मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कै. सुहास विनायक सहस्त्रबुद्धे, माझे पती, एक डॉक्टर म्हणून सेवाव्रती, अतिशय मृदू स्वभावाचे, 11 एप्रिल 2024 रोजी त्यांचे निधन झाले आणि माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली!

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीवर ती जोडी अवतरते, तसे आम्ही दोघे संसारात बांधले गेलो. आमची दोन्ही घरे मध्यम परिस्थितीतील, शिक्षणाला महत्त्व देणारी, त्यामुळे माझ्या एम्.ए.पर्यतच्या शिक्षणानंतर स्वाभाविकच लग्नाचा विषय निघाला आणि डॉक्टर सुहास सहस्त्रबुद्धे ( एम बी बी एस्) हे स्थळ आल्यानंतर लवकरच आमचे लग्न झाले!

ह्यांच्याविषयी सांगायचे तर त्यांना मेडिकलला जाण्याची प्रथमपासूनच इच्छा होती. त्यामुळे चिकाटीने अभ्यास करून त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवली. त्याचवेळी त्यांची इतर भावंडेही इंजीनियरिंगला, कॉमर्सला, अशी शिकत होती. माझ्या सासऱ्यांची सरकारी नोकरी होती. एकट्याच्या उत्पन्नात एवढ्या मुलांची शिक्षणे करणे खरोखरच अवघड होते. तरीही कै. मामा आणि कै.आई यांनी मुलांसाठी खूप कष्ट घेऊन शिक्षण पूर्ण केली..

M.B.B.S. झाल्यानंतर पुढे शिकण्याची इच्छा असूनही घरच्या परिस्थितीचा विचार करता यांनी सर्व्हिस करायचे ठरवले आणि मेडिकल ऑफिसर म्हणून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ते रुजू झाले. तो काळ आणीबाणीचा होता. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करताना खूपच त्रास सहन करावा लागत होता. नवीन नोकरी असल्यामुळे रजा, सुट्टी मिळत नसे, पण चिकाटीने ह्यांचे काम चालू होते.  आणीबाणीतील आठ दिवसांच्या रजेत 20 फेब्रुवारी 1976 रोजी आमचे लग्न पार पडले!

पुढे तीन महिन्यानंतर म्हणजे मे महिन्यात आमचे  पाटण येथे बिऱ्हाड झाले.  संसाराची खरी सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने ह्यांची ओळख झाली.

ते नेहमी दवाखान्यात व्यस्त असत..तरी त्यातूनही सब सेंटर असलेल्या चाफळ, कोयना नगर या ठिकाणी दवाखान्याची व्हिजिट असली किंवा सातारला महिन्याची मीटिंग असली की जीपने आम्ही जात असू आणि तेवढीच ट्रीप करून येत असू. यथावकाश या संसारात मी ही रमले!

19 ऑक्टोबर 1977 रोजी  केदारचा जन्म झाला. आम्ही दोघेही त्याच्या बाललीलात रमून गेलो. ह्यांना लहान मुलांची खूप आवड, त्यामुळे केदार खूप लाडका !

पुढे शिरपूरला बदली झाली.नोव्हेंबर 1979 च्या दरम्यान कन्या- प्राचीचा जन्म झाला आणि आमच्या चौकोनाचे चारी कोन पूर्ण झाले!

1981 मध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटलला ह्यांची मेडिकल ऑफिसर म्हणून बदली झाली. तेथे गव्हर्नमेंट कॉलनीत असलेल्या प्लॉटवर आम्ही घर बांधले व दवाखानाही सुरू केला. त्याच प्लॉटवर माझे धाकटे दीर – प्रकाश सहस्रबुद्धे यांचेही घर, दुकान होते. दोन्ही घरातील संबंध खूप छान होते. आता आमची दोन मुले, दिरांच्या दोन मुली, सासुबाई आणि आम्ही चौघे असे गोकुळासारखे नांदते घर झाले!

सिव्हिल हॉस्पिटल ला मेडिकल ऑफिसर म्हणून यांनी रक्तपेढीमध्ये असताना  खूप काम केले. रक्तदान शिबिरे आयोजित करणे, नियमितपणे  कॅंप घेऊन रक्त गोळा करणे , चाकोरी बाहेर जाऊन ही काही रुग्णोपयोगी कामे करणे हे  चालू असे. सिव्हिल हॉस्पिटल मध्येच ब्लड बँकेवर मेडिकल ऑफिसर, CMO, RMO अशा वेगवेगळ्या पोस्टवर काम केले.हे काम करत असताना योग्य वेळी योग्य ते निर्णय घेणे त्यांना जमत असे.सर्वांशी मिळून मिसळून तसेच आपल्या पदाचा मान राखून ते काम करत असत.शांत स्वभावामुळे लोकांना त्यांचा आधार वाटत असे.याच काळात ओगलेवाडी, कवठेमहांकाळ,नांद्रे याठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून  त्यांनी चांगले काम केले.

सतत तीन वर्षे त्यांना शासनाचा उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळाला. हे सर्व करत असतानाच त्यांचे सोशल वर्क ही चालू होते. एड्स जागृतीच्या काळात अनेक संस्थांमध्ये व्याख्याने, शिबिरे वारंवार घेत असतच. कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी तेथे काम करत असलेल्या श्री. अडसूळ सर यांच्याबरोबर एक प्रोजेक्ट केला. शंभर मुलींची निवड करून त्यांना वर्षभर योग्य आहार, टॉनिकच्या गोळ्या तसेच दर महिन्याला वैद्यकीय तपासणी अशा तऱ्हेने मदत करून त्यांच्या हिमोग्लोबिन मध्ये वाढ करता येते हे या प्रकल्पाने दाखवून दिले. तसेच एकल पालक असलेल्या, लांबून येणाऱ्या मुली निवडून त्यांना येणारा बसखर्च देणे व कॉलेजमध्ये येण्याविषयी प्रवृत्त करणे यासाठी दहा मुलींवर दरमहा लागणारा खर्च  स्वतः करून साधारणपणे पाच हजार रुपयांची मदत त्याकाळी त्यांनी केली.

नोकरीची बत्तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर  नातवंडांसाठी पुणे आणि दुबई असे वास्तव्य केले. लहान मुलांची आवड त्यामुळे  त्यांनी अत्यन्त आनंदाने  जमेल तेवढी मुलांना मदत केली. आमचे स्नेही, बापट सर तर त्यांना कौतुकाने “बालमित्र” म्हणत!कोणत्याही लहान मुलाला रमवण्याची कला त्यांना अवगत होती.. “आता उरलो उपकारापुरता” म्हणत म्हणत  2015 पासून ह्यांनी ” स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटर” ला अगदी कमी मानधन घेऊन रोज तीन चार तास काम सुरू ठेवले होते.

कोरोनाच्या काळात तेथील काम बंद झाले होते. तसेच नकळत ह्यांना वयाची चाहूल जाणवू लागली होती..

गेल्या एक-दीड वर्षात घरातील काही दुःखद घटनांमुळे त्यांचे मन अधिकच हळवे झाले होते. त्या गोष्टीचा ह्यांच्या मनावर नकळत खोल आघात झाला..

तब्येत थोडीशी खालावली. तरीही ते आपला आहार, व्यायाम याबाबत खूप जागरूक होते.स्वत: मितभाषी होते पण सहवासात गप्पिष्ट माणसे लागत.त्यांना नातेवाईक आणि मित्रमंडळी त गप्पा ऐकायला आवडत असे.आणि एखादंच मार्मिक वाक्य बोलून ते वातावरण हलके फुलके ठेवत.

माझ्या साठी त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या.. एक म्हणजे मला प्रवासाची आवड म्हणून यूरोप ट्रीप ला पाठवले! दुसरं त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या लेखनाला प्रोत्साहन देऊन माझी दोन पुस्तके प्रकाशित केली! दुसऱ्या साठी करणे हा त्यांच्या मनाचा केवढा मोठेपणा होता.

प्रथमपासूनच त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी अतिशय साध्या होत्या. शिळी भाकरी, दाण्याची चटणी आणि साईचं दही हा आवडता नाश्ता होता. जेवणामध्ये आमटीचे प्रेम फार होते. गोड पदार्थ जवळपास सगळेच आवडत असत पण “शिरा” हा त्यात अत्यंत आवडीचा! देवाची पूजा करणे हे आवडीचे काम होते. मन लावून देवपूजा करत असत, म्हणूनच की काय परमेश्वराने त्यांना जास्त त्रास होऊ न देता आपल्याकडे नेले. आमच्या घरात गोंदवलेकर महाराजांची भक्ती, सेवा केली जात असे. “श्रीराम” हा तारक मंत्र नेहमीच जपला जाई.

माझ्या संसारातील प्रत्येक आठवणीचा क्षण हा त्यांच्याशी गुंफलेला होता. आता क्षणोक्षणी ही आठवणींची माला माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि जन्मोजन्मी आमची साथ अशीच राहू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मला मंडईत जायला फार आवडते. हिरव्यागार ताज्या भाज्यांचे ढीग बघताना मनाला प्रसन्न वाटते. 

भाजी विकणारे ओळखीचे झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा आनंदही असतो. बरं हा नुसता आनंद नाही तर त्यांच्याकडून शिकायला पण  मिळते.

 

एक काका फक्त पालेभाज्या विकतात. त्या दिवशी गेले तर काका खुर्चीवर बसले होते. शेजारी एक टेबल मांडले होते आणि त्यावर पालेभाज्या निवडून प्लास्टिकच्या पिशवीत भरून पॅक करून ठेवल्या होत्या .मला सांगायला लागले

 

“मुलांनी  हे सुरू केले आहे .पुढची पिढी आहे ..नवीन काही करायचं म्हणते करू दे. आता आपण जरा मागे राहूया असं ठरवलं आहे बघा..”

 

मुलगा उत्साहात सांगायला लागला “काकू तुम्हाला काही हवं असेल तर मला व्हाट्सअप करा. घरपोच निवडलेली भाजी आम्ही पुरवतो. माझे तीन मित्र मिळून आम्ही हे चालू केलेले आहे.”

 भाजीचं काम मुलाच्या हाती सोपवलं तरी त्याला मदत करत काका बसले होते. त्यांच्या या निर्णयाच मला अप्रूप  वाटलं. त्यांनी मला एक छान धडा दिला.

 

ऊन ,वारा ,पाऊस  झेलत ..एक आजी गेले कित्येक वर्ष विड्याची पानं विकत आहेत.  हळूहळू म्हाताऱ्या होत जाताना मी त्यांना पाहते आहे .मांडी घालून त्या बसलेल्या असतात. टोपलीत पानं सुंदर पद्धतीने मांडून ठेवलेली असतात .देताना हळुवारपणे  हाताळतात. सैलसर बांधून देतात. मुक्तपणे खळखळून नेहमी हसत असतात.

कस जमत आजींना हे…..अस नेहमी माझ्या मनात येत.

 

एक कानडी भाजीवाले आहेत. त्यांना दोन मुली आहेत .आपल्या मुलीच पुढे धंदा चालवणार आहेत हे त्यांनी ओळखले आहे.

त्यांच्या सावळ्या, तरतरीत ,हसतमुख अशा दोन मुली त्यांना मदत करतात. बारा वाजता त्यांची शाळा असते .पण सकाळी दोन तास त्या वडिलांच्या हाताखाली काम करतात. आनंदाने शांतपणे त्या भाजी वजन करून देत असतात .

मला त्या मुलींचे फार कौतुक वाटते. आत्तापासूनच त्या शिकत आहेत पुढे त्या निश्चितच यशस्वी होतील.

 

एक बाई स्वतःच्या शेतातली  भाजी घेऊन बसलेल्या असतात. बाकीच्या भाज्यांची पोती  नवरा होलसेल मध्ये विकतो. तोपर्यंत त्या भाजी विकतात.

भाजी विकून झाली की तिथेच मिळणार शेव, फरसाण ,गाठी ,चुरमुरे, फळं घेऊन ठेवतात.

” पोरा बाळांना आवडतं ना म्हणून घेऊन जायचं .

मला सांगत होत्या.

 

सगळ्यात शेवटी फुलं घ्यायला सरू कडे जाते .ती गेल्या गेल्या”या काकु”म्हणते.

तिथे एक माणूस चहा विकतो. अगदी दोन-तीन घोट मावतील असा त्याचा छोटासा कप आहे. तो चहा ती आग्रहानी पाजते. आज फुलं दिल्यानंतर तिने टपोरा गुलाब त्यात घातला .

“हा तुमच्या बाप्पाला …आणि त्याला सांगा सरूच्या नवऱ्याला जरा अक्कल दे..”

“हो ग केव्हाच सांगितलं आहे”

मग काय म्हणाला तुमचा बाप्पा……..

तो म्हणाला 

सरू   शहाणी ,समंजस सोशीक आहे. संसारासाठी कष्ट करतीय. असं म्हणून तुझं कौतुक करत होता.”

 

” नेहमीसारखं गोड गोड बोलून लावा मला वाटेला “….

असं हसत  ती म्हणाली. मी पण हसून घेतलं …

बाप्पाच्या हातात काही नाही हे तिला पण माहित आहे आणि मला पण…..

 

या सगळ्याजणी पहाटे उठतात.  मार्केट यार्डला जातात. तिथे फुलं,भाज्या घेतात .टेम्पोत बसून इथे येतात. रस्त्यावर बसून विकतात. किती कष्ट करतात. हा विचार केला की मी त्यांच्याकडून शिकते.

मग उगीच छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करत नाही .

 

मनात खूप संमिश्र भावनांची मंडई भरलेली असते ….

आजकाल ती फार  जाणवायला लागलेली आहे…

जीवन आनंदाने कसं जगावं हे शिकवणारे  माझे हे गुरु …

आसपास वावरत आहेत….

शिकत राहते त्यांच्याकडून…

श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले मग आपण कोण?

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

 

??

☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर

राजस्थान रॉयल्सचा कप्तान संजू सॅमसन याची परवा इन्स्टाग्रामवर पोस्ट बघितली.

त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, दूर लांबवर नजर आणि डोळ्यात आशेची चमक. 

त्याने खाली लिहिले होते,” वियप्पु थुनियित्ता कुप्पयम. “… म्हणजे माझा शर्ट माझ्या घामाने विणला आहे.

त्याला म्हणायचे होते, ‘ मी जो इथवर पल्ला गाठलाय तो केवळ कष्टाने, घामाने.आणि अजून खूप पुढे जायचे आहे.’ 

आयुष्यात पुढे यायचे असेल तर कष्ट आलेच. गीतेत कृष्णही हेच सांगतो, 

“उद्धरेत आत्मना आत्मानम् ।”….. स्वतःच स्वतःचा विकास करत रहा. 

विकासाचा रस्ता कायम अंडर कंस्ट्रक्शन असतो. अडचणींचे दगड, धोंडे ओलांडावे लागणार

…  रफाल नडाल, २२ वेळा ग्रॅन्ड स्लाम जिंकला. उत्तम टेनिसपटू. तरीही अपूर्णतेची हुरहुर. 

मनात जिद्द…. दोन,तीन महिन्यापूर्वी बेडरिडन होता. त्याची हिप सर्जरी झाली होती. त्याला स्वतःला तो टेनिस खेळू शकेल की नाही याची खात्री नव्हती. पण मनात दुर्दम्य इच्छा.मे महिन्यात पॅरीसमधे फ्रेन्च ओपन खेळण्याची. आणि तो इच्छाशक्तीच्या जोरावर पॅरीसमधे खेळला.

कृष्ण गीतेत सांगतो ….. 

आत्मनः म्हणजे मन बलवान करा. 

मन याचा अर्थ अंतर्मन….  सबकाॅन्शस माईंड. 

या मनात चांगले विचार, सकारात्मक विचार पेरत रहा. 

या अंतर्मनाची शक्ती इतकी अफाट आहे की ते विचार सत्यात उतरतील.Thoughts will turn into things.

जाॅर्ज वाॅशिंग्टन गरीब होता. एका शाळेत शिपायाची नोकरी करीत होता.शाळा सुटायच्या वेळी घंटा वाजविण्याचे काम त्याचे होते. घंटा वाजवताना तो मस्करीत म्हणायचा,

“टण,टण,अमेरिकेचा प्रेसिडेंट वाॅशिंग्टन. ” .. हे रोज म्हणता म्हणता तो विचार त्याच्या अंतर्मनात 

आपोआप झिरपत गेला.तो झपाटून गेला. त्याच्या कामाची व्याप्ती वाढली व तो खरोखर अमेरिकेचा अध्यक्ष झाला.

जसा समुद्रावरचा वारा जहाजाला कुठल्याही दिशेने भरकटवू शकतो तसेच मनही भरकटते.

पण जहाजाचे शीड जहाजाची दिशा ठरवते तसेच उत्तम विचार हे मनाच्या तारूची दिशा ठरवतात. 

कृष्ण नंतर हे ही सांगतो, “ न आत्मानम्अवसादयेत् l “ 

… स्वतःची अधोगती करू नका…… स्वतःला कमी लेखू नका….. न्यूनतेची भावना नको. 

… आपल्यातल्या उणिवा ओळखून त्या दुरुस्त करा.

थोडक्यात उन्नती साधायची असेल तर स्वतःचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो. थोडी रिस्क घ्यावी लागते.

परवा आय.पी.एल. मॅचमधे विराट कोहली इतका तगडा बॅट्समन असूनही त्याला जाणवलं की स्पिनर्स- -समोर त्याचा स्ट्राईक रेट कमी होतो आहे. ही त्याची उणीव भरून काढण्यासाठी त्याने पंजाबसमोर खेळताना रिस्क घेतली. त्याने स्लाॅग स्वीपचा सरावही केला नव्हता. तरीही त्याने तो शाॅट मनात इमॅजिन करून मारला व सिक्सर्स घेतल्या.

थोडक्यात  परिस्थितीप्रमाणे स्वतःला ढाच्यात बसवता आले पाहिजे.

स्वतःच्या उन्नतीचा मार्ग आपणच शोधला पाहिजे……. 

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋतु गाभुळताना… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

? मनमंजुषेतून ?

☆ ऋतु गाभुळताना… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ 

झोपता झोपता दूरदर्शन बातमी देतं..

मान्सून एक जूनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार..

मार्च, एप्रिल… २४तास एसी, कुलर, पंख्याला आचवलेलं शरीर.. पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ, चादर, बेडशीट साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

ऐटीत झाडावरुन मोहित करणारे बहावा, पलाश, गुलमोहोर…

 वार्‍याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात. झाडावरचं कैऱ्यांचं गोकुळ रिकामं होऊन गेलेलं, एखादा झाडावरच पिकलेला आंबा, खाली पडून केशर कोय सांडतो. जांभुळ, करवंदाचा काळा, जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

आई-आजीची लोणच्या, साखरंब्याची घाई, कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग, गच्ची-गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तू आडोश्याच्या जागी हलवायची बाबा-आजोबांची गडबड…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो..

साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते. उरलेल्या पापड, कुर्डया आता हवाबंद डब्यात जाऊन बसतात. डाळ, पन्हं, आईस्क्रीम, सरबतं, सवयीची होत जातात. माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

दुर्वास ऋषींच्या आविर्भावात आग ओकणारा रवी..

काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो, मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता… असाच दमुन जातो. भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो. गच्ची, दोरीवरच्या कपडे, गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

निरभ्र वाटणारं आकाश,

क्षणात आभाळ होऊन जातं,

ऊन सावलीच्या खेळात चराचर सावळं होतं.

वीज गडगडाटानं रसपोळीनं सुस्तावलेली दुपार..

धावपळीची होते.

झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल, किलबिल न राहता,

नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..

उफाळत्या जमिनीत नांगर फिरू लागतात,

मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात,

मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात..

… खुशाल समजावं तेव्हा ऋतु गाभुळतोय.

 

उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी 

देहमनाने आपणही आतुरतो….

… तेव्हा अगदी खुशाल समजावं…

…. ऋतु गाभुळतोय… 

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तेच डोळे देखणे… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? मनमंजुषेतून ?

☆ 👁️ तेच डोळे देखणे… 👁️ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

☆ १० जून, नेत्रदान दिन… ☆

डोळ्यांनी या पाहतो सुंदर 

चंद्र, सूर्य अन् निळे अंबर

रंगबिरंगी फुले नि तारे

अथांग सागर नदीकिनारे… 

*

काय पाहतील जे  दृष्टीहीन

कुणा समोरी होतील लीन

डोळ्यापुढती काहीच नसे

मग कल्पनेला तरी पंख कसे… 

*

देऊन डोळे दृष्टीहीनांना

धन्य होऊ मरूनि उरतांना 

संकल्प करा आजच साचा

भरूनि उरू दे घट पुण्याचा… 

अंधत्वाचे काही प्रकार असतात, वेगवेगळी कारणे असतात, पण काही अंधांना दृष्टी आपण देऊ शकतो. त्याला नेत्रदान म्हणतात. नेत्रदान म्हणजे मृत व्यक्तीच्या डोळयातील बुबुळावरचा पारदर्शक पडदा, कॉर्निया, काढून घेणे. हे काम दहा मिनिटात होते, रक्तस्त्राव होत नाही, डोळे विद्रुप दिसत नाहीत. किंबहुना काही केले आहे असे वाटतही नाही. पण दोन डोळयांना आपण दृष्टी देऊ शकतो. नेत्रदान संमतीचे कार्ड जवळ ठेवावे. ते नाही म्हणूनही काही बिघडत नाही. मृताचे नातेवाईक ऐनवेळी सुद्धा नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात.  वयस्कर व्यक्तींनी तशी इच्छा नातेवाईकाना सांगून ठेवावी. नेत्रदान तरी वय, डोळ्यांची परिस्थिती यावर अवलंबून असत नाही, फक्त कॉर्निया चांगल्या स्थितीत असावा लागतो. व्यक्ती मृत झाल्यावर सहा तासाच्या आत कॉर्निया काढावा लागतो.

खरं म्हणजे आपण सगळे नेत्रदान करू शकतो. प्रत्येकाची इच्छाही असते.पण प्रत्यक्षात तेवढे नेत्रदान होत नाही. त्याचे कारण मला असे वाटते हं, बरोबर की चूक माहित नाही… 

… जेंव्हा घरातली व्यक्ती मृत होते त्यावेळी घरातली माणसे दुःखात असतात. पुरुष जरा लवकर सावरतात, पण त्यांच्या डोक्यात त्यावेळी कुणाकुणाला फोन करायला हवेत, पुढच्या गोष्टी काय काय करायच्या असतात हे सगळं असतं. एखादी व्यक्ती खूप हळवी असते, तिला सावरायचं असतं. अशावेळी त्यांना काही सुचत नसतं. पण मला वाटतं अशा प्रसंगात मदत करणारा (म्हणजे अर्थीचं सामान आणणं, शववाहिका सांगणं इत्यादी) एक नारायण असतोच. त्याने घरातल्या सावरलेल्या व्यक्तीला विचारावं. आय बँकेला फोन करावा. एक पुण्य आपल्या नावावर जमा करावं. अगदी नारायण विसरू शकतो असं समजून तिथे असलेल्यांपैकी कुणीही लक्षात ठेऊन ही गोष्ट करावी. खालची माहिती वाचलीत की तुम्हाला त्याचे महत्व समजेल. मग  प्रत्येक मृत व्यक्तीचे डोळे सत्कारणी लावण्याचे काम कराल ना, नक्की?

जगातल्या ५ लाख अंधांपैकी एक लाखाच्यावर अंध लोक भारतात आहेत. त्यापैकी ६० टक्के १२ वर्षाखालील मुले आहेत. वर्षाला सुमारे दीड लाख नेत्र रोपणांची गरज असते. प्रत्यक्षात फक्त ४०- ४५ हजार नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. म्हणजे किती मुले नेत्र-रोपणाविना राहतात बघा ! आपण ठरवलं तर त्या सगळ्या चिमुरड्याना जग दाखवू शकतो. मग कविवर्य बा. भ. बोरकरांच्या देखण्या डोळ्यात आपलेही डोळे सामावतील….. 

तेच डोळे देखणे, जे कोंडिती साऱ्या नभा 

वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा…

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ राजकन्येची आई… — ☆ प्रा. डॉ. सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

राजकन्येची आई…  ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

गेल्या वर्षी  इंग्लंडमुक्कामी असताना,आमच्या मुलीनं चार दिवस स्काॅटलंडला जाण्याचं नियोजन केलं होतं. एडिंबरो ह्या स्कॉटलंडच्या  राजधानीत आमचा मुक्काम होता. समृध्द प्राचीन परंपरांचे अवशेष तिथे जपून ठेवले आहेत. ते पाहून झाल्यावर एक दिवस जवळच्या समुद्रकिनारी  आम्ही फिरायला जाणार होतो.

सकाळीच तयार होऊन तिथल्याच  एका  हाॅटेलात नाष्टा करून आम्ही  एका बसने  समुद्राकडे जायला निघालो.

हवा थंड होती.पण तिकडच्या लोकांना सवय म्हणून बहुतेक लोक टी शर्ट आणि  बर्मुडा घातलेले होते.

काही वेळ बसमधून बाहेर पहात होतो. निसर्गसौंदर्याची  अनेक रूपं, बसच्या आत आणि बाहेर चकाचक स्वच्छता ,लोकांची सौजन्यपूर्ण वागणूक मी इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये  नेहमीचं आहे. त्यामुळे त्यात नवीन वाटत नव्हते. मी बसमध्ये पाहिलं.सगळीकडं स्तब्ध शांतता होती.अनेकजण आपापल्या मोबाईलमध्ये दंग होते तर काही डुलक्या घेत होते.

माझ्या पुढच्या सीटवर  एक जोडपं बसलं होतं. ते पाठमोरे होते. तरीही  त्यांच्या खांद्यावरचा भाग  स्पष्ट दिसत होता. दोघंही उंच होते. तरीही तिची शरीरयष्टी नाजूक होती. तिनं केसांचा बाॅबकट केला होता.

गडद निळ्या रंगाचा झिरझिरीत फ्राॅक तिनं घातला होता. ती राजकन्येसारखी आकर्षक दिसत होती.

कडेच्या खिडकीतून ती  बाहेर पहात होती. तिच्या मानाने तो खूप दणकट वाटत होता.दाट मिशा आणि डोक्यावरचे उभे राहिलेले केस यामुळे मला तो हिंदी सिनेमातल्या व्हिलनसारखा वाटत होता. थोड्या वेळात त्या व्हिलननं राजकन्येच्या खांद्यावर आपला हात टाकून तो तिला हसवायचा प्रयत्न करू लागला.ती शांत होती.

मनात विचार करू लागलो; सुंदर मुलींवर  जाळं टाकणं हा बलिष्ठांचा  जगभर चालू असणारा धंदा दिसतो.

त्याच्या प्रयत्नाला ती फशी  पडली वाटतं, कारण तिनंही  त्याच्या खांद्यावर आपली मान ठेवली. मला तिची कीव आली तर त्याची चीड.

टिपीकल हिंदी सिनेमाची कथा मी मनात रंगवू लागलो. प्रवास कधी संपला ते कळलंच  नाही. एका मैदानात बसच्या ड्रायव्हरने बस उभी केली.आमचं डेस्टीनेशन आलं होतं. समोर प्रचंड मोठा जलसागर पसरला होता.त्यावर अजस्र पूल होते.बाहेर आलो. थंडी बोचत होती. मीही पत्नी आणि मुलीसोबत थंडीचे कपडे घालून सगळेजण जात होते तो अथांग समुद्र पहायला गेलो. 

सहज लक्ष गेले ते जोडपेही मला दिसले आणि धक्काच बसला.त्या सुंदर राजकन्येला उजवा हातच नव्हता. तिच्या बाॅबकटचे कारण  समजून आले. मी पहात होतो. त्याने आपल्या अंगावरचं जर्कीन काढून अलगद तिच्या अंगावर ठेवलं. पाण्याला जोर खूप होता  म्हणून  ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करून ठेवले होते.शिवाय अनेक सुरक्षारक्षकही लोकांना सूचना देत होते. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून सगळी माहिती  देत होता.

काही वेळात एक छोटीशी बोट येऊन उभी राहिली. त्याला फेरी म्हणतात. लोखंडी जिन्यावरून फेरीवर  जायचं होतं. मी एका सीटवर बसून पहात होतो. तिला नीट चढता येत नव्हतं. तिला आधार देत त्याने तिला वर चढवलं. फेरीचा वेग वाढत होता. निसर्गाच्या आणि मानवी कर्तृत्वाच्या अनेक यशोगाथा आम्ही त्या स्फटिकशुभ्र जलाशयावर पहात होतो. फेरीवर जमलेली विविध रंगाची माणसं आनंदाने चेकाळली होती. मधूनच पाण्यात ती फेरी हिंदकळत होती. तेव्हा स्वतःला सावरण्याची कसरत करताना गमतीचे अनेक प्रकार घडून येत होते.

ती दोघं आमच्या जवळच्याच लाकडी बाकावर बसले होते.तिनं डाव्या हातानं फेरी पकडली होती,तरीही तिचा तोल जात होता.तो  तिला आधार देत उभा होता. 

फेरी शांत झाल्यावर त्याने आपली बॅग उघडून  कसला तरी बिस्कीटचा पुडा काढून एक बिस्किट तिच्या तोंडात दिलं. फेरी हिंदकळली, तशी तिच्या तोंडातून बिस्किट खाली पडलं. मग त्याने एका हातानं तिला सावरत दुसर्‍या हातानं नवीन बिस्किट काढून तिच्या तोंडात दिलं……. एखादी पक्षीण आपल्या  पिलाच्या चोचीत अन्न  भरवते तसा मला तो आता वाटू लागला आणि त्याच्याविषयीचा राग जाऊन ती जागा आदराने घेतली.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ समजलंच नाही आपण कधी रक्तपिपासू बनलो ! —  लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ समजलंच नाही आपण कधी रक्तपिपासू बनलो ! —  लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य ☆ श्री सुनील देशपांडे

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे..’

… शाळेत असताना दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताबरोबर या प्रतिज्ञेने होत असे. कित्ती भारी वाटायचं. प्रतिज्ञा खणखणीत आवाजात म्हणायला मला खूप आवडायचं. एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी शाळेत प्रतिज्ञा झाली नाही. हल्लीच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं तरी पुष्कळ आहे अशी परिस्थिती आहे. ते असो… 

… प्रतिज्ञा म्हटल्यावर, म्हणताना आपण जे म्हणतोय तसं वागलं पाहिजे हे आपोआप मनात रुजत गेलंच. पण त्याच पुस्तकात हजारो वर्षांपूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत असे असं वाचलं की प्रश्न पडायचा, हजारो वर्षांपूर्वी निघणाऱ्या सोन्याच्या धुराचं कवतिक मला आज का सांगितलं जातंय? अर्थात हा प्रश्न मी कधी कुणाला विचारला नाही, कुणी त्याचं आपणहून उत्तर दिलं नाही. 

मी शहरात जन्माला आले, शहरात वाढले. आपला देश कृषिप्रधान आहे या वाक्याचा अर्थ समजायला पुढे बरीच वर्ष जावी लागली. शाळेच्या पुस्तकांनी मला काय दिलं माहित नाही पण शाळेने कळत नकळत माझ्यात ‘सेक्लुअर’ जगणं रुजवलं. त्यामुळे इतकी वर्ष मला माझा देश म्हणजे आजूबाजूचा समाज आवडायचा. त्यात त्रुटी होत्या, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या दिसायच्या, त्यांच्याशी दोन हात करावे लागायचे, पण तरीही राग यायचा नाही. कारण कितीही बुरसटलेला, कर्मठ असला तरी तो रक्त पिपासूं नव्हता. दुसऱ्याचं उघड उघड वाईट चिंतणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट झालं तरच माझं भलं होणार आहे असं मानणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात गैर काहीच नाहीये, उलट ते मर्दुमकीचं लक्षण आहे असं म्हणणारा आणि मानणारा नव्हता. तो दंगेखोर असेलही, क्वचित प्रसंगी असहिष्णू होतही असेल पण त्वरेने सावरणारा आणि आपल्या चुकांचं उघड समर्थन करत त्या चुकांचा पायंडा पडावा यासाठी धडपडणारा नव्हता. तो सर्वसाधारणपणे चांगला होता. 

सातवी-आठवी पासून मी एकटीने प्रवास करते आहे. एकटीने प्रवास करताना ना मला तेव्हा भीती वाटली ना माझ्या पालकांना. शाळेत असल्यापासून कॉलनीतल्या मित्रांबरोबर भटकत होते, कधी कुणी मुलगी असून मुलांबरोबर खेळते म्हणून टोकलं असेल पण तितकंच..त्याचा न्यूसन्स कधी झाला नाही. की कुणी गॉसिप करण्याच्या भानगडीत पडलं नाही. 

आज हे सगळं आठवण्याचं आणि लिहिण्याचं कारण, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या आजूबाजूचा समाज मला अवस्थ करतोय. त्याचं वेळोवेळी खालावत चाललेलं रूप मला आतून पिळवटून काढतंय. 

त्रास होतोय कारण तो रक्तपिपासू बनला आहे. सतत काहीतरी ओरबाडून घेण्याच्या वृत्तीचा बनला आहे. हपापेलेला वाटायला लागला आहे. सतत काहीतरी हवंय, अशी भूक जी कधीच शमणारी नाहीये.. माणसं शांत नाहीत, सुखी नाहीत, समाधानी नाहीत. साधं सिग्नलवर कुणी कुणाच्या पुढे गेलं तर माणसं एकमेकांकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत असतात. रस्त्यावर माणसे कावलेली आहेत. त्यांना कायम कसला तरी राग आलेला असतो. आणि तो राग आजूबाजूच्या सगळ्या सहप्रवाशांवर सतत काढला जातो. माणसे कधी नाहीत इतकी जाती आणि धर्माच्या नावाने वेडीपिशी झाली आहेत. अचानक अस्मितांच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. 

असंख्य जाती आणि विविध धर्म-भाषा यांनी बनलेल्या आपल्या देशाची माती सहिष्णू बनली आहे कारण त्याशिवाय या मातीत गुण्या गोविंदाने कुणालाच जगता येऊ शकणार नाही. सतत माझी जाती-धर्म-भाषा श्रेष्ठ म्हणत दुसऱ्याच्या जीवावर उठायचं ठरवलं तर उद्या इथे रक्ताच्या पाटापलीकडे काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून पिढयानुपिढ्यांच्या मशागतीनंतर सहिष्णू जगणं तयार झालंय. जी आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आपण भिन्न असलो तरीही आनंदाने एकत्र राहू शकतो यात असणारी विलक्षण ताकद, सामर्थ विसरून माणसं कप्पाबंद आयुष्य जगू बघतायेत. माणसाला एखाद्या छोट्या चौकोनी खोलीत बंद करून टाकलं आणि तिथं ऊन, वारा, नवा चेहरा यातलं काहीही येणार नाही, दिसणार नाही याची काळजी घेतली, त्या खोलीत कोंडलेल्या माणसाला कुणाशीही बोलता येणार नाही याची काळजी घेतली तर त्या माणसाचं काय होईल, तसं काहीसं आता आपल्या समाजाचं झालं आहे असं अनेकदा वाटतं. सगळं कोंडलेलं. कोंदट. कुबट. 

मी शाळेत होते तेव्हा माझे मित्र मैत्रिणी कुठल्या जाती धर्माचे आहेत याकडे माझ्या पालकांचं लक्ष नसायचं. रादर कुणाच्याच पालकांचं नसायचं. तो महत्वाचा मुद्दा नव्हता. पण आज आजूबाजूला बघितलं तर आपल्या मुलांनी कुणाशी मैत्री करायची, याचे निर्णयही पालक घेऊ लागले आहेत. लहान मुलं सुरक्षित नाहीत. चाईल्ड पोर्नोग्राफीचा भारत मोठा ग्राहक आहे यातच आपली विकृत सामाजिक मनोवृत्ती दिसते. जातीबाहेर लग्न केलं म्हणून स्वतःच्या गर्भार मुलीला जाळणारे वडील हा आपल्या समाजाचा कर्तृत्ववान चेहरा आहे. आणि अशा बापाचं समर्थन करणारे हे समाजाचं भीषण वास्तव. माणासांना मारणे गैर आहे, चूक आहे ही  जाणीव नसलेला आणि आदीम भावनांना खतपाणी घालून त्याच कशा योग्य आहे हे ठसवायला निघालेला आपला समाज बनला आहे. 

हे अचानक बनलेलं नाही..हळूहळू रुजत आता प्रस्थापित होऊ बघतंय. 

रोजच्या जगण्याच्या धबडग्यात माणसांच्या मनातला कोलाहल आता उघड उघड अंगावर येतो आहे. शहरं बकाल झाली आहेत. माणसं नुसतीच धावत आहेत. गावांच्या समस्या आहेत तशा आहेत. शेतकरी अस्वस्थ आहेत. बेकारी वाढली आहे. कर्मठपणा वाढतो आहे. माणूस असुरक्षित झाला की तो त्याचं जगणं जाती-धर्मात शोधायला सुरुवात करतो. आपण असुरक्षित मनाच्या माणसांचा देश बनलोय का? अशा रक्तासाठी चटावलेल्या देशात आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना वाढवणार का? त्यांना आपण कसा आणि कसला समाज देऊ करतोय याचा थोडा तरी विचार आपण करणार की नाही?

सरकारं येतात जातात. राजकारणाच्या गणितात आपण सामान्य माणसांनी, जो हे देश खऱ्या अर्थाने चालवतात त्यांनी किती वाहवत जायचं, किती अडकून पडायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. कुठलं सरकार येतं याहीपेक्षा आपल्या समाजाची रक्तपिपासू वृत्ती बदलणं जास्त गरजेचं आहे. सतत रक्ताची तहान लागल्यासारखा दिसतो आपला देश !

… खरंच इतकं रक्तपिपासू बनण्याची गरज आहे का आपल्याला?ज्या देशाने जगाला अहिंसा शिकवली त्या देशाला कधीही न शमणारी रक्ताची तहान लागावी? 

मातीतल्या सहिष्णुतेची बाधा सगळ्यांना पुन्हा एकदा होणं गरजेचं आहे. 

आपण एकमेकांच्या रक्ताला चटावलेला समाज नाहीयोत. हे पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगण्याची गरज आहे. 

हा देश ग्रेट होता की नाही माहित नाही, पण तो ग्रेट व्हावा यासाठी जात-धर्म-पंथ-भाषा-लिंग भेदाच्या पलीकडे भारतीय म्हणून विचार करायला हवाय. नाहीतर पुढल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. 

लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शौर्य मरण…’ ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शौर्य मरण’ ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित

महापराक्रमी  पृथ्वीराज चौहान सुलतानाविरुद्ध लढा देऊन,  विजयश्रीची माळ लेऊन परतले होते.

समोर पराजित झालेला सुलतान खाली मान घालून उभा होता. पृथ्वीराज महाराजांनी मोठा लढा देऊन विजयश्री मिळवली होती तरीही, पृथ्वीराज चौहानाचे पाय जमिनीवरच होते. अभयदान देणारा दाता नेहमी श्रेष्ठच असतो नाही कां? आणि त्या श्रेष्ठत्वाला स्मरून त्यांनी सुलतानाला अभय देऊन  बंधमुक्त केलं  होतं. 

पुढे अशा घनघोर लढाईची पुनरावृत्ती दोन वेळा झाली. विशाल अंतःकरणाच्या चौहानांनी सुलतानाला तीन वेळा अभय दिलं. पण सूडाच्या भावनेने, अहंकाराने पेटलेल्या सुलतानाने, त्या सैतानाने, आपल्या उपकार कर्त्यावरच चाल करून त्याचा पराभव केला. सापाला दूध पाजलं तरी तो गरळच ओकतो ना !  तसंच  झालं. सुलतानाने,घनघोर प्रबळ सैन्याच्या बळावर चौहानांचा पराभव केला. आणि तो महापराक्रमी नरसिंह पृथ्वीराज चौहान शत्रूच्या जाळ्यात अडकून जायबंदी झाला.

पिसाळलेला सुलतान शब्दांचे आसूड फटकारून विचारत होता,  “बोल चौहान क्या सजा   चाहिये  तुझे ? अब तो तुम हमारे कब्जेमे हो l और हमारे कैदी बन गये हो l  अब तुम्हारे लिये एकही सजा काफी है l हमारा इस्लाम धर्म स्वीकार करो …l बस यही एकही रास्ता है तुम्हारे लिये l “  

संतापाने लालबुंद झालेला तो नरकेसरी त्वेषाने म्हणाला, ” हमे सजा देनेवाले तुम कौन हो सुलतान? हमारी जान जायेगी लेकिन जबान नहीं जायेगी l हम जानकी कुर्बानी करेंगे लेकिन अपना धर्म कभी नही छोडेंगे ! “ डोळ्यातून अंगार ओकत दुभाषाला चौहान म्हणाले  ” सांग तुझ्या पाखंडी सुलतानाला, शरणागताला अभय देणाऱ्या धर्माची आमची जात आहे. तर कपट नीतीने उपकारकर्त्यावरच उलटणारी  तुझी सापाची जात आहे. अभय देऊन विषारी सापाला दूध पाजण्याची चूक झालीय आमच्याकडून.  प्राण  गेला तरी चालेल. पण इस्लाम धर्म आम्ही कधीही स्विकारणार नाही. आमच्या धर्माशी शेवटपर्यंत आम्ही एकनिष्ठच राहू.”  

चौहानांच्या डोळ्यातील अंगार बघून सुलतान आणखीनच चवताळला. त्या क्रूरकर्माने त्यांचे डोळे फोडण्याची आज्ञा फर्मावली  आणि तो पराक्रमी निरपराधी धर्मनिष्ठ पुरुष पृथ्वीराज चौहान पुरता  जायबंदी झाला. अनेक प्रकारे त्याचा छळ झाला, पण  निश्चयापासून  तो शूरवीर  जराही ढळला नाही . त्यांनी आपला धर्म सोडला नाही . त्यांच्या एकनिष्ठतेची आणि त्यांच्यावर चाललेल्या अन्वनित अत्याचाराची  बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या राज्यात सगळीकडे पसरली. चौहानांची प्रजा कासाविस झाली. स्वामीनिष्ठ सेवक बैचेन झाले .आणि मग त्यांच्यातलाच एक सेवक मनाशी मनसुबा रचून सुलतानासमोर हाजिर झाला. आणि म्हणाला …” आपको  सादर प्रणाम सुलतानजी l एक शेवटची संधी आम्हाला द्या. आमचे महाराज आवाजाच्या दिशेने निशाणा साधण्यात तरबेज आहेत . तुम्ही एकदा परीक्षा तर पहा ..  त्यांचा नेम चुकला तर मग खुशाल त्त्यांच्यावर तलवार चालवा .” 

सुलतान छद्मीपणे हसून म्हणाला, ” पागल हो गये क्या? वो अंधा क्या तिरंदाजी करेगा ? उसकी आखोंकी  रोशनी तो गायब हो गयी है l  मनावर कमालीचा ताबा ठेवत, सेवक शांतपणे म्हणाला, ” एक..  सिर्फ एक बार पहचान कर लो सुलतानजी” l अशी विनंती केल्यावर अखेर उत्सुकतेपोटी सुलतान तयार झाला .

मैदानात मोठे लोखंडी गोळे ठेवले गेले.आपल्या प्रजेसह, सैन्यासह,सुलतान तिथे विराजमान झाला. एक अंधा आदमी निशानेबाजी क्या करेगा ? हा  कुचकट भाव मनात होताच.  लोखंडी गोळे एकमेकांवर आदळले. ध्वनी झाला आणि बरोब्बर त्याच दिशेने पृथ्वीराजानी निशाणा साधला.. हे कसं शक्य आहे? सुलतान ठहाका मारून हसून म्हणाला  ” इसमे कुछ गोलमाल है” .. 

सेवकाने अदबीने उत्तर  दिले ” सुलतानजी आणखी एकदा परीक्षा पहायची असेल तर अवश्य बघा. पण त्याआधी तुम्ही स्वतः नेमबाजी करण्याची महाराजांना आज्ञा द्या, कारण आमचे महाराज तुमचे कैदी आहेत. त्यामुळे तुमची आज्ञा मिळाल्याशिवाय ते बाण सोडूच शकत नाहीत.” या स्तुतीने सुलतान खुलला . त्याने विचार केला,  चौहान महापराक्रमी, युद्धकलानिपूण होगा तो क्या ! ये शेरका बच्चा पृथ्वीराज चौहान  अभी अपनेही कब्जे मे हैं ” …  आणि याचाच सुलतानाला गर्व झाला होता . मिशीवरून हात फिरवत सेवकाची विनंती त्यांनी मान्य केली. सेवक धावतच आपल्या स्वामींजवळ गेला. सुलतानाने विनंती मान्य केल्याची, सूचना, त्याला स्वामींपर्यंत पोहोचवायची घाई झाली होती .तो स्वामींजवळ पोहोचला. आपल्या स्वकीय भाषेतील कवितेच्या रूपाने, सुलतानाच्या आणि महाराजांच्या मधल्या अंतराचे मोजमाप, त्यानी आपल्या स्वामींना कवितेद्वारे सूचित केलं . जड साखळदंडांनी वेढलेला , दृष्टिहीन असा तो ‘ नरकेसऱी ‘  आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सज्ज झाला.

गडगडाटी हसून टाळ्या पिटत सुलतान छद्मीपणे म्हणाला .. ” चौहान.. अबे अंधे,कर ले नेमबाजी और दिखा दे अपनी होशियारी !”

आणि काय सांगावं मंडळी.. अहो  ! आवाजाच्या दिशेने बाण सूं    सूं   करीत सुसाट सुटला .आणि–आणि –सुलतानाच्या छातीत घुसला .कपट कारस्थानी सुलतान क्षणार्धात, खाली कोसळला. त्याच्या पापाचा घडा भरला होता. मैदान माणसांनी गच्च भरलं होतं. सुरक्षा दलाला काही कळायच्या आतच हे सगळं घडलं. हजारो लोकांच्या साक्षीने, सुसज्ज सैन्याच्या देखत, संरक्षक नजरेचं पात लवण्याच्या आतच पृथ्वीराजांच्या बाणाने शत्रूला यमसदनास  पोहोचवलं होत.   “दगा-दगा “असं ओरडतच सैन्य चौहानांच्या दिशेने धावले. आता खरी परीक्षा होती ती राजांच्या स्वामीनिष्ठ सेवकाची,

विजेच्या चपळाईने त्यानें राजांच्या छातीत पहिल्यांदा  खंजिर खुपसला  . लगेच तोच खंजिर   स्वतःच्या छातीत घुसवला . आणि- त्या दोघांना त्याक्षणीच  शौर्य मरण आलं. शत्रूच्या हाती पडून स्वामींची विटंबना होण्यापेक्षा त्या स्वामीनिष्ठ सेवकाने स्वामींबरोबरच स्वतःलाही खंजिर खूपसून ,मरणाला आपणहून कवटाळून संपवलं .आणि ते दोघे स्वामी, सेवक ‘ ‘  ‘नरवीरकेसरी ‘  अजरामर झाले.  

धन्य तो धर्मासाठी ,स्वामींसाठी प्राणांची आहुती देणारा कर्तव्यतत्पर सेवक आणि धन्य धन्य! ते पृथ्वीराज  चौहान .. .अशा शौर्य मरण पत्करणार्‍या त्या पराक्रमी ‘ नरकेसरींना ‘  माझा.  मानाचा मुजरा,– मानाचा मुजरा .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

गेल्या काही वर्षात पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून शाळा शाळातून साजरा केला जातो. माझा नातू लहान असताना पर्यावरण दिनाच्या दिवशी त्याच्याबरोबर मी शाळेत गेले होते. तेव्हा तेथील वातावरण पाहून मी थक्क झाले! शाळेत प्रवेश करताक्षणी सगळीकडे हिरवाई दिसत होती. हरीत रंगाने विविध प्रकारच्या कलाकृती केलेल्या होत्या.भिंतीवर निसर्ग चित्रे लावलेली होती. मुलांना आधीच सूचना देऊन कुंड्यांमध्ये काही बिया पेरायला सांगितल्या होत्या .कोणी मोहरी,मेथी,हळीव अशा लवकर येणाऱ्या रोपांच्या बिया रूजवल्या होत्या.त्यांची छोटी छोटी रोपे उगवून आली होती.आणि प्रत्येकाला त्या सृजनाचे रूप इतके कौतुकाचे होते की मुले त्या छोट्या कुंड्या मिरवत शाळेत आली होती! वर्गा वर्गातून त्या छोट्या कुंड्या, वनस्पतींची माहिती देणारे बोर्ड तसेच पर्यावरणाचे महत्त्व दाखवणारे प्रसंग आणि ते सांगणारे छोटे विद्यार्थी असे उत्साहाने भरलेले वातावरण होते! त्या वातावरणाने मला भारावून टाकले! लहानपणापासूनच ही जागृती मुलांमध्ये निर्माण झाली तर ही वसुंधरा पुन्हा जोमाने सजेल आणि निसर्गाची वाटचाल चांगली होत राहील, असा विश्वास पर्यावरण दिनाच्या दिवशी माझ्या मनात निर्माण झाला.

घरी येताना मन सहज विचार करू लागले की 50 एक वर्षाखाली असा हा पर्यावरण दिन आपण करत होतो का? नाही, तेव्हा ती गरज जाणवली नाही. मनात एक कल्पना आली की, परमेश्वराने पृथ्वीला मायेने एक पांघरूण घातले आहे. त्या उबदार पांघरूणात ही सजीव सृष्टी जगत आहे. पण अलीकडे या पांघरूणाला न जुमानता मनुष्य प्राणी आपली मनमानी करीत आहे, त्यामुळे एकंदरच सजीव सृष्टीचा तोल बिघडू लागला आहे. काही सुजाण लोकांना याची जाणीव झाली आणि साधारणपणे 1973 सालापासून जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अमेरिकेत “पर्यावरण दिन” साजरा होऊ लागला !

पर्यावरण म्हणजे काय? ही  सजीव सृष्टी टवटवीत ठेवण्यासाठी असलेली सभोवतांची हवा, पाणी, मातीआणि जमीन या सर्वांचे संतुलन! ते जर चांगले असेल तर आपले अस्तित्व चांगले रहाणार!

आपल्याला ज्ञात असलेला मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासताना असे लक्षात येते की, आदिमानवापासून ते आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात खूप बदल हळूहळू होत गेलेले आहेत. गुहेत राहणारा मानव निसर्गाशी आणि इतर प्राण्यांची जुळवून राहत होता. माणसाला मेंदू दिला असल्याने त्याने आपली प्रगती केली आणि त्यामुळे आजचा आधुनिक माणूस आपण निसर्गावर मात केली आहे असे समजतो. पूर्वी यंत्र नव्हती तेव्हा प्रत्येक काम हाताने करणे, वाहने नव्हती तेव्हा प्रवास चालत किंवा प्राण्यांच्या मदतीने करणे, गुहेमध्ये किंवा साध्या आडोश्याला घर समजून रहाणे, अन्नासाठी कंदमुळे, तृणधान्ये, फळे यांचा उपयोग करणे हे सर्व माणूस करत असे.अन्न,वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की बास!. पण आज या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे नकळत पर्यावरणावर आपण हल्ला केला आहे!

हवेचा विचार केला तर प्रदूषण ही समस्या आपणच निर्माण केली. विविध प्रकारचे कारखाने वाढले. पेट्रोल, डिझेल यासारख्या पदार्थांच्या वापर वहानात होत असल्याने हवा प्रदूषित झाली. रस्त्यांसाठी, घरांसाठी झाडे तोडणे यामुळे हवेतील गारवा कमी झाला. एकंदरच वातावरणातील उष्णता वाढू लागली. सावली देणारी, मुळाशी पाणी धरून ठेवणारी वड, पिंपळासारखी मोठी झाडे  तोडून टाकली. डोंगर उघडे बोडके दिसू लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडला. वेळच्यावेळी पाऊस पडेना. त्याचा परिणाम इतर सर्व ऋतूंवर आपोआपच होऊ लागला. पाणी पुरत नाही म्हणून नद्यांचे पाणी आडवणे, धरणे बांधणे यामुळे नैसर्गिक रित्या असलेले पाण्याचे स्त्रोत जमिनीखाली विस्कळीत होऊ लागले. हवा, पाणी, पाऊस, जमीन या सर्वांचा नैसर्गिक असलेला परिणाम जाऊन प्रत्येक गोष्ट अनियमितपणे वागू लागली !

माणसाला याची जाणीव लवकर होत नव्हती. घरात गारवा नाही, एसी लावा.. नळाला पाणी नाही, विकत घ्या! चांगली हवा मिळत नसेल तर ऑक्सिजन विकत घ्या! माणसाचा स्वार्थी स्वभाव त्याच्याच नाशाला हळूहळू कारणीभूत होऊ लागला. जगभर होणारा प्लास्टिकचा वापर

जसजसा वाढू लागला तस तसे हे लक्षात आले की प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी मोठा अडथळा आहे. प्लास्टिक कुजत नाही. त्यातील घटकांचे विघटन होत नाही. प्लास्टिक मुळे नाले ,ओढे यांतून नद्यांकडे वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर प्लास्टिक ही पुढे समुद्राला जाऊन मिळते. दररोज कित्येक टन प्लास्टिक समुद्रामध्ये वाहत जाते, साठत जाते. या सर्वाचा परिणाम नकळत पर्यावरणावर होत असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. गेल्या काही वर्षात प्लास्टिक वापरावर थोड्या प्रमाणात बंदी आली आहे, त्यामुळे नकळतच प्लास्टिकचा वापर थोडा कमी केला जात आहे..

5 जून 1973 साली अमेरिकेत “पर्यावरण दिन” प्रथम साजरा केला गेला आणि आता जगभर हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणसाचे लक्ष निसर्गाकडे वेधले जाते. जर प्रदूषण वाढत राहिले तर नकळत आपणच आपला नाश करून घेऊ याची जाणीव थोड्याफार प्रमाणात होत आहे.या दिवशी एक तरी रोप लावावे, एक तरी झाड वाढवावे आणि पर्यावरण चांगले ठेवायला मदत करावी एवढा जरी संकल्प आपण केला तर खऱ्या अर्थाने या वसुधेची  आपण काळजी करतो हे दिसून येईल!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होय फुला !! ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

होय फुला !! ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

तुझ्या वासाने, आणि तुझ्या रंगकांतीने मी इकडे आलो, ओढावलो गेलो,  तुझ्या त्या मनमोहक रूपानी माझ्या मनास भुरळ घातली .  काय तुझा तो सुवास, तुझा तो रंग आणि परिमळ …. विधात्याने नक्कीच खुबीने तुला निर्माण केले असेल बरं ! तुझ्या ह्या मुलायम अंगकांतीने म्हण की , विलोभनीय रंगाने म्हण, मी पुरता तुझ्या प्रांगणात शिरलो .. . मी आत कसा घुसलो ते कळलंच नाही ..  केवढी ही जादू .. जी तुझ्या फक्त दिसण्यात आहे, रूपात आहे.. . तर मग मी अंतरंगात शिरलो तर काय होईल हे कळणारच नाही !

सुगंधाने एवढं मोहित होता येतं का रे  ? ते भ्रमरांना विचारावे लागेल , त्यांची पण माझ्यासारखीच गत होणार. 

मनुष्य काय किंवा भृंग काय, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, आकृष्ट होण्याची ओढ ही जन्मजातच ! बहुतेक आपण आकर्षित व्हावे म्हणूनच विधात्याचा हा खटाटोप नाही का ? भ्रमराने तरी कोणत्या फुलावर यावे, बसावे !  चुंबन घ्यावे !  हे त्याच्या प्राक्तनातच लिहिले असेल का ? कोणत्या फुलावर बसावे, त्याचा  कोणता रंग असावा, ते कोणत्या जातीचे असावे,  सुगन्ध कोणता असावा  ह्याला बन्धन तर नाही ना ! कोणतेही फूल भ्रमरास प्रिय आहे, त्याला कश्याचेच बंधन नाही , जातिपात तो मानत नाही…  क्षुद्र, श्रेष्ठ , उच्च कनिष्ठ, असा भेदभाव तरी त्याच्या मनात येत असेल का ?  मग मी तर साधा मानव प्राणी , सुगंधाने मला भुरळ पडणारच.  मन हे असंच रसायन आहे, असं नाही का वाटतं ?  जिथे निसर्ग आहे तिथे ते ओढ  घेतच. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायला वय आड येतं का ? नाही ना ? मग मी तर साधा जीव …. 

कठीण लाकूड  पोखरणारा  भृंग मृदु, नाजूक अश्या कमलदलात .. त्याच्या पाशात अडकून पडतो. कमलदलं केव्हा मिटतात व तो केव्हा मृत होतो, ते त्याला ही कळत नाही …. असा का बरं हा निसर्ग 

नियम ! असे म्हणतात की फुलपाखरांचं मिलन झाल्यावर नर मरून जातो !  मादी तेवढीच जिवंत राहते. .. का ?  तर पुढील पिढी वाढविण्यासाठी. मग नर फुलपाखरांच्या नशिबी मरणच  का? कोणता निसर्ग नियम विधात्याने लावला?  त्यासाठीच का नराचा जन्म आहे , नेहमीच शमा-परवानाचे नियम का बरं असावे, हे माहीत असून देखील  नर हे कसं काय धाडस करतो? तर केवळ आंतरिक ओढ, माया जिव्हाळा,  प्रेम ! 

प्रेम हे असंच असतं का हो ? का मग दरीत उडी टाकायची …. षड्रिपु  हे निसर्गतःच सगळीकडे वास करतात का ?  अगदी फुलांच्या-पानांच्या -वेलीच्या -सौंदर्याच्या -सुगंधाच्या  ठाई !  पण त्यांचे अस्तित्व  आहे का ?  की विधात्याने विश्वमोहिनीचे रूप चराचर निसर्गात भरून ठेवलं आहे ? काळ्या कपारीतून थंडगार गोड पाण्याचा स्रोत, कुंडातून सतत ओसंडून वाहणारे थंड गार जलप्रवाह ! काही ठिकाणी गरम पाण्याचे कुंड. भूगर्भात असणारा तप्त लाव्हारस ….  काय काय बघायचे हे ! आकाश व सागर निळेच का !  सागराचे पाणी खारट का ?  सागराला जर तहान लागली तर त्यानी कुठं जायचं ? सरितेला सागराची ओढ का ?  अश्या अनेक गूढ प्रश्नांनी मन सैरभैर होते.

देवा तू आमच्यासाठी काय काय निर्माण केलेस व हे मोहिनी-तंत्र कशासाठी वापरलेस? वर धर्म अर्थ काम करून मोक्ष मिळवण्यासाठी का भाग पाडलेस ? मोक्ष आहे की नाही मला माहित नाही  पण ….  

पुनरपि जननं पुनरपी मरणं 

पुनरपि जननी जठरे शयनं ।। 

… हाच सिद्धांत मला भावतो कारण तुझं निसर्गरूप मला सतत पहावे वाटते. म्हणूनच ययातीही  पण स्वतःच्या मुलाकडून तरुणपण मिळवण्यासाठी मोहाच्या आहारी गेलाच ना ! 

हे सखी ..  दे दे मला ..  आज सर्व काही हवं आहे, जे जे असेल ते ते दे ! उधळण कर तुझ्या मृदु मुलायम  हाताने तुझ्या नक्षत्रांची, तुझ्या सुगंधाने मी बेधुंद झालो.  तुझ्या दरबारात कसलीच कमतरता नाही ,  तुझी पखरण अशीच चालू ठेव.  मला आज मनमुराद अमृत लुटवायचं आहे, कोठेही कमतरता नको. आस्वाद घेवू दे मला …तुझ्या पवित्र नक्षत्रांचा , मुलायम पाकळ्यांचा वेडापिसा होवून मला भ्रमर होवू दे,  मग मी जन्मभर तुझ्या सानिध्यात मृत झालो तरी चालेल ! कर खुली तुझी कवाडे ! सुगंधाची किंमत एवढी तरी किमान द्यावीच लागेल ना ! जन्मभर तुझ्या महिरपी मेघडंबरित विसावा घेण्याची तयारी आहे माझी . 

मला तुझे एकतर्फी प्रेम नको, बलात्कार पण नको, मला तुझे सौंदर्य विद्रूप पण करावयाचे नाही. 

तुझ्यातील  प्रेमभावनेचं शिंपण कर. तू जशी असशील तशी तू मला प्रिय आहेस, तुझ्या सुगंधानी

माती पण भिजेल. ओला होईल गंधित वारा.  हाच तर खरा निसर्ग नियम आहे .

विचार ..  खुशाल विचार त्या सर्व लतावेलींना , फुलांना, पानांना, त्याच्या सुगंधाना,  त्या पारिजातकाला विचार , आम्रकुसुमांना विचार, गुलाबाला विचार,  गुलबकावलीला विचार ! निसर्गत: जे अव्याहत चालत आले आहे, त्या कालपुरुषाला विचार, त्या चंद्र सूर्य तारे ग्रह यांना विचार ..  निसर्ग नियम ते कधी विसरले आहेत का ?  मग मी तरी का विसरु ! 

असेच विचार त्या ययातीच्या मनात आले असतील का ?  क्षणभंगुर वासनेचा विरक्त सोहळा, हाच मनुष्याला प्रिय आहे का ?  हे निसर्गदेवते हेच तुला पण अपेक्षित आहे का ? ह्यालाच जीवन म्हणतात का ?  

ययाती व्हायचं की संन्यासी, की ऋषी मुनी,  की मानव धर्माचा उद्धार करायचा, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. 

होय फुला हेच इंगित आहे का जीवनाचं ? तुझ्या परिमळ एवढी  प्रचंड उलथापालथ करतो, तुझ्या मनमोहक रूपाने तो भ्रमर असो वा फुलपाखरू .. त्या दोघांचंही रुपडं तुला भावतं का रे ?  

… हे ज्या त्या विविधरंगी फुलांनीच ठरवावं . मानवाला ह्या गोष्टीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला ?  

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print