मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-२ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

??

☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-२ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील  प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व रंगीत पारदर्शक लहान मोठे मासे ,सी ककुंबर यांचं दर्शन झालं.) — इथून पुढे 

कालपेनी बेटावर परतल्यावर, जेवण व विश्रांती झाल्यावर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी नाच करून दाखविला. लुंगीचा धोतरासारखा काच्या मारला होता. एका हातात लांबट चौकोनी पत्रा व दुसऱ्या हातात लाकडी दंडूका होता. झांजेच्या तालावर ‘भारत मेरा देश है’ म्हणत नाच करीत होते. गणपतीत आपल्याकडे कोकणातील बाल्ये लोक नाचतात तसा प्रकार होता.

नंतर तिथल्या होजिअरी फॅक्टरीला भेट दिली. तिथे बनविलेले टी-शर्ट, शुद्ध खोबरेल तेल, नारळाचे लाडू, डेसिकेटेड कोकोनट यांची खरेदी झाली.

आज बोटीवर परतल्यावर बोटीच्या डेकवर गेलो. अंधार होत आला होता. आकाश आणि आजूबाजूचा समुद्र सगळं राखाडी काळसर झालं होतं. शुक्राची चांदणी चमचमत होती. थंडगार, शुद्ध हवेमुळे प्रसन्न वाटंत होतं. थोड्याच वेळात वेगाने दौडणाऱ्या बोटीच्या पाळण्यातील हलक्या झोक्यांमुळे डोळ्यावर पेंग आली.

कोचीपासून चारशे किलोमीटर दूर असलेले कवरत्ती हे बेट लक्षद्वीपची राजधानी आहे. आमच्या बोटीचं नावही ‘कवरत्ती’. इथे आम्हाला काचेचा तळ असलेल्या छोट्या दहा जणांच्या बोटीतून समुद्रात नेलं. असंख्य कोरल्स ,लहान- मोठे, काळे- पांढरे, निळे- पिवळे मासे, शंख शिंपले, सी ककुंबर, कासव अशी विधात्याने निर्मिलेली आगळीच जीवसृष्टी बघायला मिळाली. दुपारी जेवण झाल्यावर म्युझियम बघायला गेलो. समुद्रजीवांचे सांगाडे, असंख्य प्रकारची, रंगांची कोरल्स, पूर्वीची मासेमारीची साधने, होड्या, स्थानिक वापरातील वस्तू म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. ॲक्वेरियममध्ये शार्कमाशासह अनेक प्रकारचे रंगीत मासे पोहत होते. इथे लक्षद्वीप डायव्हिंग ॲकॅडमी आहे.

केरळचा चेराकुलातील शेवटचा राजा चेरामन पेरूमल याच्या कारकीर्दीमध्ये लक्षद्वीप बेटावर वसाहत करण्यास सुरुवात झाली असं समजलं जातं. प्रथम हिंदू व बौद्ध लोकांची वस्ती होती. सातव्या शतकात येथे इस्लामचा शिरकाव झाला. १७८७ मध्ये टिपू सुलतानाच्या ताब्यात इथल्या पाच बेटांचे प्रशासन होतं. १७९९ च्या श्रीरंगपट्टणमच्या लढाईनंतर ही बेटं ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या ताब्यात गेली. १८५४ मध्ये चिरक्कलच्या राजाने सारी बेटं ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये ‘युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप’ ची स्थापना झाली. 

लक्षद्वीपवरील रहिवाशांचं  आयुष्य तसं खडतरंच आहे. नारळ भरपूर होतात. थोड्याफार केळी, टोमॅटो, आलं अशा भाज्या व कलिंगडासारखं फळ एवढंच उत्पादन आहे. साऱ्या जीवनावश्यक गोष्टी कोचीनहून येतात. बेटांवर बारावीपर्यंत शाळा आहेत. पुढील शिक्षणासाठी कोचीनला यावं लागतं. भारत सरकारतर्फे शिक्षण आणि आरोग्य सुविधा विनामूल्य दिल्या जातात. बोटींवरील सुसज्ज हॉस्पिटल्समध्ये स्थानिकांच्या आजारांवर उपचार होतात. मोठ्या ऑपरेशनसाठी बोटीने कोचिनला नेण्यात येतं. इथला ८०% पुरुषवर्ग देशी- परदेशी बोटींवर काम करतो. लोक साधे व अतिशय तत्परतेने मदत करणारे आहेत. स्त्रिया शिक्षित आहेत. बुरख्याची पद्धत नाही. लग्नाच्या खर्च नवऱ्यामुलाला करावा लागतो. लग्नानंतर नवरामुलगा मुलीच्या घरी जातो.

बोटीवरील स्टाफ आपली सर्वतोपरी काळजी घेतो. बोटीवरील प्रवाशांच्या केबिन्सना कुलूप लावण्याची पद्धत नाही. तसेच वॉटर स्पोर्ट्सला जाताना तुम्ही किनाऱ्यावर ठेवलेली पर्स,पाकिटे,  मोबाईल यांना कसलाही धोका नाही. सारं सुरक्षित असतं. विश्वासाने कारभार चालतो.

या बेटांवर पक्षी किंवा प्राणी फारसे आढळले नाहीत. समुद्र पक्षांच्या एक दोन जाती आहेत .या बेटांपैकी बंगाराम, अगत्ती, तिनकारा अशी बेटं परकीय प्रवाशांसाठी राखीव आहेत. इथे हेलिपॅडची सुविधा आहे. इथल्या निळ्या- निळ्या स्वच्छ जलाशयातील क्रीडांसाठी, कोरल्स व मासे पाहण्यासाठी परदेशी प्रवाशांचा वाढता ओघ भारताला परकीय चलन मिळवून देतो.

कोरल्स म्हणजे छोटे छोटे आकारविहीन समुद्रजीव असतात. समुद्राच्या उथळ समशीतोष्ण पाण्यात त्यांची निर्मिती होते. हजारो वर्षांपासूनच असं जीवन त्यांच्यातील कॅल्शियम व एक प्रकारचा चिकट पदार्थ यामुळे कोरल रिफ्स तयार होतात .ही वाढ फारच मंद असते. या रिफ्समुळे किनाऱ्यांचं संरक्षण होतं. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जागतिक तापमान वाढीमुळे आर्क्टिक्ट  व अंटार्टिक्ट यावरील बर्फ वितळत असून त्यामुळे जगभरच्या समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटांवर डोंगर, पर्वत नाहीत तर पुळणीची वाळू आहे. या द्वीप समूहातील बंगाराम या कंकणाकृती प्रवाळ बेटाचा, एक मनुष्यवस्ती नसलेला भाग २०१७ मध्ये समुद्राने गिळंकृत केला. आपल्यासाठी पर्यावरण रक्षणाचं महत्त्व पटविणारा हा धोक्याचा इशारा आहे.

प्रवासाच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता आमची बोट कोचीन बंदराला लागणार होती. थोडा निवांतपणा होता. रोजच्यासारखं लवकर आवरून छोट्या बोटीत जाण्याची घाई नव्हती. म्हणून सूर्योदयाची वेळ साधून डेकवर गेलो. राखाडी आकाशाला शेंदरी रंग चढत होता. सृष्टीदेवीने हिरव्यागार नारळांचे काठ असलेले गडद निळे वस्त्र परिधान केलं होतं. पांढऱ्याशुभ्र वाळूतील छोटे शंख, कोळी, समुद्रकिडे त्यांच्या छोट्या छोट्या पायांनी सुबक रेखीव रांगोळी काढत होते. उसळणाऱ्या निळ्याभोर पाण्याच्या लांब निऱ्या करून त्याला पांढऱ्या फेसाची झालर त्या समुदवसने देवीने लावली होती. छोट्या छोट्या बेटांवर नारळीच्या झाडांच्या फुलदाण्या सजल्या होत्या. अनादि सृष्टीचक्रातील एका नव्या दिवसाची सुरुवात झाली. आभाळाच्या भाळावर सूर्याच्या केशरी गंधाचा टिळा लागला. या अनादि अनंत शाश्वत दृश्याला आम्ही अशाश्वतांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला.

– समाप्त – 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-१ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

??

☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-१ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

अथांग अरबी महासागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डोलत आमचं स्वागत करीत होती. आता आमच्या मोठ्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. त्या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडांना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता. (लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोहोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच.)

लक्षद्वीप द्वीपसमूह हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला ३६ बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळ मधील कोची (कोचीन/ एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.

समुद्रावरील ताजा मोकळा वारा भरून घेत मिनीकॉय बेटावर  उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट लक्षद्वीप समूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५ साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून जावं लागतं. तिथून अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं. अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या

सुनील नभ हे सुंदर नभ हे

नभ हे अतल अहा

सुनील सागर सुंदर सागर 

सागर अतलची हा

या कवितेची आठवण झाली. तिथून रिसॉर्टला पोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबऱ्याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालित होता. सेफ्टी जॅकेट्स व पायात रबरी बूट चढवून पाण्यात डुंबण्यासाठी सज्ज झालो. समुद्रातील पोहणं, डुंबणं, कयाकिंग,स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट्स व पायात रबरी बूट\ चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्स  आपल्याला टोचतात. तिथे अनेक प्रशिक्षित ट्रेनर आमच्या मदतीसाठी सज्ज होते.

किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन् फतकल मारून बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. समुद्रात आजूबाजूला हात घातला की नानाविध कोरल्स हातात येत. काहींचा आकार झाडांचा तर काहींचा आकार फुलांचा, पानांचा पक्षांचा. कुणाला गणपतीसुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या कोरल्सची संपत्ती  समुद्राला परत केली. कुठल्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून  आणणं हा दंडनीय अपराध आहे.

मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.  आकाशाच्या घुमटातून परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात  उतरले होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, सोनेरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम  क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगद शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. त्या शिंपल्यात स्वतःला अलगद मिटवून घ्यावं असं वाटणारा, देहभान विसरणारा तो स्वर्गीय सुंदर अनुभव होता. 

जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. अकरा हजार लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी- छोटी अकरा गावं आहेत. मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतही आहे .प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा आहे. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे. चहा, सामोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या. दर डिसेंबरमध्ये तिथे ‘नॅशनल मिनीकॉय फेस्ट’ साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हवत असतात. 

इथे ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम असली तरी या बेटावर महल (Mahl) नावाची भाषा बोलली जाते.

रात्रभर प्रवास करून बोट कालपेनी या कोचिनपासून २८७ किलोमीटर्सवरील बेटाजवळ आली. आठ किलोमीटर्सच्या या लांबट बेटावर नारळाची असंख्य झाडं झुलत होती. शहाळ्याचा आस्वाद घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील आरामखुर्च्यांवर बसून निळा हिरवा आसमंत न्याहाळत होतो. एकाएकी आभाळ भरून आलं. पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेत सारे मांडवात परतलो. कोकणातल्यासारख्या नारळाच्या विणलेल्या झापांच्या त्या मोठ्या मांडवात टेबलखुर्च्यांची व्यवस्था होती. थोड्यावेळाने पाऊस थांबला पण आभाळ झाकोळलेलं राहिलं. त्यामुळे कडक उन्हाचा त्रास न होता सर्वांनी वॉटर स्पोर्ट्सची मजा अनुभवली. वॉटर स्पोर्ट्ससाठी समोरच्या दुसऱ्या बेटावर होडीतून जावं लागलं. समोरचं बेट आणि त्याच्या शेजारचे बेट यांच्यामध्ये शुभ्र फेसाच्या लाटा अडकून राहिल्या आहेत किंवा तिथे बर्फाचा शुभ्र चुरा भुरभुरला आहे असं वाटत होतं. नंतर तिथल्या मदतनीसांकडून कळलं की तो पांढराशुभ्र, मऊ,  मुलायम वाळूचा बांध तयार झाला आहे. त्याचंच एक बेट तयार झालं आहे. त्यावर मनुष्यवस्ती नाही. गंमत म्हणजे त्या बेटाजवळील पाणी गडद निळं होतं आणि आमची छोटी बोट हिरव्या पाण्यातून जात होती. इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील  प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व रंगीत पारदर्शक लहान मोठे मासे ,सी ककुंबर यांचं दर्शन झालं.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली 

ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ।। 

— संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे. 

असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना? 

मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?

तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो. 

मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते. 

तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची

☆ ते माझे घर…. ☆

ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।

*

आजी आजोबा वडील आई

लेकरांसवे कुशीत घेई

आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।

*

कुठेहि जावे हृदयी असते

ओढ लावते, वाट पाहते,

प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।

*

भिंती खिडक्या दारे नच घर

छप्पर सुंदर तेही नच घर

माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।

*

परस्परांना जाणत जाणत

मी माझे हे विसरत, विसरत

समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।

*

मन मुरडावे, जुळते घ्यावे

सुख दुःखाना वाटुन घ्यावे

भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।

*

ज्योत दिव्याची मंद तेवते

शुभं करोति संथ चालते

श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।

*

बलसंपादन गुणसंवर्धन

धार्मिकतेची सोपी शिकवण

अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।

– श्रीराम बाळकृष्ण आठवले

आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती. 

याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा. 

तिने घरासाठी लागणार्‍या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला. 

घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील  राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे. 

त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.

आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे. 

घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.

मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते. 

दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?

आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते. 

मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून? 

मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?

घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?

शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी  नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्‍याला त्याची बाधा होणारच ना?

उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड,  असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?

आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?

प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली. 

घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची  वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रजासत्ताक दिन ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

प्रजासत्ताक दिन ☆ श्री सुनील काळे 

आज सकाळी लाऊडस्पीकरवर देशभक्तीची गाणी ऐकू येत होती . शाळेंच्या बक्षीस वितरणांचा कार्यक्रम , विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम , झेंडा वंदनाचा कार्यक्रम व नेत्यांची भाषणे ऐकू येत होती . त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनाची जोरदार सुरुवात दरवर्षीप्रमाणे सुरु आहे हे कळत होते .

नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघालो होतो . सकाळची थंडी इतकी प्रचंड होती की दोनतीन कपडे, जॅकेट , कानटोपी , पायात वॉकींग शूज , अशा कडक बंदोबस्तात मी निसर्गात फिरत होतो . येताना गरमागरम जिलेबी आणायची म्हणजे 26 जानेवारी साजरी केल्यासारखे वाटते हा गोंडस विचारही मनात घोळत होता .

परत येताना नदीच्या किनारी जाऊन नंतर पुढे निवांत जावू असा विचार करून मी थोडी नेहमीची वाट बदलली . नदी किनारी आलो तर दोन निळ्या रंगाचे प्लास्टीक टाकून लाकडांचा आधार देऊन दोन तात्पुरत्या झोपड्या दिसल्या . पाच सहा उघडीनागडी चार पाच वर्षाची मुले एका चादरीवर लोळत पडलेली होती तर त्यातला एक सहा सात वर्षाचा मुलगा चाकूला धार करत होता .

मग त्याला हिंदीतून विचारले क्या करता है ? तर म्हणाला अभी रानडुक्कर मारनेको जाना है। इस लिए चाकू को धार करता हु. 

इतक्यात दाढीवाला , मोठे केस सोडलेला बरेच दिवस अंघोळ न केलेला त्याचा बाप आला व निवांत बसला . क्या काम करते हो ? तर म्हणाला रानडुक्करे मारायची व खेडेगावात विकायची आमचा धंदा आहे . मग थोड्या गप्पा मारल्या त्यातून समजले अशा थंडगार हवामानात , झोंबणाऱ्या थंडीत नदीकिनारी एक दोन दिवस मुक्काम करायचा . रानडुक्कर मारायचे . दिवसभर त्यासाठी जवळपास रानोमाळ भटकंती करायची . रानडुक्कर मिळाले तर विकायचे  नाहीतर निवांत पडी मारायची .

उघड्यावरच अंघोळी, उघड्यावर दगडाच्या चुलीवर स्वयंपाक, जंगलातील ओली सुकी झाडे शोधून बांधलेल्या उघड्या झोपड्या. त्याला कसलेही संरक्षण नाही. आयुष्याला कसलेही भविष्य नाही, पोरानां शाळा दफ्तरे नाहीत. कसली स्वप्ने, कसले अच्छे दिन, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? हे माहीत नाही.

त्याला सहज विचारले तुझे नाव काय ? तर म्हणाला रामजी . त्यांच्या मुलांची नावे तर खूप भारीभारीच होती . आता देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली . आपल्या देशाने तर खुप प्रगती केली .पाचशे वर्षानंतर रामाला घर मिळाले . अयोध्येत राममंदीर 

बांधण्यासाठी किती हजार कोटी गेले व अजून जाणार आहेत याची गणतीच नाही . आजच कळाले तीन कोटी रुपये तर एका दिवसात भक्तांकडून दानपेटीत जमा झाले .

हातातली जिलेबीची बॅग रामजीच्या मुलानां दिली .त्यानां प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावत बसलो नाही . कारण जिलेबी खाताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद मला प्रजासत्ताक दिन साजरा केल्यासारखा वाटला .

या रामजीसारख्यांचा वनवास कधी संपणार ? त्यांच्या मुलानां शाळा दफ्तरे कधी मिळणार ? त्यांनां राहायला घरेदारे , पोटासाठी कामधंदा कधी मिळणार ? त्यांच्या बायकांनां  ओल्या लाकडांची चुल जावून गॅसवर स्वयंपाक बनवायला कधी मिळणार ? त्यानां अच्छेदिन कधी येणार ?

पच्च्यांहत्तर वर्षात आपण किती प्रगती केली या विचारात ,देशभक्तीची गाणी मोठ्याने ऐकत मी परत निघालो . प्रजासत्ताक दिनाचा अर्धा दिवस आता संपला . . .

प्रत्येकाचा प्रजासत्ताक दिन सारखा नसतो .

प्रत्येकाचा प्रजासत्ताक दिन सारखा नसतो .

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “घरभरणी !” भाग -२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “घरभरणी !” भाग -२ श्री संभाजी बबन गायके 

(रीतसर पाणी वगैरे दिल्यानंतर तिने विचारले,”लवकर उरकला का उद्योग? कुणी सोबतीला नेलं होतं का?” यावर झाल्या प्रकाराची अगदी साग्रसंगीत पुनरावृत्ती झाली. याही वेळी गोविंदभटांचा आवेश तोच होता.) — इथून पुढे — 

आवाज ऐकून शेजारच्या घरातून नारायणपंत गोविंदभटांच्या ओसरीवर आले. नारायणभट गेली कित्येक वर्षे मुंबईला लेकाकडे असत. खरं तर गोविंदभटांना त्यांनीच तर भिक्षुकीचे धडे दिले होते. नारायणभटांचा धाकटा भाऊ म्हणून पंचक्रोशीतली गावकरी मंडळी गोविंदभटांचा रागीट स्वभाव चालवून घेत. शिवाय बामनकाका म्हणजे देव अशी भावना अजूनही गावांमध्ये आहेच. आणि नारायणपंतांच्या लाघवी स्वभावामुळे, यजमानांना अवाजवी खर्चात न पाडता पण तरीही धार्मिक कृत्यांत कुठेही तडजोड न करता सर्व कार्य पार पाडण्यात हातखंडा असण्याच्या कीर्तीमुळे हा आदर टिकून होता. नारायणपंतांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त शहरांत स्थिरावली आणि वाढत्या वयाचा भार, सुरू झालेली आजारपणं यांमुळे आपले वडील आपल्या नजरेसमोर असावेत या हेतूने मुलांनी नारायणपंतांना बळेच शहरात ठेवून घेतले होते. पण त्यांना गावकीची आंतरीक ओढ होतीच. संधी मिळेल तेंव्हा ते गावी परतत. आजही ते सकाळी सकाळीच गावी परतले होते.

नारायणपंतांनी झाला प्रकार समजून घेतला. आपण सुदामला वंशखंड होईल असा शाप दिल्याचा मात्र गोविंदभटांनी उल्लेख केला नव्हता. कदाचित आपण रागाच्या भरात असं बोलून जायला नको होतं, असंही त्यांना वाटलं होतं. आपल्या पोटी मूलबाळ नाही हे गोविंदभट कधी कधी विसरून जात. आणि मग त्यांच्या तोंडी असे शब्द येत असत. वास्तविक भिक्षुकीवाचून त्यांचं काही अडत नव्हतं. पण वाडवडिलांनी सांभाळलेली परंपरा ते पाळत असत. भिक्षुकीत फार काही पारंगत होते अशातलाही भाग नव्हता. मात्र थोरल्या भावाच्या, नारायणपंतांच्या हाताखाली काम करून करून गरजेपुरते विधी ते खूप मन लावून आणि छान करायचे. त्यामुळे लोक त्यांना सोडत नव्हते आणि ते लोकांना.

“गोविंद,चल कपडे घाल. सर्व सामान घे. आपण सुदामकडे जाणार आहोत!” नारायणपंतांनी आज्ञा केली. हे ऐकून गोविंदभट चपापले. नारायणपंतांनी गावातल्या वसंत जीपवाल्याला निरोप दिला. लगेच निघायचंय म्हणाले. तो ही लगबगीने हजर झाला. नारायणपंतांनी आपली ठेवणीतली टोपी डोईवर चढवली. स्वच्छ धोतर नेसले,अंगरखा चढवला,नवं कोरं उपरणं खांद्यावर टाकले आणि निघाले.

आपल्या घरासमोर जीप थांबलेली पाहून सुदामच्या घरातल्यांना आश्चर्य वाटले. सकाळी सकाळी गोविंदभटांनी उच्चारलेल्या शापवाणीने ते भोळे भाबडे लोक भांबावून गेले होते. आता उत्तरपूजेचे काय करायचं या विचारात होते. घरातले पाहुणे-रावळे अजूनही तसेच बसून होते.

“सुदामा,आहेस का रे घरात?” नारायणपंतांनी त्यांच्या नेहमीच्या प्रेमळ आवाजात हाक दिली आणि ओळखीचा आवाज ऐकून सुदाम धावतच बाहेर आला. समोर नारायणपंतांना पाहून त्याने पटकन खाली वाकून त्यांच्या पायांवर डोके ठेवले. सुदामचं नामकरणही नारायणपंतांनीच केलं होतं आणि त्याच्या लग्नातही भटजी म्हणून तेच हजर होते. “काका,तुम्ही?” तुम्ही तर मुंबईला होता ना?”

“अरे,चल आत चल. मग बोलू. तू आंघोळ केलीयेस का? नसली तर करून घे चटकन. आणि तुझ्या बायकोलाही तयार व्हायला सांग. आपण आधी उत्तरपूजा करून घेऊ!” नारायणपंत म्हणाले तसे सुदामच्या चेह-यावर आनंदाचे शिवार फुलले. हौसाबाई तरातरा बाहेरच्या खोलीत आल्या आणि खुर्चीवर बसलेल्या नारायणपंतांच्या पायांवर डोई ठेवली. “लई दिवसांनी दर्शन झालं,काका!”

“तुझा संधीवात कसा आहे,हौसाबाई!” “मी मागच्या वेळी सांगितलेलं औषध घेतीयेस ना अजूनही?”नारायणपंतांनी विचारले. तसे हौसाबाई म्हणाल्या,”तुमच्या औषधांचा गुण येतोय बघा,काका!” नारायणपंत म्हणजे पंचक्रोशीतलं चालतं-बोलतं सेवाकेंद्र. आयुर्वेदी औषधं,गावठी उपचार यांचा त्यांचा बराच अभ्यास होता.

तोवर सुदाम आणि त्याची बायको तयार होऊन आले. नारायणपंतांनी आपल्या खड्या,स्वच्छ,तयार वाणीने सुदामचे घर भरून टाकले. अगदी मुख्य पूजेच्या थाटात उत्तरपूजा बांधली. पाच आरत्या म्हटल्या आपल्या गोड आवाजात. गोविंदभट त्यांच्या सोबतच होते. पण सुदामच्या नजरेला नजर देत नव्हते फारशी. नारायणपंत आल्याचे पाहून शेजारच्या घरातले ज्येष्ठ लोकही सुदामकडे आले. नारायणपंतांनी त्यांची डोळ्यांनीच दखल घेतली आणि गोड हसले. म्हाता-या शिरपतनं “काय काका, बरं आहे ना?’ अशा अर्थानं आपले दोन्ही हात उंचावले आणि काकांनीही त्याला मान लववून प्रतियुत्तर दिले. घरात धुपाचा,उदबत्तीचा सुवास दरवळत होता.

सुदाम आणि त्याची बायको,नारायणपंतांच्या पायावर डोके ठेवते झाले. पंतांनी त्यांना तोंडभरून आशीर्वाद दिला. ती जोडी गोविंदभटांच्याही पायाशी वाकली…भटांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या तोंडून उदगार बाहेर पडले,”पुत्रवती भव!” आणि हे ऐकून सुदामच्या मनातलं मळभ दूर पळालं!

दोन्ही काकांसाठी दूध दिले गेले, ते त्यांनी स्विकारले. बोलता बोलता, सकाळी गोविंदभट नेमके काय म्हणाले होते हे सुदामने नारायणपंतांच्या कानांवर घातले होतेच. गोविंदभटांनी ‘पुत्रवती भव, कल्याणम अस्तू!” असा आशीर्वाद दिल्याचे ऐकून त्यांनाही बरे वाटले.

“सुदाम,अरे गोविंदचं काही मनावर घेऊ नकोस. रागाच्या भरात बोलला असेल तो. तसं त्याच्या मनात काही नव्हतं. आणि त्याने शाप दिला असला तरी आता आशीर्वादही त्यानेच दिलाय ना?” नारायणपंत सुदामला जवळ घेऊन म्हणाले. सुदामच्या डोळ्यांत ओलसरपणा दिसला. त्याची आईही पदराने डोळे पुसू लागली. “अरे,हे शाप बिप काही खरं नसतं. खरे असतात ते आशीर्वाद! मनापासून दिलेले! आणि सर्व आपल्या मानण्यावर असतं. तुम्ही अजूनही आम्हांला मान देता, पाया पडता हे काय कमी आहे?

सुदामने शिधा नारायणपंतांच्या पुढे ठेवला. त्यांनी तो गोविंदभटांना स्विकारायला सांगितला. सुदामने दक्षिणेचे पैसे असलेलं पाकीट नारायणपंतांच्या हाती ठेवले. त्यांनी मोजली रक्कम. पाचशे अकरा रुपये होते. नारायणपंतांनी त्यातील एक रुपया घेतला आणि बाकी रक्कम पाकीटात पुन्हा ठेवली. आणि ते पाकीट सुदामच्या हाती दिलं. “तुझी दक्षिणा पोहोचली मला…तुझा आधीच एवढा खर्च झालाय…ठेव तुला हे पैसे.! आणि पुजेवरची जमा झालेली चिल्लर,नोटा गावातल्या भैरोबाच्या दानपेटीत घाल”

एवढे बोलून नारायणपंत उठले. गोविंदभटांनीही पिशवी सावरत उंब-याच्या बाहेर पाऊल ठेवले. सुदामच्या घरातली झाडून सारी मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी अगदी रस्त्यापर्यंत आली होती. नुकतंच घरभरणी झालेलं सुदामचं नवं कोरं घर उन्हातही हसत उभं होतं!

– समाप्त –

(कथाबीज अस्सल. नावे, संदर्भ, स्थळ, प्रसंगांचा क्रम बदल करणे अपरिहार्य.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-२ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-२ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी फेस्टिवल निमित्त तीन दिवस आलेल्या गणेश कोकरे व सिद्धांत पिसाळ यांचे अनुभव  — पाचगणी या ठिकाणी लाईव्ह पेन्सिल स्केच करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले गेले होते. फेस्टिवल तीन तारखेला संपला व चार तारखेला सकाळी आम्ही महाबळेश्वर फिरण्याचे ठरविले. नऊच्या सुमारास आम्ही आमचे निसर्ग चित्रणाचे साहित्य बरोबर घेऊन मोटरसायकल वरून निघालो निसर्गाचा आनंद घेत घेत श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी पोहोचलो. गाडी पार्क केली व पायी चालत चालत कृष्णामाई मंदिर या ठिकाणी पोहोचलो. समोरचे निसर्ग सौंदर्य पाहून भारावून गेलो.  माझा विषय ‘वारसा’ असल्यामुळे कृष्णामाई मंदिर मला खूपच आवडले.  त्यामुळे लगेचच मी माझे निसर्गाचित्रणाचे साहित्य काढून एका कोपऱ्यामध्ये मंदिराचे स्केच करायला सुरुवात केली. कोणत्याही पर्यटकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊन मंदिर पूर्ण दिसेल अशा ठिकाणी बसलो. चित्र काढण्यात मग्न झालो सुंदर असा ठेवा समोर असल्यामुळे त्याचे चित्र रेखाटण्यात खूप आनंद होत होता माझ्याबरोबर सिद्धांत  होता तो ही एका कोपऱ्यात बसून चित्र काढत बसला होता जवळजवळ वीस मिनिटे आम्हा दोघांनीही मंदिराचे पेन्सिल स्केच केले माझे स्केच पूर्ण झाल्यामुळे मी जलरंगात रंगविण्यासाठी माझी पॅलेट व रंग बाहेर काढले रंगाला सुरुवात करणार तेवढ्यात लोंढे मॅडम आल्या व म्हणाल्या तुम्हाला या ठिकाणी चित्र काढता येणार नाही त्यांनी बंद करण्यास सांगितले काढलेले स्केच पुसून टाका असी तंबी दिली. मी छान चित्र झाल्यामुळे त्यांना विनंती केली चित्र काढायला कुठेही बंदी नसते पर्यटक सुद्धा फोटो काढत आहेत चित्र काढणे हा गुन्हा नाही. त्या खूपच भडकल्या चित्र पुसता येत नाही बहुतेक तुम्हाला म्हणून त्यांनी स्वतः खोडरबर हातात घेतला व चित्र खोडून काढले .मग चित्र पुसल्यावर तुम्ही इथे थांबू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे धमकावले व आम्हाला हाकलून दिले आम्ही त्यांना विनंती करत होतो तुम्ही आम्हाला स्थानिक पातळीवर परवानगी मिळवून द्या त्यांना आमचे कार्डही दिले मी कास पठार परिसरातील रहिवासी आहे ओळखपत्रही दाखवले फोन मधील मंदिरांची चित्रही दाखविली त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. चित्र काढू नका असा बोर्डही नाही म्हणाल्यावर त्यांनी आम्हाला तिथे थांबूच नका असे सांगितले मुंबईवरून परवानगी आणा असे सांगितले आम्ही त्यांच्याकडून लोंढे सरांचा नंबर घेतला त्यांनाही फोन केला परंतु त्यांनीही उलट सुलट उत्तरे देऊन फोन बंद केला आम्ही आमचे साहित्य गोळा केले पुसलेले स्केच घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेलो.

. . . . 

क्षेत्र महाबळेश्वर (कृष्णामाई मंदिर) या ठिकाणी चित्र काढत असताना आलेला एक अनुभव 

— गणेश तुकाराम कोकरे 

शिक्षण : G.D.Art 

व्यवसाय : चित्रकार (सातारा)

(प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यासाठी मुख्य अतिथी शोधायचे त्या कार्यक्रमांची तयारी करायची.) 

– इथून पुढे.  

मग वाई ते मुंबई ट्रान्सपोर्टसाठी ट्रक शोधायचा . त्याला मुंबईची माहीती नसते म्हणून ट्रकमध्येच बसून जायचे .हमाली आपणच करायची कारण सोबत माणूस नेले तर त्याची व आपली राहण्याची सोय नसते . आठ दहा दिवस लॉज किंवा हॉटेल बुकिंग करायचे . प्रतिदिवशी चार पाच हजार रुपये  त्याचा खर्च + GST चार्ज भरायचा . लॉजच्या ठिकाणापासून प्रवास , जेवण , खाणे ह्या रोजच्या त्रासाविषयी मुंबईत तर बोलायचेच नाही , निमूटपणे ते सगळे सहन करायचे .

त्यानंतर चित्र भिंतीवर टांगणे त्यासाठी सहा सात हजार रुपये ठरवून द्यायचे ते दिले नाहीतर तुमचा डिस्पेला लावलाच जात नाही . एकदा 2002 साली जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन होते . माझी खूपच वाईट परिस्थिती होती , त्यावेळी माझा शाळेचा कलाशिक्षकाचा पगार चारहजार सहाशे रुपये होता . सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत शाळेत वेळ द्यावा लागायचा . प्रदर्शनाची चित्रे लावण्यासाठी दाजी व मोरे नावाचे शिपाई होते . त्यांनी चित्र गॅलरीत लावायचे सात हजार रुपये मागितले . मी घासाघीस करून पैसे कमी करत होतो . सगळेच चित्रकार पैसेवाले नसतात हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो . ते म्हणाले ठिक आहे तुमची चित्रे तुम्हीच लावा . मी चित्र लावण्यासाठी स्टूल किंवा उंच  ॲल्यूनियमचा घोडा मागितला तर म्हणाले तो तुमचा तुम्ही आणायचा . आम्ही देणार नाही .आता मोठा प्रश्न पडला . माघार घेतली , नाईलाज होता . शेवटी पैसे द्यायला तयार झालो . प्रदर्शनाच्या सात दिवसात चित्रांच्या विक्रीनंतर देतो म्हणालो . दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता उद्‌घाटन होते , बाकीची तयारी करून प्रवास करून जहाँगीर आर्ट  गॅलरीत हॉलमध्ये पोहचलो तर चित्र जमीनीवर होती तशीच पडलेली . शेवटी मी , माझी पत्नी स्वाती आलेले मुख्य पाहुणे त्यांचे सुटाबुटातील सगळे मित्र व पाहुणे आमची पेंटींग्ज भिंतीवर लावत बसलो .नंतर उद्‌घाटन झाले . त्या दिवशी घामाने थबथबलो होतो ,चित्रकाराचा सारा संघर्ष सर्वांनी पाहीला .जीव नकोसा झाला त्यादिवशी . पण तरीही सहा हजार रुपये त्यांनी घेतले ते कायमचे डोक्यात लक्षात राहीले .

[मला मात्र गॅलरीत चित्र टांगायचा जॉब करावे असे वाटू लागले तो जॉब आवडला . कलाशिक्षक म्हणून पाचगणीच्या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत आर्ट टिचरचा जॉब करून साडेचार हजार रुपये पगार मिळविण्यापेक्षा जहाँगीरमध्ये वॉचमनचा पगार तर मिळतोच शिवाय एका रात्रीत एका हॉलचे चित्र टांगायचे  पाच सहा हजार मिळाले तर उत्तमच आणि आता तर प्रत्येक आठवडयाला जहाँगीरमध्येच सहा गॅलरी आहेत . एका महिन्यात चार आठवडे येतात]

कलाकार कलानिर्मिती करतो तोच तेवढा आनंदाचा क्षण असतो . कारण तो वेडा असतो . त्याला कलानिर्मितीच्यानंतरची व्यावसायिक गणिते जमत नाहीत. प्रदर्शनाच्या उत्सवाची तयारी करणे इतके सोपे काम नसते . त्यामूळे इच्छा असूनही चित्रांच्या किंमती कमी लावता येत नाहीत . कारण या चित्रांची चांगल्या किमंतीत विक्री होईल अशी त्याला आशा असते . त्यानंतर त्याला त्याचे कुटूंब , दैनंदीन घरखर्च ,  दुखणी , आजारपणे , वीजबील ,पाणीबील टॅक्सेस भरायचे असतात . शिवाय राजकीय नेत्यांसारखे , नोकरदारांसारखा नियमित पगार नसतो . राजकीय नेते पाच वर्षांनंतर निवृत्त झाले की त्यानां कायमस्वरूपी कुटूंबाला मोठ्या रकमेचे उतारवयात पेन्शन मिळते. याउलट आयुष्यभर कलाकार टेन्शनमध्येच जगत असतो . कारण या देशात कलाकार म्हणून जगणे मोठा शाप आहे . कलाकारांची आठवण राजकीय पुढाऱ्यानां, आयोजकानां त्यांचे कार्यक्रम पार पाडताना ॲक्टीव्हॅटीची शोभा वाढविण्यापुरती दाखवण्यापुरते असते . चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी एखादे प्रदर्शन भरवायचे  त्यानंतर कलाकारांची आठवणही येत नाही . ती आठवण जेव्हा पुढच्या वर्षाचा कार्यक्रम असेल त्यावेळीच येतो . 

प्रत्येक चित्र काढण्याची कथा , त्या चित्राची अनुभूती जशी वेगळी असते तसाच प्रत्येक प्रदर्शनाचा एक मोठा अनुभव असतो . प्रत्येक वेळी नवी माणसे भेटतात एक नवा अनुभव देऊन जातात . या अशा अनुभवातून थोडे थोडे शहाणपण येते त्या सुधारणा करत परत नवा अनुभव घेत जीवनचा प्रवास करत राहायचे.

पूर्वी माधव इमारते , श्रीराम खाडीलकर यांच्यासारखे कलासमीक्षक नियमित प्रदर्शन पाहायला यायचे , गप्पा मारायचे व माहीती घेऊन सुंदर लेख वृत्तपत्रांमध्ये छापून यायचे . ते वाचून अनेक कलारसिक गॅलरीत प्रदर्शन बघायला यायचे . एकदा तर दूरदर्शनच्या रत्ना चटर्जी यांनी चांगली मोठी मुलाखत घेऊन चित्रप्रदर्शनाला मोठी प्रसिद्धी दिली याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे कसलीही पैशांची दक्षिणा मागितली नाही . पण आता प्रिंट मिडीया व टिव्ही मिडीया कलाकारांवर नाराज झाला आहे . या कलांकारांचे लेख लिहून आम्हाला काय फायदा ? मग अर्थकारण , राजकारण सगळे आले . भरपूर पैसे दिले तर मोठी बातमी येते .कलाकार सक्षम असला की तो सगळे करतो . पण छोट्या कलाकारांच्या प्रदर्शनाची दखल कोणी घेत नसते . करीना कपूरचे बाळ (तैमूर )आता रांगत चालतो . काल त्याला दोनदा शी झाली अमक्या तमक्या नटाचा नटीचा ब्रेकअप झाला . कोणाचा डिवोर्स झाला या बातम्यांसाठी त्यांच्याकडे जागा असते पण चित्रकलेचे किंवा इतर कलाकारांच्या इव्हेन्टसची दोन ओळीची साधी बातमी छापण्यासाठी त्यांच्या वृत्तपत्रात जागा नसते .

आमच्या सातारा जिल्हयात तर एकही कलादालन नसल्याने कलाकार जिवंत आहेत का नाहीत हेच माहीती पडत नाही . आम्ही फक्त औंधच्या राजांचे कौतूक करून भवानी संग्रहालय साताऱ्यात आहेत याचा अभिमान बाळगणार . पण देशाच्या पच्च्यांहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्यात एकही आर्ट गॅलरी निर्माण न करणाऱ्या राजे व नेत्यांविषयी काय बोलावे व कोण बोलणार ? सगळं अवघड प्रकरण आहे .मग कलाकारच निर्माण होत नाहीत .कलाप्रदर्शने होत नाहीत व कलारसिकही निर्माण होत नाहीत . सगळे कलाकार मग पुण्यामुंबईत प्रदर्शन करायला धावतात त्यानां पर्यायच नसतो दुसरा .

त्यामूळे प्रदर्शन करणे हे एक दिव्यसंकट असते . ते पार पाडताना अनंत अडचणी येत असतात . प्रदर्शनाच्या काळात मोर्चे , आंदोलने , दंगली , बॉम्बस्फोट , रास्तारोकोसारखे प्रकार आले की प्रदर्शन संपूर्ण आर्थिकदृष्टया झोपते व कलाकारही कायमचा संपतो . म्हणून मी नेहमी म्हणतो हे माझे शेवटचे प्रदर्शन आहे .

पण सच्चे खरे कलाकार कधी संपत नसतात . कलानिर्मितीची आस त्यानां संपून देत नाही . ते सतत नव्या विषयांचा , नव्या प्रदर्शनाचा ध्यास घेऊन नव्या दिवसाची सुरवात करतात . कारण कला हेच त्यांचे जीवन असते . एक चित्रप्रदर्शन पाहणे म्हणजे त्या चित्रकाराचा विचार , त्याचा दृष्टीकोन , त्याचा ध्यास, त्याचे संपूर्ण जीवन , त्याचे व्यक्तिमत्व त्याची कलासाधना समजून घेणे असते .

– समाप्त – 

(स्वाती व सुनील काळे यांच्या पाचगणी , वाई व महाबळेश्वर परिसरांतील ” व्हॅलीज अँन्ड फ्लॉवर्स ” या शीर्षकाखाली भरणाऱ्या चित्र प्रदर्शनाला सर्व कलाकार व कलारसिकानां सप्रेम निमंत्रण !) 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-१ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-१ ☆ श्री सुनील काळे 

पाचगणी फेस्टिवल निमित्त तीन दिवस आलेल्या गणेश कोकरे व सिद्धांत पिसाळ यांचे अनुभव  — पाचगणी या ठिकाणी लाईव्ह पेन्सिल स्केच करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले गेले होते. फेस्टिवल तीन तारखेला संपला व चार तारखेला सकाळी आम्ही महाबळेश्वर फिरण्याचे ठरविले. नऊच्या सुमारास आम्ही आमचे निसर्ग चित्रणाचे साहित्य बरोबर घेऊन मोटरसायकल वरून निघालो निसर्गाचा आनंद घेत घेत श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी पोहोचलो. गाडी पार्क केली व पायी चालत चालत कृष्णामाई मंदिर या ठिकाणी पोहोचलो. समोरचे निसर्ग सौंदर्य पाहून भारावून गेलो.  माझा विषय ‘वारसा’ असल्यामुळे कृष्णामाई मंदिर मला खूपच आवडले.  त्यामुळे लगेचच मी माझे निसर्गाचित्रणाचे साहित्य काढून एका कोपऱ्यामध्ये मंदिराचे स्केच करायला सुरुवात केली. कोणत्याही पर्यटकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊन मंदिर पूर्ण दिसेल अशा ठिकाणी बसलो. चित्र काढण्यात मग्न झालो सुंदर असा ठेवा समोर असल्यामुळे त्याचे चित्र रेखाटण्यात खूप आनंद होत होता माझ्याबरोबर सिद्धांत  होता तो ही एका कोपऱ्यात बसून चित्र काढत बसला होता जवळजवळ वीस मिनिटे आम्हा दोघांनीही मंदिराचे पेन्सिल स्केच केले माझे स्केच पूर्ण झाल्यामुळे मी जलरंगात रंगविण्यासाठी माझी पॅलेट व रंग बाहेर काढले रंगाला सुरुवात करणार तेवढ्यात लोंढे मॅडम आल्या व म्हणाल्या तुम्हाला या ठिकाणी चित्र काढता येणार नाही त्यांनी बंद करण्यास सांगितले काढलेले स्केच पुसून टाका असी तंबी दिली. मी छान चित्र झाल्यामुळे त्यांना विनंती केली चित्र काढायला कुठेही बंदी नसते पर्यटक सुद्धा फोटो काढत आहेत चित्र काढणे हा गुन्हा नाही. त्या खूपच भडकल्या चित्र पुसता येत नाही बहुतेक तुम्हाला म्हणून त्यांनी स्वतः खोडरबर हातात घेतला व चित्र खोडून काढले .मग चित्र पुसल्यावर तुम्ही इथे थांबू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे धमकावले व आम्हाला हाकलून दिले आम्ही त्यांना विनंती करत होतो तुम्ही आम्हाला स्थानिक पातळीवर परवानगी मिळवून द्या त्यांना आमचे कार्डही दिले मी कास पठार परिसरातील रहिवासी आहे ओळखपत्रही दाखवले फोन मधील मंदिरांची चित्रही दाखविली त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. चित्र काढू नका असा बोर्डही नाही म्हणाल्यावर त्यांनी आम्हाला तिथे थांबूच नका असे सांगितले मुंबईवरून परवानगी आणा असे सांगितले आम्ही त्यांच्याकडून लोंढे सरांचा नंबर घेतला त्यांनाही फोन केला परंतु त्यांनीही उलट सुलट उत्तरे देऊन फोन बंद केला आम्ही आमचे साहित्य गोळा केले पुसलेले स्केच घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेलो.

. . . . 

क्षेत्र महाबळेश्वर (कृष्णामाई मंदिर) या ठिकाणी चित्र काढत असताना आलेला एक अनुभव 

— गणेश तुकाराम कोकरे 

शिक्षण : G.D.Art 

व्यवसाय : चित्रकार (सातारा)  

काही दिवसांपूर्वी मला व्हॉटसॲपवर माझ्या सातारा येथील या चित्रकार मित्राने हा मेसेज पाठवला . खूप वाईट वाटले . शासकीय व्यवस्थेविषयी खूप राग , संताप आला . हतबलता आली .मग जेष्ठ चित्रकार वासुदेव कामत , गायत्री मेहता यांच्याशी फोनवर बोललो . पण सर्वांना आलेले अनुभव सारखेच होते . सत्तेपुढे शहाणपण चालत नाही . मला सांगा या मंदिराचे प्रोफेशनल कॅमेऱ्याने फोटो काढले तर चालतात , व्हिडीओ शुटींग केले तरी चालते मग चित्रकाराने चित्र काढले तर काय त्रास होतो? एखादया चित्रकाराची दोन चार तासाची मेहनत खोडून टाकणारे हात किती अरसिक , असंस्कृत , क्रूर असतील .

एकदा सकाळी फिरत असताना मेणवलीच्या वाड्याजवळ 4 “x 6 ” इंच इतक्या छोट्या आकाराचे पेनमध्ये स्केच करत होतो . इतक्यात केअरटेकर बाई आली.  तिने चित्रकाम अर्ध्यातच आडवले . अशोक फडणीसांची परवानगी घ्यावी लागेल म्हणाली म्हणून फोन केला तर फडणीस म्हणाले चित्रकार येतात , चित्र काढतात, प्रदर्शनात मांडतात, लाखो रुपये कमवतात मग आम्हाला काय मिळणार ? मी म्हणालो तुम्हाला शुटींगचे दिवसाला एक लाख रुपये मिळतात , वाडा पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांकडून तीस रुपये गाडी पार्किंगचे व पन्नास रुपये प्रवेशमूल्य घेता मग चित्रकारांकडून पैसे का घेता ? तर म्हणाले आता प्रथम अर्ज करा नंतर चित्राची साईज , कोणत्या माध्यमात चित्र काढले आहे ते तपासून विक्रीची किंमत पाहून आमचे कमीतकमी पाचहजार तरी द्या व लेखी परवानगी घेऊन अर्ज देवूनच नंतर चित्र काढायला या. मग तेथे लगेच चित्रकाम थांबवले .परत वाड्यात व मेणवली घाटावर खास चित्र काढायला गेलोच नाही . 4 ” x 6″ इंचाच्या छोट्या पेनने रेखाटलेल्या चित्राची किंमत किती असते ? मी मलाच प्रश्न विचारला ? खरंच चित्रकाराला रोज पाच हजार रुपये मिळाले असते तर तो किती श्रीमंत झाला असता ? अशी रोज चित्रे घेणारा कोणी मिळाला तर मी रोज घाटावरच चित्र काढत बसलो असतो . किती चित्रकार करोडपती झाले याचे अशोक फडणीसांनी संशोधन ,सर्वे  केला पाहिजे तरच खरी  चित्रकार मंडळी कोणत्या परिस्थितीत जगतात हे त्यांनां कळेल .

खरं तर तो चित्रकार त्या रेखाटनातून आनंद मिळवतो . त्याच्या रियाजाचा अभ्यासाचा तो एक भाग असतो . शिवाय आपल्या चित्रातून तो स्पॉट ते ठिकाण अजरामर करतो. तो ऐतिहासिक ठेवा होतो . नंतर कितीतरी वर्षांनी ते स्केच , चित्र एक महत्वाचे डॉक्यूमेंटच ठरते .

पण पैसा महत्वाचा ठरतो . लालफितीच्या सरकारी नियमांविषयी तर काय बोलावे ? आता घाटावर वॉचमन असतो . मोबाईलने फोटो काढले तर चालतात पण मोठा कॅमेरा दिसला की तो अडवतो , प्रथम पाचशे रुपये द्यावे लागतात मग कितीही फोटो काढले व्हिडीओ शुटींग केले तरी चालते. हा मेणवलीचा एक अनुभव सांगतोय असे कितीतरी त्रासदायक अनुभव माझ्या मनात साचलेले आहेत .अनेक कलाकारानां असे अनुभव येत असतात .

एक चित्रकार प्रथम स्पॉटवर जाणार , त्याचे निरिक्षण व अभ्यास करणार , नंतर चित्रांचे सामान आणून संपूर्ण दिवसभर भटकत वेगवेगळ्या अँगलने रेखाटन करणार व नंतर एक फायनल रंगीतचित्र तयार करणार . या कष्टांचे मोल समजणारी माणसे संपली की काय असे वाटते . 

प्रदर्शन करणे म्हणजे एक लग्नकार्य करण्यासारखे असते . मुंबईत प्रथम दोनचार वर्ष बुकींग करून अगोदरच पैसे भरून मिळेल ती तारीख स्विकारावी लागते कारण आपल्याला सोयीच्या मुहूर्तावर हव्या त्या तारखा तर कधी मिळत नाहीत . ते देतील ती तारीख घ्यावी लागते . मग तो भर पावसाळा असो की ऑफ सिझन असो . प्रथम चित्र तयार करायची . त्यासाठी हार्डबोर्ड , ग्लास , माऊंटींग करून फ्रेमिंग करून घ्यायचे . फ्रेमर्सकडे तेवढी जागा नसते म्हणून चित्रे परत घरी आणायची .प्रवासात नुकसान होऊ नये म्हणून बबलशीटमध्ये परत पॅकींग करायची . मग प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका किंवा रंगीत ब्रोशर्स छापायचे नंतर बायर्स लिस्ट मिळवून सर्वानां पोस्टाने किंवा कुरीअरने पाठवायचे . प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यासाठी मुख्य अतिथी शोधायचे..  त्या कार्यक्रमांची तयारी करायची . 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तेरा साबून स्लो हैं क्या?…” – लेखक : डॉ. सचिन लांडगे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “तेरा साबून स्लो हैं क्या?…” – लेखक : डॉ. सचिन लांडगे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

हळूहळू किती खर्च आपण वाढवून घेतलेत काही कल्पना आहे का? सकाळी उठल्यापासून.. “टूथपेस्ट में नमक” असायला पाहिजे, चारकोल असायला पाहिजे.. लौन्ग, दालचिनी, विलायची, अजून काय काय टाकतील..! दात घासायचेत का दातांना फोडणी द्यायचीय, काय माहिती? आणि सगळ्याच टूथपेस्ट “डेंटिस्ट का सुझाया नंबर वन ब्रँड” असतात..  रातभर ढिशूंम ढिशूंम..

टूथब्रश च्या ब्रिसल्स वर जितके संशोधन झालेय तितके संशोधन ‘नासा’त तरी होतेय का नाही कुणास ठाऊक!! कोनें कोनें तक पहुँचने चाहिए म्हणून मग आडवे तिडवे उभे सगळे प्रकार आहेत.. असोत बापडे.. पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथो का असतो, हे मला अजून समजलं नाही..!

अंघोळीचा साबण वेगळा, चेहरा धुवायचा वेगळा.. जेल वेगळं.. फेसवॉश वेगळं.. दूध, हल्दी, चंदन आणि बादाम ने अंघोळ तर क्लिओपत्राने पण केली नसेल, पण आता गरीबातली गरीब मुलगी पण सहज करतेय..

आधी शिकेकाईने पण काम भागायचं, मग शॅम्पू आला, मग समजलं की, शॅम्पू के बाद कंडिशनर लगाना भी जरुरी हैं..

भिंतीला प्लास्टर करणं स्वस्त आहे, पण चेहऱ्याचा मेकअप फार महागात पडतो.. पण तो केलाच पाहिजे.. नाहीतर कॉन्फिडन्स लूज होतो म्हणे.. “दाग अच्छे हैं” हे इथं का नाही लागू होत काय माहिती..

मी “गॅस, नो गॅस” करत सगळे डिओ वापरून बघितले.. पण “टेढ़ा हैं, पर मेरा हैं” म्हणत एक पण पोरगी कधी जवळ आली नाही.. खरंच.. सीधी बात, नो बकवास..

केस सिल्की हवेत, चेहरा तजेलदार हवा, त्वचा मुलायम हवी, रंग गोरा हवा आणि परफ्यूमचा सुगंधी दरवळ हवा बस्स.. बाकी शिक्षण, संस्कार, बॉडी लँग्वेज, हुशारी, हे गेलं चुलीत..

मला तर वाटतं, काही दिवसांतच सगळीकडे संतूर गर्ल, कॉम्प्लॅन बॉय, रॉकस्टार मॉम आणि फेअर अँड हॅन्डसम डॅड दिसतील.

साबुन से पण किटाणू ट्रान्सफर होतें हैं म्हणे..!! (हे म्हणजे, कीटकनाशकालाच् कीड़े लागण्यासारखं आहे!) आता, तुमचा साबण पण स्लो असतो.. मग काय.. धुवत रहा, धुवत रहा, धुवत रहा..

टॉयलेट धुवायचा हार्पिक वेगळा, बाथरूमसाठीचा वेगळा..! मग त्यात खुशबुदार वाटावं म्हणून ओडोनिल बसवणं आलंच.. जसं काय मुक्कामच करायचाय तिथे..

हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी, मशीनने धुणार असाल तर वेगळी.. नाहीतर, तुम्हारी महँगी वॉशिंगमशीन भी बकेट से ज्यादा कुछ नहीं, वगैरे…

आणि हो, कॉलर स्वच्छ करण्यासाठी वॅनिश तर पाहिजेच, आणि कपडे चमकविण्यासाठी “आया नया उजाला, चार बुंदोवाला”.. विसरून कसं चालेल..?

“अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?” हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे.. म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे महामूर्ख आणि त्यात हॉर्लीक्स मिसळणारेच तेवढे हुशार.. ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं.. … आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग…

“इसको लगा डाला, तो लाईफ़ झिंगालाला” म्हणून मी टाटा स्काय लावलं खरं.. पण ते एचडी नाहीये.. म्हणून मग मी घरात टिव्ही बघत असलो की लगेच दार लावून घेतो.. न जाणो, कुठूनतरी पाचसात पोरं नाचत येतील आणि “अंकल का टिव्ही डब्बा, अंकल का टिव्ही डब्बा”.. म्हणून माझ्या ४०,०००च्या टिव्हीला चक्क डब्बा करतील.. याची धास्तीच वाटते..

“पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो”च्या जमान्यात आपणच खरे इस्तेमाल होतोय.. काल घेतलेल्या वस्तू, एक्सपायर व्हायच्या अगोदरच् आऊटडेटेड होताहेत.

माणसांचंही तसंच आहे म्हणा… असो. 

लेखक : डॉ. सचिन लांडगे.

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमुटभर आपुलकी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ चिमूटभर आपुलकी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

रोजच्याप्रमाणेच आजही तो घाईघाईत कामावर निघाला. आणि दोनच मिनिटांत घरी परतला. बेल वाजल्यावर आईने दार उघडलं, तिला वाटलं – हा बहुधा डबा, किल्ली, पाकीट काहीतरी विसरला धांदरटपणे. पण तो घरात शिरलासुद्धा नाही. दारातूनच आईला म्हणाला, “मी निघालो तेव्हा तू आंघोळीला गेली होतीस. तुला टाटा केला नव्हता, म्हणून परतलो. टाटा. चल, मी पळतो.” म्हणत तो परत गेलापण. आज त्याची रोजची ९:१३ चुकणार होती. पण त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आज दिवसभर हसू राहणार होतं.

आज ऑफिसासाठी डबा भरताना, तिनं एका छोट्या डबीत लिंबाचं लोणचं घेतलं होतं. तिच्या ऑफिसमधली स्मिता परवा दुसऱ्या कोणाला तरी सांगत होती, तिला सध्या लोणचं खावंसं वाटत होतं म्हणून. 

आज तो ऑफिसहून घरी येताना, गरमागरम बटाटेवडे घेऊन आला होता. त्याचे निवृत्त वडील चाळीतल्या त्यांच्या घरासमोरील व्हरांड्यात बसले होते. याने त्यांना ते वडे देऊ केले. हा शाळकरी असताना, त्याचे वडील ऑफिसमधून येताना, कधीकधी, त्याच्यासाठी असंच काहीतरी चटकमटक आणायचे. त्यांना ते आठवलं आणि मोतीबिंदू झालेले त्यांचे डोळे चष्म्याआडून लुकलुकले. 

त्याच्या गिरणीत – कंपनीत हडताळ चालू होता. खर्च भागवताना तो मेटाकुटीला आला होता. बायकोशी त्याचं यावरूनच बोलणं चाललं होतं. एवढ्यात त्यांचा दुसरीतला मुलगा आपली पिगी बँक घेऊन आला, त्याला दिली आणि म्हणाला, “बाबा, हे घ्या. माझ्याकडे चिक्कार पैसे आहेत.”

लेकीच्या कॉलेजमध्ये आज “साडी डे” होता. हिने आज तिच्या आईची आठवण असलेली तिची सर्वात लाडकी साडी लेकीला दिली.

ऑफिसमध्ये तो तसा कडक शिस्तीचा बॉस म्हणून ओळखला जाई, पण चहा पिऊन परतताना तो रोज वॉचमनसाठी चहा घेऊन येई, हे कोणालाच ठाऊक नव्हतं.

त्याचे वडील रस्त्यावरील एका अपघातात अचानक वारले. हा जेमतेम कॉलेजमधून बाहेर पडलेला. दोन वर्षांपूर्वी ज्या मित्राशी भांडण झाल्याने अबोला धरला होता, तो आला, आणि पैशाचं एक पाकीट त्याला देऊन गेला, “राहू देत, लागतील,” म्हणाला. 

आज ती एक नवी रेसिपी ट्राय करत होती. Sugar free टॅब्लेटस् घालून मिठाई करत होती. सासूबाईंना मधुमेह असल्याने, कालच एका बारशाला तिने त्यांना गोडधोड खाऊ दिलं नव्हतं.

माहेरी असताना लाडकं शेंडेफळ म्हणून खूप नखरे होते तिचे. आज ती आई झाली होती, लेकाला सर्दी झाली होती. रात्री झोपला की शेंबडानं नाक चोंदायचं लेकाचं. त्याला कडेवर उभं धरून, ही रात्ररात्र बसून रहायची. 

आज तिचा वाढदिवस होता. हा ऑफिसमधून येताना एक मस्त सुवासिक गजरा घेऊन आला तिच्यासाठी, आणि नाटकाची दोन तिकिटं.

या धकाधकीच्या जीवनात, सुख मिळवण्यासाठी दरवेळी वारेमाप पैसा खर्च करायची गरज नसते. ही चिमूटभर आपुलकी पुरते, घेणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामायण… ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ रामायण… ☆ श्री सुनील काळे 

माझ्या लहानपणी दर श्रावण महिन्यात आमच्या पाचगणीच्या घरी वर्षातून एकदा सत्यनारायणाची पुजा असायची. या संपूर्ण महिन्यात एका धार्मिक ग्रंथाचे रोज रात्री जेवणानंतर अध्यायवाचन व्हायचे. माझे वडील जरा धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनां फार उत्साह असायचा. एकत्र कुटूंब पद्धतीने आम्ही राहायचो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या भरपूर होती. त्यावेळी जेवणानंतर सगळेच्या सगळे एकत्र बसायचे. कान देऊन माना डोलवत सगळे ऐकत राहायचे. वडील प्रत्येक ओळ वाचली की सर्वानां अर्थ समजून सांगायचे. दरवर्षी कधी हरिविजय, रामायण किंवा नवनाथांच्या कथांचा अध्याय लावला जायचा. त्या प्रत्येक अध्यायावर पहिल्या पानावर ब्लॅक ॲन्ड व्हाईट पेनने काढलेली रेखाचित्रे असायची. मी चित्रे पहात बसायचो. कधी कधी पाचगणीच्या लायब्ररीत चांदोबा किंवा अमर चित्रकथेची कॉमिक्स वाचायला मिळायची. ग्रंथपाल असलेले कमरुद्दीनचाचा आम्हा लहान मुलानां ती पुस्तके  फुकट वाचायला द्यायचे. त्यासाठी एक वेगळे कपाट विद्यार्थी वाचनालयात ठेवलेले असायचे.

बालवयात हाताने काढलेली ती रेखाचित्रे पाहून मी आचंबित व्हायचो. ती चित्रे पाहणे, त्याच्या कॉपी करणे, त्यांचा संग्रह करणे याचे नंतर वेडच लागले. पण आपणही कधी कॉमिक्स करू असे त्यावेळी जराही वाटले नाही.

पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थी सहाय्यक समिती व महानगरपालीकेच्या घोले रोडवरच्या आंबेडकर वसतिगृहात राहत होतो. त्या रस्त्यावर नेहमी येणे जाणे व्हायचे. कोणी तरी सांगितले अमर चित्रकथा या कॉमिक्स कंपनीची पुस्तकातील चित्रे काढणारे चित्रकार प्रताप मुळीक या रामचंद्र सभामंडपाच्या गल्लीतच राहतात. मग एकदा मोठा धीर एकवटून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या घरी गेलो. मला कामाची गरज तर होतीच पण त्यापेक्षा प्रताप मुळीक दिसतात कसे हे पाहण्याची उत्सुकता खूप होती. अतिशय शांत स्वभावाचे, उंच, सडपातळ शरीरयष्टी, पँट व पांढरा झब्बा घातलेले, बुल्गानिन दाढी व डोक्यावर उलट्या दिशेने फिरवलेले केस व मिस्किल हास्य असलेले मुळीक सर पहिल्याच भेटीत आवडले. आणि त्यांनी कसलीही अट न ठेवता त्यांच्या मुलाच्या मिलींद मुळीकच्या परस्पेक्टीव्ह रेंडरींगच्या कामासाठी स्टुडिओत येण्याची व काम करण्याची परवानगी देखील लगेच दिली.

प्रताप मुळीक एक अफाट अलौकीक बुद्धीचे व्यक्तिमत्व आहे हे लवकरच लक्षात आले. त्यांचा मानवी शरीरशास्त्र व पौराणिक चित्रकथा काढण्यासाठी लागणाऱ्या सर्वच क्षेत्रातील व्यासंगाचा आवाका फार मोठा आहे हे लक्षात आले. उदा. पुरातत्व विभागातील वस्तूंचा, इमारतींचा, यथार्थदर्शनशास्त्राचा (परस्पेक्टीव्हचा ) ऐतिहासिक वस्तूंचा, तलवारी पासून त्या त्या काळातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा, प्राण्यांचा, घोडागाडी ते अत्याधुनिक गन्स, रेल्वे, जीप्स, वाहने, झाडे, डोंगरदऱ्या, आभुषणे, वेशभूषा यांचा इतका प्रचंड अभ्यास होता की कॉमिक्सचे स्क्रिप्ट आले की दोन तीन तासातच त्यानां संपूर्ण कॉमिक्सची चित्रे डोळ्यांसमोर दिसत व त्याच्यां मुक्त फटकाऱ्यांच्या शैलीत राम, कृष्ण, बुद्ध, येशू, महावीर, वेगवेगळे संत, महंत, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक थोर साधुपुरुष, महाराणाप्रताप ते शुजा, इन्स्पेक्टर विक्रम, नागराज, अमिताभ, अशी अनेक दृश्य अदृश्य सजीव, निर्जिव काल्पनिक व वास्तव पात्रे कागदावर पेन्सिलने उमटत. कधी आकाशातून, कधी डोंगरावरून, कधी समोरून, कधी खूप खालून दिसणारी वेगवेगळया प्रतलांवरची त्यांनां चित्ररेखाटने सहज करताना पाहून  पाहणाऱ्या आमच्यासारख्या नवशिक्या चित्रकारांचा मेंदू बधीर व्हायला लागायचा. वाटायचे किती काम करायला पाहीजे. सतत रेखाटने करायला हवीत. समोर दिसते ते  दृश्य मग ते घर, ऑफीस, शाळा, इमारती, दुकाने, रेल्वेस्थानके, बसस्टॉप, झाडे, डोंगर जेजे समोर दिसेल तशी सतत रेखाटने करण्याची सवयच लागली. हात बंद असला तरी मेंदू व स्मरणशक्ती कधी बंद पडू देऊ नका असे बाबा नेहमी सांगायचे. त्यांचा मुलगा मिलिंद साधारण आमच्या वयाचा तो त्यानां बाबा म्हणायचा म्हणून आम्हीसुद्धा त्यांनां बाबा म्हणायचो. स्त्री असो वा पुरुष नुसती ॲक्शन महत्वाची नसते, नुसती शरीराची ठेवण महत्वाची नसते तर माणसे बोलतात कशी ? त्यांचे हातापायाची, बोटांची पेरे, पंजाची ठेवण कशी बदलतात यावर लक्ष द्यावे प्रत्येक चेहरा बोलतो तो नीट पहा असे ते शांतपणे सांगत. मानवी भावभावनांचा अभ्यास करून माणसाचे सुख, दुःख, राग, हास्य, आनंद, क्रौर्य, त्रास अशा भावना चेहऱ्यावर दिसल्या पाहिजेत, प्रत्येक अँगलने त्याचे निरिक्षण करायला पाहिजे यावर त्यांचा भर असे. माणसाची उंची व त्यांच्या आजूबाजूच्या सर्वांचा पोशाख वेगवेगळा असला पाहिजे. समोरचा माणूस साधू असला तर त्याचा सात्विक भाव चेहऱ्यावर आला पाहिजे, दुष्ट वृत्तीचा, गुंड माणूस दाखवायचा असेल तर त्या व्यक्तिरेखेच्या पोशाखातून, त्याच्या ॲक्शनमधून त्याचे कॅरेक्टर दिसले पाहीजे त्यासाठी माणसांचे सतत निरिक्षणे करत राहा असे ते सांगत, पौराणिक मालीकांमध्ये कर्णभूषणे, गळ्यातील हार, हातातली अंगठी असो वा कपाळावरील गंध असो त्याकडे लक्ष द्या. तलवारीची रचना, रथ, त्यांचे घोडे, बैलगाडी, वाघ, सिंह यांचे डोळे त्यातील भाव चित्रात दिसले पाहिजेत अशा अनेक छोट्या गोष्टी स्टुडीओमध्ये रेखाटन करताना ते सांगत असत. ते आमच्यासाठी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.

आपणही कॉमिक्स क्षेत्रात काम करायचे असे मी ठरवले होते. त्यासाठी रात्ररात्र जागून शिवाजीनगरच्या बसस्टॉपवर आम्ही काही मित्रमंडळी स्केचिंग करत असायचो. पण माझे दुर्देव असे की शिकत असतानाच त्यानां हैदराबाद येथील मोठ्या कॉमिक्स बनवणाऱ्या कंपनीने बोलावून घेतले व प्रताप मुळीक सहकुटूंब हैदराबादला काही वर्षांसाठी शिफ्ट झाले व आमचा कॉमिक्स शिकण्याचा अभ्यासही थंडावला.

१९८७-८८ साली अभिनेता अरुण गोविल, दिपिका यांची रामानंद सागर दिग्दर्शक व निर्माते असलेली ‘ रामायण ‘ ही सिरियल टिव्हीवर खूप प्रसिद्ध झाली, खूप गाजली. त्या कलाकारांना घेऊन अमर चित्रकथा या कंपनीने एक कॉमिक्स केले होते. त्यावेळी मी देखील माझ्या अभ्यासासाठी मुळीकांचे एक हस्तलिखित कॉमिक्स तयार केले होते. त्या संपूर्ण कॉमिक्सची रेखाटने, त्याची कॅलिग्राफी, त्याचे मुखपृष्ठ, अगदी वेळ देऊन मन लावून करताना प्रचंड आनंद मिळाला होता. आज तीन तपानंतर ते हस्तलिखित, हस्तचित्रित, रोटरींग पेनने सुलेखन केलेले  कॉमिक्स बाहेर काढले कारण त्याचा विषय होता ‘ रामायण ‘.

आज वाईला बाजारात गेलो होतो. सगळीकडे रांगोळ्या, भगवे झेंडे, गुढया, लहान मुलांच्या रामायणातील वेशभूषा, रामाची गाणी ऐकून व फेसबुकवरच्या अनेक चित्रकारांची रामायणावरील चित्रे पाहून मी केलेल्या सुनील कॉमिक्सची व मूळ चित्रकार प्रताप मुळीक बाबांची खूपच आठवण आली.

छतीस वर्षांपूर्वीचे एक हस्तलिखित कॉमिक्स माझ्या वडीलांची व प्रताप मुळीकांची आठवण करून गेले.

आता ती ध्यासाने पछाडलेली निरागस ध्येयवेडी माणसे काळाच्या पडद्याआड गेली.

आता उरल्या फक्त त्यांच्या आठवणी…. ‘ रामायण ‘ कॉमिक्सच्या रुपात…….

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares