मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडेसाती – एक चिंतन – भाग 2 – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साडेसाती – एक चिंतन – भाग – 2 … अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

(अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. ) इथून पुढे —–

कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात —– वेळ नसेल तर भिजत जायचे,—-

वेळ असेल तर थांबायचे,—- ही निर्णयक्षमता साडेसातीत येते.

चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते. 

भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते.

चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही. आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो. 

`मला वाटले,` `माझ्या लक्षात आले नाही ` ` इतकं चालतं,` अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात. 

शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही. अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. 

गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात. 

शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही.

हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात.

डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं. 

स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.

घाबरावे असे शनी काही करत नाही—-

आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे. 

त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही . ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.

माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे. 

गीतेत “ कर्मण्येवाधिकारस्ते “ असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात. 

गीता, आणि एकंदरीतच  संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो. 

ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो. 

खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो.

 अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात.

आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते —- फक्त साडेसातीत नाही , तर एकूण आयुष्यातच…

“ मी म्हणेन ते,—- मी म्हणेन तसे, —-मी म्हणेन तेव्हा —-” असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो.

माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही .– होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही .—तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही . तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही. 

——  एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते. आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते. तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, असे सांगते. मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले.—

त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले. 

ही सत्य घटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ? 

हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. चूक न सुधारता नुसती सांगून  उपयोग नाही.

साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते, त्या संधीचे सोने करावे. 

ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायला लावतात . माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही. 

साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात.

साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम. 

सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????

शुभं भवतु !

— समाप्त —

लेखक : अज्ञात

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडेसाती – एक चिंतन – भाग 1 – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साडेसाती – एक चिंतन – भाग -1… अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका मैत्रिणीने संदेश पाठवला, ” कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहिशील का?”

मी, ” तुला साडेसाती सुरू झालीय का? ” असे विचारले. 

त्यावर ती म्हणाली, ” नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे.”

मी म्हंटले ,” मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल.”

त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, ” झाला तुझा वाह्यातपणा सुरू? “

विनोदाचा भाग सोडला, तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली, 

कोणाची संपली? कोणाची सुरू झाली? काय म्हणून काय विचारता महाराजा, ” साडेसाती ” !     

मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे. शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते, म्हणून त्या कालावधीला

“साडेसाती “असे नाव पडले. ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असले तरी ती कोणालाही टाळता येत नाही.

`ज्योतिष मानत नाही,` असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडा तरी घाबरतो. 

एक गोष्ट आहे—-

शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की “आमच्यातले कोण छान दिसते?”

प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले, ” लक्ष्मी येताना छान दिसते, आणि शनी महाराज जातांना चांगले दिसतात.”

शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही. 

दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते. 

देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की… ” मी सरांशी गप्पा मारून आलोच ,” असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे.

एकदा त्यांना विचारले, ” तुम्हाला सर ओरडत नाहीत का? चुका काढत नाहीत का? “

देशपांडे म्हणाला, “ओरडतात.”

मी: ” तुम्हाला वाईट वाटत नाही का? “

देशपांडे: ” वाटतं…, मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते. 

पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे.”

मी : ” काय? “

देशपांडे : ” एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो. साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो. ते मला म्हणाले, ” देशपांडे चला, चहा पिऊ.”

चहा पितांना ते म्हणाले, ” देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो. जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे. घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते.आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे? गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात. वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते, आणि साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते. त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही .”

शनी महाराज असेच असतात. पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो, त्यात शनीचा दोष नाही. 

शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो. 

साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते. माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो, कारण व्हायचे ते होतेच. कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो. 

कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो. या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो.

टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही , तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला.

अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. 

क्रमशः…

लेखक : अज्ञात

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चकवा…. लेखक -अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆  चकवा…. लेखक -अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

माझे वडील त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात उमरेडला राहत असत. त्याकाळी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे ऑफिसची कॅश कुठे देण्यासाठी ते स्वतः च जात होते. रात्रीची वेळ.त्यांना ज्या भागात जायचे होते तिकडे जाण्यासाठी त्यांना थोडा जंगलाचा भाग पार करायचा होता.वाटेत काय झाले हे त्यांना आठवत नाही,पण ते त्यांच्या रोजच्या वाटेवर जवळपास ३-४ तास फिरत होते.तिथल्या तिथच गोल गोल चकरा मारत होते. थोड्या वेळाने एक बैलगाडीवाला जवळून गेला आणि त्याने ‘हटकले’ तेंव्हा त्यांना जाणवलं, की काहीतरी विपरित घडतंय. त्या बैलगाडीवाल्याच्या आधाराने ते रस्ता नीट पार करू शकले.

‘चकवा’ आम्हाला आजही आठवतो आणि असं वाटतं की आम्हीच तो अनुभव घेतला म्हणून.

आता हा चकवा काय प्रकार आहे हे सांगण्या पलीकडचे. कोणाचा त्यावर विश्वास बसेल, कोणाचा नाही. मी तरी माझ्या आयुष्यात ह्याचा अनुभव घेतला नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. 

पण आज घरासाठी महिन्याचे वाणसामान खरेदी करायला गेले होते आणि एका चकव्यात मी पण अडकले…

खरेदीचा चकवा आकर्षक पद्धतीने मांडलेल्या गोष्टी,त्यामुळे मन नकळत आकर्षित होतं.माझी ट्रॉली कधी भरली आणि कधी ओसंडून वाहू लागली हे कळलंच नाही.आधी वाणसामान आणि मग कपडे दिसले, मग काय महिन्याच्या खरेदीत ते पण सहज ट्रॉलीत जाऊन बसले.सरकार ओरडतेय प्लास्टिक नका वापरू म्हणून… पण तरीही त्यांची आकर्षक मांडणी भुरळ पडून गेली. मग तेही थोडी जागा करून माझ्या ट्रॉलीत सहज विसावले. काच विभागाच्या वाटेत ट्रॉलीला एक धक्का लागला, थोडं सामान  बाहेर आलं आणि मी भानावर आले. माझा बैलगाडीवाला मला सापडला.बिलिंग काउंटरवर जाण्याआधी शांतपणे बसले आणि अक्षरशः दहा मिनिटांत मला नको असलेले सामान बाहेर काढले आणि मी चकव्यातून बाहेर आले.

मोबाईल हा दुसरा चकवा

एकच मेसेज वाचून बाजूला ठेवला जाणारा फोन आपसूक तीन-तीन, चार-चार तास हाताला चिटकून बसतो. फेसबुक आणि व्हाट्सअपचा चकवा

तर सगळ्यांत वाईट.ह्यात त्याहून वाईट म्हणजे आपले बैलगाडीवाले आपल्या आसपास असतात, जसे की आपली आई, वडील, बायको, नवरा, भावंड, मित्र… ते हटकतात आपल्याला… पण तरीही आपण ह्या ठिकाणी त्या बैलगाडीवाल्याचाच राग-राग करतो आणि परत चकव्यात स्वखुशीने अडकतो.

झोप हा तिसरा चकवा

पाच मिनिटं म्हणून झोपतो, ते तासभर कधी उलटतो हे कळतच नाही.इथेही बैलगाडी आहे हो, ‘गजर’ ! पण आपण त्याला सहज दुर्लक्षित करतो आणि देतो ताणून. दुपारची झोप पण अशीच वैरी. चुकून जरी अंथरुणाला टेकलात, की गेलाच म्हणून चकव्यात समजा.

टीव्ही… चा चकवा 

इथे तर काय मेजवानीच असते. १५०-२०० च्या वर चॅनेल्सचा चकवा. इथे नाही का आवडत, तर बदल चॅनेल, इथे मन नाही का रमत, मग दाब बटण आणि मार उडी दुसऱ्या चॅनेलवर. एकेक सिनेमा कमीत कमी ४-५ दा तर अगदी सहज पाहतो आपण… आणि मग काय गेले ३-४ तास! 

चकवाय स्वाहा!

Sale हा तर सगळ्यात फसवा चकवा.

अश्या अश्या गोष्टी आपण विकत घेतो, ज्याची काडीचीही गरज नसते. ५०० रुपयांच्या बचतीसाठी आपण सहज ४-५ हजार खर्चून बसतो आणि अश्या गोष्टी घेऊन येतो ज्या शिवाय आपलं पुढच्या ४-५ वर्षे तरी किमान अडलं नसतं. घे कपडे, घे चपला, घे पर्सेस, भरा ब्यागा आणि उडव पैसे. 

क्रेडिट कार्ड हा तर आत्ताच्या जगातला ‘चकव्याचा’ सगळ्यांत वाह्यात प्रकार.

केवळ आणि केवळ आपल्या खिश्यातून आत्ता पैसे खर्च होणार नाही ह्या पायी आपण इतकं सहज हे वापरतो आणि पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला त्याचे बिल भरतो. म्हणजे पगार आल्याच्या दुसऱ्याच दिवशी एक तारखेची वाट बघतो. महिना घालवतो आणि परत आत्ता कॅश नाही म्हणून क्रेडिट कार्ड वापरतो.

हॉटेलिंगचा चकवा

नसून मला तर चक्रव्यूह वाटतो हल्ली. घरी करायचा कंटाळा आला म्हणून बाहेर खायचं, की घरचं खायचा कंटाळा आला की बाहेरचं खायचं, स्टाटर्स आवडतात म्हणून बाहेर खायचं, का भाज्यांची व्हरायटी म्हणून बाहेर खायचं, उगाच च्याऊ-माऊ म्हणून बाहेर खायचं, का कॉफी प्यायला बाहेर जायचं आणि असं बरंच काही. हल्ली दुसऱ्याला जेवायला बोलावलं की पण बाहेर जातो आपण… म्हणजे तो त्याचा जाऊ शकत नाही का काय ? 

चढाओढ, ज्याला त्याला दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी हवं आहे. 

हा चकवा तर आपल्या संस्कृतीला, मानव जातीला घातक ठरतो आहे.

किती ती जीवघेणी स्पर्धा? अगदी शब्दशः अर्थ आहे, जीवच घेते आहे ही स्पर्धा, कधी पालकांचा, कधी मुलांचा, कधी आईवडिलांचा, कधी भावा-बहिणींचा आणि ही न संपणारी यादी.

विचार केल्यावर जाणवतंय, माझे बाबा त्या चकव्यातून अगदी ३-४ तासांतच बाहेर आले, पण आपलं काय ? 

ह्या सगळ्या चकव्यांतून आपण कधी बाहेर येणार?

फक्त एकच फरक आहे, इथे बाहेरचा बैलगाडीवाला चालतच नाही. 

इथे चकव्यात अडकणारे पण आपण आणि हटकणारे पण आपणच. किती जखमा होऊ द्यायच्या आणि मग बाहेर पडायचे किंवा किती गोष्टी गमवायच्या हे आपल्यालाच ठरवावे लागेल.

— लेखक: अज्ञात.—- त्याला मनोमन नमन!

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पर्शाचं महाभारत !…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ स्पर्शाचं महाभारत !…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?…आठवते का.??

बर्‍याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका..! अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं त्यात.. नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम. 

शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..

हे सगळं आठवायला एक कारण घडलं. काल-परवा `आपलं माणूस ` हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..!

नाना आणि सुमीत राघवन.. त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमीतला बोलता-बोलता विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतास.? कधी आऊटिंगला ? बाहेर जेवायला.?”—- सुमीत गप्प…इथपर्यंत ठीक..

पण नंतर नाना सुमीतला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्‍याला?” — आणि अंगावर सरसरून काटा आला.. नाना पुढे म्हणतात —“ एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे “स्पर्श” करत नाही ही साधी गोष्ट नाही, हा तर पुढचा कहर..”

किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजीही घेतो,  पण खरंच स्पर्श टाळतो का?— आणि तो खरंच इतका महत्वाचा असतो ? आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण ?

खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक. स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..

लहानशी गोष्ट—स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..

पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय ?–आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो? 

आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात..!

उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..

दिवाळीत आंघोळी… आधी पाडव्याला आईने.., भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श—-तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला. 

रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित —–

ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श.,

लग्नात लज्जाहोमाच्या वेळी, एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारा स्पर्श..

स्पर्श लाजरे असतात, बुजरेअसतात.. मायने ओथंबलेले असतात.  कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात —  पण ते बोलतात—

पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…

आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..

स्पर्श रेशमी असतात—जाडेभरडे असतात— पण आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..

आज माझी आई सत्तरीच्या  पुढे आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टिव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते–“रोड झालास रे”. ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत

कितीतरी देवाण-घेवाण करते..

स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बात  दिली जाते, तशीच दसर्‍याला सुद्धा गळाभेट असतेच की. पाश्चात्य संस्कृतीमध्ये शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही परिचयाची, भेटीची पद्धत. इथेही स्पर्श महत्त्वाचा..

का असेल स्पर्श महत्त्वाचा?— 

मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात.. आणि हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..

मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.

आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ..? 

म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “ शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्‍याला? ”

लक्षातच येत नाही आपल्या —हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत.. ती आपली गोष्ट सांगत राहतात . कुठे तरी, कोणाचे तरी, हात ताटकळतात.. 

डोक्यावरून फिरण्यासाठी. कुणाचेतरी तळवे कोमेजून जातात – तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे..

सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसुसते, नातवांनी ओढून पाहावी म्हणून—-

पण वेळ नसतो ना आपल्याकडे. पैसा असतो. टीव्ही असतो. गाड्या, घोडे सगळ काही आहे. पण — 

पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून “ जेवलीस का गं ? ” असं विचारण्यासाठीचा वेळ आणि स्पर्श हरवून बसलो आहोत आपण..

“वेळ हरवला तरी चालेल, पण स्पर्श जपले पाहिजेत हो”

स्पर्श भावनेचा झरा सतत वाहू द्या.., त्याला अडवू नका आणि आटवू तर नकाच —-

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंकारची शेळी— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ ओंकारची शेळी— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

सुशीला माझी  पेशंट. सारखे येऊन येऊन ह्या बायका माझ्या मैत्रिणी पण झाल्या. मी त्यांना घरचीच एक वाटत असे.

त्यांच्या घरच्या छोट्या मोठ्या समारंभाला मला आवर्जून बोलावत असत. मग लग्नाच्या बांगड्या भरणे असो किंवा हळदीकुंकू असो. मीही त्यांच्या कडे जाणे कधीही टाळले नाही.

सुशीला  फार नीट नेटका संसार करणारी होती. नशिबाने नवऱ्याची साथ चांगली मिळाली होती तिला. गरीबीत का होईना अगदी छान टुकीत संसार चालला होता सुशिलाचा.

सुशिलाचा मुलगा ओंकार गुणी मुलगा होता. शाळेत नेहमी चांगले असत मार्क. एकच मुलगा होता सुशिलाचा पण भलते लाड करुन बिघडवून नाही ठेवला तिने. एक दिवस म्हणाली “ डॉक्टरबाई ओंकार म्हणतोय आपण गाय किंवा म्हैस पाळूया. आहे की जागा आपल्या घरासमोर. मी सगळे करीन त्याचे. मला लै हौस आहे. अहो पण चेष्टा का आहे गाय विकत घेणे– कुठून आणू मी ते हजारो रुपये ? पुन्हा त्याचे वैरण चारा—अशक्य गोष्ट आहे बघा . हा कसला हट्ट . पुन्हा गोठा बांधा– तो एक खर्च होईलच. रोज रोज चाललंय बघा.  कुठून घेतलंय खूळ डोक्यात देव जाणे. 

जनावर पाळणे चेष्टा नाही हो . घरचा सदस्यच असतो तो. ती धार कोण काढणार, दूध कोण विकणार —याला काही समजत नाही . पोराटकी नुसती. “ 

सुशीला खरोखरच वैतागली होती. तिचे अगदी बरोबर होते. आधीच लोकांची कामे करून पिचून निघत होती,

त्यात हा व्याप कोण घेणार अंगावर.  मीही विचारात पडले. एकीकडे कौतुक पण वाटले ओंकारचे. 

आमची मुले या वयात आणखी चांगला मोबाईल हवा– नवे गेम्स हवेत म्हणून हट्ट करतात . पण हा मुलगा गाय म्हैस पाळू म्हणतोय— मलाही हा प्रश्न कसा सोडवावा समजेना. अर्थात हा प्रश्न माझा नव्हता. 

पण आमचे घरातले लोक म्हणतातच –` आपल्या बाईंना सवयच आहे लोकांचे प्रॉब्लेम आपलेच समजून डोके शिणवून घ्यायची.` 

पण मी हे सगळे विसरूनही गेले . आणि माझ्या हजार व्यापात बुडूनही गेले. मुलीच्या परीक्षा, ऍडमिशन्स , 

हॉस्पिटलचे व्याप— एक का व्याप होता मागे माझ्या.

मग एक दिवशी सुशीला परत दवाखान्यात भेटायला आली . म्हणाली “ बाई, दवाखाना झाला की याल का घरी ?ओंकार बोलावतोय तुम्हाला. “

बाहेर ओंकार उभा होता. संकोचाने म्हणाला , “ ताई या ना, गम्मत आहे एक.” 

दवाखाना बंद केल्यावर मी उत्सुकतेने गेले सुशीलाच्या घरी. मोठे टापटिपीचे घर. स्वच्छ ठेवलेला ओटा, 3 खोल्या  अगदी  छान ठेवलेल्या– मला छानसे सरबत दिले, लाडू दिला.

“ अरे ओंकार,ती गम्मत दाखवणार आहेस नं मला ? 

“ बाई, चला मागे अंगणात.” 

मला त्याने अंगणात नेले. तिथे एक पांढरी शुभ्र शेळी बांधलेली. आणि तिची सशासारखी दोन करडे.

मला इतकी मजा वाटली—

सुशीला म्हणाली, “ बाई,गाय म्हैसवरून शेवटी शेळीवर झाली बघा तडजोड. आमच्या पलीकडच्या चाळीत शेळी व्यायली. तिला दोन पिल्ले झाली. मैत्रीण म्हणाली, ` ही  शेळी जा घेऊन तुझ्या ओंकारला. फार हट्ट करतोय ना. 

बघ, सोपी असते  ग शेळी पाळायला. वर दूध देईल, तिची पिल्ले विकता येतील ते वेगळेच उत्पन्न. बघ बाई हवी का.

एक नर आहे, एक मादी. मादी ने ओंकारसाठी – मावशीकडून भेट.

याचे पैसे नको देऊस मला.

घरी येऊन ओंकारला विचारले, तर तो लगेच गेला बघायला . ही शेळी इतकी आवडली त्याला. बारके पिल्ल्लूच की होते हो ते. मी म्हटले, “ ओंकार,हिची सगळी काळजी तू घ्यायची .तरच हो म्हण. आम्ही कोणीही हिचे काहीही करणार नाही बघ. पुन्हा अभ्यासात मागे पडलास तर देऊन टाकणार मी लगेच मावशीला. चालेल का ”

“ ओंकारने त्या पिल्लाला पोटाशी धरले आणि घेऊनच आला बघा. काय लागतंय हो शेळी सांभाळायला. बिचारी काही पण खाती. अहो, वर्षभरात केवढी मोठी झाली सुद्धा. ओंकार टेकडीवर  तिला चरायला सोडतो आणि स्वतः अभ्यास करत बसतो. आता बघा,हिला दोन पिल्ले पण झाली . आहे का नाही आक्रीत ? “ 

सुशीला हसायला लागली. “ हा आणि उद्योग केव्हा केला म्हणायचा.”–आम्ही सगळेच हसलो.

ओंकार म्हणाला, “ दोन्ही पण बोकडच झाले. आता मी ते विकून टाकीन. मस्त किंमत येते बोकडांना. “

ओंकारची आजी पण बाहेर आली . म्हणाली, “ अहो, माझा पण मस्त वेळ जातो या यमनी पायी. यमनी नाव आमच्या शेळीबाईचे. गुणी हो बिचारी. अहो रोज अर्धा लिटर दूध पण देती सकाळ संध्याकाळ. आम्हाला आता बाहेरून दूध नाही घ्यावे लागत. पुन्हा उरलेला भाजीपाला असं काहीही खाते बिचारी. मस्त केले ओंकारने शेळी आणली. बाई, वाईच चहा घेता का शेळीच्या दुधाचा.” 

“ नको,नको,,” मी घाईघाईने म्हटले. मला काही शेळीच्या दुधाचा चहा प्यायचे धैर्य झाले नाही. सगळे हसायला लागले.

ओंकार म्हणाला, “ माझे सगळे मित्र रोज येतात यमनीशी खेळायला. आणि हे दोन बोकड आहेत ना – चंगू मंगू मी दिसलो की उड्या मारतात, खूप खेळतात. आमच्या गुरुजींनी आमचा सगळा वर्ग आणला होता, माझी यमनी आणि पिल्ले दाखवायला. म्हणाले की आपण ओंकारचे कौतुक करू या. किती छान सांभाळ करतोय तो या मुक्या जनावरांचा. “ 

सुशीला म्हणाली, “ अहो बाई आमच्या पलीकडे दोन जुळी मुले झाली . अगदी बारकी बघा वजनाने. जगतात का मरतात अशी स्थिती. डॉक्टर म्हणाले,यांना फक्त शेळीचे दूध पचेल , बाकी कोणतेच नाही. आमच्या ओंकारने, रोज न चुकता दोन महिने स्वतः दूध पोचवले त्यांच्या घरी. आणि ती दोन्ही मुले अगदी छान गुटगुटीत झाली बघा. त्या आईवडिलांनी तर आमचे पायच धरले बघा. “ 

“ माझा शाळेत, 15 ऑगस्टला सत्कार केला,आणि छोटेसे बक्षीस पण दिले हेड सरांनी.” ओंकार अभिमानाने सांगत होता. मलाही अतिशय कौतुक वाटले या सगळ्यांचेच.

सुशीला मला पोचवायला बाहेर आली. म्हणाली, “ बाई आमच्यात एक म्हण आहे—मोठी, खूप खाणारी, जास्त  दूध देणारी, मोठ्या पोटाची म्हैस पाळण्यापेक्षा छोट्या पोटाची म्हैस पाळावी। बेताचे खाणारी,  परवडेल अशी बेतशीर. तिचा खर्चही कमी, देखभाल पण कमीच.” 

किती खरे बोलली सुशीला —-

ही छोटी माणसे आपल्याला जगण्याचे केवढे मोठे तत्वज्ञान अगदी सहज सांगून जातात ना. —-

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग – 4 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 4 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

शनिवार संध्याकाळ! 

पुण्यातल्या गर्दीतून साठेसाई गावातल्या आमच्या शेतावर गेल्यावर हळूहळू मन निवत जातं. संध्याकाळी परिसरातले बदल टिपत टिपत निवांत चालत होतो.  

अचानक लक्ष गेले अंगांगाने फुललेल्या, बहरलेल्या रानजाईच्या वेलीकडे. वा! कमाल! मंत्रमुग्ध केले तिने… तिच्या सुगंधाने मन मदहोश झाले… ‘ तू… तेव्हा तशी… बहराच्या बाहूंची… ‘ ही ग्रेस यांची कविता आठवली. तो क्षण कॅमेरात टिपून घेण्याचा मोह आवरला नाही… 

हा आनंद! झुळूक… तापल्या भाळावर, थंड वाऱ्याची!

शेतावरच्या आमच्या वॉचमन सखीला मी हे फोटो मोठ्या अप्रूपानं दाखवले. ती सहज म्हणाली,” ती पांढरी फुलं व्हय? ” तिच्यासाठी तो नेहमीचाच सिलसिला होता, उमलणे – कोमेजणे… त्यात काही नवल नव्हते. 

तिच्या आणि माझ्या आनंदाच्या कल्पना किती वेगळ्या आहेत!  सापेक्ष आहे बुवा सगळे!

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वारीचा अपूर्व सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ वारीचा अपूर्व सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सातारला असताना वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्याबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे काम करायला मिळाले. गुरूजी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं नेटकं आयोजन करत असत. एकदा त्यांनी आषाढी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना धोतरे , घोंगडी शाली व स्त्रियांना साड्या स्वखर्चाने वाटायचे ठरवले . आम्हालाही वारीचा सोहळा अनुभवायचा होता त्यामुळे आम्ही तीस-चाळीस जण त्यांच्या बरोबर निघालो. सातारला दोशी बंधू यांची पार्ले बिस्कीट कंपनी आहे. त्यांनीही भरपूर बिस्किटांचे बॉक्स वारकऱ्यांना देण्यासाठी पाठवले. सकाळी सातला आम्ही गुरुजींच्या पाठशाळेत जमलो. सगळे जमेपर्यंत  झिम्मा फुगडी गाणी फेर, विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला आणि वारी चा उत्साह ओसंडून वाहायला लागला. आठ वाजता दोन मोठ्या बसेस निघाल्या. वाटेत भजन भारूड गवळण जप रंगतदार किस्से यात चार तास कसे निघून गेले कळलेच नाही. माळशिरस च्या पठारावर उतरलो. पोटपूजा उरकून घेतली. आता मात्र” भेटी लागी जीवा लागलीसे आस ” अशी पालखीची तळमळ प्रत्येकाला लागली. आणि लांबून टाळ-मृदंगाच्या नादात विठ्ठल नामाचा गजर ऐकायला यायला लागला. अनेक भगव्या पताका फडकू लागल्या.” निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम ” म्हणत नाचत शुभ्र वेषातले वारकरी तल्लीन होऊन स्वयंशिस्तीने पुढे जाताना दिसू लागले. आपले वय विसरून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन नाचणाऱ्या महिला पाहून जागच्याजागी आम्हीसुद्धा नाचायला लागलो. मागून सुंदर धिप्पाड खिलारी बैल जोडी आपल्या खांद्यावर रथ ओढत आली. संपूर्ण रथ फुलांच्या माळांनी सुशोभित केलेला होता.  पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पादुकांची पूजा करण्यासाठी झुंबड उडाली. बिस्किटांचे बॉक्स उघडून प्रत्येकाला बिस्किट पुडा देताना खूप आनंद होत होता. गुरुजी व त्यांचे शिष्य गरजू वारकरी हेरून त्यांना कपडे वाटप करत होते. दोन तास कसे गेले कळलेच नाही. विठ्ठल भक्ती ची गंगा अखंड वाहत होती. वारकऱ्यांची रांग संपत नव्हती. अखेर आमच्याकडचे सामान संपले व आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तो अपूर्व अद्भुत एकमेवाद्वितीय अविस्मरणीय अवर्णनीय अद्वितीय असा सोहळा आजही आठवतो. वारीमध्ये उच्चशिक्षित भाविक सुद्धा होते. कुणीही कसलाही बडेजाव मिरवत नव्हते. मन मंदिरात जपून ठेवलेला हा वारीचा सोहळा आठवला की आजही खूप प्रसन्न वाटते.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 2 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 2 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे

हा दिवस जाहीर झाल्यापासून प्रत्येक वर्षी आम्ही हा दिवस याचना करणाऱ्या लोकांसाठी आयोजित करत आहोत… ! 

डॉ मनीषा सोनवणे ही खरंतर योगाची मास्टर ट्रेनर…. मास्टर ट्रेनर म्हणजे शिक्षकांचा शिक्षक…. !

मागील तीन वर्षांपूर्वी एका पत्रकाराने मनीषाला म्हटले होते, ‘अहो तुम्ही मास्टर ट्रेनर आहात…. सेलिब्रिटींचे योगासन घेण्याऐवजी, भीक मागणाऱ्या लोकांची योगासने काय घेत बसले आहात ?

मनीषा म्हणाली होती, ‘भीक मागणाऱ्या लोकांनाच आम्हाला सेलिब्रिटी बनवायचं आहे … ‘ 

—तर… आजच्या दिवशी आम्ही आमच्या वृद्ध आई-वडिलांना, ज्यांना भीक मागावी लागते अशांना, लालमहाल परिसर आणि शनिवार वाड्यावर घेऊन आलो… तिथे योगाचे धडे दिले…. नाचलो…. विठ्ठल नामाचा गजर केला….!

माझे बंधुतुल्य मित्र श्री धनंजय देशपांडे उर्फ डीडी हे हा कार्यक्रम लाईव्ह करत होते…. हा माणूस म्हणजे हरहुन्नरी… ! या माणसाला शब्दात कसा पकडू ??? इथे शब्द थिटे होतात…

त्यांनी मला विचारलं हाच एरिया का निवडला ? —लाल महाल आणि शनिवार वाडा ही इतिहासाच्या हृदयातली दोन स्थाने आहेत…. 

तशीच आई आणि बाप ही  आपल्या प्रत्येकाच्याच हृदयातली दोन स्थानं आहेत… 

आई बापाचा सन्मान करायचा…. तर याहून दुसरे श्रेष्ठ स्थान नाही, म्हणून हा एरिया निवडला…. !

—यावर डिडीनी मला घट्ट मिठी मारली…. ! 

कृष्ण सुदाम्याची ती भेट होती… मला या निमित्ताने आज कृष्ण भेटला…. ! 

श्री नितीन शिंदे, मधु तारा सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष…. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग…. हा माणूस सध्या कोट्याधीश आहे…. पैशाने आणि मनानेसुद्धा !

हा माणूस रिक्षा पंचायतीचा पुणे जिल्हाप्रमुख आहे ! 

यांना कोणी विचारले, तुम्ही काय करता ?  तर हे बेधडक सांगतात, ‘काय नाय ओ…. मी रिक्षा चालवतो… !’ 

यावरून एखाद्याला वाटतं हे  “रिक्षावाले काका” आहेत…

नाही… , कोट्याधीश असून हा माणूस दिवसभर स्वतः रिक्षा चालवतो…. आणि रस्त्यात अडल्या नडल्या, अंध-अपंग यांना दवाखान्यात स्वखर्चाने ॲडमिट करतो,  कोणताही कॅन्सर पेशंट असेल तर त्याला ऍडमिट करून त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च ते स्वतः करतात… 

आज वाटण्यासाठी किराणा मालाची पोती आम्ही आणली होती… 

या वेड्या माणसाने शंभर शंभर किलोंची ही पोती स्वतःच्या पाठीवर वाहून आणली…. 

मी जरा रागावून माझ्या या मित्राला म्हणालो, ‘तुम्ही कशाला त्रास घेतला ? वेडे आहात का ? 

ते म्हणाले…., ‘बास्स का राव डॉक्टर …. माझे पूर्वीचे निम्मे आयुष्य हमाली करण्यात गेले…’ 

“धन्याचा तो माल…. मी भारवाही हमाल …. “

या “येड्या” माणसाच्या मी पायाशी झुकलो आणि त्याने मला उठवून हृदयाशी लावलं …. !

ही आणि अशीच अनेक “वेडी” माणसं आम्हाला आज भेटून गेली… पाठीवर हात ठेवले….

श्री प्रभाकर पाटील सर, सौ विजयाताई जोशी, श्री जुगल राठी सर, डॉ बजाज सर,  सौ गौरीताई पेंडसे, श्री बंकटलाल मुंदडा,  सौ आरोही दिवेकर…. आणखी किती नावे लिहू? 

यातील प्रत्येक व्यक्ती हे एक स्वतंत्र पुस्तक आहे…. 

या प्रत्येक व्यक्तिमत्वास शब्दात बांधण्यास मी असमर्थ आहे…. !

आजच्या योग दिनानिमित्त आलेले सर्व माझे आईबाप हे मला “वारकरी” दिसत होते…

आमच्याकडे तुळशीमाळ नव्हती…. म्हणून आम्ही त्यांच्या गळ्याभोवती हात गुंफले….

टाळ सुध्दा नव्हते आमच्याकडे… मग आम्ही टाळ्या वाजवल्या…. 

याचना करणाऱ्या या आई बापाच्या पायाखालची माती अबीर बुक्का म्हणून आम्ही आज कपाळाला लावली….

सर्व भेटलेल्या आईंनी डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटे मोडली आणि तिथे मृदंग वाजत असल्याचा भास झाला….. आम्ही फुगड्या घातल्या नाहीत…. परंतु रिंगण करून खेळलो….  जणू…  

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई I

नाचती वैष्णव “आई” रे II

मनीषाच्या डोईवर “तुळशी वृंदावन” नव्हते म्हणूनच की काय …. कित्येक आईंनी तिच्या डोईवर पदर धरला….

शेवटी अल्पोपहार करवून… सर्वांना शिधा दिला ! 

सर्व आईंना नमस्कार करण्यासाठी आम्ही त्यांच्या पायाशी झुकलो….  त्यांनी खांदे धरून उठवत आम्हाला पदरात घेतलं…. जणू “माऊली” भेटली… ! 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, “भिक्षेकरी आणि गावकरी” ही दोन विरुद्ध टोक आम्ही यानिमित्ताने जोडण्याचा प्रयत्न केला…! 

लाचारीची आहुती वाहून, स्वाभिमानाचा यज्ञ पेटवण्याचा प्रयत्न केला…. 

“Humanity” म्हणजे काय ? हे आम्हाला कळत नाही….  पण माणूस म्हणून जगण्या – जगवण्याचा आम्ही प्रयत्न केला….. या वृद्ध आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे, समाधानाचे हसू आज पाहिले आणि आम्हाला इथेच अख्खं पंढरपुर दिसू लागलं… 

सरतेशेवटी गर्दीच्या गोंगाटात…. भरधाव वाहनांमधून वाट काढत, त्यांच्या हाताला धरून आम्ही त्यांना रस्ता क्रॉस करून दिला… 

जाताना त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहून सहज मनात विचार आला…. खरंच रस्ता कोणी कोणाला क्रॉस करून दिला ? 

प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईने आमचा हात धरून आम्हालाच गर्दीचा हा रस्ता क्रॉस करवून दिला होता…. 

परतीच्या प्रवासाला चाललेली ती पाऊले पाहून….विठ्ठल-रखुमाईच्या चरणांचा साक्षात्कार झाला…. 

आम्ही मग इथे नतमस्तक जाहलो… ! 

— समाप्त —  

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

२१ जून २०२२

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे

नमस्कार.  मी डॉक्टर मनीषा अभिजीत सोनवणे…. 

रस्त्यावर नाईलाजाने भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. Doctor for Beggars म्हणून…. 

दरवर्षी आम्ही आमच्या भीक मागणाऱ्या लोकांसमवेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतच असतो…. 

यावेळीही आम्हाला प्रश्न विचारला, यंदा भीक मागणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार का ? 

होय …. नक्कीच करणार आणि आमच्या भीक मागणाऱ्या लोकांच्या समवेतच तो साजरा करणार…. 

यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे “Yoga for Humanity”—-

हल्लीच्या महागाईच्या काळात ह्युमॅनिटी…. “माणुसकी” सुद्धा खूप महाग झाली आहे. 

तुम्ही ज्यांना भिकारी म्हणता ते असतात तरी कोण…? आपल्याकडे युज अँड थ्रो ची पद्धत आहे…. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर करून झाला की ती फेकून द्यायची…. मुलं बाळं, सुना नातवंडं, हे सुद्धा आपल्या आई बापाचा, आजी आजोबाचा ‘Use’ करून झाला की त्यांना ‘Throw करतात… ` It’s a new fashion….Yoooo !!! `

आई बापाला कुष्ठरोग, टीबी यासारखे रोग झाले की, हे रोग आमच्या ‘Kids’ ना होवू नयेत यासाठी सध्याचे  जागरूक Mom and Dad आपल्या आई बाप आणि आजी-आजोबांना रस्त्यावर फेकून देतात— अक्षरशः तुटलेल्या चपलेगत…. 

आणि मग जगण्यासाठी या आई बाप आणि आजी-आजोबांना नाईलाजाने भीक मागावी लागते… 

अशा नाईलाजाने भीक मागणाऱ्या…लोकांनी टाकलेल्या आईबाबांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत…पोरांनी टाकून दिलेल्या …. तुटलेल्या या चपला “पादुका” म्हणून आम्ही डोक्यावर घेणार आहोत…. 

`योग` हा शब्द मूळ संस्कृतातील  “ युज “ या धातूपासून तयार झाला आहे. आणि याचा अर्थ “जोडणे….” 

येणारा हा आंतरराष्ट्रीय दिन भीक मागणाऱ्या लोकांसमवेत साजरा करून, गावकरी आणि भिक्षेकरी ही समाजातली iदोन टोकं जोडण्याचा प्रयत्न  आम्ही यानिमित्ताने करणार आहोत…. 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…” आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात..” हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत…. 

चितेवर जाण्याआधी त्यांच्यात चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहोत…. 

नळ दुरुस्त करणारा कारागीर कितीही कुशल असला तरीसुद्धा डोळ्यातलं पाणी थांबवायला आपल्या माणसाचीच  गरज असते…. 

 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…. “युज अँड थ्रो” केलेल्या या आई-बाबांचा हात हातात घेऊन…..  त्यांचं “आपलं माणूस” होण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करणार आहोत….. 

Yoga for humanity…. ! 

ह्युमॅनिटी चा अर्थ जर “ माणुसकी “ असा असेल तर त्यातला एक अंश आम्ही जगण्याचा प्रयत्न करणार आहोत…. 

21 तारखेला शनिवारवाड्याशेजारील फुटपाथवर आम्ही हा सोहळा सकाळी ११ वाजता आयोजित करत आहोत…. 

आमच्या या सोहळ्यामध्ये कसलाही डामडौल नसेल …येथे कोणी सेलिब्रिटी नसतील…

इथे फक्त असतील समाजाने फेकलेले…थकलेले ….आयुष्याच्या अंताला लागलेले आई आणि बाप !

आमच्या या सोहळ्यात आपणही सहभागी झालात तर त्यांना आणि आम्हाला नक्कीच आनंद होईल…. 

या निमित्ताने आपण उद्या  गोरगरिबांना शिधा देत आहोत…. !!! 

या शिध्याने त्यांचं ८ दिवसच पोट भरेल…. पण आम्ही मात्र कायमचे तृप्त होवू….! 

निसर्गाची किमयाच अशी की ….घेऊन मिळतो तो “आनंद” आणि देऊन मिळतं ते “समाधान“…! 

—क्रमशः भाग पहिला 

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हयातीचा दाखला… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ हयातीचा दाखला.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

ज्यांना दरमहा पेन्शन मिळते, त्यांना प्रत्येक वर्षअखेरीस ‘हयातीचा दाखला’ सादर करावा लागतो.. जेणेकरून त्यांना आपण जिवंत असून, पेन्शन बंद न करता चालू रहावी हे संबंधित खात्याला लक्षात आणून द्यावं लागतं..

काळ बदलला.. आता मात्र आपण ‘हयात’ आहोत, हे आपल्या फेसबुकवरील आप्तस्वकीयांना समजण्यासाठी, त्यावर कार्यरत रहावं लागतं…  

आता एखाद्या मित्राचा शोध घेणं फेसबुकमुळे, सहज शक्य आहे.. त्याचं नाव ‘सर्च’ करायला टाकल्यानंतर त्याने जर आपला फोटो टाकलेला असेल तर तो लगेच सापडू शकतो.. 

गेले दहा वर्षे मी फेसबुकवर आहे.. या कालावधीत कित्येक फेसबुकफ्रेण्ड, फेसबुकवर आले आणि गेले.. सुरुवातीला माझ्याकडून फेसबुकचा वापर जास्त प्रमाणात नव्हता.. कोरोना सुरु झाला आणि गेल्या दोन वर्षांत माझी फेसबुक फ्रेण्ड्सची संख्या शेकड्यांमध्ये वाढली.. 

मला त्या दोन वर्षांत घरी बसून राहिल्याने, लेखन करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला.. मी रोजच वेगवेगळ्या विषयांवर लिहित राहिलो.. ते लेख वाचून असंख्य वाचक माझे मित्र झाले.. कधी आवर्जून ते फोन करुन बोलू लागले.. मित्र परिवार वाढत गेला. 

आता जर मी कधी कामाच्या गडबडीत काही दिवस पोस्ट टाकू शकलो नाही तर, मला काहीजण विचारतात.. ‘बरेच दिवस झाले, आपण पोस्ट टाकलेली नाही..’ ‘काय सुट्टी घेतली का!’ ‘बाहेरगावी गेला होता का?’ इत्यादी..

याला कारण म्हणजे, फेसबुकवर रोजच भेटायची आपल्याला सवय लागलेली असते.‌. जर ती व्यक्ती दोन चार दिवस, फेसबुकवर दिसली नाही तर मनात नाही नाही त्या शंका येतात.. काळजी वाटू लागते.. अलीकडे कामाशिवाय कोणीही कुणाला फोन करीत नाही.. काही विचारायचं असेल तर व्हाॅटसअपवर विचारलं जातं.. ती व्यक्ती रोजच व्हाॅटसअप पहात असेल तर उत्तर लगेच मिळू शकतं. काहीजण आवर्जून सांगतात की, ‘मला व्हाॅटसअप केलं की फोन करुन सांगत जा.. मी ‘व्हाॅटसअपवेडा’ नाहीये..’ असे ‘सेलिब्रिटी’ फेसबुकवर मात्र सतत कार्यरत असतात.. 

माझे एक मित्र आहेत, ते रोजच माहितीपूर्ण अशा पोस्ट नेहमी टाकत असतात. त्यांच्या पोस्ट वाचण्याची मला सवय लागलेली आहे.. कधी चार दिवस ते फेसबुकवर दिसले नाहीत तर मी त्यांना फोन करतो. मग समजतं, की ते आजारी होते..

फेसबुकच्या या आभासी जीवनात जगताना आपण, कळत नकळत त्यात सहभागी झालेलो असतो.. विविध छंद, कला, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील मोठी माणसं आपल्या संपर्कात असतात.. आपण त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलेलो नसलो तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर व आपुलकी असते.. कधी त्यांची पोस्ट आवडल्याचे त्यांना लिहिल्यास, मैत्री अधिक दृढ होते.. त्यांच्या मनोगतातून, फेसबुक वाॅलवरुन त्यांचा जीवनप्रवास कळतो.. त्यांच्या जीवन संघर्षापुढे आपले प्रश्न अगदी सामान्य वाटू लागतात.. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, जगण्यासाठी उमेद मिळते.. 

आताच्या जमान्यात पत्रव्यवहार, हा लुप्त झालेला आहे. कुणासाठी दोन ओळी लिहून, आठ दिवस उत्तराची वाट पहाण्यापेक्षा व्हाॅटसअप किंवा मेसेंजरवर त्वरीत संपर्क साधता येतो.. 

पाच हजारांची फ्रेण्डलिस्ट असणाराही, फेसबुकवर एकटा पडू शकतो.. तो फेसबुकवर कसा व्यक्त होतो, हे महत्त्वाचे असते.. काहीजण सतत टिका करीत असतात.. काहीजण एखाद्या पक्षाचे समन्वयक म्हणून कार्यरत असतात.. काही उपदेशाचे ‘रेडिमेड’ डोस पाजत असतात.. इथं जर तुम्ही जसे आहात तसेच राहिलात, तर अधिक लोकमान्यता मिळते.. 

मला माझं फेसबुक समृद्ध असल्याचा सार्थ अभिमान आहे.. कारण माझ्याकडे दिग्गज कवी, लेखक, चित्रकार, सिने-नाट्य कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, प्रकाशक, प्रिंटर्स इत्यादी क्षेत्रातील असंख्य स्त्री-पुरुष संपर्कात आहेत.. त्यातील कित्येकांनी साहित्य व कला प्रांतातील उच्चतम पुरस्कार मिळविलेले आहेत..

मी तर फेसबुकवर कार्यरत आहेच, माझेही हे सर्व मित्र असेच ‘हयात’ असल्याची जाणीव करुन देत कार्यरत रहावेत, एवढंच माझं परमेश्वराकडे ‘मागणं’ आहे!!

© सुरेश नावडकर

१२-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print