मुक्ती म्हणजे नक्की काय? मला वाटतं एखाद्या विचाराच्या स्त्रोतापर्यंत पोहोचणं म्हणजे मुक्ती. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणं ही एक आध्यात्मिक बाजू आहेच, पण तेव्हा नक्की काय घडत असावं? विचार करताना मला जाणवलं की एकुणात मुक्ती हे प्रकरण इंटरेस्टिंग आहे… अनेक जणांना त्याचं अप्रूप आहे काहींचं जीवन ध्येय आहे… तर हे काय आहे…
एकदा प्राणायमाच्या विषयी जाणून घेताना हळूहळू विषय श्वास जन्म-मृत्यू यावर आला. आणि मग जगण्याचा दृष्टिकोन नेमका कुठला योग्य ? अशा अर्थाची आम्ही चर्चा करत होतो. त्यावेळी मला आमच्या ओळखीतल्या एकांनी सांगितलं होतं की आपल्या या जन्मातली प्रत्येक गोष्ट ही केवळ आणि केवळ आपल्या विचारांतून निर्माण झाली आहे. आपण करणाऱ्या (काही जणांच्या दृष्टिकोनातून घडणाऱ्या) प्रत्येक कृती मागे हा विचार असतो. कधी प्रगट तर कधी सुप्त अवस्थेत. आपला जन्म कधी, कुठे, कसा झाला/होतो. आपलं शरीर, आपल्या इच्छा, वासना, जगण्याचा दृष्टिकोन हे सारंकाही आपल्या विचारांनी नियंत्रित केलं जातं/आहे. हे विचारच आपल्याला निवड करायला प्रेरणा देतात. ज्यांना याची जाणीव नाही अशा कमजोर व्यक्तींच्या दृष्टीने भाग पाडतात.
हे ऐकल्यानंतर मला असं वाटू लागलं की ज्यावेळी एखाद्याला ही गोष्ट पटून आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर त्याला वाटतं की याचा शोध घ्यावा… याच्या मुळापर्यंत पोहोचावं… तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा मुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू होत असावा.
मग त्याला हे जग नक्की कोण नियंत्रित करतं? अशी कुठली शक्ती आहे? तिचं स्वरूप स्थिर आहे का अस्थिर? या उत्तराचा ध्यास लागत असावा. आणि आयुष्यातल्या प्रत्येक घटनेकडे या दृष्टिकोनातून बघताना कधीतरी त्याला या प्रश्नाचा उगम सापडत असावा. मग या उगमापाशी पोहोचल्यानंतर त्याला एका परिपूर्ण अवस्थेचा अनुभव येऊन तो मुक्त होत असावा. कारण जिथे विचार आणि प्रश्न दोन्हींची निर्मिती थांबते आणि उत्तराचीही आस राहत नाही त्या क्षणापासून त्याचा मुक्तीकडे प्रवास वेगाने होत असावा किंवा तोच एखादा क्षण त्याला मुक्तता देत असावा? असं मला वाटतं.
मुक्तीच्या कल्पना आणि शक्यता अशाही असतील.. की आणखीन काही वेगळ्या? शोध चालू आहे… कधीतरी याचं उत्तर मिळेल.
वळवाचा पाऊस नुसताच पडून गेला व्हता. गावातल्या लाईटी गेल्या व्हत्या. मेणबत्ती लावून मी चटई टाकून पडलो होतो. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आई झोपली होती. बायको आणि पोरं बडबड करत कसला तरी खेळ खेळत होती. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन उशालाच व्हता. मी पटकन उचलला. सवयी प्रमाणे मी फोन स्पीकर वर टाकला. आणि पलीकडून आवाज आला. हॅलो साहेब, दंगलकार बोलता का.. ? मी बी व्हय म्हणलं. पलीकडची व्यक्ती म्हणाली, “आम्हाला तारीख हवी होती. गोंदियामध्ये तुम्हाला बोलवायचे आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला ऐकायची. 14 एप्रिल तारीख हवी आहे आम्हाला. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त.. ”
तसा एप्रिल महिना सुरू व्हायला अजून पंधरा दिवस होते. बऱ्याच तारखा बुक झालेल्या होत्या. पण 14 एप्रिल कुणाला दिलेली नव्हती. पण गोंदिया खूप लांब होतं. मी त्यांना म्हणलं, “साहेब तुम्हाला तारीख द्यायला अडचण नाही पण, येण्याजाण्यात माझे चार दिवस जातील. अंतर खूप आहे आणि मला खूप अवघड होईल. ” त्यावर ती व्यक्ती जरा शांत झाली. आणि लगेच पुन्हा ते म्हणाले, ”आम्ही विमानाचं तिकीट करतो साहेब पण तुम्हाला यावं लागेल.. ”
माझ्या पोटात एकदम गोळा आला. आणि माझे वडील माझ्या बाजूला येऊन फोनकडे एकटक कधी बघत बसले कळलं नाही. बायको पोरं एकदम शांत. आई पण जागी झाली. पलीकडची व्यक्ती म्हणाली, “ साहेब पुणे ते नागपूर विमान सेवा आहे. आम्ही येणे जाणे करून घेतो. आजच तिकीट बुक करतो तुमचं. आता नाही म्हणू नका. ”.. मला लै आनंद झाला. पण माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या वडिलांना झालेला होता. बाजूला बसलेल्या आईचा हात त्यांनी हातात गच्च दाबून धरलेला मला दिसला. अण्णा इमान इमान अस बडबड करत वरच्या पत्र्यावर नजर फिरवताना मला दिसले. मला फार गंमत वाटली. तेवढ्यात पलीकडची व्यक्ती काही बोलणार त्यांना मीच म्हणालो, ”साहेब तुम्ही पहिलेच आहात माझ्या आयुष्यात जे मला विमानाने बोलवत आहात. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडणार आहे. तुमचे खूप आभार. पण, साहेब माझी एक विनंती होती बोलू का.. ?”त्यावर ते म्हणाले “बिनधास्त बोला दादा.. ”
त्यांना मी म्हणलं, ”साहेब हा पहिला विमान प्रवास माझ्या वडिलांच्या सोबत व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. तुम्ही मानधन नाही दिले तरी चालेल. पण आमच्या बाप लेकाची तिकीट तेवढी काढून द्या. आम्ही सोबत येतो. ” त्यावर ते म्हणाले, “ नितीन दादा अजिबात काळजी करू नका. तुमचं जे मानधन असेल ते ही करतो. आणि बाबुजीचे आणि तुमचे तिकीट ही बुक करतो. काळजी करू नका. फक्त दोघांचे आधार कार्ड चे फोटो पाठवा. ” मी आनंदाने होकार दिला. फोन कट केला. बाजूला वडिलांच्याकडे बघितले तर अण्णा गायब. आण्णा कपाट उघडून आधार कार्ड शोधत होते.
तासाभराने लाईट आली. लाईट आल्याबरोबर अण्णा आधार कार्ड घेऊन माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ”काढ लवकर फोटू याचा आणि पाठव त्याला.. ” मी आमच्या दोघांचेही आधार कार्डचे फोटो पाठवून दिले. आमची तिकीट बुकिंग झाली. आम्ही 14 एप्रिलला पहाटे पाच वाजता विमानात बसणार होतो. ते ही पुण्यातून. या भावनेने मला रातभर झोप लागत नव्हती. आण्णा तर रातभर बडबड करत होते. आजवर आकाशात उडणारे विमान पाहणारी आम्ही साधी माणसं. आमच्यासाठी हे खूप काही होतं.
त्या दिवसापासून आमचे अण्णा सगळ्या गावाला सांगत सुटले मी विमानात बसणार आहे म्हणून. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आमच्या सगळ्या पाहुण्यांना फोन करून ते सांगू लागले. रोज दिवस मोजू लागले. अखेर तो दिवस आला. याचदिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्याच निमित्ताने मी प्रमुख पाहुणा म्हणून निघालो होतो. आणि याच महामानवामुळे आम्ही आज आकाश मोजणार होतो.
माझे मित्र मिलिंद केदारे यांनी त्यांच्या चारचाकी गाडीतून आम्हाला विमान तळावर सोडले. आजवर एस. टी. स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर उभं राहून गाडीची वाट पाहणारी आम्ही साधी माणसं आज विमान तळावर आलो होतो. मी विमानतळापेक्षा जास्त बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात साठवत होतो. आजूबाजूला बघून प्रत्येकाला विचारत आत जाण्याची प्रोसेस आम्ही पूर्ण केली. तिथून आम्ही बाहेर पडलो. एक बस न्यायला आली. त्यात बसलो. त्यावेळी अण्णा म्हणाले, “ आरे इमान कुठाय.. ? “ मी हसत म्हणलं, “ ही गाडी आपल्याला विमानाजवळ घेऊन जाईल. ” गाडी हलली तशी तिथल्या मैदानात उभी असलेली विमाने आम्हाला खिडकीतून दिसू लागली. अण्णा भान हरवून तिकडे बघत होते.
बस थांबली. आम्ही उतरलो. आमचं नागपूरसाठी जाणारं विमान समोर उभं होतं. त्या पायऱ्या चढून आम्ही आत आलो. आमची शिट पाहून बसलो. अण्णा संपूर्ण विमान नजरेत साठवत होते. विमान त्या रन वै वर उभं राहिलं. त्यातल्या हवाई सुंदरी असणाऱ्या पोरीनी हातवारे करून माहिती दिली. अण्णा त्यांच्याकडे एकटक बघत होते. आणि मी अण्णांना पाहत होतो. तेवढ्यात पाठीमागून माझ्या खांद्यावर एक हात पडला. मी मागे वळून बघितलं. तर तो माणूस हातात हात देत म्हणाला, ” साहेब जय भीम. मी वानखेडे. तुमचा लै मोठा फॅन आहे. ” त्याने माझ्यासोबत एक सेल्फी घेतला. मनात म्हणलं, ”एस. टी मध्ये आपले फॅन भेटतात पण विमानात बी आपल्यावर प्रेम करणारी माणसं हायती.. ” लै भारी वाटलं.
विमान धावू लागलं. आणि त्याने एका क्षणाला जमीन सोडली. त्यावेळी फक्त विमान आकाशात उडालेले नव्हते. एक मुलगा त्याच्या बापाला ओंजळीत धरून हवेत तरंगू लागलेला होता. जसं विमान उडाले तसे मी अण्णांकडे बघितले. अण्णा लहान मुलासारखे खिडकीतून वाकून पाहण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या कडे पाहतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी माझ्या डोळ्यात बघितलं. माझा हात गच्च हातात धरून भरलेल्या डोळ्यांनी माझा बाप एकच वाक्य बोलला. ” पोरा आपल्या अख्ख्या खानदानीत इमाणात बसलेला मी पहिलाच माणूस बरं का.. “ असं म्हणून अण्णांनी मान डोलावली.
थोड्या वेळाने हवाई सुंदरी आली. चहा हवाय का म्हणून विचारू लागली. मी किंमत विचारली. तिने दोन चहाचे दोनशे रुपये सांगितले. अण्णानी मला हळूच चिमटा घेत म्हणले. ”नको जाऊ दे. दोनशे रुपयात आठवड्याची भाजी येईल बाबा. तुझी आय काय म्हणल.. ?” आम्ही तो चहा घेतला नाही. पण जी माणसं चहा पीत होती त्यांच्याकडे मात्र आम्ही एकटक पाहत राहिलो. तेवढ्यात अण्णा म्हणले. ” व्हय रे” यात सगळी सोय असती ना.. ?” मी व्हय म्हणलं, त्यांना बाथरूमबद्दल विचारायचं होतं हे कळलं. मी म्हणलं. मागे आहे टॉयलेट या मोकळं होऊन.. ’” आण्णा हसत म्हणले, तशी काय गरज नाही, मला काय आलेली नाहीय. पण जाऊन येतू बघून येतु” अस म्हणून आण्णा ते ही सगळं करून आले.
आम्ही आकाशात उडत होतो. आम्ही आकाश मोजत होतो. टिव्ही, पिचर, पेपर, मोबाईल, आणि हवेत उंच उडणाऱ्या जागी विमान पाहणारी साधी माणसं आम्ही. आज विमानात बसलो होतो. हा आकाश मुठीत घेणारा पहिला विमान प्रवास मी बापासोबत केला याचं समाधान होतं. ज्या बापाच्या मांडीवर मी लहान असताना झोपलो. त्याचं बोट धरून पहिलं पाऊल टाकलं. त्याच बापाने आज त्याचं डोकं हळूच खांद्यावर टेकवत आण्णा भरलेल्या डोळ्यानी मला म्हणाले, “ नितीन आयुष्यात सगळं मिळालं. जे स्वप्नात ही वाटले नव्हते ते जगायला मिळालं. ”.. असं म्हणून दोन पोरांचा बाप असलेला मी. या वयात माझ्या बापाने माझ्या गालाचा हळूच मुका घेतला. मी डोळे झाकले. हुंदक्यांची दाटून आलेली जत्रा मी आतल्या आत अडवून धरली. आणि बंद पापणीच्या आड बापाच्या खांद्यावर हात टाकून धरण फुटल्यासारखा झिरपून गेलो..
…आता सतत विमान प्रवास असतो पण तो पहिला प्रवास मात्र मनात घर करून आहे.
आमच्या घरी तांदुळाचा गणपती असे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रभात समयी सुस्नात होऊन पप्पा सुंदर, जांभळ्या रंगाचा कद नेसून गणपती पूजनासाठी बसत. एका गोष्टीचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं ते म्हणजे पप्पांच्या व्यक्तिमत्त्वात आढळणाऱ्या विसंगतीचं. कर्मकांडं, पूजाअर्चा यावर पप्पांचा विश्वास नव्हता की ते त्यावर विसंबूनच नव्हते हे मला कळलं नाही पण गणपती म्हणजे बुद्धी देवता, विद्येची आराध्यदेवता. बाकी गणपतीची विघ्नहर्ता, सुखकर्ता वगैरे विशेषणे कदाचित पप्पांसाठी म्हणजे त्यांच्या वैचारिक बैठकीसाठी तितकीशी महत्त्वाची नसतील पण विद्येची देवता म्हणून गणपती या दैवता विषयी त्यांना अपरंपार प्रेम होतं आणि त्याच भावनेतून आमच्या घरी गणपती पूजन फार सुंदर पद्धतीने होत असे.
आई चौरंगाखाली सुरेख रांगोळी रेखायची आणि सागवानी पाटावर बसून चौरंगावर तांदूळ पसरून पप्पा त्यातून सोंडवाला, मुकुटधारी, लंबोदर, चतुर्भुज गणेश साकारत. पायाशी तांदळाचा मूषक, भोवती झेंडूच्या गेंदेदार फुलांची चौकट, कापूर उदबत्तीचा सुवास आणि आम्ही सगळेजण पप्पांच्या डाव्या उजव्या हाताशी मनोभावे हात जोडून, त्यांच्या सुरेल स्वरात गायलेली गणपतीची कहाणी ऐकत असू.
।। सिद्धगणेश सिद्धंकार मनीच्छले मोत्येहार सोन्याची काडी रुप्याची माडी तेथे सिद्धगणेश राज्य करी राजामागे राज राणीमागे सौभाग निपुत्राला पुत्र आंधळ्याला नेत्र त्यांनी वाहिली सोन्याची काडी आम्ही वाहू दुर्वांची पत्री त्यांना प्रसन्न झालात तसे आम्हाला व्हा ।।
तीन पदरी सूत्रात एकेक दुर्वांची जुडी गुंफत २१ वेळा पप्पा ही कहाणी सांगत आणि मग २१ दुर्वांच्या जुडीची ही माळ गणपतीला वाहत.
त्यानंतर आरती, “घालीन लोटांगण” “मंत्रपुष्पांजली” आणि डोळे मिटून, नाकावर हात ठेवून, प्रणव मुद्रेत अर्पण केलेला पांढराशुभ्र, कळीदार २१ मोदकांचा, चांदीच्या ताटातला सुरेख सुगंधी नैवेद्य !
अशा रितीने गणपती पूजन झाल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्नता जाणवायची. कापूर, उदबत्तीच्या सुगंधात, सुग्रास स्वयंपाकाच्या मधुर वासात घर दरवळलेलं असायचं.
खरं म्हणजे आमची संपूर्ण गल्लीच गणेशमय झालेली असायची. घरोघरी यथाशक्ती, यथामती गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची. सण सोहळ्यातला सामुदायिक आनंद, सार्वजनिकतेचं महत्त्व आम्ही लहानपणी खऱ्या अर्थाने अनुभवलं असं म्हणायला हरकत नाही. गल्लीत गजाचा गणपती, सलाग्र्यांचा गणपती, दिघ्यांचा गणपती जसा मूर्ती सजावटीसाठी प्रसिद्ध होता तसाच मुल्हेरकरांचा गणपती म्हणजे आम्हाला आमच्याच घरचा गणपती वाटायचा. अगदी तेव्हापासून आजपर्यंत. मुल्हेरकरांच्या गणपती सजावटीत आम्हा सर्व सवंगड्यांचा हातभार लागायचा पण या कार्यक्रमातला प्रमुख अध्यक्ष म्हणजे दिलीप मुल्हेरकर. दिलीप हा सर्वच बाबतीत गल्लीतला एक अनभिषिक्त लीडर होताच. तो एक उत्तम कलाकार होता, उत्तम क्रीडापटू होता. क्रिकेट कसे खेळावे ते आम्ही त्याच्याकडूनच शिकायचो. तो जितका संवेदनशील होता तितकाच तापट होता. खरं म्हणजे माझ्यापेक्षा तो लहान होता पण कलेच्या क्षेत्रात सगळ्यांनीच त्याचे मोठेपण मान्य केले होते त्यामुळे गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या सामानापासून ते मखर बनवण्यापर्यंत तो जे जे सांगेल ते ते आम्ही त्याला मदत म्हणून, गंमत म्हणून करायचो.
टेबलावर छानसा रेशमाने भरलेला टेबलक्लॉथ टाकायचा, त्याच्या चारी बाजू कलात्मक रित्या दुमडून त्यावर बनवलेलं पुट्ठ्यांचं, रंगीत चकाकणार्या पेपर वेष्टनातलं, टिकल्यांनी सजवलेलं मस्त मखर ठेवायचं. मागे, बाजूला दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा सोडायच्या. खरं म्हणजे गणपतीच्या मखराच्या या तयारी पासूनच आमच्या अंगात गणेशोत्सवाचा उत्साह भरायचा. मग सकाळी टाळ, झांजा घेऊन आग्यारी लेनमध्ये एका तात्पुरत्या मंडपात विक्रीसाठी मांडलेल्या, कोकणातल्याच एका खास मूर्तिकाराकडची (मला त्यांचं नाव आता आठवत नाही) सुंदर, मध्यम आकाराची देखणी, प्रसन्न गणेशाची मंगलमूर्ती— आम्ही त्यावर विणलेला एखादा रुमाल टाकून घरी घेवून येत असू. दिलीप, चित्रा, संध्या, बेबी, सुरेश, अशोक, बंडू आणि आमचा गल्लीतला बालचमू मिळून गणपतीची थाटात मिरवणूक असायची. गणेश आगमनाच्या स्वागताची मिरवणूक. पुन्हा चालताना….
पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोला…
गणपती बाप्पा मोरया… अशी झांजा वाजवत ही आनंद गीते मुक्तपणे गात आम्ही आमच्या या आवडत्या गणेश पाहुण्याला घरी आणत असू. उंबरठ्यात ओवाळायचे, चारी दिशांना पाणी सोडायचे, गुळखोबरं ओवाळून नजर उतरवायची आणि मखरात बसवायचे. एखाद्या विमानतळावरून नाही का आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला रिसिव्ह करत ? अगदी तीच भावना आमच्या मनी या गजाननासाठी असायची.
आमचा स्वतःचा घरचा गणपती दीड दिवसाचा असायचा. त्यानंतर गौरीपूजन मात्र असायचे पण मुल्हेरकरांच्या गणपतीचे विसर्जन गौरीबरोबर व्हायचे म्हणजे कधी पाच दिवस तर कधी सात दिवस. आरत्यांचा गजर चालायचा, जवळजवळ गल्लीत सगळ्यांच्याच घरी आम्ही आरतीला जात असू आणि सहजपणेच प्रत्येक घरी आरतीच्या वेळाही ठरत.
मुल्हेरकरांकडे गायलेल्या आरत्या आजही माझ्या कानात आहेत. दिलीप तबला, ढोल, पेटीची व्यवस्था करायचा.
येई हो विठ्ठले माझे माऊली ये म्हणताना लागलेला सूर आत मध्ये काहीतरी उचंबळून टाकायचा.
रखमाई वल्लभ्भा राईच्या वल्लभ्भा म्हणताना पडलेली ती तबल्यावरची थाप कशी वर्णन करू ? आणि दशावताराची आरती म्हणताना तर कंठ भरून जायचा.
रसातळाशी जाता पृथ्वी पाठीवर घेसी परोपकारासाठी देवा कासव झालासी देवा कासव झालासी
शब्दाशब्दांचा सूर लांबून केलेला उच्चार आणि पेटीच्या संगतीत म्हटलेल्या त्या सुरेख आरत्या म्हणजे आमच्या जडणघडणीच्या काळातली संस्कार शक्तीपीठे होती. हरे राम हरे राम राम हरे हरे हे गतिशील नामस्मरण, तितक्याच गतीत वाजत असलेले टाळ आणि झांजा, हे म्हणत असताना स्वतःभोवती मारलेल्या प्रदक्षिणा आणि समोरच्या मखरातील, तबकातल्या निरांजनाच्या प्रकाशात उजळलेली ती हास्यवदना, प्रसन्नदायी, मंगलमूर्ती आजही अंतरीच्या कप्प्यात पावित्र्य आणि मांगल्य घेऊन स्थिरावलेली आहे.
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि.. … त्या एकेका मंत्रोच्चारातला दिव्यपणा कळत नसला तरी जाणवायचा नक्कीच.
आवर्जून सांगते की आमच्या गल्लीत काही मुस्लीम परिवार होते. शरीपा, ईसाक, अब्दुल, बटुबाई, आरतीला भक्तीभावाने हजर रहात. प्रसादभक्षण करत. आमचा गणपती असा सर्वधर्मपरायणी होता.
खरोखरच दरवर्षी येणाऱ्या या दहा दिवसाच्या लाडक्या पाहुण्यांनी नकळत जीवनातली सत्त्वबीजे आमच्यात नक्कीच पेरली. गल्लीतला गजाचा गणपती रात्री बाल्याच्या नृत्याने रंगायचा मध्ये ढोलकी वादक बसलेला असायचा. गायकही असायचा आणि सभोवताली गोलाकार नृत्य करणारे कलाकार असत. त्यांच्या उजव्या पायात चाळ बांधलेले असत आणि *गणा धाव रे गणा पावरे* अशी गणरायाची आळवणी करून नाचायला सुरुवात व्हायची. या नृत्यात काही वैविध्य, सौंदर्य नसायचं. गाणाराही बऱ्याच वेळा भसाड्या आवाजात गायचा.
असे काही शब्द त्या गाण्यात असायचे. पण या नृत्यातला ठेका आणि लय एक प्रकारे मनात बसायची. नाचणार्यांत एकसंधपणा असायचा. पावलांच्या गतीत एक मेळ असायचा आणि एक प्रकारची लोक संस्कृती, लोकसाहित्य या रुपातून रस्त्यावर अवतरायचं आणि त्यातलं भारीपण कुठेतरी जाणवायचं.
तर असा हा आमचा आठवणीतला गणपती. दरवर्षी भाद्रपद महिन्यात चतुर्थीला येतच असतो पण माझ्या मनातला आजचा आणि तेव्हाचा गणपती वेगळ्या रुपात असतो आणि हो एक गंमत सांगायची राहिली. गणेश चतुर्थीच्या दिवशी “चंद्र पहायचा नाही. पाहिला तर चोरीचा आळ येतो” हे भय बालमनावर इतकं ठासून ठेवलेलं होतं की एक तर त्या दिवशी रात्री बाहेर पडायचंच नाही, नाहीतर रस्त्यात खाली मान घालून चालायचं. कुणीतरी वात्रटपणे म्हणायचे (बहुतेक वेळा ती व्यक्ती मीच असायचे. ) ”ते बघ काय वरती ?” आणि पटकन सगळ्यांनाच वर आकाशात बघायला व्हायचं आणि नेमकी सुंदर चतुर्थीची चंद्रकोर वाकुल्या दाखवत नजरेसमोर यायची पण खरोखरच या दर्शनाने चोरीचे आळ आले का ? कोण जाणे ! पण पुढे आयुष्य जगत असताना ज्या नाना प्रकारच्या ठेचा लागल्या, विनाकारण दोषही लागले, स्वतःचा चांगुलपणा गैरसमजुतीमुळे काळवंडला गेला त्याला हेच कारण असेल का ? गणेश चतुर्थीच्या दिवशी घेतलेले चंद्रदर्शन…?
माहीत नाही. पण या गणरायाने एक समर्थ मन मात्र घडवलं.
गेली तीस वर्षे मी हेच नाव वाचत आलोय, इंदरजित सिंह की दुकान, मोठ्या ठळक अक्षरात ते लिहीलेले. दुकानावरच्या पत्र्याला गंज चढलाय, पण त्यावरील अक्षरे अजूनही मिरवतात स्वतःला ठळकपणे. दुकानाच्या मालकाने स्वतःचेच नाव दिलंय दुकानाला त्याचं अप्रूप नवख्यांना बरेच दिवस पुरतं, मात्र एकदा दुकानाची सवय झाली की तो दुकानाच्या प्रेमातच पडतो.
काय नसतं या इंदरजितच्या दुकानात? रोजच्या वापरातील वस्तुंचा खचच पडलाय म्हणाना! शाळेत जाणाऱ्या मुलाने खोडरब्बर मागितलं तर मिळेल. घरातील बल्ब उडालाय तर तोही मिळेल. कुणा षौकिनाने टाय मागितली की तीही हजर. स्त्रियांच्या मेकप सामानाचे तर ते माहेरघरच. मागाल ते मिळेल ही पाटीच दर्शनी भागात! दुकान तसं छोटंसंच. पण कॉलनींच्या नाक्यावरचं. होय, तीन कॉलनी एकत्र होतील अशा हमरस्त्यावरचं दुकान. लंबचौरस आत आत जाणारं. दुकानात शॉकेसेसची भरमार, शिवाय लहानमोठे कप्पेच कप्पे. सगळं ठासून भरलेलं. वरती पोटमाळा. तोही मालाने खचाखच भरलेला. इतकं असूनही इंदरजितने दुकान नीटनेटकं छानपैकी सजवलेलं. काहीही ओबडधोबड, अस्ताव्यस्त वा गबाळं दिसणार नाही. अधिकचा फॅन्सीपणा न करता आकर्षक मांडणी कशी करावी हे इंदरजितकडून शिकावं! गेली तीस वर्षे हे मी पाहत आलोय. इंदरजित एकदा ओळखीचा झाला की त्याला दुकानात पाऊल टाकल्या बरोबर सांगावसं वाटणारच की ‘दिल जीत लिया!’
दुकान उघडलं की सकाळपासून जे त्याचं बोलणं सुरू होतं ते रात्री दुकान वाढवेपर्यंत. तो शिकलेला किती हे आजतागायत कुणालाही ठाऊक नाही पण त्याच्या जीभेवर सरस्वती नाचते हेच खरं! सकाळीस वाहे गुरूची अरदास म्हणत तो दिवसाची सुरूवात करतो व जसजसे गिऱ्हाईक येईल तसा तो खुलत जातो. कोणत्याही वयाचं गिऱ्हाईक येवो, महिला असो, पुरूष असो, मूल असो वा युवा वृद्ध कोणीही, त्याला विषयांचं वावडं नव्हतं. इतक्या गोष्टी होत्या ना त्याच्याकडे. किस्से तर त्याच्या तोंडूनच ऐकावेत इतके मजेशीर असायचे. त्याचं मधाळ बोलणं व हसतमुख चेहेरा हे वेगळंच रसायन होतं.
आलेल्या गिऱ्हाईकांना हातचं जाऊ न देता आपलंसं करण्याचं त्याचं कसब वादातीत. माझ्यासाठी तो इंदर कधी झाला हे मलाही कळलं नाही. दिवसभरात दुकानात जाणं झालं नाही तर संध्याकाळी काही वेळेसाठी का होईना त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नसे. क्वचित तेही घडायचं नाही तर येताजाता हात उंचावून रस्त्यावरूनच ख्यालीखुशालीची देवघेव होत असे. हे इतकं सवयीचं होऊन गेलं होतं की घरी गेल्यावर बायको हमखास विचारायची, “इंदरला भेटून आलात की नाही?”
फाळणीच्या वेळेस त्याचे वडील आपलं घरदार पाकिस्तानात सोडून नेसत्या वस्त्रानिशी भारतात आले. पंजाबमधे बस्तान बसवलं. मुलं मोठी केली. त्यातला हा इंदरजित. फाळणीची जखम खोलवर वडिलांकडून इंदरजितने उसनवारी वर घेतली. फाळणीचे किस्से ऐकून ऐकूनच लहानाचे मोठे झालो हे तो दर्दभरल्या आवाजात सांगायचा तेव्हा आपलं ही काळीज तुटेल की काय ही भीति वाटायची. पंजाबी, हिंदी उर्दूवर त्याची हुकूमत होती. शेरोशायरी हे जीव की प्राण. जर त्याने दुकानदारी केली नसती तर तो उत्तम कवी लेखक झाला असता इतकी त्याची जाण.
पन्नाशी उलटली पण त्याचा रंगेल व मिश्कील स्वभाव काही बदलला नाही. तसा तो होता मोना शीख. गुरूद्वारात मथ्था टेकण्यासाठी नेहेमीच जात असे. प्रसंगी कारसेवाही करायचा. इंदरजितला जे खरोखर ओळखत होते त्यांना तो कौतुक मिश्रित कोडंच वाटत असे. सकाळीस सश्रद्ध असणारा इंदरजित संध्याकाळ उलटल्यावर शायराना होऊ जायचा, शिवाय पंजाबी असल्याने खाण्यापिण्यात अव्वल. विशेषतः पिण्यात तर खास. कुठला ब्रांड खास आहे व तो कुठे मिळतो याची तर तो विकिपीडियाच.
एक भरभरून संपन्न आयुष्य जगलेला इंदरजित व क्वचित दिसणारी त्याची देखणी बायको पम्मी या दोघांचं एकच दुःख होतं. त्यांना मूल नव्हतं. याचं अपार वैषम्य तो उघड उघड बोलून दाखवत असे. त्यामुळेच की काय, दुकानात मूल आलं की तोही मुलासारखा होऊन जायचा. त्यांना हवं ते लाडेलाडे द्यायचा. एरवी सुद्धा मालसामान काढताना एखाद्या मुलाने बरणी उघडून गोळ्या चॉकलेट घेतले तर तो कानाडोळा करायचा. वरतून म्हणायचा वाहे गुरूने चिडीयांना चुगण्यासाठी अख्खे खेत सोडून दिले होते ही तर बरणी आहे!
एके दिवशी इंदरजित सिंह की दुकान बंदच दिसली. चौकशी केली तर इंदरजित पंजाबला गावी गेल्याचं कळलं. वाटलं येईल परत. आठवडा झाला. महिना झाला. सहा महिने झाले. इंदरजित आलाच नाही. मोबाईल स्वीच ऑफ तर कायमचाच. मी लावणंच सोडून दिलं. रस्त्यावरनं जाताना त्याचं बंद शटर पाहून गलबलायला होतं. संध्याकाळी येताना त्याच्या बंद दुकानाच्या पायऱ्यांवर रेंगाळणं होतं. ही तर रोजच विचारते, “इंदरची काही खबरबात?” माझं गप्प राहणं पाहून तीसुद्धा खंतावते. मग मनात एक कळ उठते व मनातच बोल उठतात, “ये रे बाबा इंदर, परत ये, मागाल ते मिळेल हे तुझं ब्रीदवाक्य होतं ना? दुकान जरी बंद असलं तरी ती पाटी आत अजून तशीच असेल ! तर हेच मागणं की ये, किंवा जिथे कुठे असशील तेथे सुखात रहा !”
☆ प्रिय सुदामा…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
प्रिय सुदामा,
तुला लिहिलेलं माझं पहिलंच आणि बहुदा शेवटचं पत्र…!
तसा खूप उशीर झाला आहे, पण आजची एकूण परिस्थिती बघून माझे मनोगत तुझ्यापाशी व्यक्त करावेसे वाटले. मूठभर पोह्याचे तुझे ऋण होतं माझ्यावर, म्हणून तू जास्त लक्षात राहिलास….!
माझी नरदेह सोडून सुमारे पाच हजार वर्षे झाली…!
माझ्या संपूर्ण जीवनात मी ‘स्वार्था’पोटी एकही गोष्ट केल्याचे आठवत नाही..!
गावाच्या भल्यासाठी घराचा त्याग करावा, राज्याच्या भल्यासाठी गावाचा त्याग करावा आणि देशाच्या भल्यासाठी जीवाचाही त्याग करावा असे आपल्याकडे मानले जाते. मी तसेच आचरण केले, नाही का… ?
माझ्या जन्मानंतरचे सोडून देऊ, पण जन्माच्या आधीपासूनच माझ्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती…!
जन्म झाल्या झाल्या मला जन्मदात्रीला सोडून दुसऱ्यांच्या घरी राहावं लागले…!
जन्माला आल्यावर पुतना मावशी मारायला टपली होती…!
त्यानंतर कालिया नाग….!!
माझ्या मामाने तर मला मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला….!
धर्मरक्षणासाठी मला माझ्या मामाला मारावे लागले….!
तिथे जरी मला बलराम दादा होता, तरी जबाबदारी माझ्यावरच जास्त होती….!
मित्रांना लोणी, दूध, दही खायला मिळावे म्हणून मी अन्नाची चोरी करायचो, मी कधीही संपत्तीची चोरली नाही, पण सर्वांनी मला ‘चोर’ ठरवले….!
माझी यशोदामाई सुद्धा मला चोर म्हणाली,तेव्हा मला खूप वाईट वाटले….!
पण एक सांगतो, गोकुळात मला जे प्रेम मिळाले ते नंतर मला कुठेच मिळाले नाही. सगळे गोपगोपी लोण्यासारखे मृदूल…!
गोपींनी तर मला ‘सर्व’ ‘स्व’ दिले….!
तरीही मला कर्तव्यपालनासाठी माझ्या प्रिय गोकुळाचा कायमचा त्याग करावा लागला.
नंतरच्या बऱ्याच गोष्टी तुला माहीत आहेतच….!
तुम्हा सर्वांना त्यातील राजकारण दिसले असेल…!
कधी मला ‘कृष्ण’शिष्ठाई करावी लागली तर कधी मला ‘रणा’तून पळून जावे लागले..!
अनेक राक्षसांचे वध करावे लागले…!
नरकासुराच्या बंदी खान्यातील सोळा सहस्त्र नारींना मी सोडविले, पण त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देण्यास समाज पूढे येईना, शेवटी मीच त्यांच्याशी विवाह केला….!
द्रौपदीला मी वस्त्रे पुरवली, अर्जुनाला गीता सांगितली अशा अनेक गोष्टी माझ्याकडून नियतीने करवून घेतल्या….!
मग लोकं मला ‘अवतार’ मानू लागले….!
मला देवत्व प्रदान केले गेले…!
आणि कोणालाही देवत्व प्रदान केले की सामान्य लोकांचे काम सोपे होते. कशीतरी रोजची पूजा करायची, (खरं तर उरकायची !), मंदिरात ‘भंडारा’ करायचा. ‘उत्सव’ साजरा करायचे. हल्ली जो गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात. ना त्यात गो (गाय) असते, ना गोपाळ असतात ना त्या हंडीत दही असते……!
जे असायला नको ते मात्र सर्व असते….!
मला तुम्ही लोकांनी देव केले, माझी भक्ती करायला सुरुवात केलीत. पूजा अर्चा जमली तर अवश्य करा पण माझी खरी भक्ती करायची असेल तर मी जसा प्रत्येक संकटात वागलो तसे वागण्याचा प्रयत्न करावा. मला तुम्ही पुरुषोत्तम म्हणता पण ‘पुरुषोत्तम’ होण्यासाठी प्रयत्न करणारे फार कमी लोकं आहेत. तुम्हाला मनमोहन व्हायला आवडते पण ‘कालियामर्दन’ करण्याची कोणाची तयारी दिसत नाही. आज अनेक ‘नरकासुर’ आहेत, अनेक ‘कालिया’ आहेत पण त्यांचा बंदोबस्त कोण करणार ? विचार करा.
प्रत्येकाने जेव्हा आपापली काठी लावली तेव्हा माझ्या करंगळीने गोवर्धन उचलला गेला, हे आपण विसरून जात आहात. गीता सांगायला तुम्हाला कोणीही भेटेल पण त्यासाठी तुम्हाला अर्जुनासारखे भक्त व्हावे लागेल…!
भक्ती तशी प्राप्ती असे म्हणतात, पण आज सुचवावेसे वाटते, जशी भक्ति तशी प्राप्ती!!.
आज माझा ‘जन्मोत्सव’ तुम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा कराल, तेव्हा याचाही विचार कराल, असा विश्वास वाटतो.
☆ जड झालेले आई-बाप… साभार : श्री राकेश जगताप ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆
नेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा ‘राजेशचा’ मला फोन आला… म्हणाला, “मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच..!”
मी “हो थांबतो” म्हटलं.
मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.
एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, “ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल…!”
ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं..
अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, “आजोबा तुम्हाला भूक लागलीय? हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते..!”
ते म्हणाले, “नको बाबा नको.. पैसे नको.. एक वडापाव घेऊन दे तेवढा”
मी म्हटलं, “थांबा इथेच मी घेऊन येतो.”
एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले.
मला म्हटले, “वर नको बसू , पडशील… इथं बस माझ्या बाजूला, कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास !”
मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली… कुठून आलात? कुठे जायचंय? कोणाला शोधताय? वैगेरे वैगरे.
“मी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे…
इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर, वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला.
पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!”
मी म्हणालो, “बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही, सांताक्रुज ला आहे Airport.
आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, “परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं… फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा…त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून”
आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली… मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं…
मी विचारलं, “तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?”
“मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त” ते म्हणाले.
मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला…
मग मी तो कागद उघडून पाहिला… त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.
मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता… मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं.
तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश…
आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो…
मला कळत नव्हतं, मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती? कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल..
आजोबांना मी म्हणालो, “आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.
अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं, “मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये? “
म्हणाले, “मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी…
आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो….
तेवढ्यात मित्राचा आवाज आला, “चल ना ऐ…!”
आणि मी भानावर आलो… त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो…
घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता…
‘आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस.. आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता…? इतकं प्रेम ???
साभार : श्री राकेश जगताप, मुंबई
प्रस्तुती : सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ती त्याच्यापेक्षा सुमारे बारा वर्षांनी धाकटी. त्याची पहिली बायको वारली म्हणून हीची आणि त्याची लग्नगाठ बांधली गेली. खरं तर असं दुसरेपणावर तिला कुणाच्या घरात जायचं नव्हतं. पण त्याला नववधूच पाहिजे होती. पण हिच्या घरात तिच्या मागे लग्नाच्या प्रतीक्षा यादीत आणखी दोघी होत्या. ही गेल्याशिवाय त्यांना पुढे येता येत नव्हते. आणि तो तर एका कारखान्यात पर्मनंट! हा शब्द म्हणजे आर्थिक स्थैर्य हमी. शिवाय तो एक बरे, त्याला प्रथम विवाहातून काही अपत्य नव्हते. यातून ती त्याची बायको झाली. आणि एक adjustment संसार सुरू झाला! आधीच बायकोला पायीची वहाण समजण्याची वृत्ती त्यातून ती वयाने लहान असल्याने तो तिचा नवरा कमी आणि मालक किंवा पालक अशा भूमिकांत जास्त जाई. तरी पण त्याने तिला भरपूर सुख दिलं असं ती आज तिच्या सत्तरीतही हसून सांगत असते. सुख म्हणजे काय.. तर पाणी भरण्याचे! तिच्या वस्तीत पाणी येत नसे. तो रात्री कामावरून आल्यानंतर दूरवरून कॅन भर भरून पाणी आणून देई. आणि येताना त्याचेही ‘पाणी’ग्रहण करून येई. तसं वस्तीत एक नळकोंडाळे होते… पण आपली आपल्यापेक्षा तरुण बायको लोकांच्यात जाणे त्याला पसंत नसे! तिने कुणाशी बोललेलं त्याला खपत नसे.. पदर डोक्यावरून जराही ढळता कामा नये! डोक्यावर खिळा ठोकून ठेवीन पदर अडकवून ठेवायला.. असा दम तो तिला द्यायचा! पण तशातही ती राहिली. चार घरची कामं धरली आणि वर्षानुवर्षे टिकवली.. त्यातून संसाराला जोड मिळाली.
मद्यपान आणि धूम्रपान ही खाण्याच्या पाना सारखी किरकोळ व्यसनं वाटून घेतात लोक. त्याचे दुष्परिणाम थेट रक्तवाहिन्या निरूपयोगी होण्यापर्यंत होतो.. हे पाय amput केल्यावरच समजते अनेकांना. कारण तोपर्यंत रक्तात स्वभावात नसलेला गोडवा रुतून बसलेला असतो!
त्याचे पायाचे एक बोट काढले आरंभी आणि पुढे गुडघ्यापर्यंत प्रकरण गेले. आता सर्वकाही बिछान्यावर. दुसरे बालपण सुरू झाले होते. ती मात्र लहान होऊ शकत नव्हती. किंबहुना महिलांना आणि विवाहित महिलांना उतारवयात लहान होण्याची परवानगी नसते आपल्याकडे. मुलगी, सून, नात इत्यादी नाती रुग्णाची ‘ ती ‘ सेवा नाही करू शकत सहजपणे. हल्ली मेल नर्स, डायपर इत्यादी सेवा सशुल्क उपलब्ध आहेत. पण हे शुल्क ज्यांना देता येत नाही, तिथे ही क्षणाची पत्नी अनंतकाळच्या मातेच्या भूमिकेत जाते.. असे दृश्य सर्व रुग्णालयांत सर्रास दिसते! काय असेल ते असो… पण क्षणाचा पती अनंतकाळचा पिता झाला आहे.. असे अभावाने दिसते! स्त्रीच्या या वर्तनात तिच्या हृदयात तिच्या जन्मापासून घर केलेलं मातृत्व असतं. आयुष्यभर किमान सार्वजनिक जीवनात राखलेलं शारीरिक अंतर, लज्जा इत्यादी इत्यादी रुग्णालयात विस्मृतीत टाकले जाते. आपल्या माणसाची कसली लाज? अशी विचारणा एक बाईच करू जाणे! यात वेदनेमुळे, पुरुषी अहंकारामुळे आणि सवयीने पुरुष या ‘ मातां ‘ वर खेकसतना आढळतात… माता मात्र वरवर हसून आणि मनातून खट्टू होऊन वेळ मारून नेते! अर्थात ही बाब सर्वच जोड्याना लागू होत नाही. काही अनंत काळचे बाबा मी पाहतो आहे आजही.
आपली ही कथा नायिका त्याच्या शिव्या, ओरडा खाते आहे आजही. पण आपले कुंकू शाबूत राखण्यात तिला जास्त रस आहे. आजवर प्रेमाचा एक शब्द कानावर न पडलेली ही अजून आशेवर आहे. तो तिला मर म्हणतो.. त्यावर ती म्हणते.. मग तुमचं कोण करणार? त्यावर तो मौनी बाबा होतो! ती insulin टोचायला शिकली आहे. तिचे पहिले टोचणे त्याला अजिबात टोचले नाही, त्यावेळी तो कधी नव्हे तो गालात हसला होता!
यापुढील पिढ्या हे मातृत्व स्वीकारतील का? हा प्रश्न आहेच. पण पुरुष अजूनही आपल्या मनोवृत्तीत बदल करून बाईला ताई आणि आई या भूमिकेतही पाहू लागला तर… प्रत्येक स्त्रीला माता व्हायचं असतंच की…!
सबंध प्राणिसृष्टीत एकमेकांची सुश्रुषा करण्याची क्षमता इतर प्राण्यांच्या तुलनेत मानव प्राण्याला जास्त लाभली आहे. सर्वच बाबतीत आईवर अवलंबून राहण्यात माणसांची अपत्ये आघाडीवर आहेत! आणि मानवी शरीराची निगा राखणे सर्वांत अवघड बाब असावी. बालकास आहार देणे, शरीर धर्मातून बाहेर पडणाऱ्या त्याज्य पदार्थांची विल्हेवाट लावणे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या घाणीची स्वच्छता करणे, शरीर स्वच्छ करणे या गोष्टी आईशिवाय इतर कुणी अधिक प्रेमाने, सफाईदारपणे करीत असेल तर ती व्यक्ती खूपच मोठी म्हणावी लागेल.. अन्यथा आईला पर्याय नाही!
पण अडचण अशी आहे की आई शेवटपर्यंत पुरत नाही!
आई जन्माची शिदोरी… सरतही नाही आणि उरतही असं फ. मु. शिंदे म्हणत असले तरी
ही शिदोरी संपते! पण एक मात्र खरे… ही शिदोरी एक नवे नाते घेऊन जीवनात येते.. पत्नी!
मानवी आयुष्याची उत्तरायुष्यातील लांबी लक्षात घेतली तर पत्नीच सर्वाधिक काळ पुरुषाची सोबत करते!
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
विडा घ्या हो अंबाबाई
‘ठेविले अनंते तैसेची रहावे ‘ अशी आईची समाधानी, आनंदी वृत्ती होती. हातात कांचेच्या बांगड्या, गळ्यात काळी पोत आणि चेहऱ्यावरचे समाधानी हास्य हेच होते आईचे दागिने आणि वैभव.. शेवटपर्यंत सोने कधी आईच्या अंगाला लागलंच नाही. आई गरीबीशी सामना करणारी, आहे त्यात संसार फुलवणारी होती . नानांच्या पिठाला तिची मिठाची जोड असायची. मसाले करून देणे. सुतकताई, पिंपरीला कारखान्यात काम करायला पण जायची . विद्यार्थ्यांना डबा करून देणे अशी छोटी मोठी कामे करून मिळणारी मिळकत हाच तिचा महिन्याचा पगार होता.
माहेरी मोकळ्या हवेत हेलावणारा तिचा पदर सासरी आल्यावर पूर्णपणे बांधला गेला .वेळात वेळ काढून महिला मंडळ, एखादा सिनेमा हाच तिचा विरंगुळा होता. त्यावेळी सिनेमाचे तिकीट 4 आणे होतं. प्रभात टॉकीज मध्ये (म्हणजे आत्ताच कीबे) माझे काका विठू काका ऑपरेटर होते. त्यांचा आईवर फार जीव. ते आईला कामात खूप मदत करायचे. तिला मराठी सिनेमाचे पास आणून द्यायचे. तेवढाच तिच्या शरीराला आणि मनाला विसावा.
तिचा कामाचा उरक दांडगा होता. घरच्या व्यापातून वेळ काढून घरी पांच पानांचा सुंदरसा गोविंदविडा (हा सुंदरसा विडा करायला माझ्या वडिलांनी तिला शिकवलं होतं.)देवीसाठी तयार करून ती रोज जोगेश्वरीला द्यायची. हा नेम तिचा कधीही चुकला नाही.रात्रीच्या आरतीच्या वेळी तबकामध्ये निरांजनाशेजारी सुबक आकाराचा, पिरॅमिड सारखा गोविंदविडा विराजमान व्हायचा. “विडा घ्या हो अंबाबाई” म्हणून अंबेला रोज विनवणी असायची. एक दिवस कसा कोण जाणे विडा द्यायला उशीर झाला. (गुरव )भाऊ बेंद्रे आणि भक्त विड्याची वाट बघत होते. तबकात जागा रिकामी आहे हे सगळ्यांनी ओळखलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. विडा विसरला असं कधीच झालं नव्हतं. विड्याची वाट बघत सगळेजण थांबले होते. भाऊ बेंद्रे तबक घेऊन उभेच राहयले.भक्त आईची विडा घेऊन येण्याची वाट बघत होते…
आणि इतक्यात लगबगीने आई पुढे धावली, विडा देवीपुढे ठेवला गेला. आणि टाळ्यांच्या गजरांत आरतीचा सूर मिसळला…
“विडा घ्या हो अंबाबाई, ही विनंती तुमच्या पायी.”
… आई अवघडून गेली. आपल्याकडून उशीर झाला म्हणून आईला अगदी अपराध्यासारखं झालं होतं. तिने देवीपुढे नाक घासले. त्यानंतर कधीही तिचा हा नियम चुकला नाही. आम्ही नंतर पेशवेकालीन मोरोबा दादांच्या वाड्यात राहायला गेलो, तरीसुद्धा आईने हा नियम चालू ठेवला होता. ती म्हणाली, “ जोगेश्वरी आईनी आपल्याला पोटाशी होतं ते पाठीशी घालून तिच्याच परिसरात तिच्या नजरेसमोरच ठेवलंय.” कारण मोरोबा दादांचा पेशवेकालीन वाडा जोगेश्वरीच्या पाठीमागेच… म्हणजे आप्पाबळवन्त चौकातच होता.
आज देवीचे नवरात्र बसले आहे. ती देवी कशी आहे ? – – –
केसापासून पायाच्या नखा पर्यंत सर्वांग सुंदर आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी, प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. ती विश्वाची स्वामिनी, जगतजननी आहे. अशी ही देवी सुंदर, कोमल, शांत, नाजूक आहे. , , पण इतकच तिच वर्णन आहे का? नाही….. ती अष्टभुजा आहे. तिच्या हातात गदा, चक्र, शंख, धनुष्य बाण, शुल, पाश, खड्ग अशी अनेक शस्त्रे आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे. ती चंडिका आहे. प्रत्यक्ष देवांनीही तिची स्तुती केलेली आहे… अत्यंत नाजुक, शांत, कोमल पण वेळप्रसंगी भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी आहे. राक्षसांना शिक्षा करणारी आहे. निरनिराळ्या रक्षसांना शासन करून तिने यमलोकात धाडलेले आहे.
या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता…. एक स्त्री म्हणून बघूया… ती पण आपल्यासारखीच आहे. अशा या देवीचा अंश आपल्याही शरीरात आहे.
आपण तिची प्रार्थना करूया. प्रार्थना करून झाली की आपण तिच्याकडे काहीतरी मागतो.
आता असा विचार करा की काय मागायचे?… लौकिकात जे हवे आहे ते सगळे मागून झालेले आहे. आता थोडं वेगळं काही मागू या…
राक्षस म्हटलं की अति भयंकर, क्रूर, अक्राळ विक्राळ असं काहीस स्वरूप आपल्यासमोर येतं…
पण लक्षात घ्या की…
राक्षस ही एक वृत्ती आहे… ती विचारात, कृतीतही असू शकते.
ते प्रचंड, मोठेच असतात, त्यांचे आकार भयानक असतात असे नाही… काही मनाला नकळत सूक्ष्मपणे सतत त्रास देणारेही असतात… काही बहुरूप्यासारखे असतात… वरून गोड गोड बोलून फसवणारे ही असतात. त्यांच्यातला राक्षस ओळखायला शिकुया…..
आपण त्यांच्याशीही लढू या… अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात. त्यासाठी देवी सहाय्य करेलच. पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे.
त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत.
अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करा. एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला पण अंगी सामर्थ्य यावं लागतं. ते यायला हवं….. तसंच वेळ प्रसंगी शांत राहण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते. ” मौन” ही आपली आपण आपल्याशीच लढलेली लढाई असते. ती पण जिंकता आली पाहिजे.
पण आता तेवढ्याने भागणार नाही. आता परिस्थिती अशी आहे की आपल्या अंगात जोश ही यायला हवा…. शत्रूला भ्यायचं नाही तर… त्याच्याशी सामना करायचा.. निकरानी आणि सर्व शक्तीनिशी.. लढायचं… असं ती आपल्याला शिकवते… शत्रूला नामोहरम करून मगच देवी थांबते… विजय मिळेपर्यंत झुंजायचं ही तिची वृत्ती आपणही अंगी बाणू या.
देवीच गुणगान करा. श्री सूक्त. कुंकुमार्चन, देवी अथर्वशीर्ष, सप्तशतीचा पाठ हे सर्व काही करा.
मात्र आता तिच्याकडे ही प्रार्थना करा…..
हे देवी मला निर्भय आणि सबल कर… आज जगात वावरताना प्रत्येकीला.. प्रत्येकीला असं बनायला हवं आहे. तसेच तिला आश्वासन द्या की मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन आणि तो मनापासून करा.
देवी यश देईलच..
दोन भुजा असलेल्या अनेक जणी अष्टभुजा असल्यासारख्या अनेक आघाड्यांवर लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत.. त्यांच्या इतक आपल्याला जमलं नाही तरी चालेल… पण थोडा आपण प्रयत्न जरूर करूया. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या. आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच.
त्या मातृरूपेण संस्थिता, लक्ष्मी रुपेण संस्थिता इत्यादी वर्णनानंतर देवीच वर्णन ” शक्ति रूपेण संस्थिता ” असेही आहे… हे आपण निश्चित लक्षात ठेवूया.
अशा या देवीला माझा नम्रपणे नमस्कार.
एका मागणीचा जोगवा तुझ्यासमोर पदर पसरून मागते ग आई…….
माझ्या अंगणात एक कुंदाच झाड आहे. जाई, जुई, मोगरा, गुलाब, जास्वंदि यांच्या दिसण्याचा आणि सुवसाचा मोह सगळ्यांना, बिचाऱ्या कुंदाकडे कुणाचंच लक्ष नाही.
आता थंडी सुरू झाली, दरवळणारी जाई आणि जुई नाजूका गारठली, मलूल झाली. पण कोणताही गंध नसणारी, शुभ्र पांढरी कुंदकळी भरून आली. एकदम मस्त ताजीतवानी, भरभरून बहरली.
टपोरी, स्वच्छ, निर्मळ फुल परडीत विसावली. दातांच्या शुभ्र कुंदकळ्या अशी उपमा देतात, त्याचीच आठवण आली.
तिच्याकडे पाहिलं आणि वाटलं किती साधी, सरळ आहे ही, एरवी फारसं लक्ष देत नाही, म्हणून रागवत नाही, फुगत नाही, रडवेली होत नाही, आणि अजिबात उन्मळूनही पडली नाही.
खरचं खूप शिकता येईल हिच्याकडून … आपलं काम आपण चोख बजावत रहायचं, मग इतरेजन कसे वागतात, काय करतात त्याचा कशाला विचार करायचा !
मी सकाळी उठून देवासमोर उभी होते, तर लक्षात आलं, काल देवाला वाहिलेली कुंदाची फुलं काल होती तितकीच आज अजूनही शुभ्र आणि टवटवीत आहेत. अशी ही कुंदाची फुलं…… खरचंच खूप प्रेरणादायी वाटली…..