☆ बहीण… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
आईनंतर सर्वात जवळचे नाते कोणते असेल तर ते बहिणीचे. बहीण लहान असावी की मोठी यावर वाद होऊ शकतो पण बहीण असावीच असे प्रत्येकाचे मत असेल असे खात्रीने वाटते. ताई आणि माई. – घरात मोठी मुलगी असेल तर घराला आपसूक वळण लागते असे माझे मत आहे. जे आपण आई किंवा बाबांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या बहिणीला नक्की सांगू शकतो. मन मोकळं करण्यासाठी सर्वात खात्रीचे, जवळचे कोण असेल तर बहीण, कारण तिच्यात आणि आपल्यातील वयाचे अंतर फार नसते त्यामुळे ती आपली मनःस्थिती अधिक सजगतेने समजून घेऊ शकते. कधी ती आपली ‘ढाल’ बनते तर कधी ‘तलवार’!!
बहीण लग्न होऊन प्रथम सासरी जायला निघते तो क्षण भावाच्या आयुष्यातील सर्वात कसोटीचा !! जरी ती सासरी गेली तरी तिची नजर कायम आपल्या भावंडांवर असते. पुढे कालांतराने आई वडील नसले तरी बहिणीमुळे भावाला एकाकीपण येत नाही. ती आपल्या आयुष्यात सावलीसारखी असते. ती शीतल छाया जरुर देते पण आपल्या आयुष्यात अडसर बनत नाही. द्रौपदीने हरीला चिंधी बांधली आणि तिच्या आयुष्याचे ‘सोने’ झाले. *’बहिण अथवा भावासाठी आपल्या आयुष्याची ‘चिंधी’ करणाऱ्या अनेक बहिणी या जगात आहेत. आज आपण त्यांना वंदन करू.
☆ पैठणीवरचं नक्षीदार नातं… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
झी मराठीवर होममिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झालेला होता. रोज संध्याकाळी हा कार्यक्रम बघण्यात आमचं कुटुंब एकत्र बसलेलं असायचं. आणि आमच्या वहिनीला इथंच स्वप्नं पडायला सुरुवात झाली. की, होम मिनिस्टर माझ्याही घरी यावा. मलाही पैठणी मिळावी. आणि आपणही टीव्ही वर दिसावं. आणि वहिनी कार्यक्रम संपल्यानंतर आदेश भावजी जो नंबर सांगायचे त्यावर ती रोज मेसेज करू लागली. मी म्हणायचो तिला, “अगं वहिनी ते कशाला येतील आपल्या घरी एवढ्या दूर, ते फक्त पुणे मुंबईतल्याच घरी जात असतात. तू हा नाद सोडून दे. ” त्यावर वहिनी म्हणायची, “नितीन भावजी, बघा एक ना एक दिवस आपल्या घरी होममिनिस्टर येणारच असं म्हणून ती तिच्या कामात व्यस्त व्हायची. आणि मी त्यावर थोबाड बघावं आपलं आरशात” असं बोलून पळून जायचो. त्यावर ती मागून ओरडायची. ” या गिळायला मग बघते कोण देतंय ताट वाढून असं चिडून बोलायची. “आणि घरातले सगळेच खळखळून हसायचे. पण वहिनी अगदी पार त्यात गुंतून गेलेली असायची. प्रत्येक कार्यक्रम तो जवळ बसून बघायची. एकटीच उगाचच हसायची, मोठ्याने खिदळायची. मला गम्मतच वाटायची.
माझी बारावी झाली. आणि मी पुण्यात आलो. काम करून शिकायला लागलो. अधून मधून फोनवर दादाशी आणि वहिणीशी बोलणं व्हायचं. तिला कधी करमत नसलं की ती मला फोन करायची. मला करमत नसलं की मी तिला फोन करायचो. कारण तिच्याच मायेच्या पदराखाली मी मोठा झालो. सुनिता वहिनी माझ्यासाठी आई होती, मोठी बहीण होती, आणि मनातलं सगळं मनमोकळेपणाने बोलण्यासाठी हक्काची जागा होती.
मला तो दिवस आठवतोय. मी कंपनीमध्ये बसलो होतो. आणि समोर लँडलाईन फोन होता. चला म्हणलं वहिनीची जरा गंमत करूया. असं म्हणून मी रुमाल तोंडाला लावला आणि वहिनीला फोन केला, हा लँडलाईन चा नंबर बघून तिने तो कट केला. मी परत लावला मग तिने उचलला. मी जरा मोठ्या आवाजात रुमाल तोंडाला लावून अगदी शुद्ध पुणेरी भाषेत बोललो, “हॅलो, नमस्कार सुनिता चंदनशिवे यांच्याशी आम्ही बोलतोय का?”वहिनी घाबरत होय म्हणाली, मी लगेच पुढचं वाक्य बोललो, “ह आम्ही झी मराठी मधून होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून बोलतोय आणि आम्ही उद्याच तुमच्या घरी कवठेमहांकाळ ला म्हणजे सांगलीला येतोय. आपली परवानगी आहे असे आम्ही समजावे का?” त्यावर वहिनी मोठ्याने तीन वेळा ” या या या” असं म्हणली. बाकीचं जरा इकडंच तिकडचं बोललो, आणि “उद्या संध्याकाळी आम्ही बरोबर पाच वाजता आपल्या घरी येत आहोत” असं म्हणून मी फोन कट केला. नंतर मी कामात व्यस्त होऊन गेलो. वहिनीला फसवलं याचा मनात आनंद झालेला होता. पण आनंदाने उड्या मारण्याचं माझं वय आता निघून गेलेलं होतं.
गावी मात्र सुनिता वहिनीने सगळीकडे बोंबलत ही बातमी आनंदाने पसरवली. भावाला कामावरून सुट्टी काढून बोलावून घेतलं. तिचा आनंद बघून सगळेच आनंदी झाले. साफसफाई सुरू झाली. नव्या दोन साड्या आणल्या. ही बातमी बायकांच्या जवळची असल्यामुळे आपोआप सगळ्या गावभर झाली. आणि सुनिता वहिनी एकदम सेलिब्रिटी झाली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. वहिनीने तिच्या तीन बहिणी, तिचे दोन भाऊ, माहेरची सगळी माणसं आई वडील, तिच्या मावशी, सगळ्यांना ताबडतोब गाडीला बसायला सांगितलं. बघता बघता बातमी ग्रामपंचायतपर्यंत पोहचली. आपलं गाव टीव्ही वर दिसणार म्हणून सरपंच, उपसरपंच इतर सदस्य आणि विरोधी पक्षातले पण सगळ्यांची मिटिंगसुद्धा बसली. आणि बघता बघता आमचं घर आणि आमच्या सुनिता वहिनीची चर्चा वाऱ्यागत पसरत राहिली. सेलिब्रिटी असल्यागत आमची वहिनी वागू लागली. अचानक तिचं ग्रामीण बोलणं अगदी शुद्ध झालं. तिचं चालणं तिचं बोलणं सगळं बदलून गेलं. आमचा दादाही तिच्या आनंदात हरवून गेला. आणि लग्नात सुद्धा एवढं मेकअपचं सामान आणलं नव्हतं त्याहून कितीतरी जास्त आणि महाग सामान दादाने तिला आणून दिलं. दोन तासात त्याने आणि त्याच्या मित्रानी घर ही रंगवून काढलं. आणि सगळ्या गावात होमिनिस्टरचं वातावरण तयार झालं. बिश्या फोडून आमच्या घरातल्या सगळयांना नवीन कपडे घेतले गेले. मला यातलं एक टक्काही काही माहीत नव्हतं. मी माझ्याच नादात इकडं रमून गेलो. आणि आपण वहिनीला होममिनीस्टर बोलतोय म्हणून फोन केला होता हे ही विसरून गेलो. कारण अशा गमती जमती करणं हा माझा रिकामा उद्योगच होता.
त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या माहेरहून वीस पंचवीस माणसं लहान लेकरं वेगळीच. अस सगळं गणगोत गोळा झालं. आणि फार मोठा उत्सव असल्यागत वातावरण झालं. नुसतं आमच्या घरातच नाही तर गल्लीतसुद्धा सगळ्यांच्या तोंडात एकच चर्चा एकच विषय आणि तो म्हणजे होममिनिस्टर आणि सुनिता. आणि आमच्या सुनिता वहिनीचा रुबाब म्हणजे काय सांगावं. तिच्यासमोर इतर बायका म्हणजे चिल्लरच. एकटीचीच बडबड, सगळ्यांना आदेश सोडत होती. ये असं करायचं, तसं करायचं कुणी दंगा करायचा नाही. मध्ये मध्ये बोलायचं नाही. आणि सगळेजण तिचा आदेश नम्रपणे ऐकून घेत होते. आणि सुनिता वहिनी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेली होती.
सायंकाळचे चार वाजून गेले. घरासमोर गर्दी झाली. सुनिता वहिनी बघावं आणि बघतच राहावं अशी नटली होती. सगळे नातेवाईक नटून थटून बसलेले होते. अजून कसं कुणी आलं नाही म्हणून हळूहळू वातावरण काळजीचं होऊ लागलं. दादाने तिच्या मोबाईलवर आलेल्या म्हणजे मी केलेल्या नंबरवर परत परत फोन करायला सुरुवात केली. पण फोन काही कुणी उचलत नव्हतं. कारण रविवार होता आणि ऑफिस बंद होतं. मी रूमवर झोपलो होतो. काय झालं कुणास ठाऊक, वडिलांना शंका आली आणि त्यांनी मला फोन केला. मी वडिलांचा नंबर फादर म्हणून सेव्ह केला होता. मी फोन उचलला तसे वडील म्हणाले, ” हे बघ मी तुझा बाप आहे, मी जे विचारीन त्याचं एकाच शब्दात उत्तर द्यायचं आणि खरं द्यायचं. “मी घाबरलो, अण्णा असं का बोलतायत म्हणून मी उठुनच बसलो. फोन कानाला आवळून धरला. आणि वडील म्हणाले, ” ते कोण टीव्ही वाले येणारयत म्हणून सुनिताला काल तूच फोन केला होता का?”मी गप्प झालो, वडिलांनी आवाज वाढवून पुन्हा विचारलं आधीच धमकी दिली होती मी पटकन म्हणलं ” होय अण्णा मीच काल आवाज बदलून वहिनीला फोन केला होता. “त्यावर अण्णांनी असल्या शिव्या दिल्या मला की बस्स. आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी फोन कट केला. आणि माझ्या बहिणीला फोन केला, म्हणलं “तायडे, काय सुरुय ग घरी, ?'” त्यावर माझी बहिण इतक्या आनंदाने तिथल्या वातावरणाबद्दल सांगत होती. आणि माझ्या छातीत चमकत चाललं होतं. आणि डोळ्यासमोर हातात हिरव्यागार बांगड्या, तळहातावर मेहंदी काढलेली, आणि नटलेली सुनिता वहिनी दिसू लागली. मी फोन कट केला. आणि मला दम लागला.
तिकडे वडिलांनी सुनिता वहिनीला आणि इतर लोकांना कसं सांगितलं माहीत नाही. पण सुनिता वहिनी मात्र हे सगळं नितीन भावजीने केलं आहे. आपली इतकी मोठी फसवणूक झालीय या धक्क्याने गपकन खालीच बसली होती. ती रडत ही नव्हती कुणाशी बोलत ही नव्हती. एकटक ती दातात ओठ पकडून भिंतीकडे बघत बसली होती. सगळं वातावरण काही काळ शांत झालं होतं. सुनिता वहिनीला हा फार मोठा धक्का बसला होता. आणि सगळ्यांच्या तोंडात एकाच नावाने शिव्या सुरू झाल्या होत्या आणि तो ग्रेट माणूस नितीन चंदनशिवे म्हणजे मी होतो. तिच्या माहेरून आलेल्या तिच्या बहिणी तर वाट्टेल तसं बोलत होत्या. सगळेजण सुनिता वहिणीला एकच वाक्य बोलत होते
” घे तुझा लाडाचा नितीन भावजी. लै बोंबलत होतीस माझा नितीन भावजी माझा नितीन भावजी. कर अजून लाड त्याचा. बस ताटात घेऊन त्यालाच. चांगलं पांग फेडलं बघ तुझ्या भावजीने. ” … समोर भिंतीच्या फळीवर माझा फोटो मी एका काचेच्या फ्रेममध्ये बनवून ठेवला होता. वहिनी अचानक उठली आणि तिने तो फोटो जोरात फरशीवर आपटला. सगळ्या घरात काचा झाल्या. कुणीच काही बोललं नाही.
माझ्या मोबाईलवर सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली. मी उचलायचो कानाला लावायचो आणि शिव्या खायचो. तोंडातून आवाज निघत नव्हता. वहिनीची केलेली मस्करी चांगलीच महागात पडली होती. आनंदाने उत्साहाने भरलेलं घर एका क्षणात शांत झालं. सगळेजण आपल्या आपल्या गावी निघून गेले. आणि सुनिता वहिनी आजारी पडली. चार दिवस घराच्या बाहेर आली नाही. तिने टीव्ही लावला नाही. कुणाशीच बोलली नाही. आईने आणि बहिणीने मला बजावून ठेवलं. दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढू नकोस. तिचा राग शांत झाला की मग ये. पण माझं धाडसच होत नव्हतं.
दिवाळीच्या ‘उपहाराचा’ मनमुराद आनंद आपणास घेता यावा म्हणून हा ताजा लेखन प्रपंच! आपल्या आवडीनुसार याला तिखट अथवा गोड (किंवा दोहोंचे कॉम्बो) म्हणून स्वीकारावे.
‘ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले |
औषध नलगे मजला, औषध नल गे मजला |
परिसुनि माता ‘बरे’ म्हणूनी डोले ||
… नलाच्या विरहामुळे आजारी पडलेल्या दमयंतीला औषधोपचार देण्यासाठी वैद्य आले असता, तिने “औषध नलगे मजला” असे उत्तर दिले त्यावरून इतरेजनांनी “तिला औषध नको (नलगे)” असा अर्थ काढला. मात्र तिच्या मनांतील खरी भावना “मला नल हेच औषध (नल गे)” हीच होती. पण संकोचाने ती तसे व्यक्त करू शकत नव्हती. हा सदाबहार श्लेष काव्यालंकार रचणारे पंडित मोरोपंत (कवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मयूर पंडित १७२९-१७९४) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते. हे पुराण-काव्य अंमळ जुने झाले. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या मधुमती या गाजलेल्या चित्रपटातील वैजयंतीमालाच्या गावरान नृत्यकलेने सजलेल्या ‘चढ़ गयो पापी बिछुआ’ या गाण्यात नायिका म्हणते- ‘मंतर झूठा, बैद भी झूठा, पिया घर आ रे ! सरतेशेवटी ‘सैंया को देख के जाने किधर गयो बिछुआ ‘ असे सर्व श्रेय प्रियकराला देऊन मोकळी होते.
मंडळी, आजारामुळे घरात बसायचा जाच सहन करीत लहान मुले रडत-रडत नेमके हेच सांगतात, ‘मला औषध नको ग आई!’ पण त्याचे नाक वगैरे दाबून मधाळ औषधीयुक्त सिरप त्याच्या घशाखाली उतरवल्याशिवाय आईचे इतिकर्तव्य समाधानपूर्वक पूर्णत्वाला जात नाही. आमच्या लहानपणी कोजागिरीच्या पर्वाला लागून महिनाभर ‘भुलाबाईच्या गाण्यांना’ ऊत यायचा. त्यात पुन्हा खाद्य-संस्कृतीला जागत प्रत्येक घरी गाणी म्हटल्यानंतर स्वादिष्ट फराळाचा रतीब असायचा. त्याची सुंदर सांगता कोजागिरीला केशर-मेव्याने युक्त आटीव दुग्धपानाने व्हायची. त्यातले एक गाणे आठवणीत राहिले. आधी तर दोडक्या सासरच्या वैद्याचे वर्णन येते, ‘आला ग सासरचा वैद्य’, अपेक्षेप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व ‘फाटके तुटकेच’ असते. मग येणार लाडक्या माहेरचा वैद्य, त्याचे व्यक्तिमत्व साहजिकच राजेशाही असणार… या गाण्यांमधून सासरच्या मंडळींनी वर्षभर केलेल्या छळावर उतारा म्हणून ही गोड गाणी असायची. मात्र या गाण्यातील संदेश असेच सांगतो की – ‘ वैद्य असो वा डॉक्टर, त्याची पर्सनॅलिटी पेशंटसाठी कायमच कौतुकाचा विषय असते. ’
मैत्रांनो, आपले सणवार जेवून-खाऊन समाधानाने साजरे करायची आपली अक्षय परंपरा आहे. इतकंच काय, नावालाच निराहारी अशी एकादशीची परंपरा आपण निर्जळा एकादशी म्हणून सुरु ठेवतो. (कोणी तरी म्हटलंय, ‘निर्जळा एकादशीला इतका वैविध्यपूर्ण फराळ करावा की जळाला सुद्धा पोटात जागा असू नये!’) आम्हां भारतीयांचे सेलेब्रेशन खाण्यापिण्याभोवती रिंगण घालत असते. कोणी रुजू होऊ दे नाही तर निवृत्त, पार्टीला पर्याय नाहीच. गेलाबाजार असा कुठलाच प्रसंग मला आठवत नाही जेव्हा खाण्यापिण्यापासून वेगळे होत आपण कांही साजरे करीत असू.
मैत्रांनो, असे कधी होईल कां की आपण मळलेल्या वाटा सोडून अनवट रानवाटा धुंडाळीत एखादे समाजाभिमुख कार्य करू? खात्यापित्या घरच्या लाडक्या आप्तांची अन मैत्रमंडळींची पोटे आधीच तुडुंब भरलेली आहेत. त्यांना पार्टी देण्याऐवजी ज्यांची पोटे खपाटीला गेली आहेत अशा भुकेल्या व्यक्तींना दोन घास खाऊ घालता येतील कां, यावर आपण विचार करायला हवा. त्यांची दारिद्र्याच्या तमाने झाकोळलेली उदासीन दिवाळी उजळायला आपल्या दानाचे दीपदान त्यांचे आयुष्य नक्कीच सुसह्य करील.
… जिच्या स्वागतासाठी अनंत तारे आकाशमार्ग सोडून भूतलावर अवतरतात.
… जिच्यामुळे सारा आसमंत उजळून जातो, गंधाळलेले वारे वाहू लागतात, सारी सृष्टी आनंदाने बेभान होते.
… जिच्या येण्याने नात्यातले अवघडलेपण संपते.
… जिच्या गोजिरवाण्या स्पर्शाने सारी नाती जवळ येतात.
… जिच्यामुळे हळवे प्रेम आणखी गहिरे होते.
… जिच्यामुळे ओंजळभर सुख पासरीभर होते.
… जिच्याकडे कोणताही थिल्लरपणा नाही, फक्त नात्याचंच कोडकौतुक नाही तर मातृत्वाची पूजा आहे, श्रमाची पूजा आहे, व्यापारातील सचोटीची पूजा आहे.
… जिच्यामुळे नात्यांना दीर्घायुष्य लाभते.
… जिच्यामुळे बाजाराला नवचैतन्य लाभते.
… जी, असेल एखादी रुसणारी बहीण, पत्नी पण रुसवा काढण्यातला गोडवा सांगते.
… पर्यावरण प्रेमी बेचैन होतात, पण बाळ गोपाळांचे फुलबाजी पेटवल्यानंतर चमकणारे डोळे, भुईचक्र फिरायला लागले की डोळ्यातून ओसंडून वाहणारे कुतूहल हे तर शब्दातीत आहे. जगात शत्रुत्व वाढवणारे इतके बॉम्ब फुटताहेत, एक बॉम्ब इथेही फुटतो, पण जीविताला संजीवनी देणारा, वित्ताला उभारी देणारा, मित्रत्वाचा, प्रेमाचा संदेश देणारा !
भावनांचा ओलावा पापणीतून पाझरताच ती परतली—-
— पुढच्या वर्षी याहून जास्त आनंद घेऊन येण्याचं वचन देऊन !
… थोडी हुरहूर, थोडी कुरबुर, थोडी हुडहुड मागे ठेऊन !
आजकाल मनात निरवानिरवीचे विचार वाहतात. वेगवेगळ्या वाटांवर, आयुष्याच्या विविध टप्प्यांवर, गोळा केलेल्या अनंत वस्तुंचा पसारा स्वतःच्या डोळ्यात आता खूपू लागतो. कित्येक वस्तू अशा असतात की ज्यांना हातही लावलेला नसतो. केवळ हौस म्हणून गोळा केलेला हा पसारा अक्षरशः अंगावर कोसळल्यासारखा जाणवतो. कधीतरी लागतील म्हणून जपून ठेवलेल्या वस्तूंची अडगळ जाणवू लागते. ‘हे सगळं आता आवरलं पाहिजे. कुणाला तरी द्यावं नाहीतर चक्क घराबाहेर काढून टाकावे’ असे डिस्पोजेलचे विचार तीव्रतेने मनात उफाळतात. कुठून कशी सुरुवात करावी तेही कळत नाही. वस्तू आणताना आपण किती सहजतेने आणतो पण तीच वस्तू या घडीला कितीही निरुपयोगी असली तरी टाकून देण्यासाठी मनाची किती जोरदार तयारी करावी लागते!
शोकेसमधल्या वरच्या फळीवर मला एक घड्याळ दिसतं. स्टीलच्या कोंदणातलं, पांढऱ्या रंगाचं, गोलाकार,स्पष्ट अंक आणि काटे असलेलं, टेबलावर ठेवण्यासाठी विशाल कोनातले स्टीलचे छोटे पाय असलेलं, किल्लीचं एक जुनं पारंपरिक घड्याळ, अनेक वर्षांपासून बंद पडलेलं आणि तरीही संग्रही ठेवलेलं.. का? एक अँटिक पीस म्हणून का?की कुठल्यातरी भावभावनांचा धागा अदृश्यपणे त्यात जोडला गेला असल्यामुळे का? या भावनांच्या धाग्यांच्या गुंत्यात किती दिवस अडकायचं? ‘एक एक वस्तू काढूनच टाकूया’ आणि सहजपणे माझा हात ते घड्याळ उचलून काढून टाकण्यासाठी उचलला जातो आणि त्याच क्षणी मी साठ बासष्ट वर्षांपूर्वीच्या एका छोट्या, अत्यंत किरकोळ घटनेच्या आठवणीत नकळतपणे गुंतून जाते.
आठवणींची पण एक मजाच असते नाही का हो? आठवणी सुखदुःखाच्या, फजितीच्या, गमतीच्या, साहसाच्या, राग लोभाच्या अशा कितीतरी आणि कुठल्याही क्षणी कुठल्याही निमित्ताने त्यांना किक मिळते. अगदी तसेच झाले. कारण काय तर घड्याळ!
ताईचे अभ्यास करताना तिला लागणारेच आणि तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि अतिशय आवडते घड्याळ छुन्दाच्या हातून खळकन् फुटले. छुंदाने ते घड्याळ का घेतले, तिला ते हातात का घ्यावेसे वाटले आणि घेतले तर घेतले पण ते हातातून पडलेच कसे? या प्रश्नांना त्या क्षणी ना अर्थ होता ना उत्तर होते फक्त परिणाम होता.
ताईचे आवडते घड्याळ फुटले.
ताई संतापली. भयंकर खवळली. फार मोठे नुकसान झाले होते तिचे जणू काही आणि आता या छुंदाचे काय करू, कशी शिक्षा करू तिला या विचारात तिने तिच्यावर चक्क हात उगारला. छुंदा आधीच खूप भेदरली होती, घाबरली होती. एका वक्तृत्व स्पर्धेत ताईला बक्षीस मिळालेलं ते घड्याळ ताईसाठी किती महत्त्वाचं होतं याची छुंदाच्या बालमनालाही नक्कीच कल्पना होती पण ताईचा हा रुद्रावतार मात्र तिला अनपेक्षित असावा. ताईचा मार चुकवण्यासाठी ती घरातल्या घरातच पळू लागली.
आमच्या घरातल्या प्रत्येक खोलीला दरवाजा होता त्यामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत असं गोल गोल पळता यायचं. तो सीन मला आठवला की अजूनही खूप हसू येतं. छुंदा पुढे, ताई तिच्या मागे आणि ताईला आवरण्यासाठी जीजी ताईच्या मागे… अशा तिघी गोल गोल धावत होत्या. त्यावेळी मी काय करत होते ते आठवत नाही पण एक दोन मिनिटात ती धावाधाव संपली. छुंदा रडतच होती. ताई तिला बोल बोल बोलत होती. जीजीने छुंदाला घट्ट पकडून मायेचं कवच दिलेलं होतं.
“थांब आता! संध्याकाळी पप्पा आले की त्यांना तू केलेला प्रताप सांगतेच. मग ते तुला शिक्षा करतील.”
एक प्रकारे ताईने छुंदावरच्या आरोपाची याचिका हायर कोर्टात दाखल करून टाकली.
नकळत आमच्या घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. आता पप्पा घरी आल्यावर काय होणार, त्यांची काय प्रतिक्रिया होणार? पप्पांनाही राग नक्कीच यायचा, ते संतप्त व्हायचेच पण त्या रागापायी त्यांनी कधी आम्हाला कठोर शिक्षा केल्याचं मुळीच आठवत नाही. थप्पड मारली ती सदैव लाडानेच, रागाने कधीच नाही मग ताईच्या या सूट फाईलला कशाला घाबरायचं? त्यातून छुंदा पप्पांची सर्वात लाडकी! या सर्वात लाडकी या शब्दप्रयोगाची ही एक गंमत आहे बरं का? पप्पांना आमच्यापैकी कुणीही विचारलं ना “तुमची लाडकी लेक कोण?” प्रत्येकीसाठी पप्पांच हेच उत्तर असायचं “अग! सर्वात लाडकी तूच” पण छुंदाकडे पप्पांचा अधिक कल असावा असे मला मात्र वाटायचे. कारण ती कुणाशी कधी भांडायची नाही, तिची मस्ती ही शांत असायची. शांत मस्ती हे जरी विरोधाभासी असलं तरीही ते तिच्या बाबतीत खरं होतं. शिवाय ती लहानपणापासूनच अत्यंत हुशार, अभ्यासू. पप्पा तिला,” हा माझा अर्जुन” असेच म्हणायचे. त्याला कारण बहिणींच्या रांगेत तिसऱ्या क्रमांकावर आणि गुणांच्या बेरजेत पहिल्या क्रमांकावर म्हणून असेल कदाचित. असो.
संध्याकाळी पप्पा घरी आले. त्यांच्या सायकलीची एक विशिष्ट धून वाजली. पप्पा ऑफिसात जाताना ठाणे स्टेशन जवळ, त्यांच्या मावशीच्या घरासमोर असलेल्या उसाच्या गुऱ्हाळात सायकल ठेवायचे आणि येताना ती पिकप करायचे.
सायकलच्या घंटेने पप्पा आल्याची वर्दी दिली आणि घरात सकाळी घडलेल्या घड्याळ फुटण्याच्या घटनेचे पुन्हा तणावपूर्ण पडसाद उमटले. नेहमीप्रमाणे जीजी पप्पांच्या सायकलला टांगलेल्या सामानाच्या पिशव्या आणायला खाली उतरली. मला वाटतं तिने त्याच वेळेला पप्पांना काही पूर्वकल्पना देऊन ठेवली असावी. जीजीचे घराकरिता ‘आजी’व्यतिरिक्त अनेक पेशे होते. ती कधी डॉक्टर, कधी शेफ, कधी किरकोळ रिपेरिंगसाठी इंजिनियर, कधी शिंपी, कधी शिक्षक, मानसतज्ज्ञ तर कधी वकील असे. याप्रसंगी बहुदा तिची वकिलाची भूमिका असावी.
पप्पा आल्याचे कळताच छुंदा गॅलरीचा कोपरा पकडून पुन्हा रडत बसली. ताईचा अजूनही,” थांब आता बघतेच तुला” हा बाणा कायम होता.
मी गॅलरीच्या उंबरठ्यावर वाकून रडणाऱ्या छुंदाला बघत होते. सहज मनात आलं, “ अर्जुन कधी रडतो का? असा कसा हा रडका अर्जुन?”
मी छुंदाला म्हटलं,” उठ! घे शस्त्र हातात आणि युद्धाला तयार हो!”
पप्पा घरात थोडे सेटल झाल्यावर ताईने जोरदारपणे सांगितलं,
“छुंदाने माझं घड्याळ फोडलं. काय गरज होती तिला माझ्या वस्तूंना हात लावायची?”
संतप्त ताईला पप्पा म्हणाले,
“ काय म्हणतेस काय? तुझं घड्याळ फुटलं? नुकसान तर झालंच. कुठे आहे छुंदा?”
निरागसपणे छुंदा पप्पांच्या समोर अपराध्यासारखी उभी राहिली.
“ हो पप्पा पण मी मुद्दाम नाही फोडलं. चुकून हातातून पडलं आणि फुटलं. “
मग पप्पांनी स्वतः तिला मांडीवर उचलून घेतलं.
“ घड्याळ फुटलं? अरेरे! पण आनंद आहे! त्यात काय एवढं? आपल्याला दुसरं नवं घड्याळ मिळेल. याहून छान, सुंदर, पुन्हा एकदा ताई स्पर्धेत जिंकेल आणि आणखी मोठं घड्याळ तिला बक्षीस म्हणून मिळेलच. आहे काय नि नाही काय!”
ताईचा फुगा फुस्स झाला.
छुंदा खुदकन हसली आणि साऱ्या घरावर आलेलं तणावाचं मळभ दूरच झालं. एक आभाळ क्षणात मोकळं झालं.
आज आम्ही सगळ्याजणी वृद्धत्वाकडे झुकलोय. पण छुंदाच्या मनातली ताईचं घड्याळ फोडल्याची अपराधी भावना बोथट जरी झाली असली तरी टिकून आहे आणि ताईला मात्र आपण त्यावेळी उगीचच इतके रागावलो बिचारीवर हा सल आजही बोचतो आणि मी जेव्हा या घटनेचा विचार करते तेव्हा केंद्रस्थानी मला फक्त पप्पांचेच बोल आठवतात. “आनंद आहे! आपल्याला दुसरं नवं घड्याळ मिळेल.”
किती साधं वाक्य पण सखोल विचारांचं! यात मुळीच बेपर्वाई नाही. नुकसान झाल्याची कदरच नाही असेही नाही. हे पुन्हा पुन्हा घडू नये पण आता घडलंच आहे तर त्याकडे जरा सकारात्मकतेने पाहूया. एक गेलं तर दुसरं मिळेल.
THIS IS NOT THE END OF LIFE.
हे तत्व किती सहजपणे पप्पानी आमच्या मनावर कोरून ठेवलं. “नो रिग्रेट्स” या मानसिकतेची आयुष्य जगताना जरुरी असते. नव्हे पुढे जाण्याचे ते शस्त्र असते हा महान विचार एका किरकोळ घटनेकडे पाहताना सहजपणे त्यांनी आमच्यावर बिंबवला.शिवाय “क्षमा वीरस्य भूषणम् हे अलगदपणै ताईला सांगितले. आणि खरोखरच ताईच्या नंतरच्या आयुष्यात ज्या अनेक दु:खद अप्रिय घटना घडल्या, ज्या लोकांनी तिचे जगणे नकोसे केले होते त्यांनाही तिने नंतर सारं काही विसरून मोठ्या मनाने क्षमा केली. पपांचाच संस्कारना?
हेच खरे सार जीवनाचे असे वाटते. या जीवनसत्वांनी आम्हाला इम्युनिटी दिली, एक प्रतिकारशक्ती दिली.
“थँक्स पप्पा”
आणि आताच्या या क्षणी नकळतपणे फेकून देण्यासाठी हातात घेतलेलं ते जुनं, बंद पडलेलं घड्याळ मी पुन्हा जागच्या जागी ठेवलं. का ? .. माहीत नाही.
शाळेला सुट्टी मिळालेल्या पोरासोराने अंगणामध्ये सुंदर किल्ला बांधला. मावळे विराजमान झाले.. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर अरुढ झाले.. जागोजागी भगवे झेंडे फडकू लागले… पोर आनंदाने टाळ्या पिटू लागली.. पहाटे अंगणात केरवारे झाले.. सडा टाकला गेला. सुंदर रंगवलीत रंग भरले गेले.. पणत्यांच्या रूपाने आकाशीची नक्षत्र अंगणात ऊतरून आली.. अंगणाचे रूप कसे दिमाखदार रंगीबेरंगी झाले. नहाणी घरात सुवासिक तेलाचा आणि उटण्याचा सुवास दरवळू लागला.. घंगाळाच्या पाण्यातन वाफा निघू होऊ लागल्या… मनसोक्त पाण्याने आंघोळीझाल्या.. साबणाच्या वासाने देहाला घमघमाट आला. देवघरामध्ये मंत्रोच्चार होऊन पूजा झाल्या अभिषेक झाले देवासाठी केलेल्या खास बेसनाच्या लाडवांचा प्रसाद त्यांना दाखवला गेला. इथे पावेतो घरातल्या सगळ्या बायका नटून थटून तयार झाल्या नव्या साड्यांची सळसळ कानी येऊ लागली बैठकीच्या हॉलमध्ये पाट रांगोळी झाली फराळाची जय्यत तयारी सुरू झाली. सारी मंडळी आरतीसाठी देवघरात जमली आरती आणि प्रसाद झाल्यावर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेणं सुरू झालं नमस्कार आशीर्वाद झाल्यानंतर सगळी मंडळी फराळाच्या पानावर स्थानापन्न झाली लाडू चकली चिवडा शंकरपाळे कडबोळे अनारसे यांनी पान सजली पुरुष मंडळी बायकांचे कौतुक करून फराळावर ताव मारू लागली आणि बायका त्यांना आग्रह करून वाढू लागल्या… चेष्टा मस्करी हसणे खिदळणे आणि पोरट्यांचा कल्ला यात फराळ उरकला मग महिलांची पंगत.. छे छे बायकांची पंगत माज घरात रंगली.. पुरूष मंडळी गाद्यांवर सुपारी खात बैठक मारून होते. दिवाळी अंकाची पानं चाळण्यात सगळे मग्न. पोर सर्व फटाके उडवायला केव्हाच पळाली. आतून आजी आजोबांची लकेर सावकाश उडवा रे – काळजी घ्या– भाजून घ्याल नाहीतर…. इत्यादी सूचनांचा भडीमार सुरू झाला पण लक्षात कोण घेतो ? पोरं फटाक्यात मग्न आणि बायका पुढच्या स्वयंपाकाला लागलेल्या….
असो… ! दिवाळीचे हे दृश्य फक्त आता कथा कादंबऱ्यात वाचावं. घरात इन मीन चार माणसं.. सगळं रेडीमेड.. फराळ, इडली वडा यांना डिशमध्ये स्थान आले. सगळ्यांनी मोबाईलमध्ये तोंड खूपसायचे आणि हॅप्पी दिवालीचे मेसेजेस पाठवायचे —-
पण वरील वर्णनाची दिवाळी ज्यांनी अनुभवली ते भाग्यवान… अशा सर्व भाग्यवंतांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
☆ अशी ही एक दिवाळी…☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
दिवाळीच्या आधीचा दिवस ! सगळीकडे फटाक्यांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. वसुबारसपासूनच
आकाश कंदिल आणि दिव्यांच्या माळा वातावरण सुशोभित करत होत्या. दारासमोर रांगोळ्या दिसत होत्या. नवीन कपड्याने बाजार गजबजलेला होता. दिवाळीच्या पणत्यांनी घरे उजळून निघाली होती. घराघरातून फराळाचे वास दरवळत होते. एकंदर वातावरण दिवाळीच्या उत्साहाने भारून गेले होते आणि मी मात्र हॉस्पिटलच्या दिशेने चालले होते, आज सासूबाईंची तब्येत कशी असेल या विचारात !
आठच दिवसापूर्वी सासूबाईना अचानक पॅरॅलेसिसचा अटॅक आला होता, तसे त्यांना ब्लडप्रेशर होतेच. माझे मिस्टर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल आॅफिसर म्हणून काम करत असल्यामुळे आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. माझे मिस्टर तिथेच काम करत असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला घरच्यासारखेच होते! तिथे नेल्याबरोबर लगेच स्पेशल रूम, ऑक्सिजन, सलाईन सर्व चालू झाले. मॉनिटरिंग नीट होत असल्यामुळे त्यांना लवकरच आराम वाटू लागला. तरीही आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्याने आम्ही दिवाळीपर्यंत दवाखान्यातच होतो. त्या काळात अनुभवली ती हॉस्पिटलची दिवाळी! आमच्या घरातील सर्वजण आळीपाळीने दवाखान्याच्या वेळा सांभाळत होतो. पण रात्रपाळी माझ्याकडेच होती. ज्या स्पेशल रूममध्ये ठेवले होती ती रूम वाॅर्डच्या दाराजवळच असल्याने मला खोलीतूनच बाहेरील सर्व हालचाल दिसत असे.
खरंच, हॉस्पिटलचे वातावरण कसे असते ना! त्यातून सिव्हिल हॉस्पिटलचे! केव्हाही पेशंट्स येत- जात असत, कॅज्युअलिटी डिपार्टमेंट 24 तास चालू असे, कधी एक्सीडेंट पेशंट तर कधी इमर्जन्सी पेशन्ट्स तर कधी डेड बॉडी अचानक येत! त्यांच्यासोबत पोलीसही आलेले असत. सतत काहीतरी घडामोडी चालू असत, पण मी होते त्यावेळी दिवाळी जवळ आल्याने जरा वेगळे वातावरण होते. हॉस्पिटलमध्ये वाॅर्ड स्वच्छ करणे, सुशोभित करणे यासंबंधी स्पर्धा लावलेल्या होत्या. त्यामुळे एरवी गॉज् तयार करणे, इंजेक्शन साठी कापसाचे बोळे तयार करून ठेवणे, ग्लोव्हज पावडर मध्ये घालून ठेवणे अशी कामे करणाऱ्या आया आता वाॅर्डच्या सुशोभीकरणाकडे वळल्या होत्या. रात्री जागून रंगीबेरंगी कागदांच्या पताकांच्या माळा तयार होत होत्या, प्रत्येक वार्डमध्ये आकाश कंदील लावले होते, वाॅर्डच्या दारात रांगोळ्या घातल्या होत्या. मेण पणत्या तेवत होत्या. आपले दुःख, आजारपण विसरून आजारी लोक आणि त्यांचे नातेवाईकही उत्साहाने यात जमेल तेवढा भाग घेत असत. मी रोज झोपायला जात असल्याने मला हे सर्व रात्री उशिरापर्यंत बघायला मिळत होते. नर्सेस आया आपली कामे उरकून दिवाळी सजावटीला हातभार लावत होत्या. आनंद कुठेही निर्माण करता येतो आणि ती माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे हे खरं आहे!
दिवाळी घरी काय आणि इथे काय! जिथे आनंद तिथे दिवाळी! दिवाळीच्या दिवशीच सासूबाईंना डिस्चार्ज देणार होते, त्यामुळे आधीच्या रात्री मी हे सर्व पाहत होते. एरवी कोण सिव्हिल हॉस्पिटल ला जाते! सकाळी सकाळी फराळाचे खोकी तिथे आली होती. काही वाॅर्डात फळांच्या करंडयाही दिसत होत्या. लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये तर बिस्कीट पुडे, फराळांची खोकी याची रेलचेल दिसत होती! आपापल्या परीने आनंदाची दिवाळी चालू होती. पहाट झाली, सनई वादनाची रेकॉर्ड लागली आणि आम्ही घरी जायच्या तयारीला लागलो. तिथे नेलेले सामान भरणे, डिस्चार्ज पेपर तयार करून घेणे, ॲम्बुलन्सची वेळ ठरवून घेणे वगैरे चालू होते. हे स्वतः ड्युटीवर असल्याने सकाळी कॅज्युअलिटी संपवून ते आमच्याबरोबर घरी येणार होते.
इकडे घरी काय चालले आहे याची कल्पना नव्हती. पण माझा भाऊ आणि वहिनी मी दवाखान्यात असल्यापासूनच घरी आलेले होते. त्यामुळे मला मुलांचे टेन्शन नव्हते. तसेच माझे दीर-जाऊबाईही तिथेच रहात होते. दिवाळीच्या सर्व फराळाचे सामान वहिनी घेऊन आली होती. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा वहिनीने दारात सडा रांगोळी केली होती. सासूबाईंची तब्येतही आता बरी होती. त्यामुळे आमच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला होता. सासुबाईंची एका खोलीत व्यवस्था लावली आणि आम्ही जरा निवांत झालो. त्या पहिल्या अटॅक नंतर चार-पाच वर्षे सासूबाई होत्या. जवळपास 30 वर्ष होत आली या गोष्टीला! पण दिवाळी आली की हॉस्पिटलमध्ये साजरा केलेला दिवाळीचा पहिला दिवस आठवतो. एरवी आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हटले की थोडे नाराजच असतो, पण तिथे राहून अनुभवलं की लक्षात येते तेथील सर्व लोक किती व्यस्त असतात. त्यांनाही सणवार सोडून ड्युटी करावी लागत असते. सतत आजारी माणसांच्या सेवेत राहूनही आनंदाचे काही क्षण ते वेचत असतात आणि आनंद घेत असतात. या सिस्टर्स, ब्रदर्स आणि इतर स्टाफ सतत कार्यरत असतो. पेशंटची कुरकुर चालू असते, ते सर्व त्यांना संयमाने ऐकावे लागते अर्थात तिथेही काही काम चुकार लोक असतात पण ते प्रमाण कमी असते. या आठ दिवसात हॉस्पिटलच्या वातावरणाबरोबरच तिथली दिवाळीची तयारीही मला पाहायला मिळाली !
अलीकडे आपण कोरोनाच्या काळात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व स्टाफ किती काम करीत होते हे पाहिले, ऐकले. हॉस्पिटलची सेवा म्हणजे लोकसेवेचे, चिकाटीचे, काम ! संयमाने काम करीत असलेली ही मंदिरे आहेत ! त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. हे सर्व अनुभव स्वतः घेतले म्हणून त्याबद्दल आत्मीयता वाटली आणि अशी ही एक आठवणीतील दिवाळी कायमच माझ्या स्मरणात राहिली !
७६२ दक्षिण कसबा भाग, काळी मशीद, या ठिकाणी आम्ही राहत होतो एकाला एक असलेले दोन वाडे जोडून होते मालक राहत असलेल्या वाड्यातून आमच्या वाड्यात येण्यासाठी एक चोरवाट होती. एका घराच्या खोलीमध्ये ती वाट उघडत असे तिथे एक कपाट होतं अगदी हिंदी सिनेमा प्रमाणे ते कपाट पुढे सरकवलं की मालकाच्या घरात जायचं जिना असे. अशा दुहेरी वाड्याचा उपयोग रझाकार जेव्हा सोलापूरला होते तेव्हा त्या दंगलीच्या वेळी लोकांना खूप झाला त्याच्या ऐकलेल्या गोष्टी कधीतरी पुन्हा सांगेन
तर वाड्यामध्ये दिवाळी साजरी व्हायची ती आमची पहिली सत्र परीक्षा म्हणजे सहामाही परीक्षा सत्र हा शब्द अलीकडे आलाय तर ती झाली की वाड्यातली सगळी पिलावळ एकत्र जमायची. मग तिकडे सो कॉल मीटिंग लावायच्या साधारण 25 ते 30 लहान मुले आम्ही होतोच 15 वयोगटापासून ते अगदी तीन-चार वर्षापर्यंत. मग सुरुवात व्हायची वर्गणी जमा करण्यापासून साधारण दोन आणि चार आणे अशी ऐपतीप्रमाणे वर्गणी गोळा होत असे. त्यातून वाड्याचे मालक जरा जास्त द्यायचे त्या पैशातून पिवडी नावाचा एक रंग मिळत असे त्या रंगाने वाडा रंगवायचा तत्पूर्वी आधी जाळ्या काढून तो स्वच्छ झाडून घ्यायचा 12 बिराडकरूंचा तो वाडा दोन मजली सगळ्या भिंती वगैरे सगळं झाडून घ्यायचं मग वाड्यात एक पेंटर राहत होते खरंतर ते खूप महान होते बुगाजी पेंटर ते बालगंधर्वांचे पडदे रंगवण्याचे काम करीत त्यांची नातवंड तीही त्याच उद्योगात हातात प्रचंड कला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काथ्याच्या ब्रशने वाडा रंगवला जायचा भंग्याकडून संडास स्वच्छ करून घेतले जायचे कारण पूर्वी वाड्याचा तोंडाशीच संडास असायचे त्यानंतर वाड्यासमोरचा नगरपालिकेचा रस्ता नगरपालिकेत जाऊन पत्र देऊन स्वच्छ केला जायचा मुरूम टाकण्याविषयी त्यांना बजावण्यात यायचे मग त्यांनी मुरूम टाकला की आम्ही ती चालून चालून जमीन धुमस करून घेत असू. त्यामुळे तिथे आम्हाला रांगोळी काढायला येत असे या बुगाची पेंटरच्या घरची मुलं रांगोळी काढण्यात वाकबगार पाडवा भाऊबीज लक्ष्मीपूजन या दिवशी आमच्याकडे वाड्यासमोर ती दृश्य साकारणारी रांगोळी असायची. हे सगळं आता अलीकडे नंतर आले भाऊबीजेची रांगोळी बघायला तर आमच्या वाड्यासमोर गर्दी व्हायची.
अशी सुंदर सगळी व्यवस्था झाली की मग घराघरातून फराळाचे वास यायचे भाजणी मसाले कुटणे इत्यादी कामे सुरू व्हायची जात्यावर दळणे उखळात कांडणे. काही गोष्टी धुवून वाळवन करणे घरात सावलीत अनारश्याच्या पिठासाठी तांदूळ पसरून एका चांगल्या पांढऱ्या शुभ्र फडक्यावर घालणे आणि मग ते उखळात गुळ घालून कुटणे असे बरेच प्रोसेस सुरू होत असत.
आम्ही मुले पणत्या करणे, त्याच्यावरती पणत्या भिजत घालणे आकाश कंदील बनवणे. . . आमच्या वाड्यात प्रभाकर आणि बंडू नावाची दोन मुले होती ती आकाशकंदील बनवत असत. ते बनवत असताना अत्यंत भक्तिभावाने आणि आदराने आम्ही त्यांच्याकडे पाहत असू. एक मोठा आकाशकंदील वाड्यात बांधला जायचा. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे छोटे-मोठे कंदील असायचे. दारासमोर रांगोळी काढायला कोणाला दार नव्हतं. समोरची गॅलरीचे दोन फूट जागा त्यामुळे खाली काढलेली सामुदायिक रांगोळी किंवा उंबऱ्यात काढलेली छोटीशी रांगोळी एवढाच रांगोळीचा संबंध !
एका बाथरूममध्ये तीन बिऱ्हाडं आंघोळ करायची. त्यासाठी रात्री पाण्याची पिप भरून ठेवले जायचे. त्या तीन दिवसात मात्र अजिबात कोणी भांडत नसे, सोयी गोयीने प्रत्येकाच्या बंबातले कोणाचेही पाणी घेतले तरी चालत होते आणि सकाळी सहापूर्वी सगळ्यांच्या आंघोळी व्हायच्या. मग फटाके उडवण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग फराळ…. फराळाची ताटे पहिल्याच दिवशी शेल्याने झाकून (विणलेल्या) एकमेकांच्या घरी जायचे. आता ते एवढे एवढे पाकीट मध्ये बांधून देतात तसं नव्हतं. मोठ्या ताटात सगळे पदार्थ असायचे …. चकली चिवडा करंजी अनारसे शंकरपाळ्या कडबोळी चिवड्याचे दोन-तीन प्रकार शेव. . . ताट कसे गच्च भरलेलं असायचं. वर्तमानपत्रात इतर जे कोणी सेवक असत त्यांच्यासाठी म्हणजे रामोशी, त्यानंतर वाडा साफ करणारा माणूस, कचरा उचलणारा माणूस, यांच्यासाठी पुड्या बांधल्या जायच्या. हे काम प्रत्येक घरी चालत असे. चार दिवस कुणी कुणाच्याही घरी फराळ करत असे. . . . दिवाळी संपली की मग प्रत्येकाच्या घरी फराळाचे निमंत्रण चकली चिवडा लाडू. आमच्या घरी मात्र आई सगळ्यांना उपीट करत असे … चकली चिवडा लाडवाबरोबर गरम गरम उपीट आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे बसायला थोडीशी गच्ची होती, त्यामुळे तिकडे मस्त मैफिल जमत होती. वडिलांचे मित्र त्यांचा फराळ, आईच्या मैत्रिणी, आमचे मित्र मैत्रिणी, आमच्यापेक्षा तरुण मुली असलेल्या आमच्या घरातल्या बहिणी भाऊ त्यांचे मित्र मैत्रिणी, असे चार-पाच फराळाच्या पार्ट्या व्हायच्या. जेवायला रोज टोमॅटो घातलेली आमटी संध्याकाळी असायची. आमटी आणि भात हे संध्याकाळचे साधे जेवण असे.
दिवाळी अंकाची रेलचेल … मामाची लायब्ररी होती त्यामुळे दोन-तीन दिवाळी अंक सहज आमच्या हाती लागत असत. पालथे पडून दिवाळी अंक दुपारभर वाचणे हा कार्यक्रम. त्यानंतर दिवाळी संपली की मग उरलेल्या सर्व फराळांचा विचार करून बाहुला बाहुलीचे लग्न, आमच्या वाड्याचे मालक हुंडेकरी यांची एक मोठी गच्ची होती त्या गच्चीवर लावायचे. दोन गच्ची होत्या एक वरची आणि एक खालची. एकीकडे वधू पक्ष – एकीकडे वर पक्ष. आमच्या घरात एक तीन चाकी सायकल होती त्यावरून वरातीची व्यवस्था केली जायची. पताका लावल्या जायच्या. सगळे वाड्यातली मोठी माणसं सुद्धा लग्नाला झाडून हजर असायचे. लग्न झाल्यानंतर सगळे विधी मात्र व्यवस्थित केले जायचे आणि मग वरात काढली जायची. वाड्यातील ही सर्व मंडळी काडेपेटी टिकलीच्या डब्या याच्यामधून पैसा 2 पैशाचा आहेर पॅकिंगसह आम्हाला करत असत त्यामुळे आपण खरोखरच लग्न लावले असे वाटत असे. बाहुला बाहुली सजवण्याचे काम हे फार नेटाने केले जाई. मग गच्चीवरती आमच्या मालकीण बाई सर्वांसाठी पोहे उपीट चिवडा यासारखे पदार्थ करून पत्रावळीचे अर्धे अर्धे तुकडे करून सर्वांना फराळ दिला जात असे. . तेच लग्नाचे जेवण होय.
इथे पावे तो निम्मी सुट्टी संपलेली असायची. मग आमच्या वाड्यामध्ये राहणाऱ्या राणूअक्का या नावाच्या एक बाई होत्या, एकट्याच राहत असत त्या. अतिशय देखण्या होत्या. . स्मिता तळवळकरसारख्या त्या दिसायच्या. मी नेहमी त्याना म्हणायची. . ‘ यांना ना छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढला तर त्यात कामाला घ्यायला पाहिजे. ‘ इतक्या सुंदर होत्या. त्यांच्या घरी चूल असायची आणि शेगडी. आम्ही सगळी मंडळी म्हणजे लहान मुलं घरून गुळ डाळ मसाले वगैरे आणून अगदी कणीकसुद्धा त्यांच्या घरी जमा करीत असू आणि म्हणायचो की राणूअक्का तुमची पुरणाची पोळी झाली पाहिजे आणि कटाची आमटी. त्यांची कटाची आमटी खाल्ली की अर्धा तास हात झिनझिनला पाहिजे अशी मस्त तिखट असायची. मग कटाची आमटी आणि पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी असा बेत. त्यांच्याकडे एक गोठा होता त्या गोठ्यात पत्रावळ्यावरती होत असे ती 40 माणसाची म्हणजे मुलांची पंगत उठायची. फार प्रेमाने करायच्या. त्या जातीने धनगर होत्या. वाड्यात कधी कुणी कुणाची जात विचारली नाही आणि कधी ती जाणवली सुद्धा नाही. माळी धनगर सोनार वाणी लिंगायत सारस्वत ब्राह्मण मराठा गुरव अशा अठरा पगड जातीने वाडा राष्ट्रीय एकात्मतेची साक्ष देत होता. वाड्याच्या मालकीणबाई साक्षात लक्ष्मी होत्या सुकन्या मोने इतक्या देखण्या होत्या. त्यांचे डोळे आणि भुवया अतिशय कोरीव, काळेभोर डोळे, छान कुरळे केस – साक्षात लक्ष्मी वावरते आहे असं वाटायचं आणि तितकीच पोटात माया. पाच रुपये भाडं सुद्धा न परवडणारी माणसं वाड्यात सुखाने नांदायचे. मालकाने कधी तगादा केला नाही. उलट एखाद्याच्या घरी कमी असेल तर मालक ते आणून देत असत. इतका माया करणारा मालक जगात कुठे नसतील. . कोणाला जागा सोडण्याचा तगादा नाही, कुणाला भाड्यासाठी किरकिर नाही, ते तरी खूप श्रीमंत होते असं नाही, पण मन मात्र खूप मोठं होतं. सगळ्या पोरी बाळी बघायचे कार्यक्रम त्यांच्याच घरी व्हायचे. सगळा वाडा त्यांना भाऊ आणि वहिनी असेच म्हणत होता, आणि ती नाती त्यांनी शेवटपर्यंत निभावली. करोडोंची स्टेटस असलेली ती मंडळी पण आजही त्यांची पुढची पिढी सुद्धा अतिशय विनम्र आहे. राणूअक्काची पुरणपोळी संपली की मग आमचे उरलेल्या फराळांची भेळ असायची. कार्यकर्ते बाईंची छोट्या मुलांची लायब्ररी असायची, कॅरम बोर्ड खेळायचा, भोवरे फोडायचे, काचा पाणी खेळायचे, नाटक बसवायचे असे सगळे करण्यामध्ये आमची सुट्टी मजेत जाई…
… अशी दिवाळी पुन्हा कधीच झाली नाही. लाईफबॉय साबणाच्या वडीच्या डब्यात मोती साबण आणि दुसऱ्या डब्यात मैसूर सॅंडल दिसला की खूप आनंद व्हायचा. हळूहळू पंधरा दिवसात त्या वड्या झिजायच्या, मग सुट्टी संपताना पुन्हा त्यामध्ये लाईफबॉय ठाण मांडून बसायचा वर्षभर. . . पण त्या लाईफ बॉय ने उर्वरित वर्षभर आमच्या शरीरावरील घाण स्वच्छ केली, तजेला दिला, आम्ही प्रसन्न झालो. त्यालाही आमच्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे.
अशी ही सुंदर दिवाळी साडेतीन हजार स्क्वेअर फूटच्या बंगल्यात, दारासमोरच्या प्रशस्त गाडीत ढीगभर खरेदी एकावेळी करून आणावी अशी पैशाची श्रीमंती असतानाही आज आम्ही बघू शकत नाही. त्या दिवाळीची चव अंगावर जिभेवर मनामध्ये रेंगाळतेच आहे नव्या कपड्याना तो वास येत नाही. टाटाच्या तेलाच्या बाटलीचा वास भारी तेलाने नाही… नाही म्हणायला फक्त एक गोष्ट टिकून राहिली ती म्हणजे मोती साबण … मैत्रिणींनो आज मी जो हा लिहिलेला आहे तो बुद्धीने नाही.. अंतःकरणांनी लिहिलेला आहे कदाचित त्याच्यामध्ये समन्वय असेल नसेल, पण त्या सगळ्या भावना मात्र व्यक्त झाल्या. त्या आठवणी डोळ्यासमोर येऊन पुन्हा एकदा शब्दात चितारल्या गेल्यात !
मला वाटतं आपल्या पिढीची सर्वांची दिवाळी थोडीफार अशीच होती जिने अनेक मनं आजतागायत उजळून ठेवली आहेत. आताच्या पिढीला फुसके फटाके शोधून दुपारी सगळी घरातली मंडळी झोपली की ते उडवण्याचा कार्यक्रम माहित नाही… किंबहुना त्यांना काटकसरीने काही वापरणेच माहीत नाही… समृद्धी आली ना की सुख संपतं… हे मात्र खरे की मला वाटते सुख असले तरी समाधान नसतं… हे तर अधिक खरे नाही का?
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ खरे भिकारी… आणि आमचे दरिद्री नारायण !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट पुणे चे ट्रस्टी आदरणीय श्री प्रताप भोसले सर, यांचा एके दिवशी मला फोन आला आणि म्हणाले, ‘तुमच्या याचक मंडळींना प्रत्येकी दहा किलो साखर; दिवाळीच्या मुहूर्तावर द्यायची आम्हाला इच्छा आहे. ‘
मी हरखून गेलो…
तरीही भोसले सरांना मी म्हणालो, ‘सर आपण हे दान त्यांना मोफत नको देऊयात… त्यांच्याकडून काहीतरी छोटं मोठं काम करून घेऊया आणि मग त्यांना हि साखर देऊया…
ते म्हणाले, ‘तळजाई टेकडी साफ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, आम्ही ते रोज करतो, यात तुमच्या खराटा पलटणचे लोक येतील का ?
आणि मग आमच्या खराटा पलटण मधील वीस लोकांना आम्ही घेऊन गेलो… तळजाई टेकडी आम्हाला जमेल तशी आम्ही स्वच्छ केली…
यानंतर ट्रस्टच्या मार्फत, श्री प्रताप भोसले सर यांच्या हस्ते आम्हाला एक किलो ? दोन किलो ? नाही…. तर तब्बल 500 किलो साखर मिळाली…
यापैकी ज्यांनी स्वच्छतेचं काम केलं होतं, अशा वृद्ध याचकांमध्ये 26 ऑक्टोबर रोजी 350 किलो साखर आम्ही श्री शंकर महाराज मठामध्येच वाटून टाकली…!
सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या समक्ष….!!!
यानंतर श्री प्रताप भोसले साहेब आणि त्यांच्या सेवेकर्यांनी आम्हाला आदराने बसवून जेवू घातले…. महाप्रसाद दिला…!
VIP कोट्या मधून आम्हाला सन्मानाने श्रीं चे दर्शन घडवले…!
तुम्ही भिकारी किंवा भिक्षेकरी किंवा याचक नसून माणसं आहात…. याची आम्हाला त्यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली…! यावेळी माझ्या डोळ्यात पाणी होतं…!
भिक्षेकरी वर्गाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी आदरणीय सद्गुरु श्री शंकर महाराज याच्या पायाशी नतमस्तक होत आहे….!
ज्या भोसले सर आणि त्यांच्या सेवेकर्यांनी आम्हा सर्वांना मानाची वागणूक देऊन, माणुसकीचे दर्शन घडवले, अशा सर्वांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना प्रणाम करतो…!!!
भिकारी / भिक्षेकरी म्हणजे गलिच्छ लोक… घाण आणि कचरा करतात…. असा एक समज आहे !
आज माझ्या या याचक मंडळींनी; माझ्या एका शब्दावर, “तथाकथित उच्च वर्गीय (??) लोकांनी” तळजाई टेकडीवर पिलेल्या दारूच्या बाटल्या उचलल्या… सोबत लेज, कुरकुरे आणि इतरही काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या उचलल्या आहेत…!
मी लहान असताना, आमच्या घरात कचरा उचलायला एक मावशी आली होती… तिने घराची बेल वाजवली आणि मी आईला म्हणालो, ‘कचरा दे… कचरेवाली मावशी आली आहे…. ‘
माझ्या आईने घरातला कचरा देत, त्या मावशीच्या हातात काही खायच्या वस्तू ठेवल्या आणि मला म्हणाली, ‘कचरेवाली ती मावशी नाही… कचरेवाले आपण आहोत बाळा..!’
या शब्दांचा अर्थ तेव्हा मला कळला नाही; परंतु आता कळतो आहे…!
पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या टाकणाऱ्या श्रीमंत लोकांना मला सांगायचं आहे… “खऱ्या अर्थाने तुम्ही भिकारी आहात…!”
मी भिकारी हा शब्द वापरत नाही, भिक्षेकरी किंवा याचक हा शब्द वापरतो…
परंतु त्यांच्यासाठी भिकारी हाच शब्द योग्य आहे…!!!
पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या फेकणे, प्लास्टिकच्या पिशव्या फेकणे, प्लास्टिक बाटल्या फेकणे आणि त्या न उचलणे… …. हे सर्व करणारे लोक, कदाचित सुशिक्षित असतील, परंतु सुसंस्कारित नाहीत…!
आणि म्हणून बुद्धी, मन, अंत:करण पैशाला विकणारे… हे लोक खरे भिकारी आहेत…!!!
इथे या लोकांसाठी मला भिकारी हाच शब्द वापरायचा आहे…!
असो … या भिकाऱ्यांनी” केलेली घाण… माझ्या दरिद्रीनारायणाने आज साफ केली आहे…!
या बदल्यात सद्गुरु श्री शंकर महाराज यांनी मात्र प्रत्यक्ष आम्हाला आशीर्वाद देऊन, आज खऱ्या अर्थाने आम्हा दरिद्रीनारायणांना श्रीमंत केलं आहे….!!!
ठिपक्या ठिपक्याने उमटणारी रांगोळी, त्यात पुरले जाणारे रंग म्हणजे दिवाळी. शिवून आलेले नवीन कपडे घालण्याची हौस म्हणजे दिवाळी. फटाक्यांची माळ तसेच उंच उंच उडणारे लखलखणारे बाण, प्रकाशपर्वास अनुरूप अशा कारंजासह फुलणाऱ्या कोठ्या, भूईचक्रांची पळापळ, टिकल्यांची फटफट, म्हणजे दिवाळी, तळणाचा खमंग वास घरभर पसरून राहणे म्हणजे दिवाळी, अन् हो रंगीबेरंगी आकाशकंदील आतील दिव्यासह झुलत राहणे म्हणजे दिवाळी.
वात्सल्यमूर्ति सवत्सधेनुचे पूजन करत माया ममतेचे आरोपण करणे म्हणजे दिवाळी. मांगल्याची कामना करत दिव्यांची आरास रचत भावविश्व समृद्ध करणे म्हणजे दिवाळी. असूरांचा संहार करत जीवन मूल्यांची पुनर्स्थापना म्हणजे दिवाळी. अनपगामिनी, परत न जाणाऱ्या लक्ष्मीचे मनोभावे आवाहन करणे म्हणजे दिवाळी. नवनवे नित्यनूतन काही गवसावे याची वांच्छा राखून नूतन वर्षाचे मुक्तमनाने स्वागत करणे म्हणजे दिवाळी. भावा बहिणीचे अक्षय टिकणारे नाते अधिक सुदृढ व सकारात्मक रहावे यासाठीची उजळणी, ओवाळणीसह साजरे करणे म्हणजे दिवाळी. अशी दिवाळी आपणा सर्वांस लाभो व हो तो रंगीबेरंगी आकाशकंदील मनात कायमचा झुलत राहो या सदिच्छांसह – – –
विनीत,
डॉ. जयंत गुजराती
नासिक
मो. ९८२२८५८९७५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈