मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बाळसेदार पुणे..

रोज सकाळी सुस्नात होऊन, तुळशीपुढे दिवा लावून, सुबकशी रांगोळी काढून, हातात हळदी कुंकवाची कुयरी सांवरत सुवासिनी, श्री जोगेश्वरी दर्शन घेऊन मगच स्वयंपाकाला पदर बांधायच्या. वारांप्रमाणे वेळ काढून एखादी उत्साही गृहिणी समोरच्या बोळातून बेलबागेकडे प्रस्थान ठेवायची. आमच्या हातात आईच्या पदराचे टोक असायचं. आई भगवान विष्णूच दर्शन घ्यायला सभा मंडपात शिरली की आईच्या पदराचं टोक सोडून आमचा मोर्चा मोराकडे कडे वळायचा. खिडकी वजा जागेत दोन मोर पिसारा फुलवित दिमाखात फिरायचे.

आम्ही मोरपिसांचे मोहक रंग आणि पिसाऱ्यावरची पिसं मोजत असतांना मोर आपला पिसांचा पसारा आवरता घ्यायचा. आणि मग मनांत खट्टू होऊन आम्ही मागे वळायचो, तर काय! आनंदाने आणि सुगंधान वेडच लागायचं. पानोपान फुलांनी डंवरलेल्या झाडांनी, बकुळीचा सडा शिंपलेला असायचा. अगदी ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशिल दोहो कराने, ‘अशी स्थिती व्हायची आमची. इवल्याश्या सुवासिक, मोहक बकुळ फुलांचा गजरा मग लांब सडक वेणीवर रुळायचा. अलगद पावलं टाकली तरी नाजूक फुलं पायाखाली चिरडली जायचीचं. अग बाई! नाजूक फुलांना आपण दुखावलं तर नाही ना?असं बाल मनात यायचं. बिच्चारी फुलं ! रडता रडता हसून म्हणायची, “अगं चुकून तू आमच्यावर पाय दिलास, तरी मी तुझ्या पायांना सुगंधचं देईन हो! देवळाच्या पायरीवर बसलेल्या आईला आम्ही विचारलं, ” आई इथे मोर आहेत म्हणून या देवळाला मोरबाग का नाही गं म्हणत? बेलबाग काय नाव दिलंय.? आई बेल बागेचं गुपित सांगायची, ” हे भगवान श्री विष्णूंचं मंदिर आहे. इथे पूर्वी बेलाचं बन होत. फडणवीसांचं आहे हे मंदिर. इथे शंकराची पिंड असून खंडोबाचे नवरात्र पेशवे काळातही साजरं व्हायचं. तुळशीबागेत पूर्वी खूप तुळशी म्हणून ती तुळशीबाग. हल्लीचं एरंडवणा पार्क आहे ना! तिथे खूप म्हणजे खूपच एरंडाची झाड होती अगदी सूर्यकिरणांनाही जमिनीवर प्रवेश नव्हता. एरंडबन म्हणून त्याचं नाव अपभ्रंश होऊन पडलं एरंडवणा पार्क. रस्त्यानें येताना ही नावांची गंमत सांगून आई आम्हांला हंसवायची. प्रवचन कीर्तन असेल तर ते ऐकायला ति. नानांबरोबर ( माझेवडील )आम्ही पंत सचिव पिछाडीने रामेश्वर चौकातून, बाहुलीच्या हौदा कडून, भाऊ महाराज बोळ ओलांडून, गणपती चौकातून नू. म. वि. हायस्कूल वरून श्री जोगेश्वरी कडे यायचो. ऐकून दमलात ना पण चालतांना आम्ही मुळीचं दमत नव्हतो बरं का!गुरुवारी प्रसादा साठी हमखास, घोडक्यांची सातारी कंदी पेढ्याची पुडी घेतली जायची. तिथल्याच ‘काका कुवा’ मेन्शन ह्या विचित्र नावांनी आम्ही बुचकळ्यात पडायचो. वाटेत गणपती चौकाकडून घरी येताना सितळा देवीचा छोटासा पार लागायचा. कधीकधी बाळाला देवीपुढे ठेवून एखादी बाळंतीण बारावीची पूजा करताना दिसायची. तेला तुपानी मॉलिश केलेल्या न्हांहूनमाखून सतेज झालेल्या बाळंतपणाला माहेरी आलेल्या माझ्या बहिणी, बाळांना, माझ्या भाच्यांना देवीच्या ओटीत घालून बाराविची पूजा करायच्या, तेव्हां त्या अगदी तुकतुकीत, छान दिसायच्या. नवलाईची गोष्ट म्हणजे घरी मऊशार गुबगुबित गादीवर दुपट्यात गुंडाळलेली, पाळण्यात घातल्यावर किंचाळून किंचाळून रडणारी आमची ‘भाचरं ‘सितळा देवीच्या पायाशी, नुसत्या पातळ दुपट्यावर इतकी शांत कशी काय झोपतात? हा प्रश्न आम्हाला पडायचा. अगदी नवलच होतं बाई ते एक ! कदाचित सितळा आईचा आशीर्वादाचा हात, बाळांच्या अंगावरून फिरत असावा. गोवर कांजीण्यांची साथ आली की नंतर उतारा म्हणून दही भाताच्या, सितळा देवी पुढे मुदी वर मुदी पडायचा. तिथली व्यवस्था बघणाऱ्या आजी अगदी गोल गरगरीत होत्या. इतक्या की त्यांना उठता बसता मुश्किल व्हायचं, एकीनी आगाऊपणा करून त्यांना विचारलं होतं “आजी हा सगळा दहीभात तुम्ही खाता का? आयांनी हाताला काढलेला चिमटा आणि वटारलेले डोळे पाहून आम्ही तिथून पळ काढायचो ‘आगाऊ ते बालपण ‘ दुसरं काय! पाराच्या शेजारी वि. वि. बोकील प्रसिद्ध लेखक राह्यचे. त्यांच्याकडे बघतांना आमच्या डोळ्यात कमालीचा आदर आणि कुतूहल असायचं. त्यांच्या मुलीला चंचलाला आम्ही पुन्हां पुन्हां नवलाईने विचारत होतो”, ए तुझे बाबा ग्रेट आहेत गं, एवढं सगळं कधी लिहितात ? दिवसा की रात्री? शाई पेननी, की बोरुनी? ( बांबू पासून टोकदार केलेल लाकडी पेनच म्हणावं लागेल त्याला) एवढं सगळं कसं बाई सुचतं तुझ्या बाबांना? साधा पेपर लिहीतांना मानपाठ एक होते आमची. शेवटी शेवटी तर कोंबडीचे पाय बदकाला आणि बदकाचे पाय कोंबडीला असे अक्षर वाचताना सर चरफडत गोल गोल भोपळा देतात. कारण पेपर लिहितानाअक्षरांचा कशाचा कशाला मेळच नसायचा, त्यामुळे सतत लिहीणारे वि. वि. बोकील आम्हाला जगातले एकमेव महान लेखक वाटायचे. आमची भाचे कंपनी, मोठी होत होती. विश्रामबाग वाड्या जवळच्या सेवा सदनच्या भिंतीवर( हल्लीच चितळे बंधू दुकान, )सध्या इथली मिठाई, करंजी, समोसे, वडा खाऊन गिऱ्हाईक गोलमटोल होतात, पण तेव्हां त्या भिंतीवर किती तरी दिवस डोंगरे बालामृतची गुटगुटीत बाळाची जाहिरात झळकली होती. ती जाहिरात बघून प्रत्येक आईला वाटायच माझं बाळ अगदी अस्स अस्सच बाळसेदार व्हायला हवं ग बाई, ‘ मग काय मोहिमेवर निघाल्या सारखी डोंगरे बालामृतची बघता बघता भरपूर खरेदी व्हायची. सगळी बाळ गोंडस, गोपाळकृष्णचं दिसायची. आणि मग काय!सगळं पुणचं बाळसेदार व्हायचं. बरं का मंडळी म्हणूनच त्यावेळची पिढी अजूनही भक्कम आहे. आणि हो हेच आहे त्या पिढीच्या आरोग्याचे गमक. जोडीला गाईच्या दुधातून पाजलेली जायफळ मायफळ मुरडशिंग हळकुंड इत्यादी नैसर्गिक संपत्तीची अगदी मोजून वेढे दिलेली बाळगुटी असायचीच. मग ते गोजिरवाणं गोंडस पुणं आणखीनच बाळसेदार दिसायचं.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची -> मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

🪷 मनमंजुषेतून 🪷 

☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची ☆ मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

साल 2025 सुरू झाले आणि माझ्या आयुष्यातील सुवर्णकाल सुरू झाला आहे याची अनुभूती मला यायला लागली. समाजरूपी देवतेने माझ्या कर्तृत्वाचे स्मरण ठेवून मानाचा शिरपेच माझ्या मस्तकात खोवला. आपल्याच सांगली मिरज या भागातील लोकमत सखी मंच या अतिशय प्रतिष्ठित असणाऱ्या सामाजिक संस्थेने लोकमत सखी हा सन्मान देऊन मला पुरस्कृत केलं.

सुश्री शिल्पा मैंदर्गी

माझा स्वयं चा प्रवास – 

स्वयम टॉक्स म्हणजे मोबाईल वरील एक लोकप्रिय ॲप ज्याच्याबद्दल मला फारसे माहीत नव्हते. मिरज मधील प्रतिष्ठित व्यक्ती महेश जी आपटे यांच्यामार्फत माझा स्वयं टॉक या संस्थेशी संपर्क झाला. स्वयं टॉक या संस्थेचे सर्वेसर्वा श्री नवीन काळे सर यांचा मला फोन आला आणि त्यांनी माझा व माझ्या गुरु सौ धनश्री ताई आपटे यांचा 25 वर्षांचा नृत्य प्रवास त्यांना स्वयं टॉक्सच्या मंचावर आणायचा आहे यासाठी तुम्ही तयार आहात का याची विचारणा केली.

अशाप्रकारे आयुष्य समृद्ध करणाऱ्या आणि एक आनंददायी अनुभव देणाऱ्या स्वयं टॉक्स या संस्थेशी मी जोडले गेले.

स्वयं टॉक्स च्या मंचावर माझी व माझ्या नृत्य गुरु सौ. धनश्रीताई आपटे यांची मुलाखत व माझ्या नृत्याचे प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले आणि याची पूर्वतयारी जवळ जवळ वर्षभर सुरू होती.

आता आपल्याला स्वयं टॉक्स च्या मंचावर आपल्या नृत्याचे सादरीकरण करायचे आहे म्हटल्यावर माझा नृत्याचा सराव सुरू झाला. नृत्यासाठी कोणती रचना निवडावी त्या गीतास कशा प्रकारचे संगीत असावे याबाबत आम्हा दोघींची चर्चा सुरू झाली. 64 कलांचा अधिपती असणारा श्री गणेश याचे स्तवन आपल्या नृत्यातून सादर करावे यावर शिक्कामोर्तब झाले. दररोज दोन ते तीन तास ताई माझ्याकडून नृत्याचा सराव करून घेत होत्या. हा सराव सुरू असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या परंतु त्यावरही मात करून आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले.

12 जानेवारी हा दिवस सगळीकडे युवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी स्वयं टॉक्स च्या मंचावर आमचा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. आम्ही 11 जानेवारीलाच मुंबईमध्ये दाखल झालो आमची राहण्याची व्यवस्था स्वयं टीमने केलेलीच होती. मुंबईत गेल्यापासून आमच्याशी वेळोवेळी फोनवरून संपर्क करून स्वयं टीमने आम्हाला खूप सहकार्य केले. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा मुंबई येथे होता. या कार्यक्रमासाठी आमच्या व्यतिरिक्त अजूनही सहा वक्त्यांच्या मुलाखती होत्या. आमची सर्वांशी एकमेकांशी ओळख व्हावी आणि मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम व्हावी या दृष्टीने कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हा सर्वांना एकत्र बोलवले होते. मी प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे मला जिथे नृत्य करायचे होते त्या रंगमंचाचा अंदाज येण्यासाठी प्रत्यक्ष रंगमंचावर नेऊन तेथील लांबी रुंदीची कल्पना मला देण्यात आली. तिथे आलेल्या सर्वच वक्त्यानी एकमेकांशी ओळख करून घेतली एकमेकांची मनापासून चौकशी केली आणि असे करता करता जणू त्या रंगमंचाशी आमचे एक मैत्रीचा नातं जुळून आले.

१२ जानेवारी हा मुख्य कार्यक्रमाचा दिवस उजाडला आम्ही सकाळी साडेआठ वाजताच बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे उपस्थित झालो.

स्वयंंच्या सर्व टीमने आमचे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आमची मुलाखत घेणारे सुप्रसिद्ध सुसंवादक डॉक्टर उदय जी निरगुडकर आमच्या आधीच तिथे उपस्थित होते. रंगमंचाचा पडदा उघडण्यापूर्वी उदयजींनी आम्हा सर्वांची अगदी प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली आणि ओळख करून घेतली. आणि रंगमंचावरती एक खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आमची मुलाखतीची भीती त्याचवेळी निघून गेली.

बरोबर दहा वाजता पहिले वक्ते श्री. हेरंब कुलकर्णी यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यांच्यानंतर श्री. गणेश कुलकर्णी, धनश्री करमरकर, कियारा, सौरभ तापकीर, आनंदसागर शिराळकर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. या सर्वांचेच अनुभव त्यांना असणारे ज्ञान ऐकून सर्वच प्रेक्षक अगदी भारावून गेले.

संध्याकाळी बरोबर पाच वाजता माझी आणि धनश्रीताईंची मुलाखत सुरू झाली. दृष्टीहीन नृत्यांगना शिल्पा मैंदर्गी आणि तिला स्पर्शाच्या सहाय्याने भरतनाट्यम नृत्य शिकवणाऱ्या तिच्या गुरु सौ. धनश्रीताई आपटे या दोघींची मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले होते. एखादी दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम विशारद कशी होऊ शकते याबाबत सर्वांच्याच मनामध्ये प्रचंड कुतूहल होते आणि हा गुरु शिष्याचा 25 वर्षांचा प्रवास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

डॉक्टर उदय निरगुडकर आम्हा दोघींना कोणते प्रश्न विचारणार आहेत याची आम्हाला तसूभर ही कल्पना नव्हती. उदय जी यांनी आमची मुलाखत इतक्या कौशल्यपूर्ण रीतीने घेतली की त्यामधून आमचे गुरु शिष्याचे नाते अगदी अलगदपणे उलगडत गेले. आणि आणि गेले 25 वर्षाची आमची तपश्चर्या फळाला आली.

मुलाखतीच्या शेवटी माझ्या नृत्याचे सादरीकरण होते. श्री गणेशाचे स्मरण करून मी ही रचना सादर करायला सुरुवात केली. प्रेक्षक अगदी तन्मयतेने माझी ही रचना पहात होते. त्यांना एक दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम सादर करते आहे ही गोष्टच अद्भुत वाटत होती. आणि it’s a miracle, कमाल कमाल कमाल, अद्भुत, it’s impossible, unbeliveable अशा प्रकारच्या उद्गारांनी रसिक प्रेक्षकांनी माझ्या नृत्याला दाद दिली. माझे नृत्य संपल्यानंतर प्रेक्षक जवळजवळ पाच मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत होते रंगमंदिर टाळ्यांच्या कडकडाटाने भारून गेले होते. मला टाळ्या ऐकू येत होत्या प्रेक्षक उभे राहून माझ्या नृत्याला ताईंच्या अथक परिश्रमाला दात देत होते हे माझ्या बहिणीने सांगितल्यावर मला समजले त्यावेळी मला माझ्या आई बाबांची खूप आठवण आली. त्यांच्याही जीवनाचे सार्थक झाले अशी भावना मनात निर्माण झाली. माझे आई बाबा, माझ्या दोन बहिणी, एक भाऊ यांनी मी दृष्टिहीन असूनही लहानपणापासूनच माझ्या प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन दिले त्यांचेही सहकार्य मला आज मनापासून आठवते. तसेच माझ्या आयुष्यात आजपर्यंत आलेल्या माझ्या अनेक मैत्रिणी यामध्ये विशेष उल्लेख करावा वाटतो त्या म्हणजे गोखले काकू, अनिता खाडिलकर, कानिटकर मॅडम यांचाही मला सतत आधार वाटत आला आहे. या नृत्यकलेमुळेच माझा हा सन्मान आहे.

अशाप्रकारे माझी आणि ताईंची मुलाखत show stopper ठरली. प्रत्येक जण आम्हा दोघींना भेटण्यास उत्सुक झाला होता. प्रत्येकाने आमच्या जवळ येऊन हातात हातात हात घेऊन आमचे अभिनंदन करून शुभेच्छा देऊन आमच्या दोघींच्या प्रयत्नांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भारतीय संस्कृती आणि भरतनाट्यम नृत्य कलेची जोपासना करणाऱ्या आमच्यासारख्या गुरु शिष्यांच्या मुलाखतीच्या गोड आठवणी मनामध्ये साठवून ठेवून प्रेक्षक रंग मंदिरातून बाहेर पडले.

आपली ही भारतीय संस्कृती भरतनाट्यम कला अशीच उत्तुंग नेण्याची माझी इच्छा आहे हे बळ माझ्या मध्ये देण्याची मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आहे.

पुन्हा एक वार स्वयं टॉक्स च्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद ! 

मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी

मिरज

दूरभाष ०२३३ २२२५२७५

शब्दांकन : सौ. अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

(🙏🙏 शिल्पाने दिलेले हे मनोगत खूप बोलके आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “’पाठ’ पुराण…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “’पाठ’ पुराण…” ☆ श्री जगदीश काबरे

शरीराच्या ‘पाठी’चा कणा ताठ असतो जेव्हा, मनाचा व्यवहार सुरळीत चालतो तेव्हा. खरे तर आपण म्हणजे ‘पाठ’च असतो. ‘पाठी’च्या कण्यावरच तर आपली शारीरिक, नैतिक आणि मानसिक भिस्त असते. त्या कण्याच्या जोरावरच आपले शरीर उभे रहाते. आणि त्याच्या ताठपणावरच आपले भावविश्व कधी झुकते, कधी खचते तर कधी उंच उभारी घेते.

शाबासकीची थाप ‘पाठी’वरच पडते. धपाटा वा रट्टाही ‘पाठी’वरच मिळतो. तसंच सहानुभूतीचा हात ‘पाठी’वरूनच फिरतो. आपल्याला उभारी देणारा अश्वासक हातही ‘पाठी’वरच ठेवला जातो. कघी संधीकडे, कधी आयुष्याकडे, तर कधी मोहाकडे माणसे ‘पाठ’ फिरवतात. कधीकधी वाऱ्याला ‘पाठ’ देत देत संकटाना तोंड देतात. ‘पाठी’ला ‘पाठ’ लावून आलेली भावंडे एकमेकांच्या ‘पाठी’त खंजीर खुपसतात. तर कधी मित्र म्हणवणारी माणसे ‘पाठी’शी खंबीरपणे उभी रहातात.

एखाद्या ध्येयाचा, प्रश्नाचा जन्मभर ‘पाठ’पुरावा करत माणसे चळवळी उभारतात आणि पोटात माया असलेली माणसे आसऱ्याला आलेल्यांची ‘पाठ’राखण करताना मिळणारी दूषणे ‘पाठी’वरच झेलतात. राजकारणी माणसे कधी एखाद्याला शिताफीने ‘पाठी’शी घालतात, तर कधी एखाद्याच्या ‘पाठी’मागे लपतात.

घोड्याच्या ‘पाठी’वर स्वार होतात तर गाढवाच्या ‘पाठी’वर ओझे लादले जाते. परिस्थितीवशात सुसरीबाईच्या खरखरीत ‘पाठी’लाही मऊ म्हटले जाते. आणि खारीच्या ‘पाठी’वर रामाची बोटेही दिसतात.

‘पाठी’चा कणा हा सर्वार्थाने आपल्या जगण्याचा आधार असतो. म्हणूनच शरीराचा अन मनाचा व्यवहार सुरळीत चालू रहातो. कसे?

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नदी आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ नदी आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी अनंत तुझे ते अव्याहत वाहत जाणे ! तुझे कार्यच तसे, वाहणे ! काळाच्या कसोटीवर तुला, अनेकदा पाहिलं.. तुझं काम चोखच ! किती जणांची पापे तू धुतलीस ते तुलाच माहीत ! तुझ्या किनारी कितीतरी पिढ्यानपिढ्या गाणी गायली ! त्यांची सर्व दुःख वेदना पोटात घेऊन, तू परत स्वच्छच राहिलीस ! 

तुझ्या पोटातील घाण वेळोवेळी कचऱ्यासारखी बाहेर पण टाकलीस ! तो कचरा पण प्रवाहापासून अलग होऊन, दोन्ही किनार्ऱ्यांना बाजूला झाला ! 

तोच कचरा परत काही कालानी परत वेदना घेऊन तुझ्याच जवळ आला ! पापक्षालनासाठी ! असं अव्याहत वर्तुळ तू पूर्ण करण्यासाठीच तुझा जन्म झाला का ? 

नियतीने तुला त्यासाठीच जन्माला घातले का ? तुझ्याजवळ आला तरी तो पापी पुण्यच पदरी घेऊन गेला ! तू मात्र आहे तशीच राहिलीस ! तुझ्यात यत्किंचितही बदल झाला नाही ! हेच तुझे वैशिष्ट्य जगाला दिलेस ! तुझ्याशिवाय जन्मच हा अपुरा वाटतो, व ते तेवढंच सत्य आहे ! काळाच्या पडद्याआड कितीतरी गोष्टी लपल्या ! पण ते उघड गुपित … ते गुपितच ठेवून तुझा हा अखंड प्रवास चालूच आहे !

आजन्म तृषार्ताला तू नाही म्हटलं नाहीस ! प्रत्येकाची तृष्णा तू भागवून दमली नाहीस ! तुझे हे रूप चिरतरुणच राहिले ते तुझ्या स्वभावामुळे !

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – २९  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पत्रिका

ताई आणि संध्या दोघीही कला शाखेत पदवीधर झाल्या. दोघींनी वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतले. संध्याला मुंबई विद्यापीठाची फेलोशिपही मिळाली. माझ्या आठवणीनुसार ताईने एम. ए. ला सोशिऑलॉजी हा विषय घेतला होता आणि त्यानंतर तिला सचिवालयात चांगली हुद्देवाली नोकरी मिळाली. त्याचवेळी उपवर कन्या ही सुद्धा जोड पदवी दोघींना प्राप्त झाली होती. परिणामी आमच्या जातीतल्याच काही इच्छुक आणि एलिजिबल बॅचलर्सच्या कुटुंबीयांकडून दोघींसाठी सतत विचारणा होऊ लागली. काय असेल ते असो पण ताई मात्र याबाबतीत फारशी उत्सुक वाटत नव्हती. काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तर द्यायची शिवाय आमचं कुटुंब हे व्यक्ती स्वातंत्र्य जपणारं असल्यामुळे आमचे आई पप्पा याबाबतीत तसे शांतच होते. मात्र संध्याचे वडील ज्यांना आम्ही बंधू म्हणायचो ते मात्र “संध्याचे लग्न” याबाबतीत फारच टोकाचे बेचैन आणि अस्वस्थ होते. “ यावर्षी संध्याचं लग्न जमलंच पाहिजे. ” या विचारांनी त्यांना पुरेपूर घेरलं होतं. संध्याचं लग्न जमण्याबाबत काहीच नकारात्मक नव्हतं. सुंदर, सुसंस्कारित, सुविचारी, सुशिक्षित आणखी अनेक “सु” तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती दिमाखदारपणे जुळले होते. प्रश्न होता तो तिच्याकडून होणाऱ्या योग्य निवडीचाच. अशातच कोल्हापूरच्या नामवंत “मुळे” परिवारातर्फे संध्या आणि अरुणा या दोघींसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. घरंदाज कुटुंबातील, अमेरिकेहून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला, भरगच्च अकॅडॅमिक्स असलेला, कलकत्ता स्थित, “युनियन कार्बाइड” मध्ये उच्च पदावर मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या “अविनाश मुळे” या योग्य वराची लग्नासाठी विचारणा करणारा प्रस्ताव आल्यामुळे सारेच अतिशय आनंदित झाले.

रितसर कांदेपोहे कार्यक्रम भाईंकडेच (आजोबांकडे) संपन्न झाला. मुलगा, मुलाकडची माणसं मनमोकळी आणि तोलामोलाची होती. विवाह जमवताना “तोलामोलाचं असणं” हे खरोखरच फार महत्त्वाचं असावं आणि अर्थात ते तसं त्यावेळी होतं हे विशेष.

आतल्या खोलीत बंधूंनी पप्पांना सांगितलं की, ” मुलाच्या उंचीचा विचार केला तर या मुलासाठी संध्याच योग्य ठरते नाही का जना?” 

पप्पा काय समजायचं ते समजलेच होते. शिवाय त्यांना मूळातच अशा रेसमध्ये भाग घ्यायचा नव्हता. ते दिलखुलासपणे बंधूंना म्हणाले, ” अगदी बरोबर आहे, आपण संध्यासाठीच या मुलाचा विचार करूया आणि तसेही अरुला एवढ्यात लग्न करायचेही नाहीय. ”

बघण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर, आनंदात, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. न बोलताच होकारात्मक संकेत मिळालेही होते. तरीही पत्रिका जमवण्याचा विषय निघाला. वराच्या माननीय आईने दोघींच्याही पत्रिका मागितल्या आणि या “पत्रिकेमधील कोणती जुळेल त्यावर आपण पुढची बोलणी करूया. ” असं त्या म्हणाल्या.

बंधूंचा चेहरा जरा उतरलाच असावा. पपांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. न बोलताच स्पर्शातूनच सांगितले, “काळजी करू नका. होईल सगळं तुमच्या मनासारखं. ”

मी त्यावेळी प्रतिक्रिया देणे हा कदाचित उद्धटपणा ठरलाच असेल पण तरीही मी म्हणालेच, ” इतकी वर्षं अमेरिकेत राहणारा मुलगाही पत्रिकेत कसा काय बांधला जाऊ शकतो किंवा आईच्या विरोधात जाण्याचं टाळत असेल का ? निर्णय क्षमतेत जरा कमीच वाटतोय मला. ” परंतु “अविनाश मुळे” हा मुलगा सर्वांनाच खूप आवडला. माझ्या त्यावेळच्या शंकेचंही निरसन कालांतराने झालंच. बाबासाहेब.. ज्यांना आम्ही संध्याच्या लग्नानंतर हे संबोधन दिले.. ते अतिशय उच्च प्रकारचं व्यक्तीमत्त्व होतं. त्यांचं आदरणीय स्थान माझ्या मनात कायमस्वरुपी आहे.

संध्याच्या चेहऱ्यावरचे त्यावेळचे अस्फुट, संदिग्ध भावही तिची पसंतीच सांगत होते. त्या काही दिवसांपुरता तरी “या सम हाच” हेच वातावरण आमच्या समस्त परिवारात होते. त्याच दरम्यान ताईने संध्याजवळ हळूच म्हटलेलं मी ऐकलंही, “तुझीच पत्रिका जुळूदे बाई! म्हणजे प्रश्नच मिटला. ”

पत्रिका संध्याचीच जुळली आणि घरात सगळा आनंदी आनंद झाला. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, कपडे दागिने, खरेदी, जेवणाचा मेनु, पाहुण्यांचे स्वागत.. उत्साहाला उधाण आले होते. दरम्यान अविनाश दोन-तीन वेळा येऊन संध्याला वैयक्तिकपणे भेटलेही. एकंदर सूर आणि गुण दोन्ही छान जुळले. ताई मात्र प्रचंड आनंदात होती. नकारातही दडलेला हा तिचा खुला आनंद मला मात्र जरा विचार करायला लावणारा वाटला पण सध्या तो विषय नको. “संध्याचं लग्न” हाच आघाडीचा प्रमुख विषय नाही का? 

अवर्णनीय असा संध्याच्या लग्नाचा सोहळा होता तो! सनईच्या मंगल सुरांसोबत संध्या मनोभावे गौरीहर पूजत होती. बाहेर दोन्ही वर्‍हाडी मंडळीत गप्पागोष्टी, खानपान मजेत चालू होतं भेटीगाठी घडत होत्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता, नव्याने काही नात्यांचं पुनर्मिलन होत होतं. करवल्या मिरवत होत्या. पैठण्या शालू नेसलेल्या, पारंपरिक दागिने घालून महिला ठुमकत होत्या. नवी वस्त्रं, नवी नाती, नवे हितसंबंध, नव्या भावना. याचवेळी पप्पा हळूच गौरीहर पुजणाऱ्या सौभाग्यकांक्षिणी संध्याजवळ प्रेमाने गेले. संध्या आमची सहावी बहीणच. “मावस” हे नुसतं नावाला. लेक चालली सासुरा या भावनेने पप्पांना दाटून आलं होतं. डोळे पाणावले होते. संध्याने पप्पांकडे साश्रू नयनाने पाहिले. तिच्या नजरेत, ” काय पप्पा?” हा प्रश्न होता.

“ बाबी! या डबीत एक ताईत आहे लग्नानंतर तू तो सतत जवळ ठेव, नाहीतर गळ्यात घाल. तुझ्या सौभाग्याचं हा ताईत सदैव रक्षण करेल. ”

त्या क्षणी संध्याच्या मनातला गोंधळ पप्पांना जाणवत होता. “ पप्पा तुम्ही हे सांगताय? हा प्रश्न तिच्या ओठावर आलाही असणार. पप्पा एव्हढंच म्हणाले, ” बाबी! नंतर बोलु. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी या बापाचे खूप आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. ”

संध्याचा पपांवर निस्सीम विश्वास होता.

तर्काच्या पलिकडच्या असतात काही गोष्टी खरं म्हणजे! पप्पांचा ज्योतिष शास्त्रावरचा सखोल अभ्यास होता. ते स्वतःही जन्मपत्रिका मांडत. आमच्या, आमच्या मुलांच्या ही पत्रिका त्यांनीच अचूक मांडल्यात पण तरीही भविष्य सांगण्यावर आणि मानण्यावर त्यांचा कधीच भर नव्हता. एकाच वेळी ते “ज्योतिष” या शास्त्राला मानत असले तरी ते त्यावर विसंबून राहण्याबाबत फार विरोधात होते. पत्रिका जुळवून लग्न जमवणे, कुंडलीतले ग्रहयोग, त्यावरून ठोकताळ्याचं चांगलं -वाईट भविष्य अथवा चांगल्यासाठीची व्रत वैकल्यं, वाईट टळावं म्हणून शांती वगैरे संकल्पनांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. Rule your stars.. असेच ते कुणालाही सांगायचे. मग अशा व्यक्तीकडून संध्याबाबतच्या या छोट्याशा घटनेचं कसं समर्थन करायचं? काय अर्थ लावायचा? 

त्याचं असं झालं.. डोंबिवलीच्या एका ज्योतिषांकडे( मला आता त्यांचं नाव आठवत नाही) “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी जुळतात का हे तपासण्यासाठी संध्या आणि अरुणाच्या पत्रिका आल्या होत्या. त्यांनी काही निर्णय देण्याआधीच बंधू त्यांना भेटले होते. गंमत अशी की हे डोंबिवलीचे सद् गृहस्थ आणि पप्पा बऱ्याच वेळा एकाच लोकल ट्रेनने व्ही. टी. पर्यंतचा आणि व्ही. टी. पासून चा (आताचे शिवाजी छत्रपती टर्मीनस) प्रवास करत. दोघांची चांगलीच मैत्री होती. त्या दिवशी पप्पांना गाडीत चढताना पाहून या सद्गृहस्थांनी पप्पांना जोरात हाक मारली, “ढगेसाहेब! या इकडे, इथे बसा. ” त्यांनी शेजारच्या सहप्रवाशाला चक्क उठवले आणि तिथे पप्पांना बसायला सांगितले.

“हं! बोला महाशय काय हुकूम?” पपांनी पुढचा संवाद सुरू केला.

“ अहो! हुकूम कसला? एक गुपित सांगायचंय. बरे झाले तुम्ही भेटलात. ”

मग त्यांनी विषयालाच हात घातला. “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी कुठलीच पत्रिका नाही जुळत हो! अरुणाची सहा गुण आणि संध्याची केवळ पाच गुण. पण श्रीयुत निर्गुडेंमुळे(बंधु) थोडा नाईलाज झाला. गृहस्थ फारच नाराज झाले होते. ”काहीतरी कराच” म्हणाले.

“ काय पंडितजी तुम्ही सुद्धा ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बरं मग पुढे काय आता. ?”

“निर्गुड्यांना मी काहीच सांगितलेले नाही. हे बघा. पत्रिकेत मृत्यूयोग आहे. लग्न झाल्यावर आठ वर्षानंतर काहीतरी भयानक घडणार आहे पण ही पनवती, हे गंडांतर जर टळले तर मात्र उभयतांचा पुढच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत आनंददायी आहे हे निश्चित. ”

“ म्हणजे सत्यवान सावित्रीची कलियुगातील कथा असेच म्हणूया का आपण?”

पप्पांना गंभीर प्रसंगी विनोद कसे सुचत?

“ ढगे साहेब हसण्यावारी नेऊ नका. माझं ऐका. मी एक ताईत तुम्हाला देतो. तेवढा कन्या जेव्हा गौरीहर पुजायला बसेल ना तेव्हा तिच्या हाती सुपूर्द करा किंवा तिच्या गळ्यात तुम्ही स्वत: घाला. उद्या आपण याच संध्याकाळच्या सहा पाचच्या लोकलमध्ये नक्की भेटू. ?”

पप्पांनी फक्त त्या सद् गृहस्थांच म्हणणं ऐकलं आणि एका महत्त्वाच्या माध्यमाची भूमिका पार पाडली होती. त्यात त्यांची अंधश्रद्धा मुळीच नव्हती. होतं ते संध्यावरचं लेकी सारखं प्रेम आणि केवळ तिच्या सुखाचाच विचार. त्यात ते गुंतलेले नसले तरी कुठेतरी सतत एका अधांतरी भविष्याचा वेध मात्र ते घेत असावेत. बौद्धिक तर्काच्या रेषेपलिकडे जेव्हा काही घडतं ना तेव्हा त्यावर वाद आणि चर्चा करण्यापेक्षा त्या घटनांकडे तटस्थपणे पहावे नाही तर त्या जशाच्या तशा स्वीकाराव्यात हेच योग्य. फार तर “आयुष्यात आलेला असा एक अतिंद्रिय अनुभव “या सदरात समाविष्ट करावे.

संध्याचे लग्न झाले. बंगालच्या भूमीत एक महाराष्ट्रीयन संसार आनंदाने बहरू लागला. दिवस, महिने, वर्षं उलटत होती. आणि ते पनवतीचं आठवं वर्षं उगवलं. खरं म्हणजे पपांशिवाय कुणाच्याच मनात कसलीच भीती नव्हती. कारण सारेच अनभिज्ञ होते. पण आठव्या वर्षीच आमच्या परिवाराला प्रचंड दडपण देणारे ते घडलेच. बाबासाहेबांना अपघात झाला होता. संध्याचाच भाईंना फोन आला होता. तशी ती धीर गंभीर होती पण एकटी आणि घाबरलेली होती. ताबडतोब कलकत्त्याला जाण्याची तयारी झाली. प्रत्यक्ष भेटीनंतर बराच तणाव हलका णझाला. कारण

श्री. अविनाश मुळे हे केवळ योगायोगाने किंवा दैवी चमत्काराने किंवा पूर्व नियोजित अथवा पूर्व संचितामुळेच एका भयानक प्राणघातक अपघातातून सही सलामत वाचले. जणू काही त्यांचा पुनर्जन्मच झाला. आता तुम्ही काही म्हणा.

“ काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ”

अथवा 

“आयुष्याची दोरी बळकट किंवा देव तारी त्याला कोण मारी.

पण यानंतरची पप्पांची प्रतिक्रिया फक्त मला आठवते. ओंजळभर प्राजक्ताची फुले त्यांनी देव्हाऱ्यातल्या कृष्णाच्या मूर्तीवर भक्तीभावाने वाहिली आणि ते म्हणाले,

 हे जगन्नाथा! कर्ताकरविता तुज नमो।

अजूनही माझ्या मनात एक प्रश्न आहे. डोंबीवलीच्या त्या होरापंडितांनी त्यावेळीचं गुपित बंधुंनाच का सांगितलं नाही आणि पपांनाच का सांगितलं? या मागचं गुपित काय असेल?

जाउदे! काही प्रश्नांची उत्तरं न मिळण्यातच आयुष्याची जडणघडण असते हेच खरं!

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सुप्त ज्वालामुखी अचानक जागृत होऊन त्यातून लाव्हा उसळावा, तशी अचानक त्याची आठवण आली.

तशी लहानच होते मी. सहावी-सातवीत असावे बहुधा. शाळा मुलामुलींची असली, तरी मुलं-मुलं, मुली-मुली असेच ग्रूप असायचे. मी तर अगदीच लाजाळू होते. ग्रूपबाहेरच्या मुलींशीही बोलायचे नाही मी. मग मुलांची तर बातच सोडा.

फेब्रुवारीचा मध्य असावा. अचानक तो समोर आला. आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा. नेहमी पहिला नंबर यायचा त्याचा. मी कितीही अभ्यास केला, तरी मी दुसरीच यायचे.

तर तो अचानक समोर आला. कोणाचं लक्ष नाहीसं बघून त्याने माझ्या हातात एक कागद दिला, ” माझ्या वडिलांची बदली झालीय. हे शहर सोडून चाललोय आम्ही. यात माझा नवीन पत्ता आहे. पत्र लिही मला. नक्की. “

त्याचे डोळे अगदी काठोकाठ भरले होते. कोणत्याही क्षणी तो रडायला लागेल, असं वाटत होतं.

कागदावर त्याच्या रेखीव अक्षरात त्याचा पत्ता होता. आणि बाजूला लाल पेनने रेखाटलेला गुलाब.

मी पटकन तो कागद दप्तरात टाकला. पुन्हा समोर बघितलं, तर तो नव्हता. तो गेला होता. नंतर दिसलाच नाही.

पण तो शाळा सोडून चाललाय, म्हटल्यावर मला आनंदच झाला. आता वार्षिक परीक्षेत आणि नंतरही माझाच पहिला नंबर येणार होता.

घरी गेल्यावर दप्तर जागेवर ठेवलं. कपडे बदलून, खाऊन मी खेळायला गेले.

नंतरही त्या कागदाचं माझ्या डोक्यातूनच गेलं.

पुढे ते चिटोरं कुठे गेलं, कोणास ठाऊक! तोही डोक्यातून निघून गेला.

तेव्हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ वगैरे संकल्पना तर सोडाच, पण तो शब्दही आम्हाला माहीत नव्हता.

पण आता त्याची आठवण झाल्यावर वाटलं, की तो माझा ‘व्हॅलेंटाईन’ असेल का? किंवा नेमकं सांगायचं झालं, तर मी त्याला त्याची व्हॅलेंटाईन वाटत होते का? कल्पना नाही.

त्या दिवशी तो गेला, तो माझ्या आयुष्यातूनच गेला. नंतर तो कधीच भेटला नाही. आता भेटला, तर मी बहुधा त्याला ओळखणारही नाही. पण मी कोणाला तरी आपली व्हॅलेंटाईन वाटले, याची मला गंमत वाटली. गंमत! हो. फक्त गंमतच.

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तीन शब्दांची गोष्ट…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “तीन शब्दांची गोष्ट…” ☆ श्री जगदीश काबरे

“I Love You” हे तीन शब्द कुणी कुणालाही सहजपणाने म्हणता येऊ नयेत इतके वाईट आहेत का?

आपण आजच्या काळात जाता येता सर्रास शिव्या ऐकतो… त्याही आपल्याला सहजच वाटतात, पण कुणी ‘I love you’ हे सहजपणाने जरी बोलून गेलं तरी येणार्‍याजाणार्‍याच्या भुवया उंचावतात. अशिक्षित आणि सुशिक्षीत सगळीच माणसे याबाबतीत सारखीच.

तुमचं एखाद्यावर/एखादीवर प्रेम आहे, एखादा/एखादी तुम्हाला आवडते… हे त्याला/तिला सांगणं कसं चुकीचं आहे; हेच लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवल जातं. आणि मग हीच मुलं मोठी झाल्यावर खर्‍या प्रेमातही… ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे साधंसं वाक्यही बोलायला कचरतात… बोलू शकत नाहीत… बहुधा घाबरतातच… कारण काही काही गोष्टी शिकवतांनाही त्या चुकीच्या पद्धतीने शिकवल्या गेल्या आहेत, असं मला बर्‍याचदा वाटतं.

अगदी ‘नमस्कार’ म्हणतो ना आपण ओळखणार्‍या प्रत्येकाला तेवढ्या सहजतेने… अगदी तस्सचं ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे म्हणता यायला हवं. कारण प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष संबंधातच असतं असं नाही; तर कोणत्याही दोन माणसात (gay and lesbian too) ते होऊ शकतं. असे घडले तरच आपण प्रेमाला सरकारात्मकतेने घेऊ शकू, आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ चा चुकीचा अर्थ काढणे बंद करू. मग जसे आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण साजरा करण्यासाठी आपण निमित्त शोधत असतो तसाच ‘व्हॅलेंटाईन डे’ हा सुद्धा आपल्याच संस्कृतीतील सण निमित्त म्हणून आहे असे समजता येईल. असे झाले तर प्रेम व्यक्त करायला एका दिवसाची गरज काय, असा उथळ प्रश्न विचारणे बंद होईल.

म्हणून मला वाटतं I love you म्हणणं हे इतकं सहजपणाने असायला हवं की, आपल्याला आवडणार्‍या कुणाही माणसाला ते न घाबरता म्हणता यायला हवं… जितक्या सहजपणे आपण आपला अहम दुखावल्यावर द्वेष करू लागतो. पण आजची परिस्थिती पाहता भारतात द्वेष करणे सोपे आणि प्रेम करणे तेवढेच कठीण! कारण प्रेमासाठी लागते मोकळे मन! ते किती लोकांकडे आहे?

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रयागराज येथील महाकुंभ.. एक अनुभव…” – लेखिका : सुश्री रविबाला काकतकर   ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे  ☆

डाॅ.भारती माटे

??

☆ “प्रयागराज येथील महाकुंभ.. एक अनुभव…” – लेखिका : सुश्री रविबाला काकतकर   ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

आत्ता नुकतेच महाकुंभला जाता आले. तीन रात्री आणि चार दिवस असे वास्तव्य होते. उत्तर प्रदेश सरकारच्या ‘आगमन’ ह्या टेन्ट सिटी मध्ये बुकिंग केले होते.

दुर्दैवानी माझी मैत्रीण आणि मी असे जाणार होतो. पण ऐनवेळी काही कारणांनी तिचे येणे cancel झाले. त्यामुळे एकटीने जाण्याचे धैर्य केले.

माझ्या जावयानी बुकिंग केले, त्या एजन्टनी दिलासा दिलान की “खूप सुरक्षित आहे तुम्ही जा. मी गाईडची व्यवस्थाही केली आहे. “

पुणे दिल्ली प्रयागराज असा विमान प्रवास करून तारीख 15 जानेवारीच्या रात्री टेन्ट सिटी ला पोहोचले. Reception मध्ये गळ्यात एक सिल्कीश स्कार्फ घालून स्वागत झाले. अतिशय उत्कृष्ट असा डिलिक्स टेन्ट आणि त्यालाच लागून असलेले स्वतंत्र न्हाणीघर अशी व्यवस्था

होती. मुख्य आखाडे, नदी, त्रिवेणी संगम सर्वांपासून हे हॉटेल किमान दोन किलोमीटर इतक्या दूर वर आहे. हॉटेलचा एकूणच परिसर खूप मोठा होता. त्यामुळे सर्वदूर जायला गोल्फ कार्ट्स होत्या. जेवणघर, स्वागतकक्ष आणि शेकडो टेन्ट्स.

बरेच परदेशी लोकही होते. मोठमोठ्या गाड्या भरून पाहुणे येतच होते.

मुख्य प्रश्न होता दुसरी कोणतीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसताना मी दुसऱ्या दिवशी गावात कशी जाणार? कारण गाडीचे भाडे दर दिवसाला 7. 8 हजार, गाईडचे भाडे 6 हजार एका दिवसाला. मी तीन रात्री चार दिवसांचे बुकिंग केले होते. मग गाईड असला तरी जाणे परवडणारेच नव्हते.

गाईडशी दुसऱ्या दिवशी सकाळी बोलल्यावर कळले ते वेगळेच. विद्यार्थ्यांची एक टीम यात्रेकारुंना सर्व दाखविण्यासाठी प्रशिक्षित केली आहे. पण त्याच्या पैकी कोणाला टेन्ट सिटी च्या आत प्रवेश नव्हता.. त्यामुळे बाहेर उभे राहून त्यातले तीनजण माझ्याशी बोलत होते. हॉटेलच्या स्टाफ पैकी एका मुलीने माझे गाईडसाठी पुण्याहून येण्यापूर्वी पैसे घेतले होतेन. तिनी आश्वस्त केल्यावर त्यांनी एक सुझाव मांडला की मी एकटी आहे आणि जर मला चालणार असेल तर ह्या मुलाच्या मोटर सायकलवर मागे बसून तो मला हा सर्व परिसर, देवळे, संगम इत्यादी दाखवेल. मी तयार झाले. कारण दुसरा काही पर्याय नव्हता. पण ह्या मुलानी तिनही दिवस माझी खूप काळजी घेतलीन. मला सर्व वेळ माझे वय पाहून मला दादीदादी म्हणत फिरवून आणले! 😄

ह्याच हॉटेलच्या मागे गंगेचा एक प्रवाह येत होता. तिथे ह्या टेन्ट सिटी च्या लोकांसाठी स्नानाची व्यवस्था होती.

सकाळपासून आणि रात्री तर खूपच थंडी होती.

त्यामुळे पाण्यात जाण्याचे धाडस होत नव्हते.

आंघोळीला पाणी नळाला गंगेचेच येत होते मग वेगळे थंडीत जाऊन पाण्यात स्नान करण्याचे धाडस होतं नव्हते. 😄 पण अखेर शेवटच्या दिवशी गार आणि स्वच्छ पाण्यात नाक दाबून डुबी घेतल्या तेव्हा जाणवले की, हा अनुभव आधीच हे का घेतला नाही 🙆‍♂️ इतके छान वाटत होते.

कुंभ मधील शाही स्नानाचे दिवस सोडले तर गर्दी खूपच कमी होती सर्वच रस्त्यांवर. आणि 

तिथल्या हॉटेल्सचे रेट्स अश्यावेळी निम्मे होतात.

पहिल्या दिवशी गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती ह्याच्या संगमाला भेट दिली.

वेणी माधव हे प्रसिध्द विष्णू – लक्ष्मी मंदिर, वासुकी नागाचे मंदीर ह्यांना भेट दिली.

झोपलेल्या हनुमानाच्या मंदिराला काही वर्षांपूर्वी भेट दिली असल्यामुळे गर्दीत गेले नाही.

त्या आधी विविध आखाड्यांना भेट दिली. जुना आखाडा येथे नागा साधू. एकानी डोक्यावर काही किलोंचे ओझे रात्रंदिवस बाळगणारा साधू, तर एकानी, त्याचा दावा हात, सतत आकाशात उंच ठेवण्याचे

आव्हान पेललेले दिसले.

तो फक्त फळांहारावर जगतो आहे.

पुढे त्यांना नेमून दिलेल्या जागांवर धुनी इतवून येणाऱ्या भक्तांना प्रसादाची राख कपाळाला लावत होते.

त्यानंतर किन्नरांच्या आखाड्याला भेट दिली.

अनेक साधू त्यांच्यापुढे ताट ठेवून त्याच्यामध्ये येणाऱ्या भक्तांना पैसे टाकण्याची विनंती करत होते. हे सर्व खूप कमर्शिअल वाटलं तरी सुद्धा त्या साधूंच्या पोटापाण्याच्या व्यवस्थे करता लोकांना आशीर्वाद देणे हा त्यांचा व्यवसाय असावा असेही वाटले.

स्वामी अवधेशानंद यांच्या आश्रमाला भेट दिली हा एक अगदी फाईव्ह स्टार मोठा आखाडा आहे. पुण्याची माझी एक मैत्रीण तिथे सेवा देत आहे.

म्हणून तिथे भेट दिली.

स्वामीजींचे दर्शन मिळाले. त्यांची राम कथा एक तास ऐकली. या स्वामीजींना भेटायला अनेक मोठी मान्यवर लोक येतात असे समजले.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोवीद यायचे होते असेही समजले.

चौथ्या दिवशी आचार्य रामभद्राचार्य जे स्वतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत अनेक भाषांचे तज्ञ स्वतःचे विद्यापीठ असलेले आणि संत तुलसीदास यांचे रामायण मुखोद्गत असलेले गीता तसेच अनेक संस्कृत वेद मुखदगत असलेले अशी त्यांची ख्याती असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची उत्सुकता होती तिथे गेल्यानंतर किमान दोन तास वाट पाहावी लागली प्रचंड गर्दीतून वाट काढत त्यांची अखेर दर्शन झाले.

वासुकी मंदिर बद्दल एक कथा कळली 

जेव्हा देव आणि दानव यांचे युद्ध झाले आणि समुद्रमंथनावेळी ज्या गोष्टी बाहेर पडल्या त्यातील जो अमृत कलश बाहेर पडला. त्याचे चार थेंब चार ठिकाणी जिथे पडले तिथे आता कुंभ आयोजित केला जातो हे सर्वश्रुत आहे उज्जैन हरिद्वार नाशिक आणि प्रयाग. देव आणि दानवांच्या या युद्धानंतर विविध वस्तू दोघांनाही मिळाल्यानंतर युद्ध समाप्त झाले परंतु ज्या वासुकीला ह्या मंथनासाठी घुसळण्यासाठी वापरण्यात आले होते त्याचे संपूर्ण अंग सोलवटल्यामुळे तो जखमी झाला. म्हणून त्यानी देवाकडे प्रार्थना केली की मला काय मिळाले?त्यावर देवाने त्याला असे सांगितले की गंगेकाठी तुझे मंदिर बांधले जाईल. तू येथे विश्रांती घे.

वेणी माधव मंदिर आणि नागवासुकीचे दर्शन झाल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होणार नाही.

अशा या नागवासुकी मंदिराला जाण्यासाठी देखील प्रचंड रांग होती तरी सुदैवाने मला लवकर दर्शन मिळाले.

अशा रीतीने चौथ्या दिवशी माझी यात्रा समाप्त झाली.

अजून बरेच आखाडे आहेत परंतु त्या सर्व ठिकाणी जाता आले नाही. अनेक आखाड्यांमधून विविध प्रकारची भजने मोठ्या आवाजामध्ये चालू असतात जणू त्यांची स्पर्धाच आहे. परंतु तोही हा सर्व महा कुंभाचाच एक भाग होय. मोठमोठे वॉच टॉवर्स त्रिवेणीच्या काठी बांधलेले आहेत तेथे हरवलेल्या लोकांच्या वस्तू आणि हरवलेली माणसे यांच्यासाठी स्पीकर वरून घोषणा केल्या जातात. त्यातील एक घोषणा खूपच गमतीशीर वाटली. तो पोलीस स्पीकर वरून सांगत होता की, अजमेर से आई हुई एक सीता मैया अपने राम की राह देख रही है त्या सीतामय्याचं आणि रामाचं नाव घेऊन तीन वेळा तो पुकारत होता!

महाकुंभला भेट देण्याचा 

अनुभव फक्त

‘महसूस’ करना चाहिए, असाच आहे!

स्वच्छतेच्या जनजागृतीबद्दल सरकारचे मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन. प्लास्टिक आणि कागद मुक्त रस्ते आणि नदीघाट बघून सरकारचे, सतत झाडत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि भक्तांचेही आभार. अनेक ठिकाणी कचरापेट्या ठेवाल्याचाही परिणाम.

नदी काठी झालेली गंगा आरती आणि त्यानंतर शेकडो लोकांनी एकावेळी म्हटलेले राष्ट्रगीत निःशब्द करणारे होते! 🙏

त्यावेळी निर्माण झालेली प्रचंड सकारात्मक ऊर्जा आजही अंग रोमांचित करते आणि ह्या इतक्या उत्तम देशात आपण जन्मलो ह्याबद्दल परमेश्वरपुढे नतमस्तक होतो.

गंगेच्या पाण्याच्या जलतत्वाशी एकरूप होण्यासाठी गंगेकाठी काही काळ तरी बसणे हवे.

तेव्हा सुरु झालेल्या आतल्या प्रवासाचा आनंदमयी अनुभव हा सर्वस्वी आपला स्वतःचाच आणि प्रत्येकाचा वेगळा.

त्याचा प्रत्यय घ्यावा मात्र जरूर.

पुराणकथांमधील कथांच्या 

सत्या -सत्यतेचा ऊहापोह न करता श्रद्धा आणि भक्तीने ओताप्रोत भरलेल्या आणि मैलोनमैल डोक्यावर सामान घेऊन चालणाऱ्या भाविकांच्या सागरात आपणही बुडून जावे हे खरे.

त्याचमुळे दैनंदिन जीवनातील संकटांना आपण तो आपला भाग

समजून नवी उमेद घेऊन जगू शकतो. हे सर्व केवळ स्तिमीत करणारे आहे.

त्याचप्रमाणे दुसऱ्याला अनेक हातांनी केवळ देणाऱ्या भंडाऱ्यांमधील अन्नछत्रे तिथे येणाऱ्या हजारो भाविकांचा मोठा आधार आहेत.

तिथल्या जेवणाला खरंच वेगळी रुची होती ह्याचा अनुभव घ्यायला मिळाला.

एकूणताच उर्वरित दिवसांमध्ये एकदा तरी सर्वांनी महाकुंभला जरूर भेट द्यावी आणि त्या एका वेगळ्याच वातावरणाचा अनुभव घ्यावा 

🌹 🙏

लेखिका : सुश्री रविबाला काकतकर

पुणे.

प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वान्तसुखाय निर्णय… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

??

☆ ✍️ स्वान्तसुखाय निर्णय… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

१: निर्णय घ्यायचा असेल तर…

आपण एखाद्या निर्णय घेतो तेव्हा एकदा दुसऱ्या बाजूचा ही विचार व्हावा. जरी पटत नसली तरी दुसरी बाजू तरीही शांतपणे एकदा पुन्हा विवेकाने निःपक्षपातीपणे विचार करावा व मगच ठोस निर्णय घ्यावा. कारण आपण स्वतः घेतलेला एक निर्णय आपलेच जीवन बदलवत असतो.

बुध्दी व हृदय दोन्ही एकत्र करून विवेकाने, जागृतपणे, सावधानतेने सारासार विचार करूनच पक्का निश्चय करावा.

२: निर्णय आपल्या हातातच नसेल तर

प्रामाणिकपणाने, आत्मविश्वासाने परिणामांना शांतपणे सामोरे जावे.

आत्मिक समाधान यावरच अवलंबून असते.

*

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेम कसंही करता येतं…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “प्रेम कसंही करता येतं…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

” नीता तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे. माझ्याकडे येशील का?” पाटणकर आजींचा फोन.

” येईन की… हल्ली तुमचे पाय दुखतात म्हणून तुम्ही फिरायला येत नाही. त्यामुळे बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. येते मग उद्या. तुमच्याकडे “

तेवढ्यात त्या घाईघाईने म्हणाल्या,

” पण एक कर.. सकाळी साडेसातला हे फिरायला जातात ना तेव्हाच ये.. यांच्यासमोर बोलता येणार नाही. “

” का बरं ?

“ अग अस फोनवर सांगता येणार नाही… घरी ये मग उद्या सांगते “

“बरं बरं “

असं म्हणून मी फोन ठेवला. काय झालं कळेना… आजोबांसमोर न सांगण्यासारख एवढं काय असेल?

दुसरे दिवशी गेले. आजी वाटच पहात होत्या. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. म्हणजे मामला जरा गंभीरच होता तर….. त्या सांगायला लागल्या…

” अगं काय आणि कसं सांगू काही कळत नाही बघ…. यांच्या माघारी असं यांच्या तक्रारी करणं प्रशस्त वाटत नाही. पण सांगते…. हल्ली यांना निरनिराळे घरचे पदार्थ खावेसे वाटत आहेत”

” अहो मग त्यात काय झालं ?”

“तसं नाही ग.. कसं सांगू ?

“म्हणजे खूप खातात का ?”

“नाही ग.. मोजकचं खातात. पण रोज नवीन फर्माईश असते. सकाळचे सकाळी… रात्री परत वेगळं करायला सांगतात. घारगे कर, डाळ फळं कर, परवा तर मोठा नारळ आणला आणि म्हणाले आज ओल्या नारळाच्या करंज्या कर. मग दोन दिवसांनी उकडीचे मोदक करायला लावले…. “

” हो का?” मलाही जरा आश्चर्यच वाटलं.

“अग विशेष म्हणजे हल्ली घरी मदत पण करत नाहीत. कधी कधी तर चादरीची घडी पण करत नाहीत.

हे ऐकून मात्र मी चाटच पडले. कारण आजोबा घरात सतत काहीतरी काम करत असायचे.

“नीता तुला एक आतलं सांगु का? मला असा संशय येतो की हे काही डॉक्टरांना दाखवण्यासारखे वाटत नाही. हे काहीतरी वेगळेच….. मनाचे दुखणे यांना झाले आहे असे मला वाटते. तुझा आनंद सायकॉलॉजिस्ट आहे तर त्याला विचारशील का?”

” हो हो चालेल चालेल… त्यालाच विचारू तुम्ही म्हणताय तसच मला पण वाटतय… बोलते मी आनंदशी “

“आणि खरंच एक मात्र सांगते बाई… कोणाला काही सांगू नकोस. “

“नाही नाही… आजी नाही कुठे बोलणार नाही. “

“अग.. तू काही कोणाला सांगणार नाहीस हे मला माहित आहे. म्हणून तर तुझ्याशी मनमोकळे बोलले ग.. यांना काय झालं असेल याची मनाला फार चिंता लागुन राहिली आहे बघ.. ” 

” घाबरू नका असेल काहीतरी उपाय”

आजींना कराव्या लागणाऱ्या कामापेक्षा आजोबांची काळजी वाटत होती. त्यांचे डोळे भरून आले होते…. अगदी रडवेला झाला होता त्यांचा स्वर…..

आजींचा निरोप घेऊन घरी आले.

नंतर विचार केला आणि ठरवलं की आधी आजोबांशी बोलावे. दुसरे दिवशी सकाळीच बागेत फिरायला गेले पण ते आलेच नव्हते.

तिसऱ्या दिवशी पण आले नाहीत. मग त्यांच्या ग्रुप मधल्या लोकांना विचारलं तर ते म्हणाले…

” आजोबा आज लवकर घरी गेले. साने डेअरीत चिकाच दूध आणायला जायचं आहे असं म्हणत होते. “

– – म्हणजे आज आजोबांना खरवस खावासा वाटत होता… म्हणजे आजी सांगत होत्या ते खरंच होतं तर…

आजींचा सकाळी फोन आला.

” अगं नीता आनंदशी बोलणं झालं का?”

“नाही हो तो जरा गडबडीतच आहे. जरा शांतपणे बोलायला हव…. म्हणून… आज उद्या बोलते”

” बरं बरं असू दे असू दे… अग यांनी काल गुळाचा खरवस करायला सांगितला. दोन मोठ्या कैऱ्या आणल्या आहेत. गोड आणि तिखट लोणचं करायला सांगितलेलं आहे. तुला बोलले ना तसं अजून चालूच आहे बघ… “

” हो का ? बोलते आनंदशी. बघू तो काय म्हणतो.. “

“हो चालेल.. जसं जमेल तसा कर फोन “त्या म्हणाल्या.

सहज विचारलं..

“आजोबा कुठे आहेत?”

” आता हे रोजच्यासारखे फिरायला गेले आहेत. ” त्या म्हणाल्या.

मग मी पटकन आजोबांना भेटायला बागेत गेले. ते होतेच तिथे.

म्हणाले ” काय म्हणतेस नीता ? कशी आहेस ?”

“आजोबा आज तुमच्याशीच बोलायला आले आहे. या बसू इथे बाकावर. “

आणि मग सरळ सरळ त्यांना आजींनी जे सांगितलं ते सांगायला लागले. तसं ठरवूनच गेले होते.

ऐकताना आजोबा गंभीर झाले. शांत आवाजात म्हणाले…

” सांगतो तुला… तिने सांगितलेलं सगळं खरं आहे. “

” खरं…. अस वागताय तुम्ही आजींशी ? आणि हे नवीन पदार्थ रोज करायला सांगताय त्याचे काय?”

मी विचारलं.

” हो…. मला वाटलच होत ती तुझ्याशी बोलेल… अग ऐक… झालंय काय तिचे हातपाय हल्ली दुखतात. तिचं फिरणं बंद झालं आहे. त्यामुळे संपर्क कमी. नुसती घरी बसून कंटाळायला लागली आहे. फोन तरी किती करणार ? कुणाला करणार? मग मी ही युक्ती केली. अॅण्ड् इट्स वर्क्स… “

“म्हणजे काय?” 

“आता रोज असं नवीन काही काही बनवायला सांगितलं की तिची भरपूर हालचाल होते. भूक लागते. डॉक्टर म्हणाले व्यायाम करू दे. पण ह्या वयात कसं जमणार तिला? आजपर्यंत तिने कधी काही व्यायाम केलाच नाही…. “

” हो तुम्ही म्हणताय ते पटलं मला. अचानक व्यायाम करणे कठीणच असते. “

” म्हणूनच…. नाहीतर मी तिच्याशी असं वागेन का कधी ? पण हे काही तिला सांगु नकोस “

असं म्हणेपर्यंत त्यांचे डोळे भरूनच आले होते.

खोलवर मुरलेले स्वाभाविक, निर्मळ, प्रगल्भ, बायकोचे अंतरंग जाणणारे निर्व्याज्य प्रेम त्यांच्या डोळ्यात मला दिसत होते. दोघेही या वयात एकमेकांची मनं सांभाळत होते. एकमेकांना समजून घेत होते.

आजोबांचा निरोप घेऊन निघाले.

 शांतपणे विचार केला. खरंतर अशावेळी मला फार विचार करावा लागत नाही. पण ही नाजूक अशी गोष्ट होती.

दूसरे दिवशी सकाळीच आजींकडे गेले. मला बघताच त्या म्हणाल्या..

“अग ये ये “

म्हटलं,

“आनंदशी बोलले “

त्यांनी अगदी उत्सुकतेने विचारले..

“मग तो काय म्हणाला ग ?काय सांगितलं आनंदनी?” 

” आधी शांतपणे बसा इथं. सगळं सांगते.. “

मग त्यांना सांगितलं…

” तो म्हणाला हे विशेष काळजी करण्यासारखं काही नाही. माणसांना या वयात जुनं फार आठवतं. अगदी पदार्थ सुद्धा आणि ते खावेसे वाटतात म्हणजे उलट आजोबा ठणठणीत आहेत. “

” खरंच असं म्हणाला आनंद ?”

 ” हो… खूप वर्ष काम केले शरीर दमलं की आता थोडा आराम करावा असं वाटतं शरीराला… करू दे त्यांना आराम. “

” हो ग.. खरचं.. घरची परिस्थिती यथातथाच होती. वडिलांची साधी नोकरी त्यात दोन बहिणी… त्यांची लग्नं… फार लहानपणापासूनच नोकरीला लागले हे. शिवाय संध्याकाळी एका ऑफिसात हिशोब लिहायला जायचे “

” आनंदनी असं सुचवलं आहे की तुम्ही कामासाठी कोणाची वाटलं तर मदत घ्या. तुम्हाला त्रास होत असेल तर काही कामं बाईकडून करून घ्या. तुम्ही स्वतः घरी न करता काही गोष्टी विकत आणा. “

आजींनी पटकन माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या..

“अग ह्यांना विशेष काही झालं नाही. हे कळलं आता मला चिंता नाही. मी करीन उठत बसत काम. त्यात काय ग आपल्याला सवयच असते… “

आजींचा चेहरा खुलला होता.

“नीता माझ फार मोठं काम केलस बघ. माझ्या जीवाला फार घोरं लागला होता ग…. “

“आता आजोबांची काही काळजी करू नका.. आणि मस्त काहीतरी त्यांच्यासाठी बनवा.. खुष होतील… “

आजी खुद्कन हसल्या..

” बैस ग… आता आधी आपल्या दोघींसाठी कॉफी करून आणते”

अस म्हणून आजी आत गेल्या…

त्यांचा चेहरा एकदम बदलला होता.

खरं सांगू ?….

असा निरपेक्ष निर्मळ आनंद कुणाच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला की मला फार फार समाधान होते.

आता या वयात जगायला यासारखं दुसरं काही नको….

आजींना म्हटलं होतं कोणाला सांगणार नाही पण मुद्दाम हा लेख लिहिला… आपणही शिकू आजी आजोबांकडुन…. प्रेम कसंही करता येतं ते……

हो की नाही…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares