कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
परिचय :
कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
(बी एससी, बी टेक, एलएलबी, एमपीएम, एमबीए)
- एनडीए आणि आयएमए मध्ये प्रशिक्षणानंतर १९८१-२००७ सैन्यदलात इंजिनियर.
- SSB मधील सेनाधिकारी निवडप्रक्रियेत चार वर्षे सहभाग.
- २००७ ते आजपर्यंत खाजगी कंपन्यांचे अधिकारी-कर्मचारी आणि केंद्र व राज्य सरकारी अधिकाऱ्यांना विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय.
- छंद – लेखन, वाचन, संगीतश्रवण, प्रवास.
मनमंजुषेतून
☆ बस, छोरी समझके ना लढियो…! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆
१९९७ साली, पुण्याच्या एका सिग्नल युनिटमध्ये मी काम करीत होतो. राजस्थान बॉर्डरवरची टेलिफोन एक्सचेंजेस बारा महिने चालू अवस्थेत ठेवण्यासाठी, आमच्या काही छोट्या तुकड्या तेथेच वास्तव्याला असत. कंपनी कमांडर या नात्याने, त्यांच्या कामाच्या देखरेखीसाठी अधून-मधून मला पुण्याहून तेथे जावे लागे.
माझ्या कंपनीत, मी आणि लेफ्टनंट गीता असे दोनच अधिकारी होतो. मी पुण्याबाहेर असल्यास आमच्या कंपनीचा दैनंदिन कारभार गीता उत्तम प्रकारे सांभाळत असे.
वार्षिक युद्धसरावासाठी वर्षातून किमान एकदा, संपूर्ण युनिटला बॉर्डरवर हलवावे लागे. त्या काळात, पुण्याहून बॉर्डरपर्यंतच्या प्रवासाचे नियोजन, सर्व उपकरणे, व इतर सामानाच्या बांधाबांधीवर देखरेख, CO साहेबांसोबत चर्चा, मीटिंग्स अश्या उपद्व्यापात माझी खूपच धावपळ चालू असे.
एकदा, मी अश्याच गडबडीत होतो आणि दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती. माझ्या लक्षात आले की तो जवानांच्या पगाराचा दिवस होता. मीटिंगला जाता-जाता मी गीताला सांगितले की पगाराची सर्व रक्कम मुख्य ऑफिसातून आणवून जवानांना पगार वाटण्याचे काम तिने पूर्ण करावे. ते काम सहजच तास-दीड तासाचे होते.
गीताला आदेश देऊन मी पुढच्या कामासाठी बाहेर पडणार तेवढ्यात तिच्या चेहऱ्याकडे माझे लक्ष गेले. ती जरा अस्वस्थ आणि विचारमग्न दिसली. मी मागे वळलो आणि तिला विचारले, “काही प्रॉब्लेम आहे का गीता?”
ती गडबडीने उठून मला म्हणाली, “नाही नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. मी लगेच कामाला लागते.”
पण, माझे समाधान झाले नाही. कोणतेही काम केंव्हाही चालून आले तरी नाराज होणे हा गीताचा स्वभाव नव्हता.
मी पुन्हा खोदून विचारल्यावर ती म्हणाली, “सर, मी पगाराचे काम संपवूनच घरी जाईन. पण, एक विनंती आहे. आज संध्याकाळी गेम्स परेडसाठी मी नाही आले तर चालेल का?
सर, चार महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर, काल प्रथमच माझे सासू-सासरे माझ्याकडे काही दिवसांसाठी आलेले आहेत. अजून पक्के घर न मिळाल्याने आम्ही दीड खोलीच्या टेम्पररी घरातच राहत आहोत. किचनच्या नावाने, गॅस ठेवण्यापुरते एक टेबल फक्त आहे. जगदीप [गीताचा आर्मी ऑफिसर नवरा, जो त्यावेळी पुण्यातच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (CME) मध्ये पुढील शिक्षण घेत होता] परीक्षेच्या अभ्यासासाठी दिवसभर CME मध्येच असतो. घरी गेल्यावर गरम रोट्या बनवून सासू-सासऱ्यांना जेवू घालेपर्यंत उशीर होईल. म्हणून मी थोडी सवलत मागितली, इतकेच.”
एक अधिकारी, आणि नवीन लग्न झालेली सून, अश्या दुहेरी भूमिकेत असलेल्या गीताचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. मी तिला सांगितले, की तिने वेळेवर घरी निघून जावे आणि संध्याकाळच्या परेडसाठीही येऊ नये. पगारवाटपाचे काम मी स्वतः करेन, कारण माझ्या घरी स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती.
पण, गीता माझी धावपळ देखील पाहत होती. संध्याकाळी तिला परत यायचे नसल्याने पगारवाटपाचे काम केल्याशिवाय ती घरी जाणार नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले. तिच्या चेहऱ्यावर स्वाभिमान, कृतज्ञता आणि माझ्याप्रति असलेली आस्था असे तीनही भाव मला स्पष्ट दिसले आणि तिच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला.
पुढे आम्ही वार्षिक युद्धसरावासाठी राजस्थानात जोधपूर, बाडमेर, जैसलमेर भागात गेलो. नवीन टेलीफोन केबल्स टाकणे आणि ठिकठिकाणी खांब रोवून त्या केबल्स सुरक्षित करण्याचे काम गेल्या-गेल्या सुरु झाले. जवानांकडून ते काम करून घेण्याची जबाबदारी गीतावर होती. दूरदूर पसरलेल्या रेडिओ तुकड्यांवर देखरेख करण्यासाठी मी दिवसभर जीपमधून हिंडत होतो. केबल्सचे काम कसे झाले आहे ते पाहायला मला रात्रीपर्यंत वेळच मिळाला नव्हता. रात्री जेवण झाल्यावर, टॉर्च घेऊन एकटाच माझ्या तंबूमधून बाहेर पडलो आणि केबल्सच्या इन्स्पेक्शनसाठी निघालो.
अचानकच गीता तिच्या तंबूमधून बाहेर आली आणि म्हणाली, “सर, दिवसभर तुम्ही बाहेर-बाहेरच असल्याने केबल्सच्या कामाचा रिपोर्ट मी तुम्हाला देऊ शकले नाही. आता तुम्ही तिकडेच चाललेले दिसताय, तर मीही तुमच्यासोबत येते.”
मी तिला सांगितले की जेवणानंतरचा फेरफटका आणि इन्स्पेक्शन अश्या दुहेरी हेतूने मी बाहेर पडलो होतो. तिने दिवसभर उभे राहून काम करून घेतले असल्याने, तिने विश्रांती घ्यावी. काम पाहून आल्यावर काही सूचना असल्यास त्या मी तिला दुसऱ्या दिवशी सकाळी देईन.
“सर, काही चुका झाल्या असतील किंवा तुमच्या आणखी काही सूचना असतील तर त्या जागच्याजागी मला समजतील आणि उद्या काम करणे सोपे जाईल.” असे म्हणत गीताही माझ्यासोबत निघाली.
मी केबल रूटचे निरीक्षण करण्यात गर्क होतो. गीताला वेळोवेळी काही सूचना देत असलो तरी तिच्याकडे माझे लक्षही जात नव्हते. आमच्या तंबूच्या जवळ आल्यावर माझी परवानगी घेऊन आणि सॅल्यूट करून ती तिच्या तंबूकडे निघाली.
ती जात असताना प्रथमच माझ्या लक्षात आले की ती जरा लंगडल्यासारखी, पाय वेळावून टाकत होती. मी तिला त्याबद्दल विचारताच ती हसू लागली. मला काहीच कळेना. उत्तरादाखल तिने पाय वर करून मला तिचा बूट दाखवला. तिच्या बुटाच्या तळव्याचा अर्धा भाग टाचेकडून उकलला जाऊन लोंबत होता.
“सर, आपण निघालो आणि थोड्याच वेळात एका ठिकाणी वाळूत माझा पाय रुतला. मी पाय जोराने खेचला आणि बुटाची ही अवस्था झाली. नशीब, मी आणखी एक बुटांची जोडी आणलीय, नाहीतर उद्या प्रॉब्लेमच आला असता.”
मला आश्चर्यच वाटले, “गीता, माझं लक्ष तर नव्हतंच, पण तू तरी मला तेंव्हाच सांगायचं होतंस.”
“ठीक आहे सर, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नव्हता.” असे म्हणून ती हसत-हसतच निघून गेली.
मी विचारात पडलो. तिच्या जागी कोणीही, अगदी मी जरी असतो तरी कदाचित, अचानक उद्भवलेली अडचण वरिष्ठांना दाखवून आपल्या तंबूकडे परत वळलो असतो. केबल रूटच्या इन्स्पेक्शनकरिता जाणे म्हणजे काही युद्धजन्य परिस्थिती नव्हती. पण, गीताला ते मान्य नसावे. एक स्त्री असल्याचा गैरफायदा घेऊन, आपण अवाजवी सवलत मागितल्याची शंका चुकूनही आपल्याबद्दल कोणाच्या मनात येऊ नये याकरिता ती अतिशय जागरूक होती.
गीतासारखेच कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित वृत्तीचे पुरुष अधिकारीही वेळोवेळी माझ्या हाताखाली होते. आजही त्यांची आठवण येते तेंव्हा मला त्या सर्वांचे गुणच आठवतात.
स्त्री-पुरुष समानता किंवा विषमता याबद्दलचे विचार माझ्या मनाला शिवतदेखील नाहीत.
लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
मो 9422870294
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈