मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “== जीभ ==” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “== जीभ ==” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जीभ चालते, सुटते, चावली ही जाते

उचलता जिभेला ती टाळ्याला लागते

हाड नाही तिला, वळेल तसे बोलते

 चाटता जिभल्या कोणी चोचले पुरविते॥१॥

*

सोडताच सैल जीभ म्हणे लगाम घालावा

जीभ चाळवता आवळती ताबा ठेवावा

धार लावून बसू नये तिला आवर घालावा

दावली म्हणून हासडू नये तुकडा न पाडावा॥२॥

*

जीभ वेडावते जडावते चुरचुर करते

काळी जीभ फाटकी जीभ चुकचुक करते

जीभ घोळवित बोलता साखरपेरणी करते

दांडपट्टा जिभेचा चालता कोणा गारद करते॥३॥

*

जीभेचा शेंडा मिरवी कोणी कोणाला शेंडाच नसतो

मुळ पोटात जीभेचे हाताने करता चाखतो

कोणी उगाच जीभ नाकाला की लावतो

गिरणी पट्ट्यासम चालता त्यास सुमार नसतो॥४॥

*

जिभेने चाटून खाताना चव त्यावर रेंगाळते

कधी टाळूला चिकटता वळवळ न करते

जीभ दाताखाली येता तिला जिभाळी लागते

कडवटपणा येता जिभेवर तीळ भिजू न देते॥५॥

*

दोन जीभा असू नये, काळा तीळही नसावा

नको तिचे हुळहुळणे तिखटपणाही नसावा

नको ऐनवेळी लुळी पडाया त्यावर फोडही न यावा

सरस्वतीचे नर्तन करीत जिभेवर साखर खडा असावा॥६॥

*

अशी जीभ बहुगुणी योग्य वापर करावा

पडजीभेविना अधुरी तिचा विसर न पडावा

जीभ देवाची देणगी तिला जपू सारेजण

गोड बोलून तिच्या योगे जपू माणूसपण॥७॥

– कवयित्री : वर्षा बालगोपाल 

तुम्हाला कळले का यात जिभेशी संलग्न किती वाक्प्रचार, म्हणी आल्या आहेत ते? चक्क 53….

 ०१) जीभेला हाड असणे 

 ०२) उचलली जीभ लावली टाळ्याला 

 ०३) जीभ वळेल तसे बोलणे 

 ०४) जीभ तिखट असणे 

 ०५) जीभेवर साखर असणे 

 ०६) जिभल्या चाटणे 

 ०७) जिभेचे चोचले पुरवणे 

 ०८) जीभ सैल सोडणे 

 ०९) जीभेला लगाम घालणे 

 १०) जीभेवर ताबा ठेवणे 

 ११) जीभेवर रेंगाळणे 

 १२) जीभेला धार लावून बसणे 

 १३) जीभ दाखवणे

 १४) जीभ हासडणे 

 १५) जीभेचे मूळ पोटात 

 १६) दोन जीभा असणे 

 १७) फाटकी जीभ असणे 

 १८) काळ्या जिभेचे असणे 

 १९) हाताने केले जिभेने चाखले 

 २०) जीभ चाळवणे 

 २१) जीभ नाकाला टेकवू नका! 

 २२) जीभ ल ई चुरू चुरु बोलती य ब र तुझी 

 २३) जीभेने चाटणे 

 २४) जीभ आवळणे 

 २५) जीभेवर फोड येणे 

 २६) जीभेला शेंडा नसणे 

 २७) जीभ चावणे  

 २८) जीभेला आवर घालणे 

 २९) जिभेवर काळा तीळ असणे 

 ३०) जीभ दाताखाली चावणे 

 ३१) जीभ टाळूला चिकटने 

 ३२) जीभेवर तीळ भिजत नाही 

 ३३) जीभेचा तुकडा पाडणे 

 ३४) जीभ लईच वळवळा करायला लागली 

 ३५) जिभाळी लागणे 

 ३६) जिभेवर कडवटपणा असणे 

 ३७) जीभ हुळहुळणे 

 ३८) जीभ आहे की गिरणीचा पट्टा ? 

 ३९) जीभ वेडावणे 

 ४०) जीभ जडावणे 

 ४१) जिभेला सुमार नसणे 

 ४२) जिभेचा दांडपट्टा चालवणे 

 ४३) ऐनवेळी जीभ लुळी पडणे 

 ४४) जिभेच्या सरबत्तीने गारद करणे 

 ४५) जीभ चुकचुकणे 

 ४६) जीभ चुरचुरणे 

 ४७) जिभेवर सरस्वती नर्तन करणे 

 ४८) जिभेने साखरपेरणी करणे 

 ४९) जिभेचा शेंडा मिरवणे 

 ५०) जीभेचा तुकडा पाडणे 

 ५१) जीभ घोळवत लाडिक बोलणे.

 ५२) चांगलीच जीभ सुटलीये एकेकाला आज 

 ५३) पडजीभ

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कुमुद आत्या

ज्या ज्या व्यक्ती माझ्या बालपणी माझ्या अत्यंत आवडत्या होत्या आणि कळत नकळत ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्या मनावर प्रभाव होता त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे कुमुदआत्या. कुमुद शंकरराव पोरे. पप्पांची म्हणजेच माझ्या वडिलांची मावस बहीण. पप्पांना सख्खी भावंड नव्हतीच. ते एकुलते होते पण गुलाब मावशी, आप्पा आणि त्यांची मुलं यांच्याशी त्यांची अत्यंत प्रेमाची आणि सख्यापेक्षाही जास्त जिव्हाळ्याची नाती होती.

कुमुदआत्या ही त्यांची अतिशय लाडकी बहीण. या बहीण भावांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम. त्यांचं घर स्टेशन रोडला होतं. घरासमोर एक उसाचं गुर्‍हाळ होतं आणि तिथे पप्पा सकाळी ठाणे स्टेशनवर ऑफिसला जाण्यासाठी, दहा पाचची लोकल गाडी पकडण्यापूर्वी आपली सायकल ठेवत. संध्याकाळी परतताना ती घेऊन जात पण तत्पूर्वी त्यांचा गुलाब मावशीकडे एक हाॅल्ट असायचाच. रोजच. गुलाब मावशीचा परिवार आणि कुमुदआत्यचा परिवार एकाच घरात वर खाली राहत असे. पप्पा आल्याची चाहूल लागताच कुमुदत्या वरूनच, जिन्यात डोकावून विचारायची, ” जना आला का ग? त्याला म्हणाव “थांब जरासा” त्याच्यासाठी कोथिंबीरच्या वड्या राखून ठेवल्यात. आणते बरं का! येतेच खाली. “ 

पप्पा येताना भायखळा मार्केट मधून खूप सार्‍या भाज्या घेऊन यायचे. त्यातल्या काही भाज्या, फळे गुलाबमावशीला देत, कधी कुमुदात्यालाही देत. म्हणत, ” हे बघ! कशी हिरवीगार पानेदार कोथिंबीर आणली आहे! मस्त वड्या कर. ” 

कुमुदआत्या पण लडिवाळपणे मान वळवायची आणि अगदी सहजपणे पप्पांच्या मागणीला दुजोरा द्यायची.

तसं पाहिलं तर एक अत्यंत साधा संवाद पण त्या संवादात झिरपायचं ते बहीण भावाचं प्रेम. प्रेमातला हक्क आणि तितकाच विश्वास.

घरी आल्यावर पप्पांकडून आम्हाला या कोथिंबीर वड्यांचं अगदी चविष्ट कौतुक ऐकायला मिळायचं. मी तेव्हा खट्याळपणे पप्पांना विचारायचे, ” एकटेच खाऊन येता? आमच्यासाठी नाही का दिल्या आत्याने वड्या?”

पण कुमुदआत्या आमच्या घरी यायची तेव्हा कधीही रिकाम्या हाताने यायचीच नाही. कधी रव्याचा लाडू, कधी कोबीच्या वड्या, सोड्याची खिचडी, कोलंबीचं कालवण असं काहीबाही घेऊनच यायची. ती आली की आमच्या घरात एक चैतन्य असायचं. तिचं बोलणं गोड, दिसणं गोड, तिच्या गोरापान रंग, उंच कपाळ, काळेभोर केस, कपाळावरचे ठसठशीत कुंकू आणि चेहऱ्यावरून ओसंडणारा मायेचा दाट प्रवाह, कौतुकभरला झरा.. ती आली की तिने जाऊच नये असंच वाटायचं आम्हाला. आमचं घर हे तिचं माहेर होतं आणि या माहेरघरची ती लाडकी लेक होती.

माझ्या आईचं आणि तिचं एकमेकींवर अतिशय प्रेम होतं. नणंद भावजयीच्या पारंपरिक नात्याच्या कुठल्याही कायदेशीर मानापमानाच्या भोचक कल्पना आणि अटींपलीकडे गेलेलं हे अतिशय सुंदर भावस्पर्शी नातं होतं. सख्या बहिणी म्हणा, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणा पण या नात्यात प्रचंड माधुर्य आणि आपुलकी होती. खूप वेळा मी त्यांना सुखदुःखाच्या गोष्टी करताना पाहिलं आहे. एकमेकींच्या पापण्यांवर हळुवार हात फिरवताना पाहिलं आहे. खरं म्हणजे त्या वयात भावनांचे प्रभाव समजत नव्हते. त्यात डोकावताही येत नव्हतं पण कृतीतल्या या क्षणांची कुठेतरी साठवण व्हायची.

आज जेव्हा मी कुमुदआत्यांसारख्या स्त्रियांचा विचार करते तेव्हा मनात येतं “एका काळाची आठवण देणाऱ्या, त्याच प्रवाहात जगणाऱ्या या साध्या स्त्रिया होत्या. लेकुरवाळ्या, नवरा मुलं— बाळं घर या पलिकडे त्यांना जग नव्हतं. स्वतःच्या अनेकविध गुणांकडे दुर्लक्ष करूनही त्या संसारासाठी आजुबाजूची अनेकविध नाती मनापासून जपत, नात्यांचा मान राखत, तुटू न देता सतत धडपडत जगत राहिल्या. विना तक्रार, चेहऱ्यावरचे समाधान ढळू न देता. पदरात निखारे घेऊन चटके सोसत आनंदाने जगल्या. त्यांना अबला का म्हणायचे? स्वतःसाठी कधीही न जगणाऱ्या या स्त्रियांना केवळ अट्टाहासाने प्रवाहाच्या विरोधात जायला लावून “अगं! कधीतरी स्वतःसाठी जग. स्वतःची ओळख, अस्तित्व याचं महत्त्व नाहीच का तुला?” असं का म्हणायचं? पाण्यात साखर मिसळावी तस त्यांचं जीवन होतं आणि त्यातच त्यांचा आनंद असावा.

मी आजच्या काळातल्या प्रगत स्त्रियांचा आदर, सन्मान, महानता, कौतुक बाळगूनही म्हणेन, ” पण त्या काळाच्या प्रवाहाबरोबर आनंदाने वाहत जाणाऱ्या स्त्रियांमुळेच आपली कुटुंब संस्था टिकली. नात्यांची जपणूक झाली. माणूस माणसाला बऱ्या वाईट परिस्थितीतही जोडलेला राहिला आणि हेच संचित त्यांनी मागे ठेवलं. ” असं वाटणं गैर आहे का? मागासलेपणाचं आहे का? जीवनाला शंभर पावले मागे घेऊन जाणार आहे का? माहित नाही. कालची स्त्री आणि आजची स्त्री यांचा तौलनिक विचार करताना माझ्या मनात प्रचंड गोंधळ या क्षणीही आहे. कुणाला झुकतं माप द्यावं हे मला माहीत नाही. संसाराचं भक्कम सारथ्य करणार्‍या या स्त्रियांमध्ये मी युगंधराला पाहते.

एकेकाळी खेळीमेळीत, आनंदाने, सौख्याने, आहे त्या परिस्थितीत समाधानाने राहणाऱ्या या कुटुंबात अनपेक्षितपणे गृहकलह सुरू झाले होते. भाऊ, पपी (कुमुदआत्याचे धाकटे भाऊ) यांचे विवाह झाले. कुटुंब विस्तारलं. नव्या लक्ष्म्यांचं यथायोग्य स्वागतही झालं. पण त्याचबरोबर घरात नवे प्रवाह वाहू लागले. अपेक्षा वाढल्या, तुझं माझं होऊ लागलं. नाती दुभंगू लागली. घराचे वासेच फिरले. एकेकाळी जिथे प्रेमाचे संवाद घडत तिथे शब्दांची खडाजंगी होऊ लागली. जीवाला जीव देणारे भाऊ मनाने पांगले. पाठीला पाठ लावून वावरू लागले. घरात राग धुमसायचा पण चूल मात्र कधी कधी थंड असायची. अशावेळी कुमुदआत्याच्या मनाची खूप होरपळ व्हायची. कित्येक वेळा तीच पुढाकार घेऊन भांडण मिटवायचा प्रयत्न करायची. जेवणाचा डबा पाठवायची. म्हातार्‍या आईवडिलांची, भावांची, कुणाचीच उपासमार होऊ नये म्हणून तिचा जीव तुटायचा. पण त्या बदल्यात तिचा उद्धारच व्हायचा. अनेक वेळा तिला जणू काही आई-वडिलांच्या घरातली आश्रित असल्यासारखीच वागणूक मिळू लागली होती. नव्याने कुटुंबात आलेल्यांना कुटुंबाचा पूर्वेतिहास काय माहित? हे घर वाचवण्यासाठी या पोरे दांपत्याने आपलं जीवन पणाला लावलं होतं याचा जणू काही आता साऱ्यांना विसरच पडला होता पण इतकं असूनही कुमुदआत्याने मनात कसलाही आकस कधीही बाळगला नाही. भाऊच्या किरणवर आणि पप्पी च्या सलील वर तर तिने अपरंपार माया केली. घरातल्या भांडणांचा या मुलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांना सतत मायेचं कवच दिलं. कुमुदआत्या अशीच होती. कुठल्याही वैरभावानेच्या पलीकडे गेलेली होती. तिने फक्त सगळ्यांना मायाच दिली.

जेव्हा जेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात मला कुमुदआत्याची आठवण येते तेव्हा सहज वाटतं, ” जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकच धर्म हे निराळेपणाने तिला कधी शिकवावेच लागले नाही. प्रेम हा तिचा स्थायीभाव होता. मी कुमुदआत्याला कधीच रागावलेलं, क्रोधित झालेलं, वैतागलेलं पाहिलंच नाही. नैराश्याच्या क्षणी सुद्धा ती शांत असायची. कुणावरही तिने दोषारोप केला नाही. खाली उतरून झोपाळ्यावर एक पाय उचलून शांतपणे झोके घेत बसायची.

तशी ती खूप धार्मिक वृत्तीची होती. मी तिच्याबरोबर खूपवेळा कोपीनेश्वरच्या मंदिरात जाई. तिथल्या प्रत्येक देवाला, प्रत्येकवेळी पायातली चप्पल काढून मनोभावे नमस्कार करायची. साखरेची पुडी ठेवायची. मला म्हणायची हळूच, ” अग! सार्‍या देवांना खूश नको का ठेवायला?” तिच्या या बोलण्याची मला खूप मजा वाटायची. उपास तर सगळेच करायची. आज काय चतुर्थी आहे. आज काय एकादशी आहे. नाहीतर गुरुवार, शनिवार…जेवायची तरी कधी कोण जाणे! पपा तिला खूप चिडवायचे, कधीकधी रागवायचेही पण ती नुसतीच लडिवाळपणे मान वळवायची. अशी होती ती देवभोळी पण प्रामाणिक होती ती!

लाडकी लेक होती, प्रेमळ बहीण होती, प्रेमस्वरुप, वात्सल्यसिंधू आई होती, आदर्श पत्नी होती. तिच्या झोळीत आनंदाचं धान्य होतं त्यातला कणनिकण तिने आपल्या गणगोतात निष्कामपणे वाटला होता.

आजही माझ्या मनात ती आठवण आहे. प्रचंड दुःखाची सावली आमच्या कुटुंबावर पांघरलेली होती. आमच्या लाडक्या कुमुदआत्याला कॅन्सर सारख्या व्याधीने विळख्यात घेतलं होतं. मृत्यू दारात होता. काय होणार ते समजत होतं. जीवापाड प्रेम करणारा नवरा, अर्धवट वयातली मुलं, म्हातारे आई-वडील आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारी सारीच हतबल होती. त्याचवेळी आमच्या ताईचा जोडीदारही तितकाच आजारी होता. रोगाचे निदान होत नव्हतं. डॉक्टरही हवालदील झाले होते. पदरी दहा महिन्याचं मूल, संसाराची मांडलेली मनातली स्वप्नं, सारंच अंधारात होतं. कुठलं दुःख कमी कुठलं जास्त काही काही समजत नव्हतं.

इतक्या वेदना सहन करत असतानाही कुमुद आत्या म्हणत होती, ”मला अरुला भेटायचंय. बोलवा तिला. मला तिला काहीतरी सांगायचंय. ”

कुमुदआत्या इतकी लाडकी होती आमची की ताई त्या चिंतातुर मन:स्थितीतही तिला भेटायला स्वतःच्या छातीवरचा दुःखाचा दगड घेऊनच आली. तिला पाहून कुमुदआत्याचे डोळे पाणावले. तिच्या हातांच्या अक्षरश: पिशव्या झाल्या होत्या पण तिने ताईच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवला.

“अरु! बिलकुल काळजी करू नकोस, विश्वास ठेव, हिम्मत राख, अरुण (ताईचे पती) बरा होईल. मी माझ्या देवाला सांगितलंय “माझं सारं आयुष्य अरुणला दे.. त्याला नको नेऊस मला ने! बघ देव माझं ऐकेल आणि अगं! माझं जीवन मी छान भोगलं आहे. नवऱ्याचं प्रेम, हुशार समंजस मुलं आणि तुम्ही सगळे काय हवं आणखी? अरु बाळा! तुझं सगळं व्हायचंय. जाता जाता माझ्या आयुष्याचं दान मी तुझ्या पदरात टाकते. ”

त्यानंतर दोन दिवसांनीच कुमुदआत्या गेली. ती गेली तेव्हाचे बाळासाहेबांचे (कुमुदआत्याचे पती) शब्द माझ्या मनावर कोरले गेलेत.

“कुमुद तुझ्याविना मी भिकारी आहे.”

मृणाल शांतपणे कोसळलेल्या आपल्या वडिलांच्या पाठीवर हात फिरवत होती.

आपलं माणूस गेल्याचं दुःख काय असतं याची जाणीव प्रथमच तेव्हा मला झाली होती.

कुमुदआत्या गेली आणि अरुणच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. तो औषधांना, उपचारपद्धतींना साथ देऊ लागला होता. कालांतराने अरुण मृत्यूला टक्कर देऊन पुन्हा जीवनात नव्याने माघारी आला. ईश्वरी संकेत, भविष्यवाणी, योगायोग या साऱ्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आलेल्या अनुभवांना तार्किक किंवा बुद्धिवादी अर्थ लावत बसण्यापेक्षा त्यांना जीवनाच्या एका मौल्यवान कप्प्यात जसेच्या तसेच बंदिस्त करून ठेवाववे हेच योग्य.

आज ६०/६२ वर्षे उलटली असतील पण मनातल्या कुमुदआत्याची ती हसरी, प्रेमळ, मधुरभाषी, मृदुस्पर्शी छबी जशीच्या तशीच आहे.

…… जेव्हा जेव्हा तिचा विचार मनात येतो तेव्हा एकच वाटते,

 जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दिसामाजी काहीतरी ते करावे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दिसामाजी काहीतरी ते करावे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मध्ये काही दिवस गंमत म्हणून एक प्रयोग केला.  माझ्याच  रोजच्या रोज  वागण्याचा पेपर रात्री तपासून पाहिला…… बोलण्याच्या स्तराला  सगळ्यात जास्त मार्ग ठरवले. कुणाशी ,काय, कसं बोलले, किती वेळ, याचा नीट अभ्यास केला… कुठे कशा चुका होतात हे हळुहळु  समजते आहे…

एका  वाक्यातली उत्तरं   वरवर सोपी पण कस बघणारी होती. कारण अगदी कमी शब्दात एका वाक्यात उत्तर देणं काही प्रश्नांना फार अवघड गेलं…. मोठी प्रश्नोत्तरे सविस्तर लिहायची होती .कधी कधी त्यांची उत्तरे बरी आली, कधी  थोडक्यात चुकली. तरी तिथे चांगले मार्क देता आले.

उघड न बोलता मनातल्या मनात बोललेल्या…. गाळलेल्या जागा भरा  हा पण पेपरातला भाग होता .त्याचेही गुण तपासले…… मौन राहण्याचा प्रश्न सगळ्यात कठीण गेला. हळूहळू अभ्यासाने ते पण साध्य होईल… काही प्रश्नांची उत्तरं ऐनवेळी न आठवता नंतर आठवली.

कोण कोणास म्हणाले ….हे उमगायला बराच वेळ गेला. त्यांची उत्तरे नंतर कळल्याने त्याचा उपयोग  होत  नाही.

संदर्भासहित स्पष्टीकरण …तर ऑप्शनलाच टाकायचे ठरवले.  त्यासाठी दुसरा अभ्यास फार करावा लागतो हे  समजले .आणि इतकं  करूनही उत्तर समाधानकारक देता येत नाही हे समजले.

गणिताचा पेपर फारच अवघड… हातचे धरले ते  धरायला नको होते… त्यामुळे गणित चुकले हे नंतर समजले…. बेरीज कशाची करायची आणि वजा काय करायचे हळूहळू आता कळते आहे .त्यातही बरीच गडबड होते आहे. गुणाकार कशाचा करायचा हा संभ्रम आहेच…..

 

अध्यात्माचा अभ्यास करण्यात  “समाधान “आहे… हे उमगले आहे.

 तिथे मार्कांची भानगडच नाही. आत्मानंद मात्र अपार आहे. त्यामुळे त्यात आनंद वाटतो आहे. नुसते  पाठांतर  न करता अर्थ  समजून…उमजून… ते कशाचे करायचे हे आता समजले आहे.

त्यामुळे ते आता जरा जरा जमायला लागले आहे.

 

हल्लीच नवीन सुरू झालेला विषय  ‘ मूल्य शिक्षण ‘ …  तो  पेपर संस्कारांमुळे त्यामानाने सोपा गेला .

 

मोबाईलचे आधुनिक तंत्रज्ञान यासाठी जाणत्यांची ..  म्हणजे नातवंडांची शिकवणी लावली आहे. वेळ त्यांच्या सोयीनुसार ..त्यामुळे त्या विषयाचा आनंद आहे .भीती नाही.

 

असं सगळं चालू असताना….. 

….  कधी जेमतेम पस्तीस  मार्कांनी काठावर पास झाले.

….  कधी फर्स्ट क्लास तर कधी डिस्टिंक्शन  पण मिळाली ….

… बरं ही कायमची नाहीत  हे लक्षात आलं  आहे. अभ्यास कमी पडला तर परत आपण मागे पडणार हे पण समजले आहे.

…. गुणवत्ता यादीत यायचं तर अजून अभ्यास हवा आहे हे उमगले आहे.

 

ही जगण्याची गुणवत्ता आपली आपण काढून त्याला मार्क द्यायचे.

… इथे कॉपी करता येत नाही हे लक्षात आले .

आपला पेपर आपणच तपासायचा… प्रत्येकाने मनाने सिलॅबस ठरवायचे.. आपला पेपर आणि आपणच परीक्षक…..कठोरपणे पेपर तपासायचा हे ठरवले आहे …. तरच चुका सुधारून प्रगती होईल हे आता नीट समजले  आहे .

 

नुसती प्रगती नको तर त्याबरोबर अंतरिम मनःशांती हवी आहे .. आणि त्याच्या अभ्यासासाठी संत साहित्याची पुस्तकं हातात आहेत.

 

एक मजा मात्र झाली आहे…..  रात्री रिझल्ट चांगला येण्यासाठी दिवसभर सतर्क राहावं लागत आहे.

 

अजून एक म्हणजे…काही दिवस परीक्षांचेच असतात.तेव्हा अभ्यास कसून करावा लागतो.

 

वय वाढत जाईल तसे …पुढे पुढे पेपर अजून अवघड असणार आहेत हे पण माहित आहे…

आता कसून  सराव चालू आहे…बघू काय होते…

 

तुम्ही पण बघा ना हा प्रयोग करून….

फार अवघड नाहीये ते…

 … आता लेख पूर्ण करते … आजचा माझा होमवर्क संपला.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ गेल्यानंतरचा सोहळा… !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ गेल्यानंतरचा सोहळा… !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

जगण्या आणि जगवण्याच्या लढाईमध्ये आजपर्यंत माझे सहा एक्सीडेंट झाले आहेत…

जीव वाचला; परंतु कमरेच्या मणक्यात आणि मानेच्या मणक्यात सहा गॅप आहेत… ! 

मध्ये मध्ये ही दुखणी लहान बाळासारखी रडायला लागतात, परंतु जो जो रे बाळा जो म्हणत, मी त्यांना मनातल्या मनात बऱ्याच वेळा झोपवतो… ! 

परंतु थंडीच्या दिवसांमध्ये हाडांची हि काही दुखणी स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत…

डाव्या हातात मुंग्या येतात…. मानेपासून डावा हात इतका दुखतो; की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही…. ! या त्रासामुळे मोटरसायकल चालवताच येत नाही…. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा फिल्डवर, भिक्षेकर्‍यांमध्ये जाणे मनाविरुद्ध रद्द करावे लागते…. ! 

मागील महिन्यात दोन-तीन सुट्ट्या अशाच मनाविरुद्ध पडल्या… तिथल्या आज्यांना औषधे देता आली नाहीत हि एक तळमळ… आणि जीव घेण्या पद्धतीने डावा हात दुखतोय ही दुसरी तळमळ… दुहेरी कात्रीत मी सापडलो होतो.

आज मात्र गेलो… मला काय त्रास होतो आहे, याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती…. ! खूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो…. मला बघितल्यावर मग, हातवारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या… ! 

‘ आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ? ‘ वगैरे वगैरे… शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या… ! 

माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही…. तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो…. ! 

उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून, अभिवादन करून, मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं … ‘माज्या मानंच्या मणक्यामदल्या शिरा चिमटल्या हायेत… माजा डावा हात नीट काम करत न्हायी… तरीबी तुमच्यासाठी गाडी चालवून हितपर्यंत आलो… फकस्त तुमच्यासाटी… ! आणि तुमि माज्याशी भांडायला लागला… ‘ मी काकुळतीने बोललो… ! 

ही वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला…

श्रावणात उन्हं असताना पाऊस पडतो आणि पाऊस पडताना लगेच उन्हं पडतात…

…. माझ्या बोलण्यानंतर, रागे भरलेल्या डोळ्यांमध्ये आता पाऊस साठला होता…

क्षणात मोसम बदलला होता… ! 

श्रावणाचा महिना नसताना सुद्धा, भर थंडीतही, मावश्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पाऊस माझ्या खांद्यावर पडला… ! 

…. मग लगेच एकीने खांदा चोळला… एकीने डावा हात हातात घेऊन त्याला मालिश केले… एकीने डोक्यावर हात ठेवून आला-बला काढली… ! 

…. साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर मी… पण माझ्या लोकांनी आज मला एखादा राजकुमार असल्याचा फील दिला…. ! 

मी आपला सहज बोलून गेलो, “ एक महिना नाही आलो तर इतकं बोलता… मी जर मेलो बिलो आणि कधी आलोच नाही तर काय कराल ? “

…. या वाक्याने त्यांचा बांध फुटला…

श्रावणाने पुन्हा मौसम बदलला… !

… एक रडायला लागली, डॉक्टरला मरू नको देऊ म्हणून तिने मंदिरापुढे अश्रूंचा अभिषेक केला…

… एकीने रडत देवाला कौल लावला…

… एक आजी रडत देवाशी चक्क भांडायला लागली, “डाक्टरच्या” मणक्यात गॅप दिल्याबद्दल ती त्याला दोष देत होती…. ! 

…… मी भारावून गेलो… माझ्या डोळ्यात पाणी आलं… ! 

मला खूप पूर्वी वाटायचं, आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी मनापासुन रडेल का ? 

आपण मेल्यावर आपल्यासाठी कोण कोण रडतं ? हे पाहायची काही सोय आहे का ? 

…. आता, हा प्रसंग पाहिल्यानंतर, माझ्या मृत्यू मागे कोण कोण रडणार याची नोंद माझ्या मनात झाली होती… !

मेल्यावर माझ्या माघारी रडणारी माणसं, आज मी माझ्या जिवंतपणे पाहिली…. ! 

…. पण जाणीव झाली, आपण मेल्यावर आपल्या मागं ज्यांनं रडावं, असं आपल्याला वाटत असेल, त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं… ! 

It’s a damn reality…. !!!

असो…

मी माझ्या व्याख्यानात नेहमी म्हणतो…. आपल्याला जेव्हा काहीतरी दुखतं खुपतं त्यावेळी आपल्याला वेदना होतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं….

…. परंतु जेव्हा दुसऱ्याला वेदना होतात आणि तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं… त्याला संवेदना म्हणतात… समवेदना म्हणतात…. ! 

या माझ्या आज्या – मावश्या आज माझ्यासाठी रडल्या… यात मला आनंद नाही…

माझी वेदना; त्यांनी संवेदना आणि समवेदना म्हणून स्वीकारली… यात आनंद आहे ! 

वेदनेपासून संवेदनेकडचा आणि समवेदनेकडचा प्रवास त्यांचा सुरु झाला आहे यात मी सुखी आहे…. ! 

… आता मी कधीही गेलो तरी सुद्धा, आज्यांच्या प्रार्थनेच्या हातात मी जिवंत असेन; याची मला जाणीव आहे….

…. आता माझ्या मागे कोण कोण रडेल याची मला फिकीर नाही…. !

माझ्या जाण्यानंतरचा सोहळा आज मी जिवंतपणे पाहिला… !!! 

डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ““सांज संभ्रम !” ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

सांज संभ्रम ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

 रोज गंभीर लिहितो… म्हणून आता हे थोडे हलके फुलके !

रात्र दिवसाच्या हातावर टाळी देऊन अंधाराच्या आणखीन नजीक येत असते. तसेच काहीसे पहाटे सुद्धा होत असते. रात्र निवृत्ती घेऊन निजावयास निघायच्या तयारीत असते जणू!

दिवसा झोपी जाण्याचा अपराध आणि तो सुद्धा दिवस सायंकाळशी मैत्र साधत असल्याच्या वेळी, जो करील तो आयुष्यात एकदा तरी ह्या चकव्यात सपडतोच.

आपल्याला आज अगदी पहाटे उजडण्याच्या वेळी कशी जाग आली याच्या विचारात माणूस पडतो… आणि दिवस उगवायचा जागी रात्र आणखीन गडद होत जाते! मग लोकांनी सांगितल्यावर समजते… तुम्ही दुपारी उशिरा झोपी गेला होतात… आणि सायंकाळी अंधार पडण्याच्या सुमारास जागे झाला आहात!

असा अनुभव किती तरी जणांना आलेला असेल ना?

त्यादिवशी शनिवार होता. अर्धा दिवस शाळा. साडेतीन चारच्या सुमारास घरी आलो, थोडे खाल्ले आणि बिछान्यावर सहज अंग टाकले… डोळा लागला!

रविवारी सकाळी साडे सहा वाजता वर्गशिक्षक आणि क्रीडा शिक्षकही असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या छोट्या मैदानावर शारीरिक शिक्षणाच्या परीक्षेस बोलावले होते! ते शिक्षक अगदी एकवचनी. जे म्हणतील ते करून दाखवायचे म्हणजे दाखवायचे! गैर हजर राहाल तर सहामाहीत नापास.. असे त्यांनी सांगून ठेवले होते! (त्यावेळी काही पोरं गैरहजर ऐवजी गयहजर म्हणत…. त्यांची तर हे शिक्षक अजिबात गय करीत नसत!)

आणि नापास म्हणजे चक्क नापास.. आणि असे अपराध पुन्हा केले की एक वर्ष पुन्हा त्याच तुकडीत दिवस काढावे लागणार याची निश्चिती!

त्यामुळे मुलं नापास होत नाहीत तर शिक्षक त्यांना नापास करतात… असा (गैर) समज मनात पक्का झाला होता!

बरं… ते शिकवीत असलेल्या विषयाचा तसा पास नापासशी अजिबात संबंध नव्हता हो! पण त्यांच्या विषयात नापास होणे सोडा, पण एखादी कविता पाठ न करण्याचा अपराधही कधी कुणी केलेला… मेरे स्मरण में नहीं!

कल यह कविता मुखोदगत कर के आना! असा शुद्ध हिंदीत त्यांनी दिलेला आदेश सर्वच विद्यार्थी पाळत ! अन्यथा विद्यार्थ्याच्या मुखाची गत काही धड रहात नसे! याला मराठीत पाठ करणे असे म्हणतात. म्हणून आमच्या पाठी सुद्धा हे शिक्षक हिशेबात धरायचे! त्यांच्या हिंदी विषयाने आमची पाठ सोडली नाही. पण आमच्या त्या तुकडीतील विद्यार्थी राष्ट्रभाषेत उत्तम बोलत.

तसेच…. हमारे जमाने में अध्यापक वर्ग से कोई बहस करते नहीं थे… उलट शिक्षकांनी शिक्षा केली असे घरी समजल्यास घरी पुन्हा त्याची पुनरावृत्ती होई! 

तर त्या दिवशी मी सायंकाळी सहा वीस वाजता जागा झालो… दहा मिनिटांत सरांच्या घरी पोहोचणे केवळ अशक्य होते… वर्ष वाया जाणार हे निश्चित! त्यावेळेस रडणे एवढं एकच जमणार होतं. मग.. आईने ‘आपल्याला वेळेत जागे केले नाही’ असा आरोप करायला सुद्धा धजावलो… ! त्यावर आई स्मित हास्य करत राहिली!

घराबाहेर आलो… अंधार होता. पण लोक घराकडे परतत होते… पिंपळाच्या झाडावर कावळे जमा झाले होते… आणि शांत होते!

सहा वीस नंतर उजेड वाढायला पाहिजे होता… पण अंधार वाढू लागला. आणि मग खात्री पटली… रात तो अभी बाकी है मेरे दोस्त !

रविवारी सकाळी पावणे सहा वाजता मी शारीरिक शिक्षणाच्या परीक्षेस तयारीनिशी उपस्थित होतो !

कृपया उपरोक्त विषय पर आधारित दस से पंधरह वाक्यों में निबंध लिख कर लायें ! 

आपके भी कुछ ऐसे अनुभव होंगे तो जरूर लिखियेगा !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तिची अबोल शिकवण… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

??

तिची अबोल शिकवण ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

मुलगी सासरी येते तेव्हा एका डोळ्यांत आसूं व दुसर्‍या डोळ्यांत हासूं घेऊनच येते. एका डोळ्यांत माहेर दूर करावे लागल्याचे दुःख तर दुसर्‍या डोळ्यांत नवीन स्वप्न असतात. वियोगाचेच दुःख असले तरी आपण सासरी येतांनाच्या भावना वेगळ्या व मुलगी सासरी पाठवतांनाच्या भावना वेगळ्या असतात.

माझी लेक सासरी गेली व थोड्याच दिवसात मुलगा परदेशात शिकायला गेला त्यावेळी आमचं घरटं खर्‍या अर्थाने रिकाम झालं. मला तर काहीही करण्याचा उत्साह वाटेनासा झाला होता. जगणं जणू काही थांबलं आहे असंच वाटायला लागलं होतं. अगदी अंथरूणच धरलं होत मी.

असं असलं तरी कामं तर करावीच लागत होती. एकदा मला माझ्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून बुलबुल पक्षाचं घरटं दिसलं. पक्षाचं इवलंस पिल्लू सतत चोच उघडं ठेवून होतं. पक्षीण दिवसभर त्याला भरवायची. हळूहळू ते मोठं झालं. मला रोजच ते बघायचा नादच लागला होता.

त्या पिल्लाला पंख फुटले आणि पक्षिणीने त्या पिल्लाला उडायला शिकवलं व ते घरट्याबाहेर निघालं. ती स्वतः उंच उडवून दाखवून पिल्लाला आणखी उंच उडायला शिकवत होती. ही प्रक्रिया बघतांना मला एक लक्षात आलं; ते पिल्लू अगदी छोटं होतं तरी एकदा घरट्यातून निघाल्यावर परत घरट्यात गेलं नाही. पक्षिणीचं भक्ष्य शोधायला व उडायला शिकवणं अव्याहत चालू होतं. मांजरापासून व इतरांपासून ती रक्षणही व्यवस्थित करत होती.

थोड्या दिवसांनी पंखात पुरेसं बळ आल्यावर पिल्लाचं रक्षण करण्याची तिची जबाबदारी संपली. पिल्लूही स्वतंत्रपणे उडून गेलं व पक्षीणही स्वतःचं नवीन जीवन जगायला स्वतंत्र झाली. दोघांनीही आपलं स्वतंत्र विश्व उभारलेलं असणार होतं.

माझ्याही डोक्यात एकदम उजेड पडला. त्या पाखरांची अबोल शिकवण मला खूप काही शिकवून गेली. मलाही उमगलं; पंख फुटलेल्या आपल्या पाखरांना झेप घेऊ देणच योग्य आहे. आपल्यालाही आपले पुन्हा नवीन विश्व उभारता येते. समाजात; समाजकार्य करण्यासाठी अथवा मन रमवण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत.

खरंच ते छोटसं पाखरूं मला खूप मोठी जीवनदृष्टी देऊन गेलं. त्यानी मला नव्यानी जगायला शिकवलं. मग माझ्याही जीवनात मी नव्यानी रंग भरायला सुरवात केली.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बाळसेदार पुणे..

रोज सकाळी सुस्नात होऊन, तुळशीपुढे दिवा लावून, सुबकशी रांगोळी काढून, हातात हळदी कुंकवाची कुयरी सावरत सुवासिनी, श्री जोगेश्वरी दर्शन घेऊन मगच स्वयंपाकाला पदर बांधायच्या. वारांप्रमाणे वेळ काढून एखादी उत्साही गृहिणी समोरच्या बोळातून बेलबागेकडे प्रस्थान ठेवायची. आमच्या हातात आईच्या पदराचे टोक असायचं. आई भगवान विष्णूच दर्शन घ्यायला सभा मंडपात शिरली की आईच्या पदराचं टोक सोडून आमचा मोर्चा मोराकडे वळायचा. खिडकीवजा जागेत दोन मोर पिसारा फुलवित दिमाखात फिरायचे. आम्ही मोरपिसांचे मोहक रंग आणि पिसाऱ्यावरची पिसं मोजत असतांना मोर आपला पिसांचा पसारा आवरता घ्यायचा. आणि मग मनांत खट्टू होऊन आम्ही मागे वळायचो.

तर काय ! आनंदाने आणि सुगंधाने वेडच लागायचं. पानोपान फुलांनी डंवरलेल्या झाडांनी, बकुळीचा सडा शिंपलेला असायचा. अगदी ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशिल दो कराने, ‘अशी स्थिती व्हायची आमची. इवल्याश्या मोहक फुलांचा गजरा मग लांब सडक वेणीवर रुळायचा. अलगद पावलं टाकली तरी नाजूक फुलं पायाखाली चिरडली जायची. नाजूक फुलांना आपण दुखावलं तर नाही ना?असं बालमनात यायचं. बिच्चारी फुलं ! रडता रडता हसून म्हणायची, “अगं चुकून तू आमच्यावर पाय दिलास, तरी मी तुझ्या पायांना सुगंधचं देईन हो !

देवळाच्या पायरीवर बसलेल्या आईला आम्ही विचारलं, ” आई इथे मोर आहेत म्हणून या देवळाला मोरबाग का नाही गं म्हणत? बेलबाग काय नाव दिलंय. ? आई बेलबागेचं गुपित सांगायची, ” हे भगवान श्री विष्णूंचं मंदिर आहे. इथे पूर्वी बेलाचं बन होतं. फडणवीसांचं आहे हे मंदिर. इथे शंकराची पिंड असून खंडोबाचे नवरात्र पेशवे काळातही साजरं व्हायचं. तुळशीबागेत पूर्वी खूप तुळशी म्हणून ती तुळशीबाग. हल्लीचं एरंडवणा पार्क आहे ना ! तिथे खूप म्हणजे खूपच एरंडाची झाड होती अगदी सूर्यकिरणांनाही जमिनीवर प्रवेश नव्हता. एरंडबन म्हणून त्याचं नाव.. अपभ्रंश होऊन पडलं एरंडवणा पार्क. रस्त्याने येतानाही नावांची गंमत सांगून आई आम्हाला हसवायची. प्रवचन कीर्तन असेल तर ते ऐकायला ति. नानांबरोबर

(माझे वडील आम्ही पंत सचिव पिछाडीने रामेश्वर चौकातून, बाहुलीच्या हौदा कडून, भाऊ महाराज बोळ ओलांडून, गणपती चौकातून नू. म. वि. हायस्कूलवरून श्री जोगेश्वरीकडे यायचो. ऐकून दमलात ना पण चालताना आम्ही काही दमत नव्हतो बरं का ! 

गुरुवारी प्रसादासाठी हमखास, घोडक्यांची सातारी कंदी पेढ्याची पुडी घेतली जायची. तिथल्याच ‘काका कुवा’ मेन्शन ह्या विचित्र नावांनी आम्ही बुचकळ्यात पडायचो. वाटेत गणपती चौकाकडून घरी येताना शितळादेवीचा छोटासा पार लागायचा. कधीकधी बाळाला देवीपुढे ठेवून एखादी बाळंतीण बारावीची पूजा करताना दिसायची. तेला तुपानी मॉलिश केलेल्या न्हाऊनमाखून सतेज झालेल्या बाळंतपणाला माहेरी आलेल्या माझ्या बहिणी, बाळांना, माझ्या भाच्यांना देवीच्या ओटीत घालून बाराविची पूजा करायच्या, तेव्हां त्या अगदी तुकतुकीत छान दिसायच्या. नवलाईची गोष्ट म्हणजे घरी मऊशार गुबगुबीत गादीवर दुपट्यात गुंडाळलेली, पाळण्यात घातल्यावर किंचाळून किंचाळून रडणारी आमची भाचरं सितळा देवीच्या पायाशी, नुसत्या पातळ दुपट्यावर इतकी शांत कशी काय झोपतात? नवलच होतं बाई! कदाचित सितळा आईचा आशीर्वादाचा हात त्यांच्या अंगावरून फिरत असावा. गोवर कांजीण्यांची साथ आली की नंतर उतारा म्हणून दहिभाताच्या सितळा देवी पुढे मुदी वर मुदी पडायचा. तिथली व्यवस्था बघणाऱ्या आजी अगदी गोल गरगरीत होत्या. इतक्या की त्यांना उठता बसता मुश्किल व्हायचं, एकीनी आगाऊपणा करून त्यांना विचारलं होतं “आजी हा सगळा दहीभात तुम्ही खाता का? आयांनी हाताला काढलेला चिमटा आणि वटारलेले डोळे पाहून आम्ही तिथून पळ काढायचो ‘आगाऊ ते बालपण ‘ दुसरं काय ! 

पाराच्या शेजारी वि. वि. बोकील हे प्रसिद्ध लेखक राह्यचे. त्यांच्याकडे बघतांना आमच्या डोळ्यात कमालीचा आदर आणि कुतूहल असायचं. त्यांच्या मुलीला चंचलाला आम्ही पुन्हा पुन्हा नवलाईने विचारत होतो “, ए तुझे बाबा ग्रेट आहेत गं, एवढं सगळं कधी लिहितात ? दिवसा की रात्री? शाई पेननी, की बोरुनी? ( बांबू पासून टोकदार केलेल लाकडी पेनच म्हणावं लागेल त्याला) एवढं सगळं कसं बाई सुचतं तुझ्या बाबांना? साधा पेपर लिहिताना मानपाठ एक होते आमची. शेवटी शेवटी तर कोंबडीचे पाय बदकाला आणि बदकाचे पाय कोंबडीला असे अक्षर वाचताना सर चरफडत गोल गोल भोपळा देतात. ” कारण पेपर लिहिताना अक्षरांचा कशाचा कशाला मेळच नसायचा, त्यामुळे सतत लिहिणारे वि. वि. बोकील आम्हाला जगातले एकमेव महान लेखक वाटायचे.

आमची भाचे कंपनी मोठी होत होती. विश्रामबागवाड्याजवळच्या सेवासदनच्या भिंतीवर( हल्लीच चितळे बंधू दुकान, )सध्या इथली मिठाई, करंजी, समोसे, वडा खाऊन गिऱ्हाईक गोलमटोल होतात, पण तेव्हां त्या भिंतीवर किती तरी दिवस डोंगरे बालामृतची गुटगुटीत बाळाची जाहिरात झळकली होती. ती जाहिरात बघून प्रत्येक आईला वाटायचं माझं बाळ अगदी अस्स अस्सच व्हायला हवं ग बाई, ‘.. मग काय मोहिमेवर निघाल्यासारखी डोंगरे बालामृतची बघता बघता भरपूर खरेदी व्हायची. सगळी बाळं गोंडस, गोपाळकृष्ण दिसायची. आणि मग काय ! सगळं पुणचं बाळसेदार व्हायचं.

बरं का मंडळी म्हणूनच त्यावेळची पिढी अजूनही भक्कम आहे. आणि हो हेच आहे त्या पिढीच्या आरोग्याचे गमक. जोडीला गाईच्या दुधातून पाजलेली जायफळ मायफळ मुरडशिंग हळकुंड इत्यादी नैसर्गिक संपत्तीची अगदी मोजून वेढे दिलेली बाळगुटी असायचीच. मग ते गोजिरवाणं गोंडस पुणं आणखीनच बाळसेदार दिसायचं.

– क्रमशः भाग १२.

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उद्धरली कोटी कुळे… लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ उद्धरली कोटी कुळे… लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

सुमारे ३५/४० वर्षापूर्वीची ही आठवण. औरंगाबाद एम. आय. डी. सी. च्या स्टाफ-क्वार्टर्स स्टेशनजवळच्या औद्योगिक क्षेत्रातच होत्या. त्याकाळी स्वत:चे घर असणे ही गोष्ट दुरापास्तच होती. क्वचित सेवानिवृत्तीनंतर ती शक्य होत असे. त्यामुळे बहुतेक कर्मचारी क्वार्टर्समध्येच राहत. या कॉलनीच्या मागेच एकनाथनगर हा भाग होता.

एकनाथनगर आणि कॉलनीदरम्यानच्या मैदानात हळूहळू एक झोपडपट्टी तयार झाली. छोट्याछोट्या झोपड्यांची गरीब वस्ती! तिथे नेहमी काहीतरी चहलपहल सुरु असे. वेगवेगळ्या सणांना लाउडस्पीकरवरून गाणी लावली जात. लाउडस्पीकर लावूनच लग्ने लागत, कॉलनीतील लोकांना घरात बसूनही मांडवात काय काय घडते आहे ते कळायचे. लग्नातील भांडणे, रुसवेफुगवेही सर्वांना ऐकू येत. आहेराच्या रकमाकी लाउडस्पीकरवरून जाहीर होत.

इथेच ६ डिसेम्बर आणि १४ एप्रिलच्या आधी एकदोन दिवसापासून भीमगीते लावली जात. महापरीनिर्वाण दिन बराचसा गांभीर्याने पाळला जायचा. मात्र १४ एप्रिलला मोठ्या सणाचा आनंद, उत्साह, सगळ्या वातावरणात जाणवायचा. त्याकाळी ऐकलेली गाणी अशा दिवसात नेहमी आठवतात. त्यातले छान ठेका असलेले, ‘पहा पहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा’ आपोआप गुणगुणले जायचे. ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना’ हे काहीशा गंभीर सुरातले गाणेही सुरेश भटांच्या मनस्वी कवितेमुळे गोडच वाटायचे. त्यातले धृवपद प्रत्येक वेळी एक सुंदर चित्र उभे करायचे. समोर जणू बाबासाहेबांचा पुतळा नसून तेच उभे आहेत आणि स्वच्छ पिवळ्या कफन्या घालून तरुण भिक्कु त्यांना उभे राहून गुरुवंदना देत आहेत असे दृश मनासमोर तरळायचे. या गीतातील- 

‘कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे,

तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे?

या भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना’ 

हे कडवे आले की पुन्हा भटांची चित्रमय शैली अनेक चित्रे मनासमोर उभी करायची. त्यापुढचे कडवे तर अंगावर शहारे आणायचे-

कालचे सारे मुके, आज बोलू लागले,

अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले.

घे वसंता, घे, मनांच्या मोहरांची वंदना..

भटांनी बाबासाहेबांच्या कार्यामुळे घडून आलेल्या बदलाचे फक्त ६ शब्दात किती प्रभावी वर्णन केले होते- “कालचे सारे मुके, आज बोलू लागले, ”! त्याशिवाय बाबासाहेबांना वसंत ऋतूंची उपमा आणि अनुयायांना मोहराची उपमा म्हणजे खास ‘सुरेश भट टच’ होता! एक जण माणसांच्या आयुष्याचे सोने करणारा महामानव तर दुसरा शब्दांचे सोने करणारा परीस!

बहुतेक भीमगीतात बाबासाहेबांनी वंचित समाजाला मिळवून दिलेल्या नव्या जीवनाबद्दलची कृतज्ञता व्यक्त झालेली असते. कधीकधी ती इतकी उत्कट, हृदयातून आलेली, असते की तिचे रुपांतर भक्तीभावनेपर्यंत होते.

भटांच्या गाण्यात त्यांनी केवळ शब्दांनी बाबासाहेबांचे असेच किती भव्य शिल्प उभारले होते, पहा-

तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा,

एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा,

मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना…

सूर्याच्या नुसत्या दर्शनाने सुप्त बीजातून अंकुर फुटतात ही किती सार्थ प्रतिमा!

असेच एक सुंदर भीमगीत लिहिणा-या महान कवीशी माझा अगदी जवळून परिचय होणार होता हे मला तेंव्हा ठाऊक नव्हते. त्यानंतर बरोबर १५वर्षांनी मी त्या कवीच्या घरी राहिलो, त्यांच्याबरोबर जेवण केले आणि नाशिकच्या मुक्त विद्यापीठात मुलाखतीला गेलो. यामागे होते आमच्या औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातील कवी आणि विचारवंत असलेले माझे मित्र प्रा. ऋषिकेश कांबळे! त्यांनीच मला विद्यापीठाचे बोलावणे आले तेंव्हा रहायची व्यवस्था व्हावी म्हणून चिठ्ठी देवून वामनदादांकडे पाठवले होते.

‘चल ग हरिणी तुरु तुरु, चिमण्या उडती भुरू’ ‘ह्यो ह्यो ह्यो पाहुणा, सखूचा मेहुणा’ ‘सांगत्ये ऐका’ या सिनेमातील ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछाडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला’ यासारखी लोकप्रिय गाणी किंवा

‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट,

तिथूनच जाई माझ्या माहेरची वाट’

सारखे मधुर भावगीत लिहिणारे दादा एका झोपडपट्टीवजा वस्तीत पत्र्याच्या घरात, राहत. तेच ‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’चे कवी आहेत हे मला माहित नव्हते. श्रावण यशवंते यांनी गायलेले त्या गाण्याने बाबासाहेबांच्या आयुष्याचे संपूर्ण फलित चार कडव्यात मांडले!

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे,

एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती,

तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती,

अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे.

मुळात लोकशाहीर असल्याने वामनदादांच्या प्रत्येक रचनेत गेयता आणि ठेका आपोआप यायचा. त्यांनी केलेले वर्णन इतके यथार्थ, आणि तरीही काव्यमय होते की ज्याचे नाव ते!

जखडबंद पायातील साखळदंड,

तडातड तुटले तू ठोकताच दंड,

झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…

“झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे” ही ओळ ऐकताना आपोआपच डोळे ओलावत. बाबासाहेबांच्यापूर्वी केवढ्यातरी समुदायाला कोणतेच अधिकार नव्हते. साधे माणूस म्हणून जगणेही नशिबी नव्हते. जातीयता आणि भेदाभेदाची कीड लागलेल्या समाजवृक्षाला बाबासाहेबांनी स्वच्छ केले, शुद्ध केले, त्याला पुन्हा नवी पालवी आणवली आणि समतेची, प्रगतीची, गोड फळे सर्वांना चाखायला दिली. हे सगळे दादा किती कमी शब्दात सांगतात पहा-

कुजे वृक्ष तैसाच होता समाज,

हिरवीहिरवी पाने अन तयालाच आज.

अमृताची आली फळे, भीमा तुझ्या जन्मामुळे..

अभंगात संत जसे शेवटच्या ओळीत आपले नाव टाकत, उर्दू शायर शेवटची ओळ स्वत:लाच उद्देशून लिहित, तसे दादाही त्यांचे नाव गाण्यात चपखलपणे गुंफत-

काल कवडीमोल जिणे वामनचे होते,

आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते,

बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे..

बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारे आपण प्रगतीच्या दिशेने केवढेतरी अंतर कापले आहे. तरीही परस्पर-सामंजस्याच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर वामनदादांची ही ओळ- ‘आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते’ विचार करायला लावते. युद्धाच्या छायेत वावरणारे आजचे जग पाहता ‘बुद्धाकडे जग हे वळे, भीमातुझ्या जन्मामुळे’ ही ओळ महत्वाची ठरते. जुनी गाणी आजही केवढा सकारात्मक, रचनात्मक संदेश घेऊ उभी आहेत. आपण तो किती स्वीकारतो हाच खरा प्रश्न आहे.

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे.

 ७२०८६३३००

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संयम — – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ संयम — – लेखिका – अनामिका ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे 

आमच्या काळात लहानपणापासून संयम या गुणाचा नकळत विकास झाला, बालपणापासूनच अनेक गोष्टीसाठी मन मारायला शिकलो आम्ही. वाट पहायला शिकलो आम्ही….. धीर धरणे हा शब्द प्रयोग अक्षरशः जगलो आम्ही.

उदा. सणवार आले की स्वयंपाक घर सुगंधाने दरवळत असे, सर्व पदार्थ देवाला नैवेद्य दाखवून खायचे, उष्टे करायचे नाहीत, नवीन कपडे देवाला दाखवून चांगला दिवस बघुन घालायचे, नवीन कपड्याची घडी मोडणे हा एक सोहळाच असे जणूकाही. यात एक विशेष बाब अशी की, आपले नविन कपडे कोणाला तरी घडी मोडायला देणे…. खूप मानाचे, आनंदाचे, प्रेमाचे समजले जाई… बहुतेक महिला आपली नवीन साडी घरातील किंवा बाहेरील मैत्रीण, बहीण वगैरे… नवीन साडीची घडी मोडायला देत असत.

एवढेच कशाला आपण एखादा पदार्थ कर असे आईला सांगितलं तर तो काही ताबडतोब होत नसे, वाट बघावी लागायची, जे ताटात असेल ते, मुकाट खावे लागे. भाजी आवडत नाही म्हणून तक्रार केली तर दुसरी भाजी तयार करून मिळणार नाही याची खात्री असे, मग काय… चटणी किंवा लोणच्या बरोबर गपचुप भाकरी खायची. कोणताही हट्ट फारसा पुरविला जात नसे. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नसे, पालक सरळ नाही म्हणत असत त्यामुळे नकार देखील पचवायला शिकलो आम्ही ! 

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत बाबीं मधे तडजोड करायला शिकलो.

आठवडी बाजारातून खाऊ आणल्यास, आईवडील त्या खाऊचे सर्व मुलांच्यात समान वाटप करत, कोणी एक मूल त्या खाऊला हात लावत नसे. सर्वजण सोबत तो खाऊ खात असत. एकट्याने खाण्याची प्रथा नव्हती, सवय नव्हती.

शेअरिंग…… आपोआप होत असे. शिकवण्याची गरज नव्हती.

वह्या, पुस्तके, पाटी, पेन्सिल आणि दप्तर ही एकमेकांचे वापरत असत. तसेच मोठ्या भावा बहिणीचे कपडे घट्ट झाले की, धाकट्या नी घालायचे. अंथरूण पांघरूण ही एकत्रच असायचे.

Sharing is caring आज मुलांना शिकवावे लागते, ते आम्ही सहजपणे जगलो आहोत.

शाळेत जाताना पाण्याची बॉटल नेण्याची प्रथा नव्हती, किंबहुना घरात बॉटल च नसतं. शाळेत नळाचे पाणी सुट्टीमध्ये प्यायचो.

म्हणजे अधेमधे तहान लागली तर सुट्टी होण्याची वाट पाहायची, मन मारायची, संयम ठेवायची सवय लागली. आणि आज मुलं तास चालू असताना टीचर समोर सहजपणे बॉटल तोंडाला लावतात.

खरे तर याच संयमाचा आपल्याला जीवनात खूप खूप फायदा झाला आहे याची आता खूप जाणीव होतेय, मात्र हाच संयम आपण पुढच्या पिढीला नाही शिकवू शकलो ही खंत वाटते.

त्यांना ‘दोन मिनीट ‘ही सवय लागली… इन्स्टंट पदार्थ खायची सवय लागली, इन्स्टंट जीवन जगायची सवय लागली.

“इन्स्टंट जमान्यातील इन्स्टंट पिढी ” घडवली आपण…. ! आजची पिढी Use and throw हे तत्त्व सहजपणे शिकली. आम्ही मात्र Use and use पद्धतीने काटकसर, बचत करत, कंजूष झालो….

…. असे इतरांना वाटते !

कालाय तस्मै नमः.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी माझ्याच प्रेमात… – लेखिका : सुश्री संध्या बेडेकर ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मी माझ्याच प्रेमात… – लेखिका : सुश्री संध्या बेडेकर ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

काल माझा सत्तरावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

हॉटेलात कशाला?? घरीच करु या की, असं वगैरे मी काही म्हणत नाही. किती बिल आलं? हे विचारण्याच्या भानगडीत मी पडत नाही.

आजकाल घरातील प्रत्येक event खूप मजेत पार पडतो. काही टेन्शन नसते. आता राज्य पुढच्या पिढीचे आहे.

आता फ्रंट सीट वर मुलगा, सून बसले आहेत. जनरेशन गॅप भरपूर, म्हणून सर्वच पद्धती बदलल्या आहेत. ते जे म्हणतात ते मी सहर्ष ऐकते.

मी एक गोष्ट नक्की ठरवली आहे •••

जमाने के साथ चलो. नेहमी टीमचा मेंबर रहायचं.

 

कोणाला जेवायला बोलावायचे आहे तर आपण यावेळेस डेक्कनवरील त्या नवीन हॉटेलमध्ये जाऊ. मुलांच्या सुविधेनुसार ते जी वेळ, जागा ठरवितात आणि आम्ही दोघे तयार होतो.

आम्ही नवीन जगाशी adjust झालो आहोत….

आमच्या वेळेस ••• एवढा खर्च का? ••• घरात नाही करता येत का?? •••काय सारखं बाहेर जेवायचं?••• कामाचा कंटाळाच आहे. ••• 

 

या सर्व गोष्टी अजिबात बोलत नाही. रडगाणी गात नाही. काय गरज आहे? आजपर्यंत खूप कष्ट केले. खूप पैसे वाचविले. तो काळ वेगळा होता. पगार जेमतेम होते. येणारे जाणारे भरपूर असत. तेव्हा या आधुनिक पद्धतीचे प्रचलन नव्हते आणि परवडणारे पण नव्हते.

आता मजेत रहायला मिळतंय. घरात सर्व कामाला मावशी आहे. On line बरीच कामं होतात. मग बिघडलं कुठे ? 

 

पन्नास वर्षांपूर्वी जीवनाची परिभाषा आजच्या तुलनेत वेगळी होती. एवढे आधुनिक विचार नव्हते. मनोरंजनाची परिभाषा वेगळी आणि सीमित होती. नातेवाईकांचे घरी येणे, भरपूर दिवस राहणे या सामान्य गोष्टी होत्या. कर्ज काढणे वगैरे गोष्टी नव्हत्या. अंथरूण पाहून पाय पसरावे ही गोष्ट मनावर एवढी बिंबवली होती, की ती लक्ष्मण रेषा ओलांडायला हिम्मत लागायची. हॉटेलिंगची गणना मौजमस्ती मध्ये होत असे. एवढी चमकधमक ही नव्हती. एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. झोमॅटो, स्वीगीचा जन्म झाला नव्हता.

 

अर्ध अधिक आयुष्य या परिस्थितीत गेलं. म्हणजे त्याचं मला अजिबात दुःख नाहीये. तेव्हा पण मी मजेतच होते. परिस्थिती प्रमाणेच वागले. आता जबाबदारी संपली आहे, असं जरी मी म्हणत असले तरी अजूनही मी मुलांकडे घराकडे लक्ष देतेच.

 

जुन्या गोष्टींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा, आताचे दिवस enjoy करायचे. तेव्हा आरशात स्वतःला बघायला वेळ मिळायचा नाही. आता माझा फोन नेहमी सेल्फी मोड मध्येच असतो. माझे माझे फोटो काढायचे ‌आपल्याच नादात रहायचे.

 

स्वतः मध्ये रमता आलं, की स्वतःपेक्षा बेस्ट option दुसरा कोणीच वाटत नाही.

प्रेशर कुकर सारखं जगायचं. बाहेर किती ही आग लागू दे, आत किती ही प्रेशर असू दे, शिट्या वाजवत जगायचं मजेत.

…. हे सगळं समजेपर्यंत बराच काळ निघून गेला, इतका की आयुष्याची सत्तर वर्षे संपली त्यावेळी मोबाईल नव्हते. मोबाईल आल्यावरही माझ्या हातात येईपर्यंत वेळ गेलाच.

काळ बदलत गेला, तसे माझ्या आजूबाजूचे रिंगण वाढत गेलं. अनेक गोष्टी समजत गेल्या. स्वतःचा आनंद कशात आहे? हे आपल्यालाच शोधायचे असते, हे खूप उशीरा कळलं….

 

स्वतः कसं जगायचं? हे आपणच ठरवायचं असतं म्हणे. हे समजायला आणि पचायला बराच वेळ लागला. घरच्या आजूबाजूच्या आपल्याच माणसांमध्ये एवढी बिझी असायचे की मला मीच शोधता आले नाही. आपल्या स्वतःसाठी वेळ देणे हे चूक नाही, हा गुन्हा नाही. हे फार उशिरा कळलं.

 

मला चांगलं आठवतंय ••• अजयच लग्न झालं होतं तेव्हा त्याने अनिताला सांगितले होते, ‘ की माझ्या आई बाबांनी खूप कष्ट केले आहेत. लहानपणी मी पैशाची चणचण बघितली आहे. म्हणूनच महागड्या वस्तू स्वस्त वाटेपर्यंत कष्ट करायचे आणि तसे पैसे कमवायचे हे मी ठरवलं होतं. आई बाबांनी आणि मी स्वतः शिक्षणावर लक्ष दिलं, त्यामुळे आज मी चांगल्या नोकरीत आहे. माझे म्हणणे असेही नाही की तू घरची कामं कर. दोघीही मजेत रहा. ’

 

अजय अनिताने आमच्या दोघांचे दिवस पालटले.

 

लग्नानंतर अजयला नवीन कार घ्यायची होती तेव्हा आम्ही त्याला सिक्स सीटर कार घे, म्हणजे अनिताचे आई बाबा पण आपल्या बरोबर सहज बाहेर जाऊ शकतील, असा सल्ला दिला. आज बरेचदा आम्ही सर्व एकत्र बाहेर जातो.

 

दोन्ही आई बाबांना मुलं छान सांभाळतात.

 

आधी TV नंतर मोबाईलने आज जगण्याची दशा, दिशा, गती सर्वच बदललंय, विचारांमध्ये तर क्रांतीच आली आहे.

 

आज ज्येष्ठांसाठी आपले शौक, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत ‌

वाचक मंच, जेष्ठ नागरिक संघ अनेक गोष्टी आहेत.

पुढच्या पानावर काही तरी भारी लिहिलं असेल या विचाराने मी रोज एक पाऊल पुढे टाकते.

खूप विचार करत बसत नाही. कोणी सोबत केली तर With you नाही तर Without you.

असा सरळ सोप्पा हिशोब ठेवते.

सध्या मी माझ्याच प्रेमात आहे. मस्त बिनधास्त जगतेय.

एक लक्षात आलंय •••

शेवटी रोजचे खात्यात जमा झालेले १४४० मिनिटे मी कसे घालवायचे? हे माझं मलाच ठरवायच आहे.

लेखिका : संध्या बेडेकर

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares