श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “नक्षत्रांचे देणे”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 57 ☆
☆ नक्षत्रांचे देणे ☆
ऋतू फळांचा होता, झाड लगडले होते
खडा मारला तरिही, झाड न चिडले होते
नवी पालवी फुटली, नटले झाड नव्याने
बघून हिरवा नखरा, खग फडफडले होते
नक्षत्रांचे देणे, लतिके तुझ्याच साठी
फुले न या वेलीला, हिरेच जडले होते
अमावास्या तरीही, चंद्र कसा हा दिसला
मला पाहुनी बहुधा, तंत्र बिघडले होते
युद्ध वादळी होते, सवाल अस्तित्वाचा
अवयव हे झाडाचे, मिळून भिडले होते
फळे पक्व ही होता सारी गळून गेली
देठासोबत येथे, मुळही रडले होते
पूर्वेच्या किरणांची, वाट मोकळी केली
स्वागतास मी त्यांच्या, दार उघडले होते
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८