☆ प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
(माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज)
शिरसाष्टांग प्रणिपात,
उद्या गुरू पौर्णिमा आहे. त्यामुळे आपले स्मरण मला होणे अगदीच स्वभाविक आहे.
आपले एक प्रसिद्ध वचन आहे. “जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।” हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल… !
प्रपंच करताना दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत देखील नाही. कालच गोंदवल्यात जाऊन आलो असे म्हणता वर्ष कधी होत ते लक्षात देखील येत नाही. आम्ही बेमालूमपणे प्रपंचात गुरफटले जात असतो…..
आपण म्हणता की अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार… ?
मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न….. ! आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ ‘द्वाड’ आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!! हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!! आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो, अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण वळत काहीच नाही हो…… आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते….
श्रीमहाराज, एक करा…. तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल…. प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले…. आता आपणच माझे मायबाप!!
प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे…!
या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!
☆ शिक्षक दिनानिमित्त…☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
५ सप्टेंबर — शिक्षक दिन !
.. हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस! हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो..
मी शिक्षिका म्हणून शाळेत नोकरी केली नसली तरी शिक्षण देण्याचे काम घरात राहून बरेच वर्ष केले. माझे वडील आयुष्यभर शिक्षण खात्यात नोकरी करत होते.. बदलीनिमित्ताने ते महाराष्ट्रभर
वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते. नांदेड जिल्ह्यातील अगदी लहानशा गावात असणाऱ्या सरकारी हायस्कूल वर हेडमास्टर म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते खरे हाडाचे शिक्षक होते. एखादा विषय शिकवायचा म्हणजे जीव ओतून, अगदी मुळापर्यंत जाऊन शिकवणे!
त्यांचे स्वतःचे इंग्रजी खूप चांगले होते. ते घरी सुद्धा आम्हाला इंग्रजी शिकवत, पाठांतर करून घेत असत. आमच्या अभ्यासाकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते. नोकरीनिमित्ताने ते मराठवाड्यात गेले आणि आम्ही मुले होस्टेलवर राहून आमचे शिक्षण पूर्ण केले. खरोखरच ते आम्हाला गुरु समान होते.
माझ्या लग्नानंतर मी सासरी आले. माझे मिस्टर मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यामुळे मला नोकरीची गरज नव्हती आणि पहिली पाच वर्षे दोन मुलांच्या संगोपनात चालली होती. ज्यावेळी आम्ही सांगलीला बदली करून आलो, तेव्हा माझा मोठा मुलगा शाळेत बालवाडीत जाऊ लागला. तेव्हा माझी छोटी मुलगी तीन वर्षाची होती. तिला जवळपास बालवाडी नव्हती. त्याच वर्षी जून मध्ये माझे वडील माझ्याकडे आले होते. मी संसारात गुरफटून बाकी क्षेत्रात निष्क्रिय झाले होते. ते त्यांना बघवत नव्हते. ‘ अगं, तू एवढी शिकलीस, काहीतरी कर.. ‘ आणि त्याला निमित्त मिळाले की, छोटीला जवळ बालवाडी नाही, तेव्हा तू बालवाडी चालू कर’ असे त्यांच्या मनात आले आणि त्या दृष्टीने त्यांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी एक कॅटलॉग आणून दिला. “दुर्वांकुर” बालवाडी मी सुरू केली. प्रथम माझ्या बालवाडीत फक्त पाच मुले होती. वाढत वाढत ही संख्या 25 मुलांपर्यंत वाढली, पण त्यासाठी घर लहान होते. तरीही रोज बारा ते अडीच शाळा आणि ३ वाजेपर्यंत डबा खायला देणे आणि मुलांचे पालक आले की मुलांना सोडणे…. असा कार्यक्रम सुरू झाला होता. श्लोक, गाणी, नाच, गोष्टी सांगणे यात दोन-तीन तास कसे जात हे कळत नसे. खेळायला आमच्या घराचे अंगण पुरेसे होते. या बालवाडीमध्ये माझे मन रमले होते, पण नंतर असे झाले की माझ्या बालवाडीतील मुलांना दुसऱ्या शाळेत पहिलीत प्रवेश घेताना अडचण येऊ लागली, कारण माझी बालवाडी रजिस्टर्डं नव्हती. शेवटी हा बालवाडी प्रयोग मी थांबवला आणि क्लासेस घेण्यास सुरुवात केली.
आता माझी मुले थोडी मोठी झाली होती. त्यामुळे मी गणित आणि इंग्लिश चे क्लास सुरू केले. प्रथम प्रथम मलाच कॉन्फिडन्स वाटत नव्हता की, आपण पाचवी, सहावी पासूनचे विषय शिकवू शकू की नाही! तेव्हा शेवटी गुरु कोण होते तर माझेच वडील! त्यांनी मला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘तू सुरुवात तर कर, म्हणजे आपोआपच तुला क्लास घेणे कळू लागेल. इकडे सासर घरात ‘आमचे सगळे नीट करून मग उरलेल्या वेळेत तू काय ते कर’ असा दृष्टिकोन असल्याने मलाच थोडी तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी लवकर उठून गडबडीने सर्व आवरून साडेआठ ते साडेदहा/ अकरा पर्यंतच्या वेळेत क्लास चालू ठेवायचा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत क्लास घ्यायचा. त्यातही वेगवेगळ्या वर्गाची, शाळेची मुले- मुली ॲडजस्ट करत राहायचे.. ही सगळी कसरत तेव्हा स्वेच्छेने केली. कारण पैसा मिळवणं हा हेतू आणि मोठी गरज नव्हतीच!
माझ्या मुलांबरोबरची मुले- मुली क्लासला येऊ लागली. नकळत मुलांचाही अभ्यास चांगला होऊ लागला. साधारणपणे पंधरा वर्षे मी वेगवेगळ्या वर्गांचे क्लास घेत होते.
त्या नंतर मुलांच्या काॅलेज शिक्षणाच्या काळात मला क्लास बंद करावे लागले. पण या काळात मनाला खूप समाधान मात्र मिळाले. अजूनही जुने विद्यार्थी- विद्यार्थिनी भेटले की” बाई” म्हणून हाक मारतात,
कधीतरी गुरुदक्षिणेची फुले मोबाईलवर देतात, तेव्हा आनंद वाटतो. ‘अरे, आपल्या नकळत हे विद्यादान थोडे तरी घडले आहे. आणि त्यातूनच काही मुले इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रात काम करत आहेत, हे पाहिले की मन आपोआपच भरून येते! खूप काही घडवले असे नाही, पण आपणही या शिकवण्याच्या ज्ञान यज्ञात छोटासाच स्फुल्लिंग पेटवू शकलो याचे मनाला समाधान मिळते, हे तर खरेच! पण या सगळ्याच्या मुळाशी माझे वडील माझे गुरु होते, या भावनेने मन भरून येते !
काही गोष्टी सहजच घडतात पण बालपण सरलं तरी ती आठवण आणि त्यातली गंमत मात्र जात नाही. कधी विषय निघाला आणि पुन्हा ती आठवण सहजपणे मनाच्या कोपऱ्यातून वाट काढत वर आली की नकळत हसू फुटतेच.
आमच्या पप्पांच्या व्यक्तिमत्वातली ठळक आणि आकर्षक बाब म्हणजे त्यांचे तेजस्वी, मोठे, पाणीदार डोळे. आम्हा पाचही बहिणींचे काहीसे मोठे डोळे म्हणजे पप्पांकडून आलेला वारसाच असे म्हणायला हरकत नाही.
तर त्या डोळ्यांचीच गोष्ट आज मला लिहिता लिहिता आठवली. गल्ली मधला आमचा सवंगड्यांचा चमू तसा फारच विस्तारित होता आणि कळत नकळत वयाच्या थोड्याफार फरकांमुळे असेल पण वेगवेगळे समूह सहजपणे बनले गेले होते. लहान गट, मध्यम गट, मोठा गट अशा प्रकारचे. गटागटातले खेळही वेगळे असायचे. एक मात्र होतं की हे ‘मुलींचे खेळ” हे “मुलांचे खेळ’ असा फरक नाही केला जायचा. विटी दांडू, गोट्या, पतंग उडवणे, हुतुतु (कबड्डी), क्रिकेट या खेळातही मुलींचा तितकाच दांडगा सहभाग असायचा. लहान गटातल्या मुलांचा मोठ्या गटातल्या मुलांशी खेळण्याचा खूपच हट्ट असायचा आणि ती पण कुणाकुणाची भावंडे असायची, त्यामुळे त्यांना खेळायला घ्यावंच लागायचं पण तत्पूर्वी त्यांना एक लेबल मिळायचं कच्चा लिंबू आणि या कच्च्या लिंबाला मात्र बऱ्याच सवलती असायच्या.
खेळातल्या नियमांची माफी असायची पण माझी धाकटी बहीण छुंदा हिला मात्र ‘कच्चा लिंबू” म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही. तिला तो ‘रडीचा डाव” वाटायचा. ‘रडीचा डाव खडी’ वगैरे तिला कोणी बोललं की तिला फारच राग यायचा. शिवाय तिचे स्वतःचेच तिने ठरवलेले नाही रे ही बरेच असायचे. ती नेहमीच काहीशी शिष्ट, भिडस्त आणि ‘मला नाही आवडत हे’ या पठडीतली होती पण गल्लीतल्या मोरया आणि शेखरशी तिचे मस्त जुळायचे. हे तिघेही तसे बरोबरीचेच होते आणि म्हणून असेल पण छुंदा, मोरया आणि शेखर यांची मात्र घट्ट मैत्री होती आणि या मैत्रीतली आणखी एक गंमत म्हणजे छुंदाला लहानपणापासून मुलांसारखे शर्ट— पॅन्ट घालायला आवडायचे आणि माझी आई, कधी आजीही तिच्यासाठी अगदी हौसेने तिच्या मापाचे शर्ट— पॅन्ट घरीच शिवत. त्यावेळी रेडीमेड कपड्यांची दुकाने फारशी नव्हती. कपडे शिवून देणारे शिंपी असायचे पण आमचे गणवेशापासून, रोजचे, घरातले, बाहेरचे सगळेच कपडे आई अतिशय सुंदर शिवायची.
तर विषय असा होता की शेखर, मोरया आणि ही मुलांच्या वेषातली बॉयकट असलेली मुलगी छुंदा. मस्त त्रिकूट. ते नेहमी तिघंच खेळायचे. खेळ नसला तर आमच्या घराच्या लाकडी जिन्यावर बसून गप्पा मारायचे. मोरया जरासा गोंडस आणि दांडगट होता. शेखर तसा मवाळ होता पण नैसर्गिकपणे असेल कदाचित ती दोघं छुंदाचं मात्र ऐकायचे. तिला त्यांनी कधी दुखवलं नाही. भांडणं झाली तरी परत दोघेही तिला हाक मारून खेळायला घेऊन जायचे.
आज हे लिहीत असतानाही मला ती एकाच उंचीची, एकाच वयाची, निरागस तीन मुलं जशीच्या तशी दिसत आहेत. खरं सांगू गद्र्यांचा नवसाचा मोरया, मोहिलेंचा शेखर… गद्रे, मोहिले आमचे टेनंट्स, त्यांच्याशी असलेली स्वाभाविक बनती बिघडती नाती पण या साऱ्यांचा छुंदा— मोरया— शेखर यांच्या मैत्रीवर काहीच परिणाम कधीच झाला नाही. बाल्य किती निष्पाप असते ! छुंदा त्यांच्या घरातही सगळ्यांची फार आवडती होती.
सर्वसाधारणपणे आम्ही सारीच मुलं गल्लीतच खेळायचो. गल्लीच्या बाहेर खेळायला जायची फारशी वेळ यायचीच नाही आणि जायचंच असलं तर घरून परवानगी घेतल्याशिवाय तर नाहीच. शिवाय संध्याकाळचं दिवेलागणीच्या वेळेचं शुभंकरोति, परवचा, गृहपाठ हे कधी चुकायचं नाही पण त्या दिवशी खेळता खेळता.. मला वाटतं मुल्हेरकरांच्या दिलीपच्या लक्षात आलं की हे त्रिकूट कुठे दिसत नाही.
यांना स्वतःची नावं, घराचा पत्ता तरी सांगता येईल का ?
कुठे गेले असतील ?
तसं त्यावेळेस ठाणे एक लहानसं गावच होतं आणि हे गावही अनेक गल्ल्यागल्ल्यातूनच वसलेलं होतं. कुणीतरी म्हणालं, “ठाण्यात मुलं पळवण्याची टोळी आलेली आहे. ”
बापरे !
आई, पप्पा, जीजी आणि आम्ही सारेच पार हादरून गेलो.
संध्याकाळ होत आली. घरोघरी दिवे लागले. तोंडचं पाणी पळालं तरी या तिघांचा पत्ता नाही. शोध मोहीमही असफल ठरली. आता शेवटचा मार्ग— पोलीस चौकी. मागच्या गल्लीतली, त्या पलीकडची, इकडची, तिकडची बरीच माणसं गोळा झाली.
मुलं हरवली.
कुणी म्हणालं, ”पण अशी कशी हरवली ?”
दिलीप तापट. आधीच बेचैन झालेला. तो ताडकन म्हणाला, “कशी हरवली माहीत असतं तर सापडली नसती का ? काय विचारता काका तुम्ही…?”
आणि हा सगळा गोंधळ चालू असताना एकाएकी त्या लहानशा गल्लीत पांढरी, मोठी, अँम्बॅसॅडर गाडी हाॅर्न वाजवत शिरली. घोळक्यापाशी थांबली आणि गाडीतून ठाण्यातील मान्यवर आणि प्रसिद्ध समाजसेविका मा. विमल रांगणेकर आणि त्यांच्या समवेत ही तीन मुलं उतरली. विस्कटलेली, भेदरलेली, रडून रडून डोळे सुजलेली, प्रचंड भ्यायलेली… छुंदाने तर धावत जाऊन जीजीला मिठी मारली. आता त्या मुलांच्या मनात भीती होती.. घरच्यांचा मार बसणार की काय याची.
विमलताई म्हणजे प्रसन्न व्यक्तीमत्व. उंच, गोऱ्या, मोहक शांत चर्या. सुप्रसिद्ध क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या त्या पत्नी. यांना कुठे सापडली ही मुलं आणि या स्वतः मुलांना घेऊन आल्या? घंटाळी रोडवरच्या कोपऱ्यावर खंडू रांगणेकरांचा प्रशस्त बंगला होता. आजही आहे. ही तिघं मुलं गप्पांच्या नादात चालता चालता रस्ता चुकले असावेत. रांगणेकरांच्या बंगल्यासमोर कोपऱ्यात बावरलेल्या, रडवेल्या स्थितीतल्या या मुलांना विमलताईंनी पाहिले आणि त्यांनी चौकशी केली.
त्या सांगत होत्या, ”या मुलांना काहीही धड सांगता येत नव्हतं. नावं सांगितली. तीही पूर्ण नाही. कुठे राहतात, घराचा पत्ता त्यांना काहीही सांगता येत नव्हतं. खूप घाबरलेली होती म्हणूनही असेल. मी निरखत होते या मुलांना आणि त्यापैकी एकाच्या डोळ्यात मला ओळखीची चमक दिसली. मनात म्हटलं हे तर ढग्यांचे डोळे पण ढग्यांना तर मुलगा नाही. तरी मी याला विचारलं, ‘तू ढगे का ?’
हा म्हणाला, ”हो”
“तूच ढग्यांचा मुलगा आहेस का ? पण… ”तेव्हा तडफदार उत्तर आलं,
“नाही. मी मुलगी आहे. ”
मग सारा उलगडा झाला.
खंडू रांगणेकर आणि पप्पा दोस्तच होते. त्यांना आमचं घर माहीतच होतं.
हरवलेली मुलं सापडली.
तर असा हा गमतीदार किस्सा.
आजही, वेळप्रसंगी गल्लीतली ती माणसं कशी आपुलकीनं जोडलेली होती याची जाणीव झाली की मन भरून येतं. आता जग बदललं.
पण खरी ही गोष्ट डोळ्यांची.
गोष्ट मोठ्या डोळ्यांची. आयुष्यभर पपांनी आम्हाला स्वतःचे संरक्षण स्वतःच कसे समर्थपणे करावे याचे भरपूर धडे दिले पण या पप्पांसारख्याच असलेल्या डोळ्यांमुळे माझ्या धाकट्या, लाडक्या बहिणीचे असे रक्षण झाले, याला काय म्हणावे ?
आज हे आठवत असताना सहज ओठातून ओळी येतात..
या डोळ्यांची दोन पाखरे
फिरतील तुमच्या भवती
पाठलागही सदैव करतील
असा कुठेही जगती…
वंश, कुल, जात, गोत्र, नाव याची परंपरा भले तुटली असेल पण आम्हा बहिणींच्या परिवारात या डोळ्यांची परंपरा अखंड वाहत आहे आणि या डोळ्यातच ढग्यांची प्रतिमा आजही टिकून आहे. आता थांबते. भावूक होत आहे माझी लेखणी..
आई आपली आद्य गुरू हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नंतर वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या समुहात वेगवेगळ्या क्षेत्रात आपले गुरू बदलत जातात. अर्थात कितीही गुरू बदलले तरी त्या सगळ्यांनी दिलेल्या ज्ञानामुळेच केलेल्या मार्गदर्शनामुळेच आपण घडलेलो असतो. म्हणून त्या सगळ्यांचे स्मरण आज होणे गरजेचे आहे. त्या सगळ्यांना आदरपूर्वक वंदन 🙏🙏
पण या सगळ्यामधे लोक म्हणतात अनुभव हा गुरू मोठा आहे तर कोणी म्हणतात निसर्ग हा गुरू मोठा आहे. किती छान वाटते ऐकायला. हो आहेतच हे गुरू. पण या गुरुंबद्दलचे ज्ञान आपल्याला आपले मन देत असते. त्यामुळे मन हा मोठा गुरू आहे.
अनुभव जेव्हा आपल्याला येतो तेव्हा ती परिस्थिती काय चांगले काय वाईट याचा सारासार विचार करायला आपली बुद्धी आपले मन हे कार्यरत झालेले असते. ते मन आपल्याला त्या अनुभवांची तारतम्यता सांगत असते आणि ते तारतम्य देणारे मन हे अतिशय महत्वाचे असल्याने मन हा एक मोठा गुरू आहे.
निसर्ग हा पण गुरू आहे म्हटले तरी निसर्गातील प्रत्येक गोष्टीत काही चांगले आणि काही वाईट गुण हे असतातच. पण फक्त चांगल्या गुणांकडे बघायला आपले मन आपल्याला शिकवते म्हणून निसर्गातील एखादी गोष्ट आपल्याला आवडते. म्हणून ते शिकवणारे ते जाणणारे मन हा अतिशय मोठा गुरू आहे.
बघा ना फुलावर भिरभिरणारे फुलपाखरू पाहून आनंद नाही झाला असा माणूस विरळाच असेल. पण अशावेळी फुलपाखरू आधी सुरवंट होते किंवा याचे आयुष्य अवघ्या दीड दिवसाचे आहे हे माहित असले तरी त्याकडे कानाडोळा करायला त्या क्षणी त्या फुलपाखराचे स्वछंदी बागडणे बेधुंद होत मधु प्राशन करणे आपले रंगीबेरंगी पंखांनी उघडझाप करत लोकांच्या काळजाच्या फुलावरही अलगद बसणे याचा आनंद घ्यायला मनच शिकवत असते.
मन हा असा गुरू आहे की तो आपल्याला दिसत नाही पण एक क्षणही तो आपल्याला सोडत नाही. म्हणून आपल्या अंतर्मनाचा आवाज त्याची शिकवण जो नित्यनेमाने जपतो त्याला विजयाच्या शिखरावर जाता येते.
तसेच आपल्या हिताचा सर्वात जास्त विचार आपला गुरू करत असतो. मग या वेगवेगळ्या गुरुंपेक्षाही जास्त आपले हित आपले मनच प्रार्थित असतो. म्हणून आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या ज्ञात अज्ञात गुरुंबरोबरच माझ्या मनाच्या गुरूलाही साष्टांग नमस्कार 🙏
☆ कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर☆
(जमिनीची कृषी संबंधित उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आहे, पाण्याच्या उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.) – इथून पुढे —-
Climate change, वाढते तापमान यामुळे चक्रीवादळे, त्सुनामी यासारख्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत, त्याने infrastructure चं प्रचंड नुकसान होऊ लागले आहे, विमा कंपन्यांची आर्थिक गणितं विस्कळीत झाली आहेत.
तापमान वाढल्याने जास्त air conditioning वापरलं जाऊ लागलं आहे, आणि या अधिक वापराने आणखी कार्बन फुटप्रिंट तयार होऊन तापमान आणखी वाढतंय, असं एक कापूसकोंड्याच्या न संपणाऱ्या गोष्टीसारखं दुष्टचक्र सुरू झालंय.
पुढचं विश्वयुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी होईल म्हणतात, या वाढत्या ग्रीन हाऊस गॅसेसने तो दिवस आणखी आणखी जवळ येत चालला आहे. नैसर्गिक साधन संपत्तींसाठी झगडे होणार आहेत, स्थलांतरं होणार आहेत, होऊ लागली आहेत. ”
मुलगा अत्यंत कळकळीने कैफियत मांडत होता.
“अरे बाप रे. यातल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या घटना माहीत होत्या, पण यामागे सूत्रधार कार्बन फुटप्रिंट आहे, हे माहीत नव्हतं. पण मग या सगळ्यापासून वाचण्यासाठी उपाय काय ?” एखाद्या ऋषी मुनींनी शाप दिला, की ज्या अजीजीने उ:शाप मागितला जातो, तद्वत मी विचारता झालो.
“बाबा, उद्योगधंदे असोत किंवा तुम्हीआम्ही असोत, कार्बन फुट प्रिंट कमी करण्याचे काही मार्ग कॉमनच आहेत.
कमी इंधन वापरणारी यंत्रसामुग्री वापरणे – घरी मिक्सर, फ्रीज, AC चांगल्या energy rating चे घेणे. कमी ऊर्जा वापरणारे LED बल्ब वापरणे, कारखान्यांमध्ये शक्य असल्यास पवन ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, single use plastic चा वापर टाळणे, घन कचरा व्यवस्थापन (solid waste management), rainwater harvesting या आणि अशा अनेक गोष्टी घर आणि उद्योगधंदे या दोन्ही पातळींवर अतिशय समर्थपणे राबवता येतील.
विशेषत: व्यवसायांत, जेथे शक्य आहे तेथे कागदाचा वापर कमी करता येईल का हे तपासून पाहणे. एकट्या भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकिटे वापरायला सुरुवात केल्यावर रोजच्या रोज टनावारी कागदाची बचत होऊ लागली आहे. प्रत्यक्ष meetings घेण्याऐवजी जर online meeting घेतल्या, तर प्रवासासाठी देण्याचे कंपनीचे पैसेही वाचतील आणि इंधन जाळणे टाळता येईल.
आयएसओ १४००१ सारखी पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली राबविल्यानेही कार्बन फुटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी करता येईल.”
माझा चेहरा हळूहळू मी वर्गात बसल्यावर जसा बधीर होऊ लागायचा तसा होऊ लागतोय हे ध्यानात येताच चिरंजीवांनी चाणाक्षपणे चर्चाविषय गृहपातळीवर आणला.
“गरज नसताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे, AC चे तापमान २६° किंवा त्याहून जास्त ठेवणे, गळक्या नळांची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळणे या आणि अशा उपायांनी खर्चही कमी होतील आणि कार्बन फुटप्रिंटही. ”
ही उदाहरणे माझ्या परिचयाची आणि आवाक्यातली होती, त्यामुळे मला ती चटदिशी समजली. “म्हणजे स्वार्थही साधला जाईल आणि परमार्थही, ” मी अनुमोदन दिले.
“Electric अथवा hybrid गाड्यांचा वापर करणे, शक्यतो सार्वजनिक परिवहन (public transport) चा वापर करणे, दोघा चौघांनी मिळून गाडीतून प्रवास करणे (carpooling), छोट्या अंतरासाठी शक्यतो पायीच जाणे, किंवा चारचाकी गाडीऐवजी दुचाकी वापरणे या सर्व गोष्टीही अवलंबता येतील. “
हा घाव जरा वर्मी लागला. “हो, म्हणजे, morning walkला मी उद्यानापर्यंत मोटारसायकलने जातो, ते उद्यापासून पायीच जात जाईन, ” मी कबूली दिली.
“आईच्या राज्यात असंही आपण पटकन कोणती वस्तू फेकून देत नाहीच म्हणा, ” माझ्या जबाबाकडे काणाडोळा करत चिरंजीवांनी ज्ञानामृत पाजणे सुरूच ठेवले, “जुन्या पँटच्या पिशव्या, जुन्या पिशव्यांची पायपुसणी असं recycling आपल्याकडे चालूच असतं, ” आई आजूबाजूला नाही याची खात्री करून घेत तो म्हणाला, मी मात्र चांगलाच कावराबावरा झालो. “टाकाऊतून टिकाऊ यानेही कार्बन उत्सर्ग कमी करण्यात मदत होते, ” त्याचं चालूच होतं.
“खरंतर, मांसाहार करण्याने कार्बन फुटप्रिंट खूप वाढतो. प्राण्यांचे १ किलो वजन वाढवण्यासाठी त्यांना ६-७ किलो अन्नधान्य खावे लागते. त्यामुळे चिकन मटणापेक्षा शाकाहार केल्याने निसर्गाला कमी त्रास होईल.
जसं ज्यायोगे कार्बन उत्सर्जन वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तसंच ज्या उपायांनी निर्माण झालेला कार्बन शोषला जाईल ते उपाय केले पाहिजे. सगळ्यात सोप्पं म्हणजे खच्चून बेदम झाडं लावली पाहिजेत. गेल्या वेळी म्हणे महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी झाडं लावली होती. अशी झाडं खरंच लावली असतील, तर त्यांचे संगोपन केलं गेलं पाहिजे. ही वृक्षवल्लीच तयार झालेला कार्बन डायऑक्साइड वापरेल आणि कार्बन फुटप्रिंट कमी करेल.
फिलिपाईन्स सरकारने २०१९ सालापासूनच विद्यार्थ्यांना पदवी मिळवायची असेल तर दहा झाडे लावणे आणि त्यांची निगा राखणे अनिवार्य केले आहे. दिल्ली विद्यापीठानेही अशा प्रकारचा उपक्रम २०२१ पासून सुरु केला आहे. राजस्थानमध्ये पिपलांत्री गावाच्या परिसरात प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर ग्रामस्थ १११ झाडे लावतात. ही आणि अशी उदाहरणे आपल्यासाठी आशेचा किरण आहेत.
कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय, तो कमी का व कसा केला पाहिजे याविषयी जनजागृती केली पाहिजे, ” इतकं सगळं बोलून चिरंजीव श्वास घेण्यासाठी थांबले.
मी आता त्याच्याकडे नव्या आदराने पाहू लागलो होतो. आपण समजतो तशी ही नवी पिढी अगदीच वाया गेलेली नाही. सामाजिक विषयांची त्यांना जाणीवही आहे, भानही आहे, आणि त्याविषयी ते कृतीशीलरीत्या जागरूकही आहेत, हे पाहून मी निश्चिंत झालो आणि गाडी, AC आणि अन्नाची नासाडी याविषयी शेजारच्या काकांचे बौद्धिक घ्यायला ताबडतोब निघालो.
(मी एखाद्या गोष्टीचे पैसे भरले आहेत, मग मी त्या गोष्टीचे काय वाट्टेल ते करेन – असा एक उद्दाम मतप्रवाह हल्ली आढळतो. मग यातूनच लग्न कार्यात अथवा हॉटेलांत ताटात भरपूर अन्नाची नासाडी करणे, भांड्यातील अथवा बाटलीतील थोडेसेच पाणी पिऊन बाकीचे फेकून देणे असे प्रकार सर्रास दिसतात.
माझ्या एकट्याच्या अशा कृतीने काय फरक पडणार आहे असं लंगडं समर्थनही केलं जातं, पण आपल्या सर्वांच्या अशा एकत्रित कृतीचा परिणाम भयाकारी असतो.
गाडीच्या आरशावर लिहिले असते त्याप्रमाणे objects in the mirror are closer than they appear – आपण जर वेळीच जबाबदारपणे वागू लागलो नाही, तर आपली व सभोवतालच्या निसर्गाची अपरिमित हानी होईल, ही जाणीव राखली पाहिजे.)
गणपती बसवायचं ठरवलं तेव्हाची गोष्ट … कोणाला विचारायला गेलेच नाही
रीती रिवाज घराणं परंपरा…… नकोच ते … माझ्या मनालाच विचारलं
प्रत्यक्ष देवाला घरी आणायचं मग भीती कशाची? सुबक छानशी पितळी मूर्ती घेऊन आले
लहानगी दोन्ही नातवंड एकदम खुष.. त्यांनी आरास केली.. हौसेनी बाप्पाला सजवलं.
पूजा नैवेद्य आरती अथर्वशीर्ष यथासांग झालं
नंतर विसर्जन…..
अहो ते तर मोठ्या पातेल्यातच … ते पाणी घातलं तुळशीला
एक सांगू ? विसर्जन कशाचं करायचं ते आता नीट समजलं होतं…
परत बाप्पा जाऊन बसले जागेवर.. राहू देत की घरीच…. नाहीतरी मी काय करते हे बघायला घरात कोणीतरी मोठं हवंच ना..
हे करताना विचार केला होता …
चौकटी असतातच.. वापरून वापरून थोड्या झिजतात खराब होतात.. बेढब दिसायला लागतात
अट्टाहासानी तशाच का ठेवायच्या ? बदल करायला हवा ना.. ‘ राहु दे.. तशाच ‘… म्हणणारे असतील
तरी विचार करून त्या बदलाव्या, नीट नेटक्या कराव्या, नविन कल्पनांनी अधिक देखण्या सुंदर दिसतील
हळूहळू शहाणपण येत जातं. आपल्याही मनाला न दुखवता बदल सुचतो आपला आपल्याला.. अनेक ठिकाणी आवश्यक असलेला … चौकटीत राहुनच आपण केलेला … कुणाला न भिता केलेला … आणि
फोनची रिंग वाजली म्हणून फोन उचलला तर पलीकडून अंजूचा आवाज उर्मी उद्या माझ्याकडेबरोबर पाच वाजताभीशि आहे पण वेगळी हं! म्हणजे हिरवी मिशी! सर्वांनी हिरवे पोशाख परिधान करून या सगळे हिरवे! मी पदार्थही हिरवे करणार आहे तिची ती भन्नाट कल्पना ऐकून मी पांढरी फटक पडायची वेळ आली. मी म्हंटल बर बर येते बाई !
फोन खाली ठेवल्यापासून डोक्याला हिरवाईने घेरलं…. साडी हिरवी. कुंकू हिरवं.. कानातले गळ्यातले हिरव्या खंड्यांची अंगठी.. हिरव्या वादीची चप्पल, बांगड्या, हिरवी साडी हिरवी पर्स !माझा हा सगळा जामानिमा पाहून हे म्हणाले, ” आता हिरवी लिपस्टिक लाव म्हणजे ध्यान दिसशील” एवढ काही नको हं हे एवढ छान केलय तुम्हाला मेल कौतुकच नाही! या वाक्याने आमचा संवाद संपला…?
मंजूकडे गेले बंगल्याच्या फाटकासमोर हिरव्या पानांची सुंदर रांगोळी काढली नव्हे गालीचा होता. मध्ये फक्त थोड्याशा रंगीत पाकळया दारावर आंब्याचं तोरण आणि हिरव्या वाटाण्यानी सजवलेली नक्षीदार महिरप… फार सुंदर सजलं होतं दार ! दोन्ही बाजूला सुंदर हिरव्या कुंड्या त्यात डेरेदार उंच मयुर प्लॅन्ट… दारात हिरवी पायपुसणी हॉलमध्ये हिरवे पडदे…. सोफ्याला हिरवे कव्हर हिरव्या नक्षीदार छोट्या उषा खाली हिरवा गालीचा पसरलेला हिरव्यागार छोट्या छोट्या छोट्या पोपटांचे कॉर्नर्स हँग केलेले. एका भिंतीवर हिरव्या फॅनेलचा बोर्ड त्यावर हिरव्या रंगाचे वर्णन असलेल्या गाण्याच्या दोन दोन ओळी लिहिल्या होत्या आणि त्या हिरव्या पानांनी पिनअप केल्या होत्या हिरव्या हिरव्या रानात;
हरियाली और रास्ता; हिरवे हिरवे गार गालीचे…. इत्यादी सारखी गाणी होती ! माझ्या अंजूच्या घराची ती हिरवाई न्याहाळतांना मी थक्क झाले आणि तिचं कौतुकही वाटले. इतक्यात अंजू बाहेर आली बाई ग.. मी तर बघतच राहिले! गोरीपान अंजू.. हिरवी पैठणी.. हिरवे दागिने.. सुंदर हेअरस्टाईल त्यावर हिरवा बो आणि त्यावर हिरव्या पानांची फुल करून माळलेला गजरा मध्ये फक्त चार शुभ्र फुले होती. दागिने सुंदर होते आणि सगळे हिरव्या रंगांना धारण करणारेही होते! मी तर बाई बघतच राहिले….. ! पाठोपाठ तिची मुलगी आली तिनेही हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला. “बाई समद झालया नव्ह” असं म्हणत दोन कामवाल्या बाया बाहेर आल्या त्यांनी हिरवी इरकली लुगडी नेसली होती. हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.
हळूहळू सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या प्रत्येकीच्या एंट्रीला कुतूहल !अय्या काय गोड दिसतेस! किती सुंदर! झकास! टाळ्या काय न वाजणाऱ्या शिट्या काय….. प्रत्येकीची एन्ट्री दणाणून सोडत होती. प्रत्येकीच्या बौद्धिक क्षमतेची जणू परीक्षा होती. इतक्यात हिरव्या टी शर्टचा तिचा मुलगा बाहेर पडला आणि आम्हा सर्वांवर नजर फेरीत म्हणाला, ” मम्मा कोण म्हणतंय कि सोलापुरात यंदा कमी पाऊस झालाय “असं म्हणत त्यांना पोबारा केला. आम्ही खूप हसलो! वेलकम ड्रिंक म्हणून तिने वाळ्याचे सरबत ठेवले होते सुंदर हिरव्या ट्रेमधून हिरव्या रंगाच्या ग्लासामध्ये, त्या ग्लासाला छोट्या हिरव्या छत्र्या हिरवे सुंदर स्ट्रॉ वर्ती हिरव्या पुदिन्याची पानं पेरलेली होती पेय सुंदर रंगतदार होत… !
खूप गप्पा झाल्या काही गेम्स झाले शेवटच्या गेममध्ये एका हिरव्या प्लास्टिकच्या डिशमध्ये खूप नाणी होती ती हातानी उचलायची.. किती प्रयत्न केला तरी एक दोन चार नाण्याच्या वर जास्त मजल जात नव्हती आम्ही जिंकलेली सर्व नाणी एका हिरव्या बटव्यात एकत्र केली.
मग आले खाद्यपदार्थ सुंदर हिरव्या पत्रावळींचे डिझाइन असलेल्या डिशेश त्यात पालक पुलाव त्यावर खोबरं पलीकडे हिरव्या कोथिंबिरीची खोबऱ्याची चटणी हिरव्या मटारची उसळ पालक पुरी आणि हिरव्या रंगाची पिस्ता बर्फी…. अहाहा… बेत चवदार लज्जतदार तसा रंगतदार ही होता !
खाणे पिणे झाले शेवटी पिस्ता आईस्क्रीमचे सुंदर कप त्यावरचा पिस्ता खाताना खूपच मजा आली अंजूच्या कल्पकतेचे कौतुक प्रत्येकजण तोंडभरून करत होता इतक्यात हिरव्या सुबक केळीच्या पानात मस्त हिरवेगार गोविंद विडे आले… मी म्हणाले अंजू पुरे ग किती धक्के देशील? ती म्हणाली थांबा तिने आपल्या सहकारी मावशांना बोलावले आणि मगाचे हिरवे बटवे आमच्या काही ज्येष्ठ भगिनींच्या हस्ते त्या महिलांना बक्षीस म्हणून दिले त्यांनाही खूप आनंद झाला या तिच्या कृतीने आम्ही भरून पावलो म्हणजे या सुंदर प्रसंगाला एक छान भावनेची बाजूही होती आणी ती हिरवी कंच होती अंजूच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करीत मिळालेल्या नवीन कल्पनेचा सुखद हिरवट गारवा अंगावर लपेटत मी घरी आले ओठावर गाणं होतं हिरव्या हिरव्या रानात ——-
माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर दोघेही वकील आहेत. तीनी पितळेचा किंवा चांदीचा गणपती घेऊ म्हटलं तर ते म्हणाले,
” नाही…. मला चालणार नाही. यावर नोऑर्ग्युमेंट”
ती म्हणाली
“लग्नाला 50 वर्षे झाली आहेत पण घरातल्या निर्णयात कायम तेच जज्ज…. ते म्हणतील तेच फायनल…..
मी बोलू पण शकत नाही. ऊगीच वाद नको. म्हणून गप्प बसायच. “
हं………
मीनाचे मिस्टर बहात्तर वर्षाचे आहेत. ते म्हणाले
“मला एकदम पटलं पण दादा काय म्हणेल?”
दादा म्हणजे त्यांचे भाऊ वय वर्ष 76
मीना म्हणाली
” दादाला भीत भीतच यांच आयुष्य गेलं. पुढचंही जाणार… यांना निर्णय क्षमता कधी येणार कोण जाणे?
दरवेळेस दादा काय म्हणेल……. “
……..
नानांनी तर डिक्लेअरच केलं
” मी मेलो की काय करायचं ते करा… “
……….
बहुतेकांचं म्हणणं असं की सगळं पटतं पण भितीच वाटते….
काही विपरीत झालं तर…
त्यापेक्षा नकोच ते…..
वसुधा म्हणाली” माझा मुलगा आणि सून किती वर्ष म्हणत होते. पण माझाच विरोध होता. खरंतर कारण असं काहीच नाही. पण होता..
पण आता एकदम कसा होकार द्यायचा ? “
लिली चा फोन आला
” मावशी यस यु आर राईट.. पण नंतर गर्दी होईल म्हणून मी आधीच ऑनलाईन गणपती बुक केला होता. त्यांनी कालच डिलिव्हरी दिली आहे. आता नेक्स्ट टाईम मी पितळेचा घेईन…. “
जया म्हणाली
“आमच्या पप्पांच मम्मींसमोर काही चालत नाही. त्यांना खरतर हे आवडलं असतं. मी त्यांच्याशी बोलले. पण ते म्हणाले मम्मीला चालणार नाही काही बोलू नकोस…. “
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आशाकडे चांदीचा गणपती होता. तिनी चौरंग आणला. त्यावर गणपती बसवला. हार घातला. समया, निरांजन, लावलं. लाईटची माळ लावली. छान डेकोरेशन करून सजवलं.
पण नणंद बाई रागवल्या,
“हे काय चाललय तुझं ?आपल्याकडे गणपती बसवत नाहीत तू हे काय नवीन सुरू केलेस? इत्यादी……. “
झालं….
तेव्हापासून बंद..
अमेरिकेत असलेल्या अमोलंनी आईला विचारलं ती म्हणाली
” गणपती बसव, गौरी कर, नवरात्र घाल, काय वाटेल ते कर तू थोडंच माझ ऐकणार आहेस ?… “
थोडक्यात काय तर……
दोन वर्षांपूर्वी सुधानी मेटलचा गणपती आणला.
तिची नात जाम खुश झाली.
बाप्पा बाप्पा म्हणत हातात घेऊन नाचली. मग शेजारी झोक्यावर बाप्पाला घेऊन बसली.
तिच्या बाबांनी बाप्पासाठी छोटा झोपाळा आणला. तिनी तो सजवला. बाप्पाला त्यात बसवल.. फोटो काढले…
नात खुष झाली….
बाप्पाला आपण म्हणतो
“आम्हाला सुखात.. आनंदात ठेव…. ” खरंतर तसं राहणं बरंचस आपल्याच हातात आहे. सगळंच कशाला देवावर सोपवायचं?
थोडा प्रयत्न आपणही करू या की.
काय खरं की नाही?
मग म्हणा की
” गणपती बाप्पा मोरया…. “
आणि थोडं बदला की……
ज्यांना जमेल त्यांनी घरी मातीचा गणपती करा. घरीच विसर्जन करा. आता काही शाळेतही शिकवतात. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात.
श्री शंकराचार्यांनी लिहिलेलं
” श्री गणेश पंचरत्न स्तोत्र “खूप छान आहे.
यावर्षी ते पाठ करा. मी म्हटलेलं तुम्हाला पाठवत आहे तुम्हाला युट्युब वर मिळेल.
बाप्पाला तुम्ही समोर बसून मनापासुन म्हटलेलं आवडेल.
बदल कशाचा, कधी, कसा करायचा हे समजलं की आपले आपण आनंदात राहतो.
तिच्या या वाक्याने मी भानावर आलो आणि बशीत सांडेस्तोवर च्या तिच्या कपात “वतला”.
समाधानाने तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हसल्या.
यानंतर बशीत सांडलेला चहा तिने घरातल्या तुळशी वृंदावनाच्या मातीत टाकला, थोडा चहा एका प्लेटमध्ये टाकून ती प्लेट तीने घराबाहेर ठेवली.
आता कपात पुन्हा निम्माच चहा उरला.
हा निम्मा चहा तिने बशीत ओतून समाधानानं भुरके मारत पिला.
म्हातारीला मी पुन्हा वैतागून म्हणालो, ‘म्हातारे, मी तुला आधी कपात निम्माच चहा दिला होता, तू इकडे तिकडे ओतून निम्माच चहा पिलास…. मग मला मघाशी संपूर्ण कप सांडेपर्यंत का भरायला लावलास ?’
यावेळी ती, न चिडता भावुक होत म्हणाली… ‘माज्या बाळा, आपून इतकं कमवायचं… इतकं कमवायचं… की ते सांडून कपाभायेर येऊन बशीत पडलं पायजे… पन बशीत जे पडंल त्ये मात्र आपलं नसतंय… त्ये आस्तय प्राणी, पक्षी, गुरांचं… त्ये त्यांना वाहायचं… ‘
… माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत तिनं माणुसकीची व्याख्या सांगितली.
“ कुठं गं शिकलीस ही जगण्या आणि जगवण्याची कला…. ??? “ माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले…
मला तिचे पाय धरायचे होते… पण मला हे नक्की माहीत होतं, की मी तीचे पाय धरताना; पाठीत धपाटा घालून ती मला म्हणेल, ‘ न्हाई भजं खायाला मी तुला आट आनं द्येनार न्हाई हां मुडद्या, लय नाटकं नगों करुस… ‘
पाच लाख दरमहा कमावणारा मी….
तरीही आज “भजं खायाला” माझ्याकडे आठ आणे नाहीत… गरीब कोण… ? श्रीमंत कोण… ?
माझ्याकडे पैसा होता; पण तिच्याकडे लक्ष्मी… !!!
गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!
एकदा ती मला म्हणाली होती, ‘मेल्यावर बिन बोलवता बी “खांदा” द्यायला समदं गाव जमतंय, पन भुकेजलेल्या जित्त्या माणसाला आणि जनावराला आपल्या जवळची कोरभर भाकर आणि “कांदा” कुनी देत न्हाय… ‘ खांदा दिवून पुन्य मिळवन्या पेक्षा… जित्या मानसाला “भाकर आनं कांदा” दीवून पुन्य मिळव
आंतरराष्ट्रीय संस्थेचा प्रमुख मी… Management आणि Humanity या विषयावर माझ्याकडे पारितोषिके आहेत. Doctor for Beggars या कामामध्ये मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकूण 3000 पेक्षा जास्त पुरस्कार आहेत.
माझे हे सर्व पुरस्कार आणि पारितोषिके एका पारड्यात…. आणि माझ्या म्हातारीचे विचार एका पारड्यात…. !
कसं कोण जाणे… पण तीचंच पारडं खाली जातं… ! तिच्या विचारांचं वजन नेहमीच जास्त भरायचं.
“ओझं” “भार” आणि “बोजा” हे; वरवर “वजन” या शब्दाचे समानार्थी शब्द वाटतात. खरंतर तिघांचेही अर्थ वेगळे आहेत.
मनाविरुद्ध अंगावर पडतं ते ओझं…
नाईलाजाने वाहिला जातो तो भार…
इच्छा नसतानाही लादला जातो तो बोजा…
पण, मनापासून आणि आनंदाने खांद्यावर वागवलं जातं ते वजन… !
माझी अशिक्षित म्हातारी, विचारांचं धन डोक्यावर घेऊन… खऱ्या अर्थाने लक्ष्मी होते…
आणि, इतकं सर्व मिळवून माझी झोळी रिक्त राहते…. आणि हातात काही नसून, माझी म्हातारीच श्रीमंत होऊन जाते… !!!
अशीच एकदा ती मला म्हणाली होती, ‘नारळाच्या झाडागत बोंबलत उच्च नगो होवूस… शेळ्या मेंढ्या ह्यांच्या तोंडाला तुजी पानं लागून त्यांची भूक भागंल, असं दोन फुटाचं बुटकं झाड हो… ‘
“दुसऱ्यासाटी तू किती झुकतोस, यावर आपली उंची ठरत्ये माज्या सोन्या… ”
….. तिची ही वाक्ये ऐकून माझ्या अंगावर शहारे आले होते… !
डाव्या हाताने मग मी चड्डी सांभाळत, उजव्या हाताने नाकाचा शेंबूड पुसत… मी पुन्हा लहान होतो आणि पुन्हा तिच्या पदराखाली जातो… पुन्हा पुन्हा तिच्या पदराखाली जातो… आणि दरवेळी हा पदर मला माणुसकीच्या रस्त्यावर घेऊन येतो, एखाद्या दिशादर्शकासारखा… !!!
तिच्या फाटक्या पदराची हि पताका; हेच माझं भरजरी वस्त्र आहे… !!!
गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!
ती जायच्या अगोदर काही दिवस मला म्हणाली होती… ‘खेड्यातली ल्वोकं फुलपात्रातून च्या देत्यात यात तुला गावंडळपना वाटतू ना… ?’
मी खाली मान घालून गप्प बसलो.
यावर तिने तिच्या भाषेत, फुलपात्र या शब्दाचा व्यापक अर्थ सांगितला तो असा…
… प्रत्येकाजवळ स्वतःचं असं एक भांडं… एक पात्र असतं. हे पात्र कधी रिकामं असतं… तर कधी भरलेलं असतं. ज्याच्याकडे हे रिकामं पात्र असतं त्याला हिणवू नये कधीच… कदाचीत स्वतः कडचं सर्वस्व पोरा बाळांना देऊन माघारी फिरला असेल तो… कधी आई होऊन… कधी बाप होऊन… आई बापाचं भांडं दिसायला रिकामं दिसलं तरी ते पात्र कायम Full च असतं… ! आपल्या ताटातली भाकरी जेव्हा आपण दुसऱ्याला देतो… तेंव्हा दिसायला ताट रिकामं दिसतं… पण खऱ्या अर्थाने ते तेव्हाच भरलेलं असतं… आणि तुमचं पात्र आपोआप Full होतं… घेण्यात आनंद आहे बाळा… पण देण्यात समाधान… ! आपण घ्यायचं सुद्धा असतं आणि द्यायचं सुद्धा… ,… कधीतरी एखाद्याची भूक उसनी घेऊन, त्याच्या चेहऱ्यावरचा “आनंद” आपण घ्यायचा… आणि त्याला भाकर देऊन, आपल्या मनातलं “समाधान”, त्याच्या मुखात ठेवायचं…. !
‘हितं तुजं भांडं रिकामं दिसंल… पन तवाच तुजं पात्र Full होतंय गड्या… !’
गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!
खाटेवर पडलेल्या आजीचे क्षीण झालेले, सुरकुतलेले हात मी माझ्या दोन्ही हातात घेतले…
या हातांवर आपोआप अश्रूंचा पाऊस झाला… आणि तिच्या चेहऱ्यावरच्या भेगाळलेल्या जमिनीवर, एक अंकुर उगवून आला…. “डॉक्टर फॉर बेगर्स… !!!”
माझी हि आजी… “लक्ष्मी” होऊन माझ्या पदरात आली… अक्षय विचारांचे धन देऊन मला श्रीमंत बनवून; अक्षय होऊन गेली… !
ती गेली तो दिवस होता “अक्षय तृतीया”…. हा योगायोग नक्कीच नव्हता… !!!
ती माझं पात्र… फुल्ल करून गेली… अक्षय्य करून गेली… !
आता चेंबलेलं का असेना… जुनं का असेना… फुटकळ का असेना… पण हेच “फुलपात्र”; मी रोज याचकांच्या चरणी रीतं करतो…
परतताना मात्र माझं हे पात्र तुम्ही सर्वजण पुन्हा Full करता… परत परत Full करता…
आणि Full झालेलं हे “फुलपात्र”; मी जपून ठेवतो, दरिद्री नारायणाची उद्याची पूजा मांडण्यासाठी… !!!
आणि म्हणून आजचा हा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर !
या महिन्यात झालेल्या कामाचा आढावा आता विस्तृत सांगत नाही… फक्त इतकंच सांगेन, या महिन्यात जे अंध, अपंग – विकलांग, भिक मागणारे लोक सापडले, अशांना हातगाडी, वजन काटे, कापडी पिशव्या विकायला देऊन, छोटे छोटे व्यवसाय काढून देऊन व्यवसायाचं एक साधन त्यांच्या चरणी अर्पण केलं आहे… हाच मी वाहिलेला नैवेद्य… !
भीक मागणाऱ्या पालकांची मुलं किंवा खुद्द भीक मागणारी मुलं, यांना एकत्र करून सॉक्स बुट आणि युनिफॉर्म पासून शाळा कॉलेजेच्या त्यांच्या फिया भरल्या आहेत. 15 जुलैला जेव्हा ही मुलं दप्तर – रेनकोट घेऊन शाळेत निघाली, त्यावेळी मला त्यांच्यात, आयुष्यातला “विठ्ठल” शोधायला निघालेला वारकरी दिसला…
इथेच झाली माझी वारी,
आणि म्हणून विठ्ठला मी आलोच नाही पंढरपुरी… !!
रस्त्यावरील याचकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा दिल्या, रस्त्यावर जे जमत नाही अशा गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.
आषाढी एकादशीला पंढरपुरात हातातले टाळ तिकडे दुमदुमत होते… मला इथे ते आजारी याचकांच्या धडधडणाऱ्या हृदयात ऐकायला आले… माझा स्तेथोस्कोप आज टाळ झाला… !
काय गंमत आहे पहा, “वि-ठ्ठ-ल” नाम स्मरण हे हृदयाशी निगडित आहे… शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या नामस्मरणास “विठ्ठल क्रिया” असं म्हटलं जातं.
पंढरीच्या राजा, आम्ही इथेच बसून रोज “विठ्ठल क्रिया” केली… !
“हात हे उगारण्यासाठी नाही… उभारण्यासाठी असतात… ” हे ज्या वृद्ध याचकांनी मला रस्त्यावर शिकवलं, मी त्यांनाच गुरु मानुन त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो… !
त्यांच्या विचारांच्या उजेडात, माझी प्रत्येक अंधारी रात्र मग “पौर्णिमा” झाली… !
आज खूप वर्षांनी विचार करतो…. भिकाऱ्यांच्या डॉक्टर /भिक्षेकर्यांचा डॉक्टर/डॉक्टर फॉर बेगर्स… याचं बीज नेमकं आहे कशात… ?
खडकाळ जमिनीत सुद्धा तृण उगवतं… कुणीही बीज न रोवता बांधावर एखादं बाभळीचं / रानफुलाचं झाड उगवतं… याला ना खत लागत ना मशागत… तरीही ते फोफावतं… सावली देण्याची त्याची पात्रता नसेलही, पण शेळ्या मेंढ्यांचं खाद्य होण्यात ते धन्यता मानतं… !
*खडकाळ… भेगाळ का असेना…. पण माझी म्हातारीच माझी जमीन झाली… आणि माझं बीज इथेच अंकुरलं…*
माझ्याच म्हातारीच्या भाषेत सांगायचं तर; मला अफाट, पण खारट समुद्र व्हायचंच नाही… मला व्हायचंय एक छोटंसं, पण गोड पाण्याचं तळं… जिथं कोणाची तरी तहान भागेल… शेतकऱ्याचं बीज पिकेल… !
त्यावेळी माझ्या थेंबा थेंबाने गाणं म्हणावं…. बीज अंकुरे अंकुरे… !!!
माझं सर्व बालपण सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड नावाच्या छोट्याशा खेडेगावात आजीच्या सहवासात गेलं.
इथे घडलेल्या गमती – जमती, कथा – व्यथा आणि माझ्यावर झालेले भले – बुरे परिणाम; हे सर्व मी माझ्या पुस्तकात काहीही न लपवता मांडलं आहे.
माझ्या आजीचं नाव लक्ष्मीबाई… !
नावाप्रमाणेच ती होती. कपाळावर जुन्या रुपयाच्या कॉइन एवढं भलं मोठं कुंकू, नाकात बांगडीला लाजवेल एवढी मोठी नथ, काठापदराचं लुगडं घालून ती अशी चालायची; जसा राज घराण्यातला हत्ती निघाला आहे… ! म्हणायला अशिक्षित, पण व्यवहार चातुर्य PHD झालेल्या माणसाला लाजवेल असं…
तोंडानं फटकळ, पण मायेचा जिवंत झरा हृदयात घेऊन फिरायची… गावात जबरदस्त दरारा… !
एके दिवशी तिकडे तिचे वडील वारले आणि इकडे माझा जन्म झाला…
त्यावेळच्या भाबड्या कल्पनेनुसार, एका माऊलीने तिला सांगितले, ‘आगं लक्साबया… रडु नगो बाये, पांडुरंगाचे पोटी तुजा बापच जलमाला आलाय… !’ … पांडुरंग माझ्या वडिलांचे नाव… !
झालं, तेव्हापासून माझी आजी मला तिचा बापच समजायला लागली, आणि तेव्हापासून माझे विशेष लाड आणि कोड कौतुक सुरू झालं.
अख्खा गाव तिला मामी म्हणायचा, तिला घाबरायचा…. पण तिच्या प्रेमाने लाडावलेला मी तिला लहानपणी “ए लक्षे” म्हणून हाक मारायचो…. आजीचे वडील तिला याच नावानं हाक मारायचे, नातू पण त्याच नावाने हाक मारतो, म्हणजे खरोखरच आपला बापच नातवाच्या रूपाने जन्माला आला आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं… !
तिचा “बाप” असण्याचा, मग पुढे मी पुरेपूर फायदा घेतला.
करारी आणि कठोर बाई हि, परंतु कोणत्याही गरिबाच्या अडल्या नडल्या मदतीला ही सर्वात प्रथम पुढे येई.
सर्वांनाच हिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. गावातल्या श्रीमंतापासून ते गरिबातल्या गरीब घरापर्यंत कोणाच्याही घरात ती डायरेक्ट घुसायची… घरात जिथे उंच जागा सापडेल तिथे ती पायावर पाय टाकून बसायची…. आणि इकडे तिकडे पहात, पदराची दोन टोकं हाताच्या चिमटीत पकडत, स्वतःला वारा घालत, घरातल्या लोकांची हजामत करायची.
हतरून पांगरून आजुन काडली न्हाईत ?
शेळ्याच्या लेंड्याच हित पडल्यात…
घरच नीट सारवलं न्हायी…
गाई म्हशीचं श्यान उचलायला का तुजा बा येणार हाय का ए… ?
……. तिची टकळी चालू असायची… तिच्या तावडीतून कुणीच सुटायचं नाही. येणारा जाणारा प्रत्येक जण तिची नजर चुकवून जायचा… !
यावेळी मी तिचा पदर धरून, डाव्या हाताने चड्डी सावरत शर्टाच्या उजव्या बाहीला शेंबूड पुसत सर्व काही पहात असे. चड्डी माझ्या मापाची मला कधीच मिळाली नाही.
‘ थोडी मोटी दे… वाडतं वय हाय… अजून मोटी दे…. हांग आशी… ‘ म्हणत दुकानदाराला माझ्या चड्डीची ऑर्डर आजीच द्यायची…
डावा हात हा फक्त चड्डी सांभाळण्यासाठी असतो आणि उजवा हात शेंबूड पुसण्यासाठी… त्या वयात हाताचे इतकेच उपयोग मला माहित होते.
तर सर्व उणीदुनी काढून झाल्यानंतर, पदरानं घाम पुसत, म्हातारी बिनदिक्कतपणे त्या घरात ऑर्डर सोडायची… ए टवळे, च्या टाक जरा मला… तुमाला आक्कल शिकवून दमले बया मी, तुमच्यापेक्षा गाडव बरं… वर तीच कांगावा करायची… !
चहा येईपर्यंत, माझी नाकाची फुरफुर चालूच असायची…
समद्या गावाचा शेंबूड तुलाच आलाय का काय मुडद्या ? असं म्हणत वैतागून उठत; ती मला दरा दरा ओढत घराबाहेर नेत, माझं नाक पदरात धरून असं शिंकरायची, की मृत्यु परवडला…. !
अजून थोडा जोर लावला असता, तर तीने माझा मेंदूच बाहेर काढला असता…
तुजं आसं हाय, शेंबूड आपल्या नाकाला, आन् रुमाल देतंय लोकाला… असं स्वतःशी पुटपुटत, मला कडेवर घेऊन ती परत घरात यायची.
यानंतर कान नसलेल्या, फुटक्या कपात, किंवा चार ठिकाणी चेंबलेल्या फुलपात्रात चहा यायचा. बऱ्याच वेळा जर्मन च्या “भगुल्यात” च्या यायचा… बशी नसली तर… आम्ही मग हा “च्या” गोल ताटात भरून भुरके मारत प्यायचो… आज जाणवतं, हा खऱ्या अर्थाने सोहळा होता… !!!
….. आता कुठे आहे हे फुलपात्र ? ते जर्मनचं भांडं आणि तो कान नसलेला फुटका कप ???
मी शोधतोय… ! आईच पत्र हरवलं… हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो, हे फुलपात्र… ते जर्मनचं भांडं आणि कान नसलेला फुटका कप सुद्धा तसाच हरवलाय… !
माणसं शिकत गेली आणि या जुन्या गोष्टी पुस्तकाच्या पानात दबून गेल्या… आठवण म्हणून ठेवलेल्या पिंपळाच्या जाळीदार पानासारख्या… !
आता या गोष्टी दिसतात फक्त जुन्या बाजाराच्या दुकानात… नाहीतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी घेऊन, अंताकडे वाटचाल करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या मनात… !!!
तर; बऱ्याच वेळा फुलपात्रातून किंवा फुटलेल्या कपातून, बशीत चहा सांडेस्तोवर दिला जायचा…
फुलपात्र आणि कप सोडून बशी सुद्धा चहानं भरलेली असायची… ! डाव्या हाताने चड्डी, उजव्या हाताने नाक सांभाळताना…. मला चहा प्यायलाच जमायचं नाही, मग माझी म्हातारी एक घोट स्वतः प्यायची, एक घोट मला पाजायची… ! हा चहा पिताना, माझ्या घशातून घुटुक घुटुक आवाज येत असावा… मला माहित नाही. पण यातही माझ्या आजीला कौतुक…
‘ बगा गं बायांनो, “माजा बाप” कसा घुटुक घुटुक च्या पितो, तुमाला दावते… ‘ म्हणत ती अजून चार फुलपात्रे नाक दाबून मला चहा पाजायची…
पुढे डोक्यावरून पाणी गेलं…
रडत खडत शिकलो…. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने डॉक्टर झालो… पुढच्या खाचखळग्यातून वाटा काढत चालत राहिलो… आयुष्यातली सगळी पानीपते हरलो… तरीही पुढे कष्ट करून मनातला “विश्वासराव” जिवंत ठेवला… !
आयुष्याच्या एका टप्प्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला लागलो… आर्थिक स्थैर्य आलं. मग अनेक उच्चभ्रू लोकांशी / ऑफिसशी संपर्क येऊ लागला. सुरुवातीला… “खेड्यातनं आलंय येडं, आन भज्याला म्हनतंय पेडं…. ” अशी माझी अवस्था होती. खेड्यातला येडा मी…. तिथले मॅनर्स आणि एटिकेट्स शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. चकचकीत आणि महागड्या कपांमध्ये चहा मिळू लागला… भल्या मोठ्या कपामध्ये / मगमध्ये सांडणार नाही, अशा पद्धतीने निम्माच चहा किंवा कॉफी असायची… !
पुढे मी सरावलो…
एकदा हि माझी खडूस म्हातारी… बऱ्याच वर्षांनी माझ्या घरी आली….
आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्राचा प्रमुख मी….
तिला एका मोठ्या पांढऱ्या स्वच्छ कपामध्ये मी तिला चहा दिला…
कपाला सोन्याचीच वाटावी, अशी सोनेरी रंगाची नक्षी होती…
शिकलेले मॅनर्स सांभाळत, भल्या मोठ्या कपामध्ये; सांडणार नाही अशा पद्धतीने तिला निम्मा चहा दिला होता. विहिरीत वाकून बघावं, तसं तीनं कपात वाकून बघितलं… कपातला अर्धा चहा बघून ती खवळली…. तिच्या स्वभावानुसार ती बोलली…. ‘येवडासा च्या ? ल्हान पोरगं हेच्यापेक्षा जास्त मुततंय… तू कंनच्या कंपनीत काम करतूय रं… ? सायबाला म्हणावं पाच धा रुपय पगार जास्त दे… घरात आलेल्या पावण्यांना कप भरून च्या पाजू दे… !’
पाच लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या तोंडात माझ्याच म्हातारीने सणसणीत चपराक हाणली. मलाही राग आला, गावाकडे चेंबलेल्या फुलपात्रात आणि फुटक्या कपात च्या पिणारी माजी म्हातारी, आज इतक्या मोठ्या, सुंदर सोनेरी नक्षीच्या कपात चहा पीत आहे, नातवाचं हिला काहीच कौतुक नाही… ??? मी तिला हे बोलून दाखवलं.
यावर जोरदार पलटवार करत म्हातारी म्हणाली, ‘ गप ए शेंबड्या… तूजा कप किती छोटा हाय, का मोटा हाय…. त्याला सोन्याची का चांदीची नक्षी हाय, त्याला किंमत नसती… या कपातून तू काय देतू, किती देतू, कोनच्या भावनेनं देतू त्याला जास्त किंमत आसती… !’
आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये दरवर्षी “मॅनेजमेंट” या विषयावर किमान चार सेमिनार असतात… असे मागील दहा वर्षात मिळून मी 40 सेमिनार अटेंड केले असतील… तू काय देतो, किती देतो, कोणत्या भावनेनं देतो त्याला जास्त किंमत असते… ! सेमिनार मध्ये किती कळलं मला माहित नाही… पण माझ्या म्हातारीने दोन मिनिटात मॅनेजमेंटचं सर्व सार सांगितलं… ! हातातला कप माझ्या हातातच राहिला… तिच्याकडे भारावून मी पाहत राहिलो… “कपावरची” सोनेरी नक्षी आता तिच्या “कपाळावर” उमटलेली मला भासली… !!!