मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चहा – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ चहा ☕ भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

ओतून दिलेला चहा मोरीत  वाहत होता .पाण्यात मिसळून त्याचा रंग बदलत होता ,मी टक लावून पाहत होतो.पाहता पाहता मी माझ्या बालपणीच्या आठवणीत केव्हा गेलो कळलेच नाही……….

सकाळ झाली की आमचा सर्व भावंडांचा घोळका अंगणातील चुली भोवती जमायचा .लाकडे पेटवून या चुलीवर पाणी गरम करणे,सकाळचा चहा हे सर्व सोपस्कार याच चुलीवर व्हायचे.पण खरं तर या चुलीचा फायदा हिवाळ्यात हात शेकण्यासाठी व चर्चा करण्यासाठी अधिक व्हायचा.कधी कधी याच चुलीवर गोवऱ्यांच्या राखेत  भरतासाठी वांगी किंवा हुरड्याची कणसे भाजली जायची .पण आमच्यासाठी रोजचा आनंददायी प्रसंग म्हणजे सकाळचा या चुलीवर तयार होणारा चहा.आम्ही सात बहीण भाऊ,आत्या आई बाबा आणि वेळेवर येणारा आगंतुक असा दहा बारा लोकांचा चहा आमची आई मांडायची,चहा मांडायची म्हणजे गंजात तितके कप पाणी टाकायची,त्यात रेशन दुकानातून मिळालेली दोन मुठी साखर टाकली जायची. त्यात ब्रुक ब्रँड कंपनीची फुल छाप चहापत्ती टाकली जायची.या चाहापत्तीच्या  दहा पैसे किमतीच्या पुड्या किराणा दुकानात मिळायच्या.शिलाई मशीन द्वारा या पुड्यांच्या माळा कंपनीचं बनवीत असे, दिवाळीतील उटण्याचा पुड्या प्रमाणे त्या दुकानात लटकलेल्या असतं. आमच्या आईचं गणित असे होते की एका वेळेसच्या चहा साठी एक पुडी टाकायची ,असे हे लाल रसायन चुलीवर उकळायचे,लवकर उकळी यावी म्हणून आम्ही भावंडं फुंकनिने फुंकून जाळ वाढविण्याचा प्रयत्न करायचो. उकळी येईपर्यंत चहाकडे पहात राहणे हा आम्हासाठी आनंददायी अनुभव असायचा.सुरवातीला बुडबुडे यायचे नी मागून उकळीचा भोवरा.तो पर्यंत कुणीतरी दहा पैशाचे दूध ग्लासात विकत आणले असायचे ,ते चहाच्या रसायनात टाकले की बस चहा तयार…..चहा तयार झाला की आम्ही भावंडं आपापली भांडी पुढे करायचो.बहुदा त्या मोठ्या वाट्या असायच्या.मोठ्यांना कपबशी भरून चहा दिला जायचा त्याचा आम्हाला हेवा वाटायचा.आम्हाला त्यामुळे कमी चहा मिळेल असे उगीच वाटायचे.आमच्या भांड्यात आईने थोडा जास्त चहा टाकावा म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न असायचा.त्यात भांडणे व्हायची व एखाद्याचा चहा सांडायचा मग सर्व भावंडं त्याला आपला थोडा थोडा चहा दयायचे.  रात्रीच्या शिळ्या पोळ्या मग आम्ही या चहात तुकडे करून टाकत असू.थोड्या वेळात त्या मस्त नरम होत.त्याचा आस्वाद आम्हाला अमृततुल्य वाटायचा.

चहाचा एक थेंबही वाया जात नसे.भलेही या चहात भरपूर दूध, विलायची,मसाले अद्रकं नसेलही पण आम्हाला फरक पडत नसे.त्यामुळेच कदाचित आज मोरीत टाकलेल्या चाहाबद्दल हळहळ वाटली असावी.पोरांना चहाची खरी किंमत व आनंद कसा कळेल.चूक त्यांची नाही,गरिबी त्यांच्या वाट्याला आलीच नाही.         

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चहा – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ चहा ☕ भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

सकाळची बगीच्यातील रपेट व मित्र मंडळीतील गप्पा आटोपून घरी आलो, घड्याळाकडे नजर टाकली साडेआठ वाजून गेले होते. घरात शांतता पसरली होती,म्हणजे तरुण मंडळींचा दिवस अजून सुरू झाला नव्हता तर,आमच्या सौ. ही दिसत नव्हत्या पण त्या जागृत झाल्याचे पुरावे दिसत होते.बाहेर पडलेले वर्तमानपत्र टीटेबलवर ठेवलेले होते. सोफ्यावर टाककेले कव्हर नीट नेटके केलेले होते,खोलीतील सटर फटर सामान योग्य जागी  पोहोचले होते.देवघरासमोरील पदकात ताजी पारिजात व शेवंतीची फुले वातावरणात प्रसन्नता निर्माण करीत होती.बहुतेक सौभाग्यवती टेरेसवर गार्डन मध्ये झाडांना पाणी टाकत असाव्या,मी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र उचलले, मुख्य बातम्या वर नजर टाकली व ठेऊन दिले कारण ते माझे दुपारचे बौद्धिक खाद्य होते. सहजच किचन कडे नजर टाकली गॅसवर काहीतरी होते. जवळ जाऊन पाहिले तो चहा होता. बऱ्याच वेळेपूर्वी बनविलेला असावा, पूर्ण थंड झाला  होता. तीन चार कप तरी होताच. बऱ्यापैकी उकळल्या गेल्यामुळे चहाला मस्त रंग चढला होता,दुधात नाममात्र पाणी असावे,त्यात रेड लेबल चहा भरपूर टाकला होता.चार पाच वेलचीच्ये दोडे आणि अद्रकाचे तुकडे त्यात होते, ते माझ्याकडे पाहून हसत आहेत असे मला वाटले. तो चहा पाहून माझी चहाची तलफ जागृत झाली,मी हळूच गॅस सुरू केला समोरच्या कपाटातून घेतलेल्या कपात मी चहा ओतून घेतला, नी पिणार तोच आमच्या सौ.आल्याची चाहूल लागली. पायऱ्यांवर  ती वरून येताना दिसली, अग तू पण घेतेस का चहा, मी सहज विचारले. अहो तो चहा बिलकुल पिऊ नका,किती वेळचा उघडा पडून आहे.सकाळी मुले उठतील आणि कामवाली येईल म्हणून मांडला होता पण कामवाली आली नाही, नी मुले तर अजूनही उठली नाही. मोरीत ओतून द्या तो चहा,दोन तास जुना आहे तो. सौ.ची आदेशवजा सूचना, कानावर पडली पण भरपूर दुधाचा महागडी चाहापत्ती आणि अद्रक विलायची चा तो श्रीमंत चहा मोरीत टाकून देण्याची  इच्छा होत नव्हती,अग काही होत नाही चहाला!  टपरी वाले नाही का दिवस भर चहा विकत राहतात.मी स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.तेव्हड्यात आमचे कन्या पुत्र दोघेही अवतरले,चहा प्रकरण दोघांनी ऐकले,दोघेही मला समर्थन देतील असे वाटले,पण दोघांनी मलाच समजावलं,अहो बाबा जहर असते जुना चहा असे म्हणत आमच्या कन्येने पुरा चहा मोरीत ओतला माझ्या हातातील कपासह.मी पाहतच राहिलो,

 

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शताब्दी ची शिदोरी.. ऋजुता पेंडसे ☆ संग्राहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

? मनमंजुषेतून ?

☆ शताब्दी ची शिदोरी.. ऋजुता पेंडसे ☆ संग्राहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शताब्दी कार्यक्रम संपून जवळपास पंधरा दिवस झाले! अजूनही त्या दिवसांच्या आठवणी मनात रेंगाळत आहेत.. मागच्या वर्षी शताब्दी वर्ष सुरू झाले, तेव्हा कोरोनामुळे काही मर्यादित लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम साजरा झाला.. मनात स्वप्न होते की, पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट दूर झालेले असेल आणि आपण अधिक आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकू! पण.. … कोरोना पूर्ण गेलेला नसला तरी सुदैवाने डिसेंबर मध्ये तो मर्यादित प्रमाणात होता. त्यामुळे कार्यक्रमासाठी भरपूर उपस्थिती आपल्याला दिसली..

यंदा शताब्दी वर्ष असले तरी आपण या कालखंडाच्या माध्यान्हीच्या कालखंडात होतो.शाळेच्या 1969 च्या बॅचने 1996 साली पंचविसावे वर्ष उत्साहाने साजरे केले होते. तेव्हाही आपण उत्साहानं जमलो होतो, पण शताब्दी चा उत्साह काही वेगळाच! 25, 26, 27, 28 डिसेंबर 2021 हे चार दिवस शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे होते.या चार दिवसांत उत्साह अगदी ओसंडून वाहत होता!

संस्थेचे अध्यक्ष  आणि कार्याध्यक्षा  यांनी कार्यक्रमाची आखणी अगदी व्यवस्थित केली होती. शाळेशी संबंधित सर्व लोक उत्साहाने कार्यक्रमाची आखणी करत होते.आम्ही हे सर्व व्हाॅट्सपच्या माध्यमातून पहात होतो. पहिले दोन-तीन दिवस तरुणाईचे होते. ज्यांनी शाळा सोडून जेमतेम वीस पंचवीस वर्षे झाली होती, त्यांचा उत्साह अपूर्व होता.त्या त्या दिवसाचे व्हिडिओ पाहून आम्हाला हे सर्व कळले.

२७ डिसेंबर ला आमच्या वर्गाची बॅच बरीचशी शाळेत  हजर झाली होती.शाळा अगदी सजली होती.

तो मोठा पेंडाॅल, त्यात चमकणाऱ्या झिरमिळ्या,   सगळीकडे लायटिंग आणि शताब्दी सोहळ्याचा आनंद दाखवणारा द्योतक म्हणून मोठ्ठा ‘आकाश कंदील!’जणू काही दिवाळीच होती शाळेची! मी आणि माझी मैत्रीण रिक्षाने हॉटेल वरून गावात येताना रिक्षावाला सुद्धा शाळेच्या शताब्दी बद्दल उत्साहाने बोलत होता!’ एवढा मोठा समारंभ पाहिलाच नाही कधी!’गावातले वातावरणही शाळे प्रमाणेच उत्साहाने भारलेले होते!

२८ तारखेला सकाळी नटून थटून आम्ही उत्साहाने शाळेत आलो. जवळपास पन्नास-पंचावन्न वर्षांनी काही चेहरे आम्ही प्रथमच पाहत होतो. त्यामुळे ‘हीच का गं ती, पूर्वी लांब केस असणारी, किंवा ‘हाच का तो, आता टक्कल पडलेला!’ असे प्रश्न एकमेकींना विचारले जात होते! वय वाढले तरी मूळचे रूप डोळ्यासमोर असतेच ना! एकमेकांशी किती बोलू नि किती नको असे चालू असतानाच नाश्त्याचा आस्वाद घेतला जात होता. चारही दिवस त्याच उत्साहाने पोहे, बटाटेवडे,चहा,काॅफी अखंड मिळत होती. मुख्य कार्यक्रम सुरु होताना ढोल-ताशांच्या गजरात शाळेच्या मुख्य दरवाज्यापासून ज्योत पेंडाॅलमध्ये आणण्यात आली. वातावरण अतिशय आनंदाचे होते. सर्व मान्यवर आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणारे सर खूपच छान ओळख करुन देत होते सर्वांची! .पाहुण्यांची ओळख,  अध्यक्षीय भाषण तसेच इतरही प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. आणि सत्कार समारंभ सुरू झाला. शाळेसाठी खूप मोठमोठ्या देणग्या येत होत्या.मी वडिलांच्या नावे दिलेली देणगीची रक्कम फार मोठी होती असे नाही,पण त्यानिमित्त माझा सत्कार करण्यात आला.शाळा ही आपल्याला मातेसमान असते.आणि तिच्या हातून  हा माझा सत्कार झाला ह्याचे मला खूप अप्रूप वाटले! या सर्व कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम दोन अडीच वाजेपर्यंत चालू होता. त्या नंतर आम्हाला थोडावेळ आमच्या वर्गात जाण्यास मिळाला. आम्ही आपापली बाके धरून बसलो. आमचे जुने शिक्षक,बाई  … सर्वांच्या आठवणी आणि त्यांचे तास मनासमोर आणत खूप एन्जॉय केले! बालपण साक्षात उभे राहिले डोळ्यासमोर! तीन साडेतीन वाजता पुन्हा एकदा पेंडाॅलमध्ये  करमणुकीच्या कार्यक्रमासाठी जमलो. त्यात मला माझ्या दोन कविता वाचण्याची संधी मिळाली!

आमच्या वर्गाचा महंमद रफी असणाऱ्या मित्राची गाणी खासच झाली.कित्येक विद्यार्थ्यांनी शाळेच्या छान आठवणी सांगितल्या. त्यानंतर  मुलामुलींनी गाण्याच्या तालावर नाचून घेतले.तिथेअसलेल्या युनिफॉर्म मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी च्या कट् आऊट मध्ये आम्ही फोटो काढले.तसेच 100  च्या अंकामागे उभे राहून ही फोटो काढले गेले! लहान मुलांप्रमाणे आम्ही बागडत होतो अगदी!कार्यक्रमाला वेळ खूपच कमी मिळाला असे म्हणत म्हणतच सहा वाजेपर्यंत कार्यक्रम आवरता घ्यावा लागला. पेंडॉल मधून बाहेर पडायला कुणाचेच मन होत नव्हते! प्रत्येकाचे पाय अडखळत होते पण शेवटी कुठेतरी थांबावेच लागते ना! घोळक्या घोळक्याने मुले -मुली(स्वतः ला आम्ही अजून शाळेचे विद्यार्थी च समजत होतो.) गप्पा मारत होते. एसटीचा संप, कोरोना ची भीती या सगळ्याला तोंड देत जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षा सर्व परिचित असल्याने वातावरण आपुलकीचे होते.त्या दोघांनी तसेच इतर सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्वांनी  ह्या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले होते.शाळेच्या इतिहासात हे सुवर्णक्षण नक्कीच कायम स्वरुपी रहातील!  तिथून निघताना खूप सार्‍या आठवणींची शिदोरी बरोबर मिळाली होती .पुढची शताब्दी काही आपल्यासाठी नाही, पण या शताब्दी ची शिदोरी आम्हाला आनंद देण्यासाठी आयुष्यभरासाठी मिळाली असं मात्र मला वाटलं!

 

  – ऋजुता पेंडसे

संग्रहिका – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 2 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 2 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

मुक्तांगणचा शिल्पकार मुक्तांगणी दाखल..

डॉ. अनिल अवचट:

…….(ती ठाण्याची अनिता सोहोनी. अनिलचं तिच्याशीच लग्न झालं. अनिलच्या सामाजिक कामाचा आत्मा तीच होती. अनेक वेळा त्याने तसं माझ्याकडे बोलूनही दाखवलं होतं.)…..क्रमशः

मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, म्हणजे बावीस डिसेंबरची. सकाळी साडेसातलाच अनिलचा फोन आला.”सुध्या, मी तुझ्याकडे येतोय, आहेस ना. खालचं तुझं ऑफिस उघडं आहे नां..” इतक्या सकाळी ऑफीस उघडत नाही. तू वरच ये असं मी त्याला सांगितलं. इतक्या सकाळी अनिल येत नसायचा. दुपारी, कधी संध्याकाळी असा यायचा. या वेळी मात्र त्याने ही वेळ का निवडली होती समजेना. अखेर आठच्या सुमारास अनिल आला. मी खाली आलो, त्याची अवस्था नाजूकच होती. त्याला सुट्टं चालणं त्रासदायक वाटत होत. त्याचा ड्रायव्हर अविनाश आणि मी एकेका दंडाला धरुन घरात नेलं. घरात माझी बायको आणि मी दोघेच होतो. काय खाणार विचारल्यावर म्हणाला की मी पोहे खाल्ले आहेत, तरी पुन्हा थोडे खाईन आणि चहा पण घेईन. त्याने त्याचं ’आणखी काही प्रश्न’ हेे नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक मला दिलं. पेन मागून घेतला आणि त्यावर लिहिलं,’ प्रिय सुधा, तुझ्याकडे आल्यावर वेगळंच वाटत असतं’ खाली सही केली. अक्षर नेहमीसारखं नव्हतं. हाताला थोडा कंप होता.  मी म्हणालो,” अनिल, हे प्रश्न कधीच संपायचे नाहीत, आणखी काही, मग परत आणखी काही…. असं सुरुच राहणार. तू अनेक प्रश्नात हात घातला आहेस आणि शक्य ते सगळं केलं आहे. आता स्वत:कडे लक्ष दे”.

पोहे खात आणि नंतर चहा घेत आम्ही भरपूर गप्पा मारल्या. त्याचा एकूणच अ‍ॅप्रोच यावेळी मला थोडा विचित्र वाटला होता. उगा तो निर्वाणीची भाषा बोलतोय असंही वाटून गेलं होतं. तो नेहमीच आल्यावर भरपूर बोलायचा. बहुतेक वेळा आम्ही दोघेच असायचो. अनेक खाजगी गोष्टी शेअर करायचा. माझ्या ’एक होतं गाव ’ या पुस्तकाला प्रस्तावना त्याने लिहिली होती. त्यात त्याने म्हटलं होतं, ” सुधाकरची कमाई माझ्या तुलनेत खूप मोठी आहे’. हे वाक्य काढून टाक असं मी त्याला सुचवलं होतं. अरे हे वास्तवच आहे, तू जे काही केलंस ते खरोखर मोठं आहे. मी हे वाक्य काढणार नाही. आणि ते तसंच आहे. त्या दिवशी त्याने सांगीतले होते की तुझं ’पिंपळपार’ तिसर्‍यांदा वाचलं. काय आहे माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा वाचावसं वाटतं. भरपूर गप्पा झाल्यावर तो नेहमीप्रमाणे म्हणाला सुध्या, आता एक गाणं म्हणतो. त्या दिवशी त्याने आनंद सिनेमातलं ’कही दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं म्हटलं. त्यादिवशी हे गाणं म्हणताना त्याच्या आवाजात शेवटी शेवटी चरचरीत अशी कातर आणि आर्तता आहे असं मला वाटून गेलं. त्यालाही हे म्हणताना आतून वेगळंच जाणवत असावं. मलाही गलबलून गेलं होतं. तो प्रत्येक भेटीत एक गाणं म्हणायचाच, पण गाणं वेगळं असायचं आणि मूडही वेगळा असायचा. या पूर्वीच्या भेटीत त्याने आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग म्हणला होता.

अनिलच्या घरी गेलं की तो पुस्तकाच्या खोलीत, जी पुस्तकाचं गोडाऊन वाटावी अशी झालेली होती, बसलेला असायचा. अघळ पघळ मांडी घातलेला अनिल, समोर आपण बसलेलो आणि गप्पा व्हायच्या. मधुनच तो बासरीवर काही वाजवून दाखवायचा. आमच्या गप्पांना त्याच्या सामाजिक कामाचा, व्यसनमुक्तीचा असा काही संदर्भ नसायचा. वेगळ्याच दिशेला गप्पा व्हायच्या. सुनंदा वहिनींच्या जाण्यानंतर अनिल आतून पोकळ झाला होता आणि त्याची आई इंदुताईंच्या जाण्यानंतर तर त्याच्यातली पोकळी जाणवतही होती. त्या दिवशी अनिल आला त्यावेळी त्याची अवस्था फार चांगली नव्हती. ’मला चक्कर येते’ असं म्हणाल्यावर मी त्याला तू सध्या बाहेर पडू नकोस अशी सूचनाही केली होती. या वयात थोडं जपूनच राहा, पडलास तर भलतंच काही व्हायला नको.

अनिलला आता आपल्याकडे फार काळ नाही याची जाणीव झाली असावी आणि तो मित्रांना, घरच्यांना भेटून घेत असावा. जे काही करु ते जीव ओतून करु, सगळ्या कलांचा आस्वाद घेऊ, अनेकांच्या अडचणींने कळवळून जाऊ, जमेल ती सगळी मदत करु असा विचार करणारा, साधी राहाणी असलेला अनिल. शाकाहारी पण चवीने खाणारा अनिल. अनिल एक अपवादात्मक आगळं व्यक्तिमत्व होतं. मला नेहमीच बरं वाटायचं की अनिल त्याच्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टी विश्वासाने माझ्याकडे बोलायचा. जगण्याच्या सगळ्याच पैलूंचा आस्वाद घेत, प्रचंड सामाजिक कार्य करत आयुष्य जगलेला अनिल म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं. एक जवळचा, उत्तुंग व्यक्तिमत्वाचा मित्र हरपला याचं मोठंच दु:ख आहे. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

 – सुधाकर घोडेकर

प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी काही आदर्श गृहिणी नाही..सोनल ऋषिकेश ☆ संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

? मनमंजुषेतून ?

☆  मी काही आदर्श गृहिणी नाही..सोनल ऋषिकेश ☆ संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

नाही.. मी काही आदर्श गृहिणी नाही.

मला calendar वर साध्या नोंदी करता येत नाही की

महिन्याचा शेवटी पुरवा-पुरव करताना adjustment चं feeling ही येत नाही…

तारखा लक्षात असल्या तरी तिथीशी अजून गट्टी जमत नाही आणि

उपवास केले नाही म्हणून अपराधी सुद्धा वाटत नाही…

 

नाही जमत मला दुधाच्या पिशव्या धुवून साठवून ठेवणं,

पेपर रद्दीच्या वाट्यालाही मी सहसा जात नाही…

रोज कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवायला जमतंच असं नाही,

चोवीस तास स्वच्छतेचा जयघोषही मी करत नाही…

 

वाळवण, लोणची, मुरांबे यातलं काही करत नाही,

प्रत्येक सणाला साडी पण नेसतेच असं नाही…

 

मला वाटतं बुवा कधी कधी काम सोडून निवांत बसून राहावं,

आपलं प्रतिबिंब दुसऱ्याच्या आरश्यातून पाहावं, 

कारण खरंच मी आदर्श गृहिणी वैगरे नाही…

 

काही वेळ स्वतःसाठी काढताना स्वार्थी असल्यासारखं वाटत नाही,

दुसऱ्यांना जपताना मात्र राग, लोभ काही ठेवत नाही…

नाही विसरत मी महत्वाच्या तारखा, प्रसंग आणि घटना,

त्या अविस्मरणीय करताना Surprise द्यायलाही मी विसरत नाही…

 

नैवेद्य करताना भक्तीभाव कमी पडत नाही की

भुकेल्याला जेवू घालताना हात आवरता घेत नाही…

वर्तमान जगताना भविष्याची तजवीज करायला विसरत नाही,

अनुभवाची शिदोरी उगाच कोणालाही वाटत फिरत नाही…

 

आदर्श होण्याचा अट्टाहासही करत नाही आणि

गृहिणीची कर्तव्ये पार पाडण्यात कसलाही कमीपणा वाटत नाही…

‘स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं’ ही खंत नकोय मला,

आत्ताच मोकळा श्वास घेतीये, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही!!!

 

 –  सोनल ऋषिकेश

संग्राहिका :–  माधुरी परांजपे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 1 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 1 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

मुक्तांगणचा शिल्पकार मुक्तांगणी दाखल..

डॉ. अनिल अवचट यांचं निधन..

कुणाचं अंतिम पर्व कसं असेल याची कुणीच कल्पना करु शकत नाही. आयुष्यभर सतत कामात असणारा एखादा या अंतिम पर्वात काम नाही, किंवा काही करण्याइतकी शक्ती उरली नाही म्हणूनही खचून जातो. अनेकांना या पर्वात समाजात घडत असलेल्या अनेक घटना छळतात आणि आपण काही तरी करायला पाहिजे ही खंत लागते आणि आता आपल्या हातून हे काही होण्याची शक्यता नाही याचं प्रचंड दु:ख होत असतं. त्यांची ही तळमळ अतिशय प्रामाणिक आणि नैसर्गिक असते. त्यांना पडणार्‍या अशा प्रश्नांची मालिका संपतच नसते, कारण वय झालं, शक्तीहीन झाले तरी यांच्या संवेदना तितक्याच, किंबहुना अधिक तीव्र असतात. अनिल अवचटांबाबत हे जवळपास असंच झालं होतं. खूप काही करायचं बाकीच आहे असं त्याला सारखं वाटायचं. त्याचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं आहे,” आणखी काही प्रश्न” हे त्याच्या या मानसिकतेचंच उदाहरण आहे.

अनिलच्या सामाजिक कार्याबाबतची खडा न् खडा माहिती जवळपास सगळ्यांना आहे. त्याच्या लोकसत्तामधल्या ड्रग्जच्या व्यसनात अडकलेल्या तरुणाईवरची लेखमाला त्याला सामाजिक कार्यात खेचून घेऊन गेली आणि पुढे त्यातून मुक्तांगणची निर्मिती झाली. अनिलने केलेल्या अनेक सामजिक उपक्रमांची तपशीलवार माहिती बहुतेकांना आहेच. अनिल एक ’छांदिष्ट’ होता. शिक्षणाने डॉक्टर होता, हाडाचा सामाजिक कार्यकर्ता होता, चित्रकार होता, ओरिगामी कलाकार होता, तो उत्तम लिहायचा, बासरी वाजवायच, गायचा, कविता करायचा. हे सगळे छंद त्याने नुसतेच जोपासले नव्हते तर या प्रत्येकातून तो आनंद मिळवायचा. व्यसनमुक्ती केंद्र हे तर त्याचं मोठंच आकर्षण होतं. थोडक्यात काय तर सार्वजनिक अनिल अवचट सगळ्यांनाच माहीत होते.

अनिल माझा लहानपणापासूनचा मित्र. आम्ही काही महिन्यांच्या अंतराने एका वयाचे. अनिलचे वडील डॉक्टर होते आणि अनिलनेही डॉक्टर व्हावं ही त्यांची इच्छा होती. त्यांनी त्याला तसंच वाढवलं होतं आणि अनिल डॉक्टरही झाला. तो ज्यावेळी एमबीबीएस ला बीजे मधे होता त्या पहिल्या वर्षी मी आणि आणखी एक मित्र त्याला भेटायला कॉलेजवर गेलो होतो. अनिलने आम्हाला तिथल्या कॅन्टीनमधे नेले होते. थोड्या वेळाने आत काही मुली येताना दिसल्या. अनिलने त्यातल्या एका मुलीकडे खूण करुन सांगितले, ” ती निळ्या साडीतली मुलगी दिसते ना, तिच्याशी मी लग्न करणार आहे”. त्यावेळी मी विचारलं होतं, की ठरलंय का, तर अजून नाही पण होईल. ती ठाण्याची अनिता सोहोनी. अनिलचं तिच्याशीच लग्न झालं. अनिलच्या सामाजिक कामाचा आत्मा तीच होती. अनेक वेळा त्याने तसं माझ्याकडे बोलूनही दाखवलं होतं…..

क्रमशः…..

 – सुधाकर घोडेकर

प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 2 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 2 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

चंदा दहावी नंतर आज भेटली होती. तेंव्हा वर्गातल्या सगळ्या मुलींमध्ये दिसायला चिकनी तीच होती आणि तिचे बसणे, वागणे हे श्रीमंतीच्या घराचे दिसत होते. तेंव्हा आमच्या वर्गातल्या बहुतेक सगळ्या मुलांना चंदा आवडायची पण चंदा माझ्याशीच जास्त बोलत असे म्हणजे तसा वर्गात हुशार मुलगा मीच असल्याने तिचा अर्धा गृहपाठ ती माझ्याकडूनच करून घेत असे आणि मी पण एक मित्राचे कर्तव्य पार पाडीत असे.  दहावी नंतर मी अकरावीला आमच्या आहे त्या शाळेतच राहिलो आणि चंदा मात्र छू मंतर झाली. अकरावीला ती कुठे गेली, कुठच्या कॉलेजला गेली कोणालाच काही कळले नव्हते आणि नवीन नवीन मैत्रिणी झाल्यामुळे तशा हळूहळू तिच्या आठवणी कमी झाल्या. तरीपण मनातल्या एका कोनाड्यात तिची आठवण होती आणि आता साठीची ताकद असल्याने मी ते सरितालाही सांगायचो. आज अचानक ती समोर येऊन असे दर्शन देईल असे वाटले नव्हते म्हणजे,  आधी  तिचा चेहरा कसा कोमल होता आता तोच सुजलेला वाटतोय॰. शरीरयष्टी नाजूक होती आता फुगलेली वाटतेय.,  तरीही एक माझी जुनी मैत्रीण भेटली आणि ती पण एवढ्या बिनधास्त वागणारी म्हणून मी जरा खूषच झालो होतो.

परत एकदा साठीची ताकद लावली आणि सरिताकडे न बघताच तिला रात्री डिनरला एकत्र भेटायचे आमंत्रण देऊन मी मोकळा झालो आणि तिने काहीही आढेवेढे न घेता ते स्वीकारले. जाता जाता एकमेकांचे मोबाईल नंबर्सची देवाणघेवाण करून तिने सांगितले, ” मध्या… जरा उशिराच भेटू, जरा आता औटींगला आले आहे तर जेवायच्या आधी रूममध्ये बसून मी व्होडका घेणार आहे. बघ तू घेत असलास तर कंपनी दे. नाहीतरी पवन पण त्याच्या एका मैत्रिणीला भेटायला बाहेर जाणार आहे मी एकटीच असणार आहे…हो पण बायकोची परमिशन असेल तरच ये.” असे बोलून ती सरिताकडे बघून हसायला लागली. आता ह्यावर सरिता काय बोलणार, ह्याचे  मला टेन्शन असतानाच सरिता पण साठीच्या उंबरठ्यावर असल्याने तिनेही साठीची ताकद दाखवून तिला सांगितले, “हो… हो…..मला काहीही प्रॉब्लेम नाही. तसाही माझा डिनर टाइम ८ वाजताचा असतो त्यामुळे मी काही येणार नाही पण मधु येईल आणि मधु घेतो कमी पण त्याला चढते जास्त तेव्हा तू स्वतःला सांभाळ म्हणजे झाले. ” सरिताने होकार दिला हे मला आधी खरेच वाटेना मी मनातल्या मनात खुश झालो होतो पण तसे न दाखवता तिला सांगितले, ” चंदा जाऊन दे. आज नको. आम्ही पण खूप दिवसांनी आज बाहेर पडलो आहोत आणि सरिताला न घेता यायचे म्हणजे…. नको नंतर कधीतरी एकत्र भेटू. एवढे मी बोलत असतानाच सरिताने परत री ओढली आणि म्हणाली, ” नाही ग ….मधु  ८.३०ला तुझ्याकडे येईल नक्की  येईल उगाच तो मला  घाबरतोय. जा रे खूप दिवसांनी तुझी मैत्रीण भेटली आहे तर दे ना तिला कंपनी. “मनातल्या मनात मी खुश झालो होतो पण साठीच्या ताकदीने मनातली ख़ुशी काही मी चेहऱ्यावर न आणता चंदाला “भेटू ८.३० वाजता” असे बोलून बाय केले.

क्रमश:…. 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 2 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 2 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(पण तरी गेले आठ महिने मी हा उपवास सुरू ठेवला आहे आणि आता यापुढेही स्मार्टफोन फ्री आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.’)  इथून पुढे —-

– अर्थात हा निर्धार तिचा या स्पर्धेआधीपासून होताच. कारण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिनं जो व्हिडीओ तयार केला होता तोही मोठा रंजक आहे. त्यात ती असं स्पष्ट म्हणते की, “ स्मार्टफोन आणि आपण ही एक लव्ह- हेट प्रकारचीच रिलेशनशिप आहे. फोन हातात नसेल तर जगणं सुनं सुनं वाटतं. मी तर सगळी कामं फोनमध्येच नोंदवते. रात्रंदिवस सोशल मीडियात कनेक्ट असते. मोबाइल गेम खेळण्याचीही चटक लागलेली आहे. घरात कुणी बोलतंय, गप्पा मारतंय, जेवतंय, त्यावेळीही हातात फोन घेऊन तो कधी एकदा स्क्रोल करायला लागायचा असं व्हायचं. मी सतत फोनवरच.” 

“ मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की, मी माझा वेळ वाया घालवते आहे. मी स्क्रोल करण्यापलीकडे काहीही करत नाही. फक्त वेळ वाया घालवते आहे. ‘डूइंग नथिंग’ या स्टेजला मी कधी पोहोचले मला कळलंही नाही. रोज मी झोपतानाही फोन उशाशीच घेऊन झोपायचे. रात्री- बेरात्री जाग आली तरी मी लगेच हातात फोन घेऊन स्क्रोल करायला लागत असे. आणि एवढं करून मला कशासाठीच वेळ नव्हता. वेळच मिळत नाही ही तक्रार मी सतत करत होते. त्यामुळे मला वाटतं की या स्मार्टफोनशिवाय जगून पाहावं. म्हणून मी या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं.” 

-हा तिचा व्हिडिओ निवडला गेला. तिनं आव्हानही स्वीकारलं; पण पुढे काय? सोपं आहे का सेलफोनशिवाय राहणं? कसं जमलं तिला?

एलिना सांगते, “ मुळात मी सेलफोनशिवाय जगायचं म्हणतेय याचा धक्का माझ्या मित्र-मैत्रिणींनाच जास्त बसला. ते म्हणाले, ‘अशक्य आहे तू जे म्हणतेस ते, शक्यच नाही याकाळात सेलफोनशिवाय जगता येणं.’  पण मी ठाम होते. मलाही एकदम रिकामपण आलं. खूप वेळ एकदम अंगावर आला. मला साधं कुणाशी फोनवर बोलायला वेळ नव्हता; पण आता हातात फोन नाही, त्यावरचा स्क्रोलिंग नाही म्हटल्यावर मला वेळच वेळ होता. अगदी रिकामा वेळ. अवतीभोवतीच्या माणसांशी बोलण्यावाचून काही  पर्यायच उरला नाही. फोटो घेण्यापेक्षा मी जिथं आहे ते पाहू, अनुभवू लागले. मुख्य म्हणजे माझी भरपूर झोप व्हायला लागली. या काळात मी 30 हून जास्त पुस्तकं वाचली. १२५  टक्के जास्त प्रॉडक्टिव्ह झाले. अधिक चांगलं काम करू लागले. मला वेळच नाही, ही तक्रारच माझ्या आयुष्यातून संपली. मुख्य म्हणजे सतत सोशल मीडिया स्क्रोल करकरून मी जास्त उदास आणि डिप्रेस होत असे. ते सारं बंद झालं. माझा टेक्नॉलॉजीला विरोध नाही, ती उत्तमच आहे. मात्र मी तिचा गैरवापर किंवा अतिवापर करत असे. आणि त्याबदल्यात मला काय मिळालं?

तर माझं स्वातंत्र्य गेलं. संपलंच. माझा खासगीपणा संपला. मला काही व्यक्तिगत आयुष्यच उरलं नाही. माझी विचार करण्याची क्षमताही बधिर झाली. मी फक्त तासनतास स्क्रोल करत असे. दिवसाला किमान तीन-चार तास मी फोनवर असायची. आणि त्यावेळेत मी केलं काय ?

तर काही नाही. हे किती धोकादायक आहे—–हे धोके उमगले आणि मी ठरवलं हे सेलफोन फास्टिंग करायचंच. नो मोअर स्क्रोलिंग. आणि म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं. आता ठरवलंय हे वर्षच नाही तर यापुढेही कायम स्मार्टफोन वापरायचा नाही ! “ 

– एलिना हे जे काही सांगते ते काही तिच्यापुरतंच मर्यादित नाही. ते आज जगभरातल्या प्रत्येकाला लागू आहे. मात्र वर्षभर सेलफोनशिवाय राहण्याचं जे धाडस एलिनाने केलंय ते करण्याची हिंमत आपल्यात आहे का?

विचारावं ज्यानं त्यानं  स्वतःला..!

– समाप्त – 

लेखक:-   अनामिक हितचिंतक

संग्राहिका : – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

२६ – १२ – २०२१      

खूप  दिवसानंतर  माझ्या  बायकोनी  फिरायला  जायचा  मनसुबा  नुसता  बोलून  न दाखवता  तिने  बुकिंगही  केले  आणि  आम्ही  अलिबागच्या  रेडिसन  ब्लु  रिसॉर्टला पोचलो.

दुपारची  झोप  काढून  आम्ही  जरा  रिसॉर्टला  फेरफटका  मारायला  बाहेर  पडलो आणि  समोरून  जराशी  स्थूल  अशी  एक बाई  एका  पुरुषाबरोबर  समोरून  येत होती.  आता  साठीतच  नाही , तर  नेहमीच पुरुषांची  अशी  नजर  जाणे  साहजिक आहे  पण  साठीची  ताकद  अशी  आहे  की  त्यावर  आता  बायकोकडून  आक्षेपही घेतला  जात  नाही.  जशी  ती  जवळ  आली  तेव्हा  तो  चेहरा  कुठे तरी बघितल्यासारखा  वाटला  पण  कुठे  ते  आठवत  नव्हते. ती दोघे  आम्हाला  क्रॉस  करून  मागे  गेले  आणि  मला  आठवले,  अरे  ही  तर  माझ्या  शाळेतली  चंदा  वाटते.  सध्या  साठी  चालू  असल्याने  साठीची  ताकद  लावायची  असे  ठरवून  बायको  बरोबर  असतानाही  मी  मागे  वळून  तिला  ऐकायला  जाईल  अशा तऱ्हेने  मोठ्याने हाक  मारली, ” चंदा….”

आणि…., आणि  तिने  मागे  वळून बघितले. ” चंदा  फाटक ” मी  परत  तिचे  नाव घेतले.

आता  तिने  साठीची  ताकद  लावली.  ज्याचा  हात  तिच्या  हातात  होता  तो  सोडून ती  आमच्या जवळ  आली. ” मध्या… तू ….अरे  तू  इथे …. ओळखलंच  नाही  आधी  तुला.  हो  आणि  आता  मी  चंदा  गुप्ते  आहे.  फक्कड  मासेखाऊ  झाली  आहे. शाळेनंतर  आत्ता  भेटत  आहोत. मध्या  डोक्यावरचे  छप्पर उडाले  रे  तुझे …. ”  भेटल्या  भेटल्या  तिने  मला जमिनीवर  आणले. शाळेत  माझ्या   मधुसुदन नावाचा शॉर्टफॉर्म  सगळ्यांनी  मधु  केला होता.  फक्त   हिच  काय  ती  मला  मध्या  नावाने हाक  मारायची ” अग  तुझे  पण  ते  लांब  केस  होते  ना.!  कुठे गेले.? हा बॉबकट कसा झाला?”  मी पण तिला  रिटर्न  शॉट  दिला.  तिथपर्यंत  आमच्या  हिच्या  आणि तिच्या बरोबर  असणाऱ्याच्या  भुवया  वर  झाल्या  होत्या.  मी  चंदाची  माझ्या बायकोशी,  सरिताशी  ओळख  करून  दिली. “अग  तुला  मी  मागे  बोललो होतो ना, आमच्या   वर्गातली  मुलगी  चंदा  आणि  मी  आमच्या  माथेरानच्या  ट्रीपला  बॉबी मधले ‘ हम  तुम  एक  कमरेमे  बंद  हो  और  चाबी  खो  जाये ” हे गाणं  गायलं  होतं. तेव्हापासूनच  आमची  जोडी  शाळेत  फेमस  झाली  होती  आणि चंदा, ही माझी अर्धांगिनी  सरिता”. चंदाने  चेहऱ्यावर  खोटे  हसू  आणून  नमस्कार  केला  आणि तिच्याबरोबर  असणाऱ्याकडे  हात  करून  बोलली,  “हा माझा मित्र  पवन … पवन राठी.’  ( त्याच्याही  डोक्यावरचं  छप्पर  उडालं  होतं  माझ्यापेक्षाही पेक्षा  जास्त.  त्यामुळे  मी मनात जरा  खुश  झालो )  पवन माझ्या कॉलेजमध्ये होता. चार वर्षांपूर्वीच अचानक  भेट झाली  तेव्हापासून  आम्ही  दरवर्षी  असे  दोन  दिवसासाठी  फिरायला  बाहेर जातो….माझा  नवरा  शिपवर  असतो  आणि  पवन  बिचारा  एकटाच  आहे  रे  म्हणून  जरा  त्याला  विरंगुळा  मिळावा म्हणून  आम्ही  असे  वरचेवर  भेटत  असतो”  चंदानी  तर  एकदम  जबरदस्त  साठीची  ताकद  दाखवली.  आमच्या  हिच्या  कपाळावरच्या आठ्या  जरा  वाढल्या  पण  मी  मनात  खुश  झालो  होतो कारण , नाही  म्हणायला  मी  पण  तिचा शाळेतला मित्र  होतो,  फक्त  एकटा  नसलो  तरी  विरंगुळा  का  काय  त्याची  मलाही  गरज  होतीच की.

क्रमश:…. 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 1 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 1 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“एक कोटी रुपये देतो, वर्षभर स्मार्टफोन वापरायचा नाही,” असं कुणी सांगितलं तर तुम्ही कराल का?

– कुणीही म्हणेल की ‘ एक कोटी रुपये मिळणार असतील तर वर्षभर राहू की सुखानं फोनशिवाय, त्यात काय अवघड आहे.’

-खरं तर अवघड काही नाही, पण वाटतं तितकं सोपं ते आता उरलेलं नाही. आपण सारेच स्मार्टफोनला इतके सरावलो आहोत की फोन हा फक्त एकेकाळी कॉल करणं, घेणं, बोलणं यासाठीच होता हे आता आपण विसरून गेलेलो आहोत. सतत स्क्रोल करत राहण्याचं हे व्यसन इतकं वाढलं आहे की, एक दिवस मोबाइल बिघडला किंवा हरवला, एवढंच काय पण काही वेळ त्याची बॅटरी संपली तरी जीव कासावीस होतो. फोनशिवाय जगणंच अशक्य व्हावं इतका फोन जवळ बाळगूनच अनेकजण जगतात. झोपताना आणि शौचालयातही फोन जवळच असतो.

अशा अवस्थेत फोनशिवाय जगणं कसं शक्य व्हावं?

पण एलिना मुगडन या तरुणीनं हे आव्हान स्वीकारलं. न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरात राहणारी ही तरुणी. वय वर्षे 29. गेल्या वर्षी फेब्रुवारीतली ही गोष्ट. व्हिटॅमिन वॉटर या फिटनेस ब्रॅण्ड कंपनीने अमेरिकेत एक स्पर्धा आयोजित केली. ‘स्क्रोल फ्री इयर’ असं त्या स्पर्धेचं नाव. वर्षभर स्मार्टफोन न  वापरता राहिलं तर एक लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. 10 लाखांहून अधिक इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले व्हिडिओ पाठवले होते. त्यातून एलिनाच्या व्हिडिओची निवड झाली, आणि वर्षभर तिचा आयफोन एका डब्यात बंद करण्यात आला. पुढचे बारा महिने स्मार्टफोन नाही, त्यावर स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिकटॉक असं काहीही नाही. ओला-उबेर- खाण्याचे पदार्थ ऑनलाइन मागवण्याचे अ‍ॅप्स, हे काहीही वापरता येणार नाही.

कंपनीने एलिनाचा आयफोन काढून घेतला आणि तिला एक फ्लिपचा साधासा फोन दिला. त्या फोनवरून फक्त कॉल करता येतील आणि आलेले कॉल स्वीकारता येतील. यापेक्षा जास्त त्या फोनवरून काहीही करता येणार नाही. तशी सोयच नाही. एवढंच नाही तर लॅपटॉप, टॅब यांचा वापरही अत्यंत मर्यादित करण्याची परवानगी देण्यात आली.

आणि एवढं करूनही ती खरंच स्मार्टफोनपासून वर्षभर लांब राहिली का, हे तपासण्यासाठी तिची येत्या फेब्रुवारीत शिस्तशीर लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे. त्यावरून कळेलच की खरंच तिनं हा सेलफोन उपवास तंतोतंत पाळला की नाही.

पैसे मिळतील तेव्हा मिळतील, पण वर्षभर सेलफोनपासून दूर राहण्याचा एलिनाचा अनुभव खूप रंजक आणि डोळ्यात अंजन घालणाराही आहे.

एलिना सांगते, ‘खूपदा वाटलं की हा स्मार्टफोन उपवास सोडावा. फोनशिवाय जगणं मला जमतच नव्हतं. सोशल मीडिया नाही, कुणाशी संपर्कच नाही या भावनेनं मग तगमगायला लागले. कुठं जायचं तर गाडी बुक करता येत नाही. मित्र-मैत्रिणींशी चटकन बोलता येत नाही, त्यांचं काय चाललंय हे कळत नाही. जसं काही मी जगापासून लांब फेकले गेले असं मला वाटायला लागलं होतं; पण तरी गेले आठ महिने मी हा उपवास सुरू ठेवला आहे आणि आता यापुढेही स्मार्टफोन फ्री आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.’

क्रमशः…..

लेखक:-   अनामिक हितचिंतक

संग्राहिका : – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares