सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ आला सण वटपौर्णिमेचा..! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
गेल्या दहा वर्षात वटपौर्णिमेला वडाला जाऊन पूजा करणे बंद झाले माझे ! लग्नाची चाळीशी उलटून गेली आणि या पूजेबाबतच्या दृष्टिकोनात हळूहळू बदलही होत गेला. लग्न झाल्यावर नवीन सून म्हणून सासूबाई बरोबर नटून-थटून पूजेला गेले होते ते आठवलं ! जरीची साडी, अंगावर दागिने आणि चेहऱ्यावर सगळा नव्या नवतीचा साज घेऊन नदीकाठी असलेल्या वडावर पूजेला गेले होते. थोडा पाऊस पडल्यावरचे रम्य, प्रसन्न वातावरण, समोर कृष्णेचा घाट आणि वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळत फिरणाऱ्या उत्साही, नटलेल्या बायका असं ते वातावरण होतं ! धार्मिकतेची गोष्ट सोडली तरी त्या निसर्गातील आल्हाददायक वातावरणात चैतन्य भरून राहिलेले होते, त्यामुळे मन खरोखरच प्रसन्न झाले !
अशी काही वर्षे गेली आणि लहान मुलांच्या व्यापात वडावर जाणे जमेना. घराची जागा बदलली, त्यामुळे नदीकाठ आता दूर गेला होता. वडाची फांदी आणून त्याची पूजा करणे आणि दिवसभर उपवासाचे पदार्थ खाणे एवढाच वटपौर्णिमेचा कार्यक्रम होऊ लागला !
हळूहळू या सर्वातून मन बाहेर येऊ लागले. पतीचे आयुष्य वाढावे आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हे व्रत करणे ही गोष्ट अंधश्रद्धेचा भाग वाटू लागली. हिंदू धर्मात त्या त्या काळाचा विचार करून सणावाराच्या रूढी समाजात रुजलेल्या ! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला लहानपणी पिता, मोठेपणी पती आणि वृद्धापकाळी पुत्र अशा व्यक्तीचाच आधार आहे ही गोष्ट मनावर ठसलेली ! स्त्रीचा बराचसा काळ संसारात पतीबरोबर व्यतीत होत असल्याने पतीवरील निष्ठा सतत मनात राहणे हेही अशा पूजेला पूरक होते. पूर्वीच्या काळी स्त्रीला घराबाहेर पडणे फारसे मिळत नव्हते. त्यामुळे स्त्रियांना निसर्गाच्या सहवासात मैत्रिणी, नातलगांसह अशा सणाचा आनंद घेता येत असे.
यानंतरच्या काळात पावसाला जोरात सुरुवात होते. आषाढ, श्रावण महिन्यापर्यंत पावसाचा जोर असतो. हवामान प्रकृतीसाठी पोषक असतेच असे नाही, त्यामुळे उपवासाची सुरुवातही ज्येष्ठी पौर्णिमेपासूनच केली जाते आणि चातुर्मासात विविध नेम, उपास केले जातात.
‘वड’ हे चिरंजीवीत्त्वाचे प्रतीक आहे. या झाडाचे आयुष्य खूप ! तसेच वडाचे झाड छाया देणारे, जमिनीत मुळे घट्ट धरणारे आणि पर्यावरण पूरक असल्याने ते जंगलाची शोभा असते. वडाच्या पारंब्या त्याचे वंशसातत्यही दाखवतात. पारंबी रुजून वृक्ष तयार होतो. वडाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. या सर्वांमुळे आपल्याकडे वड, पिंपळ, चिंच, आवळा, आंबा यासारख्या मोठ्या झाडांचे संवर्धन केले गेले. या सर्वाला धार्मिकतेचे पाठबळ दिले की या प्रथा समाजात जास्त चांगल्या रुजतात. जसे हिंदू धर्मात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा, बैलपोळा,तुलसी विवाह यासारखे सण निसर्गातील प्राणी, वनस्पती यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो.तशीच ही वडपौर्णिमा आपण पर्यावरणपूरक अशा वडाच्या झाडाबरोबर साजरी करतो.
वटपौर्णिमेच्या पूजेमागे सत्यवान- सावित्रीची पौराणिक कथा सांगितली जाते. सत्यवान अल्पायुषी आहे हे सत्य सावित्रीला समजल्यावर सत्यवानाचे आयुष्य मिळवण्यासाठी सावित्रीने तप केले. हे तप तिने वडाच्या झाडाखाली बसून केले. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने एका वराने सासू-सासऱ्यांचे आयुष्य मागितले, तर दुसऱ्या वराने त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. आणि तिसऱ्या वराने मी अखंड सौभाग्यवती राहावे हा वर मागितला. या वरामुळे सत्यवानाचे आयुष्य तिने परत मागून घेतले. सावित्रीचे हे बुद्धीचातुर्य आपल्यात यावे ही इच्छा प्रत्येक स्त्रीने या दिवशी व्यक्त केली पाहिजे !
अरविंद घोष यांचे ‘सावित्री’ हे महाकाव्य एम्. ए. ला असताना अभ्यासले. तेव्हा या सावित्रीची अधिक ओढ लागली. ‘सावित्री’ ही आपल्या जीवनाचे प्रतीकात्मक रूप आहे. एका शाश्वत ध्येयाकडे जात असताना कितीही संकटे आली तरी आपली निष्ठा ढळता कामा नये हेच ‘सावित्री’ सांगते. प्रत्येकाचे एक आत्मिक आणि वैश्विक वलय असते. जीवन जगताना आपल्या स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधत साधत ‘ हे जगच परमात्मा स्वरूप असून आपण त्याचा एक अंशात्मक भाग आहोत ‘ हे चिरंतन सत्य समजून घेण्याचा प्रयत्न या ‘सावित्री’ त आहे.
कधीकधी मनात येतं की, स्त्रियांनीच का अशी व्रते करावी? उपास का करावे? पण अधिक विचार केला की वाटते, निसर्गाने स्त्रीला अधिक संयमी, सोशिक आणि बुद्धीरूप मानले आहे. स्त्री जननी आहे, त्यामुळे वंशसातत्याची जबाबदारी तिच्यावर आहे. सात जन्म हाच पती मिळावा ही भावना मनात ठेवली तरी स्त्री-पुरुष किंवा नवरा बायकोचे साहचर्य ह्या जन्मी तरी चांगल्या तऱ्हेने राहण्यास मदतच होते. पुनर्जन्म आहे की नाही याबद्दल खात्री नसली तरी आत्ताच्या जन्मात संसार सुखाचा होवो यासाठी तरी हे व्रत पाळायला किंवा एक सुसंस्कार मनात ठेवायला हरकत नाही ना?
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈