मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झाकोळ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ झाकोळ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

बरेचदा आपण छोट्या छोट्या कारणामुळं नाराज होतो ,निराश होतो व हातातील काम बाजूला पडते .

कोणत्याही स्थितीत आपण आपले मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नये, कारण कोणतेच दिवस घर करून जीवनात रहात नाहीत तसेच सुदृढ मन एव्हढ्या तेव्हढ्या कारणावरून विचलित होत नसते .

आपले मनःस्वास्थ्य बिघडले तर सभोवतालची परिस्थिती बदलत नाही. उलट परस्थिती आपल्यावर हवी होते व आपण त्या स्थितीचे गुलाम होतो. दिवस पुढे सरकतात अन मग बरेच काही यात निसटून जाते– आणि फक्त न फक्त पश्चाताप शिल्लक रहातो .जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून परिस्थितीवर आपल्याला स्वार होता आलं पाहिजे,  त्याचे लगाम आपल्या हाती खेचता आले पाहिजेत. अगदीच काळोखात चांदण्या नसल्या तरी काजवा तरी असतोच ! कधी काजवा, कधी चांदणी तर कधी चंद्र जीवनात प्रकाश देतोच !

आपण स्वयं सूर्य आहोत, फक्त झाकोळले आहोत. तो झाकोळ दुसरे कुणी दूर करणार नाही, आपली आभा तेज पसरायला तो झाकोळ आपणच दूर करायचाय, किंवा त्या झाकोळातून पुढे जायचंय .

जो काटा पायात रुतून बसलाय तो कुरूप करतो. तो काटा हळुवारपणे काढून टाकता आला पाहिजे, किंवा तो तसाच पायात ठेवून त्याची टोकदार बोच मोडता आली पाहिजे.

निराशेच्या या अंध:कारात आपले खूप काही हरवते जे कधीच परत येणार नसते. बरेचदा आपली म्हणणारी 

माणसे ,कामाच्या ठिकाणची, आसपासची माणसे, मित्र, मैत्रिणी, नैराश्य, दुःख, मानसिक यातनेचे झाकोळ पसरतात आपल्या जीवनावर.

ज्या गोष्टीपासून त्रास होतोय ती गोष्ट महत्वाची असली तरी डिलीट करता यायला पाहिजे ….. 

” झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा ” असं मनाला बजावून झाकोळातून  सूर्य होऊन तळपायला हवे .

 …… Be happy be positive. 🌹

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ त्या तश्या दोघीही आवडीच्या … अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ त्या तश्या दोघीही आवडीच्या… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

गुळाची पोळी अन् पुरणाची पोळी… 

अन ‘त्या दोघी’ हे मराठी मनाच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय!

 

मकर संक्रांतीला मान गुळाच्या पोळीला. वर्षातून एकदा…. पण एकदाच ! त्यामुळे ही जरा ‘एक्सक्लुजीव’ वाटते.

पुरणाच्या पोळीचे मात्र तसं नाही…. गौरी, श्रावणी शुक्रवार, होळी हे खास दिवस आहेतच, परंतू कुळधर्म कुळाचार याही वेळेस पुपो शिवाय पान हलू शकत नाही. 

 

गुळाच्या पोळीचा सोबती एकच….  साजुक तूप.

तर पुरणपोळीची जिवलग दोस्त तुपाची धार…आणि शिवाय इतरही. म्हणजे दूध, नारळाचे दूध, कटाची आमटी.

हे ही तिचे प्रिय सोबती…. अगदी आमरस सुद्धा.

 

गुळपोळी साखरेची बनवता येत नाही. 

पुरणपोळीत साखरेचे पुरणही चालते… असं ऐकलंय. खाल्ली नाहीये मी कधी.

 

एका बाबतीत मात्र साम्य दोघींमध्ये….गृहिणीची कसोटी लागते त्या बनवतांना…. त्या उत्तमपैकी करायला जमणे हे म्हणजे ‘फेदर इन कॅप’!.. दोन्ही पोळ्यांत व्यवस्थित पुरण असणे, ते पोळीच्या कडेपर्यंत भरलेले असणे, पोळीचे आवरण अधेमधे फाटलेले नसणे, त्यातून पुरण ओघळलेले नसणे, ती तव्यास न चिकटणे ….अश्या बऱ्याच कसोट्यांवर पोळी उतरावी लागते, तेव्हा कोठे ‘सुगरणी’चा किताब प्राप्त होतो !

 

पुपो तव्यावरची गरम गरम खाण्यात मजा. 

तव्यावरून थेट ताटात.

गुळपोळी गरमगरम खायची अट नाही. अन तशी ती खाणेही कठीण. 

कारण त्यातला चटका देणारा गुळ. 

गुळाचीपोळी कधी शिळीबिळी होत नाही. 

पुरणपोळी जरी झाली शिळी तरी ती शिळी झाली की जास्तच छान लागते. खुसखुशीत होते. 

 

आता ‘मोस्ट इंपॅार्टंट’ सवाल! 

 

“गुळपोळी आणिक पुरणपोळी यातील कोण आवडे अधिक तुला?

सांग मला रे सांग मला” 

असं कोणी गाऊन मला जर विचारू लागले तर?

अवघड आहे उत्तर देणे. 

हं…..पण गुळाची पोळी हे उत्तर द्यावं लागेल. 

आज तरी.

तुम्हाला वाटेल, आज संक्रांत म्हणून ‘देखल्या देवा दंडवत’ असणार!

ते एक आहेच. 

 

पण अजुन एक कारण आहे.

पुरणपोळ्या दोन खाल्या, फार फार तर तीन, की पोट कसं भरून जातं.

पुपो अंगावर येते. 

गुळाच्या पोळीचे मात्र तसे नाही. 

गुळाचीपोळी म्हणजे चोरटे खाणे!

चार पाच सहज पोटात जातात, अन तरीही अंगावर येत नाहीत म्हणून. 

 

लेखिका : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लईच_बीजी… सुश्री योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ लईच_बीजी… सुश्री योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

सध्या हळदी कुंकवाचा सिझन आहे… 

त्यामुळे शाळेतून घरी आलं की आधी मॅसेजेस चेक करावे लागतात की आज किती घरी हळदीकुंकू आहे. मग एक घरी असेल तर ड्रेस, दोनचार घरी असेल तर साडी शोधावी लागते.. 

काय आहे ना…… एका घरासाठी साडी नेसणं म्हणजे बारशासाठी लग्नाची तयारी करण्यासारखं आहे… त्यामुळे मग ड्रेस अडकवायचा.

जर आपल्याला फारच मेकअप वगैरे काहीही करायला वेळ नसेल तर मग तर मी त्या घरी पटापट सहा वाजताच जाऊन यायचं बघते… म्हणजे अगदी सुंदर तयार होऊन आलेल्या बायकाही भेटत नाहीत आणि आपल्याला उगच आपल्याकडे सगळं असून लंकेची पार्वती बनल्याचं दुःखही होत नाही.. 

असो.  पण हळदीकुंकवामुळे ज्या मैत्रिणी गणपतीच्या मिरवणुकीनंतर भेटल्या नव्हत्या त्याही भेटतात आणि त्या भारतातच असल्याची खात्री पटते….. तेवढेच बरे वाटते हो दुसरं काय… 

शिवाय अनेक ठेवणीतल्या साड्यांना हवा लागते नी त्यानिमित्ताने त्या नेसल्या जातात……..

काही मैत्रिणींच्या नवीन साड्यांच्या घड्या मोडल्या जातात…

चांदीची भांडी त्यानिमित्ताने कपाटरुपी जेलमधून बाहेर येतात आणि त्यांना आंघोळ पांघोळ घालून आपण चकाचक करतो… 

तेच ठेवणीतल्या मोठ्या पातेल्याच्या बाबतीतही होतं…. कपाटात वर कुठेतरी पडलेले मोठ मोठे भांडे बाहेर येतात नी चकाचक स्वच्छ होऊन त्यात मसाला दूध खळखळ उकळायला लागतं… 

दार झाडून पुसून स्वच्छ होतं नी तिथे सुंदर रांगोळी काढली जाते… भलेही मग उठताना पायही आखडतात आणि कंबरही… तुटून हातात येतात की काय असं वाटायला लागतं, नी पाच मिनिटं म्हाताऱ्या आज्जीसारखं वाकूनच  चालावं लागतं.. 

हळदीकुंकवाच्या दिवशी पोळ्या सकाळीच केल्या जातात आणि एखादी साधी भाजी किंवा खिचडी होणार हे जगजाहीर असतं.. 

घरातला पुरुष वर्ग दबकत दबकत बुटासकट थेट बेडरूम गाठतो नी तिकडेच आरामात डुलक्या घेतो…. 

…. असं करत करत पावणेदहा होतात आणि आता कुणी राहिलं तर नाही ना?? याचा कानोसा घेत आपण साडी फेडून गाऊन घालतो आणि जेवायला पान घेतलं की टाणकन बेल वाजते… 

“ उशिरच झाला गं जरा “म्हणत मैत्रिण येते नी पुन्हा आपण हळदीकुंकवाचं ताट हाती घेतो…… आणि अशा रितीने साडीपासून सुरु झालेला हळदीकुंकवाचा प्रवास गाऊनवर येऊन संपतो..

संक्रांतीचा हा पर्वकाळ म्हणजे खरंच एक पर्वणीच असते सगळ्या मैत्रिणींना भेटण्याची…… आणि लई म्हणजे लईच बिजी असण्याची…. 

सखी (फक्त महिलांसाठी)

लेखिका – सुश्री योगिता कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मांगखुरी… — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ मांगखुरी… — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

मांगखुरीतल्या मांगिरापशी गेलं कि….  

लय चांगलं वाटायचं

सगळा शिन भाग निघून जायचा

आंगात तरतरी यायची.

तिथल्या गारगोटी डोळ्यावर चमकून डोळे दिपवायच्या 

आगरबत्त्यायच्या जळालेल्या काड्याची राख 

आर्धी कपाळाला लावून

आर्धी जिभिवर ठेवत चघळन्यात वेगळीच मजा होती.

बारा पंधरा वर्षे मांगखूरिनं आम्हाला

भाकर चारली 

मांगवाड्यातल्या सगळ्याच घरायला 

हिंमतीनं जगायला शिकवलं.

अन मांगिरानं आमच्या पिकापान्याचं रक्षण केलं

आज तीच मांगखुरी 

आमच्याकडून हिसकुन घेण्याचा 

विचार चालू हाये 

तिठं मोठमोठाल्या कंपन्या येणार हाये 

हि बातमी आम्हाला कळाली तरि

आम्ही काही करु शकत नही 

काहीच करु शकत नही 

माय म्हंती 

गायिला वासरु व्हतं 

बाईला लेकरु व्हतं 

पण जमिनिला तुकडा व्हत नही.

मायिला कसं सांगू  ? 

भाकर देणारी मांगखूरी 

आता आपली राहणार नही? 

लेखक : श्री किशोर त्रिंबक भालेराव

जालना. मो – 9168160528

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंग माझा वेगळा — सुश्री सुलभा गुप्ते ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ रंग माझा वेगळा — सुश्री सुलभा गुप्ते  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

रंगात रंग तो गुलाबी रंग ।

मला बाई आवडतो श्रीरंग ॥

…. छेः छेः ! गैर समज करून घेऊ नका . माझे नाव गुलाबी नाही आणि मी हा नवऱ्याच्या नावाचा उखाणाही घेतलेला नाही, त्याचे नाव पण श्रीरंग नाही. कोणी म्हणेल लेखिकेच्या मनात आधीच होळीचे रंग भरलेत , तसे पण नाही.

इंद्रधनुष्याचे सात रंग सर्वज्ञात आहेत … ” ता ना पि हि अ नि जा “.. असे इंद्रधनूचे रंग लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र शाळेत आम्हाला शिकवले होते . तसेच हे सात रंग एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते , जे फक्त आकाशात दिसते ही निसर्गाची किमया . आणि ते बघायला आबालवृद्ध सगळेच धावतात, कारण हे अद्भुत बघून खूप आनंद होतो.

माणसाच्या आयुष्यात देखील हे सात रंग कधी ना कधी डोकावून जातात.

केशरी रंग  त्यागाचा…. 

पांढरा रंग शांतीचा…. 

हिरवा भरभराटीचा…. 

गुलाबी रंग प्रेमाचा…. 

लाल रंग रक्ताचा…. 

काळा म्हणजे निषेध !…. 

अशा सर्व संमत कल्पना आहेत.

…. माझ्या मनात मात्र प्रत्येक रंगाच्या वेगळ्या कल्पना आहेत. रंगांशी निगडित आपल्या भावना, अनुभव असतात. तो तो रंग बघून त्या भावना जागृत होतात….. 

केशरी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो, डौलाने डुलणारा , शिवाजी महाराजांचा ” भगवा “…  मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक, महाराष्ट्र धर्माची, हिंदू धर्माची शान, देवळांच्या शिखरांवर शोभणारे केशरी ध्वज !

विजय पताका !

पांढरा रंग म्हणताच मला आठवतात  हिमालयाची उंच उंच बर्फाच्छादित शिखरे . त्यागाचे प्रतीक . उन्हातान्हाची पर्वा  न करता वर्षानुवर्षे उभे राहून सीमेचे रक्षण करणारा, आपल्या उंचीने भारताची शान उंचावणारा नगाधिराज हिमालय . मनात अभिमान उत्पन्न करणारा ! पांढरा रंग आणखी एक आठवण करून देतो — – सर्वसंग परित्याग करून पांढरी वस्त्रे  परिधान करणारे श्वेतांबर जैन साधू ! आपोआप आदराने आपण नतमस्तक होतो. 

हिरवा रंग तर सृष्टीचा …. ” हिरवे हिरवेगार गालिचे । हरित तृणांच्या मखमालीचे ” …. 

बारकाईने विचार केला तर निसर्गात हिरव्या रंगाची लयलूट आहे . गवत हिरवे , इवल्या रोपट्यांची पाने हिरवी, वृक्षलतांची पाने हिरवी . झाड – लहान असो की मोठे पाने मात्र हिरवीच ! मातृत्वाची चाहूल लागलेल्या तरुणीसारखी, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी ! काय विलोभनीय रूप तिचे !

लाल रंग आणि रक्ताचे जवळचे नाते . माझ्या डोळ्यांसमोर येथे युद्धभूमीवर सांडलेले सैनिकांचे रक्त आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान . रक्तच ! पण एक मातृभूमीसाठी सांडलेले आणि दुसरे कुणा अनोळखीचा जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान. 

काळा रंग निषेधाचा ! मोर्चामध्ये वापरतात काळे झेंडे, पण माझ्या मनात चित्र उभे रहाते – पावसाळ्यातले ते काळे ढग – पावसाच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येणारे दूतच ते ! बळीराजाला आनंद देणारे, ग्रीष्माच्या उन्हाने तापलेल्या तृषार्त भूमीला शांतीचा संदेश घेऊन येणारे !

आता मुख्य माझा आवडता रंग – – अहो कोणता काय ? ??

अर्थात गुलाबी….. 

नवजात बालकाच्या ओठांचा गुलाबी…. 

प्रेयसीच्या ओठांचा गुलाबी…. 

लज्जेने प्रियेच्या गालांवर फुलणारा गुलाबी…. 

मधुर, औषधी गुलकंद बनवावा असा गुलाबांचा गुलाबी…. 

आपल्या उमलण्याने आसमंत दरवळून टाकणारा सुंदर गुलाब , रंग गुलाबी ….. 

…. हे सर्व तर अर्थात मोह पाडतातच.  पण मुख्य म्हणजे – लहानपणापासून ऐकलेले, वाचलेले, फोटोत पाहिलेले – सावळ्या घननीळाचे गुलाबी पदकमल….. 

कमलपुष्प अधिक गुलाबी,…. की भगवान श्रीकृष्णाची सुकुमार पावले अधिक गुलाबी ? मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो . पण म्हणूनच माझा आवडता रंग….. 

श्रीरंग ! भक्ति प्रेमाचा रंग श्री रंग…. 

आठवा रंग….  श्री रंग…. 

लेखिका : सुलभा गुप्ते, सिडनी .

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्त्री… आज व उद्या… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

स्त्री… आज व उद्या… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सावित्री ज्योतिबाने स्त्रियांच्या उद्धारासाठी स्त्री शिक्षणाचा पाया घातला अन स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली .जिथं माणूस म्हणून जगण्यास देखील ती लायक नव्हती, ती आता शिक्षण घेऊन साक्षर झाली ,अक्षर ओळख पाप नसून अक्षरे जीवनाची दशा आणि दिशा बदलतात हेच जणू ज्योतिबाना सिद्ध करायचे होते ! अन फल निश्चिती स्वरूपात अनेक स्त्रिया शिकल्या ,सुशिक्षित झाल्या ,कुणी उंबऱ्याबाहेर पडल्या ,कुणी हक्कासाठी ,न्यायासाठी लढू  झगडू लागल्या ,उच्च पदावर गेल्या ,जग भ्रमंती करू लागल्या ,मनातल्या भावना कागदावर उतरू लागल्या ,आज विविध क्षेत्रातली त्यांची कामगिरी पहाता त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व सिद्ध होते ,घर नोकरी या जबाबदाऱ्या पार पाडत दमछाक झाली पण त्यांनी त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली .हा झाला एक भाग.

शिक्षण सर्वदूर पसरले ,स्त्रिया जागरूक झाल्या समान संधी ,समान अधिकार मिळाले,आर्थिक स्वावलंबी झाली आर्थिक परावलंबित्व सम्पले, स्वतःची प्रगती झाली आणि आज ही गोष्ट सर्व सामान्य झालीय पण अपवाद वगळता असे दिसते की स्त्रियांची आत्मिक, वैचारिक प्रगती झालीय का ? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच दिसून येते. आमचे शिक्षण  फक्त साक्षरता अन करिअर नोकरी याभोवती फिरतेय,अजूनही आम्ही जुन्या ,बुरसटलेल्या रुढींचे, परंपरांचे,अन वैचारिक गुलामगिरीचे प्रतिनिधित्व करतो. आमच्याकडे सारासार विवेक बुद्धीचा अभावच दिसून येतो. अजूनही आमच्याकडे निर्णयक्षमता नाहीये ,आमची तेजस्विता ,तपस्विता संपून आम्हाला चमकण्यात धन्यता वाटू लागलीय. मनावर ,आत्म्यावर उत्कृष्ट संस्काराचा अभाव दिसून येतोय. भौतिक सुखांचा हव्यास अन अट्टाहास धरत आम्ही आत्मोन्नतीस हद्दपार केलेय. अन म्हणूनच कर्तृत्वाच्या पायऱ्या चढताना आम्ही त्याग ,संयम ,आत्मिक सुख ,समाधान ,शालीनता ,नात्यातले समर्पण ही अदृश्य पण सदृश्य चिरंतर परिणामकारक मूल्य विसरतोय.  कुणी तरी सुंदर म्हणावे , कुणाला तरी खूश करण्यासाठी धडपडत असतो ,  बाह्य सौंदर्यावर  मग मिळवलेले पैसे खर्च करतो .अजूनही आम्हाला शोभेची बाहुलीच होणे मान्य आहे. क्षणिक सुखासाठी आम्ही रात्रदिन झटतो पण आत्मिक सुखासाठी कमी झटताना दिसतो . अपवाद आढळतात पण अपवाद नियम होत नाही . आम्ही मग शिक्षणाच्या मूळ उद्देशापासून दूर चाललो आहोत भरकटतोय असे वाटते कारण वैचारिक प्रगतीचा अभावच दिसतोय ही झाली दुसरी बाजू !

आता तिसरी बाजू…   स्त्री कितीही शिकली तरी तिच्या आत्मसन्मानाला कुटुंबात किंवा समाजात खरेच प्रतिष्ठा आहे ? तर ‘नाहीच !’ असेच म्हणावे लागेल , अजूनही कुटुंबातील तिचे स्थान दागिने ,साडी एवढेच मर्यादित आहे आणि आम्हालाही अजून यातच धन्यता वाटते ,आम्ही आमच्यासारख्या प्रगतीपासून दूर असलेल्या स्त्रियांसाठी काही करू इच्छित नाही , समाजात अजूनही आम्हाला एकटे रहाता येत नाही , एकट्याने जीवनाची मौज अनुभवता येत नाही कारण जिथे तिथे उरी भयच बाळगावे लागते एकविसाव्या शतकात आमच्या प्रति पुरुषांची ,समाजाची दृष्टी निकोप ,स्वच्छ नाही अन आम्हा स्त्रियांची देखील नाही आम्ही अजूनही पूर्ण भयमुक्त नाहीत ही खरेच शोकांतिका आहे ! 

कधी कधी वाटते की स्त्रियांचे मूळ प्रश्न थोड्याफार फरकाने तसेच आहेत. जेव्हा माणूस म्हणून ती स्वतःचा  विचार करेल व समाजही तिचा  विचार करेल, तेव्हाच आमचा खऱ्या अर्थाने उद्धार झाला असे म्हणता येईल अन उद्याची स्त्री आनंदाने आकाशात स्वैर भरारी घेईल  आकाश स्पर्शून माणूस म्हणून स्वतःकडे पाहील…..  

…  ” तू स्वयं दीप हो ,अक्षदीप हो …”

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ स्मृती… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ स्मृती… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

तरुणपणात कुणाची तरी येते ती आठवण…. म्हातारपणात होतं ते स्मरण…. यानंतरही जिवाभावात उरतात त्या मात्र स्मृती…. ! ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या प्रत्येक घटना, स्मृती म्हणून माझ्या मनामध्ये कागदावर शिक्का मारावा त्याप्रमाणे उमटल्या आहेत…! 

… काल घडलेल्या सुखद घटना, शिक्का मारलेल्या या स्मृती, आज घरी येऊन घरातल्या आपल्या लोकांना चौखूर बसवून पुन्हा रंगवून सांगण्यात मजा असते… मी त्यालाच लेखा जोखा म्हणतो !!! 

आमच्या खेडेगावात पूर्वी बुधवारी बाजार भरत असे (आताही तो बुधवारीच भरतो)…. लहानपणी आजीच्या बोटाला धरून मी तिच्या मागेमागे फिरून बाजार करत असे….. सगळ्यात शेवटी ती माझ्यासाठी चार आण्याची भजी विकत घेत असे…. कळकट्ट पेपराच्या पुरचुंडीत बांधलेली ही सहा भजी मी जपून घरी आणत असे … बाजारातून घरी चालत जायला किमान एक तास लागे… तोवर मी साठ वेळा आजीच्या पिशवीतून भज्यांचा पुडा नीट आहे की नाही हे तपासात असे…. त्याचा वास घेत असे…. !  भजी खाण्यात जो आनंद आहे…. त्यापेक्षा त्याचा सुगंध नाकात भरून घेण्यात जास्त मजा असते…. ! 

… एखादं ध्येय प्राप्त करण्यापेक्षा त्या ध्येयप्राप्तीपर्यंतचा प्रवास कधीकधी आनंददायी असतो….!!! 

तर…. घरी जाईपर्यंत त्या कळकट पेपरला भज्यांचं तेल लागलेलं असे…. खून दरोडे बलात्कार आणि राजकारण याच बातम्या त्याही वेळी होत्या… आजही त्याच आहेत…. 

या बातम्यांची शाई माझ्या भजाला आपसूक चिटकत असे…. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं ! 

आज वयाने मोठा झाल्यानंतर “भजी” म्हणतो…. लहानपणी “भजं” म्हणत होतो…!

वर्तमानपत्राचा कागद आज जरी बदलला असला तरी बातम्या मात्र त्याच आहेत…. वयाने कितीही मोठा झालो असलो, तरीसुद्धा सामाजिक परिस्थिती विशेष बदललेली नाही…

असो….. 

फरक फक्त इतकाच पडला आहे….. भजी विकणारे, पटका बांधणारे आजोबा जाऊन, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा आला आहे…

आजोबा भजी विक्री करून “व्यवसाय” करायचे, घराचा उदरनिर्वाह भागवयाचे, मुलगा आता ” धंदा ” करतो….!

मातीची घरं जाऊन सिमेंट ची पक्की घरं झाली आहेत….

घरं पक्की झाली पण नाती भुसभूशीत झाली….!

घरासमोरचं अंगण जाऊन, तिथे पार्किंग ची जागा झाली आहे….

पूर्वी पाऊस पडल्यानंतर अंगणातल्या मातीला “सुगंध” यायचा… हल्ली नुसताच चिखल होतो…. या चिखलात घरापासून दूर गेलेल्या कारच्या खुणा फक्त ठळक दिसतात…

गेलेली मुलं, नातवंडे परत घरी येतील या आशेवर दोन म्हातारे डोळे लुकलुकत असतात…. विझत चाललेल्या दिव्यासारखे ! …. 

माझी आजी गेली त्याला कित्येक वर्ष झाली… परंतु पडक्या त्या वाड्याला तिच्या स्मृतीचा सुगंध आहे…!… 

…. चार आण्याला हल्ली भजी मिळत नाहीत…. ते चार आणे भूतकाळात मी हरवून आलो आहे… तेलाचा डाग पडलेला तो वितभर पेपर…. पटका घालणारे ते बाबा… आन् वर दोन भजी जास्त घाल म्हणून वाद घालणारी ती माझी आजी…! 

आज जरी मी हे सगळं हरवलं आहे, तरीसुद्धा….तेलाचा डाग पडलेल्या, त्या कळकट पेपरमधल्या भज्यांच्या सुगंधासारख्या…. या सर्व स्मृती अजूनही मनात दरवळत आहेत… खमंग… खमंग !!! 

या महिन्यात दिवाळी होती….! 

मोठ्या हौसेने आम्ही सुद्धा पणत्या घेतल्या पण आमच्या घरात त्या लावल्या नाहीत…. आम्ही त्या चार जणांना विकायला लावल्या…. ! 

… विकलेल्या पणत्यांनी एका बाजूचं घर उजळेल…. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घराची भूक शमेल…! 

आम्ही घरीच उटणं केलं …. रस्त्यावरील याचकाकडून त्याचं पॅकिंग करून घेतलं…. त्या बदल्यात त्यांना पगार दिला… या उटण्यात आम्ही चंदनाचे चूर्ण घातले होते… या उटण्याला चंदनाचा सुगंध येतोय की नाही माहित नाही, पण कष्टाचा सुगंध नक्कीच आहे ! 

आमच्या खेडेगावात पूर्वी प्रथा होती…  घरामध्ये फराळ तयार झाला की, ताटंच्या ताटं भरून ती गल्लीतल्या शेजार पाजारच्या लोकांना द्यायची….. जणू शेजारच्यासाठीच घरी फराळ तयार करत आहोत… आम्ही पोरं सोरं ही ताटं लोकांच्या घरी पोहोचते करत असू….  त्यावर एक फडकं झाकलेलं असे…. वाटेत जाताना हे फडकं हळूच बाजूला करून चिवड्यातल्या खमंग तळलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आणि शेंगदाणे खायला मिळत, म्हणून हे ताट पोहोचवण्याचं काम अंगावर घ्यायला आम्ही प्रत्येक जण उत्सुक असत असू … घरातून भरलेलं ताट दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत निम्मं व्हायचं… यात खूप “मज्जा” यायची….! 

सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की खेड्यातली ही प्रथा आताच्या आपल्या समाजातल्या अनेकांनी आजही जपली आहे…. 

ताटंच्या ताटं भरून यावेळी समाजातल्या अनेक दानशूरांनी आमच्याकडे फराळ पाठवला… किमान 30 हजार लोकांना पुरेल इतका हा फराळ होता…

… गावाकडल्या स्मृतीचा गंध पुन्हा मनात दरवळला….… लहानपणीप्रमाणेच याहीवेळी आम्ही फडकं झाकून फराळाचं ताट घेऊन रस्त्यावर गेलो…. पण यावेळी तळलेल्या खोबऱ्याच्या खमंग चकत्या आणि शेंगदाणे आम्ही खाण्याऐवजी पोराबाळांची वाट बघणाऱ्या…. लुकलूकणारे डोळे आणि थरथरते हात घेऊन जगणाऱ्या जीवांना भरवल्या … .. आपण घेण्यापेक्षा, दुसऱ्याला देण्यामध्ये जास्त “मज्जा” येते हे आता कळलं…. ! 

वैद्यकीय उपक्रमांतर्गत या महिन्यात जवळपास ९०० रुग्णांवर रस्त्यावरच उपचार केले. आणि १६ गंभीर रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार करून घेतले आहेत. गरजूंना वैद्यकीय साधने (व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या,  मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे,) दिले आहेत. 

वृद्ध लोक, ज्यांना कानाने बिलकुल ऐकायला येत नाही, वृद्धापकाळाने डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ता ओलांडताना एक्सीडेंट होऊन मृत्यू होतात, अशा सर्वांना कानाची मशीन दिली आहेत, डोळ्यांची ऑपरेशन्स केली आहेत. या सर्व वृद्धांच्या, आवश्यक त्या सर्व तपासण्या आपण  रस्त्यावरच केल्या आहेत. 

शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्या मुलांनी शिक्षणाची वाट धरली आहे अशा सर्वांना काय हवं नको ते पाहून गरजेच्या शैक्षणिक बाबी पुरवल्या आहेत. 

या महिन्यात अनेक गोरगरिबांना शिधाही दिला…

आमच्या परीनं आम्ही दिवाळी साजरी केली….

या अल्लाह…. दर्गाहमे हमने कोई चादर नही चढाई…. मगर रस्तेपे जो बुजुर्ग थंडमे मुरझाये पडे थे…. उनके शरीर पे चादर चढाई है …. 

Dear Jejus, we have not offered a single candle to you in this Diwali …. But we have enlightened the houses of many poor people…! 

वाहे गुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतह…

इस बार हम ने गुरुद्वारेपे नही….रस्तेपेही लंगर आयोजित किया था…

पंजाबी या गुरुमुखी भाषा तो आती नही मुझे… लेकिन बिना शब्दोंकी बोली जो हमने बोली ….क्या वो आपकी भाषा से अलग है ? … 

देवी माते … नवरात्रात तुला साडी चोळी अर्पण करण्यापेक्षा, फुटपाथवरच्या मातेला आम्ही साडी चोळी अर्पण केली गं … ! त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले…. ते तुझेच तर  होते…..

हे शंकर भगवान…. भोलेनाथा…. लोक तुम्हाला दुधाचा अभिषेक करतात…. तुम्हाला अभिषेक करण्याऐवजी उपाशी आणि नागड्या पोरांना मांडीवर घेऊन, आम्ही त्यांना दूध पाजले आहे… यानंतर तुमच्या मुद्रेवर जे प्रसन्न हास्य उमटलं…. ते मी दिवाळीचा दिवा म्हणून मनात साठवून ठेवलंय…..

हे गजानना…. चतुर्थीला तुला मोदकाचा “नैवेद्य” दाखवण्याऐवजी रस्त्यावर भुकेचा महोत्सव मांडून…. भुकेल्यांना मोदक भरवून त्यांचा आनंद  “प्रसाद” म्हणून  आम्ही मिळवला आहे… ! 

आणि हो… हे सारं करण्याबद्दल मी तुमची मुळीच माफी मागणार नाही…. ! 

कारण…

…. हे सर्व माझ्या हातांनी करणारे…

…. करवणारे…

…. करवून घेणारे…

… तुम्हीच आहात… तुम्हीच आहात… तुम्हीच आहात…!!!

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भावकोष… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

??

☆ भावकोष… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

रखमा कामाला आली की, तिच्याशी थोडावेळ बोलावं लागतं. सुखदुःख विचारपूस करावी लागते. मी तिला आज सहजच विचारलं, ” कसा चाललाय ग मुलांचा अभ्यास? बरी आहेत का?”  रखमाला, दोन मुलं. एक मुलगा पाचवीत तर एक मुलगा तिसरीत. जखमेवरची खपली काढावी, तशी ती बोलू लागली. ” काय सांगायचं ताई, मुलांचा अभ्यास फोनवर झाला आहे म्हणे, शिकवणी बंद आहेत. आम्हाला शिकवाया येत नाही. त्यात फोनसमोर टाईमात बसायला लागतं म्हणे, आणि सारखं ते फोन रिचार्ज करायचं कसं जमणार आम्हाला? बंद झालाय त्यांचा अभ्यास. नुसतीच फिरत्यात. शाळा कधी सुरू होणार हो ताई?” काकुळतीला येऊन विचारत होती. तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे तरी कुठे उत्तर होतं. .पण तरी जीव एकवटून मी तिला धीर देऊ लागले, ” सर्वांना लस मिळाली की, होईल कमी हा आजार “. ” कसलं काय. ताई, खरं सांगते, माझा मोठा मुलगा शाळेत लय हुशार होता. बाईंनी सांगितलेलं नीट करायचा. म्हणलं, असाच पुढे पुढे शिकला म्हणजे चांगलं होईल. त्याला उद्या मोठा झाला की, कुठं तरी हापिसात नोकरी लागेल. तर हयो काय संकट आलं. पोरं नुसती इथं बस तिथं बस. रिकामं फिरत्यात. कामात लक्ष लागेना माझं ताई ” आणि ती रडायला लागली. मलाही खूप पोटात कालवाकालव झाली..एका आईची सर्व स्वप्नं काचेसारखी ताडताड तुटत होती.आता मी तिला आणखी धीर देऊ लागले. ” हे सगळं लवकर संपेल गं. तूर्त मोबाईलवर अभ्यास परीक्षा चालूच राहतील.”  त्यावर ती म्हणाली, “अहो ताई, मुलांना फोनवर अभ्यास करायला जमेना. अभ्यासावरचं   लक्ष उडालं. समोर बाई नाहीत, फोटोत दिसतात. त्यामुळे भीती राहिली नाही. आणि आदरबी वाटे ना. त्यांना फोन  घेता येत नाही. काही कळत नाही.  जून महिन्यात दरवर्षी शाळेची फी, शिकवणीच्या बाईंची फी, दप्तर, डबा देऊन मुलांना शाळेला धाडीत होते. आता सगळं संपलंच ना.” तिच्या डोळ्यात भीती व बोलण्यात निराशेचा सूर होता. मी पुन्हा धीर देत म्हणाले,. ” शाळा बंद आहेत गं,पण अभ्यास चालू ठेवायचा आहे. आता असं कर, तू त्यांना मोबाईल घेऊन माझ्याकडे पाठव. मी सांगेन कसं पाहायचं ते. सगळी पुस्तकं असतात मोबाईलमध्ये. मी घेईन त्यांचा 

अभ्यास “. झाले…  हे ऐकून मात्र तिचे डोळे हसू लागले. मनातली निराशा आता निघून गेली. तिच्या मनाने उभारी घेतली, व मला म्हणाली, ” खूप उपकार होतील ताई, आत्ता घरी जाते. आणि लावून देतो त्यास्नी तुमच्या घरी. चालंल का?” मी म्हणाले, ” पाठव की “. आणि मग खूप उत्साहाने झपाझप पाऊले टाकीत ती निघून गेली.  तिची स्वप्नं पूर्ण करण्याचा तिला मार्ग सापडला होता. तिची पाठमोरी आकृती पाहून मला भरून आले. किती वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत समाजात. लोकांचा आत्मविश्‍वास ढळतो आहे. कधीकधी आपण अशांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.मनामनांतील अशांतता मिटवू या. धीर देऊ या. मदत करू या. कधी शब्दाने तर कधी कृतीतून. त्या़च्या इवल्या इवल्याशा स्वप्नांना खतपाणी घालू या.  मग त्यातूनच येणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखराची वाट पाहूया. असाच निश्चय करूया…… भावकोश जपू या.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुलाबी हवा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ गुलाबी हवा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

डिसेंबरचा महिना होता,सगळीकडे ख्रिसमसची धूम होती. बाजारपेठा आकर्षक वस्तूने सजल्या होत्या. खेळणी, कपडे,खाऊ,केक,ख्रिसमस ट्री,सगळीकडे आनंदी आनंद आणि उत्साह भरलेला होता.पाईन -देवदारच्या गच्च फांद्यात निवांत झोपलेली हवा पहाट होताच चटकन उठली.सगळीकडे अजून अंधार होता. झाडाच्या एका फांदीला शरीराला पिळदार वळण देत लटकून तिनं आळोखे पिळोखे दिले, मग हलकेच झोका घेत फांद्याच्या आधाराने हळुवार  ती जंगलातून बाहेर आली. गुलाबी फुलांचे ताटवे सगळीकडे बहरले होते. ती ताटव्यावर येऊन जरा पहुडली… इतक्यात पाखरांचा किलबिलाट कानावर आला,’आता आळस करून चालणार नाही,आपल्याला निघायलाच हवं ‘ ती स्वतःशीच पुटपुटली. गुलाबी ताटव्यावरून उठताच तिचं लक्ष स्वतःकडे गेलं. तिचा रंग गुलाबी झाला होता ! तिला खूप छान वाटलं. मंद मंद शीळ घालत ती वेळूच्या बेटातून हळुवार निघाली.

निशिगन्ध, शेवंती, जाई -जुई सर्वांना हलकेच स्पर्श करताच सर्व सुगन्ध तिच्या अंगाला लागला. तिला खूप प्रसन्न वाटले.मंद मंद हसत ती पुढे निघाली.  भल्यामोठ्या बागेत एक पांढरी इमारत तिला दिसली. ती कुतूहलाने आत शिरली. भल्या मोठ्या गोल घंटेभोवती तिनं स्वतःला वेढले व हलकेच एक झोका घेतला तसे घंटा किणकिणू लागली.  सर्वत्र दिवे झगमगत होते, फुलांची आरास होती. ती अजून आत गेली.सर्वत्र शांतता होती. समोर क्रुसाला लटकलेली शुभ्र मूर्ती होती.तिने मूर्तीला वळसा घातला अन पुन्हा घंटेजवळ आली. तिचा हलकासा स्पर्श होताच घंटा पुन्हा किणकिणू लागली. ती बाहेर आली.सूर्याची पिवळी,तांबूस सोनेरी किरणे वाट काढत बागेत लपाछपी खेळत होती.  तिनं किरणांत प्रवेश केला. तिचं सर्व अंग गुलाबी -सोनेरी दिसू लागलं.  तिला मज्जा वाटली.बागेतल्या तळ्यापाशी येऊन ती हलकेच विसावली.बदकांचा एक थवा पाण्यात सावकाश पोहत होता.पाण्यावर सोनेरी किरणं तरंगत होती. तिनं पाण्यावर हलकेच फुंकर मारली तसे किरणांनी  पाण्यावर हेलकावे खायला सुरुवात केली. सोनेरी पाण्याचे ते तरंग हेलकावे खातानाचे मनोहारी दृश्य पाहून ती हरखून गेली.मग तिनं हळूच बदकांच्या थव्यावर फुंकर घातली.  त्यांची मऊ पांढरी शुभ्र पिसे वाऱ्याने विस्कटू लागली अन ते हेलकावे खात खात आपोआप पाण्याच्या त्या तरंगावरून पुढे जाऊ लागले. तिला गंमत वाटली.

इतक्यात तिला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला.ती पटकन तिकडे गेली.एक लहान मुलगा थंडीने कुडकुडत होता.ती त्याच्याजवळ गेली तिच्या ऊबदार स्पर्शाने लपेटले, त्या मुलाला बरे वाटले.ती आणखीन पुढं गेली. रस्त्याकडेला बऱ्याच झोपड्या होत्या.तिने एका झोपडीत हळूच डोकावले.फुंकर मारून मारून एक स्त्री चूल पेटवत होती, धुराने झोपडी गच्च झाली होती. तिच्या नाकातोंडात धूर गेला. तिला गुदमरू लागले,ती तशीच थोडावेळ डोळे बंद करून थांबली अन चुलीत जाळ पेटला ! जाळ होताच सर्व धूर बाजूला झाल, त्या स्त्रीला हायसे वाटले,हवा तिथून बाहेर पडली.

भटकत भटकत ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. उंच टेकडीवर एक मंदिर दिसले.पायऱ्या चढून ती वर आली अन पायरीवर विसावली अन आतले दृश्य पाहू लागली. देवाच्या प्रसन्न मूर्तीपुढं दिवा तेवत होता,मूर्ती फुलांच्या ताज्या हाराने सजली होती. ताज्या फुलांमुळे ती अजूनच सजीव वाटत होती.उदबत्तीचा सुगंध तिच्या शरीरावरील सुगंधासारखाच होता.एक तरुण जोडपे मूर्तीसमोर हात जोडून उभे होते.प्रार्थना संपताच ते बाहेर आले.बाहेर येताच  तिला जवळ घेऊन तो हळूच काही पुटपुटला अन दूर गेला.तिच्या डोळ्यात अश्रू आले.ती तिच्याजवळ गेली अन गालांवर विसावली तसे तिचे गाल गुलाबी झाले.  मग तो मागे फिरला अन कानात हळूच बोलला,” धीर धर,मी लगेच परत येईन,सीमेवर माझी आता गरज आहे,असा जातो न असा येतो “.तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले तसे हवा खुदकन हसली अन तिथून दूर गेली. 

आता ती रानात गेली अन पिकांतून वाहू लागली.पिके आनंदाने डोलू लागली,पाखरे दाणे टिपू लागली, तीही आनंदाने बागडू लागली, पाखरांची गाणी ऐकून आनंदून गेली, मग फळांच्या झाडांवरून झोके घेत वेगवेगळ्या फळांना स्पर्श करू लागली.आंबट गोड सुवास तिच्या अंगाला लागला.शेतकरी शेतात काम करत होते. ती हळूच जवळ गेली. घामाने निथळलेल्या त्यांच्या शरीराला झुळुकीचा स्पर्श होताच त्यांना हायसे वाटले.

आता ऊन चांगलेच तापले होते. तिचा रंग लाल झाला.आंब्याच्या भल्यामोठ्या झाडाखाली तिनं विश्रांती घेतली.गार गार सावलीत तिला  झोप लागली.

तिला जाग आली तेव्हा सूर्याची किरणे मावळतीला गेली होती. आता तिला घरी परतायला हवं होतं.ती झपाट्याने चालू लागली; त्याच रस्त्याने भरभर ती परतली…. आनंदाने गीत गात, आणि पुन्हा तिच्या घरात जाऊन शांतपणे विसावली.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तीन धडे… श्री नारायण मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

तीन धडे… श्री नारायण मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही. 

माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली. 

एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो.”

त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 

म्हणूनच मी ज्या  वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली. 

जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,  “बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”

दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”

ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली ! मी अंडं नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.

पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, “बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, वन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”

तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका  वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “ बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे? ”

या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या, कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात, आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”

माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर  एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो !

माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, ” माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस  की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते !”

मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.. 

— श्री नारायण मुर्ती. 

प्रस्तुती : अमोल केळकर..

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares