आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या. खेळून झाल्यावर त्यांनी सगळा खेळ आवरून नीट खोक्यात भरून ठेवला, नीट सगळं आवरलं, प्लेरूम स्वच्छ केली आणि मग अभ्यासाला बसल्या. मी लांबूनच त्यांचा खेळ बघत होते. मनात विचार आला, ‘ किती रंगून जाऊन या मुली खेळत होत्या आणि कंटाळा आल्या बरोबर त्यांनी सगळा खेळ आवरून टाकला.’
मग माझ्या मनात असा विचार आला, की ‘ आपण कधी शिकणार असा खेळ आवरायला? चार बुडकुली आणि तीन छोट्या खोल्यात सुरू केलेला संसार आता मोठ्या बंगल्यात आला. तरी आपले अजून भातुकली खेळणे सुरूच आहे की. भातुकलीची भांडी बदलली, खेळाचा पसारा वाढला. खेळगडीही बदलले. तरीही आपण अजूनही त्यातच रंगलो आहोत. वयाची साठी केव्हाच ओलांडून गेली. आता नव्या दमाचे खेळाडू हा खेळ खेळायला सज्ज झालेत आणि उत्सुकही आहेत. हा खेळ आता देऊया ना त्यांच्या हातात. खेळत असताना आद्याने कुठे मला विचारले, “ आजी मी आता कशी खेळू?” तिला हवा तसा ती खेळ मांडत होती, मोडत होती, पुन्हा नवीन रचना करून बघत होती. तिला माझी मदत नको होती. आपणही आता हा डाव आपल्या मुलांच्या हाती देऊया. त्यांना हवी तशी ती त्यांच्या मनाप्रमाणे खेळतील. नव्या रचना करतील, नवे डाव मांडतील. आपण नको त्यात हस्तक्षेप करायला. चुकतील, धडपडतील पण कधीतरी बरोबर जागा मिळेलच की त्यांना. आपण आता नको त्यात पडायला. अनुभवाने होतीलच की तीही शहाणी. तो वर बसलेला परमेश्वर आपला हा भातुकलीचा डाव अर्धवट सोडायला लावून कधी आपल्याला हाक मारेल, सांगता येतंय का? आपण आपले आधीच आपलीही खोकी भरून तयारीत असलेले बरे. कोणी गरजवंताने जर नवा खेळ मांडला असेल तर त्यालाही देऊया ना आपली चार भांडी, नको असलेले पण उत्तम स्थितीतले कपडे, पुस्तके, फर्निचर. नको आता हा ‘अती’चा हव्यास.त्यांनाही मिळू दे खेळ खेळण्यातला आनंद. जुनी ओझी आता नकोत कवटाळायला.’
कितीतरी घरातले पक्षी दूरदेशी उडून गेलेत, त्यांना तुमच्या जुन्यापुराण्या वस्तू आणि भांड्याकुंड्याची, अवजड फर्निचरची आणि कशाचीच अजिबात गरज नाहीये. तर मंडळी, आवरता घ्या हा पसारा खेळ आवरा आणि त्या वरच्या नवीन घराचे कधी बोलावणे येईल तेव्हा हसतमुखाने त्याच्या घरी जायला सज्ज व्हा….. रिकाम्या हाताने .. आणि मनानेही.
“अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ” भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता, इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.
‘एव्हरीटाईम हे काय म्हणत असतेस तू आज्जी ?’
‘ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे.’
‘पण हे म्हणत असलीस की तुझं माझ्याकडे लक्षच नसतं’ फुरंगटलेल्या रोहिनची तक्रार.
रोहिनचा रूसवा दूर करण्यासाठी,पटकन संवाद साधला जाण्यासाठी म्हणून त्याच्या स्टाईलच्या मराठीचा आधार घेत मी म्हटलं,
‘बच्चमजी,व्हिडिओ गेम -मोबाईल मध्ये रमलात की आपणही माझ्या प्रश्नाला आन्सर देत नाही. अगदी तश्शीच मी पण “3G”मध्ये रमून जाते.’
‘आज्जी,”हे” म्हणायला यू आल्सो नीड “3G”?’
रोहिनच्या चेहरयावरचं आश्र्चर्य बघून मला हसू आवरलं नाही.त्याला समजवायला म्हटलं,
‘अरे,दत्तात्रय म्हणजे ‘ब्रम्हा -विष्णु -महेश” टुगेदर, म्हणजे “3G”च नाही का ?अर्थात माझ्या आणि हल्ली सगळ्यांची ‘नीड’ असलेल्या “3G” मध्ये एक मेजर फरक आहे.’
‘फरक म्हणजे डिफरन्स,राइट?तो कोणता?’ रोहिनने खात्री करण्यासाठी विचारलं.
‘सांगते! सगळे ज्याचे फॅन झालेत ‘ते “3G” मिळतंय की नाही ,नसेल तर कोणत्या डायरेक्शनला मिळेल हे सर्व चेक करावं लागतं. पण मी नुसतं “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असं म्हटलं तरी इनफ आहे.’
‘का ?असं का ?आणि “दिगंबरा” म्हणजे ?’ रोहिनच्या अनेक शंका धडाधड बाहेर आल्या.
‘अरे,”दिगंबरा”चा अर्थ सर्व दिशांना व्यापून राहिलेला म्हणजे स्प्रेड होऊन राहिलेला.”दिगंबरा”
हे दत्ताचं अजून एक नाव आहे.’
या अशा संवादानंतर “3G” ची गोष्ट सांगण्याची रोहिन मागणी करणार याची मला खात्री होती.
‘So श्रीदत्त म्हणजे 3 in one देव आहे?कसं काय? सांग ना आज्जी ‘ गेममध्ये पाॅझ घेऊन माझ्याजवळ येऊन रोहिननं विचारलं.अशा सुवर्ण संधीचा लाभ सोडून देणं मला शक्यच नव्हतं.मी लगेचच गोष्टीला सुरूवात केली.
‘दत्तात्रय या नावातच त्यांच्या वडिलांचं नाव लपलेलं आहे.पिता अत्रीऋषी आणि माता अनुसूया यांचा सुपुत्र means son म्हणजेच “श्रीदत्तात्रय”!फार पूर्वींची गोष्ट-अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी “ब्रम्हा-विष्णु-महेश” या देवांची कठोर आराधना केली.’
‘कठोर आराधना म्हणजे?’ मला मध्येच अडवत रोहिनचा प्रश्न आलाच.
‘म्हणजे “hard worship” ! त्याला मराठी शब्द अर्थासहित समजावणं हे माझं आवडतं काम. मातृभाषेची हसतखेळत ओळख करून द्यायला “गोष्ट” हे एक उत्तम साधन आहे असं मला वाटतं.
‘म्हणजे गेममध्ये वरची लेव्हल क्राॅस करायला मला जसं continuous hard try करायला लागतं….’त्याच्या विश्वातल्या गोष्टींशी अर्थ रिलेट करण्याच्या रोहिनच्या प्रयत्नाची गंमत वाटून मी पुढे सांगायला सुरुवात केली.
‘अत्रीऋषींच्या आराधनेमुळे ब्रम्हा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रसन्न झाले.अत्रीऋषी -अनुसूयेला “त्रिदेव पुत्रप्राप्ती” झाली म्हणजेच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला. दत्तजयंतीच्या दिवशी ” त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा….” ही आरती आपण म्हटलेली आठवतेय ?’
मला मध्येच थांबवत रोहिनची प्रतिक्रिया आली, ‘आरतीमध्ये “त्रैमूर्ति” का म्हटलंय ते आता मला करेक्ट समजलंय आजी. पण दत्ताच्या तसबिरीमध्ये गाय, कुत्रे एटसेट्रा का असतात आज्जी ?’
खरंतर त्याच्या तोंडून ‘तसबीर’ हा शब्द ऐकून मला अगदी गहिवरून आलं. माझे ‘मराठी प्रयत्न’ रूजतांना पाहून छान वाटतं होतं. पण आधीच चमकदार असलेल्या रोहिनच्या डोळ्यातली उत्सुकता अधिक न ताणता मी म्हटलं,
‘पृथ्वी – म्हणजे “मदर अर्थ” कशी एखाद्या आईप्रमाणे सगळ्यांच्या डिमाण्डस् फुलफिल करते. तसबिरीतली गाय हे पृथ्वीचं “प्रतिक” आहे.”प्रतिक” म्हणजे symbol. आता पहा, ते “3G” symbol दिसत असलं की सगळे कसे खूश असतात. त्यामुळेच तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण होतात नं ! ४ कुत्रे हे आपल्या वेदांचं प्रतिक आहे– “ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद” !’
‘वेद म्हणजे काय आजी ?’ रोहिननं अधीरपणे विचारलं.
खरं तर “वेद” म्हणजे काय हे सोप्पं करून सांगणं हे खरोखरच अवघड काम होतं.तरीही मी म्हटलं,
‘काही माहिती हवी असेल, काही क्वेरी असेल, काही अडलं असेल तर हल्ली सर्वजण विकिपिडिया रिफर करतात,राइट ? ‘वेद’ म्हणजे आपल्या अॅन्सेस्टर्सनी जपलेलं “ज्ञानाचं भांडार” आहे.’ त्याला चटकन समजेल अशा प्रकारे समजावण्याचा मी आपला एक प्रयत्न केला.
‘व्हेरी इंटरेस्टींग. आज्जी अजून सांग नं ‘आता रोहिनला राहवेना.
‘शंख-चक्र हे श्रीविष्णूचे तर त्रिशूल-डमरू हे श्रीशिवाचं प्रतिक आहे. मला आठवतंय ,तू एकदा मोबाईलमधले डमरू आणि चक्र चे सिम्बाॅल दाखवले होतेस,हो नं?’
‘अगदी बरोबर आज्जी,” ब्लूटूथसाठी डमरू आणि जनरल सेटिंग्ज ला चक्र “अशा साइन्स असतात. आज्जी हे थोडंसं ब्राॅड पण व्हाॅटस्अॅपच्या साइन सारखं दिसतंय ते काय आहे ?’
‘अरे त्याला कमंडलू म्हणतात. कमंडलू आणि जपमाला हे श्रीब्रम्हाचं प्रतिक आहे.’
व्हाॅटस्अॅपच्या सिम्बाॅलशी त्याने शोधलेल्या साधर्म्याचं मला मनात कौतुक वाटत होतं. माझ्या गोष्टीचे तपशील त्याला आवडलेत असं लक्षात येत असतानाच पुढचा प्रश्न आला.
‘पण मग आज्जी श्रीदत्तांचा जप करतांना तू “अवधूत चिंतन …..”असं का म्हणतेस ?अवधूत म्हणजे ?’
‘अवधूत हेही श्रीदत्ताचंच नाव आहे. ह्या नावाचं मिनिंग आहे ” नेहमी आनंदात,वर्तमानात रहाणारा “.
म्हणून तर मी म्हटलं की ही माझ्या जपाची “टॅग लाईन” आहे, नेहमी आनंदात ठेवणारी. पहा, आजकाल “3G” चा टॅग स्पष्ट असेल तर असतात की नाही सगळे आनंदात अन् अपडेटेड?
काय?’
रोहिनला मनापासून हसू आलं ,अन् अर्थातच मलाही ! खूपशा मराठी शब्दांची अर्थासहित रोहिनला ओळख करून दिली, एक पौराणिक कथा त्याला आवडेल अशा पध्दतीनं सांगता आली ह्याचा मलाही आनंद वाटला.
सध्याच्या “4 G” च्या जमान्यात मी रोहिनला माझ्या “3G” शी कनेक्ट करू शकले… आणखी काय हवंय माझ्यासारख्या आज्जीला ?
लेखिका : सुश्री अनुजा बर्वे
प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
आज मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने मराठीचे अवलोकन करताना त्यातील बाराखडी व मुळाक्षरांच्या वेगवेगळ्या दर्शनानी भावली आणि मराठी असल्याचा आनंद झाला. पहा तुम्हालाहि मिळ्तोय का? आणि खरच आवड्ल्यास कॉमेन्ट्स द्यायला,शेअर करायला,लाईक करायला विसरू नका.
ऐका मंडळी सुजाण। मराठीचे हे पुराण।वर्षा तुम्हा समजावूनी सांगतसे॥
मराठी भाषेसी ना तोड। तया नाही कशाची जोड।अमृताहूनी गोड, देववाणी॥
३६ मुळाक्षरांची मुळे। बाराखडीची बारा पाने।हलवूनी कल्पवृक्ष साकार होई॥
आता सारे आपण। बाराखडीचे करू अवलोकन।ठेवूनी ध्यान,कान देऊनी ऐका॥
दुपारची वेळ असूनही फलाट सुमसाम होता. गाडी यायला अजून दोन तासांचा वेळ होता. साडेचारची गाडी साडेचारला येईलच याची शाश्वती नव्हती. तोपर्यंत ताटकळणं आलंच. दिवसातून एकदा पॅसेंजर एकदा या दिशेला, दुसरी त्यादिशेला जायची. असलाच कुणी पॅसेंजर तर घ्यायची पोटात. नाहीतर थांब्याची वेळ तीन मिनिटे संपली की निघायची. तसं चाकांचं रूळावरून धावणं अव्याहत. बाकीच्या गाड्या थांबत नव्हत्या. धडधड धावून जात होत्या. फलाट त्यांच्यासाठी सावकाच.
रणरणत्या उन्हात फलाटावर तो एकटाच. स्टेशन तसं छोटं असल्याने छप्पर ही छोटंच. कौलारू. काही कौलं सुटी झालेली. त्यातून उन्हाची तिरीप फलाटावर येणारी तीही नेमकी बाकावर. बाकं ही मोजकीच. कोपऱ्यात मोठं रांजण लावलेलं आडोशाला.त्याला लाल कपडा गुंडाळलेला. तो मात्र ओला होता. माठातलं गार पाणी घशा खाली ढकललं. तेवढंच बरं वाटलं. जंबूखेडा हे काहीसं वेगळं वाटणारं नाव स्टेशनला. ते नाव लाल रंगाने मोठ्या अक्षरात पाटीवर लिहीलेलं ठळकपणे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला. जिथून स्टेशनला उतार लागतो.पाटीवर गावाच्या नावाखाली एमएसएल ही लिहीलेलं. मीन सी लेवल नऊशे छत्तीस फूट. अर्थात गाड्यांतून मुशाफिरी करणाऱ्या मुशाफिराला त्या आकड्यांशी काही देणं घेणं नव्हतं. दिवसातून एकदा गाडी येते जाते हेच खूप होतं त्यांच्यासाठी.फलाटही फारसा उंच नव्हताच. सिंगल लाईनवर धावणाऱ्या गाडीसाठी फलाटावर दोन्ही बाजूला रूळ असलेले. कधी अवचित काही घडलं तर मालगाडी वा पॅसेंजरही थांबायच्या बराच वेळ दुसऱ्या रूळावर. फलाट छोटासाच असल्याने नीटनेटका साफ असलेला. दिवसातून दोन वेळा केर काढला तरी पुरे. माणसांची नियमित ये जाच नसलेली तेव्हा कचरा होणार कसा? डोक्यावरून उन्हं कलली तरी फलाट तापलेलाच. घामाच्या धारांनी चिंब होणं होत असलेलं चिकट चिकट. कौलांवर कावळे तेवढे हजर असलेले. त्यांची काव काव अजून दोन तास ऐकावी लागणार.
गाव तसं पाच मैल लांब तेही छोटंसंच. पाच पन्नास घरं असतील नसतील. आठवड्यातून एकदा आठवडे बाजार भरतो तेव्हा थोडा फार गलबला होतो गावात. एरवी शांतच. गावातली मंडळी दिवसभर शेतात. रात्रीही निजानिज लवकर घडत असलेली. गावाच्या मध्यावर असलेलं देवीचं देऊळ. त्यात गणपती, मारूती, शंकर पिंडीच्या रूपात, देवी समोर सिंह, शंकरा समोर नंदी सगळे गुण्यागोविंदाने नांदत असलेले. गणपतीला दुर्वा, महादेवाला बेल, देवीला लाल फुल, मारूतीला तेल अजूनही वाहिलं जात असलेलं. गाव अजूनही तसंच वीस पंचवीस वर्षांपूर्वी होतं तसंच. बदल तसा फारसा नाहीच. अनोळखी चेहेऱ्यांची भर पडली इतकंच. गावाच्या ओढीने आलो तर गावातल्या खाणाखुणा तशाच मात्र गाव तसं अनोळखीच. घरोघरी ओट्यावर बसून असलेली म्हातारी मंडळी सोडली तर परिचित असलेलं तसं कुणीच नाही. मुद्दाम ओळख लपवली मग. कुणाचाच विचार करायचा नाही हे पंचवीस वर्षांपूर्वी ठरवलं होतं जेव्हा गाव सोडलं होतं तेव्हा. आताही तेच. वेगळा विचार करणं शक्यच नव्हतं. राहत्या घरात दुसरीच माणसं राहत असलेली. शेत जमीनही गेलेली. नदीचं पाणी तर नेहेमीच आटणारं. जेमतेम चारसहा महिने वाहायची तेव्हा. उन्हाळ्यात कोरडीठाक. आताही तशीच होती कोरडीठाक. गावात मोजक्याच विहीरी. त्यावर निभावून नेलं जाई. तेवढाच ओलावा. येणं तर झालं गावात. पण जीव लावणारं, ओलावा देणारं कुणी उरलंच नव्हतं.
एक कुत्रं धावत धावत गेलं फलाटावरून. तेही पाहत होतं विचित्र नजरेने. कोण हा पाहुणा? त्याचं धावणं पाहिलंन् आठवलं. असाच धावत येत होतो गावातून. गाडीची वेळ झाली की. मग डोकावून डोकावून पाहणं व्हायचं लांबचलांब रूळांवर. वेळ झाली की वेळेवर वा कधी उशिरा ते यायचंच काळं धुड धडधडत, कोळशाचा काळा धूर ओकत. त्या कोळशाच्या धुराचा वास ही खोलवर घ्यावासा वाटायचा. माथी फडकी बांधून असलेले ड्रायव्हर हीरो वाटायचे. कधीकधी गार्ड, स्टेशनमास्तर व ड्रायवरचे बोलणं व्हायचं. तितकाच वेळ गाडी जास्त थांबायची. तेवढ्यात ही गाडीत चढउतर करून घ्यायचो. गाडी हलली की उडी टाकायची. मग इंजिनकडे पळणं व्हायचं. गाडी बरोबर शर्यत लावणं मजेशीरच असायचं. करवंद, जांभळं विकणाऱ्या मुली हमखास असायच्या. मग तो मेवा चाखत चाखत गावाकडे परतणं व्हायचं. तेव्हा माहित नव्हतं की एके दिवशी डोक्यात राख घालून याच गाडीतून लांब निघून जाणं होणारेय कायमचं.
गाडी येण्याच्या अर्धातास अगोदर स्टेशन मास्तरने खिडकी उघडली. सर्वात अगोदर तिकीट काढून घेतलं. थेट मुंबईचं तिकीट काढल्याने स्टेशन मास्तर अचंबित होऊन बघत होते. मागून आणखी एकाने तिकीट काढलं. बस तेवढाच व्यवहार खिडकीवर झाला. पुन्हा बाकावर येऊन बसलो तर स्टेशन मास्तरही शेजारी येऊन बसले.“ नवीन दिसताय गावात? ” चौकशी केलीच त्याने. “ मी इथलाच. ” इतकंच म्हटलं तर त्याच्या डोळ्यात कोण आश्चर्य उमटलेलं. “ कधी बघितलं नाही? ” तसं मग परवाच्या फ्लाईटचं युएसचं तिकीटच त्याच्या हातात ठेवलं. त्याने ते न्याहाळून लगेच परत केलं. दुसरे तिकीट काढलेला सुटेडबुटेड तरूण दुसऱ्या बाकावर ऐटीत बसला होता. त्याच्या पाया जवळ पागोटं घातलेला म्हातारा बसलेला. त्याचं सारखं टुकूरटुकूर पाहणं चाललेलं. काही वेळानं तो आलाच जवळ. पुन्हा एकदा त्याने निरखून घेतलं. हात जोडून राम राम केला. “ निंबा पाटलाचा पोर ना रे तू! ” आठवत नव्हतं कोण असावा हा. पण जसं तो बोलला तसं लख्खं आठवलं. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो होतो तो हा धोंडू. आता जख्ख म्हातारा झालेला. पटकन खाली वाकणं झालं. धोंडूने तर छातीशीच कवटाळलं. त्याच्या डोळ्यात पाणीच पाणी. “ पहाटेच आलास अन् लागलीच निघाला व्हय मुडद्या. ” गळाच दाटून आला. बोलवेचना त्याच्याने. पाण्याची बाटली धरली तर दोन घोट घेत भडाभडा बोलायलाच लागला. “ घराच्या जोत्या समूर उभं राह्यलं तवाच वळखलं तवास्नी. मालकाचं पोर हाय, लई मोठं झालंस रे! कुटं निगून गेला व्हतास. असं कुनी काय निगून जातं का रागास्नी! तुजी आई गेली झुरून झुरून तुज्यापायी. आबांनी घर शेती विकली गेलं शहरात. तुजी भाऊ बहिणी कुनी फिरकत नाही गावाकडं. तू कसं येणं केलंस? ” आता माझ्या डोळ्यात पाणी. “ गाव आठवलं. गावाकडची माणसं आठवली. देवीच्या देवळातली शाळा आठवली. अन् हा फलाट आठवला बघ अन् आलो तसाच. ”
बराच वेळ धोंडू बोललाच नाही. नुसतं डोळ्यातनं पाणी. मग स्वगत म्हटल्यासारखा धोंडू बडबडत राहिला. “ हा माझा नातू गाव सोडून शहरात चाललाय. एकेक करून सोडत चाललेत. गाव गाव नाही राहिलं आता. रयाच गेली. जुनी जिव्हाळ्याची माणसं नाही राहिली. विखरून पडलंय गाव. विसरलं ही जाईल काही दिसांत. ” धोंडू स्वतःतच हरवत चाललेला. इतक्यात गाडीची शिट्टी वाजली. फलाटावर गाडी येऊन दिमाखात उभी राहिली. तसं धोंडूने स्वतःला आवरलं. तसं एकमेकांच्या पुन्हा पाया पडणं झालं. मी धोंडूचा खांदा थोपटत म्हटलं. “ गाडीची वेळ झाली की निघून जावं लागतं. थांबणं होत नाही. ” गाडीने वेग घेतला तसा फलाट मागे पडत गेला.
☆ “हे सोहळे की देखावे….…” – लेखिका : सुश्री ज्योती चौधरी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
नाना आमचे स्नेही.. परवा त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटामाटानं संपन्न झाला खरंतर हा सोहळा त्यांच्या मनाविरुद्धच, कारण त्यांना त्यांचा जन्मसोहळा नव्हे तर 81 वी जीवनयात्रा त्यांच्या ठराविक स्नेह्यांसमवेत घरी साजरी करायची होती पण मुलांसाठी सुनांसाठी अन नातवंडांसाठी ही एक पर्वणी होती स्वतः चे हितसंबंध जपण्याची !
आता बघा नाना रिटायर्ड -80 पूर्ण तर नानी 75 वर्षाच्या! तिन्ही मुलं फ्लॅट संस्कृतीत रमणारे, गावातच राहतात अन बैठ्या घरात नाना नानी एकटेच राहतात ! जमत नाही हल्ली स्वयंपाक करणं म्हणून एका मावशींकडचा डबा सकाळीच येतो. खरं तरं गरमागरम जेवण ही नानांची तरुणपणची आवडच !
“ बरेच दिवस झालेत गरमागरम जेवण जेवून “.. चार दिवसापूर्वीच ते नानींना म्हणालेत ! पोळी चावत नाही, भाजी तिखट असते म्हणून नानी मिक्सरमधून पोळी काढून वरणासोबत देतात. घरकामास अनेक वर्षांपासून मदतीला असते मालू !
आठ दिवसांपूर्वी मुलं सुना सर्वजण नानींकडे जमले, नानींना कोण आनंद झाला. लगेच त्यांनी श्रीखंडाच्या वड्या सर्वांच्या हातावर ठेवल्या. धाकट्या सुनेनं येण्याचं प्रयोजन सांगितलं .. ‘ आम्हा सगळ्यांना नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करायचाय,’ क्षणभर शांतता.!.
.. हल्ली असले सोहळे आणि तो दिखावू थाट नाही सहन होत म्हणून नानांनी विषय बंद केला ,नानी म्हणाल्या, ” छान घरी करू साजरा यांचा वाढदिवस, तुमच्या किलबिलाटानं घरं हसेल, आनंदून मोहरेल . यांना आवडेल असे गरमागरम दोन पदार्थ अन् मऊसा वरण- भात- तूप ठेवू, त्यांचे समवयस्क स्नेही
बोलवू !” …..पण नवीन पिढीला नव्या पद्धतीने करायचं होतं सेलिब्रेशन.. परवा नाना-नानींना सत्कार मूर्ती बनवून बॅंक्वेट हॉलच्या सजवलेल्या सोफ्यावर बसवलं, नाना कडक सफारीत तर नानी भारी भक्कम पैठणीत आणि दागिन्यांनी मढवलेल्या..चेहरा थकलेला न् शरीर दमलेलं ! येणारे पाहुणे कुणीच ओळखीचे नसल्यानं आलेली, भेदरलेली भावना !
मुलांचे बॉस.. सहकारी.. मित्र मंडळ.. नातवंडांचे कॉलेज कंपू.. सुनांचे किटी ग्रुप्स.. सोशल नेटवर्किंग, यात 250 माणसं झाली मग झालं काय…नाना अन् नानींचे 8-10 जण ‘ उगीचच वाढतात ‘ म्हणून बोलवले गेलेच नाहीत..! त्यामुळे सोहळा नक्की कुणाचा याचा नाही म्हटलं तरी नानींना राग आलेला ! बरं दणक्यात सोहळा करायचा तर पदार्थही वेगवेगळे हवेत ! कुणाला चायनीज आवडतं तर कुणाला पंजाबी ..साउथ इंडियन डिशसुद्धा आपली स्टाईल दाखवत होत्या..महाराष्ट्रीयन पदार्थ नेहमीच होतात म्हणून त्यांना सुट्टी दिलेली ! आईस्क्रीम अन् विविध पदार्थांची रेलचेल ..पण नाना नानींना गोडबंदी होती, मग खायचं काय..?दात नसलेल्या सत्कारमूर्तींसाठी खाण्याचा पार आनंदच होता ! बरं खाण्याच्या टेबलपर्यंत जायचं कसं? मॅनर्स पाळायला हवेत म्हणून आजी आजोबा गेल्या तीन तासापासून नुसतेच सूप पिवून गप होते !
एकदाचा सत्कार सोहळा दिमाखात संपन्न झाला अन आता रात्रीचे 10:30 झालेत. ‘ जेवण जात नाही रे बाबाsss ‘ म्हणत दोघांनी जरासं पुन्हा सूपच घेतलं ! मुलांनी रात्री 11वाजता नानांना घरीच रिलॅक्स वाटतं म्हणून बैठ्या घरी आणून सोडलं…!
….. ….
सकाळी मालू आली.. जणू सगळं जाणणारी…
नानांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा याचा नीट उच्चारही करता न येणा-या, न समजणा-या तिनं मात्र आज त्यांच्या आवडीचा गरमागरम वरण भात घरून करून आणला अन् वरून तुपाची धार ओतत ती म्हणाली,
” माह्या मायबापाले मी तं पायलं नाय जी, पर तुमी मायेनं मले वागोता यातच मले माहे बावाजी भेटले.. माह्याकडून काय द्यावा इचार केल्लो अन् आठोलं तुमाले गरम वरन भात लै आवडते..नानी नं दिवाडीले देल्लेल्या जास्तीच्या पैशातनं तूप आनलं.. नाई मनू नका जी..! “
… काय बोलणार होते दोघं …. डबडबलेल्या डोळ्यांनी नानींनी नानांना वरण भाताचा घास भरवला..
मालू आज दोघांसाठी ख-या अर्थी अन्नपूर्णा होती. !
लेखिका : ज्योती चौधरी
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लंडनला प्रथमच लेकीकडे चाललेल्या वर्षाने मला भेटायला बोलावले होते म्हणून गेले होते तिच्याकडे. तिची मुलगी गेली सात आठ वर्षे लंडनला आहे.सगळी तयारी दाखवताना वर्षाने मला स्वतः दळून आणलेली शिकेकाई दाखवली. म्हणाली, “ बघ मी ही गव्हला कचरा, नागरमोथा असं घालून सुगंधी शिकेकाई करून आणलीय. माझ्या नातीचे, लेकीचे केस खूप सुंदर आणि लांबसडक आहेत. छान न्हायला घालीन मी त्यांना या शिकेकाईने.”
मनात खूप शंका आल्या पण न बोलता घरी परत आले मी. पण मनातून मात्र ती सुगंधी शिकेकाई जाईना. आमची आई अशीच आम्हाला तिने स्वतः केलेल्या सुगंधी शिकेकाईने दर रविवारी न्हायला घालायची. शिकेकाईत नाना वस्तू घालून ती स्वतः गिरणीतून दळून आणायची. डोक्याला लावायचे तेलही ती घरीच तयार करायची. माका आवळा ब्राह्मी असं ते हिरवेगार सुगंधी तेल किती छान असायचे. रविवारचे नहाणे हा मोठा कार्येक्रमच असायचा.
गरम कडकडीत पाण्याने आणि त्या शिकेकाईने आई आम्हाला न्हायला घालायची. टॉवेलने खसखसून केस पुसून मग केस वाळले की ते हिरवे तेल लावून छान वेण्या घालून द्यायची. त्या तेलाने आणि डोक्याच्या मालिशने गुंगी येऊन झोपच यायची मग आम्हाला. त्या सोहळ्याची फार आठवण झाली मला. आता वर्षा लंडनला लेकीला आणि नातीला कशी न्हायला घालते याची खूप उत्सुकता होती मला.
वर्षा परत आल्याचे समजले आणि मग मी निवांत गेले तिला भेटायला. गप्पा झाल्यावर सहज बघितले तर ते शिकेकाईचे पुडके तसेच पडले होते टेबलावर. न उघडताच. “ काय ग बाई? हे परत कसे आले ? “ मी विचारलं. खिन्न होऊन वर्षा म्हणाली, “ काय सांगू बाई तुला. नात म्हणाली, आजी प्लीज.मी असल्या पावडरने नाही हं केस वॉश करणार. माझा वेगळा शाम्पू असतो तोच चालतो मला. सॉरी ग आजी पण माझा बाथ टब पण किती खराब होईल ना या पावडरने.” तिला दुजोरा देत लेक म्हणाली “ हो ग आई.आता कसली ग शिकेकाई आणि काय. नुकतेच आम्ही घर रिनोव्हेट केलंय ना. या कार्पेटवर शिकेकाईचे डाग पडले तर? आणि मी आता बॉयकटच केलाय की. काय उपयोग या शिकेकाईचा मला. डाग पडले तर नसता व्याप व्हायचा.” … म्हणून हे बापडे पुडके आले परत माझ्याबरोबर.” उदास होऊन वर्षा मला सांगत होती.
मी म्हटले, “ सखे रागावू नको रुसू नको. दुःखी तर मुळीच होऊ नको बाई . पुढच्या महिन्यात आपण जाणार आहोत ना आदिवासी मुलींच्या कॅम्पला? तिथे दे ही शिकेकाई. अगदी सुस्थळी पडेल बरं ती.” वर्षाच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. लंडनचा प्रवास करून आलेली शिकेकाई पुढच्याच महिन्यात ठाण्याच्या आदिवासी पाड्यावर सुखाने रवाना झाली.
आणि अशी ही शिकेकाईची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.
नकार ही एक प्रतिक्रिया आहे. ‘हो’ म्हणजे होकार आणि ‘नाही’ म्हणजे नकार इतकी साधी या शब्दांची व्याख्या असली तरी या एका शब्दाने होणारे परिणाम हे खूप व्यापक आहेत. नाही, नको म्हणण्याने कदाचित संपूर्ण जीवनाच्या वाटाही बदलू शकतात. कधी त्या सकारात्मक असू शकतात तर कधी कडवट, बोचऱ्या, दुःखदही असू शकतात.
काही वेळा नाही म्हणणं फारसं कठीण नसतं पण आयुष्यात अशा काही प्रसंगांना सामोरे जावं लागतं की त्यावेळी नकार देण्यासाठी हवं असतं बळ, एक ठामपणा, निश्चित भूमिका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामासाठी लागणारी जबरदस्त सहनशीलता, खंबीरपणा आणि तितकाच तटस्थपणाही. विचलित होणारं मन अथवा द्विधा मनस्थितीत घेतलेल्या निर्णयाची फलश्रुती ‘आपण चुकलो, आपण उगीच नाही म्हणालो’ या मानसिकतेतही घेऊन जाऊ शकते. म्हणूनच नकार द्यायला बळ लागतं.
नकार द्यायची वेळ वेगवेगळ्या आघाड्यांवर येऊ शकते. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय. आपल्या भोवताली वावरणाऱ्या जवळच्या, दूरच्या नात्यांतल्या, मैत्रीतल्या माणसांच्या बाबतीतही ही वेळ येऊ शकते.
सर्वप्रथम ‘नकार’ हा शब्द उच्चारल्यावर मनात येते ते म्हणजे विवाह ठरण्यापूर्वी मुलीने मुलाला अथवा मुलाने मुलीला दिलेला नकार. बऱ्याच वेळा नापसंतीचे खरे कारण देणं अवघड असतं. अशावेळी पत्रिका जमत नाही किंवा आपण एकमेकांना कंपॅटीबल नाही होऊ शकत, थोडक्यात आपली क्षेत्र वेगळी आहेत, स्वभाव वेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळ्या आहेत वगैरे वगैरे पण आडवळणाने दिलेला,समोरच्या व्यक्तीला न दुखावता दिलेला हा नकारच असतो. या ठिकाणी दिलेला नकार म्हणजे वेळीच घेतलेला योग्य निर्णय ठरू शकतो. नाहीतर आई-वडिलांच्या, इतरांच्या दबावाखाली येऊन जर कुठला निर्णय घेतला गेला तर “आयुष्यात दुःखाचे दार उघडले” असेच होऊ शकते.
माझ्या एका मैत्रिणीचं लग्न जमत नव्हतं. पाच मुलींचे आई वडील फार चिंतेत होते. धाकट्या बहिणीही रांगेत होत्या. त्यामुळे आई-वडिलांना हीचं लग्न जमवण्याची अत्यंत घाई झाली होती. अखेर एका मुलासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी माझ्या मैत्रिणीकडून होकार मिळवला. पण मनातून माझी मैत्रीण नाराज होती.
पहिल्याच भेटीत त्या मुलाने तिला विचारले होते,” तुला मच्छरदाणीत झोपायला आवडते का?”
हा काय प्रश्न झाला? तोही एकमेकांशी अजिबात ओळख नसताना… माझ्या मैत्रिणीजवळ लग्नाळू भांडवल नसेल कदाचित पण तिची योग्यता सर्वसाधारण पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त होती. तिने जेव्हां मला हे सांगितले तेव्हा मी तिला म्हणाले,” तू ठाम रहा. कुठल्याच दबावाखाली मुळीच येऊ नकोस. फार तर काय होईल थोडे दिवस तुझ्या कुटुंबात अशांती राहील पण तू या मुलाला नकारच दे. तुझं आयुष्य तू असं पणाला लावू नकोस.”
आणि शेवटी तिने त्या मुलाला नकार दिला. वादळ झाले. त्या वादळात मी तिची मैत्रीण म्हणूनही भरडले गेले पण कालांतराने झाले सारे शांत. आज माझी मैत्रीण एक सन्मानित सुखी जीवन जगत आहे याचा मला अभिमान आहे.
बँक गॅरंटी हा एक अत्यंत धोक्याचा प्रकार आहे. मी ४० वर्षे बँकेत नोकरी केली. कर्ज खात्यात काम करत असताना मला अनेक अनुभव आले. कित्येक गॅरंटीयरना मी उध्वस्त झालेले पाहिले आहे. त्यामुळे कर्जाचे फॉर्म भरून घेताना मी कर्जासाठी गॅरंटी देणाऱ्या प्रत्येकाला सावध करत असे.
“ही व्यक्ती कोण लागते तुमची? तुम्हाला खरोखरच भरवसा आहे का यांच्याविषयी? कुठल्याही कारणाने ही व्यक्ती जर कर्ज फेडू शकली नाही तर कायद्याने बँक तुमच्याकडून कर्जाची वसुली करून घेऊ शकते. तेव्हा विचार करा. नकार द्यायला मुळीच घाबरू नका.”
माझ्या या चांगुलपणाचे बक्षीस म्हणून काही दिवसांनी माझी या खात्यातून हकालपट्टी झाली. मुळातच कर्ज वाटपामध्ये अनेक राजकीय संबंध गुंतलेले असतात. माझ्या या,आणि इतर गैरवर्तणुकीच्या नकारात्मक भूमिकेमुळे मला डावलण्यात आले अर्थात त्याचे मला अजिबात दुःख नाही.
नकार आणि व्यवहार याचा खूप जवळचा संबंध आहे.” ताट द्यावे पण पाट देऊ नये” असे म्हणतात. बाप आणि मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद होतात. मुलांवरील प्रेमासाठी आई-बाप मुलांना सर्वस्व देऊन टाकतात. सगळीच मुले वाईट नसतात पण बहुतांशी अशा आई-वडिलांची झालेली दुर्दशा आपण पाहतोच की. वेळीच नाही म्हणणे हे म्हणून गरजेचे असते.
“नाही कशी म्हणू तुला” या भावनेपायी अनेकांना खूप सोसावं लागलंय. फार जवळचं नातं असतं. केवळ एका नकारापायी मैत्रीचं अगदी रक्ताचं नातंही तुटण्याचा संभव असतो.
कधी कधी समोरचा माणूस इतका लाचार असतो की दयेपोटी किंवा एक संधी याला देऊन बघूया या भावनेने “नाही” म्हणायला मन धजावत नाही पण अशावेळी भविष्यात “उगीच मदत केली” अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच जसे पूजेत आपण जे अर्पण करतो त्यावर पाणी सोडतो तद्वत, केलेल्या शारीरिक, आर्थिक कुठल्याही मदतीवर पाणी सोडण्याची वृत्ती जरूर बाळगावी. जेणेकरून नंतरचे मन:स्ताप टळू शकतात.
दान देणं, देणाऱ्याचे हातच घ्यावेत, अडचणीत सापडलेल्यास सहकार्य करावे,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले” ही आपली संस्कृती आहे. आपला धर्म. आहे तो पाळणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे नेहमीच नकार देणं हे योग्य नाही. तो आत्मकेंद्रीपणा ठरू शकतो. स्वतःपुरतं जगणं,” बाकी जगाचं काहीही होऊ दे’ ही भावना मात्र जोपासली जाऊ नये. कधीकधी आपलं बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते अशावेळी माघार घेणं हा मात्र पुरुषार्थ नाही.
मात्र आपली शेजारीण, जिच्याशी आपले संबंध खूप चांगले आहेत, मैत्रीचे आहेत पण रोज रोज ती हातात वाटी घेऊन काही ना काही मागायला आपल्या दारी येते. कधी साखर, कधी चहा पावडर, कधी कोथिंबीर आणि असेच काही बाही.. पण कधीतरी आपण तिला नाही म्हणावे ते याकरिता की त्यातूनच तिला तिचा स्वाभिमान टिकवण्याची शिकवण मिळावी अथवा स्वावलंबनाचा धडा मिळावा.
मला एक प्रसंग आठवतो. माझ्या एका जिवलग मैत्रिणीने माझ्याकडे एक दिवस माझ्या सासूने मला दिलेली सोन्याची बोरमाळ मागितली. त्याचे कारण तिने असे सांगितले की,” या लग्नात मला सर्वांसमोर चांगलेच नाकावर टिच्चून मिरवायचे आहे”
ती माझी इतकी जवळची मैत्रीण होती की तिला मी नाही म्हणणं म्हणजे तिच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण होण्यासारखं होतं. तिच्यापेक्षा जास्त मीच निर्णय न घेऊ शकल्यामुळे बेचैन झाले होते. तेव्हा मला माझ्या नवऱ्याने मदत केली. तो म्हणाला,” तुला नक्की कशाची भीती वाटत आहे? तुझी आणि तिची तू नाही म्हटल्यामुळे मैत्री तुटेल की इतकी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती सोपवण्याचे भय तुला वाटत आहे? कारणं काहीही असू दे पण तू यावेळी ठामपणे नकारच द्यायला हवा आहेस. तू तिला फार तर अशा बेगडी देखाव्यापासून परावृत्त करण्याचा मैत्रीच्या माध्यमातून समंजसपणे प्रयत्न करावास म्हणजे ती ही दुखावली जाणार नाही.”
थोडक्यात नकार देऊ नये आणि नकार देता आला पाहिजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र केव्हां नकार द्यावा आणि केव्हां देऊ नये हे त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. केवळ भिडस्तपणा, मुखदुर्बलपणा अथवा संकोचाने चुकीचा निर्णय कधीही घेऊ नये. योग्य वेळी नकार देण्याचा निर्णय हा फायद्याचा ठरतो असे म्हणण्यापेक्षा तो बरोबर असतो असे मी म्हणेन.
माझ्या मनात नेहमी येतं युधिष्ठराने त्याच वेळी द्युत खेळण्यास प्रतिस्पर्ध्याला नकार दिला असता तर …
कैकयीने मंथरेचा कपटी उपदेश डावलला असता तर…
सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडण्यास नकार दिला असता तर….
तर कितीतरी अनर्थ टळले असते ना. आपली पुराणे, आपला इतिहास वाचताना वेळोवेळी हा प्रश्न मनात येतो. त्यावेळी मात्र आपण म्हणतो जे व्हायचे ते होतेच. या ईश्वरी योजना असतात, विधीलिखित असते. पण तरीही एक संधी आपल्याजवळ असते. डावलण्याची, वेळीच नकार देण्याची. आणि तो देता आला पाहिजे इतकं मात्र मनापासून वाटतं…
मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.
आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.
सुरुवातीला मला तिच्या या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.
पण हळूहळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.
स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं. माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटा वळणे शरीराने पार केलेली दिसतात.
लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.
वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले. काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा. पण एकंदरीने तेव्हा बाबा, वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.
मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा. बाबांच्या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.
लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं. जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ, प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या. हव्याहव्याशा झाल्या.
मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी ‘बाजुला व्हा रे, किती अंगचटीला येता? जरा मोकळी राहू द्या ना मला ! ” असंही मी ओरडले त्यांच्यावर.
गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर, मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता. तो घरी आला की मला भरतं यायचं. मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.
मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.
या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते, गळामिठी घालते. अशावेळी स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील, मोकळेपणे बोलतील, जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत. त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मीहून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत, मला त्यांचे लाड करू देतात पण…. जाणवतंच काहीतरी..आतल्या आत…!
माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली, ”किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं ! ”
तिच्या त्या उद्गारात अर्थांचे डोंगर सामावले होते. मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्रदिशी अंजन गेलं.
मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ, वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे, मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.
आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते. तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.
आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.
एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.
मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमीप्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.
सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया (ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
माझ्या नेहमीच्या मैत्रिणी, मित्र यांनीही भरभरून दाद दिली. हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.
पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.
काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले, सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.
अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता. एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की, माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.
कोणाला दूर असलेला भाऊ आठवला, कोणाला लाड करणारा मामा आठवला. कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला. जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले. विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरुषांची संख्या जास्त होती.
हेही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण… अजून…
आज सकाळी पावणेआठचा सुमार. बेल वाजली म्हणून दार उघडलं. तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमला घामेजलेला. श्वास फुललेला.
”तुम्ही वैशाली पंडित का?” तिने विचारलं.
”हो. आपण? या ना.. ” मी.
यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?
” प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ”
नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं. एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना, हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.
शेवटी आवाज चढवला.
” बाई गं, माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे. कोण तू? का रडतेस?”
आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाक डोळे पुसले.
” मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले, मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो, नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्याजवळ थांबत नव्हतो. तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची. सतत पाणी वहायचं. हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो. एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली, या गं जवळ बसा. मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळे पण उघडेना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं. तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते. शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती. आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग केला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो. भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ”
अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई, माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.
मी सुन्न.
थोड्या वेळाने ती सावरली.
जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवा गाडीत बसवून दिलंय. निघते.
माझा हात हातात घेतला.— ‘ मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.’
ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला, काय बोलले नाही आठवत. इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही, एवढी जागेवर खिळले होते.
माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही. खरंच कुठे ठेवू तरी मी हे संचित ?
लेखिका : सुश्री वैशाली पंडित
संग्राहिका आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈