हे ऐकून मात्र आवर्जून तिच्या ताटात जेवायला बसलो….ताटात “इत्तूसं” काहीतरी होतं… जे लहान मुलालाही पुरणार नाही….मी खायला सुरुवात केली… माझ्या लक्षात आलं…. प्लेट मधले घास, मी जास्त खावं म्हणून माझ्या साईडला ती ढकलत होती…. आणि तिने जास्त खावं म्हणून प्लेटमधले तेच घास मी तिच्या साईडला गुपचूप ढकलत होतो…
हे देता – घेता माझं पोट भरलं….!
मी त्या माऊलीकडे पाहिलं…. जेवणात मला वाटेकरी केल्यामुळे तिचं पोट नक्कीच भरलं नसावं ….
तरीही तिचा तो सुरकुतलेला चेहरा अत्यंत तृप्त आणि समाधानी होता….!
घेण्यातला आनंद मी जरी मिळवला असला…. तरी देण्यातलं समाधान मात्र तिच्याकडे होतं…!
काहीतरी घेऊन मिळतो तो आनंद…. पण देऊन मिळतं ते समाधान….!!!
आईच्या पदराला खिसा कधीच नसतो… तरी ती आयुष्यभर द्यायचं काही थांबत नाही…!
बापाच्या शर्टाला कधी पदर नसतो…..परंतु लेकरांना झाकायचं, मरेपर्यंत तो बिचारा काही सोडत नाही…!!
…… या खिसा आणि पदरामधलं जे अंतर आहे…. तितकंच आपलं खरं आयुष्य….!
हा खिसा आणि पदर जर आयुष्यात नसेल…. तर —
तर…. उरतो केवळ जगण्याचा “भार” आणि वाढत जाणाऱ्या वयाचे “वजन” !
आणि “ओझं” म्हणून उगीचच वाहत नेतो आपणच आपल्याला… वाट फुटेल तिकडे….!!!
☆ “माडगुळ फाईल्स : – एक वावटळ …. ” लेखक – श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
“आम्हा गरीबांचा संसार जाळून तुम्हाला काय रे मिळणार?”… ३०-३१ जानेवारी १९४८ च्या आसपासचा दिवस….गांधीहत्येनंतरचे उसळलेले जळीत माडगूळकरांच्या गावातल्या वाड्यापर्यंत पोहोचले होते,गदिमांची आई बनुताई मोठया धीराने त्यांना विरोध करत होती,त्यातलाच एक दांडगट “ह्या म्हातारीलाच उचलून आत टाकारे,म्हणजे तरी हीची वटवट बंद होईल !” असे खवळूनच म्हणाला. तितक्यात उमा रामोश्याने म्हातारीचा हात धरून तिला बाजूला ओढले म्हणून ती वाचली,नंतर बाका प्रसंगच उभा राहिला असता.
ढोल ताशे वाजवीत ७०-८० दंगलखोर गावात शिरले होते,तात काठ्या,ऱ्हाडी.. जळते पलीते होते. वात शिरल्या शिरल्या त्यांनी गदिमांच्या धाकट्या भावाचीच चौकशी केली, भेदरलेल्या छोट्या पोरांनी त्यांना थेट आमच्याच घरापाशी आणून सोडले होते. गदिमांच्या धाकट्या भावाला दटावून गावातल्या ठराविक जातीच्या सर्व लोकांची घरे त्याला दाखवायला लावली.एका मागून एक घरातल्या माणसांना बाहेर ओढून घरे पेटवून देण्यात आली. सर्वात शेवटी परत माडगूळकरांच्या वाड्याजवळ आल्यावर गदिमांच्या भावाला स्वतःच्या वाड्यात रॉकेल शिंपडायला लावले व ‘गांधी नेहरू की जय!’ असे ओरडत आमचा वाडा पेटवून दिला. सारे संपले होते आमच्या वाड्याची राख रांगोळी झाली होती. गदिमांचे वडील गावातील मारुतीला साकडे लावून बसले होते,धाकटा भाऊ दिवसभर घाबरून रामोश्याच्या कणगीत लपून बसला होता. महाराष्ट्रातल्या अनेक घरात हीच परिस्थिती होती. शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली होती.
याच वेळी ‘वंदे मातरम’ चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण कोल्हापूरला तर काही पुण्यात पूर्ण झाले होते. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सर्व चित्रिकरण एकत्र असावे म्हणून दिग्दर्शक राम गबाले चित्रपटाच्या प्रिंट्स घेऊन रात्री कोल्हापुरातून रेल्वेत बसले. त्यांना माहित नव्हते की त्याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली आहे व सगळीकडे दंगल सुरु आहे. गदिमा-पुल व सुधीर फडके यांनी साधारण तीन चित्रपटांकरिता एकत्र काम केले होते ते म्हणजे वंदे मातरम, ही वाट पंढरीची /संत चोखामेळा व पुढचे पाऊल. यातील वंदे मातरम हा स्वातंत्र लढ्यावर आधारित चित्रपट यात पु.ल व सुनीता बाईंनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर दिग्दर्शन राम गबाले यांनी केले होते. गदिमांची गीते, कथा-पटकथा, संवाद तर फडक्यांनी संगीत दिले होते.
राम गबाल्यांच्याकडे चित्रपटाची मूळ प्रिंट एका मोठ्या ट्रंकेत भरलेली होती व रेल्वेत बसल्यावर चित्रपटाचे स्क्रिप्ट काढून ते चाळत बसले होते. तितक्यात ८-१० दंगलखोरांची एक टोळी रेल्वेत शिरली. प्रत्येक डब्यातल्या ठराविक जातीच्या लोकांची चौकशी करून त्यांच्या डोळ्यादेखत सामान रेल्वेच्या बाहेर फेकले जात होते. खूप गंभीर परिस्थिती होती,राम गबाले त्यांच्या तावडीत सापडले असते तर चित्रपटाचे अस्तित्व धोक्यात आले असते. चित्रपटाची प्रिंट व स्क्रिप्ट सर्व नष्ट झाले असते. सर्व कष्ट वाया गेले असते. गबाले स्क्रिप्ट व जीव दोन्ही हातात धरून बसले होते.
गदिमांना एक सवय होती कुठलेही साहित्य कविता, लेख पूर्ण झाला की फावल्या वेळेत ते बऱ्याचदा त्यावर चित्र/रेखाटने करून ठेवत असत. ज्याची अनेकदा दिग्दर्शकाला व अभिनेत्यांना मदत होत असे, असेच एक चित्र गदिमांनी त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या मुखपृष्ठावर काढून ठेवले होते. त्यात चित्रपटाची नायिका झेंडा हातात घेऊन त्यांनी रेखाटली होती.
८-१० जणांचा समूह राम गबाले यांच्यापाशी आला त्यातल्या एकाने त्यांच्या हातातले जाडजूड स्क्रिप्ट पाहिले व विचारले हे काय आहे. गबाले यांनी सांगितले की १९४२ च्या स्वातंत्र संग्रामावर चित्रपट काढत आहोत व त्याचे हे स्क्रिप्ट आहे. त्या माणसाने ते नीट निरखून पहिले.
वर काढलेले गदिमांचे नायिका झेंडा हातात धरलेले छायाचित्र त्यांनी पाहिले व एकदम म्हणाले ” हे बेणं आपल्यातलच दिसतं आहे… चला पुढे… “
गदिमांच्या एका चित्राने तो संपूर्ण चित्रपट गांधीहत्येच्या दंगलीतून वाचविला होता. पुढे हा चित्रपट प्रसिद्ध झाला यातील “वेद मंत्राहून आम्हा वंद्यवंदे मातरम !” सारखी राष्ट्रगीताच्या तोडीची गीते खूप गाजली. एका लेखणीत किती ताकद असते याचे हे उत्कृष्ट उदाहरण!.
या सर्व घटनांनी माडगूळकर कुटुंबीय खूप व्यथित झाले होते. “या गावात राहण्यात काही अर्थ नाही… ” हाच विचार गदिमांच्या व भावंडांच्या मनात ठाम झाला होता. व्यथित माडगूळकर कुटुंबीय गाव सोडणार अशी बातमी गावात पसरली, गावकऱ्यांना या बातमीने अतीव दुःख झाले.गावातल्या जाणत्या लोकांनी गदिमांची भेट घेतली … “अण्णा,आम्ही तुमचा वाडा वाचवू शकलो नाही पण आम्ही तो तुम्हाला परत बांधून देऊ पण गाव सोडू नका … “,अशी अनेक वावटळे येत असतात पण वर्षानुवर्ष जपलेले ऋणानुबंध इतक्या सहज तुटत नाहीत. गावकऱ्यांनी आपला शब्द पाळला … माडगूळकरांचा वाडा त्यांनी परत उभारून दिला!.
आज जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांची धडपड पाहून वाईट वाटते,लहान पणापासून सर्व जातींचे मित्र होते आमचे,जात-पात पाहून कधीच मैत्री केली नव्हती…..पण आज सर्वांच्या डोळ्यात या वावटळीची धूळ शिरली आहे, काहीच स्पष्ट दिसत नाही…. अधून मधून अश्या वावटळी येतच राहतील, आपल्याला मात्र हे माणुसकीच्या शत्रूसंगे चाललेले युद्ध असेच चालू ठेवावे लागेल……..
(ही पोस्ट केवळ गदिमा/वंदे मातरम चित्रपटाच्या आठवणी जागवण्यासाठी आहे,अनेक वर्षांपूर्वी घडून गेले ते सत्य होते,पण यातून आपण केवळ गदिमांच्या आठवणी जागवायच्या आहेत,इतर कुठलाही उद्देश नाही व त्याला कृपया इतर रंग देऊ नये ही विनंती )
लेखक – श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली……
….. पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये ??
ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.
कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना ‘ appreciation ‘असू शकतं.
ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा.
घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात, “ छान झाला बरं का आजचा कार्यक्रम. ” आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो !
पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते. एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं appreciation देऊन बघा.. अगदी मनापासून… बघा त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं.
आमच्या घरकामवालीला गजरे, फुलं घालून यायची फार आवड ! कधी त्या मोठा गजरा घालून आल्या कामाला, की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येत ” प्रमिला काय मस्त दिसते आहेस. चल एक फोटो काढते तुझा !” ह्यानेसुद्धा खूप खुश होतात त्या. लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते…… एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो, की वर्गात ” छान निबंध लिहिलास हो ” असं म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो.
ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असंही काही नाही. कधीतरी आपल्याच दुकानदारालाही म्हणावं
” काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या कडून घेतलेले. “
सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, आणि ही दखल घ्यायला आणि द्यायलाही वयाचं बंधन नसावं कधीच.…. काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात, पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो ..!
बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही ….. तसं करूही नये.
… कारण पोचपावती जितकी उत्स्फूर्त, तितकीच जास्त खरी !!
पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर कधी डोळ्यातून, कधी कृतीतून, तर कधी स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं, तशी तशी ती पोचवावी … कधी योग्य आदर ठेवून, कधी गळा मिठी मारून, कधी अगदी ” च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या “, अशी वेगळ्या भाषेतूनही यावी.
माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उत्स्फूर्त.
महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच.. ह्या मुलांच्या भाषेत cool dude .. हवा.
ह्या पोच पावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो…
….. आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी फारसं काही लागत नाही…. लागतं फक्त मोकळं आणि स्वच्छ मन … !!!
तर मग होऊन जाऊ द्यात एखादी झकास, दिलखुलास दाद !!!
लेखिका — अज्ञात
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
समस्त युवा पिढीस प्रातिनिधिक स्वरूपात, म्हणून प्रिय तरुणाई. या व्यासपीठावरून तुमच्याशी काही संवाद साधण्यापूर्वी मी तुमचे चेहरे न्याहाळत आहे. खूप त्रासलेले, कंटाळलेले, आणि आता काय डोस प्यायला मिळणार या विचाराने वैतागलेलेच दिसत आहेत मला. रीती-परंपरा, संस्कृती, आदर्श, इतिहास, हे शब्द ऐकून तुमचे कान किटलेले आहेत हे मला कळतंय. तेही साहजिकच आहे. माझ्यासारखे बुजुर्ग तुम्हाला सांगून सांगून काय सांगणार? असेच ना?
पण होल्ड ऑन —
मी मात्र अशी एक बुजुर्ग आहे की, ” काय हे, आमच्या वेळी नव्हतं बाई असं! ” हे न म्हणता तुमच्याशी संवाद साधू इच्छिणारी आहे. ” तुमच्यात मलाही घ्या की ” अशी विनंती करणार आहे.
एखादा ढग धरतीवर बसून जातो आणि संपतो. मात्र मागे हिरवळ ठेवून जातो. मी ना तो संपलेला ढग आहे आणि तुम्ही वर्तमानातील हिरवळ आहात. मी भूतकाळ आणि तुम्ही वर्तमान काळ आहात. गतकाळातच रमण्यापेक्षा मला वर्तमानकाळाबरोबर जोडायला आवडेल. एक साकव बांधायला आवडेल.
साक्षी भावाने जेव्हा मी तुमच्या जीवनाकडे पाहते, तेव्हा मला तुम्ही काळाच्या खूप पुढे गेलेले दिसत आहात. खूप प्रगत आणि विकसित भासता. आज याक्षणी मी शिक्षित असूनही तुमच्या तांत्रिक, यांत्रिक जीवनाकडे पाहताना मला फार निरक्षर असल्यासारखं वाटतं आहे. त्या क्षणी तुम्ही माझे गुरु बनता आणि मी शिष्य होते. हे बदललेलं नातं मला मनापासून आवडतं. आणि जेव्हा मी हे नातं स्वीकारते तेव्हा माझ्या वार्धक्यात तारुण्याचे दवबिंदू झिरपतात आणि मला जगण्याचा आनंद देतात.
बी पॉझिटिव्ह… से येस टू लाइफ… हा नवा मंत्र मला मिळतो.
हो युवकांनो ! भाषेचा खूप अभिमान आहे मला. पण तरीही तुमची टपोरी, व्हाट्सअप भाषा मला आवडूनच जाते. कूल. चिल, ड्युड, ब्रो, सिस.. चुकारपणे मीही हे शब्द हळूच उच्चारूनही बघते बरं का !
परवा संतापलेल्या माझ्या नवऱ्याला मी सहज म्हटलं, ” अरे! चील! ” त्या क्षणी त्याचा राग बटन बंद केल्यावर दिवे बंद व्हावेत तसा विझूनच गेला की !
तुमची धावपळ, पळापळ, स्पर्धा, इर्षा, ‘आय अॅम द बेस्ट’ व्हायची महत्त्वाकांक्षा, इतकंच नव्हे, तर तुमचे नैराश्य जीवनाविषयीचा पलायनवाद,आत्महत्या, स्वमग्नता हेही मी धडधडत्या काळजांनी बघतेच रे ! मनात येतेही..
” थांबवा रे यांना, वाचवा रे यांना !” .. एक झपकीच मारावीशी वाटते मला त्यावेळी तुम्हाला. पण मग थांबते क्षणभर. हा लोंढा आहे. उसळेल, आपटेल, फुटेल, पण येईल किनाऱ्यावर. आमच्या वेळचं, तुमच्या वेळचं ही तुलना येथे कामाची नाही. त्यामुळे दरी निर्माण होईल. अंतर वाढेल. त्यापेक्षा मला तुमचा फक्त हात धरायचाय् किंवा तुमच्या पाठीमागून यायचंय.
” जा ! पुढे पुढे जा ! आमच्यापेक्षा चार पावलं पुढेच राहा ! कारण तुम्ही पुढच्या पिढीचे प्रतिनिधी आहात. पण वाटलंच कधी तर पहा की मागे वळून. तुमच्यासाठी माझ्या हातातही एक मिणमिणती पणती आहे. दिलाच तर प्रकाशच देईल ती, हा विश्वास ठेवा. एवढेच. बाकी मस्त जगा. मस्त रहा. जीवनाचा चौफेर अनुभव घ्या.”
☆ माधुकरी… — लेखक – श्री विकास वाळुंजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मौजीबंधनात अडकलेला गोडबोल्यांचा सुनील “ॐ भवती भिक्षांदेही” असे म्हणत समोर उभा राहिला. जेमतेम सात आठ वर्षाचा हा बटू. गोरापान. काळेभोर पाणीदार डोळे. छानपैकी चकोट केलेला. हातात दंड. दुस-या हातात झोळी. नेसणीला लंगोटी. गळ्यात जानवे. त्याचे हे रुपडे पाहून भिक्षांदेहीचा खराखुरा अनुभव दृष्टीसमोरून तरळून गेला.
असाच सातआठ वर्षांचा असेन. पित्याचे छत्र हरवलेले. काबाडकष्ट करून घाम गाळणाऱ्या आईपासूनही दुरावलेला. खूप खूप दूर गेलेला मी. व्यास गुरूकुल नावाच्या एका आश्रमात होतो.
ही गोष्ट असावी. १९५७ ते १९६१ या दरम्यानची. कोवळं वय. जग काय ? कशाचीच माहिती नव्हती. ॥ॐ भवती भिक्षांदेही॥ म्हणत दररोज दहा घरून प्रत्येकाने माधुकरी आणायची. अशी शिस्त होती आश्रमात. दुपारी बारा वाजता निघायचो. झोळीत ॲल्युमिनियमची ताटली, वाडगा असायचा. पंचा नेसलेला. दुसरा उपरण्यासारखा अंगावर घेतलेला. अनवाणीच जायचं. पहिलं घर होतं घाणेकरांचं. आजीआजोबा आणि मनावर परिणाम झालेला तरूण मुलगा. असं त्रिकोणी कुटुंब होतं ते. ॐ भवती म्हणताच घाणेकर आजी भाजीपोळी, आमटी, भात झोळीत घालायच्या.
तिथेच पुढे राहाणाऱ्या चित्तरंजन कोल्हटकरांच्या दारात उभा राहायचो. तिथेही अतिशय प्रेमाने भिक्षा मिळायची. पुढे महाजनांच्या घरात जिना चढून जायचो. दार उघडंच असायचं. त्यांच्या गृहिणीला ऐकू कमी यायचं. ताटकळत वाट पहात उभं राहावं लागायचं. त्या घरात भिंतीवर इंग्रजी कॅलेंडर व सुविचार लावलेले असायचे. भिक्षा मिळेपर्यंत त्यावरील स्पेलिंग पाठ करीत असे.
शेगडीवाले जोशी, गो.भा .लिमये, डाळवाले जोशी, आपटे रिक्षावाले, माई परांजपे आणि शेवट डाॅ. मोनॅकाका भिडे. अशी घरं मला नेमून दिलेली होती. या सर्व कुटुंबांतून मिळालेले ताजे सकस पदार्थ आश्रमात घेऊन यायचे. मोठ्या पातेल्यातून ते ठेवायचे. नंतर मोठी मुलं वाढप्याचे काम करायची. वदनी कवळ म्हणत आम्ही त्या संमिश्र पदार्थांचा आस्वाद घ्यायचो.
दोन्ही वेळेस तेच पदार्थ. भिक्षांदेहीला प्रतिसाद देणारी ही सगळी घरं. सदाशिव पेठेत भिकारदास मारूतीच्या पिछाडीला होती. आज माहित नाही त्या घरांचं स्टेट्स काय आहे ते. पण या प्रत्येक घरातील प्रेमळ माणसं मनांत कायमची घर करून बसली आहेत माझ्या.
डाॅ. भिड्यांच्या घरात पाचपन्नास मांजरं होती. माझ्या मागोमाग तीही दारात यायची. शंभरीतल्या भिडे आजी मला आणि मांजरांना एकाचवेळी अन्नदान करायच्या. खूप गंमत वाटायची त्या घरात. गोभांच्या लिमये वहिनी तर सणावाराला थेट स्वयंपाकघरात बोलवायच्या. कधी पुरणपोळी, कधी जिलेबी, कधी शिरा खाऊ घालायच्या. म्हणायच्या, “बाळा. ताटात वाढलं तर हे गोडधोड तुला कसं मिळेल? ते तर वाटण्यावारी जाईल. बस खाऊन जा. ” वहिनींच्या त्या रूपात मला आईच भेटायची.
माई परांजपे तर वाट पहात बसायच्या. माधुकरी वाढल्याशिवाय जेवायचं नाही, असं व्रतच केलं होतं त्यांनी. ते घर मी कधीच चुकवीत नसे. आपटे रिक्षावाले म्हणजे त्या गल्लीतले समाजसेवकच होते. मुलं शाळेत पोचविता पोचविता त्यांची उडणारी धांदल. त्यांचं ते अंधारं दोन खोल्यांचं घर. नऊवारी साडीतल्या आपटे काकू. धुण धुताधुता लगबगीनं भिक्षा वाढण्यासाठी चालणारी त्यांची धडपड, माझ्या बाल मनावर कायमची कोरली गेली आहे.
भिक्षेच्या रुपाने मी समाजपुरुषच पाहात होतो. नियतीच्या रुपाने तो मला जगवत होता. संघर्ष शिकविणा-या या समाजपुरुषाचे दर्शन फारच अफलातून होते. असं माधुकरी मागणं आताशा दिसत नाही. त्यात गैर काहीच नव्हते. चित्तरंजन कोल्हटकर हे नाट्यचित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व होते. हे पुढे खूप उशीराने कळले. पोटाचीच लढाई होती. त्यामुळे नाटक सिनेमा वगैरै असतं, हे कळण्यासारखी परिस्थितीच नव्हती. कोल्हटकरांची तारका पुढे एसपी काॅलेजला बरोबर होती. तेव्हा आपण किती थोर व्यक्तीच्या कुटुंबाशी जोडले गेलो होतो हे लक्षात आले.
भोजनाचे आश्रमातील प्रसंग नजरेसमोरून तरळत असतांनाच गोडबोल्यांचा सुनील “आजोबा. ॥ॐ भवती भिक्षांदेही ॥ वाढतां ना ? ” असं म्हणाला. मी ताळ्यावर आलो.
चुरमु-याचा लाडू त्याच्या झोळीत घातला. साठ वर्षापूर्वी हरवलेलं बालपण शोधत बाहेर पडलो. मंगल कार्यालयातून थेट घरी आलो.
(मित्रांनो हे सगळं शब्दश: खरं आहे बरं)
लेखक : श्री विकास वाळुंजकर
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆
(मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”) इथून पुढे …
“त्याने मला एकदा ऑपरेशन करताना बोलावले. जवळ जवळ ४ तास ऑपरेशन चालले. मी शांतपणे तो काय करतो ते बघत होतो. तेव्हा काही आत्ता सारखी मोबाईलवर व्हिडीओ घेण्याची सोय नव्हती. मोजमाप देखील घेता येणार नव्हते. मी फक्त निरीक्षण केले आणि २ महिन्यांच्या प्रयत्नाने एक साधे मेदूची कवटी पकडणारे उपकरण बनवले, ते भावास दिले. त्याने ते पुढच्या ऑपरेशनसाठी वापरले आणि त्याला खूप आवडले आणि उपयुक्त देखील वाटले. त्याचे ऑपरेशन निम्म्या वेळात झाले. मुख्य म्हणजे परदेशी उपकरणाच्या तुलनेत फक्त १०% किमतीत हे उपकरण तयार केले ह्यात आमचा प्रॉफिट देखील आला.”
“ही बातमी हा हा म्हणता अनेक शल्यकर्मीपर्यंत पोहचली. हळूहळू अनेक डॉक्टर्स मला भेटून विविध प्रकारची उपकरणे बनवून घेऊ लागली. यात orthopedic आले, पोटाचे, किडनीचे अशा सर्व प्रकारच्या स्पेशालीस्टना मी वेगवेगळी उपकरणे करून देऊ लागलो. मला तो नादच लागला कोणतेही ऑपरेशन करताना निरीक्षण करायचे आणि वर्कशॉप मध्ये उपकरण बनवायचे. अशा शेकडो शस्त्रक्रिया मी ऑपरेशन थियेटर मध्ये जाऊन बघत असे. यातून मी अशा प्रकारची शेकडो उपकरणे बनवली. देशात असे कोणतेही मोठे हॉस्पिटल आणि सर्जन नसेल ज्याला माझे नाव माहीत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो हल्ली मेंदूतल्या ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यास सर्व कवटी उघडावी लागत नाही. जिथे ट्युमर अथवा दोष असेल त्याच्या वर कवटीला एक भोक पाडतात आणि शस्त्रक्रिया करून ती जागा पुन्हा बंद करतात. ह्या मेंदूच्या कवटीस ड्रील करण्याचे मशीन आम्ही बनवतो. आता एक विचार करा कुलकर्णी, हे ड्रील मेंदूत एक मायक्रॉन देखील घुसलेही नाही पाहिजे आणि अर्धवट ड्रील करून देखील चालणार नाही. असे अवघड उपकरण मी डिझाईन केले आहे आणि अनेक शस्त्रक्रियेत ते वापरले जाते.” माझ्या अंगावर सणकून शहारा आला. गोखलेसाहेब हे अगदी सहज सांगत होते.
गोखलेसाहेब या व्यवसायात पडले, ते देखील वयाच्या पन्नाशीत. पुण्याच्या कुस्रो वाडिया इंस्टीटयूटमधून draftsman चा कोर्स करून ते भोपाळच्या BHEL मध्ये नोकरी केली. ती नोकरी सोडून पुढे पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये (तेव्हाची टेल्को) आले. तिथे ते ट्रेनिंग विभाग बघू लागले. जेआरडी जेव्हा जेव्हा पुण्याला भेट देत तेव्हा ते प्रथम या विभागास भेट देऊन मगच पुढच्या कामास जात. जेआडींच्या या सवयीमुळे हा विभाग कायम व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली. गोखल्यांच्या क्रिएटिव्ह स्वभावामुळे जेआरडी त्यांना नेहमी विचारत गोखले यावेळी नवीन काय? गोखले एखादी नवीन केलेली गोष्ट त्यांना दाखवत. नवीन काहीतरी शोधण्याचा त्यांना ध्यासच लागला. त्यातून अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. त्यांच्या बंधुंमुळे यातूनच पुढे विविध शल्यसामग्री डिझाईन करून बनवू लागले. आता व्याप वाढू लागला आणि टेल्कोची आरामाची नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. सदाशिवपेठेतली जागा कमी पडू लागली तर अरण्येश्वर रोड वर उपकरणे बनवण्यासाठी एक वर्कशॉप सुरु केले. मुलगा समीर ते वर्कशॉप बघत असे. नावही मोठे गमतीचे ठेवले “समीरचे वर्कशॉप” घरचे इतर देखील सर्व त्यांना उद्योगात मदत करू लागले. पण मध्येच एका अपघातात समीरचे तरुण उमद्या वयात निधन झाले. ज्या बंधुंमुळे ते या व्यवसायात आले तो डॉक्टर भाऊ देखील अकाली गेला. पण गोखले साहेब त्या आघातातून सावरले.
“गोखले हे “मन्मन” ही काय भानगड आहे ? नुसतं मन का नाही?” मला सतावणारा प्रश्न मी शेवटी विचारलाच. त्याच काय आहे कुलकर्णी, मी असे समजतो आपल्याला दोन मने असतात. एक बाहेरचे मन जे चंचल असते. सारखं सुख, दुखः, बरे, वाईट याचा विचार करते. ते स्वार्थी असते, दुसऱ्याला पीडा देण्याचा विचार करते, हे हवंय, ते हवंय असा हव्यासी विचार करते. पण त्या मनाच्या आत एक आणखीन मन असते ते निरागस असते, क्रिएटिव्ह असते. ते मनाचे मन असते. तिथे चांगले विचार निर्माण होतात. तिथे वेगवेगळी डिझाईन घडतात. त्या बाहेरच्या चंचल मनाचे जे अंतर्मन ते “मन्मन.” हे अंतर्मन जागे असले, तर उत्तम कल्पना सुचतात. मी एखाद्या डॉक्टरचे ऑपरेशन बघतो तेव्हा माझे हे मन्मन मला ते उपकरण कसे बनवायचे ते सुचवते आणि मी ते फक्त प्रत्यक्षात आणतो. मला drawing काढावे लागत नाही. ते आतूनच येते. कसे येते ते माहित नाही पण सुचत जाते. परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मी निमित्तमात्र करता करविता तोच, विधाता.” गोखल्यांमधला निगर्वी उद्योजक बोलत होता. मीपणाचा स्पर्शही नाही. पेशाने इंजिनीअर असलेले गोखले किती कविमनाचे तत्वचिंतक कलाकार आहेत ह्याचे मी प्रत्यंतर घेत होतो.
त्यावर्षीचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध संपला होता. इथे सगळेच अनुकरणीय होते. गोखलेसाहेब इंजिनिअर आहेतच, पण कलाकार, गुरु, तत्वचिंतक, सेवाभावी शिवाय एथिकल आणखीन काय काय होते. त्यांना सगळ्यात शेवटी माझा येण्यातला स्वार्थ सांगितला आणि तळवलकरसरांच्या नावाने अनुकरणीय उद्योजक हा पुरस्कार त्यांना देणार असे सांगितले. त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. काही क्षण ते बोलू शकले नाही. अहो मी फार छोटा माणूस
मला कसले पारितोषिक? माझ्यापेक्षा कितीतरी महान लोक या जगात आहेत? त्यांच्या मृदू स्वभावाला साजेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यांना तळवलकरसरांविषयी सांगितले. ते म्हणाले मी त्यांना ओळखायचो कारण, मी देखील कुस्रो वाडीयाचाच ना. मला ते शिकवायला नव्हते पण त्यांची शिस्त माहीत होती. पुरस्कार स्वीकारणार असे त्यांनी कबूल केले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख जवळ आली तर त्यांनी मला फोन केला कुलकर्णी मी पुरस्कार स्वीकारणार आहे, पण ते भाषण वगैरे मला जमणार नाही. मी कधी असे लोकांसमोर बोललो नाही. तर ते जरा टाळता आले तर बघा. मी त्यांना समजावले गोखले आमच्याशी जे बोललात तेच सांगा लोकांना आवडेल. भाषण करावेच लागेल. होय नाही करता तयार झाले. परत एकदा माझ्या ऑफिसमध्ये आले म्हणाले भाषण लिहून आणलंय तुम्ही ऐका. मी ऐकले. छान लिहिले होते. त्यावर्षी जी चार भाषणे झाली त्यात गोखल्यांनी बाजी मारली. प्रत्यक्ष भाषण करताना लिहून आणलेले भाषण तसेच राहिले आणि फार उत्कट आणि उत्स्फूर्त बोलले. जेष्ठ विचारवंत विद्याताई बाळ अध्यक्षा होत्या त्या भान हरपून ऐकत होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात गोखल्यांचे मनापासून कौतुक तर केलेच, पण पुढे त्यांच्या ऑफिसमध्ये देखील जाऊन आल्या.
खरे म्हणजे गोखल्यांचे भाषण एव्हडे नितांत सुंदर झाले कारण, ते त्यांच्या मन्मनातून आले होते. आतून आले होते आणि ते सर्व श्रोत्यांच्या मन्मनात खोलवर भिडले. मनोहर गोखल्यांचा जीवनपट निरागस कर्मयोगी जीवन जगण्याचा एक वस्तुपाठ आहे.
☆ ‘मन्मन’चे निरागस कर्मयोगी मनोहर गोखले… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆
आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू ‘ मन्मन ‘च्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. यंदा परत दिलीपने आठवण करून दिली आणि आग्रह देखील केला. तु गोखल्यांना एकदा भेटच तुमचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध नक्की संपेल. फार अफलातून गृहस्थ आहेत. मी ठरवले, जाऊयात एकदा हा एव्हडा म्हणतोय तर. खरं म्हणजे सदाशिव पेठेत असा काही उद्योग असेल असे मनाला पटत नव्हते आणि असलाच तर असून असून किती मोठा असेल? असा प्रश्न मला उगीचच पडत होता. कदाचित म्हणूनच माझे पाय तिकडे वळत नव्हते. पण शेवटी मी ठरवले गोखल्यांना भेटायचे. दिलीपला विचारले तुझी ओळख देऊ का? तर दिलीप म्हणाला छे छे मी त्यांना १०-१२ वर्षांपूर्वी भेटलोय ते मला आता ओळखणार देखील नाहीत. शेवटी मी, अरुण नित्सुरे आणि अजय मोघे मन्मनच्या ऑफिसमध्ये धडकलो. स्वागतिकेला गोखल्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले. माझे कार्ड दिले. तिने कार्ड आत नेऊन दिले आणि १० मिनिटात बोलावतील असे सांगितले. आम्ही रिसेप्शनमध्ये वाट पहात बसलो. तेव्हड्यात एक कुरियरवाला आला. त्याने पार्सल स्वागतिकेकडे दिले. बिल दिले आणि निघाला. तोच तिने त्याला परत बोलावले आणि Octroi रिसीट विचारली. तो म्हणाला, “ Octroi भरला नाही, मटेरियल तसंच आणलंय. पण मॅडम octroi भरला नाही म्हणून पैसे पण घेतले नाहीत.” आणि तो वळून जाऊ लागला. रिसेप्शनिस्टने त्याला जरबेने बोलवून घेतले आणि सुनावले, “ हे बघा, octroi भरला नसेल तर ते पार्सल परत घेऊन जा. मी पाठवणाऱ्या कंपनीला कळवते की ह्या कुरियरने परत पार्सल पाठवू नका. हे घेऊन जा आणि octroi भरून आणा.” कुरियरवाल्याला हे नवीन होते. तो बाईंना पटवू लागला, “ बाई, तुमचं काहीतरी वेगळंच. आता मी कुठे भरू octroi? घ्या ना यावेळी. पुढे बघू.”
“ हे बघा हे चालायचं नाही. मी आत्ताच फोन करते त्यांना ” आणि फोन लावला देखील.
शेवटी होय नाही म्हणता कुरियर ते पार्सल परत घेऊन गेला. बाईंनी पार्सल पाठवणाऱ्या सप्लायारला याची खबर दिली व असे परत होणार नाही याची तंबी दिली. पार्सल परत देताना ‘ मन्मन ‘मधल्या कोणी ते मागवले होते? वेळेत न मिळाल्याने व्यवसायावर काय परिणाम होईल? याचा विचार न करता ते परत पाठवले.
मी हे सर्व बघत होतो. गोखल्यांच्या कंपनीचे एथिकल वेगळेपण इथेच बघायला मिळाले. मला गोखल्यांचे आत बोलावणे आले आणि स्वागतिकेने स्वत: मला त्यांच्या केबिनपर्यंत सोडले. आत मनोहर गोखल्यांचे दर्शन झाले. वय साधारण सत्तरच्या आसपास, कोकणस्थी गोरेपण आणि चेहऱ्यावर सात्विक शांत भाव असलेले गोखले प्रथम दर्शनीच आवडले. रिसेप्शनिस्टने octroi न भरल्याने पार्सल परत पाठवल्याचे गोखल्यांच्या कानावर घातले. ‘उत्तम केलेस’, असे बाईंचे कौतुक केले आणि माझ्याकडे बघून स्माईल केले व मला बसण्याची खूण केली. मी माझा येण्याचा उद्देश सांगितला की, “आम्ही तुमच्याविषयी खूप ऐकले आहे. एक उत्सुकता म्हणून आपण काय करता हे जाणून घेण्यास आलोय.” त्यांना माझी ओळख सांगितली. असे काही कुणी उत्सुकतेपोटी येईल अशी त्यांना कल्पना नसल्याने आश्चर्य मिश्रित कौतुकाने मला म्हणाले, “ बोला काय माहिती हवी.”
“ हेच की आपण काय करता? प्रॉडक्ट काय? ”
“आम्ही मेडिकल सर्जरीसाठी लागणारी सामग्री बनवतो.” असे म्हणून त्यांनी त्यांचा एक प्रॉडक्ट कॅटलॉग समोर ठेवला. मी इंजिनीअर असल्याने मला फारसे आकलन झाले नाही. पण त्यांनीच हा प्रश्न सोडवला आणि त्यांनी सुरुवात केली.
“आम्ही orthopedic सर्जरीपासून मेंदूच्या सर्जरीपर्यंत लागणारी सर्व प्रकारची शल्य उपकरणे बनवतो, ज्यामुळे डॉक्टरला शल्यक्रिया करणे सुकर जाते. आम्ही १००-१२५ प्रकारची शल्य उपकरणे बनवतो. देशात तसेच परदेशात देखील वितरीत करतो.” एकंदर मला जे कळले त्यावरून जशी कारखान्यात आपण वेगवेगळ्या प्रकारची टूल्स वापरतो तशीच टूल्स एखाद्या सर्जनला ऑपरेशनकरता वापरावी लागतात. एखादे मशीन दुरुस्त करताना ठराविक वेळेत दुरुस्त व्हावे असे इंजिनीअरला बंधन नसते. आज काम अपुरे राहिले तर उद्या करू, आहे काय अन नाही काय. पण माणसाचे हृदय, किडनी अथवा मेंदूची दुरुस्ती करताना, वेळ अतिशय काटेकोरपणे वापरावा लागतो. आज दुरुस्ती झाली नाही – रुग्णाला तसेच ठेऊन उद्या उरलेली करू, असे चालत नाही. हा महत्वाचा फरक माणूस आणि मशीन दुरुस्त करण्यातला आहे. तसाच इंजिनियर आणि सर्जन यामधला आहे. त्यामुळे शल्यक्रियेची अशी उपकरणे बनवताना अजून एक महत्वाची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे, त्या आयुधामुळे रुग्णास कोणतीही इजा होता कामा नये. एकंदर लक्षात आले की, गोखलेसाहेब आपल्या आकलना आणि आवाक्याच्या पलीकडचे काम करतायत.
“ तुम्ही इकडे कसे वळलात? ” असे मी विचारले
“ अहो त्याची मोठी गम्मतच झाली.” श्रोते मिळाल्यामुळे गोखलेसाहेब रंगात आले होते.
“२० वर्षांपूर्वी माझा भाऊ ससूनमध्ये न्युरो सर्जन होता. तो एकदा म्हणाला ‘ अरे मला मेंदूचे ऑपरेशन करताना कवटीतून मेंदू मोकळा करून, कवटी डाव्या हाताने धरून शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे शस्त्रक्रियेस वेळ लागतो आणि आपले काहीतरी चुकले तर? ही मोठी भीती वाटत रहाते. तर तू अशी काही वस्तू कर की ती कवटी अलगद पकडून ठेवेल आणि माझे दोन्ही हात शल्यक्रियेस मोकळे राहतील, जेणेकरून मला नीट काम करता येईल आणि वेळ कमी लागेल. परदेशात अशी उपकरणे मिळतात पण ती फार महाग असतात आणि त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्चही वाढतो आणि तो रुग्णास परवडत नाही.’ मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”
☆ प्रकाश भाऊजी – एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
शनिवार २१/१/२३ .. प्रकाश भाऊजींना जाऊन बरोबर पंधरा दिवस झाले ! कै. प्रकाश विनायक सहस्रबुद्धे, माझे धाकटे दीर ! आठ डिसेंबरला त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. आणि सात जानेवारीला हे वादळ संपुष्टात आले. बरोब्बर एक महिना अस्वस्थतेत गेला !
गेल्या 45 वर्षाचे आमचे दीर-भावजयीचे नाते ! १९७६साली लग्न होऊन सहस्त्रबुध्द्यांच्या घरात प्रवेश केला तेव्हा पाहिलेले हसतमुख, उमदे, खेळकर, खोडकर स्वभावाचे प्रकाशभावजी डोळ्यासमोर उभे राहतात ! आम्ही दोघेही तसे बरोबरचे, मी एक वर्षाने लहानच, त्यामुळे आमचे दिर- भावजयीचे नाते अगदी हसत खेळत निभावले जात होते.
पुढे १९८१ मध्ये आम्ही सांगलीला आलो. प्लॉटवर शेजारी शेजारी जवळपास बत्तीस वर्षे राहिलो ! एकमेकांची मुले- बाळे खेळवली. एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र आलो. माझी मुले त्यांच्या मुलींपेक्षा दहा-अकरा वर्षांनी मोठी, त्यामुळे प्रथम माझ्या मुलांचं बालपण आणि पुढे त्यांच्या मुलींचे बालपण जोपासण्यात आमचेही बालपण, तरूणपण टिकून राहिलं !
बी.कॉम. झाल्यावर नोकरी न करता १९७८ साली मार्चमध्ये चैत्र पाडव्याला त्यांनी दुकान सुरू केले… तेव्हा ” केदार जनरल स्टोअर्स ” असं दुकानाला त्यांनी नाव दिलं, तेव्हापासूनच त्यांची केदारबद्दलची आत्मीयता प्रकट झाली ! फारसं भांडवल नसतानाही प्रथम पत्र्याची शेड दुकानासाठी उभारली. तयार घराच्या दोन खोल्यात आईसह राहिले. सायकलवरून सामान आणत. दुकानाची सुरुवात झाली. भरपूर कष्ट घेत दुकानाचे बस्तान बसवले. गोड बोलून गिऱ्हाईकांचा विश्वास संपादन करून, गव्हर्मेंट कॉलनीमध्ये त्यांनी चांगले नाव मिळवले. लग्न झाल्यावर दीप्तीची साथ मिळाली आणि संसाराची गाडी रुळाला लागली. प्रथम मोपेड, नंतर स्कूटर आणि मग मोटरसायकल असा गाड्यांचा प्रवास सुरू झाला !
“उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी” या उक्तीप्रमाणे दीप्ती आणि प्रकाश भाऊजींनी लक्ष्मी घरात आणली. किराणा दुकान आणि कापड दुकान दोन्हीही छान सुरू होते. प्राजक्ता, प्रज्ञाच्या जन्माने घरात आनंदी आनंद झाला. मुली हुशार ! आई-बाबांच्या कष्टाचं चीज करणाऱ्या ! दोघी इंजिनियर झाल्या, नोकरीला लागल्या. दोघींनीही आपापले जीवनसाथी चांगले शोधले ! प्राजक्ता- ओंकार जर्मनीला काही वर्षे राहून परत भारतात आले. प्रज्ञाने निखिलसह संसार थाटला ! २०१९ च्या दिवाळीनंतर मुलींनी आई-बाबांना पुण्यात आणले आणि तीनही कुटुंबांचे एक संकुल वाकडला तयार झाले. त्यातच प्रज्ञाला मुलगा झाला आणि शर्विलच्या आगमनाने प्रकाशभावजींचा आनंद आणखीनच खुलला ! लहान मुलांची त्यांना खूप आवड ! निवृत्तीचे आयुष्य असे आनंदात चालले होते.
प्रकाशभावजींना लोकसंग्रह करण्याची फार आवड ! वाकडला नव्याने आले तरी शाखेच्या गोतावळ्यात रमून गेले. इतरही अनेक ओळखी करून घेतल्या. बोलका स्वभाव, खेळकरपणे प्रसंग हाताळणे, व्यायाम, खेळाचे महत्व मुलांना पटवणे यासाठी संस्कार वर्ग सुरू केले. त्यात ते इतके रममाण झाले की सांगलीचे आयुष्य बदलून वाकड मध्येही ते तितकेच रमले ! गुलाब फुलांची आवड असल्याने विविध रंगांचे कलमी गुलाब त्यांच्याकडे पाहायला मिळत. फुले आणि मुले दोन्हीची आवड जोपासली. एकंदरीत ते इथे आल्यावर वाकडच्या त्यांच्या घरी हा सर्व आनंद पाहून आम्ही खुश झालो.
सांगलीच्या त्यांच्या आठवणी तर असंख्य आहेत ! पण त्यांची खवैयेगिरी तर जास्तच लक्षात आहे. कोणत्याही आवडलेल्या पदार्थाचे तोंड भरून कौतुक करून खात असत, मग तो कोणी बनवला याच्याशी त्यांना कर्तव्य नसे. गुलाबजाम जास्त आवडत असत. पैज लावून जेवायला आवडत असे. एकदा संपूर्ण जेवणाबरोबर उकडीचे मोठमोठे २१ मोदक त्यांनी संपवले. एका बैठकीला सात आठ पुरणपोळ्या आरामात खात असत! आम्ही सांगलीत असताना छोट्या छोट्या ट्रिप खूप होत असत. बरेच वेळी पाहुणेमंडळी आली की सर्व कार्यक्रम एकत्रच होत असत. शुकाचार्य, ब्रम्हनाळ, नरसोबाची वाडी, कागवाड, हरिपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी आम्ही ट्रीपला जात असू. सुट्टीत मुलांना पोहायला नेणे, भरपूर सायकलींग करणे, उसाचा रस, भेळ तर कधी खास भाकरी, ठेचा, दही धपाटे असे बेत होत असत. यामुळे सगळ्यांचे एकत्रीकरण तर होईच आणि मुलांना सांघिक कामाचे वळणही लागत असे.
शाखा हा त्यांचा वीक पॉईंट होता.” संघावाचून कोण पेलणार काळाचे आव्हान ” हा संघ मंत्र सतत त्यांच्या तोंडात असे. आमच्या सांगलीच्या घरात मुलांना त्यांचा खूप आधार वाटत असे. काकाने काही सांगितले की ते प्राचीला लगेच पटणार ! लहानपणी प्राची थोडी अशक्त होती. बाबांनी औषध दिले , पण तिचे मानसिक टॉनिक काकाच होता ! केदार तर काकांची काॅपीच ! केदार, प्राची, प्राजक्ता, प्रज्ञा ही चारी मुले सांगलीच्या घराच्या सावलीत वाढली आणि पुण्यात सर्वांचे कर्तृत्व बहरले !
२०१९ साली दिवाळीनंतर मुलींनी आई-बाबांना दुकान बंद करून पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. आता सर्व छान सुखात चालू होते. पण काही वेळा नियतीला हे बघवत नाही की काय असे वाटते ! डायबेटीस, बीपी असा कोणताही आजार नसलेल्या प्रकाशकाकांना अचानक हार्ट अटॅक येतो, हेच मनाला पटत नव्हते ! त्यानंतर झालेली बायपास सर्जरी, त्यातच वरचेवर होणाऱ्या खोकल्याचा, कफाचा त्रास आणि न्युमोनिया पॅच या सर्वांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. मुली- जावई आणि सर्वांनी जीव ओतून त्यांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. चार जानेवारीला त्यांचा वाढदिवस होता. ७० वर्षे पूर्ण झाली. तो मनाप्रमाणे साजरा करून त्यांनी जगण्याची आशा दाखवली पण….. काळापुढे इलाज नाही.. शेवटच्या एक-दोन दिवसात तब्येतीने साथ दिली नाही. आणि अखेर “आई, काका गेला गं ” हे केदारचे शब्द फोनवरून सात जानेवारीला सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता माझ्या कानावर आले. डोकं बधीर झालं ! तब्येत खालावली आहे हे ऐकणं वेगळं आणि प्रकाश काका आता पुन्हा दिसणारच नाही हे सत्य पचवणं फार अवघड आहे. तरीही कालाय तस्मै नमः!
त्यांच्या स्मृती तर आम्ही ठेवूच, पण जाणीव होते की आपलीही सत्तरी आली. ” मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे…” हे मनात ठेवून येणारा प्रत्येक क्षण आपण चांगला जगू या असे वाटते, एवढे मात्र खरे ! कै. प्रकाश भाऊजींना माझी मनःपूर्वक श्रद्धांजली !
बारा वर्षांपूर्वीची गोष्ट… त्यावेळी आम्ही मुलाकडे बेंगलोरला गेलो होतो. दीड एक वर्षाचा मोठा नातू बोलायला लागला होता. समोर राहणाऱ्या सिंधी परिवारात तो खूप रमायचा. त्यांच्यात जे आजोबा (दादाजी) होते, त्यांना तो ‘दाद्दाजी’ म्हणायला लागला होता. मग काय त्याने ‘ह्यांना’ही दाद्दाजी म्हणायला सुरुवात केली. आबा,आजोबाऐवजी ह्यांचे दादाजी हेच संबोधन रुढ झाले.. आणि त्यांना ते आवडले ही !
२०१९ मध्ये आम्ही ऑक्टोबर महिन्यात बेंगलोरला गेलो होतो. परत यायची काही गडबड नव्हती. तिथे नेहमीप्रमाणेच आमचं छानपैकी रुटीन सुरू झालं होतं. दादाजींचं मॉर्निंग वॉकला जाणं, कूक अम्मा घरात किती चांगला नाश्ता बनवत असली तरी बाहेरून इडली- वडे, उपीट, सेट डोसा असं काहीतरी खाऊन येणं, घरात कुठली भाजी आहे कुठली भाजी नाही हे न बघता खूप सगळी भाजी घेऊन येणं, वेळ मिळेल तेव्हा नातवंडांना शिस्त लावणं, त्यांच्याकडून योगाभ्यास करून घेणं इत्यादी!
एक फरक मला यावेळी जाणवला तो म्हणजे आपल्या पाच आणि नऊ वर्षाच्या नातवंडांबरोबर ते त्यांच्या वयाचे होऊन खेळू लागले होते. आपलं वय वर्षं 78 विसरून!
एक दिवशी मला ग्राउंड फ्लोअर मधूनच मुलांच्या आयाचा फोन आला, ” मॉंजी, दादाजी ध्रुव, मिहीर के साथ फुटबॉल खेल रहे है .” मी दचकले. ताबडतोब तिथे पोहोचले. एक बेंचवर दादाजी आपले दोन्ही गुडघे चोळत बसलेले दिसले. “आजी, दादाजीनं जोरात किक् मारली” ध्रुवनं माहिती पुरवली. ” ते ना पळत जाऊन फुटबॉल पण पकडत होते.” त्याचं गुडघ्याचे दुखणे, चालतानाही होणारा त्रास. याची सगळी आठवण मला करून द्यावी लागली. त्यानंतर त्यांचे फुटबॉल खेळणे थांबले. पण दिवसेंदिवस मी पाहत होते, त्यांचं मुलांच्या वयाचं होऊन खेळणं वाढतच होतं. कॅरम खेळताना, पत्ते खेळताना जरा मुलांना जिंकून द्यायचं…. जसं मी करते… हे माझं म्हणणं त्यांच्या कानापर्यंत पोहोचायचंच नाही. हळूहळू मी पण दुर्लक्ष करायला सुरुवात केली. ‘ चालू दे दादाजी आणि नातवंडांच्या दंगा ‘ असा विचार करून !
मग एक दिवस त्यांचं लहान मुलांबरोबर छोट्या सायकलवरून अपार्टमेंटला चकरा मारणं, ही तक्रार माझ्या कानावर पडली. ग्राउंड फ्लोअरवरून शाळेतून आलेल्या नातवांबरोबर लिफ्ट सोडून जिन्यावरून सातव्या मजल्यापर्यंत जिने चढून येणं…. ही त्या तक्रारीत पडलेली भर. एकदा तर छोटा नातू सांगू लागला, “आजी आज तिकदे कोणीही बघायला नव्हतं ना तल दादाजी माझ्याबलोबल घसलगुंदीवल चधला. आणि अगं खूप जोलात खाली आपतला, पदला.. मी खलं सांगतोय.. विचाल त्याला बाऊ झालाय का ते.”
हे मोठ्या मजेत हसत उभे होते. मी कपाळाला हात लावला.. त्या क्षणी एकदमच माझ्या मनात विचार आला,
‘लहानपणी कधी घसरगुंडीवर बसायला मिळालेच नसेल. तेव्हा कुठे होते असले चिल्ड्रनपार्क.. घसरगुंडी… झोपाळे.. सिसॉ… आणखी काय काय! मनात खूप खोलवर दडलेल्या सुप्त इच्छेनेच त्यांना असं करायला भाग पाडलं असेल.
तीन महिने असेच दादाजींनी त्यांचे बालपण जपण्यात व्यतीत केले. आम्हाला माधवनगरला परत यायला चार-पाच दिवसच उरले होते. एक दिवस दादाजींनी स्वतःबरोबरच ‘विटामिन सी’ ची एक एक टॅब्लेट मुलांच्या हातात ठेवलेली मी पाहिली.” अरे मिहीर, ते औषध आहे .नका खाऊ. कडू कडू आहे.” मी जरा जोरातच ओरडत तिथे जाऊन पोहोचले. तोपर्यंत दोघांनी गोळ्या चोखायला सुरुवात केली होती. ” नाही आजी, गोली कदू नाहीय.. गोली आंबत गोद आंबत गोद.. छान छान आहे, ए दादाजी आजीला पण दे एक गोली ” धाकटं मापटं खूप खुशीत येऊन बोललं.” ‘विटामिन सी’ ची गोळी खाऊन नातवंडं खूप खुश झाली होती.
काही बोलायला मला जागाच राहिली नव्हती. नेहमीच एक गोष्ट मी मार्क केली होती की हल्ली जे सुना-मुलींचे नवऱ्याला नावाने हाक मारणे, किंवा मुलांचे वडिलांना” ए बाबा,ए डॅडी”म्हणणे हे ह्यांना अजिबात पसंत नव्हते. पण नातवंडे पहिल्यापासून ए दादाजी म्हणायची. त्यावर त्यांचा अजिबात आक्षेप नव्हता. उलट खूप समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले असायचे.
मुलगा डॉक्टर… मी लगेच विटामिन सी बाबतची गोष्ट त्याला सांगितली .”जाऊ दे आता, चार-पाच दिवसांचा प्रश्न आहे ना? ते काही ऐकणार नाहीत. तू काळजी करू नको. पाहिल्यात मी त्यांच्याकडच्या टॅब्लेट्स. जास्त स्ट्राँग नाहीत.” मुलाने मला समजावले.
माधव नगरला परत जाण्यासाठी आम्ही स्टेशनवर पोहोचलो.तेव्हा माझ्या लक्षात आलं की बेंगलोरला येताना दादाजींच्या हातात काठी होती. गुडघेदुखीमुळे चालताना सपोर्ट म्हणून ते हातात नेहमी काठी बाळगायचे .पण या तीन महिन्याच्या मुदतीत त्यांच्या हातून काठी कधी सुटून गेली कळलेच नाही. नातवंडांबरोबर खेळून एक वेगळीच शक्ती त्यांच्यात आली होती. त्यांना एक छान टॉनिक मिळालं होतं.
यथावकाश फेब्रुवारी 20 मधे आम्ही माधवनगरला येऊन पोहोचलो .करोनाची थोडीशी सुगबुगाहट सुरू झाली होती. नंतर पुढे 2020 साल आणि अर्धे 21साल करोनामय झाले. आम्हीही बेंगलोरला जाऊ शकलो नाही …आणि ते लोकही इकडे येऊ शकले नाहीत. दादाजी आणि नातवंडांची गाठ भेटही झाली नाही.
कधी कधी माझ्या मनात यायचं की खरेच सत्तरी पार केलेले आम्ही सगळेजण आणि ऐशी गाठलेले ते …. सर्वजणच आपापल्या घसरगुंड्यांवर बसलो आहोत. काही घसरगुंड्या कमी उताराच्या… काही जास्त उताराच्या… काही खूप उंच.. काही घुमावदार, प्रत्येक जणाला उतारावरुन घसरत जायचेच आहे. पण कोणी मुंगीच्या वेगाने,कोणी रखडत रखडत ,कोणी वेग आला की रडतडत, तर कोणी क्षणार्धात घसरून जाणार आहे.
दादाजींनी जोरात घसरत जाण्याचा मार्ग स्वीकारला. 14 सप्टेंबर 2021 ला हसत बोलत चहा पिता पिता ते क्षणार्धात त्या अदृश्य घसरगुंडी वरून सरकन् घसरत आमच्यापासून दूर गेले.. पुन्हा परत न येण्यासाठी ! आम्हा सर्वांसाठी तो अविश्वासनीय असा खूप मोठा धक्का होता. पण काय करणार…. रिवाजाप्रमाणे सगळे धार्मिक क्रियाकर्मं पार पडले. आणि मुलांबरोबर मी ही बेंगलोरला गेले.
एके दिवशी संध्याकाळची वेळ… अंधार पडू लागला होता. हळवं मन कावरं बावरं झालं होतं .”आजी ही बघ दादाजीची काठी”. नातवंडे मला म्हणाली .वस्तुस्थिती समजून ती दोघेपण आता नॉर्मल झाली होती .”आजी लोकं डाईड झाली की ती स्काय मध्ये जातात नां. आणि मग देवबाप्पा त्यांना स्टार बनवतो नां!…मी नकळत मान हलवली. “आजी आम्ही दादाजीची काठी खेळायला घेऊ शकतो?” ते दोघं विचारत होते……. आणि काहीच न बोलता बधिर मनाने मी एकदा त्या काठीकडे आणि एकदा आकाशातल्या एका.. इतरांपासून दूर एकट्याच मंदपणे चमकणाऱ्या ताऱ्याकडे विमनस्कपणे पाहत राहिले होते.
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈