मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे

: निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे

ऑफिस मधला एक सहकारी रामानंद आज सेवानिवृत्त झाला. त्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कोणी ही  सेवानिवृत्त होतानाचा हा दिवस खूपच वेगळा असतो.  सकाळी 9 ते संध्याकाळी 6, दिवस भर एकत्र काम करणे, खाणे- जेवणे, एकमेकांवर रागावणे, रुसणे, एकमेकांची काळजी घेणे, आपलं काम

जितकंं चांगले करता येईल तितका प्रयत्न करणे.  या सर्वात इतकी वर्षे कशी गेली कळतच नाही. सेवानिवृत्त होणारी व्यक्ती उद्यापासून आपल्यात नसणार ही हुरहुर सर्वांना अस्वस्थ करते. निवृत्त होणार्या व्यक्तीच्या  मनात तर भावनांचे काहूर माजलेले असते. काळीज गलबलून गेलेले असते.  मनातलं  वादळ, गलबलणं, चेहर्यावर दिसत असतं. खूप ह्रदयस्पर्शी असतो तो दिवस.

रामानंदच्या निरोप समारंभाचा प्रसंग.  आज प्रास्ताविकापासून सगळं  वातावरण घरगुती स्वरूपाचं होतं. प्रेमळ आणि साधेपणाचं होतं.  आपण घरी जसे एकत्र जमून छोटंसं स्नेहपूर्ण संमेलन करतो, अगदी तसं…..कुठेच औपचारिकता नाही, कुणाचा ईगो नाही, सर्वच जण आपापली post ची शाल आपल्या जागेवर ठेऊन मनमोकळ्या स्वच्छ मनाने एकत्र जमले होते. मनाच्या कोपर्यात चलबिचल होती, रामानंद उद्या पासून ऑफिस मध्ये असणार नाही याची.

रामानंद मॅनेजिंग डायरेक्टर श्री भट सर यांच्या ऑफिस मध्ये attendant म्हणून काम करत होता. पर्सोनल खात्याच्या श्री बाल्लीकर सरांनी त्याच्या कामाची मोजक्या पण अर्थपूर्ण, यथोचित आणि नेमक्या शब्दात प्रशंसा केली.  ते काही वरवरचे शब्द नव्हते.  त्यातलं खरेपण आम्ही सर्वांनी अनुभवलेलं होतं. त्याचं पटपट चालणं, चटचट काम करणं, भराभर फाईल्स पोहोचवणं. कधीच  कामचुकारपणा नाही, वेळकाढूपणा नाही कि कंटाळा नाही.  चालण्या बोलण्यात, काम करण्यात ex- serviceman ची शिस्त आणि तत्परता होती. नेहमीच स्वच्छ, व्यवस्थित  inshirt केलेला पेहराव.  गबाळेपणाला थारा नाही. ना वागण्यात, ना बोलण्यात, ना कामात. आजही त्यानं घातलेला गुलाबी शर्ट त्याला छान शोभत होता. त्याच्याच सहकारी मित्रांनी त्याला आज प्रेमानं भेट दिला होता.

स्टेजवर होते फक्त दोघं. भटसर आणि रोज सकाळी आल्यावर चहा देणारा रामानंद. मला भट सरांचही कौतुक वाटलं आणि मनातला आदर दुणावला.

रामानंदला तुला काही बोलायचं आहे का असं विचारण्यात आले.  खूपदा निवृत्त होणारा नाही बोलत. मन असंख्य आठवणीनी आणि भावनांनी व्याकुळ झालेलं असतं. डोळ्यांच्या काठांवर थोपवलेलं पाणी कोणत्याही क्षणी  कोसळेल असं वाटत असतं. पण रामानंदनं सुखद धक्काच दिला. तो बोलायला उभा राहिला.  …….” MD साहेबा, सब बडे साहेबा, और मित्रों…. हे शब्द मनाला स्पर्शून गेले. पहिल्यांदाच त्याचं इतकं सलग बोलणं ऐकलं. एरव्ही कामाशिवाय तो जास्त बोलत नसे. त्याच्या शब्दातून, भावना व्यक्त करण्याच्या शैलीवर भारतीय सैन्य दलातील हिंदीचा प्रभाव थक्क करणारा होता. अतिशय सहज, सोप्या भाषेत त्याने मनातले भाव व्यक्त केले. मनाच्या गाभार्यातून आलेल्या ह्रदयस्पर्शी भावना साध्या शब्दातूनही किती सुंदर परिणाम साधतात, हे सर्वांनी कडकडून वाजवलेल्या टाळ्यांनी सिद्ध केले.

सैन्य दलातून निवृत्ती घेऊन तो 18 वर्षांपूर्वी EDC त आला. आज तो याही सेवेतून मुक्त झाला.  मुलं अजून शिकत होती.  आर्थिक परिस्थिती पण जेमतेमच.  पण कुठेच त्रासिक पणा नाही, रड नाही, ” आणि दोन वर्षे वाढवून द्या, एक तरी  द्या……” अशी भीक नाही मागितली. शांत, समाधानी, नम्र स्वभाव. उद्यापासून काय करायचं ते आधीच ठेवलेलं. वयाची साठी आली तरी आरोग्य ठणठणीत कसं ठेवायचं ते त्याच्याकडून शिकावं.

Healthy mind stays in healthy body. समाधानी वृत्तीच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते. कामचुकारपणा? लबाडी, अति हव्यास, हेवेदावे, मत्सर, खरेपणाचा अभाव अशा वृत्तींमुळे आपण सुखाला मुकतो आणि आनंदाला पारखे होतो.

रामानंदची समाधानी वृत्ती, सतत  कार्यरत रहाण्याची धडपड, आणि साधेपणा खूपकाही शिकवून गेला. आभार मानताना त्यानं हिंदीतून व्यक्त केलेलं अस्खलित आणि ओघवतं मनोगत खूपच भावलं.

इतकी वर्षे आपल्या बरोबर असणार्या सहकारी मित्राची नवी ओळख सर्वांचंच मन हेलावून गेली. वयाच्या 18 व्या वर्षी भारतीय सैन्य दलात सामील होऊन 40 व्या वर्षापर्यंत तेथील कडक शिस्तीचे, कठोर परिश्रमांची नोकरी संपवून घरी आला. Ex serviceman म्हणून आमच्या ऑफिस मध्ये आला.  आता 58 व्या वर्षी निवृत्त झाला. आता तो त्यांच्या घराण्याचा पारंपारिक व्यवसाय आनंदाने करतो. मासे गरवण्याचा. म्हणजे गळ टाकून मासे पकडणे.

आधी देशसेवा, नंतर राज्यसेवा, आता पारंपरिक व्यवसाय.  सर्वार्थाने आयुष्यातली परिपूर्ती हीच आहे ना!

 

© सौ.अमृता देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

शिक्षण- B.A B.Com शालेय शिक्षण ज्युबिली कन्या शाळा मिरज, महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालय

छंद- वाचन, लिखाण, शिवण मैदानी खेळात (खोखो, कबड्डी, ऍथलेटिक्‍स, अनेक बक्षिसे एक वर्ष विलिंग्डन जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड)

पुरस्कार- १) कौशिक प्रकाशन सातारा २) मराठी विज्ञान परिषद इस्लामपूर  ३) ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी ४) रामकृष्ण मिशन

आणखी बरेच लहान-मोठे निबंधातील पुरस्कार (सकाळच्या मुक्तपीठ स्मार्ट सोबती मध्ये आलेले लेख, राष्ट्रसेविका समितीच्या हस्तलिखितासाठी गेली पाच वर्षे लेखकांची निवड, नवरत्न नाथ नगरी दिवाळी अंकांमधून आलेले लेख)

☆ मनमंजुषेतून : मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

आम्ही शेतात रहात असल्यामुळे साप, विंचू, चोर यांच्यापासून रक्षण होण्यासाठी कुत्र्याची गरज होती. योगायोगाने सुंदर ठुसक्या बांधण्याची, पिवळे ठिपके असलेली कुत्री कुठून तरी अचानक आली आणि आमची होऊन राहिली. नामकरण झालं पिंकी. टॉमी कुत्रा आणि पिंकी परिसराचे राखण छान करायचे. आमच्या लहान मुलांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते आणि आणि ते दोघे मिळवून मुलांना छान सांभाळायचे. आता पिंकी छान रुळली होती. आता तिला पहिल्यांदाच पिल्लं होणार म्हणून तिची बडदास्त चालली होती. लवकरच तिला दहा पिल्ल झाली. अगदी गोंडस पिल! त्यांच्यासाठी एक छोटसं घर तयार केलं. बाळंतिणीची व्यवस्थाही छान चालली होती. पिंकी  बाहेरून आली की पिल्ले धावत जाऊन पिण्यासाठी तिला झुंबा याची. एक दिवस अचानक पिंकी गायब झाली. खूप शोध घेतला, पण नाही कुठेच नाही. पिल्लांना आम्ही खाऊ घालून वाढवत होतो. एके दिवशी अचानक दुपारी एका कुत्र्याचा आक्रोश ऐकायला आला. पिंकीचा होता तो आक्रोश. पोट खपाटीला अंगावर गोमाशा, गळ्यात नायलॉन च्या कुरतडून तोडलेल्या दोरीचा थोटुक अशी अवस्था पाहिली आणि खात्री पटली की तिला कोणीतरी पळवून नेल होत. दुरून आल्याने ती धापा टाकीत होती. पिलांच्या जवळ जात होती. पिल तोपर्यंत आईला विसरली होती. तिचा रागरंग बघून पिल्ल दूर जायला लागली. रात्री बाळासाठी कडा उतरून येणारी हिरकणी मला आठवली. आम्ही पिंकीला खायला देत होतो, जवळ घेत होतो. पण तिला फक्त पिल जवळ हवी होती. मी एक आई असल्याने मला कल्पना सुचली. दोन  पिलांना उचलून तिच्या पोटाजवळ नेल आणि (अहो आश्चर्यम्) पिलानी आईला ओळखलं. माया, वात्सल्य, प्रेम, करुणा, अत्यानंद सगळ्या भावना ओसंडून वहायला लागल्या. बिन दुधाची कोरडीच, पण सगळ्या भावनांनी तट्ट भरलेली आचळ पिल्ल चुकू चुकू ओढायला लागली. मोकळ्या पोटी प्रेमाचा पान्हा फुटला होता. आता पुन्हा ती पिलां बरोबर आपल्या घरात रहायला लागली. पिल्ल मोठी झाली. त्यांचा सर्वांना जीव लागला होता. चांगलं घर बघून, त्यांना ओवाळून, ‘नीट सांभाळा हो’ असो सांगून हळूहळू दिली गेली. प्रत्येक पिल्लू देताना डोळ्यात पाणी उभ रहायचं पण कुठंतरी भावनांवर नियंत्रण ठेवायला हवच ना! मातृ मंदिरात पिंकी एकटीच राहिली. दिवस रहात नाहीत.

आता टॉमी आणि पिंकी दोघेही म्हातारे झाले. टॉमी कॅन्सर होऊन देवाघरी गेला. दोघांनीही आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. न फिटणारे. आता पिंकीचे ही खाणेपिणे कमी झाले. तिला डोळ्याला ही कमी दिसायला लागले. तिचे हाल होऊ नयेत, अशी आम्ही रोज प्रार्थना करीत होतो. दिवाळीचा आनंद सर्वांना मिळवून दिलान. दिवाळीतला लाडू खाल्लान. आणि दुसरे दिवशी सकाळी शांत पणाने प्राण सोडलान.

मातृमंदिर ओसाड झालं. मोकळं झालं. तेथेच तिची उत्तरक्रिया करून वर चाफ्या च झाड लावलं आणि त्या झाडावर पाटी लावली “मातृमंदिर”

 

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुवर्णक्षण- मोदी भेटीचा ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ. अस्मिता इनामदार

परिचय

जन्मतारीख – १३/१२/१९४५

शिक्षण – बी.ए. डी.सी.ओ.एस्

साहित्यिक कारकीर्द 

दोन काव्यसंग्रह – कविता अंतरीच्या काव्यसंग्रह, शब्दुली चारोळीसंग्रह

दैनिके व मासिकांमधून कवितांना प्रसिद्धी, नवतरंग प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कवितेचा समावेश

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग. ( सातारा , सांगली , पुणे , कराड , इंदौर , डोंबिवली )

अखिल भारतीय महिला कवयित्री परिषद , दिल्ली  ह्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्त्व, संस्कारभारती , सांगली साहित्यविभाग प्रमुख, स्पर्धा परीक्षक म्हणून नेमणूक, कवि विचारमंच, शेगाव कडून साहित्यातील योग

सांगली / कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन

आरोग्य संवेदना , सांगली कार्यकारिणीत कार्यरत, महात्मा गांधी ग्रंथालय कार्यवाह

सम्मान / पुरस्कार –  शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कार, इतिहास संशोधन मंडळ , संगमनेर उल्लेखनीय काव्य पुरस्कार, प्रतिष्ठा प्रतिष्ठान , सांगली साहित्य पुरस्कार,  सरोजिनी नायडू पुरस्कार दिल्ली येथे कविता अंतरीच्या पुस्तकाला, कै.सुरेश कुलकर्णी पुरस्कार – सुधांशू , औदुंबर, अनेक काव्यस्पर्धेत पुरस्कार, कल्पना फिल्म असो. कला मंच , मिरज – सन्मानपत्र, श्री समर्थ साहित्य , कला , क्रिडा व सांस्कृतिक युवा मंडळ , पलूस कडून कविता अंतरीच्या पुस्तकास पुरस्कार,  बिझनेस एक्सप्रेस, सांगली काव्यस्पर्धेत उत्तेजनार्थ, रंगत संगत प्रतिष्ठान , पुणे – सन्मानपत्र, साहित्य प्रेमी मंडळ  सोमेश्वरनगर , बारामती विशेष पुरस्कार, जिल्हा ग्रंथालय आयोजित ग्रंथोत्सवात उत्कृष्ट वाचक प्रमाणपत्र, आदर्श कार्यकर्ती संस्कारभारतीचा पुरस्कार,दानाबद्दल शब्दभारती पुरस्कार, ऑनलाईन स्पर्धांमधून ९४ प्रमाणपत्रे

 

☆ मनमंजुषेतून: सुवर्णक्षण- मोदी भेटीचा ☆ सौ.अस्मिता इनामदार 

‘अजी सोनियाचा दिनु। वरुषे अमृताचा घनु।‘ म्हणावं, असा आनंदयोग एक दिवस माझ्याही आयुष्यात आला. त्या दिवशी पाडगावकरांच्या सुप्रसिद्ध गीतात एक-दोन शब्दांचा बादल करत मला म्हणावसं वाटलं, ‘तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे. तुझे गुण गाण्यासाठी शब्द लाभू दे.’ ‘तुझे’ म्हणजे, कै. लक्ष्मणराव इनामदार यांचे आणि तो सोनियाचा दिनु होता, 21 सप्टेंबर 2017. तो दिवस होता, कै. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीचा. हा सोहळा साजरा झाला, तो दिलीतील विज्ञानभवन येथे आणि निमंत्रक होते. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.

कै. लक्ष्मणराव इनामदार हे माझे चुलत सासरे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ते गुरू. ते वकील होते. ते मुळचे महाराष्ट्रातले असले, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी, संघप्रचारक म्हणून गुजराथमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले. ते ब्रम्हचारी होते. गुजराथमधील भ्रमंतीतच त्यांची आणि मोदीजींची भेट झाली. त्यांच्या कार्याचा प्रभाव मा. मोदीजींवर पडून ते संघाकडे ओढले गेले. लक्ष्मणरावांना त्यांनी आपले गुरू मानले. ‘आयुष्यात मी जो काही घडलो, ते केवळ वकीलसाहेबांमुळेच (लक्ष्मणरावांमुळेच),‘ असे उद्गार त्या समारंभात मोदीजींनी काढले आणि आम्हाला धन्य धन्य वाटले. समाजातील आर्थिक दुर्बलता दूर करण्यासाठी लक्ष्मणरावांनी ’सहकार भारती’ या चळवळीचा पाया घातला. ‘विना संस्कार नही सहकार’ हे त्या चळवळीचे बोधवाक्य होते. हा मंत्र मोदीजी आजही आचरणात आणतात.

21 सप्टेंबर 1917 हा लक्ष्मणरावांचा जन्म दिवस. 2017 ला या दिवशी त्यांचा जन्मशताब्दीचा सोहळा साजरा करावा, असे मोदीजींच्या मनात आले. त्याची रूपरेखा आखताना, लक्ष्मणरावांच्या परिवारातील मंडळींनाही त्यात सामील करून घ्यायला हवे, असे मोदीजींना वाटले. त्या दृष्टीने त्यांनी आखणी करायला सुरुवात केली. लक्ष्मणरावांच्या परिवारातील व्यक्तींचा शोध घेतला गेला. प्रत्येकाला स्वतंत्रपणे आमंत्रणे पाठवली. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आग्रहपूर्वक निमंत्रणे दिली गेली. त्याप्रमाणे आम्ही 20-22 जण 21 सप्टेंबर २०17 रोजी बरोबर दहा वाजता दिल्लीयेथील विज्ञानभवनावर हजार झालो. दारावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.  सभागृहातील २-३ रांगा खास आमच्यासाठी राखीव ठेवलेल्या होत्या. आमचे स्वागत करून मोठ्या सन्मानाने आम्हाला आमच्या जागी बसवले गेले. खुर्च्यांवर आमच्या नावाच्या पट्ट्या लावलेल्या होत्या. बरोबर ११ वाजता पंतप्रधान सभास्थानी आले. सुरूवातीला लक्ष्मणरावांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या गेल्या. मा. मोदीजींनी आपल्या भाषणात त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.  दोन वाजता उपस्थितांचे भोजन झाल्यावर समारंभाची सांगता झाली.

आम्हा इनामदार परिवारातील सर्वांना मोदीजींनी संध्याकाळी चार ते पाच यावेळात भेटायला बोलावले. आम्ही सर्वजण बरोबर चार वाजता जनपथावरेल त्यांच्या निवासस्थानी पोचलो. एका हॉलमध्ये आमच्या भेटीची व्यवस्था केली होती. तिथे त्यांनी आम्हा प्रत्येकाची स्वतंत्रपणे ओळख करून घेतली. कोण कोण कुठे असतं, काय काय करतं, प्रत्येकाचे लक्ष्मणरावांशी काय नाते आहे, याची चौकशी केली. या प्रसंगी त्यांनी लक्ष्मणरावांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आम्ही दिलेल्या भेटी त्यांनी स्वीकारल्या. यावेळे मला त्यांना अगदी जवळून पाहता आलं. पाच मिनिटे त्यांच्याशी बोलता आलं. त्यांना हार घालून त्यांच्याबद्दलची भावना विकत करता आली. त्यांचं ऋजु व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी समरसून बोलणं, त्यांचा शालीन, हवाहवासा वाटणारा सर्वत्र सहज वावर यामुळे मी अगदी भारावून गेले. माझ्यासाठी त्यावेळी जसा ‘अमृताचा घनु बरसला’ आणि तो ‘सोनियाचा दिनु झाला.

त्यावेळी आमच्या इनामदार परिवारासोबत त्यांचा फोटो काढला.  आजही तो फोटो पाहताना ते आंनंदक्षण माझ्यापुढे साजिवंत होतात.

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सासू होताना ☆ सुश्री मानसी काणे

☆ मनमंजुषेतून :  सासू होताना – सुश्री मानसी काणे ☆

जेंव्हापासून माझ सासू व्हायच नक्की झाल तेंव्हापासून मी जरा गोंधळूनच गेले होते. सासू म्हणजे ‘‘सारख्या सूचना’’ आणि सून म्हणजे ‘‘सूचना नको’’. म्हणजे हाताची घडी तोंडावर बोटच ठेवायला हव. काय करू? कशी करू सासूपणाची तयारी? ‘गर्भसंस्कार, आई होताना’ अशी पुस्तक असतात तस ‘’सूनसंस्कार, सासू होताना’’ अस काही पुस्तक मिळत का ते पहायला हव. मग होमवर्क म्हणून मी आधी हिंदी सिरीयल पाहिल्या. सगळ्या बा, बीजी, ममीजी, सासूजी, माँजी वगैरे भरजरी साड्या नेसून, अंगभर दागिने घालून, केसांची एकच बट पांढरी करून सुनेन केलेल्या खिरीत मीठ टाक, तिच्या जेवणात पाल टाक, तिच्या खोलीत साप सोड, तिच्या नवर्‍याचे कान भर असले उद्योग करत होत्या. ये अपने बसकी बात नहीं. मी मराठी सिरियलकडे वळले. तिथल्या सासवा सारख सुनेला खाऊन घे, विश्रांती घे, मी तुझा डबा भरते, गजरा घाल, माहेरी जा थोडययात तू उनाडयया कर मी सगळ काम करते अस म्हणत होत्या.  ये भी अपने बस की बात नहीं.  मग आता करायच तरी काय? भारदस्त दिसण्यासाठी मी कॉटनच्या कशीद्याच्या साड्या नेसू का?  आता बेडवर लोळत पडून वाचल तर चालेल ना? दुधावरची साय खाी तर बर दिसेल ना? मैत्रीणींशी फोनवर खिदळत बोलता येईल ना? सकाळी कधी उशीरा उठल तर चालेल का? आवडते सिनेमे पाहता येतील ना? नाहीतर येणारी ती म्हणायची ‘‘काय हे आईंच अगोचर वागण! माझी आई नाही हो अस वागत. ’’अरे बापरे! आता तिची स्पेस जपायची म्हणजे माझी स्पेस घालवायची की काय?

तिला सांगू का ‘‘कि बाई तुझा नवरा म्हणजे माझा मुलगा अजून लहानच आहे. त्याला भूक लागलेली समजत नाही. आपणच समजून घ्यायला लागत. त्याला चहात साय चालत नाही. आमटी फार दाट नको  फार पातळही नको असते. शेपू करडई तो खात नाही. पोळीवर कधीतरी जाम लागतो.  लहर आली की तूपसाखरही मागतो. ’’सांगू का तिला हे सगळ? पण नकोच.  ह्यांना काय वाटतय ते विचाराव म्हणून पाहिल तर ते मस्त निवांत होते. या बाबा लोकांकड ‘‘शाबास सूनबाई’’ चा मंत्र असतो. त्यामुळ सून खूष आणि तिच्याकडचे लोक म्हणतात बाबा अगदी रॉयल आहेत.  पण आई थोड्या ‘ह्या’ आहेत.  आता या ‘ह्या’ चा अर्थ हटवादी, अडेलतट्टू, फटकळ असा काहीही हो ऊ शकतो. आता काय करायच बाई?  मला पडलेले प्रश्न माझ्या आई, आजी, पणजीला पडले असतील का? एका परयया स्वतंत्र विचाराच्या व्यक्तीला आपल्यात सामावून घेताना त्याना काही अडचण आली नसेल का? विचार करत करत मी डोळे मिटले.

माझ्या कानावर बांगड्यांची नाजूक किणकिण आली. पैंजण रुणझुणले. कोरी साडी सळसळली. मोगरा दरवळला, ‘‘आई, आले हं मी’’कानात बासरी वाजली. तिचा रेशमी लाजरा वावर मनाला मोह पाडू लागला. मुलाच्या चेहर्‍यावर न मावणारा आनंद माझ्या मनावर पसरू लागला. सगळ घर मोहरलेल्या आंब्यासारख दिसू लागल. ही किमया तिच्या आगमनाची होती हो! आपल घर सोडून माझ्या घराच्या उंबरठ्यावरच माप ओलांडून दुधात विरघळणार्‍या साखरेसारखी माझ्या घरात मिसळून जायला ती आली आहे. माझी नजर माझ्या आई, आजी, पणजीची झाली.  मी बदलून गेले. ए आई नसले तरी अहो आई आहे ना . मी तिच मनापासून स्वागत केल. दाराला तोरण लागलच होत. मनालाही मोत्याची महिरप लागली. घर सोनेरी किरणानी उजळून गेल. सासू म्हणजे ‘‘सामंजस्याचा सूर’’ आणि सून म्हणजे ‘‘सूर नवा’’. दोघीनी एकत्र मिळून रियाज केला की गाण नक्की सुरेल होणार. मी डोळे उघडले. सनई चौघडा वाजू लागला. अत्तराचा गंध दरवळला. लग्नघर सजल आणि सासू व्हायला मी सज्ज झाले. ***

© सुश्री मानसी काणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाळ- एक संस्कृती ☆ श्री राजीव दिवाण

☆ मनमंजुषेतून :  चाळ- एक संस्कृती –  श्री राजीव दिवाण ☆

ह्या चाळीत जन्माला आलेली नि वाढलेली ही तिसरी पिढी. पण कामानिमित्त इतरत्र रहायला गेलेले, कोणी मुंबई बाहेर,कोणी परदेशी तर कोणी जागा लहान पडते म्हणून वेगळी चूल मांडलेले. पुढील आठवड्यात शक्यतो सर्वांनी एकत्र येऊन,बसून ठरवायचं होतं कि आता ही चाळ पाडून नवी इमारत बांधून काढायची. चाळमालकानी तशी सर्वांना रितसर नोटीस पाठवली होती …. कोर्टाची..

महानगरपालिकेने ऑडिट करून “ सदरहू इमारत जुनी असून धोकादायक म्हणून जाहीर करणेत येत आहे” असा बोर्ड लावला.

सत्तरीच्या जवळ पोहोचलेली ही इमारत….तीला “चाळ”म्हणून संबोधलं जायचं. पंधरा बाय पंधराच्या पंचवीस खोल्या,म्हणजे पंचवीस कुटूंबं…सर्व जाती,धर्माच्या माणसांनी व्यापलेली ही ” चाळ” म्हणजे “आसेतूहिमाचल” भारताची प्रतिनिधीच… गेल्या तीन पिढ्यांचा जन्म ते मृत्यू हा प्रवास ह्याचाळीनं पाहिला…ती हि “चाळ”. ह्या चाळीत काय साजरं झालं नाही ते विचारा… एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालात येणारा प्रत्येक सण,प्रत्येक कुटूंबाच्या सहभागानेच साजरा झाला. संक्रांतीचा तिळगुळ जोशी-देवधरांच्या घरातून निघून व्हाया पाटील खोतांकडून अगदी शेख-फर्नांडिसांपर्यंत वाटला जायचा… तीच बाब इतर सर्व सणांची… होळीला तर बोंबलायला झाडून सगळी पोरं उत्साहाने हजर. चाळीच्या गणपतीच्या सजावटीची सगळी जबाबदारी शेखसाबची..चाचा मंडप,सजावट, टेबल,खूर्च्या भाड्याने देत होते ना…ईदचा शीरकुर्म्याची लज्जत सगळे लुटायचे.  देवधरांच्या सुली( सुलेखा) ची डिलीव्हरी झाली..मुलगा झाला तो ईदच्या दिवशी तर भाभीला काय आनंद झाला..म्हणाली..”चाळमंदी महम्मद आया….शुभशकून हूया” . हीच सुली शाळेचा अभ्यास जिन्यावर बसून करताना ,इस्त्रीवाल्या भैय्याला ओरडायची ” चाचाss..गावो मत,मै अभ्यास करती हूँ “..” हां हां मालूम है.बडी आयी डागदर बननेवाली” .  दिवसातून चारवेळा तरी दोघाचं असं भांडण व्हायंचच…सुली दहावीच्या पेपरला जाताना सगळ्यांच्या घरी जाऊन नमस्कार करून निघाली नि जाता जाता जिन्याखाली बस्तान ठोकलेल्या इस्त्री वाल्या भैयालाही नमस्कार करायची विसरली नाही. सुली ग्रॅज्युएट झाली…दोन वर्ष नोकरी झाली नि लग्न ठरलं… लग्नाला निघताना चाचाला नमस्कार करायला गेली तेंव्हा भरल्या डोळ्यांनी चाचा बोलला” हे गंगामैया..का बोलू , हमार बिटूवा भी अब बडी हुई होगी..!!!”

पाटील काकांचा अर्जुन  लहानपणापासून  एक नंबरचा दंगेखोर नि , टग्या. सगळ्यांना अगदी नको जीव करून सोडलेलं.हाच टग्या  मिलीट्रीत भरती झाला तेंव्हा प्रत्येक घरातल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात अश्रू तरारले होते. एकेक घुंगरू एकमेकांना बांधून तयार करतात त्यालाही ” चाळ” म्हणतात..सार्यांचाताल,सूर,लय,जसं एकंच असतं ना तशीच एकरूपता ह्या इमारतीच्या माणसांच्या वागण्यातून व्यक्त व्हायची ..म्हणूनच ती “चाळ”असावी.

अशीही चाळ आता पडली. दोनतीन वर्षात उंच मनोरेवजा फ्लॅटसिस्टीम उभी राहिली. कुटूंबं रहायला आली. काळ पुढे जात होता, पण चाळीतला जिवंतपणा नि जिव्हाळा काही जाणवेना. चाळ असताना सदैव उघडे असलेले घराचे दरवाजे आता सेफ्टी डोअरसह सतत बंदच दिसू लागले. पोरांचा किलबिलाट नाही, जिन्याखालील भैयाचं गाणं नाही. कुणाकडे कोण आला,कोण गेला कशाचा कशाला पत्ता नाही.

मोडक्या चाळीतून निघताना पाहिलेली सारी स्वप्नं ह्या फ्लॅटसिस्टीम मधे जणू “ फ्लॅट” होवून गेली.

 

© श्री राजीव दिवाण.

भ्रमणध्वनी ९६१९४२५१५१

वॉटस्अप ८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ मनमंजुषेतून : माझ्या खिडकीतून ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

माझ्या खिडकीतून दिसतात

रात्री नक्षत्रे नि तारे

आणि दिवसा वाहत असतात

झुळूझुळू मंजुळ वारे ….

 

खरंच् …खिडकी…! कित्ती अर्थ आहेत हो ह्या शब्दाचे…मनाची खिडकी, जगाची खिडकी घराची खिडकी ,हृदयाची खिडकी … वा…वा..वा….! एकूणच खिडकी फार महत्वाची असते . खिडकी नव्हे ? खिडक्या नसतील तर…घराला अर्थच राहणार नाही, किंबहुना घराला घरपणच राहणार नाही…घर कसे कोंदट, उबट होऊन जाईल . दूषित वायु बाहेरच पडणार नाही .प्रणवायू मिळणार नाही , जीव गुदमरून जाईल .. खिडकी नसेल तर बाहेरचे जगच दिसत नाही. माणूस उठसूठ दारात जात नाही .. तो खिडकीत बसतो.तासं न् तास .. कोणाच्या बापाची भीती नाही !माझी खिडकी आहे…! वा….!

काय काय दिसते ह्या खिडकी तून..? अहो, अख्खे जग दिसते. नुसते खिडकीत बसले तरी अख्ख्या गल्लीची माहिती मिळते.कोण आले, कोण गेले ,कोण चालले , कुठे चालले, परत केंव्हा आले .. बाप रे….! रोज किती वाजता येतात ..जातात..एव्हढी माहिती फक्त खिडकीत बसून ….?

माझ्या घराच्या खिडकीत बसले की मला जग जिंकल्यासारखे वाटते….! पृथ्वी प्रदक्षिणा केल्यसारखे वाटते …. , घर बसल्या माझे मनोरंजन तर होतेच …व माझ्या हातून टेबला- वरील कागदांवर चांगले काही लिहूनही होते… बघा खिडकी किती महत्वाची आहे…!अख्ख्या घराचा कंट्रोल मी खिडकीतून बसल्या जागी करते ..वॅाच  ही ठेवते..! बसल्या जागेवरून… कळले का मंडळी खिडकीचे महत्व ? म्हणून मी माझ्या रूम मध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या ठेवल्या आहेत …. शुद्ध हवा ,प्रकाश , मनोरंजन,लेखन ,वाचन, गाणी ऐकणे, पेपर वाचणे ,अऽऽऽऽऽऽऽबबबब !

खिडकी कित्ती कामाची

मनोरंजन करण्याची

येणारे नि जाणारे …

हसून त्यांना बघण्याची…..!

ह्या खिडकी मुळे माझ्या मनाची खिडकी सदैव उघडी ताजीतवानी असते.भरभरून उत्साह ही खिडकी मला देते….कसा…?

उठल्या बरोबर बघावे तर …छान दाट धुके ,शुभ्र धुके .. प्रसन्न धुके ,दुधा नि पारदर्शक धुके जणू माझी वाट पाहत असते….कधी खिडकीची काच बाजूला होईल नि मॅडम आम्हाला बघतील …असे जणू धुक्याला वाटते.. आणि मग …? मी बघताच धुके प्रसन्न हसते.

आळस पळतो . अनिमिष नेत्रंनी मी धुक्याकडे पाहत राहते … न जाणे दृष्टी आड झाले तर ….!

हरवले तर ..?त्याला मनसोक्त पाहून घ्यावे ,मनात साठवावे हो … अदृश्य झाले तर… म्हणून मग मी तिथेच झोपाळ्यावर ठाणं मांडत झुलत मनसोक्त त्याचा आस्वाद घेते.हळू हळू मनावरील पडदा दूर व्हावा तसे ते धुके अलगद हळू हळू काढता पाय घेते …विरत जाते…

नि मग …डोळे मिचकावत किरणांची स्वारी दंवबिंदूंना चिडवत ,चकाकत अळवावरच्या पानांवरून ओघळणाऱ्या दवांत चमकत  मिश्किलपणे हसत माझ्या खिडकीत समोरच्या टेकडीवर झाडांवर शेंड्यांवर वेलींवर किरणे  अवखळ पणे खेळू लागतात. पाने हसतात, फुले हसतात ,दंव हसते , गवत पाती डुलतात, वेली पुढे झुकतात,  हलतात ,अंग घासतात नि किरणे हळूहळू बालकाने लोळावे तशी पहुडतात , स्थिरावतात.

हे सारे दो नयनांनी तृप्त होत मी अनिमिष नेत्रांनी बघत असते. वा …! किती सुंदर सुंदर देणग्यांचा वर्षाव निसर्ग करतो आपल्यावर..!

धुके ,किरणे,पाने  ,फुले ,फुलपांखरे ,पक्षी,सारे समोर झाडांवर ,चराचरांवर आपल्या स्वागतासाठी हजर असतात . ..हसत असतात, डुलत असतात, ओसांडत असतात …आनंद घ्या म्हणत असतात…केवढी कृपा ! असीम…!

रात्री तर माझ्या खिडकीत चांदणीच अवतरते तिच्या साऱ्या गोतावळ्याला घेऊन… समोर टेकडीव नि:शब्द शांतता असते… झाडे काळोखात बुडून गुडूप शांत झोपी जातात, वारे स्वस्थ शांत होतात , पाने अंग मिटून स्तब्ध होतात ,पक्षी गप्पा मारून झोपी जातात….खिडकीतल्या चिकूवर मात्र वटवाघळे नि पाकोळ्या घिरट्या घालतात . वटवाघळे उलटी लटकून मुटूमुटू चिकू खातात , गर खातात …सालं खाली पडतात . सकाळी झाडाखाली मला ती दिसतात … समोर टेकडीवर मात्र डोळे फाडून पाहिले तरी काही दिसत नाही….

मला वाटते , दिवसभर माझी करमणूक करून सारी मंडळी थकली वाटतं .आता त्यांना विश्रांतीची गरज आहे.मग मी शहाण्या मुलीसारखी कुरकुर न करता आपल्या लेखन कार्यात रमून जाते ते थेट बारा साडेबारा पर्यंत ….. मला मुळी कंटाळाच येत नाही माझ्या भोवताली असलेल्या या साऱ्या मंडळींमुळे…. कारण आता एवढ्या रात्री सुद्धा मी ….. हो .. खिडकीतच असते ना? हसूआलं ना ?

अहो … आहेच माझी खिडकी गुणी ? जगाची खिडकी किती ही मोठी असो ..कुणीही असो मला त्याच्याशी देणे घेणे नसते .मी माझ्या खिडकीवर एकदम खूष  आहे…हो … माझी …खिडकी ….

कंटाळा न येऊ देणारी

साऱ्या जगाची खबर देणारी ..

कोण आलं कोण गेलं सांगणारी

माझ्याशी गप्पा मारणारी

मला आनंदात ठेवणारी…..

मला खूप काही देणारी…

अशी माझी खिडकी आपल्याला बघाविशी

वाटली तर …जरूर ….या …

खिडकी तुमची वाट पाहते आहे…

 

तिचा पत्ता…. सारंग बंगला वाघ गुरूजी शाळेसमोर नाशिक १३

येताय् ना मग… ?

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कामाचे नियोजन … ☆ सुश्री अमृता देशपांडे 

☆ मनमंजुषेतून : कामाचे नियोजन… ☆ सुश्री अमृता देशपांडे

काम   काम  काम

आज काय केलं? ..आज काय झालं? ….. हे रात्री कागदावर उतरवण्यापेक्षा आज काय करायचं आहे, हे सकाळीच कागदावर नमूद करणं मला जास्त योग्य वाटतं. अशी कामांची यादी करत असताना ‘ आजच करणे आवश्यक आहे ‘ अशा कामांना प्राधान्य दिले जाते. अगदी देवाच्या फुलवायची तुपात भिजवण्या पासून बँकेत FD पुनर्जीवित करण्यापर्य॔त, घरातले पडदे धुवायला काढण्या पासून गाडीचा टायर बदलण्या पर्यंत, स्वयंपाकघरातला ओला पुसायचा स्पंज ते मागील दारातील पायपुसणे आणण्या पर्यंत, खिडक्यांचे गज स्वच्छ करण्यापासून पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्या पर्यंत, सर्व कामांना सारखंच आणि महत्त्वाचं स्थान मिळतं. एकदा का यादी तयार झाली की स्वतःलाच best of luck देऊन ती कामे पार पाडण्याच्या तयारीला मी लागते.देवपूजेनंतर त्या दिवसाच्या कामाची यादी देवासमोर ( मनात) ठेवली की वाटतं, अर्धं काम झालं.वेळेचं व्यवस्थापन महत्वाचं.

सुरवातीला केलीच पाहिजेत (must) अशी यादीत न घालायची कामे सुध्दा असतातंच की. ती तर रोजची. अंघोळ, पूजा, नाश्ता, स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाक.  पिण्याचे पाणी उकळून थर्मास भरणे, अशी अनेक. ती सर्व करता करता मध्येच बाहेर जाऊन बिलं भरणे, पण हल्ली online payment मुळे खूपच फायदा झाला आहे. जेवण झालं की आवरा आवरी  करून वर्तमानपत्र हातात घेते.कोडं सोडवता सोडवता एक डुलकी काढतेच. एखादा wrong number किंवा idea वाले, बँकेत खातं उघडायला सांगणारा फोन दुपारी जागं करायला मदतच करतात.

काही कामं अचानक समोर येतात. सकाळी मुलांची शाळेला जायची रवानगी करताना भराभर सगळं आवरून झालं की, आठ वर्षाचा चंद्रू, ”  आई, चड्डीचं बटण तुटलं” म्हणतो तेव्हा शिवण्याचं काम जसं पटकन करावं लागतं तसं अनेक कामे ” मी आधी मी आधी ” म्हणत उभी ठाकतात. एकेक काम हातावेगळं करताना, आणि एकावेळी दोन तीन कामांचा फडशा पाडताना अष्टभुजा देवी संचारल्याचा भास होतो. संध्याकाळ कधी होते कळतच नाही.

निजताना यादीतली झालेली कामे  टिक् करताना झालेला आनंद खूप सुख आणि समाधान देतो. स्वतःवर खूष होऊन ” अपनेपे गुरूर आ जाता है” म्हणत मीच पाठीवर शाबासकी देते. दिवसभरात वेळोवेळी मदत केल्याबद्दल देवाचे मनोमन आभार मानून शांतपणे उशीवर विसावते.

हां! उरलेली कामे  carry forward…… कारण कागदावरची कामे आणि प्रत्यक्ष होणारी कामे यांत माझी होणारी कसरत फक्त मीच जाणे.

पण  काहीच न करण्या पेक्षा दुसर्यावर अवलंबून न रहाता कामे करणे मला जास्त उचित वाटतं. त्यामुळे Time management, work management, situation handle करणे, priorities ठरवणे अशा  management च्या अनेक कला, skills, मी आत्मसात केल्या आहेत. कुठलंही लहान काम कमी महत्वाचं नसतं. Each work has it’s own dignity. म्हणून प्रत्येक काम महत्वाचेच असते.

Mother Teresa यांचं एक वाक्य आहे- Do small things with great love. ” कित्ती खरं आहे ना!

कुठलंही काम लहान असो  वा मोठं असो, ते जर प्रेमाने, आपुलकीने, नेकीने केलं तर ते काम केल्याचा त्रास जाणवत नाही, दमायला होत नाही, कंटाळा येत नाही. काम करण्याची सवय लागते. काहीतरी  छान करण्याची नशा काही औरच असते.  कारण मिळणारा आनंद हा स्वर्गीय असतो.

 

© सुश्री अमृता देशपांडे

पर्वरी – गोवा

मो.  9822176170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महपुरानंतरची एक आठवण ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

☆ मनमंजुषेतून : महपुरानंतरची एक आठवण  – सुश्री मीनाक्षी सरदेसाई ☆

पद्मिनी सातलाच कामाला आली. भराभरा बोलत होती.”आत्ताच काय ती भांडी टाका वयनी. सांजच्याला काय मी येनार न्हाई”.

म्हणाली तेव्हा तिचा  ठसका मला जरा बोचलाच.”आता पूर उतरून बरेच दिवस झाले. आता का तुझ रडगाणं?आम्हाला सुध्दा त्रास झालाय महापुराचा. खूप स्वच्छता करायची आहे घराची. त्यात तुझा खाडा. आम्हालाही त्रास झालाय पुराचा. किती स्वच्छता करायची आहे.”

“आज पैसे द्यायला येनार हाईत.रासन कार्ड, फोटो तयार ठ्येवायला सांगितलंय कवाबी येनार म्हनं.मानसं मोजून तितके हजार देनार”

“होय का? महत्वाचंच काम आहे. कर सगळं व्यवस्थित. नि मग ये.”

मी तिला म्हटलं. निरक्षर आहे पण व्यवहारज्ञान चांगलं आहे तिला. दोन दिवसांनी ती कामाला आली.”किती मिळाले पैसे?”

“मिळाले की चार हजार.”.

“आता ते पोस्टात ठेव. अडिअडचणीला उपयोगी पडतील.”

“व्हय, साठले की गंठन करनार. हौस भागवून घेनार.”

दुसरे दिवशी पोस्टाचं काम करणाऱ्या बाई माझ्याकडे आल्या.

नि त्याच वेळी पद्मिनी पण आली.”आणलेस का पैसे? ”

“आज आण ग बाई तीन हजार. त्या बाई सारख्या मागे लागल्यात.”

“न्हाई जमायच वयनी. पावनं म्हनाय लागलेत” कुलदैवत करून या.”

“अग पद्मे, सरकारने हे पैसे तुम्हाला का दिलेत? तुमचं महापुरातलं  नुकसान भरून काढण्यासाठी. देवाला जायला, साड्या घ्यायला नाही दिलेले. बचत कर मी म्हणतेय.”

पैसे ठेवायचा तिचा निश्चय डळमळीत झालाय हे माझ्या लक्षात आल, तरी दोन दिवसांनी तिला पुन्हा आठवण केली.

मी विचारलं. तर थोडी गोंधळलीच.म्हणाली,”भावाला राकी बांधायला त्यांच्या भैनी आल्यात.त्यानी साड्या मागितल्यात. नवरा  म्हनतोय, माजे एक हजार दे. कंदी न्हाई ते साड्या देतो त्यास्नी.”

पद्मिनी तडतडली. आणखी दोन दिवस गेले.

“पद्मे, आता उरलेले पैसे तरी ठेव ग. कधी नाही ते एकदम इतके मिळालेत. जिवाला शांतता लाभेल तुझ्या. ऊठसूठ कर्ज काढतेस. व्याज भरतेस ह्याच्यातून वर कधी येणार तू? पैसे खर्च करण सोपं असतं . शहाणी ना तू? कळत नाही?”

“वयनी, घरात पानी शिरलं तवा भिंती पार विरघळल्यात.बुरशी चढलीय.न्हवरा म्हनतोय” भिंती रंगवुयात..गनपती येनार., लोक बघायला येनार. घर झकमक करुया की.यंदा दिवाळीबी झोकात करायची असं वाटतंय घरातल्यास्नी.”

शेवटी पैसापैसा तरी कशाला मिळवायचा ?सुखासाठीच न्हवं?महापुरातलं दुःख विसरायसाटी ह्यो सुखाचा उतारा.

मी परोपरीने सांगत राहिले नि  ती कारणं पुढे ढकलत राहिली. तिला त्याचं काहीच नाही. उलट ती हसत म्हणाली,”वयनी, तुम्ही का घोर लाऊन घेताय जिवाला?तुम्ही बचत करा म्हनताय खरं, पर आम्हाला तरी येवढ्या रकमेची चैन करायला कंदी मिळनार वं? चार हजार मिळाले. घरच्या समद्यास्नी जे जे हवं त्ये करायला मिळतय,करनी धरनी झाली, द्येवाच्या नावावर ट्रिप होईल,गनपती साटी का होईना घर साजरं दिसायला लागलं,पोराची दिवाळी हुनार पद्मिनीचं ते चार्वाकी तत्वज्ञान समजायला मला जरा उशीर झाला. पण समजलं तेव्हा मी  बिनघोर झाले.

 

© सुश्री मीनाक्षी सरदेसाई

‘अनुबंध’, कृष्णा हास्पिटलजवळ, पत्रकार नगर, सांगली.४१६४१६.

मोबाईल  नंबर   9561582372, 8806955070

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मडबाथ ☆ सुश्री सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून :  मडबाथ ☆ सुश्री सावित्री जगदाळे ☆

शेतात ऊसाची रोपे लावायला गेलो होतो. आता नर्सरीत ऊसाची देखील रोपे मिळतात . ऊसाची लागण करणारी पुरुषांची टीम असते. रोपं लावायला मात्र बायकाच असतात. मग मीही बायकांबरोबर गेले. शेतात काम करण्याचा आनंद असतो. जसा लेखन वाचनात असतो. शारीर कष्टाने मनही टवटवीत होते.

रोपांची लावणी करण्याची पध्दत मला माहीत नव्हती. मी वाकून लावू लागले. तर बायका म्हणाल्या, ‘वाकून कुठवर लावशील? बसून लाव.’

‘मला दोन पायावर बसता येत नाही. बसून मागे सरकता येत नाही.’ मी म्हटलं.

‘अगं असं फतकल घालायचे. अन्‌ असं सरीवर हात टेकवून मागं सरकायचं.’

६० वय ओलांडलेल्या फुईंनी सांगितलं. मग मी बसले सरीत फतकल घालून, खुरप्याने खड्डा खणून त्यात ऊसाचे रोप लावायचे. माती घालून नीट दाबायचे. मग खुरपे , रोपांमधील अंतर मोजण्यासाठी दिलेली दोन फुटाची काटकी. रोपांचा ट्रे मागे ओढायची आणि सरीवर हात टेकूवून मागे सरकायची.  जमायला लागलं . मग मलाही हुरूप आला. बाकीच्यांनी डोक्याला टॉवेल, अंगात जुना शर्ट, कमरेला जुनं गुंडाळलेलं. त्यामुळं त्यांना कपडे खराब होण्याची भिती नव्हती. मला फुई म्हणाल्या, ‘सायबीन आली तशीच. डोक्याला काय न्हाय, अंगात काय न्हाय.’  मी म्हटलं, ‘असू द्या. कुठं ऊन आहे? आभाळ तर आलंय.’

तेवढयात पाऊस सुरूच झाला. शिरबातात्या आणि ह्यांचं सुरु,  ‘वातावरण मस्त आहे. आता रोप तकवा धरणार.’

पण आमची भंबेरी उडाली. शिरबा तात्या सगळ्यांना ट्रे आणून देत होते. मग त्यांनी छत्र्याही आणून दिल्या. ह्यांनी मला जर्कीन आणि प्लॉस्टीकची टोपी दिली. पावसामुळे चिखल झाला. सगळं अंग चिखल्याने लडबडून गेलं. साडी, जर्कीन चिखलात माखले. रोपं लावायला सगळ्यांनाच उत्साह आला मग मी तरी का उठून जाऊ. साठी, पासष्टीच्या बायका सहज माती चिखलात काम करत होत्या. पाऊस झेलत होत्या. मग मलाच का जमू नये? मी ही जिद्दीने मडबाथ घेत रोप लागण करू लागले.

© सुश्री सावित्री जगदाळे

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अबोली ☆ सुश्री मानसी चिटणीस

☆ मनमंजुषेतून :  अबोली  – सुश्री मानसी चिटणीस

लहानपणापासूनच मला अबोली आवडते..माझं नाव अबोली का ठेवलं नाहीस म्हणून मी  आईवर  कितीदातरी रूसले

असेन. आमच्या मागच्या अंगण्यात अबोलीचं रान होतं. मी रोज फुलं वेचून आणायचे आणि हट्टाने आजीकडून त्याचा गजरा करून घ्यायचे. रोज वेणीत माळायचे. त्या अबोलीच्या गजऱ्यासाठी मी माझे केस ही वाढवले होते..

चुकला पिर मशीदीत तशी मी बघावं तेव्हा त्या अबोलीच्या रोपांसोबतच असायचे..असं कोणतं नातं , ऋणानूबंध आमच्यात होते काय माहित पण माझं अबोली वेड कायम राहिलं..

लग्न झाल्यावर कित्येक वर्ष गेली आणि संसारीक अबोल्यात माझीच अबोली झाली..अंगणातली अबोली मनात लपून गेली आणि मी अबोली होत गेले. तिचे केशरी रंग रुजवत राहिले रोज नव्याने. अबोली होवून जगताना तिला नेहमीच समजायची माझी भाषा अन् मला तिची सळसळ मोहवायची.

साधारण वर्षभरापुर्वी एका झाडवाल्याकडे मला ती मिळाली  आणि माझं अबोलीप्रेम पुन्हा उफाळून  आलं. एखादी जिवलग मैत्रीण भेटावी असा आनंद झाला. वर्षभर ती छान फुलली, डवरली, मोहरली पण  साधारण महिनाभरापुर्वी काही कारणास्तव आम्हाला सगळ्यांनाच  पंधरा दिवस गावाकडेच रहावं लागलं आणि त्यावेळात घरातली सगळी झाडे सुकून गेली त्यात माझी प्रिय अबोली सुद्धा सुकली..

मन उदास होतं एकदम. ही झाडं म्हणजे माझा जीव की प्राण..पुन्हा नवी झाडं आणली , रुजवली तेव्हा जरा जिवात जिव आला..पण अबोली काही गवसली नाही..मी आजूबाजूच्या साऱ्या नर्सऱ्या शोधल्या पण कुठेच सापडली नाही आणि मनाची तलखी मात्र वाढत राहिली. असेच आठ दहा दिवस गेले..

एक दिवस दळण टाकायला गिरणीत चालले होते तेव्हा एका घराच्या अंगणात ती मला दिसली आणि मी हरखले. भराभर गिरणीत जाऊन दळणाचा डबा ठेवला आणि जवळपास धावतच पुन्हा त्या घराजवळ  आले आणि दाराची कडी वाजवली. एका काकूंनी दरवाजा उघडला. मी मागचा पुढचा विचार न करता एका दमात बोलून गेले,”मला अबोली खूप आवडते. मी घेऊ का दोन रोप तुमच्या बागेतली ? “त्यांनी आश्चर्याने मला आपादमस्तक न्याहाळले आणि हो..घ्या. एवढे बोलून दरवाजा लावून घेतला.

मी तेवढ्या परवानगीनेही खूष झाले. अलगद तिथली दोन रोपं जमिनीतून मोकळी केली आणि घरी घेऊन आले. आल्या आल्या मोगऱ्याच्या शेजारच्या कुंडीत त्यांना जागा करून दिली. पण दोन दिवस दोन्ही रोपं रुसल्यासारखी वाटत होती..मलाही करमेना त्यांना गोंजारत राहिले वेळेवर पाणी घालत राहिले..

आज सकाळी झाडांना पाणी घालायला ग्रिल  उघडलं तर काय..!दोन्ही रोपांतून दोन पिटुकल्या  कळ्या नुकत्याच उमलल्या होत्या , जशाकाही माझ्याकडे डोळे मिचकावून हसत होत्या..खूप खूप खूप आनंद झाला मला..

अबोलीने माझी मैत्री स्विकारलीय..आता ती पुन्हा फुलेल..बहरेल..मोहरेल माझ्या इतकुश्या अंगणात आणि मनातही..

 

© सुश्री मानसी चिटणीस

चिंचवडगाव

फोन : 9881132407

Please share your Post !

Shares
image_print