श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ बावरे प्रेम… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
मी कलंदर हिंडणारा दशदिशा मज मोकळ्या
प्रीतीच्या पाशात का बंदिस्त मज केलेहस तू
कोण मी कुठला प्रवासी काय माझे प्राक्तन
डोळ्यातून पण बोलक्या संकेत मज केलास तू
पापण्या झुकल्या जरा अन उमटली गाली खळी
लाजरा मुखचंद्रमा तव कोरला हृदयात मी
सोडताना हा किनारा पेटतो वणवा उरी
आसवांची शपथ राणी परतुनी येईन मी
स्पर्शिले हळुवार तू अन्.. ग्रीष्म सारा लोपला
माध्यान्हीच्या जळत्या उन्हाचे चांदणे केलेस तू
याद ही रोमांचकारी नित्य राहील साथीला
निद्रिस्त तारा अंतरीच्या छेडल्या आहेस तू
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈