मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवनागरी ☆ श्री मयुरेश गद्रे

? मनमंजुषेतून ?

☆ देवनागरी ☆ श्री मयुरेश गद्रे ☆ 

आजच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये सुभाष अवचटांचा “देऊळ” म्हणून लेख आलाय. गावातल्या जुन्या दगडी, हेमाडपंथी देवळाची गोष्ट. त्या वास्तूशी जवळीक सांगणाऱ्या कोवळ्या वयातल्या आठवणी. आणि मग अचानक गावकीनं निर्णय घेऊन देवळाला केलेली ऑइल पेंटची रंगरंगोटी. सुंदर देवळाचं असं विद्रूप होणं त्यांच्यातल्या कलाकाराला किती अस्वस्थ करून गेलं असा तो एकंदर लेखाचा नूर….!

हे वाचता वाचता, सहज मी ते वर्तमानाशी जोडत गेलो.

गेलं साधारण वर्षभर मी व्हॉट्सअप वापरतोय. खाजगी कमी. बहुतांशी दुकानाच्या ऑर्डर्ससाठी. वेगवेगळ्या प्रांतातील सर्वभाषिक मंडळी आमची ग्राहक आहेत. त्यामुळं हिंदी, मराठी, इंग्रजी सर्वच भाषांतून विचारणा सुरू असतात. इतर भाषिकांचं सोडून देऊ. पण माझं सर्वसाधारण निरीक्षण असं की मराठी भाषकांना आपल्याच देवनागरी लिपीचं भयंकर वावडं आहे.

यातले हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता सगळे जण सर्रास रोमन स्क्रिप्ट मध्ये मराठी टाईप करतात.

काय प्रॉब्लेम आहे हा? कुणालाच त्यात काही गैर वाटत नाही. मी त्यातल्या अनेकांना न राहावून हा प्रश्न विचारतो की बाबांनो, का करता असं? तर सार्वत्रिक उत्तर म्हणजे ” मराठी टाईप करायचं म्हणजे कसलं कंटाळवाणं काम ! त्यापेक्षा हे सोप्पं आहे “

खरंच इतकं कठीण आहे का देवनागरी लिहिणं? इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं? की देवनागरी हा फक्त कॅलिग्राफी (सुलेखन) करण्यापुरता वापरून सोडून द्यायचा विषय आहे?

कितीतरी लोक आमच्या दुकानात आता गणपतीस्तोत्र, मारुतीस्तोत्र, रामरक्षा इंग्रजीत आहे का असं विचारतात. म्हणजे आता

भीमरूपी महारुद्रा

हे

Bheemroopee Mahaarudraa असं छापायचं का?

उद्या कुणी म्हणेल म्हणून

लाभले आम्हांस भाग्य

बोलतो मराठी

हे

Laabhale amhans bhagya

Bolato marathi

असं छापायचं?

आणि मग छत्रपतींच्या घोषणा

Har Har Mahadev

अश्या लिहायच्या?

त्यासुद्धा “आम्ही मराठी” असं छातीठोकपणे सांगणाऱ्या  माणसांसाठी??

 

ज्या लिपीत केवळ २६ वर्ण – त्यातही ५ स्वर आणि २१ व्यंजनं – आहेत ती रोमन समृद्ध?

की ज्यात अ ते ज्ञ असे तब्बल ४८ वर्ण – त्यात अ आ इ ई….असे १२ स्वर आणि क ते ज्ञ अशी ३६ व्यंजनं आहेत ती देवनागरी लिपी?

कृपया लक्षात घ्या मी भाषेबद्दल बोलत नाहीये, लिपीबद्दल बोलतोय. इंग्रजी भाषेच्या समृद्धीबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. पण रोमन  लिपी ( स्क्रिप्ट) मराठी भाषेसाठी का वापरावी किंबहुना का वापरू नये याबद्दल हे पोटतिडकीने केलेलं लिखाण आहे.

आज कालनिर्णय दिनदर्शिकेच्या तमीळ, तेलगू, हिंदी इत्यादि भाषेतल्या आवृत्त्या बघा. आकडे हा दिनदर्शिकेचा प्राण आहे. पण या सगळ्या छपाईमध्ये समान गोष्ट म्हणजे त्यांचे आकडे इंग्रजी भाषेत म्हणजेच रोमन लिपीत आहेत. आपणही असेच बेछूट वागत राहिलो तर साळगावकरांवर मराठी दिनदर्शिकेत इंग्रजी आकडे छापण्याची वेळ येईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

भाषा हा आत्मा असला तरी लिपीचं शरीर घेऊनच तो वावरतो.

लिपी म्हणजे काय तर चिन्हांचा खेळ. त्यातून विचार आणि भावना व्यक्त केल्या जातात. म्हणून मग आपण आता सर्रास इमोजी वापरतो. शब्द लिहायचा कंटाळा आणि व्यक्त व्हायला सोप्पं माध्यम !  म्हणजे  एका अर्थी पुन्हा आपण आदिमानवाच्या सांकेतिक भाषेकडे चाललो आहोत. ( माझ्या कोणत्याही लिखाणात मी कधीही इमोजी वापरत नाही.)

आज जगभर हेच मंथन चालू आहे. अनेकांचं म्हणणं हेच की भावना कळल्या की झालं ! पण भाषा म्हणून जसं सौंदर्य आहे तसं लिपी म्हणून आहेच की ! ते नाकारून कसं चालेल? आपलं नुसतं नाव लावून भागतं का….. आपल्या नावापुढे वडिलांचं नाव, आडनाव हे सगळं लावावसं वाटतं ना? परंपरा आणि वारसाच  तर सांगतो त्यातून. भाषा आणि लिपी यांचं नातंही असंच परंपरेचं आणि वारशाचं नातं आहे.

आज एकट्या अच्युत पालवांच्या सुलेखनाच्या जोरावर आपण देवनागरी नाही वाचवू शकत. ( जर्मनीत जगातल्या सर्व लिपींचे नमुने असलेलं संग्रहालय आहे. तिथलं देवनागरी लिपीतलं लिखाण पालव सरांच्या हातातून सजलंय…). भाषा आणि लिपी हा समूहाचा हुंकार आहे.

जागतिकीकरणाच्या फायद्यांबरोबर येणारे जे छुपे आणि भयंकर उत्पात घडवणारे तोटे आहेत त्यातला महत्त्वाचा एक म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगातलं संपुष्टात येणारं वैविध्य…! भाषा, लिपी, आहार, शेती, पोशाख या सगळ्यात येणारा एकजिनसीपणा आणि त्यातून समूळ नष्ट होत चाललेलं “देशी वाण” हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. जागतिकीकरणाला विरोध नाही पण त्यापुढे लोटांगण घालताना स्वत्व हरवणं भयावह आहे.

एकच सांगतो, आजही मी माझे बँकेचे चेक लिहिताना स्वच्छ मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचाच वापर करतो. अगदी आमच्या रोटरी इंटरनॅशनलचे चेकसुद्धा..( आणि ते पासही होतात)!

अवचटांच्या आजच्या लेखातलं हेमाडपंथी मंदिर आणि त्याला फासलेला ऑइलपेंट हे चित्रं मला का अस्वस्थ करून गेलं हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच.

माझं हे लिपीपुराण वाचून रोमन स्क्रिप्टमध्ये मराठी टायपिंग करणाऱ्या एका तरी बहाद्दराचे किंवा वाघिणीचे मतपरिवर्तन झाले तरी,

याचसाठी केला होता अट्टाहास……!

 

श्री मयूरेश गद्रे

गद्रे बंधू, डोंबिवली

(१६ मे २०२१)

संग्राहक – श्री आनंद  मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खरेदी पूर्वीची ते आँन लाईन

आठवडी बाजार आणि जत्रा या  प्रत्येक गावाच्या वैशिष्ट्यपुर्ण गो़ष्टी. शनिवार म्हणले की  आम्हाला आठवतो आमच्या गावचा म्हणजे सांगलीचा आठवडी बाजार. मारुती रोड पासून हरभट रोड ते कापड पेठ, गणपती पेठे पर्यत पसरलेला. आजच्या आँनलाईन खरेदी आणि लाँकडाऊन च्या प्रार्श्वभूमीवर याबाबतच्या आठवणी

तसं पहायला गेलं ते प्रत्येक व्यक्तीची खरेदीची सुरवात अगदी लहानपणापासून सुरु झालेली असते. पूर्वी आपल्या घरी नातेवाईक / ओळखीचे/ शेजारचे कुणीही कधीही अगदी अचानक येऊ शकत. फोनवर विचारून येणे, आधी Appointment घेणे मग येणे वेगैरे मँनर्स सांभाळण्याचा तो काळ नव्हताच मुळी. आणि घरी आलेल्याला चला सगळे मिळून हाँटेलात जाऊ आम्ही पण अजून या हाँटेलात गेलो नाही असे म्हणायचे ही ते दिवस नसायचे. अश्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी चक्क घरात पोहे/ उपमा/ शिरा / चहा / सरबत असं काहीस बनवले जायचे.

कधीकधी अचानक आलेल्या स्नेंहीमुळे आईची गडबड व्हायची, चहा घेणार का?  असे विचारताच चक्क ‘हो’  म्हणायचा तो काळ असायचा आणि थांबा आधण ठेवते असे म्हणायला आणि चहा पुड संपलीय हे लक्षात यायला एकच गाठ पडायची.

अशावेळी जा ग / जा रे कोप-यावरच्या दुकानातून चहा पुड/ आले/ बिस्किटं घेऊन ये अशी आँर्डर दिली जायची. पैसे नंतर देते असं सांग काकांना आणि काका चक्क तयार व्हायचे.  घेतलेल्या सामाना बरोबर हातावर श्रीखंडाची गोळी ठेवायला विसरायचे नाहीत

साधारण लहानपणी पहिल्यांदा अशा प्रकारचा बाजारहाट केलेला सगळ्यांनाच आठवत असेल.

वाड्यात मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ ऐन रंगात आला असताना आईचे बोलवणे आणि काहीतरी आणायला सांगणे हे जीवावर आल्यासारखे वाटायचे. मलाच का आई दरवेळेला बोलवते, माझ्या बहिणीला / भावाला पण कधी बोलवत नाही याचे दु:ख ही वाटायचे मात्र अभ्यास करत असताना असे बाहेर जाणे मात्र आवडायचं

जसं जसं मोठे होत गेलो तसे खरेदीचा आवाका वाढला आणि मग आम्हाला  आठवडा बाजारासाठी कामाला लावण्यात आले. आठवडा  बाजारासाठी यादी करणे, घरातल्यां  बरोबर  खरेदीला जाणे, दुकान (यादी) वाटून घेणे, खरेदी झाल्यावर मारुती मंदिरात समोरील रसवंती गृहात बसून लिटरच्या मापात उसाचा रस पिणे, ऐनवेळच्या यादी व्यतिरिक्त जास्ती खरेदीची मजा घेणे, बाजारहाट करताना बरोबरचीचे मित्र – मैत्रिणी भेटणॆ, त्यांचे पालक भेटणे,  मग आपल्या पालकांची ओळख करुन देणे, मग चर्चा अभ्यासावर येणे यात नेमके समोर शाळेतल्या बाई येऊन सामील होणे मग हळूच आई मी तिकडे ते घेऊन तिथे थांबतोय/ थांबतीय  ग म्हणून सटकणे, दरावरुन घासाघासी करणे, दर पटला नाही म्हणून पुढे जाणे (आणि परत पहिल्या वाल्याकडूनच त्याच दरात वस्तू घेणे), बाजूच्या मंदीरातील देवाला रस्त्यावरुनच चप्पल काढून हात जोडणे, सगळी ओझी सांभाळत चालत घरी येणे,  माल खराब निघाला तर दुस-यादिवशी बदलून घेणे त्यासाठी भांडण करणे , येताना आणि चार नवीन गोष्टी आणणे

हु:श दमलो / दमले  म्हणत परत घरात आईला मदत करणे

मस्त बाजारहाट असायचा तो. त्याची मजा माँल मधील अलिप्त वाटणा-या खरेदीला नाही, आँनलाईन खरेदीला तर नाहीच नाही. आँन लाईन खरेदी मधून “हाती आले ते पवित्र झाले ” या न्यायाने जी काही वस्तू आली ती स्विकारायची. काही कारणाने बदलायची झाल्यास ” भिक नको पण कुत्र आवर ” अशी परिस्थितीत.  त्या सगळ्या प्रोसीजर पेक्षा परत बाजारात जाऊन प्रत्यक्ष परत नवीन वस्तू आणलेली एकवेळ परवडेल. पण अर्थात श्रम / त्रास यातून थोडी मुक्तता मिळते हे नक्की

पण पारंपारिक बाजारहाट ची मजा काही वेगळीच होती हे नक्की आणि आपल्या पिढीने मस्त एन्जाॅय केला बाजारहाट, बरोबर ना?

(बाजार उठवणारा) अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

२२/०५/२१

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

?मनमंजुषेतून ?

☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ढेबेवाडी! एक टुमदार लहानसं खेडं! त्या गावातील बस स्टॅण्ड जवळच एक लहानसं तळं होतं. पाऊस चांगला झाला तर ते थोडं तलावासारखं दिसे. एरवी वर्षभर  ते  डबकं असे. या तळ्याच्या काठावर मोठे मोठे खडक होते. जवळच एक वडाचं झाड होतं. पंचायतीच्या मदतीने झाडाभोवती एक पार बांधला होता.झाडाची सावली खडकांच्या काही भागांवर पडत असे.झाडाच्या चारी बाजूंनी पारंब्या लोंबत होत्या. सकाळी गावातल्या बायका धुणीभांडी करायला येत. संध्याकाळी पुरुष लोकांची बैठक असे पारावर.गावातल्या मुलांसाठी हे एक प्रकारचं जिमच होतं म्हणा ना!

आज ऊन्हाचा तडाखा काही वेगळाच होता. उन मी म्हणत होतं. झाडाचं एकही पान हलत नव्हतं. एस. टी स्टँड च्या पायऱ्यांवर बसलेला लंगडा भिकारी कुणीतरी दिलेला पावाचा कोरडाच तुकडा खात होता. खाऊन झाल्यावर त्यानं हात अंगातल्या घामानं भिजलेल्या कळकट्ट शर्टच्या बाहीला पुसला. त्याच हातानं त्यानं कपाळावरुन खाली ओघळलेला घामही पुसला. पावाचे कण त्याच्या घामानं चिकचिकलेल्या गालाला चिकटले.आता त्याला तहान लागली . शेजारी पायरीला टेकवून ऊभी केलेली काठी त्यानं उजव्या हातानं पकडली. लंगडत लंगडत काठी ओढत तो समोरच्या कोपऱ्यातल्या नळावर गेला.अशक्त , कृश, ऊजवा पाय वर करुन , काठी आधारासाठी काखेत धरून त्यानं तोटी फिरवली. किं. . ‌ . किं. . किं. . करत नळ उघडला.आपली हाताची ओंजळ तोल सावरत तोटीला लावली. ओणवा होऊन त्यानं तोंड ओंजळीपर्यंत नेलं. पाण्याचे काही थेंब त्याच्या हातावर सांडले. नळ भकास तोटी करून त्याच्या ओंजळीकडं कोरडाच बघत होता.आपलं तोंड ओंजळीला लावून ते थेंब तीर्था सारखे त्यानं चाटले. वडावरचे दोन कावळे कर्कश काकसूर लावत उडाले.धाडधाड आवाज करत दोनची एस. टी. स्टॅंडवर आली. त्या लाल डब्याच्या खिडकीच्या काचा खणखाण आवाज करत ओरडल्या. कंडक्टर धाडकन दार उघडून उतरला. त्यानं शिट्टी कर्कश्शवाणी वाजवून एस. टी. मागं घेतली. पुण्याच्या थांब्यावर आणून थांबवली. एस. टी च्या लाला पिवळ्या पत्र्यावर हातानं थाड थाड वाजवून ड्रायव्हरला ब्रेक लावायचा इशारा दिला.एस. टीनं मागच्या धुराड्यातून काळा गरम धूर सोडला. भस्स भस्स आवाज करत , श्वास टाकत तिचा वरखाली होणारा ऊर हळूहळू शांत झाला. ड्रायव्हरनं त्याच्या सीटवरून खाली ऊडी मारली.त्याच्या बाजूचं अर्धं दार खाडकन उघडून थाडकन बंद केलं. खिडकीची आधीच खिळखिळी झालेली , तुटलेली काच आपलं अस्तित्व दाखवत आवाज करत खुडमुडली.

आपले नाकावर नसलेले मास्क कानाच्या खुंटीवरून काढून दोघं चहाच्या टपरीकडं वळले.

एवढा वेळ बाकड्यावर वाट बघत बसलेले सरपंच, उपसरपंच, कोरोनाची पुण्यातली ताजी खबर ऐकायला पोट आणि पोटावरून घसरणारी पॅंट सावरत टपरी कडं पळाले. लगोलग चार-पाच जणांचं टोळकं तयार झालं. कोरोनच्या बातम्या रंजकतेनं सांगितल्या जाऊ लागल्या. स्टार माझा किंवा आजतक पेक्षा जास्त रंजक, भडक, अतिरंजित आणि धडकी भरवणाऱ्या होत्या.

गण्या, परशा आणि वासू थोडा वेळ ऐकत थांबले.

नंतर ते तळ्याकडं गेले. पाण्यात पाय सोडून ते खडकावर बसले.

त्यांच्या गावात अजूनही कोरोनाचं पाऊल पडलं नव्हतं. पण सायन्सच्या मोघे सरांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. या महामारीचं गांभीर्य त्यांना समजलं होतं. ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू, ऑक्सिजन गळती, हॉस्पिटलमध्ये सातत्यानं होरपळणारे पेशंटस्. बातम्या ऐकून आज त्यांचा सूर पारंब्या चा खेळ थांबला होता. पाण्यात भाकरी ऊठत नव्हत्या. लहान लहान पावलं स्थिर होती. पाण्यात हलवून लाटांचा आवाज सुध्दा करत नव्हती.

वासूचा चेहरा खूपच गंभीर झाला होता.

तो म्हणाला, “काहीतरी करायला पाहिजे गड्या.”

परशा, जा बर, आपल्या सगळ्या दोस्तांना बोलव इकडं”

परशानं ओळखलं, वासूच्या डोक्यात काही तरी शिजतय. तो पळालाच. पळता पळता तो हाका मारत होता. “ए गंम्प्या, ए, मन्या या रे तळ्यावर.”

“अरे एक राजा चल की. वाश्या बोलवतोय बघ.”

थोड्याच वेळात वडाखाली वानरसेना जमली. सावल्या लांब होईपर्यंत चर्चा सुरू होती. टोळक नंतर मोघे सरांच्या घराकड गेलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठची गाडी गावच्या वेशीवर च आडवली गेली. वासू, गण्या, परशा बरोबर त्यांचे बरेच शाळासोबती रस्ता अडवून ऊभे होते. ड्रायव्हरला गाडी थांबवावीच लागली. कंडक्टर खाली उतरला. वासू त्याच्याशी काही बोलला. गाडी तून एक एक पॅसेंजर खाली उतरु लागले. गण्या थर्मल गन घेऊन ऊभा होता. परशा  प्रवाशांनी मास्क नीट घातलाय ना हे बघू लागला.

वासू प्रत्येकाच्या बोटाला oxymeter लावून बघत होता. राजा तेवढ्यात भाषण ठोकून कोरोनाच्या सोवळ्याचे नियम सांगू लागला.काही मुलांनी गावात, स्टॅंडवर, जिथं जमेल तिथं कोरोनात घेण्याच्या काळजी घे, नियमांचे फलक लावले.आख्ख्या ढेबेवाडीचा नूरच बदलला.सरपंचांनी चावडीवर मुलांना सहकार्य करण्याचं फर्मान  सोडलं.आजही उन्हाळा तोच होता. रखरख तशीच होती. स्टॅंडवर एस. टी तशीच खडखडाट करत येत होती. पण एक सूज्ञ विचारांचा वारा गावात गारवा पसरवत होता. तळ्यातलं पाणी लहान लहान लाटांतून हसत होतं.

वडाखाली गाय शांत झोपली होती. वडाच्या झाडाची हिरवी सळसळ वाऱ्याबरोबर आनंद तरंग पसरवत होती.

 

सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

? जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ? श्री सुहास सोहोनी ?

(एक सांगीतिक कोडं! खाली दिलेल्या लेखात भारतीय संगीतामधील 37 रागांच्या नांवांची गुंफण केलेली आहे. लेख नीट लक्ष देऊन वाचा आणि ते राग  ओळखून दाखवा!!)

पूर्वी शिमगा, दसरा या सणांच्या दिवशी कोंकणात घरोघरी गोमू, बाल्ये, बहुरूपी, वासुदेव – हे लोक गाणी म्हणत यायचे. आताच्या काळात त्यांचं प्रमाण कमी कमी होत चाललेलंय्. त्यात जसे कोंकणातले स्थानिक लोक असायचे, तसे परराज्यातले लोक सुद्धा असायचे. मारवाडी, गुजरीतोड्ये, गौड प्रांतीय, तिरंगी, या समाजातले हे फिरस्ते लोक असायचे. हे सारे विविध भाषांतली लोकगीत म्हणायचे. तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ कुठे समजत होता? पण चाल ठेका धरायला लावायची. कोंकण, गोवा या प्रांतातल्या लोकांच्या रक्तातच संगीत भिनलेलं आहे! राजस्थानी फिरस्ते तर जौंधपुरी नाचही करून दाखवत असत. डोक्यावर भला मोठा, भुसा भरलेला पांढरा पक्षी घेऊन हंसाचा ध्वनी काढून दाखवणं, ही त्या पहाडी कलाकारांची खासियत होती. त्यांना तोडीस तोड म्हणून कुडाळ देसकार हिंडोल पक्ष्यांचा आवाज काढून मजा आणायचे. त्यातले काही दशावतारी नट देखील होते. ते नाटकांतली गाणी सुद्धा गायचे. ही नाट्यकला व तिचा मालवणी अविष्कार या गोष्टी परंपरेतून आलेल्या असत.  फाल्गुन सरल्यावर वसंताचं आगमन झालं की निसर्गात रंगीबेरंगी फुलांचं बहारदार प्रदर्शन भरायचं. अशा वेळी अंगावर पट्टे ओढलेले, काहीसे सुधारलेले, स्वतःला शंकराचे भक्त – भैरव वंशीय समजणारे, जंगलातले भिल्ल फुलांच्या माळा गळ्यात घालून यायचे आणि अडाण्यासारखे काही-बाही गायचे. काही वेळा बंगाली बैरागी जादूगार यायचे. ते स्वतःला दरबारी जादूगार मानायचे. कालीसह दुर्गामातेची पूजा करून ते जादूचे अघोरी प्रयोग करीत असत. एका कलिंगडाचे नुसत्या हातांनी क्षणार्धांत दोन तुकडे करून त्याच्या पोटातून बर्फाच्या गारा, मुलतानी मातीचे खडे, अशा वस्तू काढून जनांवर संमोहिनी घालीत असत. भीती वाटायची ते प्रयोग बघतांना. शहाणा माणूस पण वेडा व्हायचा. आणि हे सर्व चालू असतांना हातात डमरू आणि तोंडातून सतत ऱ्हाम्-ऱ्हीम्-ऱ्हुम् असं चालूच असे! कानडा प्रांतीय कलाकार प्राणी-पक्षी घेऊन यायचे. डमरूच्या ठेक्यावर बोकड, कुत्र्याचं पिल्लू, माकड, यांचे खेळ बघतांना हसून हसून पुरेवाट व्हायची! बोकडाचा नाच, माकडाच्या उड्या मस्तच! किती वेळ पाहिलं तरी समाधानच होत नसे. मग तो माकडवाला त्याच्या कानडी हिंदीत “अब बस हो गया जी! अब काफी हो गया जी” असं म्हणत पैसे गोळा करायला लागायचा. नंद म्हणजे उत्तर भारतीय गवळी समाजाचे लोक. हे गाई किंवा नंदीबैल घेऊन यायचे. ते श्रीकृष्णाची गाणी म्हणायचे. “लल्ला, बेडा कर दे पार, खोल दे बंद सरग के दार”. सोबत गोवंशीय वस्तू, म्हणजे गाईचं तूप, लोणी, घुंगुर, शिंगाना लावायचे गोंडे, अशा वस्तू (माल) सुद्धा ते विकायला घेऊन यायचे. काही वेळा पंजाबी सरदारजी खांद्याला हार्मोनियम लटकवून यायचे आणि नानकगुरूंची बिलावली भक्तीगीतं गायचे. कधी कधी नाथपंथीय अंगाला राख फासून यायचे व गोरखनाथांची कल्याणकारी हिंदी गाणी ऐकवायचे. अशी खूप खूप गाणी घरच्या घरी ऐकायला मिळाली त्या काळी!!

              ?????

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्षमा….. ☆ मा.भारती ठाकूर

? मनमंजुषेतून ?

☆ क्षमा….. ☆ मा.भारती ठाकूर ☆

(नर्मदालयच्या मा. भारती ठाकूर यांनी लिहिलेली अप्रतिम कथा.)

नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड. रोज किमान 56-60 हून अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली, समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवस भर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची.

शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, “अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं. मला त्रास होतो त्याचा.” मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, “ काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना. काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल. मग कापतेच मी त्याच्या फांद्या. चालेल ना ?”

“ठीक आहे. पण लवकर काप. मी पडलो पाय घसरून तर ?” इति काका.

“हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या. प्रॉमिस काका !” माझे ठरलेलं उत्तर .

एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. “त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप . फार दिवसापासून ऐकतोय तुझं. आज कापते- उद्या कापते. आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या.” एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनार काका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही. माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त  त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या  जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.

ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की  माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.

पश्चाताप तर लगेचच झाला. पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता. त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.

पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढलं. आश्चर्य म्हणजे एकही फांदी  सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं. पाने हिरवीकंच आणि टवटवीत. पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही. खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले. सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं.

एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती. झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते. झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते . त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली. ‘दीदी, त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?” मी अक्षरश: रडवेली झाले होते.

“There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you.” 

“काय? झाडाला सॉरी म्हणू ?” खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या.

झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले, एक व्याकुळता माझ्या बोलण्यात – स्पर्शात आपोआपच यायला लागली.

जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं.  तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या  दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.. दहा-बारा दिवस होऊन गेले.  एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली.  जणू म्हणत होती, “शोध मला. बघ मी आलेय”.  आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं.  पण थोडा वेळच.  शेवटी मन शंकेखोर.  हा निव्वळ योगायोग  तर नाही ?  पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी  पानोपान बहरली. फुलेही उमलू लागली.  मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली  आहे.

पहिला फोन सरस्वती दीदींना  केला.  माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?

त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले,  “आता जन्मात कधी मी असे वागणार नाही.  पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का !”

 

©  भारती ठाकूर

नर्मदालय, लेपा  पुनर्वास (बैरागढ) जिल्हा खरगोन मध्य प्रदेश.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज काळ इतका बदलला आहे की, समर्थांच्या काळानुरूप त्यांना अपेक्षित असणाऱ्या सत्वगुणांच्या कसोट्या आता तंतोतंत वापरता येणं शक्य नाही,  असंच म्हणावं लागेल.  समाजमनाची धारणा, माणसाची जीवन-पध्दती, जीवनमूल्ये, आयुष्याकडे बघण्याची आणि विचारांची दिशा — सगळंच खूप बदललं आहे. त्यामुळे समर्थांच्या काळानुरूप तेव्हा अपेक्षित असणाऱ्या  सत्वगुणांनुसार  प्रत्यक्ष आचरण करता येणे आता खरोखरच अवघड आहे असं  नाईलाजाने म्हणावे लागेल. पण तरीही “भक्ती निकट अंतरंगे”असा जो सत्वगुणाचा एक सर्वोत्तम निकष समर्थांनी सांगितला आहे, तो मात्र त्रिकालाबाधित असा आहे— काळ कितीही बदलला तरीही आचरणात आणण्यासारखा आहे. कारण ”अंतरंगाशी निकट असणारी भक्ती”ही परमेशाप्रती असावी, असा याचा शब्दशः अर्थ असला, तरी आजचा काळ लक्षात घेता,  याचा अभिप्रेत अर्थ मात्र आता नक्कीच अधिक व्यापक असायला हवा. पण म्हणजे कसा? तर तो असा असायला हवा असे मला वाटते. —-सत्वगुण अंगी बाळगण्याचा मुख्य हेतू मनात कमालीची भक्तिभावना निर्माण करणे — म्हणजे त्यासाठी ध्यास घेणे –मग तो स्वतःतच वसणाऱ्या परमेशाची ओळख पटवून देणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा ध्यास असू शकतो—- उत्तम विचारांचा- उत्तम आचारांचा ध्यास — उत्तम ते शिकण्याचा ध्यास — इतरांशी वागतांना,  त्यांच्या जातीधर्मानुसार, त्यांच्या कामानुसार, त्यांच्या शारीरिक,  बौद्धिक किंवा आर्थिक क्षमतेनुसार भेदभाव न करता, सगळ्यांशी सारख्याच सौहार्दाने, प्रेमाने, आपलेपणाने वागण्याचा ध्यास — इतरांना निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकी मदत करत रहाण्याचा ध्यास … इथे मी नुकतंच वाचलेलं एक छान वाक्य मला आठवतंय, जे आजच्या व्यावहारिक जगाशी नातं सांगणारं, त्याच भाषेतलं असलं, तरी समर्थांच्या उपदेशाच्याच थेट जवळ जाणारं आहे —–”वाणी,  वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे— आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल.” वाहवा. —-. आज वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर,  माणसाला  क्षणोक्षणी अस्थिरतेच्या, अनिश्चिततेच्या स्वैर झोक्यावर, हतबल होऊन बसायला भाग पाडणाऱ्या अनिर्बंध परिस्थितीत, कितीही विपरीत परिस्थिती ओढवली तरी श्रध्येय देवतेवरचा आणि मुख्यतः स्वतःवरचा विश्वास ढळू न देता, मन शांत व स्थिरच कसे राहील यासाठी आवर्जून आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याचाही ध्यासच घेणे गरजेचे झालेले आहे.

“देव आहे‘– आणि माझ्यातही नक्कीच ईश्वरी अंश आहे” अशी जाणीव मनापासून व्हावी, असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण प्रत्येकजण हे सत्य जाणवण्याइतका सजग नसतो. मग तसे सतत सजग रहाण्याचा ध्यास घेणे, हाही महत्वाचा सत्वगुणच — ज्याला काळाचे बंधन नाही. मग, “माझ्यात जसा ईश्वरी अंश आहे, तसाच तो इतर प्रत्येक सजीवातही नक्कीच असणार“ हे मान्य करता येणे अवघड मुळीच नाही आणि तसे एकदा खात्रीपूर्वक मान्य केले,  की मग समर्थांना अपेक्षित असणारा सत्वगुण उच्च कोटीवर पोहोचायला कितीसा वेळ लागणार?

“देवा– सोडव रे बाबा आता लवकर” असं हताशपणे म्हणतांना आपण अनेकांना ऐकतो. पण “सोडव” म्हणजे “मरण दे”हा एकच अर्थ त्यात अभिप्रेत असतो का? तर अजिबातच नाही. “सोडव”म्हणजे ‘आयुष्यातल्या कटकटींपासून, समस्यांपासून, मनाचा गुंतवळ करून टाकणाऱ्या परिस्थितीपासून तू सोडव‘ अशी खरंतर ती भीक मागितलेली असते. पण देवाकडे अशी भीक मागण्याची माणसाला गरजच नाही, असेच समर्थांचे ठाम म्हणणे असावे, असे दासबोध वाचतांना प्रकर्षाने जाणवते. कारण आत्मरक्षणासाठी सतत सज्ज असलेल्या सशक्त सत्वगुणांना आवर्जून, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक, आणि मनापासून पाचारण केले, त्यांना मनापासून आपले मानले, तर देव स्वतः वेगवेगळ्या रूपात माणसाला भेटायला येईल– फक्त  ‘तो मला ओळखता यायलाच हवा” असा ध्यास मात्र मनात बाळगला पाहिजे. मग जगण्याचा कुठलाही मार्ग, अगदी नाईलाज म्हणून जरी निवडावा लागला तरीही, त्या मार्गावर परमशक्तीवरच्या विश्वासाच्या, श्रद्धेच्या आणि भक्तीच्या पायघड्या घालून, त्यावर फक्त सत्वगुणांचीच फुले उधळत जाण्याचा निश्चय केला, की मग कुठल्याही मार्गाने गेले तरी अंती तो जगन्नियंता, परमेशाचे आपल्यासाठी श्रध्येय असणारे स्वरूप घेऊन, आपल्या रक्षणासाठी, आणि त्याही पुढे जाऊन, मानवजन्माचे अंतिम उद्दिष्ट साध्य करून देण्यासाठी सज्ज असणारच.

——— सध्याच्या परिस्थितीला अनुरूप असा हाच बोध समर्थांनाही अपेक्षित असावा असे मनापासून म्हणावेसे वाटते.

{ समाप्त }

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ मनमंजुषेतून ☆ सत्वगुण लक्षण – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसाचा दुर्मिळ जन्म मिळूनही, त्याचा अंतिम उद्देश ज्यांच्या अजिबात लक्षात येत नाही, अशा सर्वसामान्यांसाठी श्री समर्थ रामदासांना “श्री दासबोध” हा ग्रंथ लिहावासा वाटला असावा, असे या ग्रंथाच्या पानोपानी जाणवते. माणसाची दिनचर्या कशी असावी, त्याने राहावे कसे, बोलावे कसे, वागावे कसे, चांगले म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, इतक्या सगळ्या रोजच्या आचरणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपासून सुरुवात करून, अखेर, एकमेव शाश्वत असे जे परब्रह्म, ते जाणून घेण्यासाठी आवश्यक अशा आत्मज्ञानाच्या खुणा अंगात कशा बाणवायच्या,  या समजण्यास अतिशय अवघड गोष्टीपर्यंतचे सर्व ज्ञान सामान्यांना यातून मिळावे हा या ग्रंथाचा स्पष्ट हेतू असावा. अर्थात सामान्य माणसाला या पायरीपर्यंत पोहोचायला एक मानव जन्म पुरणारच नाही हेही समर्थ नक्कीच जाणून होते. आणि म्हणूनच  कोणते सद्गुण,  म्हणजेच सत्वगुण अंगी बाणवले तर अखेर “त्या जगन्नियंत्या परब्रम्हाचे दर्शन होणे” या मानव-जन्माच्या अंतिम उद्दिष्टाच्या दिशेने निदान वाटचाल तरी सुरु करणे मानवाला शक्य होईल, हेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारे सांगितले असावे असे वाटते. अंगी सत्वगुण बाळगणे हा यासाठीचा त्यातल्या त्यात शॉर्टकट असावा असेच पूर्ण वेळ वाटत रहावे, इतका हा मुद्दा या ग्रंथाच्या केंद्रस्थानी असल्याचेही जाणवत रहाते  —-  आणि मग आजच्या काळानुरूप सत्वगुण म्हणजे नेमके काय अपेक्षित असावे, हा प्रश्न पडतो —- त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

मानवी स्वभावातले ‘सत्व- रज – तम‘ हे ठळकपणे दिसणारे तीनही गुण सारखेच शक्तिशाली असतात. आणि कुठलीही शक्ती कशी वापरली जाते, यावर तिचा परिणाम अवलंबून असतो.  रज आणि तम हे गुण स्वतःभोवती, प्रपंचाभोवती, आणि परिणामतः ऐहिक गोष्टींभोवती फिरत राहणारे, तर सत्वगुण सतत स्वतःमधून स्वतःला बाहेर काढणारा, आणि सतत त्या परमशक्तीकडे आकर्षित करणारा. त्यामुळेच, “जग माझ्यासाठी आहे“ ही भावना रज-तम गुणांमुळे निर्माण होते.  तर “ मी जगासाठी आहे “ ही भावना वारंवार जागृत करतात ते सत्वगुण –अशी थोडक्यात व्याख्या करता येईल.  हे सत्वगुण “परमदुर्लभ“ असं समर्थांनी अगदी सार्थपणे म्हटलं आहे. कारण असं असावं की, मुळातच सगळ्या सजीवांबद्दल, “ते खऱ्या अर्थाने  स्वजातीय  आहेत, माझे स्वकीय आहेत“, अशी आपलेपणाची, जवळकीची भावना मनात उपजतच असणं अत्यंत अवघड असतं. पण निश्चयपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक सत्वगुण अंगिकारले तर ते सहजसाध्य होऊ शकतं, हा विश्वास समर्थ देतात. “मी जगासाठी आहे“ अशी मनाची ठाम धारणा झाली की, हळूहळू इतर प्रत्येक माणसाबद्दल प्रेमभावना वाटू लागते. ती वागण्यातही दिसू लागते. आप-पर भाव नकळत पुसट-पुसट व्हायला लागतो. मग आपोआपच मोह-क्रोध-मत्सरादी षड्रिपूंचा मनातला धुमाकूळ हळूहळू आणि स्वतःच्याही नकळत कमी व्हायला लागतो आणि मनही नकळत शांत- समाधानी होऊ लागतं. अर्थात “ठरवलं आणि झालं“ असा साधा- सरळ मामला नसतोच हा. यासाठी जाणीवपूर्वक सातत्याने प्रयत्न करावे लागतात. हळूहळू तो जेव्हा जगण्याचाच भाग होऊन जातो, प्रत्येक सजीवात परमात्म्याचा अंश आहे ही भावना मनात पक्की रुजते, तेव्हा मग परमात्मास्वरूप असणाऱ्या स्वतःच्या आवडत्या देवरूपाकडे,  सद्गुरुंकडे मन ओढ घ्यायला लागतं — कारण तो जागोजागी असल्याचं अंतर्मनाला जाणवायला लागतं. आणि नकळतपणे  मनातून “मी“ हद्दपार होऊ लागतो. मग स्वतःवर दुःख कोसळले, किंवा सुखे हात जोडून समोर उभी राहिली, तरी या कशानेच मन विचलित होत नाही. ते अधिकाधिक विशाल होत जातं –वृत्तीचा संकुचितपणा आपोआप कमी होत जातो. इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो, आणखी सकारात्मक होतो आणि रज – तमापेक्षा सत्वगुण अत्यंत आनंददायक, शांतीदायक, सुखदायक असल्याची खात्री पटू लागते. प्रपंचात राहूनही परमार्थ साधण्याचा मार्ग उघडपणे समोर दिसू लागणे, ही याची पुढची पायरी. मग इतर कशाहीपेक्षा ईश्वराबद्दल सर्वाधिक ओढ, प्रेम वाटू लागते. स्वतःच्या दुःखांची बोच नगण्य वाटायला लागते. आणि इतरांची दुःखे कमी करण्यासाठी हात आपोआपच पुढे होतात. संत ज्ञानेश्वर – तुकाराम यांच्यासारखे अनेक संत म्हणजे  सत्वगुणांची मूर्तिमंत उदाहरणे.  सत्वगुण म्हणजे काय, कोणत्या कृतीमध्ये  ते ठळकपणे  दिसून येतात, हे श्री समर्थांनी दासबोधाच्या दुसऱ्या दशकातल्या  सातव्या  समासात विस्तृतपणे सांगितले आहे.

 क्रमशः….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆ 

सह्याद्रीच्या डोंगररांगात अनेक घळी आहेत, अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध ही आहेत पण सर्वात प्रसिद्धीला आली ती श्री रामदास स्वामींची शिवथरघळ!

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, वरंधा घाटाच्या कुशीत ही घळ विराजमान झालेली आहे. ही घळ चारी बाजूंनी हिरव्यागार झाडांनी झाकून गेली आहे. सतराव्या शतकात श्री.रामदासांनी निबीड अरण्यात, निसर्गसंपन्न स्थळी असलेल्या ह्या घळीची ध्यान धारणेसाठी निवड केली. समर्थांनी बावीस वर्षे इथं वास्तव्य केले आणि ह्या घळीतच दासबोधा सारख्या आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती झाली. श्री. कल्याणस्वामी नी हा ग्रंथ अक्षरबंद केला. ह्या ग्रंथाद्वारे रामदासस्वामींनी सर्व जाती,पंथ, धर्माच्या स्त्री पुरुषांना उपदेश केला आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला.शिवराय आणि समर्थ रामदासांची पहिली भेट  ह्याच घळीत झाली.

या घळीत रहाण्या मागचा रामदासांचा ग्रंथनिर्मिती हा एकमेव हेतू नव्हता तर त्यांचा महत्त्वाचा हेतू होता की शिवरायांना स्वराज्य बांधणीत मदत करणे. डोई जड झालेले जावळीचे चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांची खबर विजापूरला कळवतात, हे ध्यानात येताच समर्थांनी मठा मंदिरा द्वारे जावळी खोऱ्याची संबंध प्रस्थापित केले. तेथील आम जनतेला स्वराज्याच्या बाजुला ओढून घेतले. पुढे शिवाजी महाराजांनी मोर्‍यांचा निपात केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी हे दोन्ही हिरे शिवाजी महाराजांना गवसले.

अफजलखान  विजापूरहून निघाला त्यावेळी याच घळीतून रामदासांनी शिवबांना निरोप धाडला “केसरी गुहेसमीप मस्तीत चालला”.

“एकांती विवेक करुनी इष्ट योजना करावी.”

समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजे शिवथर घळ.

समर्थानंतर तब्बल अडीचशे वर्षे कुणालाच या घळीची माहिती नव्हती. “रामदास गोसाव्याची गुहा” असं या घळीला म्हटले जायचे. समर्थ साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक धुळ्याचे शंकरराव देव यांनी काही कागदपत्रांच्या आधारे एकोणीशे तीस साली या घळीचा शोध लावला. नंतर एकोणीसशे पन्नास साली समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. त्यांच्या पुढाकाराने या संपूर्ण जागेचे नूतनीकरण करण्यात आले, पर्यटकांना चढण्यास सोपे जावे म्हणून पायऱ्या बांधून दोन्ही बाजूला लोखंडी रॉड लावले गेले. पायथ्यापासून शंभर पायऱ्या चढून आल्यावर घळीपाशी पोचता येते. घळीत समोरच समर्थांच्या बसण्याची जागा आहे. सुमारे एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घळीत दगड आणि माती यांचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहावी म्हणून खिडकी सारख्या पोकळ्या ठेवल्या आहेत. या घळीच्या  बाजूला असलेला धबधबा 100 फुटावरून खाली पडतो, उन्हाळा व हिवाळ्यात या धबधब्याचे पाणी शांत व मनोहरी दिसते. पण पावसाळ्यात हेच पाणी तांडव नृत्य करणाऱ्या शंकराचे रूप घेते.  घळीत आजही शांतता आणि गारवा जाणवतो निसर्गाचा हा गारवा यांत्रिक एअर कंडिशनिंग पेक्षा जास्त गार आहे. या घळीत रामदास स्वामी दासबोध सांगताहेत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अशा दोन मूर्ती पहावयास मिळतात.

शिवथर घळ येथे सेवा समितीच्या इमारतीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

समर्थांनी या घळीला “सुंदर मठ असे म्हटले आहे.”

ही जागा अशी आहे की एक वेगळीच मनशांती इथे लाभते. अशी मनशांती मिळण्याचे भाग्य आम्ही सहलीला  गेलो तेव्हा मला लाभली. अशी ही अद्भुत घळ आपणही पहावी म्हणून हा सारा खटाटोप.

।।जय जय रघुवीर समर्थ.।।

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“वैजू सारखं वागायला जमत नाही ग आपल्याला. ती कशी कुणी चौकस भेटलं की तिच्या लेकीच्या उत्तम करिअरबद्दल कौतुकाने बोलत सुटते. विचारणार्याची कोरडी काळजी ओठावर यायला संधीच देत नाही.” उषाने त्यांच्या मैत्रिणीचा वैजूचा दाखला देत म्हटलं.

“हो ना! वैजू म्हणते की, ‘लोकांना सतत काहीतरी चघळायला हवं असतं. आपण कशाला त्यांचं च्युइन्गम व्हायचं? आपल्या काळजातलं कुसळ दाखवायचं?”

“बरोबरच आहे तिचं. पण….” म्हणत दोघी  गप्पच बसल्या.  आपापल्या विचारात मग्न झाल्या आणि मग निमूट घरी निघाल्या

* * *

लॅच् की ने दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यावर उषाने घाईघाईने पुढ्यातली भाजी आवरायला घेतली.

“शी! काय पसारा केलायस आई माझ्या खोलीत.” पर्स ठेवता ठेवता मानसीने शेरा मारलाच.

“हे मॅच बघताहेत आमच्या रूम मध्ये. म्हणून मालिका बघायला मी इथे बसले भाजी निवडत.” उषाने खालच्या मानेने म्हटलं.

“आवर ते सगळं लवकर” मानसीच्या आवाजातून बासगिरी डोकावलीच.

काल मॉलमधून आणलेले ड्रेस घालून बघताना मानसीने खोलीभर टाकलेला पिशव्या, हँगर्स, पिनान्चा पसारा उषाने आज सकाळीच आवरला होता. मुकाट्याने भाजीचा पसारा आवरताना तिने डोळ्यातलं पाणीसुद्धा आवरलं…..

समाप्त

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

 

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“अलीकडे रात्री बराच वेळ झोप लागत नाही.वेड्यासारखे विचार मनात येतात. वाटतं की काळ पंधरा वीस वर्षांनी मागे जावा.किती छान स्थळं येत होती तेव्हा मानसीसाठी. हुशार, स्मार्ट, पाच आकडी पगार घेणारी एकुलती एक लाडकी लेक आमची. काहीतरी निमित्त काढून चांगली चांगली स्थळं तेव्हा नाकारली मानसीने. ठाण्याचा  एक मुलगा तर अगदी परफेक्ट मॅच होता मानसीला.  पण ‘त्याची माझी उंची जवळजवळ सारखीच आहे’ असलं खुसपट काढून मानसीने त्यालासुद्धा नाकारलं. यांनी किती समजूत काढली होती तिची.त्यावेळी  मानसीची बाजू घेण्याचा मूर्खपणा मी केला नसता तर……” उषाच्या मनातली खदखद बाहेर पडत होती.

उषाच्या हातावर हलकेच थोपटल्यासारखं करीत नलू म्हणाली  ” जॉर्जबद्दल तर तुला माहितेय.  चंदाच्याच ऑफिसमधला हुशार, सालस मुलगा. केवळ दुसर्‍या धर्माचा म्हणून यांनी टोकाचा विरोध केला. तो लग्न करून, अमेरिकेला जाऊन चांगला सेटल झाला. आणि ‘आता मला लग्नच करायचं नाही’ म्हणून चंदा हट्ट धरून बसलीय.”

“आजचा जमाना असता ना तर आधी लग्न करून नंतर त्यांनी तुम्हाला कळवलं असतं.”

“ते परवडलं असतं. हे गेल्यानंतर कधी नाही इतकं एकटं  वाटतं आताशा”. नलू खिन्न होऊन  म्हणाली.

“मला तर हल्ली जवळच्या नात्यात सुद्धा कुठल्या कार्याला जावसं वाटत नाही. तिकडे आडवळणाने गाडी शेवटी मानसीच्या लग्नावर  येते.”

“परवा मुंजीला  गेले होते, तेव्हा ओळखीच्या  एका बाईंनी चंदा साठी घटस्फोटित स्थळ सुचवलं. धीर करून घरी बोलले मात्र, चंदा एखाद्या वाघिणीसारखी चवताळली. तिने घेतलेल्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहायला जाते म्हणाली.”

“अगबाई,मग? अरुणाने समजुत काढली का तिची?”

“काढणारच. सगळ्याच स्वार्थी आणि मतलबी झाल्येत आजकाल. चंदा सढळपणे घरात खर्च करते. मग तिची मर्जी सांभाळत अरुणा सगळं तिच्या हातात आयतं देते. ‘आत्या आत्या’ करत मुलं चंदाकडून हॉटेलिंग, उंची कपडे, गेम्स वसूल करतात. शिवाय चंदा तिच्या भाड्याने दिलेल्या फ्लॅटचं उत्पन्न थोडंच  सोडणारेय? कधी लाडीगोडी लावून अरूणा  मुलांना चंदाच्या खोलीत झोपायला लावते. राजा-राणीचं  दार लागलं की मलाच काहीतरी अपराध केल्यासारखं वाटतं.” नलूने मनातली खंत  व्यक्त केली.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print