मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतले जसराज…. ☆ सुश्री आसावर केळकर-वाईकर

☆  मनमंजुषेतून : आठवणीतले जसराज…. – सुश्री आसावर केळकर-वाईकर

काहीवेळापूर्वी बातमी आली आणि मनानं खूप वर्षं मागं नेलं. अगदी शालेय वय होतं… नुकताच घरात टीव्ही आला होता आणि कुठलाही गाण्याचा कार्यक्रम त्यावर लागला कि वडिलांची हाक यायचीच… हातातलं काय असेल ते सोडून हाकेला ओ देत धावायचं आणि ‘बैस इथं.. ऐक नीट’ असं त्यांनी म्हणताच टीव्हीला डोळे लावून पाहाताना काय सुरू असेल ते सगळं कानात साठवायचा प्रयत्न करायचा… एकदा असाच टीव्हीवर कार्यक्रम सुरू झाला आणि पपांनी मला हाकारलं… मी धावत आले तर कुणीतरी मैफिलीची अगदी नुकतीच सुंदर सुरांत खूप सुरेल सुरुवात करत होतं आणि कॅमेरा त्याचवेळी फिरून प्रेक्षागृहातल्या पहिल्या रांगेत स्थानापन्न झालेल्या धोतर-झब्बा-खांद्यावर शेला अशी सुंदर वस्त्रं परिधान केलेल्या एका व्यक्तीवर स्थिरावला आणि वडिलांनी सांगितलं, ‘हे बघ… हे पंडित जसराज!’ ती त्यांच्या नावाची झालेली पहिली ओळख!

ते खुर्चीच्या हातावर कोपर टेकवून तर्जनी आणि मधलं बोट गालावर आणि उरलेली तीन बोटं हनुवटीवर ठेवून अतिशय कौतुकभरल्या नजरेनं एकाग्रपणे त्या गायकाकडं पाहात होते, त्याला ऐकत होते. पुन्हा कॅमेरा गायकाकडं वळला आणि जेमतेम वीस-बाविशीचा तो तरूण स्क्रीनवर दिसू लागला. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयातही एकूणच ‘सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्यात त्या गायकाचे सूर आणि जसराजजींच्या चेहऱ्यावरच्या त्या सुखद भावांचा खूप मोठा सहभाग असावा असं आज वाटतं. मी अजून हातावर ताल देत मात्रा मोजत आलापाचे सूर त्यात बसवण्याच्या पायरीवरच होते तेव्हां… मात्र एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तो शांतावणारा सूर आणि मैफिलीच्या सरत्या काही क्षणांमधे कॅमेऱ्यानं टिपलेला पं. जसराजजींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओसंडणारा क्षण ह्या गोष्टी तेव्हांपासून काळजात घर करून आहेत. नंतर कळलं कि तो युवा गायक म्हणजे ‘प्रतिजसराज’ म्हणून नावारुपाला येत असलेला त्यांचा पट्टशिष्य संजीव अभ्यंकर! आपण घडवलेलं सुंदर शिल्प आपल्या नजरेनं न्याहाळून त्याचा आनंद लुटण्यातलं सुख त्यादिवशी जसराजजींच्या डोळ्यांत दाटलं होतं. गुरू-शिष्याची जोडीही ‘त्यानं’ जमवावी लागते म्हणतात… ही जोडी अशा सर्वश्रेष्ठ जोड्यांपैकी एक म्हणायला हवी!

पुढं त्यांना ऐकताना तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली. पुढे काही दिवसांतच त्यांची ‘दिन की पूरिया’ ही कॅसेट आलेली आठवते. दुसऱ्या बाजूला ‘मुलतानी’ होता. ती कॅसेट कितीवेळा ऐकली असेल याची गणतीच नाही. अगदी शालेय वयात गाणं म्हणावं असं काही कळत नसताना, दिन की पुरिया आणि मुलतानीचे आरोह-अवरोहही माहीत नसताना किंबहुना रागांची ही नावंसुद्धा ऐकलेली नसताना फक्त सुरानं मोहून जाऊन कॅसेट पुन्हापुन्हा ऐकणं ही गोष्ट विलक्षणच म्हणायला हवी… ती ताकद त्या सुरांची होती, त्या लडिवाळ सुरानं मनावर घातलेल्या मोहिनीचा तो परिणाम होता!

त्यानंतर दोन-तीन वर्षांतच केव्हातरी आमच्या सांगलीच्या तरुणभारत ग्राउंडवर मोठा मंडप घातलेल्या भव्य स्टेजवरच्या मैफिलीत जसराजजींना तल्लीनतेनं गाताना डोळे भरून पाहिल्याचं आणि काना-मनात तो सूर खोलवर साठवून ठेवल्याचं आठवतं. सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहाताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! शास्त्रीय संगीत म्हटलं की बहुतांशीवेळा गळा नसणाऱ्या, संगीत न शिकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अकारणच त्याचं एक क्लिष्ट चित्र रंगवलं गेलेलं असतं. मात्र जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.

त्यांच्या बंदिशींचा एक वेगळाच ढाचा आणि बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे समोरच्या कोणत्याही वर्गवारीतल्या श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत! ही सगळी किमया म्हणजे दैवी देणगीला त्यांनी दिलेल्या अपार साधनेची जोड आणि त्याचं फलित होतं.

विचार करता जसराजजींचा भावगर्भ रससंपन्न सूर, किशोरीताईंची अफाट प्रतिभासंपन्न, विद्वत्तापूर्ण तरीही रसाळ गायकी, कुमारजींचा टोकदार सुरातील नक्षीदारपणे उभा केलेला राग, भीमसेनजींचा कमावलेला दमदार सूर अशा अनेक अद्भुत गोष्टींनी आमच्या पिढीचं संगीताचं वेड समृद्ध केलं आहे. आज काहीवेळेस स्टेजवर घडणाऱ्या काही गोष्टी मनास येत नाहीत तेव्हां त्याच्या मुळाशी कोणताच पूर्वग्रह, दुस्वास या गोष्टी नसून ह्या फक्त संगीताशी निष्ठावंत कलाकारांनी डोळ्यापुढं उभं केलेलं संगीताचं एक सुंदर, मनमोहक विश्व असतं, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली ह्या कलाकारांच्या कलेनं प्रदान केलेली आत्मसुखाची अनुभूती ल्यायलेली रत्नप्रभा असते. असे संस्कार आमच्या पिढीच्या कानांवर झाले यापरते आमचं भाग्य ते काय असावं!? ह्या व्यक्तिमत्वांनी आमचं जगणं समृद्ध केलं… मनात अनेक जाणिवांची रुजवण ह्यांच्या कलेनं केली… डोळे मिटताक्षणी ह्यांच्या सुरांनी ‘त्याचं’ दर्शन घडवलं… अस्सलपण म्हणजे काय हे ह्यांच्या सुरांनी दाखवलं!

आज स्वर्गाच्या द्वारी सुशोभन असेल आणि साक्षात कृष्णपरमात्मा, त्यांचा कृष्णलल्ला त्यांच्या स्वागताला हजर असेल… त्यानं त्यांना मिठीत घेऊन आपुलकीनं स्वर्गात पाचारण केलं असेल आणि त्यांच्या रसाळ, भावगर्भ सुरांत ‘ओम्‌ नमो भगवते वासुदेवाय’ ऐकायला ‘तो’ आतुरला असेल! भगवद्गीतेतल्या ‘त्याच्याच’

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

ह्य आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं ‘त्यानं’च जसराजजींना दिलेलं वरदान तो आत्ता अंतरी अनुभवत असेल…!

शाममुरारी.. त्यांच्या सुरांच्या रूपानं कायमस्वरूपी आनंदाचा ठेवा आमच्याही आयुष्यात ठेवलास त्यासाठी तुझे अपार ऋण!

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

फोन : ०९००३२९०३२४

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुंबईस्पिरीट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆  मनमंजुषेतून : मुंबईस्पिरीट  – श्री अमोल केळकर

Running (Raining)  successfully since २६ जुलै २००५

१५ वर्ष होतील.  अनेक प्रसंग जातायत डोळ्यासमोरुन. त्यानंतरची एक ही २६ जुलै अशी नाही की २००५ ची आठवण आली नाही मुंबई वर अनेक संकटे आली. पण २६ जुलैच्या संकटाचा वय्यक्तिक अनुभव घेतल्याने ते मनावर कायम कोरले गेलंय म्हणूनच आज सगळ्या जगासमोर भयानक आपत्ती असताना, यापूर्वी असे भयानक संकट कुठले अनुभवले?  तर २६ जुलैचा प्रलय असे मी सांगेन

दुपारी ३ ते दुस-या दिवशी उजाडेपर्यत मुंबईची जीवन वाहिनी अर्थातच लोकलच्या कुशीत, कुर्ला स्थानकात ती काळ रात्र काढली. त्यावेळी स्थानकात दोन लोकल एक ठाण्याकडे जाणारी तर एक मुंबई कडे जाणारी ज्यात मी स्वतः होतो, माझ्यासारख्या  हजारो लेकरांचा सांभाळ करत या दोन माऊली भक्कम उभ्या होत्या.

मी कुर्ला स्थानकात लोकल मधे सुखरुप अडकलोय हा घरी साधारण रात्री ७ च्या सुमारास धाडलेला शेवटचा निरोप. नंतर केवळ प्रतिक्षा.

काही तासात लोकल सुरु होऊन कुर्ल्याहून पहिल्या लोकलने परतायचे भले  रात्रीचे ११/१२ वाजले तरी चालतील ही आशा संपुष्टात आली जेंव्हा रुळावरील पाणी फलाटाला समांतर आले आणि त्यानंतरच्या थोड्याचवेळात लाईट ही गेले.

मग लक्षात यायला लागले जे घडतय ते भयानक आहे.

नेहमीसारखा भुकेला स्टेशनवरचा “वडा -पावच” धाऊन आला.

आपत्तीत लुबाडणूक करायचा विषाणू त्यावेळी इतका पसरला नव्हता त्यामुळे योग्य भावातच मिळाला.

तो खाऊन परत जाग्यावर येऊन बसलो. खिडकीची जागा आणि वाट काढून आत टपकणारा पाऊस त्यामुळे ती जागा दुस-या कुणी घेणे शक्य नव्हते. कोसळणा-या पावसाच्या प्रचंड आवाजात थोड्या थोड्या अंतराने डुलक्या घेऊन,  झुंजमूंज झाल्यावर आता रस्त्याने जायचे ठरवले

कुर्ला ( पू) ला स्टेशनबाहेर कमरेपेक्षा जास्त पाण्यातून, आफीस बॅग सांभाळत देवनार डेपो पर्यत चालत जाऊन,  नंतर बसने वाशी आणि मग वाशी- बेलापूर रिक्षा असा प्रवास करत २७ जुलै मध्यान्ही ला सुखरूप घरी पोहोचलो आणि या भयानक अनुभवाचा सुखरूप शेवट झाला.

कुणी विसरु शकेल

ती काळी रात्र  ?

जणू सागरच बनले होते

मिठी नदीचे पात्र ……

.

.

तरीही आमचे सुरु

शहरीकरणाचे सत्र

शिकलो नाही आपण

यातून काडी मात्र

(अमोल)

२६ जुलैग्रस्त  नवीमुंबईकर

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चांदीचा पेला ☆ सौ अंजली दिलीप गोखले

☆ मनमंजुषेतून : चांदीचा पेला – सौ अंजली दिलीप गोखले ☆

अमेरिकेतील नेब्रास्का या छोट्या गावांमध्ये पाच सात वर्षाची मुले खेळत होती. जवळच एक खोल पाण्याचा हौद होता. खेळता खेळता मोठ्या भावाने डी कल्सन या आपल्या लहान भावाला पाण्यात ढकलले. तो गटांगळ्या खायला लागला. सगळेजण खूप घाबरून गेले. बुडता बुडता त्याचे लक्ष आकाशाकडे गेले, तेथे त्याला अनेक रंगांच्या प्रकाशाच्या झोताने सगळे व्यापले आहे असे जाणवले. त्या प्रकाशाच्या मध्यभागी एक छानसा चेहरा दिसला, त्याचे डोळे टपोरी पण शांत होते. तेवढ्यात एका मुलाने झाडाची एक लांबलचक काठी पाण्यामध्ये खोलवर बुडवली आणि त्याने हाताने गच्च पकडली. मुलांनी त्याला ओढून काठावर आणले. पुन्हा मुलांचे खेळणे सुरू झाले.

त्यानंतर बरोबर बारा वर्षांनी डिकन्स आई बरोबर शिकागोला गेला होता. अठराशे 93 चा तो सप्टेंबर महिना होता, तिथे वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रेलिजनस अधिवेशन सुरू होते, अचानक त्या मुलाला पुन्हा हा प्रकाशाचा अजस्त्र झोत दिसला. एक व्यक्ती सभागृहामध्ये जाताना दिसली. तो मुलगा आईला म्हणाला,”आई, ज्यावेळी मी पाण्यामध्ये बुडत होतो, त्यावेळी हीच व्यक्ती आली होती.”ते दोघेही त्या इमारतीकडे धावले. ती व्यक्ती म्हणजे भारतातील प्रसिद्ध स्वामी विवेकानंद होते. दोघांनी त्यांचे आत्मिक शक्ती ला हलवून सोडणारे भाषण ऐकले आणि आणि त्यांना भेटायचे ठरवले. सतरा वर्षाच्या या मुलाच्या मनातले त्यांनी माझे गुरू व्हावे. पण आश्चर्य म्हणजे ही दोघे त्यांच्यासमोर गेल्यावर विवेकानंद म्हणाले,”नाही बेटा मी तुझा गुरु नव्हे, तुला तुझे गुरु नंतर भेटतील. ते तुला एक चांदीचा पेला भेट देतील. त्यांच्याकडून तुला ओंजळी भर आशीर्वाद मिळेल.”त्यानंतर पुन्हा त्या दोघांची कधीही गाठ पडली नाही.

विशेष गोष्ट म्हणजे पूर्वोत्तर भारतामध्ये गोरखपूर येथे 5 जानेवारी अठराशे 93 ला एका बाळाचा जन्म झाला. त्याचे नाव मुकुंद लाल घोष. हा विवेकानंदांच्या प्रमाणेच अतिशय हुशार होता. 1935 मध्ये त्याने संन्यास धर्माची दीक्षा घेतली आणि त्याचे नाव गुरूंनी योगानंद असे ठेवले. गुरू नीच त्याला संन्यास धर्मातली वरची पदवी परमहंस ही बहाल केली. पुढे योगानंद अमेरिकेमध्ये आले. अचानक दिकिन्सन आणि योगानंद यांची गाठ पडली. ते योगानंद यांचे शिष्य बनले. अकरा वर्षे झाली, दिकिन्सन योगानंद यांचा क्रिया योगा चा शिष्य झाला. अधून मधून डिके यांना चांडीच्या कपाची आठवण होत असे, विवेकानंदांचे शब्द लक्षण आत्मक आहेत, अशी ते आपली समजूत करून घेत होते.

1936 च्या अध्यात्मिक ख्रिसमसच्या दिवशी योगानंद आपल्या सर्व शिष्यांना उपहार वाटत होते. भारतामधून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांसाठी भरपूर खरेदी केली होती, त्या भेट वस्तूंचे वाटप सुरू होते. दिकिन्सन ना बोलावून त्यांनी एक भेटवस्तू दिली. ती भेटवस्तू पाहताच दिकिन्सन भावनावश होऊन गेले.

पाहतात तर काय, चांदीचा पेला! त्यांच्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावार उरला नाही. योगानंद यांना नमस्कार करून ते म्हणाले,”जवळ जवळ गेली त्रेचाळीस वर्षे मी चांदीच्या कपाची वाट पहात आहे, चांदीचा पेला दिल्याबद्दल मला अपने मनापासून आभार मानू देत. या क्रिसमसच्या रात्री माझ्याकडे दुसरे शब्दच नाहीत.”आश्चर्य म्हणजे त्यान आताच्या रात्री ज्यावेळी योगानंद यांनी ती भेट त्यांच्या हातात दिली, त्यावेळी पुन्हा त्यांना तोच झगझगीत प्रकाश दिसला आणि क्षणातच गुरुदेवांनी दिलेली भेट पाहून ते आनंदित झाले. स्वामी विवेकानंदांनी 43 वर्षापूर्वी जे सांगितले होते, ते अशा तऱ्हेने दिकिन्सन ना साक्षात अनुभवायला मिळाले. आज तोच चांदीच्या पेला त्यांच्या हातात होता, जो त्यांच्या गुरुदेवांनी, परमहंस योगानंद यांनी फक्त आणि फक्त दिकिन्सन यांच्यासाठीच आणला होता. तो चांदीचा पेला!

 – सौ अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोनाडा ☆ सुश्री दीपा पुजारी

☆ मनमंजुषेतून : कोनाडा – सुश्री दीपा पुजारी  ☆

आज सकाळपासून मन सैरभैर झालंय माझं.कारणही तसंच होतं.भावानं फोन वर सांगितलेली बातमी तशीच होती.आई बाबांनी आमचं जुनं घर पाडून नवीन बांधण्याचं ठरवलं होतं. हे कधी ना कधी होणार च होत.पण मनच ते. केंव्हाच माहेरघरी पोचलं.

आमचं घर तसं जुनंच,मातीचं, दोन मजली.जुन्या पध्दतीचं, तरीही मायेचा गारवा

देणारं! या घरात आठवणींचा खजिना होता.असच एकदा बाहेरच्या खोलीतल्या कोनाड्यात मी एक पेन लपवून ठेवलं होतं. मिलिंद, माझा लहान भाऊ, त्यानं घेऊ नये म्हणून. बाबांनी आणलेलं तेच पेन दोघांना पाहिजे असे.बरेच दिवस या कोनाड्यानं पेनाचं गुपित सांभाळून ठेवलं.त्या कोनाड्यात आईनं एक कृष्णाची मूर्ती ठेवली होती.गोकुळाष्टमी ला तिथं कोनाड्यात च सजावट करून पूजा केली जाई. याच खोलीत गणपतीचा कोनाडाही होता. चांगला लांब रुंद तसाच उंच.पुढील चौकटीला छानशी नक्षीदार कमानी होती.कोनाडा बंद करण्यासाठी लहानस दार होतं,पिटुकल्या कडीसह.

माजघरातल्या कोनाड्यांची साठवण काही वेगळीच बरं. एकात तेलाची बुधली, फणीपेटी, कंगवे, कुंकू,रिबीनी इ.वस्तू असत. दुसऱ्या कोनाड्यात वाळवून ठेवलेल्या भाज्या, कडधान्य असतं.माहेरपणाला आलेल्या माझ्या आत्त्या या कोनाड्यांमध्ये त्यांचं बालपण शोधत स्वैपांकघरातील कोनाडे म्हणजे आजच्या घरांतील स्टोअररुम! चिंच, आमसुलं,गुळ,साखर, अशांच्या

बरण्या दाटीवाटीने, नटूनथटून, उंचीनुसार ऊभ्या असतं. दुपारी आई झोपली की आम्ही त्यांच्या शी सलगी करत असू.काय, सुटलं ना तोंडाला पाणी?

या कोनाड्यात माझ्या काही हळव्या, काही लज्जतदार, काही जायकेदार,तर काही जरतारी साठवणी साठवून ठेवल्या आहेत.तुळशीवृंदावनातल्या पणतीच्या कोनाड्यात

आजी आजोबांनी सांगितलेल्या किती गोष्टींचं संस्कारांचा गाठोडं आहे.

कोनाडा हा शब्द अलिकड हद्दपार झाला असला तरी आजकालच्या फ्ल्याट मध्ये तो शोकेसमध्ये गवसतो.नजाकतदार, डेकोरेटिव्ह विविध आकारात तो समोर येतो. माणसाने स्वत: बरोबर

त्याचीही ऊत्क्रांती केलेली दिसते.मन व राहणी आधुनिक असली तरीही आठवणी पाठशिवण करत येतातच ना? प्रत्येकाच्या मनात

एक कोनाडा असतोच ना? हो, फक्त त्याचा आकार वेगळा असेल इतकचं. कविवर्य सुरेश भटांनी दूर कोपरयात दिवा ठेवून तो अजरामर केलाच आहे.

 

©  सुश्री दीपा पुजारी

इचलकरंजी, मो.नं. ९६६५६६९१४८

ई मेल [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवण : मोठी माणसं – प्रा. तुकाराम पाटील

☆ मनमंजुषेतून : आठवण : मोठी माणसं – प्रा. तुकाराम पाटील ☆

मनोहर शेरकर ९८च्या एम.पी.एस.सी.चा बेस्ट कंॅडिडेट.लगेचच पी.एस.आय बनला.आज तो खात्याच कर्तबगार आफिसर म्हणून  गाजतो आहे .वर्षा पूर्वीच तो बदलून इथे आला. आपल्या चोख कामगिरीने इथले बिघडलेले वातावरण नियंत्रणा खाली  आणले. आता सारा परिसर योग्य बंदोबस्तात सुरळीत झाला आहे .याही भागात कोरोना आला आणि पाठलाग करत आले लाॅकडाऊन.सगळ वातावरण तंग. जबर बंदोबस्त ठेवूनही मोकाट फिरणा-या टवाळखोरासाठी परिसरात सातत्यान दिवसरात्र गस्त घालावी लागत होती.लोक दारापर्यंत आलेल्या मरणालाही गांभिर्यान घेत नाहीत याची त्याला प्रचंड चीड आली होती.मग मात्र आदेश न पाळणारावर तो नाईलाजान कठोर कारवाई करत होता .उगाचच फिरणाराना दंडुक्याचा चांगलाच प्रसाद देत होता. त्याचा नाईलाज होता पण आता फिरणाराना याच भाषेत सांगाव लागत होत.

सकाळचे दहा वाजले असतील.मनोहरणे तीन शिपाई बरोबर घेतले.जीप स्टार्ट केली आणि  मेन चौकात येवून तो थांबला. दोन पोर बुलेट उडवत आली त्याना मनोहरन थांबवल .विचारपूस केली .पोरांची उडवाउडवीची उत्तर मिळताच त्याना दंडुके लगवून घरी पिटाळल.मग त्याच लक्ष दुकानांच्या रांगेकड गेल.सगळ्या दुकानांची दार बंद होती.पण कोप-यातल्या एका दुकानाच शटर उघड होत .एक म्हातारी खुर्ची टाकून दारात बसलेली दिसली त्याला.त्याचा पारा चढला. तो तणतणत त्या म्हातारी जवळ गेला .म्हणाला

“कशाला उघडं ठेवलय दुकान.सगळी दुकान बंद आहेत .तुझच तेवढ उघड कशाला ठेवलयस.”

म्हातारी गोंधळली. तिला कहीच बोलता येइना. तोवर मनोहर दुकानात गेला. ते दुकान नव्हत हे त्याच्या लक्षात आल. मग तो म्हातारीची विचारपुस करत ह्मणाला

“आजी कशाला शटर उघडून बसलाय. ते बंदकरून घ्या आधी नहीतर शिपाई येवून तुम्हाला त्रास देतील दुकानआहे अस समजून”. मग म्हातारी पडेल आवाजात म्हणाली

“साहेब  शटर बंदच होत इतकावेळ पण माझा म्हातारा म्हणाला उघड शटर लय उकाडा हाय, जीवाची तलकी व्हायला लागलीया. म्हणून उघडलय आत्ताच.”

“कुठ आहे  म्हातारा”

“आत बाजेवरवर पडलाय”

मनोहर आतल्या खोलीत गेला. म्हातारा टावेलान वार घेत बाजेवर बसला होता. मनोहरन बारीक नजरेन खोलीची पहाणी केली. त्या दोघाची हालत त्याच्या लक्षात आली. मनोहरन सहज विचारल.

कुणी पोरबाळ दिसत न्हाईत. म्हातारा हासत म्हणाला.”एकच पोरगा हाय. त्यो मिलिटरीत हाय.आम्ही नवरा बायको  दोघच असतो हितं.”

मनोहरला खूप काही कळून चुकल. तेवढ्यात म्हातारी  म्हणाली.” घरातल्या खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू  कालच संपल्या.सकाळपसन काहीच नाही खायाला.सगळच बंद हाय कुठन काय आणाव काय कळना झालया.कस दिवस काढायच पुढच?”

मनोहर हे ऐकून लगेच बाहेर पडला.त्यान एका शिपायाला बोलावल.आपल्या जवळचे दोन हजर रूपये शिपायाच्या हातावर ठेवत तो म्हणाला.”जा पेठेत तुमच्या ओळखीच्या दुकानदाराकडून घरात लागणार वाणसामान लगेच घेवून या. तुम्ही येई पर्यंत मी आहे  इथेच.”

शिपाई  तातडीने गेला साहित्य घेवून लगेच परत आला .मनोहरने आणखी हजार रूपये शिपायाला दिले.आणि म्हणाला “हे त्या आजीला देवून या.” शिपाई गेला .त्याने सामान खाली  ठेवले आजीच्या हातावर हजार रुपये ठेवत तो म्हणाला.”आमच्या साहेबानी दिलेत” ‘शिपाई  आला मनोहरने जीप स्टेशनकडे पळवली. म्हतारा म्हातारी भरल्या डोळ्यनी एका मेकाकडे नुसती पहातच बसली.

दुसरा दिवस उजाडला

म्हातारीने पुन्हा शटर खोलले आणि ती दोघ पायरीवर बसून साहेबाची वाट बघू लागली. दहाच्या सुमारास जीप आली. थांबली. मनोहरला उतरलेला पाहून म्हातारा म्हातारी साहेब  साहेब करून हाका मारू लागले.मग मनोहर नाइलाजानेच त्यांच्या जवळ  गेला .म्हातारी म्हणाली “बाळा फार उपकार झाले  तुझे .हे बघ आता तू आमच ऐक .तू दिलेल वाणसामान आमच्या गरजेच हाय. तेवढ घेतो  आम्ही. पण हे पैसे नकोत. हे तू परत घे. आणि  आमच्या सारख्या गरजूला यातन मदत कर. देव तुला उदंड यश देवो.” आता आश्चर्य करायची पाळी  मनोहरची होती.त्याला वाटल जगात गरिबालाही माणूसकीची कणव जोपासता येते . मीच फार मोठा नही कुणी. माझ्या माझ्या पेक्षाही खूप मोठ्या मनाची माणस आहेत समाजात. जपल पाहिजे त्याना. नाहीतर वाळवंटच होईल सा-या जगण्याच.

© श्री तुकाराम पाटील

चिंचवड पुणे ३३

मो .९०७५६३४८२४

२/८/२०

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनुभव : अंधशाळा – सुश्री सुलु जोशी

☆ मनमंजुषेतून : अनुभव : अंधशाळा – सुश्री सुलु जोशी☆

‘महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या बांद्रा, मुंबई येथील प्रकाशगड’मधून कार्यालयीन निवृत्ती घेतली. पुणे मुक्कामी परत. मुळातच गरजा कमी. ठरवलं की, आजवर मीच लोकांकडून मदत घेतलीय, त्याची परतफेड करायची. या कामातून पैसे नाही  मिळवायचे.  मग जूनमधे महात्मा सोसायटीपासून जवळ असलेल्या अंध मुलींच्या शाळेत गेले. ही निवासी शाळा आहे. महाराष्ट्राच्या कोनाकोप-यातून या मुली येतात. बहुतेकींची परिस्थिती अगदी बेताची. एकदम मोठ्या सुटीतच या मुली घरी जाणार. मात्र, तिथे कोणी ना कोणी सेवाभावी माणसं येऊन त्यांना शक्य आहे ती मदत करत असतात. मुख्याध्यापिकाबाईंना भेटले. म्हटलं, अवांतर वाचन, गृहपाठ करून घ्यायला आवडेल. त्यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गाचा एक तास मुक्रर करून दिला.

शाळेत चार-पाच पाय-या चढून प्रवेश केला की एक मोठं दालन लागतं. या मजल्यावर मुख्य बाईंची खोली, शाळेचं ऑफिस, स्वयंपाकघर, जेवणाचं दालन आणि उजव्या हाताला वर जाणारा जिना होता. वरच्या मजल्यावर वर्ग होते.

शाळेच्या या तळमजल्यावरच्या दालनांत पाऊल टाकलं आणि समोरून खिदळत येणा-या  दोन-तीन मुली एकदम स्तब्ध झाल्या. माझी चाहूल त्यांना कशी कळली, या संभ्रमात मी! मधे किमान वीसएक पावलांचं अंतर होतं. मी पुढं होऊन विचारलं, “पहिलीचा वर्ग कुठेय गं?” त्या तिघींनी मला घेरलंच. माझे हात, खांदे चाचपत त्या म्हणाल्या, “बाई तुम्ही नवीन? रोज येणार?” मी “हो” म्हणताच त्यांनी माझा कब्जा घेतला आणि थेट मला पहिलीत पोहोचवलं. यानं मी थोडी बावचळले. पण मग लक्षांत आलं की ही तर त्यांची नवीन माणसाची ओळख करून घ्यायची रीत आहे. त्या माझ्या स्पर्शातून, माझ्या आवाजातून माझी नोंद घेत होत्या. काही दिवसांनी लक्षांत आलं की, कुणीही समोरून येतंय असं वाटलं की, त्यांचे हात पटकन् कोपरातून उचलले जात, हाताचे पंजे ताठ होत.

पहिलीचा वर्ग सुरू झाला. हळूहळू सगळ्यांची नावे पाठ झाली. कधी त्यांना अंक, पाढे म्हणायची हुक्की येई. तर कधी चालू पुस्तकातले धडे किंवा कविता. कधी मी घरून गोष्टीची पुस्तके नेई, त्यातल्या गोष्टी आवाजी अभिनयाने वाचून दाखवी. “श्यामची आई”तील प्रकरणे त्यांना आवडत. माझ्या प्राथमिक शाळेत कविता शिकवतांना बाई एखाद्या धिटुकलीला पुढे उभं करून तिच्याकडून साभिनय नाचत-गात करून घेत, ते आठवलं. – “उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही..” ही कविता म्हणून दाखवतांना तर आवंढाच आला घशाशी. – “उजाडले, डोळे उघडले आणि मिटले”, ही कल्पना त्या कशा करत असतील? कवितेचा अर्थ समजावून सांगतांना मनाचे हाल झाले. मग मला वर्गातून आजूबाजूला काय काय दिसते, त्याचं वर्णन करतांना बाग, फुले, उंच झाडे, पक्षी – माझी कसोटी लागली. रंग तर कसे सांगणार? आपल्या नेमस्त बुद्धीला बाजूला सारून मी हे अंधपण अनुभवू लागले आणि कुठे ना कुठे वाट दिसू लागली. सहजसोपी, त्यांच्या वयाला झेपतील अशी उत्तरे सुचू लागली. “छान किती दिसते फुलपाखरू..” ही कविता प्रत्येकीच्या बाकाजवळ जाऊन, दोन्ही पंजे अंगठ्यांनी गुंफून हालचाल शिकवली आणि ह्या नविन कल्पनेत रमलेली हाताच्या पंजांची अनेक फुलपाखरे उडू लागली. पक्षी उडतात कसे? तर प्रत्येकीच्या मागे जायचं, दोन्ही हात पसरायला लावायचे आणि खांद्यातून हलवायचे. मग समजावून द्यावे लागे की आपण हात हलवले म्हणजे उडणार नाही आहोत. पंख वजनाला हलके असतात, म्हणून पक्षी उडून शकतात. आपण त्यांच्या हालचालीची नक्कल करतोय.

अधूनमधून काही मुली पेंगताहेत, असं माझ्या ध्यानी आलं. मी एका वर्गशिक्षिकेपाशी याचा उल्लेख करत म्हटलं, “का हो, या मुली वेळेवर झोपतात ना? यांची झोप पुरी होत नाही का?” त्या बाई म्हणाल्या, “अहो, अंधार पडला की झोपायची वेळ झाली, अशी नोंद आपला मेंदू घेतो. यांना मुळी अंधार काय तेच ठाऊक नाही.” चर्रकन् चटका बसला मनाला! आपले ज्ञानचक्षु आपल्याला केवढी जाणीव पुरवतात, हे कळलं.

हा अवांतर वर्ग संपला की शाळा सुरू व्हायला मधे थोडा वेळ असे. वर्गापासून फाटकापर्यंत दोन्ही हातांना लगडलेल्या मुलींना घेऊन मी फाटकाशी येई. माझा अगदी ‘विठु माझा लेकुरवाळा’ व्हायचा. किती वेळ माझ्या अंगाखांद्यावरचे हात दूर होत नसत. मग गाडीत बसले रे बसले की तिचे दार दणकन् लावण्यांत त्यांना मोठी मजा येई. त्यांचे खेळ, कार्यक्रम, गाणी, स्वातंत्र्यदिनाची परेड, यात कसा वेळ जाई, कळत नसे. ब्रेल लिपी शिकायला सुरुवातही केली होती, पण मला ती फार जमली नाही.

राखीपौर्णिमेच्या आधी काही मुलींनी येऊन विचारलं, “बाई, आमची पत्रे टाकाल का पोस्टाच्या पेटीत?” होकार भरत त्यांना विचारलं, “काय गं, अगदी जाडजूड पत्रे लिहिलीत एवढी?” त्या खुषीत हसत म्हणाल्या, “बाई, राखी पाठवतेय भावाला.” एक मात्र कबूल केलं पाहिजे की, या मुलींचे रूसवेफुगवे असत, नाही असं नाही. पण त्या आनंदी असत. मला निरोप दिला की हातात हात गुंफून शाळेतील ठरलेल्या  पायवाटेवरून गरागरा चालत सुटत.

एकदा एक मोठी मुलगी हातात टेपरेकॉर्डर घेऊन भिरीभिरी फिरतांना दिसली. मी विचारलं, “तुला कुठे जायचंय का? सोडायला येऊ का?” ती म्हणाली, “नाही हो. माझा टेप बिघडलाय. तो कसा दुरूस्त करून आणावा, कळत नाही.” मी तो ताब्यात घेऊन फिलिप्सचा ग्राहक-कक्ष शोधून काढला, दुरूस्त करून घेतला आणि तिला नेऊन दिला. तिला प्रचंड आनंद झाला. या टेपवर या मुली व्याख्याने रेकॉर्ड करून घेतात आणि ती ऐकून ऐकून अभ्यास करतात.

सुरूवातीला मोठ्या मुलींना रस्ता ओलांडणे, बस-स्टॉपची माहिती देणे, चढाय-उतरायच्या जागांची माहिती देणे, हे शिकवले जाते. मग त्यांना एकट्याने चालणे, प्रवास करणे ह्याची सवय करायला लावतात. पाठोपाठ शाळा काही नेमलेली माणसे लक्ष ठेवायला पाठवतात. सरावल्या की त्या त्यांच्या त्यांच्या जाऊ-येऊ लागतात.

सहा महिने गेले आणि मला व्हायरल फीव्हर आणि सायटिकाचा अटॅक आला. एक इंचभर सुद्धा हलता येईना. नाईलाजाने सुट्टी घ्यावी लागली. बरं वाटायला लागल्यावर एकदा शाळेत जाऊन पाहिलं, पण जिना चढता येईना. मोठ्या नाईलाजाने हे काम थांबवले.

या सहा महिन्यांनी मला खूप काही शिकवले. आजही त्या चिमण्या आठवल्या की जीव भरून येतो. त्यांचे चेहरे नाही, पण अंगाखांद्यावरचे स्पर्श कायम स्मरणांत राहतील.

 

© सुश्री सुलू जोशी

मो 9421053591

Please share your Post !

Shares
image_print