डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
मागे एका आजोबांशी बोलत होतो त्यांच्या बोलण्यात आलं, आता राहिलंय काय ? आता पूर्णविराम देण्याची वेळ आली बाबा…
यावर माझी विचार चक्र सुरू झाली… पूर्णविराम म्हणजे खरंच अंत असतो का… ? पूर्णविराम दिल्यानंतरच नवीन वाक्याची सुरुवात होते… मग पूर्णविराम अंत कसा असेल ?
पूर्णविराम म्हणजे पुन्हा नवीन वाक्य सुरुवात करण्याची उमेद…!!!
ज्यांनी आपल्या आयुष्यांपुढे, थकून असे पूर्णविराम दिले आहेत, त्या पूर्णविरामानंतर आपण पुन्हा “श्री गणेशा” लिहून आयुष्याची सुरुवात त्यांना नव्याने करून देत आहोत.
आमच्यात ही पात्रता तुम्हामुळे आली आणि म्हणून भेटलेल्या लोकांचे पूर्णविराम, अल्पविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, अनुस्वार, उकार, रूकार लेखाजोखाच्या स्वरूपात आपणास सविनय सादर !
- एक जूनला कापडी पिशवी प्रकल्प सुरू झाला. भीक मागणाऱ्या पाच लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिले, मला मिळणाऱ्या जुन्या कपड्यांचा वापर करून, आपण कापडी पिशवी शिवत आहोत….
पुलाखाली / झोपडपट्टीत किंवा आणखी जिथे जमेल तिथे हे आमचे पाच लोक कापडी पिशवी शिवत आहेत आणि इतर पाच याचक लोक कापडी पिशवी विकत आहेत.
यातून प्रत्येकाला रोजचा पाचशे रुपयाचा व्यवसाय मिळत आहे. या एका प्रकल्पामुळे दहा कुटुंबं पोटाला लागली आहेत.
“प्लास्टिक पिशव्या वापरू नका, कापडी पिशव्या वापरा” या अर्थाचे आपण तयार केलेले पुणेरी टोमणे घेऊन; समाजामध्ये माझे याचक लोक प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत प्रबोधन करत आहेत.
रस्त्यावर भीक मागणाऱ्या आपल्या याचक मंडळींनी समाज प्रबोधन करावे, कापडी पिशव्या विकाव्या हा जगातील पहिलाच प्रकल्प असेल.
- या महिन्यात काही अंध आणि अपंग याचकांना वजन काटा घेऊन दिला आहे. शनिवार वाड्याच्या भिंतीलगत आपले हे लोक वजन काटा घेऊन बसले आहेत. लोक येतात आणि वजन करून त्यांना पैसे देतात. भीक मागण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं… !!!
लोकांनी केलेल्या “वजनामुळे” आपल्या लोकांच्या डोक्यावरचा “भार” हलका होईल हे निश्चित…!
शनिवार वाड्याच्या भिंतीलगत अनेक लोक अनेक प्रकारचा व्यवसाय करत आहेत….
पूर्वी हे कधीतरी भीक मागत होते…. आज आपलं बोट धरून ते स्वाभिमानाने जगत आहेत.
कुणी टॅटू काढतंय, कोणी पोस्टर विकतंय, कोणी चप्पल विकतंय, तर कोणी आणखी काय करतंय….!
कधी इकडे आलात तर…. गरज असो नसो… त्यांच्याकडून एखादी वस्तू घ्या…
यामुळे तुमचं फार काही जाणार नाही; परंतु त्यांना लाखमोलाचा आत्मसन्मान मात्र मिळेल !
पूर्व आयुष्याबद्दल विचारून त्यांना लाजिरवाणं मात्र नको करू या…!
- कोणाचाही आधार नसलेल्या एका ताईला नवीन हातगाडी घेऊन दिली आहे. या हात गाडीच्या सहाय्याने व्यवसाय करून आपलं घर ती चालवत आहे.
वर वर्णन केलेले पंधरा-वीस लोक… प्रत्येकाची स्वतंत्र कहाणी आहे…
यांच्या हातातला कटोरा या महिन्यात सुटला आहे…
हे मला भेटायला येतात त्यावेळी रडतच येतात… !
त्यांना काहीतरी बोलायचं असतं, पण त्यांना बोलताच येत नाही…
आणि कान असून मी बहिरा होतो..
शब्द इथे थिटे पडतात पण अश्रू बोलू लागतात…. तेही ताठ मानेने…!!!
शब्दातूनच सर्व काही व्यक्त होत असतं तर अश्रूंची गरजच राहिली नसती…!!!
शब्दांच्या पलीकडचं मांडण्यासाठीच निसर्गाने अश्रू दिले आहेत…!!!
रडण्याचा आशीर्वाद निसर्गाने फक्त माणसाला दिला आहे…
ज्याच्या समोर रडावं… त्यानं आपल्या माथ्यावर प्रेमानं, मायेनं हात ठेवावे… आणि रडणं पूर्ण झालं की आपण त्याच्या चरणावर माथा ठेवावा…
हे चरण जिथे सापडतील ती आपली माणसं… तेवढीच आपली संपत्ती…. तोच खरा श्रीमंत… !!!
बाकी घरदार, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, पद पैसा प्रतिष्ठा सगळं झूट…!!!
शैक्षणिक
– माझ्या आयुष्यावर जे मी पुस्तक लिहिलं आहे…
वर्षभर ते विक्री करतो…. त्या पैशाला हात लावत नाही, परंतु एप्रिल मे जून जुलै या महिन्यात पुस्तक विक्रीतून मिळालेला सर्व पैसा भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो.
जे या अगोदर कधीही शाळेत गेले नाहीत अशा सर्व मुलांना मॉडर्न मराठी मिडीयम, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन दिले आहे.
जी मुलं या अगोदर कोणत्यातरी शाळेत शिकत होती, तिथल्या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत.
सॉक्स युनिफॉर्म पासून दप्तरापर्यंत आणि दप्तरापासून कंपास पेटी पर्यंत सर्व बाबी मुलांना घेऊन दिल्या आहेत.
आमचा एक मुलगा कॉम्प्युटर सायन्स करत आहे, दुसरी मुलगी एमबीए करत आहे, तिसरी मुलगी आयएएस करत आहे, चौथ्या मुलाची पोलीस भरतीसाठी नुकतीच नोंद केली आहे.
याव्यतिरिक्त नुकताच बारावी पास झालेला मुलगा; त्याला स्पोर्ट्स टीचर व्हायचे आहे, समाजासाठी स्वतः घातक होता होता वाचलेला हा मुलगा त्याच्या मागील पिढीला घातक होण्यापासून वाचवत आहे. “घातक” या लेखामध्ये त्याच्याविषयी सविस्तर सर्व काही लिहिलं आहे…
आमच्या शैक्षणिक प्रकल्पात मदत करणाऱ्या अनेक घटकांपैकी एक घटक; चॉईस बुक शॉप चे मालक, श्री अजय कटारिया नुकतेच आपल्याला सोडून गेले… “अशी पाखरे येती”… या नावाने लेख लिहून त्यांना आदरांजली समर्पित केली आहे.
वैद्यकीय
- अनेक वृद्ध लोकांना कानाला ऐकू येत नाही किंवा डोळ्यांना दिसत नाही, या कारणास्तव; रस्ता ओलांडताना किंवा इतर ठिकाणी त्यांचे रोड एक्सीडेंट होतात. यात कधी हात मोडतो कधी पाय मोडतो, कधी डोके फुटते, कधी इतर गंभीर दुखापत होते किंवा कधी कधी जीव सुद्धा जातो.
अशा अपघाताची कुठेही नोंद होत नाही… कोणालाही शिक्षा होत नाही… कारण त्यांना माणूसच समजलं जात नाही. असे लोक उपचाराविना रस्त्याकडेला तळमळत पडून राहतात. जखमांमध्ये अक्षरशः किडे पडतात.
अशा सर्वांना या महिन्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांच्यावर उपचार केले, ऑपरेशन केले. या सर्वाचा खर्च संस्थेने उचलला आहे.
बऱ्या झालेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवलं आहे, तिथे त्यांना झेपतील असे व्यवसाय उघडून दिले आहेत.
- एक्सीडेंट टाळता यावेत यासाठी, ज्यांना दिसत नाही, अशा वृद्ध याचकांना आपण डोळ्याच्या दवाखान्यात नेऊन तपासणी करून चष्मे देत आहोत, मोतीबिंदूचे ऑपरेशन करत आहोत. आज पावतो 2000 पेक्षा जास्त रुग्णांना दृष्टी मिळवून दिली आहे.
यात अनेक रुग्ण असे आहेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे सुद्धा शक्य नाही, अशांसाठी आपण आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे.
- ऐकू येत नसल्यामुळे होणारे एक्सीडेंट रोखता यावेत; यासाठी”मांडके हियरिंग सर्व्हिसेस, पुणे” यांच्याशी आपण करार केला आहे. वृद्ध याचकांची आपण कानाची तपासणी करून त्यांना कानाची मशीन सुद्धा देत आहोत.
- कोणत्याही आजाराचे निदान करायचे झाल्यास रक्त – लघवी तपासणी, सोनोग्राफी एक्स-रे, सिटीस्कॅन यासारख्या बाबींची सुद्धा आवश्यकता असते. या तपासण्या न केल्यामुळे आजाराचे नेमके निदान कळत नाही आणि अचानकपणे मृत्यू होतात.
हे टाळण्यासाठी वरील सर्व तपासण्या आपण रस्त्यावरच करून घेत आहोत. ज्या तपासण्या रस्त्यावर होत नाहीत, त्या तपासण्या “रेड क्रॉस सोसायटी, पुणे” मधून आपण करून घेत आहोत.
- संपूर्ण दवाखाना मोटरसायकलवर घेऊन भिक्षेकरी जिथे बसतात तिथेच उकिरडा फुटपाथ किंवा सुलभ शौचालय शेजारी दवाखाना रस्त्यातच मांडून बसतो. त्यांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा देतो. वैद्यकीय सेवा देता देता त्यांच्याच बरोबर जेवतो खातो, गप्पा मारतो … विनोद करतो, त्यांच्या सुखदुःखात समरस होतो.
ते काही काम करतील का ? याची चाचपणी करतो आणि त्यांना मग या आधारे आपण छोटे मोठे व्यवसाय टाकून देतो आहोत.
पुणे आणि चिंचवड मिळून भीक मागणाऱ्या लोकांचे असे 60 स्पॉट निश्चित केले आहेत, रोज चार याप्रमाणे पंधरा दिवसात हे सर्व स्पॉट आपण कव्हर करत आहोत.
“भिक्षेकरी” म्हणून न राहता; त्यांनी “कष्टकरी” व्हावे आणि कष्टकरी होऊन “गावकरी” म्हणून सन्मानाने जगावे… हा आपल्या कामाचा मूळ हेतू आणि गाभा आहे…!!!
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈