मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १५  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 गौरी गणपती २

पप्पांचा गणपती आणि आईची गौर  अशी या पूज्य दैवतांची आमच्या घरात अगदी सहजपणे विभागणीच झाली होती म्हणा ना आणि ही दोन्ही दैवते अत्यंत मनोभावे आणि उत्साहाने आम्हा सर्वांकडून पुजली  जायची. त्यांची आराधना केली जायची.

पप्पांचे मावस भाऊ आणि आमचे प्रभाकर काका  दरवर्षी आईसाठी गौरीचं, साधारण चार बाय सहा  कागदावरचं एक सुंदर चित्र पाठवायचे आणि मग आगामी गौरीच्या सोहळ्याचा उत्साह आईबरोबर आम्हा सर्वांच्या  अंगात संचारायचा.

माझी आई मुळातच कलाकार होती. तिला उपजतच एक कलादृष्टी, सौंदर्यदृष्टी प्राप्त होती. ती त्या कागदावर रेखाटलेल्या देखण्या गौरीच्या चित्राला अधिकच सुंदर करायची. गौरीच्या चित्रात  असलेल्या काही रिकाम्या जागा ती चमचमणाऱ्या लहान मोठ्या टिकल्या लावून भरायची. चित्रातल्या गौरीच्या कानावर खऱ्या मोत्यांच्या कुड्या धाग्याने टाके घालून लावायची. चित्रातल्या गौरीच्या गळ्यात सुरेख

गुंफलेली, सोन्याचे मणी असलेली  काळी पोत त्याच पद्धतीने लावायची. शिवाय नथ, बांगड्या, बाजूबंद अशा अनेक सौभाग्य अलंकाराची ती सोनेरी, चंदेरी, रंगीत मणी वापरून योजना करायची. या कलाकुसरीच्या कामात मी आणि ताई आईला मदत करायचो. आईच्या मार्गदर्शनाखाली या सजावटीच्या कलेचा सहजच अभ्यास व्हायचा. मूळ चित्रातली ही  कमरेपर्यंतची गौर आईने कल्पकतेने केलेल्या सजावटीमुळे अधिकच सुंदर, प्रसन्न आणि तेजोमय वाटायची. त्या कागदाच्या मुखवट्याला जणू काही आपोआपच दैवत्व प्राप्त व्हायचं. गौरीच्या सोहळ्यातला हा मुखवटा सजावटीचा  पहिला भाग फारच मनोरंजक आनंददायी आणि उत्साहवर्धक असायचा. एक प्रकारची ती ऍक्टिव्हिटी होती. त्यातून सुंदरतेला अधिक सुंदर आणि निर्जिवतेला सजीव, चैतन्यमय कसे करायचे याचा एक पाठच असायचा तो! 

पप्पांचा तांदुळाचा गणपती आणि आईच्या गौरी मुखवटा सजावटीतून नकळतच एक कलात्मक दृष्टी, सौंदर्यभान आम्हाला मिळत गेलं.

घरोघरी होणारे गौरीचे आगमन हे तसं पाहिलं तर रूपकात्मक असतं. तीन दिवसांचा हा सोहळा… घर कसं उजळवून टाकायचा. घरात एक चैतन्य जाणवायचं.

आजीकडून गौरीची कथा ऐकायलाही  मजा यायची. ती अगदी भावभक्तीने कथा उलगडायची. गौरी म्हणजे शिवशक्ती आणि गणेशाच्या आईचं रूप!  असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि सौभाग्य रक्षणासाठी त्यांनी गौरी कडे प्रार्थना केली. गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांचे सौभाग्य रक्षण केले. पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. ही कथा ऐकताना मला गौरीपूजन ही एक महान संकल्पना वाटायची. मी गौरीला प्रातिनिधिक स्वरूपात पहायची. माझ्या दृष्टीने अबलांसाठी गौरी म्हणजे एक प्रतीकात्मक सक्षम शौर्याची संघटन शक्ती वाटायची.

गावोगावच्या, घराघरातल्या  पद्धती वेगळ्या असतात. काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी, कुठे पाणवठ्यावर जाऊन पाच —सात — अकरा खडे आणून खड्यांच्या गौरी पूजतात पण आमच्याकडे तेरड्याची गौर पुजली जायची. पद्धती विविध असल्या तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमी फलित करण्याचाच असतो.

सकाळीच बाजारात जाऊन तेरड्याच्या लांब दांड्यांची एक मोळीच विकत आणायची, लाल, जांभळी, गुलाबी पाकळ्यांची छोटी फुले असलेली ती तेरड्याची मोळी फारच सुंदर दिसायची. तसं पाहिलं तर रानोमाळ मुक्तपणे बहरणारा हा जंगली तेरडा. ना लाड ना कौतुक पण या दिवशी मात्र त्याची भलतीच ऐट! आपल्या संस्कृतीचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. पत्री, रानफुलांना महत्त्व देणारी, निसर्गाशी जुळून राहणारी संस्कृती आपली!

तेरड्यासोबत  केळीची पाने, विड्याची पाने, सुपाऱ्या, फुलं, फुलांमध्ये प्रामुख्याने तिळाच्या पिवळ्या फुलांचा समावेश असायचा आणि असं बरंच सामान यादीप्रमाणे घरी घेऊन यायचं. बाजारात जाऊन या साऱ्या वस्तू आणण्याची सुद्धा गंमत असायची. माणसांनी आणि विक्रेत्यांनी समस्त ठाण्यातला बाजार फुललेला असायचा. रंगीबेरंगी फुले, गजरे, हार, तोरणं यांची लयलूट असायची. वातावरणात एक सुगंध, प्रसन्नता आणि चैतन्य जाणवायचं. मधूनच एखादी अवखळ पावसाची सरही यायची. खरेदी करता करता  जांभळी नाक्यावरचा गणपती, तळ्याजवळचं कोपीनेश्वर मंदिर, वाटेवरच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन घेतलेलं  देवतांचं दर्शन खूप सुखदायी, ऊर्जादायी वाटायचं. जांभळी नाक्यावरच्या गणपतीला या दिवसात विविध प्रकारच्या फुलांच्या, फळांच्या, खाद्यपदार्थांच्या सुंदर  वाड्या भरल्या जात, त्याही नयनरम्य असत. देवळातला तो घंटानाद  आजही माझ्या कर्णेंद्रियांना जाणवत असतो.

अशा रीतिने भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध पक्षात, अनुराधा नक्षत्रावर आमच्या घरी या गौराईचं आगमन व्हायचं आणि तिच्या स्वागतासाठी आमचं कुटुंब अगदी सज्ज असायचं. गौराई म्हणजे खरोखरच लाडाची माहेरवाशीण. आम्हा बहिणींपैकीच कुणीतरी त्या रूपकात्मक तेरड्याच्या लांब दांडीच्या मोळीला गौर मानून उंबरठ्यावर घेऊन उभी राहायची मग आई तिच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून, तिचे दूध पाण्याने पाद्यपूजन करायची. तिला उंबरठ्यातून आत घ्यायची. गौर घाटावरून येते ही एक समजूत खूपच गमतीदार वाटायची. गौराईचा गृहप्रवेश होत असताना आई विचारायची,

“गौरबाय गौरबाय कुठून आलीस?” बहीण म्हणायची’”घाटावरून, ”

“काय आणलंस?”

“धनधान्य, सुख, संपत्ती, आरोग्य, शांती, समृद्धी. . ”

हा गोड संवाद साधत या लाडक्या गौराईला हळद-कुंकवाच्या पावलावरून घरभर फिरवले जायचे आणि मग तिच्यासाठी खास सजवलेल्या स्थानी तिला आसनस्थ केले जायचे.

घरातली सर्व कामं आवरल्यानंतर गौरीला  सजवायचं. तेरड्यांच्या रोपावर सजवलेला तो गौरीचा मुखवटा आरुढ करायचा. आईची मोतीया कलरची ठेवणीतली पैठणी नेसवायची  पुन्हा अलंकाराने तिला सुशोभित करायचे. कमरपट्टा बांधायचा. तेरड्याच्या रोपांना असं सजवल्यानंतर खरोखरच तिथे एक लावण्य, सौंदर्य आणि तेज घेऊन एक दिव्य असं स्त्रीरूपच अवतारायचं. त्या नुसत्या काल्पनिक अस्तित्वाने घरभर आनंद, चैतन्य आणि उत्साह पसरायचा. खरोखरच आपल्या घरी कोणीतरी त्रिभुवनातलं सौख्य घेऊन आले आहे असंच वाटायचं.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर तिचं पूजन केलं जायचं. आज गौरी जेवणार  म्हणून सगळं घर कामाला लागायचं. खरं म्हणजे पप्पा एकुलते असल्यामुळे आमचं कुटुंब फारसं विस्तारित नव्हतं. आम्हाला मावशी पण एकच होती, मामा नव्हताच. त्यामुळे आई पप्पांच्या दोन्ही बाजूंकडून असणारी नाती फारशी नव्हतीच पण जी होती ती मात्र फार जिव्हाळ्याची होती. पप्पांची मावशी— गुलाब मावशी आणि तिचा चार मुलांचा परिवार म्हणजे आमचा एक अखंड जोडलेला परिवारच होता. आमच्या घरी किंवा त्यांच्या घरी असलेल्या सगळ्या सणसोहळ्यात सगळ्यांचा उत्साहपूर्ण, आपलेपणाचा सहभाग असायचा. पप्पांची मावस बहीण म्हणजे आमची कुमुदआत्या तर आमच्या कुटुंबाचा मोठा भावनिक आधार होती. आईचं आणि तिचं नातं नणंद भावजयीपेक्षा बहिणी बहिणीचं होतं. अशा सणांच्या निमित्ताने कुमुदआत्याचा आमच्या घरातला वावर खूप हवाहवासा असायचा. मार्गदर्शकही असायचा. घरात एक काल्पनिक गौराईच्या रूपातली माहेरवाशीण  आणि कुमुद आत्याच्या रूपातली वास्तविक माहेरवाशीण  असा एक सुंदर भावनेचा धागा  या गौरी सोहळ्याच्या निमित्ताने गुंफलेला असायचा.

केळीच्या पानावर सोळा भाज्या एकत्र करून केलेली भाजी, भरली राजेळी  केळी, अळूवडी, पुरणपोळी, चवळीची उसळ, काकडीची कढी, चटण्या, कोशिंबीर, पापड, मिरगुंडं, वरण-भात त्यावर साजूक तूप असा भरगच्च नैवेद्य गौरीपुढे सुबक रीतीने मांडला जायचा. जय देवी जय गौरी माते अशी  मनोभावे आरती केली जायची. आरतीला शेजारपाजारच्या, पलीकडच्या गल्लीतल्या, सर्व जाती-धर्माच्या बायका आमच्याकडे जमत. त्याही सुपांमधून गौरीसाठी खणा नारळाची ओटी आणत. फराळ आणत. कोणी झिम्मा फुगड्याही खेळत.

हिरव्या पानात हिरव्या रानात गौराई नांदू दे अशी लडिवाळ गाणी घरात घुमत. आमचं घर त्यावेळी एक कल्चरल सेंटर झाल्यासारखं वाटायचं. मंदिर व्हायचं, आनंदघर बनायचं.

या सगळ्या वातावरणात माझ्या मनावर कोरलं आहे ते माझ्या आईचं त्या दिवशीच रूप!  सुवर्णालंकारांनी भरलेले तिचे हात, गळा, कपाळावरचं ठसठशीत कुंकू, कळ्याभोर केसांचा अलगद बांधलेला अंबाडा, त्यावर माळलेला बटशेवंतीचा गजरा, नाकात ठसठशीत मोत्यांची नथ, दंडावर  पाचूचा खडा वसवलेला घसघशीत बाजूबंद आणि तिनं नेसलेली अंजिरी रंगाची नऊवारी पैठणी! आणि या सर्वांवर कडी करणारं तिच्या मुद्रेवरचं सात्विक मायेचं  तेज! साक्षात गौराईनेच  जणू काही तिच्यात ओतलेलं!

संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही असायचा. ठाण्यातल्या प्रतिष्ठित बायकांना आमंत्रण असायचं पण आजूबाजूच्या सर्व कामकरी महिलांसाठी हळदी कुंकवाचं आमंत्रण आवर्जून दिलेलं असायचं. पप्पा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी प्रिन्सेस स्ट्रीटवरच्या पारसी डेअरी मधून खास बनवलेले केशरी पेढे आणायचे. एकंदरच गौरीच्या निमित्ताने होणारा हा हळदीकुंकवाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न व्हायचा. त्यावेळच्या समाज रीतीनुसार हळदीकुंकू म्हणजे सुवासिनींचं, या  मान्यतेला आणि समजुतीला आमच्या घरच्या या कार्यक्रमात पूर्णपणे  फाटा दिलेला असायचा. सर्व स्त्रियांना आमच्याकडे सन्मानाने पूजलं जायचं. आज जेव्हा मी याचा विचार करते, तेव्हा मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी किती सुंदर  पुरोगामी विचारांची बीजं आमच्या मनात नकळत रुजवली होती.

तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असायचं. भरगच्च माहेरपण भोगून ती आता सर्वांचा निरोप घेणार असते. तिच्यासाठी खास शेवयांची खीर करायची, तिची हळद-कुंकू, फुले— फळे, धान्य, बेलफळ यांनी ओटी भरायची. मनोभावे आरती करून तिला निरोप द्यायचा. जांभळी नाक्यावरच्या तलावात तिचे विसर्जन करताना मनाला का कोण जाणे एक उदासीनता जाणवायचीच पण जो येतो तो एक दिवस जातो किंवा तो जाणारच असतो हे नियतीचे तत्त्व या विसर्जन प्रसंगी प्रकर्षाने जाणवायचं. गौरी गणपती विसर्जनासाठी तलावाकाठी जमलेल्या जमावात प्रत्येकाच्या मनात विविधरंगी भाव असतील. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या “ या हाकेतल्या भक्तीभावाने मन मोहरायचं.

आजही या सोहळ्याचं याच प्रकाराने, याच क्रमाने, याच भावनेने आणि श्रद्धेने साजरीकरण होतच असतं पण आता जेव्हा जाणत्या मनात तेव्हाच्या आठवणींनी प्रश्न उभे राहतात की या सगळ्या मागचा नक्की अर्थ काय?  एकदा आपण स्वतःवर बुद्धीवादी विज्ञानवादी अशी मोहर उमटवल्यानंतर या कृतिकारणांना नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं? उत्तर अवघड  असलं तरी एक निश्चितपणे म्हणावसं वाटतं की या साऱ्या, जगण्याला आकार देणाऱ्या एक प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज आहेत. त्यात एक कृतीशीलता आहे ज्यातून जीवनाचे सौंदर्य, माधुर्य कलात्मकता टिकवताना एक समाज भानही जपलं जातं. श्रद्धा, भक्ती, विश्वास या पलीकडे जाऊन  या सोहळ्यांकडे तटस्थपणे पाहिलं तर मानवी जीवनाच्या संस्कार शाळेतले हे पुन्हा पुन्हा गिरवावेत, नव्याने अथवा पारंपरिक पद्धतीने पण हे एक सोपे सकारात्मक ऊर्जा देणारे महान धडेच आहेत.

— क्रमश:भाग १५ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाचन प्रेरणा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ वाचन प्रेरणा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

एखाद्या घराला दारं-खिडक्या असणं जितकं महत्त्वाचं असतं तितकं माझ्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. मानवी बुद्धीच्या दार आणि खिडक्या जितक्या खुल्या असतील तितकं माणसाचं आकाश मोठं होतं. वाचनाचं हे दार उघडलं ना की एका वेगळ्याच विश्वात माझा प्रवेश होतो. तिथं मी आणि पुस्तक या दोघांचचं विश्व असतं. गंमत म्हणजे लेखक जसा लिहिताना त्याच्या लेखनाचा सम्राट असतो तसंच मीही वाचताना वैचारिक विश्वाचं एक सम्राटपण अनुभवत असते. लेखकाचं बोट सोडून हळूहळू कधी मी त्या कथेतील पात्राचं नायकत्व स्वीकारते ते मला कळतही नाही. आणि मग जगण्याचा पैल विस्तारायला लागतो. मी कधीही न गेलेल्या किंवा न जाऊ शकलेल्या प्रदेशात फिरून येते. बरं हे फिरण्याचे अनुभवही किती तऱ्हेतऱ्हेचे असतात. त्यामुळे काही गोष्टी आपोआप घडतात. आवडलेल्या पात्राबरोबर एक नातं जुळतं. आणि ते इतकं हृद्य असतं की माझ्या जगण्यातले प्रश्न भले अनुत्त्तरीत राहिले असतील पण त्या पात्राच्या जीवनातले प्रश्न मात्र माझ्याही नकळत मी सोडवण्याचा प्रयत्न करते.

स्वयंपाक करताना, काम करताना, इतकंच काय बाहेर जाताना देखील हे आवडीचं पात्रं मनात घर करून असतं. त्याचा विरह, त्याचा आनंद, त्याला मिळणारं यश, प्रसिद्धी, त्याची स्वप्नं, त्याच्या इच्छा, त्याच दुरावलेलं प्रेम, नाती आणि क्वचित सारं काही मिळून मोक्ष पदाला पोहोचलेला तो हे सगळं सगळं मी तन्मयतेनं अनुभवते. आणि त्यातल्या प्रसंगात, संवादात माझे अंतरीचे काही मिसळते. मग माझ्या वास्तव जीवनातल्या अनेक पोकळ्या त्या त्या समरसतेनं भरून निघतात. जगण्यातल्या अनेक शक्यता मला सापडतात. कुठतरी तुकड्या तुकड्यात विखुरलेले माझे क्षण, अपुऱ्या इच्छा, नव्यानं गवसू लागलेला जीवनाचा अर्थ मला दिसू लागतो. अनुभवाच्या संचितात भर पडते. आणि जाणवतं की सारं काही मिळणं म्हणजे जगणं किंवा परिपूर्णता नव्हे. क्वचित काही सोडून देणं, निसटून जाणं हे देखील आयुष्याला अर्थपूर्णता देणारं आहे. जीवनाची परिपूर्णता हा एक भास वाटतो. आयुष्याचं रोज नव्याने स्वागत करायला मी तयार होते.

शेवटी मुक्तता, आनंद म्हणजे काय. . घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं. . . कशाचंही ओझं न बाळगणं. . . हे सारं सारं वाचन मला देऊ करतं. . .

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृत्रिमतेची स्टिरॉइड्स घेताय ? ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ कृत्रिमतेची स्टिरॉइड्स घेताय ? ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“सर, तुमच्याकडे जरा काम होतं. घरी कधी भेटता येईल?” माझ्या चांगल्या परिचयाचे एक इंटिरियर डिझायनर आहेत. आमच्या घरची पुस्तकांची कपाटं त्यांनीच डिझाईन केली आहेत. त्यांचा फोन आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी भेटलो. ते म्हणाले, “सर, मला तुमची मदत पाहिजे. माझे एक क्लायंट आहेत. त्यांना तुमची पर्सनल लायब्ररी दाखवायची आहे. तुम्हाला चालेल का?” 

“पुस्तकं उसनी मागणार नसतील तर चालेल. ” मी सांगून टाकलं.

पुस्तकांच्या बाबतीतला मुखदुर्बळपणा किंवा भिडस्तपणा मी आता आवरता घेतला आहे. “जरा वाचायला नेतो आणि परत आणून देतो” असं शपथेवर सांगणारे लोकसुध्दा नंतर पुन्हा उगवत नाहीत, हा अनुभव मी शेकडो वेळा घेतला, अनेक उत्तमोत्तम दुर्मिळ पुस्तकं गमावली आणि स्वतःचं नुकसान करुन घेतलं आहे. त्यामुळं, कुणी पुस्तक मागितलं की मी स्पष्ट नकार देतो.

दोन दिवसांनी एका चौकोनी कुटुंबाला घेऊन ते घरी आले. त्यांनी सगळी लायब्ररी पाहिली आणि मला विचारलं, “सर, एखाद्या चांगल्या मराठी घरात कोणकोणती पुस्तकं असावीत, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? आम्ही यादी लिहून घेतो. ” ते क्लायंट गृहस्थ म्हणाले.

“माझं घर हे सुध्दा एक चांगलं मराठी घरच आहे. माणसानं अवश्य वाचावीत अशी हजारों पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. त्यांची आम्हीं वयोगटानुसार यादी केली आहे. ती दाखवतो. ” असं सांगत मी त्यांना यादी दाखवली. त्यांनी फोटो काढून घेतले. आणि चमत्कारिक प्रश्न सुरु झाले – 

“फास्टर फेणे की हॅरी पॉटर? तुम्ही काय सजेस्ट कराल?” 

“तरला दलाल, संजीव कपूर की रुचिरा?” 

“मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी यांच्याशिवाय आणखी ऐतिहासिक पुस्तकं कोणती असावीत?”

“पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे संपूर्ण सेट घेतले तर स्वस्त पडतात का? असे अजून कुणाकुणाचे सेट्स आहेत?”

मी चक्रावून गेलो. त्यांचा मुलगा आणि मुलगी माझ्या लिस्ट मधून “फेमस बुक्स” शोधत होते आणि नावं सापडली की त्या पुस्तकांचे फोटो काढून घेण्यात गुंतले होते. काहीच उमगत नव्हतं. दोन अडीच तासांनी ते सगळे गेले.

साधारण दीड महिन्याने पुन्हा त्यांचा फोन आला. “सर, आम्हीं मागच्या आठवड्यात तुमच्याकडे लायब्ररी बघायला आलो होतो. ” 

“बोला” 

“तुम्ही आमची लायब्ररी बघायला आमच्या घरी याल का?” त्यांनी विचारलं.

“म्हणजे?”

“म्हणजे तुमची लायब्ररी बघितल्यानंतर आम्हीं आमची पण तशीच लायब्ररी तयार केली आहे. तुम्ही एकदा पाहायला आलात तर फार बरं होईल. ” 

“बघतो, प्रयत्न करतो” असं म्हणून मी वेळ मारुन नेली खरी. पण चार पाच दिवस त्यांचें वेळीअवेळी सारखेच फोन यायला लागले. शेवटी रविवारी त्यांच्याकडे गेलो.

प्रशस्त मोठा फ्लॅट होता. अगदी नवा कोरा. बहुतेक ते राहतं घर नव्हतं. काम सुरु होतं. त्यांनी हॉल दाखवला. सेम टू सेम बुक केस, आणि त्यात सेम पुस्तकं.. जवळपास दीड-दोनशे पुस्तकं असतील.

“सर, आतमधून एलईडी लायटिंग केलं आहे, त्याला डीमर बसवला आहे. खास टफन ग्लासचे शेल्फ बसवले आहेत. आणि लाकूड सगळं सागवानच वापरलं आहे. तुम्ही वेगळ्या अर्थानं घेऊ नका, पण तुमच्यापेक्षा भारी मटेरियल वापरलं आहे. ” ते भडाभडा सांगत होते. मी ऐकत होतो.

पाडगावकरांची बोलगाणी स्टीलच्या कपाटात ठेवली काय किंवा उंची फर्निचरमध्ये ठेवली काय, त्यातला आस्वाद बदलणार आहे का? शो केसमध्ये पॉश पोझिशनमध्ये लावल्याशिवाय पु. लं च्या पुस्तकांतून विनोदच खुलत नाही, असं कुठं असतं? पुस्तकं आपल्याला त्यांच्या अंतरंगात रमवण्यासाठी असतात. आपण त्यातून शिकतो, अंतर्मुख होतो, त्यांच्याशी जोडले जातो, प्रभावित होतो. कधी ती हसवतात, कधी रडवतात, कधी प्रेरणा देतात, कधी शहाणपण शिकवतात. पण हे सगळं त्या पुस्तकातल्या आशयावर अवलंबून असतं, पुस्तकं जिथं ठेवतो त्या फर्निचरवर अवलंबून नसतं.

“सर, हा डेस्क बघा. ह्यात काय केलंय, ते आत एक गोल खाच पाडली आहे. त्या खाचेत एक कॉफीमग बरोबर बसतो. म्हणजे वाचताना कॉफी घेऊन बसलं तरी प्रॉब्लेम नाही. कप हिंदकळण्याचा प्रश्नच नाही. ” त्यांनी ते छोटं डेस्क दाखवलं.

तेवढ्यात त्यांच्या मुलीनं दाखवलं, “सर, या अँगलनं इथं खुर्चीत पुस्तक घेऊन बसलं की, फोटो पण परफेक्ट येतो. पुस्तक वाचतानाच्या फोटोंना सोशल मीडियावर ऑल टाईम डिमांड.. “

मी त्या इंटिरियर डिझायनरकडं पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावरून अभिमान अगदी ओसंडून वाहत होता.

थोड्या वेळानं मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो, घरी आलो. संध्याकाळी ते इंटिरियर डिझायनर माझ्या घरी पुन्हा हजर..

“सर, तुम्ही पुस्तकांविषयी एवढं गाईड केलं, वेळ दिला, स्वतः साईट व्हिजिट केली. तुमची फी सांगा ना. ” 

“कसली फी? कुठली साईट व्हिजिट ?”

“सर, पुढच्या महिन्यात त्या घराचा गृहप्रवेश आहे. ‘एकदम सुसंस्कृत घर’ अशी थीम धरुनच इंटिरियर केलं आहे. त्यांच्यातले कुणीही ही पुस्तकं वाचणारच नाहियत. घरातली माणसं पुस्तकं वाचतात, असा फील देण्यासाठी मोठी बुक केस आणि त्यात ठेवलेली पुस्तकं हा डिझाईन चा भाग आहे. म्हणून तर तुमचा स्पेशल गायडन्स घेतला आणि त्याचे स्पेशल चार्जेस सुद्धा मी क्लायंटच्या बिलात लावलेत. तुम्ही सांगितलेली पुस्तकं मीच खरेदी केली आणि आणून लावली. आता गृहप्रवेशाच्या वेळी सगळ्यांना बघायला मिळेल ना, म्हणून साईट कंप्लीट करुन दिली. ” त्यांनी सरळ सांगून टाकलं.

“सर, घरात पुस्तकं असणं चांगलं असतं, येणाऱ्या लोकांवर इम्प्रेशन पडतं, असं क्लायंटचं म्हणणं होतं. ते म्हणाले, ‘उत्तम बुक केस डिझाईन करा आणि पुस्तकं पण तुम्हीच आणून फिट करा’, त्यानुसार मी तुमचं गायडन्स घेऊन काम केलं. ” 

आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नोकरीसाठी बायोडेटा किंवा लग्नाळू मुलामुलींची प्रोफाईल्स वाचताना ‘आवडी निवडी’ असं शीर्षक दिसलं की, हमखास दिसणारी पहिली आवड म्हणजे वाचन.. खरोखरच आवड असो किंवा नसो, सहज खपून जाण्याजोगं एकमेव उत्तर म्हणजे वाचन.. ! त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण मी आत्ता प्रत्यक्ष अनुभवत होतो.

मग त्या घरमालकांच्या संवादातली एकेक गोष्ट उलगडायला लागली. उंची सागवान, एलईडी दिवे, टफन ग्लास, प्रोफाईल डोअर्स, फोटो येईल अशी चेअर सेटिंग… या सगळ्या गोष्टींची लिंक लागली.

आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं आणि खरं सांगायचं तर कीव आली. पैसा ओतून सुसंस्कृत किंवा अभ्यासू असण्याचा आभास निर्माण करण्याचा जो रोग माणसाला जडतोय ना, त्याचं वर्णन चोखोबांनी शेकडो वर्षांपूर्वीच करुन ठेवलंय. “काय भुललासी वरलिया रंगा” असा त्यांचा अभंग जगद्विख्यात आहे.

पूर्वी “तो मी नव्हेच” असं दाखवण्यासाठी माणसं धडपड करायची. आता “असा मी असामी” असा आभास निर्माण करण्यासाठी धडपडतायत, याचं हे एक नवं उदाहरण अनुभवायला मिळालं. आपलं बाह्य रूप विकत घेता येतं, तशी आपली प्रतिमासुध्दा विकत घेण्याचा उद्योग कुठल्या स्तरावर गेला आहे, हे पाहिल्यावर मन ढवळून निघालं. रोज एक पुस्तक धरुन त्या बुक केससमोर खुर्चीत बसायचं आणि फोटो काढून सोशल मीडियावर पोष्टायचा, म्हणजे इमेज क्रिएट होईल ? वा रे लॉजिक.. !

“थ्री इडियट्स” मधला श्यामलदास छांछड आठवतो का? “वाट्टेल ते करा, पण या पोराला माझ्या मुलाच्या नावानं इंजिनियर करा. माझ्या मुलाच्या नावाची इंजिनिअरिंगची डिग्री या भिंतीवर लागली पाहिजे” असा दम देणारा श्रीमंत माणूस आठवला? तीन तासांच्या संपूर्ण सिनेमात हा तीस सेकंदांचा सीन आपण विसरुन जातो. पण वाट्टेल ते करुन स्वतःची प्रतिमा विकत घेण्याच्या मागं लागलेली माणसं सोशल मीडियाचं प्रस्थ वाढायला लागलं, तशी वाढतच चालली आहेत.

लोकांमध्ये, समाजात आपली ईमेज भव्यदिव्य दिसावी म्हणून लोकं काय काय करतात, याचे काही विचित्र नमुने पाहिले तर, कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येते. “मी अमुक अमुक दुकानातूनच भाजी घेते, अमुक अमुक ठिकाणाहूनच आंबे घेते”, इथपासून ते “अमुक अमुक देवालाच मी दर चतुर्थीला जातो” इथपर्यंत सगळ्या जगाला अभिमानानं सांगणारे कितीतरी लोक तुम्हाला दिसतील. “एकवीस हजार रुपये भरुन तिकीट काढून तिरुपतीचं स्पेशल दर्शन घेऊन आलो” असंही सांगणारे लोक आहेत आणि “दरवर्षी काहीही न खाता पिता एकवीस तास रांगेत उभारुन दर्शन घेतो” असंही सांगणारे लोक आहेत.

“आम्हीं अमुक ठिकाणचाच वडापाव खातो”, “मला तर दुसरी कुठली भेळ आवडतच नाही”, “मी एसी शिवाय तर प्रवासच करत नाही”, “मी आणि लाल डब्यातनं प्रवास? बापजन्मात शक्य नाही”, ” रेग्युलर ब्लड शुगर लेव्हल चेक करायला सुद्धा मी तिथं जात नाही, माणूसच घरी बोलावतो. त्याला सांगतो, शंभर रुपये जास्त घे पण तिथं बोलावू नकोस, मला जमणार नाही” असले अनेक तोरे मिरवणारे कितीतरी जण आहेत.

आपल्या गळ्यातली सोनसाखळी मुद्दाम दिसावी असा शर्ट घालणारी जशी माणसं आहेत, तशीच अमुक एखाद्या ग्रंथालयाची मेंबरशिप नुसतीच घेऊन ठेवणारीसुद्धा माणसं आहेत. त्यांना वाचनाचा छंद नसतो पण आपल्या गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेचा मी सभासद आहे, हे सगळ्यांना सांगण्यातच त्यांना खरा रस असतो.

मध्यंतरी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचे पाय धुवायचे आणि पाय धुताना, फुलं वाहताना ढसाढसा रडतानाचे फोटो, व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर फिरवायचे, ही एक जबरदस्त ‘तथाकथित इमोशनल’ क्रेझ निर्माण झाली होती. अशी गुरुपूजनं गल्लोगल्लीचे फ्लेक्सजिवी करत सुटले होते. आनंदाच्या क्षणी ओक्साबोक्शी का रडायचं? याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही.

मी जसा आहे तसं दाखवणं कठीणच आहे, माझी ईमेज बिघडेल. म्हणून मग खोटी बेगडी ईमेज पैशाच्या जोरावर विकत घ्यायची, हा रोग बळावतोय. मग ते कपडे असोत, महागड्या वस्तू असोत किंवा मोठाली कर्जं काढून घेतलेल्या गोष्टी असोत.. पण आता छंद आणि आवडी निवडीसुध्दा विकत घेण्यापर्यंत माणसं पोचली ? आणि त्या ईमेज बिल्डिंग साठीसुध्दा स्पेशल कन्सल्टिंग सुरु झालंय? हे लोकांना आणखी खड्ड्यात घालणारं ठरेल.

छंद आणि व्यासंग हे आपल्या व्यक्तीमत्वाच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी असतात. आपलं व्यक्तिमत्त्व उत्तम व्हावं, चांगल्या गुणांचा विकास व्हावा, समाजात आपलं चांगलं स्थान निर्माण व्हावं, अशी इच्छा असणं मुळीच गैर नाही. पण त्यासाठी स्वतःला घडवावं लागतं आणि तसं घडण्यासाठी फार मनापासून, सातत्यानं कष्ट घ्यावे लागतात. ते विकत घेता येत नाही.

स्वतःची ईमेज बिल्ड व्हावी म्हणून कोणत्याही संतवर्यांनी साहित्य निर्मिती केली नाही. जगाला दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी काही केलं नाही. अतिशय साधं, संतुलित, प्रामाणिक आणि समाज प्रबोधनाला वाहिलेलं आयुष्य अशीच त्यांची जीवनपद्धती होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनसुद्धा त्यापासून सतत दूर राहणारी कित्येक माणसं असतात. वास्तविक त्यांच्याकडं ज्ञान असतं, वकूब असतो, यश असतं, कौशल्य असतं, पण तरीही ते त्याचं भांडवल करत नाहीत. स्वतःच्या यशाविषयी स्वतःहून एक अक्षर सांगत नाहीत, पुढं पुढं करत नाहीत, स्वतःचं प्रस्थ तयार करत नाहीत आणि लोकांनाही स्वतःविषयी असलं काही करु देत नाहीत. हाच तर त्यांचा सगळ्यात मोठा आणि त्यांच्याकडून आवर्जून घेण्यासारखा सद्गुण असतो.

डॉ. कलाम, स्व. बाबा आमटे, स्व. दाजीकाका गाडगीळ, स्व. श्रीनिवास खळे, उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, अत्यंत साधी राहणी असणारे स्व. मनोहर पर्रीकर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. ही माणसं त्यांच्या अंगच्या गुणांमुळेच लोकांसाठी प्रेरणास्थान बनली, आदर्श बनली. आदर्श होण्यासाठी म्हणून त्यांनी हेतुपूर्वक काही केलं नाही. स्वतःचं प्रस्थ तयार करणं त्यांना अशक्य नव्हतं. पण त्यांनी तो मार्ग जाणीवपूर्वक टाळला.

जसजशी आपली सोशल अकाउंट्स तयार झाली, तसतशी आपली इतरांना दाखवण्याची धडपड सुरू झाली. राहणीमान जगाला दाखवण्याचा पायंडा पडला. खरंखुरं जगण्यापेक्षा नसलेलं दाखवण्याची इच्छा मनात कायमची मुक्कामालाच येऊन राहिली. आणि तीच कृत्रिमता आता गळ्यापर्यंत आली आहे.

लोकांचे डोळे दिपवून टाकून मिळवलेला आनंद किंवा प्रतिष्ठा कशी आणि कितपत टिकेल ? आणि त्यासाठीच सतत जगत राहिलो तर खरं समाधान तरी कुठून मिळणार? खरं समाधान प्रत्यक्ष जगण्यातूनच मिळवायचं की केवळ त्याच्या आभासातच जगत राहायचं, हे आता आपणच ठरवायला हवं.

लोकांवर सतत इम्प्रेशन मारत बसण्याचा शौक कितीही गोड वाटत असला तरीही नंतर त्याची ओझी झेपण्यापलीकडं जातात. आणि ते नाटक फसलं की, खोटेपणा उघडा पडतोच. म्हणूनच, कृत्रिमतेच्या स्टिरॉइड्सचे न परवडणारे साईड इफेक्ट्स टाळायचे असतील तर, जगण्याचं हे शहाणपण जितक्या लवकर आत्मसात होईल, तितकं उत्तम.

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांजवेळ – –  लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

सांजवेळ – –  लेखिका : सुश्री शैलजा दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर

मी वनिता आणि ही माझी रोजनिशी… रोजनिशी म्हणते कारण मला दुसरं नाव आठवत नाही. ही तारीखवार लिहिलेली रोजनिशी नाही. ज्या दिवशी लिहिण्यासारखं घडेल किंवा लिहावं असं मनात येईल त्या दिवशी लिहिलेली ही डायरी आहे.

वयाची पंचाहत्तरी जवळ यायला लागली आणि मनात विचार येऊ लागला की आता वानप्रस्थाश्रम सोडून संन्यासाश्रमाकडे वाटचाल सुरु करायला हवी. ह्याची पहिली जाणीव त्या दिवशी झाली.

दाराची बेल वाजली. दार उघडलं तर दारात सामान घेऊन वाणी उभा. मी म्हटलं, अरे, आम्ही तर यादी दिली नव्हती. तो म्हणाला, सकाळीच तर वहिनीसाहेब यादी देऊन गेल्या. तो सामान ठेवून निघून गेला. ही पहिली वेळ होती जेव्हा सुनेने माझ्याशी चर्चा न करता वाण्याला महिन्याच्या सामानाची यादी दिली होती. सामानातही खूप बदल झाला होता. गव्हाच्या ऐवजी तयार आट्याची पाकिटं आली होती. तेलही बदललं होतं. तुकडा बासमतीऐवजी अख्खा बासमती आला होता. त्या दिवशी ठरवलं, आता स्वयंपाकघराचा मोह सोडून तिथून बाहेर पडायचं. त्यात लुडबुड करायची नाही. बाहेर बसून भाजी निवडणं वगैरे एवढीच मदत करायची.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलगा म्हणाला, आई, उद्या आम्ही सर्व जण सिनेमाला जातो आहोत. तुझं पण तिकीट काढणार होतो, पण त्या थिएटरला पायऱ्या खूप आहेत. तुला त्रास होईल म्हणून तिकीट काढलं नाही. तो म्हणाला ते खरं होतं. अलीकडे पायऱ्या चढताना खूप दम लागायचा. त्या दिवसापासून जाणवलं, आता नाटक, सिनेमा ही मनोरंजनं बंद करायला हवीत. घरातच टीवी, फोन, वाचन ह्यात मन रमवायला हवं.

नात पार्टीला गेली होती. खूप उशीर झाला होता. एक वाजत आला होता. माझा डोळ्याला डोळा लागेना. तिची काळजी वाटत होती. तिचे आईवडील शांत होते. ती आल्या आल्या मी म्हटलं, अगं, किती उशीर! पण माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच ती म्हणाली, अगं आजी, मी आईबाबांना सांगून गेले होते मला उशीर होईल म्हणून. तू कशाला एवढी काळजी करतेस? तिच्या त्या ‘तू कशाला एवढी काळजी करतेस?’ ह्या वाक्याने मला जागं केलं. खरंच, तिची काळजी करायला तिचे आईवडील समर्थ आहेत. मी कोण तिची काळजी करणारी? माझा काय संबंध? त्या दिवसापासून ठरवलं, भावनांना आवर घालायचा. कशातच गुंतायचं नाही.

तुका म्हणे उगी राहावे। जे जे होईल ते ते पाहावे।

घरच्या आघाडीवर अशी हळूहळू निवृत्त होत असताना शरीरानेही वृद्धत्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली होती. पहिला नंबर लावला पायांनी. जरा जास्त वेळ उभं राहिलं की पाय भरून यायला लागले. चालताना किंवा बसल्यावर एवढं जाणवत नव्हतं, पण उभं राहिलं की त्रास होत होता. शॉपिंगला किंवा कुठे समारंभाला गेलं तर चटकन कुठे बसायला जागा मिळते का ते बघायला लागले. हळूहळू शॉपिंग, समारंभ हे बंदच केलं. रस्त्यावरून चालण्याचा आत्मविश्वास कमीकमीच होत गेला. कोणीतरी बरोबर असावं असं वाटायला लागलं. आणि मग बाहेर जाण्यावर बंधनंच आली.

नंतर जाणीव करून दिली दातांनी. दात दुखत नव्हते, पण त्यांचे तुकडेच पडत होते. म्हणून डेंटिस्टकडे गेले. त्यांनी खालचे सर्व दात काढायला सांगितले. ते दात काढून नवीन बसवण्यात दोन महिने निघून गेले. हे दोन महिने खाण्याचे फार हाल झाले. अगदी खूप शिजवलेलं किंवा पातळ खाणंच खाता येत असे. त्याचा तब्येतीवरही परिणाम होत होता. कवळी बसवल्यानंतरही ती सेट होईपर्यंत खूप त्रास झाला. कवळी घातली की हिरड्या सोलवटायच्या. शेवटी एकदाची ती कवळी सेट झाली पण तेव्हापासून अन्नाची चवच गेली.

जास्त वेळ बसलं की पाठ आणि कंबर दुखायला लागली. ह्या साऱ्यामुळे माझं जगच आक्रसून गेलं. एरवी सगळीकडे बेधडक वावरणारी मी, पायाच्या दुखण्यामुळे शॉपिंग, समारंभ बंद झाले. एकटी जाण्याचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे रस्त्यावर जाणंच बंद झालं. मी आता कॉलनीतच फेऱ्या घालू लागले. पण तिथेही एक दिवस चालताना ठेच लागली आणि पडता पडता वाचले. त्यामुळे तोही आत्मविश्वास गमावला. खाली जायची भीती वाटायला लागली. शेवटी माझी खोली, माझा पलंग आणि मदतनीस ठेवलेली बाई एवढंच माझं संकुचित जग झालं. बाहेर कुठे जायची दगदग नकोशी वाटू लागली.

वृद्धत्व जवळ जवळ येत होतं पण त्यातही काही सोनेरी क्षण येतात जे मनाला उभारी देऊन जातात. मुलगा ऑफिसमधून लवकर घरी येतो. आल्यावर माझ्या खोलीत येतो. पलंगाजवळ खुर्ची घेऊन बसतो आणि माझी चौकशी करतो. आई तू बरी आहेस ना? गोळ्या नीट वेळेवर घेतेस ना? वेळच्या वेळी जेवत जा. व्यायाम कर. त्याचे हे प्रश्न अगदी साधे असतात पण त्यातल्या आपुलकीच्या स्पर्शाने माझं मन आनंदाने भरून येतं.

एक दिवस रात्री जेवताना सून म्हणते, आई, तुम्हाला पोळी चावताना त्रास होतो ना? मी रात्री तुमच्यासाठी घावन करत जाईन. चावायला सोपं आणि पचायलाही हलकं. तिची ही काळजी मनाला हळुवार स्पर्श करून जाते.

चष्मा लावून गोळ्यांची नावं वाचताना नात तिथे येते आणि म्हणते, आजी तुला गोळ्या रोज शोधाव्या लागतात ना? दर रविवारी मी आठवड्याच्या गोळ्यांच्या पुड्या करून ठेवत जाईन. हिरव्या पुडीतल्या गोळ्या सकाळी लाल पुडीतल्या रात्री घ्यायच्या. ते तुला सोपं होऊन जाईल. गोष्ट साधीशीच पण मन भरून येणारी.

नातवाचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी असतो. तो म्हणतो, आजी! तुझा शिरा खूप सुंदर होतो. उद्या माझे मित्र येणार आहेत. तू शिरा करशील? दुसऱ्या दिवशी जास्त वेळ उभं न राहता येणाऱ्या माझ्या अंगात दहा हत्तीचं बळ संचारतं आणि मी शिरा करते. तो कसा झाला ह्यापेक्षा नातवाने करायला सांगितलं ह्याचाच आनंद फार मोठा असतो.

मार्केटमधून येताना सून तीन गाऊन्स घेऊन येते. म्हणाते आता घरात साडी नका नेसत जाऊ. पायात येते. पडायला होईल. घरात हे गाऊन्स घालत जा. घालायला सोपे आणि सुटसुटीत. तिने दाखवलेली काळजी मनाला भिडते.

एका रविवारी मुलगा म्हणतो, आई तू घराबाहेर जाऊ शकत नाहीस. आज आपण लॉंग ड्राईवला जाऊ या. तुलाही बाहेर पडल्यावर बरं वाटेल. आम्ही सगळेच बाहेर पडतो. खूप दिवसांनी भेटलेला बाहेरचा निसर्ग मनात भरून घ्यावासा वाटतो.

अश्या आंबटगोड आठवणी जागवताना मनात येतं, खरंच आता किती थोड्या अपेक्षा उरल्या आहेत. घरातल्या कोणीतरी रोज खोलीत येऊन आपुलकीने फक्त कशी आहेस असं विचारावं. सुनेने रोजचं जेवणाचं ताट मदतनीस बाईबरोबर न पाठवता एखाद दिवशी स्वतः घेऊन यावं. जवळ बसावं. चार गोष्टी बोलाव्यात. नातवंडानी वेळ मिळेल तेव्हा जवळ बसून तुटलेल्या बाहेरच्या जगातल्या चार गोष्टी सांगाव्यात. आजारी पडल्यावर कोणी तरी येऊन कपाळावर नुसता हात ठेवावा.

सांजवेळ ही हुरहूर लावणारी असते. आयुष्याची सांजवेळही अशीच हुरहूर लावते. गतायुष्यात केलेल्या चुका आठवून देणारी, छोट्याश्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटायला लावणारी…

… अशी ही सांजवेळ.

लेखिका : शैलजा दांडेकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगगाडीशी जडले नाते… ☆ श्री उद्धव भयवाळ ☆

श्री उद्धव भयवाळ

☆ मनमंजुषेतून ☆ आगगाडीशी जडले नाते… ☆ श्री उद्धव भयवाळ  

मित्रहो, माझे गाव बदनापूर. आता जालना जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असले तरी पन्नास साठ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील आणि जालना तालुक्यातील एक छोटेसे खेडे होते. मी बदनापूरच्या शाळेमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत असतांना आम्हाला बहुदा भूगोलाच्या पुस्तकात एक धडा होता. त्यात बदनापूर हे कृषी संशोधन केंद्र असलेले महत्त्वाचे गाव असल्याचा उल्लेख होता. तसेच जालना हे मोठे व्यापारी शहर असल्याचाही उल्लेख होता. बदनापूर आणि जालन्यामध्ये केवळ एकोणीस किलोमीटरचे अंतर. जणू घर अंगणच.

मी मार्च १९६६ मध्ये बदनापूरच्या जि. प. प्रशालेतून पहिल्या श्रेणीत एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्यावर जालन्याच्या जे. ई. एस महाविद्यालयात पी. यू. सी. सायन्सला प्रवेश घेतला आणि माझा आणि आगगाडीचा संबंध सुरु झाला. पी. यु. सी. पासून बी एस्सी {स्पेशल फिजिक्स } ची पदवी मिळेपर्यंत सलग चार वर्षे बदनापूर ते जालना नियमितपणे रेल्वेने जाणे येणे केले. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी बदनापूरच्या स्टेशनवर येण्याची पॅसेंजर ट्रेनची वेळ असे. बहुदा ती वेळेवरच येत असे. तसेच सायंकाळी ५. २०ला जालन्याहून परतीची गाडी {पूर्णा ते मनमाड पॅसेंजर} होती. तीसुद्धा वेळेवरच येत असे. त्या चार वर्षांच्या काळातील रेल्वेविषयीच्या अनेक आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात साठवून ठेवलेल्या आहेत. त्यातल्या फक्त दोन आठवणी इथे सांगतो.

बदनापूर ते जालना विद्यार्थ्यांसाठीचा सवलतीच्या दरातील मासिक पास चार रुपये तर त्रैमासिक पास दहा रुपये होता. त्यासंबंधीच्या प्रमाणपत्रांचे पुस्तक दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयाकडून 

कॉलेजला येत असे. कॉलेजकडून प्रमाणपत्र घेऊन रेल्वे स्टेशनवर दिले की सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असे. बहुतेक मी बी. एस्सी प्रथम वर्षाला असतांना रेल्वेने भाडेवाढ केली होती. ती बातमी त्या काळातील ‘अजिंठा’ आणि ‘मराठवाडा’ या लोकप्रिय असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत स्पष्ट लिहिलेले होते की, रेल्वेची भाडेवाढ झालेली असली तरी विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या पासमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. परन्तु नंतरच्या आठवड्यात माझा पास संपला म्हणून मी कॉलेजमधून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर आलो आणि तिकीट खिडकीपाशी जाऊन दहा रुपये आणि कॉलेजचे प्रमाणपत्र देऊन त्रैमासिक पास मागितला. तर तिथल्या बुकिंग क्लार्कने बारा रुपये मागितले. मी म्हटलं, “ बारा रुपये कसे? दहा बरोबर आहेत. “.. तर तो म्हणाला, “पेपर पढते नही क्या? अभी रेल्वे फेअर बढ गया है. ” 

मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, विद्यार्थ्यांच्या कन्सेशनमध्ये फरक पडलेला नाही. तरी तो ऐकेना. शेवटी अनिच्छेने मी बारा रुपये देऊन पास घेतला. पण मन बेचैन होते. बदनापूरला आल्यावर लगेच “वाचकाचे मनोगत” या सदरासाठी अजिंठा या वर्तमानपत्राला पत्र लिहिले. त्यात रेल्वेच्या भाडेवाढीसंबंधी मागच्या आठवड्यात आलेल्या बातमीचा उल्लेख केला. तसेच माझ्याकडून जालन्याच्या बुकिंग क्लार्कने दोन रुपये जास्त घेतल्याचाही उल्लेख केला आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत नेऊन टाकले.

दोन दिवसांनी रविवार होता. त्या रविवारी माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत रेल्वेच्या सिकंदराबाद कार्यालयास पत्र लिहून वस्तुस्थिती कथन केली आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकले.

आश्चर्य म्हणजे ‘दैनिक अजिंठा या वर्तमानपत्रास पाठवलेले माझे पत्र तीन चार दिवसांनी अजिंठा पेपरमध्ये छापून आले. विशेष म्हणजे माझ्या पत्राखाली संपादकांनी टीप लिहून स्पष्ट केले की, ” विद्यार्थ्यांच्या पासच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही, याची आम्ही औरंगाबादच्या स्टेशनमास्तरकडून पुष्टी करून घेतली. ” मला ते माझे प्रसिद्ध झालेले पत्र वाचून खूप आनंद झाला.

पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे, दोन दिवसांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे पत्र ‘अजिंठा’मध्ये त्याच कॉलममध्ये प्रसिद्ध झाले. त्या पत्राचा आशय असा. ” गैरसमजुतीतून जालन्याच्या रेल्वे स्टेशनवरील क्लार्कने दोन रुपये जास्त घेतलेले आहेत. तरी संबंधित विद्यार्थ्याने स्टेशनवर जाऊन दोन रुपये परत घ्यावेत. ” 

मग मी तो पेपर दाखवून जालन्याच्या स्टेशनवरच्या बुकिंग क्लार्ककडून दोन रुपये परत घेतले. त्यानेही दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात “रेल निलायम सिकंदराबाद”कडून माझ्या बदनापूरच्या पत्त्यावर तशाच आशयाचे इंग्रजी पत्र आले, तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना….. आज दोन रुपयांचे इतके महत्त्व वाटत नसले तरी पंचावन्न वर्षांपूर्वी त्या दोन रुपयांचे काय महत्त्व असेल हे आपण समजू शकतो.

रेल्वेसंबंधीची दुसरी आठवण म्हणजे, एक दिवस कॉलेजमध्ये जास्त वेळ थांबावे लागल्यामुळे सायंकाळी सहा वाजता जालना स्टेशनवर आलो. ५. २० ची गाडी अर्थातच गेलेली होती. आता यानंतरची पॅसेंजर ट्रेन रात्री साडेआठ वाजता होती. ती काचीगुड्याहून यायची. पण तिचा लौकिक असा होता की, ती नेहमी दोन तासांपेक्षा जास्त लेट असायची. त्या दिवशी ती तीन तास लेट होती. म्हणजे गाडी रात्री साडेअकरा वाजता येण्याची शक्यता होती. मी स्टेशनवर तिकीट खिडकीच्या समोर बाकावर बसून राहिलो. पोटात काही नव्हते. रात्री नऊ वाजेनंतर झोप येऊ लागली. कारण रोज सकाळी जालन्याला येण्यासाठी पाच वाजताच उठावे लागे. {आई मात्र मला डबा तयार करून देण्यासाठी चार वाजताच उठायची.}

एव्हाना स्टेशनवरची गर्दी बरीच कमी झाली होती. कारण त्यादरम्यान कुठलीच गाडी येणार नव्हती. मी मनात विचार केला, “आपली गाडी साडेअकरा वाजता येईल. तोपर्यंत थोडी झोप होईल. “

म्हणून मी तिथेच बाकावर आडवा झालो. जेव्हा जाग आली तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. पोटात धस्स झाले. आई घरी वाट पहात असेल या विचाराने आणखी त्रस्त झालो. आता काय करायचे? हा विचार करीत असतांना लक्षात आले की, स्टेशनजवळच अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर बस डेपो आहे. तिथून पहाटे साडेपाच वाजता जालना ते मालेगाव बस निघते. मी पटकन तिथे चालत गेलो. तर बस उभीच होती. पण निघायला वेळ असल्यामुळे ड्रायव्हर, कंडक्टर कुणीच नव्हते. दोन तीन लोक बसमध्ये बसलेले होते. मीसुद्धा आत जाऊन बसलो. कंडक्टर आल्यावर तिकिटाचा सव्वा रुपया देऊन बदनापूरचे तिकीट घेतले. थोड्या वेळेत बस सुटली आणि बदनापूरला सकाळी सहा वाजता पोचलो. आई नेहमीप्रमाणे चार वाजता उठलेली होती आणि माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मला बघताच आईने आधी माझ्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि नंतर विचारपूस केली.

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

 email: [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆ |

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मला कमालच वाटते देवाची, आणि दैवाचीही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर

एकाच वर्षी, एकाच महिन्यात, एकाच दिवशी… दोन बाळं जन्माला आली. एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात, तर दुसरं पार तिथे उत्तर प्रदेशातील निझामाबादेत. एकाचा जन्म हिंदू कुळातील… तर दुसर्‍याचा जन्म मुस्लिम घराण्यातला.

पण अखेर आपापल्या उमेदीच्या काळात, दोघेही कार्यरत झाले ते मात्र एकाच क्षेत्रात. एकाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली, तर दुसर्‍याने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून. एकाला आद्य ‘वाल्मिकी’ म्हणून ओळखत लोक, तर दुसर्‍याला इस जमानेका ‘गालिब’. खोर्‍याने गीतं लिहिली दोघांनीही, अगदी आपापल्या शेवटच्या श्वासापर्यंत.

अर्थातच एक गेला, ह्या इहलोकीची यात्रा संंपवून अंमळ लवकरच… आणि त्या दुसर्‍याने माझ्याही पिढीची, तरुणाई धुंद करून सोडली. म्हणजे बघा ना… ‘पहेला नशा पहेला खुमार.. नया प्यार है नया इंतेजार’ लिहितेवेळी, हे जुनं खोड पंच्याहत्तरच्या आसपास होतं.

तर… एका प्रतिभावानाने लिहिलं होतं…

‘तुझ्यावाचूनीही रात जात नाही

जवळी जरा ये हळू बोल काही

हात चांदण्यांचा घेई उशाला

अपराध माझा असा काय झाला’

आणि दुसर्‍याने लिहिलं होतं…

‘रातकली एक ख्वाब में आई

और गले का हार हुई

सुबह को जब हम नींद सें जागे

आँख तुम्ही सें चार हुई’

म्हणजे ही दोन गाणी अनुक्रमे ‘मुंबईचा जावई’ आणि, ‘बुढ्ढा मिल गया’ ह्या चित्रपटांतली. हे दोन्ही चित्रपट आले तेव्हा, ह्या दोघांनीही वयाची पन्नाशी ओलांडलेली. आणि असे अगणीत चमत्कार उतरलेयत ह्या दोघांच्या सिद्धहस्त लेखणीतून, स्वतःच्या त्या त्या वेळच्या वयाला न जुमानता.

हेच बघा वानगीदाखल…

‘सुटली वेणी, केस मोकळे

धूळ उडाली, भरले डोळे

काजळ गाली सहज ओघळे

या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा

झुलवू नको हिंदोळा’

आणि…

‘ये है रेशमी ज़ुल्फों का अँधेरा 

न घबराइए

जहाँ तक महक है मेरे गेसुओं की 

चले आइये’

आहाहा ! रोमान्सनी काठोकाठ भरलीयेत ही दोन्ही गाणी. पण तरीही अगदी कणभरानेही व्हल्गर नसल्यामुळेच, एका स्त्रीच्या तोंडीही खुलून येतांना दिसतात.

बरं नायिकाच नाही… तर ह्या दोघांच्याही शब्दांच्या पायघडीवरुन चालणारा नायकही, अगदी ओतप्रोत भरलेला आहे प्रेमभावनेनी. आणि तरीही… ती आत्यंतिक संयतपणे व्यक्त करणाराही आहे तो.

एकाचा नायक म्हणतो…

‘अनादी चंद्र अंबरी, अनादी धुंद यामिनी

यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी

घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी

नविन आज चंद्रमा’

दुसर्‍याचा नायक म्हणतो…

‘जब तलक ना ये तेरे रसके भरे होठों से मिलें

यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी ज़ुल्फ़ों के तले

गाए जाऊँगा वही गीत मैं तेरे लिए

जलते हैं जिसके लिये’

तर… १ ऑक्टोबर, ह्या दोघांचा जन्मदिन. आणि दोघांचं जन्मवर्षही एकच… १९१९. काय म्हणावा हा दैवी योगायोग……

#ग_दि_माडगुळकर

#मजरुह_सुलतानपुरी

… आपापल्या आकाशात… स्वयंतेजाने तळपलेल्या ह्या दोन्ही सूर्यांना, मनःपूर्वक अभिवादनाचं ओंजळभर अर्ध्य.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘नक्षत्रे अवतरली पोस्टात.. !’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘नक्षत्रे अवतरली पोस्टात.. !’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(पोस्टाची संगीतसेवा…)

९ ऑक्टोबर. जागतिक पोस्ट दिनानिमित्त एक सुखद आठवण आपल्या सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे… 

३ सप्टेंबर २०१४, हा माझ्यासाठी फार सुंदर आणि ऐतिहासिक दिवस होता. ज्या भारतीय पोस्ट खात्याची, ‘जगातील सर्वोत्तम नेटवर्क’ अशी ख्याती आहे, अशा पोस्टाने माझ्या हातून एक मोठ्ठी ‘संगीत सेवा’ करण्याची मला संधी दिली!

भारतरत्न पं. रविशंकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी तसंच सर्व पद्मविभूषण सन्मानप्राप्त – उ. अली अकबर खाँसाहेब, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, पंडिता डी. के. पट्टमल, गंगुबाई हनगल आणि पद्मभूषण उ. विलायत खाँसाहेब अशा संगीतातील थोर विभूतींचे स्टॅम्प्स (पोस्टाची तिकिटे) आज माझ्या हस्ते प्रकाशित झाले आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हाच मी माझा मोठा सन्मान समजते.

स्वरसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लतादीदींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्याच गाण्यांचा ‘तेरे सूर और मेरे गीत’ हा कार्यक्रम मी त्यांना मानवंदना म्हणून जेव्हा अर्पण करायचा ठरवला, त्या वेळी गंमत म्हणजे ‘जाने कैसे सपनों में खो गईं अखियाँ’ तसंच ‘कैसे दिन बीते’ व ‘हाये रे वो दिन’ ही अनुराधा चित्रपटातली तीन गाणी, माझी अत्यंत आवडती गाणी म्हणून सर्वांत प्रथम निवडली गेली… ज्याचे संगीतकार पं. रविशंकरजी होते. नृत्याचे बालपणीच धडे घेतलेल्या रवीजींच्या रक्तात जशी झुळझुळ झर्‍यासारखी लय वाहत होती, तशीच ती त्यांच्या शास्त्रीय सतार वादनात आणि स्वरबद्ध केलेल्या सुगम संगीतातही होती. त्यांनी अनेक सुंदर रागांचे मिश्रण करून राग सादर केले…. उदा. श्यामतिलक या रागातील ‘जाने कैसे सपनों में’ (श्यामकल्याण + तिलककामोद). शास्त्रीय संगीत काय किंवा सुगम संगीत काय, दोन्हींत त्यांनी अत्युच्च दर्जाचं काम केलंय. ‘कैसे दिन बीते’ या गाण्यातली सौंदर्यस्थळं तर, काश्मीरच्या सौंदर्य स्थळांपेक्षा कितीतरी सरस आहेत. उदा. ‘हायेऽऽऽ कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ, पिया जाने ना’ यातील तीव्र आणि शुद्ध या दोन्ही मध्यमांचा (म॑धम॑, मगरेगऽसा) असा उपयोग रवीजींनी अफाट सुंदर केला आहे.

यानंतर मी पं. भीमसेनजींची एक छोटीशी आठवण सांगितली. १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शनच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात लतादीदींनी आणि माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी माझ्याकडून ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल गाऊन घेतली होती. हे गाणं ऐकून पं. भीमसेनजींनी त्यांचे संवादिनीवादक, थोर कलावंत पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्यामार्फत “अप्पा, काल टीव्हीवर बाळच्या कार्यक्रमात ही मुलगी फाऽऽरच सुंदर गायली!” असा मला निरोप पाठवून खूप मोठा आशीर्वाद दिला. वास्तविक शास्त्रीय संगीतात अत्युच्च स्थानावर असूनही, पंडितजींनी माझ्यासारख्या नवोदित गायिकेचं कौतुक केलं. असं कौतुक कोणत्याही कलावंताला कारकीर्दीच्या सुरुवातीला उंच भरारीचं बळ देतं!

अशीच एक सुंदर आठवण उस्ताद अली अकबर खाँसाहेबांची, १९८५ सालची! पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांनी संपूर्ण विश्वभर हिंदुस्तानी संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. यात त्यांचा फार मोठा मोलाचा, सिंहाचा वाटा आहे. मी उस्ताद अली अकबर खाँसाहेबांच्या सॅनफ्रान्सिस्कोमधील अकॅडमीला भेट द्यायला गेल्यावेळी, त्यांनी मला कौतुकानं एक गोष्ट खिलवली…. काय बरं असेल ती चीज? आश्चर्याची गोष्ट म्हणजे… ती होती ‘चिकन जिलेबी’! अगदी वेगळा, पण खरंच खूप छान प्रकार त्यांनी मला प्रेमानं खिलवला..

पं. मल्लिकार्जुनजींची ही आठवण सांगताना मला खूप गंमत आली. मी आणि सुनील जोगळेकर १९८८ मध्ये, साखरपुड्याच्या बंधनात अडकलो आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी आम्ही एकत्र बाहेर जायचं ठरवलं. कुठं बरं गेलो असू? काही अंदाज? गेलो ते चक्क वानखेडे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या, पंडित मल्लिकार्जुनजींच्या मैफिलीला! अवघ्या १५ ते २० मिनिटांत एक राग संपूर्णपणे, सक्षम उभा करण्याची त्यांची हातोटी! ती ‘मैफील’ आम्ही दोघांनीही अतिशय मनापासून, समरसून आनंद घेत ऐकली.

‘स्त्रियांनी गाणं’ हे ज्या काळात शिष्टसंमत नव्हतं, त्या काळात पंडिता डी. के. पट्टमल यांनी, बालपणापासून मैफिली गाजवल्या आणि स्त्रियांच्या गाण्याला उच्च स्थान व दर्जा मिळवून दिला. म्हणूनच मला वाटतं, आजच्या सर्व गायिकांनी त्यांच्याप्रती उतराई व्हायला हवं! मुख्यत्वे, त्यांनी गायलेली कृष्ण भजनं ऐकताना रसिकांचे डोळे नेहमी पाणवायचे, इतकी त्यात भक्ती होती, भाव होता, आवाजात सणसणीत ताकद आणि खर्ज होता, तेज होतं! हीच बाब, पंडिता गंगुबाई हनगल यांच्याविषयी खरी ठरते. नागपूरमध्ये झालेल्या ‘सप्तक’ या संस्थेच्या शास्त्रीय संगीताच्या संमेलनात मी ‘राग बिहाग’ गायले. माझ्यानंतर लगेचच गंगुबाईंचं गाणं होतं. मी स्टेजवरून उतरताना गंगुबाईंना नमस्कार केला. त्यांनी प्रेमभराने, माझ्या पाठीवरून हात फिरवत माझं कौतुक केलं व भरभरून आशीर्वाद दिले!

पं. कुमार गंधर्व यांनी वयाच्या आठव्या वर्षी अनेक दिग्गज गायकांची शैली आत्मसात करून ‘चमत्कार’ सादर केला. पं. कुमार गंधर्व यांची जशी ‘शास्त्रीय’ संगीताला देणगी आहे तशीच त्यांनी ‘लोकसंगीताचा’ उपयोग करून, संगीतबद्ध करून गायलेली निर्गुणी भजनं, ही देखील त्यांचीच ‘किमया’ आहे. तसंच नवनवीन राग, बंदिशी आणि रचना यांची त्यांनी केलेली निर्मिती ही भारतीय संगीताला मिळालेली अमूल्य ‘देणगी’ आहे. उदा. लगनगंधार, शिवभटियार इ…

उ. विलायत खाँसाहेबांचंही असंच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीतातही मोठं योगदान आहे. ‘जलसाघर’सारख्या सुप्रसिद्ध बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं, जे खूप गाजलं. सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी, सुगम संगीतातही अपूर्व असं काम केलं.

संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या मंडळींनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं, तसंच तळागाळातल्या रसिकांपासून ते जगभरातील हिंदुस्थानी अभिजात संगीतावर प्रेम करणार्‍या रसिकांचं आयुष्यही समृद्ध केलं, अशा या सर्वश्रेष्ठ संगीततज्ज्ञांच्या नावे आज पोस्टाची तिकिटे ‘प्रकाशित’ झाली.

आज पोस्ट खात्याने अशा दिग्गजांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली, ही संगीत क्षेत्रासाठी कितीतरी आनंदाची नि अभिमानाची गोष्ट आहे! त्यासाठी पोस्ट खात्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! आपल्या भारतीय एकशे चाळीस कोटी जनतेला आपण शासकीय खात्यातील सर्वांत चांगलं खातं कोणतं? हा प्रश्न विचारला तर, एकमुखानं चांगलं बोललं जाईल, ते म्हणजे केवळ ‘पोस्टखात्या’बद्दलच!

मनीऑर्डर, instant money transfers, ATM, बचत खातं, पोस्टाचा बटवडा, इ. प्रचंड मोठी जबाबदारी पोस्टखात्यावर आहे. इतका जनतेचा आणि सरकारचाही पोस्टावर विश्वास आहे.

आजच्या इंटरनेट आणि एसएमएसच्या युगात, पोस्टानं आलेलं आणि हाती लिहिलेलं पत्र काय आनंद देऊन जातं, हे त्या पत्र घेणार्‍याला आणि वाचणाऱ्यालाच ठाऊक! गावोगावी तर अशिक्षितांसाठी पत्र वाचणारा आणि लिहूनही देणारा ‘पोस्टमन’ म्हणजे देवदूतच जणू!

आजही माझ्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत मातृदिनाला आपल्या आईला, तिच्याबद्दलचं ऋण व्यक्त करताना विद्यार्थी अन्तर्देशीय पत्र / पोस्ट कार्ड लिहितो. ते पत्र वाचताना, प्रत्येक आईला किती अमाप आनंद होत असेल?

आज मला २७ वर्षांपूर्वीची आसामच्या, कोक्राझारमधील चाळीस हजार रसिकांसमोर, मी सादर केलेली शास्त्रीय संगीताची मैफिल आठवते. त्यात एक विशेष व्यक्ती होती आणि ती म्हणजे शिलाँगचे ‘पोस्टमास्टर जनरल’! त्यांची नी माझी कधीच भेट झाली नाही परंतु त्यानंतर, त्यांचं मला कौतुकाचं एक सुरेख पत्र आलं! त्यावर केवळ पत्ता होता…. पद्मजा फेणाणी, माहीम, मुंबई. आणि…… चक्क पत्र पोहोचलं! त्यावेळी “तू स्वतःला काय महात्मा गांधीजी समजतेस?” अशी घरच्यांनी गंमतीने माझी चेष्टा केली. त्या काळात गूगल मॅप नसतानाही पोस्टाची ही विश्वासार्हता आणि चोख काम…. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!

बालपणी आम्ही भावंडं एकत्र खेळताना, “मोठेपणी तू कोण होणार?” हा प्रश्न विचारला जाई. कुणी कंडक्टर, कुणी पोलीस, कुणी काही सांगे. पण स्टॅम्प्स गोळा करण्याचा छंद असलेला माझा एक चुलत भाऊ म्हणाला, “मी कोण होणार ठाऊक नाही, पण मी असं काम करीन की, माझ्या नावे पोस्टाचं तिकीट कधीतरी निघेल!” यावरून ‘स्टॅम्प’वर फोटो असण्याचं महत्त्व आणि प्रतिष्ठा कळते! या जन्मात, आम्ही राम आणि कृष्ण काही पाहिले नाहीत, परंतु संगीतातल्या अशा या सर्व दिग्गज मंडळींना मी पाहिलं, त्यांचं संगीत अभ्यासलं, त्यातल्या काहींचा आशीर्वादही लाभला, हे मी माझं भाग्यच समजते! या व्यक्ती स्टॅम्प्सच्या रूपाने आम्हाला व पुढच्या पिढ्यांना कायम स्फूर्ती देत राहतील, हे फार मोठं कार्य पोस्टाने केल्याबद्दल आणि माझ्या हस्ते या स्टॅम्प्सचे लोकार्पण करण्याचा मान मला दिल्याबद्दल, मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गारवा…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत)

? मनमंजुषेतून ?

☆ “गारवा…” ☆ सुश्री सीमा ह. पाटील (मनप्रीत) ☆

सुखावतोस तू जेव्हा श्रावणातील सर होऊन, मग तिही सावळते भिजून तृप्त झालेली वसुंधरा होऊन, आणि मग गीत गाते तुझ्या सोबतच्या क्षणासोबत आपल्या सहवासाचे…

आणि मग वेडावतात या वेली, लता, तरु अगदीच भान हरपून.. लवलवणारी गवताची पाती, मध्येच डोकं वर काढून चिडवणारी रानफुलं सगळं कसं हिरवं हिरवं! जणू तुझ्या माझ्या मनाचं चांदणं होऊन एक एक करीत समोर यावं तसं!अशाच मंतरलेल्या सायंकाळी एक दोन करीत प्राजक्त आपल्या फुलांचा वर्षाव माझ्या आठवणीतील साठवणीवर करून पुन्हा त्यांना नव्याने गंधीत करीत असतो. आणि पहाटेच्या सुखस्वप्नातून जागे होऊन पुन्हा साखरझोपेत त्या गोड आठवणींना लपेटून घेऊन पावसाळी गारव्याचा आस्वाद घेण्याचा मोह सुटता सुटत नाही.

सूर्याची एक दोन किरणे जेव्हा कृष्णधवल नभातून वाट काढीत जेव्हा गवाक्षातून आत येऊन तुझा निरोप देण्यासाठी कानात कुजबुजतात तेव्हा कुठे दिवसाची सुरुवात करावी वाटते. आणि उठून दरवाजा उघडावा तर काय, समोर प्राजक्ताने आपले सर्व सुमनभांडार रितं करून अंगणात बेभान करणारी अस्तित्वरुपी सुगंधी कुपीच बहाल केली आहे याची जाणीव होते आणि हाच दरवळ संपूर्ण तिचा दिवस अगदी सुगंधी होऊन श्वासात घर करून राहतो जाणींवातला उधाणलेला किनारा होऊन !

… आणि विश्वास पटवून देतो गारव्याच्या रुपाने कर्तव्यातील पुनर्जन्माचा…

© सीमा ह. पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

अन्नपूर्णेची परिक्षा- 

माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा. “अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.

लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे… असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला….. मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. सौ. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची.

एकदा शाळेत जाताना सौ. आईने मला त्या ब्राह्मणाला “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले. धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पुजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी मानगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय. ” गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी… तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली. ” ते काय पुटपुटले ते मला काहीच कळले नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरे.

इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरुजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.

आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या, ‘ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर….. ” 

गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो.. उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो. ” तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. “ साडेबाराला नक्की जेवायला या. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल. ”

आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्हते. आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली, आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता.

“बसा नं जेवायला. माझ्यामुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला. ” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे. आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, चवीष्ट होतं जेवण. खरं सांगू माई, आमची मंडळी गेल्यापासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.

आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरुजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी. इकडे सौ. आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होता. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.

त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला माझी मोठी बहिण कु. लीला ने गाठले आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्यामुळे बघ आईला केवढा त्रास झाला, ‘ असं म्हणून भरपूर झापलं.

मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली. माझ्या क्षमाशिल आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले….. “

तर, असा सकारात्मक विचारांचा धडा सौ. आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणूं.

– क्रमशः भाग पाचवा 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “को जागर्ति ?” कोजागरी☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

??

को जागर्ति ?” कोजागरी ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

कोजागरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि “ को जागर्ति ?” म्हणजे कोण जागे आहे असे विचारते.

नुसते शरीराने जागे नव्हे, तर शरीराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात, नीती-कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे असा ह्याचा अर्थ.

 जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.

आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते. त्या चांदण्यात आपल्या मित्र – आप्तेष्टांसह मौज मजा करता यावी त्यासाठी हा उत्सव प्रचारात आला असावा. या दिवशी रात्री आप्तेष्ट मित्रांना केशरी मसाला दूध किंवा पोहे देण्याची पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात.

कोजागरी म्हटली की आमच्या लहान पणाचे दिवस आठवतात.. लहानपणी आम्ही सगळ्या मैत्रिणी रात्री जागरण करून कोजागरी साजरी करायचो. आधी सगळ्या मैत्रिणी एकत्र येवून कोजागरीचा कार्यक्रम कसा करायचा हे ठरवायचो. मग वर्गळी गोळा करणे व मग सामानाची खरेदी अशी एक दोन दिवस आधी पासून तयारी असायची. कोणाची आई नाहीतर आजी प्रेमाने एखादा पदार्थ करून द्यायची.

सगळ्यात आधी आम्ही सगळ्या मैत्रिणी आमच्या घरासमोरचे अंगण साफ करायचो. ह्याच अंगणात रात्री आम्ही सगळे खूप मैदानी खेळ खेळायचो. खेळून दमल्यावर बैठे खेळ खेळायचो. मधेच मध्यरात्री मसाला दूध प्यायचो. मग नाचं, गाणी, भेंड्या, पत्ते, कानगोष्टी असे कार्यक्रम असायचे.. ह्यात कुणाच्या आई, काकू व आजीचाही सहभाग असायचा. थोडे दमल्यावर कोणी चुटकुले सांगायचे तर कोणी आपल्याला आलेले वेगळे अनुभव सांगायचे.

पहाटे पहाटे सगळ्यांनी मिळून केलेली भेळ, पोहे, बटाटावडा नाहीतर विकत आणलेला सामोसा असा काहीसा बेत असायचा. नंतर सगळ्यांनी अंगणात गोल करून ते सगळे खाण्याचा कार्यक्रम व्हायचा. आनंदात भर म्हणून कधी कधी कोणाचे काका नाहीतर बाबा यांच्याकडून पेप्सीकोला नाहीतर आइस्क्रीम चा कप ही मिळायचा.

त्यानंतर सगळे आवरून पहाटे पहाटे भटकंती म्हणजे फिरायला जायचो. रस्त्यावर थोडी रहदारी वाढली की सगळे आपापल्या घरी छान आठवणी घेवून परतायचो.

लहानपणीच्या ह्या कोजागिरीच्या आठवणी अजूनही इतक्या ताज्या वाटतात की आत्ता एखादी मैत्रीण येईल व आपल्याला खेळायला येतेस का ग म्हणेल असा भास होतो.

आत्ताच्या आणि पूर्वीची कोजागरी साजरी करण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असायचा समाधान वाटायचे. सगळी मैत्रीची नाती निर्मळ व निरपेक्ष असायची अगदी घट्ट.

आजकालच्या आभासी आयुष्यात सगळ्याच गोष्टीमध्ये कृत्रिमपणा, दिखावा आला आहे …. मग तो नात्यांमध्ये असो किंवा मैत्रीमध्ये … अथवा साजरे करण्यामध्ये.

लहानपणीच्या कोजागरीच्या आठवणींची मनात एक विशेष जागा आहे.. नेहमीच लक्षात राहील अशी एक गोड आठवण.

… मैत्रिणी एकमेकांना जणू विचारात आहेत ‘ को जागर्ति ‘ कोण जागर्ती…

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares