साडीचे टेक्श्चर थोडं कडकच होतं…निऱ्या नीट बसेनात, माझी आपली कसरत चालूच…खाली मान घालून मोडायची वेळ आली तरी साडी काही मनासारखी नेसली जाईना. कॉलमध्ये व्यग्र असलेली लेक…कानात हेडफोन्स् घालून धावत आली..हाताने खूण करत तिने पटकन निऱ्यांच्या चुण्या हातात घेतल्या आणि मांडी घालून मस्तपैकी खाली बसली. एक एक चुणी दोन बोटांच्या चिमटीत धरुन एकसारखी निरीवर निरी घालत तिने सगळ्या निऱ्या सेफ्टीपिनेत अडकवून दोन मिनिटांत नेटकी साडी नेसायला मला मदत केली.
हुश्श…मी एकदम रिलॅक्स झाले. क्षणभर या आवडलेल्या साडीऐवजी दुसरी साडी नेसून मोकळं व्हावं असंही वाटून गेलं. पण शेवटी लेकच ती…मनातलं सगळं जाणणारी… अगदी ऐनवेळी मदत करुन नामानिराळी होणारी…
तिचा कॉल म्यूट करत तिने, मी बांधलेल्या पोनीवर ही आक्षेप घेतला. “ इतकी छान साडी नेसलीस तर ते केस का आवळून बांधतेस…सोड जरा मोकळे….मी छानपैकी क्लचर लावून देते.” तिने डोक्याचा देखील ताबा घेतला. मी अगदी दहा वर्षाच्या पोरीसारखी तिच्यापुढं उभी राहिले, “ कर बाई तुला माझं काय करायचं आहे ते. ऑफिस चालू आहे हे मात्र विसरु नकोस,म्हणजे झालं !”
तिने मॅचिंग क्लचर मध्ये केस सैलसर अडकवून दिले…हलकीशी लिपस्टिक ओठावर ओढली…आणि माझी हनुवटी दोन बाजूस फिरवून…’ हं नाऊ ओके…जा आता…’ चा इशारा दिला.
तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून गेलं.आणि ती … “ मोठी गबाळी पर्स खांद्यावर टांगून जाऊ नकोस, एखादी वन साईड नाजुक पर्स घे, पैसे मोबाईल बसतील अशी.. तू म्हणजे ना कशावर काहीही करत असतेस.”
कोण कुणाची आई आहे हेच क्षणभर मला विसरायला झालं. “ आई छान रहावं ग…तू अशी छान असलीस की मलाही छान वाटतं…”
“अग गधडे…हेच लहानपणी मला तुमच्याकडून अपेक्षित असायचं..पण आम्हाला धुडकावून तुम्ही कधी ऐकलंत का आमचं?”
मला एकदम लहानपणीची हीच ती लेक आठवून गेली. खेळ,शाळा, अभ्यासातून वेळ मिळत नसताना, तिला असं आवरून देताना, माझ्या आईपणाला असंच भरतं येत असे. ती वैतागायची…बाहेर मैत्रिणी उभ्या असायच्या…” तू बाहेर जाताना टोकत जाऊ नकोस ना आई… “ तिचा सूर चिडका व्हायचा. “ नीट आवरून सावरून जावं ग बाहेर पडताना…” मी आपली सूचनावजा एखादं वाक्य टाकायची.पण त्या फटकुऱ्या जुनाट जीन्स् अन् वर ते टिचभर झबलं अडकवून, त्यांना धावायची कोण घाई असायची.
“ नको ग घालूस त्या रंग उडालेल्या जीन्स ,कसं दिसतं ते जुन्या बाजारातून आल्यासारखं….!”
“ आई हीच फॅशन आहे…आणि कंफर्टेबल पण असतात. तुमचा आणि आमचा फॅशन सेन्स फार वेगळा आहे… “ आपली बोलती बंदच !
सवयीने जुनीच, समोर असलेली चप्पल पायात अडकवली…तिचं लक्ष होतंच ….
“ नवीन घेतलेल्या मोजड्या घाल पायात…ते जुनं पादत्राण फेकून दे आता…!”
जाता जाता…एक बाण आलाच.
मी बाहेर पडताना…हळूच तिच्या कानाशी कुजबुजले… “ समजलं…कसं वाटतं ते ! माझीही अशीच चिडचिड होते, तुझा जीन्समधला अवतार बघून….कर्मा रिटर्न्स हं !”
ती मनापासून हसली…” आई तू पण ना….. “
लेखिका : सुश्री सौ विदुला जोगळेकर
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते.उगीचच उदास वाटतं.आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही.मोबईलचा कंटाळा आला.काय करावं सुचत नव्हतं.एकदम ब्लॅंक झालो.टेरेसवर जाण्याची लहर आली.सौंना आश्चर्य वाटलं.तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो.दोन मजले चढून टेरेसवर आलो.आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे,कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं.टेरेसवर शांतता होती.कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो.बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते.इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला…..
“ए,काल संध्याकाळी काय झालं.”
“काही नाही”
“बोल की,येस की नो”
“अजून मी फायनल सांगितलं नाही.”
“लवकर सांग.आधीच उशीर झालाय.”
“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.
“उगाच भाव खाऊ नकोस.मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”
“फुकट केलं नाहीस.दोघांकडून गिफ्ट घेतलय.तेव्हा जास्त उडू नकोस.”
“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”
“मार खाशील.गप बस.ममीचा मोबाईल आणलाय.तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”
“लवकर फोन लाव.स्पीकरवर टाक”
“गावजेवण नाहीये.कुणी ऐकलं तर..कान इकडं कर.दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता.फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं.
“आता पार्टी पाहिजे”
“कशाबद्दल”
“बॉयफ्रेंड मिळाला”
“तो तर मिळणारच होता.बघितलं ना कसला पागल झालाय.नुसता बघत रहायचा.”
“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”
“जळतेस का?”
“माझा ही आहेच की..”
“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच …”
“माझं मी बघेन.जास्त शायनिंग मारू नकोस.बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे.लक्षात ठेव.”
“ए गपयं.सेंटी मारू नको.”
“अजून काय म्हणाला सांग ना”
“तुला कशाला सांगू.आमचं सिक्रेट आहे”
“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही.आता सांगतेस की ………..”
“तो फार अडव्हान्स आहे”
“असं काय केलं”
“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”
“मग नुसती पोपटपंची”
“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”
“मामला अंगापर्यंत पोचला.लकी आहेस”
“सालं,माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो.आमचं नीट बोलणं होत नाही.”
“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”
“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे.मागितला तर आधी किस दे म्हणाला”
“अय्यो..”खी खी हसण्याचा आवाज आला.तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही.दोघी धावत खाली गेल्या.टेरेसवर मी एकटाच होतो.खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही.नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट असेल असं वाटलं नाही.जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत.
नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं.ते लहानपण म्हणजे मित्र,मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं.भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं.‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची.एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची.तिच्यावरून चिडवणं,त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा.कृती काही नाही.लपून छ्पून बघणं चालायचं.खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती.मुलींशी बोलताना भीती वाटायची.तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट.त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती.वडीलधारे,शिक्षकांचा धाक,दरारा होता.मार पडेल याची भीती वाटायची.आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.
“काय झालं” तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.
“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय.घर घर की कहानी.थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”
“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.”
“कारट्यांना,अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.
☆ …बाळा, निवृत्त हॊ… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
(आई बाबांचे पन्नाशीच्या मुलाला पत्र)
प्रिय बाळा.. शुभाशीर्वाद.
‘आईबाबा मी voluntary रिटायरमेंट घेऊ कां ?’ हा तुझा प्रश्न आणि आमच्याकडून तुला हवं असलेलं उत्तर आणि अनुभवाचा सल्ला विचारण्याचा तुझा हेतू लक्षात आला. तू भविष्याच्या विचाराने गोंधळून न जाता अवश्य रिटायरमेंट घे. आतापर्यंत धावपळीच्या सर्कशीत कितीतरी मोलाचे, सोन्यासारखे क्षण तुम्ही गमावलेत. तुला नोकरी लागल्यापासून सारखा पळतोयसच तु त्यापुढे तुला बायका,मुले,आई वडील यांच्यासाठी द्यायला जराही वेळ नाहीये.इतकं धाऊन-धाऊन काय मिळवता रे तुम्ही? पैसाच नां? अरे तो कितीही मिळवलास ना तरी अपुराच ठरतो. आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघ. हा गरीब वर्ग एका खोलीतच आपला स्वर्ग सजवतो. तेच स्वयंपाक घर.तिथेच हॉल आणि तिथेच बेडरूम . तुझे मात्र हिल स्टेशनवर दोन बंगले, फार्म हाऊस राहता प्रशस्त प्लॅट आहे .एवढी जागा, बंगले, खरंच लागतात का रे ? आणि तिथल्या शांततेचा अनुभव घ्यायला वेळ तरी मिळालाय का तुम्हाला?या सगळ्या धावपळीच्या चक्रातून तू बाहेर पड. आता पन्नाशी उलटलीय तुझी . कुठेतरी थांबायलाच हवं. मिळवलेल्या पैशाचा उपभोग घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करून रोग बळावले तर पुढील आयुष्यात कसा उपभोग घेणार तुम्ही या ऐश्वर्याचा? सेवानिवृत्त होऊन मोकळ्या हवेतला मोकळा श्वास घ्यायला तुझ्या फार्म हाऊस मध्ये जाण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि कुणासाठी सांठवताय रे इतका पैसा ? मुलांना शिक्षण दिलेस. त्यांच्यासाठी भरपूर पैसा खर्च केलास. पण सहज मिळालेलं आयत सुख मुलांना आळशी बनवतं . त्यांना त्यांच्या हाताने काहीतरी करू दे ना जरा ! स्वावलंबी होण्याची सवय लागू दे त्यांना .तुझ्या बरोबर सुनबाई घरच्या राम रगाड्यात भरडली गेली. तिलाही मोकळी हवा मिळू दे.तिच्याही कष्टी मनाला तुझ्या प्रेमाचा शिडकावा हवाच की रे!आपल्या खानदेशात तुझ्या जन्मगावी तिला घेऊन जा.तापी काठची भरताची वांगी, मेहरूंणची बोरं, उडीद ज्वारी घालून केलेली कळण्याची पौष्टिक भाकरी, भाकरीवरचा झणझणीत ठेचा, तो खातांना ठेच्याच्या झणझणीतपणा बरोबरच आनंदाचे अश्रू पण येतिल तिच्या डोळ्यातून ., ते बघ.
आता बेकारी, महागाई आभाळाला पोचलीय. ज्यांना नोकरी नाही अशांसाठी तू काहीतरी कर.तू तुझी जागा खाली कर म्हणजे नवतरुणांना नवीन जागा मिळेल.सूर्य नाही होता येणार तुला. पण त्यांच्यासाठी आशेचा प्रकाशदिप तर होउ शकतोस ना तू?
तेव्हा बाळा आता निवृत्ती घे. आमच्या अनुभवाची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थाने शांत,निवांत, निरामय आयुष्याचा आस्वाद घे. लहानपणीच्या आठवणीत रंगून जा. वर्तमानाचा आनंद घेऊन भविष्यकाळाची स्वप्न उज्वल कर.
सौ सुनबाईंना आणि आमच्या गोड नातंवंडांना शुभाशीर्वाद
☆ या जगण्यावर शतदा प्रेम करावे — लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
मी आणि आजार ह्यांची ‘दोस्ती ‘ऐन तिशीतली.
‘दोस्ती’ शब्दाने चमकलात? आजार बरोबर घेऊन जगायचं म्हटलं कि दोस्ती होते. .
वयाच्या अडतिसाव्या वर्षी आमच्या दादरच्या शिवाजी पार्कला धावत फेऱ्या मारत असताना मला ह्रृदयविकाराचा गंभीर धक्का जाणवला. माझा भाऊ डाॅक्टर प्रकाश संझगिरीने मला वाचवलं. मी आठवड्याने दक्षिण कोरियातल्या ‘सोल’ ला ऑलिंपिक कव्हर करायला जाणार होतो. तो थेट आयसीसीयूत जाऊन झोपलो. आयुष्य प्रथम तिथे बदललं. पण आधुनिक औषध, भावाची ट्रीटमेंट, जेवण्यातली शिस्त, बायकोचा देवावरचा विश्र्वास, मित्रांचा आधार, सकारात्मक विचार, एन्जियोप्लास्टी आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही वृत्ती त्यामुळे मी जवळपास नाॅर्मल झालो.
त्यानंतर ३४ वर्ष भूरर्कन निघून गेली. त्यात अनंत कलात्मक उद्योग मी माझं इंजिनिअरिंग सांभाळून केले. जग फिरलो. मनाच्या एका कोपऱ्यात मृत्यूची भीती होती. पण मनाचा इतर भाग मध्यान्हासारखा उजळला होता. विविध गोष्टी करण्यासाठी मनाला नवी पालवी फुटत होती. नवा मोहर येत होता.
इतक्यात एक दिवस असा आला की सारा मोहरा फिरून गेला.
ती तारीख होती २२ ऑक्टोबर २०२२. मी निघालो होतो ऑस्ट्रेलियाला, टी २० विश्वकपासाठी. त्यावेळची दिवाळी संपता संपता निघणार होतो. बरोबर धनत्रयोदशीला कॅन्सर नावाच्या नरकासुराने गाठलं मला. अचानक रक्ताळलेली लघवी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य अस्ताला जायच्या आत, किडणीच्या चौथ्या टप्प्यातल्या कॅन्सरचं निदान झालं.
मी हादरलो. पण स्वतःला सावरलं. सर्व विसरून तीन दिवस मुलाबाळांसह दिवाळी साजरी केली. दिवाळी संपल्यावर मी एकटाच शिवाजी पार्कच्या एका गल्लीत गेलो. रड रड रडलो. मनात साठलेलं दुःख, भीती, अश्रुतून बाहेर फेकून दिलं. अश्रु पुसले. कुसुमाग्रजांच्या कवितेतले शब्द आठवले. “सर, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा.” आणि लढायला सज्ज झालो.
डॉक्टर स्मृतीच्या इम्युनो थेरपिने ८ सेंटिमीटरची गाठ, वर्षभरात ५.४ सेंटिमीटर वर आली. त्याकाळात औषधांचे फार वाईट परिणाम मी सहन केले.
कधी कधी वाटायचं, “बस झाले उपचार. थांबवावं सगळं. जे काही आयुष्य त्यानंतर उरेल ते तरी नीट जगावं.”
कधी अतिसार, कधी बध्दकोष्ट, त्यामुळे भगंदरचा त्रास. त्वचेवर लाल व्रण, जिभेची चव पूर्ण गेलेली. इडली सांबारचं सांबारही तिखट लागायचं.
भूक नाही, खाणं कमी, त्यामुळे वजन कमी होत गेलं. मला स्वतःला आरशात पाहणं कठीण जात होतं.
डॉक्टर स्मृतीचं म्हणणं होतं, “आता ऑपरेशन करून ट्युमरग्रस्त किडनी काढून टाकावी” पण माझ्या हृदयरोग तज्ञ भावाने ती कल्पना स्वीकारली नाही. माझी ३५ वर्षाची हृदय रोगाबरोबरची मैत्री काहीतरी परिणाम हृदयावर करणार होती. माझ्या हृदयाच्या पंपाची ताकद कमी झाली होती. ज्याला इजेक्शन रेशो म्हणतात तो ३५ वर आला होता. माझं शरीर माझ्या भावाइतकं कुणालाच ठाऊक नाही.
पण देवाच्या मनात वेगळंच होतं. त्यानेच बोटं धरून मला ऑपरेशन थिएटरकडे नेलं.
पुन्हा दिवाळी जवळ आलेली. क्रिकेटचा विश्वकप सुरू होता. माझं लिखाण सुरू होतं. आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं. आणि निदान झालं. माझ्या पित्ताशयात खडे आहेत.:
मी स्वतःशी हसलो. कारण विविध आजार माझ्या शरीरावर हल्ला करायला उत्सुक असतात. काय काय आजारांनी ३५ वर्षात माझ्या शरीराचा पाहुणचार घेतलाय! तुम्ही नाव सुध्धा ऐकली नसतील.
‘पायलोनायडल सायनस’ ऐकलंय?
एपिडीडीमायटीस, आय टीपी, वगैरे… सर्जन, डॉ हितेश मेहतांनी माझ्या भावाला सांगून टाकलं, पित्ताशय काढायलाच हवं. म्हणजे ऑपरेशन आलं.
पित्ताशय नाही काढलं तर….
तर ते आत फुटण्याचं भय मोठं. ते फुटलं तर परिणाम भयानक. म्हणजे बहुदा “आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा.” ऑपरेशनची जोखीम घ्यायलाच लागणार होती.
माझा भाऊ डॉ. प्रकाश संझगिरी हा अत्यंत हुशार डॉक्टर आहे. तो हृदयरोग तज्ञ असला तरी त्याचं इतर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत असतं. त्याची बौध्दीक चक्र फिरायला लागली. पित्ताशय काढायला ऑपरेशनची जोखीम घ्यायची मग त्याच वेळी उजवी, ट्यूमरग्रस्त किडनी काढायला काय हरकत आहे.? त्याने विचार मांडला.
पण विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो उतरवणं वेगळं. तो सर्जीकल स्ट्रायिक असतो. त्याचं यश वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अत्यंत कुशलतेने आखणी करावी लागते. प्रत्येक टप्प्यावर एक नवी अडचण येते आणि त्यावर मात करून पुढे जायचं असतं.
डॉ प्रकाशने त्याचा उत्कृष्ठ संघ निवडला. ॲनेस्थेटिस्ट सर्वात महत्वाचा. बदलत्या परीस्थितिनुसार योग्य निर्णय घेणारा हवा. डॉ प्रकाशने त्याच्या विश्र्वासातला निवडला. डॉ फाल्गुनीची टीम होती. डॉ हितेश मेहता हे पित्ताशय काढणार होते. डॉ हेमंत पाठक किडनी काढणार होते. आखणी अशी होती. आधी पित्ताशय काढायचं. आणि त्यावेळेला इतर महत्वाची (vital) प्यारामिटर्स व्यवस्थित असतील तर किडनी काढायची.
ते विश्वचषकाचे दिवस होते. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून सामने पाहत होतो. लिहित होतो. ऑपरेशन पासून मन दुसरीकडे नेत होतो.
पण एकाक्षणी मी भाऊक झालो. मी भावाला म्हटलं, “दिवाळी नंतर ऑपरेशन करूया का?”
तो म्हणाला, “ऑपरेशन शिवाय मी तुला लीलावती बाहेर पाऊल ठेवायला देणार नाही.”
मी म्हटलं, “बरं मला तीन तास सोड. मी माझं जन्मस्थळ, माझी शाळा किंग जॉर्ज, कॉलेज रुईया, व्हि जे टी आय, शिवाजी पार्क, सावरकर स्मारकाचं स्टेज, शिवाजी पार्कचा गणपती (गणेश उद्यान) सिध्दीविनायक, वानखेडे, आणि माउंट मेरीलां जाऊन येतो.” लहानपणी मला वडील खांद्यावर घेऊन माउंट मेरीला जात असत. ते मला डोळे भरून पाहायचं होतं.
तो म्हणाला, “तू काळजी करू नकोस. ह्या सर्व ठिकाणी तू नंतर स्वतःच्या पायाने जाशील.” ह्या शब्दांनी मला धीर दिला. मनातली ऑपरेशन थिएटर मध्ये आयुष्य संपू शकतं ही भावना दूर पळाली.
ऑपरेशनच्या दिवशी माझी रवानगी आ य सी सी यू मध्ये झाली. लग्नापूर्वी वधूला नटवतात, तसं माझं नटणं झालं.
वेगवेगळ्या नळ्या शरीरात गेल्या. माझी धाकटी सून हेमांगी हळूच पडदा सरकवून आत आली आणि म्हणाली, “बाबा, काय ऐकायचंय?”
मी म्हटलं, “माझा सी रामचंद्र ह्यांचा कार्यक्रम ऐकव.”
मी संगीतात त्या ‘नटण्याच्या’ वेदना विसरून गेलो. नव्या आयुष्याशी लग्न करायला सज्ज होऊन मी ऑपरेशन थिएटर नावाच्या स्टेजवर उभा राहिलो.
आठ तास ती मंगलाष्टकं चालली. शेवटच्या शुभ मंगल सावधानने सर्वांनी निःश्वास सोडला. नव्या आयुष्याच्या उंबरठयावरचं माप मी ओलांडलं होतं.
पण हे इतकं सहज घडलं नव्हतं. माझी अँजिओप्लास्टी आणि एक प्रोसिजर आधी झालेली असली तरी मेजर ऑपरेशनचा अनुभव पहिलाच होता.
जवळचे नातेवाईक, आणि मित्र ह्यांचे हात हातात घेत ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना, त्यांच्या स्पर्शातून प्रेम आणि काळजी जाणवत होती. माझ्या अनंत मित्रांनी, चाहत्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेची ताकद घेऊन मी आत गेलो. आत देवाचं अस्तित्व डॉक्टरांच्या रूपात होतं. हे डॉक्टर्स त्या परमेश्वराचे दूत होते.
युरोलॉजिस्ट डॉ हेमंत पाठक, अनेस्थेटिस्ट डॉ फाल्गुनी, आणि गॅसस्ट्रो इंटेस्टाईनल सर्जन डॉ हितेश मेहता, यांची टीम माझ्याशी अत्यंत हसून बोलले, माझ्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. एक सुई टोचली, आणि जवळपास काही सेकंदात मी झोपेच्या अधीन झालो. अशी झोप, ज्यात स्वप्न नव्हतं, वेदना नव्हत्या, जेंव्हा झोपेतून जागं करण्यात आलं तेंव्हा मधल्या आठ तासातलं काहीही आठवत नव्हतं. मी अशी झोप एकदाच अनुभवली होती. हार्ट ॲटॅकच्या वेळी मला माॅर्फिंनचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा.
माझ्या ऑपरेशनचं वैद्यकीय भाषेतल वर्णन Laparoscopic cholecystectomy and right radical nephrectomy असं होतं. डॉ मेहतांनी जेंव्हा पित्ताशयावर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की पित्ताशयात पस झाला होता. गँगरीन झाल्याचं लक्षण होतं. प्रत्येक अवयवाला एक आवरण असतं त्या आवरणाला आणि यकृताला ते चिकटलं होतं.
चांगल्या शल्य विशारदाचे हात हे कलावंताचे हात असतात. डॉ मेहतांनी हा गुंता, अत्यंत सुंदरपणे आणि अचूक सोडवला. डॉक्टरी ज्ञान, अनुभव आणि कलेचा त्यांच्या हातात अपूर्व संगम होता. डॉ पाठकांनी त्यांना मदत केली.
त्यांनी नुसतं पित्ताशय बाहेर काढलं नाही. पोटातला टाईम बॉम्ब बाहेर काढला. माझा भाऊ हॉस्पिटलच्या बाहेर मला क्षणभरही सोडायला का तयार नव्हता, हे मला कळलं. अपेक्षेपेक्षा जास्त रक्त गेलं होतं. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन पार पडलं होतं. जीव वाचला होता.
आणि मग माझ्या भावाने मास्टर स्ट्रोक मारला. माझा भाऊ आणि दोन सर्जन ह्यात चर्चा झाली. पुढे जायचं आणि किडनी काढायची का? माझे इतर पॅरामीटर्स चांगले होते. किडनी काढून टाकायची ही उत्तम संधी होती. हे माझ्या भावाने ताडलं, आणि निर्णय घेतला, जायचं पुढे.
हा निर्णय अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा होता.
मग डॉ पाठकना डॉ मेहतांनी किडनी काढायला मदत केली. ऑपरेशन थिएटर मध्ये वैद्यकीय ज्ञान आणि कसब पणाला लागलं होतं. बाहेर बसलेली रक्ताची आणि मैत्रीची नाती, देवाचा धावा करत होती. आणि मी शांतपणे दोन जगाच्या सीमारेषेवर गाढ झोपलो होतो.
त्याच वेळेला वानखेडेवर अफगाणिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाचा सामना अटीतटीने खेळला जात होता. ग्लेन मॅक्सवेल जिवाच्या आकांताने खेळत होता. आमचे डॉक्टर्स तसेच खेळले. आणि जिंकलें. दोघंही जवळपास एकाचवेळी जिंकले.
डॉ स्नेहाने मला जागं करून तो स्कोअर सांगायचा प्रयत्न केला. पण शुध्दी आली नव्हती. नीट शुध्द मी पुन्हा आय सी सी यू त आल्यावर आली. तेंव्हा पाहिलं लक्षात असलेलं वाक्य बायको कानात कुजबुजली, “ऑपरेशन चांगलं झालं. पित्ताशय, किडनी दोन्ही काढलं.”
भारतीय संघ विश्वचषक ऐन मोक्याच्या वेळी दबावाखाली हरला.
माझ्या आयुष्यातला हा मोठा विश्वचषक डॉक्टरांनी दबावाखाली जिंकून दिला. माझा भाऊ डॉ प्रकाश संझगिरी ह्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स सारखं नेतृत्त्व केलं.
देवाने आजार दिले, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊही दिला. लढाई संपलेली नाही, पण पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी.
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
“पुढील महिन्यात माझ्याकडे वृद्ध आईबाबा येणार आहेत. तुम्ही तुमच्या आईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत होतात. आणि असं बरचं काही माझी आई नेहमीच सांगायची. तर काय करु?
जरा pl. टिप्स द्या..” सुलक्षणा विचारत होती.–
तेव्हा मी तिला बरेच पदार्थ लिहून दिलेच. आणि वृद्ध,आजारी व्यक्ती संभाळताना माझ्या हातून झालेल्या बऱ्याच चुका सांगितल्या — म्हणजे तिने सावध रहावे.. खूप खूप चुका झाल्या-
** *** अहमदाबादला आमच्या घरी माझे वृद्ध सासु..सासरे अगदी आनंदात असायचे .पण..
एकदा सासरे फिरायला गेले.. ” नीट सावकाश जा हं !काँलनीबाहेर जाऊ नका …” या सूचना मी दिल्या.
पण.. आमच्या घराचा नंबर व पत्ता द्यायला विसरले, ते भटकतच राहिले .त्यांना वयोमानानुसार घरनंबर आठवलाच नाही. ते सैरभैर झाले. अर्थातच मी अर्ध्या तासात त्यांना शोधत गेलेच.. दाखवलेच नाही त्यांना काही…. पण.. वयोवृद्धांना आपला पत्ता बरोबर लिहून देणे, हे महत्त्वाचे..
वयोमानानुसार त्यांना पोथी वाचन अवघड होते. हे माझ्या बऱ्याच उशिरा ..आठदहा दिवसांनी लक्षात आले..मग चूक सुधारली..रोज सकाळी वृत्तपत्रे वाचून दाखवणे. व दुपारी.. माझ्या लेकीला मांडीवर घेऊन थोपटत..अंगाई ऐवजी..त्यांच्यासाठी पोथी वाचन केले.
माझ्या सासूबाई.. हाँस्पिटलमधे होत्या. मी रोज रात्रभर असायची. हाँस्पिटल सुसज्ज होते. तरीही –.बेडपॅन देतात.. निघून जातात. असा अनुभव आला..शारीरिक स्वच्छता करत नाहीत.. हे मला दुसऱ्या दिवशी कळले. माझी चूक झाली… मग सेवेकरींवर अवलंबून रहायचे नाही. रुग्णांची आंतर्बाह्य शारीरिक स्वच्छता, शुश्रूषा आपल्यालाच करायची आहे. हे लक्षात घेऊन .. रोज रात्री कडूलिंब पाणी व सकाळी उठल्यावर गुलाबपाणी त्या जागेवर शिंपून..बेबी पावडर लावून ठेवणे.. हे केले. नारळपाणी हे तर अंतर्गत शुद्धीकरण करतेच. मी पुढे सर्व रुग्णांबाबत ते पाळले.
— ती चूक वेळेवर लक्षात आली म्हणून त्या जवळजवळ दोन महिने हाँस्पिटलमधे असूनही त्यांना bed sores झाले नाहीत. माझ्या सासूबाईनी त्यांच्या बहिणीला सांगितले —
” संपूर्ण शरीराची स्वच्छता किळस वा आळस न करता उन्नती सतत करत होती. म्हणून बोटभर सुद्धा जखम झाली नाही.”
पहिल्याच दिवशी मी नर्सवर भरोसा ठेवला ही चूक लक्षात आली, म्हणून बरे झाले. धडा घेतला.. कुणावरही अवलंबून रहायचे नाही, स्वतः रुग्णसेवा करायची.
**** माझी आई आजारी असताना..(स्मृती भ्रंशाने तिला बोलता येत नव्हते) अल्झायमर पराकोटीचा होता. ती माझ्याकडे येऊन दोनच दिवस झाले होते. तिला आईस्क्रीम भरवताच… एकदम ती किंचाळली.. चवताळली..मला मारत सुटली..माझे केस उपटले. कडकडून चावली. चूक तिची नव्हती.(तिला स्मृती भ्रंश होता. या भयंकर आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर..रुग्ण हिंसक बनतो. चवताळतो, बेदम मारतो. नाते विसरतो. जवळच्या व्यक्तीला सहन करावेच लागते. व मार खाणे असह्य झाले तर दूर ठेवावेच लागते.नाईलाजाने. )
— तिला तो गार स्पर्श सहन झाला नाही. चूक माझी होती. मग लक्षात आले.. वार्धक्यात आईसक्रीम खूप खूप गार चालत नाही.. जरा वेळाने.. तिने आवडीने खाल्ले..आणि पुढे नंतरही मी ती चूक सुधारली..अति गार काही दिले नाही. व तिनेही आनंदाने चाटून पुसून खाल्ले…. प्रत्येक क्षण कसोटीचा होता.
**माझे वडील…. त्यांना नागीण झाली होती. त्यामुळे व वाढत्या वयानुसार थकल्याने हातात जोर नव्हता. त्यामुळे त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालणे, जेवताना.. पोळीचे तुकडे करून देणे, मुख्य म्हणजे पाठीला ,पायांना मालीश करणे हे सर्व मी करत होतेच…
*वडिलांना आंघोळ घालून त्यांचे अंग पुसताना लक्षात आले की म्हातारपणात कातडी नाजूक होते. म्हणून टर्कीश टाँवेल, V.I.P. Shorts वापरणे योग्य नाही. नाजूक कातडी दुखावते… आपले वडील हेच मुळात आपल्या साठी.. V.I.P. असतात. हे लक्षात आल्यावर पंचा, कोपऱ्या, लुंगी मागवून ती सुखद वस्त्रे वापरली.
* कवळीची डबी उघडून कवळी घासण्यासाठी हातात घेतली तेव्हा लक्षात आले.. छी.. छी.. छी–
दात किती अस्वच्छ.. कवळीतील तीन दात तुटलेले.. काही दात झिजलेले.बघून मी स्वतःला लाखो दुषणे देऊ लागले. दर महिना वडील माझ्या घरी येतात. किमान पाचसहा दिवस राहतात. त्यांची कवळी वीस वर्षांपूर्वीची होती. बदलायला हवी, हे माझ्या लक्षात कसे आले नाही?
केवढी मोठी चूक झाली माझी !!!
मी लगेचच डेंटिस्टला फोन करुन.. ‘ ते रुग्ण आहेत. आपण येऊन बघता का? नवी कवळी करुन देता का?’ विचारले. माझ्या विनंतीवरून ते बहुमल्य वेळ खर्चून आले. माप वगैरे घेऊन.. अर्ज़ंट कवळी बनवून दिली. माझे वडील जेव्हा जेव्हा आमच्या घरी येत, ..तेव्हा..त्यांना चष्मा पुसून देत होते..नखे कापून देत होते.. डोळ्यात औषध घालून देत होते. तेल लावून देत होते, तेव्हा दात/कवळी स्वच्छ आहे की नाही, हे पहाणे मी कशी विसरले बर? खरच मोठी चूक झाली होती–माझी !!!
आणि खरं म्हणजे मी अगदी माझ्या नवव्या वर्षीपासून माझ्या आजोबांची कवळी घासून पुसून लख्ख करणे, पायांना, पाठीला मालीश करणे.. हे संस्कार आमच्यावर बालपणापासून आहेतच…तरीही माझ्या लक्षात आले नाही? चुकलेच माझे !!! अस्वच्छ दात मुखात असताना.. मी काळजीपूर्वक केलेले पदार्थ पचणार कसे??? डॉ.नी माझी समजूत घातली.. तुम्ही रोज खीर/दुध,आणि सार/सूप्स /नारळ पाणी ,आणि मऊ पातळ खिचडी वगैरे देत होतात तेव्हा ते दात लावत नव्हते. खरं म्हणजे..तेव्हढेच पुरेसे असते.जास्त खायचेच नसते इतके आजार असणाऱ्यांनी !!!…. वगैरे. पण चूक ती चूकच होती.
ते पुण्यात गेल्यावर रोज फोनवर सांगायचे..
आंघोळ घालणे, कवळी साफ करणे, बूटसाफ करून घालणे. गरमागरम पौष्टिक आहार वेळेवर देणे…प्रत्येक वेळी तुझी आठवण येते. येथे काही नीट कुणी करत नाही… वगैरे.. मी हसत असे.
कारण काही व्यक्तींना सवय असते–प्रत्येकाला तोंडावर.. “तू किती माझी काळजी घेतेस,नाही तर ती..
हे प्रत्येकाला म्हणणे. हा मनुष्य स्वभाव असतो.त्यामुळे स्वतःच्याच मुलांच्यात भांडणे होतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही.
— हे मी पूर्णपणे लक्षात ठेऊन ती चूक आम्ही पुढे करणार नाही..असे मनाशी ठरवले आहे.
****माझ्या मोठ्या नणंदताई रूग्ण म्हणून माझेकडे होत्या. दोन्ही डोळ्यांना पट्टी होती.
सेवा करायला बाई ठेवली की नीट करत नाही.. हा अनुभव गाठी होता. म्हणून त्यांचे सर्वकाही मी करत होते. दुखणे डोळ्यात होते. बाकी त्या हसून खेळून मजेत होत्या. गप्पा, टप्पा, गाणी-गोष्टी चालू असत.
त्यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे म्हणून मी खरतर त्यांना आंघोळ घालणे, वगैरे सर्व काही करत होते.तरीही अनावधानाने..मी–एकदा..'””ताईवन्सं ,या लवकर ! तुमच्या आवडीचे गाणे लागले आहे. बघायला या””
असे बोलले. असेच एकदा..”‘ताई वन्सं, बेल वाजली. दार उघडता का? मी कणीक भिजवत आहे. आणि मला दुसऱ्या अधू हाताने दार उघडता येत नाही !” असे मी चुकून बोलले
त्यांना किती वाईट वाटले असेल ना..नंतर आम्ही दोघी खूप खूप हासलो..आंधळ्या–पांगळ्याची जोडी !
त्या समजून घेणाऱ्या होत्या म्हणून.. माझ्या चुकीवर हासून पांघरूण घातले.
— ते सर्व झाले. पण जी चूक झाली ती चूकच असते..
— आणि प्रत्येकावर अशी आबालवृद्धांचे संगोपन करण्याची वेळ येतेच. .. जागृत रहावे..
लेखिका : सुश्री उन्नती गाडगीळ
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(१० फेब्रुवारी… थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा जन्मदिन… त्यानिमित्ताने त्यांच्या सहवासातील प्रसन्न आठवणी…)
ज्वालामुखीचा उद्रेक आणि बर्फासारखं शीतल व्यक्तिमत्व,तुम्ही कधी एकत्र पाहिलंय का? होय,मी केवळ पाहिलंच नाही, तर त्यातला प्रेमळ, खळखळ वाहणारा, नितळ, शुभ्र झराही अनुभवलाय. हिमालयाची उंची गाठलेलं हे व्यक्तिमत्व कोण बरं असेल? वयानं माझी आजी शोभेल,असं आमचं नातं जुळलं आणि हळूहळू आम्ही मैत्रिणीच बनून गेलो, हे माझं अहोभाग्य! ही मैत्रीण, अर्वाचीन काळातली गार्गी,मैत्रेयी-म्हणजे थोर साहित्य विदुषी दुर्गाबाई भागवत !
केवळ साहित्य विदुषीच नव्हे,तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्यसेनानी पासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! अंगकाठी किरकोळ, क्षीण जरी असली तरी वयाच्या नव्वदीतही बाईंची कुशाग्रबुद्धी, तोंडात बोटच घालायला लावे. शरीर पेलवत नसतानाही,”आत्ता मी तुम्हाला व्यायाम करून दाखवू का?” म्हणून झटकन् उठायचा प्रयत्न करणाऱ्या दुर्गाबाई पाहिल्या, की त्यांच्या मनाचा अवखळपणा, उत्साह,अगदी लहान मुलासारखा अखेरपर्यंत टिकून होता, हे जाणवतं.
दुर्गाबाईंची ओळख झाल्यावर, त्यांची बरीच पुस्तकं वाचली. सध्या दुर्गाबाईंचं ‘दुपानी’ हे पुस्तक ५व्यांदा वाचतेय.परत परत वाचूनही कंटाळा येत नाही. कारण वाचताना, त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं. मला त्यांचं लेखन ‘प्रांजळ’ तरीही सडेतोड, थेट मुद्द्याला हात घालणारं (आणि अंत:करणालाही) म्हणूनच चिंतनीय व विचार करायला प्रवृत्त करणारं वाटतं. दुर्गाबाई म्हणजे पी.एच.डी करण्यासारखाच विषय ! डॉ.मीना वैशंपायन, प्रतिभा रानडे यांसारख्या नामवंत लेखिकांनाही त्यांच्यावर पुस्तक लिहावंसं वाटणं आणि लिहूनही बरंच काही सांगायचं उरलंय असं वाटणं, यातच सारं आलं.नव्वदीतही त्या अर्धमागधी भाषेतील ‘विशुद्धीमग्ग’चा वजनाला न पेलवणारा ग्रंथ मराठीत अनुवादित करत होत्या. त्यांचा नवनव्या गोष्टी करण्याचा, शिकण्याचा ध्यास पाहून आश्चर्य वाटतं.
बाईंचा ९० वा वाढदिवस त्यांच्या सुनबाई चारुताईंनी घरीच पण थाटात साजरा केला. त्यावेळी पत्रकार, टी.व्ही चॅनेल मंडळी जमली होती. अचानक बाईंनी मला, त्यांना आवडणारा संत एकनाथांचा अभंग गायला सांगितला. मी मनोभावे गायले. गाणे झाल्यावर बाईंनी कौतुकाने पाठ थोपटून माझा हात हाती घेतला, व थंडगार हात पाहून, उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, “Cold from outside, Warm from inside…!”
समाजात श्रेष्ठ वा थोर व्यक्ती कोण, याची व्याख्या करायची तर, सहज सोपी व्याख्या म्हणजे, जी व्यक्ती आपल्या सद् गुणांमुळे, आजूबाजूच्या व समाजातल्या इतरांनाही घडवते; ती व्यक्ती थोर! माझ्या जडणघडणीत मला आदरणीय कुसुमाग्रज,इंदिरा संत,आणि दुर्गाबाई भागवत म्हणजे ‘ब्रह्मा,विष्णू,महेश’च वाटतात. तात्यासाहेबांनी (कुसुमाग्रज) प्रेमळ आज्ञा केल्याने, इंदिराबाईंच्या, शंकर रामाणींच्या व त्यांच्या स्वतःच्या कवितांच्या,’रंग बावरा श्रावण’ व ‘घर नाचले नाचले’ ह्या कॅसेट्स तयार झाल्या. प्रत्येक कवीचं व्यक्तिमत्व अभ्यासण्याच्या निमित्तानं, कविता व इतर साहित्याचंही भरपूर वाचन केलं गेलं. इंदिरा संतांनी तर मला अक्षरशः कवितेचं वेडच लावलं. या दिग्गजांच्या कविता गाता गाता एके दिवशी नवलच घडलं… शाकंभरी पौर्णिमेच्या पहाटे,दुर्गाबाईंना त्यांच्या वडिलांनी (स्मृतिदिनी) त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. दुर्गाबाईंनी पहाटे चंद्रबिंब ‘अस्त’ होताना पाहून त्यांना स्फुरण आलं, ते असं –
|| देहोपनिषद ||
आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||
भय गेले मरणाचे,कोंब फुटले सुखाचे ||२||
अवयवांचे बळ गेले,काय कुणाचे अडले ||३||
फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||
मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||
पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||
सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले ||७||
आणि नेमकं त्याच दिवशी मी, दुर्गाबाईंना इतर नव्या कविता म्हणून दाखवायला गेल्यावेळी, त्यांनी त्यांची, ही ‘एकमेव’ कविता माझ्या ओंजळीत दिली, व म्हणाल्या; “यापूर्वीच्या मी केलेल्या कविता मला नावडल्याने, मी त्या फाडून, जाळल्या. परंतु या देहोपनिषदाला तू सुंदर चाल लावून, उद्या दूरदर्शनवरील माझ्या मुलाखतीत गावंस, अशी माझी इच्छा आहे.” ‘देहोपनिषद’ हे अभंगाचं नाव वाचूनच, माझे धाबे दणाणले! मरणाला असे ठणकावून सांगणारी बाईच पाहिली नाही मी! कविताही चालीत बांधायला प्रथमदर्शनी कठीण वाटली. परंतु दुर्गाबाईंची आज्ञा – नाही म्हणायची माझी प्राज्ञाच नव्हती. मी त्याक्षणी तरी हो म्हटलं व घरी पोहोचेपर्यंत संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी अंतर्ज्योत’ पेटली! शब्दाशब्दाला न्याय देणारी,सुसंगत वाटेल अशीच चाल परमेश्वराने सुचवली…
दुर्गाबाईंनी माझ्या या पहिल्या पाऊलाचं, दुसऱ्याच दिवशी दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ सुंदर गाणार आहे” म्हणून मोठ्या मनानं कौतुक केलं. बाळाचं पहिलं पाऊल पडलं आणि आत्मविश्वास आला की, त्याला जसे कुठे धावू आणि किती धावू असे पाय फुटतात, तशी मी – इंदिराबाई, कुसुमाग्रज, शंकर रामाणी, अटलजी, व्ही.पी.सिंग यांच्या, तसंच दुर्गाबाईंनी निवडलेले संत नामदेव, एकनाथांचे अभंग व इतर नवोदितांच्याही साठ एक कवितांना धडाध्धड चाली लावत गेले. अर्थात, प्रत्येक शब्दाला स्वरांनी न्याय दिला पाहिजे या निकषावर ! माझ्या लेखी, शब्दांमुळे सुरांना आणि सुरांमुळे शब्दांना अर्थ आला. केवढी भव्य नि सुंदर दृष्टी दिली दुर्गाबाईंनी मला ! या तिघांनीही मला कुबेराचं एक दालनच मोकळं करून दिलं, गर्भश्रीमंत केलं! हा खजिना, केवळ पुस्तकात न राहता, रसिकांसमोर सादर करण्याचं, कॅसेटद्वारे घराघरात पोहोचवण्याचं काम, नाशिकच्या भालचंद्र दातारांनी केल्यानं, दुर्गाबाईंनी त्यांचं खास अभिनंदनही केलं. तसंच माझी या परिवारातर्फे निघालेली पहिली ध्वनिफीत – ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ चे प्रकाशनही दुर्गाबाईंच्या शुभहस्ते झालं. त्यावेळी बाई सुंदर बोलल्या आणि गंमत म्हणजे, खच्च भरलेल्या सभागृहासमोर राग केदारची बंदिश गायल्यादेखील!
एकदा त्या आणि डॉ.कमलाताई सोहोनी (त्यांच्या भगिनी आणि भारतातील पहिली महिला शास्त्रज्ञ) जपानी चित्रपट पाहात होत्या. त्यातील स्वेटर विणणाऱ्या नायिकेने त्यांचे लक्ष वेधले. ती वेगळ्या पद्धतीने टाके विणत होती. तसे विणल्यास एका व्यक्तीचा, एका दिवसात स्वेटर पटापट विणून तयार होतो, असे त्यांनी बारकाईने पाहून, स्वतः प्रत्यक्ष विणून एका दिवसात एक स्वेटर तयार केला. बाईंची इतकी विलक्षण वेधक नजर ! कमलाताईंच्या निधनानंतर बाईंनी त्यांच्या ‘सपाता’ देखील पुजल्या. असं राम-भरतासारखं अलौकिक प्रेम!
कधीकधी दुर्गाबाई आणि इंदिरा संतांचं नातं पाहिलं, की मला पंडिता रमाबाई आणि डॉ.आनंदी जोशी आठवतात.दोघी मनस्वी,विद्वान,प्रखर स्वाभिमानी असूनही, एकमेकींबद्दल प्रचंड आदर,प्रेम बाळगणाऱ्या. दोघींनाही एकमेकींना भेटण्याविषयीची प्रचंड ओढ…समानशीलेषु व्यसनेषु सख्यं… हेच खरं! मी मुंबईहून बेळगावला इंदिराबाईंकडे जाताना व परतताना, दोघींनी एकमेकींना दिलेल्या ‘अनुपम पत्रां’ची पोस्टमन होण्याचं भाग्य मला लाभलं!
बाईंच्या तीन गोष्टी प्रामुख्याने मी कधीच विसरणार नाही, एक म्हणजे ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ त्यामुळेच, इतक्या विविध विषयात त्या प्रभुत्व मिळवू शकल्या. त्यांच्या हातची वाटाण्याच्या सालीची उसळ सुद्धा इतकी चविष्ट, स्वादिष्ट असे की, एकदा मी त्यांना या विशेष खमंगपणाबद्दल, ‘प्रमाण’ विचारले! त्या म्हणाल्या, “अगं मीही सगळ्यांसारखंच करते, फक्त त्यात थोडा ‘जीव’ ओतते!” तिसरी गोष्ट म्हणजे एकदा त्या मला म्हणाल्या, “ पद्मजा, प्रत्येक दिवस हा आपला ‘वाढदिवस’ म्हणून साजरा करावा.” बाईंच्या या आणि अशा अनेक गोष्टी मी हृदयात कोरल्या आहेत. एरव्ही कमालीच्या प्रेमळ, शांत असलेल्या बाईंनी ‘कराड साहित्य संमेलना’च्या अध्यक्षा असताना, एकटीने मंचावरून ‘ज्वाला’ होऊन, आणीबाणी विरोधात शिताफीने कणखर आवाज उठवला. ही त्यांची ताकद होती!
बाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्वचिंतनाचंही ! तत्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळेच बाईंचं त्याच्यावर प्रेम. याच थोरोवर इंदिरा गांधींनीं एक कविता केली होती. ती अशी…
“Whoever reads Thoreau,
Is struck
By the ethical force,
Of his ideas
And the clarity of his writing
Thoreau’s great influence
On Mahatma Gandhi
Is well known
His words ring long,
In the mind.
Those who live
In the storm of politics
Need the quiet pool within
For sustenance
Thoreau lived by such a pool.” – Indira Gandhi.
ही कविता वाचल्यावर दुर्गाबाईंना खूप आवडली व आणीबाणीत त्यांनी सोसलेले पराकोटीचे हाल विसरून, इंदिराजींचे सगळे गुन्हे माफ करून टाकले. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन !
परवाच पेपरमध्ये अमेरिकेतील सुप्रसिद्ध भारतीय वंशी जर्नल सर्जन यांचे बोल वाचले.
‘एकाकीपणामुळे मनुष्याच्या तब्येतीवर कसा हानिकारक परिणाम होतो’ असे त्यांचे भाष्य होते.
काल ‘पोज’ नावाची 1980-90 दशकातलं चित्रण असणारी वेब सिरीज पाहिली. त्या काळात अमेरिकेत तृतीयपंथी लोकांनी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, मूलभूत आरोग्य सेवेसाठी दिलेला लढा, त्यांची एड्स या गंभीर आजारामुळे झालेली दुरावस्था, त्यांचा खडतर जीवनप्रवास असे अनेक अतिसंवेदनशील मुद्दे,यात नाजूकपणाने हाताळले होते.
शीर्षकाशी ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध काय,असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल.
.. ही वेब सिरीज पाहताना अनेक वेळा माझे डोळे पाणावले. परंतु ते दुःखद घटनांपेक्षा आल्हाददायक भावनिक प्रसंगांमुळे घडले.
सर्वांची एकमेकांना असणारी अतूट साथ, एकमेकांच्या प्रगतीसाठी स्वतःच्या सुखाचा केलेला निरपेक्ष त्याग, चुकांमध्ये अडकलेल्या दुसऱ्यांसाठी त्याला नावं न ठेवता, प्रसंगी स्वतः जोखीम पत्करून, धोकादायक परिस्थितींमधून त्यांना सोडवणं, स्वतःला मिळालेली जास्तीचं जीवन जगायची संधी दुसऱ्याला, ज्याचं आयुष्य जगणं अजून उरलंय, त्याला देण्यातली निस्वार्थता, पाहून कोणाचेही हृदय भरूनच येईल. मी ही त्याला अपवाद नव्हते.
त्याकाळात, समाजात अनेक गैरसमजुती व अपुरी माहिती असल्याने, स्वतःच्या कुटुंबाने झिडकारलेल्या आणि हिंस्र जगात अनोळखी व्यक्तींमध्ये स्वतःचं ‘घर’ सापडलेल्या व्यक्तींचा हा एकत्रित प्रवास होता.
घर म्हणजे छत, भिंती आणि खांब. डोक्यावरचं छत जरी सुरक्षा देत असलं, तरी भिंती आणि खांब, या सपोर्ट सिस्टीममुळे छत त्याच्या जागी खंबीर राहतं.
आपल्याला आयुष्यात येणारया वादळवाऱ्यांपासून सुरक्षा हवी तर आपल्या जीवनात मनुष्यरुपी खांब, भिंती म्हणजे ‘सपोर्ट सिस्टीम’ ही तेवढीच खंबीर हवी. आपल्या डोक्यावरचं कधी छप्पर उडालं की आपल्याला निवारा देणारी माणसे हवीत. आपण व्हर्चुअल जगात असणाऱ्या फॉलोवर्स, फ्रेंड्स च्या आकड्यांवरून आपलं गणगोत ठरवत असू, तर आपण चुकतोय,असं ते जर्नल सर्जन यांचे मत होतं. आपल्या आयुष्याची खरी सफलता, आपल्या आयुष्यात असणाऱ्या त्या मोजक्या लोकांमुळे ठरते, जे एका मध्यरात्री केलेल्या फोन कॉल मुळे स्वतःची झोप मोडून आपल्या मदतीसाठी धावत येतात.
आपण चुकल्यावर ,आपल्याला दोन बोल कमीजास्त सुनावून आपली चूक सुधारण्यासाठी मार्ग सुचवतात आणि म्हणतात “खबरदार ! पुन्हा असा चुकलास तर याद राख.”
ज्यांच्याशी वर्षांचा अबोला असला तरी आपल्या आयुष्यातली सुखद अथवा दुःखद घटना घडल्यावर त्यांना सांगण्यासाठी आपला फोनकडे हात वळतो, ज्यांच्यावर किती जरी राग असला तरी आयुष्याने आपल्या श्रीमुखात भडकवली, की जो बर्फाप्रमाणे वितळून जातो,
जे स्वतःच्या आयुष्यात कधी कमी पडले असतील कधी, पण तुम्हाला गरज पडली म्हणून, आपल्या गरजांना मुरड घालून तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहतात,
— अशा लोकांना कधीच कोणत्याही परिस्थितीत, आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नका.
या खंबीर सपोर्ट सिस्टिम मुळेच, अनेक वादळं आली तरी आपण ठामपणे उभे राहू शकतो.
हे ‘सपोर्ट सिस्टीम’ नात्यात सापडतीलच असं नाही, जिथे सापडेल तिथे त्यांना आपण मात्र घट्ट धरून उभं राहावं.
जास्वंद : “अगं, मी वीतभर असताना, मला किती प्रेमाने लावलं होतस तुझ्या अंगणात. तुझ्या बाळांप्रमाणे तू माझी काळजी घेतलीस. अजूनही घेतेस…आता माझं वय दोन वर्षे असेल ना? माझी मुळं मातीत घट्ट रुजेपर्यन्त तुझ्या प्रेमळ स्पर्शाने मी आनंदी होत होते. आणि मनाची खात्री झाली की, ही मला छान घडवणार!रोज पाणी घालण, वरचेवर माती बदलणं, तू घरी केलेलं खत घालण, माझ्या फुटलेल्या कोवळ्या पालवीवर धुळ जरी पडली तरीही कससं होणारी तू, माझ्या आजूबाजूला किडही लागू देत नव्हतीस.
नव्या उमेदीने मला एकेक फांदी नवीन फुटत गेली, मी बहरत गेले. कधीतरी एखादी कळी जणू त्या एकसारख्या कापलेल्या पानातून वर डोकवायची! दोन-तीन दिवसात फुलायची! लालभडक ….पहिलं फुल देवाला घातलंस. आता माझा विस्तार आणि वंशावळ वाढलीय! हळूहळू करत लहान मोठ्या भरपूर कळ्या वर डोकावू लागल्या. आपलं आकाश शोधू लागल्या!
तुझ्या मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर नाजूक उपदेश देताना पाहिलय मी! माझ्या अपत्यानाही मी हलकेच गोंजारत तसे उपदेश देऊ लागले. कोवळ्या कळ्यांच्या वरील आवरणाच्या हिरवळीतून हलकेच उठून दिसणारा त्यांचा आतला लालसर रंग! त्या कळीच सौंदर्य अधिकच वाढवत असे. कळीच फुल होतानाच तीच सौन्दर्य आणि टप्पे काय वर्णू! मला वाटत होतं माझीच दृष्ट लागेल की काय ह्या माझ्याच बाळांना.
लालभडक फुलं हसताना…मी समाधानी होत असे ! खूप फुलं फुलू लागली…लाल पताक्यांसारखी उंच हलु लागली आणि आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवू लागली.
अशातच…तू एकदा पाहिलंस, शेजारच्या,रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी लाल फुल तोडायला सुरुवात केली. तुला कसतरी वाटायचं.. इतकं देखणं झाड आपलं आहे, फक्त आपलं आणि इतर लोकं याची फुल तोडतात. पण तू एकदा माझ्याशी गप्पा मारताना हे बोलून दाखवलस आणि मला आणि स्वतःलाही समजावलस की आपला काय आणि लोकांचा काय… देव एकच! त्या देवाच्याच चरणी जातील ही फुल! ह्या विचाराने तू थोडी शांत झालीस आणि मीही.
पण तुला सांगावं की नाही? न राहवून सांगते आता…आताशा, आजूबाजूचे लोक, रस्त्यावरचे लोक कळ्याच काढून न्हेत आहेत. अगदी ओरबाडून, काठीला आकडा लावून, उड्या मारून फांद्या तोडून मुक्या कळ्या तोडत आहेत ग. माझ्याच न फुललेल्या बाळांची ही अवस्था…लोक जवळ आले तरी पोटात गोळा येतो आता…माझ्यापासून माझ्या तारुण्याचा उंबरठा ओलांडत असलेल्या माझ्या पोटच्या कळ्यांची ही अवस्था बघवत नाही मला…त्यांचा रंग आता कुठे खुलणार असतो…त्यांना पूर्ण आकारणार असतात…पण, त्यांच्या अवयवांचा रेखीवपणा आहे त्या अवस्थेत ओरबाडून घेऊन, स्वतःच्या घरात नेऊन ठेऊन, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवाला वाहण्यात काय आनंद मिळतो त्यांना ? आणि कोणत्याही देवाला हे आवडेल का? एकीकडे म्हणतात, निसर्ग ही देवता आहे म्हणतात ना, मग आम्हाला त्रास देऊन ते स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त देवाच नाव घेऊन समाधान का मानतात? आमचं समाधान त्यांनी जाणलेय कधी?
माझं रडू, माझं रक्त नाही दिसत त्यांना…माझ्या भावना नाही समजू शकत ते…आईपासून त्यांना अकाली पोरकं करणं…संवेदनाहीन झालीत का ही माणसं?
पोटच्या गोळ्याला गर्भातच खुडणारी माणसं ऐकली होती.. अत्याचार करून ‘ती’ ला संपवणारी माणसं ऐकली होती. पण आता आमच्याही तरुण कलीका अशा खुडून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांचं जगणं संपवणारे..रांगोळ्या घालण्यासाठी एकेक पाकळी वेगळी करणारे…आम्हाला ओरबडणारे…तुम्ही ‘नराधम’ म्हणता तुमच्या भाषेत अशा लोकांना, मी काय म्हणू?
सगळेच तुझ्यासारखे दुसऱ्याचं काळीज जाणारे नसतात ग! “