मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मित्र नावाचा नातलग… – डॉ.महेंद्र वंटे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ मित्र नावाचा नातलग… – डॉ.महेंद्र वंटे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

…. ना जवळचा ना लांबचा… पण  हाकेच्या अंतरावरचा..

१९६५ चा जून महिना …चार साडेचार वर्षांची बालकं.. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो…. कुणी हमसून हमसून, तर कुणी भोकाड पसरून.. पण सगळेच रडके…. या समूहरुदनाकडे मख्खपणे पाहणाऱ्या जोशीबाई..  प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती.. एक दोन दिवस रडण्यात गेले…  मग चेहऱ्यावर निर्विकार भाव.. मग हासरी आपुलकी… दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली…. अंकुरली….. पालवली.. फुलली… आणि फुलतच राहिली…. भावनिक मुळं एकमेकात जी अडकली, तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा… ब.. बदकाचा.. पेक्षा… म… मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली… कुणी चालत, तर कुणी बापाच्या  सायकलवर, तर एखादा फटफटीवर… कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा, पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील…… सवर्ण, अवर्ण, गौरवर्ण, कृष्णवर्ण, गरीब, श्रीमंत……  सामाजिक भेदाभेदीची ही सगळी ओझी घराच्या उंबरठ्यावर सोडून मित्राला भेटण्यासाठी धावणारी.. पाठीवर ओझं फक्त दप्तराचं.. कुणाच्या फडक्यात चटणी भाकरी, तर कुणाच्या टिफीनमधे तूप साखर पोळी……. मधल्या सुट्टीत वाटून खाताना… ना जात ना पात….. ना भेद ना भाव…….

मित्रांशी खेळणं आणि सोबत खाणं याच सुखाच्या  परमोच्च कल्पना… बेभान होऊन केलेली पळापळ.. पडणं, धडपडणं, खरचटणं… उचलणं, जखमेवर फुंकरणं, आयोडीन लावणं.. पुन्हा फुंकरणं..

सहवासातून सुखवासाची अनुभूती देणारा सत्संग..

याच सुखाच्या निरागस समागमातून जन्माला आलेला मित्र नावाचा नातलग… ना जवळचा ना लांबचा… पण  हाकेच्या अंतरावरचा…

एके काळचा अनोळखी, पण आता जिवलग,

ना जातीचा, ना पातीचा,

ना रक्ताचा, ना वंशावळीचा,

मीही तोच, तोच तूही.

‘मी’पणाच नाही कुठे..

वयं वाढली.. बुद्धी वाढली..  तशी इयत्ताही वाढत गेली….बालवाडीची झाली शाळा… शाळेचं झालं विद्यालय.. तिचं झालं महाविद्यालय..  मित्र नावाच्या नातेवाईकांत नवी भर पडली… मिशी आली.. दाढी वाढली…. खांद्याखांद्यावर जबाबदारी वाढली…

रोटी कपडा और मकान… काळानुरुप गरजा बदलल्या….. बदलल्या सुखाच्या कल्पना.. त्याच्या शोधासाठी पायाला भिंगरी….  झाल्या दिशा वेगवेगळ्या… झाल्या वेगवेगळ्या वाटा…… काही स्वत:च्या… काही वहिवाटा …..

पण वाटेच्या प्रत्येक वळणावर मागे वळत एकमेकांना अडीअडचणीला “मैं हूं ना” चा आशावाद देत संसाराची सप्तपदी चालणारे मित्र…

पोटाची भूक ज्यांनी कधीकाळी वाटून खाऊन भागवली, ते आता  झाले एकमेकांच्या भावनिक भुकेचे वाटेकरी ..

हक्काने बोलवता येईल असा सुखदुःखातील सहकारी…

लग्नं, बारसं, बर्थडे, पूजा…. दहन, दफन, दहावा, तेरावा…

कुणी कारने, कुणी दुचाकीने, तर कुणी बसने… पण येणार हमखास.. नातलगांपेक्षा आधी पोहचणारा तोच मित्र नावाचा नातलग…. ना लांबचा, ना दूरचा…  हाकेच्या अंतरावरचा… 

गेल्या ५० वर्षांत कितीतरी वेळा आला गेला….  दु:खात आणि सुखात.. कधीतरी सहज…. वाटलं भेटाव़ं म्हणून आलेला.. वयाने साठी गाठली तरी चवीपुरतं बालपण अजूनही  गाठीला जपलेला..

कष्टाने मिळवलेली सुबत्ता आणि दैवाने दिलेली सुखदुःखं भोगलेली पिढी .. 

काहींनी मोजता येणार नाही इतकं मिळवलं, तर कुणी सहन होणार नाही इतकं गमावलं…  कुणाची सुखं मुठीत सामावलेली.. तर कुणाची मिळकत बॅंकेच्या पासबुकात मावलेली…

पंखात बळ भरलेल्या पाखरांनी आपापलं आभाळ शोधलं…  कुणी लोकल, तर कुणी ग्लोबल झालं.

कोणी आजोबा केलं, तर कोणी ग्रॅंडपा… मोबाईलच्या पडद्यावर नातवाने दिला पा…

पोटाचा घेर सुटला.. गुढघ्यांचा भार वाढला… केसाने रंग सोडला…. डोक्याने केस सोडले..

बीपी, शुगर, संधिवात…. सकाळ दुपार संध्याकाळ…. .

जेवणाच्या जागी औषधं आली..

तरीही..

मित्रांचा कुंज तोच….. तीच मैत्रमोहिनी

माझ्या ६१ व्या वाढदिवशी एका हाकेला जमला.. कुणी कारने, कुणी दुचाकीने, तर कुणी चालत.. पद, प्रतिष्ठा अन् सुबत्तेपायी साठलेलं ‘मी’पणाचं ओझं  उंबरठ्यावर सोडून….. 

तोच उत्साह, तीच निरागसता…… .बालसवंगडी ते शाळकरी.. वर्गात पहिल्या दिवशी एकाच सुरात रडलेले ते तमाम सुदामा… सवंगड्याच्या अनेक सुखात हसलेला आणि प्रत्येक दुखा:त पाणावलेला सुदामा…  

तांबेकर, घारे, नारंग, झानपूरे, सोमण…. घाटणेकर, सानप, चव्हाण, आठवले…… 

किती नावं, किती आडनावं…  ना जात, ना पात….. ना भेद, ना भाव..

आता ना फडक्यातील भाकरी उरली, ना डब्यातील तूप साखर पोळी… उरले आहेत जग नावाच्या बंदीशाळेतील शेवटचे काही तास आणि प्रत्येक सुदाम्याने जपलेले पोहे खास……

शाळा संपल्याची घंटा वाजण्याआधी आनंदाने वाटून खा….. ते उरलेसुरले चविष्ट घास….. मित्र नावाच्या नातलगाचे…..

ना जातीचा ना पातीचा

ना रक्ताचा ना वंशावळीचा

ना जवळचा ना लांबचा… पण  हाकेच्या अंतरावरचा… 

लेखन…डॉ.महेंद्र वंटे

मो 9673817700

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विंडो सीट… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

विंडो सीट… ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

परवा फेसबुकवर एक लेख वाचण्यात आला. त्यामध्ये लेखकानं विमानातील ‘विंडो सीट’ बद्दल लिहिलं होतं.. जमिनीवरील प्रवासात ‘विंडो सीट’ मिळाली तर आपल्याला दिसणारी दृष्य मोठी व आपण लहान वाटतो.. आणि विमानातील ‘विंडो सीट’ मधून उंचावरुन दिसणारं, जग लहान व आपणच मोठ्ठे वाटतो… 

लहानापासून तो मोठ्यांपर्यंत ‘विंडो सीट’ कुणाला नकोशी वाटेल? सर्वांनाच ती हवीहवीशी वाटते.. कारण प्रवासात आपण बाहेरचा निसर्ग पाहू शकतो.. छान हवेची झुळूक अनुभवता येते. पाऊस पडत असेल तर खिडकीतून काही थेंबांचा अंगावर शिडकावा होतो.. थंडी असेल तर उन्हाचा शेक घेता येतो.. हिवाळ्यात काचा लावून उब मिळविण्याचा प्रयत्न केला जातो..

लहानपणी पुण्याहून सातारला जाताना, शिरवळ आलं की निम्मा  प्रवास पूर्ण झाल्याचं समजलं जायचं. मग एसटीच्या खिडकीजवळून काकडी, उसाचा रस, वडापाववाले, गोळ्या बिस्कीटवाले येरझाऱ्या घालायचे. उन्हाळ्यात ठंडा पाणी, कोल्ड्रींकवाले गिऱ्हाईक शोधायचे. त्यात एखाद्यानं वस्तू घेऊन पैसे देईपर्यंत गाडी सुरु झाली तर त्यांची पळापळ व्हायची.. खाली जर चहाला जायचं असेल तर आपल्या ‘विंडो सीट’वर रुमाल ठेवला जाई..

बसमधली ‘विंडो सीट’ मिळण्यासाठी, बुकींग करणाऱ्याला विनंती करावी लागते. दोन सीटच्या बाकड्यावर विंडो सीट मिळाल्यावर आधीच खिडकीशी बसलेल्या प्रवाशाला आपला सीट नंबर दाखवून उठवावे लागते.. तो नाराजीनेच उठतो व आपल्याला बसू देतो. तिथे जर स्त्री बसलेली असेल तर स्त्री दाक्षिण्य म्हणून, आपण विंडो सीटचा आग्रह सोडून देतो.. 

मला स्वतःला ड्रायव्हरच्या मागची ‘विंडो सीट’ आवडते. एकतर आपल्यासमोर कोणीही नसतं. शेजारी कुणीही येऊन बसलं तरी खिडकीतून बाहेरचं जग बघत बघत, प्रवास छान होतो.. रात्रीचा प्रवास असेल तर मस्त झोप काढता येते. 

मी माझ्या तरुणपणात अनेकदा ट्रकने प्रवास केलेला आहे. अशा प्रवासात त्या केबिनमधील मिळेल ती जागा स्वीकारावी लागते. कधी ड्रायव्हरच्या मागे तर कधी क्लिनरजवळ.. तर कधी गरम चटके देणाऱ्या, इंजिनच्या झाकणावर. 

एकेकाळी मुंबईला जाताना एशियाडने खूप वेळा, मी प्रवास केलेला आहे. या गाड्या सकाळी आठ वाजता पुणे स्टेशनवरून निघायच्या व दुपारी दादरला पोहोचायच्या. वाटेत लोणावळ्याला अर्धा तास गाडी थांबत असे. तेवढ्या वेळेत एशियाडच्या कॅन्टीनमधून ‘अप्पू’ची कुपनं घेऊन, काहीतरी पोटात ढकललं जात असे.. या प्रवासात मात्र मी पुढे मागे कुठेही असलो तरी ‘विंडो सीट’च पकडत असे..

रेल्वे प्रवासात विंडो सीट भाग्यवंतालाच मिळते. लोकलमधला प्रवास हा कमी वेळाचा असल्याने, अनेकदा उभं राहूनच केलेला आहे. लोकलमध्ये चढणं व हव्या त्या बाजूला उतरणं हे मला कधीच जमलेलं नाही.. अशावेळी आपण फक्त उभं रहायचं.. आत जाणं व बाहेर पडण्याचं काम हे आपल्याला ढकलणारे स्वतःहून आनंदाने व इमानेइतबारे पार पाडतात..

रेल्वेच्या मोठ्या प्रवासासाठी, विंडो सीट मिळायलाच हवी. ती नसेल तर प्रवास नीरस होतो.. दिल्लीच्या प्रवासात मला ‘विंडो सीट’ मिळूनही, मधल्या स्टेशनवरील गर्दी करणारे प्रवासी छोट्या प्रवासासाठी आपल्या मांडीवर बसायलाही कचरत नाहीत.. 

आता प्रवासाचे दिवस संपलेले आहेत.. कधी प्रवास केला तर तो खाजगी गाडीने होतो.. तेव्हाही खिडकीतून बाहेर पहाताना पळणारी झाडं, विजेच्या खांबावरील वरखाली होणाऱ्या तारा, एखाद्या पुलावरुन जाताना दिसणारे नदीचे विशाल पात्र, घाटातून गाडी वळताना आपले शरीर शेजारच्या व्यक्तीवर रेलणे हे अनुभवून जुन्या आठवणींना नकळत उजाळा मिळतो व मी गालातल्या गालात हसतो…

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावण…. ले . – कविता ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆  श्रावण…. ले . – कविता ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर .. ‘ दिव्याची आवस ‘ म्हणून जाड कणिक आणि केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप… म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल !!

डबाभर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पूड, उपासाची भाजणी, राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर !!

जिवतीचा फोटो, कहाण्यांचे पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र , दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा- आघाडा- फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन !!

श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध !!

श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण, म्हणून आई वहिनीकडे झालेलं सवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर.. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण !!

श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार.. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं, धूप- अगरबत्ती- दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण- जाई- जुई- तगर- जास्वंद- बेल- दुर्वा- पत्री- तुळस- यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण !!

श्रावण म्हणजे हिरवा ऋतू  .. या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसात जुईचा गजरा, पायीच्या जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण.. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा  श्रावण !!

श्रावण म्हणजे आठवणींची सर.. श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध..  तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल… श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण..  तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण.. श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिने आग्रहानं खाऊ घातलेली पुरणाची मऊसूत पोळी.. श्रावण म्हणजे देव्हाऱ्यात समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप….  

श्रावण म्हणजे आई तुझ्या आठवणींचा पाऊस !!!

ले . – कविता

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेडिओ सिलोन…भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ रेडिओ सिलोन…भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(History: The history of Radio Ceylon dates back to 1925, when its first precursor, Colombo Radio, was launched on 16 December 1925 using a mediumwave radio transmitter of one kilowatt of output power from Welikada, Colombo. Commenced just 3 years after the launch of BBC, Colombo radio was the first radio station in Asia and the second oldest radio station in the world.)  

Source: Radio Ceylon – Wikiwand

या रेडिओचा इतिहासही मोठा गमतीदार आहे. सिलोन म्हणजे आजचे श्रीलंका.  भारताच्या दक्षिणेला असलेल्या या  देशातही इंग्रजांची सत्ता होती. द्वितीय महायुद्धा्त हिंदमहासागरात नौदलाला संदेशवहनात  मदत व्हावी म्हणून ब्रिटिश शासनाने दि. १६ डिसेंबर १९२५ ला कोलंबो येथे सिलोन रेडिओची स्थापना केली . पुढे संन १९४९ ला सिलोनला स्वातंत्र्य मिळाले व सिलोन सरकारला या  रेडिओचे हस्तांतरण झाले. पुढचा १९७५ पर्यंतचा काळ या रेडिओने अक्षरशः गाजवला. एकूण बारा भाषेत या रेडिओचे प्रसारण व्हायचे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान,अफगाणिस्तान, बांगला देश ,नेपाल, व जवळपास सर्व दक्षिण आशियाई देशात सिलोन रेडिओची फ्रिक्वेंसी पोहोचत होती. मनोहर महाजन, अमीन सयानी, गोपाळ शर्मा,  के .एस. राजा, माई लोईलगम्म ही रेडिओ उदघोषकांची नावे लोकांना परिचित झाली होती. सन १९७२ ला सिलोन रेडिओचे नाव बदलून श्रीलंका झाले व   ‘ये श्रीलंका ब्राडकास्टींग कारपोरेशन का विदेश विभाग है” हे वाक्य प्रसारित होऊ लागले. या रेडिओच्या लोकप्रियतेचा कळस म्हणजे, “बिनाका गीतमाला” हा कार्यक्रम होय. बिनाका ही टूथपेस्ट निर्माण करणारी कंपनी होती. नवीन चित्रपटाच्या गीतांच्या रेकॉर्ड (तबकड्या) एच. एम . व्ही. सारख्या कंपन्या निर्माण करायच्या. कोणत्या नवीन चित्रपटांच्या किती रेकॉर्ड विकल्या गेल्या यावरून त्या गीतांची लोकप्रियता ठरविली जायची. व अश्या १३ गीतांची निवड करून हा कार्यक्रम प्रसारित व्हायचा.सर्वात लोकप्रिय गीत सर्वात शेवटी लावले जायचे. दर बुधवारला रात्री नऊ वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण व्हायचे. उदघोषक अमिन सयानी हे या कार्यक्रमाचे आत्मा होते. त्यांची बोलण्याची व सादरीकरणाची पद्धती एवढी लोकप्रिय की पुढे अनेक ऑर्केस्ट्रा उदघोषक त्यांचीच पद्धत वापरायचे. या कार्यक्रमामुळे हिंदी सिनेमाला आपल्या गीतांची लोकप्रियता वाढविण्यात व सोबत प्रेक्षकही वाढविण्यास खूप मदत झाली. पुढे या कार्यक्रमाचे नाव बदलून सिबाका गीतमाला झाले, पण  हा कार्यक्रम पुढे बंद झाला. अनेक चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या रेडिओचा उपयोग करीत असत. चित्रपटाचे पंधरा मिनिटांचे रेडिओ प्रोग्राम प्रसारित व्हायचे.  त्यात गीतांचे अंश, चित्रपटाचे संवाद आणि कथानकाचा काही भाग यांचा उपयोग करून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास प्रोत्साहित केले जात असे.

असा हा सिलोन रेडिओ सन १९७५ नंतर लोकप्रियतेच्या ओहोटीस लागला. विविध भारतीची स्थापना, त्याची स्पष्ट प्रसारण सेवा, श्रीलंका रेडिओची  ढासळलेली आर्थिक स्थिती, टेप रेकॉर्डरची उपलब्धता, दूरचित्रवाणी या सर्व कारणांमुळे  रेडिओ श्रीलंका मागे पडली. आज ती केवळ यू ट्यूब पुरती मर्यादित झाली आहे. पण आज साठी सत्तरीच्या वयात असलेली मंडळी रेडिओ सिलोनला कधीही विसरू शकत नाहीत हे तेवढेच सत्य आहे.

समाप्त — 

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेडिओ सिलोन…भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ रेडिओ सिलोन…भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(History: The history of Radio Ceylon dates back to 1925, when its first precursor, Colombo Radio, was launched on 16 December 1925 using a mediumwave radio transmitter of one kilowatt of output power from Welikada, Colombo. Commenced just 3 years after the launch of BBC, Colombo radio was the first radio station in Asia and the second oldest radio station in the world.)  

Source: Radio Ceylon – Wikiwand

आमच्या बालपणीचे दिवस म्हणजे १९६५ ते १९७५ चा कालखंड, आजच्या पेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळा. मनोरंजन ही त्याकाळी चैनीची बाब समजली जायची. चित्रपट, नाटके ही साधने उपलब्ध असली तरी त्यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी सर्वांचीच नसायची. मग मनोरंजनाचे सहज उपलब्ध साधन म्हणजे काय तर रेडिओ. परिसरात बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या घरात रेडिओ असायचे आणि शेजारच्या चार घरापर्यंत आवाज जाईल येवढ्या मोठ्या आवाजात त्यावरिल कार्यक्रम ऐकले जायचे. आमच्या सारख्यांना त्यातूनच रेडिओचा परिचय झाला. रेडिओ  म्हणजे “रेडिओ सिलोन” अशी आमची धारणा होती कारण या व्यतिरिक्त कुणीही रेडिओ वर दुसरे स्टेशन लावत नसे. उपहारगृहात ही रेडीओवर सिलोन हेच स्टेशन सुरू असायचे. “ये सिलोन ब्राडकास्टींग कारपोरेशन का व्यापार विभाग हैं”. हे वाक्य आम्हाला पाठ झाले होते.

अनेकांची सकाळच रेडिओ च्या संगीताने व्हायची. समाचार, भक्तिगीते ऐकत आपआपली कामे लोक करायचे, रेडिओ ऐकण्यामुळे कुणाच्या कामात अडचण येत नसे, सकाळचा ज्येष्ट नागरिकां चा आवडीचा कार्यक्रम म्हणजे ” पुराने फिल्मो का संगीत”. आम्हाला सहगल, तलत मेहमूद, हेमंत कुमार, प्रदीप, सुरैया, शमशाद बेगम,  नूरजहाँ. या गायकांचा परिचय याच कार्यक्रमामुळे झाला. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेस “खुश है जमाना आज पहली तारीख है” हे गीत हमखास लावले जायचे.  रेडिओ सिलोन च्या लोकप्रियतेचे गमक होते चित्रपट गीते, कारण आल इंडिया रेडिओ वर चित्रपट गीतांचे प्रसारण होत नव्हते, चित्रपट गीतांना विरोध करणारी याचिका सन १९५२ ला कलकत्ता येथील प्रो. चक्रवर्ती यांनी न्यायालयात केली  होती त्यामुळे आल इंडिया रेडीओवर सिनेगितांचे प्रसारण होत नव्हते. त्यामुळे रेडिओ सिलोन ची लोकप्रियता वाढली.

त्यावेळी सकाळच्या प्रसारणात सर्वात लोकप्रिय कार्यक्रम असायचा “आप ही के गीत” नवीन चित्रपटांच्या गीतांचा हा कार्यक्रम असायचा, महत्वाचे म्हणजे श्रोत्यांच्या फर्माइश वर गीतांची निवड केली जायची आणि गाण्याच्या प्रसारणा आधी पसंती कळविणाऱ्यांची नावे घेतली जायची. आपले नाव रेडीओवर यावे म्हणून लोक पोस्टकार्ड पाठवायचे. अनेकांना ही सवयच लागली होती. अनेक गावात तर त्यासाठी श्रोता संघ स्थापन झाले होते. भाटापारा, झुमारितलय्या या गावांची नावे त्यावेळी खूप प्रसिद्ध होती या गावातील लोकांची नावे अनेकदा यायची. नवीन चित्रपट येण्यापूर्वीच या कार्यक्रमामुळे गीते लोकप्रिय व्हायची व गीतांमुळे चित्रपट पाहिले जायचे. सिलोन रेडिओ  हे व्यापारी तत्त्वावरआधारलेले स्टेशन असल्यामुळे त्यावर अनेकवस्तुंच्या जाहिरातींचे प्रसारणही व्हायचे, काही जाहिराती आजही आठवतात. सॉरीडॉन, बोर्नव्हीटा, एसप्रो, व्हिक्स, टिनोपाल, यातही ‘तन्दुरूस्ती की रक्षा करता है लाइफबॉय… लाइफबॉय है जहां तन्दुरूस्ती है वहां… लाइफबॉय… ही जाहिरात मला आजही पाठ आहे.

क्रमशः…

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंदाचे भागीदार ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आनंदाचे भागीदार ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ज्यांना वयोमानामुळे किंवा इतर कोणत्या परिस्थितीमुळे अजिबात ऐकू येत नाही, अशा लोकांचं रस्त्यावर जगणं मुश्कील झालंय….

ऐकू न आल्यामुळे, कोणतंही काम करण्यास त्यांना अडथळा येतोच…. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, रस्ता ओलांडताना किंवा चालताना गाडीचे आवाज न ऐकू आल्यामुळे एक्सीडेंट होऊन मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे प्रमाण वाढत आहे…

आणि याचमुळे मागील तीन महिन्यांपासून माझ्या भीक मागणाऱ्या वृद्ध माता पित्यांच्या कानाची तपासणी सुरू करून, त्यांना श्रवण यंत्रे देण्यास सुरुवात केली आहे.  

मशीन मिळाल्यानंतर, कानात मशीन घालून ही मंडळी कानावर आडोशासारखा हात धरून…. अगदी मन लावून…. नजर एका जागी स्थिर करून…..रस्त्यावरील गाड्यांचा आवाज ऐकतात….हॉर्न ऐकतात… रस्त्यावर चाललेला गोंगाट ऐकतात….! 

एरव्ही खरंतर अशा गोष्टी आपण ऐकायचं टाळतो….. पण “ते” मात्र जीव लावून या गोष्टी ऐकत असतात…. ! 

मी गंमतीने त्यांना या बद्दल विचारतो, तेव्हा ते म्हणतात,  “ काय करणार डॉक्टर?  पूर्वी  जेव्हा ऐकायला येत होतं तेव्हा जवळची माणसं सोबत असून सुद्धा बोलत नव्हती…. आज पुन्हा ऐकायला यायला लागलंय…. पण आज ती जवळची माणसं सुद्धा नाहीत आणि त्यांचा आवाज सुद्धा ….. मग काय करणार ? आम्ही बसतो गाड्यांचे आवाज ऐकत, आपल्याला ऐकू येतं याचा आनंद घेत….! “ 

हे ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचं कारुण्य रेखाटायला माझ्याकडे शब्द नाहीत…..! 

आपल्या माणसांचा आवाज शोधणारी…. निर्जीव गाड्यांच्या हॉर्नशी संवाद साधू पाहणारी…. ही पिढी हळूहळू डोळ्यादेखत नष्ट होईल…. ! 

आपल्या वृद्ध आई-वडील, आजी आजोबा यांना न सांभाळणारी ही मंडळी आपल्याला कुठे घेऊन जाणार आहेत माहित नाही…! 

मी लहानपणी पुस्तकात वाचलं होतं– “आपण आज जी माणसं पाहतो, ती फार फार पूर्वी माकडं होती…” 

मला भीती वाटते …. इथून पुढच्या काही वर्षानंतर लहान मुलांच्या पुस्तकात धडा असेल— “आपण आज जी “माकडं” पाहतो आहोत… ती फार फार पूर्वी “माणसं” होती ! “

अशी वेळ येण्याअगोदर आपल्या जुन्या खोडांना आपणच जपलं पाहिजे…. ! 

कानाची मशीन ही एक अत्यंत “महाग” गोष्ट आहे… 

परंतु ऐकू यायला लागल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान हे त्याहीपेक्षा जास्त “मौल्यवान” वाटतं मला ….!

“महाग” आणि “मौल्यवान” यातला फरक एकदा समजला की खर्च झाल्याचं दुःख होत नाही…. !!!

कळत-नकळतपणे आपणही सर्व जण त्यांच्या या चेहऱ्यावरील ” आनंदाचे भागीदार ” आहात, म्हणून आपणास कळविण्याचा हा खटाटोप !!!

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ समजून घ्या – एक वीज कर्मचारी ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ समजून घ्या – एक वीज कर्मचारी ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

“पाऊस पडला,लाईट गेला !” या विधानाला अर्थ नाही. पाणी आणि वीज यांचा ३६ चा आकडा असतो. नैसर्गिक गोष्टी त्याला अपथ्याच्या असतात. आठ महिने तापलेले इन्सुलेटर्स अचानक पडलेल्या पाण्याने फुटतात. त्याची देखभाल आधी करता येत नाही. हेअर लिकेज डोळ्यांना दिसत नाही. मोठं नुकसान टाळण्यासाठी सुरूवातीच्या काळात मुद्दाम बंद ठेवतात. दिवसेंदिवस बंद ठेवण्यापेक्षा योग्य वेळी बंद ठेवणं योग्य नाही का? जरा समजून घ्या.

सबस्टेशन अक्षरशः विद्युतदाहिनी असते. तिथे जिवंत माणसं काम करत असतात. गमबूट, हँडग्लोव्हज् पावसात सुरक्षेचं काम पाहिजे त्या क्षमतेनं करत नाहीत . ते बिचारे रॉकेल आणि मशाल यांच्यामधे काम करत असतात. सबस्टेशनमधे धुक्याच्या दिवसातली अग्नीवलयं पहा. दिसतात सुंदर, असतात मात्र क्रूर. अनवधानानं, ग्राहकांसाठी घाईत झालेली चूक फक्त मरण देते हे लक्षात घ्या. समजून घ्या.

परमिट मागे दिल्यावर चुकून चालू करताना फिडर बदलला की, लाईनवरचा खाली पडण्याआधी वर जातो. ब्रेकर, आयसोलेटर, फीडर, सीटी, पीटी, डीपी, कंट्रोल केबिन्समधे काम करणं म्हणजे जराशी चूक नि यमाची भूक! हे समजून घ्या.

पावसात सुरुवातीला, शेवटी विजा असतात. पोल विद्युतवाहक असतो आणि लाईनमन त्यावर काम करत असतो. म्हणजे तो चक्क सरणात काम करत असतो. ग्लोव्हज् घालून ग्रीप मिळत नाही, नि काढले तर सुरक्षा मिळत नाही. अशावेळी लाईनमन सुरक्षा बाजूला ठेवताना मी बघितलंय. एबीस्विच काम करत नाही. मग सबस्टेशनला विनंती करावी लागते. ती विनंती मान्य करणं यंत्रचालकाला अडचणीत आणतं. त्यालाही आई, मुलं, बायको, उकाडा, थंडी, भिजणं असतंच. एक क्षण वैधव्य देतो, निपुत्रिक करतो, अनाथ करतो. समजून घ्या.

लाखो प्रकारची, जंगलीपेक्षा बागायती झाडं हीच वीज जायला जास्त कारणीभूत. ती तोडूही द्यायची नाही, तार जोडूही द्यायची नाही, नि वीज हवी, हे कसं चालेल? वीज जाण्याचं जास्त वेळचं कारण अर्थफॉल्ट म्हणजे झाडं आहेत. समजून घ्या.

मूर्ख राजकारण्यांच्या नादी लागून आपण बिलं भरत नाही. मग इंशुलेटर, वायर, नटबोल्ट, फ्यूजखरेदी अशक्य होतं. स्पेअर्सचा तुटवडा– तरी वीजेचा बटवडा करणारा लाईनमन –  समजून घ्या.

उन्हाळ्यात मेंटेनन्स करावा, तर आपलाच पंखा, एसी, फ्रीज, टी.व्ही, वॉशिंग मशीन, पंप त्याला परवानगी देत नाही. वीजप्रवाह चालू ठेवून मेंटेनन्स करता येत नाही. आयपीएलची एक ओव्हर बघू शकत नाही, तेव्हा आपण पंख्याखाली आरामखुर्चीत चिडचिड करतो. तेव्हा लाईनमन आणि सबस्टेशनचे ऑपरेटर्स जिवावर उदार असतात– तुम्हाला नंतर पूर्ण सामना दिसावा म्हणून. समजून घ्या.

उन्हाळा सहन होत नाही याचं कारण वीज कर्मचारी असतात का? याचा विचार करा. एखाद्याच्या मरणाबाबत आपण इतके असंवेदनशील का?

फक्त समजून घेऊया. चिडचिड होण्याआधी थांबेल आणि केलेली शिवीगाळ आणि नाराजी करुणाष्टक होईल.

वीज नसताना हे टाईप करतोय, कारण मी समजून घेतलंय. मला भिजत चाललेली कामं महाभारतातल्या संजयासारखी दिसतात. घरात बसून….

–एक वीज कर्मचारी

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विपरीत घडेल..! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ विपरीत घडेल..!  ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

तिच्या मनात दाटलेले काळे ढग 

कुणाला दिसतील का ? 

तिने पापण्यांपर्यंत अडविलेला पाऊस

कुणाला जाणवेल का ?

वादळातही मन सावरुन

इतरांसाठी झटणारी ती

कधी कुणाला उमगेल का ?

आशा, आकांक्षा जपण्यासाठी तिला

वेळीच साथ मिळेल का ? 

का तिने सोडून द्यावे त्याग, समर्पण सारे ?

मुक्त वावरावे अनिर्बंध

स्वतःला शोधण्यासाठी ?

ती म्हणते कधीकधी तळमळून

“नकोच बाईपण, ओझ्याने थकलेले आईपण

माणूसपणाच्या सागरात

डुंबू दे ना मलाही..!”

वेळीच आवरा, माणूस म्हणून सावरा

नाहीतर विपरीत घडेल !

 आई, आईपण गोठून जाईल !

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंदिरा : तीन ऋणे – सुश्री विनिता तेलंग ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ इंदिरा : तीन ऋणे – सुश्री विनिता तेलंग ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

‘आपल्या अंधाऱ्या प्रवासात प्रकाशाचे झोत फेकणाऱ्या ‘ तीन जणांच्या ज्या ऋणांविषयी इंदिराबाईंनी लिहिलं आहे, ते सारं खरं तर कोणत्याही उमलू पहाणाऱ्या कलाकारासाठी फार मोलाचे आहे..

इंदिराबाई लिहितात —-

कवी माधव जूलियन त्यांना शिकवायला होते. ते एकदा, ‘ तुम्ही कविता लिहिता असं समजलं, तर येतो एकदा पहायला ‘ असं म्हणून एक दिवस खरंच घरी आले. जाताना माझ्या मनाविरुध्द आईने त्यांना कवितांची वही दिली..

आता इथे काय अभिप्राय येतो म्हणून प्राण कंठाशी आलेले !आठ दिवसांनी सरांनी वही आणून दिली आणि सांगितले….. “ शब्दसंग्रह वाढवा.. त्यासाठी  ज्ञानेश्वरी वाचा. शब्दासाठी कविता अडली असे दारिद्र्य असू नये. शब्द म्हणजे काय ते ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगेल. दुसरे, जेव्हा कविता लिहावी वाटते तेव्हा जे वाटते ते प्रथम गद्यात लिहून काढा. ते झाले की कवितेत लिहा. काही बदल हवा वाटला तर तो पुन्हा गद्यात लिहा.. पुन्हा त्यानुसार कवितेत बदल करा..”

दुसरे दुर्गाबाई भागवतांचे सांगणे…..

बोलता बोलता त्यांनी विचारले, ” सध्या काय वाचताय?”

” तसे विशेष काही नाही..”

यावर त्या उत्तरल्या, ” पण जे वाचता त्याचे टिपण ठेवता ना?…”

“नाही हो..” असे उत्तरताना इंदिराबाई गुदमरल्याच !….  पुढे बाई सांगतात….. .

“आणि मग एक अद्भुत झाले ! त्यांनी मला क्षुद्र, अडाणी ठरवले नाही. त्या मला म्हणाल्या,  “ कसे वाचन करावे, मी सांगते…” असे म्हणत त्यांनी कागद पेन घेतले, त्यावर रेघा ओढून खण पाडले आणि त्या सांगू लागल्या. अगदी मनापासून व जिव्हाळ्याने.

त्यांच्या सांगण्याचा तपशील आठवत नाही, पण सारांश असा होता……

“ वाचन नेहमी जाणीवपूर्वक करावे. कोणतेही पुस्तक वाचा, शेजारी एक वही ठेवावी. त्या पुस्तकातील आवडलेले, न आवडलेले मुद्दे नोंदवावेत. त्यावरचे आपले मत नोंदवावे. झाल्यावर एकूण पुस्तकाविषयीचे मत नोंदवावे. ही नोंद स्वतंत्र करावी; व मागील नोंदी व ही नोंद तपासून लेखनाविषयीचे तुमचे निष्कर्ष नोंदवावेत. मग एकूण पुस्तकाचे एक स्वतंत्र टिपण या साऱ्यावरुन करावे. तुम्ही कविता अशा तऱ्हेने वाचा. बघा तरी !”  इतके तपशीलवार त्यांनी मला सांगितले ! त्या विदुषी खऱ्याच !”

तिसरे वि.स.खांडेकर…

एकदा ते म्हणाले, ” तुम्हाला मी एक काम सुचवणार आहे. तुम्ही कविता प्रत्यक्ष कागदावर उतरू लागलात की, हे करायचे. एका वहीत तारीख टाकून त्या दिवशी सुचलेल्या ओळी, कविता लिहायची. पुन्हा त्यात काही भर पडली, बदल झाले, तर पुन्हा तारीख टाकून पुढच्या पानावर लिहायचे. मागच्या ओळींसकट. क्रम बदलला, शब्द बदलले तर त्याचीही नोंद करायची. मथळे बदलले वा काहीही काम त्या कवितेवर केले तरी ते नोंदवायचे. अशी ती कविता- रचनेची डायरी ठेवायची.. अगदी प्रामाणिकपणे. तुम्ही हे करु शकाल म्हणून सांगतो. हे काम समीक्षेला पुढे नेणारे आहे….”

“या साऱ्या सूचना मी सहीसही अमलात आणल्या असे नाही. पण ही तीन ऋणे माझ्या मनात बिल्वदलांसारखी टवटवीत आहेत. या सूचनांचा गाभा मी आत्मसात केला आहे. माझ्या लेखनप्रवासाची वाटचाल या प्रकाशकिरणांनी थोडीफार उजळली आहे, हे निश्चित.”

हे वाचल्यावर पुन्हा प्रकर्षानं आपल्या तोकडेपणाची जाणीव झाली !

वाटलं की उत्स्फूर्तता, सहजभाव, लालित्य हे सारं जपूनही शास्त्रशुध्द पध्दतीने लिखाण विकसित करता येऊ शकतं, तसं ते केलं पाहिजे .

एखादा कसलेला नट त्याच्या नैसर्गिक जिवंत अभिनयाचा प्रभाव पाडतो, तेव्हा त्यामागे त्याची शास्त्रशुद्ध मेहनत असते. गायक रियाज करतो, ताना पलटे घोटतो, तसे लेखक, कवी म्हणून आपण काय करतो ?

तर या इंदिराबाईंच्या बिल्वदलानं असं विचारात पाडलं !

लेखिका – सुश्री विनिता तेलंग

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गरज सरो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ गरज सरो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

याही गोष्टीला खूप खूप वर्षे झाली.

सहज मनात आले, काय करत असेल सरोज आता? माझ्या दवाखान्यात ते कुटुंब नेहमी येणारे.

मी त्यांची फॅमिली डॉक्टर होते. त्यांच्या तिघी मुली,औषधाला यायच्या. दिसायला देखण्या. कॉन्व्हेंटमध्ये अगदी हौसेने घातलेले आईवडिलांनी.

परिस्थितीही छानच होती त्यांची. आईवडील नोकरी करत आणि या बहिणी आपले शाळा-कॉलेज सांभाळून

घराकडेही लक्ष देत.

 त्यादिवशी रंजूताई, म्हणजे मुलींच्या आई सरोजला घेऊन आल्या. “ ताई, सरोजला खूप खोकला झालाय हो.

आज आठ दिवस खोकतेय आणि डॉक्टरकडे चल म्हटले तर नकोच म्हणतेय. जरा चांगले औषध द्या तिला.”

 मी म्हटले, “ सरोज, वजन किती वाढलंय ग तुझं .काही व्यायाम करतेस  की नाही? “ 

 बोलत बोलतच मी तिला टेबलावर घेतले. स्टेथोस्कोप  छातीवर ठेवायला  घेणार, तर मला भलतेच दृश्य दिसले.

सरोजचे पोट केवढे मोठे झाले होते. मी नीट तपासले. मला चक्क बाळाचे हृदयाचे ठोके ऐकू येत होते. सरोज जवळजवळ आठ महिन्यांची गर्भवती होती.

 तिने माझी नजर चुकवली.

“ सरोज,हे काय?? तुला कल्पना आहे ना,हे काय झालेय याची?”

  मी हात धुवून बाहेर आले. तिच्या आईला म्हटले, ” सरोजला काय झालंय याची कल्पना आहे का तुम्हाला? ”

“ नाही हो बाई. काही गंभीर झालंय का.” 

“ रंजूताई, तुम्हाला मुद्दाम करताय म्हणू, का समजत नाही म्हणू .सरोजला दिवस गेले आहेत,आणि तिला आठवा महिना चालू आहे.आता पूर्ण डिलिव्हरी करण्या शिवाय इलाजच नाही. मी म्हणते , सरळ लग्न का लावून देत नाही जो कोण असेल त्याच्याशी? ” 

त्या एकदम पांढऱ्याच पडल्या. “अहो काहीही काय. कारटे, अग काय बोलताहेत या डॉक्टर बाई? मला कसे समजले नाही? “ त्या जोरजोरात रडू लागल्या.

 सरोजने सांगितले, की  चार महिने training ला आलेला  आणि त्यांच्याच घरी राहिलेला तिचा सख्खा चुलतभाऊ होता तो.

“ अहो मग आता द्या लग्न लावून.” 

त्यावर ती म्हणाली, “ मी नाही लग्न करणार त्याच्याशी. दारुडा आहे तो.”

रंजूताई म्हणाल्या, “ अहो,सख्ख्या चुलत भावाशी कोणी लग्न करते का? आमच्या घरी हे चालणारच नाही.” 

“ अहो, मग  हे आधी नव्हते का समजत? आणि आठ महिने गप्प बसलीस तू, हो ग? आणि तुझ्या संमतीनेच ना हे घडले? रंजूताई, चूक तुमचीही आहे. लांबून सुद्धा समजते दिवस असलेली बाई. तुम्हाला समजू नये हो?

काय म्हणावे तुम्हा मायलेकींना…. “ मीच हादरून गेले होते हा प्रकार बघून.

त्या घरी गेल्या. दुसऱ्याच दिवशी सरोजचे वडील भेटायला आले. त्यानी विचारले, “ बाई, काय करू मी…. 

तोंड दाखवायला जागा नाही ठेवली हो .तुम्हीच मार्ग सांगा.” ते माझ्या पायाशी वाकले.

“ अहो असे काय करता ? आपण तिची डिलिव्हरी करूया. दुसरा उपायच नाही. मग ते बाळ नाईलाजाने एखाद्या चांगल्या संस्थेला देऊ. ते देतील दत्तक, चांगल्या आई बापाना. काय हो हे….  इथे लोकांना मूल होत नाही म्हणून  लोक रडतात. माझ्याचकडे मी रोज देतेय किती जोडप्याना  ट्रीटमेंट… आणि इथे बघा. काय देव तरी.” 

मी हताश होऊन बडबड केली. मला आश्चर्य वाटत होते, ‘कमाल आहे हो या मुलीची. काय केले असते हिने?

मी जर तपासून सांगितले नसते तर?’

  त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचे renovation चालले होते. म्हणून मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे तिची  डिलिव्हरी करायचे ठरवले. माझ्या सरांना ही सगळी कल्पना मी देऊन ठेवलीच होती. पुढच्याच आठवड्यात त्यांचा फोन आला.“ तुझी सरोज पेशंट आली आहे. ये तू.”

 मी लगेचच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. सरोजला चांगल्याच कळा येत होत्या. एवढ्या मरण यातना होत असतानाही ती हू का चू करत नव्हती.

 सरोज ने एका मुलाला जन्म दिला. आठ पौंडी मुलगा होता तो.

 तिने एक रुपयाचेही औषध,टॉनिक काहीही न घेतासुद्धा ते इतके सुदृढ मूल जन्माला आले होते.

  मी, आमचे डॉक्टर सर, त्यांच्या डॉक्टर मिसेस, सगळे हळहळलो.

 बाई म्हणाल्या, “ काय ग ही  देवाची  लीला तरी.  मूल व्हावे म्हणून दोन बायकांची  केवढी मोठी  precedure कालच केली आम्ही. त्या तळमळत आहेत,मूल मूल करत. सरोज, काय करून बसलीस बाई.”

सरोजने ते बाळ बघितले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, आणि म्हणाली, “ न्या त्याला. देऊन टाका.” 

   आम्ही सगळे थक्क झालो. तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता, की केलेल्या कृत्याचा पश्चाताप.

मीच अतिशय हळहळले. सरांना म्हटले की ‘ किती गोजिरवाणे बाळ आहे हो हे. काय पाप या बिचाऱ्याचे.

कोण दत्तक नेईल, कुठे जाईल….. ‘ ते बाळ मजेत मुठी चोखत पाळण्यात पडले होते.

आधीच ठरवलेल्या आणि सर्व माहिती देऊन ठेवलेल्या संस्थेला मी फोन केला. एका तासात त्यांच्या सोशल वर्कर बाई आल्या. त्यांच्या हातात सुंदर कपडे, बाळासाठी  छान ब्लॅंकेट होते.

त्या मायेने सरोजजवळ गेल्या. त्यांनी तिच्याकडून फॉर्म भरून घेतला….’ मूल दत्तक द्यायला आपली हरकत नाही, मग ते परदेशात पाठवायलाही माझी परवानगी आहे,’ असा बराच मोठा फॉर्म होता तो.

 सरोजने सह्या केल्या.

 “ बाळा, तुला याचे काही नाव ठेवायचे आहे का?” त्यांनी तिला विचारले.

सरोज कडवट हसली. 

“ कसले नाव ठेवताय. नकोसा असताना आला जन्माला.. कर्णासारखा. ठेवा करण नाव त्याचे.”

तिने मान फिरवली. त्या बाई, मी,आमचे डॉक्टर हतबुद्ध झालो.

सर म्हणाले, “ अग, इतकी वर्षे मी हॉस्पिटल चालवतोय, पण अशी  पेशंट नाही बघितली.”

 आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रु होते, पण सरोज मात्र निर्विकार. तिची आई ते बाळ मांडीवर घेऊन टाहो फोडून रडत होती.

 संस्थेच्या बाई ते बाळ घेऊन गेल्या. आम्हाला म्हणाल्या, “ तुम्ही काळजी नका करू. आमच्याकडे दोन दोन वर्षे वेटिंग लिस्ट असते मुलांसाठी. हे बाळ चांगल्या घरी देऊ आम्ही. नशीब असेल तर जाईलही परदेशात. कल्याणच होईल त्याचे.” 

दुसऱ्याच दिवशी सरोज डॉक्टरांना विचारून घरी निघून गेली. “ अग थांब एखादा दिवस,” असे म्हटले, तरी  न ऐकता गेलीच ती. त्या नंतर ते कुटुंब मला कधीच भेटले नाही.

 

  —-अशीच कधीतरी मलाच आठवण येते,

काय झाले असेल पुढे त्या बाळाचे?…. 

सरोजने लग्न केले असेल का?….. 

पण याची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत.

त्या  लोकांनी, माझी गरज संपल्यावर माझ्याशी सम्बन्धच ठेवला नाही!!!

‘ गरज सरो,वैद्य मरो,’ हे माझ्या बाबतीत तरी त्यांनी खरे ठरवले।

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares