☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
आमची आई.. .
आईने केला कोंड्याचा मांडा. माझी आई सौ. इंदिरा द. माजगावकर, दुसरी श्यामची आई होती. इतके दिवस नाही पण आता संसारात पडल्यावर जाणवतय, आईने कसा संसार केला असेल ? घरात आई नाना, आम्ही चौघी बहिणी, एक भाऊ, माझे काका (अण्णा), आत्या (आक्का) इतकी माणसे होती. पण मिळवणारे एकटे नानाच होते. त्यातून शिक्षकांना अगदी अपुरा पगार, पण आईने कोंड्याचा मांडा करून संसार सजवला.
45 ते 50 चा तो काळ, रेशनचे दिवस होते ते! धान्य आणून स्वच्छ करून निवडून रेशनला लाईनीत उन्हातान्हांत उभं राहून जड ओझं घरी आणायचं, घामाघूम व्हायची बिचारी! शिवाय आम्हा मुलांचं सगळ्यांचं आवरून हे सगळं आई एकटी करायची. आई माहेरी धाकटी होती. शेंडेफळ म्हणून लाडाकोडात वाढलेली आई सासरी मोठी सून म्हणून आली, हे मोठेपणाच शिवधनुष्य वेलतांना तिची खूपच दमछाक झाली.
आईचं लग्न अगदी मजेशीर झालं, माझे मामा (दादामामा )आणि माझे वडील नाना दोघे मित्र होते. एकदा नाना अचानक दादा मामांना भेटायला म्हणून आईच्या घरी गेले. बाहेर ओसरीवर माझ्या आईचा सागर गोट्यांचा डाव रंगात आला होता, नाना म्हणाले, “अहो यमुताई (आईचं माहेरचं नाव) दत्तोपंत आहेत का घरात? हे कोण टिकोजी आले मध्येच. ‘ असं पुटपुटत सागर गोट्याचा रंगलेला डाव सोडून आईने गाल फुगवले आणि परकराचा घोळ सावरत दादा मामांना बोलवायला ती आत पळाली. तिला काय माहित या टिकोजीरावांशीच आपली लग्न गाठ बांधली जाणार आहे म्हणून. लग्नानंतर आपल्या मित्राला, म्हणजे मोठ्या मामांना, हा किस्सा आमच्या वडिलांनी आईकडे मिस्कीलपणे बघत रंगवून सांगितला होता. मग काय मामांच्या चेष्टेला उधाणच आलं,
आम्ही मोठे झाल्यानंतर ही गंमत आमच्यापर्यंत मामांनी पोहोचवली होती. तर अशी ही आईनानांची पहिली भेट. नंतर संसाराची निरगाठ पक्की झाली, आणि त्यांचे शुभमंगल झाले. नाशिकच्या जोशांची कनिष्ठ कन्या मोठी सून म्हणून माजगावकरांच्या घरांत आली. कर्तव्याची, कष्टाची जोड देऊन तिने नानांचा संसार फुलवला. आता ति. आई नाना दोघेही नाहीत पण आठवणींची ही शिदोरी उलगडतांना मन बालपणात जात, आणि त्यांच्या आठवणीने व्याकुळ होत… व्याकुळ होतं..
कावळ्याचा आणि आपला किती जवळचा संबंध आहे ? नाही का? अगदी लहान असल्यापासून एक चिऊ आणि एक काऊची गोष्ट आपण ऐकलेली आहे. नंतर मग लोभी कावळ्याची गोष्ट मग तहानलेल्या कावळ्याची गोष्ट मग कावळ्याला काणा का म्हणतात ती गोष्ट मग कावळ्यासारखी दृष्टी ठेवण्याची शिकवण मग मुलगी वयात आली की काकस्पर्शाची शिकवण अशा अनेक वळणांवर भेटलेला कावळा मेल्यानंतर पिंडाला शिवायला आवश्यकच आणि त्यानंतर येणार्या प्रत्येक पक्ष पंधरवड्यात तर यांचा मान जास्तच!!
पण हे एवढे महत्वाचे दिवस•••• त्यासाठी आणि जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर भेटणारा हा कावळा क्षुल्लक का? का त्याला कमी लेखले जाते?
खरं तर त्याच्या रूपाने आपण आपले पूर्वज पहात असतो मग ज्ञानेश्र्वरांनी म्हटल्याप्रमाणे पाहुण्यांचा, आपल्यांचा संकेत घेऊन येणार्या या कावळ्याचे पाय खरोखर तुझे सोन्याने मढविन पाऊ ईतके महत्व तर त्याला मिळालेच पाहिजे नाहि का?
अहो हे पक्ष पंधरवड्याचे दिवस ! त्या दिवसांना सुद्धा आपण कमीच लेखतो की••••• म्हणे या दिवसात शुभ कार्ये करायची नाहित•••• म्हणे यामधे चांगले निर्णय पण घ्यायचे नाहीत••• मुलगा मुलगी बघायचे कार्यक्रम करायचे नाहित•••• इत्यादि इत्यादि••••
पण याच अनुशंगाने एक प्रश्न विचारावासा वाटतो•••• या दिवसांमध्ये कावळ्याच्या रूपाने आपले सगळे पूर्वज आपल्या घरी जेवायला येतात यावर तुम्ही विश्वास / श्रद्धा ठेवता ना? मग मला सांगा आपले पूर्वज आपले कधी वाईट चिंततील का हो? नाही ना?
मग जर तसे असेल तर त्यांच्या हजेरीत चांगला निर्णय घेतला शुभकार्य केले किंवा मुलगा मुलगी पहाण्याचे कार्यक्रम केले तर या कार्यक्रमांना आपले पूर्वजही हजर राहून ते आपल्याला आशिर्वाद नाही देणार का? मग देव आप्तेष्ट आणि पूर्वजांच्या हजेरीत या गोष्टी का करायच्या नाहीत?
उलट इतर कोणत्याही दिवशी केलेल्या कार्यांपेक्षा या दिवसात केलेल्या कार्यांना यश जास्त येईल. तेव्हा शुभस्य शिघ्रम ! तेव्हा या पंधरवड्यासाठी म्हणून काही निर्णय लांबणीवर टाकले असतील तर ते त्वरीत घ्या!! आणि प्रत्यक्षच त्याचे परिणाम अनुभवा!!
आपल्याला पण म्हणावेसे वाटेल••• पैलतोगे काऊ कोकताहे••• शकून गे माये सांगताहे••••
अजून एक विचार आला कावळ्याच्या रुपाने आपण आपल्या पूर्वजांना बोलावतो एक दिवसाचा जुलमाचा रामराम करतो. पण पूर्वज जर खरेच कावळ्याच्या रूपाने येत असतील तर त्यांना असे येणे आवडत असेल का? ज्यांना जीवंतपणी मुलांच्याकडे हाल सोसावे लागले असतील तर ते नाईलाजाने येत असतील का? का मुलांच्या प्रेमापोटी ते सगळे विसरून त्यांना माफ करायला येत असतील?
काही काही कावळे ना घर का ना घाटका अशी वेळ येऊन उपाशीच रहात असतील का?
अजून एक विचार करावासा वाटतो पूर्वजांच्या प्रती सद्भावना प्रेम व्यक्त करायला ठराविक पंधरवडाच कशाला पाहिजे? घरात नेहमी शक्य नसले तरी जेव्हा जेव्हा चांगल्या घटना घडतात किंवा वाईट प्रसंग येतात तेव्हा तेव्हा त्यांचे स्मरण व्हायला हवे. अगदी छोट्या छोट्या कारणांनीही म्हणजे खाण्याचे पदार्थ कपड्याचा रंग प्रकार आदिंनीही त्यांना आठवणीतून जपले पाहिजे. त्यांची चांगली शिकवण आचरली पाहिजे.
मग पितृपक्षाची गरजच राहणार नाही. रोजच्या जेवणातल्या सारखे गोग्रासा सारखा कावळ्याचा घासही बाजूला ठेवा. मग पितृजनाच्या कृपेने आपले सगळेच जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही.
कृष्णाचा विचार मनात येताच त्याची विविध रूपे मनःचक्षुसमोर येतात.
परंतु ती सर्व त्याची सगुण रूपे आहेत.
कृष्णाची ही सगुण रूपे सुद्धा खूप प्रतीकात्मक आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी गोपींची मधुरा भक्ती खूप सुंदर वर्णिली आहे.
गोपी सखीला म्हणते,
“मी माझे रूप आरशात बघते, परंतु मला मी दिसतच नाही. मला आरशात कृष्णच दिसतो. “
तेव्हा सखी म्हणते, “कारण तू कृष्णमय झाली आहेस. तुझे स्वतःचे अस्तित्व, तुझा मीपणा विरघळला आहे. ”
गोपी म्हणते, “मी कृष्णाला शोधले. सर्व वृदांवन धुंडाळले पण कृष्ण कुठेच सापडला नाही. “
ती अतिशय व्याकुळ होते.
तेव्हा तिची सखी सांगते, “कृष्ण तुला बाहेर सापडणार नाही. तू तुझी दृष्टी बाहेर टाकण्या ऐवजी स्वत:च्या आत पहा. तिथे तुला तो दिसेल कारण कृष्ण तुझ्या अंतरात आहे, तुझ्या हृदयात आहे. “
गोपींची मधुरा भक्ती तशी द्रौपदीची आर्त भक्ती तिच्या आर्त हाकेला धावून कृष्ण येतो व तिची लाज राखतो.
गजेंद्र मोक्ष हे सुद्धा कृष्णाप्रती असलेल्या आर्त भक्तीचेच प्रतीक आहे.
आपल्या सामान्यांच्याही जीवनात कुणाच्या रूपाने कृष्ण संकटात धावून येतो.
कृष्ण खरा उलगडत जातो, तो गीतेत, जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा तत्ववेत्ता म्हणून.
तो अर्जुनाला सांगतो, “तू मला जाणून घे. माझ्या या सगुण रुपाच्या पलीकडचा जो मी आहे त्या मला, परमतत्वाला जाणून घे, माझे परम अव्यय रूप जाणून घे. मला जाणल्यावर तुला दुसरे काही ज्ञान शिकायचे बाकीच उरणार नाही. “
मी चराचरात भरून आहे, पाण्यातल्या रसात मी आहे, चंद्र सूर्यांच्या प्रभेत मीच आहे, पृथ्वीच्या गंधात मी आहे, बुद्धीवंतांची बुद्धी मी आहे, तेजस्वींचे तेज मी आहे, बलवानांचे बळ मी आहे,
तपस्वींचे तप मी आहे. “
कृष्णाला दुर्गुणी लोकांचा अतिशय राग आहे.
तो त्यांना दुष्कृतिनः, नराधमाः, आसुरम् भावम् आश्रिताः
असे म्हणतो. तो म्हणतो, “अशा लोकांना मी कधीच दिसत नाही. ”
न अहम् प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृत्तः।
आज जो हाहा:कार माजला आहे—
चिमुकल्या मुलींवर बलात्कार होतात,
भर रस्त्यात खून होतात, दरोडे पडतात,
दारुच्या नशेत बेदरकारपणे गाड्या चालवून निरपराध्यांच्या हत्या होतात
हे सर्व थांबविण्यासाठी आकाशातून कृष्ण येणार नाही.
तो म्हणतो, ” माझेच बीज, माझा अंश तुमच्यामधे आहे. ”
बावऱ्या बाल मनात काय कल्पना व विचार येतील सांगू शकत नाही. आज आवरताना एक कॅसेट सापडली आणि त्यातच त्यातील रिबन प्रमाणे तिने गुंडाळून घेतले. माझ्या लहानपणी ज्याच्या कडे रेडिओ, टेप रेकॉर्डर, टिव्ही असेल, घरात नळ असेल, गॅस असेल, झोपायला कॉट आणि त्या वर गादी असेल, तर त्या घराकडे फार श्रीमंत आहेत, त्यांचे काय बाबा! अशा आविर्भावात बघितले जायचे.
तर अशा काळात वडिलांनी एक बॉक्स घरी आणला. ( बॉक्स उघडणे ही पण एक दिवाळीच बरं का! ) तर त्या बॉक्स भोवती वाड्यातील सगळे बालवीर जमले. अगदी आनंद व उत्सुकता चेहेऱ्यावर घेऊन! मोठी माणसे कडेकडेने उभी राहिली. त्यातील स्त्रियांच्या चेहेऱ्यावर नानाविध भाव! कौतुक, आसुया, उत्सुकता, थोडी इर्षा, थोडी हळहळ असे संमिश्र भाव! तर विविध सूचनांच्या भडिमारात बॉक्स उघडला. आणि आतून मस्त काळा, चमकदार अनेक बटणं असलेला एक पाहुणा घरात प्रविष्ट झाला. तो म्हणजे टू इन वन
प्रथम त्यातले काहीच कळेना. हळूहळू त्याच्याशी परिचय वाढत गेला आणि नवनवीन गुपिते कळू लागली. रेडिओ तसा थोडा फार परिचित होता. पण त्यातील कॅसेट प्लेअर हा नवीनच होता. अगदी कॅसेट फिरते कशी याचे पण निरीक्षण झाले.
त्याचा आवाज, हवी तीच गाणी ऐकणे सगळेच नवीन!
त्यात माझी बाल बुध्दी गप्प बसू देईना! या बाल कुतूहलाने कोणी नसताना खूप वस्तू खोलून बघायचे प्रताप केले आहेत.
ती कॅसेट वाजते कशी? मग घरात कोणी नसताना ती कॅसेट उलट सुलट बघितली. त्याला A व B बाजू असते. आणि दोन्हीकडे वेगळी गाणी कशी वाजतात? हा मोठाच प्रश्न होता.
आणि एका गाफील क्षणी त्यातली काळी रिबन बाहेर आली. आणि आता ओरडा मिळणार म्हणून मी घामाघुम झाले. पण कॅसेटच्या चाकात करंगळी घालून ती फिरवली आणि रिबन आत गेली. आणि मी श्वास सोडला. पण कुतूहल होतेच! मग अशी हव्या त्या कार्यक्रमाची कॅसेट मिळते हे समजले. त्या कुतूहलाने दुकाने फिरले. त्यातून हे समजले की, आपल्याला हवी ती गाणी त्यात भरून मिळतात. मग काय कोरी कॅसेट घ्यायची घरातील सर्वांनी एकत्र बसून प्रत्येकाच्या आवडीची गाणी निवडायची, त्याची यादी करायची आणि ती दुकादाराकडे सोपवायची. हा एक नवीनच खेळ मिळाला. नंतर हेही समजले की आहेत ती गाणी पुसून नवीन गाणी पण त्याच कॅसेट मध्ये भरून मिळतात. मग तर अजूनच आनंद! त्यावेळी TDK आणि SONY च्या कॅसेट सर्वात उत्तम असतात हे ज्ञान पण मिळाले. आणि जे कथाकथन, गाण्याचे कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकावे लागत, ते या कॅसेट मुळे घरात आले. एकदा घ्या आणि परत परत ऐका याचा खूप आनंद व्हायचा. पु. ल. , व. पु. , शंकर पाटील, हे सगळे जणू घरातच आले आहेत असे वाटायचे. विशेष म्हणजे ती कॅसेट विशिष्ट बटणे वापरून मागे पुढे करून हवे ते गाणे पुन्हा ऐकता यायचे. रेडिओ ऐकण्याची सवय असणाऱ्यांना आपल्या बोटावर आवडते गाणे वाजवताना फारच छान वाटायचे.
असे आनंदात ऐकणे चालू असताना अचानक खटक असा आवाज येऊन तो टेप बंद पडला. आणि सगळ्यांची नजर माझ्याकडे वळली. मी शक्य तितका निरागस की बावळट चेहरा करुन माझा त्यात काही हात नाही, मी आज टेपला हातही लावला नाही हे पटवून दिल्या नंतर ती कॅसेट बाहेर काढण्यात आली. तर त्यातून खूप लांब रिबन बाहेर आलेली. तिथे माझा पूर्वानुभव उपयोगी पडला फक्त या वेळी करंगळी ऐवजी त्या स्पूल मध्ये पेन्सिल घालून ती रिबन गुंडाळून पुन्हा आत बसवली. एकदा तर ती रिबन तुटलीच! पण ती सेलोटेपचा बारीकसा तुकडा घेऊन ती रिबन सरळ करुन, त्या वर तो तुकडा चिकटवणे हे पण काम मी करत असे. हे काम ज्यांनी केले असेल त्यांना डॉ ऑपरेशन किती टेन्शन मध्ये करत असतील याचा अनुभव आला असेल.
आता या ढगात (क्लाउड), तू नळी (यू ट्यूब), आपले गुगल बाबा यावर मागाल ते एका टिचकी (क्लिक) वर मिळते. आणि प्रत्येकाला हवे ते कानात हेड फोन घालून हवे ते ऐकता येते. पण आज काय ऐकायचे असा जेवणाचा आणि कॅसेट ऐकण्याचा मेन्यू एकदमच ठरायचा. त्या सहभोजन व सहश्रवण यात जी गंमत होती, ती हे सगळे ज्यांनी अनुभवले त्यांनाच माहिती!
दारावर टकटक झालं म्हणून मी दार उघडलं.. समोर लॉंड्रीवाला उभा होता.. हातात दोन तीन पिशव्या.. त्यात इस्त्री केलेले कपडे.
मी हिला हाक मारली.. अगं.. लॉंड्रीवाला आलाय.. काही कपडे द्यायचे आहे का?
हिने आतुन कपड्यांचा गठ्ठा आणला.. तो धोब्याला दिला.. इस्त्री केलेले कपडे ताब्यात घेतले.. मोजले.. त्याचं काय बील झालं ते ट्रान्स्फर केले.. मी दरवाजा बंद केला आणि आत आलो.
सहजच विचार मनात आला.. हा माणूस धोब्याचा व्यवसाय करतो.. लॉंड्री वगैरे शब्द आत्ताचे.. मुळ शब्द धोबीच.. तर हा धोब्याचा धंदा किती जुना आहे ना! अगदी रामायणात पण धोब्याचा उल्लेख आहे.. गुरुचरित्रात पण आहे. कपडे धुण्याचा हा व्यवसाय खुप जुना.. पण त्याकाळी इस्त्री करत असतील?
जुन्या लोकांकडुन ऐकलेलं.. अमुक अमुक हे.. त्यांची फार गरीबी होती.. इस्त्रीला पण पैसे नसायचे.. तांब्यात पेटलेले निखारे घालून इस्त्री करायचे वगैरे.
मी तर इस्त्रीचे कपडे वापरायला सुरुवात केली ती कॉलेजला जायला लागल्यावर.. शाळेत असताना फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला शर्ट चड्डी वरुन इस्त्री फिरवली जायची. मग कॉलेजला जायला लागल्यावर मीच माझी शर्ट पँट इस्त्री करायला लागलो.
कपडे लॉंड्रीत टाकण्याची वेळ कधीतरीच यायची.. लग्न कार्य वगैरे असलं तर.. एबीसी लॉंड्रीत कपडे टाकायला जायचो. तिथला माणूस प्रत्येक कपडा उलगडून बारकाईने बघायचा.. कुठे फाटला आहे का.. कुठे काही डाग आहे का.. असला तर त्याचे वेगळे पैसे होतील का.. कुठे रफु करायचं का.. सगळं बघून मग पावती करणार..
मग चार दिवसांनी पावती घेऊन जायचं.. ती पावती घेऊन तो आत जायचा.. हॅंगरला सतराशे साठ कपडे लटकवलेले.. त्यातुन तो नेमकेपणाने आपले कपडे घेऊन यायचा. मोठ्ठा ब्राऊन पेपर काऊंटरवर अंथरायचा.. त्यावर कपड्यांचा गठ्ठा.. मग कुठुन तरी दोर्याचं टोक पकडायचा आणि व्यवस्थितपणे तो गठ्ठा बांधायचा. एखादं लहान मुलं हातात घेऊन आपण सांभाळुन घेऊन जातो.. तसं ते कपडे घरी घेऊन जायचो.
आमचे दादा.. म्हणजे वडील कपड्यांच्या बाबतीत फार काटेकोर.
पॉपलीनच्या कापडाचा शर्ट.. त्याच कापडाचा पायजमा.. आणि गांधी टोपी. त्यांचे कपडे इस्त्री साठी नेहमी लॉंड्रीतच असायचे. टोपी खादीची. ती खादी पण ठरलेली. चांदवडकर लेन मध्ये खादी भांडार आहे. तिथे ते जायचे. त्यांना कुठल्या प्रकाराची खादी हवी असते ते तेथील माणसांना माहीत होतं. कधी ती स्टॉक मध्ये नसायची.. मग चार दिवसांनी ते परत जायचे.
खादीचं ते पांढरं कापड घरी आणलं की एक रात्र पाण्यात टाकायचं.. सकाळी दोरीवर वाळत टाकायचं.. मग त्याच्या टोप्या शिवायच्या. त्यांचा शिंपी ठरलेला होता. असंच घरात शिवणकाम करणारा होता तो.
आता टोपीत कसले आले मापं.. पण नाही.. दादांना ते पटायचं नाही. पहीले सॅम्पल म्हणून तो एक टोपी शिवायचा. दादांना आणुन दाखवायचा. दादा ती घालुन बघायचे.. इंचपट्टीने लांबी रुंदी उंची बघायचे. पुढे असणारं टोक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे.. त्याला दिवाल म्हणत.. ती दिवाल अगदी त्यांना हवी तशी लागायची.. थोडेफार फेरफार करून मग ते फायनल करायचे.
दुसऱ्या दिवशी टोप्या शिवून तो शिंपी यायचा. दादा एकदम डझनभर टोप्या शिवायचे. त्याची धुलाई.. इस्त्री घरीच.. त्यांचं टोप्यांना इस्त्री करणं बघत रहावं असं.
पांढऱ्या शुभ्र टोप्या ते घेऊन बसायचे.. सगळ्या डझनभर.. त्याला पाणी मारुन ठेवायचे.. टोपीला तीन घड्या असतात.. मग एक एक स्टेप.. त्या ओलसर टोपी वरुन दाबुन इस्त्री फिरवली की अशी वाफ यायची.. त्याचा एक वेगळाच वास असायचा. मग एक एक घडी.. शेवटी पुर्ण दाब देऊन इस्त्री फिरवायचे.. खास करून पुढच्या टोकावर.. ते टोक खुप महत्वाचं.
अश्या डझनभर टोप्या इस्त्री झाल्या की त्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून काळजीपूर्वक कपाटात ठेवायचे.. दर दोन दिवसांनी संपूर्ण ड्रेस बदलायचे.
सकाळी देवपूजा झाली की ते देवदर्शन करण्यासाठी. भाजी आणण्यासाठी बाहेर पडायचे. पांढरा शुभ्र पायजमा.. शर्ट आणि टोपी. ती टोपी डोक्यावर ठेवायचे.. कपाळावर गंधाचा लाल टिळा.. आरश्यासमोर उभे रहायचे… टोपीची पुढची बाजु.. त्यांच्या भाषेत ‘दिवाल’.. एकदम सरळ हवी.. अगदी नाकाच्या सरळ रेषेत.. एकदा मान डावीकडे फिरवायचे.. एकदा उजवीकडे.. त्यांच्या दृष्टीने ती केवळ कडक इस्त्री केलेली टोपी नव्हती.. तर तो एक शिरपेच होता..
त्या काळातील पिढीचं जगणं असंच होतं ना.. स्वच्छ.. कुठेही डाग नसलेलं.. इस्त्री केल्यासारखं प्लेन.. आणि डोक्यावरच्या टोपीसारखी सरळ.. एका रेषेत असलेलं..
हाताची पाच बोटं सारखी नसतात. खरं आहे. आम्ही पाच बहिणी पण दिसण्यात, वागण्यात, स्वभावात आणि एकंदरच आम्हा पाच बहिणींच्या पाच तर्हा होत्या. तसं पाहिलं तर आम्हा बहिणींच्या वयातली अंतरही जरा जास्तच होती. म्हणजे पहा ना.. माझ्यात आणि ताई मध्ये (मोठी बहीण) पाच वर्षांचं अंतर. छुंदा माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आणि उषा— निशा या जुळ्या बहिणी, यांच्यात आणि माझ्यात दहा वर्षांचे अंतर. एक सांगते भावंडांची संख्या जास्त असली की आपोआपच त्यांच्यात ग्रूपीजम होऊन जातो. छुंदा, उषा, निशा यांचा एक ग्रुप होता. मी आणि ताई मोठ्या बहिणी म्हणून आमचं घरातलं स्थान जरा वेगळं असावं, पण या मोठेपणातही पुन्हा वयातल्या अंतरामूळे भागीदारी झाली होती. कधी मला वाटायचं मी ना इथली ना तिथली पण त्यातल्या त्यात छुंदा जरा माझ्या गोटा मधली असायची. त्यामुळे तिचं आणि माझं एक निराळंच सख्य होतं.
ताईची आणि माझी कधी भांडणं वगैरे झाली नाहीत पण मला तिचा रागच यायचा. कारण ती अतिशय हट्टी होती आणि तरीही पप्पा तिला “बाबी” म्हणायचे. कसली बाबी.. आईला वेण्या घालताना भंडावून सोडायची. जिजी ला तर नकोसं करायची. बस ! तिच्या मनात काही आलं की ते “आत्ताच्या आत्ता” झालंच पाहिजे. जिजी तिचं सगळं ऐकायची. म्हणेल तेव्हा तिच्याबरोबर सागर गोटे, पत्ते खेळायची. बाहेर रणरणीत ऊन असायचं पण हिला मैदानात सायकल फिरवायला जायचं असायचं. जिजी बिचारी त्या उन्हातही तिला सायकल चालवायला घेऊन जायची. घरात तिचा पाय काय स्थिरावयाचा नाही. मी तर तिला “भटक भवानी”च म्हणायचे. आज तिचं वय ८२ आहे पण अजूनही ती तशीच आहे बरं का ? कुठून येते तिच्यात इतकी ऊर्जा देव जाणे !
पण ताई मॅट्रिक झाली. आमच्या वेळेला अकरावीला एसएससी बोर्डाची परीक्षा असायची. अकरावी पास म्हणजे मॅट्रिक पास. जणू काही एक पदवीच असायची आणि मग पुढे कॉलेजगमन.
तर ताई मॅट्रिक झाली आणि ग्रँटरोडला आजोबांकडे कायमची राहायला गेली. आमची मावस बहीण संध्या जन्मल्यापासूनच आजोबांकडे राहत होती. आता ताई आणि संध्या ज्या एकाच वयाच्या होत्या.. या जोडीने आजोबांच्या आयुष्यात एक वेगळीच हिरवळ निर्माण केली. असो ! तो एक संपूर्ण वेगळा विषयच आहे पण ताईचे असे इमिग्रेशन झाल्यामुळे आमच्या घरात एक प्रकारचे सत्तांतर झाले म्हणा ना. आता या घरात मी मोठी होते. या मोठेपणात एक पॉवर होती आणि मला ती पॉवर माझ्या लहान बहिणींवर वापरायला नक्कीच आवडायचे पण त्याही काही बिचाऱ्या वगैरे नव्हत्या बरं का ? चांगल्याच कणखर, सक्षम आणि फायटर होत्या. त्यातल्या त्यात छुंदा जरा सौम्य होती. तिला नक्की काय वाटायचे कोण जाणे पण तिची अशी एक मनोधारणा असायची की बिंबा (म्हणजे मी) सांगते ना म्हणजे ते तसंच असलं पाहिजे. तिचं ऐकायलाच पाहिजे. माझा स्वभाव तसा जरा खट्याळ, फिरक्या घेणारा आणि काहीसा वात्रटच होता.
एकदा छुंदाच्या हातून बरणीतलं मीठ सांडलं. मी तिला म्हटलं.. गमतीनेच बरं का ?
“छुंदा ! मीठ सांडलंस ? पाप केलंस. आता पाण्यात घालून पिऊन टाक. नाहीतर देवाच्या दरबारात तुला डाव्या डोळ्याच्या पापणीने मीठ उचलावं लागेल. ”
बिच्चारी छुंदा !
तिला सगळं खरंच वाटायचं. ती खूपच घाबरली. तिने लगेच ग्लासात मीठ घातलं, पाणी ओतलं आणि ती खरोखरच पिऊ लागली. मी कोपऱ्यातून मज्जा बघत होते पण तिला भली मोठी उलटी झाली म्हणून जीजी लगेच धावली. जीजीला सगळा प्रकार कळल्यावर तिने माझ्या पाठीत बुक्केच मारले. सगळा गोंधळ.
“मस्तवाल कार्टी, वात्रट कुठली.. ” म्हणून मला ओरडणे, माझे जीजीचा मार चुकवत निलाजरे हसणे आणि छुंदाचे रडणे असा एक मोठ्ठा सीन झालेला. आजही जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. गंमत वाटते पण वाईटही वाटते. या आठवणी बरोबरच त्यावेळी न म्हटलेलं आज ओठावर येतं. “सॉरी छुंदा. अगदी मनापासून सॉरी !”
डावीकडून.. उषा छुंदा निशा ताई (अरुणा) आणि मी
उषा निशा तर फारच लहान होत्या. मी अकरा वर्षाची असताना त्या एक वर्षाच्या होत्या. माझ्यासाठी तर त्या खेळातल्या बाहुल्याच होत्या. घरातली शेंडेफळं म्हणून आई— पप्पा— जीजी आणि सर्वांच्या अत्यंत लाडक्या. सगळ्यांचं सतत लक्ष या दोन बाळांवर असायचं. मला तर कधी कधी दुर्लक्षितपणाचीच भावना यायची आणि त्यामुळे मी खरोखरच कधी कधी त्यांच्यावर, मला जन्मानेच मिळालेली मोठेपणाची पॉवर वापरायची पण या मोठेपणाच्या बुरख्यामागे माझ्या मनात त्यांच्याविषयी अपार मायाही होती. जणू काही त्यांचं या घरात आमच्याबरोबर मोठं होणं ही माझीच जबाबदारी असंही मला वाटायचं. त्या झोपल्या का, त्यांनी वरण-भात खाल्ला का, त्यांची आंघोळ झाली का, त्यांना कपडे घालायचे, पावडर लावायची.. बापरे ! केवढी कामं पण मला ती माझीच कामं वाटायची. छुंदाची पण मध्ये मध्ये शांतपणे लुडबुड असायचीच कित्येक वेळा मी आणि ताईने त्यांना मांडीवर घेऊन शाळेच्या परीक्षेचा अभ्यास केला आहे.
आमचं घर लहान होतं. फारसं सोयीसुविधांचही नव्हतं. वास्तविक आमच्या घराच्या खालच्या मजल्यावर, जी दोन, एक खणी घरं होती ती भाड्याने का दिली होती ? नाहीतर आमच्यासाठी खालीवर मिळून एक मोठं घर नसतं का झालं ? पण हा विचार आता येतो. तेव्हा कधीच आला नाही. आम्ही पाच, आई पप्पा आणि जीजी असं आमचं आठ जणांचं कुटुंब, तीन खोल्या, एक गॅलरी आणि मागची मोरी एवढ्या परीघात सुखनैव नांदत होतं. “स्पेस” नावाचा शब्द तेव्हा डिक्शनरीत आलाच नव्हता. आमच्या या गोकुळात सगळं होतं. खेळणं, बागडणं, भांडणं, रुसवे—फुगवे, दमदार खाणं पिणं, आईची शिस्त, टापटीपपणा, पप्पांचा लेखन पसारा आणि जीजीचं तुडुंब प्रेम! काय नव्हतं त्या घरात !
पप्पा पहाटे उठून सुरेल आवाजात ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग गात. आई, जीजी अंग तोंड धुवून लगबगीने घर कामाला लागत. चहापाणी, स्वयंपाक, घरातला केरवारा, झटकफटक, आमच्या शाळेत जाण्याच्या वेगवेगळ्या वेळा, वेण्याफण्या, कपडे, डबे, पप्पांची कधीही न चुकलेली ठाणे ते व्हीटी (म्हणजे आताचे सीएसटी. ) दहा पाचची लोकल, त्यांचे जेवण, त्यांची बॅग भरणे आणि त्यांना ऑफिसात जाण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी खिडकीतल्या मोठ्या लक्षवेधी महादेवाच्या फोटोला, ”नमस्कार केलास का ?” म्हणून न चुकता जीजीचा केलेला प्रश्न आणि हमखास नमस्कार न करता निघून गेलेल्या पप्पांच्या मागे जीजीनेच मग खिडकीतल्या महादेवाला नमस्कार घालत पुटपुटणे.
या सगळ्याच्या दरम्यान सकाळची साडेसात ते साडेआठ ही पप्पांची आम्हा बहिणींसाठी घेतलेल्या शिकवणीची वेळही कधी चुकली नाही. आमच्या वयानुसार या पप्पांच्या शिकवणीत बदल घडत गेले. सुरुवातीला मी आणि ताई असायचो. पप्पा मध्ये आणि पप्पांच्या डाव्या उजव्या हाताला चौरंग मांडून भारतीय बैठकीत आमचा अभ्यास चालायचा. एक राहिलं.. आमचा चौथीपर्यंतचा अभ्यास आई घ्यायची आणि पाचवी नंतर पप्पांच्या ॲडव्हान्स अभ्यास वर्गात आम्ही जायचो. मी पाचवीत असताना ताई दहावीत होती. हा असा वेगवेगळ्या इयत्तांचा अभ्यास पप्पा कसा काय घेत होते ? पण मुळातच त्यांचा अभ्यास पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नसायचा. त्यांच्याबरोबर आम्ही तरखडकारांचे इंग्लिश व्याकरण, हितोपदेश, मोरोपंतांच्या आर्या, गोखलें अंकगणित, हँन्स अंडरसनच्या फेरी टेल्स, साॅमरसेट मॉमच्या कथांचं वाचन, शेक्सपियरची नाटके, संतवाङ्मय तर होतंच… तर पप्पांबरोबरचा अभ्यास हा असा चतुरंगी होता. शाळेतल्या माझ्या अनेक हुशार मैत्रिणी गाईडचा वापर करून अभ्यास करत. वरचा नंबर पटकावत पण पप्पांचा गाईड वापरून केलेल्या अभ्यासाला जोरदार विरोध असायचा. अभ्यास परीक्षेपुरता करायचाच नाही. तो सखोल असला पाहिजे. विषयाच्या गाभ्यापर्यंत झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत. गाईड सारखे शॉर्टकट त्यांना कधी पटलेच नाहीत. तरीही पप्पांनी त्यांची मतं आमच्यावर कधीच लादली नाहीत पण पप्पांच्या विरोधात जाण्याची आमच्यातही हिम्मत नव्हती. खरं म्हणजे माझा स्वभाव लहानपणापासून, सौम्यपणे असला तरी विरोध करणारा, रीव्होल्टींग, काहीसा विद्रोही होताच पण पप्पांपुढे मात्र तो पार लुळापांगळा होऊन जायचा. आज जेव्हा या सगळ्या आठवणी येतात तेव्हा प्रकर्षाने जाणवते आम्हा पाचही जणींना दिलेली ही पप्पांची शिकवण आयुष्यभर साथ देत राहिली.
आता मी इथेच थांबते कारण का कोण जाणे हे सारं लिहीत असताना अचानकच मला प्रचंड ठसका लागला आहे आणि तो थांबत नाहीये. हातातलं पेनही गळून पडले आहे. कदाचित ब्रम्हांडात कुठेतरी अस्तित्वात असलेल्या, ज्यांच्या छत्राखाली आम्ही पाच जणी वाढलो त्या आई, जीजी आणि पप्पांनाही या क्षणी आमचीच आठवण झाली असेल का ?
☆ “जगणं साठवत राहायचं बस…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून, जुनी चप्पल पायात असायची. शाळेत जाईपर्यंत तिचा पन्ना चार वेळा निघायचा. तो बसवत बसवत शाळा गाठायची. नंतर दिवस बदलले.. संघर्ष बदलला. मग पुण्यात भाजीपाला भरलेली हातगाडी घेऊन ओरडत पुणे तुडवले.. नंतर वाचमन झालो… पुण्यात विमान दिसायचं म्हणून पुणे आवडू लागलेलं… काही काळ हाऊस किपिंगचे काम…. एखाद्या सिनेमातच दुसरा देश बघायला मिळायचा. लै वाटायचं आपण कधी इमानात बसणार.. कधी हा देश बघणार… मनातल्या मनात हे चालायचं..
कवितेने पोट भरत नाही हा टोमणा ऐकतच मी कवितेला जवळ धरलेलं… मी आज हक्काने सांगू शकतो, कवितेने पोट भरते, आणि कविता भरभरून खूप काही देते… फक्त कविता मिरवण्यासाठी नाही तर गिरवण्यासाठी लिहायची असते… तुम्हाला एक खरं सांगू का? आपल्या कवितेचा दराराच इतका वाढवला मी की जाती- धर्माच्या भिंती फोडून मी सीमा ओलांडून अलगद बाहेर पडलो…. आता फक्त राज्यातच नाही तर पूर्ण जगात फिरतोय.. फक्त सगळ्या अपडेट मी सोशल मीडियावर देत नाही किंवा त्याबद्दल व्यक्त होत नाही..
दर महिन्याला किमान एका तरी देशात कवितेचा कार्यक्रम होत आहे.. हे सगळं मी पुस्तकात लिहिणार आहे आणि ते पुस्तकच तुमच्या स्वाधीन करणार आहे..
आणखी एक.. अगदी खेड्यातल्या एखाद्या चौकात छोट्याश्या स्टेजवरसुद्धा मी कविता घेऊन उभा असतो. तिथं मानधन ही लै त लै तीन हजार असतं.. पण कधीच कुणाला नकार देत नाही.. मानधनाच्या रक्कमेवरून मी कुणाला नकार दिलाय असा संयोजक शोधूनही सापडणार नाही. कधी कधी तर संयोजकाची परिस्थिती फार बेताची आहे आणि त्याच्या खिशातून खर्च करून आपल्याला आणलं आहे हे जाणवू लागलं की, लगेच मिळालेलं मानधन परत द्यायला माझे हात कायम खुले होतात.. असं जेव्हा करतो तेव्हा संयोजक असणाऱ्या माणसाच्या डोळ्यात खळकन् पाणी आलेलं मी बऱ्याचवेळा अनुभवलेले आहे..
बाकी अती प्रसिध्दी नसावी, आपले फॉलोवर कमी असावेत पण रॉयल असावेत.. कमी प्रसिध्दी असली की रानटीपणाने हिंडता येतं जगता येतं… कधी कधी गर्दीत कुणी ओळखले आणि जवळ आले की छातीत धडक भरते.. नको वाटतं.. स्टेजवर असतो तेव्हाच काय तो नितीन चंदनशिवे.. इतर वेळी मला माझं मैदान हवं असतं.
बाकी काचेचा मॉल असो किंवा गावातला चौक, विमान असो किंवा एस टी, आपण कायम असाच हाताच्या बाह्या वर सरकवून रेडा फिरल्यासारख हिंडत राहायचं… शेवटी आयुष्य हे आपलं आहे.. अंगाला माती लावून जगत असताना आकाश मोजता मोजता ओंजळीत भरभरून जगणं साठवत राहायचं… बास इतकंच…
साहित्य:- कथा, कविता, ललित लेख, स्तंभ लेखन महाराष्ट्रातील नावाजलेल्या दैनिक, दिवाळी अंक आदीमधून.. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, दैनिक सकाळ, लोकमत, तरूण भारत, मटा,जनवाद, लोकसत्ता, लोकशाही वार्ता, नावाजलेल्या विविध दिवाळी अंकासाठी लिखाण…
साहित्य पुरस्कार:- शब्दवर्षा, तेल्हारा, अकोला, कालिदास पुरस्कार, वर्धा, काव्य साधना , भुसावळ, उ.रा.गिरी. अमरावती असे लिखाणासाठी पुरस्कार
संपादन:- (१) इंद्रायणी काठी… कवितेसाठी.. त्रैमासिक (२) आशा दिवाळी अंक (३) अभियान वार्षिकांक
मनमंजुषेतून
☆ “सोन्याची पानं, बॅडमिंटन आणि खिचडी…” ☆ प्रा. भरत खैरकर☆
३० x ९ x६ =१६२० दिवस! निकेतनात घालविलेले हे दिवस.. तब्बल एक हजार सहाशे वीस जवळपास.. ह्यातल्या एका एका दिवसाविषयी लिहायचं म्हटलं तर एकूण एक दिवसच खूप खूप लिहीण्याजोगा.. प्रत्येक दिवस कधी मित्रांचा.. कधी शिक्षकांचा. कधी कर्मचाऱ्यांचा.. तर कधी एकूणच सर्वांचा. असा असायचा.
निकेतनात व्यक्तिशः असा अनुभव फार कमी यायचा.. त्यात ग्रुप सामील असायचाच.. निदान दोघे तिघे तरी असायचेच.. एकाटं दुकाटं उनाड पोर इथे मिळणं कठीणच..! जोडी जोडीने बऱ्याचश्या जोड्या होत्या. आठवण परस बागेतली असो.. हॉलमधली असो.. एनसीसी मधली असो… स्काऊट मधली असो किंवा वर्गामधली.. नाहीतर मेस मधली. असे एक ना अनेक दिवस आणि आठवणींनी निकेतन अंगात संचारतं त्यातलेच हे तीन दिवस…
बहुदा माझ्या सातवीतला तो दसरा असावा. विद्यानिकेतनात सर्व मुलांची दसरा मैदानावर कार्यक्रम बघायला जाण्याची गडबड चालली होती. मी मात्र कुठल्याशा आजाराने फणफणलो होतो. डोळ्यावर गुंगी होती. रूम बाहेर चाललेली मुलांची लगबग मला कळायची.. पण उठवेना आणि काही त्राणच माझ्या अंगात नव्हते. हळूहळू सर्व कोलाहल शांत झाला( की मला झोप लागली होती!) नक्की सांगता येत नाही! रात्री सात आठ वाजता चांगला दरदरून घाम फुटला.. जाग आली.. तेव्हा सर्व हॉस्टेल सामसूम झालं होतं. कर्मचारीही लवकर जेवण आटोपून बाहेर गेले असावे कारण दसरा असल्याने आपापल्या घरी नातेवाईकांसह सण साजरा करीत होते बहुदा..
मला खूप एकटं-एकटं वाटत होतं. घरची खूप आठवण येत होती. आपण आता घरी असायला पाहिजे होतं. ह्या विचारानं स्पुंदून स्पुंदून मी रडत होतो. ऐकायला कोणीच नव्हतं. किती वेळ रडलो माहिती नाही.. मग खूप खूप गाढ झोपलो. तर सकाळ झाली होती.. तेव्हा माझ्या अंथरुणावर चांगली अर्धा टोपली भरेल एवढी सोन्याची पानं म्हणजे आपट्याची पानं होती.. रात्री बहुदा एकटा एकटा असलेल्या मला माझे एवढे सवंगडी, एवढे नातेवाईक कधी भेटून गेले कळलंच नाही!! रात्री दसरा मैदानाहून परतल्यावर मित्रांनी, शिक्षकांनी, आठवणीने मी झोपलो असतानाच दिलेल्या शुभेच्छा.. नंतरच्या कितीतरी दसऱ्यांमध्ये मला मिळाल्या नाहीत. ती रात्र.. ती सोन्याची पानं.. अजूनही दर दसऱ्याला मला, बायकोला, मुलाला माझ्या होस्टेलची आठवण करून देतात..
असाच एक दिवस सकाळी सकाळी पिटी आटपून आलो.. तर नेहमीप्रमाणे नंदकिशोर आणि विकास मधल्या चौकात बॅडमिंटन खेळत होते. कां कुणास ठाऊक या खेळाचे एक अनामिक आकर्षण मला पूर्वीपासूनच आहे.
मला हे ठाऊक नव्हतं की ह्या दोघांनी आपापल्या पैशाने ती रॅकेट अन फुल( शटल कॉक) आणलेलं म्हणून! मला वाटायचं की स्पेशल ह्यांनाच कसं खेळायला देतात.. ?? वगैरे.
खूप दिवसाचा तो खेळ खेळायचा म्हणून मी चंग बांधला होता. पण दुसरा पार्टनर हवा ना! कारण आम्हांला दोघांचीही रॅकेट हिसकावून गेम खेळायचा होता. एकाची हिसकावून चालणार नाही कारण दुसरा मग खेळणारच नाही. आता काय करायचं? दुसरा एवढा ‘प्याशीनेट’ गडी शोधायचा कुठे? म्हटलं अजून नको वेळ घालवायला.. मधल्या चौकात जाऊन सरळ सरळ नंदकिशोर जवळून जवळपास मी रॅकेट हिसकावली.. तो लहान जीव.. लागला त्याच्या परीने विरोध करायला.. !! मी इकडे विकासला ” अरे, चल टाक सर्विस.. ” म्हणून एकदम रंगात आलो होतो.. शटल कॉक मागे नंदकिशोर इकडून तिकडे धावत होता.. मला गंमत वाटायची.. पण ही सगळी गंमत आमचे सर कुठून तरी बघत होते.. मला कळलं नाही ! मी आपला गुंग होतो. इतर सीनियर मुलही सरांच्या मागे मागे हळूहळू पुढे होणाऱ्या मनोरंजनाची वाट बघत होते.
सर दबक्या पावलांनी आले. त्यांनी माझी मानगुट पकडली आणि सपकन ‘व्हीसल कॉड ‘माझ्या पोट-यांवर उमटविला.!! आकाशात उडालेलं फुल आता ताऱ्यांमध्ये रूपांतरित झालं होतं! दुसरा ‘व्हीसल कॉड ‘ बसेस्तोवर.. प्रकरण काय आहे.. ते माझ्या ध्यानात आलं होतं. म्हटलं “नाही सर, नाही.. आता नाही करणार. “
“लहान मुलांना त्रास देतोस त्यांची वस्तू आणि त्यांनाच मारतोस.. ” वगैरे.. वगैरे.. पुढचं काही आठवत नाही.
पण बॅडमिंटनचे फुल आजही सकाळी बायकोसह बॅडमिंटन खेळताना निकेतनाची आठवण करून देत आणि सांगतं आपल्याच वस्तूवर हक्क सांगा.. दुसऱ्यांच्या नाही.. हवी असल्यास ती कष्टाने मिळवा.. ओरबाडू नका..
मोझरी… राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गाव… ह्या गावापासून साधारण तीन-चार किलोमीटर अंतरावर “दास टेकडी” आहे. त्या दासटेकडीच्या पायथ्याला दरवर्षी अमरावती जिल्हा स्काऊट गाईड आणि एनसीसीचे कॅम्प त्याकाळी भरायचे..
सन १९८६ ची घटना असावी.. आम्ही सर्व ‘ शिवाजी पथक ‘ नावाने स्काऊट गाईड कॅम्पला सरांच्या मार्गदर्शनाखाली मोझरीला गेलो होतो.. तिथे दास टेकडीच्या पायथ्याला आम्हांला दिलेल्या जागेवर एक चौकोनी आकाराची जागा स्वच्छ करून आम्ही आमचा तंबू उभारला होता.. तंबूभोवती कुठल्याही प्रकारचा सरपटणारा प्राणी येऊ नये, म्हणून खोल खड्डा करून घेतला होता..
दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या ग्रुप मधील आठपैकी सहा जणांसह सर कुठल्यातरी ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायला गेले होते. मी आणि सोहेल या दोघांकडे त्यादिवशी स्वयंपाकाची जबाबदारी होती. आम्ही दोघेही स्वयंपाकात तसे हुशारच(!).. मग करायचं काय? तर खिचडी करायचं ठरलं… तर पाणी एवढं टाकलं गेलं की खिचडी काही केल्या घट्ट होईना.. पाणी काही आटता आटेना!
आम्हांला ते जास्त पाणी बाहेर काढून टाकावं एवढं साधं ज्ञानही त्यावेळी नव्हतं! आता काय करायचं ? तोवर खिचडीचा चांगलाच ” घाटा ” तयार झाला होता.
थोड्यावेळाने इतर मित्र परतले.. भुकेलेले होते पटकन जेवायला द्या.. म्हणू लागले.. आमचे चेहरे पाहून सरांनी ओळखलं होतं “कुछ तो गडबड है ” त्यांनी चुलीवरचं भांड बघितलं.. त्यात भरपूर पाणी असलेला ” भात कम खिचडी कम घाटा ” त्यांना दिसला. त्यांचं डोकं चांगलं सटकलं.. सटकणारच.. कारण भुकाचं तेवढ्या लागल्या होत्या.. पण ते मारू शकत नव्हते.. कारण ” स्काऊट गाईड “होता ना! एनसीसी नव्हे!
पण शिक्षा तर द्यायलाच हवी. मग आम्हां दोघांनाच तो घाटा.. ती खिचडी.. दोन दिवस खाऊन संपवावी लागली.. तेव्हापासून मी स्वयंपाकात परिपक्व झालो.. स्पेशली “फोडणीचा भात ” मी अप्रतिम बनवितो! आणि खिचडीही तेव्हापासून माझी आवडती झाली ती आजतागायत.. !!
“ ए ये गं, शुक्रवारची सवाष्ण म्हणून जेवायला… किती दिवस झाले आपण रोजच बाहेर भेटतो… घरी कधीतरी तुला घरी बोलवायचे… हे ठरवलंच होतं…. या निमित्ताने येशील तरी…! “ तिचा आर्जवी सूर मोबाईल मधून उमटला.
माॅर्निग वाॅक ला न चुकता भेटणारी ती…! उन असो, थंडी पाऊस असो… तिची वेळ कधीच चुकत नाही… एका ठराविक ठिकाणी तिचे भेटणे ठरलेलेच असते. सडसडीत बांधा आखूड केसांचा वर बांधलेला पोनी… ट्रॅक सूट… निळसर बूट घालून, झपझप तिचं बाजूने पास होणे… ठरलेले असायचे.
एक नेटकं आणि स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व असणार ही म्हणजे… तिची अशीच इमेज माझ्या मनात दृढ होत गेली…. आम्ही एकमेकींना फक्त अंतरावरुन बघत होतो… रोजच्या भेटण्यातून कधीतरी एक स्मितहास्याची रेष दोघींच्याही चेहऱ्यावर… अशीच कधीतरी विसावून गेली. माझ्यासारखीच मध्यमवयीन… त्यामुळे अर्थातच… स्थिरावलेल्या संसारातील… थोडी निवांत गडबड… जशी मला असते… तशीच तिलाही असणारच…!
थांबून खास गप्पा मारण्याइतका परिचय नसला तरी.. अंतरीक आपलेपण दोघींनाही सारखंच जाणवत असणार… कधी चुकामुक झाली किंवा… कधी फिरण्याची दांडी पडली तर… आज तिची भेट झाली नाही… याची हुरहुर क्षणभर जाणवून जाई… तिलाही आणि मलाही.
मग आपोआप समोर येताच ‘कुठे दोन दिवस ? ‘चे प्रश्नचिन्ह एकमेकींचे डोळे वाचून जात… आणि न विचारताच कारणांचा पाढा वाचला जाई.
परवा मात्र मला थांबवून तिने मोबाईल नंबर घेतला… आणि मी तिचे जेवणाचे आमंत्रण ही सहजच स्विकारले.
आटोपशीर पण निवडक गोष्टींनी सजवलेला तिचा टू बीएचके… इरकलीचे पंचकोनी तोरण सागवानी दारावर उठून दिसत होते…. उंबऱ्याच्या दोन्ही बाजुला छोटीशी रेखीव शुभ्र रांगोळी… फक्त लालचुटुक कुंकवाच्या शिंपणाने पवित्र वाटून गेली. मोकळा… जुजबी फर्निचर मांडलेला हाॅल… समोरच्या काचेच्या काॅर्नर स्टॅण्डमध्ये… ठेवलेल्या ट्राॅफीज… तिच्या लवचिक… देह मनाची साक्ष देणाऱ्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचा छंदांची जणू पावतीच देत होत्या. ती बॅंकेत सर्व्हिस ला आहे ही जुजबी माहिती तिच्या बोलण्यातून मला समजली होती.
तिच्या दोन मुली आणि सासूबाई… हसत बाहेर येत, वातावरणात मोकळेपणा पसरवून गेल्या. पहिल्यांदाच तिच्याकडे गेल्यावर… तिच्याशिवाय कोणी ओळखीचे नाही… ही माझी थोडी uneasy भावना, त्या आजी नातींनीं सपशेल मोडीत काढली.
थोड्या गप्पा होईपर्यंत… तिने भाजी आमटी गरम करायला ठेवले. ती खासच सुगरण असणार… गरम होत असणारी भाजी आमटी जठराग्नी चेतवून गेली. नैवेद्याच्या ताटासाठी भाताची मूद करण्यासाठी कुकर उघडताच… आंबेमोहोर तांदळाचा वास दरवळून गेला… चांदीच्या ताटवाटीतला तो भरगच्च नैवेद्य तुळशीपत्राने परिपूर्ण होऊन गेला.
सवाष्णीसाठी चे ताट, वाटी तांब्या भांडे, पानं फुलांच्या सुबक रांगोळीत, टेबलावर सजलेले होते. मी मलाच शाबासकी दिली… आपण मनात तिची नेटकी जपलेली इमेज बरोबर आहे.
गरम पोळी करुन वाढण्यासाठी… तांदळाच्या पिठी पासुन… भिजलेली कणिक, पुरणाचे उंडे… तिची किचन ओट्यावरची आटोपशीर तयारी तिच्यातल्या गृहकर्तव्यदक्षतेची साक्ष होती जणू.. !
ती एक उत्तम सून.. उत्तम आई.. उत्तम पत्नी.. उत्तम मुलगी… असणार, हे तिच्या एकंदर वावरातून लक्षात येऊनच गेले होते.
तिची मुलींना सासूबाईंना सोबत घेऊन जिवतीची आरती औक्षण करण्याची लगबग… सारे घर भारल्यासारखे झाले. औक्षणाचे तबक खाली ठेवताना… माझे लक्ष देवघराजवळच लावलेल्या उमद्या चेहऱ्याच्या दोन तसबिरी कडे गेले. तसबिरीस लावलेले गंधटिळे खुप काही बोलून गेले… !
माझी तसबिरीत अडकलेली नजर तिच्या चाणाक्ष नजरेने लगेचच पकडली. माझे धाकटे दिर आणि माझे मिस्टर… तिची फोटोतल्या कुटुंब प्रमुखांची ही अनपेक्षित ओळख… मी क्षणभर सुन्नच होऊन गेले… !
आठ एक वर्षांपूर्वी एका अपघातात दोघेही on the spot गेले, ही माझ्या धाकट्या दिराची मुलगी… आणि ही माझी… !
अवयव दानाचा फाॅर्म केवळ आठ दिवस आधीच दोघा भावांनी भरला होता. तो सर्वांगाने नाही पण काही अंगांनी… अन् कित्येक अर्थाने माझ्यासाठी अजुनही इथे अस्तित्वात आहे… !
या समाजात, कुणाचे डोळे… कुणाची किडनी, कुणाची स्किन होऊन वावरत आहे.
तिच्या कपाळावरची लालचुटुक टिकली आणि गळ्यात पदराआड विसावलेले छोटेसे मंगळसूत्र… क्षणमात्र लखलखीत झाल्याचा भास मला होऊन गेला.
चार वर्षापूर्वी धाकट्या जावेला नव्याने तिचा पार्टनर मिळून गेला. हिला मात्र मी माझ्या जवळच ठेवून घेतले… माझी दुसरी मुलगीच ही पण… तिने तिच्या पुतणीला जवळ ओढले.
तिचे डोळे क्षणभर गढुळल्यासारखे झाले… आणि पुन्हा घरातल्या पवित्र वातावरणात मिसळून नितळ झाले…. !
चला आता जेवायला बसा… मी गरम गरम पोळी करते… तुमचा वरणभात संपेपर्यंत… !
तिच्यातल्या गृहिणींची लगबग सुरु झाली.
… ती ओटी भरताना… तिचे दोन्ही हात माझ्या ओंजळीत भरून घेत मी तिला जवळ ओढलं… हां तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैने सोचता था… !
प्रत्येक नात्यात तू उत्तमच आहेस… पण एक माणुस म्हणुन… तुझ्यातली स्त्री अत्यंत संवेदनशील, कर्तव्य तत्पर आहे. तुझ्या देहबोलीतूनच तुझी इमेज माझ्या मनात चढत्या आलेखात निर्माण झाली होती, त्याच्या कैकपटीने… तू प्रगल्भ आहेस. सन्मानित होणं आणि सन्मानित करणं.. तुझ्याकडून शिकावं, सलामच तुला!
ती प्रसन्न हसली… सकाळच्या माॅर्निग वाॅक मध्ये हसते तशी… एकदम ओळखीची… जवळची!
मुठीतून निसटलेल्या वाळूची खंत करत बसण्यापेक्षा मुठीत शिल्लक उरलेल्या वाळुस कसा न्याय द्यायचा… हे ज्यास समजते… तिथे शांती आणि समाधान हात जोडून उभे राहते… इतकंच खरं!!!
☆
लेखिका : सौ. विदुला जोगळेकर
प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈