श्री अरविंद लिमये
☆ मनमंजुषेतून ☆ मनात घर करुन राहिलेल्या कधीच न हरवणार्या आठवणीची गोष्ट….. ‘निसटून गेलेलं बरंच कांही….’ ☆ श्री अरविंद लिमये☆
‘c/o जानकीबाई बापट, दुसरा मजला, नूर बिल्डिंग रेल्वे स्टेशनसमोर, दादर(पश्चिम) मुंबई’ हा माझ्या आयुष्यातल्या कधीकाळच्या अडीच एक वर्षांसाठीचा पत्रव्यवहाराचा पत्ता ! जुनी महत्वाची कागदपत्रे जपून ठेवतानाच अगदी जीर्ण झालेली पन्नास वर्षांपासूनची अनेक पत्रेही मी जपून ठेवलेली आहेत. नोकरी निमित्ताने प्रथमच घर सोडून मुंबईला जातानाच्या अनेक हळव्या अस्वस्थ आठवणी यातील प्रत्येक पत्राला या ना त्या रुपाने लगडलेल्या आहेत. जेमतेम वीस वर्षाचं माझं वय. घरापासून पहिल्यांदाच दूर जातानाचं हळवेपण आणि आयुष्यात मुंबईला प्रथमच आणि तेही दीर्घ वास्तव्याला जाताना असणारं अपरिहार्य दडपण सोबत घेऊन घराबाहेर पडल्यानंतरच्या पुढच्या अडीच एक वर्षातल्या असंख्य आठवणी सामावून घेतलेली मला घरुन येणारी ती जुनी पत्रे. त्या पत्रांवरचा ‘c/o जानकीबाई बापट. . . . ‘ हा पत्ता जेव्हा जेव्हा नजरेस पडतो, तेव्हा कधीच विसरता न येणार्या बापट काकूंच्या आठवणी उसळी मारुन वर येऊ लागतात.
बॅंकेत जाॅईन झाल्यानंतर काही दिवसांनंतरचा आमचा संपर्क न् सहवास पुढे माझी कोल्हापूरला बदली होईपर्यंत अबाधित राहीला,तरी त्यांचा निरोप घेऊन निघताना घरी ओढ घेणारी माझी पावलं त्यांच्या दारात अडखळली होती एवढं मात्र खरं. माझ्या नेमक्या गरजेच्या वेळी मला मदतीचा हात द्यायला त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि स्वत:ची दुखरी आठवण मागे ठेऊन निघून गेल्या.
काकूनी त्यांच्या लग्नानंतर नूर बिल्डिंग मधल्या चाळीतील दोन रुम्सच्या त्या ब्लाॅकमधेच गृहप्रवेश केला होता. आता उतारवयात तो ब्लाॅकच त्यांच्या चरितार्थाचं साधन बनलेला. त्या ब्लाॅकमधे माझ्यासारखी मुंबईत नोकरीनिमित्ताने आलेली मुलं त्या पेईंग गेस्ट म्हणून ठेऊन घ्यायच्या. एकावेळी जास्तीतजास्त चार. फक्त रहाणं,सकाळचा चहा, अंघोळ अशी सोय माफक दरात व्हायची. त्या दोनशे रुपयात त्याकाळी त्यांचा चरियार्थ जेमतेम चाले. त्यातही काटकसरीची सवय अंगी बाणवून त्या चार पैसे बाजूला ठेवीत.
तिथे माझ्यासाठी ओळख करुन घ्यायला आणि नीट सगळी चौकशी करायला मीच आग्रह केला म्हणून माझी डोंबिवलीची मावशीच आधी त्याना भेटून आली होती.
“त्याला सवय नसल्याने डोंबिवलीहून रोज लोकलच्या गर्दीतून ये जा करणे त्याला त्रासाचे वाटतेय हो. त्यामुळे इथे यायचं म्हणतोय. तो इथे राहील,दोन्हीवेळचा जेवणाचा डबा त्याच्यासाठी डोंबिवलीहून मी पाठवीन. इथं तुमच्याकडे त्याची जेवणाची सोय होऊ शकली असती तर हा प्रश्न नव्हता. जमेल का तुम्हाला. . . ?”
“अडकून पडायला होतं हो. शिवाय मुलांच्या आवडीनिवडी फार असतात. म्हणून मी ते गळ्यात घेत नाही. ”
“त्याच्या काहीही आवडीनिवडी नाहीयेत हो. हवं तर चार दिवस करुन बघा. नको वाटलं तर बंद करा. सोय झाली तर त्याला निदान रात्रीतरी गरम जेवण मिळेल. म्हणून गळ घालतेय. शेवटी तुम्ही म्हणाल तसं”
आमचे ऋणानुबंधच असे की काकू राजी झाल्या. आमचं ना नातं ना गोतं. पण काकूनी मला त्या एका होकारात घरचं जेवणच नाही फक्त तर घरपणही देऊ केलं होतं. त्यामुळे अगदी थोड्या दिवसातच मी त्या घरचाच होऊन गेलो होतो जसा कांही. त्या काळी मोबाईलच काय घरोघरी फोनही नव्हते. वडील आजारी. घरुन पाठवलेलं साधं चार ओळींचं खुशालीचं पत्रही आठ दिवसांनंतर हातात पडायचं. घरच्या काळजीने न् आठवणींनी मन व्याकुळ होत असे. आधी मावशीने आणि नंतर या बापटकाकूनी दिलेलं घरपण त्या मनोवस्थेत तर माझ्यासाठी लाखमोलाचं होतं. त्याकाळी घरोघरी गॅस नव्हते. अल्युमिनियमच्या कुकरमधे वातीच्या स्टोव्हवर रोजचा डाळभात शिजायचा. सकाळी बरोब्बर साडेआठ वाजता वाफाळलेला गरम भात माझ्या पानात असायचा. भात संपेपर्यंत तव्यावर मऊसूत पोळी तयार असायची. स्वैपाक साधाच पण अतिशय रुचकर असायचा. प्रत्येक घासागणिक तृप्ततेबरोबरच कृतज्ञतेची जाणिव मनात झिरपत रहायची.
त्या आनंदी,हसतमुख होत्या. समाधानी होत्या. त्या मुखवट्याआड एखादं बोचरं दु:ख लपलेलं असेल अशी शंकाही मला कधी आली नाही. त्यांच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी सुखात होती. ती, जावई, नातवंडं सगळेच यांना ‘ब्लाॅक विकून टाका. आमच्याकडे या. आरामात रहा’ म्हणायचे. आणि या ‘होईल तितके दिवस रहाते. ‘म्हणत हसण्यावारी न्यायच्या. काकूंचा भाऊ पूर्वापार नागपूरला. तेच यांचं माहेरघर. दिवाळीनंतर दरवर्षी न चुकता एक महिना त्या माहेरघरी जाऊन राहून यायच्या. एका वर्षी त्या नागपूरहून परत आल्या न् लगेच दुसर्या दिवशी चारधाम यात्रेची चौकशी करुन बुकींग करुनही आल्या. आठ दिवसानी यात्रेचा प्रवास सुरु होणार होता. त्या रात्री पान वाढता वाढता त्यानी हे सांगितलं
“काकू,लांबचा प्रवास करुन कालच तर आलायत. पुन्हा इतक्या लगेच चारधामची दगदग कशाला? पुन्हा नंतर जा कधीतरी”
“नंतरचं कुणी पाहिलंय आला दिवस आपला” त्या कसनुसं हसत म्हणाल्या. एरवी देवधर्म, सोवळं-ओवळं या कशाचं कधी अवडंबर न करणार्या त्यांची चारधामची ओढ आश्चर्य वाटावं अशीच होती. शिवाय लेक जावयालाही बुकींगपूर्वी त्यानी विश्वासात घेतलेल़ं नव्हतं.
“बरोबर कोण मग?” काळजीपोटी मी विचारलं.
“यात्राकंपनी बरोबरच तर जातेय. मग वेगळी सोबत ती कशाला?” त्या बोलल्या खर्या पण का कुणास ठाऊक जाताना स्वस्थचित्त नव्हत्या एवढं खरं. ट्रीपहून परतल्या ते तीच अस्वस्थता बरोबर घेऊन.
“काकू, प्रवासात कांही त्रास झाला का? तब्येत बरी नाहीय तुमची. “रात्री त्यानी अगदी घासभरच भात घेतला ते पाहून जेवताना मी विचारलं. त्यांचे डोळे भरुन आले. त्या मानेनेच ‘नाही’ म्हणाल्या.
“काकू, मला सांगा बघू काय झालंय. मोकळेपणानं बोललात तरच समजेल ना मला ?” मी काकुळतेने हे बोललो न् त्याचाच धक्का लागल्यासारखा त्यांचा बांध फुटला. त्याही परिस्थितीत उचंबळून आलेलं मनातलं सगळं त्यानी कसंबसं थोपवलं. स्वत:ला सावरलं.
“तुझं जेवण होऊ दे. मग सांगते. आत्ता बोलले तर घास अडून राहील उगीचच. . “त्या शांतपणे म्हणाल्या. त्या रात्रीचं ते सुग्रास जेवणही मला बेचवच वाटत राहीलं. ऐकलं ते मला उध्वस्त करणारं तर होतंच आणि त्या माऊलीची किंव वाटावी असंही. इतके दिवस त्यांच्या आयुष्यातली ही पडझड त्यानी मनातच कोंडून ठेवली होती. पण आज. . . . ?
त्याना एक मुलगीच नव्हती फक्त. एक मुलगाही होता. थोड्याशा आजाराचं निमित्त होऊन त्यांचा नवरा गेला तेव्हा ही दोन्ही भावंडं शाळकरी वयाची होती. आल्या परिस्थितीला तोंड द्यायला आपल्या मुलांकडे पाहूनच तर त्या पदर खोचून उभ्या राहिल्या. शिक्षण जेमतेम. स्वैपाकपाण्याची कामं करुन पुढे मुलांच्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचं काय करायचं?मग त्यानी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. एका ओळखीच्या डाॅक्टरांच्या हाॅस्पिटलमधे त्यांना नोकरीही मिळाली. दोन्ही मुलांचं सगळं व्यवस्थित करता यावं म्हणून त्यांनी कायमची ‘नाईट ड्युटी’च घेतलेली होती. मुलांची रात्रीची जेवणं आवरुन त्या ड्युटीवर जायच्या. पहाटे परत यायच्या. दिवस मुलांसाठी मोकळा ठेवायच्या. मुलं शाळेत गेली की दुपारी थोडा आराम. मग घरची सगळी कामं. मुलीनं समजुतीनं घेतलं. पण मुलाची आदळआपट हट्ट दिवसेंदिवस वाढत चालला. तो असा बिथरत का चाललाय याना समजेचना. त्या रात्री तर कहरच.
“तू आजपास्नं नाईट ड्युटीवर जायचं नाही बघ. ”
“का?”
“रात्रीच कशाला हवी ड्युटी? तू दिवसाची ड्युटी घे बघ. ”
“वेडा आहेस का तू? मग घरची कामं कुणी करायची? आणणंसवरणं, स्वैपाक, धुणीभांडी कमी कामं असतात का?”
“मुलं शाळेत चिडवतात गं मला. त्या डाॅक्टरांचं नाव घेऊन चिडवतात. मला आवडत नाही ते” ऐकलं आणि त्या संतापल्याच.
“मला नावं सांग त्यांची. उद्याच शाळेत येते तुझ्या. आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईबाबांनाही भेटते. गुडघ्याएवढी पोरं तुम्ही,अकला आहेत का तुम्हाला?”
मुलगा न जेवता घुसमटत रडत राहीला. त्याच मन:स्थितीत त्या रात्री ड्युटीवर गेल्या. सकाळी घरी आलो की त्याला जवळ घेऊन शांतपणे समजवायला हवं हा सुज्ञ विचार मनात डोकावून गेलाच. पहाटे घरी आल्या तर दार लोटलेलेच होतं. तेही किलकिलं. दार ढकलून आत आल्या न् पाहिलं तर मुलगी एकटीच झोपलेली. मुलाचं पांघरुण तिथं तसंच विस्कटलेलं. मुलगा नव्हताच. खूप शोधाशोध,पोलीस कम्प्लेंट,पेपरमधे जाहिराती सगळं झालं पण मुलगा सापडला नाहीच.
काळजाला चरे पाडणारं हे दु:ख तसंच मनाच्या तळाशी दडपून ठेऊन काकू दिवस ढकलत राहिल्या. कांहीतरी चमत्कार घडेल आणि मुलगा दत्त म्हणून समोर येऊन उभा राहिल या एकाच आशेवर त्या इतकी वर्षं दिवस ढकलत राहिल्या. यावेळी त्या नागपूरला नेहमीप्रमाणे भावाकडे गेल्या तेव्हा तिथल्या कुणी ओळखीच्या एकानं त्याना सांगितलं होतं. . ,’आम्ही चारधामला गेलो होतो नुकतेच. तेव्हा तुमच्या मुलाला आम्ही पाहीलं होतं. साधूवेशात होता. तरीही ओळख पटली होती. अंदाज घेत आम्ही त्याला नावाने हांक मारली तेव्हा त्याने दचकून मागे वळूनही पाहिलं होतं आणि मान फिरवून तरातरा निघून गेला. गर्दीत दिसेनासा झाला. ”
नेमका कुठे दिसला, भेटला काकूनी त्याना विचारुन घेतलं होतं. त्या तातडीनं चारधाम यात्रेला गेल्या होत्या ते मुलगा भेटेल या आशेने. एक नवी आशा मनात पालवली आणि क्षणात कोमेजूनही गेली. मुलगा भेटलाच नाही. कसं नशीब म्हणायचं हे ?मला हे समजलंच नसतं तर बदलीनंतर काकूंचा निरोप घेऊन निघताना माझा पाय अडखळला नसता.
आज बापट काकू हयात नाहीयेत. पूर्वी कारणपरत्त्वे कितीही धावपळीत मुंबईला जाणं होई तेव्हा त्याना आवर्जून भेटून तरी येत होतो. त्याना जाऊनही तीस वर्षं उलटून गेलीयत. पण त्यांच्या या सगळ्या दुखर्या आठवणी मात्र कालपरवाच सगळं घडून गेलं असावं इतक्या ताज्या आहेत. मला हवं ते भरभरुन द्यायलाच आल्यासारख्या त्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या. मला असं उपकृत करुन ठेऊन गेलेल्या त्यांची कधीतरी अचानक आठवण येते आणि मला जेवतानाचा तो प्रसंग आठवतो.
“तू आल्यापासून मला दोन घास जास्त जायला लागलेत” एकदा त्या म्हणाल्या होत्या.
“सं का म्हणताय? उलट दोघांचा स्वैपाक करायचा तुमचा त्रास मी वाढवलाय” मी चेष्टेने म्हणालो होतो. ऐकलं आणि त्या गंभीरच झाल्या होत्या क्षणभर. का ते मला तेव्हा कुठं माहित होतं?
“त्रास कसला रे?कितीक वर्षात कुणासाठी तरी रांधायचं, त्याची जेवणासाठी वाट पहायची हे मी विसरुनच गेले होते. तू आलास तेव्हापासून हरवलेलं ते सगळं पुन्हा परत मिळाल्यासारखं वाटतंय” त्या म्हणाल्या होत्या. . . . त्यांच्या तेव्हाच्या त्या बोलण्याचा खरा अर्थ मला त्या चारधाम यात्रेहून परत आल्या त्यानंतर समजला होता. पुढे सगळं निसटूनच गेलं. त्यांच्या हातून आणि माझ्याही. इतकी वर्ष मनात जपून ठेवलेल्या त्याच्या या आठवणी त्यांच्या नसण्यामुळे अधिकच केविलवाण्या वाटतायत मला….
© श्री अरविंद लिमये
सांगली
मो ९८२३७३८२८८
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈