतून यायची, शोफरने दार उघडल्याशिवाय गाडीतून उतरायची नाही. दिमाख, डौल होताच तिच्यात. 

त्याची नजर तिच्यावर गेली.  आणि त्याने ठरवलं,

” लग्न करायचं ते हिच्याशीच. नव्हे! ती आपली झालीच पाहिजे.”  तिच्या मनाचा विचार त्याच्या खिजगणतीतही  नव्हता.  ती दुसऱ्या कुणात गुंतली होती असेही काही म्हणता येणार नाही, पण त्याला मात्र ती सांगायची, अगदी विनवून विनवून,

” अरे मला तू आवडतोस! पण मित्र म्हणून.  मी काही तुझ्याशी लग्न वगैरे करणार नाही.”

त्याचे मित्रही त्याला चिडवायचे.  त्याची टिंगल करायचे.  त्याला आव्हान द्यायचे.  त्याच्या स्वप्नांना डिवचायचे.  तो तो त्याचा राग सळसळायचा.  अधिक चीड, अधिक संताप,  अधिक उद्रेक. टोकाची इर्षा. मनात अक्षरश: तांडव.

आणि एके दिवशी कॉलेजच्या आवारात ते घडलं. त्या कॉलेजच्या आवारातली जुनी वठलेली झाडंही थरथरली. किती युवा पिढ्या त्यांच्या छायेत वावरल्या  असतील! प्रेमाची कुंजनं, वियोगाचं कारुण्य, मनोभंगाची दुःखं, अश्रू सारं पाहिलं असेलच त्यांनी.  पिढ्या पिढ्यांच्या नात्यांचे, भावबंधांचे, अनुबंधांचे ते साक्षीदार होते. पण त्या दिवशी त्यांनी जे पाहिलं, अनुभवलं, त्यामुळे ते स्तब्ध झाले असतील.  मुळापासून कळवळले असतील.  त्यांची पानंफुलं मिटून गेली असतील. विदीर्ण झाली असतील.

तिचा आणि त्याचा बराच वेळ वाद झाला म्हणे! हिसका हिसकी झाली. तिने पाठ फिरवली  तरी त्याने तिचे हात खेचले.  तिने त्याला झटकलं. कडवट, कठोर तिरस्काराचे शब्द वापरले.  जळजळीत प्रतिकार केला तिने. त्याने डोळे विस्फारले.  छाती फुगवली. त्याच्यात बळ होतं.  शक्ती होती. त्याच्या नसानसात बेदरकारपणा  होता. संहार स्फुरत होता.  मग काही उरलं नाही. ना प्रेम ना ओलावा! ना दया ना करुणा. फक्त अहंकार, दुराभिमान, एक प्रचंड विकृत आत्मकेंद्रीतपणा.  सारं उपटून फेकून देण्याची वृत्ती.  एक विनाश.  एखाद्या प्रेमाचा फक्त एकच रंग.  लाल. लबलबीत, चिकट मनाची दुर्गंधी.

आता ती त्याचीही नव्हती आणि कुणाचीच नव्हती. सारं काही संपलं होतं.  उरल्या होत्या त्या फक्त चर्चा. सुरुवातीला दबक्या,  कळवळून केलेल्या आणि मग हळूहळू विरत जाणाऱ्या.  नव्हे! पुन्हा अशाच प्रकारच्या घटनांना बोथटपणे सामोऱ्या जायला लावणाऱ्या.

अशा साऱ्या पार्श्वभूमीवर, सामाजिक विकृतीच्या संदर्भात, माझी जन्माला येणारी प्रेमळ, लडिवाळ, हसरी रुसवी, राग —अनुरागाची प्रेम कथा एक सारखी हिंदकळत होती.  डळमळत होती. वास्तवतेच्या आणि अवास्तवतेच्या सूक्ष्म रेषेवर चक्क मरगळून गेलेली दिसत होती. 

एक दिवस सहज मनातलं कुणाजवळ तरी बोलावं म्हणून माझ्याच उमलत्या वयातल्या लेकीला मी म्हणाले,

” किती भयंकर घडलं नाही ग त्या कॉलेजमध्ये!”

तिच्या हातात भलं मोठं बर्गर होतं!  ते अख्खच्या अख्ख तोंडात घालतच तिने विचारलं,

” कशाबद्दल म्हणतेस मम्मी तू.?”

” अगं तुला माहित नाही? इतकं पेपरात रोज येत होतं ते! टीव्हीवरही तुम्हा कॉलेज तरुण— तरुणींच्या प्रतिक्रियांचाही कार्यक्रम झाला.  सूर हाच  होता, त्यानं तिची अशी हत्या करायला नको होतं. “नाही”म्हणायचा तिचा नैतिक अधिकारच होता.

” त्या दोन-तीन महिन्यापूर्वीच्या घटनेबद्दल बोलतेस का तू? काय मम्मी” अजुन तुझ्या डोक्यात तेच विचार आहेत? तू इतकी सेंटी होऊ नकोस. हे असं नेहमीच घडतं. एखादी घटना जरा जास्तच डिस्कस होते.  आजकाल हे काही नवीन नाही.  आधी प्रेमात पडायचं, फसवणूक झाली तर आत्महत्या करायची, नाहीतर तिचा किंवा त्याचा खून करायचा. सट्टॅक. फिनिश!  धिस इज लाईफ. आणि तू मला हेच का विचारतेस, त्याचाही मी अंदाज करू शकतेच. पण मी तुला सांगते, तू एवढा विचार नको करूस.  तुझी मुलं तशी नाहीयेत.  चांगली, विचारी, अभ्यासू, सरळ मार्गी सुसंस्कृत, आणि काय काय… तुला जशी हवी तशी आहेत. एवढं पुरे नाही का तुला?”

तिने ते भलं मोठं बर्गर संपवलं.  पाणी प्यायली आणि टीव्ही ऑन केला.  कुठला तरी इंग्लिश चॅनेल सेट करून त्यावरचं कार्टून पाहण्यात, ती पुढल्या काही सेकंदातच रमून गेली.

मी मात्र पहात राहिले तिचा कोरडेपणा. अलिप्तपणा. आपल्याच विश्वात मस्तपैकी रमायला लावणारा बिनधास्तपणा. 

सारं काही शांत झाल्यावर मी देव्ह्यारात  सांजवात केली. मंदपणे तेवणारी ज्योत, अन्  उदबत्तीचा संथ  सुगंध माझ्या डचमळणाऱ्या मनाला कुठेतरी आधार देत असल्यासारखं वाटलं. 

 मी पुन्हा घेऊन बसले, माझं अर्धवट राहिलेलं लिखाण. माझ्या कहाणीतल्या त्याला आणि तिला क्षणभर सुन्नपणे पाहिलं. मला त्यांच्याबाबतीत असं काही घडू द्यायचं नव्हतं पण  डोकं बधिर झालं होतं. शब्दसुद्धा सोडून गेलेत आपल्याला, असं वाटत होतं.  मी म्युझीअम मधल्या वस्तु जशा आपण कुतुहलाने पाहतो ना तशा सार्‍या घटनांना पाहत बसले.  माझ्या या कथेतल्या प्रेमिकांचा सारा अभिनिवेश जुनाट, मळका, गढूळ, धुळकट वाटला. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेले प्रेमाचे भावही अगदी शामळु वाटायला लागले.  एखाद्या कृष्णधवल चित्रपटातल्या नायक नायिके सारखे. केवळ गिमीक्स. वास्तवापासून दूर.अगदीच कृत्रीम. अनैसर्गिक.

पण का कोण जाणे! लिहूच नये  असेही वाटेना. या काळाचीच  प्रेमकथा मी  लिहावी का? वाचकांना तीच अधिक रुचेल. पण म्हणून, वास्तवाचा आग्रह धरुन समाजाला हे विकृत द्यायचं का? नाही.  हा  धुरळा जरा झटकता आला तर आतमध्ये अजूनही खूप काहीतरी शिल्लक आहे. जे मला जाणवत होतं. एक शांत, सुखावणारं, शीतल असं प्रेमरंगाचं मधुर मिश्रण!  तेच उलगडून दाखवायची गरज आहे. फक्त भडक, गर्द डोळ्यांना, केवळ रुद्रताच भासवणाऱ्या रंगात ते मिसळायला हवं, म्हणजे भीषणतेची, रौद्रतेची दाहकता कमी होईल. प्रेम म्हणजे नक्की काय असतं, याचा अविष्कार झाला पाहिजे. प्रेम म्हणजे हत्या नव्हे. प्रेम म्हणजे त्याग..

मी पुन्हा लेखणी हातात घेतली.  माझी प्रेम कथा सुंदर, स्वच्छ ,निर्मळ शब्दांची गुंफत गेले. मोगर्‍याच्या गजर्‍यासारखी. रुसणं, फुगण,! राग अनुरागात बांधलेली.  संहारापासून तर कितीतरी दूर. फक्त भावबंध जपणारी, गोड, मिठ्ठास. हातात हात गुंफणारी. जन्मोजन्मीची. साथसोबतीची.

मनाच्या गाभार्‍यात सहज एक ध्वनी घुमला.

कोहं? शिवोsहं!

शिव म्हणजे सुंदरही आणि संहारकही.

मला सुंदर लिहायचं होतं आणि संहारही करायचा होता.

विकृतीचा. अनैतिकतेचा, ओंगळतेच्या वास्तवाचा.

  – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवोsहम्… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ शिवोsहम्… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

एखादी प्रेम कथा लिहावी असं मनाशी ठरवलं, आणि त्या दिशेने मनात स्वाभाविकपणे काही प्रवाह वाहू लागले. 

तिची आणि त्याची एक प्रेम कहाणी. म्हणजे कहाणीत ती आणि तो असणारच.  कथेतली  “ती” सुंदर असायलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नव्हती..  पण पाहता क्षणीच म्हणा, अथवा काहीशा ओळखीने म्हणा,  त्याला ती आवडायला लागली. तोही अगदी काही सिनेमातला हिरो टाईपच हवा, असं नव्हे. पण त्याचं बोलणं, चालणं काहीसा हसरा, मिस्कील, विनोदी स्वभाव आणि बराचसा बिनधास्त पणा तिला आवडला आणि गुटर गु व्हायला लागलं.

जमतय.  ओढ वाटतेय् . पुन्हा पुन्हा भेटावसं वाटतंय. एकमेकांना दिलेल्या छोट्या-मोठ्या वस्तू सांभाळून ठेवाव्याशा  वाटतात.  तेच तेच गोड शब्द कानात रुंजी घालताहेत.  त्यामुळे ओठावर, नकळत वेळी अवेळी हंसू उमटते.  निसटते स्पर्श, त्याने अंग मोहरते.  गोड गोड लहरी जाणवत आहेत.  प्रीतीचा अविष्कार हाच नाही तर कोणता?कथेतले  ती आणि तो एकमेकांत गुंतत आहेत.

कथा तशी कोंबातच आहे. पण उलगडेल  हळूहळू. तिची आणि त्याची आकृती नक्कीच तयार झालीय्.  कथेत मीही हळूहळू गुंतत चाललले आहे, त्यापेक्षा कथा मनावर पांघरतेय. 

त्या दिवशी दामोदर आला.  दामोदर आला म्हणजे काही तरी बातमी असणारच.  तीही सनसनाटी.  आणि माझी अपेक्षा खरी ठरली.

चहापाणी, शिवाय गरमागरम कांद्याची भजी खाल्ल्यावर, दामोदर जरा मुळावर आला.  म्हणजे सुरुवातीला अवांतर बोलणं झालं.

” काय वहिनी? इतक्या ठिकाणी मी भजी खाल्ली आहेत पण ही चव नाहीच.”

मग गरमागरम भजीचा आस्वाद घेत त्याने एखादी अनधिकृत गोटातली बातमी सांगावी तसा अविर्भाव करून, म्हटलं,

” वहिनी कळलं का तुम्हाला?”

” कशाबद्दल? काय ते?”

” अहो सदानंद बद्दल?”

” सदानंद? काय झालं त्याचं?”

” सांगतो मी. पण सांभाळून! नाहीतर एखादी कथाच लिहाल त्याच्यावर.  म्हणजे तसा प्लॉट कथेसाठी चांगलाच आहे.”

” अहो पण झालं काय?”

” सदानंदची बायको सदानंदला सोडून गेली.”

” सोडून गेली? मग ही काय अशा रीतीने सांगण्याची बातमी आहे का?”

” अहो सोडून गेली म्हणजे वरती नाही हो! रश्मीकुमार सोनी बरोबर ती पळून गेली.”

” काय सांगताय काय?”

” सदानंदच्या बायकोबद्दल ऐकलं आहे मी. लोक काहीही बोलतात रे! चांगली आहे ती. शिवाय टॅलेंटेड आहे. त्यांची मुलं किती हुशार आहेत!  शिवाय कसली कमतरता नाही संसारात. ती कशाला अशी वागेल?”

” वहिनी! तुम्ही पण साध्या आणि सरळ आहात.  पण दुनिया फार निराळी आहे.  दिसतं तसं नसतं. आणि रश्मीकुमारचे अन मिसेस सदानंदांचे संबंध काही आजचे नाहीत.  फार पूर्वीपासूनचे आहेत.  ते काहीसं म्हणतात ना प्लॅटॉनिक लव, समान वैचारिक कल, जीवनाकडे पाहण्याचे कलात्मक दृष्टिकोन वगैरे…  बरीच मोठी स्टोरी आहे.  सांगेन सवडीने.  पण सध्या सदानंद पार हादरला आहे. प्रतिष्ठा, पोझिशन. ठीक आहे. पण त्याचं काय आहे शो मस्ट गो ऑन. वरवर तो भासवतोय्, “मला काही फरक पडत नाही.”

मग जाता जाता दामोदर एवढेच म्हणाला, “काय वहिनी? दिलं की नाही कथानक तुम्हाला? आता कल्पनेने रंग भरत बसा त्याच्यामध्ये.”

खरंय्.  प्रेम कथा लिहायचं ठरवले आहे  मी. तो आणि ती आहेतच माझ्या कथेत.  अजून त्यांचं वय, आकार, काळ ठरायचंय पण त्याच्यात  “रश्मी कुमार” आणि तिच्यात सदानंदची  बायको ,हे काय माझ्या कथेच्या साच्यात बसत नव्हतं.  म्हणजे घटना असेल प्रेमाची, पण माझ्या कथेतील प्रेम, त्याचं स्वरूप, रंग हे नाहीत एवढे नक्की.

अगदी नदीकिनारी, मावळता सूर्य, डोंगर, क्षितिज, गुलमोहराचे  झाड, वगैरे काव्यमय संकेत घालायचं  टाळत होते मी. कारण प्रेमाच्या बदलत्या परिभाषेचं भान ठेवायचं ठरवलं होतं मी.  म्हणजे डॉट कॉम, ई लँग्वेज वापरायला हरकत नव्हती.  प्रेमाचा  गाभा तोच असला तरी,  नवं स्क्रीन आणि इतर आधुनिक साधनं उपयोगात आणायला हरकत नव्हती. पण “रश्मी कुमार “आणि “सदानंदची बायको”  ही प्रेम कथा या पठडीतली नव्हती. ती जरा वयस्कर, वाकड्या वाटेने जाणारी, आणि असंस्कृत वाटत होती.  म्हणजे संस्कृतीच्या ज्या चौकटी आपण आखल्या आहेत आपल्या भोवती, त्यात बसणारी नव्हतीच मुळी. 

मला असं काही लिहायचं नव्हतं.  म्हणजे उच्च अभिरुची, ढासळलेल्या समाजाची घडी, बदलत्या माध्यमाचा वेडावाकडा प्रभाव ,वगैरे इतकं काही उंचीचं, टोकाचं नाही म्हणायचं मला.  पण एक नक्की,  ज्या समाजात मी वावरले, जगण्याची दिशा नक्की ठरली आहे त्या समाजात हे असं काही नव्हतं, म्हणून मला असं काही लिहिता येणार नाही.

क्रमश: भाग १

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मळभ – भाग 2 ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

? जीवनरंग ❤️

☆ मळभ – भाग 2 ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(मागील भागात आपण पाहिले, – सौमित्र कॅनडाला रवाना झाला. वेळ मिळेल तसा फोन, व्हिडिओ कॉलवरून सावनी आणि नुपुरची खबरबात घेऊ लागला. आता इथून पुढे)

तीन महिने झाले की सावनी आणि नुपुर मुंबईला येणार होत्या. तिचा भाऊ आणि आई-बाबा  येणार होते पोचवायला. इकडचे आजी-आजोबा पण नातीच्या आगमनाच्या तयारीत गुंतले होते. पण त्याआधीच दोन दिवस फोन आला सौमित्रच्या  बाबांना. सावनीच्या बाबांनी त्यांना ‘तुम्ही लवकरात लवकर इकडे या, सावनीची तब्येत खूप बिघडली आहे. बाकी इकडे आल्यावर सांगतो. ‘ असं म्हणून फोन ठेवला. तात्काळद्वारे  रिझर्वेशन करून सौमित्रचे आई-बाबा दुसर्‍या दिवशी सकाळी रतलामला पोचले.

काय आहे ते बघून मग सौमित्रला  कळवू, असं त्यांना वाटलं पण ते तिथे पोचले तेव्हा सावनी घरी नव्हतीच. तिचे आई-वडील डोक्याला हात लावून बसले होते. काही न बोलता त्यांनी सौमित्रच्या बाबांच्या हातात एक चिठ्ठी दिली. ती सावनीची होती. ‘ मला डान्समध्येच करिअर करायचं आहे. त्यासाठी मी घर सोडून सुमंतकडे चालले आहे.’ चिठ्ठी वाचून सौमित्रचे बाबा एकदम खालीच कोसळले. सौमित्रच्या आईदेखील हतबुद्ध झाली. डाॅक्टरना बोलावलं, त्यांनी हार्ट अ‍ॅटॅकचं निदान करून सौमित्रच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितलं. सौमित्रला हे कळवणं भागच होतं. रजा घेऊन आणि तिकिट मिळवून दोन दिवसांनी तो रतलामला पोचला. त्याचा मित्र सलील त्याच्याबरोबर आला होता.तोच या सगळ्यांना मुंबईला परत घेऊन आला.

बाळाच्या अंघोळीसाठी बाई येणारच होती. थोडी खटपट करून स्वैपाकालाही बाई मिळाली. या धक्क्यातून सावरून नुपुरकडे दिवसभर बघणं, शिवाय बाबांचं पथ्य-पाणी, औषध हे सर्व सांभाळणं सौमित्रच्या आईसाठी खूपच अवघड काम होतं. पण या परिस्थितीत ते निभावणं भागच होतं. सौमित्रलाही हा आघात पचवणं सोपं नव्हतं. त्याची मनःस्थिती पार बिघडून गेली होती. त्यानं कंपनीकडे महिनाभर रजेसाठी अर्ज केला. कंपनीला कॅनडात त्याच्या जागी दुसर्‍या माणसाची नेमणूक करावी लागली. त्यामुळे कंपनीने त्याची रजा मंजूर केली पण प्रमोशन रद्द केलं.  नुपुरसाठी वेळ देता यावा म्हणून सौमित्रने इतरत्र नोकरी शोधायला सुरुवात केली. सात-आठ महिन्यांनंतर त्याला तशी नोकरी मिळाली. आठवड्यातून एक दिवस ऑफिस आणि बाकी घरून काम. त्यामुळे आईलाही थोडी स्वस्थता मिळाली.

पण दैव माणसाची सत्त्वपरीक्षाच घेत असतं. सौमित्रच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्यांची ट्रिटमेंट सुरू झाली. नुपुरला पाळणाघरात ठेवायची वेळ आली. पण तिची तब्येत खूप नाजूक होती. ती वारंवार आजारी पडायची.मग तिच्यासाठी काही दिवस घरी बाई ठेवली.

सौमित्रची खूपच ओढाताण होत होती. मित्रांनी, नातेवाईकांनी दुसर्‍या लग्नाचा सल्ला दिला. पण आधीच्या कटू अनुभवामुळे त्याचं मन या गोष्टीला तयारच होत नव्हतं. शिवाय नुपुरला तो तळहाताच्या फोडासारखं जपत होता. तिला सावत्रपणाचा त्रास झाला, तर त्याला ते अजिबात सहन झालं नसतं.

सौमित्र आत्ताशी बत्तीस वर्षांचा होता. त्यानं एकट्यानं उभं आयुष्य काढावं हे त्याच्या आई-बाबांना देखील पटत नव्हतं.

‘सगळीच माणसं वाईट नसतात रे! शिवाय आम्ही थोडेच तुझ्या आयुष्याला पुरणार? आमच्या तब्येती या अशा! नुपुरलाही आईची गरज आहेच.’ असं हरप्रकारे समजावून त्यांनी त्याला परत लग्न करायला तयार केलं.

मिथिलाचं स्थळ सलीलनं, त्याच्या मित्रानं सुचवलं.

मिथिला त्यांच्याच एका मित्राची चुलत बहीण. बी. कॉम. झाली आणि लग्न ठरलं. एकुलता एक मुलगा इंजिनिअर, अमेरिकेत नोकरीला. आई-वडील पुण्यात. एका मध्यस्थामार्फत माहिती कळली, नाव ठेवण्यासारखं काही नव्हतंच. पण लग्नानंतर सहा महिन्यांनी अमेरिकेला पोचल्यावर खरी परिस्थिती उघड झाली. तो आपल्या मैत्रिणीबरोबर रहात होता आणि त्यांना एक मुलगाही होता. मिथिला भारतात परतली आणि दोन वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. सध्या ती घरीच ट्यूशन्स घेत होती. तिचे आई – वडीलही तिनं दुसरं लग्न करावं म्हणून प्रयत्नशील होते.

सलीलकडून एकमेकांची पूर्ण हकिकत दोघांना कळली होती. त्यानंतर अनेकदा फोनवर बोलून आणि प्रत्यक्ष भेटून सौमित्र आणि मिथिलानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मिथिलानं नुपुरला पोटच्या पोरीसारखंच वाढवलं. आईशिवाय तिचं पानच हलत नव्हतं. ती नुपुरची सख्खी आई नाही हे सांगूनही कोणाला पटलं नसतं. आई-बाबांचंसुद्धा ती प्रेमानं करत होती. सौमित्र आणि ती एकमेकांना समजून वागत होते.

आणि आता हा बाॅम्ब येऊन आदळला होता. 

सावनी सुमंतकडे पुण्यात निघून गेली. त्यानं मुंबईतून आपलं बस्तान पुण्यात हलवलं होतं. मुंबईत कार्यक्रमाच्या आणि  सरावाच्या निमित्ताने त्यांना एकमेकांचा सहवास घडला होता आणि जवळीक निर्माण झाली होती. तिचं नृत्यातलं आणि शिकवण्याचं कौशल्य त्यानं जवळून पाहिलं होतं. त्याच्या क्लासमध्ये मुलींना शिकवायला घरचीच आणि नृत्यनिपुण शिक्षिका मिळणार होती. सौमित्रशी घटस्फोट झाल्यावर त्यांनी लग्न केलं. पण आपल्या या व्यवसायात अडथळा नको, म्हणून काही वर्ष मूल होऊ द्यायचं नाही, यासाठी त्यांनी खबरदारी घेतली.

सहा-सात वर्षांत त्यांनी पुण्यात चांगलाच जम बसवला. पण सततच्या गर्भनिरोधक औषधांचा सावनीच्या गर्भाशयावर अनिष्ट परिणाम झाला होता. उपाय चालू होते, पण तिला मूल होणं अवघड होतं. काळ पुढे सरकत राहिला. नंतर आलेल्या कोरोनानं सगळं चित्रच पालटून टाकलं. दोन वर्षांत होत्याचं नव्हतं झालं. क्लास बंद ठेवावा लागला. ऑनलाईन क्लासमधून जेमतेमच पैसा मिळत होता. अशात कोविडनं सुमंतचा बळी घेतला. त्याच्या उपचारासाठी होती-नव्हती ती सर्व शिल्लक खर्च झाली. सुमंतच्या घरच्यांना हे लग्न फारसं पटलं नव्हतंच. त्यांनी सावनीशी असलेले जुजबी  संबंधही तोडून टाकले. मधल्या काळात सावनीचे वडीलही वारले होते. आई भावाकडे राहात होती. सावनी घर सोडून निघून गेल्यामुळे माहेरच्यांशीही संबंध दुरावले होते. सावनी एकटी पडली होती.

करोनाचं सावट ओसरल्यावर तिनं परत डान्स क्लास सुरू केला होता. तिच्या नृत्य नैपुण्यात काही उणेपणा नव्हता. म्हणूनच ती ‘नृत्य-मयूरी या मानाच्या पुरस्कारास पात्र ठरली होती. पण आता पहिली उमेद राहिली नव्हती. एकटेपणाची जाणीव प्रकर्षाने व्हायला लागली होती. म्हणून नुपुरच्या आधारासाठी तिनं चाचपणी सुरू केली होती.

नुपुरवर दुसर्‍या कोणी हक्क सांगणं ही कल्पनाच मिथिलाला सहन होत नव्हती. ती म्हणूनच अस्वस्थ होती. सौमित्रही गोंधळून गेला होता. नुपुरला हे सगळं कसं सांगायचं, हा तर खूपच मोठा पेच होता. पण सांगावं तर लागणारच होतं. त्यानं आपल्या मनाची तयारी केली होती.

नऊ वाजता नुपुर उठली. आवडता नाश्ता बघून तिची कळी खुलली. पण आईला बरं नाही हे कळताच, नाश्त्याची प्लेट हातात घेऊन, ती तशीच तिच्यापाशी गेली. मिथिलानं तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळयांना धार लागली. गोंधळलेल्या नुपुरला जवळ घेऊन सौमित्रनी तिला आधी नाश्ता करायला लावला. मग हळूवारपणे  त्यानं तिला सगळं काही सांगितलं. काही वेळ नुपुर स्तब्ध बसून राहिली. मग तिचे डोळे अश्रूंनी डबडबले, तिनं उठून सौमित्रचे हात घट्ट पकडले. त्याने तिला प्रेमाने कवेत घेतले. मग मुसमुसतच तिने मिथिलालाही मिठी मारली.

मग अचानक आपलं रडं आवरून ती सौमित्रला म्हणाली, ‘ बाबा, मी तयार आहे तिला भेटायला. असं कर ना तिचा मोबाईल नंबर आहे का? आपण इथूनच व्हिडिओ कॉल करूया. बघ ना नंबर मिळतोय का? तोवर मी आजी-आजोबांना पण इकडे घेऊन येते.  सौमित्र संभ्रमात पडला. तिचे वकिल फोनवर डायरेक्ट बोलायला देतील की नाही याची त्याला शंका होती.   

तेवढ्यात नुपुर आजी-आजोबांना तिथे घेऊन आली देखील आणि सौमित्रकडे नंबरची विचारणा करू लागली. मिथिलानं हळूच सौमित्रला आजच्या पेपरमध्ये आलेली बातमी सांगितली होती. त्याला एकदम शशिकांतची आठवण झाली. त्याचा हा आतेभाऊ प्रेस रिपोर्टर होता. सौमित्रनी त्याला फोन करून, सावनीचा नंबर मिळवायला सांगितला. पाच मिनिटात त्याचा मेसेज आला आणि सौमित्रनी फोन लावला. नुपुर तुला व्हिडिओ कॉल करतेय, एवढं सांगून त्यानं फोन नुपुर कडे सोपवला. नुपुर काय बोलणार याकडेच सगळ्यांचे कान लागले होते.

नुपुरचा व्हिडिओ कॉल सुरू झाला होता.

‘ सावनीमॅडम तुमचं अभिनंदन ! आपल्या तीन महिन्याच्या मुलीची पर्वा न करता, तिला सोडून जाणाऱ्या बाईला,’ हिरकणी’च्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळावा हे गौरवास्पदच आहे नाही का? मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मिथिलाच माझी आई आहे आणि मी तिची मुलगी. इतर कोणीही केवळ जन्म दिला म्हणून माझ्यावर हक्क दाखवू शकत नाही. आमच्या या कुटुंबात तुम्हाला कोणतंही स्थान नाही आणि यापुढेही मिळणार नाही. मला तुम्हाला भेटण्याची अजिबात इच्छा नाही. ‘

सावनीच्या हातून फोन गळून पडला होता. मिथिलानं अश्रू भरल्या डोळ्यांनी नुपुरला कवेत घेतलं होतं. सौमित्रही त्यांना सामील झाला. आजी-आजोबांचा आनंद डोळ्यांतून पाझरत होता. भरून आलेलं आभाळ मोकळं झालं होतं.

 – समाप्त –

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – प्रणिता प्रशांत खंडकर.

Mob. 98334 79845    Email.. [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मळभ – भाग १  ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

? जीवनरंग ❤️

☆ मळभ – भाग १  ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

मिथिलाचे हात यांत्रिकपणे काम करत होते, पण मन मात्र सैरभैर झालं होतं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली म्हणून मिथिला किचनमधून पटकन बाहेर आली आणि दार उघडून तिनं पेपर आत घेतला. टिपॉयवर पेपर ठेवताना, सवयीनं तिची नजर हेडलाईनकडे वळली. ‘ पंतप्रधानांची पाकिस्तानला ताकीद’, आणि त्याच्या बाजूलाच दुसरी बातमी आणि फोटो.. ‘सावनी सुमंत यांना नृत्य मयूरी पुरस्कार ‘ बाजूला हातात चांदीची मोराची प्रतिमा असलेला सावनीचा हसरा फोटो . हिरकणी या नृत्य नाटिकेतील उत्कृष्ट नृत्याभिनयाबद्दल, सावनीला हा विशेष पुरस्कार देण्यात आला होता.

हं, पेपर बाहेर ठेवायलाच नको, असा विचार करून तिनं तो चक्क आपल्या वॉर्डरोबमध्ये कोंबला.’ निदान सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांचा मूड खराब व्हायला नको.’

कालच लेकीची- नुपुरची आठवीची परीक्षा संपली होती. मग संध्याकाळी ती मैत्रिणींबरोबर सिनेमा बघायला गेली होती. सिनेमा संपल्यावर पावभाजी आणि आईस्क्रीम हादडून घरी पोचायला साडेदहा वाजले होते.  सुट्टी लागल्यामुळे बाईसाहेब काही आज लवकर उठणार नव्हत्याच. दुसरा शनिवार म्हणून सौमित्रलाही सुट्टी होती.

मिथिलाला रात्री नीट झोप लागलीच नव्हती. पण सातला ती उठलीच. नुपुरच्या फर्माइशीनुसार नाश्त्यासाठी सँडविचची सर्व तयारी तिनं करून ठेवली. काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या, हिरवी चटणी टेबलवर नीट झाकून ठेवली. मिथिलाचे सासू-सासरे मॉर्निंग वॉक करून घरी येण्याची वेळ झाली होतीच. त्यांच्या चहाचं आधण ठेवावं म्हणून भांड्यात पाणी घ्यायला ती वळली आणि तिच्या डोळ्यांपुढे एकदम अंधारी आली. कशीबशी ती जवळच्या खुर्चीवर टेकली. तेवढ्यात सासू-सासरे घरात आलेच.

‘काय ग, बरं वाटत नाही का? चल आतमध्ये जाऊन जरा पड बघू. आराम कर, मी बघते चहाचं.’, असं म्हणत त्या तिला हाताला धरून  बेडरूममध्ये घेऊन गेल्या.
त्यांच्या चाहुलीनं सौमित्र जागा झाला.

‘आई, काय झालं?’ म्हणत त्यानं मिथिलाला हात धरून बिछान्यावर झोपवलं.

‘ झोप झाली नसेल रे नीट टेंशनमुळे! आधीच खूप हळवी आहे ती!’

काल रात्री नुपुर घरी आली, तेव्हा मिथिलानं तिची तब्येत बरी नाही, असं तिला सांगितलं. त्यामुळे बाईसाहेबांचा मूड खराब झाला होता.कारण उद्या आई-बाबांबरोबर बाहेर पडून धमाल करायचा प्लॅन होता तिचा. परीक्षेच्या आधीपासून ठरलंच होतं मुळी त्यांचं. ‘दोन दिवस ताप येतोय,  तुझी परीक्षा चालू होती म्हणून बोलले नाही , हे स्पष्टीकरण देताना मिथिलाचा चेहरा कावराबावरा झाला होता. पण परीक्षा संपल्याच्या आनंदात नुपुरच्या ते लक्षात आलं नाही.

असं काही होईल याची मिथिलानं स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सावनीनं तिच्या वकिलामार्फत नुपुरला  भेटण्याची मागणी केली होती. सावनी ही सौमित्रची पहिली बायको. सौमित्र मुंबईत राहणारा तर सावनी रतलाम.. मध्यप्रदेशची. सौमित्रच्या नात्यातल्या कोणीतरी स्थळ सुचवलं आणि हे लग्न जमलं. सावनी संगीत विषय घेऊन बी. ए. झाली होती आणि कथ्थकही शिकत होती.  रंगानं गोरी, चारचौघांत उठून दिसणारी! ‘मला नोकरी करायची इच्छा नाही’, हे तिनं लग्नाआधीच सौमित्रला सांगितलं होतं. सौमित्र , मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च अधिकारी. त्यामुळे बायकोनं नोकरी करावी, असा त्याचा आग्रह नव्हता. दादरला त्याचा चार खोल्यांचा प्रशस्त फ्लॅट होता. सौमित्र एकुलता एक मुलगा. त्याच्या आई-बाबांबरोबर एकत्र राहायची सावनीची तयारी होती.

कामानिमित्त  सौमित्रला अनेकदा बाहेरगावी जावं लागत असे. मुंबईत असला तरी सकाळी साडेआठला तो कंपनीत जाण्यासाठी बाहेर पडायचा. घरी परत यायला आठतरी वाजायचे. कधीकधी त्याहीपेक्षा  उशीर व्हायचा. शनिवार-रविवार मात्र सुट्टी असायची. मग दोघांची भटकंती चालायची. सावनीला मुंबई-दर्शन घडवायला सौमित्र घेऊन जायचा. कधी कारमधून, कधी ट्रेन तर कधी बस. सासू-सासरेही सूनबाईंचे लाडच करायचे.

एक वर्ष कसं उडून गेलं ते कोणाला कळलंच नाही. नव्याची नवलाई संपली आणि रूटिन सुरू झालं.

सौमित्रला  प्रमोशन मिळालं आणि त्याच्या परदेश वाऱ्याही सुरू झाल्या. आठ-आठ दिवस तो घरी नसायचा. सावनीला मग कंटाळा यायचा. घरात सासूबाई पण सगळं करणाऱ्या होत्या. वरकामाला बाई होती. त्यामुळे सावनीला काम तरी किती असणार ?

एक दिवस दादरला बाहेर फिरता फिरता कथ्थक नृत्य मंदिराची पाटी दिसली आणि तिच्या मनात आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचा विचार आला. येऊन-जाऊन दीड-दोन तासच वेळ जाणार होता. बरं क्लासही चार ते सहाच्या वेळेत. तिला तेवढाच विरंगुळा,म्हणून घरात कोणी विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. सावनीचा क्लास सुरू झाला. सावनी अधून-मधून क्लासमध्ये किंवा मुंबईत नृत्याच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली. अजून सुटवंग असल्याने सरावासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागला, तरी सावनीला ते जमत होतं.  शक्य असेल तेव्हा, सौमित्र आणि त्याचे आई-बाबा कौतुकाने या कार्यक्रमांना हजेरीही लावत.दोन वर्षांनी सावनी कथ्थक विशारदही झाली.  सुमंतसरांनी गळ घातल्यामुळे, तिच्या क्लासमध्येच ती नवीन विद्यार्थ्यांना शिकवायला जाऊ लागली.  तिचा बराच वेळ क्लास आणि कार्यक्रम यातच जाऊ लागला.

आता सौमित्रच्या  आई-बाबांना आपलं नातवंड यावं, असं वाटायला लागलं. सौमित्रलाही बाबा व्हायचं होतंच. त्यानं सावनीजवळ तसं बोलूनही दाखवलं.  आणि  लवकरच ती गोड बातमी आली. घरात आनंदाला उधाण आलं. सासू-सासरे, सूनबाईंचे आणखीनच लाड करू लागले, काळजी घेऊ लागले. सौमित्रही खूष होता. मुंबईबाहेर जाणंही तो शक्यतो टाळू लागला. सावनीचे डोहाळे पुरवण्याचा, तिला खूष ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला. पण मध्येच ती  कुठेतरी हरवल्यासारखी वाटायची. ‘ या अवस्थेत कधीकधी बायका तऱ्हेवाईकपणे वागतात, मनावर ताणही असतोच ‘, असं आईनं म्हटल्यावर, त्याने याबाबत तिला फारसं छेडलं नाही.

सातव्या महिन्यात डोहाळजेवण झालं आणि सावनीचे आई-बाबा तिला बाळंतपणासाठी माहेरी घेऊन गेले. सावनीनं एका गोड छोकरीला जन्म दिला. सौमित्र , आई-बाबांसह लेकीला भेटायला लगेच रतलामला गेला. तिथून घरी परततअसताना वाटेतच, त्याला फोनवर, पुढच्या प्रमोशनची बातमी मिळाली. पंधरा दिवसांनी त्याला कंपनीच्या कॅनडाच्या युनिटमध्ये हजर व्हायचं होतं. मग सर्वानुमते बाराव्या दिवशीच बारसं करून घ्यावं, असं ठरलं. सगळी धावपळच होणार होती. पण बारसं थाटात पार पडलं. बाळाचं नाव ‘नुपुर’ ठेवलं. सावनी जरा नाराज वाटली,’ पण तू आता कॅनडाला जाणार नं’ असं तिनं म्हटल्यावर, त्याला पटलं. लेकीला लवकर भेटता येणार नाही, याचं त्यालाही वाईट वाटत होतंच. पण प्रमोशन  कसं नाकारणार? पॅकेजमध्येही जबरदस्त वाढ मिळणार होती. ‘ पहिली बेटी, धनाची पेटी’, असं म्हणत सगळ्यांनीच आनंद साजरा केला. सौमित्र कॅनडाला रवाना झाला. वेळ मिळेल तसा फोन, व्हिडिओ कॉलवरून सावनी आणि नुपुरची खबरबात घेऊ लागला.

क्रमश: भाग १

© सुश्री प्रणिता खंडकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लाइटर – कथा – भाग 2 – लेखक – श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ लाइटर – कथा – भाग 2 – लेखक –  श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

( मागील भागात आपण बघितले –  लाइटरचे दोन तुकडे झाले तेवढ्यात तिथे भीमराम आला आणि जोराने ओरडला  ” हे काय केले तुम्ही , हा साधासुधा लाइटर नव्हता या लाइटर मध्ये एक दुष्ट आत्मा कैद होता . आता आपले काही खरे नाही . चला पळा इथून ”  आता इथून पुढे )

भीमराव आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला . त्या रात्री भीमराव आपल्या भावाच्या भीतीने घरी गेलाच नाही . दुसऱ्या दिवशी सकाळी भीमराव घरी गेला घराचा दरवाजा उघडाच होता . तो आत गेला तर  त्याचा भाऊ जमिनीवर मृत पडलेला होता . तो मोठ्याने रडू लागला पण आता रडून काय फायदा त्याच्या चुकीमुळे त्याने आपल्या भावाला गमावला होता . भावाच्या मृत्यूने त्याच्या मनावर खुप मोठा परिणाम झाला . त्याने ठरवले या पुढे दारू आणि सिगरेटला हात सुद्धा लावायचा नाही .

त्याने आपले सगळे लक्ष तांत्रिक विद्येकडे केंद्रीत केले . खूप दिवस कठोर परिश्रम केल्यावर आता तो सुद्धा आत्म्यांना कैद करण्याच्या विद्येत निपूण झाला . पण त्याच्या समोर आता खूप मोठे संकट उभे होते . गावातील लोकांना शामरावाचा आत्मा दिसत होता . लोकांकडे त्याचा आत्मा सिगरेट आणि लाइटर मागत होता .

भीमरावाने खूप प्रयत्नाने शामरावाच्या आत्म्याला एका लाइटर मधे कैद केले . दुसऱ्या दिवशी तो शामरावाच्या आत्म्याला मुक्त करणार होता . पण तो लाइटर कुठे तरी हरवला .     कदाचीत तो लाइटर कोणीतरी तुमच्या गावात आणला आहे आणि त्या लाइटर मधे असलेल्या शामरावाच्या आत्म्याला नकळत बाहेर काढले आहे . जोपर्यंत त्याचा आत्मा त्या लाइटर मधे कैद होत नाही तो पर्यंत तो या गावात भटकत राहणार .शामरावाला  फक्त त्याचा भाऊच कैद करू शकतो पण त्यासाठी अगोदर तो लाइटर शोधावा लागणार . “

“लाइटर तर आम्ही शोधू शकतो पण भीमराव कुठे मिळणार आम्हाला ? ” लोकांनी त्या तांत्रिकाला प्रश्न केला .

” तुम्ही फक्त लाइटर शोधा भीमराव इथेच आहे ” .

तांत्रीकचे बोलणे ऐकून लोक सर्वत्र बघत म्हणाले ” इथे ? पण इथे तर कोणीच दिसत नाही . कुठे आहे भीमराव ? “

” तुमच्या समोर . होय मीच आहे भीमराव . त्या दिवशी मी त्या लाइटरच्या शोधात सरपंचाच्या घरात गेलो होतो .  त्या दिवशी जर तुम्ही माझे ऐकले असते तर आज तुमच्यावर ही वेळ आलीच नसती . त्याच दिवशी मी त्याला कैद केला असता . अजुनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर तो लाइटर शोधा नाहीतर अनर्थ होईल.”

लाइटर शोधण्यासाठी लोकांना जास्त त्रास झाला नाही ,लाइटर सरपंचाच्या घरीच सापडला . लाइटर हातात घेऊन तांत्रीक मंत्र म्हणत गावभर फिरत होता . त्याच्या पाठोपाठ गावातील लोक चालत होते . तांत्रीक पिंपळाच्या झाडाखाली थांबला . त्याला तिथे शामरावाची आत्मा असल्याचा आभास झाला असावा . तो झाडाकडे बघत जोर जोरात मंत्र म्हणू लागला . जसा जसा मंत्राचा वेग वाढत होता तसतसा लाइटर पकडलेला तांत्रिकाचा हात थरथर कापत होता . ५ – १० मिनीटे  न थांबता तो जोरात मंत्र म्हणत होता . मंत्र म्हणता म्हणता अचानक तो शांत झाला आणि लाइटर आपल्या पिशवीत ठेवतं म्हणला ” आता घाबरण्याची गरज नाही शामरावाचा आत्मा लाइटरमधे बंद झालेला आहे . ” इतका वेळ शांत असलेला सरपंच त्याला म्हणाला ” नीट ठेवा तो लाइटर परत बाहेर नाही आला पाहिजे तो आत्मा “

तांत्रीक म्हणाला ” तुम्ही काहीच काळजी करू नका सरपंच साहेब तो आत्मा आता कधीच बाहेर नाही येणार ” .

” मग तो कोण आहे ? ” सरपंचाने  समोर बोटाने इशारा केला .

समोर शामराव हातात सिगरेट घेऊन उभा होता . लोक त्याला बघून घाबरले . यावेळी तांत्रीकाला सुद्धा घाम फुटला होता .

” किती भयानक आणि मायावी आहे शामरावाचा आत्मा. तो बघा आपल्या  मागे पण आहे त्याचा आत्मा ” सरपंच मागे बघत म्हणाला .

लोकांनी मागे वळून पाहिले तर तिथे पण शामराव होता . आता तर लोक खूपच घाबरले होते त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता . लोकांपेक्षा जास्त तांत्रिक घाबरला होता .

लोकांना घाबरलेले पाहुन सरपंच म्हणाला ” घाबरण्याची गरज नाही . इथे आत्मा वगैरे काही नाही . हे दोघे जुळे भाऊ आहे  शामराव आणि भीमराव . “

” मग हा कोण आहे ? ” लोकांनी तांत्रीकाकडे बोट करत विचारले .

सरपंच म्हणाले, ” हा  एक हिर्‍यांचा स्मग्लर आहे . परदेशातून ह्याचे साथीदार  लाइटर मध्ये हिरे लपवून इथे पाठवतात . एका रात्री  पोलिस  याच्या मागे लागले होते म्हणून याने लाइटर खिडकीतून माझ्या घरात फेकून दिला होता . तोच लाइटर घेण्यासाठी हा दुसऱ्या दिवशी तांत्रीकाचा वेष घेऊन माझ्या घरात घुसला होता . पण त्यावेळी तुम्ही याला ढोंगी म्हणून गावातून हाकलून लावला . त्याच दिवशी मला तो लाइटर खिडकी जवळ सापडला . तो इतर लाइटर पेक्षा वेगळा होता आणि पेटत पण नव्हता म्हणून मी तो उघडला  त्यात मला हिरे सापडले . मी लगेच पोलिसांना फोन केला . पोलिसांनी मला रात्री घडलेल्या घटने बद्यल सांगितले . आणि विचारले  “त्या दिवशी कोणी अनोळखी माणूस गावात आला होता का ? ”   मी त्यांना सांगितले ” एक तांत्रीक माझ्या घरात आला होता पण लोकांनी त्याला ढोंगी समजून हाकलून लावला . ” पोलिसांना माझे बोलणे ऐकून खात्री पटली की  तो स्मग्लरच तांत्रीक बनून माझ्या घरी आला होता . पोलिसांना माहित होते तो लाइटरमधे असलेले हिरे घेण्यासाठी परत नक्की येणार या गावात . मग पोलिसांनी आपले काही गुप्तचर या गावात पाठवले . त्यांनीच या जुळ्या भावांचा पडदा उघड केला . मग काय पोलिसांच्या भितीने या दोघांनी तांत्रिकाची सगळी हकीकत सांगितली. तांत्रीकाने खुप चांगला प्लान केला होता ते हिरे परत मिळवण्यासाठी पण त्याला त्याच्या नशीबाने साथ दिली नाही आणि शेवटी तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला .. ‘’ सरपंच बोलायचे थांबले. एव्हाना पोलिसांनी त्या तिघांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या.

 – समाप्त –

लेखक – श्री देवा गावकर  

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लाइटर – कथा – भाग १ – लेखक – श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ लाइटर – कथा – भाग १ – लेखक –  श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

शांतीपूर गाव आपल्या नावाप्रमाणे शांततेत नांदत होते . पण एक दिवस असे काही घडले ज्यामुळे गावातील शांतता नाहीशी झाली . त्या गावात  एक तांत्रीक आला होता आणि तो सरपंचाच्या घरात  सापडला. तो लोकांना सांगत होता ” मी त्या घरात असलेल्या एका दुष्ट आत्म्याला पकडण्यासाठी आत गेलो होतो . ” पण लोकांना वाटले तो ढोंगी आहे आणि चोरी करण्यासाठी सरपंचाच्या घरी गेला असावा म्हणून गावातील लोकांनी त्याला मारहाण केली .  त्याने परत लोकांना विनंती केली ” मला त्या आत्म्याला कैद करण्यासाठी मदत करा, नाहीतर ती आत्मा गावातच भटकत राहणार आणि इतरांना त्रास देणार . “

लोकांनी तर अगोदरच त्याला ढोंगी ठरवला होता मग त्याच्या सांगण्यावर लोक कसे विश्वास ठेवणार होते? लोकांनी त्याचे ऐकले नाही आणि त्याला हाकलून लावला .

त्याच रात्री गावातील एक माणुस सिगरेट ओढत होता तेव्हा त्याच्या जवळ एक अनोळखी माणूस  आला आणि म्हणाला ” शंकरराव मला पण एक सिगरेट दे ना “

” कोण आपण ? आणि मला कसे काय ओळखता? मी तर तुम्हाला या आधी कधी पाहिलं पण नाही . ” शंकररावाने उलट प्रश्न केला .

“माझे नाव शामराव मी आता याच गावात राहणार . ” त्याने उत्तर दिले .

” पण तुम्ही मला कसे ओळखतात ? ” शंकररावाने परत प्रश्न केला .

“मी या गावातील सर्व लोकांना ओळखतो . गावात राहणार म्हटल्यावर सगळ्या गावकऱ्यांची ओळख असायलाच पाहिजे नाही का? ” शामराव शांतपणे म्हणाला .

“हो ते बरोबरच आहे म्हणा तुमचं पण राहणार कुठे तुम्ही ? “

“ते पिंपळाचे झाड दिसते ना तिथेच राहणार . ” असे म्हणत तो शंकररावाच्या हातातील सिगरेट घेऊन पिंपळाच्या झाडाकडे जाऊ लागला .

शंकरराव त्याला बघतच राहिला . बघता बघता तो त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला . शंकरराव त्याचे  हे वागणे बघून थोडा घाबरला पण त्याचे लक्ष अजूनही शामरावाच्या हालचालींवर खिळून होते . शंकरराव त्याला बघत होता तेवढ्यात मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला . शंकररावाने  वळून पाहिले तर मागे शामराव हातात विडी घेऊन उभा होता .

शंकररावाचे लक्ष परत पिंपळाच्या झाडावर गेले तर तिथे कोणीच नव्हतं . शंकरराव आता मात्र खुपच घाबरला . तो थरथरत्या पावलांनी पळू लागला . त्याच्या मागे शामराव धावत होता . शामराव जोराने ओरडत होता . ” शंकरराव सिगरेट तर दिली आता लाइटर कोण देणार? ” .

शंकरराव एकदाचा पळत पळत आपल्या घरी पोहचला . त्याला अशा अवस्थेत पाहुन घरचेही चिंतीत झाले . त्याने घडलेला प्रकार सर्वाना सांगितला .

त्या रात्री त्याला झोपच लागत नव्हती . परत परत शामरावाचा चेहरा त्याच्या डोळ्यांपुढे येत होता . त्याची नजर खिडकीवर पडली तिथे त्याला कोणाची तरी सावली दिसत होती . त्याची खिडकी जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती . शेवटी तो देवाचे नाव घेत घेत खिडकी जवळ गेला आणि खिडकी उघडली बाहेर शामराव हातात सिगरेट घेऊन उभा होता . शंकररावाला बघताच तो म्हणाला ” शंकरराव लाइटर द्या ना लाइटर ” . शंकरराव जागीच कोसळला .

दुसर्‍या दिवशी त्याने घडलेला सगळा प्रकार गावात सांगितला . तेव्हा गावातील आणखीन काही लोकांनी त्या रात्री त्यांच्या सोबत घडलेले अनुभव सांगितले .

तो सगळ्या लोकांकडे लाइटर मागत होता. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . लोकांना तांत्रीकाला मारल्याचा पश्चाताप होऊ लागला . त्यांना आता खात्री पटली होती की तो तांत्रीक खरोखर सरपंचाच्या घरात आत्म्याला पकडण्यासाठी आला होता . लोकांना वाटत होते कदाचीत तो आत्मा शामरावाचा असावा आणि तांत्रीकाने सांगितल्याप्रमाणे आता त्याचा आत्मा गावात भटकत असून सर्वांना त्रास देत असावा.

लोकांनी त्या तांत्रीकाला शोधून परत गावात आणण्याचे ठरवले. लोकांनी त्या तांत्रीकाला शोधण्याची मोहिम सुरु केली . लोकांनी खुप शोधाशोध केली शेवटी तो एका शेजारच्या गावात त्यांना सापडला . सर्वात अगोदर लोकांनी त्याची क्षमा मागितली आणि गावात घडलेल्या सगळ्या घटना त्याला सांगितल्या आणि लोक त्याला  आपल्या गावात घेऊन गेले. त्यांनी तांत्रीकाला त्या आत्म्या बद्दल विचारले .

तांत्रीकाने एक लांब श्वास घेतला आणि सांगायला सुरवात केली ” शामराव आणि भीमराव हे दोघे भाऊ होते . त्यांचे वडिल एक तांत्रीक होते आणि आपली विद्या त्याने आपल्या दोघा मुलांना शिकवली होती. वडिलांच्या मृत्युनंतर भीमराव व्यसनाच्या आहारी गेला. तो आपल्या मित्रांसोबत सिगरेट आणि दारू पिण्यात वेळ वाया घालवायचा.

दुसरीकडे शामराव आपल्या तांत्रीक विद्येत भर घालत होता. तो गावोगावी फिरून भटकत असलेल्या आत्म्यांना एका लाइटर मधे बंद करायचा आणि एका  विशिष्ट ठिकाणी नेऊन त्यांना आपल्या मंत्राद्वारे मोक्ष प्राप्ती करण्यास मदत करायचा.  एक दिवस शामराव कुठेतरी बाहेर गेला होता म्हणून भीमरावाने पार्टी करण्यासाठी त्याच्या घरी मित्रांना बोलवले होते. मित्र आल्यावर भीमराव दारू आणायला बाहेर गेला होता. त्याचे मित्र सिगरेट पेटवण्यासाठी लाइटर शोधू लागले. लाइटर शोधता शोधता ते शामरावाच्या खोलीत गेले. तिथे त्यांना एक लाइटर मिळाला. पण खूप प्रयत्न करून सुद्धा तो लाइटर पेटत नव्हता. लाइटर पेटत नाही म्हणून रागाने त्यांनी तो जोरात जमिनीवर आपटला . लाइटरचे दोन तुकडे झाले तेवढ्यात तिथे भीमराम आला आणि जोराने ओरडला  ” हे काय केले तुम्ही, हा साधासुधा लाइटर नव्हता या लाइटर मध्ये एक दुष्ट आत्मा कैद होता. आता आपले काही खरे नाही. चला पळा इथून “

क्रमशः भाग १

लेखक – श्री देवा गावकर  

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उथळ पाणी — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ उथळ पाणी — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(“अमोल, अशी काय रे ही तुझी मैत्रीण? कशी वागते बोलते. नवरा बिचारा बरा वाटला.”

अमोल हसत म्हणाला, “ मुक्ता,अशीच आहे ग ती लहानपणा पासून.) — इथून पुढे —-

अमोलने मुक्ताला तिची आणि आपली सगळी हकीगत सांगितली. अगदी,मी तिला लग्नाचे विचारले होते,हेही त्याने खुलेपणाने सांगितले मुक्ताला.

मुक्ता हसली,आणि म्हणाली, “ अमोल कठीणच झाले असते तुझे.. ही तुझ्या आयुष्यात आली असती तर..  काय रे तो मेक अप आणि उथळ रहाणी. अमोल, पश्चाताप तर नाही होत ना, माझ्या सारख्या साध्यासुध्या मुलीशी लग्न केल्याचा?” 

अमोल गंभीरपणे म्हणाला, “ मुक्ते,तू आयुष्यात आलीस आणि मला कळून चुकले की,संध्याला विचारणारा मी किती मूर्ख होतो ग त्यावेळी. पण ते काफ लव्ह ग. काही तरी समजतं का त्या वेड्या वयात? देवानंच वाचवलं बरं मला.” 

मुक्ता हसली आणि म्हणाली, “ गम्मत केली रे. पण खरोखरच काही माणसे किती उथळ असतात ना… विशेषतः बायका ! मेकअप, साड्या, खरेद्या, पार्ट्या,,यापलीकडचं जगच माहीत नसतं त्यांना. बुद्धी, व्यवहार हेही आयुष्यात महत्वाचे असते, बाईला स्वतःची आयडेंटिटी हवीच, हे कसे रे लक्षात येत नाही त्यांच्या? मग आपण,आपली मुले फारच वेगळे  आहोत .. यांच्या बेगडी जगापेक्षा.”

” नाही  मुक्ता. तू फार सुंदर आहेस. किती साधी पण सुरेख राहतेस. काय सुरेख चॉईस असतो तुझा. माझे कपडेही तूच निवडतेस. परवा आपल्या ऑफिसमध्ये आलेल्या डेलिगेट्समधला परेरा विचारत होता 

‘ सर,हा शर्ट फार सुंदर दिसतोय तुम्हाला. आणि मुक्ता मॅडम ची साडी काय सुरेख दिसतेय त्यांना’ .”

मुक्ता म्हणाली, “ बरं बरं !उठा आता. मैत्रीण बघून पोट जरा जास्तच भरले की काय? “ 

दोघेही हसतहसत हॉटेलबाहेर पडले.

अमोल मुक्ताची कंपनी खूपच सुंदर जम बसवू लागली होती. आता त्यांना कंपनी वाढवायची वेळ आली.   रिक्रुटमेन्ट करताना, त्यांनी ऍड दिली आणि होतकरू हुशार मुलं  इंटरव्ह्यूसाठी येऊ लागली. त्यांचे सीव्ही, जॉब एक्सपिरिअन्स बघून अमोल प्रभावित झाला. खरोखरच योग्य अशी सहा मुलंमुली त्यांनी शॉर्टलिस्ट केली. आता दोनच पोस्ट शिल्लक होत्या.

अचानक रिसेप्शनिस्टने कॉल करुन सांगितलं, “ सर, कोणीतरी संध्या कपाडिया म्हणून मॅडम तुम्हाला भेटायचं म्हणताहेत. आधी अपॉइंटमेंट घेतली नाहीये.” 

अमोल म्हणाला, “ बाहेर कोणी आता नाहीये ना? मग पाठव  त्यांना आत.” 

संध्या ऑफिसमध्ये.. अमोलच्या केबिनमध्ये आली.

अमोलने अदबीने म्हटले, “ बस ना संध्या. काय काम होतं?” 

संध्या म्हणाली, ” वावा! मस्तच आहे रे तुझा थाटमाट. छानच सजवलीय तुझी ही केबिन.”

“अग, कराव्या लागतात या गोष्टी संध्या. पण मी मात्र आहे तसाच आहे अजूनही. बरं, बोल. काही काम होतं का? “

“ अरे, परवा आपली भेट झाली ना, तर माझे मिस्टर म्हणाले, बडी असामी  दिसते ही, तुझा मित्र.

 आपल्याला आपला माल एक्स्पोर्ट करायला हे मदत करतील का? “ 

अमोल विचारात पडला.

“ कसले आहे तुमचे मॅन्युफॅक्चरिंग संध्या? मला मिस्टर कपाडियांशी बोलावे लागेल. “ 

“ हो हो जरूर. कधी पाठवू त्यांना?” 

अमोलने त्यांचा सेल नंबर लिहून घेतला, आणि म्हणाला, “ मीच कॉन्टॅक्ट करीन त्यांना.” 

अमोलने त्यांना फोन केला आणि त्यांच्या  मालाची सॅम्प्लसही घेऊन यायला सांगितले.  मिस्टर कपाडिया त्याला अजिबात आवडले नाहीत. ती त्यांची बोलण्याची पद्धत, सतत मी मी  करण्याची वृत्ती त्याला मुळीच आवडली नाही. त्यांनी मशिनरीच्या पार्टसची आणलेली सॅम्पल्स त्याने ठेवून घेतली आणि म्हणाला , ” मी ही माझ्या  क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडून तपासून घेईन आणि मगच त्याबद्दल बोलूया.”

लोचट हसत कपाडिया म्हणाले, ” काय  साहेब ! कुठे एवढी बारीक झिगझिग करता? तुमचे कमिशन आपण जास्त देऊ की.”

अमोलला संताप अनावर झाला, पण तो आवरत अमोल म्हणाला, “ असे होणार नाही. तुमचा माल उत्कृष्ट असेल तर तसे समजेलच. या तुम्ही.”

अपेक्षेप्रमाणे कपाडियांचे पार्टस अत्यंत निकृष्ट होते. अमोल ते कधीही परदेशातच काय, पण  इथेही कोणाला विकू धजला नसता. त्याने  कपाडियाना ते परत घेऊन जायला सांगितले, आणि  गोड बोलून आपली असमर्थता व्यक्त केली.

 दुसऱ्याच दिवशी  त्याच्या ध्यानीमनीही नसताना, अचानक संध्या त्याच्या केबिनमध्ये वादळासारखी घुसली.

 अमोल अवाकच झाला तिला बघून.

“बस संध्या, बस ना.” 

“ नको! तुझ्याकडे बसायला नाही आले मी. माझ्या नवऱ्याचा अपमान केलास  तू काल? आमचे प्रॉडक्ट निकृष्ट आहे असे म्हणालास? आज आम्ही बाजारात केवढी पत राखून आहोत, आणि हेच पार्टस सगळीकडे विकले जातात, हे माहीत नाही का तुला? काय रे ?  मोठा  बिझनेसमन आहेस ना तू? उलट तुलाच मदत होईल म्हणून आम्ही हे प्रपोजल दिले तुला.”

अमोलला भयंकर संताप आला. “ संध्या ज्यात तुला काडीची अक्कल नाही, त्यात तू बोलूच नकोस.तुझ्या नवऱ्याने आणलेले प्रॉडक्ट अत्यंत भिकार  आहे आणि ते कोणीही एक्स्पोर्ट करणार नाही.  मला माझी एवढे वर्ष कमावलेली पत घालवायची नाहीये.” 

संध्या आणखीच संतापली आणि म्हणाली, ” मी तुला नकार दिला म्हणूनच ना तू आता  सूड उगवतो आहेस? असा इतका तरी काय मोठा झाला आहेस श्रीमंत? त्याहीवेळी बरोबरच होता माझा निर्णय.. तुला नाही म्हणण्याचा.” 

आता मात्र अमोलला हसायलाच आले.

” संध्या, तुझ्यात काहीही बदल झाला नाही. आहे तशीच अजूनही  महामूर्ख आणि पैशाच्या मागे लागलेली अत्यंत उथळ बाई राहिलीस. वयाबरोबर माणसाला समजूतदारपणा, गांभीर्य येते म्हणतात. पण तुझ्यात  मात्र  एक कणही नाहीये ते. मला राग नाही , पण कीवच येते आहे तुझी. अजून शहाणी हो. डोळे उघडून, मिस्टर कपाडिया नक्की काय करतात ते बघ. तू तर शिकली नाहीसच, पण निदान नवऱ्यावर आंधळा   विश्वास ठेवू नकोस. त्यांना किती कर्जे आहेत, हा पोकळ डोलारा कधी कोसळेल तेही माहीत नाही, तरी तू मला दोष देतेस? खूप ऐकून घेतले आत्ता तुझे, पण ते केवळ आपण बालमित्र आहोत म्हणून. बस झाले. होती तशीच मूर्ख राहिलीस तू. जा आता.”

संध्याच्या चेहऱ्यावर राग, आश्चर्य, दुखावलेपण अशा संमिश्र भावना होत्या. पण अमोलने त्याकडे अजिबात लक्ष न देता, तिला  ताबडतोब जायला सांगितले. त्यावेळी तिने नकार देऊन आपल्यावर उपकारच केले असेच वाटले त्याला.

शांतपणे त्याने मुक्ताला आपल्या केबिनमध्ये बोलावून, हा सगळा प्रकार सांगितला.

मुक्ता म्हणाली, “अमोल,अगदी उत्तम केलेस तू. जिवापाड मेहनत घेऊन आपण ही कंपनी उभी केलीय. असल्या लोकांकडे लक्ष देऊन तू तुझे मनस्वास्थ्य बिघडून देऊ नकोस. सोडून दे रे. हाही एक अनुभव यायचा होता तुला. अरे आपल्या म्हणवणाऱ्या लोकांकडून असेही धडे मिळायला हवेतच ना !”

अमोलने कृतज्ञतेने मुक्ताकडे पाहिले… “ किती शहाणी आणि समंजस आहेस मुक्ता तू.” 

मुक्ता हसली आणि म्हणाली, “ बरं बरं. पुरे आता माझी स्तुती. चल आपण मस्त बाहेर जाऊया. तुला बरं वाटेल.” 

“आम्ही आज लवकर जातोय. पुढच्या अपॉइंटमेंट्स उद्या घे “ असे रिसेप्शनिस्टला सांगून मुक्ता आणि अमोल ऑफिस बाहेर पडले.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उथळ पाणी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ उथळ पाणी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

काशीबाईंच्या चाळीत चार मजले होते. मध्ये मोठा चौक आणि  चारी बाजूना तीन तीन मजली  बिल्डिंग्ज.चाळ आता अगदी जुनी झाली होती आणि बरेच लोक ती सोडून दुसरीकडे रहायलाही गेले होते.अमोल आणि  संध्या यांच्या खोल्याही अगदी लागून लागूनच होत्या. दोघांच्या शाळा वेगळ्या,वेळा वेगळ्या.अमोल नऊ वर्षाचा आणि संध्या सातची. अमोल अभ्यासात अतिशय हुषार !  संध्याला सतत म्हणायचा,  “ किती उनाडक्या करतेस संध्या. देवाने चांगली बुद्धी दिलीय,तर वापर कर की तिचा. छान मार्क्स मिळव.”

संध्या मान उडवून म्हणायची, “ नको रे बाबा. मला कुठे स्कॉलर व्हायचंय तुझ्यासारखं? मी आहे अशीच बरी आहे. पोटापुरते मार्क्स मिळवून पास होतेय ना, बस झालं की.” 

संध्याला आरशात बघण्याचा  विलक्षण सोस. घरी असलेल्या पारा उडालेल्या आरशात सतरा वेळा, माना वेळावून बघणे आणि  पावडर लावून नाना नखरे करणे, हाच छंद संध्याचा. संध्याची आई  वैतागून जायची. बिचारी चार घरी पोळ्या आणि स्वयंपाक करून महिना कडेला न्यायची. संध्याचे वडील एका दुकानात साधे सेल्समन होते. अमोलची घरची परिस्थिती मध्यमच होती, पण संध्याइतकी वाईट नव्हती.

त्यादिवशी अंगणात खेळ अगदी रंगात आला होता. अमोल गॅलरीत उभा राहून बघत होता. संध्या भान विसरून खेळत होती .अमोलने संध्याला हाक मारून वर बोलावले.

“का रे बोलावलेस? किती रंगली होती आमची लगोरी.”

अमोल म्हणाला, “ एवढी मोठी झालीस तरी अक्कल नाही अजून. खुशाल मुलांच्यात  खेळतेस? मूर्ख कुठली. एक तरी मुलगी आहे का बघ तुझ्या बरोबर? किती मूर्खपणा करशील संध्या? नीट अभ्यास कर. तोच येणार आहे आयुष्यात उपयोगाला. कधी  समजणार हे तुला?” 

“ तुला काय करायचंय रे ? माझं मी बघून घेईन.” संध्या मान उडवत म्हणाली. 

मुलं मोठी होत होती. संध्या वयात आली आणि आणखीच सुरेख दिसायला लागली. अल्लडपणा मात्र तिळमात्र कमी झाला नव्हता. अमोल उत्तम मार्क्स मिळवून कॉलेजला गेला. त्याला हे चाळीत राहणे,सतत आयुष्याशी तडजोडी करणे झटकून टाकायचे होते. त्यासाठी एकच उपाय म्हणजे सपाटून अभ्यास करणे आणि  चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे. त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिवसाचे चोवीस तास कमीच पडत अमोलला. संध्याने आर्टस् ला प्रवेश घेतला. काहीच ध्येय नसताना आणि कोणतेही प्रयत्न न करता,कसे उत्तम मार्क्स मिळणार होते संध्याला?

अमोलला ती भेटली तेव्हा मनापासून हळहळला अमोल. “ काय हे मार्क्स संध्या ! अग, जरा लक्ष दिले असतेस तर सुरेख मार्क्स मिळून सायन्स ला नसती का मिळाली ऍडमिशन?”

संध्या म्हणाली, “ छे रे.कोण करणार ती मगजमारी.मी बरी आहे रे ! तू उगीच नको काळजी करू माझी.”

अमोल  उत्तम मार्क्स मिळवून पवईला गेला. फार अभिमान वाटला, त्याच्या आई वडिलांना. आता अमोल मागे वळून बघणार नाही,ही खात्रीच झाली त्यांची ! अमोलने संध्याला गाठले, आणि म्हणाला,” आज येशील माझ्या बरोबर हॉटेलमध्ये? माझ्या  रिझल्टची पार्टी करू आपण.”

… संध्या अमोलबरोबर आनंदाने हॉटेलमध्ये गेली. अमोलने तिला विचारले, “संध्या तू खूप आवडतेस मला. मी आवडतो का तुला? अजून आपण लहान आहोत, पण मोठे होऊन मी सेटल झाल्यावर लग्न करशील माझ्याशी?” 

संध्या म्हणाली, “ काय ? लग्न ? आणि तुझ्याशी?.. काहीही काय…. माझ्या आयुष्याच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. तुला त्यात जागाच नाही. मी माझ्या रूपाच्या बळावर बघच कसा रिची रिच नवरा पटकावते ते… मला उबग आलाय या दरिद्री भिकार आयुष्याचा. आणि देवाने दिलेले हे रूप हीच माझी जमेची बाजू आहे. मी त्याचा वापर करणार आणि श्रीमंत नवरा पटकवणार. माझी स्वप्न पुरी करायला तुला सात जन्म लागतील. मी कधीही तुझा विचार करणार नाही लग्नासाठी. एका चाळीतून उठून पुन्हा  दुसऱ्या चाळीतच जाणार नाही मी ! थँक्स फॉर पार्टी हं। पण तुला बेस्ट लक तुझ्या भविष्यासाठी.” — अमोलचा अपमान करून संध्या तिथून गेली.

अमोलने आपले लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित केले. स्कॉलरशिप टिकवायची तर त्याला उत्तम ग्रेडस  मिळायलाच हव्या होत्या ना. त्याला संध्याच्या उथळपणाचा संताप आला आणि कीवही आली. आयुष्यात असे शॉर्टकट्स शोधून हिच्या  हाती काहीही  लागणार नाही, हे त्याने ओळखले. त्याने तिचा विचार मनातून काढून टाकला. अमोल  बीटेक् उच्च श्रेणीत पास झाला. संध्या एव्हाना बी.ए.. होऊन कुठेतरी नोकरी करत होती. अमोलला  खूप छान नोकरी मिळाली आणि अमोलने मोठा ब्लॉक बुक केला. अमोल आणि त्याचे आईवडील चाळ सोडून ब्लॉकमध्ये राहायला गेले. चाळीशी त्यांचा मग संबंधच उरला नाही. अमोल आता  त्याच्या नोकरीत खूप व्यग्र होता.

काळाची बरीच पाने उलटली मग…….  

अमोलने त्याच्याच कंपनीतल्या हुशार आणि  इंजिनिअर असलेल्या मुक्ताशी लग्न केले. मोठी मोठी पदे भूषवीत अमोल आता एका मोठ्या कंपनीचा एम डी झाला होता.

त्याच्या कानावर गोष्टी येत होत्या पण चाळीशी त्याचा काहीच संबंध येत नव्हता. मध्यंतरी त्याने ऐकले, संध्याने एका गुजराथी मुलाशी लग्न केले,आणि खूप श्रीमंतीत ,सुखात आहे ती. अमोलला बरे वाटले, आणि संध्याचे स्वप्न पुरे झाल्याचा आनंदही त्याला  मनापासून झाला. अमोलची मुलं मोठी झाली. मोठा आशिष उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला आणि मुलगी लग्न होऊन सासरी दिल्लीला गेली.

मध्यंतरी अमोलला मुंबईला कामानिमित्त जावे लागले. मुक्ता आणि अमोल दोघेही ऑफिसचे काम संपवून,  फोर्टमधल्या पॉश हॉटेल मध्ये जेवायला गेले. पलीकडच्या टेबलावरची बाई त्यांच्याकडे निरखून बघत होती. तिच्याबरोबर तिचा नवरा असावा बहुतेक. न राहवून ती अमोलच्या टेबल जवळ आली आणि म्हणाली, “तुम्ही अमोल ना?”

“ अरे.. तू संध्या ना ? कित्ती वर्षांनी भेटतोय ग आपण ! मुक्ता,ही संध्या. आम्ही अगदी बालमित्र आहोत हं,चाळीत रहात होतो तेंव्हापासूनचे ! “

संध्याला भेटून अमोलला मनापासून आनंद झाला. संध्या मजेत दिसत होती. पक्की शेठाणी झालेली दिसत होती.भरपूर मेकअप,दागदागिने,लठ्ठ सुटलेले श्रीमंत शरीर.

“ या तुझ्या मिसेस ना? काय करतात या?”

मुक्ताला जरा राग आला ,पण ती म्हणाली, “ संध्याताई, मीही तुमच्या मित्राच्याच कंपनीत आहे हं।आम्ही  दोघांनी आठ वर्षांपूर्वी, अमोल एक्स्पोर्ट-इम्पोर्ट कंपनी सुरू केली आहे. 

संध्याचा नवराही एव्हाना त्यांच्याजवळ आला होता.

“ बाप रे ! ती इतकी मोठी  इम्पोर्ट एक्स्पोर्ट कंपनी तुमची आहे? अमोलभाई, ग्रेटच. संध्या, अगं केवढे मोठे नाव आहे यांच्या कंपनीचे मार्केट मध्ये. खूप छान वाटले,तुम्हा दोघांना भेटून.” संध्याचा नवरा अगदी सरळपणे म्हणाला.

“असेल बाई! मला त्यातले काही समजत नाही. आपल्याला आज पार्टीला जायचंय, लक्षात आहे ना?आणि खरेदीही करायचीय अजून !” संध्याने  दुर्लक्ष करत म्हटले, आणि निरोप घेऊन ती निघून गेली.

मुक्ताला अगदी संताप आला तिचा.

“अमोल, अशी काय रे ही तुझी मैत्रीण? कशी वागते बोलते. नवरा बिचारा बरा वाटला.”

अमोल हसत म्हणाला, “ मुक्ता,अशीच आहे ग ती लहानपणापासून.”

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संगम… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? जीवनरंग ?

☆ संगम…  ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

“ग्रॅनी, ग्रॅनी”, अशा हाका ऐकू आल्या आणि वंदनाच्या गळ्यात दोन लाडिक हात पडले. गळामिठी घालत इरानं वंदनाच्या गालावर ओठ टेकले.

“इथं काय करतीस? कम कम मीट माय फ्रेंड्स.”, म्हणत इरानं तिला ओढतच हॉलमध्ये आणलं. हॉलमधल्या प्रशस्त सोफ्यावर तिच्या दोन फ्रेंड्स बसल्या होत्या. वंदनाच्या मते पसरल्या होत्या. त्यांचे आधुनिक कपडे त्यांना पसरू देत नव्हते. तरीही त्यातल्यात्यात त्या पसरल्या होत्या. काव्या आणि सौम्या अशा नावांनी स्वतःची ओळख त्यांनी सांगितली खरी. पण आवाजात माधुर्य नव्हतं ना वागण्यात मार्दव. दोघींनीही ‘हाय’ म्हणून हात हालवला. वंदना देखील ‘हाय’ असं म्हणत एका बाजूच्या खुर्चीवर टेकली. त्या मऊ आलिशान खुर्चीवर बसताना ती थोडी सुखावलीच. पाठ आणि मान छान टेकवता येत होती. खांद्यांना रग लागत नव्हती. शिवाय खुर्चीची उंची अशी होती की तिचे गुडघेही कुरकुरले नाहीत. शेजारीच बसलेल्या माधुरीला ती म्हणाली देखील,” हा तुमचा सोफा छान आहे हो.” “आई,अहो सोफा नाही बरं,काऊच म्हणायचं.”, त्यांच्याकडं हलकेच हसून बघत माधुरीनं सांगितलं. वंदनानं हसून मान हलवली.

वंदना मुंबईत राहणाऱ्या आपल्या लेकाच्या, मोहनच्या घरी आली होती. आल्यापासून ती बघत ‌होती.  वंदना तशी सुशिक्षित होती, समंजस होती. हिरानंदानी संकुलातला हा फ्लॅट आलिशान होता. कोल्हापूरातील तिचं घर काही तसं लहान नाही. पण ते तसं साधंसुधं आहे. बाहेरच्या खोलीत ठेवलेल्या खुर्च्या उठता बसता तिच्या गुडघ्यांसारख्याच कुरकुरतात. तिला दाखवायला नेलं तेव्हा तर सतरंजीवर मांडी घालून बसली होती ती. इरा अशी खाली बसेल का? ‘मॉम आय वोंट. माझा ड्रेस स्पाॉईल होईल ना.’ इरावर चुकुन कुठं तरी खाली बसायचा प्रसंग आला तर ती कशी बोलेल या कल्पनेनं तिला हसू आलं. ओठांवर आलेलं हसू दाबून ती माधुरीला म्हणाली, “अगं यांच्यासाठी काही खायला आणते.” “आई,” माधुरी म्हणाली, “तुम्ही आणलेला चिवडा लाडू देऊ यांना. चला, मी पण येते.”

दोघी किचनमधे आल्या. वंदनानं डबा काढेपर्यंत माधुरीनं प्लेट्स काढल्या. फराळाचे पदार्थ छान मांडले. ट्रेमधून ते बाहेर गेले. सेंट्रल टेबलवर विराजमान झाले. चिवचिवाट करत त्या दोघींनी आनंदानं त्यांचा स्वाद घेतला. मग काचेच्या ग्लासमधून आलेल्या विकतच्या बाटल्यांमधल्या रंगीत सरबताचा रसास्वाद घेऊन त्या गेल्या. जाताना एकमेकिंना शेकहॅंण्ड देऊन, गळामिठी घालायला त्या विसरल्या नाहीत. वंदनाच्या गळ्यात पडून तिलाही चिवडा खूप टेस्टी होता सांगायला विसरल्या नाहीत. अंधार पडू लागला होता. पण ‘हा s s य’ ‘ बा s s य’, ‘सी यू टुमारो s s ‘ करत बाळ्या पळाल्या. 

‘टेक केअर’, असं म्हणत माधुरीनं पसारा आवरायला घेतला. काही वेळानं वंदनाच्या लक्षात आलं की काव्या आणि सौम्याच्या आईचे मुली घरी पोचल्याचे मेसेजेस माधुरीला आले आहेत. पिढी बदलली, राहणीमानात बदल झाला, वागण्या बोलण्यात आधुनिकता आली तरी मनातली काळजी तीच आहे. वंदनाचे ओठ समाधानानं हसले.

रात्री जेवणं झाल्यावर ओटा-टेबल आवरताना वंदनाच्या शब्दकोशात भर पडली. किचन कॅबिनेट, बोऊल, स्पून, डस्टबीन, थ्रॅश. . .

दोन चार दिवसात तिचा शब्दकोश समृद्ध झाला. दोन चार दिवसात ती या जीवनपद्धतीला काहीशी सरावली. घरातील प्रत्येक सदस्याला स्वतंत्र खोली. अर्थात कपडेपट, कॉट, अभ्यासाचं टेबल, बाथरूम सगळंच स्वतंत्र. मोहनची दोन्ही मुलं आपापल्या खोल्यांमध्ये. मुलांना माधुरीनं तशी शिस्त चांगली लावली होती. सवयी चांगल्या लावल्या होत्या. पण एकूणच आधुनिकतेचं वारं वहात होतं.

शुक्रवारची सकाळ आली तसं विकेंड प्लॅनिंग सुरू झालं. शनिवार रविवार वेळ कसा घालवायचा याचा विचार. एक दिवस आऊटिंग!! घरातली चूल बंद. भटकंती, मूव्ही, ट्रेकिंग, रिसॉर्ट, वॉटर गेम्स् इ. इ. कधीतरी यायचं आणि उपदेश करत रहायचं. नको गं बाई. असा विचार करत वंदना या सगळ्यात सामिल झाली. जमेल तेवढ्यात सहभागी झाली. छोटा नऊ वर्षांचा नातू चिंटू तिच्या जास्त जवळ आला. दोस्तीच झाली त्याची आजी बरोबर.

ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेला मोहन रविवारी रात्री परत आला. रात्री तो वंदनाच्या खोलीत आला. काहीतरी वेगळं सांगायचं असलं की आईच्या मांडीवर डोकं ठेवून सांगत असे. तो खोलीत आला तेव्हा चिंटू आजीच्या मांडीवर झोपला होता. वंदनानं ओठावर बोट ठेवून चिंटूला हळूच खाली ठेवलं.

 “अरे व्वा! साहेबांनी माझी उशी पळवली वाटतं.”असं म्हणत त्यानं आईच्या मांडीवर डोकं टेकलं आणि काही न बोलताच तो झोपी गेला. त्याच्या चेहऱ्यावर शांत, समाधानी भाव होते. गप्पा मारत मारत झोपायची त्याला सवय होती. काल आल्यापासून तो बघत होता. बऱ्याच गोष्टींमधला बदल त्याला जाणवला.

संध्याकाळी जेवताना इरा आणि चिंटू टेबलवर जेवायला बसले होते. गरम गरम भाकरी,पिठलं, लसूण चटणी, भात असा साधा बेत. पण आजी बरोबर गप्पा मारत चवीनं जेवण चालू होतं. महत्त्वाचं म्हणजे टी. व्ही. बंद होता. इरा तिच्या शाळेत शिकवलेल्या कवितेविषयी सांगत होती. आणि चिंटू लक्ष देऊन ऐकत होता. जेवल्यानंतर आजीच्या पदराला हात पुसत चिंटूची गोष्टीसाठी गडबड सुरू झाली. इरा आईला ओटा आणि टेबल आवरायला मदत करू लागली.

माधुरीनं त्याला सांगितलं की, “आई आल्यापासून सगळे एकत्र जेवतात. शिवाय आजीला चालत नाही तर तू आजीसाठी करशील तेच आम्हालाही दे असा आग्रह धरतात. काही तरी जादू आहे हं आईंच्या कडं.  आजीची आणि नातवंडांची गट्टी जमलीय अगदी.”  माधुरीचा सूर थोडा चेष्टेचा असला तरी ती खूष होती हे लक्षात येतंच होतं.

बघता बघता वंदनाला मोहनकडं येऊन पंधरा दिवस झाले. आज ती परत जाणार होती. महालक्ष्मीसाठी घरातून बाहेर पडण्याची वेळ होईपर्यंत दोन्ही नातवंडं आजी भोवती फिरत होती. त्यांनी बाबांच्या कडून दिवाळीला कोल्हापूरला जायचं कबूल करून घेतलं होतं. आजीकडून शिवाजीच्या गोष्टी ऐकायच्या होत्या. किल्ला करायचा होता. इराला मोठी रांगोळी काढायला शिकायचं होतं. इथून पुढं प्रत्येक दिवाळी कोल्हापूरला साजरी होणार होती आणि मे महिना मुंबईत, हो. . ‌ पण दरवर्षी निदान एक तरी किल्ला बघायला जायचंच. . अशा अनेक नवीन गोष्टी पक्क्या वदवून घेऊनच वंदनाला कोल्हापूरला परतायची परवानगी मिळाली होती. या पंधरा दिवसांत आधुनिक राहणीमान आणि जुन्या सवयींचा प्रयत्नपूर्वक मेळ घालण्यात वंदनाला थोडंसं यश मिळालं होतं. दोन पिढ्यांचा संगम झाला होता. नातवंडांच्या साखरगप्पा आठवत वंदनाचा प्रवास सुरू झाला.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका कर्जाची परतफेड – भाग 3 – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ एका कर्जाची परतफेड – भाग 2 – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – या अनोख्या जिद्दीची गोष्ट मॅडमच्याही कानावर गेली. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाल्या, `जया तिच्या अबोध मनात सगळ्यांसठी काही ना काही करण्याची इच्छा घर करून राहिलीय. तिचं मन मोडू नको. . तिला सांग, की तिने तिच्या वर्गातील मुलींना अभ्यासात मदत करावी.’ आता इथून पुढे )

ही व्यवस्था सगळ्यांनाच आवडली. रामकुँवर जशी वॉर्डाचीच झाली. दिवसभर हिंदी, इंग्रजी, इतिहासाची प्रश्नोत्तरे वाचून दाखवायची. कुणी सांगितलं, तर सायन्समधला भागही पुन्हा वाचून दाखवायची. खरं तर तो काही तिचा विषय नव्हता. कधी कुणासाठी डेस्कमधली वही शोधून आणायची. कधी कुणासाठी लायब्ररीच्या पुस्तकातील काही भाग लिहून काढायची. याशिवाय जरा करमणूक म्हणून मासिकांचं वगैरे वाचन व्हायचं. औषध देणे,  मोसंब्याचा रस काढून देणे,  ताप बघणे,  कपाळाला बाम लावणे याही गोष्टी साईड बिझनेसप्रमाणे चालू असायच्या.

परीक्षा सुरू होईपर्यंत सगळ्या बिछान्यातून उठल्या होत्या. तरीही आजारी असताना जो अभ्यास झाला होता,  त्याचा खूपच आधार वाटत होता. जेव्हा त्या मुक्तकंठाने रामकुँवरला धन्यवाद देत,  तेव्हा तिचा चेहरा आनंदाने फुलून यायचा.

२२ मार्चला परीक्षा संपल्या. मुली हॉस्टेल सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी अश्रू आणि विषदात बुडून गेले. दर वर्षी मला या करुण प्रसंगातून जावं लागतं. मुलीची सासरी पाठवणी करण्याचं दृश्य डोळ्यापुढे येतं. पण चुकूनही मनात अशी इच्छा होत नाही  की या नापास होऊन पुन्हा अभ्यासाठी इथे याव्या.

रामकुँवरने जाण्याची कोणतीच घाई दाखवली नाही. विचारलं,  `दीदी मी तीन-चार तारखेला गेले तर चालेल?’

`माझी काय अडकाठी असणार? पण बोअर होशील. तुझ्याबरोबरीच्या सगळ्या निघून जातील.’

`जाऊदेत. मला हे जीवन पुन्हा कधी जगायला मिळणार, म्हणून जास्तीत जास्त इथे राहू इच्छिते’.

माझं मन भरून आलं. माझी सम्मती घेऊन तिने ४ एप्रीलला भावाला नेण्यासाठी पत्र लिहीलं. मग माझ्याकडे येऊन म्हणाली, `दीदी बाकीच्या मुलींच्या परीक्षा अजून व्हायच्या आहेत. मी त्यांच्या कामात थोडी मदत करू?’                                                                                                           

`काय विचार करून मी तिला हो म्हंटलं कुणास ठाऊक?  मग एक आश्चर्य माझ्यापुढे आलं. तीन पावलात पृथ्वी व्यापणार्‍या वामनाची कथा अनेक वेळा ऐकली होती. पण दोन हातात सगळं हॉस्टेल व्यापणारं आश्चर्य माझ्या डोळ्यांनी पाहू लागले.

प्रथम तिने हॉस्टेलचे सारे नियम लक्षात घेऊन आशाकडून भोजन कक्षाची,  मीनाकडून प्रार्थना कक्षाची,  सुलभाकडून घंटा देण्याची…. अशी सारी कामे आपल्या हातात घेतली. सकाळी पाच वाजता उठायची आणि रात्री साडे दहा वाजता घंटा देऊन झोपायची. लहान मुलींच्या वेण्या घालायची. बिछाने स्वच्छ करायची. नंतर टेबल, ड्रॉवर वगैरे ब्रासोने पॉलीश करायची. मग त्यांना हिशोब समजावत माझ्या खुर्चीच्या कव्हरवर भरतकाम करायची.

`अग, जरा आराम कर!’  मी म्हणायची. `घरी जाऊन आरामच तर करायचा आहे.’

खुर्चीचंकव्हर तयार झालं. खुर्ची झाडून पुसून तिने नवीन कव्हर घातलं. टेबलक्लॉथदेखील नवीन घातला.

मॅडम खूप दिवशांनी त्या दिवशी राउंडलाआल्या. बहुतेक कुठे तरी एक्झॅमिनर म्हणून गेल्या असाव्यात. माझ्या खोलीपुढून जाताना थबकल्या.

`जया काय आहे?  तुझी खोली एकदम चमकतेय!’

`जी. हे सगळं रामकुँवरचं कर्तृत्व आहे. तिला भीती वाटली, की मी तिला विसरून जाईन, म्हणून माझ्या कपाटापासून दरवाजापर्यंत तिने सारी खोली आपल्या रंगात रंगवली. आता सकाळ संध्याकाळ तिची आठवण केल्याशिवाय इलाज नाही!’  मी म्हंटलं.

`व्हेरी गुड’  मॅडमनी तिच्या भरतकामाची प्रशंसा करत म्हंटलं. `पण दीदीवर मेहेरबानी आणि आमच्यासाठी काहीच नाही! खरं सांग,  माझ्यापेक्षा यांचाच आरडा-ओरडा तुला जास्त ऐकून  घ्यावा लागलाय नं?’  मॅडम हसत हसत म्हणाल्या.

रामकुँवर जशी संकोचाने धसून गेली होती. मग हळूच म्हणाली, `आपल्याला… आपल्याला काही देण्याचा विचार तर मी करूच शकत नाही!’

श्रद्धेने ओतप्रोत भरलेलं हे वाक्य ऐकून मॅडमनी तिला जवळ घेतलं आणि मिठी मारली. रुबाबदार गौरवर्णीय व्यक्तिमत्वापुढे तिचं बुटकं,  सावळंसं शरीर मोठं गमतीदार वाटत होतं.

मॅडम दाटलेल्या गळ्याने म्हणाल्या. `आम्ही रामकुँवरला यासाठी लक्षात ठेवू, की तिने आम्हाला काहीच दिले नाही.’  आणि त्यांनी तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकले.

मॅडमना इतकं भावविव्हळ झालेलं मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं.

– समाप्त – 

मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares