श्री नंदकुमार पंडित वडेर
☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
…आम्ही भाजी मंडईतून घरी निघालो होतो… अर्थात आम्ही म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको… गद्दे पंचवीशीचा माझा बहर लग्नाच्या दशकपूर्ती दरम्यान केव्हाच उतरलेला… आणि हिचा गरगरीत बहरलेला… तिच्या हाताला पैश्याने भरलेल्या पाकिटाचाच भार तेव्हढाच सहन व्हायचा आणि माझा पैश्याचं पाकिट सोडून बाकी सगळ्याचा भारच उचलून उचलून हर्क्युलस झालेला…त्या भाजीने भरलेल्या दोन जड पिशव्यांचे बंदानीं माझ्या हाताला घातलेले आढेवेढे …तर माणसानं सुटसुटीत कसं जगावं याचाच आर्दश जगापुढे ठेवायला हिचं पाऊल नेहमीच पुढे पुढे…. आणि हो भाजीवरुन आठवलं अहो त्या भाजी बाजारात मला ये पडवळ्या नि हिला ढब्बू मिरची या नावानेच ओळखतात.. अहो त्यांना मी सतत डोळे मिचकावून ‘ असं निदान आमच्या समोर तरी म्हणून नका ‘ असं ज्याला त्याला डोळ्यांच्या सांकेतिक भाषेत सांगू पाहत राही.. पण ते टोमणे ऐकून ज्याला त्याला हि मात्र रागाने डोळे वटारून बघत असते.. आणि चुकून माकून त्याचवेळी मी करत असलेल्या नेत्रपल्लवीकडे तिचे लक्ष गेलेच तर डोळे फाडून फाडून बघते हा काय पांचटपणा चालवलाय तुम्ही असे कायिक आर्विभाव करते… आता एकदा हिच्या बरोबर लग्न करून पस्तावा पावल्यावर लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वासच उडाला असताना आणि इथून तिथून बायकांची जात शेवटी एकच असते तेव्हा खाली मान घालून चालणं ठरवल्यावर पुन्हा मान वर करून दुसऱ्या स्त्री कडे बघण्याचा सोस तरी उरेल का तुम्हीच सांगा! तरी पुरूष जातीचा स्वयंभू चंचलपणा कधीतरी डोकं वर काढतोच… आणि तशी एखादी हिरवळ नजरेला पडलीच तर माझा मीच अचंबित होतो… अहो तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या त्या घराच्या वाटेवर एक सुंदरशी बाग आहे… रोज संध्याकाळी तिथं प्रेमी युगुलांचा नि कुटुंब वत्सलांचा जथ्था जागोजागी प्रेमाचे आलाप आळवताना दिसतात ना डोळ्यांना.. अगदी सहजपणे… कितीतरी मान वळवून दुसऱ्या दिशेला पाहायचा प्रयत्न केला तरी… मनचक्ष्चू तेच तेच चित्र दाखवत राहतात… मग वाटायचं आपलं मनं शुद्ध भावनेचं आहे यावर आपला विश्वास असताना कशाला उगाच दिसणाऱ्या सृष्टीला दृष्टिआड जबरदस्तीने करा… प्रत्येकाची आपापली तर्हा असते आपलं प्रेम व्यक्त करण्याची… करू देत कि बिचारे… आपल्याला हे सुख मिळालं नाही याची खंत करण्यापेक्षा ते प्रेमी युगुल किती नशीबवान आहे.. कि त्यांच्या वाट्याला काटे नसलेला गुलाब आला… आणि आपल्याला गुलाब तर कधीच कोमेजून, सुकून गळून गेला आणि हाती फक्त काटेच काटे असणारा देठ मिळाला… असा मी काहीसा मनातल्या मनात विचार करत तिथून चाललो असताना मधेच हिने माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहिले आणि ती सुद्धा मनात विचार करू लागली… काय पाहतायेत कोण जाणे आणि कसल्या विचारात पडलेत काही कळत नाही.. इथं कशी जोडप्यानं बसलेले प्रेम करतात ते बघून घ्या म्हणावं.. अगदी तसच नसलं तरी बायकोवर कसं प्रेम करावं ते बघून तरी माणसानं शिकायला करायला काय हरकत आहे म्हणते मी… आणि मी एव्हढी घरात असताना जाता येता दुसऱ्यांच्या बायकांकडे बघणं शोभतं का या वयाला…
बराच वेळ मी माझ्या तंद्रीत होतो हे पाहून हिने माझी भावसमाधी कोपराची ढूशी देऊन भंग केली आणि वरच्या पट्टीत आवाज चढवून म्हणाली… “बघा बघा तो नवरा आपल्या बायकोवर मनापासून कसं प्रेम करतोय आणि ती देखील छान प्रतिसाद देतेय… तुम्हाला कधी माझ्याबाबतीत असं जमलयं काय?… नेहमीचं एरंडाचं झाड असल्यासारखं तुमचं वागणं… “
माझ्यातल्या पुरूषार्थाला तिने चुनौतीच दिली…मग मीही ती संधी साधली तिला म्हटले ” तुला जे दिसते ते कुठल्याही बाजूनें खरं नाहीच मुळी… एकतरं ते खरे नवरा बायको नसावेत, आणि दुसरे त्यांचे दोघांचे आपापले जोडीदार कुणी वेगळेही असू शकतात…प्रियकर प्रेयसीचं युगुल प्रेम करत आहेत तेच उद्या त्यांचं लग्न झाल्यावर आपल्या जागेवर ते नक्कीच दिसतील… भ्रभाचा भोपळा फुटायाचाच काय तो अवकाश… आणि शेवटचं लांबून कोणीतरी त्यांच्या या लवसिनचं शुटींग करत असणार.. कि या सिनसाठी त्यांनी पैसे घेतले असणार… हे विकतचं दिखाऊ बेगडी प्रेम पडद्यावर दाखवतात त्यावर तू भाळून जाऊ नकोस.. आणि तुला जर मी अगदी असच तुझ्यावर प्रेम करावसं वाटत असेल तर मला थोडी तुझ्यापासून सुटका कर बाहेर प्रेमाचे धडे गिरवायला मला नवी प्रेयसीचा शोध घेतो ते धडे शिकल्यावर मग तुझ्यावर प्रेमच प्रेम करत राहिन… “
माझं म्हणणं तिच्या पचनी पडणारं नव्हतचं मुळी.. तिने इतक्या झटक्याने मला म्हणाली “काही नको बाहेर वगैरे जायला तुम्ही जितकं प्रेम सध्या दाखवताय ना तितकसचं पुरेसे आहे मला… घरी तरी चला मग बघते तुमच्या कडे…म्हणे मला नव्याने प्रेयसी शोधायला हवी.. “
आमचा सुखसंवाद चालत असताना माझ्या मनाला सारखी ‘काटे नसलेला गुलाब मात्र दुसऱ्यांना मिळतो आणि मला मात्र गुलाब हरवलेला टोकदार काट्याचा देठच हाती यावा..’ हि सल सतत बोचत राहिली…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈