मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

[आपल्या वार्डातला हिंदूंचा एरिया कुठला, मुस्लिम एरिया कुठला ह्याचा पूर्ण अभ्यास करून त्यानुसार मतदारांना काही ना काही वाटप करायला लागते. ]आता पुढे—-

त्यामध्ये पण मी मास्टर आहे म्हणून तर भाऊ मला मानतात ना. काय काय वेळेला तर भाऊ माझी त्यांचा डावा हात म्हणूनच ओळख करून देतात. अहो डावा हात म्हणजे आमचे भाऊ डावखुरे आहेत म्हणून हो. तुम्ही पण आहे ना… काय पण गैरसमज करून घेता.

 संध्याकाळी सात, आठला भाऊ परत ऑफिसात येतात.  मग तिकडून माघारी घरी जायचा काही टाईम फिक्स नसतो. भाऊ जिथपर्यंत ऑफिसमध्ये असतात तिथपर्यंत एक पंधरा वीस पोरांना ऑफिसमध्ये थांबावेच लागते. सध्या कामाचा लय पसारा वाढलाय पक्ष बांधणी, म्युनिसिपलटीची कामे, नवीन बिल्डिंगचे नकाशे पास करून आणणे, जागेचे व्यवहार, फार्म हाऊसची कामे ….. आणि वेळात वेळ काढून मतदारांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवणे किंवा तसे त्यांना आश्वासन तरी देणे. खायचं काम नाही एवढा मोठा पसारा सांभाळायचा म्हणजे…  हो….तुम्हाला म्हणून सांगतो, भाऊंनी  माझ्या नावावर पण लोणावळ्याला एक फार्म हाऊस घेतला आहे. 

चावी त्यांच्याकडेच असते पण आपल्याला सांगितले आहे कधी पण तुझ्या घरच्यांना घेऊन जा.

 ह्या अशा अनेक कामातून रात्री जरा उशिराच मोकळा होतो. मग  काय जरा माझ्याखातर येणाऱ्या माझ्या मित्रांबरोबर एक बैठक मारून विचारांची देवाण घेवाण करून त्यांच्याबरोबरच  भुर्जीपाव किंवा भाजीपाव खाऊनच रात्री उशिरा घरी जायला लागते. पहिले पहिले अशा अवस्थेत घरी गेल्यावर पिताश्री आणि मातोश्रींची बडबड ऐकायला लागून डोक्याचे दही व्हायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता मी मातोश्रीना दर महिन्याला घरखर्चाला दहा हजार देतो ना– आणि ते फ्लेक्सवर माझे फोटो पण येतात. त्यामुळे कितीही उशीर झाला तरी मला आता काय पण बोलत नाय. हो आणि ते गणपती उत्सव, नवरात्री उत्सवला माझ्या आई आणि अण्णांना एखादा दिवस मी पूजेचा मान पण मिळवून देतो. आता आमच्या एरियातले लोक त्यांना माझे आई वडील म्हणून ओळखायला लागले असल्याने  ते पण माझ्यावर खूष असतात, म्हणून तर आता माझ्या लग्नाचा बँड बाजा वाजवायचा आहे असं म्हणतात. 

 आता तुम्हीच सांगा, एवढे सगळे मी करून वर त्यो मुलीचा बाप मलाच विचारतो, ” तुम्ही सध्या काय करता? ” आंधळा मेला तो— ‘ अरे डोळे उघडे ठेऊन आला असतास तर चौकाचौकात जे भाऊंचे बॅनर आणि होर्डिंग लागले आहेत त्यात खाली माझ्या नावासकट फोटो दिसले असते. अरे थांब जरा आता तीन महिन्यातच मुनिसिपाल्टीचे इलेक्शन आहे. भाऊ मला तीन वर्षांपूर्वीच बोलले आहेत मला ते नगरसेवक बनवणार आहेत. एकदा का नगरसेवक बनलो की बघ कसा चमकतो ते. मग टप्याटप्याने नाही तर टक्याटक्याने इज्जत कमवणार आणि मोठा होणार.’ सगळे सेटिंग झाले आहे पण एकच प्रॉब्लेम झाला आहे …….

 कालच डिक्लेअर झाले… आमचा वॉर्ड हा लेडीज वॉर्ड डिक्लेर झाला आणि भाऊंची बायको म्हणजेच आमच्या वैनीसाहेबांना भाऊंनी  तिकीट मिळवून दिले. हां, पण भाऊंनी मला शब्द दिलाय पुढच्या वेळेला मलाच तिकीट द्यायचे.

चला आता इलेक्शनचे लय काम असणार आहे. तुमच्याशी बोलायला पण वेळ मिळणार नाही. वैनीसाहेबांना निवडून आणायचे आहे, त्यासाठी मरेस्तोवर काम करायचे आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, वैनीसाहेबांना निवडून आणले की भाऊंनी मला एक इनोव्हा कार द्यायचा शब्द दिला आहे. एक मात्र नक्की, फ्युचर आपले लय ब्राइट आहे.

एवढा मी बिझी माणूस आणि त्यो मेला मुलीचा बाप मलाच विचारतो, “तुम्ही सध्या काय करता ? “

— समाप्त — 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

नमस्कार राव ….. ओळखलेत ना मला. अहो तुम्ही मला खूप वेळा बघितले आहे. हां बरोबर- तोच तो. बाईकला आमच्या पक्षाचा झेंडा लावून फिरणारा. आमच्या म्हणजे भाऊ ज्या  पक्षात असतात त्या पक्षाचा झेंडा. ते आपल्या नाक्यावर भाऊंच्या वाढदिवसाच्या दिवशी भाऊंच्या फोटोचा फ्लेक्स लागतो ना त्याच्या खाली बघा माझा फोटो असतो…. हां तोच तो..मी…. भाऊंच्या  अनेक विश्वासातल्या कार्यकर्त्यातला एक. गेली दहा वर्षे भाऊंसाठी काम करतो. भाऊंसाठी काय पण काम करतो. आता थोडा सिनिअर झालोय. आपले भाऊ मला लय इज्जत देतात. बरोबर…. ही  बाईक पण भाऊंनीच दिली आहे. मानतात आपल्याला. भाऊंसाठी लॉकपमध्ये पण जाऊन आलोय तेव्हापासून आपली इज्जत लय वाढली. नशीब लागते भाऊंच्या एवढ्या जवळ जायला.

हां  …. तर विषय असा आहे… तिशीतल्या माझे लग्न करायला माझ्या घरचे मागे लागले आणि त्यांच्या आग्रहाखातर मी मुलगी बघायला गेलो तर तिचा बाप मला विचारतो, “तुम्ही सध्या काय करता “– अरे हा काय प्रश्न आहे काय, अरे तुम्ही किती कमवता असे विचारा ना…. तुमच्या मुलीला सुखी ठेवणार का… ते विचारा ना. काय तरी भलताच प्रश्न विचारला.  माझे डोके फिरले. मी तिकडेच मुलीला रिजेक्ट केला. आता त्याला काय सांगायचे, माझ्या सुखी जीवनाची कथा. तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगतो.

माझा रोजचा दिवस फुल्ल बिझी असतो. रोज रात्री उशिरा झोपतो म्हणून सकाळी १० ला उठतो आणि कडक गरम पाण्याने आंघोळ करून सफेद इस्त्रीचे शर्ट आणि मळकी असली तरी मळकी दिसत नसलेली जीन्सची पॅंट घालून, घरातल्या देवांना नमस्कार करून, कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये उभे कुंकू लावतो आणि घराबाहेर पडतो. दहा वर्ष्यापुर्वी बाहेर पडतांना आईकडून नाही तर बहिणीकडून १०० रुपये घेऊन पडायला लागत होते. बाईकमध्ये ५० चे पेट्रोल भरूनच– पुढे ५० रुपये मामलेदारची मिसळीसाठी लागायचे. पण आता आपण घरी पैसे नाय मागत. आता आपण आपल्या पायावर उभा आहे. म्हणजे भाऊंचा वरदहस्त असल्याने कसली कमी नाही.

हां तर ….. तर्रीवाली मिसळ हाणली कि पुढे स्ट्रेट, सरळ स्वामींच्या मठात जाऊन त्यांच्या पादुकांवर डोके ठेवायचे. लय भारी वाटते. भाऊंनी एक सांगितले आहे देवाकडे तोंड करून आपण काय बी मागायचं, देव आपल्या पाठीशी कायम असतो, म्हणूनच देवाकडे एकदा का पाठ झाली की आपण काय पण करायला मोकळे. तेथून कुठेही टाइमपास न करता भाऊंच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये हजेरी लावायची. तिकडे पक्या, मध्या, सुन्या आलेले असतात. बरोबर १२ च्या आसपास भाऊ आले की, पहिले त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा. हां…. आपण जगात दोन जणांच्या पायाला हात लावतो. एक स्वामी समर्थ आणि आमचे भाऊ. भाऊंनी काही काम सांगितले तर ते हाती घ्यायचा. आपल्यामागे तसे १०० पोरं उभी करायची ताकद आहे हे भाऊंना माहित आहे म्हणून एखादी सभा किंवा शक्ती प्रदर्शन करायचे असेल तर भाऊ माणसं जमवायची जबाबदारी माझ्यावरच देतात. दोन तीन तास ऑफिसमध्ये काढले की ऑफिसमध्येच भाऊंच्या कृपेने दोन लंच बॉक्सचे डबे येतात. तेथेच जेवण करून जर काही काम नसेल तर टेबलावर डोके ठेऊन एक डुलकी मारायची. इलेक्शन आले की ते डुलकी, झपकी वगैरे विसरायला लागते. तेव्हा लय खूप काम असते. आपल्या वार्डातला हिंदूंचा एरिया कुठला, मुस्लिम एरिया कुठला ह्याचा पूर्ण अभ्यास करून त्यानुसार मतदारांना काही ना काही वाटप करायला लागते.

क्रमशः…

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन…भाग -3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ परिवर्तन…भाग – 3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध : आपल्याला न विचारता राणीने वेगळं राहायचा निर्णय घेतला, म्हणून आई चिडते आणि म्हणते, ‘उद्या उठून ही म्हणेल – मला लग्नच करायचं नाही.’…….)

“आई, मला लग्नच करायचं नाही, असं मी कधीही म्हटलं नाही. मला फक्त थोडा वेळ हवाय. एवढ्यात लग्नाची घाई करू नकोस. एकत्र कुटुंबात तू कायकाय भोगलंस आणि अजूनही भोगतेयस, ते मी बघितलंय, आई.”

माझी नजर पटकन आई-बाबांच्या खोलीच्या दाराकडे वळली. दार बंद होतं.

“एकत्र सोडाच, पण आमचं दोघांचंच असं छोटं, न्युक्लिअर कुटुंब जरी असलं, तरी मला नवऱ्याशी तडजोड करावी लागणारच, ना. त्याची मतं, त्याच्या आवडीनिवडी, त्याचं जेवणखाण, त्याची राहणी तंतोतंत माझ्यासारखी कशी असणार! वेळ येईल तेव्हा मी त्याच्याशी जुळवून घेईनच. त्यासाठी आवश्यक ती तडजोड करणारच मी. तसं तर, नातं म्हटलं, की तडजोडी आल्याच. पण निदान तोपर्यंत तरी थोडे दिवस मला माझ्या मनासारखं जगायचंय. माझ्या अपेक्षेनुसार,माझ्या इच्छेनुसार जगायचंय. कोणतीही तडजोड न करता, मनाला मुरड न घालता. माझं तुम्हा सर्वांवर – अगदी आजी-आजोबांवरसुद्धा प्रेम आहे. मला तुमच्याविषयी आदर वाटतो. पण मला थोडी स्पेस हवीय. जराशी मोकळीक. तीही काही काळापुरती. प्लीज, मला समजून घ्या.”

राणी मुद्देसूदपणे बोलत होती, पटवून सांगत होती…… माझ्या मनात आलं – हीतर माझीच प्रतिकृती आहे. तिच्यात मला तरुणपणीची ‘मी’ दिसली. माझ्या स्वतःच्याच आयुष्याची भीक मागणारी. पण माझ्या आई -वडिलांनी माझ्या विनवणीला अजिबात भीक घातली नाही.

असं काय जगावेगळं मागितलं होतं मी? थोड्या दिवसांची मोकळीक. बस्स! बी.ए.ची परीक्षा संपली. मानेवरचं अभ्यासाचं जोखड उतरलं होतं. आता थोडे दिवस सकाळी झोप पूर्ण होऊन आपोआप जाग येईपर्यंत झोपायचं, मैत्रिणींबरोबर हिंडा-फिरायचं, नंतर थोडे दिवस नोकरी करायची…. एवढं साधं स्वप्न होतं माझं.

 पण आई-बाबांनी माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती.

दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम. लगेचच होकार, साखरपुडा. रिझल्ट लागण्यापूर्वीच मी माप ओलांडून या घरात आले. तोवरच्या संस्काराप्रमाणे कामसू, कर्तव्यदक्ष, स्वतःच्या आधी इतरांचा विचार करणारी आदर्श सून झाले. माझी स्वप्नं तर सोडाच, पण माझं अस्तित्वच लोप पावलं. आणि अजूनही तेच चाललंय.

नाही. नाही. माझ्या लाडक्या राणीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. अजिबात नाही. माझ्या आधीच्या पिढीने केलेल्या चुका मी करणार नाही.नव्या काळासोबत येणारे बदल मी स्वीकारीन.

माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती काहीही गैर करणार नाही. शेवटी मुलीची काळजी घेणं, म्हणजे तिला घराच्या अक्षांश-रेखांशात कैद करून ठेवणं नाही. आयुष्याचा सामना करायला तिला सक्षम बनवणं, हेच खरं प्रेम.

तिला तशी गरज वाटत असेल, तर अविवाहित असूनही तिला वेगळं राहू दिलं पाहिजे. इथूनही मी तिची काळजी घेऊ शकतेच की.

“चालेल, राणी. तुझा निर्णय मला पटला. मी तुझ्या पाठीशी उभी आहे, खंबीरपणे.तुझे आजी-आजोबा, इतर नातेवाईक काय म्हणतील, याची तू अजिबात काळजी करू नकोस. मी त्यांना समजावून सांगेन. तरीही नाहीच पटलं त्यांना, तरी तू थांबू नकोस. हे तुझं आयुष्य आहे. आणि तू हा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला आहेस. मला मान्य आहे तो.”

माझ्यात अचानक झालेलं हे परिवर्तन बघून राणी आणि ह्यांना तर नवल वाटलंच ; पण मलाही  सुखद धक्का बसला.

मला वाटतं, सामाजिक परिवर्तनांची सुरुवात अशाच छोट्याछोट्या पायऱ्यांनी होत असावी.

– संपूर्ण –

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन…भाग -2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ परिवर्तन…भाग – 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध : अविवाहित राणी वेगळं राहण्याचा विचार करत असल्याचं आई-वडिलांना सांगते……..)

ती असं काही बोलेल, असं मला अजिबातच वाटलं नव्हतं.

“काsssय? वेड लागलंय तुला? एक तरुण, अविवाहित मुलगी एकटीच राहणार! ” नाही म्हटलं तरी माझा आवाज चढलाच होता.

बाप रे! आई-बाबांना जाग आली तर? मी हळूच दार उघडून त्यांच्या खोलीत डोकावले. दोघंही गाढ झोपली होती. बाबांच्या घोरण्याचा आवाज खोलीत भरून  राहिला होता. शिवाय पंख्याचा घुं घुं आवाजही होताच सोबतीला. त्यामुळे बाहेरचं बोलणं आत ऐकू येण्याची शक्यता तशी कमीच.

तोपर्यंत मीही थोडी शांत झाले होते.

“असं कर, राणी.सकाळी जाताना डबा घेऊन जात जा. दिवसभर तिथे काम कर. रात्री जेवायला आणि झोपायला इकडे ये.” माझा तोडगा सगळ्यांनाच पटण्यासारखा होता.

“पण आई, तिथे मी रात्री उशिरापर्यंत काम करू शकेन. इथे आजोबा ओरडत असतात, ‘लवकर झोप. पहाटे पाचला उठून काम कर.’ मी नाईट पर्सन आहे. मला पहाटे जाग नाही येत. त्यापेक्षा रात्रीच्या शांत वेळी काम करायला मला खूप आवडतं. आणि त्यावेळी कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम होतंही चांगलं. माझा अभ्यासही मी रात्री जागूनच करायचे ना. तेव्हाही आजोबा असेच ओरडत राहायचे. पण तेव्हाचं एक सोड. मी लहान होते तेव्हा. पण आताही…..? मी स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावरही? मी काय म्हणतेय, ते लक्षात घे, आई. यासाठीच मला एकटीला राहायचंय. दादा कसा राहतो एकटा?”

“अगं, त्याचं पोस्टिंग मुंबईबाहेर आहे. ते जर मुंबईत असतं, तर घरातच राहिला असता ना तो!” मी विजयी मुद्रेने ह्यांच्याकडे बघितलं.

हे काहीच बोलले नाहीत. त्यांची मनस्थिती द्विधा झाली असावी. एकीकडे त्यांचे ते ‘मी नाही मुलगा- मुलगी भेदभाव करत’ हे आदर्श आणि दुसरीकडे लाडक्या लेकीची काळजी.

तशी मीही एरव्ही भेदभाव करत नव्हते. पण ही गोष्ट वेगळी होती.तिची काळजी तर होतीच. शिवाय लोक काय म्हणतील, ही भीती.

“तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे, आई? मी एकटी राहणार हा की लोक काय म्हणतील हा?”

मी काहीच बोलले नाही.

“माझ्या एकटं राहण्याची तुला काळजी वाटत असेल, तर हे लक्षात घे. समजा, माझं लग्न झालं असतं, तर मी दुसरीकडेच राहत असते ना! तू म्हणशील, ‘हो.पण नवऱ्याबरोबर.’ पण समज, त्याच्या कामासाठी त्याला वरचेवर बाहेरगावी जावं लागलं असतं, तर त्यावेळी मी घरी एकटीच राहणार होते ना?”

तसं राणी बोलली, ते चुकीचं नव्हतं.

“आणि जर तू लोकांचा विचार करत असशील, तर मी त्यांची अजिबात पर्वा करत नाही. तूपण तो विचार करणं सोडून दे. हे बघ, आई. आपलं कुटुंब जुन्या विचारांचं आहे. त्यामुळे तुला हा विचार क्रांतिकारी वाटतोय. पण सद्या मुंबईत कितीतरी मुली, कितीतरी बायका एकट्या राहतात, अगं.”

“पण तुझं काम आणि घर सांभाळणं – दोन्ही कसं जमणार तुला?”मी शस्त्र बदलून लढायला सुरुवात केली.

“आई, तू आणि आजीने घर सांभाळायचं व्यवस्थित ट्रेनिंग दिलंय मला. त्या दृष्टीने बघितलं, तर मी दादापेक्षा उजवी आहे त्या बाबतीत. घर आणि काम – दोन्ही व्यवस्थित मॅनेज करू शकेन. शिवाय निशाची बाई आणि स्वयंपाकीण -दोघी तयार आहेत माझ्याकडे काम करायला.”

“याचा अर्थ, तू सगळा विचार केलायस, तुझा निर्णयही घेऊन झालाय. आता तू फक्त आमच्या कानावर घालते आहेस.” नाही म्हटलं, तरी माझा आवाज कापत होता.

“अगं आई, एवढा मोठा निर्णय मी सांगोपांग विचार न करता आणि सगळं प्लॅनिंग न करता कसा घेईन?मी दादाशीही  या बाबतीत बरेचदा चर्चा केली. त्यानेही साधकबाधक विचार करून मला संमती दिली. म्हणूनच मी निशाला होकार दिला.”

“म्हणजे तू दादाशी चर्चा केलीस! तीही बरेचदा!आणि आम्हाला विचारावंसं तुझ्या मनातही आलं नाही आतापर्यंत! ” आता मात्र माझ्या डोळ्यांनीही मला दगा दिला.

“हेच. तू रडणार, हे ठाऊकच होतं मला. मला भावनांच्या वादळात अडकायचं नव्हतं. सर्व दृष्टीने नीट विचार करून योग्य तो निर्णय घ्यायचा होता मला.”

आता मात्र मला सगळ्यांचाच राग आला. मग मी शेवटी ह्यांच्यावरच चिडले,”बघितलंत ना? तिचं शिक्षण संपलं, तेव्हाच मी तुम्हाला सांगत होते, तिच्या लग्नाचं बघूया, म्हणून. पण तुम्ही तिच्या बिझनेसच्या योजनांवर भाळलात. आणि आता मॅडम एवढ्या स्मार्ट झाल्यात, की त्यांना आपल्या जन्मदात्या आईवडिलांचं मत विचारात घेण्याचीही गरज वाटत नाही. उद्या उठेल आणि म्हणेल – मला लग्नच करायचं नाही.”

क्रमश:… 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन…भाग -1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ परिवर्तन…भाग -1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

रात्रीची जेवणं आटोपली.

आई -बाबांना त्यांची औषधं दिली.

त्यांचे बिछाने तयार करून ठेवले.

“सूनबाई, थर्मासातलं पाणी संपत आलंय.”

मग उरलेलं पाणी पेल्यात ओतून थर्मास रिकामा केला. पाणी तापवून थर्मास भरला. दूध तापवून दोन मगमध्ये भरून आई – बाबांना नेऊन दिलं.

त्यांच्या खोलीच्या खिडकीचे पडदे ओढून घेतले. पंख्याचा रेग्युलेटर तीनवरून दोनवर फिरवला आणि दार ओढून बाहेर आले.

आता स्वयंपाकघर माझी वाट पाहत होतं. मग जेवणानंतरची आवराआवर करायला घेतली.

तेवढ्यात राणी आली.

“आई, आजी – आजोबा झोपल्यावर मला तुझ्याशी आणि बाबांशी बोलायचंय. तोपर्यंत तूही मोकळी होशील कामातून आणि माझंही हातात घेतलेलं काम आटोपेल.”

काय बोलायचं असेल तिला? तेसुद्धा आजी -आजोबा झोपल्यावर. कोणाच्या प्रेमाबिमात पडलीय की काय? तशीही सत्तावीस वर्षांची आहे. म्हणजे लग्नाचं वय झालंच आहे. आणखी उशीर करून चालणार नाही.

पण आजी – आजोबा झोपल्यावर म्हणजे? दुसऱ्या जातीचा आहे की काय? घरात प्रलय होईल, ऐकल्यावर. दुसरी जात तर सोडाच; पण दुसरी पोटजातही पचणार नाही आई-बाबांना.आणि दुसऱ्या धर्माचा असेल तर? अरे देवा! तुलाच खाली यावं लागेल, रे बाबा!

पण माझी राणी तशी शहाणी, समजूतदार आहे. ती ज्याची निवड करेल, तो मुलगा चांगलाच असणार. सर्व दृष्टींनी. देवा! ह्यांना तो पसंत पडूदे. मग ते आपल्या आई-वडिलांना पटवू शकतील.

 “आई, बाबा, तुम्हाला माहीतच आहे, मी घरूनच काम करते.माझे क्लाएन्ट इथे येतात.

आपलं घर तसं लहान आहे. आजोबा आत पूजा करताना जोरजोरात घंटा वाजवतात. अगदी शाळेची घंटा वाजवल्यासारखी. बेडरूममध्ये ते टीव्ही बघत असतात, तेव्हा आवाज एवढा मोठा असतो, की मी माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आणि जर ते इथे लिव्हिंग रूममध्ये असतील, तर माझ्या क्लाएन्टना असे काही प्रश्न विचारत राहतात, ना. अगदी त्यांची उलटतपासणी घेतात. त्यांना खात्री करून घ्यायची असते, की त्या क्लाएन्टबरोबर काम करणं, माझ्यासाठी सेफ आहे ना. मला अवघडल्यासारखं होतं.क्लाएन्टही वैतागतात.”

तिचे मुद्दे बरोबर होते.पण लग्नाचं सांगताना ही प्रस्तावना कशाला?

” म्हणून मी ऑफिससाठी जागा बघत होते. तर माझी मैत्रीण आहे एक, निशा म्हणून. ती परदेशी जातेय तीन-चार वर्षांकरता. ती तिचं घर भाड्याने देणार आहे. मी भाड्याने घेणार असेन, तर ती डिपॉझिटही घेणार नाही. मी तिथे माझं ऑफिस काढू शकेन. वेगळं ऑफिस असेल, तर मला असिस्टन्टसही नेमता येतील. आणि माझा बिझनेसही वाढवता येईल.”

“कल्पना चांगली आहे तुझी,” हे म्हणाले, “ऑफिस सुसज्ज आणि स्टाफ जास्त असेल, तर  क्लाएन्टवरही चांगलं इम्प्रेशन पडेल.”

राणीचं बोलणं ऐकून हे खूश झाले.

माझी मात्र निराशा झाली. ती लग्नाबिग्नाचा विचारच करत नव्हती. जाऊ दे. वेळ येईल, तेव्हाच लग्न होणार. आणि आता ऑफिस काढतेय, म्हटल्यावर बिझनेस चांगला चालेल. एकदा का व्यावसायिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाली, की लग्नाचं बघेलच ती. तिने मागेच कबूल केलंय तसं.

“कुठे आहे हे निशाचं घर?” ह्यांनी विचारलं.

“इथून दहा मिनिटांवर आहे.”

“चल. बरं झालं. दुपारी जेवायला घरी येऊ शकशील.” माझा जीव भांड्यात पडला.

ती काहीच न बोलता माझ्याकडे टक लावून बघत बसली. कदाचित काय बोलायचं, कसं बोलायचं, याची जुळवाजुळव करत असावी मनात.

” हे बघ आई, जर मी त्या पूर्ण घराचं भाडं देणार असेन, तर त्या अख्ख्या घराचा उपयोग केलेला चांगला. “

वा! ही अगदी व्यवहाराचा विचार करायला लागलीय. मला कौतुकच वाटलं तिचं.

“म्हणून…. मी तिथेच राहण्याचा विचार करतेय.”

क्रमश:… 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

एवढ्यात फोनची रिंग वाजली. छे ।. उठून फोन घ्यायचा वैताग आहे. पण पुढारी झाल्यावर आपला हा त्रास वाचेल. मोबाईल मिळेल ना भारीपैकी. शिवाय पि. ए. असेल ना तो फोन घ्यायला. वा वा ! आताचा फोन तरी घेऊ.

” काय ग”   ” झोपलीस की काय?फोन घ्यायला किती वेळ ?हे बघ, तुझी बॅग भरून ठेव. तुला आज रात्रीच्या गाडीने दादाकडे जायचंय. माझ्या दादा कडं”. ” काय झाल य ?अगं वहिनी पाय घसरून पडल्या. पाय मोडला त्यांचा. उद्या सकाळी ऑपरेशन करायचं. दादांनी तुला बोलावले मदतीला. संध्याकाळी येताना मी रिझर्वेशन करून येतो. “

झालं. यांनी फोन ठेऊनही दिला.

“अहो मी निवडणूकीचा फॉर्म भरणार कधी? प्रचार करणार कधी?” हे मनातल्या मनातच.

यांच्या फोनमुळे स्वप्नांचे पंख फुटून आकाशात उंच भरारी मारणारी मी , वास्तवाच्या दगडावर दाणकन आपटले. माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. मेरा सुंदर सपना टूट गया ।मेरी जिंदगी मे हार गई ।मला एकदम हिंदीतून दुःख व्हायला  लागले.

मी गावाला जाणार म्हणजे दोन महिने तरी येऊ शकणार नाही. कुठली उमेदवारी आणि कुठली इलेक्शन?कुठले मतदान ?कुठले झेंडावंदन आणि लाल दिव्याची गाडी ?

वहिनींना तरी आत्ताच पडायचे होते ?आणि मदतीला मीच आठवले का फक्त ?मी काय रिकामीच.

आता काही मी पुढारी होऊ शकत नाही. देशाचे भवितव्य उज्वल करू शकत नाही. हा देश एका चांगल्या नेतृत्वाला मुकला. देशाच्या अंधकारमय भविष्या मुळे मला रडायला यायला लागले. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंपरेचा मला अभिमान आहे. देशाची मान उंच करण्याची पात्रता माझ्यात आहे. मी जाणीवपूर्वक प्रयत्नही केले. पण देशाची सेवा करण्याचा ऐवजी, जाऊ बाईची  सेवा मला करायला लागणार. जरीच्या साड्यां ऐवजी साध्या साड्या मला न्याव्या लागणार. हॉस्पिटल आणि घर हेच माझ्या कार्याचे कार्यक्षेत्र राहणार.

उसासे टाकत मी बॅग भरली. संध्याकाळी तिकीट घेऊन येताना, फुललेल्या चेहऱ्याच्या” सुदाम्या” नेही यांच्या बरोबर ऐंट्री घेतली. आता या चौकडीला आमचे घर मोकळेच ना!” वहिनी, आजही झकास पोहे करा. आता सहा महिने तुम्ही नाहीत म्हणजे आम्हाला चमचमीत पोहे कोण करून देणार?”

“काय? सहा महिने?” यांनी सगळ्यांनी परस्पर ठरवल?

अशातऱ्हेने माझ्या राजकारण प्रवेशाचा पार फज्जा उडाला. पुढारी होण्याचे माझे स्वप्न पुरते धुळीला मिळाले. भारत देश आता महान कधीच होणार नाही. सारे भारतीय एका खंबीर नेतृत्वाला – नेत्याला – नाही नेतिणीला मुकले. !

निवडणुकीला उभे राहून पडायच्या आधीच,पडेल चेहऱ्यानं सुदाम्याचे पोहे करायला मी सज्ज झाले.

समाप्त.

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

म्हणजे काय ?आपण काय करू शकत नाही ?भांडी वाली आली नाही की भांडी घासतो, धुणं धुतो, घराची सगळी सफाई करतो, इस्त्री करतो, पाण्याचं लाईट बिल सुद्धा भरतो. वर्षातून एकदा हाऊस टॅक्स ही भरतो. पाहुणे आले की त्यांचं आदरातिथ्य ठेव मानपान सगळं करतो.

मुली लहान होत्या तेव्हा त्यांचं सगळं सगळं केलं की. शाळेच्या वेळात उठवायचं, त्यांचं आवरायचं, डबे भरून द्यायचे. लगेच स्वयंपाक करायचा आणि मुख्य म्हणजे मुलींचा अभ्यास! बाप रे बाप! काय काम होतं ते. एकदा संजनाला सगळी कविता समजावून सांगितली, सगळी प्रश्न उत्तरे लिहून घेतली तिच्याकडून. हिचा झाला अभ्यास व्यवस्थित. पण माझ्यातली ‘ रजनी’ जागी झाली. मुलीला एक मी घरी शिकवलं पण बाकीच्या मुलींचं काय ?शाळेतले शिक्षक शिकवत कसं नाही? काय करायचं यांनी उरलेल्यांनी? ठीक आहे. ते काही नाही. चांगलं खडसावून विचारलं पाहिजे बाईंना. दुसऱ्या दिवशी मुलींचं आवरून झाल्यावर माझं  मी पटापट आवरलं आणि शाळेमध्ये गेले. कोण बरं शिकवतो संजनाला मराठी? चौकशी करत गेले. तर काय एक बुटक्या पण हे एवढे हाय हिल्स घालून टॉक टॉक करत  चालणाऱ्या साडी ब्लाउज हेअर बँड बांगड्या सगळ्या सगळ्याच मॅचिंग केलेल्या बाई समोर आल्या. बापरे, म्हटलं एक दिवस शाळेत यायचं तर सकाळी माझी किती त्रिधात रिपीट उडाली. कशी तरी एक साडी भरकन गुंडाळली आणि आले. यांना रोज काय जमतं हे सगळं मॅचिंग करायला?

“काय प्रोब्लेम आहे तुमचा?” त्या बाई माझ्यावर जवळजवळ  खेकसल्याच. मी मनात म्हटलं, “अहो बाई प्रॉब्लेम माझा नाही तुमचाच आहे. ” पण वरवर हसून म्हटलं, “अहो ती अमुक-अमुक कविता त्याचे स्पष्टीकरण तुम्ही शिकवलं नाहीत मुलींना. कशी कळणार कविता त्यांना? अहो काल आमच्या संजनाला मी शिकवली मलाही दोन-तीन वेळा वाचायला लागली. “

“करेक्ट, बघा अवघड आहे की नाही कविता? कसं शिकवायचं सांगा बरं. “मराठी च्या बाईनी मलाच प्रश्न केला. मी मनात म्हटलं,” पण मग तुम्ही कशाला आहात? हा गलेलठ्ठ पगार काय फक्त मॅचींग साठी वापरता का? जरा इतरही काही वाचा. मुलींना सांगा. त्यांनाही वाचनाची गोडी लावा. “पण कुठलं काय? सुळकन निघूनही गेल्या त्या माझ्यासमोरून. आले आपली घरी. शाळा सुटल्यावर संजना घरी आली तीच मुळी मुसमुसत. “आई तू पुन्हा आमच्या शाळेत येऊ नको. तू शिकवत नाही असं का सांगितलं म्हणून बाईनी आज मला बाकावर उभ केलं. सगळ्या मुली मला हसत होत्या. तू पुन्हा कधी म्हणजे कधीच शाळेत यायचं नाहीस बघ. ” तेव्हा झालं ते झालं. त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय तर मी नेतृत्व करू शकते. पुढारीपणाचे गुण माझ्यातही आहेत. म्हणजे आता निवडणुकीला उभारण्या  एवढी,निवडून येण्या एवढी मी निश्चितच सक्षम महिला आहे.

मी मनानं, नक्की  केले, या निवडणुकीला उभं रहायच च,निवडून यायचं आणि आपलं राजकीय क्षेत्र गाजवायचं. आपलं आपल्याला सिद्ध करायचं. नुसते महानगरपालिकेची निवडणूक लढवून थांबायचं नाही. महापौर व्हायचं. त्यानंतर राज्यसभा विधानसभा यांचीही निवडणूक लढवायची आणि खरोखरच पुढारी व्हायचं.

मग शपथविधीला जाताना आई ने दिलेली हिरवीगार साडी नेसायची. डोक्यावरुन पदर घ्यायचा. अगोबाई ती सवय आत्तापासूनच करायला हवी.

झेंडावंदन ला जाताना जाऊ बाईनी त्यांच्या मुलाच्या लग्नात दिलेली ती जिजामाता साडी नेसायची. एरवीसुद्धा सगळ्या जरी च्या साड्या वापरून टाकू. नाहीतरी आता आपल्याकडे भरपूर साड्या झाल्यात. त्यांचा वापर तरी होईल.

पुढाऱ्यांना म्हणे बंगले असतात राहायला. म्हणजे आपल्यालाही हे घर सोडावे लागेल. गाडी पण मिळेल आपल्याला लाल दिव्याची. वा !काय थाट असेल आपला !पण हे घर सोडून तिकडे बंगल्यात राहायला” हे”तयार होतील का? अवघडच आहे. काय करायचं मग? तिकडे बंगल्यात जाऊन एकटीने राहणं चांगलं दिसणार नाही ना!

 क्रमशः…

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

सकाळपासून ची सगळी काम आवरल्यावर दुपारी निवांतपणे ताजे वर्तमानपत्र वाचायला मी सुरुवात केली. नित्याप्रमाणे अपघाताचा फोटो, त्यातील मृतांची नावे, अपघाताचे कारण, त्यानंतर  कमीत कमी कपडे घातलेल्या अन झकास हास्य देणाऱ्या नट्यांचे फोटो, अगदी सगळं यथासांग निरखून झाल्यावर उरलेल्या बातम्या पेंगुळल्या डोळ्यांनी मी वाचायला लागले.

आतल्या पानावर महानगरपालिकेच्या निवडणुकांची बातमी ठळक अक्षरात होती प्रभाग त्यातील वाटप वगैरे वगैरे. सहज म्हणून आमच्या प्रभागातकाय आहे हे वाचायला गेले तर काय? अहो आश्चर्य!आमचा प्रभाग चक्क यावेळी महिलांसाठी राखीव होता.

एकदम मला काल संध्याकाळी आमच्या घरी जमलेल्या यांच्या चौकडीचे बोलणे आठवले. त्यांची ही याच विषयावर चर्चा सुरू होती. आपल्या प्रभागातील महिला उमेदवार कोण ?यावर चर्चा रंगली होती. हे एकूण चार जण मित्र आहेत म्हणून मी आपलं चौकडी म्हणते. तेही मनातल्या मनात बर का. त्या तिघांना सु दा मा. म्हणते. सुपर म्हणजे सुधीर,दा म्हणजे  दामोदर आणि तिसरे मा म्हणजे माधव. हे तिघेघरी आले ना की मला हमखास पोहे करायला लावतात. म्हणून मी मनातल्या मनात त्यांना सुदा मा म्हणते. तर काल यांची पोहे खाता-खाता जोरदार चर्चा सुरू होती. आपल्या प्रभागांमध्ये निवडणुकीला उभे राहण्यासाठी योग्य महिला उमेदवार कोण ?

आता मी तोच विचार करायला लागले. आपल्या प्रभागात कोण महिला उमेदवार होणार ?त्या रंजनाताई राहतील का उभ्या ?भारी बडबड बडबड बडबड करत असतात. पण बडबड करणं वेगळं आणि भाषण करणं वेगळं !मग कोण ?आपल्या डॉक्टरीण बाईनाच मला वाटते उभं करतील. त्यांची सगळ्यांशी ओळख आहे थोडाफार पैसाही खर्च करू शकतील. आपली प्रॅक्टीस सोडून त्या कशाला या फंदात पडतील ?मग कोण बरं ?ती नुकतीच बँकेतूननिवृत्ती घेतलेली मंजू. हो ती शिष्ट. कदाचित उभी राहील हं !तिला काय घरी काम हे कमी असतात आणि पैसाही भरपूर राखून आहे. शिवाय भाषणबाजी ही जमीन तिला. हिरवीच कशी ठसक्यात बोलत असते.

अरेच्या मग आपणच बर आहे का या इलेक्शनला आपल्या वॉर्ड मधून? काय हरकत आहे? माझे डोळ्यावर आलेली झोप एकदम खाडकन उडाली. खरंच काय मस्त कल्पना आहे. आपल्याला आता वेळही भरपूर आहे. दोन्ही मुलींची लग्न झाल्यामुळे आपण एकदम निवांत आहोत. हे सुद्धा आपल्या  व्यापात गुंग. बर दोघी मुली सुद्धा आपापल्या नवऱ्यांबरोबर अमेरिकेत गेल्यात. त्यामुळे त्यांचे सेवन करा वार करा हे द्या ते द्या काही म्हणजे काही नाही.

पण निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे जरा जास्तच होतय का ?काय हरकत आहे ?हल्ली सगळे सांगत असतात ना ?महिलांनी राजकारणात यायला पाहिजे,स्वच्छ कारभार करून दाखवायला पाहिजे, देशाला पुढे नेलं पाहिजे. वा वा आपल्यात ही क्षमता नक्कीच आहे.

       क्रमशः…

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अज्ञात ग्रहाचे रहस्य – भाग 2… (भावानुवाद) – श्री सुशांत सुप्रिय ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ अज्ञात ग्रहाचे रहस्य – भाग 1… (भावानुवाद) – श्री सुशांत सुप्रिय ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(अज्ञात  ग्रहाचे रहस्य  ( हिन्दी कथेचा अनुवाद))

रात्री सगळी निजानीज झाल्यावर राणी अल्पना चावला, कमांडर भरत यांना भेटण्यासाठी त्यांच्या शयनकक्षात पोचली. भरतने विचारले, ‘आपल्याला कधी पृथ्वीची आठवण येत नाही.?’

‘येते तर… पण आता मी इथे राणी बनले आहे. आणि सुखी आहे.’ अल्पना चावलाने उत्तर दिलं.

यावर कमांडर भरत ने तिला विचरलं, ती पृथ्वीवर परत येऊ इच्छिते का?’ भरल्या डोळ्यांनी राणी अल्पना चावलाने पृथ्वीवर परतायला नकार दिला. ती म्हणाली, ‘मी इथे खूश आहे. आता माझी नियती या ग्रहाच्या महिलांशी जोडलेली आहे. कमांडर भरत, आपण मला माझ्या या जगात सोडून परत जा.’

रात्रीच्या आंधारात राणी अल्पनाच्या मदतीने कमांडर भरत राणीचा निरोप घेऊन आपल्या छोट्या अंतरीक्ष यानातून परत गेले. कमांडर भरतचं ते छोटंसं अंतरीक्ष यान उडालं आणि या ग्रहाच्या कक्षेत  फिरणारे मोठे अंतरीक्ष यान’ ‘ इंडियाना -2 ‘शी जोडलं गेलं॰‘ इंडियाना -2मध्ये असलेल्या अंतरिक्ष-यात्रींनी कमांडर भरत आणि  अपले  अन्य सहयोगी यात्री सुरेंद्र कुमार यांचं स्वागत केलं॰

कमांडर भरत विचार करत होते. या ग्रहाबद्दल आपाल्या केंद्राला काय सांगायचं? वस्तुस्थिती सांगितली, तर, एक नवा ग्रह शोधल्याचे श्रेय त्याला मिळेल, पण त्याचबरोबर इतर राष्ट्रांची यानेसुद्धा धडाधड या ग्रहाकडे धाव घेतील. इथल्या जमिनी आपल्या मालकीच्या करून घेतील. इथली नैसर्गिक साधन सामग्री ओरबाडून नेतील. इथे सुरळीत  चाललेलं शांत, निवांत जीवन विस्कटून जाईल. नकोच ते! याबद्दल काही बोलूयातच नको.

श्रीहरिकोटाशी संपर्क झाल्यावर कमांडर भरत ने त्यांना संगितले, ‘या ग्रहावर धोकादायक एलियंस‘चा निवास आहे. ते मला बंदी बनवणार, इतक्यात मी तिथून पळून येण्यात यशस्वी झालो. आपलं पहिलं अंतरीक्ष यान’ ‘ इंडियाना – १ मधील प्रवाशांना कदाचित् त्यांनीच मारून टाकलं असेल. ग्रहाच्या जमिनीवर अंतरीक्ष यान’ ‘ इंडियाना – १ चा नामोनिशाणही दिसलं नाही. हा ग्रह आपल्याला राहण्यासाठी उपयुक्त नाही.’

अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना-2 ‘ पुन्हा आपल्या सौर-मंडळ आणि आपल्या पृथ्वीच्या दूरवरच्या कठीण प्रवासासाठी उडत राहिलं,

या अनोळखी, अज्ञात ग्रहाचे रहस्य पृथ्वीवर रहाणार्या  लोकांसाठी नेहमीसाठी रहस्यच बनून राहिलं

मूळ कथा – अज्ञात ग्रह का रहस्य  मूळ लेखक – श्री सुशांत सुप्रिय 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अज्ञात ग्रहाचे रहस्य – भाग 1… (भावानुवाद) – श्री सुशांत सुप्रिय ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ अज्ञात ग्रहाचे रहस्य – भाग 1… (भावानुवाद) – श्री सुशांत सुप्रिय ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(अज्ञात  ग्रहाचे रहस्य  ( हिन्दी कथेचा अनुवाद))

अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ची  मुख्य चालक कमांडर अल्पना चावला होती. या अंतरिक्ष-यानात आणखी  चार  पुरुष अंतरिक्ष-यात्री  होते.  श्री हरिकोटा अंतरिक्ष-केंद्रातून  काही वर्ष आधी २५१० मध्ये उड्डाण केल्यानंतर हे यान आमच्या सौर-मंडळाच्या बाहेर पडलं होतं. पण अजूनही श्री हरिकोटाशी याचा सम्पर्क होत होता. आता ‘ इंडियाना ‘ अंतरिक्ष-यान, एंड्रोमीडा गैलेक्सीत, तिथला एक तारा ‘अल्फ़ा-सेंटौरी ‘ च्या सौरमंडळात उड्डाण भरत होतं. 

अचानक त्यांना आपल्या  अंतरिक्ष  – यानाच्या स्क्रीन वर एक मोठा -सा ग्रह दिसला.  दुरून तो पृथ्वीसारखाच नीळा, हिरवा आणि भूरा वाटत होता. अंतरिक्ष-यानातील सगळे प्रवासी अतिशय उत्साहित झाले. या ग्रहावर जीवन असण्याची संभावना होती.  काही दिवसांच्या प्रवासानंतर, अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ त्या ग्रहाच्या कक्षेत पोचलं.  खगोलीय प्रवासाच्या इतिहासात, हे प्रथमच घडत होतं की दुसर्या  एखाद्या आकाशगंगेच्या तार्यााच्या, एखाद्या ग्रहावर मनुष्य पाऊल ठेवणार होता. श्री हरिकोटाशी सातत्याने सम्पर्क होत होता. परंतु जेव्हा अंतरिक्ष-यान त्या  ग्रहाच्या जमिनीवर उतरणार होतं, तेव्हा अचानक त्याचा श्री हरिकोटाशी  सम्पर्क तुटला. दोन्हीकडच्या  वैज्ञानिकांनी आपापसात सम्पर्क प्रस्थापित करण्याचा  खूप प्रयत्न केला. परंतु त्यांना यश लाभलं नाही. शेवटी श्री हरिकोटा केंद्रा ने अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘  अंतरिक्षात हरवल्याचं जाहीर केलं. 

या घटनेनंतर काही वर्षांनी श्री हरिकोटा अंतरिक्ष-केंद्रातून आणखी एका अंतरिक्ष-यानाने ‘ इंडियाना-2 ‘ ने उड्डाण केलं. त्याचा उद्देश हरवलेलं पहिलं अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ बद्दलची माहिती मिळवणे हा होता.  

अंतरिक्षामधे काही वर्षे उड्डाण केल्यानंतर आता ‘ इंडियाना-2 ‘सुद्धा  एंड्रोमीडा गैलेक्सी चा तारा  अल्फ़ा सेंटौरी च्या सौरमंडळात उड्डाण करत होतं. अखेर हे यांनही पृथ्वीसारख्या दिसणार्यां निळ्या, हिरव्या, भुर्या् ग्रहाच्या कक्षेत पोचले.  

या अंतरिक्ष-यानाचं ‘ इंडियाना-2 ‘ चं नेतृत्व कुशल आणि अनुभवी अंतरिक्ष-यात्री कमांडर भरत सिंह करत होते.  त्यांच्या दलात पाच अन्य पुरुष अंतरिक्ष-यात्री होते. आत्तापर्यंत या  अंतरिक्ष-यानाचा सम्पर्क श्री हरिकोटाशी होत होता. कमांडर भरत सिंह यांनी एक  छोटं अंतरिक्ष-यान या ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा निर्णय घेतला.  मूळ यान  आणि  अन्य अंतरिक्ष-यात्री या ग्रहाच्या कक्षेतच फिरणार होते.  कमांडर भरत आणि एक अंतरिक्ष-यात्री फ़्लाइट लेफ्टनंट सुरेंद्र कुमार  यांचा गट एक छोटं अंतरिक्ष-यान घेऊन त्या ग्रहावर उतरण्यासाठा निघाले. ढगांना चिरत जेव्हा ते या ग्रहाच्या जमिनीवर उतरले, तेव्हा पृथ्वीसारखीच इथली संस्कृती बघून हैराण झाले॰ 

अंतरिक्ष-यान एका मोठयाशा मैदानात सहजपणे उतरलं॰ नाशिबाची गोष्ट अशी होती की या ग्रहाच्या वायुमंडळातदेखील ऑक्सीजन होता. कमांडर भरत अंतरिक्ष-यानातून खाली जमिनीवर उतरले. त्यांना स्पेस-सूट आणि ऑक्सीजन-सिलिंडरची  आवश्यकता भासली नाही. इथलं सगळं वातावरण प्रदूषण-रहित पृथ्वीसारखंच होतं. फ़्लाइट लेफ्टनंट सुरेंद्र कुमार छोट्या अंतरिक्ष-यानातच बसून राहिले. कुठलीही आपत्कालीन स्थिती उद्भवली तर आपलं यान उडवून, या ग्रहाच्या कक्षेत फिरणारं यान  इंडियाना -2 च्या जवळ पोचता येईल, असा त्यांचा विचार.  कमांडर भरत  अंतरिक्ष-यानातून बाहेर पडताच त्यांना सात फूट ऊंची असलेल्या धट्टया-कट्ट्या डझनभर महिलांनी घेरलं. त्यांच्या हातात लेसर गनसारखी धोकादायक हत्यारं होती. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिला सैनिक हिन्दी भाषा जाणत होत्या. त्यांनी  कमांडर भरतला बंदी बनवून आपल्या राणीकडे नेलं. अमेज़ोनियन  विमेन , “ कमांडर भरतच्या तोंडून बाहेर पडलं. 

कमांडर भरतने त्या महिलांची राणी पहिली, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. कारण ती राणी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून  काही वर्षापूर्वी हरवलेल्या  अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ ची  मुख्य चालक कमांडर अल्पना चावला होती. 

अल्पना चावला म्हणाली की त्यांचं अंतरिक्ष-यान ‘ इंडियाना ‘ या ग्रहावर उतरातांना हवा आणि खराब वातावरणामुळे क्रॅश झालं. तिचे सगळे सहयात्री त्या दुर्घटनेत मारले गेले. 

या ग्रहावर उंच निंच, तगड्या स्त्रियांचं तेव्हा शासन होतं. या ग्रहाच्या अमेज़ोनियन  महिलांनी अल्पना चावलाचा आपल्यामध्ये सहर्ष स्वीकार केला. हळू हळू ती इथे लोकप्रिय झाली. अल्पना ने या ग्रहावरील महिलांना हिंदी भाषा शिकवली.  आणखीही किती तरी गोष्टी तिने त्यांना शिकवल्या. त्या सगळ्या तिचा सन्मान करू लागल्या. काही महिन्यापूर्वीच या महिलांनी अल्पनाला आपली राणी बनवले.

इथल्या महिलांनी यापूर्वी कधी कुणी पुरुष पहिला नव्हता. इथे प्रयोगशाळेत काही तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन मुलांचा जन्म होत असे. सगळ्या महिला लेस्बियन होत्या. त्या आपापसात यौवन संबंध प्रस्थापित करत. त्यामुळेच कमांडर भरत इथल्या बायकांसाठी एक वेगळेच कुणी तरी प्राणी होते. त्या पुन्हा पुन्हा त्यांना स्पर्श करून बघायच्या. कमांडर भरत त्यांच्यासाठी कुणी अद्भूत जीव होते.  त्या अतिशय कुतुहलाने त्यांच्याकडे पहात होत्या.

क्रमश:…

मूळ कथा – अज्ञात ग्रह का रहस्य  मूळ लेखक – श्री सुशांत सुप्रिय 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print