☆ जुन्या मैत्रिणी, नवीन आठवणी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
दोन दिवसापूर्वी अचानक जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. ‘आपल्याला ८ फेब्रुवारी २०२३ बुधवारी जायचे आहे.’ पाठोपाठ दुसऱ्याही मैत्रिणीशी बोलणे झाले. कधी,कुठे अशा प्रश्नांना वावच नव्हता. इतकी वर्षे सहल, खेळ, शाळा या सर्वांचे नियोजन करणे चालूच होते. मग मी ठरवले होते आता आपण सहलीला मैत्रिणी नेतील तिकडे जायचे.आणि बुधवार सकाळपासूनच आश्चर्याचे सुखद धक्के मिळू लागले. अगदी रिक्षा,बस हे सर्व अगदी वेळेवर आणि उत्तम स्थितीत असणारे हजर झाले.आणि जसजसे एकेक मैत्रीण गाडीत चढत होती तसतसे आश्चर्य वाढतच होते. कारण जुन्या (खूप वर्षापूर्वीच्या) मैत्रिणी नव्याने भेटत होत्या. एकमेकींची विचारपूस करत, गळाभेट घेत असताना सगळ्या आनंदात ठिकाण कधी आले कळलेच नाही.
मग तर अगदी बालपणच गवसले. एकमेकींची थट्टा, मस्करी, विनोद सुरू झाले. झोके खेळणे, नाचणे, गाणी म्हणणे, ट्रॅक्टर राईड, बोटिंग, सुग्रास जेवण, उत्तम नाश्ता… सगळेच खूप एन्जॉय केले. अगदी सगळे आयते पुढ्यात येत होते. आणि साऱ्याजणी वय, दुखणी, केसातील चांदी, जबाबदारी, नातवंडे, सगळे विसरून मस्त हसत, खिदळत होत्या.
आजच्या १० तासांच्या मैत्रिणींच्या सहवासाने अगदी सगळ्यांनाच नवीन ऊर्जा नक्कीच मिळाली. आणि जुन्या मैत्रिणींची नवीन परिपक्व ओळख झाली.
त्या सर्व मैत्रिणींना, सर्वांना घरापासून घरापर्यंत पोहोचवणारे उत्कृष्ट नियोजन, सुखरूप नेऊन घरापर्यंत आणणारे चक्रधर ( ड्रायव्हर ) आणि दगदग धावपळ यातून निवृत्त होऊन सेवानिवृत्तीचे आयुष्य नव्याने सुरू करणाऱ्या माझ्या परिपक्व मैत्रिणी ….या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद !
उन्हाळ्याचे दिवस ! काही दिवस अशा कडक उन्हाचे संपल्यावर वळिवाची चाहूल लागली. एकदम अंधारूनच आले, आणि ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला ! आला आला तो पाऊस म्हणेपर्यंत बाहेर टप टप गारांची बरसात होऊ लागली. पांढऱ्या शुभ्र गारांनी अंगण भरले. किती वेचू असं मनाला झालं !
उन्हाळ्यातला पहिला पाऊस ! तापलेली तृषार्त जमीन पाणी पिऊन घेत होती ! मातीचा सुगंध सगळीकडे दरवळला होता. अंगणात छोटी मुले मस्त भिजून गारा वेचत आनंदाने बागडत होती. ते पाहून आपण उगीचच मोठे झालो असं वाटत होतं ! हवेतला लोभस गारवा खूपच सुखद होता. अर्ध्या पाऊण तासात सगळं वातावरण बदलून गेले. अशी हवा पडली की, मला गच्चीत जाऊन त्या निसर्गाकडे बघत राहावं असं वाटे !
आकाशाकडे पाहिलं आणि मस्तपैकी इंद्रधनुष्य डोळ्यासमोर दिसू लागले ! सहज मनात आलं आणि आयुष्य हे इंद्रधनुष्यासारखे दिसू लागले. आयुष्याचा प्रत्येक टप्पा म्हणजे इंद्रधनुचा एक एक रंग आहे. पावसाच्या थेंबावर सूर्याचे किरण पडले की आकाशाच्या पटलावर आपल्याला इंद्रधनुष्य दिसते ,तसेच आयुष्याच्या या टप्प्यावर मला भूतकाळ इंद्रधनुष्यातील रंगांसारखा दिसतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आपल्या अवस्था इंद्रधनुष्यातील रंगांसारख्या वाटतात…
ता –तान्हेपण, जन्माला आलेल्या बाळाचा तांबूस वर्ण आयुष्याची सुरुवात दाखवतो.
ना – नेणतेपण, छोटे बाळ आपल्या पायावर उभे राहते.. बोबडे बोल बोलू लागते पण ते अजाण असते. नुकत्याच उगवलेल्या बाल रवी सारखे त्याचे दिसणे असते!
पि – पौगंडावस्था, साधारणपणे आठ ते पंधरा वयातील मुले जी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात.. अजून कळीचे फुल व्हायचे असते. जीवनाविषयी प्रचंड कुतूहल दाखवणारी जिज्ञासू वृत्ती या वयात असते..
हि – हिरवेपणा, हे तर सुजनाचे, तारुण्याचे प्रतीक! प्रत्येकाचा हा काळ नवनिर्मितीचा, पूर्णत्वाकडे नेणारा काळ असतो. आयुष्यातील कर्तृत्वाचा हा काळ माणसाला सर्वात जास्त आवडतो.
नि – तारुण्याचा जोश उतरू लागतो आणि जाणीव होते ती निवृत्तीची! एकंदर आयुष्याचा विचार केला तर हा प्रवास उतारा कडे नेणारा असतो..
पा – वाढत्या वयाची दृश्य खूण म्हणजे पांढरे केस! ते आपल्याला जाणवून देतात की किती पावसाळे पाहिले आपण! अनुभवाच्या संचिताची शिदोरी घेऊन ही वृद्धत्वाकडे वाटचाल चालू असते.
जा – जाता जीव शेवटी शिवाकडे विलीन होणार या सत्याची जाणीव होते आणि तो खऱ्या अर्थाने जन्म ते मृत्यूपर्यंतच्या दीर्घ प्रवासाचा आढावा घेतो.
अशा या इंद्रधनुष्यी जीवनात आपण कालक्रमणा करीत असतो. प्रत्येक अवस्था तितकीच महत्त्वाची आणि मोहक असते. जीवनाचा आस्वाद घेत हा मनुष्य जन्म चांगल्या कामासाठी व्यतीत करून पुन्हा अनंतात विलीन करणे हेच त्या इंद्रधनुष्याचे काम ! त्याची वक्रता जीवन क्रम दाखवते. लहानपणापासून ते मध्यापर्यंत वाढत जाणारी ही कमान उतरत्या क्रमाने जाते, ती जीवा शिवाची भेट होण्याची उतरती रंगसंगती दाखवत !
पहिल्या पावसाच्या मातीच्या गंधाने भरलेल्या त्या वातावरणात माझं मन इंद्रधनुष्यी बनलं होतं ! विविध विचारांच्या रंगात गंधात न्हाऊन गेलं होतं !
☆ ..आणि पदार्थ वाफाळू लागला भाग -2… शेफ शंकर विष्णू मनोहर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
( मग मी काय केलं त्या लिंबाच्या अर्ध्या भागावर पाणी घातलं आणि पिळल्याची अॅक्टिंग केली.. वेळ साधली गेली.) इथून पुढे —
रेसिपीज् हाताळणं हा माझा डाव्या हातचा मळ. त्यामुळे त्यातले काहीही प्रश्न समोर आले तरी मी लीलया सोडवतो. पण माणसाला कसं हाताळायचं आणि त्यातूनही ते जर सेलेब्रिटी असतील तर झालंच! या लढाईला तोंड देताना मात्र खरंच माझ्या तोंडचं पाणी पळालेलं असतं! कित्येक सेलेब्रिटींना अक्षरश: चमच्यानंसुद्धा ढवळता येत नाही. त्यांच्याकडून कॅमेऱ्यासमोर पदार्थ करून घेणं मुश्कीलच नाही कित्येकदा अशक्य असतं! त्यांना साहित्यातला मसाला कुठला आणि धणे-जिरे पावडर कोणती हेही समजत नाही. अशा वेळी मी तुम्हाला मदत करतो, असं म्हणत मलाच कॅमेऱ्यासमोर सगळं साहित्य सांगावं लागतं, पदार्थात घालावं लागतं. हे कमी काय म्हणून काही वेळा या सेलेब्रिटींना लगेच जायचं असतं. आता पदार्थ शिजून होईपर्यंत तर वाट बघायलाच हवी ना! कॅमेरा बंद केला की लगेच त्यांचं मोबाइलवर बोलणं, घडय़ाळ्यात बघणं सुरू होतं. मग एकदा आम्ही शक्कल लढवली चक्क बंद कॅमेरा त्यांच्यापुढे उभा करून शूटिंग सुरू असल्याचा आभास निर्माण केला म्हणजे त्यांना घडय़ाळ्यात बघायला फुरसतच मिळाली नाही किंवा मग शो सुरू असताना ते भान सुटल्यासारखे नुसतेच बोलत राहतात, तेही कोणत्याही विषयावर. अशा वेळी त्यांना परत मुख्य विषयाकडे वळवून गप्पा सुरू करायच्या हेही कसबच असतं!
एकदा तर एका हास्य अभिनेत्याने कमालच केली होती. तो येणार म्हणून सेटवरचं वातावरण एकदम उत्साही होतं. पण तो आलाच मुळी मरगळलेल्या चेहऱ्यानं. त्याला बघून क्षणभर मीच गोंधळलो की, आपण ज्याची वाट बघत होतो तो हाच का नक्की? पण विचार केला, दमला असेल म्हणून त्याला चहा दिला, जरा निवांत बसू दिलं आणि मग मेकअपला सुरवात केली. पण त्याची कळी खुलेना. शेवटी तसंच शूटिंग सुरू केलं. पदार्थ मीच दाखवला. तो चांगला झाला पण वातावरण जसं रंगायला पाहिजे ना तसं रंगलंच नाही. का तर म्हणे त्याला टेन्शन आलं होतं! अशा वेळी त्याला सतत बोलतं ठेवून, एकीकडे रेसिपी सांभाळून, सगळं कसं छान आहे, असंच शूटिंगच्या वेळी चेहऱ्यावर दाखवणारा शेफ एक उत्तम अभिनेताही असतो हे मान्य कराल ना!
कधी-कधी मात्र खरंच परीक्षा असते. सगळं शूटिंग संपल्यावर लक्षात येतं की एक पदार्थ कमी झाला आहे! आता? अजून एक पदार्थ तर दाखवायलाच हवा. शूटिंग संपलं म्हणून बॅक किचन आवरलं जातं. त्यामुळे हाताशी ना रसद असते ना कोणी मदतनीस. असंच एकदा दिवाळी रेसिपी शूटिंगच्या वेळी घडलं होतं. पॅकअप झाल्यावर कळलं की एक पदार्थ कमी पडतो आहे. बॅक किचन बंद झालं होतं. सेटवर तेल, मसाला, कणिक, मीठ वगरे दोन/चार आधीच्या रेसिपीमधले पदार्थ होते तितकेच. रात्रही इतकी झाली होती की दुकानं उघडी असण्याची शक्यताही नव्हती. इतकं टेन्शन आलं की विचारू नका. त्याच टेन्शनमध्ये कणिक आणि रवा भिजवला तो चांगलाच घट्ट झाला. आता पुढे काय करायचं या विचारानं हाताशीच असलेल्या किसणीवर तो गोळा किसू लागलो. बघितलं तर त्याचा चुरमुऱ्याच्या आकाराचा मस्त कीस पडत होता. गंमत तर पुढेच आहे.. तो कीस छान तळला गेला, तरतरून फुलला. मग मलाही हुरूप आला. सेटवर जितके मसाल्याचे पदार्थ होते ते सगळे एकत्र केले आणि त्या तळलेल्या चिवडय़ावर टाकले. तो माझा रव्याचा चिवडा इतका फेमस झाला की एका नामांकित कंपनीने तो माझ्याकडून विकत घेऊन बाजारात देखील आणला!
शूटिंगप्रमाणेच माझा कॅटिरगचा व्यवसाय होता तेव्हा किंवा मी फूड फेस्टिव्हल किंवा लाइव्ह शोज् करतो तेव्हाही, काही वेळा अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं की वाटतं इथे आपलं सगळं कसब पणाला लागलंय. जर यातून नाही तरलो तर कायमची नामुष्की. अशाच एका भीषण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं होतं ते महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाच्या वेळी. मी पाच फूट बाय पाच फूटचा पराठा केला होता हे त्यांना समजल्यावर त्यांनी अशीच मोठय़ा आकाराची पुरणपोळी करा, असं फर्मान काढलं. पण पराठा करणं वेगळं आणि पुरणपोळी करणं वेगळं. पुरणपोळी तव्यावर पडली की पुरण पातळ होऊ लागतं आणि ती उलटणं जड होतं. शिवाय पराठा पुरणपोळीच्या तुलनेत हलकाही असतो. तरीही मी पोळी केली. तव्यावरही टाकली. पण आता ती उलटायची कशी? तवा तर एकदम तापलेला होता तसंच आजूबाजूचं वातावरणंही उत्साहानं तापलेलं होतं, राज ठाकरेंसह सगळे टक लावून बघत होते. पोळी उलटता नाही आली आणि जळली तरी नामुष्की आणि उलटताना पडून तुटली तरी नामुष्की. पोटात गोळा येणं..घशाला कोरड पडणं..जे जे काही म्हणून होतं ते सगळं माझं झालं होतं. तरीही चेहऱ्यावर काही दिसू द्यायचं नव्हतं. पण इथे माझी, माझ्या आई-वडिलांची पुण्याईच कामी आली आणि पोळी न जळता, न तुटता उलटली जाऊन मस्त खमंग पुरणपोळीचा रेकॉर्ड मला पूर्ण करता आला! ही खरी दृष्टिआड सृष्टी!
खरं तर यापुढे काही सांगण्यासारखं नाहीच पण पुरणपोळीच्या गंभीर किश्शानंतर एक गमतीदार किस्सा सांगतो. आम्ही केटरिंगची काम घ्यायचो तेव्हा एका लग्नाच्या वेळी जेवणखाण सगळं उरकलं. भांडी, उरलेला शिधा वगरे सगळं टेम्पोमध्ये लोड झालं आणि टेम्पो गेला सुद्धा. फक्त आमच्या चहासाठी एक स्टोव्ह दोन भांडी, थोडं दूध, चहा पावडर, थोडीशी साखर इतकंच सामान मागे होतं. इतक्यात वधूमाय धावत आली, काय तर म्हणे वरमायेला चहा हवाय. झालं लेकीच्या सासूचं मागणं म्हणजे पूर्ण करायलाच हवं! आम्ही चहा करून दिला. तो कप घेऊन त्या बाई तशाच परत माघारी. का तर म्हणे त्यांना चहा अगोड लागतोय, आणखी साखर हवी. गंमत म्हणजे साखर सगळी संपलेली. मग मी तो कप हातात घेतला. त्यात एक चमचा घातला. तो कप घेऊन वरमायेकडे गेलो आणि म्हणालो, ‘बघा चव, साखर पुरेशी आहे का?’ आणि त्या बाईंनाही चक्क साखर पुरेशी वाटली!
या अशा अनुभवांनी मला खूप शिकवलंय. मात्र यापुढे माझा शो बघताना प्रत्येक वेळी मी मीठच टाकतोय ना किंवा साखरच घालतोय ना, असे प्रश्न मनात येऊ देऊ नका! आणि घरी असले प्रयोगही करू नका! हे असं ‘चिटिंग’ प्रत्येक वेळी नाही करावं लागत आणि कुणाला खायला द्यायच्या पदार्थात तर ते करणं कुठल्याच शेफला कधीच शक्य नाही ! तेव्हा एन्जॉय खाद्यायात्रा !
– समाप्त –
लेखक : शेफ विष्णू मनोहर
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पीएच.डी. – “महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निबंधांतील स्त्रीविषयक चिंतनाचा तौलनिक अभ्यास”
अधिव्याख्याता – य. च. मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र एल.आर.टी. कॉलेज अकोला
सचीव – महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मंगरूळपीर,जि.वाशिम
स्थानिक तक्रार समिती अध्यक्षा – (कामाच्या ठिकाणी स्त्रियांची होणारी लैंगिक छळवणूक कायदा २०१३)
स्तंभलेखिका – दै.मातृभूमि २०१९-२०
विभागीय महिला संपर्क प्रमुख – (अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
लेखन- अनेक दिवाळी अंकांमध्ये तसेच शैक्षणिक मासिकांत लेखन, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘लढा ‘ हे मुखपत्र असलेल्या मासिकात एक वर्ष लेखन. अकोला आकाशवाणीवर मुलाखती आणि व्याख्याने.स्त्री सक्षमीकरण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर व्याख्याने,गेल्या पाच वर्षांपासून ग्रंथोत्सवात वक्ता म्हणून सहभाग.महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यावर प्रात्यक्षिकांसह व्याख्याने,अनेक वृत्तपत्रांत प्रासंगिक लेखन, मासिके यांत लेखन.
मनमंजुषेतून
☆ बा भिमा! तू माऊली माझी!… ☆ डॉ. स्वप्ना लांडे ☆
“भिमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे”
असं वामनदादा कर्डक म्हणून गेलेत. दि. १४ एप्रिल १८९२ रोजी क्षितीजावरील लाली एक निराळाच संदेश घेऊन आली. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, मानववंश शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, धर्मशास्त्रज्ञ, समाज क्रांतिकारक …. आणखी काय अन् किती सांगावं!
या सर्वांसोबत आणखी महत्त्वाचं …. ‘ बा भिमा! तू समस्त स्त्री वर्गाची माऊली आहेस. इतकं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तिमत्त्वानं इतक्या छोटया छोटया गोष्टींकडे लक्ष द्यावं लेकीच्या ! इतके सन्मानाचे जिणे बहाल करावे ! सारं विस्मयकारकच … ! केवळ आईच करू शकते हे. जशी एखादी पुरोगामी आई लेकीला विचारांचे धन देते ना, छान समजाऊन पण सांगते, अगदी तस्सं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब लग्न झालेल्या आपल्या लेकींना सांगतात, ” लग्नानंतर पत्नी पुरुषाची समान अधिकारी असलेली गृहिणी असली पाहिजे, ती नवऱ्याची गुलाम असता कामा नये.” लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलामाप्रमाणे वागविल्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा. कोणत्याही कारणासाठी का होईना ज्यावेळी एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल, त्यावेळी तिला ती गर्भधारणाच टाळता येण्याची शक्यता असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणे, हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे. गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलांच्या संगोपनाचा भार स्त्रीलाच होतो. तेव्हा मुले केव्हा आणि किती होऊ द्यावयाची हा निर्णय तिचाच असला पाहिजे. राष्ट्र संकल्पनेचे आधुनिक प्रारूप घडवायचे तर स्त्रियांनाही समान अधिकार, आर्थिक सक्षमता आणि वेळ आल्यास कुटुंब नावाची रचना जाचक ठरू लागल्यास विभक्त होण्याचे अधिकार असणे गरजेचे आहे, असे बाबासाहेब म्हणत. स्त्रियांच्या प्रगतीच्या आड त्यांची लग्ने येतात, हे बाबासाहेबांनी हेरले होते. म्हणूनच “मुलींची लग्ने लवकर करून वैवाहिक जीवन त्यांच्यावर लादू नका.” तसेच आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा मुलींना अधिकार असावा असे ते म्हणत.
भारतीय स्त्री हजारो वर्षे अज्ञान दारिद्र्य, देवभोळेपणा ,अंधश्रद्धा यांच्या दुष्टचक्रात अडकलेली होती. स्त्रीला माणूस म्हणून जगता यावं याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य पणाला लावले. मनुस्मृती नावाचे अधर्मशास्त्र जाळून, मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातीची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद , त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. गुलामांना गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे, म्हणजे मग ते आपोआप बंड करतील, या आंबेडकरांच्या विधानातील गृहीत हे सबंध मानवमुक्तीच्या सामाजिक परिवर्तनाचे मूलभूत तत्त्व होते. जोवर या देशातील प्रत्येक व्यक्ती ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हक्क प्राप्त करू शकत नाही, तोवर या देशात एकात्मता निर्माण होऊ शकत नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच या देशातील स्त्रीला तिच्या गुलामगिरीची जाणीव करून देऊन, देशाच्या विकासात तिचेही योगदान किती महत्त्वाचे आहे, हे भारतीयांच्या लक्षात आणून देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बाबासाहेब म्हणतात, “आईबाप मुलाला जन्म देतात कर्म देत नाहीत असे म्हणणे ठीक नाही. आईबाप मुलांच्या आयुष्याला वळण लावू शकतात. ही गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर बिंबवून जर आपल्या मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींच्याही शिक्षणासाठी धडपड केली तर, आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल.
मनुस्मृतीने चातुर्वर्ण्याची निर्मिती करून माणसामाणसांमध्ये उच्च-नीचतेचे बीज पेरले. स्त्रियांच्या बाबतीत तर मनुस्मृतीने अतिशय कठोर कायदे केले होते. त्यामुळे तिला जगणेही असे झाले होते. मनुस्मृतीने स्त्रियांच्या बाबतीत घेतलेली भूमिका कमालीच्या असंस्कृतपणाची आहे. धर्म कोणताही असो पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल आजही गैरसमज आहेत. परंतु स्त्रीच्या प्रगतीवर मानव जातीचे हित अवलंबून आहे, हे बाबासाहेबांना माहीत होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीचे रणसिंग फुंकले. रमाईंना पाठविलेल्या एका पत्रात ते म्हणतात, “स्त्रियांच्या उन्नती व मुक्तीसाठी लढणारा मी एक योद्धा आहे.” दिनांक २७ डिसेंबर १९२७च्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस जवळजवळ पाच हजार स्त्रियांची सभा बाबासाहेबांनी घेतली होती. स्त्री व पुरुष यांनी मिळून समाजाच्या, संसाराच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. पुरुषांनीच हे काम अंगावर घेतले तर ते पार पडण्यास त्यांना फार अवधी लागेल. तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले, तर त्यांना त्या कामात लवकर यश प्राप्त होईल. याच सभेत बाबासाहेबांनी दलित स्त्रियांच्या राहणीमानाबद्दल प्रबोधन केले. मुला-मुलींना शिक्षण देण्यास सांगितले. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर भर दिला. दि. २० जुलै १९४२ साली नागपूरला दलित स्त्रियांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या सभेत वीस पंचवीस हजार स्त्रिया उपस्थित पाहून बाबासाहेबांना आनंद झाला. ते म्हणाले “स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो.”
परंपरागत कायद्यांनी अमानुष परंपरांनी जखडलेली स्त्री बाबासाहेबांनी संविधानात विकासाचे स्थान दिल्याबरोबर शिक्षण क्षेत्रात नव्हे, तर आतापर्यंत केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेले प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करू लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी अभेद्य असे एक सुरक्षा कवच तयार केले. ते म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिलाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजातील वर्गावर्गातील असमानता, स्त्री-पुरुष यांच्यामधील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करीत जाणे होय आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रासाद बांधल्यासारखे होय. हिंदू सहितेला मी हे महत्त्व देतो. बाबासाहेबांनी हे उद्गार हिंदू कोड बिलाच्या मसुद्यावरील सर्वसाधारण चर्चेच्या वेळी काढलेले आहेत. हिंदू कायद्याच्या संहितीकरणाविषयीच्या विधेयकाला बाबासाहेबांच्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व होते. कारण त्यायोगे स्त्रियांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या भेदभावाला आळा बसून त्या अधिक सक्षम बनतील असा त्यांना विश्वास होता. या कायद्याला बराच विरोध झाल्याने बाबासाहेबांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. आज स्त्रीला घटस्फोटानंतर कायद्याने स्त्रीधन वापस मिळते, वारसाहक्काने संपत्तीचा हिस्साही मिळतो. तिच्या जीवनाला एक प्रकारचे बाबासाहेबांनी स्थैर्य करुन दिले. पण बहुजन स्त्री काय करते? देवाच्या कृपेने माझं सर्व चांगलं झालं म्हणून, वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीचा काही भाग देवाच्या पेटीत देणगी म्हणून टाकते. पण ज्या पित्याने आपल्या प्रकृतीची चिंता न करता, आपल्या सर्व लेकींसाठी अहोरात्र झटून कायदा केला, प्रसंगी मनस्तापही सहन केला. हिंदू कोड बिल संपूर्ण मान्य केले नाही म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्याचा बहुजन स्त्रीला विसर पडावा ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती ! आज जेव्हा मी स्त्रियांना आत्मविश्वासाने उभे पाहते, अनेकींचे संसार चांगल्या रीतीने फुललेले पाहते, तेव्हा बाबासाहेबांच्या विचारांनी डोळ्यांत अश्रू गर्दी करतात आणि नकळत मी नतमस्तक होते.”बा भिमा! कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळयांतले पाणी नव्याने वहावे.”
सिंहगड एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला प्रवास करत होतो. बहुधा रामनवमीची सार्वजनिक सुट्टी असल्याने, आज दादरनंतर गाडीला बऱ्यापैकी कमी गर्दी होती. दादर स्टेशनलाच समोरच्या सीटवर एक चाळीस पंचेचाळीस वर्षांचा माणूस येऊन बसला. त्याने माझ्याकडे बघून एक general स्मितहास्य केलं, मीही प्रत्युत्तर दिलं.
सर्वसाधारण दिसणारा माणूस, पण थोडासा खंगल्यासारखा दिसणारा. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद थुईथुई नाचत होता. प्रचंड खुश दिसत होता तो. अर्थात संपूर्ण अनोळखी माणसाला आपण कसं विचारणार, “का हो, एवढे खुश का आहात ?”
तो, डोळे मिटून, स्वतःशीच गाणं गुणगुणत होता. आणि हळूहळू तो स्वतःच्याच भावविश्वात एवढा रममाण झाला की, त्याच्या नकळत, तो ते गाणे मोठ्याने म्हणू लागला. गाणं होतं – “होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.”
आजूबाजूचे सगळे आधी आश्चर्याने – कुतूहलाने त्याच्याकडे पाहू लागले. मग कोणीतरी त्याच्या सुरात सूर मिसळला, मग आणखी एकाने, आणखी एकाने. आम्ही सगळे “होंगे कामयाब” म्हणत होतो. अंगावर शहारा येत होता. प्रत्येकालाच सगळ्या ओळी ठाऊक होत्या असं नाही. पण त्याला ते गाणं पूर्ण पाठ होतं. जणू अनेक वर्षे तो हे गाणं म्हणत होता. त्याने ओळ म्हणायला सुरुवात केली, की बाकीचेही त्याला साथ देत होते. वातावरण नुसतं भारावून गेलं होतं.
गाडीची गती हळू हळू कमी होऊ लागली. स्टेशन येत होतं. गाणं संपलं. त्याने डोळे उघडले. आम्ही सगळे उभे राहून गाणं म्हणत होतो. गाणं संपल्यावर उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होतो.
तो अवघडला, संकोचला. मग तोही उठून उभा राहिला. रंगमंचावर, कलाकार अथवा जादूगार, प्रयोगानंतर जसा कुर्निसात करतात तसा त्याने सगळ्यांकडे बघत लवून कुर्निसात केला आणि म्हणाला, ” मी आज खूप खूश आहे. आत्ताच टाटा हॉस्पिटलमधून येत आहे. Today is my first cancer free day. आज माझा कॅन्सर पूर्णपणे निघून गेल्याचं, मी कॅन्सरवर मात केल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलं आहे. आज मी माझ्या मुलाबाळांकडे, बायकोकडे गावाला परत जाणार आहे. Thank you all for joining in.”
गाण्यामागचं कारण समजल्यावर गाण्याची अर्थपूर्णता आणखीनच वाढली, त्यानं हेच गाणं का म्हटलं तेही कळलं. आमच्या टाळ्यांचा जोर वाढला, आणि कॅन्सरवर मात करणारा तो योध्दा ताठ मानेने गाडीतून उतरून निघून गेला.
☆ OUTLET — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
लाखो जीव घेणार्या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली !……..
सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सिंग राजपूतनं नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल (आमटे) करजगी आपलं जीवन संपवतात.
-आजची नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.
या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ……..
पाण्यात शांतपणे पोहणारे बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात…… माणूस वरवर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असू शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय…?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.
भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक अध्यात्मिक गुरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्यांच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात -) त्याचंही अगदी भैयु महाराजांसारखं झाले.)
इतकं महत्वाचं असतं का हे outlet ? तर होय !!!
— कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir …मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?— मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंतर्मनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध…वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा…. हे केव्हाही सोपं नाही का.?
म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट म्हणजे परिवार आणि मित्र !—–
— हसा ! बोला ! रडा ! भांडा ! व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!
काळजी घ्या…. सोडून गेल्यावर “ᴍɪss ʏᴏᴜ” म्हणण्यापेक्षा, सोबत आहे तोपर्यंत “ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ” म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ …मी मध्यम वर्गीय… – लेखिका – सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
” नेहा, मी आज दुपारी दादरला जाऊन येणारे. ”
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत नेहा म्हणाली, “आई, ओला, उबेर किंवा टॅक्सीने जा हं .. “
सोफ्यावर पेपर वाचत बसलेला नवरा हसून लगेच म्हणाला.
” नेहा, ती मध्यम वर्गीय आहे. ती ट्रेन किंवा बसनेच जाणार”
” अरे, साठी उलटून गेली तरी ट्रेन, बसने फिरू शकते याचं खरं तर कौतुक करायला हवं तुम्ही. माझी काटकसर कसली बघता. ” मी पण हसण्यावारी नेलं ते .
” काहीतरी खायला करून ठेवीन. म्हणजे अथर्व शाळेतून आल्यावर त्याची पंचाईत नको व्हायला. “
” आई, अहो एक दिवस आणेल की काहीतरी पार्सल.. बाबाही enjoy करतील. Burger किंवा वडापाव पाव. “
” नेहा, अबब एवढाले पैसे खर्च करायचे ते junk फूड खायला ? तुझ्या मध्यमवर्गीय सासूला पटणार
का ? “
नवऱ्याने मला बोलायची संधी नाहीच सोडली.
” बरं चालेल “असं म्हणून मी विषय संपवला. मुलगा त्याच्या बेडरूम मधे अजूनही लॅपटॉपवर काम करत होता.
” सुजीत, आज ऑफिसला नाही जायचं का ? “
” अगं आज गाडी गॅरेजमध्ये दिलीय. कुठे ते टॅक्सी शोधत बसा. “वर्क फ्रॉम होम “करतोय. by the way तू आज दादरला कशासाठी जातेयस? .” – आता याला का जातेय हे सांगितलं तर परत माझ्या मध्यम वर्गाचा उद्धार होईल. म्हणून मी ” काम आहे जरा ” एवढं मोघम उत्तर दिलं.
पूर्वीच्या आमच्या दादरच्या घराशेजारी, मालतीकाकू घराला हातभार लावायला त्यांच्या भावाने कोकणातून पाठवलेले पदार्थ विकतात. दुकानातून घ्यायचं तर मी त्यांच्याकडे जाऊन आणते. तेवढीच त्या भावंडाना मदत. पण हे आमच्या घरच्यांच्या पचनी पडणं जरा कठीणच. म्हणून मी सुजीतला काही बोलले नाही..
दुपारी गर्दीची वेळ टळून गेल्यामुळे आरामात ट्रेनने दादर ला गेले. इकडची तिकडची विचारपूस केली. गप्पा टप्पा केल्या. आणि चहा पिऊन बस स्टॉपवर आले.
याच्यासाठी घे, त्याच्यासाठी घे (टिपिकल मध्यम वर्गीय !!!) असं करताना सामान अंमळ जडच झालं.
कष्ट उपसायचेच असा काही हव्यास नव्हता माझा. मी टॅक्सी करायचं ठरवलं.
स्टॉपवर उभ्या असलेल्या दोघी तिघीना नकळत विचारलं, ” पार्ल्यापर्यंत जातेय. कोणाला वाटेत सोडू का ? “
“टिपिकल मध्यमवर्गीय “– हा मीच मला taunt मारला बरं का. अरे एवीतेवी दोनशे रुपये खर्चच करायचे तर एकटीसाठी कशाला.. नाही का .. ! माझं मलाच हसू आलं. घरी जर हे सांगितलं तर
सुजीतचा तर स्फोटच होईल. माझं फुटकळ समाजकार्य कसं अंगलट येऊ शकतं याच्यावर हिरीरीने चर्चा होईल— ” काळ बदललाय, पण तरीही सतत अविश्वासाचे चष्मे घालून का रे वावरता ? चांगुलपणा अजूनही येतो अनुभवायला. ” — हे माझं म्हणणं मोडीत काढलं जाईल किंवा मध्यम वर्गीय विचारात त्याची गणना होईल हे मला माहित होतं .
मी घरी आले तर मस्त MacD च्या पार्सलवर तिघांनी ताव मारल्याची वर्दी ओट्यावरच्या पसाऱ्याने दिली… सवयीनुसार take away चे कंटेनर धुऊन पुसुन कपाटात ठेवले. कामवाल्या बाईंना , मावशींना, पदार्थ घालून द्यायला उपयोगी पडतात. , ” टिपिकल मध्यमवर्गीय ” वागणं. !!! “
सोफ्यावर जराशी टेकले. आणि मनात विचार आला —-
“मध्यमवर्ग ” हा स्तर जरी ‘ पैशाची आवक ‘ यावरून पडला असेल तरी मध्यमवर्गीयांचे विचार, वागणूक, संस्कार यात खूप श्रीमंती आहे. आज पैशाची थोडी उब मिळाली, सुबत्ता आली म्हणून हे संस्कार पाळायचे नाहीत हे कितपत योग्य आहे.? — चालत जाता येण्यासारखं अंतर असेल , किंवा बस ट्रेननी जाणं सोयीचं असेल, तर परवडतंय म्हणून टॅक्सीने जाणं जर मला चैन वाटत असेल तर त्यात मध्यमवर्ग कुठे आला.? काटकसर कुठे आली? पैशाची नाहक उधळमाधळ नको ह्या संस्काराची जपणूक आहे यात. —-
सहजपणे कोणाला मदत करणं, वस्तू जपून वापरणं, आपुलकीने कोणाशी वागणं, गरजा मर्यादित ठेवणं, उच्च राहणीमान ठेवूनही दिखाऊपणा न करणं — या वागण्याचा संबंध आजची पिढी पैशाशी का जोडू पहाते ? हे वागणं टिपिकल मध्यमवर्गीय म्हणून त्याची खिल्ली का उडवते ?– हे आकलनाच्या पलीकडे आहे आणि न पटणारे आहे. आजकालच्या आत्मकेंद्रित पिढीला या कशातही रस वाटत नाही .
एकमेकांच्या संपर्कात राहणं, जुडलेलं राहणं, “थेट ” भेटणं, हे मध्यमवर्गीय का वाटावं या पिढीला? . “आई, आजकाल असं नाही आवडत लोकांना. त्यांना त्यांची अशी space हवी असते ” असं म्हणत आपसातलं अंतर वाढवणं हे ‘उच्चभ्रू ‘??
माझ्या मध्यम वर्गीय विचारात न बसणारं आहे हे !!! आपल्याला हवं तसं वागायची मोकळीक आहे ना आपल्याला….. मग मनातल्या मनात तरी कशाला चर्चा करायची…. ‘ मी मध्यमवर्गीय आहे ‘ याचा मला अभिमान आहे ना…. मग झालं की !!
— असं म्हणून मी सगळ्यांसाठी फक्कड चहा करायला स्वयंपाक घरात घुसले.
लेखिका : नीलिमा जोशी
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
निळ्या आकाशात पतंग उंच उंच का भरारी घेतो माहित आहे ? त्याचा विश्वास असतो दोर पकडलेल्या त्या हातांवर ! त्याला माहित असतं की हे हात जोपर्यंत माझी ढील सैल करत नाहीत तोपर्यंत मी वर वर लहरत जाईन .. आकाशाला स्पर्श करेन .. वाऱ्याशी स्पर्धा करेन अन जमलेच तर ते खुणावणारे तारेही स्पर्शेन … एवढासा पतंग किती उच्च स्वप्ने पहातो केवळ त्या दोर पकडलेल्या हातांवर अन उंच उंच उडत राहतो !
माणसाचे ही असेच असते आपल्या माणसांच्या, कुटुंबांच्या भक्कम पाठिंब्यावर, विश्वासावर तो आनंदाने पळतो, मोठी मोठी स्वप्ने पहातो, ती पूर्णत्वास नेतो, केवळ या अदृश्य चिवट नाते बंधावर … जोपर्यँत हा विश्वास असतो बंधाचा, आधाराचा तोपर्यंत तो प्रचंड आत्मविश्वासाने संकटे, अडचणी आनंदाने झेलतो.
आपलाही अदृश्य दोर कधी असतो भाऊ, कधी मित्र, कधी मैत्रीण, सहचर, बहीण, पती, पत्नी बनून दृढ विश्वासाचा दोर मजबूत पकडत असतात आणि आपण आनंदाने जीवनाच्या विशाल अथांग आकाशात उंच उंच लहरतो ….आनंदी पतंग होऊन …
☆ “केवळ तुम्ही आहात म्हणून…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
“Thank God! मी हा निर्णय घेतला-‘
‘बापरे! थोडा जरी उशीर झाला असता तर..?’
“देवा! या वेळेस साथ दे —’
‘कसे अगदी वेळेवर आलात!’
‘तरी मला वाटलंच होतं!—’
‘काय करावे समजत नाही, नक्की कुठे जावं कळत नाही. कोणती दिशा पकडू? हा दिवा मालवू की तो?’
“खरं सांगू? केवळ तुम्ही आहात म्हणूनच मी हे करू शकले.’
हे आणि असे सहज उमटलेले, अंतरंगाच्या क्षितिजावर आलेले सहजोद्गार असतात. कधी ते ओठावर येतात तर कधी पोटातच वास करतात. पण भावनांची ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. ती ओढून ताणून येत नाही. ठरवूनही येत नाही. भावनांच्या वादळात, व्यक्ती जेव्हा द्विधा मनस्थितीत असते तेव्हां त्यातून बाहेर पडताना, एखाद्या जलभाराने फुटलेल्या ढगासारखे, हे शब्दतरंग झरतात.
“तुम्ही आहात म्हणून” या तीन शब्दात खूप काही दडलेलं आहे. हे तीन शब्द जितके आधारभूत आहेत तितकेच ते कृतज्ञता दर्शक ही आहेत. तसेच ते स्थितीदर्शक आहेत. अंधारातून प्रकाशाची वाट सापडलेल्या, भेलकांडलेल्या, तावून सुलाखून बाहेर पडलेल्या, श्वास कोंडला असता प्राणवायू मिळालेल्या, भरकटलेल्या, गोंधळलेल्या, जीवात्म्याला दिशा सापडल्यानंतर, त्याच्या अंतरंगातून उलगडलेली ही शब्दांची लड आहे. आता प्रश्न येतो तो हा की “तुम्ही आहात म्हणून..” या वाक्यातले “तुम्ही” नक्की कोण? ज्यांचा त्याक्षणी आधार वाटला, ज्यांनी खरा हात दिला, ऐनवेळी सकारात्मक मदत केली म्हणून हे घोडं गंगेत नहालं!
हे “तुम्ही” खरोखरच विविध आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेले सहस्त्र हातांचे हे “तुम्ही” आहेत. ते एकरंगी नसून विविध रंगी आहेत. कधी ते सगुण तर कधी ते निर्गुण आहेत. कधी ते ज्ञात आहेत तर कधी ते अज्ञात आहेत. दूर आहेत, निकटही आहेत. सावली देणारे आहेत उन्हाचा तडका ही जाणवणारे आहेत. रानातल्या चकव्यासारखे आहेत तर “भिऊ नको! मी तुझ्या पाठीशी आहे.” म्हणणारेही आहेत. कणा मोडलेल्या पाठीवर हात ठेवून, “लढ.” म्हणणारेही आहेत. सॉक्रेटिसच्या विषाच्या पेल्यात हे “तुम्ही” आहेत. कृष्णाच्या बासरीत ते आहेत. आकाशातल्या ग्रहताऱ्यात , झऱ्यात , नदीत , पर्वतातही आहेत, अर्जुनाच्या बाणात , भीमाच्या बाहुबलात, युधिष्ठिराच्या सत्यप्रियतेत, युगंधराच्या गीतेत, संतांच्या वचनात, गांधारीच्या डोळ्यावरच्या पट्टीत, कुंतीच्या वेदनेतही आहेत.
“राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये” या काव्यपंक्तीत आहेत. सुरात, लयीत, प्रेमात, रागात, रंगात आहेत. दृश्य आणि अदृश्य स्वरूपातले हे “तुम्ही” अनंत अथांग आहेत. आणि कधीतरी अवचित ते आपल्यासमोर असल्याचे जाणवते आणि मग आपण म्हणतो,
“केवळ तुम्ही आहात म्हणून…”
आपण साधे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासास निघतो तेव्हा आपली केवढी धांदल उडालेली असते ! प्रवासात लागणाऱ्या अनेक संभाव्य साहित्याची आपण विचारपूर्वक जमवाजमव करतो. शेवटच्या क्षणापर्यंत, आपण आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रवासी बॅकपॅक मध्ये काही ना काही कोंबतच असतो. आणि सुरक्षित, सुखद वाटचालीची खात्री बाळगतो.
मग जीवन ही तर लांबलचक सहलच आहे. कुठले विराम, कुठली स्थानकं, कुठला मार्ग याविषयी आपण तसे अनभिज्ञच असतो नाही का? मग या प्रवासासाठी लागणारे साहित्य नेमकं कुठलं आणि कसं घ्यायला हवं?
या प्रवासी पेटीत अनेक कप्पे आहेत, खण आहेत. काही गुप्त जागाही आहेत. काही उघडे आहेत, काही बंद आहेत. आतही आहेत, बाहेरही आहेत. ज्या ब्रम्हांडापासून जीवनाच्या प्रवासाची सुरुवात होते, तेव्हा काही कप्पे भरलेले असतातच. त्यात काही नातीगोती असतात काही गुणदोष असतात.स्थल, कालदर्शक असं बरंच काही असतं. पण बाकीच्या अनेक रिकाम्या जागा या सहलीच्या दरम्यान, कधी कळत नकळत तर कधी जाणीवपूर्वक भराव्या लागतात. वाटेत खूप सिग्नल्स असणार आहेतच. कधी लाल, हिरवे, तर पिवळे ही.
मला इथे सहज एक आठवलं म्हणून उदाहरणादाखल सांगते—
एखादी, पदार्थ बनवण्याची स्पर्धा असते. स्पर्धेपूर्वी कुणी कुठला पदार्थ बनवायचा, हे ठरलेले असते. बाजूच्या टेबलवर अनेकविध पाकक्रियेचे साहित्य ठेवलेले असते. आणि त्यातून आपल्याला जे हवे ते नेमके उचलायचे असते. वाटते तितके हे सोप्पे नसते बरं का? स्पर्धक काहीतरी विसरतोच. आणि मग ठरलेला पदार्थ बनवताना त्याची प्रचंड धावपळ होते.
जगण्याच्या स्पर्धेतही नेमके हेच घडते. ब्रह्मदेवाने आपल्यासमोर अफाट पसरून ठेवलेले आहे. आणि नेमके त्यातलेच आपल्यासाठी योग्य असलेले ” वेचायचे आहे. या प्रवासात “तुम्ही” ही एक संज्ञा आहे. त्याची अनंत रूपे आहेत. रंग,रस आहेत. तुम्हाला कुठली रूपं हवी आहेत ते तुम्हीच ठरवा. पंचमहाभूते आहेत, षड्रिपू आहेत. ध्येय, चिकाटी, जिद्द, स्वाभिमान ,स्वावलंबन, परिश्रम, सत्य, नीती, चातुर्य, बुद्धी असे सहस्त्र गुणही आहेत. हे सारेच तुमच्या मार्गातले “तुम्ही” आहेत. एकदा त्यांची निवड तुम्ही केलीत की ती योग्य आहे की अयोग्य, हे तुमच्या मुखातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे उमटणाऱ्या,
” तुम्ही आहात म्हणून” या कृतज्ञतापूर्वक उद्गारातूनच ठरेल. म्हणूनच हे “तुम्ही” तुमचे तुम्हीच निवडा. आणि जीवनाची सफर, सफल संपूर्ण करा.
चैत्र नवरात्री ,झुल्यावर बसलेली गौर आणि चैत्रातील हळदी कुंकू ,मंतरलेले बालपणीचे दिवस आठवांचे सुंदर हिंदोळे… घरातील साध्या सुध्या ट्रंक ,टेबल स्टूल आणि पारंपरिक गालिचे शेले असे ठेवणीतले सामान घेऊन आणि शोकेस मधील पक्षी प्राणी फुले फुलदाण्या घेऊन सजावटीत सुंदर पितळी झोपाळ्यावर गौर नटून सजून बसे . त्यात आमची पितळी भातुकली मांडली जाई .दारचे मोगऱ्याचे गजरे ,जाई जुईचे हार ,सोंनचाफ्याच्या वेण्या ,आंब्याच्या पानांची तोरणे , बागेतल्या कैऱ्या , आणि इतर उन्हाळी फळे ,कलिंगड ,काकड्या ,टरबूज ,द्राक्षे आंबे अशा रसरशीत फळांच्या सुंदर सजावटीची उतरंड गौरीच्या पायथ्याशी सजवली जात असे . परिसरातील मुबलक पळसाची पाने धुवून पुसून आंब्याच्या डाळीसाठी दिली जात ,कैरीचे गूळ वेलची जायफळ केशर युक्त पन्हे अक्षरशः छोटे पिंप भरून केले जाई ,आदल्या रात्री टपोरे हरभरे भिजवून रोवळी रोवळी भरून उपसले जात . ओल्या नारळाच्या करंज्या ,काही फराळाचे जिन्नस सजावटीत मांडले जात . केशरी भात , पाकातील चिरोटे अशी साधी पक्वान्ने रांधली जात.
दारात सुबक चैत्रांगण रेखत असू त्यावेळी आम्ही…
डाळ पन्हे हरभरे फळे यातील पोषणमूल्ये आणि कॅलरीज यांचा उहापोह न करता सख्यांसाठी हे पाठवत आहे .
आजूबाजूच्या चार पाच वाड्यांमधील बिऱ्हाडातील सख्या, त्यांच्या लेकी बाळी ,अगदी लांबच्या ओळखितील सुद्धा स्त्रिया पारंपरिक ठेवणीतील वस्त्र चार दागिने घालून एकमेकींची चैत्र गौर आवर्जून बघायला जात ,त्या निमित्ताने भेटी गाठी आणि ऐसपैस बोलणे बसणे होई.. सुंदर ताजी हळद ,पिंजर ,वाळ्याचे अत्तर ,गुलाबपाणी शिंपडून स्वागत होई .
बतासा , आंब्याची डाळ ,पन्हे देऊन समारंभ होई ,आणि प्रत्येकीची ओल्या हरभर्याची ओटी भरली जाई….घरी मग चटपटा चना तव्यावर परतला जाई ,त्याची चव खमंग खुमासदार लागत असे.
प्रत्येकीची कैरी डाळ त्याची खुमासदार फोडणी आणि पन्हे अगदी विविध चविंचे पण सुंदर चवीचे असे .
चैत्राची पालवी ,मनामनावर आलेली मरगळ झाकोळ सगळे घालवी आणि वसंताच्या चाहुलीने निसर्गातील चैतन्य पुन्हा सदाबहार होण्यासाठी अनुकूल असे .
हवेतील उष्मा सुसह्य करण्यासाठी पांढरा शुभ्र मोगरा , वाळा ,जाई जुई अशी फुले भरभरून फुलत , आसमंतात कडुलिंबाचा नाजूक फुलांचा मोहोर मधुर गंधाची बरसात करीत असे . उत्साहाची आनंदाची श्रीराम भक्तीची गुढी उभारून चैत्राची सुरुवात होत असे . घरोघरी श्रध्देने जपलेले गीत रामायणाचे सुंदर सूर आवर्जून गुंजत असत.
चैत्राची अशी ही जादू अजूनही मनावर आपला ठसा उमटवून आहेच.
चैत्रातील ही गौर म्हणजे पार्वतीचे माहेरघरी येणे होय. अशा माहेर वाशिणीचे कौतुक चराचराने केले नाही तर नवलच !! वर दिलेले गीत हे कोकणात पारंपरिक गौरीचे गीत म्हणून. गायले जाते. हा चैत्र गौरीचा चंदन झुला अनुभवला असेल त्या प्रत्येकीच्या मनात दर वर्षी नक्कीच झुलत असणार..
इरकली टोप पदरी अंजिरी जांभळ्या काठाची गर्भ नऊवारी साडी ,टपोरी मोत्याची नथ , चार मोजकेच पण ठसठशीत दागिने , आईचा सात्विक चेहरा , कर्तृत्ववान कष्टाळू समाधानी वावर ….आत्ता कळतंय की पार्वती म्हणजे दुसरे तिसरे कोण ….ती आईच….जगन्माता ….आणि प्रत्येकाच्या घराघरात नांदणारी आपापली आईच !!!!
लेखिका : सुश्री रश्मी भागवत
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈