मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उणीवेची जाणीव… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ उणीवेची जाणीव… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

*…”Make imperfection as the new defination of perfection “.

वरची ओळ मी काही कुठ वाचलेली नाही बरं का…. माझ्या रोजच्या जीवनात मला अनेक वेळा पडणारा प्रश्न आहेआणि खरच मला रोज वाटत मी बऱ्याच गोष्टीत कमी आहे हे कमी असणं नाही का चालणार?

म्हणजे बघा आजूबाजूला प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत perfect च व्हायचं आहे…

अगदी Nursery मधल्या आईबाबांना सुद्धा मुलांनी इंग्लिश मध्येच बोलायला हवंय..त्याचे बोबडे बोल सुद्धा त्यांना इंग्लिश मध्येच ऐकायचे आहेत त्याच्या बोबड्या बोलानी त्यांनी जर मातृभाषेत संवाद केला … एखाद बडबड गीत म्हटल तर नाही का चालणार? त्यामुळं तुमच आणि त्याच्या बालमनावर च दडपण कमीच होणार आहे…इतर मुलांप्रमाणे त्याने नाही परफेक्ट इंग्लिश बोललं तर नाही का चालणार?

आज सोशल मीडिया वर प्रत्येक जण माझे लाईफ किती perfect आहे…मी किती आनंदात आहे हे दाखवण्या च्या धडपडीत असलेला आपण पाहतो

त्यापेक्षा तुमच्या संपर्कामधल्या मित्र मैत्रिणीना कळु द्या की …बाबारे ! माझ्या लाईफ मध्ये पण problems आहेत .. माझं लाईफ पण तुमच्या सारखच imperfect आहे .. मी अमुक एका problem मधून जात आहे… हे मोकळे पणाने मित्रात, नातेवाईकांना…. सांगा नक्कीच दडपण कमी होऊन एखादा मदतीचा हात समोर येईल… कौन्सिलर ची महागडी मदत घ्यावी लागणार नाही.

मी कमी पडतोय …हा problem …सोडवण्यासाठी ही कबुली दिली एखाद्या जवळ तर नाही का चालणार?

अहो आपण काही सिनेमा मधल्या नट नट्या आहोत का पन्नाशी मध्ये सुंदर दिसायला?… मग कशाला ते filters च दडपण? चार मैत्रिणी समोर कमी सुंदर दिसलो तर नाहीं का चालणार?

पन्नाशी मधला charm वेगळाच असतो तो अनुभवा ! एन्जॉय तर करा एकदा….पहा जमतंय का…

प्रत्येक स्त्री घराबाहेर जाऊन किंवा घरून काहीतरी करून पैसे मिळवते….मी मेली मात्र नुसती घरातच असते!! असं वेळोवेळी मनाशी बोलून मनाला नाही दुखावलं तर नाही का चालणार? या उलट ज्या  कामाचा मला पगारही मिळत नाही ते काम मी तितक्याच उत्साहाने रोज करते आणि माझ्यावर आप्रेजल च दडपणही नाही अस  सांगा मनाला हवे तर!!   नाही का चालणार?

माझ्या मुलाला इतर मुलांप्रमाणे खुप चांगले मार्क्स मिळत नाहीत पण तो खुप भावनिक आहे… माझ्या चेहर्या वरील रेष जरी बदली तरी त्याला समजत… माझ्या घरकामाची, बाबांच्या मेहनतीची तो दखल घेतो… कधी विचारलं त्याला काय खाशील?… तर तुला जे सोप्पं वाटेल ते कर अस  म्हणतो….हे चांगल्या मार्क्स इतकचं सुखावणारं आणि महत्वाचं  वाटतं नाही का? माणूस म्हणून तो उत्तम घडला आहे मग त्याला कमी मार्क्स मिळाले तर नाही का चालणार ?

अजून किती वर्ष आपण ससा आणि कासवाची गोष्ट सांगून शर्यत या गोष्टीला glorify करणार आहोत

शर्यत ही गोष्टच वजा केली तर जीवन किती सुखकर होईल कल्पना करा!!!!!

फ्रस्टेशन, डिप्रेशन हे शब्द डिक्शनरी मध्येच राहू द्या ना

जीवनात नाही आले तर नाही का चालणार?

मला सर्वांसमोर जाऊन बोलता येत नाही  …पण चांगल ऐकायला आवडत हे बोलता येण्याइतकचं महत्वाचं आहे  …मी फक्त मन लावून ऐकल तर नाही का चालणार?

माझा मुलगा वेगवेगळ्या क्लासेस ला जातो या पेक्षा संध्याकाळी त्याला आवडेल ते दोन तास खेळतो

तो All rounder नाही पण खुप आनंदी आणि खट्याळ आहे ही गोष्ट  सांगताना आभिमान वाटायला हवा नाही का ?

मी काही प्रथितयश लेखिका नाही …. चार मनातल्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या तर नाही का चालणार?….

परंतु पुन्हा तेच… खुप रंजक लिहिता नाही आल तर नाहीं का चालणारं?—- फक्त भावना व्यक्त केल्या तर नाही का चालणार? 

धन्यवाद!!

लेखक : अज्ञात

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘श्रीराम’: काश्मीरचं सांस्कृतिक संचित – लेखक : श्री फैसल शाह ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ‘श्रीराम’: काश्मीरचं सांस्कृतिक संचित – लेखक : श्री फैसल शाह ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

काश्मिरी भाषेत इंद्रधनुष्याला राम दून म्हणतात. राम दून म्हणजे रामाचं धनुष्य. इथले रजई विणणारे कारागीर कापूस पिंजण्यासाठी धनुष्याची जी दोरी वापरतात तिलाही दून असंच म्हणतात. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या जवळच असणाऱ्या एका शांत- निवांत खेड्यात मी लहानाचा मोठा झालो. अक्रोडाच्या वनराईतून आम्ही सारी मुलं या मायावी कमानींचा मागोवा घेत फिरायचो. त्या अद्‍भूत सौंदर्यानं तर आम्ही मोहून जात असूच पण राम दून या शब्दानं माझ्यावर टाकलेली मोहिनी त्यापेक्षा जास्त जबरदस्त होती.*

इतकं सुंदर रंगीबेरंगी धनुष्य स्वत:जवळ बाळगणारा हा राम कोण बरं असेल? आणि या नैसर्गिक कमानीला हे असलं गूढ नाव कसं काय पडलं असेल ? की याचा कुणा पिंजाऱ्याशी काही संबंध असेल ? अशा अनेक बालसुलभ प्रश्नांची सरबत्ती मी माझ्या वडिलांवर करायचो. माझे वडील एक शिक्षक होते आणि अनेकविध भाषा त्यांनी स्वतःच प्रयत्नपूर्वक आत्मसात केलेल्या होत्या.

पण असे प्रश्न मी विचारले, की दरवेळी एका काश्मिरी अंगाईतील “राम राम भद्रेन बूनी” अशी सुरुवात असलेल्या दोन ओळी ते म्हणत असत. आणि मग लगेच शिक्षकाच्या भूमिकेत शिरून या इंद्रधनुष्यातील तानापिहिनिपाजा असा रंगांचा विशिष्ट क्रम मला सांगत. पुढे ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारिंगी असे ओळीने सारे रंग मला समजावून देऊ लागत. आमची ही गाडी शेवटच्या रंगावर आली, की माझ्या प्रश्नातल्या रामाची चर्चा आता पुन्हा केव्हातरी करावी लागेल हे मी मनोमन समजून चुकत असे.

अति प्राचीन काळापासून काश्मीरमध्ये अद्वैतवादी शैवपंथाचं प्राबल्य आहे. परंतु इस्लामचं आगमन होण्यापूर्वीच्या काळात भगवान श्रीराम आणि रामायणही काश्मिरी जाणिवेत तितकेच खोलवर रुजलेलं आहे, हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. कल्हणरचित राजतरंगिणी हे बाराव्या शतकातील एक ऐतिहासिक इतिवृत्तात्मक काव्य आहे. काश्मीरचा राजा दुसरा दामोदर यांच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा कल्हणानं त्यात तो सांगितलेला आहे.

श्रीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराला ‘दामोदर करेवा’ असं नाव दिलेलं आहे ना, तोच हा राजा. 

कल्हण सांगतो, की एकदा या राजा दामोदरानं धर्मधुरिणांना भोजन द्यायला नकार दिला. त्या वेळी संतप्त झालेल्या त्या धुरिणांनी त्याला तू सर्प होशील असा शाप दिला. मात्र या शापाला एक उ:शापही होता. राजा दामोदर यानं संपूर्ण रामायण एकाच दिवसात श्रवण केलं तर मात्र हा शाप निष्फळ ठरेल, असा तो उ:शाप होता. प्राचीन आणि मध्ययुगीन काश्मिरात रामायणाचं पठण अतिशय लोकप्रिय होते, याचा हा अत्यंत स्पष्ट पुरावा होय.

तरीही आता इतकी शतके उलटून गेल्यावर आणि इतक्या ऐतिहासिक उलथापालथी झाल्यानंतर आजही राम हा काश्मिरींच्या जाणिवेचा भाग उरला आहे का, हा प्रश्न येतोच. सांस्कृतिक प्रवाहाचं सातत्य म्हणता येईल असं काही खरोखरच अस्तित्वात असतं काय ? काश्मिरी मुस्लिमांच्या पिढ्यांमागून पिढ्यांनी भगवान रामाचा वारसा आपल्या सुप्त मनात कसा काय जपला असेल ? या आणि अशा इतरही काही बाबी समजून घेण्याची माझी इच्छा होती.

आमच्या गावात पंडितांची बरीच घरे होती. ते सारे बाजार भागात राहत. आम्ही टेकड्यांच्या बाजूला राहायचो. पण मी सहा वर्षाचा झालो तेव्हा आमच्या शेजारी राहणारे सारे पंडित दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळं गाव सोडून निघून गेले. त्या काळातलं फारसं काही मला आता आठवत नाही. पण एक गोष्ट मला आजही स्पष्ट आठवते. हिवाळ्यातले थंडगार वारे संध्याकाळी धुरकटून येत.

आमच्या घराच्या कुंपणावरून अंगणात राख येऊन पडत होती. वाऱ्याच्या झोताबरोबर अर्धवट जळलेले कागदही येत होते. गावच्या पूर्वेला दूरवर उफाळलेल्या भयानक ज्वाळा आम्ही पाहतच राहिलो होतो. 

दहशतवाद्यांनी सगळ्या पंडितांना जम्मूकडे निघून जायला भाग पाडलं होतं. त्या दहशतवाद्यांचे काही सहानुभूतीदार होतेच गावात. ते रोज एक अशा नेमाने पंडितांची मोकळी घरे एकेक करून पेटवून देत होते.

निर्मनुष्य झालेल्या त्या घरांमधून अर्धवट जळालेल्या वह्या, कपड्यांच्या जळक्या चिंध्या आणि अक्रोड वृक्षांची काळवंडलेली पाने गावभर विखरून पडत होती. इतिहासाचे निषिद्ध अवशेष ज्वाळांच्या मुखातून वारा जणू खेचून बाहेर आणत होता. आख्खं काश्मीर त्या काळात वैश्विक जिहादी केंद्र बनत चालले होते. अशा काळरात्री कुणी आमच्याशी राम आणि रामायणाच्या गोष्टी करेल, अशी सुतराम शक्यता नव्हती.

या गोष्टीला बरीच वर्षे उलटल्यावर एक परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी म्हणून मी जिल्हा प्रशासनाचा अनुभव घेत असताना बालपणी पडलेल्या त्या प्रश्नांचा भुंगा पुन्हा माझ्या कानात भुणभुण करू लागला. 

एकदा माझ्या कामाचा भाग म्हणून काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील सुथरण नावाच्या एका खेड्यात मी गेलो होतो. रामायणाच्या कथेची या गावातील आवृत्ती ऐकून मी थक्कच झालो.

जिथं पाहावं तिथं हिरवीगार कुरणं आणि पाईन वृक्षांची राई दिसत असलेलं सुथरण किंवा सीताहरण नावाचं हे गाव अतिशय मोहक दिसत होतं. धरतीवर जणू स्वर्गच अवतरला होता. पण त्या काळात या दुर्गम गावी जायला पक्का रस्ता नव्हता. तिथल्या लोककथेनुसार याच गावातून रावणानं सीतामाईचं अपहरण केलेलं होतं. त्या लोकांनी मला गोड्या पाण्याचा एक खळाळता झरा दाखवला. जवळच एक विशाल खडक होता.

त्यांनी मला सांगितलं, की श्रीरामचंद्र, सीता आणि लक्ष्मण आपल्या १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात एके दिवशी अगदी याच ठिकाणी आले होते. जवळच कांच्छेतपूर नावाचं आणखी एक छोटेसं गाव होतं. काश्मिरी भाषेत कानछेत म्हणजे कान तुटलेली. यात नक्कीच रावणाची बहीण शूर्पणखा हिचा संदर्भ उघड दिसत होता. वाल्मिकी रामायणानुसार लक्ष्मणानं तिचंच नाक आणि कान छाटून टाकले होते.

चौदाव्या शतकात काश्मिरात इस्लामचं आगमन झाले. काश्मिरातील बहुसंख्य लोकांनी हा नवा धर्म स्वीकारला. पण शैव पंथ आणि सुफी इस्लामची वैश्विकता काश्मिरी जाणिवेत सदासर्वकाळ घट्ट रुजलेलीच राहिली. लल्लेश्वरी ऊर्फ लाल देद आणि शेख उल आलम यांच्या शिकवणुकीमुळं मुस्लीम प्रजा हिंदू आणि मुस्लीम यात भेद न करणारी बनली.

संघटित धर्मातील दृढ कट्टरतेपेक्षा समन्वयवाद आणि अतींद्रिय आध्यात्मिक अनुभूतीच काश्मिरी लोकांनी अधिक मोलाची मानली. सांस्कृतिक निर्मितीचा भाग म्हणून विविध कला, काव्य, संगीत, वास्तुकला, कारागिरी, उत्सव आणि धार्मिक परंपरांची निर्मिती झाली. त्या सर्वांनी इस्लाम, हिंदू आणि बौद्ध मतांचं मीलन घडवून आणले आणि काश्मीरला शांततापूर्ण सहजीवनाचं एक अनन्यसाधारण उदाहरण बनवलं.

असं असलं तरी भगवान शिवाचा अंमल असलेल्या प्रदेशात रामाचं भ्रमण होणं ही बाब मला बराच काळ चक्रावून टाकत राहिली. पण मग आणखी एका ठिकाणाची माहिती मला मिळाली. हे ठिकाण सुथरणपासून १५० किमी अंतरावर होते. कूपवाडा जिल्ह्यातील फर्किन नावाचे गाव होतं ते. उंच टेकड्यांमधली ती एक चिमुकली वस्ती होती.

सुथरण गावाशी तिचा सुतराम संबंध नव्हता. त्याही गावात “राजा राम की लादी” नावाचं एक स्थळ होतं. सुथरणसारखीच एक आख्यायिका या स्थळाशीही निगडित होती. या स्थळाजवळही एक गोड्या पाण्याचा झरा आहे. तो सीता सर या नावानं ओळखला जातो. रामाच्या वनवास काळात सीतामाई या झऱ्यापाशी येऊन गेल्या असं सांगितलं जातं.

कूपवाड जिल्ह्यातले फर्किन आणि मध्य प्रदेशातील ओरछा या दोन्ही ठिकाणात एक साम्य दिसतं. तिथंही ‘भगवान राम राजाराम’ याच नावानं ओळखले जातात. संपूर्ण भारतात रामाला राजाराम म्हणणारी अशी फारच थोडी ठिकाणं सापडतात.

भगवान राम हे इंडोनेशियापासून थायलंडपर्यंत आणि कोरियापासून कूपवाडापर्यंत उसळत वाहत राहिलेल्या भारताच्या आध्यात्मिक प्रवाहाचे समृद्ध चिरस्रोत आहेत. काश्मिरी जाणिवेत, भाषेत, म्हणीत, वाक्प्रचारात, लोककथांत, आख्यायिका आणि मिथकात, कलाप्रकारांत, विचारपद्धतींत, स्थळांच्या नावात आणि लिखित सामग्रीत भगवान राम गेली हजारो वर्षे ध्रुवीय ज्योतीप्रमाणं प्रकाशत राहिले आहेत.

एक मुस्लीम या नात्यानं भले मी आज एका भिन्न धर्माचं आचरण करत असेन पण माझी ओळख, माझा इतिहास आणि माझा वारसा श्रीरामाचं स्तवन करतो. ख्यातनाम उर्दू कवी डॉ. इकबाल यांनी श्रीरामाचं वर्णन इमाम ए हिंद (हिंदनायक) आणि भारताचं भूषण अशा शब्दांत केलंय. भारतीय या नात्यानं भगवान रामाच्या काश्मीर यात्रेची स्मृती आम्ही काश्मिरी लोक आमच्या सांस्कृतिक संचिताचा हिस्सा म्हणून भक्तिभावानं जतन करतो.

लेखक : श्री फैसल शाह  

(लेखक हे मूळचे जम्मू-काश्मीरमधील ‘आयएएस’ अधिकारी असून सध्या केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात कार्यरत आहेत.)

[email protected]

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

काल, परवाची गोष्ट असावी, मी सकाळी सकाळी आपला भाजी मंडईत भाजी घेत होतो, एवढ्यात अचानक बालपणीचा मित्र भेटला. तीस पस्तीस वर्ष जरी झाले असले तरी चेहेरपट्टीच्या खाणा खुणा तश्याच होत्या.पुढे गळा भेट झाली, समोरच्या टपरीवर चहा पीत पीत, आठवणींच्या हिंदोळ्यावर तास दीड तास कसा गेला ? ते कळलंच नाही पण मोठा आनंद देऊन गेला हे मात्र नक्की 

पुढं मित्र त्याच्या वाटेनं गेला, मी माझ्या वाटेला..

मनी विचार करू लागलो, की खरंच ही अचानक भेट किती आनंद दायी घडून आली…

खरंच आपण बऱ्याच गोष्टी ठरवून करू पाहतो, पण त्या एवढया आनंद देत नाही, जेवढ्या सहज घडून येतात. 

होय आयुष्यातल्या या सहजतेचा आनंदच विरळा..

आता हेच घ्याना, आपल्या ला गाणं ऐकायचा मूड असतो 

मग आपण लगेच मोबाइल मध्ये गाणी शोधतो, अवघ्या जगातील संगीत तिथं उपलब्ध असतांना, आपण मग हे लाऊ की, ते असं करता करता दहा, पंधरा मिनिटं अशी निघून जातात, गाण्याचा मूड ही जातो, मग कुठलं तरी नेहेमीच एकून कानाची  तृषार्तता भागवतो….

आता जरा, आपलं बालपण आठवा, एकच रेडिओ घरी दिवसभर चालू असायचा, कधी कुठलं गाणं लागेल त्याचा ठाव नाही, पण जे लागेल ते आनंदाने ऐकायचो, हा झाला सहजतेचा आनंद…..

आता टीव्ही चं ही घ्या, आपल्या लहानपणी आठवड्यातुन शनिवारी रविवारी एखादा दुसरा सिनेमा लागायचा, पण त्या साठी आठवडा भर उत्सुकता असायची, कारण सहजता असायची, केवढा  मोठा आनंद…..

आज आपल्या टी व्ही वर शेकडो सिनेमा ची चॅनेल आहेत, पण एक सिनेमा आपण धड पाहत नाही, किंवा जाहिराती त्या पाहू देत नाही, प्रचंड उपलब्धतेमुळे त्याचा आनंदच गेला….

तुमच्या आमच्या नाते संबंधाचही तेच, पूर्वी माणसं एक मेकांकडे यायची जायची, सहज एखादा पाहुणा यायचा.. चहा पाणी गप्पा टप्पा व्ह्यायच्या  मनं मोकळी व्हायची 

आता तशी होत नाही, मग आम्ही  कृत्रिम तेचे मित्र सोशल मीडियावर शोधतो, हे असं झालं आमची   भूक तिचं आहे, पण आता त्यासाठी आम्ही  खरं खूर अन्न पाणी न खाता त्याची

चित्र  पाहून भूक भागवण्याचा  प्रयत्न करत आहोत..

लग्न समारंभात आम्ही अचानक पणे भेटतो, गाठी भेटी घेतो, याय जायचं आमंत्रण ही देतो….

अन शेवटी एक वाक्य म्हणतो……

मी तसा रिकामाच आहे…

पण येतांना, एक फोन करून या..

अन तिथंच सहजतेचा आनंद हिरावून बसतो…

 

आता हे झालं बाहेरचं, अगदी आपल्या घरातलं च घ्या 

कुटुंबामध्ये पूर्वी संवाद साधतांना नर्म विनोदी पणा असायचं 

हास्य विलाप व्हायचा, भांडणा तली कटुता त्याने दूर व्हायची. आता अहंकारापायी, मोबाईल मुळे एकमेकांशी बोलनासो झालो, मग खास हसण्यासाठी, पैसे भरून सकाळी सकाळी, हास्य क्लब ला जातो, आणि नैसर्गिक हास्य सोडून, कृत्रिम हास्य विकत घेतो, ते कितपत आनंद देणार, तास दीड तास……..

आता आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बघा केवढ्या सहज होत्या, सकाळी न्याहारीला आम्ही  कधी शिळा परतलेला भात, तर कधी  पोळीचा भाकरीचा तिखट चुरमा खायचो  त्यानं आम्हाला कधी ‘ ऍसिडिटी ‘ झाली नाही क्वचित कधी तरी पोहे, उपमा  आम्ही खायचो..असा हलका फुलका नाष्टा घ्यायचो, आता त्याचा ब्रेकफास्ट झाला.. ब्रेड बटर, आम्लेट, पिझ्झा  बर्गर खातो, त्यानं वजन वाढतं.  आता पुढं गम्मत पहा..

 

मग खास पैसे खर्चून जिम लावतो, पायी न जाता महागडी गाडी घेऊन जातो, अन मग तिथं ट्रेंड मिल वर चालू लागतो 

पुढं डाएटसाठी खास कन्सल्टंट चा सल्ला हजार, दोन हजार रुपये देऊन घेतो, अन तो काय सांगतो…

सकाळी हलकं, फुलकं खा….

ही कृत्रिमता आम्ही विकत घेतो, आणि सहजता हरवून बसतो 

 

…… म्हणून म्हणतो मित्रांनो आयुष्यातली सहजता टिकवण्याचा प्रयत्न करा, नैसर्गिकता जपा, कारण   

ठरवून केलेल्या गोष्टी फारसा  आनंद देणार नाहीत…

 

लेखक : श्री सुमंत खराडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।माझी मी। — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

माझी मी। — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माझ्याकडे पोळ्या करणाऱ्या सुरेखा बाई चार दिवस आल्याच नाहीत. निरोप नाही काहीच नाही.मी अगदी वैतागून गेले.आता जर आल्या नाहीत तर मात्र घरी जाऊन बघून यायचे असं ठरवत होते मी. सकाळीच गेट वरची बेल वाजली. खिडकीतून बघितलं तर दोन मुली उभ्या होत्या.” बाई , सुरेखाबाई पडल्या,त्यांना

लागलंय. त्या येनार नाहीत कामाला !”  “ हो का?मग तू कोण आहेस? “ “ मी सून आहे त्यांची  कांता माझं नाव. “  .” वर या ग दोघी जरा!” .. मी त्यांना घरी बोलावलं. कांता अगदी साधी,जरा खेडवळच वाटली मला.

“ कांता,मग तू का नाही येत माझ्याकडे ग? कर की पोळ्या. त्या येत नाहीत तर तू ये ना! “ ती घाबरून म्हणाली, “ बया! मी नाही यायची ! “ “ अग पण का?मी तुला पगार देईन ना ! “ “ बाई, मिष्टर दारू  पितो माझा आणि संशोव घेतो वो.  मागं मागं येतो. मला लै भीति वाटती त्याची.” मी म्हटले “ असं नको करू

कांता. तुलाही नाही का  वाटत गं,आपल्याला चार पैसे मिळावेत? “ “  वाटतं ना बाई.  पण काय करू?चांगली दहावी पर्यंत शिकलेली आहे मी बाई. हाही बारावी झालाय पण दारूने सगळं बिघडत

गेलं. लग्नात नव्हता हो असा. पण वाईट मित्र भेटले आणि हा गेला वाहवत !  आता तर घरीच बसतो आणि काहीच काम करत नाही हो बाई . मी काम लावून दिलं तर चार दिवस पण नाही धड गेला.”  

कांताच्या डोळ्यात अश्रू होते. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली,” बाई,मी लवकर सकाळी तो उठायच्या आत येऊन जाऊ का?  म्हणजे सातला ? चालेल का? करून बघते काय होतं ते.”  मी म्हटलं “ चालेल की अग. कशाला अवलंबून राहतेस ग त्या नवऱ्यावर? रहा की पायावर उभी. येतात ना पोळ्या भाकरी करता?” ती हसली.. म्हणाली “ तर वो. न यायला काय झालंय? येते उद्या.”  मला अगदी हायसं झालं.

दुसऱ्याच दिवशी सकाळी सातच्या आतच कांता आली. मी तिला सगळं दाखवलं. कांताने छान केल्या पोळ्या.पटापट आवरून ती गेली सुद्धा. एकही दिवस खाडा न करता  कांता येऊ लागली. आधी न बोलणारी कांता आता खुशाल गप्पा मारू लागली.कित्ती बडबडी होती ती. माझ्या नवऱ्याला म्हणायची  

 “ दादा,मधेमधे येऊ नका. मी देते आणून चहा तुमच्या खोलीत. बसा पेपर वाचत.” 

त्यांनाही प्रेम लागलं तिचं.  म्हणाले “ ससूनला नोकरी करतेस का कांता.?देतो लावून आया म्हणून.” 

तर म्हणाली “ या बया नको. लै घाणीचं काम ते . मला घाण वाटती.आणि रोज कोण जाणार ससूनला?मला लै भीती वाटती बया! मला नको रे बाबा.” आम्ही सगळे हसलो मग.

धाकट्या मुलीला म्हणायची”,ताई,पोळ्या शिका बरं का माझ्याकडून. बाईच्या जातीला सुटका नाही.तुम्ही किती पगार मिळवला तरी लग्न  झाल्यावर कुठे होतेय सुटका स्वयंपाकातून.  त्यातून तुम्ही  लै शिकलेल्या मुली. मिळाला नवरा अमेरिकेचा की सगळं करावं लागेल स्वतः . तिकडे बाया मिळत नाहीत ना म्हणे? ” कांताकडून माझी मुलगी पोळ्या भाजी सगळं शिकली. तिच्या कलाकलाने घेत कांताने तिला छान तयार केली  .माझ्याकडून मी हजार वेळा सांगून सुद्धा “ तू ओरडतेस मला ! नको जा शिकवू मला तू “ असं मला म्हणणारी माझी मुलगी निमूट शिकली सगळं कांताकडूनच !  अगदी तिच्या पद्धतीचं गावरान चिकन सुद्धा.  कांता माझी अत्यंत लाडकी झाली. मी तिला पगार वाढवला आणि सगळा आपल्या पद्धतीचा स्वयंपाक शिकवला .कांताला आणखीही कामं आमच्याच सोसायटीत लागली. 

एक दिवस म्हटलं ” काय ग कांता,आता नाही का  मिष्टर संशय घेत आणि मागं मागं येत?” 

ती म्हणाली “ हॅट! तो काय येतोय? असा झाडला त्याला एक दिवस बाई मी ! म्हटलं दारू पितोस

आणि वर रुबाब करतोयस होय रे? पैसा मिळवून आण आणि मगच बोल.”  गप बसला मग. हुशार आहे

हो ,पण या दारूने घात केलाय बघा.” 

आता कांता मस्तच रहायला लागली. आधीचं खेडवळ ध्यान आता पूर्ण बदललं. आम्ही दिलेल्या साड्या मस्त पिन अप करून ऐटीत येऊ लागली ती.  मला अतिशय कौतुक कांताचं.   तिचंही माझ्यावर खूप प्रेम. इतर  मालकिणी हेव्याने म्हणतात .. हो! त्या डॉक्टर बाईंकडे जायचं असेल आधी.आमच्याकडे उशीर करतेस कांता हल्ली!’ ती म्हणते ‘ हो मग.माझं पहिलं काम आहे ते. किती प्रेम करतात माझ्यावर

त्या. करणारच मी त्यांचं काम आधी .नसेल पटत तर बघा दुसरी बाई!’  बिचाऱ्या गप्प बसतात कारण हिच्यासारखी बाई मिळणार नाही हे पक्के माहीत आहे त्यांना.  

मध्यंतरी  कांताच्या नवऱ्याला खूप बरे नव्हते. हिने त्याला ऍडमिट केलं,त्या डॉक्टरला सगळी कथा

सांगितली. त्याने हिच्या नवऱ्याला चांगला दम भरला आणि म्हणाला दारू सोडली नाहीत तर दोन वर्षात मरालच तुम्ही.’ पुन्हा मी तुम्हाला ऍडमिट करणार नाही.हे शेवटचं!” 

काय आश्चर्य.त्या दिवसापासून त्याची दारू सुटली हे कांताचं भाग्यच म्हणायचं. त्याला शिपायाची नोकरी पण लागली एका शाळेत. खूप छान झालं मग कांताचं. हळूहळू त्यांनी होत्या त्या जागेत छानसं तीन

खोल्यांचं घर बांधलं.  हौसेने छान भांडी घेतली ,बसायला सोफा घेतला. एका मालकीणबाईकडून त्यांचा जुना पण छान अवस्थेतला फ्रीज घेतला. आम्हाला सगळ्याना  कांताचं अतिशय कौतुक आहे. माझ्या मुली परदेशातून आल्या की आठवणीने कांतासाठी मुद्दाम खूप छान उपयोगी वस्तू घेऊन येतातच. माझ्या बहिणींची पण  कांतावर माया आहे.त्या आल्या की कांता मस्त चहा करते ,त्यांच्याशी गप्पा मारते. बहिणीने तिच्या मुलाच्या लग्नात  कांताला आवर्जून बोलावलं होतं. तीही ऐटीत सुंदर साडी नेसून आली होती. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लेकीच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला  सहा महिने गेले होते. घर बंद होतं म्हणून काय अवस्था झाली असेल ही चिंता होतीच मनात. मी येण्याच्या आधी एक आठवडा कांताला फोन केला. ‘ मी अशी अशी या तारखेला येतेय.’  मुंबई एअरपोर्टला पोचल्यावर परत तिला फोन केला .मी पुण्याला सकाळी 6 ला पोचले. लॅच उघडून बघते तर काय… कांताने आमच्या कामवाल्या मावशीकडून सगळं घर सुंदर आवरून चकाचक करून घेतलं होतं.  बेडशीट्स बदललेली, बाथरूम्स स्वच्छ  केलेल्या,  फर्निचर झकास पुसलेलं ,फ्रीज मध्ये दूध,टोस्ट ब्रेड दही बिस्किटे आणून ठेवलेली. गॅसखाली चिट्ठी… ‘ मी बारा वाजता येतेय.’ माझ्या डोळ्यात पाणीच आलं बघा. 

बारा वाजता कांता मला पोळी मटकीची उसळ भात असा घरून डबा घेऊन आली. किती कौतुक वाटलं मला तिचं. गहिवरून आलं मला. कोण करतं हो इतकं ? पण ही मुलगी वेगळीच आहे. 

मध्ये माझ्या मैत्रिणींना मी घरीच पार्टी दिली. कांताला मदत करायला चारला बोलावलं. सगळ्या जणी आल्या, हिने सगळ्या डिशेस भरल्या, सगळ्यांशी हसून खेळून बोलली. मैत्रिणींना माझा चक्क हेवाच वाटला. एक म्हणाली ‘ अशी पाहिजे बाबा कांता आम्हालाही.’

कांता हसत म्हणाली, ”आमच्या बाई पण किती माया लावतात मला. आज पंधरा वर्षे झाली की मला इथं येऊन. मला हे घर माझंच वाटतं.”  तिने पटापट सगळं  मागचं आवरलं आणि घर ओटा स्वच्छ

करून गेली सुद्धा. मध्येच लाजत लाजत येऊन मला पायातले पैंजण दाखवले. म्हणाली, “देव

पावला बघा.एवढ्या वर्षात पहिल्यांदाच  केले नवऱ्याने पैंजण आणि हे सोन्याचे कानातले.”  मला वर

म्हणाली, “ बाई,तुमची कृपा.” 

“ अग मी काय केलं कांता? “ तर म्हणाली, “ बया ! नाही कसं?तुम्हीच की मला पायावर उभं केलं नाही का?बसले होते घरी भिऊन. आता बघा. नाही म्हटलं तरी आठ हजाराची काम आहेत मला.पुन्हा एक ला

घरी असते मी.आता स्वतः कमावतेय म्हणून नवरा पण आदर करतोय आणि सासूबाई पण दबून

असतात. हे सगळं माझं चांगलं तुम्हीच केलं नाही का? “ मला कांताने खाली वाकून नमस्कार केला. माझ्या आणि तिच्याही  डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसून हसून म्हणाली, “ आता दिवाळीला स्कूटी घेतो तुला म्हणालाय आमचा नवरा ! बघते काय करतो.“ 

“ येते का पण तुला चालवता स्कूटी ग’? “ 

 “हो मग ! कवाच शिकली मी  .भुंगाट जाते की मैत्रिणीच्या स्कूटीवरून.. आता हा बाबा घेतोय तर घेऊ दे की. देव पावला म्हणायचा.” 

दोघीही हसलो आणि  कांता हसत हसत जिना उतरली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स.न.वि.वि. … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

स.न.वि.वि. … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सुरुवातीला स.न.वि.वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय, असे कदाचित वाटू शकेल.

पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही. 

हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते, हे सुध्दा विसरायला झाले आहे. उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.

खरंच मोबाईलसारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे, काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरीही पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात.

आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली…….

||• श्री •||• लिहून पत्राची सुरुवात.

*श्री.रा.रा. – श्रीमान राजमान्य राजश्री.

*स.न.वि.वि. – सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

तीर्थरुप आई / बाबा.

*शि.सा.न. –  शिरसाष्टांग नमस्कार.

या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत. 

कळविण्यास आनंद होतो की… असे लिहून पत्राची सुरुवात झाली, तर पुढे आनंदाची बातमी आहे, म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)

पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे…

– कळावे, लोभ असावा.

– आपला.

– तुझाच/ तुझीच (किती रोमँटिक!)

– आपला आज्ञाधारक

– मो.न.ल.अ.उ.आ‌. छो.गो. पा. : मोठ्यांना नमस्कार, लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद छोट्यांना गोड पापा, असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचतांना सुध्दा खरेच लहानांचा गोड पापा घेतला जातोय असा भास व्हायचा.

हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेनासारखेच झाकण (टोपण) लावून जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते.

त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेनने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत, तर बंद झाले आहेत.

पत्र लिहून संपविताना एखादी गोष्ट आठवली तर ता.क (ताजा कलम) असे लिहून उरलेल्या जागेत ती मावेल अशा अक्षरात लिहीली जायची. त्यात सुध्दा गंमत वाटायची.

कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेनमुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले. 

आता तर मोबाईलवरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो. खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता.

पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली, तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे.

पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, Dear, Sir/Madam, Respected Sir/Madam अशी सुरुवात आणि Regards, Yours असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द. त्यात नात्यातला ओलावा नाहिच. Yours faithfully यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते. 

यातही स.न.वि.वि. सारखेच नुसतेच GM, GN असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनीची मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही.

आजकाल फोनवरच बोलणे (त्यातही काही वेळा व्हिडिओ कॅाल) होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग “काय? कसे काय? बाकी सगळे ठीक आहेत ना?” असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते, किंवा पाहिली जाते.

पत्र आले की आनंद व्हायचाच पण मोठे पत्र (अंतर्देशीय) आले की ते व्यवस्थित उघडून (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणीसारखे त्याचे वाचन व्हायचे. पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते. 

अधिक काय लिहू?

कळावे…

आपला नम्र

लेखक : अज्ञात 

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बापू … ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ बापू … ☆ श्री सुनील शिरवाडकर

आज बापू  पुन्हा दिसला. त्याच गल्लीतून बाहेर पडत होता. मागच्या आठवड्यात मी या भागातुन चाललो होतो. टु व्हिलरवरून. तेव्हा तो दिसला. पण मी घाईत होतो. त्यामुळे थांबू शकलो नाही. आज पुन्हा इकडे या भागात आलो..पुन्हा बापू दिसला.. हो तो बापूच होता.कितीतरी वर्षांनी दिसला होता.

मलाही वेळ होता.एकदम त्याच्या पुढ्यातच गाडी थांबवली. बापू  दचकला.. माझ्याकडे जरा रागानेच त्यानं पाहीलं..पण मग मला ओळखल्यावर एकदम दिलखुलास हसला.काही  बदल नव्हता त्याच्या त्या हसण्यात..आणि दिसण्यातही.गोरटेलासा..उंचीने जरा कमी..कुरळे केस..

बापूचं हे असं हसणंच मला खूप आवडायचं.आम्ही दोघे शाळकरी मित्र.दोन वर्ष तर एकाच बाकावर बसायचो.त्याची माझी मैत्री खुप पटकन जमली.

“काय बापू ..इकडे कुठे?”

 मी विचारले.

“अरे,कांता किती वर्षांनी भेटतो आहेस..”

“हो ना.मागच्या आठवड्यात पण मी तुला पाहीलं.याच गल्लीतुन येताना. इकडे काय कोण रहातं का?”

“नाही रे..इकडे एक उदबत्तीचा कारखाना आहे. मी तिथेच नोकरी करतो.”

बापू  ही अशी नोकरी करतो याचा मला जरा धक्काच बसला. कारण बापुची खुप मोठी स्वप्नं होती.बापुचे वडील पेपर विकायचे.पहाटे उठून पेपरचे गठ्ठे आणायचे.. घरोघर ते टाकायचे.आणि मग त्यांच्या घराच्या पुढे एक टेबलवर स्टॉल लावायचे.मी कधी शाळेत जातांना बापुला बोलवायला जायचो.बापु तिथेच स्टॉलवर बसलेला असायचा. एका खुर्चीवर. एक लोखंडी घडीची खुर्ची. निळ्या रंगाची. बापु त्यावर मोठ्या ऐटीत बसायचा.एखाद्या बादशहा सारखा. एक पाय खाली सोडलेला,आणि दुसरा पाय त्यावर आडवा..सतत  हलणारा….. मला त्याची ही पोज खुप आवडायची.

मी आलो की बापू उठायचा.आत घराकडे बघुन त्याच्या वडिलांना हाक मारायचा. ते आले की बाजुला ठेवलेलं दफ्तर उचलायचा.आणि मग आम्ही शाळेकडे जायचो.

त्या लोखंडी घडीच्या खुर्चीत बसुन बापु स्वप्नं रंगवायचा.त्याला मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं होतं.आपला एकदम पॉश दवाखाना असेल..मोठ्ठं टेबल..आणि त्यामागे आपली खुर्ची. गोल गोल फिरणारी..खाली छोटे चाकं असणारी.

कधी त्याला वाटायचं..आपण बँकेतला साहेब व्हावं..आपल्याला छानसं केबिन असेल..बाहेर दरवाज्यावर नावाची पाटी असेल.. आणि आपल्या साठी खास खुर्ची.. अशीच.. गोल गोल फिरणारी.

वेळोवेळी त्याची स्वप्नं बदलायची.. पण एक गोष्ट मात्र कॉमन.. ती त्याची खुर्ची.

शाळा सोडल्यानंतर बापु  आज प्रथमच भेटत होता.मधली बारा पंधरा वर्षं कशी झरकन गेली होती.त्याला पाहीले..अन् मला हे सगळं आठवलं.बापुच्या त्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नांचं..मोठा अधिकारी बनण्याच्या स्वप्नाचं पुढं काय झालं ते मी विचारुच शकलो नाही.त्याच्या एकंदरीत अवसानावरुन.. त्याच्या नोकरीवरून मला त्याच्या परीस्थितीचा अंदाज आला.

पण मग गप्पा मारताना त्यानेच सगळं सांगितलं.शाळा सुटली..मार्क जेमतेमच.अकरावीला कॉलेजमध्ये पण गेला.आणि अचानक त्याचे वडील वारले.घरची जबाबदारी त्याच्यावर पडली.कॉलेज सोडुन तो पेपर स्टॉलवर बसु लागला.पण त्याला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता.

कोणाच्या तरी ओळखीने त्याला ही नोकरी मिळाली होती.

“तु बघ कांता.. मला आता या उदबत्तीच्या धंद्याची बरीचशी माहिती झाली आहे.अजुन फारतर दोन तीन वर्षे..मग..”

“..मग..काय?” मी विचारलं.

“मीच एक उदबत्तीचा कारखाना टाकणार आहे.मुंबईहुन कच्चा माल आणायचा.. दहा बारा बायका..मुलं कामाला ठेवायची.आपण फक्त लक्ष ठेवायचं..गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीत बसुन..”

गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीचं वेड काही त्याच्या डोक्यातुन गेलं नव्हतं.

त्यानंतर मात्र बापुची भेट नाही.मधल्या काळात असाच एकदा रस्त्यानं जात असताना एक भंगारवाल्याची गाडी दिसली.त्यावर एक जुनी खुर्ची ठेवलेली होती.. उलटी करुन.तुटकी चाकं अशी वरती दिसत होती.ती खुर्ची बघुन मला एकदम बापुची आठवण आली.

मग एकदा वेळ काढून मी बापुकडे गेलोच.तो तिथेच रहात होता अजुन.पत्र्याच्या खोलीत.पेपर स्टॉलमागेच त्यांचं घर होतं.आता तो रस्ता खुपच रहदारीचा झाला होता.

दार वाजवलं.एका विशीच्या मुलानं दार उघडलं.बापूचा मुलगाच असावा तो.दिसायला साधारण बापुचाच तोंडावळा.

“कोण आहे रे..”

म्हणत बापु बाहेर आला.त्याचं हे असं भेटणं मला एकदमच अनपेक्षित होतं.बापु खुर्चीत बसला होता.. चाकाच्या खुर्चीत..पण..

..पण ती व्हिल चेअर होती.दोन्ही हातांनी चाकं फिरवत तो बाहेर आला.त्याचा एक पाय प्लास्टरमध्ये होता.

मला बघताच बापुला खुप आनंद झाला.बापुला भेटुन मलाही बरं वाटलं.नुकताच त्याचा एक छोटा अपघात झाला होता ‌काही दिवसांसाठी पाय प्लास्टरमध्ये ठेवला होता.म्हणुन त्याच्या मुलानं ही खुर्ची आणली होती.

गप्पा मारताना आम्ही जरा भुतकाळात हरवलो.. आणि मला आठवलं ते बापुचं स्वप्न.

आणि मग बापुच म्हणाला..

“तुला आठवतं..माझं एक स्वप्न होतं ते? चाकाच्या खुर्चीच? ते पुर्ण झालं बघ.बसलो आहे चाकाच्या खुर्चीत.”

बापू हसला.पण त्यांचं ते हसणं कसंतरीच होतं.नेहमीचं नव्हतं.मलाच वाईट वाटलं.त्याला समजावलं.

“अरे आत्ता महिनाभरात ही खुर्ची सुटेल तुझी.चांगला हिंडायला फिरायला लागशील.”

मग आम्ही विषय बदलला ‌त्याच्या त्या जुन्या खुर्चीची आठवण झाली.बापुनं ती अजुन जपुन ठेवली होती.बापाची आठवण म्हणुन.पोराला सांगुन त्यानं ती खुर्ची आतल्या खोलीतून मागवली.गंजली होती..पण बाकी तशीच होती.निळ्या रंगाची..पांढर्या पाईपची.थोडा रंग उडाला होता इतकंच.

मी उठून ती खुर्ची उघडली.करकर आवाज करत ती उघडली.त्यात बसलो.अगदी बापुच्याच थाटात.

“तुला सांगतो कांता..मला अजुनही वाटतं कधी कधी..माझं ते स्वप्न पुर्ण होणार आहे.चाकाच्या खुर्चीचं..गोल गोल फिरणार्या   खुर्चीचं.”

बापुचं ते वाक्य ऐकुन मला बरं वाटलं.पुन्हा जुना बापु दिसला मला.त्याचं ते अधुरं स्वप्न त्याच्या मनातुन गेलं नव्हतं.अशी स्वप्न पहाण्याची क्षमता असणारी माणसं एका अर्थानं मला ग्रेट वाटतात.खरंच..बापु बदलला नव्हता.बापुचं  ‘बापुपण’ हे त्याच्या ह्या स्वप्नाळू व्रुत्तीमध्ये होतं.

_____________________

बापुंचं पाठवलेलं निमंत्रण माझ्यासमोर पडलं होतं.बापुच्या मुलानं दुकान टाकलं होतं.आणि त्यांचं हे निमंत्रण होतं.

संध्याकाळी मी गेलो.बापुच्या त्या जुन्या घराशेजारीच एक नवीन बिल्डिंग झाली होती.तेथेच एका गाळ्यात बापुच्या मुलानं दुकान सुरू केलं होतं.ते एक जनरल स्टोअर होतं.छान नवीन फर्निचर.. फुलांच्या माळा…बाहेर मंडप टाकला होता.बोर्डवर लाईटस्  माळा होत्या.मुलगा आत काउंटरवर होता.

आणि कडक पांढर्या  सफारीतला बापु इकडुन तिकडे फिरत होता.कोण कोण येतंय.. कुणाला डिश मिळतेय की नाही यावर लक्ष देऊन होता.

मला बघताच बापु धावत आला माझा हात हातात घेतला.आणि मला घेऊन आत गेला.दुकानच्याच एका भागात एक छोटं केबीन बनवलं होतं.एक टेबल.. आणि एक खुर्ची ‌तीच..बापुला हवी होती तशीच.बापु टेबलच्या मागे गेला.. आणि त्या खुर्चीत बसला.अतीव आनंदाने त्याने एक गोल गिरकी मारली.

“बघ..झालं की नाही माझं स्वप्न पुर्ण? मग? माझ्या पोरांनं खास माझ्यासाठी ही केबीन आणि खुर्ची बनवुन घेतलीय”

बापुला त्या खुर्चीत बसलेलं बघताना मला खुप आनंद झाला.. खुप बरं वाटलं.जसं काही माझंच स्वप्न पुर्ण झालं होतं.

बोलत बोलत आम्ही बाहेर आलो.प्रसाद घेतला,डिश घेतली.

शेजारीच त्यांचं ते जुनं घर होतं.अजुनही तसंच..पत्र्याचं.

दार नुसतंच लोटलेलं होतं.बापु आत गेला.आणि दोन खुर्च्या घेऊन बाहेर आला.मी एका खुर्चीत बसलो.बापु त्याच्या खुर्चीत बसला.तीच खुर्ची.. लहानपणापासून बघत आलो ती‌.पाठीमागच्या निळ्या पत्र्यावर बापुनं करकटने त्यांचं नाव कोरलेले.. शाळेत असतानाचं.त्यावरुन त्यानं बापाचा मारही खाल्लेला.

आता ती चेपली होती.जराशी डुगडुगत पण होती‌.बापु त्या खुर्चीत बसला होता.. तस्साच..एक पाय खाली सोडलेला.. दुसरा त्यावर आडवा..हलत रहाणारा.आणि चेहर्यावरचे भाव जग जिंकल्याचा.खर्याखुर्या 

बादशहा सारखा..

.. आणि मग आमच्या गप्पा रंगतच गेल्या.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंद…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “आनंद” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

दोघी बहिणी तीन दिवसांच्या ट्रीपला निघाल्या.

 पहिला दिवस मजेत …आता उद्या सकाळी नऊला निघायचे आहे .टूर लीडरने सांगितले.

दोघी रूमवर आल्या फ्रेश झाल्या

” उद्याचा ड्रेस काढून ठेवते ” धाकटी म्हणाली.

“थांब एक गंमत दाखवते…. उद्या आपण हे घालायचं आहे…”

“काय ग..”

“हे घे…” .. धाकटीने घडी उलगडली. आणि बघतच राहिली…

ते फ्रॉक सारखं होतं…. पण त्याचा घेर मोठा होता.

“नविन वेगळच दिसतय ..काय म्हणतात ग “

“अग दुकानदारानी काहीतरी नाव सांगितलं  बाई..पण मी गेले विसरून आपण पूर्वी फ्रॉक घालायचो त्याच्यासारखंच आहे ना हे…”

“हो ग किती छान आहे ग…”

 

धाकटीने लगेच घालून बघितला .. ती सुखावलीच..

“ताई किती मस्त आहे ग… आईच्या फ्रॉकचीच आठवण आली उंची जरा जास्त आहे आणि घेरही मोठा आहे एवढाच फरक पण किती कम्फर्टेबल आहे..”

त्याचा गुलाबी रंग एम्ब्रॉयडरी लेस… धाकटी हरखुनच गेली.

“अग ताई याला एक खिसा  हवा होता.अजून मज्जा आली असती”

“आवळे चिंचा ठेवायला?”

…. दोघी मनमुराद हसल्या….

 

“अगं दुकानात हे बघितलं आणि आईची आठवण आली.

ती कापड आणून  साधे फ्रॉक शिवायची दोघींचे एकसारखे. फॅशन काही नाही..

शाळेत अकरावीत साडी कंपल्सरी मग आजीने फ्रॉक घालूच दिला नाही

तेव्हा तिची ती मतं….”

“तू गप्प बसायचीस पण मला राग यायचा. किती बावळट होतो अस आता वाटतं”

“जाऊ दे ..आपलं ठरलं आहे ना…. मागचं काढून उगीच गळे काढून रडायचं नाही..आनंदानी पुढे चालायचं …. म्हणून दुकानात हे दिसलं आवडलं की घेतलं…. .. “समजूतदार शहाणी ताई धाकटीला सांगत होती…

 

दोघी सकाळी ते फ्रॉकसारखं घालून तयार झाल्या….. मैत्रिणी बघायलाच लागल्या..

“ए किती मस्त आहे ग….. कुठून घेतलं.?….. काय म्हणतात..?”

 

सगळ्यांना  तो प्रकार आवडला.

“ए मला पण आवडेल हे घालायला “

दुकानदाराला दाखवायला  तीनी फोटोही काढला..

 

फ्रॉकचा विषय निघाला आणि एकेकीचं मन उलगडायला लागलं……. 

 

“नहाण आलं आणि माझा तर फ्रॉक बंदच झाला.”

“माझ्या आईकडे फॅशन मेकर होतं ती वेगवेगळे डिझाईनचे फ्रॉक शिवायची..”

“माझी मावशी मुंबईला रहायची तिथुन नविन फॅशनचे आणायची”

“एकदा फ्रॉक ची उंची कमी झाली होती ….तर बाबा आईला खूप रागावले होते..”

“माझा लाल लेस वाला फ्रॉक मला फार आवडायचा..”

“मला कायम मोठ्या बहिणीचा जुना मिळायचा….”

….. प्रत्येकीकडे फ्रॉकची एक तरी आठवण होतीच..

खरंतर फ्रॉक एक निमित्त होतं आईची आठवण सुखावत होती…

 लहानपणी तिच्याभोवतीच तर सगळं जग होत….हो की नाही…

तुम्हाला आली का तुमच्या फ्रॉकची आठवण…..

 

मैत्रिणींनो आता आपली छान गट्टी जमली आहे ना….

मग एक सांगते ते ऐका..

 

जे घालावं असं वाटतंय ते खुशाल घाला….

कोण काय म्हणेल ?

कोणाला काय वाटेल…

याचा विचार करू नका .

कोणी इतकं तुमच्याकडे निरखून बघत नसतं….

कोणी आणून देईल याची पण वाट बघू नका..

तुम्हीच जा आणि घेऊन या..

….. आनंदाची परिस्थिती आपली आपणच निर्माण करायची असते हे लक्षात ठेवा…

“काय म्हणतेस तूच धाकटी आहेस

अगं मग ताई साठी तूच घेऊन ये…..”

मजेत आनंदात राहा…

तुमचा नवीन ड्रेस घालून काढलेला फोटो मला जरूर पाठवा

वाट बघते….

 

सुखाची गुरुकिल्ली आपल्याच हातात असते…

ती कशी कुठे लावायची हे समजले की आयुष्यच बदलते..

….. ती  किल्ली अजून कुठे कुठे लावता येईल याचाही विचार करा….

हेच तर  तुम्हाला सांगायचं होतं…… मैत्रिणींनो  मजेत राहा…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिटॅचमेंट… भाग – 1 ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ डिटॅचमेंट… भाग – 1 ☆ डॉ. शैलजा करोडे 

रोजचाच दिवस, रोजचीच सकाळ,  तीच धावपळ, तोच दिनक्रम . पण माझ्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता . अडोतीस वर्षांपूर्वीही तो दिवस खास होता . पण तो  माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा आरंभ होता .जीवनाची खर्‍या अर्थानं सुरूवात होती ..माझ्या शिक्षणाचं , मी केलेल्या कष्टांचं जणू ते फळ होतं . रोज उठून रोजगाराच्या जाहिराती पाहणं , अर्ज करणं व प्रतिसादाची वाट पाहाणं हा प्रवास आजच्या दिवशी संपला होता . अर्ज , लेखी परीक्षा नंतरचे मुलाखतीचे सोपस्कर आटोपल्यावर आजच्या दिवशी अडोतीस वर्षापूर्वी बँकिंग सर्व्हीस रिक्रूटमेंट बोर्डाकडून ( BSRB ) मला अपाइंटमेंट लेटर मिळून एका राष्ट्रीयकृत बँकेत मला हजर व्हायचे होते

स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंद काही वेगळाचं असतो , तो आनंद मला मिळाला होता .बँकेत लेटर घेऊन जाणे , अधिकार्‍यांनी सगळ्या पूर्तता झाल्यावर  कामावर रूजू करवून घेऊन मला काम सोपविणे , सगळं अद्भूत होतं माझ्यासाठी . आणि आज इतकी वर्षे इमाने इतबारे सर्व्हिस केल्यावर सेवानिवृत्तीचा दिवस आला होता .

इतकी वर्षे या इन्स्टिस्टूटशी जोडलेली मी डिटॅच होणार होते .

आज रोजच्याप्रमाणे मी आॅफीसला जायला निघाले पण मनात एक वेगळीच हुरहुर होती . उद्यापासून हा दिनक्रम थांबणार होता . रोज घड्याळाच्या तालावर नाचणार्‍या मला एकदम रितेपण जाणवणार होतं .दिवसातील दहा दहा तास कामाच्या चक्रात फिरणारी मी आता या वेळेत काय करणार , या वेळेचं नियोजन कसं करणार .? या प्रश्नांनी वेढली होते .

“मॅडम आता कोठे घेऊ गाडी, मला रस्ता सांगा ” मी तंद्रीतून बाहेर आले . “उजवीकडे घ्या ” . रोज नवनवीन आव्हानांना सामोरी जाणारी मी , आजही नवीन आव्हान समोर आलं . आँटोरिक्षा , टॅक्सीवाल्याँचा आज संप होता . बँकेत वेळेवर पोहोचणं , डे बेगीन करणं , कॅश व सुरक्षा जमा कक्ष उघडणं , वेळेवर होणं गरजेचं होतं . रस्त्यावरून जाणार्‍या एका फोर व्हीलरला थांबवून त्या व्यक्तिला मी विनंती केली व त्याने मला इच्छितस्थळी पोहोचविले .

सेवानिवृत्ती नंतर मनसोक्त झोपायचं , आरामात उठायचं , वर्तमान पेपर वाचतांना चहाचा एकएक घोट घ्यायचा . आरामात आंघोळीला जायचं . किती किती छोटी स्वप्न असतात आपली नाही का ?. पण रोजच्या धावपळीत , दगदगीत ती सुद्धा पूर्ण होत नाही . सेवानिवृत्तीनंतर आपण हे सगळं करूया , मी मनाशी खूणगांठ बांधलेली .आज ती वेळ आली होती , पण हे काय ? पक्ष्यांच्या चिवचिवाटासोबत मी पण उठून बसले , ते ही नेहमीपेक्षा लवकर . वर्तुळात फिरण्याची इतक्या वर्षांची सवय. हातही भराभर कामे करू लागलीत .स्वयंपाक आटोपला आणि सवयीने डबा भरायला घेतला , ” अगं काय करतेस ? डबा काय भरतेस ? रिटायर झालीस ना तू काल ” यांच्या बोलण्याने मी भानावर आले . डब्यातलं अन्न पुन्हा पातेल्यांमध्ये काढलं . ” इतकी वर्ष सोबत निभावलीस . माझ्यासोबत तू ही रिटायर झालास . तू ही अलिप्त झालास . डिटॅच झालास ” मी हातातील डबा न्याहाळत होते .डबा सिंकमध्ये ठेवला आणि मी गॅलरीत आले .तुळशी चांगली बहरली होती . असं निवांतपणे मी तुळशीला कधी न्याहाळलंच नव्हतं . तुळशीने मंजिर्‍या खूप धरल्या होत्या . ” मंजिरी वाढली म्हणजे तुळशीचं लाईफ कमी होतं . म्हणून मंजिर्‍या वरचेवर खुडाव्यात , तुळशी पुन्हा बहरायला मदत होते ” आईचे बोल आठवले व मी तुळशीच्या मंजिर्‍या खुडू लागले .देवघरात जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मंजिर्‍या वाहिल्या .

दुपारचा एक वाजला आणि आॅफीसमधील लंचब्रेक मला आठवला .आज मला हे काय होतंय .? सेवानिवृत्तीपूर्वी माझी तीन महिने शिल्लक असलेली रजा मी एंजाॅय करत होते , तेव्हा मला अशी हुरहुर कधीच वाटली नाही . हो त्याला कारणंही तसंच होतं म्हणा , मी अजून त्यांच्याशी जोडलेली होते .

हा काय पहिला बदल होता का आयुष्यातला ? नाही ना . प्रत्येक वेळी जुळवलंच ना आपण . प्राथमिक शिक्षण झालं आणि हायस्कूलला प्रवेश घेतला . जुनी शाळा , मैत्रिणी , शिक्षकवर्ग सगळ्यांचा निरोप घेतांना डोळ्यात अश्रूंनी दाटी केलेली .आम्ही मैत्रिणी एकमेकींना भेटवस्तू देत , पुनःपुन्हा भेटीचं आश्वासन देत डिटॅच झालो .पण नवीन शाळा , नवीन मैत्रिणी आणि पुढे शिकण्याची जिद्द , यांनी नवऊर्जा दिलीच की .

हाच परीपाठ हायस्कूल सोडतांना , पुढे महाविद्यालय सोडतांना , मनाला हुरहुर लावणारा घडत गेला . एकीकडे डिटॅच होतांना दुसरीकडे अँटचही होत गेलेलो आम्ही . पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही शिकत होतो . नवी उमेद , नवी आशा आणि जुन्याने दिलेल्या असंख्य आठवणींचा खजिना सोबतीला घेऊन मार्गक्रमण होतंच राहिलं .

आठवणींच्या या चलचित्रात मला आठवलं माझं सगळ्यात मोठं डिटॅचमेंट . माझं लग्न . ज्या घरात माझा जन्म झाला , मी लहानाची शहाणी झाले . आई वडिलांच्या छायेत वावरले , भावंडांच्या सोबतीने खेळले , कधी भांडले , रूसवे फुगवे धरले , यांना सगळ्यांना सोडून नव्या घरी , नवीन माणसांसोबत राहाणं , तेथील रितीरिवाज , घरातील प्रत्येकांचे स्वभावदोष जाणून त्यांच्याशी जुळवून घेत , त्यांची मर्जी राखणं , सासूचा तोरा , दीर जावांचा हेवादावा ,नणंदेचे टोमणे सहन करत संसारगाडी हाकायची , अजबच होतं . माहेर सुटलं , अगदी ”

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– साधुसंत येती घरा… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – साधुसंत येती घरा… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा 

(आदरणीय सुमित्राताई माझ्या शिवाजी पार्कच्या घरी प्रथम आल्यावेळी, आनंदाचं शिंपण करून गेल्या, त्यावेळची माझी भावना…)

पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांचा वारसा चालवणारी, त्यांची परंपरा जागवणारी आणि स्वतःही ती जगणारी; माझ्या नि अनेकींच्या आयुष्यातली – स्वाभिमानाने, व्रतस्थपणे कसं जगावं हे शिकवणारी, एक आदर्श, सोज्वळ, तेजस्वी, कर्तृत्ववान स्त्री….. ज्यांचं भाषण म्हणजे सदैव रंगलेली मैफल ! भारतातील राजकारणाचा, झाशीच्या राणीसारखा कणखर, करारी तरीही मृदु मुलायम आवाज….. लोकसभेच्या ‘स्पीकर’….  म्हणजेच ज्या आवाजाने भल्याभल्यांना “कृपया शांति रखिए…” असं म्हणत गप्प केलंय ! आणि जो हळवा, कोमल, आर्जवी आवाज, ज्यांच्यावर भारतरत्न आदरणीय अटलजींनी, मुलीप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला, ज्यांचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो, अशा सर्वांच्याच ताई….. आज माझ्या घरी येऊन आनंदाचं शिंपण करून गेल्या… ज्यांच्या जिव्हेवर सरस्वती वसली आहे, त्याचं प्रतिरूप म्हणजेच सुमित्राताई! यामुळेच मी ताईंना सुप्रसिध्द शिल्पकार आनंद देवधरांकडे घडलेली सरस्वतीची प्रसन्न आणि सुंदर मूर्ती भेट दिली! 

“ताई, तुम्ही माझ्या घरी स्मिताकाकूबरोबर प्रेमाने आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेतलात, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय, जो शब्दांत वर्णन करणं शक्यच नाही. म्हणून म्हणावसं वाटतं, 

“साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!”

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विचार तर कराल ?… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विचार तर कराल ? ☆ श्री सुनील देशपांडे

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.त्यामुळे आपण कोण आहोत हे दुसर्यांना सांगण्याची गरज नाही, फक्त चांगले कर्म करत रहा.

वरील मजकूर मला व्हाट्सअप वर आला होता. अशा प्रकारचे सुविचार अनेक येतात.  या सारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगावेसे वाटते. वस्तुतः चंदनाचे झाड हे लक्षात येत नाही.  गावाकडे आमच्या बागेत काही चंदनाची झाडे उगवली होती. परंतु आम्हाला ती झाडे चंदनाची आहेत हे समजलेच नव्हते. कोणीतरी आम्हाला हे झाड चंदनाचे आहे हे सांगितले तेव्हा समजले. झाडे थोडी मोठी झाल्यावर त्याचा गवगवा होऊन चोरीला जाण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केली म्हणून गावाकडच्यांनी ती विकून टाकली. घरात चंदनाचे खोड असेल तर घरात त्याचा सुगंध पसरलेला आम्ही तरी कधी अनुभवला नाही. पूर्वी पूजेसाठी चंदनाचे खोड प्रत्येकाच्या घरी असायचं. चंदनाचे खोड जेव्हा उगाळले जाते तेव्हा त्यातून सुगंध पसरतो त्यामुळे चंदनाला, कुणीतरी हे चंदन आहे हे सांगावेच लागते. आमच्या गावाकडचे घर विकल्यानंतर तेथील सामान देऊन टाकणे व  विकून टाकणे ही प्रोसेस चालू असताना चंदनाचे खोड हे वेस्टेज मध्ये टाकले गेले होते. कोणीतरी हे चंदनाचे खोड आहे म्हणून उचलून आणले.  हिरा सुद्धा पैलू पाडल्याशिवाय हिरा आहे हे कुणालाही समजत नाही. तसे पाहता पैलू पाडल्यानंतर सुद्धा खरा हिरा आणि खोटा हिरा हे कोणाला समजते? 

हिरा ठेविता ऐरणी, वाजे मारिता जो घणी, तोचि मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. असे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले आहे.  त्यामुळे अज्ञानी किंवा फारसा विचार न करणाऱ्या लोकांना एखादा चुकीचा मुद्दा सुद्धा पटवून देण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या मजकुरांचा किंवा चुकीच्या दृष्टांतांचा उपयोग केला जातो.  लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दृष्टांतांची परंपरा कीर्तनकारांनी फार पूर्वीपासून आपल्या समाजात रुजवली आहे. कीर्तनकाराला स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी काही दृष्टांत द्यावयाचे असतात. परंतु ते दृष्टांत किती योग्य आहेत याचा विचार केला जात नाही. फारसा विचार न करणाऱ्या लोकांसमोर अशा दृष्टांतांचा उपयोग होतो.‌ सध्या व्हाट्सअप वर असे दृष्टांत देऊन एखादी चुकीची गोष्ट सुद्धा पटवून देण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे कोणतेही उदाहरण किंवा दृष्टांत याबाबत आपण सजग पणे आणि विचारपूर्वक पाहिले पाहिजे. 

कुणीतरी गुड मॉर्निंग साठी असे काहीही सुविचार व्यावसायिकपणे तयार करून पाठवतात. ज्याला खरोखरीचा तर्क लावून तपासून पाहिले तर तो विचार योग्य आहे असे वाटत नाही.  परंतु कट पेस्ट संस्कृती आणि आलेले फॉरवर्ड करा विचार करू नका. या प्रवृत्तीमुळे अनेक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आपला उपयोग काही लोक करून घेतात. त्यामुळे अविचाराने फॉरवर्ड करणे किंवा आला मजकूर की कट पेस्ट करणे ही सवय चांगली नाही. या गोष्टी शक्यतो टाळाव्यात जी गोष्ट विचारपूर्वक आपल्याला पटली असेल, विचारपूर्वक म्हणजे खरोखरच त्यावर विचार करून मान्य झाली असेल तरच ती पुढे पाठवावी. ही सवय स्वतःच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न मी सुरू केला आहे. आपणही सर्वांनी अशा पद्धतीने करावे आणि दुसऱ्याचा विचार फॉरवर्ड करण्यापेक्षा जे फॉरवर्ड कराल तो तुमचा विचार असला पाहिजे. निदान तुम्हाला सर्वतोपरी विचार करून पटलेला तरी असला पाहिजे.  तो मान्य  असला पाहिजे.  ‘फॉरवर्ड ॲज रिसिव्हड’ अशा पद्धतीने करणे टाळावे, नव्हे, करूच नये!

पहा जमते का? आपण सर्वच हे जमवूया.  अर्थात आपणास विचार करायची सवय असेल तर! नसेल तर लावून घ्यायला काही हरकत आहे का? सुशिक्षित आहात ना? शिक्षित नसला तरी सुविचारी तरी आहात ना? करा करा ..  प्रयत्न करा माझ्याबरोबर ! 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print