मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नात्यांचा श्वास …. विश्वास ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नात्यांचा श्वास …. विश्वास ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“विश्वास” हा शब्द वाचायला एक सेकंद, विचार करायला एक तास आणि समजायला एक वर्ष लागतं….मात्र तो सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं…! 

नात्यांचा “श्वास” हा विश्वासावर चालतो…!!! 

जेव्हा विश्वास उडून जातो, तेव्हा हि नाती खळ्ळकन् फुटून जातात… फुटलेले तुकडे पुन्हा जोडायचं म्हटलं तरी ते पुन्हा नव्या सारखे होत नाहीत…. 

फाटलेल्या कपड्याला शिवण घातली तरी शिवण दिसायचीच….! 

असेच फुटलेले तुकडे आणि फाटलेल्या चिंध्या रस्त्यावर पडून आहेत वर्षानुवर्षे… ! 

असेच गोळा केलेले तुकडे एकत्र करून त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे…. 

आणि फाटलेल्या चिंध्याना शिवण घालण्याचा प्रयत्न करत आहे…

आमच्या खेड्यात याला “वाकळ” म्हणतात…! 

मला ही वाकळ खूप आवडते, कारण या वाकळी मध्ये साडी पासून सफारी पर्यंत आणि सफारी पासून लेंग्यापर्यंत सर्व चिंध्या एकमेकांचे हात धरून सोबत राहतात…. मला रस्त्यावर भेटणाऱ्या भिक्षेकर्यांचही असंच आहे…  रावा पासून रंकापर्यंत आणि रंकापासून रावापर्यंत येथे सर्वजण सापडतात…. 

आयुष्यभर या चींध्यांनी अपमानाचे चटके सहन केलेले असतात…. कदाचित म्हणूनच वाकळ जास्त उबदार असते….!

अशा या दिसायला बेढब …चित्र विचित्र….  मळखाऊ…. चींध्यांनी बनलेल्या, तरीही उबदार वाकळीचा फेब्रुवारी महिन्यातील “शिवणप्रवास” आपणास सविनय सादर !!! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

  1. या महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या तीन प्रौढ महिला भेटल्या. तिघींचीही मुलं मोठी आहेत. धुणं भांडी करून, कुणाचीही साथ नसताना; खस्ता खाऊन, मुलांना मोठं केलं, मुलांनी संसार मांडले. पुढे मुलांना आईचं ओझं झेपेना… मुलांनी तीनही आईंना घराच्या बाहेर काढले….

या आईंनी पोरांची हाता पाया पडून गयावया केली….

मुलं म्हणाली, ‘आई आजपर्यंत काय केलंस तू आमच्यासाठी… ?’  पण … या आईला ऐनवेळी काहीच आठवेना…

मुलं म्हणाली, ‘आजपर्यंत काय राखून ठेवलंस आई तू आमच्यासाठी… ? ‘.. यावर या आईला काहीच बोलवेना… 

मुलं म्हणाली, ‘तू आमच्या भविष्याची काय तजवीज करून ठेवलीस, म्हणून मी आता तुला सांभाळू ?  सांग ना … ? आताही या आईला काहीच सांगता येईना… 

आई नेहमीच स्वतःच्या दुःखाची “वजाबाकी” करून जन्माला घातलेल्या पोरांच्या सुखाची “बेरीज” करत जाते… 

स्वतःच्या ताटातल्या भाकरीचा “भागाकार” करून, पोराच्या ताटात चतकोर चतकोर भाकरीचा “गुणाकार” करत जाते…. 

उपाशी राहूनही आईच्या चेहऱ्यावर इतकं समाधान कसं ? याचं “गणित” पोराला शेवटपर्यंत सुटत नाही…! 

आणि इतकं सारं करूनही, आयुष्याच्या शेवटी आईच्या पदरात, “बाकी” म्हणुन एक भला मोठ्ठा “शून्य” येतो…

पोरांसाठी आयुष्यभर गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करून जगातली ती सगळ्यात मोठी गणितज्ञ होते…

‘ आई, मग हे तुझ्या आयुष्याचं गणित असं का ?’

असं एखाद्या आईला विचारलं, तर तेव्हा सुद्धा आईकडे उत्तर नसतंच… 

कारण…. कारण…. आईला कुठं हिशोब येतो…??? 

जमा खर्चाची नोंद तिनं कधी केलेलीच नसते…. 

कारण आईला कुठे हिशोब येतो ??? 

यातील दोन आईंना स्थिर हातगाडी घेऊन दिली आहे. विक्री योग्य साहित्य घेऊन दिले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. 

एका आईला वजन काटा घेऊन दिला आहे.  

पोरांना आईचा “भार” झेपला नाही म्हणून, स्वतःच्या म्हातारपणाचं “ओझं” स्वतःच्याच डोक्यावर घेऊन, या तिन्ही आई स्वतःचं “वजन” सावरत निघाल्या आहेत, आता पैलतीराच्या प्रवासाला…!!!

मी फक्त साक्षीदार….

  1. मराठीत”अंध पंगु न्याय” असा एक वाक्प्रचार आहे…

तो असा: अंध व्यक्तीने पंगू (अपंग /दिव्यांग) व्यक्तीला खांद्यावर घ्यावे…. अंध व्यक्ती चालत राहील आणि पंगू व्यक्ती, अंध व्यक्तीला खांद्यावर बसून दिशा दाखवत राहील… इथे एकमेकांना साथ देऊन दोघांचेही काम भागते…! 

याचाच उपयोग करून, अपंग महिला…. ज्यांना शिवणकाम येते; अशांना यापूर्वी आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिले आहे, त्यांना कापडी पिशव्या शिवण्यासाठी आपण कापड देत आहोत, यानंतर शिवलेल्या पिशव्या भीक मागणाऱ्या अंध व्यक्तींना विकायला देत आहोत… 

येणारा नफा दोघांमध्ये समसमान वाटत आहोत…

“अंध पंगु न्याय”… दुसरं काय… ? 

वैद्यकीय

  1.   रस्त्यावरच भिक्षेकर्‍यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना व्यवसाय करण्यासंबंधी सुचवत आहोत आणि त्यांना व्यवसाय सुद्धा टाकून देत आहोत.
  2. अनेक आज्यांच्या कानाच्या तपासण्या केल्या आणि ऐकायचे मशीन त्यांना मांडके हियरिंग सर्व्हिसेस पुणे येथून घेऊन दिले आहे.
  1. अनेक भिक्षेकर्‍यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करवून घेऊन डोळ्यांची ऑपरेशन्स केली तथा त्यांना चष्मे घेऊन दिले आहेत.

लहानपणी पोराला “नजर” लागू नये म्हणून “दृष्ट” काढणारी आई… 

तीच पोरं मोठी झाल्यावर आईला “दृष्टीआड” करतात… 

कालांतराने रस्त्यावर आलेली हि आई गुपचूप देवाघरी निघून जाते… 

तरीही पोरांचे “डोळे” उघडत नाहीत…! 

आई बाप जिवंत असताना त्यांना दोन घास जेऊ घालत नाहीत आणि मेल्यावर मात्र पिंडाला कावळा शिवावा म्हणून तासन् तास बसून राहतात… 

मला नेहमी असं वाटतं, माणसांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याआधी, “दृष्टिकोनाची” शस्त्रक्रिया करायला हवी…!!! 

अन्नपूर्णा

जगात सगळ्यात जवळचं कोण ??? 

कोणाचं काहीही उत्तर असेल…. 

माझ्या मते, प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची असते ती भूक…

जगातला सर्वात सुंदर सुवास कोणता….? 

भूक लागलेली असताना, भाकरी किंवा चपाती भाजतानाचा घमघमाट, हा जगातला सर्वात सुंदर सुवास आहे …

प्रत्येकाच्या आयुष्यातले भूक आणि भाकरी हेच दोन मुख्य गुरुजी ….

आपण झोपल्यावर सुद्धा जी जागी असते…. ती भुक….

न मरताही आयुष्यभर चितेवर जळायला लावते…. ती भुक…

आयुष्यात काहीही करायला लावते…. ती भुक…

घुंगरू न घालताही अक्षरशः नाचायला लावते…. ती भुक…. 

या भुकेसाठी, अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक दुर्बल कुटुंबांकडून आपण डबे विकत घेऊन त्यांना उपजीविकेचे साधन देत आहोत.

हे डबे घेऊन आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)

It’s our win-win situation

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

भाकरीचा सुगंध वाटण्याचे काम आम्हाला मिळालं…. निसर्गाचे आम्ही ऋणी आहोत….! 

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. 

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

मनातलं काही …. 

  1. माझ्या आयुष्याच्या चढउतारांवर आणि कामात आलेल्या अनुभवांवर एक पुस्तक छापलं आहे…. एकाच वर्षात या पुस्तकाच्या 3000 प्रती खपल्या. हे सुद्धा श्रेय समाजाचं….

या पुस्तकाच्या विक्रीतून भीक मागणाऱ्या ५२ मुलांचे आपण शिक्षण करत आहोत 

आता एप्रिल महिन्यामध्ये शिक्षणाचा हा अवाढव्य खर्च माझ्या अंगावर पडेल…. कोणाला जर माझं पुस्तक हवं असेल तर मला नक्की कळवावे …. पुस्तकाचे देणगी मूल्य पाचशे रुपये आहे…. ! 

हाच पैसा भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकरता वापरला जाईल. (आमचा एक मुलगा यावर्षी इन्स्पेक्टर होऊ इच्छितो, दुसरी मुलगी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करत आहे, तिसरा मुलगा कॉम्प्युटर्स सायन्स करत आहे आणि चौथी मुलगी कलेक्टर व्हायचे स्वप्न बघत आहे)

या सर्वांचे शिक्षण माझ्या पुस्तकावर अवलंबून आहे…

  1. येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त, या वर्षात ज्या महिलांनी भीक मागणे सोडले आहे, अशा ताईंना आपण भावाच्या भूमिकेतून साडीचोळी करणार आहोत….

ज्या मुलींनी भिक मागणे सोडून शिक्षणाची वाट धरली आहे , अशा माझ्या मुलींना, बापाच्या भूमिकेतून ड्रेस घेऊन देणार आहोत. 

इथे ड्रेस आणि साडी महत्त्वाची नाही …. 

आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून मिळणारा सन्मान महत्त्वाचा… 

जागतिक महिला दिनाच्या या, एकाच दिवशी, मी मुलगा होईन….बाप होईन आणि भाऊ सुद्धा… ! 

या परते अजून मोठे भाग्य कोणते…??? 

निसर्गाने मला पितृत्व आणि मातृत्व दोन्ही दिलं…! 

बघता बघता, दिवस न जाताही , “आई” झालो की राव मी….!!!! 

बस्स, जीने को और क्या चाहिये…. ??? 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्त्री – एक उत्तम व्यवस्थापिका” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

??

☆ “स्त्री : एक उत्तम व्यवस्थापिका…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

स्त्रीला आचार्य अत्रे यांनी इस्त्रीची उपमा दिली कारण ती नवऱ्याच्या विस्कटलेल्या जीवनाला इस्त्री करते.

स्त्री एकाच वेळी अनेक भूमिका सफाईदारपणे बजावू शकते. माता, पत्नी, सून, मुलगी, बहिण, भावजय, नणंद आणि सखी, कधी दूर्गा, कधी सरस्वती तर कधी लक्ष्मी.

तिला उपजतच व्यवस्थापन कला, मल्टी टास्कींग, टाईम मॅनेजमेंट जमते.

घरातल्या सर्वांच्या वेळा सांभाळणे,सर्वांना समजून घेणे,नोकर माणसांकडून कामे करवून घेणे, त्यांच्या गैरहजेरीत ती कामे स्वतः उरकणे,सकाळी दूध गरम करण्यापासून ते रात्री झोपताना ओटा आवरेपर्यंत तिची मॅनेजमेंट चालूच असते.

हेच तिचे उपजत कौशल्य ती जेव्हा उद्योजक बनते तेव्हा तिला उपयोगी पडते.

माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी काही टिपा देत आहे.

मनाचा कणखरपणा वाढविणे…

शांता शेळके म्हणतात,स्त्री, काळोखात हळूच डोळे पुसणारी. 

ती मनाने हळवी असल्यामुळे, सासूबाई रागे भरल्या, नवरा तिच्यावर क्षुल्लक कारणासाठी चिडला तरी तिचे डोळे झरू लागतात. पण अश्रू हे दुर्बलता दर्शवितात.

व्यवसायात रोजचाच दिवस एक आव्हान असते. कधी कुठले संकट समोर येईल हे सांगता येत नाही.

अगदी छोट्या गोष्टी, कधी फॅक्टरीत ब्रेकडाऊन, कधी डिलीव्हरी अर्जंट असते आणि नेमकी वीज जाते.

कधी टेम्पोचा संप असतो. कधी कुणी कामगार नेमका गैरहजर असतो. कधी कच्चा माल वेळेवर पोहचत नाही. कधी कस्टममधे माल अडकतो व डॅमेरेज चढत जाते. कधी ग्राहकांच्या तक्रारी, तर कधी सरकारची शुक्लकाष्ठे, …. मारुतीच्या शेपटासारखी ही यादी संपणारी नाही.

अशावेळी रडून चालत नाही. संकटाशी सामना करायला शिकले पाहिजे.

मी माझ्या एका मोठ्या ग्राहकाकडे पेमेंट मागण्यासाठी गेले होते. मोठी रक्कम होती म्हणून स्वतः गेले होते.

त्याने मला बराच वेळ बाहेर बसवून ठेवले. त्याची कंपनी लाॅसमधे होती म्हणून तो कुणाचेच पेमेंट करत नव्हता असे समजले. कारण माझ्यासारखेच बरेच जण बाहेर ताटकळत बसले होते.

मी त्याच्या केबिनमधे गेल्यावर तो वसकन् मला म्हणाला, “ मी तुमचे पेमेंट देणार नाही, गेट आऊट प्लीज.”  

मी बाहेर आले. पण माझे इतके पैसे बुडतात समजल्यावर,आणि माझा इतका अपमान त्याने केल्यावर मला रडू आले. लिफ्टमधून खाली उतरेपर्यंत, गाडीत बसेपर्यंत माझे डोळे झरत होते.

माझा सेल्स मॅनेजर म्हणाला, “ मॅडम तुमच्यासारख्या देवीचा त्याने अपमान केला.”

तीन दिवसांनी त्याचा पेपरमधे फोटो आला. त्याने केलेल्या स्कॅममुळे त्याला अटक झाली होती.

तेव्हापासून ठरवले ,आपण रडायचे नाही. आपले अश्रू इतके स्वस्त नाहीत.

संवाद साधण्याची कला 

स्त्री ही मूळातच मृदू भाषिणी असते.याचा उपयोग तिने मार्केटिंग मधे करावा. आपली विकायची वस्तू  ग्राहकाला आवडली पाहिजे. त्याची किंमत त्याला पटली पाहिजे.आणि ती वस्तू त्याने आपल्याकडूनच विकत घ्यावी असे त्याला वाटले पाहिजे यासाठी ग्राहकांबरोबर सुसंवाद साधण्याचे कौशल्य तिने वाढवावे.

तसेच आपल्या हाताखालच्या माणसांना सूचना देताना, दूरच्या साईटवर असणाऱ्यांना सुद्धा सूचना देताना त्या त्यांना नीट समजतील, संदिग्धता राहणार नाही याची काळजी घ्यावी.आपल्याला नेमके काय पाहिजे हे कम्यूनिकेट करता येणे फार महत्वाचे असते.

व्यवसायात आपल्याला कच्चा माल पुरवणारे सप्लायर्स, फायनान्स करणारी बॅन्क, ग्राहक,कामगार,पदोपदी वेगवेगळ्या पातळीवरच्या माणसांशी संबंध येणार. यांच्याशी परस्पर सुसंवाद साधता आला तर बरीच कामे सोपी होतात.

सुसंवाद म्हणजे नेमके काय?

समोरच्या व्यक्तीला न दुखावता,त्याच्या इगोला ठेच न पोहचवता, त्याची बाजू नीट ऐकून घेऊन,त्याला सन्मान देऊन बोलता येणे. तसेच पत्रव्यवहार करताना पत्रातील भाषा फार सांभाळून लिहीली पाहिजे. बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी चालतो परंतु लिहिताना नेटके व मोजकेच लिहावे.

मलाही या गोष्टी शिकाव्या लागल्या.

आज व्यवसाय सुरू करून ४५वर्षे झाली. माझे जुने व नवे ग्राहक, आमचे संबंध सलोख्याचे आहेत.

जुने कामगार रिटायर व्हायला मागत नाहीत. 

कायद्याचे ज्ञान…

उद्योजकाला प्रत्येक कायदा माहीत असतो असे नाही. परंतु माहिती जरूर करून घ्यावी.

उदा. दरवर्षी डिसेंबर महीन्यात फॅक्टरी लायसन्स रिन्यू करायचे असते. पहिल्या वर्षी मी विसरले.

जानेवारी महिन्यात रिन्यू करायला गेले तर ७०००रूपये दंड भरावा लागला.

मी अमेरिकेतून जाॅगिंग मशीन मागवली होती. कंपनीने मला मशीनसोबत एक बेल्ट फुकट पाठविला होता.म्हणून बिलात बेल्टची किंमत शून्य लिहिली होती. मी जेव्हा ड्यूटी भरायला गेले तेव्हा माझ्यावर अंडर इन्वाॅइसचा गुन्हा ठोकला. केवळ अज्ञानामुळे आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. छोट्या चुका सुद्धा महाग पडतात.

म्हणून कुठलीही गोष्ट करताना हे पडताळून पहावे

‘Is it legally right?’

स्वतःची उन्नती….

व्यवसायात प्रगती साधायची असेल तर प्रथम स्वतःला उन्नत करणे जरूरी आहे.

आपली कार्यक्षमता वाढवायची, आपली पोटेन्शियलस वाढवायची. स्वतःला अपग्रेड करत रहायचे.

वाचन, प्रवास व विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधायचा. स्वतःच्या चुका सुधारायच्या. 

चांगल्या गोष्टींचे अनुकरण, इतर व्यक्तींचे चांगले गुण टिपायचे.

मी माझ्या वडीलांचे निरीक्षण करून बऱ्याच गोष्टी शिकले. त्यांची फोनवर बोलायची पद्धत,डिक्टेशन द्यायची पद्धत, फायलिंग कसे करायचे, बिझिनेस पत्रे कशी लिहायची, दिलेली वेळ कशी पाळायची, नोट्स कशा लिहायच्या — अशा खूप गोष्टी…. ते माझे आदर्श होते.

ते म्हणायचे कुठलाही निर्णय घेताना आधी स्वतःच्या मनाशी संवाद साधायचा. स्वतःला अपराधीपणाची भावना असेल, स्वतःच्या नजरेतून आपण उतरणार असू तर तो निर्णय  कितीही  फायद्याचा असला तरी तो चुकीचाच.

शेवटी निर्मितीचा आनंद हाच खरा नफा…

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कविता आणि मी…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “कविता आणि मी…” ☆ सौ राधिका भांडारकर 

कळत नकळत आपल्या जीवनाची जडणघडण होत असताना कुणाकुणाच्या आपल्या आयुष्यातील जागा  ठळकपणे ठरत जातात. आपले कुटुंबीय, आपले गुरुजन, आपले सखे सोबती,अफाट निसर्ग, इतकेच नव्हे तर आपले प्रतिस्पर्धी, विरोधक यांना सुद्धा आपल्या जीवनात कोणते ना कोणते स्थान असतेच.

माझेही जीवन  यापेक्षा वेगळे नाही. पण जेव्हा जेव्हा मी सखोलपणे माझ्या वर्तमान आणि गतायुष्याचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की  मला आयुष्यात खूप काही मिळालं ते भाषिक साहित्यातून. कथा, कादंबऱ्या, कविता,चरित्रं, ललित साहित्याचा हात धरूनच मी वाढले आणि गद्य आयुष्य जगत असताना पद्यांनी माझ्या भोवती सदैव एक हिरवळ जपून ठेवली.

या माझ्या जीवनात कवितांचे स्थान काय याचा विचार करत असताना मनात आलं ही कविता तर माझ्यासोबत जन्मानंतरच नव्हे तर जन्मापूर्वीही होतीच की! मातेच्या उदरात वाढत असताना

। ये ग ये ग विठाबाई।

। दहीभाताची उंडी घालीन तुझ्या तोंडी।

 ।कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।

हले हा नंदाघरी पाळणा।। 

किंवा 

कन्हैया बजाव बजाव मुरली।  

…. अशी अनेक गाणी माझ्या आईने तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भाला गोंजारून म्हटलीच असणार आणि ते नाद ते शब्द माझ्यात, गर्भात असतानाच झिरपले नाही का?

त्याच माझ्या मातेने मांडीवर थोपटत “निज निज रे लडिवाळा” किंवा “ये ग गाई गोठ्यामध्ये बाळाला दूध दे वाटीमध्ये”  “आडगूळ मडगुळ सोन्याचं कडगुळं” अशी कितीतरी बडबड गीतं गाऊन मला जोजवलं, वाढवलं.

“ उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही”

असेच म्हणत मला झोपेतून जागं केलं. त्यावेळच्या या बाल कवितेने जीवनातला केवढा तरी मोठा आशय नंतर दाखवलाही.

जेवू घालताना तिने

“ चांदोमामा चांदोमामा भागलास का?” म्हणत माझ्या मुखी अमृततुल्य वरण भाताचे घास भरवले.

कधी रडले, कधी रुसले तर,

“ रुसु बाई रुसु कोपऱ्यात बसू तिकडून आला बाई कोणीतरी खुदकन हसू” शिवाय “लहान माझी बाहुली मोठी तिची सावली”

“ पाऊस आला मोठ्ठा पैसा झाला खोटा”

“ ये ग ये ग सरी माझे मडके भरी” अशा अनेक गीतांनी माझं बालपण बहरलं. मला सदैव हसवलं, आनंदी ठेवलं आणि संस्कारितही केलं.

केव्हातरी रात्र उलटून गेली…  बालपण सरलं  पण कवितांनी कधीच सोबत सोडली नाही. त्यावेळी अंकुरलेल्या   कोवळ्या प्रीतीच्या भावना जाणवणारे उद्गार मीही कागदावर  उतरवले असतील.त्या कविता मात्र फक्त माझ्या आणि माझ्या अंतर्मनात घुमणारी स्पंदने होती.

त्यावेळी 

“जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते” या काव्य शब्दांनी माझ्याही मनातली अव्यक्त, अनामिक हुरहुर जाणवून दिली होती.

आयुष्याचे कितीतरी टप्पे ओलांडले. तळपत्या उन्हात रस्त्यावरचे वृक्ष जसे सावली देतात ना तशी शितल छाया मला केशवसुत, पाडगावकर, विंदा, बोरकर, ग्रेस, वसंत बापट, शांताबाई, बहिणाबाई, इंदिरा संत आणि कितीतरी…. यांच्या कवितांनी दिली.

 विमनस्कपणे स्वपदे उचलीत

 रस्त्यातुन मी होतो हिंडत 

एका खिडकीतून सूर तदा पडले 

दिड दा दिड दा दिड दा…

केशवसुतांच्या या सतारीच्या बोलांनी तर कित्येक वेळा माझ्या आयुष्यात दाटलेला काळोख दूर केलेला आहे.

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा..”

या काव्यांने तर जादूच केली म्हणा ना! सकारात्मक जीवन जगण्यासाठी जणूं काही मजबूत दरवाजे उघडून दिले..

 झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे

 लाटांवर

 पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालिचे 

हरित तृणांच्या मखमलीचे 

त्या सुंदर मखमाली वरती 

फुलराणी खेळत होती…

बालकवींच्या या कवितांनी तर निसर्गाशी मैत्रीच घडवली. वृक्षवेलींशी संवाद साधला.

 “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते”

या बहिणाबाईंच्या रसाळ काव्यपंक्तींतून तर जीवनातल्या तत्त्वज्ञानाचे कोडे अगदी सहजपणे सोडवले. काळ्या मातीशी नातं जोडलं.

कवी ग्रेस संपूर्णपणे नाही उमगले. पण

 “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

 मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवत होता…”

 या ओळींनी मन अक्षरशः घनव्याकुळ झाले.

 हा रस्ता अटळ आहे 

अन्नाशिवाय कपड्याशिवाय 

ज्ञानाशिवाय मानाशिवाय

 कुडकुडणारे हे जीव 

पाहू नको, डोळे शिव!

 नको पाहू जिणे भकास

 ऐन रात्री होतील भास 

छातीमध्ये अडेल श्वास

 विसर यांना, दाब कढ

 माझ्या मना बन दगड…

 विंदांनी तर खिळे ठोकावे तसे शब्द आणि विचार मनावर अक्षरशः ठोकले. आणि दमदारपणे जगण्याची कणखर प्रेरणा दिली.

 “माझी मैना गावाकडे राहिली

 माझ्या जीवाची होतीया काहिली” शाहीर अण्णाभाऊंच्या या कवितांनी तर अनेक वेदनांना उघडं केलं.

 “होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा

 देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे …

गुरु ठाकूर यांचे हे गीत खरोखरच मनातले अंधारलेले कप्पे क्षणात उजळून टाकतात. आधार देतात.

अशा कितीतरी कविता …

आयुष्यात उचललेल्या प्रत्येक पावला सोबत येत गेल्या. कविता माझ्या जीवनात सदैव सावली सारख्या सोबत असतात. 

“तेरी आवाज मे कोई ना आये

 तो फिर चल अकेला रे, 

यदि सभी मुख मोड रहे सब डरा करे 

 तब डरे बिना ओ तू मुक्तकंठ

 अपनी बात बोल अकेला रे

 तेरे आवाज पे कोई ना आये तो फिर चल अकेला रे 

रवींद्रनाथ टागोरांच्या या कवितेने जीवन वाटेवरचे काटे अगदी सहजपणे वेचायला शिकवले, नव्हे त्या काट्यांनाच बोथट केले.

कवितांचे आपल्या जीवनात  स्थान काय याविषयी काही भाष्य करताना मी वर्ड्सवर्थच्याच  शब्दात म्हणेन

FOR OFT WHEN ON MY COUCH I LIE

IN VACCANT OR IN PENSIVE MOOD 

THEY FLASH UPON THAT INWARD EYE

WHICH IS THE BLISS OF MY SOLITUDE

AND THEN MY HEART WITH PLEASURE FILLS

AND DANCES WITH THE DAFFODILS….

जेव्हां मी एकटी असते, उदास लेटलेली असते तेव्हां खरोखरच —रेताड, रुक्ष  वाळवंटात ठिकठिकाणी उगवलेली सोनेरी डॅफोडील ची फुले जशी मनाला प्रसन्न करतात तसं कवितांनी माझं मन टवटवीत ठेवलं.

 अंगणात प्राजक्ताचा सडा बरसावा  तसे कवितांनी माझ्या आयुष्यात आनंदाचे शिंपण केले.

 कवितांच्या अथांग सागराने माझी जीवन नौका  डुबु  दिली नाही. तिला पैल तीरावर सांभाळून नेले.

 जोडीदाराच्या हातात हात घालून पैल तीर गाठतानाही सुहास पंडितांच्या या काव्यपंक्तीच मनावर रेंगाळतात.

धकाधकीच्या जीवनातले 

क्षण शांतीचे वेचून घेऊ 

तुडुंब भरले कुंभ सुखाचे

 हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता

 जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता

 गाठू विश्रांतीचा पार जुना….

मातीतून मातीकडे जाताना, मातीत पेरलेल्या या  महान कवींच्या कवितांनी आयुष्यभर दीपस्तंभ सारखी सोबत केली. बेडा पार किया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ लाखमोलाची पुडी ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ लाखमोलाची पुडी… ☆ श्री सुनील शिरवाडकर

माझा एक मित्र आहे. अवि नावाचा.आयुर्वेदाचा डॉक्टर आहे तो.आता डॉक्टरच म्हटल्यावर काही ना काही कारणाने त्याच्याकडे जाणे होतेच.

त्याच्याकडे गेले की नेहमीचे दृश्य. पितळी खलबत्त्यात तो औषधे कुटत असतो.बाजुच्या टेबलवर कागदाचे चौकोनी तुकडे मांडून ठेवलेले असतात.साधारण पंचवीस तीस तुकडे.तीन बाय तीन इंचाचे.औषध कुटुन झाल्यावर तो त्या प्रत्येक कागदावर ती पुड टाकत जातो. अगदीच समप्रमाणात. बरोबर शेवटच्या कागदापर्यंत पुरतं ते औषध. समोरच एक लाकडी मांडणी. त्यात छोट्या छोट्या डब्या. औषधांच्याच. एखादी डबी घ्यायची. त्यातील एक एक गोळी प्रत्येक कागदावर ठेवायची. मधुनच पेशंट अजुन काही तरी एखादी तब्येतीची तक्रार सांगतो.

“ठिकेय..देतो औषध त्याच्यातच टाकून”

मग अजुन एखाद्या डबी उघडतो.बारीक चमचाच्या टोकाने कुठली तरी पुड त्या कागदांवर टाकतो.काळी पुड..तपकिरी पुड..लाल गोळी.. पांढरी गोळी.. प्रत्येक कागदावर आहे ना हे बघतो.सगळी औषध योजना मनासारखी झाली याची खात्री पटली की एक एक पुडी बांधायला घेतो.

अगदी कुशलतेने तीन चार घड्या घातल्या की इंचभर लांबीची अगदी घट्ट पुडी तयार होते. एवढ्या पुड्या बांधायला वेळ लागतोच.एकदा मी त्याच्या मदतीला धावलो.माझा व्यवसाय सोनाराचा.सोन्याच्या दागिन्यांच्या पुड्या बांधायची सवय असतेच.तसं अवीला..म्हणजे डॉक्टरांना सांगितलं.

तो म्हणाला..

“अरे बाबा..तुमच्या पुड्या म्हणजे लाखमोलाच्या पुड्या..”

छोटी असते ती पुडी.. मोठा असतो तो पुडा. पण ते बांधणे म्हणजे कौशल्याचेच काम.किराणा दुकानात आता सगळं वाणसामान पैक केलेलं असतं,पण पुर्वी गिर्हाईकाच्या ऑर्डर नुसार बांधुन द्यायचे.राजाभाऊ जोशींचं किराणा दुकान होतं आमच्या गल्लीत. काही आणायला गेलं की ते ,पेपर घेऊन त्याच्या बाजुची पट्टी टर्रकन फाडायचे.ती त्या पेपरवर ठेऊन काट्यामध्ये ठेवायचे.मग रवा,साखर काय असेल ते काट्यामध्ये टाकुन वजन झाले की तो कागद अगदी कुशलतेने उचलुन दोन्ही हात उंचावून त्याच्या घट्ट पुडा बांधायचे.त्यावर एकावर एक दोर्याचे फेरे लपेटायचे..दोर्याचा बंडल दिसायचा नाही.प्रश्न पडायचा की हा दोरा येतोय कुठुन.पण असा छान आणि घट्ट पुडा बांधायचे ना ते..कुठुन कागदाच्या फटीतून रवा साखर बाहेर येण्याची शक्यताच नाही.

कधी चिवडा आणायला जावे.त्याचाही पुडा असाच बांधायचे.फक्त दोऱ्याचे चार पाच वेढे झाले की लाल रंगाचा चतकोर कागदी तुकडा त्यावर ठेवायचे.’कोंडाजी यांचा उत्तम चिवडा’..फेटा घातलेल्या कोंडाजी पहिलवानाचा फोटो.. त्या कागदावरुन पुन्हा दोरा गुंडाळायचे.नाशिक चिवड्याचा हा पुडा अखिल भारतात तेव्हापासून प्रसिद्ध होता.

कितीतरी पुडे आठवतात.कधी संध्याकाळी येताना गजरा आणावा. वेडावून टाकणारा मोगऱ्याचा गंध.हिरव्या मोठ्या पानात ठेऊन त्याची हलक्या हाताने बांधलेली पुडी. आतल्या नाजुक कळ्या कोमेजून जाऊ नाही म्हणून. हळुवारपणे तो खिशात ठेऊन आणायचो.

गुरुवारी एकमुखी दत्ताच्या दर्शनाचा नेम.जाताना रामसेतुजवळच्या पांडे मिठाई कडून पळसाच्या पानात बांधलेले चार पेढे. दत्तापुढे उघडून ठेवलेली ती पुडी. छोटासा गाभारा..धुपाच्या सुगंधाने भरलेला.. आणि भारलेला.सगळी मुर्ती फुलांना झाकुन गेलेली. त्यातून दिसणारा दत्ताचा तो तेजस्वी चेहरा.पाठीमागून येणारा ‘दिगंबरा..दिगंबरा..’ चा गजर..

दोरा न वापरता पुडी बांधणे ही एक कलाच आहे. आमचा व्यवसाय सोनारकामाचा. पुर्वी धर्मकाट्यावर वजन करण्यासाठी जावे लागायचे. म्हटलं तर खुप अवघड काम. तिथे गर्दीत उभं रहायचं..आपला नंबर आला की हळुच पुडी उघडायची..त्यातले सोन्याचे मणी तिथल्या लहान वाटीत टाकायचे..वजन झालं की पुन्हा त्याची पुडी बांधायची.हे सगळं गर्दीत.. उभ्यानेच. एखादा मणी सुध्दा खाली पडता कामा नये.

पण एक गोष्ट नक्की. सोन्याच्या दागिन्यांची पुडी बांधावी तर आमच्या दादांनीच..म्हणजे वडिलांनी.

पेपरचा साधासाच चौकोनी कागद.. त्यावर त्याच आकाराचा गुलाबी कागद. या गुलाबी कागदाची रंगछटा खुपच आगळी. त्यावर सोन्याचा दागिना जेवढा खुलुन दिसतो ना..तेवढा कशावरच नाही. तर त्या गुलाबी कागदावर ठेवलेलं ते गंठण.सोन्याच्या तारेत गुंफलेलं..खाली ठसठशीत मंगळसूत्राच्या दोन वाट्या.अतिशय सुबकपणे एक उजवी घडी..एक डावी घडी घालत दादा त्याची पुडी बांधत. त्यातही एक नजाकत होती.आजकालच्या शेकडो रुपयांच्या ज्वेलरी बॉक्सला मागे सारणारी ती मंगळसूत्राची पुडी.. अवी म्हणतो तश्शीच…. अगदी ‘लाखमोलाची पुडी’

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘धर्म…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘धर्म…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

धर्म म्हणजे काय ?

तर माझ्या मते धर्म म्हणजे एक आदर्श जीवन पद्धती आहे.

नियम आणि चौकटी धर्माने आखून दिलेल्या आहेत.

त्यांचे योग्य तऱ्हेने पालन करून जीवन जगावे .असे जीवन आनंददायी आहे .

 

अगदी सकाळी ऊठल्यानंतर  अंथरुणावरून खाली उतरण्याच्या आधीच गादीवर बसून  …

प्रार्थना केली जाते…

“कराग्रे वसते लक्ष्मी 

करमुले सरस्वती

करमध्ये तु गोविंदा

प्रभाते कर दर्शनम्

समुद्र वसने देवी

पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यमं 

पादस्पर्श क्षमस्व मे…”

हे पृथ्वी माते माझ्या पायांचा तुला स्पर्श होणार म्हणून क्षमा याचना करून दिवसाची सुरुवात करायची.

 

हे म्हणताना शब्दातून आपोआप लीनता येते. आपली कृतज्ञता दाखवली जाते.

हात जोडले जातात..

नंतर नित्यकर्म सुरू….

आंघोळ करून देव पूजा …

तेव्हा मग स्तोत्र – मंत्र आरती……..

 

मात्र हे नुसतं म्हणायचे नसतात ..

त्यात शिकवण असते …मनाची समजूत असते… 

तसे देवाचे प्रेम आणि माया पण असते .

त्याचा अर्थ आणि मुख्य म्हणजे भावार्थ समजून घेऊन ती म्हणायची असतात.

 

संकटात दुःखात मनाला त्यांचा फार मोठा आधार असतो.

फुलांनी सजलेल देवघर,मंद तेवणारी समई,उजळलेली निरांजन बघताना मनात  सदभावना दाटून येते.

 

सकाळ अशी सात्विकतेने सुरू झाली की दिवस आपोआप निरामय आनंदात जातो.

हे नुसतं म्हणणं नाही तर याचे पाठांतर पण हवे ….

यासाठी अभ्यास हवा..

त्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा …

 

आणि मग ते स्तोत्र – मंत्र शांतपणे डोळे मिटून एकांतात म्हटले की मिळणारा आनंद हा शब्दात सांगता येत नाही .

त्याचा अनुभव घ्यायला हवा.

 

जेवताना…

“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे….”.म्हणावे..

मग ते साधे जेवण होत नाही तो  यज्ञ कर्म  होतो हे …  मार्मिकपणे सांगून ठेवले आहे .

याला आयुर्वेदाचा आधार आहे….

“सीताकांत स्मरण जय जय राम…”

 म्हटल्यानंतर त्या अन्नाकडे बघायची आपली दृष्टी बदलते .

अन्न उत्तम रीतीने पचते .घरच्या गृहिणीने कष्ट घेऊन ते बनवलेले असते. त्याचा आपोआप मान राखला जातो .पवित्रता जपली जाते .

 

म्हणूनच त्याला पूर्णब्रह्म म्हटलेले आहे …..

 

हे रोज म्हणायला जमणार नाही पण सणावारी …रविवारी म्हणून तर बघा आपला आपल्यालाच आनंद वाटतो.

 

शाळेत आजही सरस्वती मातेला प्रथम वंदन केले जाते .

“या कुंदेंदु तुषारहार धवला

या शुभ्र वस्त्रावृता…”

असे म्हणून सरस्वतीची प्रार्थना केली जाते .तिच्याकडे आमची जडता (अज्ञान) दूर कर अशी विनवणी करायची. मात्र त्यासाठी प्रयत्न आपण करायचे आहेत.  आपल्याला अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवायचे आहे.

 

मनाचे श्लोक ,अथर्वशीर्ष ,पसायदान हे शाळेत म्हणून घेतले जाते.पाठ करून घेतले जाते.

 कदाचित त्या वयात अर्थ लक्षात येत नाही .पण मोठे झाल्यानंतर तो आपोआप बरोबर कळतो… समजतो..

हेच ते संस्कार….

हुरहुर  लावणारी संध्याकाळ… दिवेलावणीची वेळ  झालेली असते… तेव्हा देवासमोरचा दिवा लावला जातो … तेवढ्या मंद प्रकाशाचाही आधार वाटतो…क्षणभर हात जोडले जातात.

“शुभंकरोती कल्याणम्…” म्हणायचं ..आरोग्यम् धनसंपदा हे किती वर्षांपूर्वीच आपल्याला सांगून ठेवलं आहे .सवयीने आपण ते म्हणतो पण ते कृतीतही यायला हवं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

निरामय आरोग्यासाठी आपला आहार विहार योग्य असायला हवा. जाताजाता केवढी शिकवण दिलेली आहे. आपण सहजपणे नेहमी  म्हणतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही…

 

रात्री झोपायच्या वेळी शरण आलेल्या लोकांचे क्लेश दु:ख दूर करणाऱ्या गोविंदाला नमस्कार करायचा .

“कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः”

 

असा संपूर्ण दिवस प्रार्थनेने संस्काराने आपोआप बांधला गेला आहे.

त्याचे एक संरक्षित आवरण आपल्या भोवती असते. त्यात आपल्याला सुरक्षित वाटते.

एक अदृश्य शक्ती आहे ती मला सांभाळते आहे… हा मनात विश्वास असतो .

संकट येत नाही तोपर्यंत काही वाटत नाही .मात्र ते आले की आपण आपोआपच परमेश्वराला शरण जातो. मस्तक टेकवले जाते. हात जोडले जातात.. त्या क्षणी त्या एकाचाच आधार आहे  हे आपल्या अंतरंगातून आपल्याला जाणवते.

.. आणि मग त्याची प्रार्थना अजूनच आर्ततेनी  केली जाते. 

मनापासून जेव्हा आपण शरण जातो तेव्हा ती प्रार्थना सफल होते..

 

 आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात इतकं सगळं म्हटलं जात नाही.

 हेही तितकच अगदी खरं आहे .

नाही म्हटलं गेलं तरी चालेल …

पण दिवसातून एकदा अगदी मनापासून त्याला हाक दिली त्याची आळवणी केली तरी ती त्याच्या पर्यंत पोहोचते….

 किती वेळा काय काय म्हणतो… हेही महत्त्वाचे नाही .

आतूनच जाणीव होऊन खरं खरं  त्याच्याशी बोलायचे…

 त्याला सांगायचे….

अभ्यास वाढला की सांगणे पण कमी होते…

तो सर्वज्ञच आहे….

याची जाणीव होते..

 

इतके सारे ज्ञान भांडार आपल्या हाताशी आहे. पूर्वजांनी हा ठेवा  देऊन ठेवलेला आहे.

 

 शब्दांचा फार मोठा आधार असतो. त्या जगनियंत्त्याला शरण जाऊ…

आपली विनवणी त्याच्यापर्यंत पोहोचेलच….. तो विश्वास मात्र मनात हवा.

तो असला की पुढचे सगळे सोपे होते.

“सर्वेपि सुखिनः:सन्तु सर्वे संन्तु निरामया:

सर्वे भद्राणी  पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात…”

.. .. रात्री झोपताना सर्वांचे कल्याण व्हावे कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना करायची.

आपल्याही नकळत आपला दिवस असा जातो…..

 

हाच तो धर्म…… प्रत्येकाचा आपला आपला धर्म असतो.आणि तो त्याप्रमाणे वागत असतो.

सर्व धर्मात हीच शिकवण असते .. शब्द फक्त बदलतात…..

 

यासाठी  दिवसाच्या चोवीस  तासांतील फक्त काही मिनिट आपल्याला  द्यावी लागतील.

 प्रत्येकाला सुखी शांत आणि आनंदी जीवनाची आस असते, तसंच प्रत्येकाचा ही एक स्वतःचा असा

” धर्म.”…….असतो.

मला काय म्हणायचे आहे तुम्हाला समजले असेलच…. 

त्याप्रमाणे आचरण करून निश्चिंत  जीवन जगूयात. 

शुभं भवतु…..

श्री कृष्णार्पणमस्तु…. 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ll अथांगाचे गमभन…ll ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

ll अथांगाचे गमभन…ll ☆ श्री मनोज मेहता 

मला पक्कं आठवतंय मी ५वीत होतो आणि आमच्या बंगल्यात भावाने हौसेने गुलाबाची रोपे आणून कुंडीत लावली होती, कुंड्या  मी माझा मोठा भाऊ क्रांती व सख्खा शेजारी जिवलग मित्र पूनम दुर्वे त्यावेळेस धारावी कुंभारवाड्यातून येथून टेक्सिने दादर तिथून लोकलने आणल्याचे स्मरणात आहे, सुमारे ५०/६० कुंड्यात वेगवेगळी गुलाबाची रोपे लावली होती त्याला रोज पाणी घालणे, खत घालणे, पाने खुरडणे, कीड असल्यास ती टूथब्रशच्या साहाय्याने घासून काढून रोगोर नावाचे औषध फवारायचे,  ह्यात मी बघून बघून तरबेज होत नंतर मी हेच काम करायला लागलो अन डोळ्यावर फांदी कापायची. या सगळ्याची फळे मिळण्यास सुमारे ६ महिने गेले की, मग काय एकेदिवशी सकाळी बघतो तर आख्खी गच्ची गुलाबाच्या फुलांनी डवरून गेलेली, 🤗झपकन वाटावे आपण काश्मिरात तर नाही ना ! इतका आनंद आमच्या घरातील प्रत्येकाला झाला होता. बरं तोडायची नाहीत पाकळ्या गळून गेल्या की व्यवस्थित पाहून तो भाग कापायचा. ते पाहायला डोंबिवलीकर सेलिब्रेटी यायचे. असं एक महिना सुरू राहीलं की. आणि एके दिवशी चक्क लहानशा मुलीने भल्या पहाटे डेरिंग करून ती गच्चीतील फुले हातात येतील तेव्हडी तोडली व पळाली ना शेजारच्या प्रतिभा दुर्वे काकीने सांगितले म्हणून कळले तरी.

मग मी दोन दिवसांनी घरातील कोणालाही न सांगता पहाटे उठून ती फुले व्यवस्थित कापून पिशवीत भरली आणि सकाळी बरोब्बर ७ वाजता डोंबिवली पूर्वेला रेल्वे तिकीट घराजवळ उभा राहून ती अंदाजे दोनशे गुलाबाची फुल दोन तासात विकून अभिमानाने घरी आलो.

अर्थातच समाचार झालाच कुठे गेला होतास वगैरे वगैरे…  माझे ऐकल्यावर मोठ्या भावाचा तिळपापड झाला खूप आरडाओरडा तुला अक्कल नाही दीडशहाणा आहेस ढुंगण घुवायची अक्कल नाही असो…..

त्यादिवशीच संध्याकाळी वडिलांपर्यंत बातमी आली आणि पुन्हा घरातच न्यायालय ना. त्यातून माझे वडील म्हणजे कै. कैलासचंद्र मेहता नामवंत कामगार कायदा तज्ज्ञ.

खरं म्हणजे त्यावेळेस परमपूज्य पिताश्रींसमोर बोलायचे म्हणजे चड्डीतच सुसू व्हायची ना! पण धीर एकवटून मी का ही फुलं विकली हे सांगावे लागले आणि काय सांगू तुम्हाला न्यायालयाचा निकाल चक्क माझ्या बाजूने लागला. वडिलांनी सांगितले त्याने कोणताही गुन्हा केला नाही उलट स्वावलंबाने व धाडसाने ही फुल विकली एरव्ही रोज फुकट जाण्यापेक्षा ती कोणाला कामाला आली मनोजच्या या कामाला माझ्याकडून पूर्ण परवानगी आहे. अशा प्रकारे मी गुलाबाची फुलं अभिमानाने विकू लागलो अगदी २५ पैसे, ५०पैसे, ते चक्क १ रूपायालाही विकायचो. ही गोष्ट १९७० ची हं. म्हणजे माझ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली म्हणा ना. इतक्या लहानवयात लोकांशी आणि मुख्य म्हणजे बायकांशी कसे बोलावे याची रीतसर शिक्षणाची गुरुकिल्ली या मुक्तविद्यापीठातून शिकायला मिळाली. कोणतीही लज्जा न बाळगता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काम करू द्यावे / करावे या मताशी आजही मी पक्का ठाम आहे. माझ्या दोन्ही मुली आज त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवतात हे पाहून मन नक्कीच प्रफुल्लीत होते.

जसा गुलाबाचा मौसम तसे माझे मुक्त दुकान जोरात असायचे, नंतर माझ्या भावाला कळून चुकले की त्याने जे त्यावेळेस ५ हजार रुपये या गुलाबाच्या वेडापायी घातले होते ते मी मिळवून तर दिलेच पुन्हा व्याजही मिळू लागले. जितके मिळत होते ते सर्व सुपूर्द करून पुन्हा शाळा – अभ्यास – खेळ यात रमून जायचो. पण मला मात्र पैशाचा व्यवहार कधीच कळला नाही त्यामुळेच कदाचित मी आजही खूप सुखी आहे. थोडक्यात काय कोणतीही लाज न बाळगता आपल्या आवडीचे काम करा ते छोटे मोठे मी कसं करू लोकं काय म्हणतील याचा कधीही विचार करू नका. आपल्या मुलांना त्यांची आवड ओळखून मोकळीक द्यावी हे नक्की. आपल्या इच्छा मुलांवर लादू नये हे कळकळीचे सांगणे. मला कडक शिस्तीचे व माझ्यावर प्रेम करत नकळत संस्कार करणाऱ्या माझ्या वडिलांना भावाला माझा विनम्र प्रणाम व नमस्कार.💓🙏💓

(ही कथा आवडल्यास लेखकाच्या नावासह आणि कथेत कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.)

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘बाई…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘बाई…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

घरातल्या प्रत्येकाला 

प्यायला पाणी लागतं 

बाई भरते पाणी

घागर डोक्यावर काखेत कळशी

 

चालत जाऊन नदीतून 

विहिरीतून रहाटानी ओढुन  

हापसा असेल तर हापसते पाणी…. खड्यांत नळ असला की पाणी जोरात येते…

बाई पाणी भरते खड्यांत उतरून..

 

” अरेच्चा…

तुम्हाला  हे माहित नाही ?”

खरंच अजूनही असं पाणी भरणाऱ्या बाया आहेत

 

नळ घरात असेल तर 

बाई पिंप, माठ भरून ठेवते

 तेवढ्यात आवाज येतो..

” तुझं काय ते पाणी भरून झालं असेल तर चहा टाक” 

 

तुझं पाणी…..

 

ती विचारात पडली 

विचार केल्यावर लक्षात आलं

हो… हो.. माझंच पाणी 

खरंच की.. मीच  तर भरत आले 

…. खूप वर्षे झाली आहेत.. ती पाणी भरते आहे

 

आता तर घरात अॅक्वागार्ड आहे.. चोवीस तास पाणी..

दोन बटणं दाबायची.. की पाणी सुरू होतं 

तरी ते काम तिचचं… ती  ते करते…

घागरीतून पाणी भरणारी ती अशिक्षित, अडाणी होती

अॅक्वागार्ड मधुन पाणी भरणारी ती डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका, प्रोफेसर आहे.

.. पण पाणी भरते तीच

 

 घरातल्यांची तहानभूक भागवायची जबाबदारी तिची आहे 

ती आनंदाने पार पाडते.. न कंटाळता… न रागवता

 

म्हणूनच सुखी माणसाचा सदरा हुडकला जातो..

पण सुखी बाईची साडी कोणी हुडकत नाही..

 

 मला तर वाटतं जगातली प्रत्येक बाई ते वस्त्र तिच्यात अंगभूत घेऊनच आलेली आहे…

 ते तिला उतरवता येतच नाही…

आहे त्या संसारात सुख शोधून बाई आनंदात राहते..

काय म्हणता? “आपलीच गोष्ट आहे ना?…. “

“हो हो… आपलीच”

मग…

” अशाच आनंदात रहा ग.. बायांनो “

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर 

अपघातामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.प्रचंड बोर झालेलो पण नाईलाज.मित्राचा फोन आला “काय रे,काय उद्योग करून घेतला.”

“विशेष नाही.छोटासा अक्सीडेंट झाला”

“काही सीरियस नाही ना”

“अं हं,मुका मार जास्त लागलाय.”

“नक्की काय झालं.” 

“पिवळ्या विमानानं धावती भेट घेतली.”

“कुठल्या विमानानं??”

“पिवळ्या.रोज सकाळी लेकीला शाळेत सोडायला जातोस तेव्हा पाहिलं असशीलच की….”

“कशाला डोक्याची मंडई करतोस.नीट सांग नाहीतर फोन ठेवतो”मित्र वैतागला.

“अरे स्कूल व्हॅनची धडक बसली”

“असं स्पष्ट बोल की,उगीच विमान वगैरे कशाला??”

“बस,व्हॅन,रिक्षा रस्त्यावर सकाळी विमानाच्या स्पीडनं तर पळतात.” 

“हो रे,कशाही गाड्या चालवतात.भीतीच वाटते.खरंच रस्त्यावरची विमानच.काहीतरी करायला पाहिजे.”

“एक कल्पना आहे.तुझी मदत पाहिजे”

“नक्की!!काय करायचे ते बोल.”

“व्हिडिओ शूट करायचयं.कुठं,कधी,कसं ते सांगतो.आपल्या भागातील प्रसिद्ध शाळेच्या प्रिन्सिपलची अपॉईटमेंट मिळालीय.सोबत येतोस का”

“डन,काळजी हे”मित्राने फोन ठेवला.ठरल्याप्रमाणं प्रिन्सिपलांना भेटलो.उपक्रमाची माहिती दिली.त्यांनीसुद्धा लगेचच  सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि कार्यक्रम ठरला. 

रविवारी सकाळी शाळेच्या हॉलमध्ये प्रिन्सिपल,शिक्षक,पालक प्रतिनिधी आणि सुमारे पंचवीस स्कूल बस,व्हॅन,रिक्षाचे ड्रायव्हर जमले होते.नक्की कसला कार्यक्रम आहे याविषयी सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.“पिवळं विमान” व्हाटसप ग्रुपमध्ये ऍड केल्याचं प्रत्येकाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आल्यावर आपसात चर्चा सुरू झाल्या.तितक्यात प्रिन्सिपल मॅडमनी बोलायला सुरवात केली.“आज सुट्टी असूनही आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप आभार.एका चांगल्या कारणासाठी ग्रुप तयार केलाय.कृपया कोणीही ग्रुपमधून बाहेर पडू नये.आज इथं का जमलोय,काय करायचं सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.जास्त वेळ घेणार नाही.”प्रिन्सिपल मॅडमनी थोडक्यात प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सूत्र माझ्याकडं दिली.वॉकरच्या आधारानं उभं राहत बोलायला सुरवात केली. “पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद!!नवीन ग्रुपवर शॉर्ट व्हिडिओज पाठवलेत ते आधी पहा.नंतर बोलू” व्हिडिओ बघितल्यावर चूळबुळ सुरू झाली. 

“हे काय आहे”वैतागलेल्या एकानं विचारलं.

“आपल्याच शाळेच्या गाड्यांचे गेल्या आठ दिवसातले व्हीडिओज.” माझ्या उत्तरावर एकदम गदारोळ सुरू झाला. काही ड्रायव्हर तावातावानं,ओरडून बोलायला लागले. 

“आम्ही आमचं काम प्रामाणिक पणे करतो आहोत.उगीच चुकीची माहिती पसरवू नका.”

“बदनामी करण्यासाठी बोलावलंयं का?तसं असेल तर आम्ही पण गप्प बसणार नाही.”

“सगळी पोरं सेफ आहेत.तरी सुद्धा असले विडिओ कशाला दाखवता”

“रस्ता म्हटल्यावर किरकोळ गोष्टी होणारच.आम्ही व्यवस्थितच गाड्या चालवतो.”

“पोटच्या पोरांइतकीच गाडीतल्या मुलांची काळजी घेतो.”

“उगीच शाळेच्या आणि पालकांच्या मनात काहीबाही भरून देऊ नका”

“तुम्ही कोण कुठले.शाळेशी काय संबंध” चिडलेले ड्रायव्हर संतापून बोलत होते.प्रिन्सिपल मॅडमनी विंनती केल्यावर सगळे शांत झाले.मी पुन्हा बोलायला सुरवात केली“सर्वप्रथम एक गोष्ट क्लियर करतो की इथं कोणाला दोष देण्यासाठी किवा जाब विचारण्यासाठी हा कार्यक्रम नाहीये.”

“मग हे व्हिडिओ कशासाठी?.मुलांची काळजी घेतो.त्यांचे लाड करतो ते दिसलं नाही का?”एकाच्या बोलण्यावर बाकीच्यांनी ‘बरोबरयं’ म्हणत माना डोलावल्या. 

“तुमच्याविषयी तक्रार नाही परंतु हे व्हिडिओज सुद्धा वस्तुस्थिती आहे.”

“आधी तुम्ही कोण ते सांगा.”

“पंधरा दिवसांपूर्वी सकाळी स्कूल व्हॅननं मला उडवलं. नशीब बलवत्तर म्हणून पायावर निभावलं.”

“रस्त्यावर अपघात होणारच.नेहमी दोष ड्रायव्हरचा नसतो”

“शंभर टक्के मान्य.माझ्या केसमध्ये ड्रायव्हर खूप घाईत,मोबाइलवर बोलत गाडी चालवत होता.”

“मग त्याच्यावर कारवाई करायची.”

“पण त्यानं मूळ प्रश्न सुटणार नाहीये.”

“एकानं चूक केली म्हणून सगळे वाईट नसतात.”

“रोज रिस्क घेऊन ओव्हरटेक करता,गरज नसताना कट मारता,रॉंग साइडनं गाडी घुसवता,गाडी सोबत फोनही चालूच असतो.हे खूप धोक्याचं आहे.आतापर्यंत काही गंभीर घटना झाली नाही परंतु यापुढे कधीच होणार नाही ही खात्री नाही.त्यात गाडीत लहान मुलं असतात.बेफाम गाडी चालवून त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवत आहोत.याचा जरा विचार करा.सर्वांना विनंती आहे की विनाकारण जीव धोक्यात घालू  नका.” 

“पुढे काय होईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही.” 

“करेक्ट पण काळजी घेणं तर आपल्या हातात आहे.वेळ गाठण्याससाठी म्हणून मन मानेल तशी गाडी चालवणं बरोबर नाही.स्वतःबरोबर  अनेक पालकांचा काळजाचा तुकडा तुमच्यासोबत असतो त्याचाही जीव पणाला लावता.” बोलण्याचा परिणाम तात्काळ दिसला.हॉलमध्ये चिडिचूप शांतता पसरली.

“माफ करा.साहेब.तुमचं बोलणं ऐकून डोळे उघडले.”एकजण हात जोडत म्हणाला. 

“तुम्ही माफी मागावी म्हणून नाही तर बेदरकारपणे सुसाट वेगानं जाणाऱ्या गाड्या पाहून पोटात गोळा येतो.तसंही आता घराबाहेर पडलं की जीव मुठीत घेऊनच फिरावं लागतं.हे अनेकांचं मत आहे.मला ठेच लागल्यावर लक्षात आलं की नुसती चडफड करण्यापेक्षा तुमच्याशी एकदा संवाद साधावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला.कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही.कृपया गैरसमज करून घेऊ नये, ही नम्र विनंती आणि मनपूर्वक धन्यवाद!!”

“साहेब,आजपासून आम्ही काळजी घेऊ.हा ग्रुप आता आम्ही चालवू.आमच्या गाड्यांना तुम्ही दिलेलं “पिवळं विमान” नाव भारीयं.आता गाडीचा स्पीड वाढला की हे नाव नक्की आठवेल आणि आपसूकच कंट्रोल होईल.”ड्रायव्हरच्या दिलखुलास बोलण्यावर ‘हो, हो’ म्हणत सगळे मोठ्यानं हसले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(लोकसत्ता – 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक)

विश्वकोषासाठी विशेष नोंदी करण्यासाठी आलेले चित्रकार सुहास बहुळकर  तर वाईच्या प्रेमातच पडले . त्याचे सुंदर वर्णन त्यांनी वाई कलासंस्कृती या पुस्तकात केले आहे . पेशवेकालीन पुण्याचे वास्तुवैभव , महिरपी खिडक्या , वाडयांचे दरवाजे , चौकटी , कोनाडे हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत . या विषयांची प्रेरणा घेऊन आकारसंस्कृती नावाचे त्यांनी केलेले प्रदर्शन खूप गाजले आहे .

वाईच्या घाटाची तर अनेकांनी चित्रे काढलेली आहेत त्यापैकी ना. श्री . बेन्द्रे यांच्या आत्मचरित्रात वाईच्या घाटाचे पेनने चित्र रेखाटलेले पाहता येते . वि .मा . बाचल मूळचे वाईचे . काही वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे . त्यांनी काढलेली रेखाटने व घाटाची चित्रे फर्ग्युसनच्या शताब्दी स्मरणिकेत पाहायला मिळतात .

वाईचे सु .पि .अष्टपुत्रे सर व गजानन वंजारी सर हे दोघेही वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये कलाशिक्षक होते . त्यांना ज्यावेळी वेळ मिळत असे तेव्हा ते गणपती घाटावर चित्रे काढायला यायचे . अष्टपुत्रेसर अपारदर्शक कलर्स म्हणजे पोस्टर कलरमध्ये व वंजारीसर तैलरंगमध्ये निसर्गचित्रे रेखाटतात . मूळचे पसरणी गावाचे पण सध्या इंग्लडमध्ये वास्तव्य असणारे तुषार साबळे यांनीही वाई घाटपरिसरातील , मेणवली घाटाची चित्रे रेखाटली आहेत .

सुप्रसिद्ध सिनेनट चंद्रकांत मांडरे , चित्रकार पी एस कांबळे , दिवाकर प्रभाकर, या जुन्या पिढीतील कलावतांनी वाईची चित्रे साकारलेली आहेत . बाळासाहेब कोलार , श्रीमंत होनराव (वाई) , यांच्या बरोबरच मिलींद मुळीक , संजय देसाई , शलैश मेश्राम , कविता साळुंखे , दिवगंत सचीन नाईक , कुडलय्या हिरेमठ (पुणे) , प्रफुल्ल सावंत , सागर गायकवाड (सातारा ) , संदीप यादव ( पुणे), अमोल पवार , निशिकांत पलांडे (मुंबई ), गणेश कोकरे (सातारा) विजयराज बोधनकर (ठाणे ) सुनील काळे अशा नव्या दमाच्या चित्रकारांनी वाई परिसरातील अनेक चित्रे काढलेली आहेत .

एडवर्ड लियर या ब्रिटीश चित्रकाराने वाईच्या घाटाचे केलेले सुरेख  रेखाटन अरुण टिकेकर यांच्या ‘ स्थलकाल ‘ या पुस्तकात पाहायला मिळते . त्याचबरोबर जॉन फेड्रीक लिस्टर 1871 याने एलफिस्टन पॉईंटची व्हॅली रंगवलेली आहे . तर 1850 साली विल्यम कारपेंटर या चित्रकाराने प्रतापगडाचे विहंगम दृश्य रंगवल्याचे गुगलसर्च केल्यावर सापडले . एम.के . परांडेकर यांनी रेखाटलेल्या ऑर्थरसीट पॉईंटचे चित्र खूप प्रसिद्ध आहे . त्याचबरोबर अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत श्री . दिवाकर डेंगळे यांनीही पांचगणी वाई महाबळेश्वर येथील चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत .

प्रसिद्ध चित्रकार जहाँगीर साबावाला याचां महाबळेश्वरमध्ये बालचेस्टर नावाचा बंगला आहे . त्यामुळे त्यांनी महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांच्या अमूर्त शैलीत ऑईलकलर मध्ये साकारले आहे . नाशिकचे शिवाजी तुपे यांनी घोड्यांचे पार्कींग असलेले इमारतीचे चित्र काढले आहे तर रवि परांजपे यांनी प्रसिद्ध पंचगंगेच्या मंदिराचे प्रवेशद्वार त्यांच्या शैलीत रेखाटले आहे .वासुदेव कामत यांनीही या परिसरात चित्रांकन केलेले आहे .

मेणवली घाट , धोमचे नरसिंहाचे मंदीर , गणपती घाट , गंगापुरी घाट , मधलीआळी घाट , भीमकुंडआळीचा घाट , असा घाटांचा परिसर व मंदिराचे गाव म्हणून जरी वाई प्रसिद्ध असले तरी या घाटांच्या आजूबाजूला वाढलेले स्टॉल्स , टपऱ्या , दुकाने , कातकऱ्यांच्या वस्त्या , स्थानिक नगरपालीकेचे व सर्व घरांचे नदीपात्रात सोडण्यात येत असलेले दुषित सांडपाणी उघडपणे कृष्णा नदीत राजेरोसपणे सोडले जाते . त्यामुळे ट्रॅफिकची प्रचंड वर्दळ , गोंगाट , उघडी नागडी नदीत अंघोळ करणारी माणसे, भांडीकुडी कपडे धुणारी व हागणदारी करत नदीशेजारीच झोपड्यात राहणारी माणसे प्रदुर्षण करतात . मंदिराशेजारची वाढणारी गलीच्छ वस्ती पाहीली की चित्र काढण्याचा चित्रकाराचा मूड जाण्याचीच जास्त शक्यता असते . त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही . भंगारवाल्याच्या टपऱ्या , मेणवली जोर रस्त्यावर जाणाऱ्या जीपगाडया , छोट्या पुलावर बसणारे छोटे व्यावसायिक पाहीले की रस्त्यातून गाडया चालवणे किंब चालत जाणे एक मोठे संकट आहे . तरीही कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी व चित्रकार येथे येऊन चित्र काढत बसतात . मेणवली घाटावर लेखी परवानगी घेऊन फी देऊन फोटो व चित्र काढावे लागते . मेणवली घाटावर उतरत असताना डाव्या बाजूला जवळच स्मशानभूमीची जागा आहे व त्याशेजारी उघड्यावरची हागणदारी पाहीली की येथे पैसे देऊन चित्र का काढावे असा प्रश्न पडतो . तेथे बसून चित्र काढावे असे कधीकधी वाटत नाही .

खूप वर्षांपूर्वी एकदा फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या घरी राहण्याचा योग आला होता . त्यावेळी औंधचे कलाप्रेमी बाळासाहेब पंतनिधी महाराज यांचे तैलरंगातील २ फूट बाय ३ फूट आकारातील एक मेणवलीच्या घाटाचे चित्र पाहायला मिळाले . त्या चित्रातील वातावरण व शांतता आता कधीच अनुभवता येईल असे वाटत नाही . सगळीकडे व्यापारीकरण सुरु आहे .

पाचगणीच्या टेबललॅन्डच्या पठारावर आता मोठी तटबंदी बांधली आहे . त्याच्या सभोवताली खाण्याच्या टपऱ्या व घोडागाडीची रेलचेल पाहीली की चित्र काढणाराच चकीत होतो . सगळीकडे हॉटेल्स व त्यांच्या जाहीरातीचे फ्लेक्स दिसतात त्यातून निसर्ग शोधावा लागतो . शिवाय अति गर्दीमुळे पर्यटकांचा त्रास असतोच . महाबळेश्वरला शनिवार रविवारी जायचे असेल तर घाटातच ट्रॅफीक जामचा अनुभव येऊन ड्रायव्हींग करताना मुंबई पुण्यासारखा इंच इंच लढवावा लागतो . प्रसिद्ध पॉईंटसवर चित्रे काढणाऱ्या चित्रकारानां परवानगी घ्यावी लागते अन्यथा तुमचे रेखाटलेले चित्र खोडणारे नतद्रष्ट येथे आहेत . नियमांचा बडगा दाखवून कलाप्रेमीनां काम करताना बंद पाडणारे हाकलून देणारे महाभाग येथे आहेत . त्यामुळे कलेविषयी सातारा जिल्हयात अनास्था भरपूर आहे .

संपूर्ण सातारा जिल्हयात एकही कलादालन नसल्याने चित्रकारांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी कोठेही जागा नाही . कापडाच्या बांबूच्या कनाती बांधून नाटक असल्यासारखे प्रदर्शन करावे लागते . येथे अनेक व्यावसायिक मंडळी , राजकीय पुढारी , मुख्यमंत्री , आमदार ,खासदार , शिवरायांचे वशंज राजेमंडळी आहेत पण जिल्ह्यात वाई ,पाचगणी ,महाबळेश्वर , सातारा , कराड येथे कोठेही सुसज्ज चित्रप्रदर्शनासाठी कलादालन नाही आणि याची कोणाला लाज वाटत नाही . सगळ्या चित्रकारानां नाईलाजाने पुण्यामुंबईत प्रदर्शनासाठी जावे लागते . एकंदर कलेविषयी खूप लाचार अनास्था या पर्यटनस्थळी आहे . त्यामुळे प्रदर्शने भरत नाहीत , कलाप्रेमी तयार होत नाहीत व कलारसिकही नाहीत .

एकंदर परिस्थिती गंभीर आहे पण चित्रकार मात्र मनाने खंबीर आहेत .

आजही चित्रकार मनापासून चित्रे रेखाटत आहेत व भावी पिढीचेही नवे चित्रकार भविष्यातही चित्रे रेखाटत राहतील कारण निसर्गाची ओढ, जुन्या स्थापत्यशैलीतील मंदीरे,घाट, सहयाद्री पर्वताच्या डोंगरांच्या दूर पसरलेल्या रांगा , भव्य सपाट टेबललॅन्डची पठारे कायम चित्रकारानां प्रेरणा देत राहणारच आहेत . चित्रकारांची ही चित्रे आणखी काही वर्षांनी इतकी महत्वाची असतील कारण जे वेगाने बदल होत आहेत त्या बदलांचे हे एक प्रकारे दस्तीकरण होत असते .निसर्गदेव सदैव दोन्ही हातांनी भरभरून देत राहणार आहे .  माणूस नावाचा प्राणी मात्र निसर्गाची वाट लावायला रोज नवी यंत्रणा राबवतो , त्याच्या कुठे तरी भलताच  ‘ विकास ‘ करण्याच्या प्रयत्नांनां मात्र लगाम घातला पाहीजे .

– समाप्त – 

© श्री सुनील काळे [चित्रकार]

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

🌟 वाई, पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन – भाग – १ 🌟 श्री सुनील काळे 🌟

(लोकसत्ता – 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक)

वाई ,पाचगणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्राची नावाजलेली ठिकाणे आहेत . वाई हे पर्यटनाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, काही जण वाईला दक्षिण काशी असेही संबोधतात . तीर्थक्षेत्र ही जशी वाईची ओळख आहे तसेच फार पूर्वीपासून विद्वान मंडळीचे गाव किंवा विश्वकोश निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींमुळे वाईला महत्व प्राप्त झाले आहे .

वाई पासून बारा कि .मी अंतरावर पसरणीचा वेडावाकडा घाट पार करून पोहचले की थंडगार वाऱ्याच्या झुळका सुरु झाल्या की ओळखायचे आपण पाचगणीत पोहचत आहोत . पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीला ओळखतातच पण त्याहीपेक्षा ब्रिटींशानी सुरु केलेल्या रेसिडेन्सल बोर्डींग स्कूल्समुळे पांचगणीला एक नवी ओळख मिळाली आहे .

महाबळेश्वर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नंदनवन व उंचावर असलेले गिरिस्थान आहे . थंड हवेच्या ठिकाणाबरोबरच महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणूनही महाबळेश्वरला महत्व आहे . क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन पंचगगा व कृष्णाबाईचे मंदीरे , कृष्णा नदीचे उगमस्थान व पंचनद्याचे संगमस्थान यामुळे तीर्थक्षेत्र म्हणूनही प्राचीन काळापासून क्षेत्रमहाबळेश्वर सुप्रसिद्ध होते . अशा या महाबळेश्वर पाचगणीला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे श्रेय मात्र ब्रिटिशांना किंवा गोऱ्यासाहेबांना दिलेच पाहीजे . याचे मुख्य कारण म्हणजे येथील थंडगार हवा , सुंदर वनश्री , आल्हाददायक वातावरण ही वैशिष्ठये असली तरी या ठिकाणाला येण्यासाठी चांगले रस्ते नव्हते . राहण्यासाठी प्रशस्त बंगले , निवासस्थाने , क्लब्ज , बाजारपेठ , नव्या सुंदर पॉईंटसचा शोध घेऊन तेथपर्यंत अवघड डोंगराळ जागी पोहचण्यासाठी लागणारे रस्ते विकसित करण्याचे काम ब्रिटीश राजवटीत सुरु झाले . पुणे किंवा मुंबईतील असह्य उकाड्यामुळे उन्हाळ्यातील मे महिन्यात व्हाईसरॉय , गव्हर्नरसाहेब यांनी राज्यकारभार करण्यासाठी महाबळेश्वर येथून राजभवन किंवा गव्हर्नर हाऊस नावाचे प्रशस्त बंगले बांधले व खऱ्या अर्थाने पर्यटनाची कारकीर्द सुरू केली . या ठिकाणांचा प्रसार व प्रचार केला त्यामुळे अनेक ब्रिटीश अधिकारी व भारतातील राजे , श्रीमंत व्यापारी , प्रसिद्ध उदयोजक त्यांची बायका मुले  सर्व परिवार घेऊन मित्रमंडळीसोबत सातत्याने  येथे येऊ लागली व हळूहळू खऱ्या जीवनावश्यक सुविधा येथे पुरविल्या जाऊ लागल्या . त्याचबरोबर अनेक इंग्रज कलाकार मंडळी येथे निसर्गचित्र काढण्यासाठी येऊ लागले .

परमेश्वराकडे माझ्या अनेक तक्रारी आहेत पण एका गोष्टीविषयी मी सतत त्याचा कृतज्ञ आहे की त्याने माझा जन्म व बालपण पाचगणीसारख्या सुंदर  निसर्गरम्यस्थानी  घालवले . लोकसत्ताने जेव्हा या तीन ठिकाणी चित्रकाराच्यादृष्टीने या पर्यटनस्थळांचे काय महत्व आहे असा विषय मांडायला सांगितले त्यावेळी जवळपास पन्नासवर्षांपासूनचा एका कलाकाराचा समृद्ध जीवनपटच माझ्या डोळ्यापुढे सरकला . सगळ्या आठवणी जाग्या झाल्या सष्टपणे डोळ्यासमोर चित्र दिसू लागले .

साधारण पन्नासपूर्वी म्हणजे 1975 च्या दरम्यान आम्ही मुले पाचगणीच्या मराठी शाळेत  शिकत होतो . त्या कोवळ्या आठ दहा या बालीश  वयात पाचगणीच्या गावाबाहेर जकात नाक्याशेजारी एका शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही मुले शाळा सारावण्यासाठी शेण गोळा करायला जात होतो . त्यावेळी त्या दुपारच्या शांत वेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले . एक वयस्कर जाडजूड रिचर्ड ॲटनबरोसारखा दिसणारा गोरापान म्हातारा माणूस डोक्यावर मोठी फेल्टहॅट घालून रंगाची एक मोठी पेटी घेऊन छान ब्रशेस कागदाचे पॅड घेऊन बिलिमोरीया स्कूलच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या कडेला निवांतपणे एक चित्र काढत होता . हा म्हातारा नेमके काय करतोय हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आम्ही मुले त्याच्या बाजूला गोळा झालो . अतिशय व्यवस्थित काटेकोरपणे समोरच्या दृश्याचे पेन्सीलने केलेले रेखाटन व सुंदर रंगसगतीने चित्रित केलेले कृष्णाव्हॅलीचे ते पाहिलेले पहीले

डेमोन्सस्ट्रेशन नंतरच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले . सगळी मुले गेली पण मी मात्र या गोऱ्या चित्रकाराचा शेवटपर्यंत पाठलाग केला . त्यावेळी ते गृहस्थ पाचगणीच्या प्रसिद्ध एम आर ए या राजमोहन गांधी यांच्या संस्थेत गेले . पुढे मोठे झाल्यानंतर त्यांचे नाव व कार्य कळले . या चित्रकाराचे नाव होते  गॉर्डन ब्राऊन . हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे पण त्यांनी नैतिक पुनरुत्थान केन्द्र (MRA ) ही संस्था उभी करण्यासाठी आर्किटेक्ट म्हणून फुकट काम केले . राजमोहन यांच्या प्रेमाखातर ऑस्ट्रेलियातून स्वखर्चाने येऊन संस्थेचे वास्तूनिर्मितीचे नियोजन व पूर्ण त्रेसष्ट एकरात एक भव्य प्रकल्प उभा केला . पण येथील सुंदर वातावरण , टेबललॅन्डची पठाराखालची संस्था , कृष्णा व्हॅलीची , रस्त्यांची त्यांनी अनेक चित्रे जलरंगात साकारली . त्यातील काही चित्रे एम आर ए या संस्थेच्या इमारतीमध्ये आजही पाहता येतात .

त्यानंतर कलाशिक्षक सुभाष बोंगाळे यांनी अनेक चित्रे जलरंगात जागेवर जाऊन रेखाटलेली आहेत . हिरव्या शेवाळी रंगाच्या सायकलला एक पाठीमागे स्टॅन्ड बांधून रंगाचे सामान घेऊन सिडने पॉईंटच्या व्हॅलीत बोंगाळे सर सतत स्केचिंग व लॅन्डसेकप्स करत बसायचे . पाचगणीच्या या संराच्या चित्रनिर्मितीच प्रेरणा घेऊन मी या लेखाचा लेखक  सुनील काळे आयुष्यभर या परिसरात रेखाटणे करत व जलरंग वापरून सातत्याने तीस पस्तीस वर्ष चित्र काढत राहीलो आहे . कृष्णानदीच्या किनाऱ्यावर धोमधरण बांधल्यानंतर पाचगणीच्या विविध भागातून दिसणारे विहंगम दृश्य , चिखली , पसरणी या गावांची बारावाडीची दिसणारी भातशेती , चमकणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या रांगा , पाचगणीचे दुतर्फा रस्त्याच्या बाजूला असलेली भव्य वडाची झाडे , अशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सपाट पठार म्हणून प्रसिद्ध असलेली टेबललॅन्डची पठारे या पाच पठारावरून दिसणारे पाचगणी गावाचे दृश्य विलोभनीय दिसते . खिंगर , दांडेघर , आंब्रळ , राजपुरी , तायघाट , भिलार या सभोवतालच्या गावामध्ये पसरलेले शंभर एकरचे एकेक सपाट पठार रंगवणे हे आयुष्यभर आनंद देणारे कार्य ठरले . ब्रिटिशांनी त्यांच्या मुलांमुलीसाठी येथे प्रथम त्यांचा जॉन चेसन नावाचा रिटायर्ड ऑफीसर पाठवून भरपूर अभ्यास केला . सिल्व्हर वृक्षाची झाडे लावली . प्रत्येक वर्षातील बारा महिन्यांचे तापमान पाहून तीनही ऋतूमध्ये काय काय फरक दिसतो याच्या सविस्तर नोंदी केल्या . रिकाम्या पसरलेल्या जागेत मोठ्या शाळा व राहण्यासाठी वसतिगृहे बांधली बंगले बांधले . रस्त्यांचे नियोजन केले . स्ट्रॉबेरी , बटाटा , कॉफी व इतर अनेक फळझाडे वृक्षांची लागवड केली . नगरपालीका बांधली . ऑफीसर्स राहण्यासाठी विश्रामगृहे बांधली . प्रथमच टेबललॅन्डच्या पायथ्याशी शाळा बांधली या शाळांपैकी सेंट जोसेफ स्कूल , किमिन्स स्कूल , सेंट पीटर्स स्कूल , यांनी सव्वाशे वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे .

परंतू सव्वाशे वर्ष होवूनसुद्धा  आजही किमिन्स , सेंट जोसेफ या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे सुशिक्षित कलाशिक्षक नसल्याने चांगले कलाकार निर्माण झाले नाहीत किंवा कलापरंपरां निर्माण झाली नाही . चित्रसंस्कृती टिकून राहीली नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे .

सुनील व स्वाती काळे या दाम्पत्याने मात्र या परिसराचा सखोल अभ्यास करून येथील किमिन्स , सेंट पीटर्स , बिलीमोरीया , या शाळांसोबत अनेक ब्रिटीशकालीन बंगले , पारशी लोकांचे बंगले , अग्यारी , चर्चेस , या वास्तूंचे जलरंगात चित्रिकरण केले . गावातील मुख्यरस्ते , सुंदर वनश्री , गार्डनमधील फुले , कुंड्या , कॉसमॉस , हॉलिहॉक्स ,वॉटरलिलीज , रानफुले  तैलरंगात रंगवून पाचगणीचा निसर्ग अनेक मान्यवर कलाप्रेमी मंडळीच्या घरी व अनेक देशात चित्रे विकली त्यामुळे पाचगणी ,महाबळेश्वर व वाईपरिसरातील चित्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . नुकतेच त्यांचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथील AC व सर्क्युलर आर्ट गॅलरीमध्ये भरले होते त्याठिकाणी त्यांनां चित्र रसिकांकडून भरघोस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .

वाई हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे गाव आहे . लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोष निर्मितीचे संपादक मंडळाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केले . त्याकामासाठी अनेक तज्ञ व नावाजलेले चित्रकार वाई येथे कलासंपादक म्हणून येऊ लागले .

प्रसिद्ध चित्रकार व जेजे स्कूल ऑफ मुंबईचे डिन असलेले ज . द . गोंधळेकर वाईच्या  विश्वकोषात काही वर्षांसाठी आले होते . त्यांनी गणपती घाट , मधलीआळी घाट , मेणवली घाट येथे पेनने व जलरंगात चित्रे काढलेली आहेत .

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील काळे [चित्रकार]

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares