सौ उज्ज्वला केळकर
☆ मन वढायं वढायं… ☆ सौ उज्ज्वला केळकर ☆
आयुष्याची ८ दशके सरली. सरली म्हणजे, कशी-बशी गेली नाहीत. छान मजेत गेली. आताशी मी त्याला म्हणते, ‘ये. लवकर ये. मी तयार आहे, गाठोडं बांधून.’ मग माझं मलाच हसू येतं. तो तर माझी कायाही घेऊन जाणार नाहीये. गाठोडं कुठलं न्यायला? तो माझ्यात कुठे तरी असलेलं प्राणतत्त्व घेऊन जाणार. हे सगळं माहीत असतं, तरी मी माझी गाठोडी कवटाळून बसते. दोन गाठोडी आहेत माझी…..
… पहिले एक गाठोडे आहे… ज्यात सुखद स्मृतींची तलम, मुलायम, नजरबंदी करणारी, बेशकीमती महावस्त्रे आहेत. त्यांच्या आठवणींनी मनावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं, पण कसं आणि का, ते कळत नाही, हे गाठोडं क्वचितच कधी तरी उघडलं जातं. दुसऱ्या गाठोडयाच्या तुलनेने हे गाठोडं आहे अगदीच लहान, चिमुकलंच म्हणता येईल, असं.
… दुसरं आहे, ते आहे एक भलं मोठं गाठोडं…. पर्वताएवढं.. नव्हे त्यावर दशांगुळे उरलेलं…..
अनेक विवंचना, चिंता, काळज्या, समस्यांच्या चिंध्या, लक्तरे, चिरगुटे… जगताना घेतलेल्या कटु स्मृतींचे हे गाठोडे. माझ्या बाबतीत कोण, कधी, काय चुकीचे वागले, कुणी माझा जाणीवपूर्वक अपमान केला, कुणी, केव्हा दुर्लक्ष केले, मला तुच्छ लेखले, या सगळ्या दु:खद आठवणी, .. आणि कुणी कधी दिलेल्या दु:खाचं, केलेल्या अपमानाचं, दुखावलेल्या अस्मितेचं, चिंता काळज्यांचं, ताण- तणावांचं, विवंचनांची चिरगुटं असलेलं …… हे असं सगळं… नकोसं – क्लेशकारक वाटणारं..तरीही मनात घट्ट चिकटून राहिलेलं सगळंसगळं या गाठोड्यातून ओसंडून वहात आहे. हा कचरा बाहेर टाकून देण्यासाठी मी हे गाठोडं पुष्कळदा उघडते. . कचरा बाहेर काढते. पण बहिणाबाईंनी म्हटले आहे त्याप्रमाणे,
‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर —
किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर’
किती प्रयत्न केला, हा कचरा काढून फेकून द्यायचा… केशवसुत म्हणाले आहेत त्याप्रमाणे जाळून किंवा पुरून टाकण्याचा…. पण नाहीच.. हा कचरा जणू अमरत्व लाभल्यासारखा आहे. पुन्हा पुन्हा येऊन गाठोड्यात बसतो. बुमरॅँग जसं ते फेकणार्याकडेच परत येतं, अगदी तसंच आहे हे.
हे मोठं गाठोडं, कटू स्मृतींचं….. सतत उघडलं जातं. विस्कटलं जातं. तो सारा कचरा, चिंध्या, चिरगुटं गाठोड्यातून बाहेर काढून फेकून द्यायचं ठरवते. फेकून देतेही. पण त्या पुन्हा लोचटासारख्या गाठोड्यालाच येऊन चिकटतात.
आता साधीशीच गोष्ट. मी एम. ए., एम. एड. पर्यन्त शिकले. 30 वर्षे अध्यापनाची नोकरी केली. निवृत्त होऊनही 20 – 22 वर्षे झाली. नशिबाने आणखी काय द्यायला हवं? पण सारखं मनात येत रहातं , मी पी. डी. सायन्स झाल्यावर आर्टसला का आले? आले तर आले, इकॉनॉमिक्स, मॅथ्स यासारखे चलनी विषय का घेतले नाहीत? ग्रॅज्युएट झाले. नोकरी मिळाली . मग लोकसेवा आयोगाच्या परीक्षा का दिल्या नाहीत? अधिक चांगल्या संधी मिळाल्या असत्या. आता या काळात आणि या वयात या विचारांना काही अर्थ आहे का? त्यांचा काही उपयोग आहे का? पण तो विचार उगीचच येत रहातो आणि मन खंतावत रहातं. ही झाली एक गोष्ट. अशा किती तरी जुन्या गोष्टी अकारणच मनात साठून राहिल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा उफाळून येत दु:खी करताहेत.
कधी कधी मैत्रिणी जमलो, की सहजच घरातल्या गोष्टी निघतात. ‘ सासू तेव्हा असं म्हणाली, नणंद तसं बोलली. कितीही करा आमच्या विहीणबाईंचा पापड वाकडाच. मुलांसाठी किती केलं, पण त्यांना कुठे त्याची पर्वा आहे.’ असंच काही- बाही बोलणं होतं. मी त्यांना म्हणते, “ नका ना या जुन्या आठवणी काढू ! अशा दु:खद आठवणी काढायच्या म्हणजे तेच जुनं दु:ख आपण पुन्हा नव्याने जगायचं. कशाला ते….”
अर्थात दुसर्याला सांगणं सोपं असतं. स्वत:च्या बाबतीत मात्र ‘ लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ‘ अशीच माझी स्थिती. मीही जुन्या जुन्या दु:खद आठवणी पुन्हा पुन्हा मनात घोळवत रहातेच.
परवा परवा ‘उमेद’ ग्रुपवर एक पोस्ट वाचली. 1 जून … एक टास्क.. आपल्या मनातील दु:खे, वाईट विचार, चिंता, काळज्या, लिहून काढा आणि त्यातून बाहेर पडा. आपली पाटी स्वच्छ ठेवा. मी म्हंटलं, बरी संधी आहे, आपण मोकळं व्हायला. मनाची पाटी कोरी करायला. मी सगळं लिहून काढलं. नंतर पाटी पुसू लागले. पण ती काही पुसली गेली नाही. त्यावरचं सारं लेखन शीलालेखासारखं अमीट झालं.
सध्या रहाते, तो माझा बंगला छान आहे. 37-38 वर्षे आम्ही या घरात रहातोय. इथले शेजारी-पाजारी चांगले आहेत. कामवाल्या घरच्यांसारख्याच आहेत. गरज पडली तर मदतीला कोणीही येईल, अशी परिस्थिती आहे. छान बस्तान बसलं आहे आमचं सध्याच्या घरी. पण सात-आठ महिन्यात बसेरा बदलायचा आहे. हे घर सोडून नव्या घरी फ्लॅटवर रहायला जाण्याची शक्यता आहे. आम्हा म्हातारा-म्हातारीला जमेल का सगळं? जुनाट वृक्ष नव्या वातावरणात रुजवायचे आहेत. रुजतील? तिथली फ्लॅट संस्कृती पचनी पडेल आमच्या? शेजारी कसे असतील? काही होऊ लागलं, तर कुणाची मदत मिळेल? मुलगा आणि सून आपआपल्या कामातून किती वेळ काढू शकतील? प्रश्न… प्रश्न… आणि फक्त प्रश्न ….खरं तर पुढच्या श्वासाची शाश्वती नाही, असं मी मनाला सतत बजावत असते आणि त्याचवेळी भवितव्याचा अनावश्यक विचार करत व्यथित होते. आपलंच टेन्शन वाढवते. ‘ देवा आजचा दिवस सुखाचा दाखवलास, उद्याची भिस्त तुझ्यावरच रे बाबा !’ असं म्हणण्याइतकी आध्यात्मिक उंचीही मनाने गाठलेली नाही.
अनेक गोष्टी अशा असतात, ज्या बाबतीत मी प्रत्यक्ष काहीच करायचं नसतं. तरीही काही गोष्टी, काही विचार भाकड गायीप्रमाणे मनात हुंदडत असतात आणि मन तणावग्रस्त करतात. आता हेच बघा, ‘ मुलाला प्रमोशन कधी मिळेल? सुनेला नोकरी मिळेल ना? नातीला मेडीकलला अॅडमिशन मिळेल ना? नातवाची टी.व्ही. ची क्रेझ जरा कमी होऊन तो थोडा मनापासून अभ्यास करायला लागेल का?’ …. यापैकी कशावरही माझं नियंत्रण नाही. पण तरीही याबाद्दलचे विचार काही मनातून हद्दपार होत नाहीत. आताशी एक विचार मनात घोळू लागलाय. अर्चनाताईची समुपदेशनासाठी अपॉईंटमेंट घावी. बघूया, त्याचा तरी काही उपयोग होतोय का?
अगदी अलीकडे अनघा जोगळेकर यांची .हॅँग टिल डेथ या इंग्रजी नावाची हिन्दी लघुकथा वाचली होती, ती अशावेळी हमखास आठवते. ती कथा मराठीत अशी आहे —
“ हॅँग टिल डेथ “
‘ मीनू, मी बघतोय, जेव्हा जेव्हा तुला वैताग येतो, किंवा तू काळजीत, चिंतेत असतेस, तेव्हा तेव्हा तू खोलीत जाऊन कपाट उघडतेस. तिथेच थोडा वेळ उभी रहातेस. मग थोड्याच वेळात तुझा चेहरा हसरा होतो. अखेर त्या कपाटात असं आहे तरी काय?’
पलाशचं बोलणं ऐकून मीनू हसली.
‘छे छे, केवळ हसून काम भागणार नाही. आज तुला हे रहस्य उलगडून दाखवावंच लागेल. ‘ पलाशच्या आवाजात थोडा आवेश होता. मग नजर चुकवत म्हणाला, ‘तुझ्या अपरोक्ष मी ते कपाट अनेक वेळा उघडून पाहिलं. शोधाशोध केली पण….. अखेर असं आहे तरी काय तिथे?’ तो जवळ जवळ ओरडतच म्हणाला.
मीनू थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग तिने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन आली. तिने कपाट उघडले.
‘ ते बघ माझ्या खुशीचं रहस्य!’
‘अं… तो तर एक हँगर आहे. …. रिकामा हँगर…’
‘ होय पलाश. तो हँगर आहे, पण रिकामा नाही. याच्यावर मी माझ्या सार्या चिंता, काळज्या, त्रास, वैताग लटकवून ठेवते आणि कपाट बंद करण्यापूर्वी त्यांना म्हणते,— ‘ मरेपर्यंत लटकत रहा ! ’ मी माझ्या काळज्या, त्रास, वैताग माझ्या डोक्यावर स्वार होऊ देत नाही. त्या माझ्यापासून दूर केल्यानंतरच त्या निपटून काढते. ‘
… आणि आता त्या कपाटात एकाऐवजी दोन हँगर लटकलेले आहेत…..
मी सध्या त्या कथेतील मिनूच्या शोधात आहे. एकदा भेटली की विचारणार आहे, “ बाई ग, तू त्या सार्या सार्या चिंता, काळज्या, त्रास, वैताग रिकाम्या हँगरवर कशा लटकावून ठेवतेस? एकदा प्रात्यक्षिक दाखव ना ! प्लीज…..”
©️ सौ उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈