मराठी साहित्य – मराठी कविता – ? वांझोटी ? –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की  मातृ दिवस पर विशेष एक भावप्रवण कविता ।  स्त्री का बांझ होना अभिशाप क्यों माना जाता है। माँ सिर्फ जन्म देने वाली ही हो तो क्या पालने वाली माँ नहीं हो सकती? उत्तर आप ही दें।  )

मातृ दिवस विशेष 

? वांझोटी ?

 

जन्म नाही दिला तिनं

तरी तीच माझी आई

अनाथाला ही पोसते

आहे थोर माझी माई

 

काही म्हणतात तिला

आहे वांझोटी ही बाई

त्यांना बाई म्हणायला

जीभ धजावत नाही

 

बाळ श्रावण होण्याचं

स्वप्न पाहतोय मीही

त्यांना डोईवर घ्यावं

फिराव्यात दिशा दाही

 

मुक्ती मिळूदे मजला

त्यांच्या ऋणातून थोडी

त्यांच्या पायात असावी

माझ्या कारड्याची जोडी

 

© अशोक भांबुरेधनकवडी

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? सज्ञान रंग ? –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? सज्ञान रंग ?

(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की  एक भावप्रवण कविता ।  )

 

रंगात कोरड्या मी भिजणार आज नाही

रंगात ओल ज्या ते गालास लाव दोन्ही

 

ठेवीन हात धरुनी हातात मीच क्षणभर

तो स्पर्श मग स्मृतींचा राहो सदैव देही

 

छळतील डाग काही सोसेल मी तयांना

हे रंग जीवनाचे नुसते नको प्रवाही

 

ते रंग कालचे तर बालीश फार होते

सज्ञान रंग झाला सज्ञान आज मीही

 

जातीत वाटलेले आहेत रंग जे जे

ते रंग टाळण्याची मज पाहिजेल ग्वाही

 

ते पावसात भिजले आकाश सप्तरंगी

त्यातील रंग मजवर उधळून टाक तूही

 

रंगात रंग मिळता जन्मेल रंग नवखा

येथे नव्या दमाने खेळेल रंग तोही

 

© अशोक भांबुरेधनकवडी

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता/गजल – ☆ आजवर ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

? आजवर ?

 

(सुश्री प्रभा सोनवणे जी  हमारी  पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं ।  प्रस्तुत है e-abhivyakti के विशेष अनुरोध पर लिखी सुश्री प्रभा जी की एक बेहतरीन मराठी गजल।)

 

मोरपंखी स्वप्न माझे फक्त विरले आजवर

हेच माझ्या जीवनाचे सार ठरले आजवर

 

ना तुला जाणीव झाली सोसले मी काय ते

कोण जाणे येथ कैसे दिवस सरले आजवर

 

दोष ना देते तुला वा दोष नाही प्राक्तना

जे मिळाले त्यात आहे  मी बहरले आजवर

 

मी फुलाना काय सांगू जखम करता मज तुम्ही

वार त्यांचे काळजावर घेत फिरले आजवर

 

जे नको होते मुळी ते ही करावे लागले

तू मला प्रत्येक वेळी गृहित धरले आजवर

 

कोवळे वय येत नाही फिरुन माघारी कधी

मी कुठे आई तुझे ते बोट स्मरले आजवर

 

लोक किल्ले बांधती वाळूत, बांधो बापडे

सागरा मध्ये स्वतःच्या मस्त तरले आजवर

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? पेच आहे ? –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? पेच आहे ?

(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की  एक भावप्रवण कविता ।  )

 

का तडकली काच येथे ?

आरशाला जाच येथे

 

भास्करा तू दूर तेथे

जाळते मज आच येथे

 

सांग मी बोलू कशाला

मौन माझे वाच येथे

 

चाकरी देवा तुझी ही

का स्विकारू लाच येथे ?

 

चार बोटे स्वर्ग उरला

का रडावी टाच येथे ?

 

स्वर्गलोकी पुण्य न्या हो

पाप फेडा ह्याच येथे

 

मोह माया सोडवेना

पेच आहे हाच येथे

 

© अशोक भांबुरेधनकवडी

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ अक्षय तृतीया ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ अक्षय तृतीया ☆

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  अक्षय तृतीया पर्व  पर रचित कविता “अक्षय  तृतीया “।)

 

अक्षय सुखाची       वैशाख तृतीया

पर्वणी साधुया         मुहूर्ताची ….!

 

शुभदिन योग           शुभ मुहूर्ताचा

दानधर्म साचा          फलदायी. …!

 

गहू, हरभरे              जवस नी सातू

दानधर्म हेतू             साधियेला. …!

 

पितृश्राध्द कर्म         मिष्टान्न भोजन

हवन, तर्पण             लाभदायी. ….!

 

जडजवाहीर             सुवर्ण लंकार

शुभकार्य द्वार            उघडिले.. . !

 

स्नेहबंध वृद्धी         नामजप सिद्धी

अक्षय प्रसिद्धी         सामावली.

 

अक्षय तृतीया          शुभारंभ योग

कर्मफल भोग           अविनाशी. . . . !

 

चैत्रगौरी सण           आनंदी सांगता

समृद्धी मागुता         प्रवेशली.. . !

 

संकल्प  आरंभ          आनंद वर्धन

सौभाग्य दर्पण           अंतरात . . . . !

 

अक्षय तृतीया            ठेवा मांगल्याचा

कर्म साफल्याचा         शुभदिन. . . . . !

 

सुख, स्नेह, शांती      अक्षय रहावी

त्रिसूत्री जपावी         स्नेहमयी.

 

विजय यशवंत सातपुते, पुणे.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ भक्तिगीत ☆ – सुश्री विजया देव

सुश्री विजया देव

☆ भक्तिगीत ☆  

(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री विजया देव जी  का एक भक्तिगीत । )

 

अभिमान नकाे धरु मनी

मानवा हाेईल रे हानी

धन दाैलत सुख अय्याशी

ना राहिल रे तुजपाशी

लीन का न हाेशी इशचरणी  – 1

 

गर्वाची घागर रिकामी

प्रभु नामच येई कामी

सुवीचार आण रे मनी  – 2

 

रावण राजा बलवान

तरी क्षणात हरले प्राण

त्याची काही न उरली निशाणी  – 3

 

©  विजया देव

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? शिवबाचे गुणगान… ? –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? शिवबाचे गुणगान… ?

(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की  छत्रपति शिवाजी महाराज का गुणगान करती एक अतिसुन्दर कविता ।  )

 

भारतदेशी होऊन गेला राजा एक महान

एकमुखाने चला गाऊया शिवबाचे गुणगान…

 

सर्व धर्म अन् जाती त्यांना होत्या एकसमान

कधी नाही भेद केला रयतेस मानी संतान…

 

यवन स्त्रीसही माता म्हणतो राखून त्यांचा मान

माता काय पण परस्त्रीचाही होई तिथे सन्मान…

 

बाजी, तानाजी कामी आले वीर हे बलवान

राजांसाठी ठेवी मावळे हातावरती प्राण…

 

सुवर्ण फाळ करणारा राजा एकच तू रे जाण

सुवर्ण फाळ पाहुन धर्तीला वाटला अभिमान…

 

शिवशाहीला माझे वंदन आणि लवूनी प्रणाम

कवन शिवाचे गाता गाता शाहीर हा बेभान…

 

© अशोक भांबुरेधनकवडी

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ? खरा चेहरा ? –श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? खरा चेहरा ?

(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की एक अतिसुन्दर भावप्रवण कविता ।  )

 

तिच्या डोळ्यांपेक्षा

माझा तुझ्यावरच जास्त विश्वास होता

कारण…

माझा खरा चेहरा

फक्त तूच दाखवत होतास

भाव भावनांसह…

कधी कधी मी

तिच्याही डोळ्यांत शोधायचो

माझा खरा चेहरा

पण ती लागुदेत नव्हती थांग

नेमक्या क्षणी

पापण्यांचा पडदा घ्यायची खाली

आणि

ठेवायची कैद करून…

पण तुझं मात्र तसं नव्हतं

खुल्या मनाने दाखवायचास सारं

टिपायचास साऱ्या भाव भावना

जशाच्या तशा…

माझी सुखं, दुःखं, आनंद

सारं सारं मला दिसायचं तुझ्या चेहऱ्यात

कधी कधी तुझा चेहरा

वाटायचा मळकट

मी फिरवायचो आरश्यावरून बोळा

आणि काय आश्चर्य

तू करून टाकायचास

दोन्हीही चेहरे

एकसारखे स्वच्छ…

आज मात्र तू भासलास

तिच्या सारखा

रक्ताचा मागमूसही न ठेवता

किती ओरखडे काढलेस चेहऱ्यावर…

विश्वास आणि आरशाला तडे गेले

की हे असेच होणार…

 

© अशोक भांबुरेधनकवडी

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ व्रुत्त अनलज्वाला ☆ – सुश्री विजया देव

सुश्री विजया देव

☆ व्रुत्त अनलज्वाला ☆ – 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री विजया देव जी  की एक  भावप्रवण व्रुत्तबध्द  मराठी कविता।)

 

स्पंदने तुझी मला सांगती कथाच सारी

दूरदूर तू तिथे अन आस इथे अंतरी

पंचप्राण हे थकले ,वाहून मनाचे व्याप

तरीही जीव गुंतले ,तुझ्या काळजावरी

कधी न वाटे ल्यावी मी नवनवीन वसने

जीर्णॆ झाले बासनात ते शालु भरजरी

चारी बाजू जलभरला ताे सागर हाेता

परि क्षुधीत मी, हरले फिरले रे माघारी

साैख्यानीही नेहमीच कां निषेध केला?

राेजचेच दुखं तेच राेजच्या जीवनलहरी

ढाळू कां मी आसवे ?रंग मनाचे फिके

भेटण्यास,ये सजणा घे उंच भरारी।

 

©  विजया देव

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता – ☆ बहावा ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

? बहावा ?

(सुश्री प्रभा सोनवणे जी  हमारी  पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं ।  प्रस्तुत है सुश्री प्रभा जी की एक  संवेदनशील एवं भावप्रवण मराठी  कविता “बहावा।)

 

बहावा बहरलाय

भर उन्हात ,

त्याच्या बुंध्याशी —

सिमेन्ट चा फूटपाथ

आणि शेजारी

डांबरी सडक ,

माथ्यावर —

आग ओकणारा सूर्य !

वैशाख वणवा

पेटेल आता !

ही कुठली अग्निपरिक्षा देतोय हा

बहावा ??

सुरक्षित छपराखाली

फॅन च्या वा-यातही

बाहेरच्या ऊन्हाच्या

झळा जाणवताहेत मला !

खिडकीतून दिसणारा

बहावा —-

मस्त मजेत झेलतोय

दाह आणि त्याच्या

सावलीत —

कुणी सरबतवाला

तहानलेल्या

पांथस्थांना

करतोय

तृष्णामुक्त !

बहाव्याची पिवळुली फुले डोलताहेत

वा-यावर तृप्ततेने !

खिडकीच्या आत

मी कासावीस !

न्याहाळतेय निसर्गसोहळा !

बहावा बहरलाय

भर उन्हात मग मी का

कोमेजावं

सावलीतही?

हा संदेश पाठवतोच

बहावा —

बहरण्याचा, फुलण्याचा, फुलवण्याचा !

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

Please share your Post !

Shares
image_print