काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही…
मग डोळेच येतात धावून नि भावनेचा ओघ घेतात सामावून.. क्षणभर होते त्यांची कालवाकालव अन आसवांची करतात जमवाजमव..
तरारलेले अश्रू पूर्ण डोळे एकेक थेंब ओघळू लागतात..
पाहशील का एकदाच डोळयात माझ्या,दिसतेय का तुला अर्थपूर्ण हळवी भावना असे मुके हुंदके सांगत असतात.. ओथंबलेली डोळ्यातली आसवं पापणीच्या किनाऱ्यावर जलबिंदूची नक्षी काढतात..
अन तर्जनी नकळत फिरते तिथे अलगद अलवारपणे टिपून घेते किनाऱ्यावर साचलेले अश्रूबिंदू…
एखादा उन्मळून वाहिलेला भावनेचा कड गालावरून जेव्हा स्यंदन करत ओघळतो..
भर भावुकतेचा वाहून गेला तरी सल त्याचा उरी टोचतच राहतो…
आणि आणि या आवेगाची आठवण जेव्हा जेव्हा त्या क्षणाला येते तेव्हा तेव्हा ही अशीच आसवांची रिमझिम बरसून जाते…
मन गलबलून येते नि…
काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही.
“..हाच आपला मार्ग बरोबर असेल ना ? ही शंका का आली बरं तुला?”
“..इतका मजल दरमजल करीत प्रवास करून मध्य गाठलास आणि आता या वाटेवरून पुढची वाटचाल करण्यास घुटमळतोस का ?.”
“…निर्णय तर त्यावेळी तूझा तूच घेतला होतास! याच वाटेवरून जाण्याचा आपलं इप्सित साध्य इथेच मिळणार असा आत्मविश्वासही त्यावेळी तुझ्या मनात होता की!”
“..ते तुझं साध्य गाठायला किती अंतर चालावे लागेल, त्यासाठी किती काळ ही यातायात करावी लागेल याचं काळ काम नि वेगाचं गणित तूच मनाशी सोडवलं होतसं की! उत्तर तर तुला त्यावेळीच कळलं होतं .”
.”. वाटचाल करत करत का रे दमलास!, थकलास! इथवर येईपर्यंत चालून चालून पाय दमले..आता पुढे चालत जाण्याचं त्राण नाही उरले..”
“..घे मग घटकाभर विश्रांती.. होशील पुन्हा ताजातवाना, निघशील परत नव्या दमाने. काही घाई नाही बराच आहे अवधी .”
“.ही काय कासव सश्याची स्पर्धा थोडीच आहे? अरे इथं कुणी हारत नाही किंवा कुणी जिंकत नाही. कारण हा आहे जीवन प्रवास आदी कडून अंता कडे निघालेला.. “
“..पण पण कुणालाही न चुकलेला. जो जो इथे आला त्याला त्याला याच वाटेवरून जावं लागलंच.. हा प्रवास मात्र ज्याला त्याला एकटयालाच करावा लागतो.. “
.”.साथ सोबत मिळते ना घडीची पण निश्चित नसते तडीची. “
“..तू पाहिलेस की कितीतरी जणांचे चालत गेलेल्यांचे पावलांचे ते ठसे , त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूनच तू ही चालत निघालास .काही पावलंं तुझ्या बरोबरीने चालली त्यात काही भरभर पुढे निघून गेली तर काही मागे मागेच रेंगाळली.. “
“..पण तू ठरवलं होतसं की आपण चालायचं अथक नि अविरत त्या टप्यापर्यंत..आणि हे ही तू जाणून होतास या वाटेने जाताना चालणे हाच एकमेव पर्याय आहे इथं दुसरं वाहन नाही मुळी. “
.”.आशा निराशेच्या दिवस रात्री दाखवत असतात मैलाचा टप्पा
..सुखाच्या सावलीचे मृगजळ दुःखाच्या उन्हात कायम चमचमते दिसते.. “
“..आल़ं हातात म्हणत म्हणत उर किती धपापून किती घेतेय याचं भान नसतयं.. “
“..दुतर्फा घनदाट वृक्षलता लांबवर पसरत गेलेल्या त्या लपवून ठेवतात संकटानां दबा धरुन बसवतात.. “
“..खाच खळगे प्रतिकुलतेचे नि समस्यांचे दगडधोंडे वाटेवर जागोजागी पसरलेले असतात तुझ्याशी सामना करण्यासाठी डोकं उंचावून..,”
“..कुठे उंच तर कुठे सखल, कुठे वळण तर कुठे सरळ, कुठे चढण तर कुठे उतार.. यावर चालूनच व्हायचं तुला पैलपार.. ही आहे तुझी जीवन वाट .. ”
आणि आणि माझी…
“.. मी आहे हा असाच ना आदी ना अंताचा माझा मलाच ठावठिकाणा नाही.. “
.”. कशा कशाचंच मला सोयरसुतक नाही… आणि कशाला ठेवू म्हणतो ते तरी.. “
“किती एक आले नि गेले किती एक अजूनही चालत राहिलेत.. आणि उद्याही कितीतरी येणार असणार आहेत… हीच ती एकमेव वाट आहे ना सगळ्यांची.. “
“.. आणि आणि माझा जन्मच त्यासाठी आहे तो सगळयांचा भार पेलून धरण्यासाठी.. “
“कोवळया उन्हाचे किरणाचे कवडसे गुदगुल्या करतात माझ्या अंगावर… दवबिंदूचे तुषार नाचतात देहावर.. ओले ओले अंग होते नव्हाळीचे न्हाणे जसे..चिडलेला भास्कर चिमटे काढतो तापलेल्या उन्हाने… दंगेखोर वारा फुफाटयाची माती उधळून लावतो भंडाऱ्यासारखी.. मग रवी हळूहळू शांत होत केशर गुलाबाच्या म्लान वदनाने मला निरोप देतो.. अंधाराचा जाजम रात्र टाकत येते… चांदण्याच्या खड्यांना चमकवित चंदेरी रूपेरी शितल अस्तर पसरवते..अंधारात बागुलबुवा झाडाझुडपांच्या आडोशाला दडतो… मी मी असाच पहुडलेला असतो.. दिवस असो वा रात्र मला काहीच फरक पडलेला नसतो… कारण मला तर कुठेच जायचं वा यायचं नसतं..”
“..माझं कामं प्रवाश्यांच्या पदपथाचं असतं. .”
“.. मी आहे हा असाच ना आदी ना अंताचा अक्षय वाटेचा…”
जिकडे पाहावे तिकडे घरभर पुस्तकेच पुस्तकं पसरलेली असतात. अगदी दिवाणखान्यापासून, शयनकक्षापर्यंत, स्वंयपाकघरात टेबलावर इतकचं काय .. जाऊदे.. तुम्ही ओळखलं असालचं.. घरात इनमीन सहा माणसं सगळी मोठी नि पुस्तकाची वेडी.. घरात दूरदर्शन आहे पण सगळेच जण दुरुनच दर्शन घेत असतात. मीच कधी तरी हट्टाने कार्टून लावारे म्हणत असतो.. तेव्हढ्यापुरताच तो लागतो. मोठी छोटी पुस्तकं मात्र प्रत्येकाच्या हातात असतात.. एवढं काय असतं त्यात असं मी विचारलं तर मला म्हणतात, तू अजून लहान आहेस. मोठा झालास की, वाचायला लागलास की तुला कळेलचं काय असतं त्यात.. मलाही पुस्तकं हवयं असा कधी मधी मी पण हट्ट धरला कि मोठ्या मोठ्या चित्राची एक दोन पुस्तके माझ्या समोर ठेवतात.. हत्ती, घोडा, वाघ सिंह, विमान, मोटार, जहाज, पोपट, मैना, चिमणी, सगळे त्यात दिसतं ,मी पाहतो पाच मिनिटांत पुस्तकं वाचून? नव्हे पाहून हाता वेगळे होतं ..मग घरातल्यांचं तसं का होत नाही असा प्रश्न काही सुटत नाही..मग माझ्या पुस्तकाहून काही वेगळं त्यात नक्की काहीतरी असणार.. हळूच ती पुस्तकं हातात घेऊन बघण्याचा मोह अनावर होतो.. कधी कधी ती पुस्तकं इतरांच्या नकळत हाती घेऊन चाळत जातो.. शब्दांच्या ओळीवर ओळीने पानं पानं भरलेले असते.. अक्षर ओळख नुकतीच होत असल्याने एकेक शब्दाचा उच्चार करतो अर्थ आणि समज दोन्ही बाल बुद्धीच्या पलीकडे असल्याने पानं पलटलं जातं… नेमके काय असतं की ते इतकं खिळवून ठेवतं याचा शोध अजून चालूच आहे.. पण एक मात्र मला उमजलयं वेळ मात्र छानच जातो.. त्यातली अक्षरं चित्रं पाहून डोळे खिळतात आणि चेहऱ्यावर हास्य पसरतं.. मग घरातले कसे मौनात वाचता वाचता मंदस्मित करत करत मोठयानं हसू लागले दिसतात अगदी तसेच मी पण हसू लागतो… तो आवाज ऐकून आई धावत येते आणि आधी हातातलं पुस्तकं काढून घेते.. पुन्हा या पुस्तकांना हात लावू नको बरं.. नाहीतर तुला सगळे रागावतील.. मी खट्टू होतो आईवर रुसून बसतो..शहाणा माझा राजा उदया मोठा झालास कि वाचायची आहेतच हि पुस्तकं तुला.. आता जरा तुझी खेळणी घेशील खेळायला…माझं पुस्तक वाचन तिथचं संपतं..
काही गोष्टी अश्या असतात नजरेला दिसतात त्या खऱ्या तश्या नसतात मुळीच… नजरबंदी होते डोळ्यांना… आणि जे दिसतं तेच सत्य मानून बसतो… याही पलिकडं काही असेल मानायलाच तयार नसतो… जे मला तेच तुम्हालाही तसंच दिसतं समजलेलं असं कळतं तेव्हा तर आपली पक्की खात्री होते आपलं काही चुक नाही… पण इथचं तर आपण पुरते फसले जातो… होता तो भ्रभ आपला…सूर्यप्रकाशात जेव्हा सत्य उजेडात येते तेव्हा कळते भ्रमाचा भोपळा फुटला… दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं… असं नाही तर काही वेळेला तीन बाजूच कळतात आणि चौथी बाजूचा विचार शिवत नसतो मनात.. त्रिशंकूची अवस्था होते आपली… कुणी तैलबुद्धीचा करतो वेगळा विचार … अन त्यालाच समजून जातं त्याचं सारं.. हवेत तरंगत विहरत होते म्हातारीचे केस.. रवि किरणाने ते रुपेरी चमकलेले… तमा मागून येतो असाच रुप्याची उधळण करत आशेचा प्रकाश तो.. प्रत्येक दिवसाला देई नवा नवा आयाम तो.. स्वप्नांची क्षितीजं खुलवून दाखवताना सांगतो उठ झटकून टाक ती मरगळ. उचल ते पाऊल अन ध्येयाकडे नजर टाक.. निवळले भ्रमाचे धुके प्रकाशले सोने सत्याचे..
☆ नाचून गेल्या चिमण्या…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
सकाळी अंगणातल्या चिवचिवाटानं जाग आली.चिमण्यांचा थवा अंगणात गलका करत होता.चटचट चटचट किड्या मुंग्या वेचण्यात सगळ्या गुंग होत्या.आईनं शेणानं सारवलेल्या अंगणाला नुकताच लखलखीतपणा आला होता.त्या शेणातल्या किडया अळ्या आणि धान्य वेचण्यात रममाण झालेल्या चिमण्या माझी चाहूल लागताच भुरकन उडून लिंबांच्या झाडावर बसल्या आणि अंदाज घेऊन काही क्षणात पुन्हा सारवलेल्या अंगणभर पसरल्या.चिमणा चिमणीचे ते चिवचिव करत,चटचट अन्न वेचत आणि टूणटूण उड्या मारत अंगणभर हुंदडणं डोळ्यात साठवत मी बाजूला बसून पहात होतो.काही अगदी माझ्या जवळ येऊन मला निरखून पहात होत्या.मीही कुतुहलानं त्यांच्या डोळ्यात एकटक पहात त्यांचं निरागसपण टिपून घेत होतो.आपल्याच तालात नाचणाऱ्या चिमण्यांनी अंगण सजून गेलं होतं.मध्येच शेळ्यामेंढ्यांचं ओरडणं,गाईगुरांचं हंबरणं आणि कावळ्यांचं कारकारनं ऐकत..एकटक त्या अंगणाचं जीवंतपण अनुभवत होतो.बाजूला आईनं पाणी भरून ठेवलेली दगडी काटवटीत चिमण्यांची अंघोळीसाठीची धडपड आणि उडणारं पाणी कोवळया उन्हात अंगणाला सोनेरी झालर लावून जात होतं. तिथंच टपून बसलेली मनी आणि चिमण्यांचं हुंदडणं पहात दोन्ही पायावर तोंड ठेवून शांतपणे पहुडलेला काल्या होता. मध्येच अंड्याला आलेल्या करडया कोंबडीचं देवळीत उडी मारण्यासाठी चाललेली धडपड आणि फांदीवर लक्ष ठेवून टपलेले कावळे सारे काही माझ्या बनपुरीच्या घराच्या अंगणाची शोभा वाढवत होते.नुकत्याच चार पाच दिवसापूर्वी जन्मलेल्या शेळ्यांच्या करड्यांनी अंगणभर उड्या मारत चालवलेला धिंगाणा आणि सारवलेल्या अंगणात बारीक बारीक पडलेल्या लेंड्याचा अंगणभर सडा पसरलेला होता.अंगणातल्या चूलीवर काळ्याकुट्ट अंगानं डिचकीत पाणी तापत होतं.दुसऱ्या बाजूला काट्याकुट्यात भक्ष शोधणारी पंडी मांजरीन तिच्याच तालात होती.पाणी तापवत डोळं चोळत,फुकणीनं फुकत शेकत गप्पा हाणित बसलेली पोरं.असं गावाकडचं घरदार भरलं की अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी रोजच्या सकाळचं अंगण असं उजळून निघतं…..
आज चिमण्यांचं चिवचिवनं क्वचितच ऐकायला मिळतं.लहानपणी माळवदी घराच्या किलचानात चिमण्या घरटं करायच्या.घरटं बनवताना त्यांची चाललेली धांदल सारं घर उघडया डोळ्यानं बघायचं.कधी कधी घरात पसरलेला कचरा, त्यातच पडलेलं एखादं फुटलेलं अंडं आणि कधीतरी उघडया अंगाचं पडलेलं चिमणीचं पिल्लू पाहून मन हळहळायचं. चिमण्यांचं सुख आणि दुःख अनुभवत बालपण कधी सरलं समजलच नाही.चिमण्यांनी मात्र घरात आणि मनात केलेलं घरपण हटता हटलं नाही.
आज मात्र अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी मनाचं अंगण पुन्हा हरखून गेलं…..अशा अंगणभर पसरलेल्या चिमण्या पुन्हा पुन्हा मनात नाचत रहाव्यात..आणि घराचं अंगण पुन्हा सजीव होत रहावं..!
(आज अंगण हरवलेली घरं आणि चिमण्यांचं ओसाडपण मनाची घालमेल वाढवत राहते अगदी माझ्या आणि तुमच्याही.)
☆ मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… ” अगं ये! ऐकलसं का? आमच्या ऑफिसची पिकनिक निघालीय येत्या शुक्रवारी रात्री लोणावळयाला. आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत परत येणार आहे, चांगले दोन दिवस मौजमजा करुन. तेव्हा जाताना मला भडंग आणि कांदे मिरच्या बांधून देशील.. आम्ही प्रत्येकाने काय काय खाणं आणायचं तेही वाटून घेतलयं बरं.. तुला उगाच करत बसायला त्रास पडायला नको म्हणून अगदी बिना तसदीचं मी ठरवून घेतले आहे.. थंडी फार असेल वाटते आता तिकडे तेव्हा माझे स्वेटर्स, पांघरूण शिवाय दोन दिवसाचे कपडे देखील बॅगेत भरून देशील..बऱ्याच वर्षांनीं पिकनिक निघतेय. तेव्हा मी न जाऊन चालेल कसे?.. “
“.. हे काय मी एव्हढ्या उत्साहाने तुला सांगतोय आणि तू हाताची घडी घालून डोळे बंद करुन हसत काय बसलीस? कुठल्या स्वप्नात दंग झाली आहेस? मी काय म्हणतोय ते ऐकतेस आहेस ना?.. “
” हो हो डोळे बंद असले तरी कान ऊघडे आहेत बरं! झालं का तुमचं सांगुन? का आणखी काही शिल्लक आहे? नसेल तर मी आता काय सांगते ते ऐका! काय योगायोग आहे बघा! आमची महिला मंडळाची सुद्धा पिकनिक निघालीय याच शुक्रवारी रात्री लोणावळयाला,आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत परत येणार आहे, चांगले दोन दिवस मौजमजा करुन. बऱ्याच वर्षांनीं पिकनिक निघतेय. तेव्हा मी न जाऊन कसे चालेल ?. आम्हा बायकांना तुम्ही पुरुषांनी संसाराच्या चक्रात बांधून पिळून काढत आलात.. फक्त नोकरी आणि तिच्या नावाखाली आजवर आम्हाला वेठीस धरलंय तुम्ही.. रांधा वाढा घर सांभाळा, आलागेला, पोरबाळं आणि गेलाबाजार सासूरवाडीचा बारदाना झेला.. यातच आमचा जन्म वाया गेला… कधी तरी हौसमोज करायची होती.. मेली काटकसर आमच्या नशीबी पाली सारखी चिकटली ती काही सुटायचं नाव घेईना.. साधं माहेरला चार दिवस जाऊन निवांत राहिन म्हटलं तरीही ते जमेना… या उसाभरीत तो जीव कातावून गेला मग आमच्या महिला मंडळाने हा स्व:ताच पुढाकार घेतला.. आम्ही सगळया झाडून पिकनिकला जातोय म्हटलंय.. अगदी एकेकीने पदार्थ पण वाटून घेतलेत.. तयारीसुद्धा सुरू झाली… मी तुम्हांला सांगणारच होते पण म्हटलं तुम्ही काही शनिवारी रविवारी घर सोडून जाताय कुठे? जायच्या आधी एक दिवस कानावर घालू मग जाऊ.. “
“.. तेव्हा लेडीज फस्ट या न्यायाने मी पिकनिकला जाणार हे नक्की.. तुमची यावेळची पिकनिक पुढे ढकला.. नि मला पिकनिकला जायाला जरा मदत करा… आणि हो एक महत्त्वाचं या पिकनिकच्या दिवसात तुम्ही घर सांभाळणार आहात कुठलीही कुरबुर न करता समजलं.. मला कसे जमेल म्हणायचा आता प्रश्नच येत नाही.. संसाराला आता पंचवीसहून अधिक वर्षे लोटली..आता येथून पुढे संसाराची अर्धी जबाबदारी तुम्हालाही द्यायची ठरली… “
“अहो असं काय बघताय माझ्या कडे डोळे विस्फारून.? मी काही चालली नाही तुम्हाला सोडून.!. आता पन्नास टक्के हक्काचे अधिकार आमचेही आहेत त्याचाच लाभ घेणार.. आमच्या मंडळाने ही जागृती केली.. आणि आणि आम्ही सगळया बायकांनी ती आता अंमलात आणायला सुरुवात केली.. तिचा पहिला उपक्रम हि पिकनिक आहे.. तेव्हा बंच्चमजी तुम्ही इथंच थांबायचं आणि मी एकट्याने पिकनिकला जायचं.. “
मी आले, निघाले, सजले फुलले, फुलपाखरू झाले.. वेग पंखाना आला जसा, आला या लकेरी , घेतली भरारी…
☆ बाबू समझो ईशारे, हारन पुकारे पम पम… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… साठच्या दशकातील मुंबईचा हा ट्राम चा फोटो मला फेसबुकवर दिसला… मन भुतकाळात गेले… कितीतरी बालपणीच्या आठवणी त्या ट्रामशी निगडीत होत्या त्या एकेक मनचक्षूसमोर उभ्या राहत गेल्या…. मला आठवतंय ते किंग्ज सर्कल, आताचा माहेश्वरी उद्यान,ते काळा घोडा, आताचं जहांगीर आर्ट गॅलरीचा परिसर इतका तिचा प्रवासाचा पल्ला असे… हमरस्ताच्या मधोमध लोखंडी पट्ट्याच्या , रेल्वे लाईन सारख्या खाचा पडलेल्या मार्गिका होती. त्यात आठ चाकांची ट्राम खडखड करत येजा करत असे… ट्राम टर्मिनस (T.T.) म्हणून परेल टी. टी., दादर टी. टी. राणीबाग. टी. टी. सायन टी. टी. आणी फ्लोरा फाउंटन टी. टी. अशी मुख्य ठिकाणी ट्रामचा मोठा पसारा असे…ट्राम स्टेशनस होते… अधे मधे प्रत्येक नाका, चौकात, थिएटर जवळ, मार्केट जवळ स्टेशन असत…माळा असलेली, आणि नसलेली स्वरुपात ह्या ट्राम फिरत असत… दोन्ही टोकाकडे उतर दक्षिण चालक उभ्यानेच दोन्ही हातांने हॅंडल फिरवित असे.. बहुधा एक लिवरचा आणि दुसरा ब्रेकचा अशी ती हॅंडलची रचना असावी… शिवाय पायात एक नाॅब असे.. हॅन्ड गियर काम करत असे… चालक एकच आणि वाहक दोन असत… आताची लोकल आणि ट्राम जवळपास सारखी फक्त ट्राम ला डबे नव्हते… अगदी संथगतीने ट्राम धावत असे… चालत्या ट्राम मधून बऱ्याच वेळेला हवे तिथे धीराचे लोक चढ उतरतं करत असतं…मोठमोठाल्या खिडक्या, दारं, संपूर्ण लाकडाच्या बनावटीची अशी हि ट्राम एका लय पकडून धावत असे.. पाच पैसे तिकीट असताना मी प्रवास त्यातून केलेला मला चांगलाच आठवतो…रविवार सुट्टीच्या दिवशी तर दोन तास फेरफटका त्यातून केल्या शिवाय दिवस मावळत नसे.. खूप गंमतीशीर अनुभव येत असे.. हळूहळू मुंबईची वस्ती वाढू लागली आणि वाहतूकही वाढली.. रस्तावर गर्दी वाढत गेली.. रस्ते दुतर्फा वाढविण्यासाठी ट्रामची जागा बळकावली गेली आणि आणि सन 1966/67च्या आसपास ट्रामची घरघर बंद झाली…
आजही जुन्या हिंदी सिनेमात मुंबई दर्शन दिसताना ती धावणारी ट्रामची छबी पाहिली कि आठवणींची जिंगल बेल मनात कुठेतरी वाजत असते…
☆ हा माझा मार्ग एकला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
हा माझा मार्ग एकला.. आता तुम्ही कुणीच येऊ नका माझ्या सोबतीला. घेतलीय काठी माझ्या आधाराला. येथून पुढच्या प्रवासात मीच ऐकेन माझ्याच संवादाला. आपुलाच संवाद आपुल्याशी,आत्मसंवाद. करेन सारीच उजळणी गत आयुष्याची, काय मिळविण्यासाठी किती दयावे लागले याच्या जमाखर्चाची. हाती उरले ते काय आणि सोबत नेतोय काय याच्या खातरजमेची. मागे आता माझे उरले आहे इतिहासातले फक्त पिकलेले पान..तुमच्या नव्या पिढीच्या शिलेदारांना दिलाय मी जीवनाचा मंत्र खरा.. ज्यात मिळेल फक्त सात्त्विक समाधान तोच राजमार्ग धरा..तेच मला गवसले म्हणून तर या एकलेपणाच्या पथावर मन:शांतीचे दिप उजळले.. या निर्जन एकांतात देखिल मनास भीतीचा लवलेशही स्पर्शून जात नाही… आणि मनही कशातही गुंतून राहिले नाही.. सगळे काही आलबेल नव्हते जीवनात, संघर्षाविना सहजी नव्हते नशिबात.षडरिंपूच्या मातीचच देह होता माझा, भोवतालच्या माया , ममता, माणूसकिच्या संस्काराने प्रोक्षळला गेला तो.. मग मी ही त्यात वाटत चालत होतो. खारीचा माझा वाटा मी पण माणूसच होतो तर मी कसा राहावा एकटा.. परंपरेची भोयी खांद्यावर घेऊन संसाराची पालखी मिरविली. कष्टाचे उद धूप जाळले संसारा बरोबर समाजाचे मंदिरही उजाळले. नैवैधयाची भाजी भाकरी महाप्रसाद म्हणूनी वाटली..जो जो आला भेटला तोषविले त्याला त्याला..तृप्तात्मयाच्या आर्शिवादाने भरून गेली झोळी.. सुख शांतीचा बुक्का लागला कपाळी.. तोच विठूरायाने दिली वारीची हाळी.. हा मग मी निघलो सर्व संग परित्याग करुनी.हा वेड्यानो अश्रू नका आणू नयनी…हा माझा मार्ग एकला.. आता तुम्ही कुणीच येऊ नका माझ्या सोबतीला. घेतलीय काठी माझ्या आधाराला. येथून पुढचा प्रवासात मीच ऐकेन माझ्याच संवादाला.. .
.. अग थांब चारूलते! तो मनोहारी भ्रमर ते कुमुदाचे कुसुम खुडताना उडून गेला पण माझं लक्ष विचलित करून गेला. त्याकडे पाहता पाहता नकळत माझं पाऊल बाभळीच्या कंटकावर की गं पडले… आणि तो कंटक पायी रूतला.. एक हस्त तुझ्या स्कंधावरी ठेवून पायीचा रूतलेला कंटक चिमटीने काढू पाहतेय.. पण तो कसला निघतोय! अगदी खोलवर रुतून बसलाय.. वेदनेने मी हैराण झाले आहे बघ… चित्त थाऱ्यावर राहिना… आणि मला पुढे पाऊल टाकणे होईना.. गडे वासंतिका, तू तर मला मदत करतेस का?..फुलं पत्री खुडून जाहली आणि आश्रमी परतण्याच्या मार्गिकेवर हा शुल टोचल्याने विलंब होणारसे दिसतेय… तात पूजाविधी करण्यासाठी खोळंबले असतील..
.. गडे चारुलते! अगं तरंगिनीच्या पायी शुल रुतूनी बसला.. तो जोवरी बाहेर निघून जात नाही तोवरी तिच्या जिवास चैन पडणार कशी?.. अगं तो भ्रमर असा रोजचं तिचं लक्ष भुलवत असतो.. आणि आज बरोबर त्यानं डावं साधला बघ… हा साधा सुधा भ्रमर नव्हे बरं. हा आहे मदन भ्रमर . तो तरंगिनीच्या रूपावरी लुब्ध झालाय आणि आपल्या तरंगिनीच्या हृदयात तोच रुतलाय समजलीस… हा पायी रूतलेला शुल पायीचा नाही तर हृदयातील आहे… यास तू अथवा मी कसा बाहेर काढणार? त्याकरिता तो ऋषी कुमार, भ्रमरच यायला हवा तेव्हा कुठे शुल आणि त्याची वेदना शमेल बरं… आता वेळीच तरंगिनीच्या तातानां हि गोष्ट कानी घालायला हवी…आश्रम प्रथेनुसार त्या ऋषी कुमारास गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगणे आले नाही तर तरंगिनीचे हरण झालेच म्हणून समजा.
गडे तंरगिनी! हा तुला रूतलेला मदन शुल आहे बरं तू कितीही आढेवेढे घेतलेस तरी आम्हा संख्यांच्या लक्षात आलयं बरं.. तो तुझ्या हृदय मंदिरी रुतून बसलेला तो ऋषी कुमार रुपी भ्रमराने तुला मोहविले आहे आणि तुझे चित्त हरण केलयं… हि हृदय वेदना आता थोडे दिवस सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.. पाणिग्रहण नंतरच हा दाह शांत होईल.. तो पर्यंत ज्याचा त्यालाच हा दाह सहन करावा लागतो..
.. चला तुम्हाला चेष्टा सुचतेय नि मला जीव रडकुंडीला आलाय… अश्या चेष्टेने मी तुमच्याशी अबोला धरेन बरं..
हो हो तर आताच बरं आमच्याशी अबोला धरशील नाहीतर काय.. त्या भ्रमराची देखील चेष्टा आम्ही करु म्हणून तूला भीती वाटली असणारं… आता काय आम्ही सख्खा परक्या आणि तो परका ऋषी कुमार सखा झालायं ना.. मग आमच्याशी बोलणचं बंद होणार…
.. चला पुरे करा कि गं ती थट्टा..आश्रमाकडे निघायचं पाहताय की बसताय इथंच . ..