मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनुभव : अंधशाळा – सुश्री सुलु जोशी

☆ मनमंजुषेतून : अनुभव : अंधशाळा – सुश्री सुलु जोशी☆

‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या बांद्रा, मुंबई येथील प्रकाशगड’मधून कार्यालयीन निवृत्ती घेतली. पुणे मुक्कामी परत. मुळातच गरजा कमी. ठरवलं की, आजवर मीच लोकांकडून मदत घेतलीय, त्याची परतफेड करायची. या कामातून पैसे नाही  मिळवायचे.  मग जूनमधे महात्मा सोसायटीपासून जवळ असलेल्या अंध मुलींच्या शाळेत गेले. ही निवासी शाळा आहे. महाराष्ट्राच्या कोनाकोप-यातून या मुली येतात. बहुतेकींची परिस्थिती अगदी बेताची. एकदम मोठ्या सुटीतच या मुली घरी जाणार. मात्र, तिथे कोणी ना कोणी सेवाभावी माणसं येऊन त्यांना शक्य आहे ती मदत करत असतात. मुख्याध्यापिकाबाईंना भेटले. म्हटलं, अवांतर वाचन, गृहपाठ करून घ्यायला आवडेल. त्यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गाचा एक तास मुक्रर करून दिला.

शाळेत चार-पाच पाय-या चढून प्रवेश केला की एक मोठं दालन लागतं. या मजल्यावर मुख्य बाईंची खोली, शाळेचं ऑफिस, स्वयंपाकघर, जेवणाचं दालन आणि उजव्या हाताला वर जाणारा जिना होता. वरच्या मजल्यावर वर्ग होते.

शाळेच्या या तळमजल्यावरच्या दालनांत पाऊल टाकलं आणि समोरून खिदळत येणा-या  दोन-तीन मुली एकदम स्तब्ध झाल्या. माझी चाहूल त्यांना कशी कळली, या संभ्रमात मी! मधे किमान वीसएक पावलांचं अंतर होतं. मी पुढं होऊन विचारलं, “पहिलीचा वर्ग कुठेय गं?” त्या तिघींनी मला घेरलंच. माझे हात, खांदे चाचपत त्या म्हणाल्या, “बाई तुम्ही नवीन? रोज येणार?” मी “हो” म्हणताच त्यांनी माझा कब्जा घेतला आणि थेट मला पहिलीत पोहोचवलं. यानं मी थोडी बावचळले. पण मग लक्षांत आलं की ही तर त्यांची नवीन माणसाची ओळख करून घ्यायची रीत आहे. त्या माझ्या स्पर्शातून, माझ्या आवाजातून माझी नोंद घेत होत्या. काही दिवसांनी लक्षांत आलं की, कुणीही समोरून येतंय असं वाटलं की, त्यांचे हात पटकन् कोपरातून उचलले जात, हाताचे पंजे ताठ होत.

पहिलीचा वर्ग सुरू झाला. हळूहळू सगळ्यांची नावे पाठ झाली. कधी त्यांना अंक, पाढे म्हणायची हुक्की येई. तर कधी चालू पुस्तकातले धडे किंवा कविता. कधी मी घरून गोष्टीची पुस्तके नेई, त्यातल्या गोष्टी आवाजी अभिनयाने वाचून दाखवी. “श्यामची आई”तील प्रकरणे त्यांना आवडत. माझ्या प्राथमिक शाळेत कविता शिकवतांना बाई एखाद्या धिटुकलीला पुढे उभं करून तिच्याकडून साभिनय नाचत-गात करून घेत, ते आठवलं. – “उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही..” ही कविता म्हणून दाखवतांना तर आवंढाच आला घशाशी. – “उजाडले, डोळे उघडले आणि मिटले”, ही कल्पना त्या कशा करत असतील? कवितेचा अर्थ समजावून सांगतांना मनाचे हाल झाले. मग मला वर्गातून आजूबाजूला काय काय दिसते, त्याचं वर्णन करतांना बाग, फुले, उंच झाडे, पक्षी – माझी कसोटी लागली. रंग तर कसे सांगणार? आपल्या नेमस्त बुद्धीला बाजूला सारून मी हे अंधपण अनुभवू लागले आणि कुठे ना कुठे वाट दिसू लागली. सहजसोपी, त्यांच्या वयाला झेपतील अशी उत्तरे सुचू लागली. “छान किती दिसते फुलपाखरू..” ही कविता प्रत्येकीच्या बाकाजवळ जाऊन, दोन्ही पंजे अंगठ्यांनी गुंफून हालचाल शिकवली आणि ह्या नविन कल्पनेत रमलेली हाताच्या पंजांची अनेक फुलपाखरे उडू लागली. पक्षी उडतात कसे? तर प्रत्येकीच्या मागे जायचं, दोन्ही हात पसरायला लावायचे आणि खांद्यातून हलवायचे. मग समजावून द्यावे लागे की आपण हात हलवले म्हणजे उडणार नाही आहोत. पंख वजनाला हलके असतात, म्हणून पक्षी उडून शकतात. आपण त्यांच्या हालचालीची नक्कल करतोय.

अधूनमधून काही मुली पेंगताहेत, असं माझ्या ध्यानी आलं. मी एका वर्गशिक्षिकेपाशी याचा उल्लेख करत म्हटलं, “का हो, या मुली वेळेवर झोपतात ना? यांची झोप पुरी होत नाही का?” त्या बाई म्हणाल्या, “अहो, अंधार पडला की झोपायची वेळ झाली, अशी नोंद आपला मेंदू घेतो. यांना मुळी अंधार काय तेच ठाऊक नाही.” चर्रकन् चटका बसला मनाला! आपले ज्ञानचक्षु आपल्याला केवढी जाणीव पुरवतात, हे कळलं.

हा अवांतर वर्ग संपला की शाळा सुरू व्हायला मधे थोडा वेळ असे. वर्गापासून फाटकापर्यंत दोन्ही हातांना लगडलेल्या मुलींना घेऊन मी फाटकाशी येई. माझा अगदी ‘विठु माझा लेकुरवाळा’ व्हायचा. किती वेळ माझ्या अंगाखांद्यावरचे हात दूर होत नसत. मग गाडीत बसले रे बसले की तिचे दार दणकन् लावण्यांत त्यांना मोठी मजा येई. त्यांचे खेळ, कार्यक्रम, गाणी, स्वातंत्र्यदिनाची परेड, यात कसा वेळ जाई, कळत नसे. ब्रेल लिपी शिकायला सुरुवातही केली होती, पण मला ती फार जमली नाही.

राखीपौर्णिमेच्या आधी काही मुलींनी येऊन विचारलं, “बाई, आमची पत्रे टाकाल का पोस्टाच्या पेटीत?” होकार भरत त्यांना विचारलं, “काय गं, अगदी जाडजूड पत्रे लिहिलीत एवढी?” त्या खुषीत हसत म्हणाल्या, “बाई, राखी पाठवतेय भावाला.” एक मात्र कबूल केलं पाहिजे की, या मुलींचे रूसवेफुगवे असत, नाही असं नाही. पण त्या आनंदी असत. मला निरोप दिला की हातात हात गुंफून शाळेतील ठरलेल्या  पायवाटेवरून गरागरा चालत सुटत.

एकदा एक मोठी मुलगी हातात टेपरेकॉर्डर घेऊन भिरीभिरी फिरतांना दिसली. मी विचारलं, “तुला कुठे जायचंय का? सोडायला येऊ का?” ती म्हणाली, “नाही हो. माझा टेप बिघडलाय. तो कसा दुरूस्त करून आणावा, कळत नाही.” मी तो ताब्यात घेऊन फिलिप्सचा ग्राहक-कक्ष शोधून काढला, दुरूस्त करून घेतला आणि तिला नेऊन दिला. तिला प्रचंड आनंद झाला. या टेपवर या मुली व्याख्याने रेकॉर्ड करून घेतात आणि ती ऐकून ऐकून अभ्यास करतात.

सुरूवातीला मोठ्या मुलींना रस्ता ओलांडणे, बस-स्टॉपची माहिती देणे, चढाय-उतरायच्या जागांची माहिती देणे, हे शिकवले जाते. मग त्यांना एकट्याने चालणे, प्रवास करणे ह्याची सवय करायला लावतात. पाठोपाठ शाळा काही नेमलेली माणसे लक्ष ठेवायला पाठवतात. सरावल्या की त्या त्यांच्या त्यांच्या जाऊ-येऊ लागतात.

सहा महिने गेले आणि मला व्हायरल फीव्हर आणि सायटिकाचा अटॅक आला. एक इंचभर सुद्धा हलता येईना. नाईलाजाने सुट्टी घ्यावी लागली. बरं वाटायला लागल्यावर एकदा शाळेत जाऊन पाहिलं, पण जिना चढता येईना. मोठ्या नाईलाजाने हे काम थांबवले.

या सहा महिन्यांनी मला खूप काही शिकवले. आजही त्या चिमण्या आठवल्या की जीव भरून येतो. त्यांचे चेहरे नाही, पण अंगाखांद्यावरचे स्पर्श कायम स्मरणांत राहतील.

 

© सुश्री सुलू जोशी

मो 9421053591

Please share your Post !

Shares
image_print