मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘विठ्ठल ‘पांडुरंगमय’ झाला…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘विठ्ठल ‘पांडुरंगमय’ झाला…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

ज्यांचे जीवनच सारे..‘गमप’मय झाले होते, त्या आदरणीय लोकशाहीर  विठ्ठल उमपांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या बरोबरच्या काही सुंदर आठवणी भराभरा जाग्या झाल्या, त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे. 

काही वर्षांपूर्वी एका टीव्ही चॅनलसाठी उमपांचं आणि माझं गाण्याचं शूटिंग होतं. माझं गाणं झाल्यावर मी उमपांना ऐकण्यासाठी थांबले आणि इतका ‘पांडुरंगमय झालेला विठ्ठल’ मी प्रथमच पहिला! परमेश्वराला अत्यानंदानं आळवीत, ते ‘स्वरचित’ काव्य गात होते… 

गोरोबाच्या हाती, मातीचा चिखल

बोलतो विठ्ठल पांडुरंग… ||१||

*

सावतामाळी तो मळ्यात राबता

मळा होई बोलता, पांडुरंग… ||२||

*

नामदेव शिंपी शिवताना कपडे,

शिलाई ओरडे पांडुरंग… ||३||

*

विठ्ठल अभंग – गातो रे विठ्ठल

ऐकतो विठ्ठल – पांडुरंग… ||४||

एखादा चित्रपट पहावा, त्याप्रमाणे त्यांच्या ओठून शब्द सहजपणे ‘जिवंत’ होऊन येत होते. स्टुडिओची ‘पंढरी’ झाली होती! साक्षात् विठ्ठलाचं दर्शन त्यांनी आम्हाला घडवलं.  परमेश्वराशी तद्रुप होणं म्हणजे काय, याचा सुंदर आविष्कार होता तो! प्रत्येक अंतऱ्यागणिक डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा येत होता! 

त्यानंतर एकदा उमपांनी मला ‘जांभूळ आख्यान’चं निमंत्रण दिलं. मुलाच्या परीक्षेमुळे लवकर परतायचं ठरवूनही, संपूर्ण आख्यान पाहूनच घरी आले. खुर्चीला खिळवणारं हे संगीत आणि नृत्यही भारावून टाकणारं होतं. परमेश्वरानं दिलेल्या पुरुषी रूपातही ७८ वर्षांच्या (त्यावेळी) उमपांनी साक्षात् सुंदर कोवळी द्रौपदी ‘जिवंत’ उभी केली. पांडवांच्या अनुपस्थितीत कर्ण आल्यावेळी, तिचं कर्णाला पाहून लाजणं, मिलनोत्सुक होणं, अधीर होणं आणि पांडवांसमोर, कृष्णाने सत्य उघड केल्यावर बिथरणं, सारं इतकं थरारक, की प्रत्येक श्रोता ‘स्वतःतच’ द्रौपदीला अनुभवत असावा! या वयात त्यांचा स्टेजवरील वावर, खड्या आवाजातील भावस्पर्शी गाणं, अभिनयाच्या बादशहालाही लाजवेल असा अलौकिक आविष्कार पाहून वाटलं, देहभान विसरून कलेचा ‘परमोच्च आनंद’ घेणं म्हणजेच  ‘अध्यात्म’!

मी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘माझं अध्यात्म’ या सदरात त्यांच्या ‘जांभूळ आख्यान’ मधील मला अत्यंत अध्यात्माविषयी लिहिलेलं वाचून उमपांचा मला फोन आला. ते म्हणाल, “पद्मजा ताई, तुम्हाला संतांचं संचित मिळालं आहे. एखाद्या पोक्त माणसानं इतरांबद्दल मनमोकळेपणे, मुक्तपणे लिहावं, तसं स्वानुभवाचं गांठोडं तुमच्या आत्म्याच्या कप्प्यातून आलंय. ती दृष्टी तुम्हाला इतक्या लहान वयात मिळाली आहे, ही परमेश्वरी कृपाच!” असं सांगून त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. 

आजही जांभूळ आख्यानातील ‘अन् कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं…’

या ओळी कानी घुमू लागल्या, तरी उमपांचा चतुरस्र अभिनय डोळ्यांसमोरून हलत नाही!

याच आदरणीय शाहीर विठ्ठल उमपांच्या नावे मला २४ नोव्हेंबर २०१३ रोजी ‘वत्सला प्रतिष्ठान’ तर्फे ‘मृद्गंध’ हा मानाचा पुरस्कार दिला गेला. तो स्वीकारताना विठ्ठल उमपांच्या ‘आठवणींचा गंध’ मला पहिल्या पावसानंतरच्या मृद्गंधासारखाच उत्साहित करून गेला! काव्य, गायन, वादन, लेखन, नृत्य, सर्वच क्षेत्रांत अशी ‘अलौकिक’ मुशाफिरी करणारा असा कलावंत, पुन्हा होणे नाही!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

“मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार.” एक 27-28 वर्षाची नवविवाहित तरुणी मला स्पष्टपणे म्हणाली. तशी ती कूल होती, नम्रही होती पण ठाम होती.

मी म्हंटल, “नको करू.तुझी इच्छा.पण सगळे हौशीने करायला तयार आहेत, तर तुला का नाही करायची मंगळागौर??”

त्यावर ती उस्फुर्तपणे म्हणाली, “मला ना हे सगळं Illogical आणि Wastage of time वाटतं.”

“तू करूच नको मंगळागौर.पण मंगळागौर म्हणजे नक्की काय, त्यात काय-काय करतात, माहिती आहे का तुला ?” मी तिला विचारलं.

“नाही हो.मंगळागौर म्हणजे दिवसभर पुजा करतात एवढंच माहीत आहे.”

“अगं, दिवसभर कसं कोणी ‘फक्त पुजा’ करेल? ” मी तिला हसतहसत विचारलं.

ऐक, मी सांगते तुला,

“मंगळागौर म्हणजे देवी पार्वतीची पुजा.नवीन लग्न झालेल्या मुली, श्रावणतल्या मंगळवारी ही पुजा करतात.तसा हा सोहळा संपूर्ण दिवसभर असतो. पण पुजा फक्त एकदीड तास.फार फार तर दोन तास.

पुढे दिवसभर गप्पा-गोष्टी, खाणेपिणे, नाचगाणे आणि खेळही असतात.मंगळागौरीसाठी माहेरची माणसं येतात, तसेच तुझ्या सासरचे नातेवाईक पण येतात .सगळे दिवसभर एकत्र राहिले की आपोआप नवीन ओळखी होतात, सुख-दुःखाची देवाणघेवाण होते. आणि नकळत आपल्यातलं बॉण्डिंग वाढत.

तुझ्यासोबत पुजा करायला आणखीन 5 मुली येतात. त्यांचं लग्न सुद्धा अलीकडेच झालेलं असतं. त्या निमित्याने तुझ्याच वयाचं एक friend circle आपसूकच तुला मिळतं . सगळ्यांचे वय सारखे म्हणजे तुमचे बोलायचे विषय सारखे आणि प्रश्नही सारखेच. तेव्हा मैत्री व्हायलाही सोप्प जातं आणि Wave length पण पटकन जुळते.नाही का?

नवी नवरी दुसऱ्या गावावरून आलेली असते, तिला तिच्या वयाच्या मैत्रिणी मिळाव्यात, सुख दुःखाच्या चार गोष्टी बोलायला कोणी असावं, ह्यासाठीच तर ह्या मुली बोलावतात..

संध्याकाळी हळदीकुंकू करतात , त्यात शेजारीपाजारी, इतर ओळखीचे लोक आपण बोलावतो. आपले स्नेही,शेजारी ह्या सगळ्यांची तुला माहिती व्हावी. ह्यासाठी हा सगळा खटाटोप…

थोडक्यात सांगू का, मंगळागौर म्हणजे नव्या नवरीसाठी एक Induction Program च असतो बघ.. 

आणखीन एक गम्मत आहे.मंगळगौरीच्या जेवणाच्या मेनूची.सकाळी पुरणपोळी, कटाची आमटी,चटणी, कोशिंबीर. Full protein rich आणि फायबरयुक्त जेवण.

रात्रीच जेवण तर आणखीन भारी..

भाजणीचे वडे.जे बाजरीचे आणि ज्वारीचे असतात.अगं, Gluten free.ते सगळं भाजलेले असतं म्हणजे पून्हा पंचायला हलकं. सोबत मटकीची उसळ.ऊसळी, कडधान्य म्हणजे प्रोटीन आलंच की.

आणखीन जेवणात असतं ते टोमॅटो सार. श्रावण महिना म्हणजे पावसाळाच.त्या थंड वातावरणात गरमागरम,आंबटगोड टोमॅटो सॉस.. 

आणखीन एक शेवटचं, पण महत्वाचं.. कोणीतरी खूपच Health Conscious, Calorie मोजून जेवणारे किंवा daily gym hit करणारे असतील तर त्यांना सुद्धा Workout आहे..संध्याकाळी जे मंगळागौर खेळ असतात ना ते मस्त Physical Exercise आहेत. सोबत मजबूत Calories burn करणारे आहेत.”

“उत्तम आरोग्य हाच खरा दागिना.” असं म्हणणाऱ्या आपल्या जुन्या लोकांना, “मनातल्या भावनांचा निचरा होण्यासाठी आपलं हक्काचं माणूस लागतं ” हेही चांगलं माहिती होतं.

केवळ Mental piece, stress buster, healthy lifestyle अशा चकचकित टर्म त्यांनी वापरल्या नाहीत म्हणून ते direct Illogical होतात का ?”

सगळं ऐकून झाल्यावर तिला मंगळागौर चांगलीच समजली होती,उमजली पण होती..

तिने मंगळागौर बुक केली.

जाता जाता मला म्हणाली, ” तुम्ही management चा अभ्यास केला का हो? “

छानसं हसून मी तिला उत्तर दिलं,”मी आपल्या पारंपरिक सणांचा अभ्यास केला.. “

लेखिका : सुश्री  दीपा देशपांडे कस्तुरे

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गळके पत्रे, साप, आणि बॅटरी…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “गळके पत्रे, साप, आणि बॅटरी” ☆ सुश्री शीला पतकी 

आज शिकवणीच्या मुली जरा कुडकुडतच आल्या. शाळेतून येताना पावसात भिजल्या होत्या. घरी आल्यानंतर मी त्यांना पुसायला टॉवेल दिला थोडासा आलं घालून चहाही दिला. कारण माझी आई आम्ही शाळेतनं भिजवून गेलो की डोकं पुसायची आणि आम्हाला चहा करून द्यायची, आलं घातलेला…. तिच्या आठवणीने त्यांनाही चहा दिला. त्यानंतर मी त्यांना म्हटलं आज शिकवणे नको आपण थोडीशी वेगळीच चर्चा करूया. मग काय मुलींना आनंदी आनंदच .. 

 मी म्हणाले मुलींनो तुमची काही स्वप्न असतील तुम्ही आमच्या या कॉलनीत येता इथे असलेले सगळी मोठी मोठी बंगले वजा घरं.. प्रत्येकाच्या घरासमोर दोन दोन तीन गाड्या.. समोर विस्तीर्ण पटांगण बाग हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला वाटत असेल ना की अशी घर आपली असावीत किंवा तुमचं काय स्वप्न असेल ते ते सांगायचं प्रत्येकाने…..! 

खुशी पटकन उठून म्हणाली;” बाई मी सांगते” मी म्हणलं सांग, ती म्हणाली, “आम्हाला असली मोठी घर वगैरे काही नको फक्त आमच्या घरावर जे पत्रे आहेत ते गळके देऊ नको चांगले पत्रे दे देवा “.मला काही उलगडा झाला नाही .मी म्हणाले म्हणजे? त्या म्हणाल्या,” अहो बाई आमचं घर सर्व पत्र्यातच आहे मातीच जोत उचलून घेतलेल आहे आणि त्यावर सर्व बाजूंनी पत्रे ठोकलेले आहेत सगळं घरच पत्र्याचे” 

मग त्या सगळ्याच मुली एका मागून एक बोलत्या झाल्या. म्हणाल्या बाई आम्हाला ना थंडीच्या दिवसात वरचे बाजूचे सगळे पत्रे थंड पडतात खाली फरशीमुळे जमीन थंड होते चुकून एखादं भोक जर पत्र्याला पडलेल असेल तर त्यातून लई गार वारा येतो आणि इतकी थंडी वाजते झोपच येत नाही दुसरी म्हणाली उन्हाळ्यात ते सगळं तापतं मग आम्ही समोरच्या झाडाखाली बसतो अंकिता म्हणाली आणि पावसाळ्यात चांगल्या जागेवर म्हातारी माणसं कामाला जाणारी माणसं झोपतात उरलेल्या जागेत  रात्रभर आम्ही गळक्या पत्र्याखाली भांडे भरत बसतो रात्री काय झोप मिळत नाही लाईट गेली असली तर बघायलाच नको….. 

गुड्डी म्हणाली बाई परवा आमच्याकडे तर साप निघाला मोठा…. वडिलांच्या उशाखाली होता चार दिवस झोप आली नाही आम्हाला…. अंकिता म्हणाली बाई माझे नवे बूट बाहेर ठेवले होते तर कुत्र घेऊन गेला .त्यावर गुड्डी म्हणाली आणि माझ्या घरात ठेवले होते तर उंदराने कुरतडले .बाई ते बूट ना आम्ही दुकानात गेलो तेव्हा त्या माणसाने त्याची किंमत पाचशे रुपये सांगितली मग बाबा म्हणाले खूप महाग आहेत सध्या जुनेच घाल मग मी त्या दुकानदार काकांना म्हणाले ओ काका द्या ना तीनशे रुपयांमध्ये मला तुमची मुलगी समजून द्या ना आम्हाला परवडत नाही पाचशे रुपये  आणि मग एवढं म्हणल्यावर त्या काकांनी मला बूट दिले आणि ते उंदराने कुरतडले. गुड्डी अगदी उत्साहात येऊन पुढे सांगत होती ..

बाई रात्री तर आम्हाला लय भ्या वाटतं आमच्या घरात बाथरूम नाही सरकारी संडासमध्ये बाथरूमला जावं लागतं ते घरापासून लांब आहे आई-बाबा दमलेले असतात आईला उठवलं तर ती लवकर उठत नाही अन मला बाथरूमला दम धरवत नाही मग मी एकटी तशीच अंधारात जाते मग अंकिता म्हणाली काही वेळेला तर आम्ही एकमेकांना हाक मारून जातो कारण आमची घर अगदी लागून असतात ना …मग मी विचारलं,” मग आंघोळीचं काय करता?” तेव्हा त्यामध्ये तीने सांगितले तुटके पत्रे लावून थोडी भिंत केली आहे त्याला बाजूने तरट लावतो आणि त्याच्यात आंघोळ करतो ….

सगळ्या मुली जे सांगत होत्या ते कल्पनेच्या पलीकडचे होते मी ताबडतोब माळ्यावरची जादाची पांघरूणे आणि रग काढले सतरंज्या काढल्या आणि त्यांना त्या वाटून टाकल्या म्हणलं किमान खाली दोन एक सतरंज्या एकावर एक घालून जाड करून झोपा रग घ्या त्याशिवाय माझ्या मैत्रिणीने त्यांच्यासाठी दिलेल्या पैशातून मी त्या सगळ्यांना एक एक बॅटरी घेऊन दिली अंधारात जात जाऊ नका. सोबत घेतल्याशिवाय जाऊ नका आता तुम्ही मोठ्या व्हायला लागलेला आहात. आसपासचे लोक चांगले नसतात… खूप गोष्टी मी त्यांना समजावून सांगितल्या. 

….  पण ती रात्र माझी अस्वस्थपणात गेली माझ्या पक्क्या बांधलेल्या घरात उबदार पांघरुणात मला शांत झोप येत नव्हती केवढी ही विषमता आमच्या मुलांना आम्ही किती जपतो जाड जाड रग मऊ गाद्या पावसाळा म्हणून विक्स लावा पायमोजे घाला  मफलर  बांधा आणि इथं ही फुलं त्या चिखलातही फुलत होती त्यांना आज कुणीतरी सगळे ऐकून घेणारा भेटल होत त्या सगळ्या मुली चौफेर माझ्याशी भरभरून बोलत होत्या आणि मी त्या अनोळख्या जगाची ओळख करून घेत होते हे सगळं आपण पाहिलेलं असतं वाचलेलं असतं पण प्रत्यक्ष अनुभवणारी लहान लहान लेकरं हे जेव्हा सांगतात तेव्हा वाटतं देवा असं का रे?… हा न्याय आहे ..?ही सगळी मुलं तुझीच रुप आहेत ना मग त्यांना सगळ्यांना सारखाच न्याय देना…! बहुधा देवानं माझी प्रार्थना ऐकली असावी माझ्यासारख्या एका प्रामाणिक संवेदनाक्षम शिक्षकाचे त्याच्याशी कनेक्शन झाल असावा 

या वर्षाच्या सुरुवातीला मुली मला सांगत आल्या बाई बाई आमचं घर मंजूर झालं बाई आमचं घर मंजूर झालं मला काहीच कळलं नाही त्या म्हणाल्या ती सगळी झोपडपट्टी जी आहे तिथे पक्की घर बांधायची आहेत त्यासाठी आमचे कागदपत्र भरून नेले आणि आता आम्हाला अडीच लाख रुपये मंजूर झाले ..!रमाई आवास योजनेअंतर्गत त्यांना ती रक्कम मिळाली या चार-पाच महिन्यात त्यांची घर बांधून झाली  पुढच्या महिन्यात त्यांच्या घराच्या वास्तुशांतीच्या पूजा होतील आणि मुली पक्क्या घरामध्ये राहायला जातील. घर मंजूर झाले हे सांगताना त्यांचा आनंद एवढा होता की विचारू नका ..

मी देवाला प्रार्थना केली देवा किमान प्रत्येकाला एक घर अंगाला अंग झाकेल असं पूर्ण वस्त्र दोन वेळचे चांगले जेवण पोटभर मिळू दे इतकं तरी दे बाबा ! मोदींच्या रूपाने परमेश्वरच त्यांना या सुविधा देत आहे असे वाटते ते काही असो पण माझ्या मुलींचं गळके पत्रे ते पक्की घरे हा प्रवास रोमहर्षक होता कारण मला ते दुःख ठाऊक होते पाच रुपयाच्या दोन खोल्याच्या भाड्याच्या घरातून तीन खोल्यांच्या बंगल्यात येताना माझा जो कष्टमय  प्रवास झाला होता त्याची मला आठवण झाली मी परमेश्वराला म्हणून म्हटलं त्यांना छान घर दिलेस त्यांच्या घरात आनंदही नांदू दे नाहीतर बापाने दारू पिऊन धिंगाणा घालण्यासारखं घर देऊ  नकोस” घर असू दे घरासारखे नकोत नुसत्या भिंती…..

 ” परमेश्वरा तुझे अस्तित्व तेथे असू दे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे..!!! “

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – २ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – २ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

इंदिराबाई

(“लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा, हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले, तरी मनाने त्यात आहे बरं का!” तुझी दुर्गाबाई.) – इथून पुढे 

इंदिराबाईंना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न मिळाल्याची खंत मात्र या प्रिय मैत्रिणीच्या पत्रात जाणवते. तसंच इंदिराबाईंनाही दुर्गाबाई म्हणजे त्यांच्या साहित्याचा आधार वाटतात. दोघीही मनस्वी, प्रखर स्वाभिमानी आणि विदुषी असल्या तरी दोघींचं एकमेकींवर जबरदस्त प्रेम! एकमेकींविषयी आदर आणि ओढ पाहून मला अनेकदा डॉ. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई आठवतात. अशा या इंदिराबाई आणि दुर्गाबाईंच्या पत्रांचे ‘पोस्टमन’ होण्याचे भाग्य मला लाभले!

इंदिराबाई म्हणतात, “सर्वसामान्य लोकांच्या भावनांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य ज्याप्रमाणे माझ्या कवितेत नाही, त्याप्रमाणे ते माझ्या वाचनातही नाही. माझ्या कवितेची लोकप्रियता ही विशिष्ट लोकांपुरतीच आहे.” हे वाचून ‘जो संग तुझपे गिरे, और जख्म आये मुझे’ अशी माझी अवस्था झाली. आता तर माझा सर्वतोपरी हट्ट असतो की, प्रत्येक कार्यक्रमातून इंदिराबाईंच्या काव्यरत्नांचे हार पेटीत केवळ जपून न ठेवता, जास्तीत जास्त (अ)सामान्य रसिकांसमोर उलगडून दाखवावेत. हा माझा खारीचा प्रयत्न जरी असला तरी तो (सर्व)सामान्यांचेही हृदय पाझरवणारा आहे, हे मी प्रत्यक्ष मैफिलीत अनेकदा अनुभवले आहे.

कुणी निंदावे त्याला, करावा मी नमस्कार  

कुणी धरावा दुरावा, त्याचा करावा मी सत्कार!

असे साधेसुधे सूत्र घेऊन जगणाऱ्या इंदिराबाईंच्या कविता म्हणजे तरलता, निसर्गरम्यता आणि भावनांनी ओथंबलेल्या तरल कवितांचा मोरपिशी स्पर्श! भावनांचे हळवे प्रकटीकरण म्हणजे इंदिराबाईंची लेखणी! 

इंदिराबाईंची कुठलीही कविता वाचताना चित्ररूप डोळ्यासमोर येते, ही तिची ताकद आहे. त्यांची ‘बाळ उतरे अंगणी’  म्हणताना तर दुडुदुडु धावणारं गोंडस बाळ डोळ्यासमोर येतं. अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील कुठल्याही अजीव वस्तूतसुद्धा अक्कांना चैतन्य दिसतं. त्यात बाळाच्या पायाला स्पर्श करणारी ‘मऊशार काळी मखमली माती’ आणि ‘चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण’ म्हणताना सजीव होऊन माती आणि अंगण बाळाभोवती प्रेमाची पखरण करतात असं जाणवतं.

‘किती दिवस मी मानीत होते,

ह्या दगडापरी व्हावे जीवन

पडो ऊन वा पाऊस त्यावर,

थिजलेले अवघे संवेदन

दगडालाही चुकले नाही,

चुकले नाही चढते त्यावर

शेवाळाचे जुलमी गोंदण,

चुकले नाही केविलवाणे

दगडफुलाचे त्यास प्रसाधन!’

दगडासारख्या निर्जीव गोष्टींमधेही सजीवपणा जाणवणारं किती संवेदनशील मन असेल अक्कांचं! गंमत म्हणजे ‘वंशकुसुम’ हा कवितासंग्रह तर पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय त्यांनी!

‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,

गुलबाशीच्या फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो..

काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यात

एवढेच बोलली ती, घागरीला हात देत…’

या कवितेत तमाम ‘स्त्री’जातीची कथाच (नव्हे व्यथाच) अवघ्या चार ओळीत वर्णिलेली आहे. ‘अल्पाक्षरी’ कवितेत इंदिराबाई वैश्विक सत्य अगदी सहजपणे सांगून जातात.

‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले

आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…

सूर्यकिरण म्हणाले, घालू दारात रांगोळी

शिंपू पायावरी दव, म्हणे वरून पागोळी…!’

अशा कविता म्हणजे अक्का आणि निसर्ग अशी नात्याची सुंदर गुंफण आहे. त्यांची प्रत्येक कविता, एखादं फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं तशी, किंवा एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. दवबिंदूला जसे स्पर्श करतानाच, तो फुटून जाईल की काय, या भीतीनं या कवितेतील कवितापण जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता ही त्या कवीचं ‘बाळच’ असते.

‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ

दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ!’

यातील ‘तुळस वेल्हाळ’ म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच किंवा सहीच जणू! अक्कांची 

‘किती उशिरा ही ठेच, किती उशिरा ही जाण

आता आजपासूनिया माझे, आभाळाचे मन’

ही आत्मस्पर्शी, आत्मभान असलेली कविता वाचून तर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. प्रत्येकानं आभाळाचं मन ल्यायचं ठरवलं, तर या धर्तीवर केवळ आनंदच उरेल नाही?

इंदिराबाईंच्या शांत, सौम्य स्वभावाचा आणखी एक वेगळा पैलू त्यांच्या प्रारब्ध या कवितेत जाणवतो. प्रारब्धालाही ठणकावून सांगणाऱ्या व प्रसंगी मन कठोर करणाऱ्या अक्का म्हणतात, 

‘प्रारब्धा रे तुझे माझे,

नाते अटीचे तटीचे

हारजीत तोलण्याचे,

पारध्याचे सावजाचे…

जिद्द माझीही अशीच,

नाही लवलेली मान,

जरी फाटला पदर, 

तुझे झेलते मी दान…

काळोखते भोवताली 

जीव येतो उन्मळून,

तरी ओठातून नाही,

*_ तुला शरण शरण…!’_*

ही कविता कठीण प्रसंगी ताठ मानेनं उभ राहण्याचं बळ देते. तसंच, पती ना.मा. संत गेल्यावर लिहिलेली,

‘कधी कुठे न भेटणार,

कधी काही बोलणार

कधी कधी न अक्षरात, 

मन माझे ओवणार

व्रत कठोर हे असेच, 

हे असेच चालणार…’

यात अक्कांचं, सात्विक, सोज्वळ, तेजस्वी, ओजस्वी आणि निश्चयी व्यक्तिमत्त्व दिसून येतं. “चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत.” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात.

‘मराठी काव्याला पडलेली एक सुंदर मोरस्पर्शी निळाई’ असं कवयित्री शांताबाई शेळके  इंदिराबाईंबद्दल म्हणतात, तेव्हा मी अक्कांच्या निळाईत बुडून जाते आणि वाटतं….. 

किती तुला आठवावे, किती तुला साठवावे,

जिवाभावा एक ध्यास, एकरूप व्हावे व्हावे!

सूर्याचे तेजःकण आणि चंद्राची शीतलता त्यांच्या लेखनात आहे. चंद्रसूर्याची साथ आपल्याला आयुष्याच्या अंतापर्यंत आहे, तशीच साथ मला इंदिराबाईंच्या तेज, रंग, रूप, गंध ल्यालेल्या कवितेची आहे. सोनचाफ्याच्या पावलांनी माझ्या घरी आलेल्या त्यांच्या कविता म्हणजे आनंदी पाखरंच आहेत! म्हणूनच इंदिराबाईंच्याच शब्दांत म्हणावसं वाटतं…..

गेली निघून हासत, घर भरले खुणांनी

सोनपाखरे टिपावी, किती वाकूनी वाकूनी…!

— समाप्त — 

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

हे देखील करायला हवे…

“…भांडता सुद्धा आलं पाहिजे. आपली बाजू प्रभावीपणे मांडता आली पाहिजे. भांडण करणं म्हणजे दादागिरी करणं, दहशत निर्माण करणं, अथवा उद्धटपणा दाखवणं

असा अर्थ नव्हे. आपली अस्मिता विनाकारण दुखावली गेली अथवा पणाला लागत असेल तर भक्कमपणे बोलणं

आपल्याला जमलं पाहिजे.”

असं पपा नेहमी सांगायचे. एकीकडे शालीनता, नम्र वाणी, शब्दातील गोडवा जपणे, कुणाला दुखावलं जाईल असं न बोलणं, अशा तर्‍हेचे बोधामृत प्राशन करीत असताना मध्येच ‘”तुला उत्तम भांडताही आलं पाहिजे हं !!”

असं जेव्हां पपा सांगायचे तेव्हां या विरोधाभासाची

मला नुसती गंमतच नव्हे तर आश्चर्यही वाटायचं.

पण त्याचा प्रत्यय यायचा होताच.

एकदा गणिताच्या पेपरात ,वेगळ्या पद्धतीने गणित सोडवल्यामुळे, उत्तर बरोबर असतानाही त्या उदाहरणाला बाईंनी मला मार्क्स दिले नाहीत. परिणामी त्या दोन मार्कांनी माझा क्रमांक एकाने खाली गेला. मी खूप खट्टु झाले होते. माझ्या पद्धतीने यथाशक्ती मी गणिताच्या बाईंना “माझे मार्कस उगीच कमी केले”  असल्याचे निदर्शनास आणून दिले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.  बाईंची प्रतीक्रिया शून्य होती. मी आपली “जाऊदे”  या मोड मधेच राहिले. गेला नंबर मागे तर गेला..असं मुळमुळीत धोरण धरुन गप्प बसले.

तेव्हां पपा म्हणाले ,”प्रश्न गुणानुक्रमाचा नाहीय्. तुला जर खात्री आहे, तुझं गणित बरोबरच आहे तर ते पटवून देण्यात कमी का पडावंस? तू मुख्याध्यापिकांना सांग.”

“पपा,तुम्ही भेटाल का त्यांना? एकदम मुख्याध्यापिकांना

भेटायची मला भीती वाटते.”

“नाही मी नाही भेटणार त्यांना.हे तुलाच करायचेय्. हा तुझा प्रश्न तुलाच सोडवायचाय्. आधी पटवून देण्याचा प्रयत्न कर, नाहीतर  भांड त्यांच्याशी तुझ्या हक्काच्या मार्कांसाठी. काही हरकत नाही.”

“पण पपा त्यांनी मला बेशिस्त वर्तनासाठी शिक्षाच केली तर?.”

“बघूया.” पपा एव्हढच म्हणाले.

पण एक पलीता पेटवला होता मनात.

मग मी भीतभीतच, दुसर्‍या दिवशी माझा गणिताचा पेपर घेऊन मुख्याध्यापिकांच्या रुममधे गेले. तशी शाळेत वर्गाच्या कामानिमीत्त मी अनेक वेळा इथे आले होते. डेंगळे बाई चांगल्या स्वभावाच्या होत्या. प्रेमळ, समंजस,  रागवायच्या पण तरी आदर वाटायचा त्यांच्याबद्दल. पण यावेळी कारण वेगळं होतं. म्हणून फार दडपण आलं होतं. पाऊल पुढे मागे होत होतं. “जाऊच दे”  वाटत होतं. पपा काहीही सांगतात.मदत तर करत नाहीत.

त्यांचाही थोडासा रागच आला होता मला पण नेहमीप्रमाणे त्यांच्या डोळ्यातील तीक्ष्ण झाक माझा विश्वास बळावत होती. माघार का? हेही बळावत होतं.

मग मी धैर्य गोळा करुन डेंगळे बाईंना माझी समस्या सांगितली.  “मला वर्गात शिकवलेल्या पद्धतीनेही

गणित सोडवता येत होतं पण ही पद्धत थोडी कमी लांबीची व सोपी वाटली म्हणून मी ती वापरली” वगैरे सर्व मी त्यांना पटवून दिले.मग मुख्याध्यापिका डेंगळे बाईंनी

गणिताच्या बाईंना बोलावून घेतलं. मला जायला सांगितलं.

“मी बघते काय ते” असंही म्हणाल्या.

दुसर्‍या दिवशी गणिताच्या बाईंनी माझे प्रगती पुस्तक मागवले. पेपरातले दोन मार्क्स वाढवले आणि वरचा क्रमांकही दिला.

मला न्याय मिळाला. माझ्या बोलण्याचा उपयोग झाला.

पण माझी मैत्रीण जिचा वरचा नंबर मिळाल्याचा आनंद माझ्यामुळे लोप पावला, ती नाराज झाली. मी थेट मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली म्हणून गणिताच्या बाईंनीही राग धरला. त्यावेळी सर्व वर्गच ,”स्वत:ला काय समजते” या भावनेनी माझ्याशी वागत असल्याचं जाणवलं. काही दिवस हे वातावरण राहिलं.

आजही मनात गुंता आहे. मी बरोबर केलं की चूक?

त्या वेळच्या कारणाची धार आता जरी बोथट झाली असली तरी योग्य ठिकाणी योग्य ते बोलायला कां घाबरायचं?

हे एक सूत्र पुढे अनेक वेळा संरक्षक शस्त्र जरुर बनलं.

अनेक संघर्षाच्यावेळी, अडचणीच्या वेळी त्याने साथ दिली हे मात्र खरं…

– क्रमशः भाग पाचवा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – १ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – १ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

इंदिराबाई

२६ जानेवारी २००१ ला ‘पद्मश्री’ मिळाल्याची बातमी आली आणि सर्वात प्रथम आठवण आली ती आदरणीय इंदिराबाई आणि कुसुमाग्रज यांची ! वास्तविक पाहता माझं आणि इंदिराबाईंचं नातं काय? या नात्यानं मला काय दिलं? गर्भरेशमी कवितेचा ध्यास, गर्भरेशमी कवितेचा नाद… त्यांनी मला जो कवितेचा ‘राजमार्ग’ दाखवला त्या वाटेवर बकुळ, प्राजक्त आणि सोनचाफ्याचा सडाच अंथरला होता. या वाटेवरून जाताना सुगंधच सुगंध होता. मला त्यांच्या कवितांनी अक्षरश: वेढून टाकलं, मोहून टाकलं आणि त्यांच्याच कवितेच्या ओळी आठवल्या….

‘केव्हा कसा येतो वारा,

जातो अंगाला वेढून

अंग उरते न अंग,

जाते अत्तर होऊन…’

असं अंग अत्तर अत्तर होऊन गेल्यावर, आणखीन जीवनात आनंद तो अजून कुठला?

इंदिराबाई आज आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच नाही. त्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, अगदी कुठलीही लहानसहान गोष्ट करताना त्या, सतत सखीसारख्या माझ्या सोबतच असतात. त्यांची कविता गाताना तर त्यांचं ‘चैतन्य’ माझ्या रक्तारक्तातून वाहत असतं.

‘होऊन माझ्यातून निराळी,

मीच घेतसे रूप निराळे.

तुझ्या संगती सदा राहते,

अनुभविते ते सुखचि आगळे

तुझ्यासवे मी विहरत फिरते,

चंचल संध्यारंगामधुनी

तुझ्यासवे अंगावर घेते,

नक्षत्रांचे गुलाबपाणी!’…

या नक्षत्रांच्या गुलाबपाण्यात माझे सूर चिंब भिजून जातात आणि,

“होकर मुझही से निराली,  लेती हूँ मै रूप निराला

तेरे संग सदा रहती हूँ,

अनुभव करती सुख अलबेला”

या संपूर्ण कवितेचा भावानुवाद मला हिंदीत सहज सुचतो नि ‘माझी न मी राहिले’ अशी अवस्था होऊन जाते. 

१३ जुलैला इंदिराबाईंच्या निधनाची वार्ता ऐकली आणि,

‘एक तुझी आठवण,

वीज येते सळाळून

आणि माझी मनवेल,

कोसळते थरारून…’

अशी माझ्या मनाची अवस्था झाली आणि गेल्या ५-६ वर्षांचा काळ डोळ्यांसमोर सरसर उलगडत गेला. ६ वर्षांपूर्वी इंदिराबाईंना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ दिला गेला. त्या समारंभाची सांगता मी त्यांच्याच ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ आणि ‘कधी कुठे न भेटणार’ अशा दोन कवितांनी केली होती. कार्यक्रम संपल्या संपल्या आदरणीय तात्यासाहेबांच्या (कुसुमाग्रजांच्या) आज्ञेवरून ‘रंगबावरा श्रावण’ व ‘घर नाचले नाचले’ (निवड कुसुमाग्रजांची भाग १ व २) अशा इंदिराबाई, कुसुमाग्रज व शंकर रामाणींच्या कवितांच्या कॅसेट्सची हळूहळू तयारी सुरू झाली. त्यानिमित्तानं कवितांचं वाचन सुरू झालं. जर एखाद्या बाईला खानदानी, भरजरी साड्या एकानंतर एक उलगडून दाखवल्या तर ‘ही निवडू का ती निवडू…’ अशी तिची स्थिती होईल, अशीच या कवितांच्या बाबतीत माझीही स्थिती झाली. इंदिराबाईंच्या शब्दात सांगायचं म्हणजे, … 

‘कुणी ठेविले भरून, शब्दाशब्दांचे रांजण

छंद लागला बाळाला, घेतो एकेक त्यातून…’

अशा त्याच्या शब्दासाठी, माझी उघडी ओंजळ

शब्द शब्द साठविते, जसे मेघांना आभाळ… 

असंच झालं.

२३ ऑगस्ट १९९७ रोजी तात्यासाहेबांच्या सूचनेवरून इंदिराबाईंच्याच गावी, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याकरीता बेळगावला प्रकाशन सोहळा करायचे ठरवले. त्या दिवशी दुपारी दूरदर्शन, चॅनलवाली मंडळी इंदिराबाईंची प्रतिक्रिया विचारत होती. इतकं थोर व्यक्तिमत्त्व, पण हातचं न राखता इंदिराबाई अगदी सहजपणे म्हणाल्या, “आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे! माझ्या कविता आज पद्मजाच्या गळ्यातून फोटो काढल्यासारख्या चित्रमय होऊन, जिवंत होऊन रसिकांसमोर येत आहेत. माझी कविता फक्त पद्मजाच गाऊ शकते. तीच फक्त तिचं कवितापण जपू शकते!” प्रत्यक्ष साहित्यसम्राज्ञी, काव्यसम्राज्ञी, मायमराठी माऊलीने दिलेला फार मोठा आशीर्वाद होता तो माझ्यासाठी!

अक्कांच्या प्रेमाखातर अत्यंत उत्साहाने, या सोहळ्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे ‘तरुण भारत’ बेळगांवचे संपादक श्री. किरण ठाकूर, साहित्यिक व न्यायमूर्ती डॉ. नरेंद्र चपळगांवकर, देशदूतचे संपादक श्री. शशिकांत टेंबे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक अशोक जैन, प्रख्यात लेखिका डॉ. श्रीमती अरुणा ढेरे तसेच बेळगांवचेच थोर कविवर्य शंकर रामाणी वगैरे सारी मंडळी अगत्याने आली होती. तुफानी पावसातही सभागृह श्रोत्यांनी ओसंडले होते. या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक नाशिकच्या भालचंद्र दातार आणि परिवाराने नेटाने झटून हा सोहळा एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही नेत्रसुखद आणि संपन्न करायचा घाट घातला होता. प्रत्येकाला वाटलेल्या सोनचाफ्यांच्या फुलांचा ‘मंद सोनेरी सुगंध’ हॉलभर दरवळत होता. सोनचाफी रंगाची साडी परिधान केलेल्या इंदिराबाईंचे, फुलांनी सजवलेल्या एका कमानीखालून स्टेजवर आगमन होत असताना त्यांचीच कविता  

‘दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले

आज येणार अंगणी, सोनचाफ्याची पाऊले..’

असं मी म्हणत असताना, इंदिराबाईंवर पुष्पवृष्टी झाली आणि त्यावेळी छप्पर फाडून टाकणाऱ्या टाळ्यांच्या  कडकडाटात त्यांचं स्वागत झालं. कविवर्य ग्रेस यांनी या प्रसंगाचं वर्णन म्हणजे, “जगात कुठल्याही कवीचा याहून मोठा आणि योग्य सत्कार तो काय असू शकतो? मीरेची एकट, एकाकी विरह वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कुणी तोलून धरली असेल तर ती या इंदिराबाईंनीच! त्या कविता तुम्ही गायलात पद्मजाबाई, त्या ऐकताना खरंच सांगू का तुम्हाला! मीराच ज्यावेळी आपल्या सखीच्या कानात गुणगुणत सांगते आपल्या वेदनेचे स्वरूप…

दुखियारी प्रेमरी, दुखडा रोमूल

हिलमिल बात बनावत मोसो

हिवडवामे (हृदयात) लगता है सूल… इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….!”

इंदिराबाईंच्या ‘रंग बावरा श्रावण’ कॅसेट प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबईहून निघताना इंदिराबाईंच्या सख्ख्या मैत्रिणीने, आदरणीय दुर्गाबाई भागवतांनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या. 

“लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा, हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले, तरी मनाने त्यात आहे बरं का!” – तुझी दुर्गाबाई.

– क्रमशः भाग पहिला 

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कवितांचा पाऊस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “कवितांचा पाऊस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गॅलरीत बसले होते पावसाची एक सर आली….. ती  ओसरली तोच दुसरी आली….

आणि मला संदीप खरेची कविता आठवली …. 

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर

 निळे निळे गार गार पावसाचे घरदार

… त्यांच्या इतरही कविता आठवायला लागल्या.

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा ‘ आयुष्यावर बोलू काही ‘ हा कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. त्यातल्या सगळ्याच  गाण्यांनी तेव्हा वेड लावलं होतं…. असंख्य वेळा ऐकून ती गाणी पाठ झाली होती…त्या कवितांच्या गाण्यांनी तेव्हा  मनावर गारुड केलं होतं….. सहज सोपे शब्द…. चाल …आवाज…. वास्तव सांगणाऱ्या पण गर्भित अर्थाच्या कविता… दोघांचे ट्युनिंग सगळं काही जमून आलं होतं… प्रेक्षागृह गच्च भरलेलं.. त्यांनी सुरुवात केली की सगळ्यांची त्यांना साथ….. एक सुरात सगळे म्हणायला लागत होते…आनंद मजा गम्मत  चालली होती….वातावरण भारलेलं…

आणि अचानक त्यांनी सुरू केलं …… 

नसतेस घरी तू जेव्हा..

 जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे विरती धागे

 संसार फाटका होतो….

.. .. आणि एकदम सगळे स्तब्ध झाले .. तन्मयतेनी शांतपणे ऐकायला लागले.. ती कविता एका वेगळ्याच उंचीवर गेली…..अशीही दाद…

तव मिठीत विरघळणाऱ्या

मज स्मरती लाघव वेळा…..

.. .. .. काय शब्द आहेत ना…..

आज एका  कवितेचं निमित्त झालं आणि अनेक कविता आठवायला लागल्या ….

मला आवडणाऱ्या कवितांची माझी डायरी आहे. ती काढली आणि कितीतरी वेळ त्यातच रमून गेले….

मनाला भिडणाऱ्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कविता….

गालातल्या गालात हसवणाऱ्या…

काही फसव्या…

वरवर साध्या वाटणाऱ्या पण गहन खोल अर्थ असणाऱ्या….

तर काही मनाला अलवार स्पर्शून जाणाऱ्या…

मग .. .. डायरीत न लिहिलेल्या कविताही आठवायला लागल्या…

कवी खरंच मनाचे जादूगारच असतात… भावना ओळखून असं लिहितात की वाटतं यांना कसं आपलं मन कळलं…

म्हणूनच कवी सांगत असावेत…. 

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणूनी

वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही….

अनेक कविता  वाचत गेले आणि  जीव  वेडावूनच गेला… कोणाकोणाची नावं घेऊ?

या साऱ्या दिग्गजांना माझा मनोमन शिरसाष्टांग नमस्कार….

तुम्ही आमच आयुष्य  फार समृद्ध केलतं…..

झाले हवेचेच दही…

या कवितेत बा. भ.बोरकर म्हणतात .. .. 

 

लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय होतेय 

भिजणाऱ्या तृप्तीवर  दाटे संतोषाची  साय…

तसंच अनेक कवींनी आपल्याला त्यांच्या  कवितांनी  भिजवून तृप्त केलेल आहे….

कवींच्या आठवणींनी  मन भरून आले आहे…

पुलं आणि सुनीताबाई यांचा मुंबईला बघितलेला कवितांचा कार्यक्रम आज आठवतो आहे…..

त्यांच्या शब्दातून कविता साक्षात समोर उभी राहत असे…. तो एक दृकश्राव्य कार्यक्रम होता..

किती आनंद आहे त्या अनमोल क्षणांचा ….

…… कुठल्या कुठल्या आठवणी जाग्या व्हायला लागल्या….

संदीप खरे म्हणतो तसं

आताशा असे हे मला काय होते

कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते

बरा बोलता बोलता स्तब्ध होतो

तशी शांतता शून्य शब्दात येते…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “संसार….” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “संसार” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

एक डोळा बारीक करून

सुईत दोरा ओवतेस

आणि,

लेकराच्या शर्टाला बटण

लावतेस तेव्हा,

नेमक्या जागी सुई खुपसताना 

किती किती हळहळतेस

 

बटन लावून झालं की,

किंचितशी मंद हसतेस

आणि,

निजलेल्या लेकराचा हळूच मुका घेतेस

खरं सांगू….?

तू बायको नाहीस आईच वाटतेस माझी…

 

अंगणात कावळा दंगा घालतो 

तेव्हा,

तुझ्या डोळ्यात 

तुझं माहेर जसंच्या तसं दिसू लागतं

पाणावलेल्या डोळ्यांनी

टाच उंचावून दूरवर पाहतेस

 

मुसमुसलेल्या हुंदक्यांनी

सांज होऊन जाते

तोंडावर पाणी मारून

पुन्हा स्वयंपाकघरात जाते

माहेरच्या आठवणीतच

कुकरच्या शिट्ट्या वाजत राहतात

आणि उचक्यांसोबत हुंदके

पुन्हा डोळ्यातून वाहतात

 

ये विसर ना आज सगळं

लेकरं झोपलीयत

मला मांडीवर घे

ये गा ना एखादी अंगाई 

फक्त माझ्यासाठी

आणि आज तरी पगाराचा

हिशोब मांडू नकोस

आकड्याची वजाबाकी करू नकोस

शांत झोपव मला

खूप दिवस झाले गं

या जगाने मला शांत झोपू दिलं नाही

 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मेतकूट भात –’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘मेतकूट भात ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

…आयुष्याच  गणित सोप्प करणारी माणसं धकाधकीच्या जीवनात आपल्याला जीवनाचं ‘सार ‘ सांगून जातात. 

लग्नानंतर ग्रॅज्युएशन सर्टिफिकीट हातात पडलं आणि आमचं विमान हवेत तरंगायला लागल. त्यातून हरबऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या  मैत्रिणींची  चढाओढ चालू होती , ” ए बाकी कमाल आहे हं तुझी! कसं गं जमलं तुला.? लग्नानंतर सगळा व्याप सांभाळून कसा केलास गं एवढा अभ्यास ? हरबऱ्याच्या झाडाचा डेरा वाढतच होता. आणि मी वर वर चढतच होते.अहो हो ना! मी म्हणजे खूप शहाणी,संसारातल्या तत्त्वज्ञानात तर एकदम तरबेज.अशी ‘ ग ‘ ची बाधा झाली होती मला. ‘आशाच’ कामवालीच साधसुध  समीकरण ऐकून चक्क खालीच पडले  की हॊ मी!.माझं गर्वाच विमान  दणकन जमिनीवरच आपटल. नुसत्या पदव्या असून काय उपयोग?   व्यवहारी  जगातल्या तत्वज्ञानाच् पारडचं वरचढ ठरत . काय झालं माहिती आहे का  साधी सरळ, भाबडी, अशिक्षित अशी माणसं माझ्या आयुष्यात आली. आनंदी क्षणाचं, सकारात्मक विचा्रांच सोनं करणारी माणस मला भेटली. पांडित्यालाही लाजवेल असं संसाराच साध, सोप्प, गणित त्यांनी माझ्यापुढे मांडलं. आणि ते ऐकून मी अवाक झाले.

 निक्कम्या मारकुट्या नवऱ्याला पोसत,आपल्या अपंग मुलाला सांभाळून कष्टाशी हात मिळवणी करून ,हाता तोंडाशी गांठ  घालणारी खम्बिर ‘आशा ‘ मला भेटली. आशा  म्हणजे आमची कामवाली  हॊ!. माझ्याकडे ती रोज कामाला यायची.एकदा मुलांवरून विषय निघाला. सहज तिच्या बोलण्यात आलं.  “माझ्या मुलाला वरण भात , मेतकूट भात  खूप  खूप आवडतो. पण रोज कसं परवडणार ?  तुम्हीच सांगा  वहिनीबाई  काही वेळेला इतका हटून  बसतो कीं,मलाच  लई वाईट वाटतंया   साधा  भात  तो काय ! हा साधा हट्ट पण मी पुरवू शकत नव्हते त्याचा.आणि मग हा त्याचा  हट्ट पुरवन्यासाठी मी इठुरायाच्या मंदिरात  गेले.” नवल वाटून मी विचारलं. ” काय गं ? विठोबाला साकडं घातलस की काय? परिस्थिती बदलावी म्हणून? “नाही हॊ वहिनीबाय ! त्याला किती संकटात टाकू ?  अंधार झाल्यावर तोच प्रकाश दाखवणार आहे ना मला. दुकानातले महागडे तांदूळ परवडणार नाहीत म्हणून मी गेले पुजारी बाबां कडे त्यांना विनवून म्हणाले,”पुजारी बाबा. देवा पुढ लोकांनी टाकलेले तांदूळ प्रसाद म्हणून द्याल का मला “? ते म्हणाले, ”अगं ने की असेच  घेऊन जा.जाडे भरडे , हलके, भारी, बरेच तांदुळ पडतात ह्या टोपलीत . आमची पोरं नाकं  मुरडतात,अशा सरमिसळ तांदुळाचा भात खायला. तू बेलाशक घेऊन जा ” आशा पुढे सांगत होती “पण असं फुकटचं देवापुढंच  घेनं बरं वाटतं का ? मग मी इचार केला. आपण देवा पुढे पैसे नाही टाकू शकत मग अशा रूपाने पैसे देऊन तांदूळ घेऊन,पुण्य मिळवायला काय हरकत आहे “? मी पुजारी बाबांना विनंती केली, “पुजारी बाबा थोडं तरी पैसे घ्या आणि थोडं तरी पुण्य माझ्या पदरात टाका .नाही म्हणू नका.”अशा प्रकारे  देवा पुढचे प्रसादाचे तांदूळ आणून,भात  कधीतरी व्हायचा तिच्याकडे.   रोज जवळजवळ नाहीच  म्हंटल तरी चालेल.मला कसतरीच झाल. मोठ्या मुदीच्या वरण भातावर साजूक तुपाची धार रोज लागायची माझ्या मुलांना . पोट भरलं तर माजोऱ्या सारखी पानं उष्टावून पळायची मुलं खेळायला . आणि तिच्या मुलाला साधा मेतकूट भात पण मिळत नव्हता.फारच  अपूर्वाई वाटायची त्याला भाताची .. नवरात्राचे दिवस होते,. मी संकल्प केला.आणि  एका मंगळवारी  तिची घसघशित तांदुळाने ओटी भरली. ताज्या,घरगुती मेतकूटाचा डबा तिच्या हातात ठेवला. महिनाभर पुरतील असे आंबे मोहोर तांदूळ,मी तिच्या जीर्ण पदराच्या ओटीत घातले. ती रास बघून तिचे डोळे भरून आले. दोन मुठी  तांदूळ परत तिने माझ्या थाळीत टाकले.तिला थांबवत मी म्हणाले, “अगं अगं ! हे काय? परत काय देतेस ?” ठसठशित कुंकवाची ती सवाष्ण उत्तरली “नाही ताई ही प्रेमाची, बरकतीची परतफेड आहे. तुमचं प्रेमाचं वाण  नाकारून मी उतले नाही की मातले नाही.  अहो दुसऱ्याला दानधर्म देताना तुमची थाळी अशी रिकामी नसते ठेवायची. तुम्ही मला मुठी मुठी ने  धान्य दिलेत. तुमची थाळी रीती नको ठेवायला,म्हणून मी चिमटीभर परत केलं.  अन्नपूर्णेच्या मान असतो हा.डब्यात टाका हे तुमच्या.कायम बरकत  राहील,माझ्या वहिनी बायकडे.तिचं ते तत्त्वज्ञान ऐकून माझ्यातली वहिनी बाई अवाक झाली.आणि कौतुकाने तिला न्याहाळू लागली. एका हाताने घेतांना दुसऱ्या हाताने द्यावे. हे आयुष्याचे तत्वज्ञान त्या अशिक्षित बाईकडून मला समजलं. साधी असणारी ही माणसं  काहीतरी वेगळच ज्ञान आपल्याला सहज  जाता जाता देऊन जातात. त्याकरता त्यांना कुठल्याही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायची जरुरी नसते. आणि असे धडे घेतच संसाराच्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट व्हायचं असतं. तेच खरं ग्रॅज्युएशन असं म्हणायला काय हरकत आहे ? तुम्हालाही पटतय ना हे!मनांत असलेली भक्ति,आणि  अगदी गात्रा गात्रातून भरभरून वहाणारी शक्ती घेऊन  ती, सावलीला विसावली. मिटल्या डोळयांपुढे सावळा विठ्ठल नाचत होता.” 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाप आहे म्हणून…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “बाप आहे म्हणून” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो. माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते. तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते. एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता. मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.

आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय..”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस..? “ मी म्हणलं,पुण्यात आहे अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे.अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा का पोटाला..?  मी होय म्हणलं.. अण्णांनी फोन ठेवला..आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला..मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाले “ हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये. तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडणं ..मी बर अण्णा म्हणलं…परत फोन ठेवला…मीटिंग सुरू झाली..आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला..मी शांतपणे पुन्हा फोन घेतला..पलीकडून अण्णा म्हणाले, “आर टिव्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच…” मी होय आण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला..

तर लगेच परत फोन आला..अण्णा परत म्हणले “ हम्म आलाय आलाय बॅलन्स चालू झालं..” मी बर अण्णा म्हणून फोन ठेवला..सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला…मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं “ आरं ती भारताची मॅच कवा हाय..साऊथ आफ्रिका सोबत हाय नव्हं आता..त्यावेळी वल्डकप सुरू होता..अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे.मी बाजूच्या एकाला विचारलं, “सर कधी आहे ओ साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच..??? त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून….मी तसंच अण्णांना सांगितलं…मग अण्णांनी परत फोन कट केला…

चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय आण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहित होती.आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू…  माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती..पण मी काय लै लोड घेतला न्हाय..मीटिंग संपली..

मीटिंग संपल्यावर नाष्टा आला..नाष्टा करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिसकॉल पाहत होते.आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते.माझ्या ही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबर वरून आलेले मिस कॉल दिसत होते…मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाष्टा पोटात ढकलू पाहत होतो..

त्यातला एकजण मला म्हणाला, दादा एक बोलू का? रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लै बोलला तुम्ही..आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्वाचं ही नव्हतं.. तुम्ही मिटिंग संपल्यावर ही बोलू शकला असता त्यांना.? त्याच्या सुरात सगळ्यांनी सुर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले.

त्या सगळ्यांचं बोलण झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणलं…

आज बापाचा आपल्याला दिवसातून हजारवेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दूसरी कुठलीच नाही साहेब …आणि साहेब मी जर फोन उचलला नसता ना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता..साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबर वरून कॉल येणार नाही..हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही.. आणि साहेब मिटिंग,कार्यक्रम वैगेरे होतच राहतील…माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला…मी पटकन उचलला आणि स्पिकरवर टाकला…अण्णा जोरात बोलत म्हणाले,

“आर बोंबील घेताना खारा मासाबी जर चांगला भेटला तर किलोभर घेऊन ये..तोंडाला चव येईना लका…मी शांतपणे होय म्हणाल्यावर फोन ठेवला…

त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले..सगळेजण शांत झाले…डोळे पुसत ते म्हणाले, चंदनशिवे खरं आहे तुमचं…मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली.पण आता वेळ निघून गेली ओ.. आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा. कारण वडीलच गेले ओ निघून पार पार दूर निघून गेले. रेंजच्या बाहेर गेले.सगळ्याचे डोळे पाणावले. आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंज मध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरवात केली. का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले. मात्र परांजपे सरांचा हंबरडा आतल्या आत हंबरत राहिला.

आम्ही बाहेर पडलो.सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले. आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हंजे रुपेशला फोन केला..पलीकडून रूप्या शिवी देतच म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला??. मी पण तसाच शब्द फिरवत म्हणलं, नालायका कोथरूडला ये ना बोंबील, सुकट आणि खारा मासा घेऊन.. आण्णाने घेऊन यायला लावलं आहे. तसा रुप्या हसत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मघाशीच.. येतो घेऊन थांब तिथंच…तासाभराने रुप्या सगळं घेऊन आला.मी मात्र त्या बोंबलाच्या दरवळनाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो..

मित्रहो, बापाचा फोन येतोय ना.. येतोय ना..तर दुनिया गेली उडत..बापाचा फोन उचलायचा आधी..तुमची मिटिंग, तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाहीय. दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे.पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर. तिथून बाप फोन करू शकणार नाहीय. त्यावेळी कितीही तडफडून वाट बघितली तरी स्क्रिनवर हा नंबर येणार नाहीय. म्हणून दोस्ता दुनियेला जरा वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं. बस्स इतकंच सांगायचं होतं.वाचून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडलाय का? चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय ना तो तुमच्या फोनची…

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares