मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा देह आनंदला… श्री शशिकांत हरिसंगम ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ अवघा देह आनंदला… श्री शशिकांत हरिसंगम ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

गावातले मोठ्ठ सरकारी हॉस्पिटल. चांगलं चार पाच मजली. हॉस्पिटलच्या इमारतीवरील घड्याळतला काटा रात्रीच्या नऊ वर सरकला. तसे फ़ार काही वेळ झाली नव्हती पण बाहेर रास्त्यावर आज का कोण जाणे रात्रीचे बारा एक वाजले असावेत असे वाटणारी भयाण शांतता होती.

हॉस्पिटलच्या आत सर्व रोगी आपापल्या रूममध्ये आपापल्या कॉटवर पडले होते. काहीजण झोपी गेलेले, काही झोपण्याच्या तयारीत, काही कॉटवर बसलेल्या नातेवाईकांशी बोलत होते.

हॉस्पिटलमधल्या मोठ्या हॉल मधील  कोपऱ्यातील कॉटवर एक पेशंट अत्यवस्थ होता. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल चालली होती. तो पेशंट सत्तरीच्या घरात असावा. चेहरा सुकलेला. डोळे खोल खोल गेलेले.

डॉक्टर शेजारीच होते त्या पेशंटच्या. त्याला तपासायला आले असावे. कॉट शेजारच्या टेबलावर त्याचे वैद्यकीय रिपोर्ट होते. ते पाहून अधिकच गंभीर होताना दिसत होते डॉक्टर. गेले पंधरा दिवस झाले औषधे, इंजकशनाने त्याला होतं असलेल्या जीवघेण्या वेदना कमी करण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत होते.तेथेच असलेली नर्स त्या पेशंटची खूप काळजी घेतं होती.

सारे आसपासच्या कॉटवरील पेशंट, डॉक्टर आणि ती नर्स काय समजायचे ते समजून गेली होती. डॉक्टरांनीनर्सच्या कानात काही सांगितले. हळुवार पावलांनी त्यांनी वार्ड सोडला.

रिसेप्शन काउन्टरवरला फोन उचलला. टेलेफोनची डायल फिरवली……

पठाणकोट लष्करी छावणीतला  फोन वाजला.

‘ मी डॉक्टर, मोकाशी, गव्हर्मेंट हॉस्पिटल मुबंईहून बोलतोय.’

‘ हां जी, मै कॅप्टन बालवरसिंग….’

‘ बालवरर्सिंगजी  ये देखो भाई  डॉक्टर मल्होत्राको फौरन मुंबई हॉस्पिटलमे भेज दो. पेशंट सिरीयस है. ‘

बोलून फोन खाली ठेवला.

त्या वृद्धाची अवस्था खूपच  वाईट झाली होती. डोळे उघडण्याचा निष्फळ प्रयत्न चालला होता त्याचा. ओठ हालत होते त्याचे पण ओठातून शब्द बाहेर येतं नव्हते. आपली एहलोकांची यात्रा संपत चालल्याचे त्याला त्या अवस्थेत कळले असावे. त्याचा जीव एकुलत्या एक मुलात गुंतला होता. त्याची अखेरची भेट व्हावी वाटत असावे त्याला. त्याचा चेहरा सांगत होता हे. मरणाच्या दारात माया माणसाला अडकवून ठेवते. माणसाच्या जवळ येत त्याला बिलगते.

औषध एका प्याल्यातून नर्सने त्या विकलांग पेशंटच्या ओठाशी लावले. औषध ओठातून गळून पडले.

नर्सने मनगटी घड्याळात पहिले. रात्रीचा एक वाजला होता. वार्डच्या दाराशी हालचाल झाली. नर्सने दाराच्या दिशेने पहिले….

डॉक्टर मोकाशी एक लष्करी जवानांस बरोबर घेऊन येतं होते.

नर्सने त्या विकलांग वृद्ध पेशंटच्या अंगावरील चादर नीट केली. डॉक्टर मोकाशी व जवान दोघेजण वृद्ध पेशंट जवळ आले. जवानाने पहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा हलली नाही. चकित झाले डाक्टर आणि नर्स. आपला वडील मरणासन्न आहे हे दिसत असूनही त्याची स्तब्धता जीव कापून गेली.

काही क्षणात त्या जवानाच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या.

‘ बाबा, तुमचा मुलगा भेटायला आला आहे.  ‘ म्हणत ओक्सबोकशी रडत जवान त्या पेशंटच्या अंगावर पडला.वृद्धाचा सुरकुत्या पडलेला हात आता

जवानाच्या पाठीवरून फिरू लागला.विकलांग वृद्धाच्या डोळ्यात आनंद धो धो वहात होता.किलकिल्या डोळ्यात तो विकलांग वृद्ध मुलाला साठवून घेतं होता. अस्पष्ट अस्पष्ट मुलांची आकृती दिसत असावी त्याला. त्या मुलाच्या अस्पष्ट दर्शनाने सुखावला होता तो. थरथरत्या ओठानी तो वृद्ध मुलाचे हात चुंबत होता. डोळ्यातून त्याचे दोन अश्रू टपकले  काना खालून त्या जवानाच्या  हातावर पडले

वृद्धाचे ओठ समाधानाने थरथरत होते. जवानांने आपला हात त्या वृद्धाच्या हाती दिला. वृद्धाचे डोके कपाळ कुरवाळू लागला. जवानांच्या खांद्यावरून फिरणाऱ्या वृद्ध हाताचा वेग मंदावत चालला… मंदावत .. मंदावत थाम्बला. वृद्धाने मान टाकली. जवानांने त्याचा हात वृद्धाच्या हातून सोडवला. वृद्धाकडे पहिले थोडेसे. चादर ओढून घेतली त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर.

त्या भयाण शांततेत घड्याळाची टिक टिक फक्त जीवघेणा आवाज करीत होती. वृद्धाच्या कॉट शेजारील  टेबलावरील औषधाच्या  अवाक होतं उघड्या पडल्या होत्या.

‘ सिस्टर, हा पेशंट कोण होता  ? ‘

त्या जवानांने विचारले. या प्रश्नाने त्या नर्सला धक्काचं बसला.

‘ हे काय तुमचे  वडील ना ते ? त्यांना ओळखत नाही ?

नर्सने प्रतिप्रश्न केला.

‘ नाही हे माझे वडील नाहीत. चुकीच्या माहितीमुळे मी इकडे आलो. आल्यावर मी जाणले. या वृद्धाची  काहीच मिनिटे राहिलीत. त्याला फक्त मुलाला अखेरचे भेटायचे होते. हे मला समजले. खरे सांगण्यात आता अर्थ नाही. त्यांच्या क्षीण झालेल्या दृष्टीला मुलगा ओळखता आला नाही. जवानच त्याचा मुलगा झाला.माझा हात त्यांच्या हाती दिला. हात हाती येताच समाधानाने त्याने प्राण सोडला.

जड अंतकरणाने तो जवान दवाखान्याच्या वार्डाबाहेर पडला. नर्स त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.

लेखक – श्री शशिकांत हरिसंगम

वालचंदनगर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(मी तुमच्यातलाच एक आहे,पण बाई म्हणून नाही जगणार !”) — इथून पुढे —

लक्ष्मी आणि इतर बायका बघतच बसल्या. “ अरे, तुला टोचा मारून मारून दुनिया जगू देणार नाही पोरा ! तुझ्यावर कधीतरी बलात्कार होणार, असे घाणेरडे आंबट शौकी लोक आहेत बाबा दुनियेत !”  

“ मावशी, तुम्ही वाचवाल ना मला? तुमच्यातला एक काहीतरी वेगळं करू बघतोय, तर मला द्या ना संधी. नाहीच जमलं तर आहेच, भीक मागत फिरणं हो.” लक्ष्मी, शबनम गहिवरल्या. त्यांनी श्यामची अलाबला घेतली. “ कर पोरा काय हवं ते ! आहे आमची वस्ती तुझ्यामागं. चला ग ! ए पोरा, लक्ष आहे आमचं तुझ्यावर. मोकळा सोडणार न्हाय.  न्हाय जमलं तर यावच लागलं झक मारत ! चला गं !’

श्यामने सुटकेचा निश्वास टाकला. सगुणा घाबरून त्या सगळ्यांकडे बघत होती. “ लेकरा,ह्याला मी जबाबदार आहे ! का घेतली मी असली औषधं आणि तुझा नाश केला रे.”

“ आई,असं म्हणू नको ! माझ्याच नशिबात हे होतं. एवढं होतं तर त्याच वेळी मारून टाकायचस गं. तुम्ही आणि मी सुटलो असतो.” उद्वेगाने श्याम म्हणाला. “ काय ग हे माझं आयुष्य. खेचराची जात आमची. धड  बाई नाही की धड पुरुष नाही. काय आहे ग मला भावी आयुष्य?”

 शामचा तोल सुटला. तो हुंदके देऊन रडायला लागला. “ आई,मी बाहेर शांत असतो, पण आत शंभर मरणं मरत असतो. मला लोकांसारखे साधे सरळ आयुष्य नाही. मरण सुद्धा नाही ग माझं नॉर्मल. कशाला मला जिवंत ठेवलंस? त्याच वेळी मारून टाकायचं ना!”

सगुणाने त्याला मिठीत घेतले. “नको लेकरा असं बोलू. कोणी नसेल तर मी जिवंत असेपर्यंत तुला आधार देईन. मला असं त्या लक्ष्मीसारख्या लोकांत नाही रे जाऊ द्यायचा तुला पोरा. निदान देवानं कला दिलीय हातात, तर उपयोग कर बाळा त्याचा. “

श्याम हळूहळू शांत झाला. त्याने डोळे पुसले, आणि कॉलेजला निघून गेला. श्याम सगळ्या परीक्षा उत्तम श्रेणीने पास झाला. त्याच्या हातात स्वयंपाकाची दैवदत्त कला होती. त्याने केलेले केक्स आणि त्याची डेकोरेशन्स भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावत.

अशीच शेवटच्या वर्षी  कुकिंगची स्पर्धा होती. दिल्लीहून मोठे मास्टरशेफ आले होते.

सर म्हणाले, “ श्याम, तू का भाग घेत नाहीस? तुला नक्की बक्षीस मिळेल. नाही मिळाले तर निदान या मोठ्या लोकांशी ओळखी तर होतील ना? आता हे शेवटचे वर्ष तुमचे ! भविष्याचा विचार करायला हवा तुम्ही मुलांनी.”

श्याम खिन्न हसला.म्हणाला, “ सर,तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलेत हेच खूप आहे हो माझ्यासाठी.. माझी टवाळी,कुचेष्टा नाही झाली आपल्या कॉलेज मध्ये.” 

सरांना भरून आले. “ श्याम,तू माझ्यासाठी एन्ट्री दे. कोणी काही का म्हणेनात. लक्षात ठेव, परीक्षकसुद्धा तुला हिणवतील, कुचेष्टा करतील, पण तू हरु नकोस. तुझ्या बोटातली जादू  येऊ दे जगासमोर ! “

वर्गातील मुलांनीही आग्रह केला आणि श्यामने घाबरत एन्ट्री फॉर्म भरला. त्याच्या वर्गातली टॉपर  शलाकाही होती  फॉर्म भरायला. “ श्याम, तू भरलास फॉर्म म्हणजे मी कसली येणार रे फायनल राऊंड पर्यंत !”

श्याम निष्पापपणे म्हणाला, ” शलाका, मी नको का भरू फॉर्म? तुला पुढे खूप चान्सेस आहेत ग ! माझं काय, मला अंधारच आहे बघ सगळा.”

शलाकाने त्याचे डोळे पुसले.” वेड्या, सहज कौतुकाने म्हणाले रे मी ! तू जिंकतोस की नाही बघच ही स्पर्धा. मी आहे की तुझ्याबरोबर! “ 

श्यामची प्राथमिक फेरीत निवड झालीच. त्याने केलेले दोन पदार्थ केवळ लाजवाब होते. त्याला सिलेक्ट केले तिथल्या तिथे. श्यामची खरी स्पर्धा सुरू झाली. कधी नावे सुद्धा न ऐकलेले पदार्थ आणि त्या कृती. वर प्रात्यक्षिक चालू असताना, धैर्य खच्ची करणाऱ्या परीक्षकांच्याच कॉमेंट्स. 

फिनालेपर्यंत पोचला श्याम. एव्हाना, टीव्हीवर बघणाऱ्या प्रेक्षकांना चांगलाच माहीत झाला होता श्याम.त्याचे उत्कृष्ट पदार्थ तर त्यांना  आवडूच लागले. कोणालाही सुचणार नाहीत असे पदार्थ तो दिलेल्या मोजक्या  सामानात आणि वेळात सहज करून दाखवी.

हळूहळू चेष्टा करणाऱ्या परीक्षकांचाही आवडता झाला श्याम. शेवटच्या तीन स्पर्धकात शलाकाही पोचली होती.

आज चार स्टार असलेल्या मिशेलिन शेफ कुणाल ने केलेला चार  मजली केक करून दाखवायचा होता. ५० मिनिटात कुणालने तो करून दाखवला. सामान, कृती आजीबात लिहिलेली नव्हती. सगळे नुसते लक्षात ठेवूनच ९० मिनिटात, पॅन्ट्रीतून सामान आणण्यापासून सर्व काही करायचे होते. 

 

बेल वाजल्याबरोबर सगळे धावत सुटले आणि सामान घेऊन आले. श्यामनेही कामाला सुरुवात केली. 

शेफ कुणाल जवळ आले, म्हणाले, “ काय श्याम ! इथपर्यंत मजल मारली खरी,पण बाकीचे दोन कॉम्पिटीटर कमी नाहीत बरं का. जरा चूक झाली तर घरी जायचे लगेच !”

श्याम शांतपणे  काम करत होता.

शेवटच्या पंधरा मिनिटात, मोठे मोठे शेफ स्पर्धा बघायला आमंत्रित केले होते. सगळीकडे बातमी पोचली होती —  एक तृतीयपंथी मुलगा फायनलपर्यंत पोचलाय. कौतुकमिश्रित कुतूहलाने सगळे वरच्या गॅलरीतून तिघांचे फायनल टचेस बघत होते.

तिघांच्यात शलाकाचा केक केवळ अप्रतिम झाला होता. लोकांना खात्री होतीच, शलाकाच विनर होणार म्हणून.

फायनल आईसिंग करताना शलाकाच्या लक्षात आले की,आपण आईसिंग शुगर विसरलोय. ती हताश झाली.  टीव्हीवर  लाइव्ह प्रोग्रॅम दाखवत होते. श्यामने कुणाल सरांना विचारले “ सर माझं सगळं काम झालंय. मी देऊ का उरलेली शुगर त्यांना?”

कुणाल हसले. म्हणाले, ” नो.इथे कोणी कोणाचे नसते श्याम ! अशी मदत  केलेली चालत नाही दुसऱ्या  कँडीडेटला. सो स्वीट आर यू डिअर.”

वेळ संपल्यावर तिघांचेही केक ट्रॉलीवरून नेऊन  परीक्षकांना दाखवले गेले. तीनही परीक्षकांनी  खाऊन बघितले आणि  कुणाल उठून उभे राहिले. ” श्याम मी कबूल करतो, तू आज हा केक माझ्यापेक्षा उत्तम करून दाखवला आहेस. तू जन्मजात शेफ आहेस खरा.” 

तिन्हीही परीक्षकांनी  एकमुखाने  शामचा केक उत्कृष्ट ठरवला. होताच तो सर्वोत्तम. श्यामला मास्टरशेफचा मानाचा कोट कुणालने चढवला. पंचवीस लाख रुपये आणि एक टीव्ही शो असे भव्य  प्राइझ त्याला मिळाले.

श्याम  हुंदके देऊन रडायला लागला. त्याची खेडवळ आई, वडील, भाऊ, सगळे  घाबरून,अंग चोरून प्रेक्षकांत बसले होते. 

श्याम म्हणाला, ” मी तृतीयपंथी आहे, हे मी कधीही लपवून  ठेवले नाही. देवाने आमच्यावर  फार मोठा अन्याय केलाय, पण मी त्याला कधी दोष  दिला नाही. आज त्याच देवाने, ही कला माझ्या हातात ठेवली आणि तुमच्यासारख्या लोकांनी माझे कौतुक केले. मला दुसरे काही नको. हे श्रेय माझ्या आईला देईन मी.  मला ती लहानपणापासून बरोबर स्वयंपाक करायला न्यायची. माझी आई अतिशय सुगरण आहे. कदाचित त्याचमुळे मी केटरिंग करायचा निर्णय घेतला असावा. आणि सर्वात महत्वाचे, शेफ नेहमी हॉटेलमध्ये आत असतो, लोकांसमोर थोडाच येतो?  मला  लोकांसमोर यावे लागणार नाही आणि मी असा असल्याने सतत किचन मधेच असेन –  हाही एक फायदाच की !”

 साधा सरळ श्याम लोकांना मनापासून आवडला. शामच्या आईची पण एक मुलाखत घेतली गेली. तेव्हा तर ती रडलीच. म्हणाली, “ या माझ्या लेकराने लई सोसलय हो लोकानो. किती अपमान, किती चेष्टा. शाळेतून पळून यायचं पोरगं. इथपर्यंत तुम्ही मायबापानी आणलं. असंच लक्ष राहू द्या.”

 श्यामचं नाव एका रात्रीत जगभर झालं. एक तर तो खरोखरच या सन्मानाला पात्र होता. आणि दुसरं म्हणजे, तृतीयपंथी लोकांप्रमाणे सहज हार न मानता, जिद्दीने त्याने कॉलेजशिक्षण  पुरे केले होते. 

—- आज ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला तृतीयपंथी होता.  

आज श्याम भारतात रहात नाही. त्याला मास्टरशेफ किताब  मिळाल्यावर देशोदेशी बोलावणी आली. श्यामने बँकॉक पसंत केले, जिथे त्याच्यासारख्या तृतीयपंथीयांना समाजात हीन लेखत नाहीत.

आज श्यामचे बँकॉकला मोठे स्टार हॉटेल  आहे, आणि त्यात मॅनेजरपासून ते वेटरपर्यंत फक्त आणि फक्त तृतीयपंथी लोकच काम करतात.

—  बँकॉकमधले अतिशय नावाजलेले अप्रतिम हॉटेल !! “ श्याम’स् हॉटेल !!!” 

— समाप्त —  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

लग्नानंतर अगदी दोनच महिन्यात दिवस गेले म्हणून सगुणाबाई अगदी नाराज झाली. तिला फार हौस, नटण्या मुरडण्याची, नवऱ्याबरोबर सिनेमाला जायची, जत्रेला जाऊन पाळण्यात  बसायची ! हे सगळं आता दिवस गेल्यावर  बंद पडणार, म्हणून तिला वाईटच वाटलं. सासू म्हणाली, ‘ का ग उगीच तोंड पाडून बसलीस? होतंय तर होऊ दे की  लगेचच. शेजारची रखमी मूल मूल करतीय आणि तुला नको म्हणायचा माज आलाय व्हय.’ 

सगुणी काहीच बोलली नाही. मुकाट्यानं  गेली परसात, कच्ची पपई खाल्ली, म्हणाली, ‘ जाईल पडून गर्भ. अजून तर दोन महिने पण नाही झाले.’ मग दुसऱ्या दिवशी चार अंडी खाल्ली. कोण जे सांगत होतं ते करत होती सगुणा. पण तो चिवट गर्भ काही पडेना. दिसामाशी तो वाढू लागलाच. नवराही शेवटी तिला रागावला, म्हणाला, ” काय ग चाललंय तुझं? दिलंय देवानं तर घे की मुकाट ! होतंय लवकर मान्य आहे पण तुला कुठं मोठं नोकरीला जायचंय ग? ”

  सगुणा काही बोलायची नाही, पण मनोमन तिरस्कारच केला  तिनं त्या गर्भाचा ! दिवस पुढे पुढे गेले,आणि त्या पोटातल्या बाळाने तिला खरोखर काहीच त्रास नाही दिला. योग्य वेळी सगुणा प्रसूत झाली. दवाखान्यात नर्सने डॉक्टरला बोलावून आणले. ‘ सर, तुम्हीच लवकर या. मला तर काही समजत नाहीये. ” डॉक्टर हा जगावेगळा निरोप ऐकून, तसेच रात्री दवाखान्यात आले. नर्स कोपऱ्यात उभी होती. ” सर,बाळ बघा ना ! “

 डॉक्टरांनी बाळ उघडे करून बघितले. त्या दुर्दैवी बाळाची दोन्ही लिंगे अविकसित होती. मुलगा, का मुलगी, हे त्यांनाही नीट ठरवता येईना. त्यांना अतिशय वाईटच वाटले. सगुणासारखी विचारत होती, 

” डॉक्टर, काय झालं मला? मुलगी असली तरी मला चालेल. नीट आहे ना माझं बाळ? “ डॉक्टराना तिला काय सांगावे हेच समजेना. होहो, छान आहे हं बाळ तुमचं, मग तुमचं आवरलं की देतो हं जवळ. ‘

  मुलांचे डॉक्टरही आले. त्यांनीही बाळ बघितलं. त्यांनी सगुणाच्या नवऱ्याला बोलावलं, खरी परिस्थिती सांगितली आणि म्हणाले,’ तुम्ही दोघे अजून तरुण आहात, तुम्हाला आणखीही अव्यंग संतती होईल. हे मूल  तुम्ही कसं सांभाळणार? माझा सल्ला असा की, काही संस्था अशी मुले फार चांगली सांभाळतात. त्यांना शिक्षण देतात. तिथे याची व्यवस्था होईल. विचार करा. तुमचे आणि त्यातही त्याचे आयुष्य त्याला घरी ठेवून वाया नका घालवू.”

सगुणा आणि तिचा नवरा म्हणाले, “ हे मूल असं झालं यात त्याचा काय दोष ? माझ्या बायकोला नकोच होता तो ! ती विषारी औषधे खाऊन तर नाही ना झालं असं?” डॉक्टर म्हणाले “ तसं काही नसतं. तुमच्या आणि त्याच्या नशिबात हे होतं. बघा,कसं काय करणार ?अवघड आहे हे. “

सगुणा खूप खूप रडली, स्वतःला दोष दिले, तिला खूप अपराधी वाटायला लागले.  मूल आपलं दिवसामाशी मोठं होत होतं. लहानपणी काही लक्षात येत नव्हतं पण मोठा झाल्यावर काय? सगुणा आणि नवऱ्याला या प्रश्नाने रात्रंदिवस झोप यायची नाही.

नंतर सगुणाला पुन्हा दिवस गेले. यावेळी,ती  शहाणी झाली. तालुक्याला जाऊन, सगळी नीट तपासणी करून आली. मूल छान  निर्व्यंग आहे, कोणताही दोष नाही, हे डॉक्टरांनी सांगितले.सगुणाला याही वेळेस मुलगाच झाला. पण किती नॉर्मल खणखणीत मुलगा .. त्या दोघांचे डोळे आनंदाने भरून आले. नवीन बाळ बघायला,  लहानगा श्यामही दवाखान्यात आला. आपला छोटा भाऊ बघून खूप आनंद झाला त्याला. याचे मात्र छान  बारसे  करून, राम नाव ठेवले, त्यांनी।

श्यामला  शाळेत घातले.  शाळेत आवडायचे  श्यामला. मन लावून अभ्यास करायचा श्याम आणि पासही  व्हायचा. जसजसा मोठा व्हायला लागला,तसतसा थोडा बायकी दिसायला लागलाच श्याम. पण तेही खूप लक्षात येण्यासारखा नाही. त्याला बायकी कपडे आवडत नसत., पण तरीही त्याच्यातले वेगळेपण लपत नसेच. 

रामची  वाढ नैसर्गिकरीत्या अगदी उत्तम होत होती. खेळात, मैदानावर अगदी उठून दिसायचा राम. श्याम स्वभावाने इतका चांगला होता, की त्याला कधी रामचा हेवा वाटला नाही की द्वेष.

श्याम घरी आईला मदत करायचा.त्याला स्वयंपाक करायला फार आवडायचा.चवही फार छान होती त्याच्या हाताला. सगुणाला अतिशय वाईट वाटे या मुलाचे. आपल्या मुळेच हे वैगुण्य आले या मुलात, असं म्हणत बसे ती.  निदान या छोट्या खेडेगावात, श्यामची चेष्टा तरी करत नसत मुलं. त्याचा गोड स्वभाव आवडायचा मुलांना.

श्याम मनाने खंबीर होता. त्याला आपल्यातले वैगुण्य चांगलेच माहीत होते. मोठा होऊ लागला, तसतसे हे वाढत जाणार होते. हॉर्मोनल बदल तर होणार होतेच. श्याम शक्यतो आरशासमोर उभा राहून,आपण बायकी हावभाव करत नाही, तसे चालत नाही हे बघत असे. थोडेसे आपोआप तसे होत असेच. पण ते अगदी प्रकर्षाने  लक्षात येण्यासारखे नव्हते.

सगुणाने शामला स्वयंपाक शिकवला. ती स्वतः फार सुगरण होती. गावात तिला खूपदा बायका कार्य असले की मदतीला बोलवायच्या. तिला पैसेही द्यायच्या. श्याम तिच्या हाताखाली तयार होऊ लागला. Ssc झाल्यावर श्याम म्हणाला, “ आई,मी पुण्याला जातो. तिकडेच बारावी करतो आणि मी कॅटरिंगचा डिप्लोमा घेतो.” 

सगुणा ला अतिशय वाईट वाटले. पुण्यासारख्या महासागरात या आपल्या असे वैगुण्य असलेल्या मुलाचा निभाव कसा लागणार? सगुणाने मनाशी निश्चय केला,आपण त्याच्याबरोबर पुण्यात राहायचे. राम आणि त्याचे वडील राहतील इथेच .

सगुणाने  गरीब वस्तीत भाड्याने खोली घेतली. ती लगेचच धुणीभांडी करू लागली. पुण्यासारख्या ठिकाणी तिला कामांना काय तोटा. हिला स्वयपाकाचीही चार कामे मिळाली. श्यामला केटरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. श्यामने पहिल्याच दिवशी वर्गात मुलांना सांगितले, “दोस्तहो! मी खूप ग्रामीण भागातून आलेला गरीब मुलगा आहे. मी तुमच्यातला नाहीये. मला समजून घ्या. तुमच्या लक्षात आलं असेल, मी  देवाने अन्याय केलेल्या त्या एक टक्क्यांपैकी आहे. यात माझा काय दोष? मलाही तुमच्यासारखे शिकू द्या. इतर  किन्नर लोकांसारखी मला सिग्नलला भीक नाही मागायची. कोणीतरी होऊन दाखवायचंय मला. शाळेत मुलं करायची रे चेष्टा, ‘ फलक्या, गणपत पाटील,’ पण मी लक्ष नव्हतो देत. मला सहकार्य कराल ना? एखाद्याला जन्मतः डोळे नसतात, कोणी मुके असतात, तसा मीही एक दुर्दैवी आहे.” बोलतांबोलता श्यामच्या डोळ्यात पाणी आले. क्लासमधील मुलं अतिशय  गंभीर होऊन हे ऐकत होती. हा साधा,पायजमा,शर्ट घातलेला मुलगा,आपण होऊन हे न लाजता सांगतोय, याने त्यानाही गलबलून आले.

 तो खूप बायकी नव्हता. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे, हे लक्षात आल्याशिवाय कसे राहील? वर्गातला भोसले उठून उभा राहिला.  मैदान गाजवलेला, खेळाडू होता भोसले. 

“ शाबास रे श्याम.  देतो आम्ही तुझ्या धीटपणाला आणि जिद्दीला. आम्ही सगळे तुझे मित्र आजपासून.काय ग पोरीनो,काय म्हणणे आहे तुमचे? ”

रेखा म्हणाली, “ भोसले, फार गोड आहे श्याम ! तुम्हीच त्याची पहिल्या दिवशी टिंगल  केलीत, पण आम्ही कधीच करणार नाही, केलीही नाही. श्याम, हे जाहीर सांगायचे धैर्य तुझ्यात आहे, हे केवढे मोठे आहे रे. खूप पुढे जाशील तू. आजपासून तू आमचा दोस्त.”

 शामला मनातून आनंद झाला. त्यांचा कोर्स सुरू झाला. पाठीमागे चर्चा होत असणार, हा मुलगा कोण, कसा..  पण श्यामने लक्ष द्यायचे नाही असंच ठरवलं होतं.

कमी त्रास नव्हता होत त्याला. वस्तीतही असा मुलगा आलाय,अशी बातमी पसरलीच. किन्नरांची टोळी टाळ्या वाजवत त्याला भेटायला आली. “ ए पोरा,कसलं करतो रे कालेज. ही दुनिया लै बेकार.. तुला काय जगू देणार व्हय. तू आमच्यातलाआहेस,आमच्यातच ये .बघ. ही रानी महिन्याला धा हजार कमावती. ही शबनम पन्द्रा. तू काय करतोस इथं? “

 श्यामने त्यांच्या पुढारी बाई लक्ष्मीला नमस्कार केला.

“ मावशी, तुमचं खरं आहे. पण मला साडी नाही नेसावीशी वाटत. मला कोणत्याही अनैसर्गिक भावना नाहीत. मला समजून घ्या मावशी ! काही गरज लागली, तर मी तुमच्याशिवाय कुठं जाणार? मी  तुमच्यातलाच एक आहे, पण बाई म्हणून नाही जगणार! “

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दिवा अन उदबत्ती …. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ दिवा अन उदबत्ती… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

वादळात अडकलेल्या एका पांथस्थाने जवळच्याच एका भग्न मंदिराचा आसरा घेतला.काळ्याकुट्ट ढगांनी सर्व परिसर झाकोळून गेलेला होता.कोणत्याही क्षणी आभाळ भुईवर उतरणार होतं अन कडाडणाऱ्या विजा प्रकाशाची वाट दाखवत त्यांना भुईवर उतरवणार होत्या.कुट्ट त्या अंधाराच्या मंदिरात पांथस्थास काहीच दिसेना.अडखळत चाचपडत तो कसाबसा गाभाऱ्याशी पोहचला.खिशातली काडीपेटी काढून तो काडी ओढायचा  प्रयत्न करू लागला पण सर्द पडलेला तो गुल पेटण्याचं नावच घेत नव्हता.अथक प्रयत्नाने एका काडीने शेवटी पेट घेतला.पांथस्थाला हायसे वाटले.त्याने इकडे तिकडे शोध घेतला. एका कोनाड्यात त्याला तेलाने भरलेला दिवा दिसला.हातातील आगीने त्याने दिवा पेटवला अन मूर्तीच्या पायाशी ठेवला.काळ्याकुट्ट पाषाणातील ती मूर्ती दिव्याच्या प्रकाशात उगीचच हसल्याचा त्याला भास झाला.त्याची नजर आता उदबत्तीस शोधू लागली ” दिवा आहे तर उदबत्तीही असणारच !” तो स्वतःशी पुटपुटला, इतक्यात मूर्तीच्या मागे त्याला उदबत्ती सापडलीच.दिव्यावर उदबत्ती पेटवून त्याने शेजारीच असलेल्या कपारीत खोचून दिली अन देवाला हात जोडून तो गाभाऱ्याबाहेर आला.गाभारा प्रकाश अन सुगंधाने भरुन गेला.त्या भयाण रात्रीत त्याला देवाचा सहारा मिळाला.थकलेला तो लवकरच निद्राधीन झाला.

सोसाट्याचा वारा ,कोसळता पाऊस अन विजांचे कल्लोळ चालूच होते.मध्यरात्र उलटली. दिव्याचे लक्ष सहजच स्वतःकडे गेले.रत्नजडित खड्यांनी मढलेले त्याचे रूप खासच सुंदर होते.त्याहून खूप सुंदर नाजूक नक्षी,उठावदार रंग, सुबक आकार त्याला खूपच आवडला.स्वतःच्या रूपाचा त्याला खूपच आनंद झाला आणि सौंदर्याचा अभिमानही !

शेजारी उदबत्ती जळत होती तिचं अस्तित्व काही क्षणांचं होतं. दिव्याला उदबदत्तीची कीव आली.

” काय ही उदबत्ती ! ना प्रकाश ना रूप ! काळा देह, हिला मुळी देखणेपण नाहीच!” तो स्वतःशीच पुटपुटला.त्याने उदबत्तीला न राहून विचारलेच,”काय गं उदबत्ती तुला माझ्या देखणेपणाचा जरासुद्धा मोह होत नाही का ? माझ्या सौंदर्याचा हेवा वाटत नाही का?”

तिने हसून उत्तर दिले ,” बिल्कुल नाही.ईश्वराने जे रूप मला दिलेय त्यात मी समाधानी आहे.प्रत्येकाला इथं नेमून दिलेले काम आहे अन आपण ते करायचे आहे ,एवढेच मला माहित आहे ;त्या पलीकडे मी जास्त विचार नाही करत.”

दिव्याला तिचं म्हणणं तितकंसं पटलं नाही तो तिला काही न काही म्हणतच राहिला अन उदबत्ती मौन बाळगून ऐकत राहिली.

इतक्यात सोसाट्याचा वारा सुटला आता मात्र दिव्याला आपला तोल सांभाळता येईना.उदबत्ती स्थिरपणे मंद मंद सुगंध दरवळत होती, अन …वाऱ्याचा प्रचंड झोत गाभाऱ्यात शिरला ! फडफडणारा दिवा क्षणात विझला.उदबत्ती शेवट पर्यंत जळत राहिली .

उत्तररात्री वादळ शांत झाले.पहाट होताच पक्ष्यांनी पंख झटकले.आभाळ निवळून निरभ्र शांत झाले.पांथस्थ उठला त्याला आता पुढं जायचं होतं.रात्रभर जीविताचं संरक्षण केल्याचे उपकार मानायला तो देवाच्या गाभाऱ्यात गेला. दोन्ही हात जोडून नतमस्तक होत उदबत्तीची राख त्याने भाळावर लेपली.बाजूच्या दिव्यावर काजळी साचली होती.त्याने दिवा उचलला व पुन्हा कोनाड्यात ठेऊन दिला .

रात्रभर प्रभू चरणाची सेवा करून कुणा सज्जनाच्या भाळावर मिरवत उदबत्ती दिमाखात पाऊले चालत राहिली अन दिवा अंधारल्या कोनाड्यात कुणा अवचित पांथस्थाची अभावीत पणे वाट पहात एकटाच  राहिला…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ममत्व… – श्री अशोक दर्द ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ममत्व… – श्री अशोक दर्द ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर  

सावित्रीच्या मुलीच्या सासरहून फोन आला की पारोला मुलगा झालाय. आजी झाल्याच्या आनंदात तिने आसपास, परिचित नातेवाईक यांच्यामध्ये मिठाई वाटली. काही वेळाने मुलीचा फोन आला, ‘माझ्याकडे यायचं, तर आपला चांगला आब राखून ये. आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाढेल, अशी ये.’

पारोचं जेव्हा लग्नं ठरलं, तेव्हा मागणी तिच्या सासरच्यांकडून होती. त्यावेळी तिने आपले दागिने विकून आणि जी काही जमा-शिल्लक होती, ती काढून, मोठ्या थाटा-माटात तिचं लग्नं लावून दिलं होतं.

यावेळी मागणी तिच्या स्वत:च्या मुलीची होती. खरं तर पारोला आपल्या आईच्या परिस्थितीची चांगली जाणीव होती. सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना पारोच्या फोनबद्दल सांगितलं. पण दोघांनीही आपण स्वत:च पैशाच्या तंगीत आहोत, असं म्हणत हात झटकले. सावित्रीने मग आपल्या राहिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या विकल्या. आपल्या नातवाला सोन्याची चेन केली. मुलीच्या सगळ्या परिवारासाठी कापड-चोपड घेतलं. फळांच्या आणि, मिठाईच्या टोपल्या घेतल्या आणि ती पारोकडे आली. पारोच्या सासरी तिची इज्जत वाचली पण ती जेव्हा घरी आली, तेव्हा तिच्यावर दु:खाचा पहाड कोसळला.

सावित्रीने आपल्या बांगड्या विकल्याचे ऐकून तिची मुलं आणि सुना अशा संतापल्या की वाद-विवाद, भांडणात ती दोन घास अन्नालाही महाग झाली. आता सावित्री मंदिरात सेवा करून आपला जेवणाचा आणि औषधापाण्याचा खर्च चालवते आणि तिथल्या धर्मशाळेच्या तुटक्या-फुटक्या खोलीत खंत करत आपलं म्हातारपणाचं ओझं वहाते.

इकडे मुलं आणि सुना सांगत फिरतात की आईला देवाची इतकी ओढ लागली आहे, आता ती घराच्या बंधनात बांधून राहू इच्छित नाही. ती आता संन्यासिनी झालीय. आता ती घरीदेखील येत नाही.

मूळ कथा – ममत्व  – मूळ लेखक – श्री अशोक दर्द  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षमा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ क्षमा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

“क्षमा”…….!!!

पुण्याच्या आसपासचं गाव….कुटुंब ठिकठाक …एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन….. साहजीकच सुनेवर सर्व भार …. आधी किरकोळ कुरबुर…. मग बाचाबाची…. त्यानंतर कडाक्याची भांडणं…. सुनेचं म्हणणं…. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका….. काम करुन हातभार लावा संसाराला ….. पण बाबा थकलेले….. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं… मुलानेही अडवलं नाही…

आले पुण्यात….कुणी म्हातारा म्हणुन काम देईना  आणि भुक जगु देईना…. भिक  मागण्यावाचुन पर्याय उरला नाही….

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन  बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला ?

“बाळ” म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण “हिला” विचारुन सांगतो…..

पण ….या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही…..!

आता बाबा अट्टल भिकारी झाले…..

झाले कि त्यांना केलं गेलं….. ?

अशीच भिक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली….

बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो…. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणा-या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं…. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते…. कुणाचाच आधार नसतो म्हणुन…. तसंच हे म्हातारपण ….. झुकलेलं आणि वाकलेलं…. निष्प्राण वेलीसारखं…. !

बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही…!

नाव पत्ता पिनकोडसहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं….नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच…. तसंच आमचं आयुष्य..! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले….

असं बोलुन ते हसायला लागतात….

त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच  पिळ पाडुन जातं…..

मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही… पण हे हसु खोटं आहे तुमचं… तर म्हणायचे… आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं…. हसण्याचं नाटकच केलं … आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु….???

मी निरुत्तर…. !

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं  आयुष्य झालंय… कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं…. टोपलीत ठेवतं…. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली…. नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी,  शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय… सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा….?

बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो….

काहीतरी काम करा बाबा , असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती…. बाबा कामाला तयार नव्हते !

म्हणायचे , आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं…किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही ; पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील…. श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील…

नाटक असतं हो सगळं आयुष्यच …. प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच…. !

इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच…. बॕट-या विकण्यासाठी त्यांना मदत केली…. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता… भिक  मागत नाहीत.

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता…. !

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕट-या विकताना रस्त्यावर भेटले…. मला जरा बाजुला घेवुन गेले…. म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर …..

सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो…. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, “हिने” तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते…. पाया पडुन माफी मागायला तयार आहे… बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु.”

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला / सास-याला  भिक मागायला लावली…. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली….?

डाॕक्टर काय करु सल्ला द्या…

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु….. !

बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु ? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना…. चालेल तुम्हाला ?

मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का ?अहो चुकतात तीच पोरं असतात….. माफ करतो तोच “बाप” असतो…..

अहो,  लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय; माया म्हणजे काय , भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो….. त्यातुन तो किती शिकला माहिती नाही…. बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर…असो !

पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी “क्षमा” म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर ….

आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला “क्षमा” करणार नाही…..

काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर …

असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत…

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। तनामनाची व्यथा ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ ।। तनामनाची व्यथा ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(ते ऐकून तनुजाला खूप वाईट वाटलं होतं. ती तडक घरी परत आली होती. इथून पुढे …

येणारे जाणारे तनुजाचं घर बघून आश्चर्यचकित होत. “ किती ग सुंदर घर ठेवलं आहेस तनुजा ! आम्हाला नाही ग बाई असं चैत्रगौरीच्या आराशीसारखं चकचकीत घर ठेवायला जमणार.”

तनुजाची मुलगीही आपली रूम नीट ठेवायला शिकली. पसारा करणारा दादा गेला अमेरिकेला.

त्या दिवशी राजीव घरी आला तर त्याला सोफ्यावर मासिके, सेंटर टेबलवर खायच्या डिशेस दिसल्या.  पाण्याचे ग्लास तसेच पडलेले. झालं ! त्याने रियाला आणि तनुजाला धारेवर धरले आणि खूप बोलला दोघीना. अगदी इथपर्यंत,की “ हे माझं घर  आहे,नीट ठेवणार नसाल तर  इथे  राहू नका. तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे.” 

रिया तिच्या खोलीत  निघून गेली आणि तनुजा काहीही बोलली नाही. रात्री बेडरूम मध्ये आल्यावर ती म्हणाली, ” हे अती होतंय तुझं राजीव ! घर माणसांसाठी असतं,, का माणसं घरासाठी गुलाम म्हणून असतात? सारखी त्याची चाकरी करायला? तुझ्या वागण्याला  obsessive compulsive disorder असे नाव आहे  बरं का – अती करू नकोस. वेळीच जागा हो. हवी तर डॉक्टरची मदत घे, मी येते तुझ्या बरोबर. पण आता हे वेड टोकाला गेलंय तुझं. नीट विचार कर. अरे किती सहन करायचं आम्ही? सततच आम्ही घाबरून असतो, कारण कधी तुझा स्फोट होईल ते सांगता येत नाही. मी खूप वाचलंय याबद्दल. काही लोक दिवसातून चाळीस चाळीस वेळा हात धुतात, तर काही  वीस वेळा अंघोळच करतात.  तूही याकडेच झुकायला लागला आहेस  राजीव. आम्हाला घराबाहेर जा म्हणण्याइतकं का आम्ही वाईट वागतो, का घर वाईट ठेवतो? नीट विचार कर. आता तुझ्या या स्वभावाची मला भीती वाटायला लागलीय. पहिल्यांदा कौतुक केले सगळ्यांनी, की राजीवला नीटनेटकेपणा, टापटीप आवडते. अडगळ अजिबात चालत नाही. पण आता आम्हाला याचा त्रास होतोय. नीट विचार कर, नाहीतर आपलं घर उध्वस्त होईल तुझ्या या अतिरेकापायी.”

राजीव विचारात पडला. ‘ खरंच आपण असे वागतोय का? आणि ती टोकाची स्वच्छता आणि न सहन होणारी अडगळ कधीपासून आपला ताबा घेऊन बसलीय? ‘ 

राजीव म्हणाला, “ तनुजा, तुम्ही बरोबर आहात. मी  आपल्या डॉक्टर मित्राची अपॉइंटमेंट घेतो पुढच्या आठवड्यात. ऑफिसमध्येही मला आता हे जाणवू लागलंय. मी खूप चिडचिड करतो,लोकांना वाट्टेल ते बोलतो. टेबलवर जरा जरी अडगळ दिसली, तरी मला ते सहन होत नाही. नक्की माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असावा “.

तनुजाला गहिवरून आले. तिने राजीवला जवळ घेतले. “ होईल सगळे ठीक राजीव. आपण जाऊया तुझ्या   सायकॉलॉजिस्ट मित्राकडे. मीही खूप बदलले तुझ्यामुळे. खूप छान स्वच्छतेच्या सवयी लागल्या मलाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला, की तो गुणही दोषच होतो ना. आपल्या मुलांनाही जाच व्हायचा याचा.

त्यांचे मित्र त्यांनी कधी घरी आणले नाहीत, हे लक्षात आलंय का तुझ्या ? अरे, आईवडिलांनी केलेली माया, धडपड नाही दिसत मुलांना. पण लावलेली शिस्त, दिलेला मार मात्र बरोबर लक्षात ठेवतात  रे ते. आमचेही  अतिशय प्रेम आहे तुझ्यावर, आणि हवाच आहेस तू सगळ्यांना.  पण  नॉर्मल बाबा आणि  नॉर्मल नवरा हवास तू राजीव.”

पुढच्या आठवड्यात राजीव आणि तनुजा , डॉ. निर्मल उपाध्याय यांच्याकडे गेले. निर्मल राजीवचा  शाळेपासूनचा मित्र. त्याने नीट सगळे ऐकून घेतले आणि तनुजाला म्हणाला, ” तू ही थांब आत. मी  

राजीवला  संमोहनाखाली नेणार आहे, आणि अर्थात इन्ट्राव्हेनस इंजेक्शन्स ही देणारच आहे.”

डॉ. निर्मलने राजीवला  संमोहनात नेले…. 

” राजीव, तू आता पंधरा वर्षे मागे जा. काय आठवतंय तुला?”

“ मी इंजिनिअर झालोय. माझं लग्न ठरलंय तनुजाशी. छान आहे ती.” 

 “ राजू, तू आता शाळेत आहेस. काय आठवतंय तुला?”

राजीवची अस्वस्थ हालचाल झाली. तो म्हणाला, ” मी दुसरीत आहे ना? नको नको. मला असं करू नका ना काका. इथे अडगळ आहे. कुबट वास येतोय.धूळ आहे. मला सोडा. “

राजीव किंचाळू लागला. डॉ. निर्मलने राजीवला इंजेक्शन दिले आणि तो गाढ झोपला..

तनुजाला डॉ. निर्मल म्हणाले, “ तनुजा, राजीवच्या लहानपणाच्या वाईट आठवणींशी याचा संबंध आहे बघ. पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण हे सेशन करू. मला खात्री आहे, राजीव यातून बाहेर येईल.” 

राजीव घरी आला, आणि त्याला हे काहीही आठवले नाही. डॉ. निर्मलने त्याला काही गोळ्याही सुरू केल्या होत्या.

पुढच्या आठवड्यात डॉ. निर्मलने पुन्हा राजीवला संमोहनात घातले. पुन्हा तसेच झाले…. 

डॉ. निर्मलने विचारले, ” राजीव, कोण आहेत रे हे काका? काय करतात तुला ते? “

राजू अस्वस्थ झाला…  ” आमचे लांबचे काका आहेत ते. गावाकडेअसतात. नेहमी नाही येत आमच्याकडे, पण मला नाही आवडत ते. मला खाऊ देतात आणि वर अडगळीच्या खोलीत नेतात आणि घाणेरडे चाळे करतात. मला किती दुखतं मग. काका,सोडा मला .. सोडा ना .”

राजीव हातपाय झाडू लागला. “ राजीव, तू हे आईबाबाना नाही का सांगितलंस?”

“ कित्ती वेळा सांगितलं मी, पण त्यांनी मलाच मार दिला. आई म्हणाली,’ मोठ्या माणसाबद्दल असं बोलतात का?” आणि मलाच अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवलं तिनं. काका,तुम्ही घाणेरडे आहात, वाईट आहात.” राजीव रडायला लागला. .. जणू आठ वर्षाचा लहानगा राजीवच तिथे  हुंदके देऊन रडत होता.

 तनुजाच्या  डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिने राजीवला जवळ घेतले. “.राजू,आता नाही हं असे कोणी तुला करणार. मी आहे ना तुझ्याजवळ ?” 

“आई ग, तुला खरं वाटतंय ना गं  मी सांगतोय ते? “

“ हो रे राजू. मी शिक्षा करीन त्या काकांना. कधीही घरी येऊ देणार नाही. मग तर झालं ना?”

डॉ. निर्मल चकित होऊन हे बघत राहिले. कोणीही न सांगता, तनुजाने उत्स्फूर्तपणे  राजूच्या खोल लपलेल्या जखमेवर फुंकर घातली. ती त्याची आईच झाली त्या क्षणी. जे काम त्यावेळी राजीवच्या आईने करायला हवे होते, ते तनुजाने केले. अगदी आंतरिक उमाळ्याने !

राजीवच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. “ आई ग,” म्हणून त्याने तनुजाला मिठी मारली.

डॉ. निर्मल म्हणाले, “ बघ.तनुजा, हे कारण होते राजीवच्या अतिरिक्त स्वच्छतेच्या वेडामागचे. ती अडगळीची खोली, ते घाणेरडे काका, ते कुबट वास आणि मनावरचं तीव्र दडपण. सहासात वर्षाच्या मुलावर केलेले अनैसर्गिक अत्याचार, याचा उद्रेक होता तो. आत्ताच्या भाषेत आम्ही याला ‘ चाईल्ड अब्यूज ‘ म्हणतो. कुठे तरी अंतर्मनात त्याचा संबंध होता, आणि म्हणूनच राजीवचं मन ते झटकून टाकायला , बाह्य गोष्टींची पराकोटीची स्वच्छता करू बघत असे. आता लक्षात आलं का, तो हे मुद्दाम नव्हता करत.”

तनुजाला अत्यंत दुःख झाले. आपल्या अत्यंत सज्जन नवऱ्याबद्दल तिची माया उफाळून आली.

डॉ. निर्मल म्हणाले, “ तो यातून हळूहळू बाहेर येईल. तू गप्पा मारताना हा विषय काढ. त्याला ते आठवू दे. त्याने ते खोल मनात दडपून ठेवलेले बाहेर येऊ दे.”

तनुजाने हळूहळू राजीवला मोकळे केले. त्याला ते सगळे आठवले. आपल्या अतिरेकी स्वच्छतेच्या मागचे कारण त्याला उमगले. जी गोष्ट त्याने इतके वर्ष मनाच्या कोपऱ्यात गाडून टाकली होती, ती तनुजा आणि 

डॉ. निर्मल समोर व्यक्त करताना, राजीव मोकळा होत गेला. 

राजीव यातून बाहेर आला. दोन वर्षांनी तनुजा आणि तो लेकाकडे अमेरिकेला गेले. 

निनाद एअरपोर्टवर त्यांना न्यायला आला होता. घरी जाताना गाडीत म्हणाला, ” बाबा,रागावणार नाही ना? माझा फ्लॅट एकदम अस्ताव्यस्त आहे हं. मी त्यातल्या त्यात आवरलाय पण तुमचा तो  शंभर टक्के निकष  नका लावू हं प्लीज. मला वेळच होत नाही हो आवरायला.” 

बाबा, तनुजा त्याच्या घरी पोचले. त्या फ्लॅटला बघून पूर्वीच्या राजीवने आकाश पाताळ एक केले असते. पण राजीव म्हणाला, “ ठीक ठेवलाय की फ्लॅट. इतका काही वाईट नाही रे. मस्त आहे,आवडला मला.अरे,तुम्ही मुलं महत्वाची मला. “ 

मुलगा आश्चर्यचकीतच झाला आणि म्हणाला, “ आई, हे काय बघतोय मी? आपले बाबाच बोलताहेत ना 

हे ? मी तर तुम्ही रागवाल म्हणून हॉटेलमध्ये रूम पण बुक करणार होतो.”

“नाही रे वेड्या. सुंदर आहे हाच फ्लॅट. तुझे बाबा बदललेत आता. ही तुझ्या आईची आणि निर्मलकाकांची कृपा. ते विसर आता. सांगेन कधीतरी. ” राजीव निनादला जवळ घेऊन म्हणाला.

निनादच्या डोळ्यात पाणीच आले. “ हे पहिल्यांदा  घडतंय बाबा, तुम्ही मला जवळ घेताय.”

“हो रे निनाद… बाळा नकळत अन्यायही झाला माझ्या हातून तुम्हा मुलांना वाढवताना. पण आता क्षमा कराल अशी आशा आहे. “ 

“काय हे बाबा ! “ असं म्हणत आईबाबांना मिठीच मारली निनादने, आणि हास्यविनोदात 

खायच्या डिशेस, कपबश्या, सगळे टेबलावर तसेच पडलेले टाकून तिघेही गप्पांमध्ये रंगून गेले.

— समाप्त — 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। तनामनाची व्यथा ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ ।। तनामनाची व्यथा ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

पावसाची नुसती  झड लागली होती. खूप वेळ ऑफिसमध्ये थांबून सुद्धा पाऊस थांबायचे चिन्ह दिसेना, तेव्हा तनुजा आणि सायली नाईलाजाने घरी निघाल्या. आज नेमकी सायली छत्री विसरली होती आणि एका छोट्या छत्रीत दोघीही पुऱ्या भिजल्याच. ” तनु, थँक्स हं. चल की वर. मस्त चहा पिऊया.आलं घालून करते. ओले कपडे बदल, माझा मस्त ड्रेस घाल आणि मग जा घरी. हवं तर राजीवला फोन करून सांग, मी सायलीकडे आहे, पाऊस थांबला की मग येते.”

क्षणभर तनुजाला मोह झाला,की सायलीचं  ऐकावं. जाऊन  तरी  काय करणार आहोत घरी इतक्यात ! .पण निग्रहानं ती म्हणाली, ” नको ग सायली ! कधी घरी जाईन असं झालंय बघ ! थँक्स,पण पळतेच मी आता.. ” तनुजा घरी आली.

ते बाहुलीघरासारखे चकचकीत घर तिच्या अंगावर आले. जिकडची वस्तू  तिथेच ठेवलेली, प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली. चादरीवर एकही सुरकुती खपणार नाही….. अजून राजीव आलेला दिसत नव्हता. तोही अडकला बहुतेक पावसात. तनुजाने मस्त चहा करून घेतला. केस कोरडे केले आणि बाल्कनीत आरामात बसली.

इतक्यात रिया बाहेरून आलीच. “ आई,मला पण हवाय मस्त आलंवाला चहा. आज सुलतान ए आझम आले नाहीत वाटतं? “

तनुजाला अतिशय हसू आलं. ” कारटे, बापाला असं म्हणतात का? किती प्रेम करतो ग तो तुझ्यावर.”

“ हो आई, मान्य !अग पण काय हा शिस्तीचा वरवंटा. उगीच नाही दादा पसार झाला यू एसला ! आई, मी गेले होते ना सुट्टीत दादाच्या घरी..  यूएस ला ? बाप रे ! काय ग तो पसारा.  मला म्हणाला, ‘ बघ बघ ! स्वातंत्र्य म्हणजे काय असतं 

ते ! बाबांच्या घरी म्हणजे आपण काट्यावरच उभे असायचो ना! इथे बघ ! ‘ मी म्हटलं त्याला, ‘ दादा, शी ! किती घाण ठेवलीयेस तुझी रूम ! बाबांनी मारलेच असते तुला. शी ! नुसता उकिरडा केलायस या खोलीचा ! ‘– तर आई यावर दादा हसत होता आणि म्हणाला, ‘ सुटलो त्या सुलतानशाहीतून. काय ग ती शिस्त बाबांची ! मला तर वाटतं रिया, बाबांना ओ सी डी असावा बरं का ! सतत काय ग हा नाद ! अतीच करतात बाबा. आपली आजी सांगत होती एकदा, म्हणाली, ‘ बाबारे,या तुझ्या बाबांनी आम्हालाही कमी नाही त्रास दिलाय बरं! सतत धू पूस. जरा पसारा दिसला,की झाली ओरडायला सुरुवात. अरे इतकी माणसं असलेल्या घरात अशी चोवीस तास काटेकोर स्वच्छता,आणि चित्रासारख्या वस्तू राहणार तरी कशा ? कसं  व्हायचं या मुलाचं, अशी काळजीच होती रे बाबा आम्हाला. सतत स्वच्छ कपडे हवे. हात सतत दहा दहा वेळा धुणार. पुन्हा डेटॉलनेही धुणार.’ – दादाने आजीला विचारलं ‘ आज्जी,मग पुढे काय झालं? ‘– ‘  मेल्या, पुढं लग्न झालं  त्याचं तुझ्या आईबरोबर ! इतका हुशार, मोठ्या नोकरीचा नवरा सोडतेय हो ती? पण मग समजला तिलाही या पराकोटीच्या स्वच्छतेचा इंगा ! आम्ही सुटलो, पण ती बिचारी अडकली ! गरीबच हो तनुजा, म्हणून सहन करते या  बाबाला ! ‘

आजीचे भाषण ऐकून सगळे हसायला लागले, त्यात तनुजाही सामील झाली.

तनुजाला तिचे लग्नाचे सुरुवातीचे दिवस आठवले. ती आपली साधीसुधी, चार सामान्य लोकांसारख्या घरात वाढलेली. पहिल्याच दिवशी राजीव म्हणाला होता , ” शी ! कसला रंग हा तुझ्या गाऊनचा ! आणि किती बेक्कार फिटिंग  ! आणि हो, लक्षात ठेव, मला ओली बाथरूम अजिबात चालणार नाही. ते पाय आधी कोरडे कर, बाथरूम ब्रशने कोरडी कर, आणि मगच ये इकडे ! आणि डेटॉलने हात दरवेळी धुवायचे.–आणखी एक, ते भयानक वासाचे तेल लावायचे नाही केसांना ! मी सांगतो तेच लावत जा ! कुठून भेटतात मलाच असले गावठी लोक ! “

तनुजा ही सरबत्ती–तीही अजून कोऱ्या करकरीत असलेल्या नवऱ्याकडून ऐकून एकदम गारठलीच होती . . भयंकर घाबरली होती. ते पाहून तो तिला म्हणाला होता , ‘ घाबरतेस काय? मी काय वाघ आहे का? माझ्यासारखे वागावे लागेल तुला इतकेच म्हणणे आहे माझे .’– तनुजा ‘ होहो ‘ म्हणाली, आणि मगच त्याने तिला जवळ घेतले.

आता मात्र तनुजाला हसू येत होते. स्वच्छता आणि पराकोटीची शिस्त एवढे सोडले, तर राजीव लाखात एक होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घाबरत सासूला विचारले, “आई, हे असे काय वागतात हो? मला भयंकर भीतिच वाटतेय बघा ! ” सासू हसली आणि म्हणाली, “ हो ग बाई! आम्हीही सोसलाय बरं हा काच. पण तू अजिबात घाबरू नको. बाकी खूप चांगलाय माझा लेक ! तेवढी ती स्वच्छता आणि शिस्त सांभाळ हो ! “

तनुजाने कपाळावर हात मारला. सासूबाई हसत होत्या. “ अहो आई,काय हसताय? “ असं म्हणून तिने रात्रीचा किस्सा सांगितला आणि दोघी सासू सुना हसायलाच लागल्या. त्या दिवसापासून तनुजाची सासूशी जी गट्टी जमली ती आजपर्यंत.

राजीवचं कपाट तर बघण्यासारखं असायचं. फुल शर्ट्सचा वेगळा कप्पा. चेक्सचे टी शर्ट्स वेगळे. डार्क कपडे वेगळे, फिक्के वेगळे —  पँटस ही रंगाप्रमाणे लावलेल्या – हँगरवर,आधी फिके मग डार्क कपडे क्रमाने लावलेले. 

 परफ्यूम्स शिस्तीत अल्फाबेट्स प्रमाणे ओळीत लावलेली. त्याच्या कपाटाला कुणी हात लावलेला चालायचा नाही त्याला. जराही धूळ, अडगळ, कुबट वास सहनच व्हायचा नाही त्याला. त्यामुळेच  तो रेल्वे किंवा एसटीचा प्रवास चुकूनही करत नसे. लोकांच्या जवळच्या सीट्स त्याला नको असत. विमानानेही तो कधीच इकॉनॉमी क्लासने जात नसे – लोक अगदी जवळ असतात म्हणून. कायम बिझनेस क्लासचाच प्रवास असायचा त्याचा. कंपनी त्याला सगळे देत असेच, पण नाही दिले एखादेवेळी, तर हा स्वतःच्या पैशाने जात असे.

” काय हो तुम्हाला इतकी  प्रायव्हसी प्रिय? जरा नकोत माणसे जवळ आलेली.” ती दरवेळी त्याला म्हणायची. 

एकदा राजीवचा मित्र घरी आला होता. रिया अगदी लहान होती. त्याने सहज रियाला मांडीवर बसवले आणि तिला चॉकलेट दिले. पापाही घेतला प्रेमाने. ते पाहून राजीव अतिशय संतापला होता आणि म्हणाला होता ,” रिया,खाली उतर आधी. असं कोणाच्याही मांडीवर बसलीस तर फोडून  काढीन मी.”

तो मित्र रागाने जो निघून गेला, तो पुन्हा कधीही आला नाही. 

“ अरे काय हे ? असं का बोललास भावजीना? किती दुखावले ते.”

“ आहे हे असं आहे बघ..मला अजिबात सहन होत नाही मोठ्यांनी मुलांशी लगट केलेली ! काहीही म्हण तू मग. “ तनुजा अगदी हताश झाली होती तेव्हा.

पण काहीकाही  गोष्टी फार उत्कृष्ट होत्या त्याच्या. चॉईस फार सुरेख होता राजीवचा.  तनुजाला त्याने इतके सुंदर स्वयंपाकघर लावून दिले आणि म्हणाला होता, “ हे कायम असेच राहिले पाहिजे बरं का. मला अस्ताव्यस्त घरं अजिबात आवडत नाहीत.  मिक्सर, मायक्रो, फ्रीज लखलखीतच हवा. घाणेरडे हात लावायचे नाहीत त्याला. “

तनुजा नोकरी करायची. ती सांभाळून हे असे शोरूमसारखे घर ठेवायचे म्हणजे कठीणच काम होते तिला.

बरं, राजीव स्वतः तिला कधीही पैशाबद्दल अडवायचा नाही, की तिच्या पगाराचा हिशोबही कधी मागायचा नाही.  

तनुजाला सासूबाई म्हणाल्या होत्या , ” अग, एवढा पगार मिळवतेस ना? मग ठेव की एखादी मुलगी साफसफाईला. कोण बघतंय, ही सगळी कामं तू करतेस की नोकर करतात ते –  घर त्याच्या म्हणण्याप्रमाणे चकाचक राहिलं की झालं.” 

सासूचा गुरुमंत्र अमलात आणून तनुजाने वरकाम आणि साफसफाईला  एक  मुलगी ठेवली. तिला आपल्या तालमीत तयार केली. कलाबाई म्हणजे  तनुजाचा उजवा हातच बनली.,राजीवच्या धाकाने तनुजाही हळूहळू त्याच्या चांगल्या सवयी  उचलू लागलीच होती. तिलाही आता पसारा,अस्वच्छता सहन होईनाशी झाली होती. .

एकदा माहेरी रहायला गेली होती,  तेव्हा भावजयीने ठेवलेलं घर बघून हबकलीच होती तनुजा. आईला म्हणालीही होती, ” अग काय हे आई.किती घाण झालंय आपलं घर… तुझं लक्ष नसतं का हल्ली? घरभर नुसता पसारा ! आणि बाथरूम्स तर बघवत नाहीत.  किती अवकळा आलीय घरावर. तरी बरं, वहिनी घरातचअसते, नोकरी नाही करत.”

भावजय हे ऐकून लगेच म्हणाली होती ,” तनुजा,असू दे हो आमचं घर असंच. तू मात्र फारच बदलली आहेस तिकडे जाऊन. अगं मुलं पसारा करणारच ना.”

“अग वहिनी, मुलं मला पण आहेत की. पण किती खेळणी पसरली आहेत. खेळून झालं की त्यांनाच उचलायला लावत जा की.” 

भावजयीला राग आला आणि ती तिथून निघून गेली.

आई म्हणाली, ” हे बघ, तुझे आणि त्या राजीवचे पराकोटीचे स्वच्छता वेड आम्हाला नको सांगू. आहे हे असं आहे. पटलं तरच येत जा रहायला. “ 

ते ऐकून तनुजाला खूप वाईट वाटलं होतं . ती तडक घरी परत आली होती .

— क्रमशः भाग पहिला. 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कुंदन भाग- २… लेखक – श्री अनिरुद्ध  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कुंदन भाग- २… लेखक – श्री अनिरुद्ध  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

(मागील भागात आपण पाहिले – बाई बाहेर आल्या. म्हणाल्या मी आज जरा बाहेर जाणार आहे. बहुतेक उद्यापासून दुपारी मी घरात नसेन, तुला सांभाळावं लागेल सगळं, मी सगळं म्हणजे काय हे विचारणार इतक्यात त्याच म्हणाल्या कुंदनकडे लक्ष द्यावं लागेल. त्या सारखं कुंदन चा उल्लेख करत होत्या पण माझं धैर्यच होत नव्हतं कुंदन कोण, कुठे आहे म्हणून विचारायचं? – आता इथून पुढे )

मी घरी आले मनातून कुंदन जात नव्हता ठाण मांडून बसला होता. इतकं काय गुपित होतं त्यात म्हणजे बाईंनी मला सांगायला काय हरकत होती. उद्यापासून कुंदनशी आपला संबंध येणार असा विचार मनात येऊन एक शिरशिरी आली अंगावर, त्या खोलीत कुंदन आहे का? कुंदन किती वर्षांचा असेल? त्याला काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम असेल का? अनेक विचार मनात घेऊनच मी रात्री झोपले, सकाळी लवकर उठावं लागणार होत ना?

सरावल्यासारखी मी बेल दाबली आणि आतून लीनाताई आली वाटत असं म्हंटल्याचा  बाईंचा आवाज आला. मी दचकले म्हणजे दोन दिवस मी जात होते त्यांच्याकडे. कुंदन कोण हे समजलं पण नव्हतं. मग बाई कोणाशी बोलतात इतकं स्पष्ट? दार उघडल्यावर मी डावीकडे नजर वळवली कारण आज त्या खोलीचं दार उघड होत, मी तिकडेच बघत घरात आले, किचनच्या दिशेने निघाले आणि बाई त्या खोलीत गेल्या, मी चहा टाकला आणि मला बाईंचा आवाज ऐकू आला म्हणत होत्या आज दूध तुला लीनाताई देईल, मी थबकले म्हणजे आज कुंदन कोण ते समजणार होत तर मला, मी चहा झालाय म्हणून बाईंना सांगितले बाई आतमध्ये होत्या त्या खोलीत, तिकडूनच त्यांनी आवाज दिला आणि म्हणाल्या आपल्या तिघांचे कप घेऊन इकडेच ये. बाप रे मला का कोणास ठाऊक हे सगळं गूढंच वाटत होतं. मी ट्रे मध्ये कप ठेऊन पॅसेजमध्ये आले तर बाई हसत होत्या. काहीतरी कुंदनला सांगून म्हणत होत्या, ‘आता बघ गंमत…’ असं काहीतरी, माझी पावलं जड झाली होती. कुंदन म्हणजे कोण हे गूढच राहावं असं काहीतरी वाटत होत मला, मी दाराजवळ आले बाईंना चाहूल लागली म्हणाल्या, ‘लीना आत मधे ये, मी आतमधे आले डाव्याबाजूला बेड होता, बेडरूमच्या विंडोज बंद होत्या, आतमध्ये मंद टेबललॅम्प लावला होता. मी कुंदनला बघण्यास अधीर होते.  बाई बेडवर बसल्या होत्या आणि पलीकडे पांघरून घातलेलं काहीतरी होत. मला काहीच समजत नव्हतं, म्हणजे कुंदन कुठे आहे ते, मी पुढे आले आणि दचकले बेडवर बाईंच्या बाजूला एक दोन फुटांचा बाहुला उशीला पाठ टेकवून ठेवला होता. बाप रे त्या बाहुल्याचे डोळे इतके बोलके वाटत होते म्हणजे जणू ‘ये लीनाताई…’ असं काहीतरी म्हणत असावेत असं वाटलं.

मला धक्काच बसला म्हणजे बाई त्या बाहुल्याला कुंदन म्हणत होत्या. अगदी एखाद्या जिवंत व्यक्तीसारखं त्याच्याशी वागत होत्या. माझा तो दिवस भयंकर गोंधळात गेला. कुंदनला दूध देण्यापासून त्याचे केस विंचरणे, त्याचा बेड नीट करणे, त्याला कपडे घालणे अशी अनेक हास्यास्पद कामं मी करत राहिले. दुपारी अचानक बाई म्हणाल्या मी जाऊन येते. जरा कुंदन कडे लक्ष ठेव. दुपारी त्याला गोष्ट सांगायला लागते मोठ्यांदी त्याशिवाय तो झोपत नाही. मी जाऊन येते दोन तासात. बाई गेल्या मी दार लावलं आणि त्या खोलीच्या दाराकडे बघितलं, आतमध्ये कुंदन होता. मी किचन मध्ये गेले काही कामं केली. सारखं लक्ष कुंदनच्या खोलीकडे जात होत. माझं धैर्यच होत नव्हतं तिकडे जाण्याचं, कारण कुंदनचे डोळे खूप बोलके होते जणू माझं तुला सगळं करायचं आहे त्याशिवाय गत्यंतर नाही असं ते सांगत असावेत. मी लक्षच दिलं नाही तासभर॰ अचानक मी दचकले म्हणजे मी हॉल मध्ये बसले होते त्यामुळे कुंदनची खोली दिसत नव्हती कारण हॉल मधून उजवीकडे जावं लागे आठ दहा फूट, पण अचानक मी दचकले कारण पॅसेजमध्ये मला सावली दिसली. मी भेदरल्यासारखी झाले तोंडातून शब्द फुटत नव्हता. मी घाबरून बेडरूममध्ये आले. बेडरूम त्या खोलीला चिटकून आहे. मी बेडरूमचं दार लावून घेतलं. दुपारची शांतता भयाण वाटत होती. माळ्यावर एकटीच असल्याची भावना गडद झाली होती त्यामुळे गुदमरल्यासारखं होत होतं. मी बेडवर शांत बसले, दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले. हळू हळू मी बेडवर कधी आडवी झाले मलाच समजलं नाही. अचानक मला जाग आली कश्याने तरी मी डोळे उघडले आणि भयंकर दचकले, बाई समोर उभ्या होत्या माझ्याकडे एकटक बघत. मी उठले बघून त्या तरातरा बाहेर गेल्या बहुतेक कुंदनच्या खोलीत गेल्या असाव्यात. मी बाहेर आले, बेसिनमध्ये तोंडावर पाण्याचे सपकारे मारले. बाईंनी मला हाक मारली, मी सगळं अवसान एकवटून त्या खोलीत गेले. बाई म्हणाल्या कुंदन इतक्या हाका मारत होता का लक्ष दिलं नाहीस? मी गोंधळले काय बोलावं हेच सुचेनासं झालं. मी चाचरत म्हणाले बाई तो एक बाहुला आहे ना, हाका कश्या मारेल? हे सांगताना मी कुंदनकडे बघितलं त्याच्या डोळ्यात छद्मी भाव दिसत होते.

दुसऱ्या दिवशी मी गेले नाही. बाईंचा फोन आला, का आली नाहीस म्हणून विचारलं? मावशी सुद्धा आश्चर्यचकित झाली, का नाही गेलीस म्हणून विचारलं, काय सांगणार मी? दोन दिवसांनी का कोणास ठाऊक सकाळी उठून गेले. बेल दाबली आतून हालचाल जाणवली, लीनाताई आली असं काहींतरी बाई म्हणाल्या कुंदनला. मी आत आले, सरळ कुंदनच्या खोलीत गेले. तो खोलीत नव्हता. मी बाईंना विचारलं. म्हणाल्या, ‘किचन मधे बसलाय.’ मी किचनमधे आले. कुंदन खुर्चीवर बसला होता मी आल्यावर जणू त्याने नजर फिरवली माझ्याकडे मी आतून थरारले. बाई दुपारी गेल्या बाहेर. मी कुंदनच्या खोलीला बाहेरून कडी घातली आणि हॉल मधे बसून राहिले. दुपारभर त्या खोलीतून धडपड ऐकू येत होती, जणू कुंदन बाहेर येण्याची खटपट करत होता. मी बेडरूममधे जाऊन भिंतीला कान लावला, मला मुसमुसण्याचा आवाज आला. मी गडबडले हे काय आहे म्हणजे नक्की काय प्रकार आहे, हेच समजेनासं झालं. मी खोलीपाशी आले, हळूच कडी काढली आणि कानोसा घेतला कोणीतरी धावत दारापासून पळाल्यासारखं वाटलं मी पटकन आत आले तर कुंदन बेडवर उशीला टेकून बसला होता माझ्याकडे बघत. बाई आल्या. खोलीत गेल्या. आतून दार लावून घेतलं. काहीतरी बोलत होत्या कुंदनशी.

मी जाणं सोडलं बाईंकडे॰  काहीतरी गूढ निश्चित होतं त्या खोलीत आणि कुंदनबद्धल, मावशी विचारत होती का जात नाहीस म्हणून? मी तिला काय सांगू?

नंतर खूप गोष्टी कानावर आल्या बाईंबद्धल, तो फ्लॅट हल्ली बंद असतो. बाईंना हॉस्पिटल मधे ठेवलंय बरेच महिने, फ्लॅटमधून कसले कसले आवाज येतात म्हणे.

वॉचमननी विचारलं कुठे जाताय लीनाताई? का कोणास ठाऊक मी वर आले आणि बेल दाबली आतमध्ये रिकाम्या नळ्या एकमेकांवर आपटल्याचा आवाज घुमला, मी दाराला कान लावला आणि अचानक मला आतून आवाज ऐकू आला “लीनाताई तू ये ना सोबतीला …. मी एकटा असतो” …

 मी थरारले, घाईघाईत लिफ्टमधून खाली आले आणि बिल्डिंगच्या बाहेर पडले. 

मूळ लेखक – श्री अनिरुद्ध

प्रस्तुती – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कुंदन भाग- १… लेखक – श्री अनिरुद्ध  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कुंदन भाग- १… लेखक – श्री अनिरुद्ध  ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

जरा घाबरतच बेल वाजवली, आतमधे धीरगंभीर असा पोकळ नळ्या एकमेकांवर आपटून आवाज येतो तसा आवाज आला. दोन मिनटं गेली. मला बधिर झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे नक्की हेच घर आहे ना असा सुद्धा विचार मनात येऊन मागे फिरले पण नेमप्लेट तर तीच होती. अजून एकदा बेल वाजवावी का? मजल्यावर तीन फ्लॅट दिसत होते, खूप मोठा पॅसेज होता, हा फ्लॅट ह्या कोपऱ्यात, त्या बाजूला सुद्धा डेकोरेट केलेला दरवाजा दिसत होता. मधे सुद्धा एक फ्लॅट असावा. आत मधे हालचाल जाणवली बहुतेक कोणीतरी दार उघडायला येत असावं, मी सावरून उभी राहिले. मुद्दामून ड्रेस घातला होता म्हणजे मला खरं तर जीन्स टॉप्स वगैरे आवडतं, पण मावशी चिडते। म्हणते तुझं हे वय वाईट असतं ड्रेस घालत जा आजकालचे दिवस खराब आहेत.

दार उघडलं आणि मी स्तब्ध उभी राहिले समोर मध्यम वयाची सुंदर म्हणण्याइतपत एक बाई उभी होती. मी लीना, माझा आवाज एकदम घोगरा झाला म्हणजे खरंच मी घाबरले होते, कोणाकडे मेड म्हणून काम करण्याची माझी पहिलीच वेळ. म्हणजे आयुष्यात मावशीचं घर सोडून पहिल्यांदा अशी मी दुसरीकडे आले होते.

बस, त्या आवाजात जरब होती म्हणजे सुंदर बाईचा आवाज वाटत नव्हता तो.  तर हुकूमत गाजवणारा आवाज वाटत होता. कधी काम केलंयस का मुलांना सांभाळायचं? मी दचकले.  म्हणजे मावशीने सांगितलं होत एकट्या बाई आहेत हेल्पर म्हणून त्यांच्या घरात काम करायचंय. जे पडेल ते. पण मुलांना सांभाळायचं माहिती नव्हतं. मी बावरलेली पाहून त्या बाई म्हणाल्या म्हणजे तुला तसं कुंदनला बघावं लागणार नाही पण कधी गरज पडलीच तर ते सुद्धा करावं लागेल. माझ्या तोंडावर पडलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत त्या म्हणाल्या, ये तुला घर दाखवते, मी यंत्रवत उठले आणि त्यांच्या मागे निघाले. दारातून आत मधे आल्यावर मोठा लांब पॅसेज, नंतर हॉलचा दरवाजा डाव्या बाजूला पुढे पॅसेज कंटिन्यू टॉयलेट बाथरूम्स, पॅसेजच्या टोकाला किचन. हॉल मधून दोन बेडरुम्सना दरवाजे. बेडरूम्स प्रशस्त म्हणजे सगळं घरच स्पेशिअस. मावशीच्या वनरुम किचन मधे राहण्याची सवय असल्याने हे एकदम अंगावर आल्यासारखं वाटत होत. बाईंनी थंडगार सरबत दिलं म्हणाल्या आता दिवेलागणी झालीये. तू निघ उद्या सकाळी सहाला ये, मी दचकले सहाला म्हणजे माझ्या दृष्टीने खूपच लवकर,  मनात विचार आला नको यायला उद्या॰ सहापासून किती वाजेपर्यंत कोणास ठाऊक असं वाटायला लागलं।  त्याचवेळेस बाई म्हणाल्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबायला लागेल.’ बाई मनातलं ओळखतात की काय असं वाटून गेलं. बाई छद्मी हसल्या म्हणाल्या, ‘ये उद्या आणि मला बाई म्हण्टलंस तरी चालेल,मी तुला लीना म्हणत जाईन.’ बाप रे सगळंच ओळखतात ह्या माझ्या मनातलं? मी मेन दरवाजाजवळ आले लॅच सिस्टीम माहिती नसल्याने मी तशीच उभी राहिले, बाई पुढे आल्या माझ्या अंगावरून जाताना त्यांच्या अंगाचा मंद सुवास जाणवला. त्या दार उघडत असताना माझं अचानक लक्ष पॅसेजच्या ह्या कोपऱ्यात गेलं तिथेसुद्धा एक दरवाजा होता म्हणजे एखादी खोली असावी. म्हणजे हॉल, किचन, दोन बेडरूम्स, दोन टॉयलेट बाथरूम्स, आणि ही खोली मला बाईंनी दाखवलीच नाही?

दाराचं लॅच सोफिस्टिकेटेड आवाज करत बंद झालं आणि मी मोकळा श्वास घेतला आणि मी दचकले आत बाई बोलत होत्या “कुंदन आले रे थांब.”मघाशी त्यांनी कुंदनचा उल्लेख केला होता पण कुंदन कोण हे सांगितलं नव्हतं आणि तो घरात आहे हे सांगितलं पण नव्हतं. आणि ती खोली? त्याबद्धल सुद्धा काही म्हणाल्या नाहीत? खूपच विचीत्र वाटलं खरं. सांगून टाकूया मावशीला नको म्हणून? तशीच घरी आले मावशी वाट बघत बसली होती, माझ्या जिभेवर अजून त्या थंडगार सरबताची चव रेंगाळत होती आणि बाई दिसत होत्या नजरेसमोर, बाईंची नजर गूढ वाटली मला काहीतरी लपवून ठेवल्यासारखं चोरटी पण हुकूमत गाजवणारी नजर, बाईंना नवरा नाहीये का? मी माझ्या विचारातच चपला काढल्या, मावशी म्हणाली, ‘लीना काय झालं? मी काही न बोलता पलंगावर बसले मघाशी नको वाटत होत त्या बाईंकडे जाणं पण ती खोली आणि कुंदन माझ्या मनात घोळत होते. पगार खूप देणार होत्या, बारा तास चांगल्या घरात वावरायचं, जेवणखाण होणार होतं म्हणजे तक्रारीला जागाच नव्हती शिवाय सगळंच पॉश असल्याने साफसफाई वगैरे फारशी करावी लागणार नव्हती हे नक्की, हल्ली ग्रॅज्युएट होऊन काय मिळतंय बाहेर त्यापेक्षा इकडे सुरक्षित आणि चांगला पगार, माझ्या तोंडातून आपसूक बाहेर आलं, “छान आहे.” मावशी खुश झाली. म्हणाले, ‘उद्या सकाळी सहाला जायचंय त्यांच्या घरी,’ मावशी सुद्धा आश्चर्यचकित झाली म्हणाली, ‘इतक्या लवकर?’

वॉचमनशी कालच ओळख झाली होती त्यामुळे त्याने मी बिल्डिंगच्या गेटमधून शिरल्यावर नुसती मान हलवली, मी लिफ्टपाशी आले पाचवा माळा  दाबला लिफ्टच्या पंख्याच्या आवाजात मनात विचार येत होते कुंदनबद्धल, कोण असेल हा कुंदन? बाई तर मध्यमवयीन वाटत होती॰ म्हणजे कुंदन असला तर निदान पंधरा सोळा वर्षांचा तरी असावा. कुंदनला काही आजार असेल का? का अपंग? लिफ्टचा दरवाजा उघडला आणि उजव्या बाजूला आले बेल वर हात ठेवला इतक्यात आतून कुजबुज ऐकू आली म्हणजे बाई मोठ्यांदीच बोलत होत्या पण सागाचा जाड दरवाजा असल्याने बाहेर खूप कमी आवाज येत होता. मी दाराला कान लावला आणि कानोसा घेऊ लागले. बाई, कुंदन कुंदन हाका मारत होत्या बहुतेक त्याला उठवत असाव्यात. अचानक त्या समोरच्या फ्लॅट च्या सेफ्टी डोअर मधून कोणीतरी बघत असावं असं जाणवलं मी झटक्यात दारापासून लांब झाले आणि बेल वर हात ठेवला.

आतमध्ये लगबग झाली असावी, मी श्वास का कोणास ठाऊक रोखल्यासारखा केला, बाईंनी दार उघडलं, बाई गाऊनमधे होत्या, मध्यमवयीन असल्या तरी तरुणीला लाजवतील अशी फिगर होती त्यांची. ‘ये’ म्हणाल्या मी का कोणास ठाऊक त्यांच्या आवाजाखाली संमोहित होत होते की काय कोणास ठाऊक? मी आतमधे आले, मला डायरेक्ट स्वयंपाकघरात घेऊन आल्या बाई. म्हणाल्या, ‘चहा येतो ना करता? दोघींचा कर आणि हो दूध सुद्धा. दे, त्यांनी एक मग दिला काढून. म्हणाल्या, ‘भरून दे साखर कमी टाक कुंदनला साखर कमी लागते.’ मी दचकले म्हणजे हा कुंदन कोण हे काही समजत नव्हते कदाचित आज दिसेल कुंदन असा विचार करून मी हो म्हणाले. पटपट चहा केला, बाईंनी चहाचा कप आणि दुधाचा कप एका ट्रे मधे घेतला आणि त्या पॅसेजच्या त्या कोपऱ्यात असणाऱ्या बंद खोलीच्या दिशेने निघाल्या, मी किचनमध्ये डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसले चहाचा कप हातात घेऊन, बाईंनी हळूच ते दार ढकललं आणि त्या आतमध्ये शिरल्या दार बंद करून घेतलं. मी चहाचा घोट घेतला आणि त्या बंद दाराकडे बघत राहिले. अर्ध्या तासांनी बाई आल्या बाहेर, मी इकडची तिकडची कामं करण्याचा प्रयत्न करत होते. बाईंनी सगळं समजावून सांगितलं, अधूनमधून कुंदनचा उल्लेख करत होत्या. मला चैन पडत नव्हतं कुंदन काही दिसत नव्हता. जेवणं झाली. बाई अधून मधून त्या खोलीत जात येत होत्या, आतमधे गेल्यावर आतून बाईंची कुजबुज जाणवत होती पण कुंदनचा आवाज काही येत नव्हता.

करकरीत दुपार झाली बाई मला म्हणाल्या, ‘तू पडू शकतेस पाहिजे तर  हॉलमधे,’ मी तुम्ही काय करणार ह्या नजरेने त्यांच्याकडे बघितलं, जणू माझ्या मनातला प्रश्न ओळखून त्या म्हणाल्या, ‘कुंदनजवळ पडते जरा नंतर मला दुपारी क्लब मधे जायचंय, मला झोप लागली तर अर्ध्या तासानी उठव मी जास्त झोपत नाही दुपारची.’

हे कुंदन प्रकरण मला खूपच गूढ वाटायला लागलं होत. बाई गेल्या त्या खोलीत आणि मी विचार करायला लागले कुंदनचा. दहा एक मिनीटांनी मी उठले हळूच आवाज  न करता त्या खोलीच्या दाराजवळ गेले आणि कान लावला, बाईंचा कोणाशी तरी बोलण्याचा स्पष्ट आवाज येत होता. माझ्याबद्धलच सांगत होत्या कुंदनला, मी थरारले. कोण आहे हा कुंदन म्हणजे दिसतच नाहीये बाई सुद्धा काही सांगत नाहीयेत त्याच्याबद्धल आणि माझ्याबद्दल त्याला सांगतायत? मी नीट कानोसा घेतला म्हणत होत्या ती लीनाताई राहील तुझ्याबरोबर उद्यापासून, तिला त्रास द्यायचा नाही. मी दचकले बाप रे म्हणजे कुंदनला आपल्याला सांभाळायला लागणार आहे? आतून हालचाल जाणवली मी झटक्यात हॉलमध्ये आले. बाई बाहेर आल्या. म्हणाल्या मी आज जरा बाहेर जाणार आहे. बहुतेक उद्यापासून दुपारी मी घरात नसेन, तुला सांभाळावं लागेल सगळं, मी सगळं म्हणजे काय हे विचारणार इतक्यात त्याच म्हणाल्या कुंदनकडे लक्ष द्यावं लागेल. त्या सारखं कुंदन चा उल्लेख करत होत्या पण माझं धैर्यच होत नव्हतं कुंदन कोण, कुठे आहे म्हणून विचारायचं?

क्रमश: भाग १

मूळ लेखक – श्री अनिरुद्ध

प्रस्तुती – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares