केसापासून नखापर्यंत सर्वांग सुंदर अशी आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. विश्वाची स्वामीनी जगत जननी आहे. अशी ही सुंदरी कोमल शांत नाजूक आहे.
पण इतकच तिचं वर्णन नाही. ती अष्टभुजा आहे. गदा ,चक्र ,शंख, धनुष्यबाण ,शूल ,पाश ,खड्ग अशी अनेक शस्त्रे तिच्या हातात आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे .ती चंडिका आहे देवांनी ही तिची स्तुती केली आहे… अत्यंत शांत कोमल …. पण वेळप्रसंगी भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी ….आणि राक्षसांशी झुंझणारी आहे… अनेक दुष्ट राक्षसांना शासन करून तिने यमलोकात घाडलेले आहे.
या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता एक स्त्री म्हणून बघा….ती पण आपल्यासारखीच आहे…अशा या देवीचा अंश आपल्या ही शरीरात आहे. आपण तिची प्रार्थना करूया.
प्रार्थना करून झाली की आपण काहीतरी तिच्याकडे मागतो… तर विचार करा काय मागायचे? लौकिकात जे हवे आहे ते आपले सगळे मागून झालेले आहे….
आता थोड वेगळं काही मागूया ….
राक्षस म्हटलं की अती भयंकर क्रूर अक्राळ विक्राळ असं काहीसं रूप आपल्यासमोर येतं… .. पण लक्षात घ्या राक्षस ही एक वृत्ती आहे…..ती विचारात कृतीतही असू शकते… ते प्रचंड मोठेच असतात असं नाही पण मनाला त्रास देणारे असेही असतात…. काही बहुरूप्या सारखे वेष बदलून येतात. आपण त्यांच्याशी लढूया….
अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात… त्यासाठी देवी सहाय्य करेलच… पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे….. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत….
एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला पण अंगी सामर्थ्य यावं लागतं ते यायला हवं. .. .तो जोश यायलाच हवा….
शत्रूला भ्यायचं नाही तर त्याच्याशी सामना करायचा… निकरानी आणि सर्व शक्तीनिशी लढायचं असं ती आपल्याला शिकवते….विजय मिळेपर्यंत झुंजायचं…
देवीचं गुणगान करा. ‘ श्री सूक्त ‘, ‘ देवी अथर्वशीर्ष ‘, ‘ सप्तशतीचा पाठ ‘, हे सर्व काही करा…..आणि तिच्याकडे प्रार्थना करा ….
“ हे देवी मला निर्भय कर सबल कर……”
तसेच तिला आश्वासन द्या की “ मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन….”
दोन भुजा असलेल्या अनेक जणी…. अष्टभुजा असल्यासारख्या अनेक गोष्टींसाठी लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत… त्यांच्याकडून प्रेरणा घेऊया…
आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच…
त्या मातृरूपेण संस्थिता अशा देवीला माझा नम्रपणे नमस्कार.
नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते.
।।नमो देव्यै महादेव्यै
शिवायै सततं नम:
नम: प्रकृत्यै भद्रायै
नियत: प्रणता स्मताम् ।।
अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते. मंत्रजागर आरत्या यांचा नाद घुमतो. उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात.
नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह ,मांगल्य ,पावित्र्य पसरलेले असते.
लहानपणापासून आपण एक कथा ऐकत आलो आहोत…महिषासुराची. या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात अत्याचार माजवला होता.आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासुरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात, व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया… आदिशक्ती… दुर्गामाता.
शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप. तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते, व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी…. सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.
नवरात्रीचे महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस .वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर ,सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं,अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची..
तर असा हा भोंडला, भुलाई, किंवा हादगा ….
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।
अक्कण माती चिक्कण माती .. खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई .. जातं ते रोवावं…
अस्स जातं सुरेख बाई .. शेल्यानं झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई .. पालखीत ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई .. माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई .. खायाला देतं
अस्सं सासर द्वाड बाई .. कोंडून मारतं..
अस्सं आजोळ गोड बाई .. खेळाया मिळतं…
गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी….
बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा
गाणे संपले खिरापत आणा..।।
खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची.अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील,असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.
अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री, ही निरनिराळी नऊ नावे असली तरी ती एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे. आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…
दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं मोठ्या भक्तीभावाने पूजन, पठण होते. गरबा,दांडीयाचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..
…. पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं…
आपले सर्वच सण हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण , नैतिक संदेश.
उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?
ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो ,आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??
…… खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे, त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन नक्की कसा आहे…?
आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?
ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मिती होते, त्या देहावर पाशवी, विकृत वासनेचे घाव का बसतात…?
विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?
समाजासाठी मखरातली देवी आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री..ही निराळीच असते का?
असे अनेक प्रश्न, अनेक वर्षे.. युगानुयुगे, अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.
आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.
स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? …. ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली. तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही झाली.
…. पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके, तिची घुसमट, तिची होरपळ…. आहेच त्या चौकटीत.
एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच… दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…?
.. मग हा जागर कधी होणार?
तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर …. जेव्हा धार लावून तळपतील, तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…
नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर स्त्री जन्माच्या पावित्र्याचा..मांगल्यांचा… शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…
हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!
हादग्याची खिरापत ओळखण्यासाठी असा शॉर्टकट आम्ही मांडत असू. पण एखादी सुगरण सांगे नाऽऽऽऽही.
मग गोड की तिखट?
तळलेले की भाजलेले?
कुठली फळं आहेत का?
बेकरीचे पदार्थ आहेत का? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. चुळबुळ चुळबुळ सुरु व्हायची. पण आता उत्कंठा शिगेला पोचल्यानंतर सगळ्याजणी हार मानायच्या.
“हरलो म्हणा, हरलो म्हणा”. विजयी मुद्रेने आणि उत्फुल्ल चेहऱ्याने यजमानीणबाई डबा घेऊन उभी असे. पण डब्याचं झाकण उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्फर्म करत असे.
१)लाह्याच्या पिठाचा उपमा कुणी म्हटलंय का?
२) फुटाणे कुणी म्हटलंय का?
३)गुलगुले कुणी म्हटलंय का?
४) शेंगोळी कुणी म्हटलंय का?
५) ढोकळा कुणी म्हटलंय का?
किंवा एखादी गाणं म्हणायची.
“हरलीस काय तू बाळे?
गणगाची उसळ ही खुळे.”
मग आम्ही सगळ्या “खुळ्या” आनंदाने त्या खिरापतीला न्याय द्यायचो.
डबा उघडला जायचा. सर्वांना खिरापत मिळायची. त्यावेळेला द्रोण, वाट्या, चमचे, डिश यांचे फॅड नव्हते. प्रत्येकीच्या तळहातावर चमचाभर खिरापत घातली जायची. तेवढ्यानेही आमचे समाधान व्हायचे. सगळेच मध्यमवर्गीय. घरात एकटा मिळवता आणि सात आठ खाणारी तोंडे. तुटपुंज्या पगारात भागवताना नाकी नऊ येत. पण तरीही हादग्याची खिरापत केली जायची च. सगळीकडे खिरापत “परवडणेबलच” असायची. श्री बालाजी ची सासू याचा अर्थ खालील प्रमाणे…..
श्री=श्रीखंड,
बा=बासुंदी, बालुशाही
ला=लाडू, लापशी, लाह्या
जी=जिलबी
ची=चिवडा, चिरोटे
सा=साटोरी, सांजा साळीच्या लाह्या
सू=सुतरफेणी, सुधारस सुकामेवा. वगैरे.
त्याचप्रमाणे श्री बालाजीच्या इतर नात्यांवरून पदार्थ ओळखायचे…
उदा. भाऊ .. भा=भातवड्या (तळलेल्या किंवा भाजलेल्या), भात, भाकरी.
अक्षरशः फोडणीचा भात ,भाकरी यांना सुद्धा खिरापतीचा मान असायचा. कुणीच कुणाला नावं ठेवत नसे. ओळखण्याचा आनंद आणि हादग्याचा प्रसाद म्हणून गट्टम करायचा.
ऊ=उंडे, उपासाचे पदार्थ… एका केळ्याचे, रताळ्याचे, काकडीचे, छोट्या पेरूचे दहा तुकडे करून एक एक तुकडा हातावर ठेवला जायचा. खिरापत कोणतीही असो ओळखण्याच्या आनंदानेच पोट भरून जात असे. मग आमचा घोळका पुढच्या घराकडे निघायचा.
उगारला आम्ही चाळीतले सगळे मध्यमवर्गीय. घरोघरी असा हादगा साजरा करत असू. भिंतीवर एक खिळा मारून हादग्याचा कागद लावत असू. त्या रंगीत चित्रात समोरासमोर तोंड करून दोन हत्ती उभे असायचे. दोघांच्या सोंडेत माळा धरलेल्या असायच्या. त्याला सोळा फळांची माळ घातली जायची त्यात भाज्या देखील असायच्या. १६ फळं उगारसारख्या खेडेगावात मिळणं मुश्किल. बंगल्यातल्या मुलींच्या घरात फळझाडे भरपूर असायची. बिन दिक्कत आम्ही तोडून आणत असू. हातातली काचेची फुटकी बांगडी विस्तवावर धरून ठेवली की ती वाकडी व्हायची. मग त्यात शेतातली ताजी भाजी म्हणजे वांगी, दोडका कारली, मिरची, काकडी, भेंडी, ढबू मिरची अशा काही भाज्या त्यात बसवायच्या. हत्तींना रोज ताज्या फुलांचा हार घातला जायचा. त्यासाठी दोन्ही बाजूला खिळे मारलेले असायचे. घरोघरी हादगा रंगायचा. आमंत्रणाची गरजच नसायची. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचेच. फेर धरायचा. मध्ये एक पाट ठेवून त्यावर हत्तीचे चित्र अंबारीसकट काढायचे. हळद, कुंकू, फुलं वाहून सगळ्यांनी पारंपारिक गाणी म्हणायची. पहिले दिवशी एक ,दुसरे दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने १६ व्या दिवशी १६ गाणी म्हणायची. मग खिरापत ओळखायची.
हादगा समाप्तीचा मोठा समारंभ असायचा. हादग्याच्या सगळ्या मुली, शिवाय त्यांच्या आयांना देखील आमंत्रण असायचे. घागरीच्या पातेल्यात खिरापत केली जायची. सर्वांनी पोटभर खावे अशा इच्छेने आग्रह करून वाढले जायचे. ती चव, ती तृप्ती वर्षभर पुरायची. मग पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सगळा खेळ रंगायचा.
आता सर्वत्र आर्थिक सुबत्ता आली. पण वेळेअभावी एकच दिवस हादगा किंवा भोंडला खेळला जातो. पण खिरापत ओळखण्याची मजा आजही वेगळा आनंद देऊन जाते. आता घरोघरी चढाओढीने पदार्थ केले जातात. गुगलवर एका किकवर अनेक अनोख्या खिरापतींची रेसिपी मिळते. लहानपणीची ” श्री बालाजीची सासू ” आता सुधारक पद्धतीने आकर्षक डिशमध्ये मिळते. आणि आम्हा महिलांना तोच आनंद पुन्हा मिळतो.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य आणि बासरी…☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
प्रत्येकाचं आयुष्य, हे बासरी सारखं पोकळच असतं अनेक ठिकाणी अनेक छिद्र असतात…!
कोणतं छिद्र कधी झाकायचं ? कधी उघडायचं ?
श्वास कधी घ्यायचा ? आणि फुंकर कधी मारायची ?
— एकदा याचं गणित समजलं, की मग आयुष्य सुरेल होतं…!!!
आयुष्यात दुःख कुणाला नाही ?
आता हेच पहा ना…. कुणी लिहितंय तर कुणी वाचतंय…. !!!
गुरुस्थानी असलेले श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर, मागच्या वेळी बोलताना मला म्हणाले, दुःख कमी करण्याचा एकच उपाय, तो म्हणजे .. ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”
सोबत घेऊन जायचा कोणताही पर्याय नसेल, जे आज ” माझं ” आहे ते मला इथेच जर सोडून जायचं असेल … तर मी उद्या ते दुसऱ्याला द्यायला काय हरकत आहे… ? ज्याचा आज मी उपभोग घेत आहे, ते माझं नाहीच… उद्या ते दुसऱ्याच्या पदरात असणार आहे, मी ज्याला माझं म्हणतोय ती फिरती ढाल आहे, आज माझ्याकडं आहे, उद्या दुसरीकडे ही ढाल जाणार, हे एकदा समजलं, तर जातांना ही ढाल दुसऱ्याला खुल्या दिलानं द्यायला काय हरकत आहे ?
— लेके तो जा नही सकते….. तेव्हा ” देके जावो, या फिर छोडके जावो…!”
Give it… or leave it !!!
वरील तत्व तंतोतंत अंमलात आणत, आपण तळागाळातल्या समाजाला आपल्या घासातला घास द्यायला अगोदरच सुरुवात केली आहे.
आपल्या देण्याच्या या वृत्तीला मनापासून नमस्कार.
भिक्षेकरी ते कष्टकरी ….
१ . परिस्थितीने पिचलेले एक तरुण कुटुंब ! नाही म्हणायला एक झोपडं होतं, बाजूला शिवाजीनगर कोर्ट परिसरात “तो” छोटा विक्रीचा व्यवसाय करून बायको आणि दोन पोरांना जगवायचा. याचं झोपडं जिथं होतं, बरोब्बर तिथूनच मेट्रोला जायचं होतं… तिचा तसा हट्टच होता…. मग सर्व झोपड्या जमीनदोस्त झाल्या… याची कशी शिल्लक राहील ? अनेक कुटुंबं उध्वस्त झाली… मग आता नक्कीच विकास होणार याची खात्री पटली… !
ज्या रस्त्यावर अनेक लोक छोटे विक्री व्यवसाय करत होते, त्यांचे सर्व सामान उचलून त्यांना तिथे विक्रीस बंदी आणली… उदरनिर्वाह थांबला… लहान लेकरं भुकेने इकडे तडफडत होती, आणि चकाचक होण्याच्या नादात शहर मात्र तिकडं “स्मार्ट” होत होतं…!
याचाही व्यवसाय थांबला, जगण्याचे आणि जगवण्याचे सर्व रस्ते बंद झाले. याने मग झाडाला लटकून फास घेण्याचा प्रयत्न केला… ऐनवेळी कुणीतरी बघितले आणि थोडक्यात वाचला !
याला मी आधीपासून ओळखत होतो. याला बोलावून घेतलं…. सातारी शिव्या आणि पुणेरी टोमण्यांनी याला आधी चांगला बुकलून काढला…. इतका, की यापेक्षा फास परवडला असता, असं त्याला वाटलं असेल.
इलाज नव्हता… गोळ्या औषधांनी बरं होत नसेल, तर सुई टोचावीच लागते…!
यानंतर मात्र त्याला प्रेमानं जवळ बसवून, तू गेल्यानंतर, बायको आणि लहान पोरांचे हाल कसे झाले असते… हे त्याला समजावून सांगितले. तो रडायला लागला. त्याला समजेल अशा भाषेत मग सांगितलं, ‘आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत नसेल, तर वाट बदलून बघायची असते मित्रा… चालणं थांबवायचं नसतं…!.. ‘पानगळीत झाडं आपली पिकलेली पानं फक्त बदलतात येड्या … आपलं मूळ नव्हे !’
सोमवारी २५ सप्टेंबरला विक्रीसाठी याला लागतील त्या सर्व गोष्टी घेऊन दिल्या आहेत. विक्रीची जागा बदलली आहे… एक कुटुंब सावरलं आहे. बायकोच्या ज्या ओढणीने तो गळफास घेणार होता, तीच ओढणी, आता तो गळ्याभोवती गुंडाळून काम करतो…! त्याच्या गळ्या भोवती पडलेले काळे निळे व्रण आणि झालेल्या जखमा आता हीच ओढणी झाकते… !
२ . परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेले… पत्नीवर निस्सिम प्रेम करणारे… पण तिच्याकडूनच फसवले गेलेले… भ्रमिष्ट होऊन, रस्त्यात एक्सीडेंट होऊन पडलेले एक बाबा…! २३ तारखेला शनिवारी रस्त्यावरच यांची दाढी कटिंग करून, आंघोळ घालून यांना उपचारासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. पूर्ण बरे झाल्यानंतर, यांचे पुढे काय करायचे… याची दिशा भविष्यात समजेल… !
बाबांनी आतापर्यंत जगलेलं आयुष्य… त्यांचे झालेले विश्वासघात, हे सर्व ऐकून मी सुद्धा अंतर्बाह्य हलून गेलो होतो.
शेवटी एकच समजलं .. ” विश्वास किंमती असतो पण धोका खूप महाग… !!!”
याच बाबांचा संपूर्ण आयुष्यपट “कुणी जीव घेता का जीव ?” या दीर्घ लेखात स्वतंत्रपणे मांडला आहे.
वैद्यकीय
१. एक वेळ अशी येते.. आई बाप थकून आणि सुकून जातात… गळून पडतात…. तेवढ्यात सुना, किंवा मुलं येतात, माने खाली हात घालून उठवतात… सुकलेल्या निर्जीव डोळ्यात तेवढ्यापुरती जान येते …चकाकी येते… सुकलेली ती पानं मग हरखून भावुक होवून विचारतात, ‘ मला कुठे नेत आहात ?’
अशी अनेक सुकलेली लाकडं आम्हाला रस्त्यावर ठिकठिकाणी मिळतात…. आम्ही आधी या लाकडांना शुचिर्भूत करतो, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो… झालेल्या सर्व जखमांवर फुंकर मारून, पुन्हा या जुन्या खोडातून पालवी फुटावी यासाठी प्रयत्न करतो. !
या महिन्यात अशा तीन अतिगंभीर रुग्णांना ऍडमिट केले आपल्या आशीर्वादाने ते जगले आहेत.
त्यांची कर्मकहाणी इथे किंवा स्वतंत्र लेखात मांडावीशी वाटते, परंतु साहित्यातला बीभत्स रस सुद्धा इथे ओशाळेल, म्हणून संयमाने आणि नाईलाजाने थांबतो … !!!
२. याव्यतिरिक्त रस्त्यावरील खरोखरचे गरजू ओळखून त्यांना कुबड्या, वॉकर, काठ्या, व्हील चेअर, मानेचे तथा कमरेचे पट्टे अशी वैद्यकीय साधने दिली आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या रक्त लघवीच्या सर्व तपासण्या करून रस्त्यावरच त्यांना वैद्यकीय उपचार केले आहेत…. हेतू एकच …. बरं झाल्यानंतर स्वाभिमानानं यांनी काहीतरी काम करावं आणि सन्मानानं माणूस म्हणून जगावं…!
अन्नपूर्णा प्रकल्प
खिशाला छिद्र पडलं की पैशाच्या आधी नाती गळून पडतात ही आजची वस्तुस्थिती आहे !
बापाच्या शर्टाला पदर नसतो आणि आईच्या पदराला खिसा नसतो… तरीही आईबाप आपल्या मुलाबाळांना झाकायला… त्यांना काही द्यायला… कधीही कमी पडत नाहीत…!
पण जेव्हा बापाच्या खिशाला छिद्र पडतं किंवा आईचा पदर फाटतो , त्यावेळी मात्र त्यांची किंमत तुटलेल्या आणि झिजलेल्या पायताणासारखी होते…
वापरून फेकलेली अशी बरीच पायताणं आम्हाला रस्त्यावर जागोजागी उकिरड्यावर भेटतात…! आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही अशा उकिरड्यावर पडलेल्या किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, रोज…. हो दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत.
कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पासून सुरू केलेला आमचा हा प्रकल्प, आजतागायत आपल्या आशीर्वादाने दररोज सुरू आहे…. !
खराटा पलटण
खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team !
अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे.
आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत.
भीक नको बाई शिक
आपल्या माध्यमातून भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांना दत्तक घेतलं आहे, आणि त्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या आहेत.
माझ्या पूर्व आयुष्यावर मी जे पुस्तक लिहिलं आहे, त्याची विक्री करतो आहे. या विक्रीतून येणारा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरत आहे.
आमचा हा संपूर्ण प्रवास आहे… भिक्षेकऱ्यांना कष्टकरी बनवण्याचा… माणूस म्हणून त्यांना जगणं शिकवण्याचा…. !!! कोणत्याही प्रवासात, महत्वाचं काय असतं ? प्रवास सुखकर झाला …? नाही, हे फारसं महत्वाचं नाही…! प्रवासात खूप अडचणी आल्या …? नाही, हेही फारसं महत्वाचं नाही, त्या तर येणारच …!
मग ? इच्छित स्थळी पोचला नाहीत अजून ??? …. यालाही फारसं महत्व नाही, रोज थोडं थोडं चालतोय, इच्छित स्थळ येईलच कधीतरी …!
अरे…. मग महत्त्वाचं काय…. ??? .. महत्त्व असतं, प्रवासात दिलेल्या सोबतीला….!
चालताना दम लागला तर, पाठीवरून मायेनं फिरवलेल्या हाताला…!!
धावताना तहानेनं जीव व्याकुळ झाला असता, ओंजळभर पाणी पाजणाऱ्या त्या ओंजळीला….!!!
खाच खळगे पार करताना, कधी ठेच लागते, अंगठा रक्ताळतो… वेदना आपल्याला होते…. आणि अश्रू समोरच्याच्या डोळयात असतात… महत्त्व असतं त्या समोरच्या थेंबभर अश्रूला….!
तुम्ही सर्वजण हेच तर करताय…. माझ्या या प्रवासात “सोबत” राहून….!
आणि म्हणून “आपल्या सोबतीने” झालेल्या या प्रवासाचा लेखाजोखा आपणास सविनय सादर….!
मैत्रीण म्हणाली गोकर्णीच्या बिया आहेत लाव तुझ्या कुंडीत…
पावसाळ्याचे दिवस आहेत रुजतील बघ…
कुंडी रिकामी नव्हती .तुळशीच्या कुंडीतच तीनी खड्डा केला …आणि त्यात बिया पेरल्या. पाणी घातलं .
दर दोन दिवसांनी ती बघायची अजून अंकुर वर आला नव्हता.
काही दिवस तिचे तिकडे लक्षच गेले नाही .आणि त्या दिवशी अचानक दोन पानं दिसली …
तिला विलक्षण आनंद झाला.. वेल भराभर वाढायला लागली..
ती प्रचंड खुश…
तुळशीच्या फांद्यांचा आधार घेऊन वेल वर चढायला लागली..
भरपूर हिरवीगार पानं दिसत होती.
ती रोज परत परत बघायची वेल ऊंच ऊंच गेली होती ….
त्या दिवशी सुनबाई जवळच उभी होती म्हणाली..
“ आई इतकं काय निरखून बघताय?”
“ अगं वेल वाढली आहे पण अजून फुलं काही लागली नाहीत “
सून जरा शांत बसली.. नंतर हळूच म्हणाली..
“आई इतकी घाई नका करू.. वेलीला वाढू दे …सशक्त होऊ दे.. तिला योग्य वाटेल तेव्हा येतील फुलं…
तिचा तिला वेळ द्या…. कदाचित तिची अजून तयारी झाली नसेल…”
तिने सुनेकडे बघितलं … म्हणाली, “ अग फुलांची वेल आहे मग फुलं आलीच पाहिजेत …फुलं येत नाहीत म्हणजे काय…. “
सून काही बोलली नाही. शांतपणे बाजूला झाली .
‘फुल कशी येत नाही बघतेच आता…..’ असं म्हणत तिने त्यावर उपाय करायला सुरुवात केली .
अनेक जण सांगणारे भेटले. माहितीचे नवेनवे स्तोत्र हाताशी होतेच .जे जे जमेल ते ते ती करत होती .
एकदा सुन म्हणाली ….
“आई या सगळ्याचा वेलीला त्रास होत असेल …हिरवीगार वेल पण छान दिसते आहे….”
तिने सुनेच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तिचा फुलासाठी आटापिटा सुरू होता.
यश मात्र येत नव्हते .काही दिवसांनी ती निराश झाली…आणि मग तो खटाटोपही कमी झाला .
मध्ये काही दिवस असेच गेले………… एक दिवस ती उठली सहज वेलीकडे लक्ष गेले …
ती चमकली. फुलासारखं तिला काहीतरी दिसलं… जवळ गेली तर लक्षात आलं ते प्राजक्ताचे फुल होतं….
वाऱ्यावर वेल डोलली …तसे ते फुल अजूनच तिला छान वाटलं…
ती बघत बसली….आज वेल जास्त सुरेख दिसते आहे असं तिला वाटलं.
मनोमन तिला सगळं काही उमगलं…
अचानक तिने हळूच सुनेला जवळ घेतलं. पाठीवर थोपटलं …तिचे हात हातात घेतले.. तो आश्वासक हात बरंच काही सांगून गेला…
… आई स्टूलावर चढली होती. ती पडेल अशी लेकीला भीती वाटत होती …” आई मी स्टूल घट्ट धरून ठेवते म्हणजे तू पडणार नाहीस….” आपल्या छोट्याशा हाताने तिने स्टूल पकडले…
आईला आधार देण्यासाठी…आईची काळजी लेकीच्या इवल्याशा डोळ्यात दिसत होती….
दोघी कौतुकाने छोटुकल्या प्राजक्ताकडे बघत होत्या…
सासू सुनेचे डोळे गच्च भरून वाहत होते……
कुठलाही गाजावाजा न होता एका वेलीनी अवघड प्रश्न सहजपणे सोडवला होता…….
गणेशोत्सव संपला की सर्वांना नवरात्राचे वेध लागतात ! नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. नऊ ही संख्या ब्रह्म संख्या समजली जाते. निर्मिती शक्ती आणि नऊ हा अंक यामध्ये एक नाते आहे. जमिनीत गेल्यावर बीज नऊ दिवसांनी अंकुरते. आईच्या पोटात बाळ नऊ महिने राहते आणि जन्म घेते. नऊ हा अंक सर्व अंकात मोठा आहे. आदिशक्तीचा उत्सव हा निर्मितीचा उत्सव असल्याने तो नऊ दिवस असतो.
सनातन वैदिक धर्म हा माणसाने निसर्गाशी नाते जोडावे हे शिकवतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे सण उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रकानुसार करण्यात आली आहे. पावसाची नक्षत्रे संपता संपता भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणपती पूजन केले जाते. भाद्रपद कृष्णपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो तर अश्विन महिन्याच्या सुरुवातीला शेतात धान्य तयार होते म्हणून निसर्गातील निर्मिती शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मिती शक्ती नवीन पिढीला जन्म देते ती या आदिशक्ती मुळेच ! म्हणून नवरात्र उत्सव किंवा आदिशक्तीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो..
आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सण हे त्या त्या काळातील हवामान, शेती, प्राणी या गोष्टींशी संबंधित असतात. निसर्ग आणि मानव मूलतः एकमेकांशी जोडलेले असतात. भौतिक प्रगतीच्या नादात माणूस आपले मातीशी असलेले नाते विसरत चालला आहे. आप, तेज, माती, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राचा उत्सव सुरू होतो. आदिशक्तीची ‘श्री महालक्ष्मी’, ‘श्री महासरस्वती’ आणि ‘श्री महांकाली’ ही तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी संपन्नतेची देवता आहे, तर श्री महासरस्वती ज्ञानाची देवता आहे. श्री महाकाली रूपात देवी अन्यायाला वाचा फोडणे आणि गुंड प्रवृत्तीचा नाश करणे यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे महाकाली ही वाहनावर बसून हातात आयुधे घेतलेली अशी आपण पाहतो.
पारंपारिक पद्धतीनुसार पाहिले तर सर्जनाचे प्रतीक असणाऱ्या मातीची व धान्याची पूजा नवरात्र प्रारंभी सुरु होते. एका घटात माती घालून त्यावर कलश ठेवला जातो. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूने घातलेल्या मातीत सप्तधान्याचे बी टाकले जाते. रोज नऊ दिवस पाण्याचे सिंचन होऊन रोपे तयार होतात. यालाच आपण घट बसवणे असे म्हणतो. मातीच्या घटातून येणारी ही छोटी रोपे माणसाला सृजनाची ताकद दाखवतात. ही ‘आदिशक्ती’ असते.
याच काळात “सरस्वती”ची पूजा केली जाते. लहान मुलांच्या अभ्यासाचा श्री गणेशा पाटीपूजनाने केला जातो. सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन करणे हा संस्कार लहान मुलांना दिला जातो. तिची पूजा म्हणजे आपल्या बुद्धीचे तेज वाढवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. ‘ तू शक्ती दे, तू बुद्धी दे ‘ असे म्हणून सरस्वती पूजन होते. पाटी पूजन अजूनही कित्येक मराठी शाळांमधून केले जाते. ते नवमीच्या दिवशी होते.
या नवमीला खंडे नवमी असेही म्हणतात.त्या दिवशी पांडव वनवासातून परत आले आणि वनवासाला जाताना शमीच्या झाडांवर ठेवलेली शस्त्रे त्यांनी काढून घेतली आणि कौरवांशी युध्दाची तयारी केली. अशा या खंडेनवमीचे स्मरण म्हणून आपण घरी शस्त्र पूजा करतो. देवासमोर घरात असणारी छोटी मोठी शस्त्रे जसे की सुरी, कात्री, कोयता मांडून ठेवतात व त्याची पूजा करतात. (आमच्याकडे माझे मिस्टर डॉक्टर असल्याने आम्ही स्टेथोस्कोप, फोर्सेप्स, सिरींज यासारख्या वस्तू ठेवून त्यांची पूजा करत होतो.) शेवटी ही पण आत्ताच्या काळातील शस्त्र आहेत ना ! खंडेनवमीला वाहनांची पूजाही करण्याची पद्धत आहे.. अर्थात काहीजण दसऱ्याच्या दिवशीही करतात. त्यानिमित्ताने वाहने स्वच्छ करणे, धुऊन काढणे, झेंडूच्या फुलांच्या माळा घालून सुशोभित करणे, दाराला तोरण बांधणे हे सर्व घडते.
देवीचे तिसरे रूप म्हणजे “महाकाली” ! अन्यायाचे पारिपत्य करण्यासाठी देवीने घेतलेले हे दुर्गा रुप ! यात देवी सिंहावर बसून, हातात आयुधे घेऊन आक्रमक स्वरूपात येते. आत्ताच्या काळात अन्यायी वृत्तीला प्रतिकार करण्यासाठी स्त्रीने सबल होणे गरजेचे आहे. त्यासाठीही “महाकाली” ची पूजा आहे !
या सर्व देवी रूपांना नमन करण्याचा काळ म्हणजे नवरात्र ! या नवरात्राला “शारदीय नवरात्र” हे सांस्कृतिक नाव साहित्य उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. लेखक, कवी यांच्याकडून जे लिहिले जाते, तीही एक सृजनशक्तीच आहे. तिचा आदर करणे, वंदन करणे, यासाठी शारदीय नवरात्रात साहित्यिकांकडून, संस्थांकडून वेगवेगळे उपक्रम जाहीर केले जातात. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची संधी या नऊ दिवसात मिळते. नवीन विचारांची मनात पेरणी होऊन नवीन लिखाणाला स्फूर्ती देणारा हा काळ ! त्यामुळे आपल्याला बुद्धी वैभव देणाऱ्या सरस्वतीचे पूजन या काळातच होते.
ज्याप्रमाणे पावसाची नक्षत्रे सृजनाची निर्मिती करतात, स्त्रीमध्ये बालकाची गर्भातील वाढ नऊ महिने, नऊ दिवस असते तो हा ‘ नऊ ‘ अंक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिशक्तीच्या कृपेमुळे ही नवनिर्मिती होते. भारतात विविध प्रांतात नवरात्र पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. जसे, गुजरातमध्ये देवीसमोर गरबा खेळला जातो. बंगालमध्ये कालीमाता उत्सव होतो. उत्तर भारतात दुर्गा पूजन होते, तसेच महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आणि इतरही सर्व ठिकाणी महालक्ष्मी पूजन होते.
सांस्कृतिक, पारंपारिक आणि ऋतुमानानुसार देवीचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. आपल्या माता, भगिनी आणि कन्या या देवीस्वरूप मानून त्यांचा आदर करावा ही शिकवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मिळावी, हीच या शारदीय नवरात्राच्या काळात मी देवीची प्रार्थना करते.
‘मंगलदीप’च्या मैफिलीनंतर आम्हा कलाकारांच्या अवतीभवती कौतुकानं जमणारा श्रोतृवर्ग, हा खरं तर नेहमीचाच अनुभव ! मात्र त्यादिवशीच्या माझ्या चाहत्यांची झालेली माझी गळाभेट, मनाला चटका लावून गेली. कार्यक्रम संपता-संपता एकच गलका झाला आणि अनपेक्षितपणे मुलींच्या एका लोंढ्याने, झपाटल्यासारखं जवळ येत मला घेरून टाकलं…
कुणी थरथरत्या हातानं, माझे हात पकडले तर, कुणी थंडगार हातांनी, “ताई, तुमचा गाणारा गळा कसा आहे पाहू!” म्हणून माझा गळा चाचपू लागल्या, तर काही मुली मला चक्क बिलगल्या! त्या बिलगण्यात उत्कट प्रेमाचा वर्षाव होता! त्या विलक्षण स्पर्शात, आपलेपणाचा ओलावा होता. मला भेटून त्या निरागस मुलींचे गोंडस चेहरे उजळून गेले होते. पण डोळे?….. त्यांचे डोळे मात्र जन्मतःच प्रकाशाला पारखे झाले होते, हे जाणवलं आणि मला गलबलून आलं. मनात आलं, थोडा वेळ जरी अंधारलं तरी आपण किती अस्वस्थ होतो, मग कसं असेल हे दृष्टिहीन आयुष्य? माझे डोळे भरून आले.
तेव्हापासून माझं आणि कमला मेहता अंधशाळेचं नातं जुळलं. त्यानंतर मात्र दरवर्षीची १४ जुलैची माझी आणि त्यांची भेट पुढील बरीच वर्षं होत होती. कारण नेहमी ओढ असते, ती माझ्या या बालमैत्रिणींना भेटायची, त्यांच्याबरोबर गाणी गायची, त्यांच्यातल्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य यासारख्या कलागुणांचा मनसोक्त आनंद घेत दाद द्यायची!
अॅना मिलार्ड बाईंनी ही शाळा स्थापन करून आज शंभराहून जास्त वर्षं झाली आहेत!! इथं १४ जुलै हा शाळेचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा या शाळेत आले. संस्थेच्या विश्वस्त हंसाबेन मेहता यांनी हसतमुखाने आणि अत्यंत आपुलकीनं माझं स्वागत केलं. ‘धन्य अॅना मिलार्ड बाई…!’ या गौरवपर गीताचे सूर मुलींच्या कोकीळ कंठातून पाझरू लागले. गडबडीचं वातावरण एकदम शांत झालं. मुलींच्या सुरात आत्मविश्वास पुरेपूर होता. सुरेल स्वरांनी वातावरण एकदम शांत झालं, वातावरण भारून गेलं. या मुलींपैकीच एक निवेदिकाही खणखणीत आवाजात कार्यक्रम रंगवत होती. हे सर्व अनुभवताना मीच बिथरले होते..!
त्यानंतर काही नाट्यप्रवेश, एकांकिका आणि थक्क करून सोडणारं बांबूनृत्य झालं. भीती, त्याचबरोबर आश्चर्य आणि आनंद माझ्या डोळ्यांत मावत नव्हता. मी स्तंभित झाले! त्यांच्या प्रत्येक स्टेप्स, इतक्या अचूक कशा? कुठेही अडखळत नाहीत, पडत नाहीत, अडचण नाही. सर्व काही सुंदर आणि बिनचूक! त्यानंतर मी त्यांच्यासाठी गायले. माझ्या ‘मंगलदीप’ परिवारातल्या साथीदारांनीही अत्यंत आनंदात मला या सेवेत साथ केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘हासरा नाचरा श्रावण’ ही कविता, ‘केंव्हातरी पहाटे’, ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, या गझला व अशी अनेक गाणी सर्व मुली माझ्यासंगे सुरेलपणे गात होत्या. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! ‘दिवे लागले रे दिवे लागले, ‘तमाच्या’ तळाशी दिवे लागले’ ही कविवर्य शंकर रामाणींची माझ्या स्वररचनेतली कविता, मुली तन्मयतेनं गाताना पाहून माझ्यासमोर प्रकाशाचं झाडच लखलखलं! वाटलं, या मुलींना ही सर्व गाणी पाठ कशी? नंतर जाणवलं, अरे सूरदास नव्हता का अंध? पण त्यालाही परमेश्वरानं जशी दैवी दृष्टी दिली होती, तशीच या मुलींना स्मरणशक्तीची जबरदस्त देणगी दिली आहे. या कार्यक्रमात आम्ही सर्वांनीच खूप आनंद घेतला.
त्यानंतर सुरेल गळ्याच्या स्नेहल, सारिका, तेजल, पल्लवी तसंच सणसणीत ढोलकी व तबला वाजवणारी योगिता, अशा मुलींच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. रेडियो टीव्हीवर कुठेही माझा आवाज ऐकला तरी आजही यांचा फोन असतो. योगिताने तर माझ्या कार्यक्रमातही मला साथ केलीय.
मधून मधून मी त्यांना कमला मेहता शाळेत जाऊन काही गाणीही शिकवली. त्यांची आकलनशक्ती जरी तीव्र असली तरी लाजऱ्या बुजऱ्या स्वभावामुळे त्यांना शिकवणं, ही किती कठीण गोष्ट आहे हे मला उमगलं. त्या मुलींना शिकवताना आपल्याला संयमाची खूप गरज असते हे जाणवलं. म्हणूनच त्यांना सांभाळून घेणार्या त्या-त्या वेळच्या मुख्याध्यापिका स्मिताताई, श्यामाताई, शिक्षक आणि शिपायांचंही मला नेहमीच मोठं कौतुक वाटतं. शिवाजी पार्क मधील समर्थ व्यायाम शाळेच्या श्री. उदय देशपांडे सरांनीही या मुलींना मल्लखांब, दोरखंडावरची हवेतली वेगवेगळी आसनं आणि अव्यंगालाही सहजतेनं न जमणारे, चकित करून टाकणारे, व्यायामाचे भन्नाट प्रकार शिकवताना मी अनेकदा पाहिलंय. कराटे, ज्युडोसारख्या स्वसंरक्षणार्थ खेळांचंही व्यायामशाळेत शिक्षण दिलं जातं..
बाहेरच्या जगात कुणी फसवू नये म्हणून खचून न जाता, धैर्यानं कसं वागावं, याचं शिक्षण या ‘कमला मेहता अंध शाळे’त दिलं जातं. स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून जगण्याचं भान येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न इथे केले जातात. ‘तू करू शकतेस, Nothing is impossible…’ असं म्हणत आयुष्याला वळण दिलं जातं. या शाळेतले निरलस सेवाव्रत घेतलेले सर्व शिक्षक, शिपाई, हंसाबेन मेहता या कामाशी आणि मुलींशी एकरूप झाल्या आहेत, ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.
शाळेत रोज प्रार्थनेच्या वेळी वाजवल्या जाणार्या ‘जन गण मन’मधून मुली माझ्या आवाजाशी घट्ट परिचित आहेत. तसंच माझ्या इतर सीडींमधील ‘दारा बांधता तोरण’, ‘प्रीती जडली तुझ्यावरी’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आणि मुलींचं सर्वांत आवडतं ‘गो मजे बाय, तू माका जाय, माका तुजें जडले पिशें….’ सारखी अनेक गाणी त्यांना मुखोद्गत आहेत.
मी शाळेला भेट दिल्यावर दर वेळेस या लाडक्या चिमण्यांचा घोळका आनंदाने चिवचिवाट करत येतो आणि मला बिलगतो. त्यावेळी माझा हात हाती घ्यायला, माझा स्पर्श अनुभवायला आसुसलेल्या, चिमुकल्या मैत्रिणींच्या स्पर्शात मला जाणवतं,….
मागच्या आठवड्यात एका मित्राच्या शेतातल्या घरी मुक्कामाला गेलो होतो. दुपारी १२ वाजता तिथे पोहोचलो. टुमदार कौलारू घर, आजूबाजूला भात शेती.आंबा, आवळा, पिंपळ अशी वृक्षांची मांदियाळी. हे सर्व पहाता पहाता नजर स्थिरावली ती त्याच्या घराच्या अंगणातच असलेल्या एका झाडावर आणि त्याला टेकून उभ्या केलेल्या शिडीवर.
रानातलेच झाड ते. जमिनीपासून आठ फूट उंच आणि तिथून वर फांदयांना सुरुवात. फांदया आणि पाने एवढी दाट की आत कुणी पक्षी असला तरी दिसणार नाही. या झाडाला टेकूनच एक शिडी ठेवली होती. त्या शिडीला प्रत्येकी दोन फुटांवर एक पायरी. शिडी एवढी भक्कमही नव्हती की त्यावरून माणूस चढेल. रानातल्याच वाळलेल्या काटक्यांपासून बनविलेली. मित्राला विचारले, ‘ही शिडी कुणासाठी रे?’ तो हसला. म्हणाला, ‘ संध्याकाळ होऊ दे, मग समजेल ‘.
संध्याकाळ झाली. अंधाराचे राज्य सुरू झाले. तसे मित्रासमोर तीन कोंबड्या, एक कोंबडा आणि चार छोटी पिल्ले येऊन उभी राहिली. त्याने पिल्ले उचलली. एका खोलीत मोठ्या टोपल्याखाली झाकली. त्यावर वजन ठेवले. कोंबड्या हे दुरुन पहात होत्या. पिलांची सोय झाली आहे,याची खात्री पटताच एकेक कोंबडी आणि तो कोंबडा क्रमाक्रमाने त्या शिडीवर उड्या मारत मारत झाडावर पोहोचले.
“ आता खाली कधी उतरणार? “ माझा प्रश्न.
“ सकाळी उजाडल्यावरच. रात्रभर त्या झाडावरच झोपणार “ , मित्राचे उत्तर.
थोड्या वेळाने झाडाखाली जाऊन मी पाहिले, तर खोडाला फांदी जिथे जोडली जाते, तिथे त्या डोळे मिटून पायावर बसून विश्रांती घेत होत्या. गावातले भटके कुत्रे आणि रानातले मुंगूस यापासून त्यांना जीवाला धोका. मग त्यांनीच ही सुरक्षित जागा शोधली. रोज प्रयत्न करून त्या छतावर, तिथून झेप घेऊन झाडावर जायच्या. मग मित्रानेच ही शिडी ठेवून त्यांचा मार्ग सुकर केला. आता रोज रात्री त्या झाडावर जातात. ध्यानस्थ होऊन विश्रांती घेतात. उजाडल्यावर खाली येतात. पहाटेची बांगही झाडावरूनच…. मित्राने ही माहिती पुरविली.
हे ‘ कुक्कुट ध्यान ‘ मनात घर करून राहिले. पिलांची काळजी नाही.. ती घ्यायला मालक सक्षम आहे, याची खात्री. उद्याची चिंता नाही. शत्रूपासून सुरक्षित ठिकाण शोधायचं. तिथे ध्यानाची ‘खोड’ लावून घ्यायची की फांदीवरचा तोल समन्वयाने आपोआप राखला जातो. जीवाला स्वस्थता आणि विश्रांतीही.
सहज मनात आलं, आपणही राग, लोभ, मोह, हे आतले शत्रू आणि स्पर्धा, असूया, मत्सर हे बाहेरचे शत्रू यांच्यापासून दूर, सुरक्षित ठिकाण शोधून तिथे निश्चिंतपणे, असेच ‘कुक्कुट ध्यान’, रात्रभर नको …पण दिवसातून थोडा वेळा तरी केलेच पाहिजे. या ध्यानातून मिळणारी स्वस्थता ही ऊर्जा प्रदान करणारी असेल. आत उजेड निर्माण करणारी असेल. उजाडताच पुन्हा नव्या ऊर्जेने उगवलेल्या दिवसाला सामोरी नेणारी असेल. हेच आपले एका दिवसाचे ‘ उजेडी राहिले उजेड होऊन ‘, असे होणे… असे रोज व्हावेसे वाटत असेल तर रोज हे ‘कुक्कुट ध्यानम्’…..
गणपती बाप्पाचे विसर्जन होते आणि त्यानंतरचा पुढचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून मानला जातो.
भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातले हे पंधरा दिवस पितरांच्या स्मरणार्थ व्यतीत केले जातात.
आत्मा अमर आहे हे आपण मानतो. तसेच मृतात्म्यांचे ऋणानुबंध, मृत्यूनंतरचे अस्तित्व, या संकल्पनांनाही आपण नाकारत नाही. आयुष्य जगत असताना कधी कधी असे अनुभव येतात की अशा अतिंद्रिय घटनांचाही विचार करावा लागतो. कित्येक वेळा, ही सारी पूर्वजांची पुण्याई असे उद्गारही मुखातून निघतात. याचाच अर्थ कुठल्याशा अदृश्य अस्तित्वाला आपण मनाशी बाळगतो. त्याच्याशी आपण जोडले जातो.
आपले पूर्वज हे आपलं मूळ असतं. (ओरिजिन). शास्त्रीय दृष्टीने सुद्धा त्यांचे जीन्स, क्रोमोझोम्स, पेशी या आपल्या शरीरात जन्मत:च स्थित असतात. आणि याच बरोबर आपल्यातले गुण, स्वभाव ,आवडीनिवडी, आपलं कर्तृत्व, आपल्या जगण्याच्या, विचार करण्याच्या दिशा या याच धाग्यांची निश्चितपणे निगडित असतात. ज्याला आपण जन्मजात गुण असेही म्हणतो.
आपले सण, आपले उत्सव हे ऋतूचक्र आणि शास्त्रीय विचारांवरच आधारलेले आहेत. आणि बहुतांशी ते साजरे करत असताना निसर्गाच्या पंचतत्वांशी कृतज्ञता व्यक्त करणे हेच केंद्रस्थानी असते. पितृपक्ष हा असा पंधरवडा आहे की,तो पाळण्यामागे आज या जगात आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतला आहे त्यांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच अपेक्षित आहे. पितृपक्ष मानण्याचा हा एक मुख्य हेतू आहे.
आपण वरचेवर एकमेकांना थँक्यू सॉरी म्हणतच असतो ना? मग जे आपल्या जीवनात होते आणि आज नाहीत, शिवाय ज्यांना आपण बघितलेही नाही, पण त्यांच्या कथा मौखिक पद्धतीने आपण ऐकत आलो आहोत, त्या सर्व पितरांसाठीही अंतःकरणापासून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. त्याच वेळी सॉरीही म्हणायचं आहे. कारण अनेक वेळा आपण त्यांना नकळतपणे दुखावलं आहे. त्यांचा अवमान केलेला आहे. त्यांची आबाळहीआपल्या हातून झालेली आहे, म्हणून या अदृश्य आत्म्यांना मनापासून सॉरी म्हणून पुढच्या पिढीलाही संदेश द्यायचा आहे की, बुजुर्गांचा, वाडवडिलांचा ते असतानाच मान ठेवायला हवा. त्यांनी जे कष्ट आपल्यासाठी उपसले आहेत त्याची जाणीव ठेवायला हवी. आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुमच्या हातून होऊ नये.. असे रचनात्मक संस्कार पुढच्या पिढीवर या पितृपक्षाच्या निमित्ताने करावेत.
दर्भाहुती, तर्पण, अग्नि कुंडातला घास, यामागे विकारांचे दहन आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना हाच उद्देश जाणावा.
भाद्रपद महिना हा पशु पक्षांचा जनन काळ असतो. (ब्रीडिंग सीजन ), कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळ वृक्षांचे पुन्हा पुन्हा नैसर्गिकरित्या बीजारोपण होत असते. म्हणूनच वृक्षासम सावली देणाऱ्या पूर्वजांना कावळ्याच्या मुखातून घास भरवून निसर्गवर्धनाची भूमिका जाणून घ्यावी.
ही अंधश्रद्धा नसून मनातल्या अबोल भावनांना व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे. आणि आपलं जीवन सार्थ, सुखी आणि सुरक्षित करणारे एक माध्यम आहे असा सकारात्मक विचार करून पितृपक्षाची ही परंपरा यथाशक्ती राखावी असे मला वाटते.
या काळात शुभकार्य करू नयेत, वाहन खरेदी, वस्त्र खरेदी, गृह खरेदी करू नये, प्रवास करू नयेत या संकल्पनांचा मात्र नक्की पुनर्विचार व्हायला हवा. पितृपक्ष या काळाला अशुभ कशासाठी मानायचे यावर चर्चा व्हावी. या संकेतांना कितपत महत्व द्यावं हे व्यक्तीगत असावं.
आणखी एक विचार मांडावासा वाटतो की, ग्लोबलायझेशन झाले आणि जीवनपद्धतींची देवाणघेवाण झाली. त्यात मदर्स डे, फादर्स डे साजरे होऊ लागले. मग आपली ही पितृपक्ष परंपरा, मातृ-पितृ दिन, फादर्स डे, फोर फादर्स डे म्हणून मानायला काय हरकत आहे? घरातल्या वृद्ध बुजुर्ग मंडळींचा सन्मान त्यांच्या हयातीतच या दिवसात का करू नये? स्वर्गस्थांचे स्मरण आणि हयातांचा सन्मान पितृपक्षात जाणीवपूर्वक व्हावा यात न पटण्यासारखे काय आहे?
दरवर्षी न चुकता हे घडत जातं…डोळ्यांपुढे उभी राहतात ती सारी माणसं जी आपल्याआधी निघून गेली या जगातून. काही माझ्या आधी कैक वर्षे जन्माला आलेली होती म्हणून.. तर काहींना अवेळी बोलावणं आलं म्हणून….गुरुजी सुधांशुला एक एक नाव उच्चारायला लावून पाठोपाठ एका मंत्राचा पुनरुच्चार करीत त्याला त्याच्यापुढे ठेवलेल्या परातीत, हातावर घेतलेलं पाणी सोडायला सांगत होते तेव्हा ती ती माणसं नजरेसमोर दिसू लागली.
आज सासुबाईंचं नवमी श्राद्ध ! मामंजी आहेत अजून. खूप थकलेत म्हणून नातवाच्या हातून करून घेतात तर्पण….दरवर्षी अगदी आग्रहाने. सुधांशु आणि त्याची नोकरीवाली बायको कधी काचकूच करीत नाहीत. सुधांशु कितीही काम असले तरी किमान सकाळची अर्धा दिवसाची सुट्टी घेऊन येतोच घरी आणि सूनबाई रजा टाकतात. सुधांशु दुपारी बारा वाजता काकग्रास ठेवतो बंगल्याच्या भिंतीवर आणि दोन घास खाऊन माघारी जातो त्याच्या कामाला. द्वितीयेला ह्यांचं श्राद्ध असतं, त्यादिवशी तर तो सबंध दिवस सुट्टीच टाकतो….माझ्यासोबत रहाता यावं दिवसभर म्हणून. माझ्या आधी गेले हे. म्हणजे मी ह्यांच्या माघारी श्वास घेत राहिले…एकाच सरणावर जाण्याचं भाग्य माझ्यासारखीच्या कपाळी कुठून असायला?
चुलत जाऊबाई मात्र माझ्यापुढे गेल्या….सर्वच बाबतीत….
‘ अहेव मरण पिवळं सरण, भ्रताराआधी डाव जितला गोरीनं
भ्रताराआधी मरण दे रे देवा, दीर खांदेकरी नणंदा करतील सेवा ।।’
ह्या ओळी जणू त्यांच्यासाठीच लिहिल्या होत्या कुणीतरी. सुधाकर भावोजी मोठ्या लढाईतून जगून वाचून परतले होते. पेन्शन बरीच होती पण ती खायला घरात तिसरं कोणी नाही. ह्यांची बहिण,वसुधा, तिला दिलेली होती दूर तिकडे खानदेशात. तिचं माहेरपण मात्र आमच्या दोन्ही घरांत होत असे निगुतीनं. सुधाकर भावोजी तिचे ह्यांच्यापेक्षा अंमळ जास्तच लाड करायचे. तसा आमच्यातही भावजय-नणंद असा भाव नव्हताच कधी. दिवस पाखरागत उडून गेले आणि जाऊबाईंनी अनाकलनीय दुखण्याने अंथरूण धरले ते कायमचेच. वसुधाताई जाऊबाईंच्या शेवटच्या दिवसात नेमक्या माहेरपणाला आल्या होत्या. त्यांची सेवा घडली त्यांच्या हातून. आणि ह्यांनी खांदा दिला शेवटी.
अजूनही लख्ख़ स्मरतो तो दिवस. जाऊबाईंच्या पार्थिवाला नव्या नवरीचा शृंगार केला होता जमलेल्या आयाबायांनी. एवढा आजारी देह तो.. पण त्यादिवशी चेहरा इतका गोड दिसत होता…पण डोळे मिटलेले ! काठी टेकीत टेकीत तिला शेवटचं पहायला गावातल्या चार दोन वृद्धाही आल्या होत्या. नव्या पोरीही होत्या आसपासच्या. त्या भेदरलेल्या…काही म्हणत नव्हत्या फारसं काही. पण एक वृद्धा म्हणून गेली…’ पोरी हो…कपाळी हळदी-कुंकू लावा….अहेव मरण आलं काकींना…नशीब काढलं !’ असं म्हणत त्या म्हातारीने तिच्या सुरकत्या पडलेल्या हातांनी पार्थिवाला नमस्कार केला….तेव्हा माझा हात आपसूक माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर पडला. माझं सौभाग्य…मी आणि आमचा सुधांशु ! किती दिवसांची असेल सोबत ही अशी? जीवनात सारेच क्षणभंगुरच की. पण याचा विसर मात्र सहजी पडतो जीवाला…नाही?
काळ झपाझप पुढे निघाला..त्याला जणू कुठंतरी खूप दूर जायचं होतं स्वत:लाच ! तिस-याच वर्षी सासुबाईंनी इहलोकीची यात्रा समाप्त केली आणि आमचं घर तसं ओकंओकं झालं. आणि मामंजी अबोल. त्यांचा अगदी बालवयापासूनचा संसार होता. पण कितीही वय झालं तरी साथसंगत संपून जावी असं कुणाला वाटतं? सासुबाई काहीवेळा गंमतीनं म्हणायच्या…..तुमच्यानंतर जन्माली आलेली असले तरी जाताना तुमच्याआधीच जाईन ! यावर मामंजी त्यांना मनापासून रागवायचे आणि मग त्यांच्याकडे पहात रहायचे..चष्म्याच्या भिंगांतून. त्यांची ती नजर, सासुबाईंच्या नजरेतील ते ओलेपण मनात रुतून बसले ! आणि दोनेक वर्षांत सासूबाईंनी डाव जितला ! त्यानंतरच्या पितृपक्षापासून नवमी माझ्या घरीआली. ’अहेवनवमी.’ ‘अविधवा नवमी’ही म्हणतात असं ऐकलं होतं कधीतरी. पहिल्या वर्षी तर कित्येक पानं उठली होती वाड्यात. इतका मान असतो भ्रताराआधी जाणा-या बाईला?
माझ्या चेह-यावरील पूर्णाकृती प्रश्नचिन्ह बघून हे म्हणायचे, “ अगं,वेडे ! जुना काळ तो. चूल आणि मूल नव्हे मुलं हेच विश्व असायचं तुम्हां बायकांचं. पुरुषावर अवलंबून रहायचं स्त्रियांनी सर्वच बाबतीत. माहेर कितीही लाखाचं असलं तरी ते घर फक्त साडी-चोळीपुरतं. कारण तिथं नव्या कारभारणी आरूढ झालेल्या असतच. त्यामुळे नव-याची सुख-दु:खं तीच त्यांचीही होऊन जायची. आणि हा आधार निखळून पडल्यावर बाई गतभ्रर्तृक होई. तिचं भरण-पोषण करणारा, तिची बाजू घेणारा तिचा भ्रतार जगातून नाहीसा झाल्यावर तिचं ओझं कोण वागवणार?.. असा कोता विचार करायची माणसं त्यावेळी. घराबाहेर पडून स्वत:चं आणि पोरंबाळं असल्यास त्यांचं पोट भरण्याचं धारिष्ट्य आणि सोय सुद्धा नव्हती आतासारखी. या सर्वांतून सुटकेचा जवळचा मार्ग म्हणजे पालनकर्त्याच्या आधी जगाला राम राम ठोकणे. पुरुषांचं राहू दे….तिच्यासारख्या इतर बायकांना तिचा हेवा वाटणं किती साहजिक?”
ह्यांनी कितीही समजावून सांगितलं तरी माझ्या मनातल्या एका कोप-यात अहेवपणाचं वेड हळव्या बाईपणाचं लुगडं नेसून घुसून बसलं ते बसलंच. हे आजारी पडले तेव्हा तर मन अगदी धास्तावून गेलं होतं. डोळ्यांत तेल घालून उशाशी बसून रहायचे मी कित्येक रात्री. रामरायाच्या कृपेने यांना आराम पडला आणि मी निर्धास्त झाले. सुधांशु मोठा झाला, शिकला, पोटापाण्याला लागला. शिकली-सवरलेली सून आली. आता माझे दोन दोन पालनकर्ते होते घरात…एक हे आणि दुसरा सुधांशु. आम्हा दोघांच्याही वयांनी उंबरठे ओलांडले आणि इस्पितळांचे चढले. माझी तब्येत तशी तोळामासाच म्हणा प्रथमपासून. हे मात्र स्वत:ची योग्य ती काळजी घेत. लहानपणी गरीबीमुळे खाण्या-पिण्याची आबाळ झालेली होती. पण जरा बरे दिवस पाहिल्यावर शरीरानं उभारी धरली होती यांच्या. जाण्यासारखे नव्हते हो इतक्यात…पण गेले … .. … माझ्याआधी..मला हरवून. सुधांशु म्हणाला होता…..”आई, बाबांच्यानंतर मला तुझ्याच तर प्रेमाचा आधार आहे…तू अशी खचून जाऊ नकोस !” मग मात्र मी स्वत:ला फार त्या विचारांत गुंतवू दिलं नाही. पण दरवर्षी द्वितीया आणि नवमी यायची आणि माझ्या थकत चाललेल्या चेह-याच्या नकाशात निराशेचं बेट अगदी ठळक दिसू लागायचं…समुद्रातून अचानक वरती आलेल्या बेटासारखं…!
आज सासुबाईंची ‘अविधवानवमी’ . कालपासून तयारी सुरू होती. गुरुजी तर दरवर्षी नेमानं येणारे. त्यांना आठवण करून द्यावी लागत नाही…उलट तेच निरोप देतात…येतो म्हणून. पण मला बरंच वाटत नव्हतं गेल्या काही दिवसांपासून…खूप थकवा जाणवत होता. गुरूजी आले….घर त्या मंत्रांनी भरून आणि भारावून गेलं. माहेरकडची, सासरकडची सारी माणसं.. त्यांच्या प्रत्येकाच्या नावांच्या उल्लेखानं जणू जिवंत होऊन एका रांगेत येऊन बसली पंगतीला….सासुबाई, जाऊबाईही होत्या…कपाळी कुंकू लेवून. पण मला त्यांना कुंकू लावायची परवानगी नव्हती…मी कुठं अहेव होते?
टळटळीत दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला. नैवेद्य..ज्याचे त्याला ठेवले गेले. सुधांशुने,सूनबाईने सासूबाईंच्या तसबीरीपुढे डोके टेकवले…मामंजी त्यांच्या खोलीतल्या बिछान्यावर जरासे उठून बसले…थरथरत्या हातांनी नमस्कार करीत.
सुधांशुने माझ्या हाताला धरून मला उठवलं…आई….वहा हळदीकुंकू आजीच्या तसबीरीवर ! मी चमकून त्याच्याकडे पाहिलं….तो म्हणाला…”अगं पालन-पोषण करणारा फक्त नवराच असतो का…मुलगा नसतो का आईचा पालनकर्ता…आधारस्तंभ? बाबा नसले म्हणून काय झालं? तू मागे राहिली नसतीस तर मला कोण असलं असतं. आता मी आहे की….तुला शेवटपर्यंत.”
माझ्या डोळ्यांना धारा लागलेल्या…भिंतीवरच्या ह्यांच्या तसबिरीकडे पहात राहिले. सूनबाईंनी माझा एक हात हाती घेतला. मी ह्यांच्या तसबीरीच्या काचेत पाहिलं…सुधांशु मागे उभा होता…..आणि तसबीरीतील ह्यांच्या डोळ्यांतही आज चमक दिसत होती ! सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडून, नव-यामागे त्याच्या आईवडिलांची सासु-सासऱ्यांची मुलाप्रमाणेच सेवा करण्याचं भाग्य लाभलेल्या माझा.. हो .. माझा मलाच हेवा वाटू लागला होता ! अहेवनवमीही मंद स्मित करीत पुढे सरकत होती…आणि आज मला तिचा हेवा वाटत नव्हता !
(अशीच एक आई आणि तिचा मुलगा आठवला…ह्या पितृपक्षात. या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे तरी स्पष्ट आठवली दोघं. कालानुसार बदललं पाहिजे सर्वांनी. आठवलं तसं लिहिलं…काही कालक्रम इकडचा तिकडे झाला असेलही. पण असे सुधांशु आहेत म्हणून ही नवमी ‘अहेव’ आहे, असे म्हटल्याशिवाय राहावत नाही.)