मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 1 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 1 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

भव्य जलाशयावर हळूहळू चालली आमची आगबोट,

पाणीच पाणी चहूकडे पाहुनी 

उरात धडकी राहिली भरुनी 

पण, मामाच्या गावाला जायचं आहे 

आंबे फणस खायचे आहेत, सुट्टीची मज्जा घ्यायची आहे म्हणून डोळे मिटून बोटीत बसायचे धक्का यायची वाट पहायची उतरल्यावर श्वास सोडायचा, हुंदडायचा, ध्यास घ्यायचा, सुट्टीचा आनंद लुटायचा, डोळेभरून निसर्ग पहायचा आणि महिनाभर मुक्काम ठोकायचा कोठे तर मामाच्या गावाला अलिबाग जवळच्या लहानशा ‘थळ’ गावात! 

दरवर्षी मे महिन्याशी शाळेला सुट्टी लागली की वेध लागायचे थळला मामाकडे जाण्याचे अलिबाग पासून तीन मैलावर असलेले लहानसं खेडं! कौलारू घरे नारळ पोफळी, आंब्या फणसाची झाडं दूरवर असलेली शेतं. विहिरीवर पाण्यासाठी रहाट, थोडसं पशुधन असे हे मामाचं गाव! 

आम्ही रेल्वेने मुंबईच्या आमच्या उपनगरातील घरातून निघून मसजीद बंदर स्थानकावर उतरत असू, मग व्हीक्टोरियात बसायचो भाऊच्या धक्यावर जायचं असायचं. तेव्हा व्हिक्टोरिया हे घोडा जुंपलेले टांग्यासारखे वहान होते. मागे वर उंच छत असलेली बग्गी त्यात दोन तीन माणसे मावत. पुढेही एक दोघ बसत. त्याच्या पुढे मग गाडीवान आणि जुंपलेले घोडे अशी ही खूप लांबलचक असलेली एखादी शाही बग्गीच ! पुढे दोन्ही बाजूस दिवे असत. याच छत पुढे ओढून बंदही करता येई, (आता ही व्हिक्टोरिया इतिहास जमा झाली आहे ) मग आमची सवारी भाऊच्या धक्याला पोहचायची. आई बोटीचे तिकीट काढत असे, आम्ही बोटीत प्रवेश करत असू. चहुबाजूला अरबी समुद्राचं ‘अबब’, पाणी बघून बालवयात माझ्या उरात धडकीच भरायची! एकदाचा बोट निघायचा भोंगा, भूsss भूsss करत वाजला की बोट धक्का सोडून पुढच्या समुद्रावर हळूहळू चालू लागे. समुद्राचे पाणी कापत कापत. हालत डोलत हेलकावे खात बोटीची संथपणे रेवसच्या दिशेने वाटचाल चालू असे. आता प्रवासाच्या मध्यावर बोट पोह्चायच्या बेतास आली की दुरूनच, मधोमध असलेला, ‘काशाचा खडक’ दिसू लागे, मग मन धास्तावून जाई. काशाच्या खडका जवळून बोट जाऊ लागली, की तेथे जणू समुद्र खवळल्यासारखाच होई, आणि मग बोट खूपच हेलकावे खाऊ लागे, माझ्या बालमनात भितीने घाबरगुंडीची वलये गोळा होत, उरात धडकीतर भरेच, मग आईला बिलगून बसू लागे. त्या खडकाजवळ काही वर्षांपूर्वी रामदास बोटीला जलसमाधी मिळाल्याची भयकथा अनेकदा आई, मामाने सांगितल्यामुळे, मी मनात त्या काशाच्या खडकाची धास्तीच घेतली होती. त्यामुळे ती समुद्रातील अपघाती जागा पार करून बोट पुढे गेल्यावर, लहान असतानाही मी सुटकेचा निश्वास सोडत असे. राहिलेले, थोडे अंतर भीती, उत्कंठा, आणि पोहचण्याची अधीरता यात पार पडे. आणि आता आलीच जवळ जमिनीवर उतरायची जागा, उतरल्यावर हायसं वाटे, आणि तो मनावर त्यावेळी भयाने ग्रासलेला प्रवास संपे.

हळूहळू चालत आम्ही, बसच्या थांब्यावर जात असू. या बस पूर्वीच्या पद्धतीच्या होत्या, त्यांचे प्रवासी बैठकी चा भाग मागे सोडून, पुढचा चालकाचा भाग, पुढे तोंड काढल्यासारखा इंजिनाचा भाग असे. आता सारख्या चपट्या तोंडाच्या बस नसत. पूर्वीची लौरी (ट्रकही) असेच असत. मग स्थानापन्न झाल्यावर, आमची वटवट चालू असे, मोटार सुरु होई, रस्त्याची अवस्था खेडेगावातील त्यावेळच्या स्थिती प्रमाणेच होती. आचके दचके खात बस चालत असे, आणि मग आई दटावे, “ बोलू नका, बोलता बोलता जीभ दाता खाली येऊन चावली जाईल,”  त्या भीतीने आमची वटवट कमी होई.

कंडक्टरला थळ आगार, सांगितलेले असे थळचा फाटा आला की बस मुख्य रस्त्यावरून आत वळे. उजवीकडे दत्तदेवळाची दत्ताची डोंगरी मागे टाकली की पुढे गेल्यावर डावीकडे तळं येई पुन्हा पुढे गेल्यावर बाजाराकडे जायचा रस्ता व आत देवीचे देऊळ! मग बरीच दोन्ही बाजूची वाड्या घरे मागे पडत. नंतर आलचं मामाचे घर. होळीवर उतरत असू. होळी म्हणजे दरवर्षीच्या रस्त्याच्या बाजूला होळी पेटवली जाई. म्हणून त्या जागेला म्हणायची पध्द्त होळीपाशी उभे आहेत तेथे उतरले आहेत वैगरे म्हणजे ती जागा होळीची असे. 

बस थांबताच आम्ही टुणकन उड्या मारून पळत घराकडे जात असू. आत जायची घाई असे. पण आजी व मावशी थांबून ठेवत. थांबा, “तांदूळ पाणी ओवाळायचे आहे!” लांबून प्रवास करून आल्याने बाहेरची बाधा होऊ नये म्हणून हा उपचार होऊन मगच घरात प्रवेश मिळे.

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खिडकी(कविता) – सुश्री समिधा गांधी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून  ?

☆ खिडकी(कविता) – सुश्री समिधा गांधी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अगं!!

ती खिडकी उघडून

केव्हा पाहिले होतेस

तुझ्या मालकीच्या

आकाशाच्या तुकड्याकडे?

 

तिथेच तर असणार आहे

कुठे हरवणार का आहे

असा विचार करून

त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस

 

अधूनमधून खिडकी उघडत जा

आकाशाला नीट न्याहाळत रहा

नसतील दिसत इंद्रधनूचे सप्तरंग

नसेलही कदाचित नक्षत्रांची रांगोळी

 

दिसेल झाकोळलेले नभ

कधी असेल कडक ऊन 

दिसणार नाही मुक्त उडणाऱ्या

पक्षांची लांबचलांब माला

 

तरीही खिडकी उघडायचे

कधीही थांबवू नको

ती मिळविण्यासाठी केलेला 

आटापिटा तू विसरू नको

 

तरच कदाचित तू तुझ्या

लेकीसुनांना त्यांच्या वाटचा

आभाळाचा तुकडा, नाही नाही

संपूर्ण आकाश मिळवून देशील

 

सुश्री समिधा गांधी

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आभार… ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ आभार…☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

काही शब्दच असे असतात की ते ऐकणार्‍याच्या मनावर जादु करतात. कुणी छोटसं काम केलं आणि पटकन् त्या व्यक्तीला “धन्यवाद” म्हणून कृतज्ञता व्यक्त केली की त्या आदान प्रदानात गोडवा राहतो.

या लाॅकडाउनच्या काळात माझ्यासारख्या वय झालेल्या महिलेला अनेकांनी मदत केली.कुणी किराणा आणून दिला ,कुणी फळे भाज्या ,किरकोळ औषधे,रोख  पैसे  …वजने उचलली ..एक ना अनेकप्रकारे सहायता केली. मी त्यांची नुसतीच आभारी नाही तर ऋणी आहे…

आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्यावर फार संकटे आली अथवा अशा काही समस्या  ऊभ्या राहिल्या असे सुदैवाने झाले नाही ..एक सुरक्षित अन् नाॅर्मलच आयुष्य जगले!!

पण हा लेख लिहीत असताना माझ्या मनात आले, संकट म्हणजे नक्की काय? त्याची व्याख्या काय?—–

तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे आणि तुमच्या जवळ प्यायला पाणी नाही, त्यावेळी कुणीतरी तुम्हाला त्याच्या जवळची पाण्याने भरलेली बाटली देउन तुमची तहान भागवतो तो क्षण सर्वोच्च कृतज्ञतेचाच असतो!

तुम्हाला त्वरेने कुठेतरी जायचे आहे आणि त्याच वेळी टॅक्सी रिक्षा बस वाल्यांचा संप आहे ,पण कुणी ओळखीचे अथवा अनोळखी तुम्हाला स्वत:च्या गाडीतून सोडतात तेव्हा त्या  उपकाराची परतफेड फक्त “धन्यवाद!!” या सर्वसमावेशक शब्दानेच होऊ शकते!!

संकट मोठं नसलं तरी मदतीची गरज कशी कशा स्वरुपात हे परिस्थिती ठरवते..

माझे प्रिय पपा गेले तेव्हां आम्ही जळगावला राहत होतो! मला खूप उशीरा कळवलं!  वेळेत ठाण्याला कसं पोहचायचं? मला पपांचं अंत्यदर्शन तरी मिळेल का? प्रचंड दु:खाने मी बुद्धीहीन झाले होते! दोघांनाही —मी आणि माझे पती —जाणं आवश्यक होतं! शिवाय माझ्या मिस्टरांना मला अशा अत्यंत भावनिक प्रसंगी एकटीलाच जाऊ द्यायचं नव्हतं..मग लहान मुलींना कुठे ठेवणार?

त्यावेळी आमचे जीवलग मित्र डाॅ. गुप्ता आणि अलका यांनी सर्वतोपरी मदत केली .अतिमहत्वाच्या कोट्यामधुन रेल्वेची तिकीटं आणून दिली. मुलींची जबाबदारी घेतली .माझी बॅगही भरण्यात मदत केली .स्टेशनवर सोडायला आले.त्यावेळी ए टी एम वगैरे नव्हतच!  पैशाचं एक पुडकंही त्यांनी माझ्या बॅगेत टाकलं! माझे पती त्यांना म्हणालेही “पैसे आहेत अरे…!””असु दे! लागतील..”

 प्रश्न पैशांचा नव्हता!!  त्यामागची भावना महत्वाची..

—-मैत्री, प्रेम, प्रसंगाचं गांभीर्य समजुन  दाखवलेलं औचित्य याचं मोल होऊच शकत नाही.. त्यासाठी धन्यवाद हे शब्दही  तोकडे आहेत!! 

अगदी अलीकडे दोन वर्षापूर्वी माझी गुडघेरोपणाची शस्त्रक्रिया झाली !आम्ही दोघच ! मुलं परदेशात .माणूसबळ नाहीच. शिवाय कुणाला कशाला त्रास द्यायचा? निभावुन नेऊ आपले आपणच!!– पण प्रत्यक्ष आॅपरेशनच्या दिवशी माझ्या नणंदेचा मुलगा सुन हजर..पुढची सगळी सुत्रं त्या दोघांनी हातात घेतली..माझी जाऊही सोबतीला आली. ही सगळी माझ्या प्रेमाची माणसं ऊत्स्फुर्तपणे आली ..माझ्या सेवेखातर.. सगळं सुरळीत पार पडलं. आज जेव्हां मी बिना वेदनेचं पाऊल ऊचलते तेव्हां या सर्वांच्या प्रेमाचंच बळ एकवटलेलं असतं!!—यांचे आभार कसे मानु? किती अपुरे आहेत शब्द!!

खरं सांगु? मला माझ्या आयुष्यांत असे हाक मारल्यावर धावणारे मित्र मैत्रीणी, प्रियजन, नातेवाईक लाभले,  म्हणून मी परमेश्वराचेच आभार मानते!!

ईश्वरचरणी मी माझी कृतज्ञता ,भावपूर्णतेने व्यक्त करते….!!!

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मदतीचा त्रास ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीचा त्रास ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

विशु आमची जवळची मैत्रीण.

स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.

गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा.

कोणतेही काम सांगा, हिच्याकडे,त्यावर माणसे,आणि उत्तर तयार असते.

बरं ,यात तिला मोठेपणाही नको असतो.

पण मदत करण्याची हौस— 

हसू येईल सांगितले तर,

पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.

कसे म्हणताय?

ऐका तर।

लेकाचे लग्न विशूने हौसेने केले. 

सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता.

सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच , विशूने, आपल्या हौसेने, घर अगदी मस्त लावून टाकले.

सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी.

झाले। एवढा खर्च, कष्ट करूनही  दोघीही नाराजच.

तरी विशूची जित्याची खोड जात नाही.

ती इतकी भाबडी आहे ना,की, समोरचा रागावूही शकत नाही.

सहज वीणा म्हणाली, बाई ग परवा केळवण करणार आहे, 10 माणसे यायची हेत. ,काही सुचत नाही बघ, काय मेनू करू,आणि कसे करू.

विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली. 

वीणा म्हणाली, अग हे काय,। मी आहे ना इथे,मला विचार की. पैसे मी देणारे ना.

आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते–

ते विशूच्या गावीही नव्हते.. हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत.

आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा.

भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.

 तिलाही फटके कमी नाही बसत,या स्वभावाचे.

कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली.

4 दिवसात मालकाचा हिलाच फोन। बाई कसला मुलगा दिलात–.गेला की काम सोडून।

विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय?  दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण  तिसऱ्या  तर कोण 5व्या मजल्यावर राहत्यात। पोराचे पाय दुखले,  दिली सोडून नोकरी “. 

विशू हतबुद्ध झाली, शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते.

विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले.

दोघे, भेटले, बोलले.

ती मुलगी विशूला म्हणाली,  “काकू, कसला मुलगा, सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू.”

बिचारी विशू.

तरीही, विशूची जित्याची खोड जाईना.–तिची मदतीची हौस भागेना,.–आणि मूळ स्वभाव बदलेना..

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चेक पोस्ट ड्युटी..शब्दांकन शीतल चव्हाण ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ चेक पोस्ट ड्युटी..शब्दांकन शीतल चव्हाण ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

(काळजाला हात घालणारा प्रसंग)

—-चेकपोस्ट अंकली…सोबत संजय जाधव सर… दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काय मनावर घेतलं कुणास ठाऊक?..पण दुसऱ्या दिवशी सगळ्याच गाड्यांची झडती घेतली… पण तेवढ्यात सुध्दा लोकं डोळा चुकवून सटकत होती,…आणि जी अडवली जात होती त्यांच्या हातात हमखास दवाखान्याची फाईल…म्हणजे गेल्या 5 वर्षात जेवढी सांगलीला दवाखान्यात गेली नसतील ना.. तेवढी ह्या लॉकडाउनच्या काळात दवाखान्यात गेली….कुठून कुठून…,कधीच्या अन कुणाच्या फाईली हुडकून काढल्या कुणास ठाऊक?

ह्याच गडबडीत एक तरुण मुलगा येऊन माझ्यासमोर उभा राहिला….साधारण वीस बावीस वर्षाचा असेल…त्याला वाटलं आम्ही सुध्दा पोलिसच आहोत की काय !…म्हणाला “साहेब, बहिणीकडे चाललोय,पलूसला…प्लिज ..जाऊ दे.” जाधव सरांनी विचारलं.. ,”का चाललाय?”..त्यावर त्यानं जे उत्तर दिलं त्यावर आम्ही दोघेही खूप हसलो… म्हणाला, ” ते बहिणीला सांडगं, पापड, कुरुड्या आणि चटणी द्यायला चाललोय, उन्हाळ्याचं.”…मी हसत हसतच त्याला खुळ्यात काढलं,.. म्हटलं “लेका तुला काय कळतंय का?.. इथं काय चाललंय?..दुनिया थांबलीय अक्की..अन तुला कुरुड्याचं पडलंय होय!!”.. तसा त्याचा चेहराच पडला..”नाही साहेब, तसं नाही.. खरं प्लिज मला जाऊ दे”… मी त्याला पोलिसांकडे जायला सांगितलं.” जा..त्यांची घे जा परवानगी”. त्यानं पोलिसालापण हीच विनवणी केली… पोलिसांनी देखील सुरुवातीला त्याला शिव्याच घातल्या.. आणि परत जायला सांगितलं…तसा तो त्यातल्या एका पोलिसाच्या पायाशीच वाकला,..आणि ढसाढसा रडायला लागला….”साहेब प्लिज, मला जाऊदे, … नाहीतर माझ्या बहिणीचं काही खरं नाही… प्लिज मला माझ्या बहिणीसाठी तरी सोडा,….मी येताना परत इथं थांबतो,… त्यावेळी मला काय शिक्षा द्यायची ते द्या.”…. त्याच्या एवढ्या विनवणीवर आम्ही सगळेजण अवाक झालो…. त्या पोलिसाने त्याला जवळ घेऊन विचारलं…,”असं का म्हणतोयस”..त्यावर त्यानं रडतच उत्तर दिलं,…”साहेब ,दरवर्षी बहिणीला इकडूनच सगळं द्यावं लागतं,.नाहीतर सासरची लोकं तिला खूप त्रास देतात ओ….यावर्षी हे उन्हाळ्याचं द्यायला  जरा उशीर झालाय तर दाजी तिला रोज फोडून काढा लागल्यात.” …. भयाण वास्तव… तो भाऊ आमच्यासमोर मांडत होता…. एका पोलीस मित्रानं त्याला सांगितलं….”अरे एक तारखेनंतर जा की लेका”.… तो नाही म्हणाला,..” कारण आज जर इथून परत गेलो तर घरात आई बाच्या जीवाला पण घोर लागेल… गेली महिनाभर त्या दोघांना सुध्दा बहीणीची खूप काळजी लागलीय….”

एक निवृत्तीला झुकलेले पोलीस काका होते…. त्यांच्या डोळ्यांत मात्र टचकन पाणी आलं…. बहुधा त्यांनाही एखादी लेक असावी… कारण त्या पोलिसाच्या वेशात भावुक झालेला बाप मला स्पष्ट दिसत होता…. सगळे पोलीस बंधू भगिनी, आम्ही क्षणभर शांत झालो होतो…. एरव्ही निर्ढावलेल्या चेहऱ्याच्या सर्व पोलिसांच्या डोळ्यांत पाणी साचलं होतं.… अन माझ्या साठलं होतं…. त्या पोलीस काकांनी त्याला स्वतःच्या गाडीवर बसवलं.. आणि म्हणाले..”चल, माझ्याबरोबर.. आपण दोघे मिळून तुझ्या बहिणीला हे सगळं देऊन येऊ.”….परत त्याला भीती.. पोलिसाला बघितल्यावर सासरची खवळतील अन परत बहिणीबाबत काही विपरीत घडायला नको…. म्हणून त्याने परत हात जोडून एकट्यालाच जाऊ द्यायची विनवणी केली….त्या पोलीस काकांनी त्याला धीर दिला.. “अरे मी समोर येणार नाही.. तू बाहेरच्या बाहेर दे आणि ये.. मी थांबतो अलीकडच्या चौकात.”..…एवढं ऐकल्यावर त्या मुलाने पोलीस काकांना घट्ट मिठीच मारली अन ओक्साबोक्शी रडू लागला……पोलीस काकांनी त्याला धीर देत गाडीवर पाठीमागे बसवलं.. त्या पिशव्या ,डबा ,,बरणी घेऊन तो पोलिसाच्या गाडीवर बसला आणि गाडी स्टार्ट झाली.. नजरेआड होईपर्यंत मी आणि जाधव सर त्या गाडीकडे पाहत होतो.. अगदी भरल्या डोळ्याने… पोलीस वेशातील एक बाप चालला होता.. ..एका लेकीकडे…..आणि एक भाऊ चालला होता एका बहिणीकडे…..फक्त नी फक्त तिचे अश्रू पुसण्यासाठी……

आज परत माझ्या मनात असंख्य प्रश्न काहूर माजवून गेले…..त्रास देवून गेले… ..तरीही आजूबाजूला अशी परमेश्वराची रूपं पाहायला मिळाली अन मी भानावर आलो….. आज परत मला कळेना कुणाला परमेश्वर म्हणू?….त्या भावाला?….त्या बहिणीला?….की त्या पोलीस काकांना?…..पण  तो आहे एवढं मात्र नक्की.. कोणत्या ना कोणत्या रुपात तो तुम्हाला भेटावयास येतो… कदाचित आज देखील …

खरं सांगू… परमेश्वराने आपल्याला ” माणूस ” या पदावर पोस्टिंग केलंय.. पण आपण आपली पोस्ट विसरत चाललोय ….तसं विसरून नाही जमणार…. ती सतत चेक करावी लागेल आपल्याला…आपली माणूस ही पोस्ट… कदाचित ह्यालाच चेकपोस्ट म्हणतात बहुतेक…. . आज खऱ्या अर्थाने मी चेकपोस्टवर ड्युटीला होतो….. 

 थेट चेकपोस्टवरून…  

शब्दांकन… शीतल चव्हाण, जयसिंगपूर 

संग्राहक – श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? मनमंजुषेतून ? 

☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆  

आम्ही रहात होतो तेथेही स्वातंत्र्य चळवळीने भारावलेले काही तरुण तरुणी रहात होते. जवळच सेवादलाची शाखा होती. सर्व लहान मुलांना तेथे गोळा करून गाणी गोष्टी सांगितल्या जात. साने गुरुजींची, त्यांच्या विचारांची ही सेवादल शाखा होती. अनेक मैदानी खेळ इथे खेळायला मिळत. झेंडावंदन, देशभक्तीची गाणी शिकवली जात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेवादलाच्या शाखा हळूहळू बंद पडल्या. पण साने गुरुजींच्या विचाराप्रमाणे, ध्येयाप्रमाणे कार्य मात्र सुरू राहिले.

माझ्या लग्नानंतर एकदा घराच्या माळ्यावर सूतकताईचा चरखा दिसला. मी चौकशी केली तेव्हा समजले, तो माझ्या मिस्टरांचा, ‘माधव नारायण कुलकर्णी’ यांचा होता. ते सेवादलाचे कार्यकर्ते होते. साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी कोल्हापुरात राष्ट्रसेवादलाचे शाखा प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम केले होते. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची ते एक आठवण सांगत. ध्वजारोहण कसे करावे, वंदेमातरम म्हणायला शिकवणे, तिरंगा हवेत लहरत ठेवण्याचे नियम शिकवणे वगैरे गोष्टींची माहिती लोकांना देण्याकरिता हे सेवादलाचे कार्यकर्ते गावागावातून जात. त्यात श्री. राम मुंगळे, श्री. बाबासाहेब बागवान, श्री.यमकनमर्ढे वगैरे मित्र असत. सेवादलाची गाणीही गायला शिकवले जाई. नंतरही बरीच वर्षे हे सर्व मित्र (‘ह्यांच्या सांगण्याप्रमाणे जवळजवळ पन्नास वर्षे) महिन्यातून एकदा एकत्र येत. स्थळ होतं, श्री. मोहनराव लाटकर यांचे ‘ओपल हॉटेल!’ त्यात श्री. चंद्रकांत पाटगावकर, बाबुराव मुळीक,इ. होते. हे सर्व श्री. एस्. एम्. जोशी, श्री. नानासाहेब गोरे, श्री. यदुनाथ थत्ते, श्री. आजगावकर आणि साधना परिवाराशी जोडलेले होते. देशभक्तीने भारावलेले हे प्रामाणिक कार्यकर्ते! बरेचसे प्रसिध्दी पराङमुख!! बाबुराव यमकनमर्ढे यांनी तर त्या काळात कोकणात जाऊन शाळा सुरु केली.

बालवयात ऐकले होते, स्वातंत्र्य मिळाले, चांगले दिवस येतील. लहानपणी काही दिवस रेशनवर धान्य मिळे. मिलो (तांबडा जोंधळा)मका, बटाट्याचे चौकोनी तुकडे… कापड सुध्दा रेशनवर मिळे. चीटाचे  कापड म्हणत. . याचेच कपडे शिवले जात. फ्रॉक, परकर-पोलकी, गल्लीतल्या सर्व मुलींची सारखी! आम्हाला गंमत वाटे!! गोर गरीब, सामान्य, श्रीमंत, सुस्थितीतील लोकांनाही तेच कपडे घालावे लागत. त्यावेळी साथीचे रोग होते. प्लेग, कॉलरा, टी. बी., देवी, इ. पालक चिंतेत असत. दंगलीही होत. सामाजिक वातावरण काहीसं असुरक्षित वाटे. तरीही शेजारी एकमेकांना मदत करत. लपंडाव, सागरगोटे, आंधळी कोशिंबीर असे अनेक देशी खेळ खेळण्यात मुलांना आनंद मिळे. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके यांच्या वाचनाने विचार आणि जीवन समृद्ध होत असे.

आज विचार केला तर? अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आहोत. तरी शेतकरी काळजी मुक्त नाही. कपडे, फळे, धान्य मुबलक आहे. अद्ययावत साधने, विज्ञान-तंत्रज्ञान यामुळे  सुधारणा झालेली आहे. परंतु संकटांचा ससेमिरा तसाच आहे. कोरोनाची महामारी, महापूरासारखी आस्मानी संकटे त्यात भर घालत आहेत. कोविड जीवाणूंचे नवीन प्रकार पाय पसरत आहेत. शासन व्यवस्था करत आहे. पण गरज आहे मनोबलाची, स्वच्छतेची, शिस्तीची! गरज आहे विश्वासाने एकमेकांना समजून देण्याची!! लहानथोरांना आधार देण्याची!! स्वतंत्र भारताची, स्वातंत्र्य देवीची ही मागणी, ही इच्छा आपण सर्वांनी मिळून एकजूटीने, निष्ठेने पूर्ण करायची आहे.

वंदेमातरम !!

© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

फोन नंबर : 0738768883

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्रांतिकारकांचे आईस (भारतमातेस) पत्र ☆ श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ? 

☆ क्रांतिकारकांचे आईस (भारतमातेस) पत्र ☆ श्री विजय गावडे ☆  

प्रिय भारत मातेस
कृ. सा. न. वि. वि.

आई तूझी आठवण येते. आई तुझी खूप खूप आठवण येते.

काळ कसा भरभर पुढे सरकला, कळलंच नाही बघ. हा हा म्हणता तू स्वतंत्र होऊन पंच्यात्तर वर्षें उलटली सुद्धा.  तुझ्यावर जीव ओवाळून टाकतानाचा तो क्षण आठवला तरी नसलेल्या शरीरावर आजही रोमांच उभे राहतात.

सिंहावलोकन करतांना कधी कधी आई असं वाटतं की स्वातंत्र्य लढ्यात आम्ही दिलेली आमच्या प्राणांची आहुती, हि चूक तर नव्हती ना आमच्या हातुन घडलेली.

आम्ही तर जागेपणी हि तुझ्या अखंड अस्तित्वाची स्वप्ने पाहिलेली.  आसेतू हिमालय असलेली तुझी अखंड मूर्ती आम्ही आमच्या हृदयात साठविलेली. मात्र स्वातंत्र्य  मिळताच जे घडलं ते अत्यन्त क्लेशकारक होतं. आमच्या मातृभूचे तुकडे झालेले पाहून आमचा भ्रमनिरास झालेला. तुच्छ राजकीय अभिलाषा तुला एवढं दुःख आणि वेदना देईल यावर विश्वासच नव्हता बसत.

असो. जे झालं ते झालं. तुझ्यावर राज्य करणारे आमचे बांधव तुझा आत्मसन्मान तुला पुनः मिळवून देतील अशी आशा आहे.
तेवढं सर्व राजा रजवाड्यांच्या रियसतींचं तुझ्यात झालेलं विलीनकरण सोडलं तर काहीच आमच्या मनासारखं होत नव्हतं. कित्येक वेळा तर परकीयांच्या जागी आता आपल्याच लोकांशी संघर्ष करावा लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहून आमचे सर्वांचे आत्मे तडफडत होते.

पण ईश्वरेच्छा बलियसी या न्यायाने तुझ्या उज्वल भवितव्याकडे सुरु असलेल्या वाटचालीकडे आमचे डोळे लागून राहिले आहेत. तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुला विश्वगुरूचा मान मिळो हिच आम्हा सर्वांची मनोमन प्रार्थना.  येवू घातलेल्या पंच्यात्तरि पुढे शम्भर, सव्वाशे, दीडशे……… हजार……..अशी अनन्त काळ पर्यंत तुझी स्वतंत्रज्योत तेवत राहो हिच तुझ्या सर्व लेकरांची शुभेच्छा!

तुझेच लाडके सुपुत्र क्रांतिकारी
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वासुदेव बळवन्त फडके…………….. ई.

© श्री विजय गावडे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग पहिला ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? मनमंजुषेतून ? 

☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग पहिला ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆  

पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस! आपल्या देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन!! त्यावेळी आम्ही पाचवी- सहावीत शिकत असू. शहरात सगळीकडे उत्साही वातावरण होते.. तसेच शाळेतही होते. एखाद्या सणाप्रमाणे आम्ही चांगले कपडे घालून, नटूनथटून शाळेत गेलो होतो. त्यावेळी शाळेचा विशिष्ट असा युनिफॉर्म नव्हता. शाळा रंगीबेरंगी पताका लावून सजवली होती. पंटागणात रांगोळी काढली होती. कोणी मोठे पाहुणे येणार असावेत! वातावरण स्वच्छ, सुंदर, आनंदी होते. मैदानावर रांगेत आम्ही सर्व मुले-मुली ऊभे होतो. शाळा सुरु होण्यापूर्वी रोज प्रार्थना असे. त्यादिवशी स्वतंत्र भारताचा

‘तिरंगा’ उंच फडकाविला गेला. ‘ वंदे मातरम’ गायले गेले, ‘राष्ट्रगीत’ झाले. ‘भारत माता की जय’ घोषणा दिली गेली. आम्ही सर्व मुले खूप जोरात मोठ्या अभिमानाने ‘जय’ म्हणत असू. आम्हाला सर्वांना गोड खाऊ वाटला गेला. आम्ही मुले स्वतंत्र भारताचे उद्याचे भविष्य आहे, असे काहीसे पाहुण्यांचे भाषण झाले. त्यांनी खूप काही सांगितले. ते म. गांधी, पं. नेहरु, सुभाषचंद्र बोस अशा अनेक थोर नेत्यांबद्दल बोलले. आम्हाला ‘देश स्वतंत्र झाला’; एवढे फक्त कळले. आता भारत देशाला, आपल्याला चांगले दिवस येणार. तो खूप आनंदी दिवस होता.

आमच्या घरात भिंतीवर एक फोटो फ्रेम होती. सुंदर रंगीत चित्र! भारताच्या नकाशाचे!! एका बाजूला गांधी, नेहरु, सुभाषचंद्र असे बऱ्याच पुढाऱ्यांचे चेहरे. दुसऱ्या बाजूला भारतातून ब्रिटिश शिपाई बाहेर पडत आहेत असे दाखवले होते. तसेच भारतीय लोकांची खूप मोठी रांग, जी संपूर्ण नकाशावर होती. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज! हे चित्र मनावर कोरले गेले. खाली लिहिले होते. . . ” छोडो भारत”, “Quit India”. त्यावेळी त्या चित्राचा अर्थ फारसा लक्षात येत नसे. पुढे शाळेत इतिहासाच्या अभ्यासात; तसेच गोष्टी वाचनातून समजत गेले, तसे सर्व गोष्टींचे महत्त्व कळत गेले.

शालेय जीवनात  माझ्या हातात एक पुस्तक आले. माझा चुलतभाऊ नाना ( चंद्रकांत ) याने ते मला भेट म्हणून दिले. मुखपृष्ठावर कॅप्टन लक्ष्मीचे लष्करी पोषाखातील आकर्षक रंगीत चित्र, बाजूला लष्करी पोषाखातील महिला. नाना आम्हां भावंडांपेक्षा वयाने बरेच मोठे होते. माझ्या आठवणीप्रमाणे ते ब्रिटिश काळात जेलर म्हणून नोकरीस होते. देशभक्त कैदी लोकांचे हाल त्यांना सहन होत नसत. म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली होती. आमच्या बालमनावर नकळत संस्कार होत गेले. आम्ही बघत होतो, ऐकत होतो, घडत होतो.

आम्ही असे मोठे होत गेलो. वाचन वाढले. संदर्भ लक्षात यायला लागले. ऑगस्ट महिन्यात अनेक सण येतात.पारंपारिक सणांशिवाय सर्व भारतीयांचे आनंदाचे सण, अभिमानाचे दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांतीदिन आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन!

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसची चळवळ हे जनतेने केलेले तीव्र आंदोलन होते. इ. स. २०२१ साली या चळवळीला  एकोणऐंशी वर्षे, २०२२ साली ऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत ज्या मैदानात या आंदोलनाला सुरुवात झाली त्या मैदानाला ‘ऑगस्ट क्रांतीदिन मैदान’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रपिता म. गांधीजींनी ‘भारत छोडो’ हा अंतिम इशारा दिला. संपूर्ण देशातील अनेक लोक तरुण पिढी या आंदोलनात सहभागी झाली होती. प्रत्येक व्यक्ती जणू नेता बनली होती. ब्रिटिश सरकारने एक दिवस आधीच म. गांधी आणि प्रमुख पुढाऱ्यांना कैद करुन बंदी केले होते. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या सभेत ह्या आंदोलनाचा निर्णय झाला होता. अरुणा असफअली ही शूर धाडसी तरुणी पकडली गेली नाही. ९  ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबईच्या ‘ गवालिया टॅंक मैदानात’ ‘तिरंगा ध्वज’ फडकविला गेला आणि ‘भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात झाली.

क्रमशः…………

© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

फोन नंबर : 0738768883

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हातारी ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ म्हातारी ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

लहान मुलांना आपण शेकडो गोष्टी सांगतो. साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून सात-आठ वर्षांची होईपर्यंत सगळी मुलं गोष्टींमध्ये मनांपासून रमतात. या गोष्टींमधून मुलांचं स्वतःचं एक भावनिक, आभासी विश्व तयार होत असतं. त्यात राजा असतो, राणी असते, राजकन्या असते, म्हातारी असते, लबाड कोल्हा असतो आणि एक भला मोठा भोपळा सुद्धा असतो. ही सर्व मंडळी मुलांच्या लेखी खरोखरच अस्तित्वात असतात!आजी-आजोबा हा गोष्टी मिळवण्याचा मुख्य स्रोत! त्यानंतर रात्री गोष्टी ऐकत ऐकत झोपण्यासाठी आई लागते. बाबा लागतात.

या गोष्टीतल्या पात्रांमधल्या “म्हातारी” या पात्राबद्दल मला विलक्षण कुतूहल आहे! वेगवेगळ्या गोष्टींतून ही म्हातारी येते. गोष्टी निरनिराळ्या असल्या, तरी मला म्हातारी नेहमी एकाच रूपातली दिसते. पांढरे शुभ्र केस, तोंडाचं बोळकं, बारिकशी कुडी, कमरेत वाकलेली, हातातली काठी टेकत टेकत तुरुतुरु चालणारी! डोक्यानं तल्लख! “एक होती म्हातारी” हे वाक्य ऐकलं की माझ्या डोळ्यासमोर म्हातारीचं हेच चित्र उभं रहातं. म्हातारी आणि भोपळा यांचं नातं अतूट आहे. कुठल्याही मराठी माणसानं म्हातारीची ही विलक्षण कथा ऐकलेली नसेल, हे तर संभवतच नाही! पूर्वी कितीही वेळा ऐकलेली असली, तरी मुलं ही माहीत असलेली गोष्टच पुन्हा पुन्हा सांगायला लावतात! ती म्हातारी, तिची लेक, वाघोबा-कोल्होबा, शिरा-पुरी, तूप-साखर, लठ्ठलठ्ठ होण्याचं खोटं आश्वासन, भला मोठा भोपळा, आणि “म्हातारी बितारी मला नाही ठाऊक –  चल रे भोपळ्या टुण्णुक टुण्णुक” असं म्हणत वाघोबा-कोल्होबाचा पार मामा करून टाकणं — हे सगळं ऐकतांना गुदगुल्या झाल्यासारखी खिदळणारी पोरं पाहायला मला आवडतात!! या गोष्टीचा शेवट दोन प्रकारांनी सांगितला जातो. पहिल्या प्रकारात वाघोबा-कोल्होबाच्या हातावर तुरी देऊन भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणून पोचवतो, असा शेवट केला आहे. दुसऱ्या प्रकारात, म्हातारी राखेच्या ढिगाऱ्यावर झोपते, मग वाघ तिला खायला येतो, आणि मग म्हातारी जोरात *???? फुस्स्स्स्!! राख उडते आणि वाघाच्या डोळ्यांत जाते. डोळ्यात राख गेल्यामुळे वाघ डोळे चोळत बसतो आणि भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणतो, असा शेवट केला आहे. मला दुसरा प्रकार ऐकायला खूप आवडायचा! आणि इतर बच्चे कंपनीला सुद्धा! पण एकूणच या म्हातारीने बालवाङ्मयात अढळपद मिळवलं!!!

म्हातारीची इतर रूप पाहतांना देखिल मला मजा वाटते. सांवरीच्या झाडाची, चवरीच्या आकाराची, पांढऱ्या तंतुंची, बुडाला हलकसं बियाणं चिकटलेली, हवेवर तरंगत तरंगत जाणारी म्हातारी पाहायला मला आवडते! सावरीची म्हणजेच शेवरीची शेंग तडकली, की अशा शेकडो म्हाताऱ्या एकदम हवेवर तरंगायला लागतात. त्यांच्या हातात हात घालून मला पण तरंगल्याचा भास होतो! (शेवरीची म्हातारी म्हटल्यावर आचार्य अत्रे यांची आठवण येणे अपरिहार्य आहे!)

सुकं खोबरं किसतांना शेवटी किसला न जाणारा असा चिवट पापुद्रा शिल्लक राहतो. त्याला म्हातारी हे नांव कां पडलं असावं, हे मला एक कोडं आहे. बहुधा मरू घातलेल्या, पण चिवटपणे जिवंत राहून आप्तेष्टांच्या पदरी गाढ निराशा टाकणाऱ्या म्हातारीचा ‘चिवटपणा’ हा गुण या पापुद्र्याला चिकटला असावा आणि हे नामाभिधान त्याला प्राप्त झालं असावं!

साखरेच्या गुलाबी रंगाच्या तंतुंच्या काडीभोवती गुंडाळलेल्या कापसाच्या गठ्ठ्याला म्हातारीचे केस असं कां म्हणतात, हे सुद्धा मला एक कोडंच आहे. आजकाल बऱ्याच खऱ्याखुऱ्या म्हाताऱ्या, मेंदी लावून आपले केस लाल-भगवे करून घेतात. खरं म्हणजे त्यांना म्हातारपणांत सुद्धा गुलाबी रंगाचं वावडं नसावं! म्हातारीचे गुलाबी साखरेचे केस विकणारे, हातात एक हळुवारपणे किणकिणणारी घंटा घेऊन केस विकायला येतात. त्यांच्याकडे गुलाबी रंग मिळू शकेल हे या खऱ्या म्हातार्‍यांना कुणीतरी सांगायला हवं! कदाचित तो म्हातारीचे केस विकणारा, खऱ्या म्हाताऱ्यांच्या खऱ्या केसांना सुद्धा गुलाबी रंग लावून देईल!

पावसाळ्यात गडगडाट झाला, की आकाशातली पीठ दळणारी म्हातारी केवढी असेल, तिचं ते धान्य दळायचं जातं केवढं मोठं असेल, असं कुतुहल लहानपणी वाटायचं! आकाशातून सरसरत खाली पडणाऱ्या पिठाचा पाऊस कसा होतो, हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीतच आहे. पण त्या लहान वयात सगळं खरं खरं वाटायचं!!

म्हातारीच्या टोपलीतली बोरं चोरणाऱ्या कोल्होबाची गोष्ट तर आबालवृद्धांना अतिशय प्रिय! या कोल्होबाला अद्दल घडवायला म्हातारी होते  सज्ज! हुशारच ती!! सणसणीत तापवून, लालबुंद केलेला तवा ती टोपली जवळ ठेवते. आपल्याला बसायला म्हातारीने रंगीत पाट ठेवलाय्, म्हणून कोल्होबा खुश्. ते त्या रसरशीत तव्यावर जरा बुड टेकून बसतात मात्र … आणि??? आणि हाहा:कार!!! कोल्होबा जीव घेऊन पळ काढतात. म्हातारीची हसून हसून पुरेवाट होते. जळके कुल्ले सांभाळत पळणाऱ्या कोल्होबाला म्हातारी खिजवून प्रश्न विचारते …

शहरी भाषेत

कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?

नको नको म्हाताऱ्ये, खोड मोडली!!

ग्रामीण भाषेत

कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?

नको नको म्हाताऱ्ये, * भाजली !!

तर अशी ही म्हातारी! लहान मुलांच्या गोष्टींतून, लोकवाङ्मयातून दिसणारी. ती डोक्याने तल्लख आहे, चटपटीत आहे, युक्तीबाज आहे, विनोदी आहे! ती लहान मुलांच्यात रमते आणि मुलं तिच्यात रमतात. मुलांच्या भावविश्वात तिचं स्थान अढळ आहे आणि म्हणूनच …

ही म्हातारी अमर आहे!

?  ?

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यक्तिचित्रण- बाई रामचंद्र सिंदकर ☆ डॉ दिपाली घाडगे

? मनमंजुषेतून ?

☆ बाई रामचंद्र सिंदकर ☆ डॉ दिपाली घाडगे ☆ 

व्यक्तिचित्रण – बाई रामचंद्र सिंदकर

जन्म-१९३२.        

वय वर्ष -८७

बाई म्हणजे माझ्या सासूबाई, दहाबारा दिवसांपूर्वी त्यांचे देहावसन झाले.मला अखंड कुतूहल वाटायचे त्यांच्या नावाबद्दल, व्यक्तिमत्वा बद्दल आणि एवढ्या दीर्घायुष्याबद्दल.

इथे माझ्या सासऱ्यांचा उल्लेख केलाच पाहिजे ‘ कै नारायण घाडगे ‘ सहा फुटांपेक्षा जास्त उंची, गौर वर्ण आणि चेहऱ्यावर कायम एक प्रसन्न,समंजस हास्य,कुठल्याही मदतीला सदैव तत्पर व्यक्तिमत्व. मी सुरुवातीला त्यांना पाहिलं ते लाल रंगाचा स्वेटर घालून घराजवळच्या बागेत बंबासाठी लाकडे फोडताना. त्या

पोशाखात त्यांचे व्यक्तिमत्व अगदी एखाद्या इंग्रजी पिक्चर मधील कलाकारासारखे दिसत होते.

याच्या अगदी विरुध्द बाईंचे व्यक्तित्व. ठेंगणाठुसका बांधा, सावळा नाहीच काळ्याकडे झुकणारा वर्ण आणि नाकीडोळी मात्र ठसठशीतपणा,कपाळावर मोठे कुंकु आणि चेहऱ्यावर आत्म प्रौढी मिरवणारे दिमाखदार हास्य.त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा स्वभाव प्रतीत व्हायचा.अखंड स्वत:च्या तालात असणारे व्यक्तित्व.जणू तो अहंकार त्यांच्या

शरीरालाच चिकटलेला होता आणि तो शेवटपर्यंत तसाच राहिला.

त्याच्याकडे प्रचंड बुध्दीमत्ता होती, नेतृत्वगुण होते शिवाय ज्ञानप्राप्तीची आवड होती,त्यामुळे सतत सल्ला विचारण्यासाठी माणसे येत असत.कधीही फक्त स्वतः च्या कुटुंबाचा विचार करायचा नाही, आपल्या मुलांबरीबरचं त्यांच्या मित्रांनाही खाऊपिऊ घालायाचे.त्या काळी एस टी मध्ये काम करणाऱ्या माणसाचे उत्पन्न ते किती असायचे,पण त्यातूनही सतत परोपकार करत राहायचे.आपली पाच मुलं जशी तशी ती सुध्दा आपलीच मुलं मानायच्या आणि त्यांना शिकण्या साठी सक्रिय प्रोत्साहन द्यायच्या.

त्याची पाचही मुले उच्च शिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणारी.त्या  स्वतः साठ वर्षांपूर्वीच्या म्याट्रिक आणि माझे सासरे संस्कृत मध्ये एम ए होते.(कै नारायण घाडगे विट्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेतील सुरुवातीच्या शिक्षकांपैकी एक होते) त्यामुळे दोघांनाही शिक्षणाविषयी आस्था होती.त्याची मुले माझे मोठे दिर श्री अविनाश घाडगे मुख्याध्यापक म्हणुन निवृत्त झाले, श्री दिनेश घाडगे विट्यातील शिवसेनेचे संस्थापक, श्री सुरेश घाडगे सोलापूर ट्रेनिंग सेंटर येथे DYSP म्हणुन कार्यरत, कै अधिवक्ता सतीश घाडगे प्रथितयश वकील, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे तालुक प्रमुख होते आणि कै राजेश घाडगे यशस्वी वेट लिफ्टर होते.

या सर्वांबरोबर श्री लालासाहेब पवार आणि श्री अरुण फडतरे हे त्यांचे मानसपुत्र देखिल उच्चशिक्षित झाले. पवार सरांनी शेवटपर्यंत त्यांची सेवा केली, त्यांचा कोणताही शब्द डावलला नाही.

बाईंचे माहेर वाई. अागदी नदीकाठालगत ब्राम्हणपुरी मध्ये. त्यामुळे शुद्ध सडेतोड भाषा, ओचा पदर खोचलेली नऊवार साडी आणि आंबाड्यावर खोचलेले एखादे फूल नेहमीच त्यांना शोभून दिसत असे. त्यांचे माहेर देखिल सुशिक्षितच. वडिल शिक्षक होते आणि भाऊ मामलेदार, आई मात्र लहानपणीच वारलेली मग कर्तेपणाने लहान बहिणींची लग्ने बाई भावजींनीच करुन दिली. त्यामुळे सारेच सासऱ्यांना भावोजी म्हणू लागले.

बाई आपल्या वडिलांकडून काही औषध देण्यास शिकल्या होत्या. त्यामुळे काविळीचे  औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे बरेच लोक येत. त्या देखिल सकाळी सकाळी ओचा पदर खोचून, आजूबाजूला फिरून काही वनस्पती गोळा करत आणि त्या वाटून रस काढून पिण्यास देत, वरुन काही पथ्य सांगत.त्यामुळे मी डॉक्टर असले तरी सुरुवातीला आमच्याकडे येणारे रुग्ण बाईंकडून औषध घेण्यासाठी येत.

अशी ही कृष्णा काठची लेक घाडगेवाडी सारख्या दुष्काळी गावात आली आणि त्या गावची होतकरू व्यक्ती झाली.

तिथली खडकाळ शेती विट्यातील मैत्रिणींना बरोबर घेऊन केली.

या कृष्णा काठच्यां लेकीचे सासरीही तसेच लाड झाले, शिकलेली ज्ञानी म्हणुन. अगदी तिच्या थोरल्या जावेणे, म्हाताऱ्याआईने, इंदुला सिनेमा बघायला आवडते म्हणुन

आपल्या दिराला बैलगाडी जुंपायला सांगावे आणि ती परत येईपर्यंत भाकरी कालवण करुन ठेवावे.

पोथ्या, पुराणे, पचांग जाणत असल्या तरी बाई विचाराने पुरोगामी होत्या. रोजचे वर्तमान पत्र वाचणे आणि टीव्ही वरच्या बातम्या पाहणे हे त्यांचे शेवटच्या पाचसहा वर्षां पूर्वीपर्यंत चे छंद होते. आपल्या मुला, नातवंडांनी आपल्या मर्जीने केलेली लग्न त्यांनी स्वीकारली होती.

आम्हा सुनांच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वभावानुसार फार लावून घेतले नाही, पण आमच्या शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाला कधी बाधा आणली नाही. माझ्या मोठ्या जाऊबाईंच BA Bed, नंतरच्या BSc,नंतर MSc Bed   आणि माझे BAMS  या साऱ्या पदव्या लग्नानंतर घेतल्या गेल्या आहेत आणि आम्ही साऱ्याजणी स्वतः चा पायावर उभ्या आहोत, यातच सारे काही आले.

बाईंच्या नातसूनांनीही ही परंपरा पुढे चालवली. सौ कविता MA Bed, सौ  अमृता Phd,. सौ अनुजा ME, त्याचबरोबर त्यांची सारी नातवंडेही उच्च शिक्षित असून विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नातावंडाला दिलेले वेगवेगळे नाव बाळक्या,गुंड्या,पप्या ही त्यापैकी काही. सगळ्यात लहान नात म्हणजे माझी मुलगी.तिला त्या नेहमी आवडे या नावानेच हाक मारत. असा बाईंच्या वारसांचा वटवृक्ष विस्तारला आहे. एक सुफळ संपुर्ण आयुष्य त्यांना लाभले.

सारं आयुष्य भरल्या घरात, खूप माणसं अवतीभोवती असं गेलं त्यामुळे थोडथोडक काही करायचं माहीतच नाही, जे केलं जायचं ते अगदी डबे भरभरून असायचं.भाकरी चपाती बरोबर पुरणाची पोळीही पोळपाट भरुन लाटली जायची, त्यामुळे आयुष्याच्या शेवटी जेव्हा नवरा, आणि दोन तरुण मुलं यांचं जाणं बघावं लागलं, घरातली माणसं कमी झाली तसा स्वभाव अधिक दुराग्रही झाला. तरी त्यांची जीवनेच्छा जबरदस्त होती आणि त्यांच्याजवळ वर्तमान काळात जगण्याची हातोटी होती.

बरीच वर्षे मला कोडे पडले होते त्यांना बाई का म्हणत असावेत आणि विशेष म्हणजे त्यांना बाई म्हटलेले आवडायचे, आपल्या परतवंडांना ही त्या स्वतः ला बाई म्हणायला शिकवत, तसे त्यांचे नाव इंदिरा ठेवले होते.

नंतर मी कोठेतरी वाचले की महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वी घरातली मोठ्या मुलीला बाई म्हणायची पद्धत होती, जसं ताई, अक्का तसं बाई. म्हणजे बाई हे त्यांचे माहेरचे नाव होते आणि म्हणुनच त्यांना बाई म्हटलेले आवडायचे.

© डॉ दिपाली घाडगे

विटा

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print