सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
मनमंजुषेतून
☆ दिवाळी कालची आणि आजची.. भाग –1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
भारतीय संस्कृती ही निसर्गाधिष्ठित तर आहेच,पण त्याचप्रमाणे विज्ञाननिष्ठ अशी महान संस्कृती आहे.सण , उत्सव हे ही निसर्गाला अनुसरूनच आहेत.
सगळ्या सणांचा राजा म्हणजे दिवाळी.दिव्यांच्या ओळी .तेल आणि वात यांची ज्योती तोच दीप.पूर्वी अंगणात दिव्यांच्या ओळी प्रज्वलित करत असत.आज जागे अभावी एखादी पणती आणि रंगबिरंगी लाईटच्या माळा लावलेल्या जातात.पूर्वी दारात अंगणात सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून सडा टाकून रंग भरून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जायच्या.आज मोठ्या शहरात लहान जागेत कुंदनच्या तयार रांगोळ्या ठेवून हौस भागवली जाते.दिवाळी हा सण खरा कृषीवलांचा सर्वोच्च आनंदाचा सण. घरात आलेली धान्यलक्ष्मी हीच धनलक्ष्मी. गोठ्यात असंणार जित्राब गाई ,म्हशी, बैल ,वासरे यांची दिवाळी.सगळ्यांच्या कष्टातून आलेलं धन त्याची पूजा ही दिवाळी.70 वर्षापूर्वीची माझ्या आठवणीतली आणि आजची. दिवाळी यामध्ये खूप फरक पडलेला मी पहातेय. एकशे वीस वर्षापूर्वी कवी केशवसुतांनी दिवाळी छान वर्णन केली आहे भिंती रंगविल्या नव्या फिरूनिया केली नवी आंगणे…….. पूर्वी अंगणात मातीचे किल्ले छोटे गाव शेत केल जायचं. पण आज अंगण खूपच कमी ठिकाणी असली तरी आहे त्या जागेत सजावट करून कृत्रिम किल्ले आणून ठेवले जातात खरा लोकसंस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर खेड्यात जायला हवं. माझ्या लहानपणीची दिवाळी मला आठवते. शेणाने अंगण सारवून शेणाच्याच गवळणी, विहीर, जात ,दळणारी बाई असे अनेक प्रसंग, म्हणजे गावगाडा करायचा. शेतातील झेंडूचे फुले त्यावर खोचायची. रोज पहिलं काढायचं आणि नवीन करायचं पांडव पंचमी दिवशी पांडव, द्रौपदी, उठून बसलेला बळीराणा , त्यांच्यासमोर ताट,वाट्या भांडी सगळ शेतातच. त्या ताटांमधे थोडं,थोडं फराळाच घालायचं वरती जोंधळ्याच्या धाटांचा मांडव करायचा. मात्र शेणाची कधी घाण वाटली नाही. आज हे चित्र क्वचितच पहायला मिळेल. पूर्वी दिवाळीच्या अगोदर कामट्या आणून, तासून ,चिरमुरे कागद लावून आकाश दिवे घरी करत असत. आता बाजारात नवनवीन रंग बिरंगी आकाशदिवे मिळतात. वेळ आणि कष्टही वाचले. पूर्वी दिवाळीची अपूर्वाई म्हणजे नवीन कपडे. सर्वसामान्यपणे एक कपडा दांडीवर आणि एक अंगावर असे असायचे. त्यामुळे वर्षातून एकदा दिवाळीला नवीन कपडे घेणे असायचेच. आता कपडा आवडला की घेतला, असे नेहमीच कपडे घेणे चालू असते. त्यामुळे पूर्वीचा दिवाळीच्या कपडे खरेदीचा आनंद हा वेगळाच होता. आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे फराळाचे पदार्थ. पूर्वी फराळाचे अनेक प्रकारचे पदार्थ करत असत . वर्षातून एकदाच सगळं व्हायचं. जवळच्यांना फराळाचे डबे द्यायचे असायचे. बारा बलुतेदारांना फराळ द्यावा लागायचा. आज शहरात आणि त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात ऑर्डरचे आणि मर्यादित पदार्थ असल्याने ते शक्य होत नाही. आता सर्व पदार्थ कायम मिळत असल्याने त्याचे अप्रूप वाटत नाही. पूर्वी दिवाळीची चाहूल लागली की सासरी गेलेल्या मुली माहेरासाठी आसुसलेल्या असायच्या. मायबापही मुली नातवंडे येणार, म्हणून मनाचे मांडे रचत असत. आता मुलींना माहेरी जाण्यापेक्षा कुटुंब आणि ग्रुपने ट्रीपला जाण्यात, मौजमजा करण्यात जास्त ओढ वाटते. पूर्वी दिवाळीला पाहुणे आले की आनंद व्हायचा तो एक नात्यांच्या गुंफणीचा उत्सव असायचा. विभक्त कुटुंबात पाहुणे येणे हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे.
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈