मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ आठवणींचा त्रिपूर ! ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आज त्रिपुरी पोर्णिमा! दसरा दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते. त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो ! तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो.लहानपणी त्रिपुर पहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू!

वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून  गेलेली दिसत असे. गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दिप माळा मी खूप पाहिल्या.

पण… माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला! सासुबाई  सांगत, ‘समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला! त्याकाळी जन्मवेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण ह्यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! आणि लग्नानंतर तारखे पेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला ह्यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात प्रकाश भावजींचा पुढाकार असे. मग मुले आणि आम्ही सर्वजण पणत्या , मेणबत्या घेऊन त्रिपुर लावण्यात मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या स्निग्ध प्रकाशाने उजळून गेलेले पहाण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे. शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या  तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे नीरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खुपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस शालीत गुरफटून  घेत डिसेंबर ,जानेवारी येतात, पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचे 70 त्रिपूर पूर्ण झाले! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो,असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे यांना आयुष्यभर मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरद: शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले

download.jpg

☆ मनमंजुषेतून ☆ भक्तीची आस ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

भक्ती संप्रदायाचा इतिहास जेव्हां वाचनात आला तेंव्हा साहित्याचे मुकुटमणी, संतांचे गुरु ज्ञानेश्वर यांना माऊली कां संबोधतात याची जाणीव झाली. भागवतधर्म म्हणजे काय? शैव व विष्णुरूपी पांडुरंग जो सर्व जातीपातीच्या, उच्चनीच, श्रीमंत, गरीब, विद्वान, सामान्य, सर्वांना एकाछत्राखाली सामावून घेतो.तो साक्षात ईश्वर संतांचा मायबाप, प्रसंगी, दिनांचा कनवाळू विठोबाराया!

आषाढी, कार्तिकीचे महत्व पूर्वापार चालत आले आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी पालख्या घेऊन पंढरपुरला जातात. वर्षाचे बारामहिने एकादशी असतेच, पण या दोन एकादशीना विशेष महत्व आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या सुमारास सूर्याचे दक्षिणायन असल्याने, देवांची रात्र सुरु होते. इथून पुढचे चार महिने चातुर्मास सुरु होतो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आहे.

उदा.कामिका,पुत्रदा,पाशांकुशा,षट्तिला,स्मार्त,भागवत,परिवर्तिनी,इंदिरा,रमा,प्रबोधिनी,मोक्षदा,सफला, आमलकी,वरूथिनी,मोहिनी,पापमोचीनी,निर्जला,योगिनी अशी नावे आहेत.

एकादशी म्हणजे विष्णूचे व्रत.आषाढी,कार्तिकीला पंढरपुरच्या विठोबाचे महत्व! पुंडलिकाची गोष्ट लहानपणी ऐकलेली,वाचलेली होती.पण प्रत्यक्ष पंढरपूर,तेथील मंदिर पाहण्याचा योग सासरघरी आल्यावरच  आला.नाहीतर एकाद्शी दिवशी उपवास करायचा फराळाचे पदार्थ खायचे एवढेच करायचो.

वयाबरोबर जाणतेपण येते,तसे मन प्रगल्भ होते आणि मग इतर गोष्टींची जाण येते. सासरघरचे वातावरण धार्मिक होते.दरवर्षी सासूबाई आळंदीला प्रस्थानाला जात.एकदा पुण्याला पालखी सोहळा पाहिला  होता. शाळेतल्या क्रमिक पुस्तकात संतांची अभंगवाणी समाविष्ट असे.त्यातून जी काही थोडी  बहुत तोंडओळख या ईश्वरभक्तीशी झाली तेवढीच! पण मनातून ईश्वरभक्तीच्या ओढीचे प्रेम जागृत व्हायला आवधीच लागला.

एकदा आमचेकडे,सासूबाईंनी,पंढरपुरला मोठी महापूजा घालायचे ठरवले.मी तशी या साऱ्यालाच नवखी होते.कशाला इतका घाट घालताहेत? असे आपले मला वाटले. सर्वानीच जायचे ठरले.

महापूजा सकाळीच असल्याने भीमेकाठी जाऊन, चंद्रभागेत स्नान करून तयार झालो.मी या सर्व गोष्टी खरोखर आलीप्तपणे  करत होते. पुजेची वेळ झाली.घरचे यजमान पूजेच्या अग्रभागी सोवळे नेसून सिद्द होते.आम्हीही सर्वजण गाभाऱ्यात जमलो.पंच्यामृताच्या कळश्या एकेक हाती घेऊन पुजाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे देवाला स्नान घालणे सुरु होते.सासूबाई मला सांगत होत्या,”अग हात पुढे कर,तू पण देवाचे अंग चोळ,हाताने अंघोळ घाल”!त्यावेळी थोडे उचंबळून आले.साक्षात भगवंताला न्हाऊमाखूघालत होतो. पण जितका आनंद व्हावा तेवढा काही होत नव्हता.भक्तीची आस,भक्तीची कास देवभेटीची आळवणी,श्रद्धा ही सुद्धा जागृत व्हावी लागते. ईश्वराविषयीचे आकर्षण काही कोणी सांगीतल्याने,ऐकल्याने ओतले जात नाही.ते निर्माण व्हावे लागते,मनाच्या खोल गाभाऱ्यातून! जो ईश्वर, जे परब्रह्म,मूळ तुमच्यात वास करुन आहे, जे अंतस्थ आहे, अदृश आहे त्या मूळ जीवात्म्याला,निर्गुण निराकार परब्रहमाशी जोडण्याकरिता मनाचा हुंकार तुमच्या अंतस्थ ह्रदयातून उमटावा लागतो.तो अंतस्थ हुंकार, भक्तीची प्रेमनदी,भक्तीचा पान्हा,साक्षात भगवंताला न्हाऊ घालताना मजजवळ नव्हता,’मी रीतेपणीच गेले आणि रीतेपणीच आले’! म्हणून मला ईश्वरासमीप जाऊनही ते साक्षात ‘परब्रह्म’ भेटले नाही.भाव तेथे देव.भाव तो मनीच नव्हता, मग देव कसा भेटावा?

काही वर्षांनी पुन्हा पंढरीला जाण्याचा योग आला.यात्रा नव्हती.एरवीची एक संध्याकाळ होती.गर्दी तुरळकच होती. थोडा वेळ बारीत उभे राहून दर्शन झाले. गाभारा जवळ जवळ येऊ लागला, या वेळेसमात्र मागच्यापेक्षा मनात भक्तीची, देवाला प्रेमाने भेटण्याची ओढ होती. त्या तरंग लाटा मनात उचंबळू येऊ लागल्या. त्या आनंदाच्या भेट सोहळ्यात, पूर्वीच्या स्मृतीत मी हात वर उंचावून देवाला पाहू लागले, त्याच्या कायेला स्पर्शू लागले. एवढ्यात पुजार॒याचे दम भरलेले शब्द ऐकू आले, ‘बाई, पायाशीच हात लावा !’ अरे बापरे ! महापुजेवेळी साक्षात भगवंताला न्हाऊमाखू घालताना त्याचे अंग चोळले, अंघोळ घातली. बाळकृष्णाला, गोपाळाला पण आता तसा हा उंचावायचा नाही. बरोबर आहे, ‘बा, विठ्ठला, माझे पामराचे डोके तुझ्या चरणी लीनच व्हायला हवे. ते अशावेळी तुझ्या कायेला हात लावून आशीर्वाद का बरे घेणार !’ चूक झाली मायबापा चूक झाली. !’ असे मनाशी म्हणत मी पांडुरंगाच्या चरणी आपले मस्तक लीन केले, टेकवले. पुजाऱ्याने घाई चालवली होती. मी डोळेभरून ईश्वर पहिला. मनी त्याचे रूप आकंठ साठवून माझ्यावर प्रेमाची पाखर घालण्यास विनवले आणि पुन्हा आपल्या संसारी येऊन मग्न झाले. यावेळेस मला ईश्वराच्या सत्चीदानन्दाची जाणीव होऊ लागली. हृदयी ईश्वर भेटीचा प्रकाश होऊ लागला.

अशी ही ईश्वराची भक्ती, हृदयी भाव नसलेल्यांना वेडं करणारी ! भक्तीचा झरा वाहू लावणारी, असीम, उत्कट, अविनाशी ! दरवर्षी आषाढी येते. यावर्षीही आली आहे. पण यावर्षी मनाच्या गाभाऱ्यात वरील रहस्यमय अनुभवांचे गुंजन चालू आहे. जिकडे तिकडे पंढरपूरला पालखी निघाल्याच्या वार्ता कानावर येत आहेत. मन तिकडे हळूहळू ओढ घेत आहे.

शैशवात मनात नसलेला भक्तीचा उगम. हा काही नंतर एकाकी झालेला नाही. बहिर्चक्षूंनी पाहिलेला देव. अंतरमनात वास करीतच होता. परंतु बौद्द्धिक पातळीवर त्याचा विचार केलेला नव्हता. ती अंतरमनातील भक्ती जागृत झाली. बुद्धीने मनाची जागृती एका उंच स्तरावर नेऊन ठेवली. ह्यालाच भक्ती म्हणावं कां? देवाची भक्ती, त्याची आळवणी, त्याचे नामस्मरण सामान्यांनी करावे. हाच खरा सुखाचा मार्ग संतांनी शतकानुशतके दाखविला आहे. भक्तीच्या अशा नवविध पद्धती सांगितल्या जातात. देह हा इंद्रिय सुखाच्या पिंजऱ्यात अडून पडलेला आहे. त्या देहातील जीवात्म्याला त्या परिपूर्ण, अनादी अनंत परब्रह्माशी जोडून जिवाचे सोने होईल तेच खरे अंतिम सुख ! ‘देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावो ! नुरो मस्तक ! कुटो हे शरीर ! नामाचा गजर सोडू नये ! नामाच्या गजराने, भक्तीने तो कृपाळू ईश्वर भक्तावर आपली कृपादृष्टी करतो. भक्ताच्या चिमुकल्या नामघोषाने फुल नाही फुलाची पाकळीसुद्धा त्याला पुरते. इतका तो दयानिधी कृपाळू आहे. त्याच्याकडे देण्यासाठी खूप आहे, पण आपली झोळी फाटकी असता कामा नये.

म्हणूनच ‘पुंडलिके वरदा हरिविठ्ठल, द्यानोबा तुकाराम,’ ह्या नामघोषात लाखो वारकऱ्यांनी भक्तीची ही उज्ज्वल परंपरा जागृत ठेवली आहे. हजारो वर्षे हे विठ्ठलाचे पाईक अखंड मुखी हरिचे नाम घेत. उन्हापावसाची, दगडाधोंड्यांची पर्वा न करता जिवाचे, देहाचे कवतीक सोडून, मैला मैलांचा प्रवास करीत, आपल्या मनातील नाद्ब्रम्हाला त्या परब्रम्हाशी एकरूप करण्या, भेटवण्या, पंढरपूरला त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात आणि आपले मस्तक लीन करतात. आपल्या अंतरमनातील उर्जा देवाच्या दर्शनाने तृप्त करून परतात.

वारीला जातो तो वारकरी होतो. आपण पांडुरंगाच्या दर्शनाची आस ठेवली. भक्तीचा भाव ठेवला आणि वारीत मनाने जरी सहभागी झालो तरी आपणही वारकरी होऊ. प्रत्येकाच्या मनातले भक्तीचे स्वरूप जरी वेगळे असले तरी भाव तेथे देव आहेच ! भक्ती तेथे कृपा ! ईश्वराने अनेक प्रसंगी केलेली आपण पाहिली वाचली आहे. म्हणून या आषाढी निमित्त एकादशीला पंढरपूरला जाणार्या वारकऱ्याच्या स्वरात आपलाही स्वर मिसळून म्हणूया टाळी वाजवावी ! गुढी उभारावी !वाट ही चालावी ! पंढरीची.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

वारक-यांची पावले आषाढ आला की संसारातून बाहेर पडून पंढरीची वाट का चालू लागतात, ते कळलं.’ ग्यानबा तुकाराम च्या तालावर चालत विठुरायाच्या पायावर माथा टेकण्याचा आनंद आणि सुख काय असतं ते कळलं. किती भाग्यवान ते वारकरी…..

विठ्ठल दर्शनानंतर रखुमाई कडे गेलो.

श्रीराम-सीता, श्री शंकर- पार्वती, श्री विष्णू -लक्ष्मी, आणि विठ्ठल-रखुमाई ही चार देव- दांपत्ये. रामसीता म्हटलं की सतत रामाबरोबर असणारी सीता,  शंकर पार्वती कैलासावर बसलेले, विष्णू शेषशायी आणि लक्ष्मी त्यांचे पायाशी असे द्रुष्य समोर येते. विठ्ठल रखुमाई हे जोडपं आपल्यातलं वाटतं. सा-या जगाचा संसार समर्थ पणे सांभाळणारा विठ्ठल आणि सगळे भक्त “विठ्ठला, पांडुरंगा” म्हणत त्यांनाच आळवतात, म्हणून जणु रुसून दुसरीकडे जाऊन आपणही कमरेवर हात ठेऊन उभी असलेली रखुमाई.  घराघरातल्या गृहस्थ- गृहिणी सारखे विठ्ठल रखुमाई.

दर्शनाला रखुमाई जवळ पोचले, कित्ती गोड रूप ते! अगदी विठ्ठलाला साजेसे.

विठ्ठलाच्या उंचपु-या मूर्ती समोर ही गोड गोजिरी रखुमाईची  अतिशय लोभसवाणी मूर्ती. जगत्जेठी आणि जगतजननी.  पिवळा शेवंतीचा हार तिच्या हिरव्यागार शालूवर छान शोभत होता. काळीशार तेजस्वी मूर्ती,  नाकात नथ, कर्णफुले,  आणि कपाळी मळवट. हेच ते दैवी, अलौकिक सौंदर्य.  अनिमिषतेने बघतच रहावे अशी रखुमाई. नमस्कार केला आणि भारावलेल्या मनाने बाहेर आले.

बाहेर दुकाने गजबजलेली होती. पण विठूमाऊलीच्या दर्शनापुढे मला बाकी सगळे गौण वाटत होतं. अतिशय शांत मनाने आणि जड अंतःकरणाने तिथून निघालो.

40 वर्षांपूर्वी ची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. किती आभार मानावेत विठूरायाचे!

आभार तर मी मित्र मैत्रिणींचे  मानते, ज्यांनी मला त्यांच्या बरोबर सामील होण्याची संधी दिली. मी शतशः त्यांची ऋणी आहे. त्यांच्यामुळेच हा ” सोनियाचा दिनु ” मला दिसला. नकळत मनात अभंगांचे स्वर रुंजी घालू लागले.

“जातो माघारी पंढरी नाथा

तुझे दर्शन झाले आता ।।

तुझ्या नादाने पाहिली

ही तुझीच रे पंढरी

धन्य झालो आम्ही जन्माचे

नाव घेऊ तुझे आवडीने ।।

दिपविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी ।

तुका म्हणे भक्ती करा सोपी

जाती पापे जन्माची पळूनी ।।

।। समाप्त  ।।

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 4 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

मंदिराच्या परिसरात जाताच मला देवभूमीवर उभी असल्याचा भास झाला. नखशिखान्त आतून एक शक्ती लहर माझ्यात भिनल्यासारखे वाटले. सकाळी अकराची वेळ होती. सूर्य बराच वर आला होता. थंडीत त्याच्या उबदार किरणांची शाल अंगावर घेत दर्शनाच्या रांगेत सामील झालो. हळूहळू पुढे सरकत सरकत मंदिरात प्रवेश करते झालो. आत शिरताच दोन्ही बाजूंनी भिंतीवर विठ्ठल रखुमाई,  मंदिराबद्दल माहिती,  तिथे साजरे होणारे उत्सव, आषाढी कार्तिकी च्या वारीची आणि वारक-यांची माहिती,  रिंगण, इंद्रायणी चे महत्व,  अनेक संतांची चित्रे, अभंग, ओव्या,  ज्ञानेश्वर माऊली,  तुकाराम महाराज इत्यादींची सुचवेन, असा संत- खजिना बघायला मिळाला. सर्वात शेवटी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान होते. आमच्या मागे खानदेशातून आलेल्या भक्तांचा ग्रुप होता. ते सर्व जण  त्यांच्या भाषेतील विठ्ठलाचे अभंग सामुदायिक गात होते.ऐकायला खूप छान वाटत होतं, पण माझं लक्ष विठ्ठलाकडेच लागलं होतं.  मूर्ती अजून किती दूर आहे हे बघत होते. पुढे चालता चालता जरासं उजवीकडे वळून समोर पहाते तो……

‘सावळे सुंदर रूप मनोहर’, मकरकुंडले ल्यालेला,  कमरेवर हात ठेवून उभा होता.  मुखावर मंद हास्य, अतिशय सुंदर,  देखणा पंढरीचा राणा.

त्याच्या नजरेतून वहाणारे वात्सल्याचा झरा माझ्या डोळ्यात भरून आला.दृष्टी न हलवता पुढे जात होते. जवळ पोचताच भान हरखून मूर्ती बघतच राहिले. भटजी म्हणाले, आधी पायावर डोकं ठेवायचं, मुख दर्शन नंतर घ्या. मी विट्ठलाचे पाय धरून माथा टेकला.

रांगेत असल्याने पुढे सरकावेच लागते. मला तर विठ्ठलाच्या जवळून दूर व्हावेसेच वाटत नव्हतं. माहेराहून सासरी येताना प्रत्येक वेळी आई दारात दिसे पर्यंत मान मागे वळून वळून आईला बघत रहायचे आणि ती दिसेनाशी होईपर्यंत डोळे डबडबलेले असायचे. आत्ता तीच अवस्था माझी झाली.  हो! ही सुद्धा विठू माऊली च ना!

परत मागे येऊन किंचित अंतरावर, मूर्ती पहाण्याची संधी मला मिळाली. बांधेसूद शरीरयष्टी, चेह-यावर सात्विक भाव, गळ्यात तुळशीहार, गुलाबी वस्र ल्यालेल्या विठोबा चं ते देखणं रूप डोळ्यात साठवून घेतलं. “राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपियेल्या” अशा देखणेपणातून मला त्याची आश्वासक कृपाद्रुष्टी जाणवली. जणु काही मला सांगत होता, “मी असताना तुला कसली चिंता?”

गर्दी असल्याने तिथे जास्त वेळ थांबता नाही आले. पण त्या पाच मिनिटात सगळे विचार, सगळ्या चिंता, काळज्या, काळ-वेळ, सगळ्या सगळ्याचा विसर पडला. फक्त विठू माऊली आणि मी. दुसरं काहीच नाही.

“अवघा रंग एक झाला

रंगी रंगला श्रीरंग

मी तू पण गेले वाया

पहाता पंढरीचा राया”

अगदी अशीच मी एकरूप झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मन इतकं शांत झालं. ही सुखद अनुभूती मी प्रथमच घेत होते.

क्रमशः …

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –6 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

कॉलेज ची धमाल करता करता परीक्षा कधी संपली समजलेच नाही. काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि मी मराठी घेऊन बीए चांगल्या मार्कांनी पास झाले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. सगळ्यांनी माझे कौतुक केले आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

पण आता पुढे काय हे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले. कोणी म्हणाले आता एम ए करून घे. कोणी म्हणाले त्यापेक्षा आवाज चांगला आहे गाणं शिक…

लहानपणापासून मला नृत्याबद्दल,नाचा बद्दल खुपच ओढ होती. मला ना,चवथीपर्यंत चांगलं दिसत होतं. म्हणजे जन्मतः जरी मला मोतीबिंदू असले, तरी ऑपरेशन करून थोडं दिसायला लागलं होतं. पण फार लहानपणी मोतीबिंदू झाल्यामुळे काचबिंदू वाढत गेला आणि चौथीनंतर दृष्टी कमी कमी होत गेली. पुढे बीए झाल्यावर वयाच्या एकविसाव्या वर्षी भरतनाट्यम शिकायला मी सुरुवात केली. तेच का हे सुद्धा मला चांगलं आठवतंय. माझे बाबा विद्या मंदिर प्रशाला मिरज, इथं शिक्षक होते. त्यावेळी दिल्लीमध्ये झालेल्या एका कोर्समध्ये त्यांना प्रोजेक्टर, स्लाईड्स बक्षीस मिळाले होत्या. त्यामध्ये भारतातील प्राचीन मंदिरे, भारतीय नृत्य याची सखोल माहिती होती. परमेश्वर कृपेने त्यावेळी मला दिसत होते आणि तो नाच, तो सुंदर पोशाख,छान छान दागिने माझ्या मनामध्ये इतके पक्के बिंबले होते की माझी नजर नंतर गेली पण मनावरचे ते दृश्य नाहीसे झाले नाही. ते मला सारखे साद घालत होते म्हणतात ना, चांगले बी पेरले ही पोषक वातावरणात ते उगवते, फुलते. माझेही तसेच झाले. अर्थात हे सगळे माझ्या नृत्यातल्या गुरु मुळेच घडू शकले. माझ्या नृत्यातल्या गुरु म्हणजेमिरजेतील सौ धनश्री आपटे.

माझ्या नृत्यातल्या, माझ्या विचारांच्या जडण-घडणीतल्या, माझ्या व्यक्तिमत्व विकासाला उमलू देणाऱ्या, फु लू देणाऱ्या, मला माझ्या आयुष्यातला आनंद मिळवून देणाऱ्या आणि एक प्रकारे माझे जीवन उजळून टाकणाऱ्या या माझ्या ताई म्हणजे सौ धनश्री ताई या माझ्या गुरुच आहेत.

अशा गुरू मला केवळ माझे नशीब,माझ्या आई बाबांचे आशीर्वाद,परमेश्वराची कृपा आणि  ताईचा मोठेपणा यामुळेच मला प्राप्त झाल्या.

मी बी ए झाल्यानंतर माझ्या मनातले नृत्य शिकण्याचे गुपित आई बाबांना सांगितले. माझ्या बाबांनी ते मनावर घेतले आणि मला नृत्य.  कोण शिकवू शकेल याचा शोध घ्यायला सुरुवात केली. धनश्री ताई बद्दल समजल्यावर माझे बाबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. तो पहिला दिवस मला अजूनही चांगला आठवतोय. बाबांनी माझी ओळख करून दिली आणि हिला तुमच्याकडे नृत्य शिकायचे आहे आहे असे सांगितले. माझ्या चालण्या वरून, वावरण्यावरून ताईंना मी पूर्ण दृष्टिहीन आहे असे वाटले नाही. पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की एका आंधळ्या मुलीला नृत्य शिकवायचा विडा आपल्याला उचलायचा आहे, तेव्हा क्षणभर त्याही गोंधळल्या. त्यांना हे अनपेक्षित होतं. थोडा विचार करून म्हणाल्या मी दोन दिवसांनी सांगते. आणि त्यांचा आलेला होकार माझ्यासाठी खूप मोलाचा ठरला. माझ्या आयुष्याला प्रकाश देणारा ठरला.

फक्त मला एकटीला शिकवण्यासाठी ताईंनी माझ्यासाठी बुधवार आणि शुक्रवार राखून ठेवले होते. एकदा तरी त्यांना जमणार नव्हते,म्हणून मला घरी सांगायला आल्या, आज येऊ नको म्हणून. त्यावेळी. मी एकटी जाऊ शकत नव्हते ना,कोणीतरी माझ्याबरोबर सोडायला आणायला लागायचे. आमची खेप वाचावी म्हणून त्या स्वतः आल्या. त्यांच्यातला तो साधेपणा, खरेपणा इतकी वर्ष झाली, तरी अजून तसाच आहे .

ताईंनी मला नृत्यामधल्या हाताच्या,पायाच्या विशिष्ट हालचाली, हावभाव, चेहऱ्यावरचे भाव कसे आले पाहिजेत ते मला समजून समजावून,शिकवलं. हाताच्या मुद्रा त्या तोंडी सांगायच्या. अंगठा आणि पहिले बोट यांची टोके जुळवून गोल कर, बाकीची तीनही बोटं तशीच राहू दे. पायाच्या हालचाली सांगताना त्या या खाली बसून माझे पाय तसे करून घ्यायच्या,एकदा मला कळलं की त्यांना पाहिजे तसं जमेपर्यंत प्रॅक्टिस करून घ्यायच्या . माझ्या एमएच्या अभ्यासाचं सांगते, धीर गंभीर अशा श्लोकांच्या स्वरांमध्येमला दशावतार करायचे होते. अक्षरश: नाच करत दहा अवतार सादर करायचे होते. कलकी या अवतारामध्ये मी खरंच घोड्यावर बसून करते आहे असेच मला वाटले. मला त्या सगळ्या अभ्यासाची मजा लुटता आली,आनंद घेता आला.

गाण्यांचे विशिष्ट बोल, त्याचा अर्थ, त्यानुसार हावभाव हे सगळं प्रॅक्टिस न जमत गेलं. सुरुवाती सुरुवातीला काय व्हायचं मी नुसती शरीरानं म्हणजे फिजिकली नाचत होते. घरी येऊनही त्याचा सराव करत होते. एकदा त्यांच्या लक्षात आलं  की नाचून नाचूनमाझे पाय सुजले आहेत तेव्हा त्या म्हणाल्या, “नृत्य नुसतं शरीरांन करायचं नसतं. मी काय सांगते ते मनानं, बुद्धीने समजून घे, तसं मनात  उतरु दे.” त्यासाठी त्या मला शंभर गोष्टी सांगायच्या, त्यातल्या मला कशातरी पन्नास समजायच्या. माझं त्यांनी इतकं पक्क करून घेतलं की मी अजून सुद्धा झोपेतही ते विसरणार नाही. त्यांनी नृत्यातल्या सगळ्या अवघड गोष्टीसोप्या करून सांगितल्या. मनापासून कसं करायचं याची ट्रिक सांगितली. मला वेगळच समाधान मिळालं. आपल्यातलं काहीतरी सुप्त असलेलं, मला लागले याची जाणीव झाली.  नृत्या तला आनंद मिळाला.

मी भरतनाट्यम ची विद्यार्थ्यांनी आहे. पूर्ण शिकून झालं असं मी म्हणणार नाही. पण पण गांधर्व महाविद्यालयाच्या सलग सात वर्ष परीक्षा दिल्या मी . शेवटची परीक्षा नृत्य विशारद ची होती.

असाध्य ते साध्य कसं करावं ते मी माझ्या ताई कडूनच शिकले. माझ्या आई बाबांच्या खालोखाल, माझ्यासाठी माझ्या ताईंचं स्थान आहे. त्यांनी मला खूप, माझ्या आयुष्यात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. शिष्याचे प्रगती गुरु कसा भेटतो यावर अवलंबून असते. माझे गुरु प्रगल्भ अध्यात्मिक पाया असणारे, उच्च स्तरावरील विचारांचे आणि खूप प्रेमळ आहेत. ताईंनी मला जवळजवळ वीस वर्ष शिकवले आहे म्हणून मी मी अनुभवान एवढं बोलू शकते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 3☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

मी केवढी भाग्यवान कि,  प्राध्यापक श्री पां.ना. कुलकर्णी हे स्वतः ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक,  विवेचक, प्रवचनकार,  मला हा विषय शिकवत होते. त्या वर्षी मराठी विषयाची मी एकटीच विद्यार्थिनी होते.  अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन,रसाळ वाणी, आणि ओघवतं वक्तृत्व अशा मार्गदर्शनात मी अभ्यास करत होते. वेगवेगळ्या असंख्य नोट्स लिहून तयार करत होते. सरांच्या कडून तपासून घेत होते.

वर्ष संपत आलं होतं.  परीक्षेची वेळ आली. मी विट्ठलाचीच प्रार्थना्थ करत होते, ” मला पेपर लिहिताना सगळं आठवू दे आणि लिहायला येऊ दे.” परीक्षा झाली. आणि सरांनी मला सांगितलं, ‘ तुमच्या सर्व नोट्स मला आणून द्या’. मी सगळ्या व्यवस्थित एकत्र केल्या आणि दिल्या. त्यांनी त्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या विभागात संदर्भ वाचन आणि अभ्यासासाठी दिल्या. मला खूप खूप खूप  आनंद झाला. विद्यापीठाते आपलं लेखन संदर्भा साठी असणं ही किती अभिमानाची गोष्ट.  असं असेल,हे  कधी माझ्या  स्वप्नातही  वाटलं नव्हतं. तेव्हा पटलं, संपूर्णं वर्षभर विठ्ठलच तर माझ्या कडून लिहून घेत नसेल?

तेव्हा पासून मला सतत वाटायचं, पंढरपूर ला विठ्ठलाच्या दर्शनाला मला कधी जायला मिळेल? ही 1978 सालची गोष्ट. लगेचच प्रपंचात पडले. नशिबात पुढे काय वाढून ठेवलेले असते, काही कळत नाही. सुखदुःख, त्रास,  अडचणी यांच्याशी दोन हात करता करता 40 वर्षे गेली. वयाची साठी ओलांडली. दरवर्षी आषाढी,  कार्तिकी एकादशीला उपवास करण्याइतकाच विठ्ठलाशी संबंध उरला होता.

आणि….अचानक ओळखीच्या मित्र मैत्रिणींचा अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूरला जायचा बेत ठरला. डिसेंबर 2019,  आम्ही प्रवास सुरू केला. अक्कलकोट ला श्री स्वामी समर्थांचे दर्शन,  महाप्रसाद घेऊन दुसरे दिवशी सकाळी मार्गस्थ झालो. वाटेत तुळजापूर च्या आधी पंढरपूर ला जाऊ असे ठरले. आणि दोन तासात पंढरपूर ला पोचलो सुद्धा.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 2 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

तो काळ महाराष्ट्रासाठी फार कठीण होता. यवनांचा धुडगूस माजला होता. परकीयांच्या आक्रमणापेक्षा जनजीवन उध्वस्त झाले होते. बायका मुली पळवल्या जात होत्या. मंदिरांची तोडफोड करून मूर्ती भंग केली जात असे. पांडुरंगा ची मूर्ती यवनांनी पळवून कर्नाटक प्रांतात नेऊन टाकली. अशा वेळी सर्व संतांनी आपापल्या परीने घाबरलेल्या जनतेला एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली. भगवी पताका, भागवत धर्म,  आणि वारकरी संप्रदाय या त्रयींच्या आधारे जनतेला एक सुरक्षा कवच दिले. श्री संत भानुदास म्हणजे एकनाथ महाराजांचे वडील, यांनी पांडुरंगाची मूर्ती कर्नाटकातून आणून पंढरपूरात स्थापन केली. कर्नाटकातून आला म्हणून “कानडा राजा पंढरीचा”.

संत रामदास स्वामी, संत तुकाराम,  संत एकनाथ इत्यादिनी हिंदुधर्म,  हिंदु दैवते, यांचे महत्व पटवून देऊन साध्या भोळ्या शेतकरी, कामकरी वर्गाचे जगणे सुसह्य कसे होईल याची ग्वाही दिली. त्याच काळात शिवाजी राजे दिल्लीच्या पातशाहीशी टक्कर देत होते. स्वराज्य आणि सुराज्य स्थापनेसाठी त्यांची पराकाष्टेची शिकस्त चालू होती. त्यांना समर्थ रामदास व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे पाठीशी राहून उत्तेजन देत होते. मार्गदर्शन करत होते. महाराजांना तुळजाभवानीचा वरदहस्त होता. अवघा महाराष्ट्र संक्रमणाच्या कठिण परिस्थितीतून जात होता. रयतेला, जनतेला एकत्र आणून त्यांच्या वृत्ती,  त्याचे आचार,  त्यांचे विचार , हे विठ्ठलाच्या रूपात असलेल्या परम शक्ती कडे वळवण्याचे महत्कार्य सर्व संतांनी केले आहे.  त्यातूनच भागवत धर्माची गुढी रोवली गेली. भगवी पताका अस्तित्वात आली. वारकरी,  माळकरी संप्रदाय उदयास आला.

भोळी भाबडी रयत विठ्ठलाच्या वात्सल्यपूर्ण कृपेच्या आश्रयाला आली.

अभ्यास करताना माझ्या मनात परत परत विचार यायचे, कि खरंच विठ्ठल भक्तांच्या मदतीसाठी धावून आला असेल का? मग कळलं, ज्याचा त्यावर विश्वास नाही,  किंवा मनात संदेह आहे, त्यांना तो दिसत नाही,  जाणवत नाही. पण ज्यानं विश्वास ठेवला, त्याला तो प्रत्यक्ष दिसतो, मदत करतो, संकटातून बाहेर काढतो. कुठल्याही गोष्टीत विश्वास आणि श्रद्धा महत्वाची. जनाबाईंच्या अभंगातला विठू लेकुरवाळा असतो.  सगळे भक्त विठ्ठल नामाच्या गजरात नाचतात, गातात, धावतात,  उड्या मारतात. स्वतःला विसरून पांडुरंगाच्या पायाशी लोळण घेतात.  पावसापाण्याची, उन्हातान्हाची  कदर न करता पायी पंढरीची वारी करतात. त्यांच्या भक्तीने,  त्यांच्या सेवेने वेडा झालेला विठू सुद्धा आषाढी कार्तिकी एकादशीला त्यांची वाट बघत असतो. असं हे देवाचं आणि भक्ताचं नातं. ‘ देव भावाचा भुकेला ‘ . त्याला फक्त भक्तांच्या ह्रदयीचा खरा भक्ती भाव अपेक्षित आहे. भक्तांची आर्ततेने आलेली ” विठ्ठला, विठुराया, पांडुरंगा ” अशी हाक त्याच्यापर्यंत क्षणार्धात पोचते, आणि तो भक्तांजवळ हजर होतो. हा अनुभव भक्तांचा.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ ।। राजा पंढरीचा ।। भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

संत वाङमय, आणि संत साहित्य, भागवत धर्म, वारकरी संप्रदाय, संत चरित्रे या सर्वांचा अभ्यास करण्याचा योग मला माझ्या महाविद्यालयीन काळात आला. त्या अनुषंगाने ज्ञानेश्वरी,  अमृतानुभव,तुकाराम गाथा, शेकडो अभंग, ओव्या, भारूडे, लोकगीते यांची ओळखंच नाही तर पक्की दोस्ती झाली .

दरवर्षी आषाढी एकादशी,  कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल रखुमाई च्या दर्शनाला जातात.

कपाळी बुक्का,गळा तुळशीची माळ,  खांद्यावर भगवी पताका, हाती मृदंग टाळ आणि ‘ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ‘ च्या तालावर पडणारी पावले. विठ्ठलाच्या प्रेमात सारं वातावरण भारून गेलेलं असतं. सगळ्यांची वाट एक, नेम एक, ध्यास एक – विठ्ठलाला भेटणे. संत साहित्य वाचताना एक गोष्ट सातत्याने आणि प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे,  ” जगत्जेठी विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेऊन विटेवर उभा आहे,  त्याचं दर्शन झाले की आयुष्यातल्या सगळ्या व्यथा, दुःख,  कष्ट, त्रास  नाहिसे होतात आणि मनात रहातं फक्त त्याचं साजिरं गोजिरं रूप. एकदा त्याच्या पायावर डोकं ठेवलं की पुढं वर्षभर कसलीच काळजी नाही.आपली सगळी दुःख,  संकटं तोच निवारण करतो हा प्रचंड विश्वास. पंढरपूर ला जाताना दर्शनासाठी आसुसलेली मने येताना शांत होतात. असं काय असेल त्या विठ्ठलाकडे?

लहानपणी विठोबा रखुमाई च्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी वाचल्या, ऐकल्या.  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर,  निवृत्ती,  सोपान,  मुक्ताई,  तुकाराम,  एकनाथ,  नामदेव, पुंडलिक,  गोरा कुंभार,  चोखामेळा,  जनाबाई, कान्होपात्रा, सावता माळी अशा अनेक संतांची विट्ठलाचे गुणवर्णन करणारी,  ईश्वरानुभूतिचे अनुभव सांगणारी चरित्रे वाचली आहेत. अभंग,  ओव्या ऐकल्या आहेत.  एक एक अभंग म्हणजे विठुरायाच्या गळ्यातील  तुळशीचे  एक एक  दळच जणु. इतके पवित्र आणि आर्त.

पंढरपुरात विठोबा जरी विटेवर  युगे अठ्ठावीस उभा असला तरी भक्तांची श्रद्धा इतकी दृढ की आपले नित्याचे काम करताना मुखावाटे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जप केला तर कष्ट जाणवल्याविना त्यांचे काम पार पडत असे.

( परीक्षेत पेपर्स लिहायला विठू मदत करेल का? असा प्रश्न मनात आला होता)

विठ्ठल, पांडुरंगा, म्हटलं की दिवसभराचे सर्व क्लेश, कष्ट शरीरातून निघून जाई, आणि रात्री पाठ टेकल्या टेकल्या भक्तांना गाढ झोप लागत असे. तुकोबारायांची अभंगगाथा समाजकंटकानी इंद्रायणीत बुडवली, नंतर ती जशीच्या तशी पाण्यातून वर आली.गोरा कुंभाराचा चिलया बाळ परत जिवंत झाला.अशा अनेक अलौकिक कथा आहेत.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पेस ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ मनमंजुषेतून  ☆ स्पेस ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

असचं एकदा   काही  कारणानं  मला मुंबईला जावं लागलं होतं.माझी एक  जुनी शाळासखी इथं राहते. काम झाल्यानंतर मुद्दाम वेळ काढून मी तिच्याकडं गेले. अर्थातच फोन करुन  तिला इंटिमेट केलं होतंच. मनात मात्र बालमैत्रीणीला भेटण्यासाठी आजकाल हा जो शिष्टाचार पाळावा  लागतो याविषयी थोडी नाराजी होतीच.

बेल वाजवून दारात ऊभी राहिले. दार ऊघडताच गळाभेटीसाठी हात पसरणार इतक्यात..  हाय रे.. कामवालीनं दार उघडलं.  मला बाहेरच थांबायला सांगून ती आत गेली. थोड्या वेळानं येऊन तिनं मला हॉलमध्ये नेलं. तो ऐसपैस, किंमती वस्तूंनी सजलेला दिवाणखाना मालकिणीच्या  सधनतेची जाणीव करुन देत होता. काही मिनिटांनी मॅडम बाहेर आल्या. गळाभेट झाली. दोघीही गहिवरलो. ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिच्या मिस्टरांची कर्तृत्वगाथा समजली. मुलांची चौकशी करुन झाली. तसं सगळं छान होतं. पण कुठंतरी काहीतरी खटकत होतं. भेटीनंतर शाळेत असताना मिळणारा आनंद, गवसणारं समाधान … छे.. छे.. मान झटकून मी मनाला आवरलं. घरी नसतील कुणी.. त्यामुळं कदाचित भेटले नाहीत  आपल्याला.. पण.. गप्पांच्या ओघात समजलं, सगळे घरीच  होते. शेड्यूल  ठरलं होतं. मला भेटायला त्यांच्या जवळ  वेळ नव्हता. मी सकाळी कळवलं होतं ना. त्यांचे प्रोग्राम्स पूर्वीच ठरले होते.

घरी परतल्यावर मी माझ्या  मुलाशी  बोलत होते.मैत्रिणीच्या घराच वर्णन, पण मनातील खदखद जास्त. तेव्हढ्यात माझ्या नवर्‍यानं  माझा मोबाइल  घेतला.” अगं, ते ICICI बॅंकेचं स्टेटमेंट बघायचंय. तुझ्या कडं  मेसेज आला  असेल.”माझा  लेक तिथंच  डायनिंग टेबलवर पेपर पसरुन वाचत बसला होता.मी नुकत्याच भाजून ठेवलेल्या शेंगदाण्याच्या बुट्टीत हात घालत  तो म्हणाला,” आई, याला स्पेस जपणं  म्हणतात. हाय सोसायटीतला हा एक  शिष्टाचार आहे. सगळे आपआपापल्या खोल्यात बंद. आत्ता आपण बसलोय ना तसं बसायचं नाही एकत्र. परवागनी घेऊन, दारावर टकटक करुनच एकमेकांच्या खोलीत जायचं. बाबांनी आत्ता तुझा मोबाइल घेतला ना; तुला न विचारता ; तसा नाही घ्यायचा. आजकाल असं वागणं म्हणजे स्पेस  देणं.कळलं ?”

माझा  वेडा प्रश्न,” म्हणजे, एकत्र बसून जेवायचं  नाही का? सासवा- सुनांनी, मायलेकींनी हसत खेळत गप्पा मारत घरकाम, स्वयंपाक करायचा नाही ?”

“अं हं. आणि तसंही आजकाल स्वयंपाकाला वेळ असतोच  कुणाला? आणि दहा- बारा तास ऑनलाइन काम. ते जास्त महत्त्वाचं नाही का ?”

तो ऊठून आपल्या  कामाला  गेला. माझे हात काम करत होते. पण मन भूतकाळात गेलं  होतं. रोज रात्री एकत्र गप्पा मारत जेवणं हा एक दंडकच होता म्हणा ना. त्यामुळं कोणाचा दिवस कसा गेला हे कळत  असे.दूसर्‍या दिवशीचं सगळ्यांच  वेळापत्रक समजे.बाबांचे ऑफिस ऑफिशिअल नसे. आईच्या शाळेतील विविध कार्यक्रम, स्पर्धा यांचं वेळापत्रक आम्हांला देखील ठाऊक असे. माझ्या भावांच्या मित्रांची मी खास ताई होते. माझे मित्र मैत्रिणी सगळ्यांचे, घरातले झाले होते. आई तर चेष्टेनं म्हणत असे, की माझ्या न पाहिलेल्या कॉलेजातील शिक्षकांनाही  ती रस्यावर सुद्धा ओळखेल. मी तेव्हढी बडबड रोज करतच होते घरात.

भाजी निवडणार्‍या आईला मुलंही हातभार  लावत. भुईमुगाच्या शेंगा फोडणार्‍या आजोबांच्या भोवती नातवंडांचं कोंडाळं असे. पेपर मधील बातम्या,” बरं का गं… ” असं म्हणत  बाबा  मोठ्यानं  वाचून  दाखवत. सकाळच्या  धावपळीत पेपर  हातात  न घेताही आईला, आजीला महत्त्वाच्या घडामोडी कळत. स्वयंपाकघरातल्या  कोपर्‍यात दोन पायांवर बसून आजोबा ताक करत तेंव्हा  घरातलं एखादं लहान नातवंड नाचणार्‍या रवी बरोबर  खिदळत असे. हलकेच लोण्याचा गोळा त्याच्या जिभेवर ठेवला  जाई.

मागच्या पिढीनं स्पेस जपली असती तर सुदृढ भावबंध असलेली नाती कशी  तयार झाली  असती? तेंव्हाच्या आई बाबांची ऑफिसं कशी  बरं  बिनधास्त झाली असती?  मध्यमवर्गीय  संसार कसे बरं  बिनघोर झाले असते? पण छे:, न्युक्लियर फॅमिली ची ही कॅप्सूल समाजात आली, लोकप्रिय झाली. पाळणाघरांची गरज निर्माण झाली. एकमेकांना वेळ देणं एकमेकांच्या  वस्तू शेअर करणंही  जिथं  दुरापास्त  होऊ लागलयं, तिथं मी खुळी  नात्याला भावबंधांचे रेशमी  पदर असावेत  असल्या अपेक्षा करत बसलेय.

अचानक माझ्या गळ्यात मऊ लडिवाळ हात पडले. माझी सहा वर्षांची नात मला  लाडीगोडी लावत होती. “आजी चल ना गं. बागेत झाडांना पाणी घालूया. फुलं काढूया. काल तू प्रॉमिस केलं  होतसं शाळेत जाताना गजरा करुन देईन. माझ्या मॅमना द्यायचाय  गं मला.” मी तिचा गालगुच्चा घेतला. तिचा हात धरून बागेकडं निघाले. ती माझ्या हाताला झोके देत चालत होती. प्रत्येक झोका मला माझ्या कुटुंबातील सगळ्यांना बांधून ठेवतोय, समाधानाचं हसू माझ्या घरकुलात पसरतयं याची सुखद जाणीव करुन देत होता. मी मनात म्हणत होते,’ बरं गं बाई, मी महानगरातल्या हायफाय सोसायटीत रहात नाही.’

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ रावण दहन… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

दसऱ्याला टीव्हीवर अनेक ठिकाणचा ‘ रावण- दहन’ सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतांना पाहिला आणि अचानक मनात विचारांची गर्दी झाली. ‘रावण वध’ हे सुष्ट वृत्तीने दुष्ट वृत्तीवर विजय मिळवल्याचे ठळक उदाहरण  असे वर्षानुवर्षे मानले जाते. रावण राक्षसी वृत्तीचा होता- स्वतःच्या बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून त्याने सीतेला पळवले- आणि म्हणून  रामाने युद्ध करून त्याचा वध केला …. एवढेच वर्षानुवर्षे लक्षात ठेवले गेले आहे. पण या  दोन घटनांच्या मधल्या सत्याकडे मात्र कुणीच लक्ष दिले नाही याचे आश्चर्य, आज समाजात घडणाऱ्या घटना पहाता प्रकर्षाने वाटते. आज इतर बातम्यांइतक्याच आवर्जून येणाऱ्या बातम्या असतात त्या स्त्रियांचे अपहरण, बलात्कार, शारीरिक- मानसिक छल …यांच्या, ज्यामध्ये कामवासना – पूर्ती हाच उद्देश बहुतांशी असलेला दिसतो. सामूहिक बलात्कार हा त्याहूनही भयानक प्रकार. मग कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून तिला मारूनच टाकायचे हेही तितकेच सहजसोपे वाटते. एखाद्या मुलीने आपल्याला नकार दिला तर, तिचा जो चेहेरा आवडत असतो तोच एसिड टाकून विद्रूप करणे, तिला आयुष्यातून उठवणे हाही भावनांच्या – विचारांच्या विद्रूपतेचा कळसच. असे असंख्य अत्याचार अनेक प्रकारे सतत होतच असतात. पण बरेचदा लोकलज्जेखातर आणि भीतीने ती त्याचारित स्त्रीच ते समाजापासून लपवून ठेवते हे तिच्याइतकेच पूर्ण समाजाचेही दुर्दैव आहे. अशा-काही घटना व्हाट्यावर येतातही. त्यांचा बभ्रा होतो. कोर्टकचेऱ्याही होतात. आरोपींना शिक्षाही ठोठावली जाते …… पण शिक्षेची अंमलबजावणी? …. ती जास्तीत जास्त लांबणीवर कशी पडेल , माफी मागण्याचे नाटक करून ती रद्दच कशी करता येईल, याचेच जोरदार प्रयत्न सुरू होतात, ज्यात समाजाचे प्रतिनिधीसुद्धा स्वतःचे ‘वजन’ वापरतांना दिसतात. हे पाहून कुणाही संवेदनशील असणाऱ्याचा तात्पुरता संताप होतोच. पण नंतर ती अत्याचारित स्त्री बाजूलाच रहाते, आणि खमंग चर्चा रंगत रहातात त्या फक्त खटल्याच्या……..

हे सगळे चित्रच अतिशय विकृत आहे.. आणि ते पहातांना खरोखरच प्रश्न पडतो की रावणाने सीतेला पळवण्याची मोठीच चूक केली होती, पण आत्ताची परिस्थिती पाहता तो इतका गंभीर गुन्हा म्हणता येईल का, की आज इतकी युगे लोटल्यानंतरही त्याचे आवर्जून प्रतीकात्मक दहन करावे ? समाजाने याचा नक्कीच विचार करायला हवा. आणि तो का ? या प्रश्नाला समर्पक अशी बरीच उत्तरे आहेत ……….

बहिणीच्या अपमानाचा बदला घेणे एव्हढाच तेव्हा रावणाचा हेतू होता, जो भावनेच्या भरात घाईघाईने पूर्ण करण्याची घोडचूक त्याने केली होती. पण सीतेवर कुठलाही अत्याचार करण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता, हे नंतरच्या त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येते. तो तिला कुठल्याही अज्ञातस्थळी घेऊन गेला नाही. त्याने तिला पहिल्यापासूनच अतिशय आदराने वागवले. इतक्या आदराने, की जो आदर आजही स्त्रीला सामान्यपणे दिला जात नाही.  अशोकवनासारख्या निसर्गरम्य जागी त्याने तिची रहाण्याची व्यवस्था केली. तिच्यासाठी आवर्जून स्त्री – सेविकांचीच नेमणूक केली. तिला उत्तम भोजन मिळण्याची व्यवस्था केली. तिथे तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. त्या काळात स्त्रीने परक्या घरी राहणे पाप मानले जायचे. हा नियम आणि स्वतःची चूक लक्षात घेऊन, केवळ माणुसकी म्हणून सीतेशी औपचारिक लग्न  करण्याची तयारीही त्याने दाखवली होती. आत्तासारखा एसिड फेकून , बलात्कार करून सूड घेण्याचा विचार त्याच्या मनात येणेही अशक्य होते हे यावरून नक्कीच सिद्ध होते. रामाने युद्धाआधी पूजा करायचे ठरवले, आणि ती सांगायला , ‘ व्युत्पन्न ब्राह्मण‘ म्हणून रावणालाच बोलावले. आणि रामाचा मान राखत रावणही गेला. असे सगळे घडणे आज अशक्याच्याही पलीकडचे आहे. विशेष म्हणजे मरण्यापूर्वी त्याने रामाची माफी मागितली. आता हा सगळा रावणाचा ‘शुद्ध मूर्खपणा‘ समजला जाईल. पण त्याच्या मनाची शुद्धता, मोठेपणा याचा विचारही कुणी करणार नाही,  जो सगळ्यांनीच करणे  फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आवर्जून असे म्हणावेसे वाटते की रावण- दहन करणे कायमचे थांबवून, आता प्रत्येकानेच स्वतःच्या मनातल्या राक्षसी वृत्तीचे , दुष्ट आणि घातक विचारांचे आणि दुष्ट वासनांचे जाणीवपूर्वक वेळोवेळी दहन करत राहण्याची फार जास्त गरज आहे. आणि  त्यासाठी  ” दसरा” उजाडण्याची गरजच नाही. कारण अशी प्रत्येक वेळ सोने वाटण्यासारखीच असेल………

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print