डॉ. जयंत गुजराती
☆ घटा घटाचे रूप आगळे… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆
एकदा सकाळ सकाळीसच गोरटेली गोल गरगरीत बाई दवाखान्यात आली. प्रस्थ श्रीमंतांकडचं दिसत होतं. गळा दागिन्यांनी भरलेला. गळाच काय जिथे जिथे दागिने असायला हवेत तिथे तिथे ते विराजमान असलेले. आल्या आल्या ती सरळ वजन काट्यावरच उभी राहिली. वजनकाटा नव्वदच्या वर सरकला, तशी ती किंचाळलीच. “अग्गो बाई नव्वदच्या वर गेलं की हो! बरेच दिवस अठ्ठ्यांशीवर रोखून धरले होते. डॉक्टर काहीतरी करा, मला वजन कमी करायचेय, त्यासाठी मी तुमच्याकडे आलीय.” मी तिला पुन्हा आपादमस्तक न्याहाळलं. मग सहजच बोललो, “यात दोन किलो वजन तुमच्या दागिन्यांचंच असेल.” तिला नेमकं ते वर्मावर बोट ठेवल्यासारखं वाटलं. आपले दागिने ठीकठाक करत, टेबलावर ठेवलेली पर्स पुन्हा ताब्यात घेत समोर खुर्चीवर बसली पसरट फैलावून, व म्हणाली, “नाही हो डॉक्टर, माझं वजन इतकं काही नाहीये. आमच्या घरी कुणीही काट्यावर उभं राहिलं की काटा शंभरी पार जातो. सगळ्यांच्या तब्येती मस्त, हे एक वजनाचं सोडलं तर! ” मग तिने अख्ख्या खानदानाचा वजनी लेखाजोखाच मांडला.
आता त्याचं (किंवा तिचं) असं होतं की ती पंजाबी होती. मेदस्वी असणं हे वंशपरंपरागत. त्यातही फॅमिली बिझनेस आलिशान दारूचं दुकान. सगळी उच्चकोटीची गिऱ्हाईकं. बिझनेस करता करता त्यांच्या बरोबर पिणं ही आलंच व आपसूक खाणंही. तेही प्रमाणाबाहेर. पुन्हा ते पंजाबी खाणं. मक्के की रोटी सरसों का साग, तेलतर्री व पनीरचा बोलबाला. शिवाय लस्सीचा मारा, मलई मार के. प्रकरण तसं गंभीरच होतं. म्हणजे वजन कमी करण्याबाबत. “मला हे सुटलेलं शरीर नकोसं झालंय. मी विशीत जशी शिडशिडीत होते तसं मला पुन्हा व्हायचंय.” चाळिशीची असूनही नव्वदीला टेकलेल्या स्थूलदेहधारिणीने निक्षून सांगितले.
“तुम्ही योग्य वेळी व योग्य ठिकाणी आलात. काळजी करू नका. मात्र तुमचा विशीतला एखादा फोटो असेल तर अवश्य दाखवा, म्हणजे शिडशिडीत असण्याची तुमची व्याख्या तरी कळेल!! ” असं मी म्हणताच तिने लागलीच मोबाईल काढून, दोन मिनिटे स्क्रोल करून एका सुंदर तरूणीचा फोटो मला दाखवला. कुणीही तिच्या प्रेमात पडावं असा!! मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, तरीही विचारून घेतलं, “या तुम्हीच का?” यावर, “म्हणजे काय?” म्हणत, गोड लाजत तिने मान हलवली. आता आव्हान माझ्यापुढे होतं. गोल गरगरीत असण्यापेक्षा सुडौल असणं ही तिची प्रबळ इच्छा होती. वय फारसं उलटलेलं नव्हतं, तेव्हा तिला आश्वस्त करणं भाग होतं. तिची थोडक्यात हिस्ट्री घेतली तर तिने आयुष्याचा पटच रंगवला. नाशिक हे तिचं माहेर, इंदोर हे सासर. माहेराकडून मिळालेला वजनी वारसा सासरीही निभावला गेला. “खाना कंट्रोल ही नहीं होता हे पालुपद तिने कितीतरी वेळा उच्चारलेले. संयुक्त कुटुंबाचा गोतावळा, घरी पैपाहुण्यांचा राबता. खाणंपिणं याची रेलचेल. तरी “एवढ्यात पिणं मी कमी केलंय, वजन वाढत गेलं तसं, पण तेही थोडंफार सवयीचंच झालंय.” निर्विकारपणे तिने सांगितलं. “ ते अगोदर बंद करावं लागेल!” असं मी म्हटलं रे म्हटलं तिचा चेहेरा पडला. तरीही स्वतःला सावरत ती विशालकाय निश्चयाने उद्गारली, “ मैं कुछ भी करूंगी, मलाच हे ओझं सहन होत नाही. इतर तंदुरुस्त बायका पाहिल्या की माझा जळफळाट होतो, त्यांची डौलदार चाल, त्यांचे नखरे, फिगर मेंटेन केल्याचा अभिमान पाहून मी कष्टी होतेच होते. माझं वय काही फार नाही. इतक्या लवकर मी जाडगेलेसी कशी काय झाली याचं मलाच नवल वाटतं, तेव्हा इतर बायकांच्या बरोबरीने नव्हे पण त्यातल्यात्यात चांगलं दिसावं ही माझी तळमळ, मळमळ काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण आहे.” तिने तिचा न्यूनगंड उघड केला. सहानुभूती वाटावी अशीच तिची जटिल समस्या! खरंतर तिचा विशीतला फोटो डोळ्यासमोरून हलत नव्हता. तसं असलं तर कुणीही सहज स्टेटस म्हणून ठेवला असता मोबाईलमधे. सिनेतारकांपेक्षाही ती उजवीच होती तेव्हा. तेव्हा तिला पुनश्च तिचं वैभव मिळवून द्यायचं याचा विडा मी उचललाच!
तिचा न्यूनगंड घालवणं आवश्यक होतं. मी म्हटलं, “देखो, गोल गरगरीत असणं हा काही गुन्हा नाही. राऊंड हाही एक शेपच आहे. त्यात बदल करणं एकदम सोपं नाही, तसेच अवघडही नाही. वेळ लागेल, काही तपासण्या, काही पथ्यपाणी, व्यायाम शिवाय औषधं याने तुम्ही बरंच काही मिळवू शकाल, आयमीन घालवू शकाल! तेव्हा काळजी करू नका. ”
आतापर्यंत चेहेऱ्यावर ताण घेऊन बसलेली ती एकेकाळची सौंदर्यवती आता थोडीफार प्रफुल्लित दिसायला लागली. वजन कमी होऊ शकतं असं म्हणणारा जणू मीच पहिला भेटलो असावा या आविर्भावात तिने सांगितलं, “माझा नवरा सहा महिन्यांसाठी कॅनेडात गेलाय, तो परत यायला आठ महिनेही लागू शकतील. मुलं ही बोर्डिंग स्कुलला शिकतात. तेव्हा सर्वांना सरप्राईज द्यायचा माझा इरादा आहे. तुम्ही सांगाल ते पथ्यपाणी, गोळ्या औषधं सगळं करेन पण मला पुन्हा पूर्वीसारखं व्हायचंय! ”
एक डॉक्टर म्हणून मला तिच्या कटात सामील होण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिचा विशीतला फोटो नजरे समोर ठेऊन !!
(४/३/२०२४ रोजी झालेल्या ‘ वर्ल्ड ओबेसिटी डे ‘ निमित्त.)
© डॉ. जयंत गुजराती
नासिक
मो. ९८२२८५८९७५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈