☆ “मनातला पाऊस” – लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
श्री मयुरेश उमाकांत डंके
॥मनातला पाऊस॥
(देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका ***)
काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती.
अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.
पहाटे साडेतीन च्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला)
पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे.
कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का?
काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला.
“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.”
“मग?”
“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”
“मग तुम्ही काय केलंत?”
“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”
“मग आता?”
“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”
त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं.
“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो.
ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”
“मग काय, पैसे कमवू नयेत का?”
“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”
“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी.
“ पण, ती फसवतीलच हे कशावरून?”
मी पुन्हा सपशेल आडवा.
“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”
शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं.
“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं.
मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं.
“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले.
“तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?”
“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती.
“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”
आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो.
“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं.
“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”
त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
☆
१३ जुलै. तब्बल पावणे चारशे वर्षे होत आली. हिंदवी साम्राज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला तोच हा दिवस. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन खिंड पावन झाली, तोच हा दिवस.
बाजी, आजही तुम्ही तेथे लढता आहात का? आज ही तुमचे कान ५ तोफांचे आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत का? आजही तुम्ही तुमच्या शूरवीर मावळ्यांच्या समवेत अभेद्य अशा खडकाप्रमाणे उभे आहात का?
बाजी, तुम्ही आपल्या स्वामी-भक्तिचा संदेश केवळ मराठी मनालाच नव्हे, महाराष्ट्रलाच नव्हे तर संपूर्ण जगताला देऊन अमर झाला आहात .आणि म्हणूनच प्रत्येक मराठी मनात, प्रत्येक मराठी ओठावर
☆ अन्नपूर्णेची परिक्षा— ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆
मी राधिका गोपीनाथ पंडित. माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा.”अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.
लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे.
असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला…
मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची.
एकदा शाळेत जाताना आईने मला त्या गुरुजींना “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले.
धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पूजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी माजगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय.”
गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली.”
ते काय पुटपुटले ते मला काहीच कळल नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरं .
इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरूजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.
आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या,’ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं.
तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर..”
गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो.”
तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. साडे बारा ला नक्की जेवायला या हं!. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल”. आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्ह ता.
आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली गेली आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता.
“बसा नं जेवायला. माझ्या मुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला.” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न- प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे.
आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, च विष्ट होतं जेवण. खरं सांगू!माई आमची मंडळी गेल्या पासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.
आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरूजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी. इकडे आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होत. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.
त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला माझ्या मोठ्या बहिणीने लीलाने गाठले.आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्या मुळे बघ आईला केवढा त्रास झाला,’ असं म्हणून भरपूर झापलं.
मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली.
माझ्या क्षमाशील आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले.”
तर, असा सकारात्मक विचारांचा धडा आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणू काही..
अणुशक्ती नगर मधल्या माझ्या एका मैत्रिणीला दोन्ही मुलगेच होते.आम्हा सर्वांची मुलं एकत्रच लहानाची मोठी झाली. जेव्हा आमची मुलं काॅॅलेजातही जायला लागली तेव्हा आमच्या group मधली ती मैत्रीण आम्हाला म्हणाली की ‘ मला दोन्ही मुलगेच आहेत ग. कधीकधी ना मला, आज ना उद्या त्यांची लग्नं होऊन
घरी सुना येतील या विचाराची भीतीच वाटते. काय माहीत मला कशा सुना मिळतील….? हल्लीच्या मुलींच्या इतक्या गोष्टी ऐकतो ना आपण…. !’
आम्हाला तर तिचं बोलणं ऐकून हसूच आलं.आम्ही तिघी मैत्रिणी दोन दोन मुलीवाल्या होतो.आम्ही
म्हटलं की ‘ आम्ही मुलींच्या आयांनी घाबरायचं , त्यांना घर कसं मिळेल.. ? सासरची माणसं कशी असतील..म्हणून. तर तूच काय घाबरते आहेस… ?’ मग आम्ही सर्वांंनी तिची समजूतही
घातली आणि चेष्टाही केली. पण तिच्या मनात या विचाराने घर केलेलं होतंच.
एकदा आम्हाला आमच्या काॅलनीतल्या एक ओळखीच्या बाई भेटल्या.त्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या.त्यांना पण दोन्ही मुलगेच होते आणि त्यांची लग्नं झालेली होती.
त्यांच्याशी गप्पा मारताना माझी मैत्रीण त्यांना म्हणाली, ‘तुम्हाला दोन सुना आहेत. तुम्हाला टेन्शन नाही का येत त्यांच्याशी बोलताना किंंवा वागताना… ?’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘ नाही हो. या मुली तशा चांगल्या असतात. फक्त त्यांच्या बाबतीत आपण काही पथ्यं पाळली ना , की काहीच प्रॉब्लेम येत नाही.मग सुनांचे आपल्याशी संबंध कायम गोडीगुलाबीचेच राहातात.
माझ्या मुलांची लग्नं ठरल्यानंतर लगेेचच, ‘घरात सून आली की तिच्याशी कसं वागायचं ‘ते मी ठरवून टाकलेलं होतं.
– – पहिली गोष्ट म्हणजे तिला कधीही कुठल्याही बाबतीत टोकायचं नाही…मुुळात तिच्याकडून फार
अपेक्षाच ठेवायच्या नाहीत..!
आता समजा मुलगा आणि सून अचानक बाहेर जायला निघाले, तर ‘कुठे जाता? कधी येणार.. ?जेवायला असणार का….. ?’ यातलं काहीही त्या दोघांना विचारायचं नाही… !
कधी मुलाने येऊन सांगितलं की ‘ ‘आज ‘ही’ office मधून येताना परस्पर माहेरी जाणार आहे राहायला..’
तर त्यावर ,’ किती तारखेला परत येणार… ?’असा प्रश्न विचारायचा नाही.किंवा ‘ तिनेच का नाही मला
सांगितलं.. ? तू मध्यस्थ कशाला हवास.. ? मी काय तिला नको म्हणणार होते का..?असलं
काहीही बोलायचं नाही. फक्त ”बरं !” एवढंच म्हणायचं.
जर मुलगा सून खरेदी करून आले आणि मुलगा म्हणाला की दुकानात नेमका सेल लागलेला होता.म्हणून हिने चपलांचे तीन जोड घेतले. तर, ‘चपलांचे चार जोड आधीचेच घरात पडले आहेत.आता हे कशाला हवे होते? आम्ही तर चपलांचा एकच जोड तुटेपर्यंत वापरायचो..!’ असं पुटपुटायचं सुद्धा नाही..काय
म्हणायचं.. ? ” हो का … बरं… !”
कधी सून म्हणाली की,’आई , आज माझ्या 5- 6 मैत्रिणी येणार आहेेत घरी. तेव्हा तुम्हालाआणि
बाबांंना आज संध्याकाळी TV वरच्या संंध्याकाळच्या serials नाही बघता येणार. मग तुमच्या खोलीतच बसून राहाण्यापेक्षा संध्याकाळी तुम्ही थोडावेळ गार्डनमधे जाल का..?म्हणजे तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि माझ्या मैत्रिणींनाही मोकळं वाटेल.’तर ह्यावर आपण काय म्हणायचं…..? ” बरं…!”
समजा त्या दोघांचा अचानक बाहेेर जेवायला जायचा बेत ठरला तर मुलगाच सांगेल तुम्हाला.’आई
आम्ही बाहेर जातोय.बाहेरून जेवूनच येऊ. तर ‘ अरे मग आधी सांगायला काय झालं होतं… ? बाईला चार पोळ्या कमीच करायला सांगितलं असतं ना ? आता सगळं अन्न उरणार. आणि उद्या आम्हाला सगळं शिळं खावं लागणार… !’ अशी कुरकुर करायची का…?छे …छे… !
मग आपण काय म्हणायचं..? ” बरं !”
आजकाल तर अगदी दिवसाआड Amazon मधून खरेदी केलेली parcels घरी येत असतात. मुलं
दिवसभर घरात नसतातच.तेव्हा आपणच ती घेऊन ठेवतो.पण ती अजिबात उघडायची नाहीत. संध्याकाळी सून घरी आल्यावर, कपाळावर अगदी एकही आठी न घालता, शांतपणे ‘ हे तुझं काय काय मागवलेलं आलंय बरं का ग ‘ असं म्हणून सगळं तिच्या ताब्यात द्यायचं.’एवढं काय काय मागवलं आहेस… ?’ असं ही विचारायला जायचं नाही.. आणि तिने दाखवलंच तर ”वा.. छान.. !”‘ म्हणायला देखील विसरायचं नाही.
अगदी, आपल्याला नातू किंवा नात झाल्यानंतर, पाच सहा महीन्यांनी कामावर हजर होताना जर सून म्हणाली की ‘आता रोज office ला जाताना मी बाळाला माझ्या आईकडेच सोडून जात जाईन आणि संध्याकाळी येताना घेऊन येत जाईन.’ तर अशा वेळी, तुुमच्यात अगदी बाळाला सांंभाळायची आवड आणि ताकद दोन्ही असली तरीदेखील फक्त एकच दोन अक्षरी मंत्र उच्चारायचा …!
सांंगा कोणता….? ” बsssरं…! “
‘फक्त हा एकच ‘मंत्र’ तुम्ही सदैव जपत राहिलात, तर मग तुमचं मुलाशी नि सुनेशी असलेलं नातं अगदी निश्चित छान राहील….!’
….खरंतर हा मंत्र मुलांच्या आणि मुलींच्या, दोन्ही आयांनी पक्का लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
एकूणच मुलांच्या संसारात कोणतीच लुडबूड करायची नाही. की त्यांना सल्ले द्यायलाही जायचं
नाही…मग कित्ती सोपं होऊन जाईल ना सगळं….?
मात्र कायम हे लक्षात असू दे की कधीकधी,अगदी सोप्प्या वाटणा-या गोष्टीच सगळ्यात कठीण असतात
लेखिका : सुश्री मंगला खानोलकर
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
यशला तर खरं म्हणजे इथे येण्याची इच्छाच नव्हती.काय तर म्हणे..हे गुरुजी तुला चांगला मार्ग दाखवतील.त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे.तसं म्हटलं तर समस्या अशी नव्हतीच.तीशी उलटुन गेली.. अजुनही यशचं लग्न जमत नाही..ही बाबांच्या मते समस्या होती..यशच्या द्रुष्टीने नव्हती.
बाबांचा खुपचं आग्रह झाला म्हणून यश आता शिखरे गुरुजींकडे आला होता.बरोबर आणलेली कुंडली त्याने गुरुजींच्या समोर ठेवली.गुरुजींनी ती कुंडली बघितली. पंचांग उघडलं.. बाजुला असलेल्या पाटीवर पेन्सिलने काही तरी आकडेमोड केली..बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी यशला सांगितलं..
“तुमच्या कॉलनीत गजानन महाराजांचं मंदिर आहे.तु गुरुवारी त्या मंदिरात जायचं.. दुर्वा फुलं वहायचं.. आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या.बघु..कसं लग्न जमत नाही ते.”
यशला ते काही पटलं नाही.त्याने तसं सांगितलं सुध्दा.गजानन महाराजांना.. किंवा कोणत्याही देवाला प्रदक्षिणा घातल्याने नक्की काय मिळते? पण मग गुरुजींनी त्याला समजावून सांगितले. त्यामुळे आपण देवाच्या सान्निध्यात अधिक काळ रहातो.एका जागी बसुन चिंतन करणे..हा एक मार्ग झाला.आणि प्रदक्षिणा घालणे हा दुसरा.प्रदक्षिणा घालण्याने एक गोष्ट मात्र हमखास होते..ती म्हणजे चालण्याचा व्यायाम.
मग शिखरे गुरुजींनी त्याला वेगवेगळ्या प्रदक्षिणांबद्द्ल माहिती द्यायला सुरुवात केली.मंदिर लहान असेल तर कमी वेळात प्रदक्षिणा होतात..मोठे असेल तर जास्त वेळ लागतो. त्रिंबकेश्वरला ब्रम्हगिरी पर्वत आहे.हा पर्वत म्हणजे साक्षात शिवाचे रुप.श्रावण महिन्यात या ब्रम्हगिरीलाच प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविक येतात.ही प्रदक्षिणा पुर्ण करण्यासाठी साधारणपणे एक दिवस लागतोच.श्रावणसरी अंगावर झेलत..ओम नमः शिवाय चा जप करत शेतातून,नदितुन वाट काढत ही प्रदक्षिणा पुर्ण केली जाते. या प्रदक्षिणेने धार्मिक पुण्य किती मिळते हा वेगळा भाग.एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्याचा आनंद मिळतो तो खरा महत्वाचा.
देवाला आपल्या उजव्या हाताला ठेऊन फेरी मारणं म्हणजे प्रदक्षिणा.याला कोणी फेरी म्हणतात..कोणी परिक्रमा म्हणतात..तर कोणी उजवी घालणं असंही म्हणतात.प्रदक्षिणा का घालायची?त्यांचं काय महत्त्व आहे? हे विषद करणारा एक संस्कृत श्लोक आहे.
यानि कानि च पापानी
जन्मांतर कृतानी च
तानि सर्वाणि नश्यन्तु
प्रदक्षिणे पदे पदे.
म्हणजे..
आमच्याकडुन कळत नकळत झालेली.. आणि पुर्व जन्मातील सर्व पापे या प्रदक्षिणा करता करता नष्ट होऊन जावो.
प्रदक्षिणा म्हटलं की आठवते ती नर्मदा परिक्रमा. एखाद्या नदीला संपुर्ण प्रदक्षिणा घालण्याची कल्पनाच अभिनव.मेघदुत या महाकाव्यात कवी कालिदासाने नर्मदा नदीचे वर्णन खुपच सुंदर केले आहे.तिची वळणे.. मध्ये मध्ये येणारे छोटे मोठे डोंगर .काठावर डुलणारी उंच उंच झाडे.. घनदाट अरण्ये हे सगळंच परिक्रमा करणार्यांना आकर्षुन घेतं.नदीच्या किनार्यावर असलेली गावे..मंदिरे..बदलत जाणारे समाज जीवन या सर्वांच्या सोबतीने वाटचाल करणं हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
अलीकडे वाहनात बसुन नर्मदा परिक्रमा करण्याचं प्रमाण वाढलं आहे.पण शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमा करायची असेल तर त्यासाठी तीन वर्ष.. तीन महिने.. तेरा दिवसांचा कालावधी सांगितला आहे. परीक्रमेला बहुधा ओंकारेश्वर येथुन सुरुवात केली जाते.पण तसा नियम नाही.बाकी नियम मात्र भरपूर आहे.परीक्रमे दरम्यान नर्मदा नदीचे पात्र ओलांडून जाता येत नाही.सोबत फारसं सामान नसावं.सदावर्तात जेवण करावं.नाही तर पाच घरी भिक्षा मागावी.त्यात मिळालेल्या शिधा घेऊन तो रांधावा.मिळेल ते पाणी प्यावं.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत ‘ओम नर्मदे हर..’ हा मंत्र जपावा.
नर्मदा परिक्रमा केल्यावर तेथील अनुभव अनेक जण शब्दबद्ध करतात.ते सर्वच वाचनीय असतात.जगन्नाथ कुंटे यांनी अनेक वेळा नर्मदा परिक्रमा केली.’नर्मदे हर हर’.. आणि ‘साधनामस्त’ या पुस्तकांमधून ते आपल्याला नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जातात.
यशला या निमित्ताने बरीच माहिती मिळाली.गुरुजींचं म्हणणं त्यांना पटलं.दर गुरुवारी तो मंदिरात जाऊ लागला.मनोभावे प्रदक्षिणा घालु लागला.मधल्या काळात त्यानं गजानन विजय ग्रंथाचे पारायण ही केलं.
आणि खरोखरच यशच्या सेवेला यश मिळालं. आज यशचा लग्न समारंभ साजरा होत होता.आताही तो प्रदक्षिणा घालत होता..ती म्हणजे सप्तपदी.हो..ती पण एक प्रदक्षिणाच..प्रज्वलित अग्नीभोवती..देवां.. ब्राम्हणांच्या साक्षीने घातलेल्या या सात फेर्यानंतर वैवाहिक जीवनाचा प्रारंभ होतो.गजानन महाराजांना घातलेल्या प्रदक्षिणेचं फळ आज त्याला सप्तपदीच्या प्रदक्षिणेच्या रुपाने मिळालं होतं.
“I FEEL I WANT TO GO BACK IN TIME,NOT TO CHANGE THINGS BUT TO FEEL A COUPLE OF THINGS TWICE…
I WISH I COULD GO BACK TO SCHOOL NOT TO BECOME A CHILD BUT TO SPEND MORE TIME WITH THOSE FRIENDS,I NEVER MET AFTER SCHOOL.”
माझं अगदी असंच काहीसं झालेलं आहे.
आम्ही मुलं नगरपालिकेच्या शाळेत शिकलो. म्हणजे माझं प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झालं. माझ्या शाळेचे नाव शाळा नंबर १२. घरापासून अगदी जवळच आमची शाळा होती. माझ्या काही बालमैत्रिणी शाळा नंबर चार मध्ये जात तर मुलगे दगडी शाळेत जात. आमची शाळा फक्त मुलींची होती. शाळेची अशी नावं आठवली तरी आता गंमत वाटते. लिटिल मिलेनियम स्कूल, ब्लूमिंग पेटल्स, किडझी. स्माईल अशी आकर्षक नावं असलेल्या शाळा तेव्हा नव्हत्याच. नर्सरी, प्लेग्रुप्स यांची ओळखही नव्हती म्हणजे शिशुविहार, बालक मंदिर वगैरे सारखे काही खासगी शैक्षणिक समूह होते पण आमच्या शिक्षणाची सुरुवात मात्र शाळा नंबर १२ या नगरपालिकेच्या शाळेपासूनच झाली.
त्यावेळी ठाण्यात एक कॉन्व्हेंट स्कूल होतं. सेंट जॉन द बाप्टीस्ट हायस्कूल पण मला वाटतं आमची पालक मंडळी मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान बाळगणारी होती. आपल्या मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे याच विचारांची होती. कदाचित आपल्या मुलांना एखाद्या मिशनरी इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये का पाठवू नये असा विचारही त्यांच्या मनाला तेव्हा शिवला नसेल आणि आमच्या बालमनावरही नगरपालिकांच्या शाळांतून मिळणारं शिक्षण हेच खरं शिक्षण असा काहीतरी विचार पक्का केला असावा आणि त्यावेळी आमचा जो मराठी माणसांचा एक गट होता त्यातली सगळीच मुलं मराठी आणि नगरपालिकांच्या शाळेतून शिकत होती. त्यामुळे याहून काहीतरी उच्च, दर्जेदार असू शकतं हा विचार त्यावेळेच्या मुलांच्या मनात कशाला येईल? मात्र काही अमराठी मुलं आमच्या परिसरात होती आणि ती मात्र कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. याचा परिणाम असा झाला की नकळतच इंग्लिश माध्यमातून शिकणारी मुलं आणि मराठी माध्यमातून शिकणारी मुलं यांच्यात संस्कृतीच्या भिंती त्यावेळी निर्माण झाल्या. या भिंती थेट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत टिकल्या.
टेंभी नाक्यावर टाऊन हॉल समोर बारा नंबर शाळेची इमारत होती. ब्रिटिश कालीन दगडी इमारत होती ती! शाळेला मागचं— पुढचं अशी दोन प्रवेशद्वारे होती. मागच्या बाजूला पटांगण होतं आणि ते रस्त्याला लागून होतं पुढचे प्रवेशद्वार हे मुख्य द्वार होते आणि नऊ दहा लांबलचक अशा दगडी पायऱ्या चढून आमचा शाळेच्या मधल्या आवारात प्रवेश व्हायचा आणि त्याच्या डाव्या उजव्या बाजूला वर्ग होते.
शाळेच्या समोर चाळ वजा घरे होती. अडचणीची, खडबडीत बोळातली आणि अरुंद घरात दाटीवाटीने राहणारी, खालून पाणी भरणारी, भाजीपाला किराणाच्या पिशव्या सांभाळणारी, सायकलवरून कामाच्या ठिकाणी जाणारी, जीवनाची दहा टोकं एकमेकांशी जुळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी माणसं होती ती. वयाच्या सहाव्या वर्षापासून डोक्यात बसलेलं हे जीवन आज इतकी वर्ष झाली, स्वतःच्याच आयुष्यात इतकी स्थित्यंतरे झाली. एका उजळ वाटेवरून प्रवास होत गेला तरीही ही चित्रं पुसली गेली नाहीत.
बारा नंबर शाळेच्या त्या दगडी पायऱ्यांवर दहा मिनिटाच्या आणि अर्ध्या तासाच्या सुट्टीत बालमैत्रिणींसोबत केलेल्या गप्पा, गायलेली बडबड गीते आणि चवीने चोखत खाल्लेली आंबट चिंबट चिंचा बोरं, एकमेकांना दिलेली सोनचाफ्याची फुलं आजही आठवतात.
एक छोटसं दफ्तर… शाळेत जाताना आईच दफ्तर भरायची. त्यात एखादं पाठ्यपुस्तक, काळी दगडी पाटी आणि पेन्सिल आणि मधल्या सुट्टीत खायचा डबा एवढेच सामान शाळेसाठी आम्हाला पुरायचं. आमच्या शालेय जीवनाचं नातं होतं पाटी— पेन्सिल, खडू —फळा आणि बुटके लांबलचक वर्गात बसायचे बाक यांच्याशी.
एकेका वर्गाच्या अ ब क ड अशा तुकड्या असायच्या.”अ तुकडीतली मुलं हुशार आणि “ड” तुकडीतली मुलं ढ!
“ढ” हे अक्षर मला तेव्हा फार त्रासदायकच वाटायचं कारण “ढ” या अक्षराला माझ्या मते फारशी चांगली पार्श्वभूमी नसताना माझे आडनाव मात्र ढगे होतं.
एक दिवस वर्णमाला शिकत असताना बाई सांगत होत्या “क कमळातला …
“ख” खटार्यातला ..
“ग” गडूतला ..
असं करत करत त्या “ढ”जवळ आल्या आणि माझ्या शेजारी बसलेली रत्ना पेडणेकर नावाची मुलगी मोठ्याने म्हणाली “ढ” ढगेतला.
सगळा बालचमु हसला. माझे डोळे पाण्याने भरले.
बाईंनी मात्र रत्नाला हात पुढे करायला सांगितला आणि तिच्या हातावर सपकन छडी मारली. तिचेही डोळे गळू लागले आणि त्याचेही मला फार वाईट वाटले. पण त्यानंतर मी आणि रत्ना एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रिणी झालो हे नवल नाही का? यालाच मी आमचे बालविश्व म्हणेन.
मात्र त्यादिवशी शाळेतून घरी परतल्यावर मी— संध्याकाळी पप्पा ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना पहिला प्रश्न विचारला होता,
“ आपण आपलं आडनाव बदलू शकतो का?”
त्यावेळी पपा मिस्कीलपणे म्हणाले होते..
“म्हैसधुणे,धटींगण,झोटींग असे आपले आडनाव असते तर..”
शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? मला आजही असं वाटतं नावात खूप काही असतं. सहज आठवलं म्हणून सांगते वरपरीक्षेच्या त्या अप्रिय काळात माझ्या कन्येने “टकले” नावाच्या सर्वगुणसंपन्र स्थळाला केवळ आडनावापायी नकार दिला होता.असो..
रत्ना पेडणेकर ही ठाण्यातल्या एका मोठ्या कलाकाराची मुलगी होती. सिव्हील हॉस्पिटलच्या समोर त्यांचा सुंदर बंगला होता. गणपती उत्सवात तिचे वडील गणेश मूर्ती समोर अतिशय कलात्मक असे पौराणिक कथांवर आधारित देखावे उभे करायचे आणि ठाण्यातली सगळी मंडळी पेडणेकर यांचा गणपती बघण्यासाठी त्यांच्या बंगल्यासमोर प्रचंड गर्दी करायचे.
अशा घरातली ही रत्ना शाळा नंबर १२ मध्ये टांग्याने यायची. सुरेख इस्त्री केलेले तिचे फ्रॉक्स असायचे. तिच्या वडिलांचा ठाण्यात दबदबा होता. हे सांगण्याचे कारण इतकंच की असे असतानाही तिने केलेल्या एका किरकोळ चुकीलाही बाईंनी थोडेसे हिंसक शासन केले पण तिच्या वडिलांनी शाळेत येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. एकदा आपलं मूल शाळेत गेलं की ते शिक्षकांचं. तिथे हस्तक्षेप नसायचा हे महत्त्वाचं. त्यामुळे घर, शाळा, आजुबाजूची वस्ती ही सारीच आमची संस्कार मंदिरे होती. आम्ही सारे असे घडलो. नकळत, विना तक्रार.
१२ ते ५ अशी शाळेची वेळ होती. एक दहा मिनिटांची सुट्टी आणि एक डबा खायची सुट्टी.
सगळे वर्ग एका शेजारी एक. मध्ये भिंत नाही फक्त एक लाकडी दुभाजक असायचा. वर्ग चालू असताना शेजारच्या वर्गातल्या बाईंचा आवाज आणि शिकवणंही ऐकू यायचं. कुठे गणितातले पाढे, कुठे कविता पठण, कुठे उत्तर दक्षिण दिशांचा अभ्यास, कुठे बाराखड्या, तोंडी गणितं आणि अशा सगळ्या खिचडी अभ्यासातून आम्ही एकाग्र चित्ताने शिकत होतो.
“आईने आणssले चाssर पेरू.
माधवने दोन चोरून खाल्ले. किती उरलेsss?
आम्ही आमच्या हाताची चार बालबोटं उघडायचो, दोन दुमडायचो आणि एक साथ उत्तर द्यायचचो
दोssन.
मग बाई म्हणायच्या, “शाब्बास!”
आयुष्यातल्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार या साऱ्यांची सुरुवात जणू काही अदृश्यपणे या शाळा नंबर १२ पासूनच सुरू झाली.
आज नातीचा अभ्यास घेताना लॅपटॉप,टॅब्लेट(यास मी अधुनिक युगातली पाटी असेच म्हणते.) त्यावरचे अभ्यासक्रम, उत्तरे देण्याची पद्धत, आकर्षक पुस्तके, त्यातील रंगीत चित्रे! एकंदरच दृक् श्राव्य अभ्यासाचं बदलतं, नवं,स्वरूप बघताना मला माझी बारा नंबरची शाळा हमखास आठवते.
पण इथेच आम्ही शिकलो, वाढलो घडलो.
आजही नजरेसमोर ते फुलपाखरू बागडतं,
“फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू ..”
नाही तर
“देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो ।”
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून
सरसर गोविंदा येतो
मजवरी गुलाल फेकि.तो…
झिम पोरी झिम कपाळाचा भीम
भीम गेला फुटून
पोरी आल्या उठून..
अडम तडम तडतड बाजा
उक्का तिक्का लेशमास
करवंद डाळिंब फुल्ला…
लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली…
अशा सुंदर गाण्यातून खरोखरच आमचं बालपण हसलं, बागडलं.
मला जर आज कोणी प्रश्न विचारला,” मराठी भाषेनं तुला काय दिलं तर मी नक्की सांगेन माझ्या मराठी भाषेने मला असं सुंदर काव्यमय बालपण दिलं.”
आजही त्या शाळेतल्या दफ्तराची मला आठवण येते. माझं दफ्तर आणि माझी आई यांच्याशी माझं एक सुंदर, भावनिक अतूट नातं आहे.
आठवणीच्या पेटीत
एक दफ्तर होतं
एक पाटी होती
दफ्तर जागोजागी
ऊसवलं होतं
पाटीही फुटली होती.
पण पाटीवरची अक्षरं
नव्हती पुसली.
कळायला लागेपर्यंत
आईने रोज
पाटी दफ्तर भरलं
वह्या पुस्तकं,खडु पेन्सीली..
आज आई नाही
पण दफ्तर आहे
पाटी फुटली
तरी अक्षरे आहेत
त्या जीर्ण दफ्तरावर आता
माझाच सुरकुतलेला
हात फिरवताना वाटतं,
हेच तर आईनं
दिलेलं संचीत.
वेळोवेळी तिने
हव्या असलेल्या गोष्टी
आत भरल्या.
नको असलेल्या काढल्या.
हळुच….ऊसवलेल्या ,
दफ्तरात डोकावून पाह्यलं,
त्यात नव्हते मानअपमान,
दु:खं ,निराशा, राग,
होतं फक्त समाधान,
आनंद….तृप्ती!!
एकेका अक्षरात ,
जपून ठेवलेला…
मानवतेचा ओलावा….
खरंच या साऱ्या आठवणींच्या लाटेवर मी तरंगतच राहिले की… आता थोडा ब्रेक घेऊया.
गुरुपौर्णिमेनिमित्त अनेकांचे संदेश आले – काही वैयक्तिक तर काही समूहांमधून. खूप बरे वाटले. व्हॅलेंटाइन दिवस, १ जानेवारीला नव वर्ष मानणे, Thanksgiving day, अशा पाश्चिमात्य रुढीत नव्या पिढीला आपल्या येथील पवित्र दिवसांची आठवण राहिली याचे निश्चितच कौतुक वाटले. तरीही …
हो, तरीही एका गोष्टीचे निश्चितच वैषम्य वाटले.
गुरुपौर्णिमा हा पवित्र दिवस गुरूला नमस्कार करून त्याच्याकडे आशीर्वादाची याचना करण्याचा! तथापि, आलेल्या बऱ्याच संदेशांवर अजूनही पाश्चिमात्य पगडा दिसत होता. काही संदेश Happy Gurupornima असे होते तर काही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे होते; गुरूला नमस्कार किंवा वंदन करणारे संदेश तुरळकच होते. हेच इतरही सणांच्या आणि पवित्र दिवसांच्या वेळी घडते. ज्या त्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार उचित संदेश पाठवायला पुढच्या पिढीला शिकविणे हे आधीच्या पिढीचे कर्तव्य आहे. आपला धर्म आणि संस्कृती टिकविण्यासाठी हे अभियान अंगीकारलेच पाहिजे ना!
☆ माऊलींचा हरिपाठ१.… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
प्रिय माउली – –
बा विठ्ठला,
देवा, तू असा आहेस ना ? मनाने तू माउली आहेस आणि दिसतोस मात्र लेकरासाठी, कुटुंबासाठी उन्हांत राबलेल्या, उन्हानं रापलेल्या बापासारखा…..
आमच्या सारख्या सामान्य जीवांना तुला नक्की कोणत्या नावाने हाक मारावी असा संभ्रम पडतो……
मी तुला माउलीच म्हणेन इथून पुढे…..
खरं सांगू का ?
प्रपंचातील कटकटींनी आम्ही पार वैतागून जातो, आम्हाला माहीत असते या सर्वांस आम्हीच किमान ५०% तरी जबाबदार आहोत. (खरेतर आम्ही १००% जबाबदार असतो, पण ती जबाबदारी घेण्या इतपत शहाणपण आणि सामर्थ्य आमच्या अंगी नाही रे…..) पण सर्व दोष आम्ही तुला देतो, तुला माहित असते की लेकरू कावले आहे…, राग व्यक्त करायला त्याला माझ्या शिवाय कोणी नाही, म्हणून तू सर्व शांतपणे ऐकून घेतोस…, देवा, अगदी मनातलं सांगतो, तुझ्यासारखे शांतपणे, एकाग्र चित्ताने ऐकून घेणारे कोणीही नाही रे या जगात…, तू आमचे गाऱ्हाणे ऐकून घेतोस ना, तिथेच आमचे ५०% दुःख निवळते…. आणि बाकी राहिलेले दुःख वागविण्याची ताकद तुझ्या दर्शनाने मिळते….
तुला वाटेल, आज एकादशी आहे म्हणून हा बोलत असेल….
तसे नाही देवा, वरील विचार कायम आमच्या मनात असतो, पण आज तुझ्या घरी तुझे लाडके भक्त आले आहेत, साक्षात ज्ञानेश्वर माउली, तुकोबा, जनी, चोखोबा, नामदेव,…. कित्ती जणांची नावे घेऊ…? खरी माहेर वाशीण घरी आली की घराच्या गड्याला ही गोडधोड खायला मिळते, एखादं वस्त्र मिळत, अगदीच काही मिळालं नाही तर मालकाचे चार प्रेमाचे शब्द मिळतात, आमच्या सारख्या सामान्य भक्ताला ते अमृता सारखे नाहीत काय ?
देवा तुझ्या डोळ्यांत पाणी आले न ? अरे या दोन गोड अमृत असलेल्या शब्दांसाठीच आम्ही वर्षभर आसुसलेले असतो…..
देवा, अपार काळजी मागे सोडून तुझ्या दर्शनासाठी येतो, जे पायाने वारी करू शकत नाहीत, ते मनाने वारी करतात…..
विठू माउली,
तुला सगळंच ठावे….., तरीपण तुझे कौतुक तुला आपल्या लेकरांकडून ऐकायचे असते, म्हणून माझ्या लेखणीतून तू ते लिहून घेतलेस ना….
तूच खरा खेळिया, आणि आम्ही तुझ्या हातातले खेळणे…..
अरे हो, हिने तुझ्याकडे मागण्यासाठी मोठी यादी दिली होती…. पण चंद्रभागेत स्नान करताना वाहून गेली….. आता, घरी गेल्यावर मी तिला काय सांगू….? अरे मी काही सुदामा नाही की तू मला सोन्याची नगरी भेट द्यावी…. एकच कर, माझी आणि माझ्या पत्नीची मागण्याची इच्छाच नष्ट कर…. हे तुला करायला आवडेल….
तुझ्या मनातलं बोललो ना….?
मी तुझेच लेकरू आहे, तुझ्या मनातलं थोडेसे मला कळणारच…..
बरं, आता परतीला निघतो…
जाताना रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जातो….
देवा, आणखी एक गोष्ट मागाविशी वाटते…, मागू का ?
तू नाही म्हणायच्या आधीच मागतो…..
.. तुझ्या नामाचे प्रेम दे……!
देशील ना ?
तुझाच
एक वारकरी…..!
शब्दांकन:- संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य )
मो। ८३८००१९६७६
*********
वारकऱ्यांच्या पत्राला माउलीचे उत्तर ..
लेकरा,
अनेक आशीर्वाद.
तुझं कौतुक व्हावं म्हणून मी तुझ्याकडुन पत्र लिहून घेतलं असे तू लिहिलेस….
बाप से बेटा सवाई हेच खरे….
तुम्हीच मला सगुण रूप दिलेत, त्यामुळे सगुणाचे गुण मला येऊन चिकटणार यात नवल ते काय ?
निर्गुण निराकार असलेल्या मला आपण विविध आकार देऊन साकार केलेत. रंग रुपाप्रमाणे मला विविध नावे दिलीत आणि माझे माहात्म्य विविध प्रकारे असे काही वर्णन केलेत की मला तसेच प्रगट व्हावे लागले, आणि पुढेही…….
असो….
लेकरा, यावर्षी तू पायी वारीला न येता मानसिक वारी केलीस…. तुझी नवीन कल्पना मला अधिक भावली…. शेवटी तुझ्या अंतरात असलेलं मन मीच आहे आणि त्यानेच तू वारी केलीस…..
व्वा!! खूप छान!!
मी आपल्या सर्वांसाठी विठू माउली नक्कीच आहे, पण माझे खरे रूप ओळखून तुम्ही माझ्या ज्ञाना, तुका, जनी, चोखामेळा, सखू सारखे संत व्हावे असे मला वाटते…
पिंडी ते ब्रम्हांडी या उक्तीची अनुभूती तुम्ही घ्यावी असे मला वाटते…..
माझ्या लेकीने (गडबडू नकोस, तुझ्या बायकोने) दिलेली यादी चंद्रभागेमध्ये मीच वाहू दिली…. कारण तुला ती यादी पुढे करताना खूप अवघड झाले असते….., प्रेमात कोण, कुठे आणि कसली मागणी करणार….सगळा त्यागाचा मामला……
– अरे साऱ्या सृष्टीची काळजी मी घेतो, तुला वाऱ्यावर सोडेन….? घरी गेलास की बघ, सारे घर माझ्या सान्निध्याने भारलेले असेल……
एक वचन देतो तुला बाळा,
तू यत्न कसून कर, शर्थीने प्रयत्न कर. मग, यश तुझेच आहे…., पडायला लागलास तर सावरायला मी आहेच….. निर्धास्तपणे जा, जपून रहा. मी तुझ्या सोबत आहे की नाही याची काळजी करू नकोस…
एक मात्र कर. तू सतत नाम घेत रहा म्हणजे तुझ्या सोबत रहायला मला अडचण वाटणार नाही…..
☆ “बूट पॉलिशची डबी” – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर☆
नेहमीचीच व्यस्त संध्याकाळ, डोंबिवली स्थानकातली, बिन चेहऱ्याची. स्त्री पुरुषांची घरी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आटापिटा करणारी गर्दी. दिवसभराच्या श्रमाने थकलेले, घामेजलेले चेहेरे. मी ही त्यांच्यातलाच एक. कल्याण दिशेकडल्या पुलावरून घरी जायच्या ओढीने, पाय ओढत निघालेला, पाठीवर लॅपटॉपची गोण घेतलेला पांढऱ्या सदऱ्यातला श्रमजीवी. असे असंख्य जीव सोबत चालत असलेले, माझ्यासारखेच श्रांत. आता लवकर रिक्षा मिळेल, का परत मोठ्या लांबलचक रांगेत जीव घुसमटत राहील या विवंचनेत. माझं एक बरं असतं. मी आपला चालत चालत थोडीफार खरेदी करत घरी जातो. रिक्षाच्या भानगडीत पडतच नाही कधी. तो नकार ही नको आणि ती अरेरावीही नको पैसे देऊन. विकतचं दुखणं नुसतं!!!
आज पण तसाच विचार करत जात असताना पुलाच्या कडेशी एक अंध विक्रेता दिसला. बूट पॉलिशच्या डब्या आणि ब्रश विकत असलेला. बऱ्याच दिवसांपासून एक पॉलिश ची डबी घेऊन घरच्या घरी बूट चमकवायचा मी विचार करत होतो. मागे पण असा प्रयत्न केला होता पण डबी आणायचो, एकदोनदा उत्साहात पॉलिश करायचो आणि मग मावळायचा उत्साह. डबी अडगळीत पडायची आणि मग नंतर कधीतरी परत वापर करावा म्हंटलं तर आतलं मलम वाळून कडकोळ झालेलं असायचं. या वेळी मात्र खूप जाज्वल्य वगैरे निश्चय केला आणि त्या विक्रेत्यापाशी रेंगाळलो.
या लोकांना कसं कळतं कोणास ठाऊक, पण मी उभा आहे समोर हे कळलं त्याला आणि काय हवंय विचारलं मला त्यानं . मी थोडा वाकलो त्याच्या समोर आणि म्हणालो काळं पॉलिश हवंय. त्याने हात लांब करून तपकिरी झाकणाची एक डबी उचलली आणि म्हणाला घ्या. मी म्हणालो, अहो ही तर तपकिरी आहे. मला काळं हवंय पॉलिश. म्हणाला आत काळं पॉलिशच आहे. मी चक्रावलो. घरी तांदुळ लिहिलेल्या डब्यात डाळ आणि डाळीच्या डब्यात पोहे हे ठाऊक होतं पण इथेही तेच बघून जाम आश्चर्य वाटलं मला. मी म्हणालो नक्की ना? बेलाशक घेऊन जा म्हणाला. नसेल काळं तर नाव बदलेन!!
उघडून बघू का ? विश्वास नसेल तर बघा !! काय तो आत्मविश्वास !!! मी न उघडता डबी खिशात ठेवली.
किती द्यायचे? ५० रुपये. मी नाही घासाघीस करत अशा विक्रेत्यांशी. सांगितलेली रक्कम देतो त्यांना आढेवेढे न घेता. QR code दिसतोय का बघितलं त्याच्या शेजारी. नव्हता दिसत. मी पाकीट काढलं आणि जांभळी, नवी १०० ची नोट दिली त्यांच्या हातात. चाचपली त्यानं आणि म्हणाला साहेब आज अजून बोहनी नाही झाली. ५० नाहीयेत माझ्याकडे परत द्यायला. पंचाईत झाली आता. मी माझ्या पाकिटात ५० ची नोट किंवा सुट्ट्या नोटा आहेत का ते शोधलं, पण नव्हते. थांबलो दोन मिनिटं, पण कोणीच गिऱ्हाईक येत नव्हतं त्याच्याकडे. मी म्हणालो, जाऊद्या ठेवा तुम्ही ५० रुपये तुमच्याकडे, मी उद्या संध्याकाळी घेईन परत.
अचानक तो म्हणाला उद्याचा काय भरोसा साहेब? मी असेन नसेन. कोणी पाह्यलंय ? तुमच्या पन्नास रुपयांचं ओझं नको मला डोक्यावर. मी परत बघितलं त्याच्याकडे, गळ्यात तुळशीमाळ वगैरे नव्हती पण तत्व आणि स्वत्व तेच जाणवत होतं. डोळ्यातले नव्हे पण मनातले भाव वाचता येत होते त्याच्या, स्पष्ट. तिढा पडला होता. मी उपाय काढला. त्याला म्हणालो, तुम्ही शंभर ठेवा, मी दोन डब्या घेतो. उद्या संध्याकाळी एक परत करेन आणि उरलेले पन्नास घेऊन जाईन.
हे ऐकल्यावर चेहरा खुलला त्याचा. चालेल म्हणाला. फक्त डबी उघडू नका. मी हो म्हणालो. एक संपवायची मारामार असताना दोन डब्या घेतल्या. त्याला विचारलं एक फोटो काढू का ? खुशाल काढा म्हणाला. मी कसा दिसतो ते मलातरी कुठे ठाऊक आहे…. मी भांबावून बघतच राहिलो त्याच्याकडे. गर्दीत कसाबसा त्याचा फोटो काढला आणि निघालो घराकडे.
आज आठवडा झाला. मी रोज जातो त्याच्यासमोरून, त्याच्याकडे बघत आणि संभाषण आठवत. बूट पॉलिश विकणाऱ्या, डोळ्यांनी अंध पण मनाने डोळस असणाऱ्या त्याच्यातल्या प्रामाणिकपणाला प्रणाम करत, मनोमन. ती डबी अजून तशीच आहे माझ्याकडे. नाही परत केली मी. वापरली जाणार नाही ती कदाचित माझ्याकडून, पण ठेऊन देईन एका आंधळ्याच्या डोळसपणाची आठवण म्हणून…
आणि हो, सांगायचं राहिलंच, तपकिरी झाकणाच्या डबीत काळंच पॉलिश होतं !!!
लेखक : श्री पराग गोडबोले.
प्रस्तुती : मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈