सुश्री ज्योति हसबनीस

? अनोखे नाते ?
(संभवतः विश्व में ऐसा कोई भी मनुष्य नहीं होगा जिसका पुस्तकों से परोक्ष या अपरोक्ष न रहा हो। सुश्री ज्योति हसबनीस जी e-abhivyakti के प्रारम्भिक साहित्यकारों में से एक हैं, जिनका साहित्यिक सहयोग अविस्मरणीय है। आपकी यह कविता हमें बचपन से हमारे पुस्तकों से निर्बाध सम्बन्धों का स्मरण कराती हैं।)
पुस्तकांशी नातं लहानपणीच जडलं
चांदोबा वेताळ कुमार ने घट्ट घट्ट केलं
पऱ्यांच्या राज्यात मुक्त संचार
तर कधी जादुच्या सतरंजीवर होऊन स्वार किर्र जंगल घातले पालथे तर ऐटीत चढलो डोंगरमाथे ,
कधी मैफल जमली हिमगौरी अन् सात बुटक्यांची
तर चाखली गंमत फास्टर फेणेच्या सायकल शर्यतीची
तिरसिंगरावाच्या कुस्तीत हरवून गेलो
तर मॅंड्रेकच्या संमोहनात हरखून गेलो
ब. मों. नी साकारलेल्या शिवशाहीने मोहून गेलो
तर ह. ना. आपटेंच्या सूर्यग्रहणाने दु:खी झालो
बोकिल द. मांच्या मिष्कीलीत खळाळून हसलो तर पुलंच्या हसवणूकीत पार विरघळलो
विंदा, बोरकर, शांताबाईंच्या कवितेचे सूरच आगळे होते
कुसुमाग्रजांच्या कुंचल्याचे देखील आगळेच रूप होते
पुस्तकांतलं जग, जगातल्या जाणीवा
झिरपत झिरपत तनामनात रूजल्या
चराचराशी अनोखं नातं जोडत्या झाल्या
आजही माझ्या एकांती मी एकटी कधीच नसते
पुस्तकाची मला लाखमोलाची सोबत असते
तीच माझा सखा सोबती प्रियकर होतात
आणि जीवनाचे अनोखे धडे मला देतात
माझे अश्रू, माझे हास्य,
माझे कुतूहल, माझी खळबळ
सारं काही ह्या पुस्तकांभोवतीच
माझी जिज्ञासा, माझी ज्ञानलालसा
माझा लळा, माझा विरंगुळा
सारं काही ह्या पुस्तकांच्या संगतीच
अंतरीचे मळभ असो,
की मनमोराचा झंकार
पुस्तकांचा त्यांस तत्पर रूकार
वाटते ही सोबत जन्मजन्मांतरी लाभावी
पुस्तक वाचता वाचता पल्याडची हाक यावी ….!
© सौ. ज्योति हसबनीस